मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नणंद माझी लाडाची… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ नणंद माझी लाडाची ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

वऱ्हाड कार्यालयात आलं.. शारदा इकडून तिकडे नुसती धावत होती. कितीतरी कामांची, मोठी सून म्हणून तिच्यावर जबाबदारी होती. कारण तिच्या लाडक्या नणंदेचं समीराचं लग्न होत नां! सहज समीराच्या खोलीमध्ये ती डोकावली, तर हे काय! ती हमसून हमसून रडत होती. तिला जवळ घेत शारदा म्हणाली. “समीरा नको ग रडूस. सासरी परक्या घरी जातांना अशीचं स्थिती होते, प्रत्येक मुलीला वाईट हे वाटतंच. आणि साहजिकच आहे गं तें!एका जागेवरून उपटलेल रोपंट दुसऱ्या जागी लावतांना त्रास हा होणारच. मी नाहीं का माझ माहेर सोडून तुमच्याघरी आले. आणि आतां सासर हेच माहेर असं समजून तुमच्या घरात रुळले पण. सासरच्या अनोळखी माणसांच्या प्रेमाची ओळख मला पटली. आणि तुझ्यासारखी जिवलग, नणंदेच्या रूपांतली मैत्रिणी पण मला मिळाली. हे बघ,. आई आण्णा व ह्या घराची काळजी अजिबात करायची नाही. अग मी आहे नां !. तुझ्या सारखीच काळजी घेईन हॊ मी त्यांची. समीराचे डोळे आपल्या पदरानें पुसत शारदा पूढे म्हणाली “ए समीरा हास ना गं!आतां फक्त एकच गाणं गुणगुणायचं. ‘ ” “साजणी बाई येणार साजण माझा “. आणि हो ! घोड्यावरून येणाऱ्या सागरच रुप आठवतंच मस्त स्वप्ननगरीत जायच. काय?

समीरा गालात हसली आणि खुदकन् लाजली, सागरच्या आठवणीने. तशी शारदा पुढच्या कामासाठी चटकन् उठायला लागली. तर.. तिचा पदर ओढत समीरा म्हणाली. जरा- थांब ना वहिनी. मला तुला काही सांगायचय. “हसतंच शारदेने चिडवलं ” पूरे हं समीरा. आतां मला नाही,. जे काय सांगायच तें सागर रावानाच. सांगायच. चल बाई उठू दे मला “.. “प्लिज थांब ना वहिनी, “ काकुळतीला येऊन समीरा परत मुसमुसायला लागली. थरथर कांपतच होती ती.. शारदाने तिला जवळ घेतल्यावर ती घडाघडा बोलायला लागली.

” वहिनी सागर मला मनापासून आवडलेत. पण. – पण हे लग्न सुखरूपपणे पार पडेल की नाहीं ? ह्या भितीने जीव घाबरा होतोय ग माझा !”

तिला प्रेमानें गोंजारून शारदा म्हणाली “समीरा काही झालय का ? अगदी मोकळे पणी सांग any Problem? ” 

थरथर कापतच समीरा पूढे सांगु लागली. : “ कसं सांगु वहिनी तुला? एक गोष्ट लपवलीय मी तुमच्यापासून.. प्रकरण. तसं गंभीरच आहे “. हे ऐकल्यावर. आता मात्र थरकांपच उडाला शारदाचा. काय सांगणार आहे ही? काही भानगड, प्रेम प्रकरण? की बलात्कार ? असा कांही अत्याचार झालाय का हिच्यावर ?

‘ नाहीं नाहीं माझ्या सासरच्या अब्रुचा प्रश्न आहे हा!’. असंख्य प्रश्नाच्या विचाराने घशाला कोरड पडली कसबसं स्वतःला सावरून ती म्हणाली ”समीरा बोलना ! सांग लौकर. काय झालयं ?सांग गं! पटकन सांग.

“ऐक नां वहिनी. गेले कित्येक दिवस एक मवाली, गुंड मुलगा माझ्या मागे लागलाय. सुरुवातीला, लाडीगोडीनें अघळ पघळ बोलून त्याने मला खूप विनवलं, आमिषे दाखवली. पण मी बधले नाही. कारण माझं त्याच्यावर प्रेमच नव्हतं. तसं सांगूनही त्यानी माझा पिच्छा सोडला नाही. उलट त्याचा मवाली पणा जास्तच वाढला. खूप त्रास व्हायचा मला त्याचा. कधीकधी भिती वाटायची. हां हात टाकेल की काय माझ्यावर? अतिप्रसंग करेल कां ?या विचाराने घराबाहेर पण पडायची नाही मी. आणि शेवटी त्यानी मला धमकी दिली. ” माझ्याशी लग्न केल नाहीस तर मी दुसऱ्या कुणाशीही तुझ लग्न होऊ देणार नाही. मग सुखाचा संसार तर दूरच राहिला. गुंड आणून पळवीन मी तुला “. मला खूप भिती वाटतेय ग वहिनी. तो लग्नात काही विघ्न तर नाहीं ना आणणार ? तसं झाल तर… तर सगळाच डाव उधळेल. माझ्या स्वप्नांचा, आणि माझ्या आयुष्याचा… आई अण्णांच काय होईल गं ? आणि माझा दादा? केवढया मोठया आजारातून उठलाय तो नुकताच. तुझ्यामूळे तो लौकर बरा झालाय त्याच B. P. वाढून त्याला काही त्रास झाला तर. ?वहिनी रात्र रात्र जागून काढतेय गं मी, हया सगळ्या विचारांनी झोपच उडालीय माझी० आणि काय सांगू वहिनी. काल तो आपल्या घराभोवती घिरट्या घालत होता. आणि कहर म्हणजे खिडकीतून त्याने ही चिठ्ठी फेकलीय. हे बघ यांत त्यांनी लिहीलय –” उद्या बघच तू. गुंड आणून तुझं लग्न मी मोडणारच. लग्न कसं होतयं बघतोच मी. ” 

शारदा क्षणभर गांगरली. पण दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरत तिनें समीराचें घळघळ वहाणारे अश्रु पुसले.

