☆ जीवनरंग ☆ सरलावहिनी ☆ सौ अंजली गोखले ☆
सरला वहिनी, आमच्या गल्ली मधले एक धमाल व्यक्तिमत्व ! गोऱ्या गोऱ्या पान अन् वजनदार. चालताना थुलथुलीत दंड हलायचे. चार पावले चालल्या की दम लागायचा. पण त्याही अवस्थेत बोलायची हौस दांडगी. बोलण्यातून, वागण्यातून सहज घडणारा विनोद त्यांच्या लक्षातही येत नसे.
एकदा सकाळी उठल्या बरोबर घरातली साखर संपल्याचे लक्षात आले. पिशवी अन् पर्स घेऊन दुकानाकडे धावल्या. दुकानाची पायरी चढता चढता दम लागलेल्या आवाजात दुकानदाराला म्हणाल्या, “लांबूनच पाहिलं मी तुम्ही उघडे आहात ते. बर झालं बाई तुम्ही उघडे आहात.” दुकानदाराला हसावे की रडावे समजेना. तेवढ्यात तिथली एक मुलगी म्हणाली,” काकू, तुम्हाला दुकान उघडे आहे असे म्हणायचेय ना?” “तेच ते! द्याहो मला साखर लवकर. चहा झाला नाही अजून”. सरलावहिनी म्हणाल्या. आपल्या बोलण्याने घडलेल्या विनोदाकडे साफ दुर्लक्ष्य केलं त्यांनी.
असेच एकदा सरलावहिनींचे मिस्टर बाहेर गेले असताना मिस्टरांचे एक मित्र आले. सरला वहिनींना काय बोलायला कोणीही चालतं. गप्पा रंगल्या. थोड्या वेळाने च हा करण्याचे त्यांच्या लक्षात आले. “बसा हं. पटकन चहा करते.” म्हणत त्यांच्या स्पीडने उठल्या आणि त्यांच्याच स्पीडने चहाची कपबशी घेऊन आल्या. गंमत म्हणजे खुर्चित बसून आपणच तो गरमागरम चहा घेतला. समीरचे मित्र गालातल्या गालात हसत म्हणाले,”वहिनी, आता माझा मित्र आल्यावर मलाही चहा करा” “अग्गो बाई, तुम्हाला दिलाच नाही का मी चहा? खरच, हे आल्यावर करते हं” इति वहिनीबाई !
बायकांना काही ठराविक वयानंतर स्वयंपाक, खाणीपिणी, कप बशा विसळणे अगदी नको वाटते. सर ला वहिनींचे तसेच झाले. यातून सुटका मिळणार कशी? दोन्ही मुली आपल्या सासरी रमलेल्या. त्यांना आईची आठवण कामापुरती ! यांना विश्रांती – बदल कसा मिळणार? अखेर सरला वहिनींनीच एक युक्ति – काढली. “अहो, हल्ली मला खूप दमल्या सारखं होतय. छातीत धडधडतं. मी डॉक्टरांकडे जाऊन येते”. “हो का? अग इतका त्रास होतोय तर बोलली का नाही?” त्यांचेमिस्टर म्हणाले “उद्या जाऊ आपण. आज मित्राकडे जमणार आहोत आम्ही”. सरलावहिनी पटकन ठसक्यात म्हणाल्या, “उद्या नको. माझी मी आजच जाऊन येते.”
रात्री मिस्टर आल्यावर म्हणाल्या, “जाऊन आले ह. B.P. वाढलय खूप माझे. डॉक्टरांनी ८-१० दिवस बेडरेस्ट सांगितली आहे. आपण दोन वेळचा डबा लावूया.” मिस्टरांनी मान हालवली. नेमके दुसऱ्या दिवशी सकाळी फिरून येताना डॉक्टर भेटले त्यांना. डॉक्टरांकडे त्यानी सरला वहिनीच्या तब्येतीची चवकशी केली. डॉक्टर म्हणाले, “अहो, कित्येक दिवसात वहिनी आल्याच नाहीत”.
घरी आल्यावर सरला वहिनींना बोलावून मिस्टर म्हणाले, “अग आत्ताच डॉक्टर भेटले होते. तुला BPचा नाही, जास्त वजनाचा problem आहे म्हणाले. व्यायाम झटून काम आणि खाणे कमी करायला सांगितलेय.”
बिचाऱ्या सरला वहिनी. औषध गोळ्या न घेताच त्यांचे तोंड कडू कडू झाले.
©️ सौ अंजली गोखले
मो ८४८२९३९०११
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