सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा
☆ जीवनरंग : लघुकथा – बाई – भावानुवाद सुश्री माया महाजन ☆
शहरातील झाडून सर्व महिला समित्यांनी एकत्र येऊन आयोजन केले. खूप मोठ्या संख्येने महिला एकत्रित झाल्या. कलेक्टर कमिशनर, मेयर यांच्या बायकांबरोबरच काही नेत्यांच्या पत्नीदेखील आमंत्रित होत्या.
महिलांवर होणार्या अत्याचारांविरोधात मोकळेपणी, स्पष्टपणे चर्चा झडल्या ज्यात हुंडा, कुटुंबाकडून होणारे शोषण, नोकरदार महिलांना सहकारी पुरुषांकडून होणारा त्रास, स्त्री भ्रूणहत्या इत्यादी मुद्यांवर भरपूर चर्चा झाली. या मुद्यांवर काही प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आले.
दिवसभराच्या या व्यस्ततेनंतर माधुरी जेव्हा घरी पोहोचली तेव्हा रात्र झाली होती. जेवणे वगैरे उरकल्यानंतर ती थकलेली अशी पलंगावर पडली की नवर्याने तिला जवळ ओढले. माधुरी म्हणाली, ‘‘आज मी खूप थकून गेलेय…’’ नवरा एकदम चवताळून म्हणाला, ‘‘सगळा दिवस भाषणबाजी, घोषणाबाजी करताना स्टेजवर नाचताना थकवा नाही आला आणि आता मला पाहताच थकवा जाणवायला लागला का? समजतेस कोण स्वत:ला.’’
नवर्याची मारझोड सहन करून त्याची हवस पूर्ण करून जेव्हा ती पलंगावर मूक अश्रू गाळत पडली तेव्हा विचार करत होती, ‘हाच तर मुद्दा आज आपण मांडला होता, नवर्याकडून शोषण, उपेक्षा, मानहानी शेवटी बायकोने कसे तोंड द्यावे या सर्वाला! कुठपर्यंत हे सगळे सहन करावे तिने?
यातून सोडवणूक कधी? तिने मांडलेल्या या मुद्यावर प्रस्ताव मंजूर केला गेला. त्यांनी सर्वांनी अभिनंदन केले होते तिचे.
आता तिला वाटायला लागले की अभिनंदन करणारे जणू आता तिला टोमणे मारत आहेत, तिची चेष्टा करताहेत. पाह्यलं? चालली होती मोठी क्रांतिकारी बनायला.
विसरू नकोस तू बाई आहेस बाई…
मूळ हिंदी कथा- औरत- नरेन्द्र कौर छाबड़ा, मो.- ९३२५२६१०७९ अनुवाद- माया महाजन, मो.-९८५०५६६४४२