तिला खूप किंव आली तिची. किती तरी दिवस मानसिक ताणाचं भलं मोठ्ठ ओझं उरावर बाळगून, आनंदाचे दिवस किती ताण तणावात गेले बिचारीचे. आपल्या आई वडिलांना दादाला त्रास होऊ नये म्हणून केविलवाणी धडपड चालली होती इतके दिवस समीराची. तिला आधार देत शारदा म्हणाली,

“घाबरू नकोस समीरा मी आहे तूझ्या पाठीशी. आपल्या घराची अब्रू अशी चव्हाट्यावर नाही येऊ देणार मी. तू निर्धास्त रहा. मी बघते काय करायच तें. “ तिचा आधार घेत समीरा म्हणाली “ पण — पण वहिनी दादा ! तो किती संतापी आहे रागाच्या भरात त्यांनी काही केले तर? आणि पण मग त्याला किती त्रास होईल माझ्यामुळे. मला काही काहीचं सुचत नाहीये, काय करू मी?” तिला शांत करुन ठामपणे शारदा म्हणाली, ” नाही समीरा ह्यातलं ह्यांना आई अण्णाना काहीच कळता कामा नये. नाहीतर परिस्थितीला वेगळंच वळण लागेल. तू शान्त रहा.. “

आणि मग खरोखरचं शारदाने आपल्या भावाला मदतीला घेऊन परिस्थितीशी लढा दिला. आणि तिचा पाठीराखा भाऊ अविनाश तिच्या पाठीशी उभा राह्यला.. पोलीसांच्या मदतीने बंदोबस्त करून रंगे हात त्या मवाल्याला पकडून त्याला शिक्षा झाली. आणि नंतर मग ‘.. झाले मोकळे आकाश. ‘….. कार्य निर्वीघ्नपणे पार पडलं होतं. अशी ही बाहेरची व घरांतली आघाडी सौ. शारदानें अविनाशच्या मदतीने खंबीरपणे सांभाळली होती.

 कु. समीरा, चि. सागरची अर्धांगिनी,… सौभाग्यवती समीरा सागर साने झाली.

सासरी निघताना सौ. समीराच्या डोक्यावरून हात फिरवीत शारदा म्हणाली, ” सागर एक गुणी, सुशील, भाबडी मुलगी आम्ही दिलीय तुम्हाला. सांभाळून घ्या हं तिला. ” गम्भीर वातावरण हसरं साजरं करीत सागर म्हणाला ” मंडळी समीराचं नांव आम्ही सरिता ठेवणार आहोत आणि हीं सरिता आता सागराला मिळालीय. तिच्या सुख दुःखात मी तिच्या पाठीशी आहेच… तुम्ही दिलेलं हे खणखणीत नाणं आम्ही केव्हाच पारखून घेतल आहे हं. माझे आई बाबा खूप चांगले आणि सुशिक्षित व समंजस आहेत. त्यांच्या छत्राखाली समीरा आणि मी सुरक्षित राहू. एकमेकांच्या विश्वासावरच आमचा संसार सुखाचा होईल. तेव्हा आता कुठलीही काळजी करायची नाही. आणि हो! आईचे, अण्णांचे आणि दादांचे तुमचेही आशीर्वाद आहेतच कि आमच्या पाठीशी. ” असं म्हणून ती लक्ष्मीनारायणाची जोडी थोरांच्या पायाशी वाकली. सगळं निर्विघ्नपणे पार पडलं होतं. कोपर्‍यात उभ्या राहयलेल्या भाऊरायाचे, अविनाशचे शारदेने नजरेनेच आभार मानले.. अगदी कृतज्ञतेने प्रेमळ नजरेने..

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काचेचा स्वर्ग… (अनुवादित कथा) – भाग-2 – डॉ अमिताभ चौधुरी ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

काचेचा स्वर्ग… (अनुवादित कथा) – भाग-2 – डॉ अमिताभ चौधुरी ☆ सौ. गौरी गाडेकर

(आणि तेच झालं. कित्येक महिने गेले. शंभुदयाल ना धरणीधरच्या घरी आला,ना त्याने पुन्हा फोन केला. धरणीनेही त्याचा नंबर सेव्ह केला नव्हता. त्यामुळे कॉलबॅकची  शक्यता नव्हती .दिवस-रात्री उलटत गेल्या. जग आपल्या चालीने चक्कर काटत राहिलं.) …इथून पुढे…..

विश्वविद्यालयाच्या समोरच्या लंकाच्या युनिव्हर्सल बुक डेपोमध्ये आदिवासींवर एक पुस्तक आलं होतं. धरणी काहीबाही लिहित असतो. तेव्हा त्याने फोनवर त्यांना विचारलं होतं. आज दुपारी तो तेच घेऊन परत येत होता. पण रेवडी तलावाच्या पुढे राजपुर्‍यात ट्रॅफिक एवढा ठप्प झाला होता, की वैतागून त्याला रिक्षातून खाली उतरावं लागलं. 

तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की तो कुंवरजींच्या हवेलीजवळ उभा आहे. ‘अरे!’  तो विचार करू लागला, ‘ शंभूने सांगितलं होतं,की इथेच त्याने एक घर विकत घेतलंय. आज वेळ आहे, तर त्याला भेटून का येऊ नये?’ 

डॉ अमिताभ चौधुरी 

पण फक्त नावावरून नक्की पत्ता कसा मिळणार? या बाबतीत काशीचे चहावाले,पानवाले इन्क्वायरी काउंटरचं काम चोख बजावतात. 

“भैया, शंभुदयालजीचं घर कुठे आहे,सांगू शकता?” 

“कोण शंभुदयालजी? जमुहरामध्ये काम करायचे ,ते? दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांनी इथे वर्माजींचं घर खरेदी केलं.”

“हा.हा. तोच.”

मग दिशा दिग्दर्शन सुरू झालं, ‘बाजूच्या रस्त्याने जा. पुढे खांबाकडून एक गल्ली आत गेलीय. त्या गल्लीत शिरा.तीन-चार घरं सोडून डावीकडे त्यांचंच घर आहे. समोरची खिडकी हिरवी आहे. वगैरे वगैरे.कोणालाही विचारलं तर सांगेल.’ 

विचारायची गरजच पडली नाही. धरणीने बेल वाजवली. एका बाईने बाजूच्या खिडकीचं एक दार उघडून विचारलं,”कोण आहे?” 

“नमस्कार. मी धरणीधर.शंभुदयालचा बालमित्र. त्याला सांगा,मी भेटायला आलोय.”   

आतमध्ये काहीतरी बोलणं झालं. मग दरवाजा उघडला,”या.”

हावभाव आणि बोलण्यावरून अंदाज करणं सोपं होतं, की ती शंभुदयालची बायको होती. धरणीला एका खुर्चीवर बसवून ती आत गेली. थोड्याच वेळात तिने नवर्‍याला आधार देत  बाहेर आणलं.

धरणीधर उठून उभा राहिला,” अरे शंभू, बच्चू! ही काय अवस्था करून घेतलीयस?”

साठी ओलांडलेले दोन्ही मित्र एकमेकांना बघत होते. बहुधा मनात विचार करत असावेत – ‘पंधरा-सोळाव्या वर्षी जेव्हा शेवटचं बघितलं होतं, तेव्हा हा कसा दिसत होता?’

शंभूने तोंड उघडलं,” आता एवढे आजार….त्या दिवशी सांगितलं होतं ना तुला?” 

“अरे,वहिनींशी ओळख तर करून दे.”

“हो,हो. देतो ना. हा धरणीधर. आम्ही दोघं प्रायमरीपासून एका वर्गात होतो. आता काय सांगू? तीन वर्षांपूर्वी मला पॅरॅलिसिस झाला. डाव्या बाजूला. तीन महिने बिछान्यात होतो.हळूहळू बरा झालो. आताही व्यायाम करावे लागतात.हीच करून घेते.”

