☆ जीवनरंग ☆ लघुकथा : अकल्पित ☆ सुश्री मंजुषा मुळे ☆
दोन तास झाले तरी ते दार उघडलं नव्हतं. बाहेर थांबलेल्या त्या दोघांची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहत होते… त्यासाठीच अमेरिकेहून परत आले होते.
एकदाचं दार उघडलं. नर्स बाळांना घेऊन आली. दोघांनाही प्रचंड आनंद झाला.त्या बाईला तिळं होणार हे खरंतर आधीच माहिती होतं. पण तीनही बाळं सुखरूप असणं, ही त्या दोघांसाठी फार मोठी गोष्ट होती.
अनेक डॉक्टरांचे उंबरे झिजवून, अनेक प्रकारच्या टेस्टस करून, खूप वेगवेगळ्या शक्यतांवर, पर्यायांवर खोलवर चर्चा करून, त्यांनी हा निर्णय घेतला होता…… आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय. तिला मूल होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ ठरली होती. पण तो सक्षम होता. एखादं मूल दत्तक घ्यावं, असं तिचं म्हणणं होतं. पण “मला माझे मूल होऊ शकत असेल, तर काय हरकत आहे? ‘’हे त्याचं म्हणणं, त्याच्यावरच्या अतीव प्रेमापोटी, त्याच्या भावना जपण्यासाठी, खूप विचारांती तिने मान्य केलं होतं, आणि ‘सरोगसी’ चा पर्याय स्वीकारला होता. आज त्या ‘सरोगेट मदर’ ची प्रसूती झाली, आणि त्याला तीन मुलं झाली. तिलाही मनापासून आनंद झाला…. स्वतःच ‘आई’ झाल्यासारखा.
इतक्यात डॉक्टर गंभीर चेह-याने बाहेर आले. स्वतःचं गर्भाशय भाड्याने दिलेली ती बाळंतीण मात्र स्वतःचा जीव गमावून बसली होती. दोघेही एकदम सुन्न झाले. त्यांना मूल देण्याच्या बदल्यात, तिची स्वतःची तीन मुलं पोरकी झाली होती हे सत्य, पैसे देऊनही बदलणार नव्हतं.
असह्य अस्वस्थता, दुःख, आणि अपराधीपणाची, मनाला घायाळ करणारी तीव्र वेदना……. दोघांनाही काहीच सुचत नव्ह्तं………….
शेवटी तिनेच कसंबसं स्वतःला सावरलं. त्याचा हात हळुवारपणे हातात घेतला…. “हे बघ, ऐक… तुला तुझं एक बाळ हवं होतं, तर तीन मिळाली. मी एखादं मूल दत्तक घेऊ म्हणत होते, पण आता तीन मुलं दत्तक घेऊ शकेन…. हो…… तिची पोरकी झालेली तीन मुलं. देवाच्या कृपेने, सहा मुलं वाढवण्यासाठी आवश्यक ते सगळं आहे आपल्याकडे… तिच्या आयुष्याच्या बदल्यात, इतकं तर नक्कीच करू शकतो आपण… हो ना?”
तो कृतज्ञतेने तिच्याकडे पहात राहिला. तिच्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा त्याला प्रकर्षाने जाणवला… मग फक्त डोळे बोलले…. आणि अमेरिकेला परत जाण्यासाठी आता एकूण आठ तिकिटं काढली गेली……….
© सुश्री मंजुषा मुळे
मो ९८२२८४६७६२