“मग मुलाकडे का जात नाहीस? तो तर डॉक्टर आहे. आम्ही आपसात बोलत असतो, तुझे दोन्ही मुलगे चांगले निघाले.”

“काय   म्हणता, भाईसाहेब?” ती एवढ्या धारदार आवाजात बोलली,की धरणी नजर उचलून सरळ तिच्याकडे पाहायला लागला. “कोण डॉक्टर? आमचा मुलगा?” 

“अगं,कमला,इतक्या दिवसांनी मित्र घरी आलाय,त्याला चहा-बिहा नाही पाजणार?” शंभुदयाल गोंधळून गेला. जणू त्याच्या रहस्यावरचा पडदा बाजूला झाला होता. तो स्वतःच कसातरी उठून उभा राहिला. पण वादळात सापडलेल्या झाडासारखं त्याचं शरीर थरथरू लागलं. त्याचा डावा पाय आणि हाततर कमजोर होतेच. तो त्या पायावर नीट उभासुद्धा राहू शकत नव्हता. त्याचा उजवा हात हवा कापत होता. त्याचं तोंड एका बाजूला मिटलं गेलं होतं.  “अरे यार, बस ना. एवढ्या दिवसांनी भेटलो आहोत! “

कमला काहीतरी बडबडत आत निघून गेली,” हं. मुलगे! त्यांच्यापेक्षा परके बरे.”  

“काय झालं?” धरणीधरलाही संकोच वाटू लागला.संवादाच्या धाग्याचं कोणतं टोक पकडावं,हेच त्याला कळेना.

“तूच सांगितलंस ना? की तुझा मोठा मुलगा इंजिनिअर आहे आणि धाकटा डॉक्टर?  खरं सांगायचं,तर आम्हाला थोडीशी असूयाच वाटायला लागली होती -साल्याचं नशीब किती जोरावर आहे!” 

“देवाच्या मनात होतं,तसंच सगळं झालं. ते लोक आपआपला संसार सांभाळताहेत. आम्ही दोघं कोंबडा-कोंबडी इकडे बसून कुकूचकू  करतोय. हे घर घेतलं. आयुष्यभर जमवलेल्यातली अर्धी पुंजी या घरातच गेली.” 

‘ठक’…. कमला कधी खोलीत आली,कळलंच नाही. चहाचा कप टेबलावर ठेवून ती बोलायला लागली,” आणि आता तेच मुलगे सांगताहेत – हे घर विकून आम्हाला अर्धा-अर्धा हिस्सा देऊन टाका.”

“म्हणजे?” धरणीधर चकित झाला. 

“जाऊ दे गं. आपल्या मुलांनी काही मागितलं,तर काय झालं?”

” इंजिनिअर आणि डॉक्टर तर स्वतःच एवढं कमावतात,की…”धरणी बोलताना अडखळला.

” कुठचा इंजिनिअर आणि कुठचा डॉक्टर?” कमला तिरमिरीत बोलली, “मोठ्याला ह्यांनी टेम्पो विकत घेऊन दिला होता. तो त्याला धड चालवायला जमलं नाही. विकून टाकला. पिऊन पडलेला असतो आता. धाकटा कुठच्यातरी प्रॉपर्टी डीलरकडे काम करतो. जमिनीच्या खरेदी-विक्रीत काय घपला केला,कोणास ठाऊक.त्याला ते शहर सोडून दुसरीकडे पळून जावं लागलं.आता दोघेही बापाचा गळा दाबून सांगताहेत – घर विकून आम्हाला अर्धेअर्धे पैसे द्या.”

“अरे!” बस्स.धरणी फक्त एवढंच बोलू शकला. काही न बोलता ,तो आपल्या बालमित्राकडे बघत राहिला. त्याला खूप राग आला होता. एवढं मोठं खोटं! एवढं धडधडीत असत्य! आणि कशासाठी?  फक्त लोकांसमोर मोठेपणा मिरवण्यासाठी?

शंभुदयालच्या चेहर्‍यावर विचित्र उदासी तरंगत होती. डोळ्यांत अश्रू नव्हते. पण त्याच्या रक्तातून एक प्रकारचा पश्चात्ताप चेहर्‍यावर झिरपत होता. त्याने हसण्याचा प्रयत्न केला,”धरणी, कोण जाणे मेंदूत हे वेड कसं शिरलं? माझी मुलं जसजशी उद्दाम बनत गेली, तसतसा  मी जुन्या मित्रांना फोन करून-करून मुलांविषयीच्या स्वप्नांची बहार सजवत गेलो. कित्येकांच्या मुलांना, अगदी मुलींनासुद्धा चांगलं शिकून,एमबीए करून चांगल्या नोकर्‍या मिळाल्या. कोणी बॅंकेत नोकरीला लागले. पण माझी मुलं?” 

शंभुदयाल गप्प झाला. खोलीत भरलेल्या शांततेत विष तरंगत असल्यासारखं वाटत होतं आणि तो ते हळूहळू गिळत होता.  “जेव्हा माझ्या कानावर यायचं – कोणाचा मुलगा स्पर्धापरीक्षेत पास झाला, कोणाच्या मुलीला नोकरी लागली, आता तिच्या लग्नाचं बघताहेत,तेव्हा माझ्या छातीत विचित्र जळफळाट व्हायचा. डोक्याचा दाह व्हायचा. देवा,मी काय पाप केलं, म्हणून माझ्या नशिबात असली मुलं आली?”

शंभुदयालला धाप लागली.

मित्राला बघून धरणीधरच्या जिभेला जणू अर्धांगाचा झटका आला. काय सांगणार होता तो मित्राला? कसं करणार होता त्याचं सांत्वन? एका बापाने नकळत आपल्या आकांक्षांचा एक काचमहाल उभा केला होता. आणि आज तो फुटून विखुरला होता. शंभूदयाल हळूहळू बोलायला लागला,”आणि नंतर तर पॅरॅलिसिस झाला. त्यातून सावरल्यावर रोज कोणा ना कोणाला फोन करून हेच सगळं सांगत राहिलो, की माझा मोठा मुलगा इंजिनिअर आहे आणि धाकटा डॉक्टर . का कोणास ठाऊक, पण त्यामुळे मला एक विचित्र शांती मिळायची. मला माहीत आहे, सगळ्यांना वाटायचं की या साल्याने तर बाजी मारली!” 

धरणीधर आ वासून आपल्या मित्राकडे पाहत होता. माणूस स्वप्न व वास्तवाचा हा कुठचा साप-शिडीचा खेळ खेळू लागतो? 

त्याला चहाचा कप उचलण्यासाठी हात पुढे करावासा वाटला. पण त्याच्या हाताचा जणू दगड झाला होता. तो उठून उभा राहिला,”चल,यार.निघतो.येईन पुन्हा कधीतरी.”

मागून शंभूचा आवाज आला,” अरे,निदान चहा तरी पिऊन जा.”  

कमला काहीच बोलली नाही. ती गुपचूप उभी होती. दरवाजाजवळ भिंतीला टेकून. 

– समाप्त – 

मूळ लेखक :डॉ. अमिताभ शंकर रॉय चौधुरी 

मूळ हिंदी कथा :  कांच की जन्नत

मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काचेचा स्वर्ग… (अनुवादित कथा) – भाग-1 – डॉ अमिताभ चौधुरी ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

काचेचा स्वर्ग… (अनुवादित कथा) – भाग-1 – डॉ अमिताभ चौधुरी ☆ सौ. गौरी गाडेकर

पौषातली दुपार निरोप घ्यायच्या तयारीत होती. थंड वारा  सुटला  होता. धरणीधरची धाकटी मावशी आणि तिचे पती आले होते.  धरणीधर- मुग्धा हे पती-पत्नी  उतरत्या उन्हाची  दुलई  ओढून त्यांच्यासोबत गप्पा मारत होते. 

“चहा कधी करणार?” धरणीधरने हातावर हात चोळत विचारलं,” काय काका! एक-एक कप गरम चहा मिळाला,तर रक्त गोठण्यापासून आपली सुटका होईल ना!” 

मुग्धा हसतहसत उठून उभी राहिली.”जरा कुठे मावशींबरोबर बोलत होते,तर मध्येच…”

डॉ अमिताभ चौधुरी 

“सॉरी मॅम, पण मोठमोठ्या लोकांचं बोलणं एका खेपेत थोडंच आटोपतं? बोलणी तर चालूच राहतात. आता हिंदुस्थान-पाकिस्तानच्या बोलण्यांचं ,वाटाघाटींचं बघा ना. चहा करून आण. मग गप्पांचा दुसरा एपिसोड चालू करू या.”

मुग्धा स्वयंपाकघरात  गेली,तोच टेबलावरचा धरणीधरचा फोन वाजायला लागला.

मुग्धाने हाक मारली,”अहो, तुमचा फोन वाजतोय.” 

“यावेळी कोणाचा फोन?” धरणीधरला खुर्ची सोडून उठावंच लागलं. नाव धरणीधर,पण  मोबाईलचं ओझंपण त्याला पेलवत नाही. तो भार,तो पत्नीवरच सोपवतो. 

“हॅल्लो!” पलीकडून आवाज आला. पण रस्त्यावरच्या कलकलाटाने ते शब्द स्वाहा केले. 

“कोण बोलतंय?” 

“अरे,धरणी. मी शंभुदयाल बोलतोय. ओळखलंस?” एक अस्पष्ट आवाज स्मृतीच्या सागरापलीकडून हलक्या हाताने टकटक करत होता. 

“अरे यार! कसा आहेस? किती दिवसांनी! ” 

“दिवस नाही.वर्षं म्हण.बस्स! अडतीस वर्षं नोकरी करून आता रिटायर झालोय. बसल्याबसल्या जुन्या मित्रांना फोन करतोय.”

“वा! पण माझा नंबर कसा मिळाला?”

“अरे,मोहनकडून मुरलीचा, मुरलीकडून मोतीलालचा..असं करत करत मिळाला.” 

“काय म्हणतोयस? रिटायरमेंटनंतर मुक्काम कुठे?” 

“परत आलो बनारसला. सर्वांहून सरस,आमची काशी-बनारस. जमुहरा बाजारात ढीगभर लोकांनी घरं बांधली.रिटायर होत गेले आणि तिथेच फॅक्टरीपासून लांब जमीन विकत घेऊन घरं बांधत गेले.तीन-चार एकर जमिनीत लोक घर बांधतात. तेवढ्या पैशात बनारसमध्ये कबुतरांच्या कॉलनीतलं एखादं खुराडंपण मिळणार नाही.”  

“आणि मुलं? ती काय करतात?”

थोडा वेळ शंभुदयालचा आवाजच बंद झाला.

नंतर ” मला दोन मुलगे आहेत. दोघेही सेटल  झालेत. मोठा बंगलुरूच्या सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर आहे.  धाकटा भोपाळच्या एका पॉलिक्लिनिकशी अटॅच्ड आहे.”

“वा,बच्चू! मला वाटतं,तू एकदा फोनवर बोलला होतास,मोठा मुलगा इंजिनिअर आणि धाकटा डॉक्टर. म्हणजे  लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरतेय, म्हणायची.”

“तुझ्या मुलीचं लग्न झालं ना? ती ऑस्ट्रेलियात असते म्हणे.”

“हो.”

“आणि तुझा मुलगा टाटा सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये पीएचडी करतोय ना?” 

“अरे! तू तर सीआयडीसारखी  सगळी इन्फॉर्मेशन गोळा केलीयस.”

” हा हा! माझं काय? दिवसभर बसून असतो. प्रायमरीपासून कॉलेजपर्यंतच्या जुन्या मित्रांना – ज्यांचे नंबर आहेत माझ्याकडे, त्यांना फोन करत राहतो. कोणाला तुझ्याविषयी विचारतो.मग तुझ्याकडून दुसर्‍या कोणाचीतरी माहिती काढीन. बस्स. इन्फॉर्मेशन कम्प्लिट.” 

हायस्कूलमधल्या दोन मित्रांच्या गप्पा अशाच चालू राहिल्या. 

“जगन्नाथ तुझा जिवलग मित्र होता. तो कसा आहे,ठाऊक आहे का तुला?” शंभुदयालने विचारलं,” काही वर्षांपूर्वी मालाची डिलिव्हरी घ्यायला आसनसोलला गेलो होतो, तेव्हा मला भेटला होता.”

“काय सांगू तुला? तो अगदी एकटा पडलाय आता,” धरणीचा आवाज उदास झाला,”मुलगी चेन्नईला नोकरी करते. आणि मुलगा भुवनेश्वरला. मला वाटतं,त्याचं शिक्षण अजून पुरं नाही झालं.”

“चांगलंच आहे की! पण एकटा पडलाय म्हणजे?”

” त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता. तेव्हा बिचारा मुंबईला टाटा मेमोरिअल हॉस्पिटल आणि कुठे कुठे धावाधाव करत होता. पण कॅन्सर म्हणजे असला रोग ,साक्षात यमराजाशी गाठ. त्यानंतर कधी भेटला नाही तुला तो?”

“नाही. माझ्याकडे त्याचा नंबर नाही. तुझ्याकडे कधी येईन,तेव्हा त्याचा नंबर घेईन. आणि बोलेन त्याच्याशी.”

“नक्की ये. या म्हातारपणात बालपणीच्या गप्पा होतील.”

” बरोबर बोललास. काय सांगू? त्रेसष्ट वर्षांचा होता होता सहाशे तीस रोग लागले माझ्यामागे.”

” चल. नंतर  गप्पा मारू या. शिवीगाळ करू या. भेटायला आलास,की चहा पाजीन आणि इरसाल बनारसी शिव्यांनी तुझं आदरातिथ्य करीन. आता मावशी आणि काका आले आहेत.”

“ठीक आहे. भेटू या कधीतरी.”

“नक्की ये. अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. पण एक फोन कर. नाहीतर तू यायचास आणि नेमकं त्याच वेळी आम्ही दोघं दहा मिनिटांसाठी बाहेर जायचो. ओ.के.”

फोन ठेवून धरणीधर मावशी-काकांकडे आला. 

“पहिलीपासून आम्ही एका वर्गात होतो. हायस्कूलपर्यंत बरोबर होतो. मग दोघांचे सब्जेक्ट वेगवेगळे झाले. मी वेगळ्या कॉलेजमधून इंटर केलं.”

” पहिल्या इयत्तेतला मित्र! अरे वा!” मावशीचा चेहरा खुलला. 

“हो. त्याच्याकडे हजार-बाराशे फोन नंबर आहेत,म्हणत होता. सगळ्यांना फोन करत असतो. काय  बडबडतो देवाला ठाऊक! आमच्या जमान्यात वर्गात मेंढरांसारखी मुलं भरलेली असायची. पण सत्तर-ऐंशीपेक्षा जास्त थोडीच असणार! आणि हायस्कूलमध्ये पोहोचेपर्यंत त्यापैकी काही मुलं रिसर्च स्कॉलर बनली. मग उरली किती?….नंतर त्याच्या ऑफिसात किंवा आयआयटीमध्ये असून असून किती मित्र असणार! फार तर पन्नास -शंभर . का कोणास ठाऊक! तोंडाला येईल ,ते बडबडत होता.” 

चहा आला. घोट घेताघेता धरणीधरचं स्मृतिमंथन चाललं होतं,” तसं तर,लहानपणीही थापा मारायची सवय होती त्याला. मला आठवतं, त्या दिवसांत सगळ्यांना शायरीची बाधा झाली होती. तर एक दिवस त्यानेपण स्वतःची शायरी ऐकवली,’बदल जाएं  अगर माली, चमन होता नहीं खाली, बहारें फिर भी आती हैं,बहारें फिर भी आएंगी’  ” 

“अरे,हे तर ‘बहारें फिर भी आती हैं’ या सिनेमातलं गाणं आहे!”

“बघा ना!”

“याआधी कधी बोलणं झालं होतं तुमचं?” आता काकांनाही मजा वाटत होती. 

“हो. दोन-तीनदा त्यानेच फोन केला होता. पहिल्यांदा जवळजवळ वीस-पंचवीस वर्षांपूर्वी. शेवटचा तीन-चार वर्षांपूर्वी. तेव्हा म्हणत होता,’आता रिटायर होणार,तेव्हा बनारसला येऊन जुन्या मित्रांना भेटू या.’ ” 

” जुन्या मित्रांशी तुझं बोलणं होतं?” मावशीने हसतच विचारलं.

” कुठून होणार? हं. दोघं-तिघं जणं बाजारात वगैरे भेटतात,तेव्हा थोडं बोलणं होतं. नाहीतर कोणाला हार्ट प्रॉब्लेम,तर कोणाला डायबिटीस, कोणाकोणाला तर दोन्ही रोगांचं वरदान. आता शंभू बोललाय,येतो म्हणून, पण येतो की नाही,ते बघू या.” 

आणि तेच झालं. कित्येक महिने गेले. शंभुदयाल ना धरणीधरच्या घरी आला,ना त्याने पुन्हा फोन केला. धरणीनेही त्याचा नंबर सेव्ह केला नव्हता. त्यामुळे कॉलबॅकची  शक्यता नव्हती .दिवस-रात्री उलटत गेल्या. जग आपल्या चालीने चक्कर काटत राहिलं…. 

—  (क्रमशः भाग पहिला )

मूळ लेखक :डॉ. अमिताभ शंकर रॉय चौधुरी 

मूळ हिंदी कथा :  कांच की जन्नत

मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभूमी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ रंगभूमी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(हॉस्पिटलमध्ये मी फोन करून सांगितलंय, मी सोबत आहे. तुम्ही नाटक सुरु ठेवा, ही तुमची दोन माणसे गाडीत आहेत, ती त्याच्या सोबत राहतील .”) – इथून पुढे 

डॉक्टरांची गाडी अनिलला घेऊन गेली, आता परीक्षकांना पण देवव्रताची भूमिका केलेल्या नटाला हार्टअटॅक आला, ही बातमी समजली, ते पण स्पर्धक काय पुढे सांगतात, हे पहाण्यासाठी थांबले.

प्रेक्षकांना पण हळूहळू हे कळले, काही प्रेक्षक आत भेटायला आले.

आता त्यांची तब्येत बरी होईल म्हणाले ना डॉक्टर, मग दुसरा कलाकार घेऊन नाटक सुरु करा, आम्हाला नाटक पहायचे आहे, पुढील अंकातील गाणी ऐकायची आहेत.

काही प्रेक्षक बोंबाबोंब करत म्हणाले “आम्ही तिकीट काढलंय की राव,आमास्नी नाटक बघायचं हाय.”

काय करावे अजितला सुचेना. आता आयत्यावेळी देवव्रतासारखी महत्वाची भूमिका कोण करेल?

एव्हढ्यात सत्यवती झालेली तन्वी अजितकडे आली “अजित, सुदर्शन आलेला आहे ना, त्याने या वर्षी देवव्रताची भूमिका केली आहें, त्याला गळ घाल, तो नाही म्हणणार नाही.”

अजितच्या लक्षात आले, होय, सुदर्शन देवव्रत करू शकेल, तसं स्पर्धेच्या नियमात बसतं की नाही कोण जाणे, पण नाटक पुढे चालू राहील, प्रेक्षक नाराज होणार नाहीत. तेथेच बाजूला उभ्या असलेल्या सुदर्शनला अजित म्हणाला “सुदर्शन, नाटक रद्द करावे लागता कामा नये. कारण रंगभूमीचा आणि प्रेक्षकांचा तो अपमान होईल.”

“होय खरे आहे, पण आता काय करणार?”

“तूच करू शकतोस सुदर्शन, तूच करू शकतोस, तू येथून पुढील देवव्रताचा रोल करायचा, नाही म्हणू नकोस दोस्ता, स्पर्धेत पहिला दुसरा नंबर मिळवायचा म्हणून नव्हे, हे मायबाप प्रेक्षक तिकीट काढून आलेत, त्यांना पुढील नाटक पहायचे आहे म्हणून आणि आपल्या रंगभूमीसाठी.”

सुदर्शन भांबावला, असे कधी या आधी झाले नसेल, आपण ते करावे काय?

तो आपल्या सोबत्याकडे धावला. त्याना पण अजितचा प्रस्ताव आश्रयकारक वाटला आणि नटराज ग्रुप त्याचाही प्रतिस्पर्धी होता गेल्या कित्येक वर्षाचा. पण..ज्योती म्हणाली “सुदर्शन, तू आत्ता काम करावंसं, नाटक थांबता कामा नये, नटराज ग्रुप आपला नाटकातील दुश्मन असला तरी प्रेक्षक नाटक अर्धवट पाहून नाराज होऊन परत जाता कामा नयेत. तू हो म्हण .”

मग सर्वच सोबती नाटक करावं असं म्हणू लागले आणि सुदर्शन भूमिका करायला तयार झाला.

सुदर्शन देवव्रत म्हणजेच भीष्मचा पुढचा भाग करणार हे निश्चित झाल्यावर अजितने परीक्षकांना त्याची कल्पना दिली, ते म्हणाले “नाटक थांबवू नका, आम्ही सरकारला या नाटका दरम्यान घडलेली परिस्थिती आमच्या अहवालत कळविणार पण स्पर्धेसाठी नाटक पुरे होणे चांगले”.

तो पर्यत बऱ्याच प्रेक्षकांना दुसरा नट देवव्रताची भूमिका करणार हे कळले होते. जे नवखे होते, ते म्हणत होते, हा आयत्यावेळी काय करेल? प्राॅम्टींग वर बोलेल, धा मिनिट बघू नायतर सटकू..

पण काही नेहमी स्पर्धेची नाटके पाहणारे त्या शहरातील सुज्ञ प्रेक्षक होते, त्याना आपल्या प्रतिस्पर्धी ग्रुप मधील माणूस आयत्या वेळी नाटक रद्द होऊ नये म्हणून, भूमिका पुढे न्यायला तयार झाला याचे कौतुक वाटत होते, आता सुदर्शन या दुसऱ्या ग्रुप मध्ये कशी भूमिका करतो, याचे पण कुतूहल वाटत होते.

आत मध्ये सुदर्शन रंगायला बसला. मनातल्या मनात देवव्रताचे संवाद आठवू लागला. या ग्रुप मधील इतर साथीदार डोळ्यासमोर आणू लागला. आज आपली परीक्षा आहें हे त्याने जाणले. त्याने मनातल्या मनात आई वडिलांना नमस्कार केला, आज मला यश द्या, अस मनात म्हणत राहिला. .

सुदर्शनने देवव्रताची वेशभूषा केली आणि तो स्टेज वरील त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना भेटायला गेला, त्याचे जास्त संवाद तन्वी म्हणजेच सत्यवती सोबत आणि चंडोल झालेल्या मोहन सोबत होते. सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेल दिली गेली आणि पडदा उघडला.

तिसऱ्या अंकातले सत्यवती आणि भिवरा मधील संवाद सुरु होते, तेंव्हा पाठीमागच्या विंगेत सुदर्शन आपल्या एन्ट्री साठी श्वास रोखून तयार होता. त्याचा सेनापती सत्यवतीला “राजपुत्र देवव्रत इकडेच येत आहेत,यावर भिवर काही म्हणणार एव्हड्यात देव व्रत प्रवेश करत म्हणतो, “देवव्रताच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द म्हणजे देवव्रताचा निर्धार असतो”.

सत्यवतीची भूमिका करणाऱ्या तन्वीच्या शरीरावर हे धारदार वाक्य ऐकून शिरशिरी आली, अनिल या भूमिकेत असे वाक्य एवढ्या परिणामकरक कधीच म्हणत नसे.

आणि मग सुरु झाली देवव्रतची पल्लेदार वाक्ये. कानेटकरानी एवढी जबरदस्त वाक्ये देवव्रतला लिहिली आहेत, ती उच्चारणे येणे नटाचे काम नव्हे.

“देवी मी कुणाला जन्मालाच घातलं नाही म्हणजे या राज्यात वाटेकरी नसेल “.

“भीष्म हा स्वतः उदगारलेल्या प्रतिज्ञेचा बंदी आहें “.

“भीष्माचे वर्तन धर्माच्या चौकटीत बसत नसेल तर धर्माची चौकट बदलेल पण भीष्म बदलणार नाही “

एकापाठोपाठ एक शब्दसरी प्रेक्षकांच्या अंगावर कोसळत होत्या आणि प्रेक्षक ओलेचिंब होत होते. स्टेज वरील आणि विंगेत राहून पहाणारे इतर कलावंत सुदर्शनाच्या या अनोख्या भीष्म दर्शनाने आश्चर्यचकित झाले होते.

आज स्वतः सुदर्शन खूष होता, त्या दिवशी तो मूड मध्ये आला नव्हता पण जी मोठी जबाबदारी पडली, त्याने त्याच्यातल्या कलाकाराला चॅलेंज दिले होते. तो एका पाठोपाठ एक संवादाच्या फैरी झाडत होता.

शेवटी लावण्यवती अंबा, भीष्म तिचा स्विकार करत नाही म्हणून धिक्कार करते, आणि त्याचे त्याच्या आप्तेष्टांसमोर सैरावैरा धावताना मरण येईल असा शाप मागते आणि भीष्म तो देतो.

पडदा पडला, प्रेक्षक डोळे भरलेल्या अवस्थेत आत येऊन भेटत होते.

आज काहीतरी विलक्षण पाहिले असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटले, आयत्या वेळी भूमिका स्वीकारून आणि एक अंक दुसऱ्या नटाने केला असताना, शेवटचा अंक या नटाने विलक्षण उंचीवर नेला, असे कदाचित नाटकाच्या इतिहासात प्रथमच घडले असेल.

नटराज नाट्यग्रुप चे सर्व कलाकार सुदर्शनला मिठी मारून रडत होते. आज शेवटी रंगभूमी जिकंली होती.

Show must go on म्हणजे काय ते आज नाट्यरासिकांना कळलं.

सुदर्शनचे नेहमीचे साथीदार पण नाटक पहात होते, आजची सुदर्शनची भीष्मची भूमिका पाहून ते पण भारावले होते. त्यांचे कंठ दाटून आले होते.

दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रात कालच्या संगीत स्पर्धेत घडलेली घटना म्हणजे रंगभूमी वर पहिलीच, असा उल्लेख करून सुदर्शनने आपल्या स्पर्धक ग्रुप मध्ये नाटकाच्या शेवटच्या अंकात नाटक रद्द होऊ नये म्हणून भूमिका फारच उच्च अभिनीत केली, म्हणून कौतुक झाले.

नाटक मधेच सोडून हॉस्पिटल मध्ये भरती झालेल्या अनिलची एंजिओप्लास्टी झाली, हे सुदर्शनला समजले

आठ दिवसानंतर तो अनिलला भेटायला गेला, तेव्हा अनिल त्याचा हात पकडून सद्गदित स्वरात म्हणाला,

“दोस्ता, माझ्यासाठी जे केलंस ते अमूल्य आहे.”

त्याचा हात थोपटत सुदर्शन म्हणाला “दोस्ता, मी तुझ्यासाठी नाही केलं, केलं ते त्या रंगभूमीसाठी, ती आहे म्हणून आपण आहोत.”

“होय दोस्ता, रंगभूमी आहे म्हणूनच आपण आहोत “.

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभूमी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ रंगभूमी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

( स्पर्धा नुकतीच सुरु झाल्याने प्रेक्षक सुद्धा कमी आले असतील. काही तरी कारण झाले, पण भीष्म मनासारखा उभा राहिला नाही, हे खरे.) इथून पुढे —-

ग्रुप आपल्या शहरात परत आला आणि आपापल्या कामात व्यस्त झाला.

पुन्हा नटराज नाट्य ग्रुपचा “मत्स्यगंधा “चा प्रयोग होणार होता, त्याला जायचे ठरले होते.

पुन्हा मंडळी जमा झाली आणि एक ट्रॅव्हलर घेऊन नटराज ग्रुपचा “मत्स्यगंधा” बघायला निघाली.

मनोज – अनिल देवव्रत कसा करतो बघू,पण सुदर्शन, तुझ्या जवळ पण जाणार नाही देवव्रत.

सुदर्शन – पण माझं पण त्या दिवशी काम बरं झालं नाही रे, मूडच आला नाही.

ज्योती – असं तुला उगाच वाटतं सुदर्शन, तू मस्त काम केलंस, भीष्मला केवढे मोठे आणि कठीण डायलॉग्ज लिहिलेत वसंतरावांनी. मास्तर दत्ताराम ही भूमिका करायचे म्हणे.

मनोज – हो, आणि मत्स्यगंधा आशालता. गाजवली तिने ही भूमिका आणि गाणी. गाणी काय सुरेख आहेत ना यातली.पंडीत अभिषेकींचे संगीत. खुप प्रयोग झाले या नाटकाचे.

ग्रुपची गाडी स्पर्धा चालू असलेल्या गावात पोचली, सर्व मंडळी एका हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश झाली आणि नाटक सुरु होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजे साडेसहाला नाट्यगृहाजवळ पोचली.

सुदर्शन आणि बाकी ग्रुप मधील आत गेली, नटराज च्या ग्रुपला भेटायला. अनिल जो नाटकात देवव्रत म्हणजे भीष्म करणार होता, तो मेकअप करून तयार होता. त्याने सुदर्शन, ज्योती यांना पाहिले आणि जवळ येऊन सुदर्शनला मिठी मारली.

सुदर्शन-अन्या, जाडा झालास की रे,व्यायाम करत नाहीस काय?

अनिल – नाही रे, वेळच मिळत नाही, चालणं पण होत नाही.

ज्योती – अनिल, तुझी तब्येत बरी नाही की काय, धापा टाकतोस..

अनिल -हो ग, आज थकवा आलाय, प्रयोग झाला की उद्या डॉक्टरला तब्येत दाखवतो.

सुदर्शन -हो बाबा, रोज चालणं महत्वाचे आहेच आणि तपासून घे बऱ्या डॉक्टरकडून.

एव्हड्यात सत्यवतीची भूमिका करणारी तन्वी आणि बाकी कलाकार, लाईट करणारा उमेश जवळ आले. सर्वजण शेकहॅन्ड करत शुभेच्छा देत राहिले.

सर्वाना प्रयोगासाठी शुभेच्छा देऊन सुदर्शन आणि ग्रुपची लोकं बाहेर आली. तो पर्यत नाटकाची पहिली घंटा दिली होती.

दुसरी घंटा वाजली आणि सुदर्शन, ज्योती, मनोज, अरुणा आत जाऊन आपापल्या खुर्चीवर बसली. परीक्षक स्थानापन्न झाले, संगीत साथ करणारे, प्रकाश योजना करणारा आपआपल्या जागेवर बसले आणि तिसरी घंटा दिली गेली, मग पात्रपरिचय आणि नाटक सुरु झाले.

“संगीत नाट्यस्पर्धेतील आठवा दिवस “

आज आठव्या दिवशी नटराज नाट्यस्पर्धेचे नाटक “संगीत मत्स्यगंधा ‘ सुरु झाले. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी हेच नाटक दुसऱ्या नाट्य ग्रुप ने सादर केले होते. त्या दिवशी एवढी गर्दी नव्हती कारण स्पर्धा नुकतीच सुरु झाली होती, जसजशी स्पर्धा पुढे सरकत होती, तसतशी गर्दी वाढत होती. आणि आज शनिवार असल्यामुळे असेल, नाटकाला सातशे हुन जास्त प्रेक्षक हजर होते.

एवढे प्रेक्षक तिकीट घेऊन नाटकाला आले म्हणून नटराज ग्रुपची माणसे खूष होती.

नाटक सुरु झाले, सत्यवती झालेली तन्वी आणि भिवर यांचा प्रवेश सुरु झाला, मग पराशर आणि सत्यवती यांची सदाबहार गाणी, त्या गाण्यानी प्रेक्षक खूष झाले, वन्स मोअर मिळत गेले.

दुसऱ्या प्रवेशात राजा शंतनू आणि सत्यवती यांची भेट, शंतनू सत्यवतीच्या प्रेमात पडणं, तिच्यासाठी झुरणं, आणि मग प्रवेश झाला देवव्रताचा.

सुदर्शन आणि ग्रुप सरसाऊन बसला. देवव्रत स्टेज वर किती आत्मविश्वासाने बोलतो यावर नाटकाचा कस लागणार होता कारण वाचिक अभिनयाची, मोठया दर्जाची, तिथे गरज होती.

देवव्रताच्या भूमिकेत अनिलने प्रवेश केला, त्याचे पहिलेच वाक्य

“भिवरा, तूझ्या कन्येला नृपश्रेष्ठ शंतनू महाराजासाठी मागणी घालायला आलो आहे.”

खरे तर ते देवव्रतासाठी महत्वाचे वाक्य. पण अनिल ने मुळमुळीत म्हटले. संवाद सुरु होते, सत्यवती आणि देवव्रत यांची संवादाची आतिषबाजी व्हायला हवी होती पण अनिलची तब्येत बरी नसावी कदाचित, तो फिक्का पडत होता आणि तन्वी प्रभावी होत होती.

प्रेक्षकात बसलेली अरुणा सुदर्शनाच्या कानात म्हणाली “आज अन्या मूड मध्ये नाही, कमी पडतोय. तुझा देवव्रत किती तरी श्रेष्ठ होता.”

दुसरा अंक संपला आणि पडदा पडला. इकडे देवव्रत झालेला अनिल आत गेला तो घामाघूम झाला. त्याच्या पाठीतून कळा यायला लागल्या. डावा हात दुखू लागला. छाती जड झाली.

छाती धरून अनिल टेबलावर झोपला आणि कण्हू लागला. त्याच्याकडे सर्व मंडळी धावली. अजितच्या लक्षात आले, बहुतेक हार्ट अटॅक येतो आहें.

अजित धावत स्टेज वर गेला आणि प्रेक्षकात कोणी डॉक्टर असल्यास ताबडतोब आत येण्याची विनंती केली.

डॉ. विभुते त्यांच्या बायकोसह संगीत नाटक म्हणून आले होते. त्यांनी ही घोषणा ऐकली आणि ते त्वरित आत आले. त्यानी टेबलावर विव्हळणाऱ्या अनिलला पाहिले, त्याची नाडी पाहिली आणि त्यांच्या लक्षात आले, हार्ट अटॅक आला आहें, याला हॉस्पिटलमध्ये हलवण्याची गरज आहें.

डॉक्टरनी त्यांच्या पॉकेट मधील सोरबिट्रेटची गोळी अनिलच्या जिभेखाली ठेवली आणि धावत आपली गाडी आणायला गेले. तोपर्यत बाकी नाटक मंडळी त्याला वारा घालत होती. घाम पुसत होती. छातीवर बुक्के मारून प्रथमोपचार करत होती.

सुदर्शनने बाहेर स्टेजवरील डॉक्टरांचे बोलणे ऐकले आणि तो पण आत आला. अनिलची परिस्थिती त्याने पाहिली, त्याला आठवले, नाटक सुरु व्हायच्या आधी आपल्या आणि ज्योतीच्या लक्षात आले होते, आज अन्याची तब्येत बरी दिसत नाही, त्याला श्वास लागत होता, म्हणून.

डॉ.विभुते यांनी सोर्बीट्रेट ची गोळी जिभेखाली ठेवली असेल म्हणून कदाचित, अनिलच्या छातीत दुखणे थोडे कमी झाले, घाम थांबला.

डॉक्टरांनी दोघांच्या मदतीने अन्याला गाडीत घेतले आणि ते अजितला म्हणाले “आता काळजी करू नका, मी डॉ. भागवत हॉस्पिटल मध्ये त्याला ऍडमिट करतोय. हॉस्पिटलमध्ये मी फोन करून सांगितलंय, मी सोबत आहे. तुम्ही नाटक सुरु ठेवा, ही तुमची दोन माणसे गाडीत आहेत, ती त्याच्या सोबत राहतील .”

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभूमी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ रंगभूमी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

साईनाथ नाट्य मंडळीची वार्षिक बैठक. ऑगस्ट महिन्यातील संध्याकाळ. बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. मंडळाच्या नाट्य ग्रुपचा दिग्दर्शक सुदर्शन हजर होता. शिवाय मनोज, अरुणा, ज्योती, उदय, वासंती बाई, सदानंद हजर होते. संस्था संगीत नाटकं करण्यात प्रसिद्ध होती. दरवर्षी शासनाच्या संगीत नाट्य स्पर्धेत भाग घेऊन मग त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी होत. या आधी संस्थेने अनेक नाटके केली, बक्षीसे मिळविली.

यंदा कुठले संगीत नाटक करावे, यासाठी बैठक होती. सुदर्शनने मागच्या काही वर्षातील संस्थेने केलेल्या नाटकंचा आढावा घेतला, दरवर्षी आपली संस्था प्राथमिक स्पर्धेत पहिला किंवा दुसरा नंबर मिळविते, पण अंतिम स्पर्धेत आपण पहिला नंबर मिळवत नाही, ही सल सुदर्शनने मांडली.

या बाबत काही मेंबर्स नी आपली मते मांडली.

अरुणा – संगीत नाट्य स्पर्धा असल्याने आपण ज्यात संगीताला भरपूर वाव आहें, असे नाटक निवडावे. सुदैवाने या वर्षी ज्योती तिचं शिक्षण संपवून पुन्हा ग्रुपमध्ये आली आहे.

मनोज – आपले संगीत साथीदार बदलावे लागतील. कारण आपण स्पर्धेच्या वेळी पहातो, इतर ग्रुप्स दर्जेदार साथीदार घेऊन येतात.

अरुणा – हे खरे आहे, परीक्षक संगीत साथीकडं बारकाईने लक्ष ठेऊन असतात.

सुदर्शन – मग नाटक कुठलं निवडावं? ज्याला उत्तम लेखन आणि संगीत आहे? आणि आपण ते इतक्यात केलेलं नसावं?

मनोज – यंदा ज्योती सारखी देखणी आणि उत्तम गळा असलेली स्त्री कलावंत आहे, सुदर्शन सारखा दर्जेदार वाचिक कलावंत पण आहेच आणि मनोज पण उत्तम गातो, म्हणून आपण “संगीत मत्स्यगंधा” करावं, अस मला वाटतं.

सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. सुदर्शनला पटले. अरुणा, ज्योती यांनी पण मान हलवली. मनोजने पण हो म्हटलं.

यंदा स्पर्धेसाठी “संगीत मत्स्यगंधा” करायचे ठरले. सुदर्शन आणि अरुणा संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरींना भेटले. त्यांनी पण मान्यता दिली. नाटकासाठी खर्चाची तजवीज केली.

नाटकाचे दिग्दर्शन दरवर्षी प्रमाणे सुदर्शन करणार होता.

“मत्स्यगंधा ‘” नाटक करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. सत्यवती च्या भूमिकेसाठी उत्तम गाणारी आणि देखणी कलाकार हवी होती, त्यामुळे ज्योती सत्यवती करणार हे निश्चित झाले. पराशर साठी पण चांगला गाणारा माणूस हवा होता, मनोज हा अनेक वर्षे काम केलेला आणि खडया आवाजाचा ग्रुप मेंबर होता, त्याला पराशर भूमिका मिळाली, देवव्रत च्या भूमिकेला मोठी मोठी वाक्ये होती, ती पेलणारा कलवंत हवा होता. सुदर्शन तसा होता. त्याचे पाठांतर उत्तम होते आणि शब्दफेक सुरेख होती. त्यालाच ही भूमिका मिळाली, अरुणला चंडोल ची भूमिका. याखेरीज इतर भूमिका इतर ग्रुप मेंबर्स मध्ये वाटल्या गेल्या आणि सुदर्शनने मुहूर्त करून तालमी सुरु केल्या.

स्पर्धेचा फॉर्म भरला. रोज सायंकाळी कलाकार जमू लागले, प्रथम गद्य तालीम सुरु झाली, वाक्ये तोंडात बसली, मग उभ्याने हालचाली दिग्दर्शकाने बांधल्या, मग संगीत साथ करणारे यायला लागले, गाण्याच्या तालमी सुरु झाल्या. हळूहळू प्रकाश योजना करणरा येऊ लागला. दृष्य परिणाम वाढविण्यासाठी त्याचा उपयोग सुरु झाला. नाटक हळूहळू बसू लागले. पाठांतरे झाली. गाणी व्यवस्थित बसली.

स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले. या ग्रुपचे नाटक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी होते आणि आश्चर्य म्हणजे या ग्रुपचा प्रमुख प्रतिस्पर्धी नटराज ग्रुप, जो दुसऱ्या शहरातील होता, त्यांनी पण यंदा “मत्स्यगंधा ” हेच नाटक स्पर्धेत उतरविले होते.

ही बातमी कळली मात्र ,सुदर्शन खवळला. तालमीच्या वेळी ग्रुप मंडळी भेटली, तेव्हा सर्वांचीच हीच चर्चा.

सुदर्शन – मला वाटते, नटराज ची मंडळी दरवर्षी असेच करतात, आपण हे नाटक बसवतोय, हे अनिलला कळले असेल, म्हणून मुद्दाम तो हे नाटक करतोय.

अरुणा – अरे गेली दोन वर्षे प्राथमिक ला आपण पहिले दुसरे असतो ना, म्हणून ते आपल्याला त्रास देतात, आणि ती तन्वी काही कमी नाही. तीच करत असणार सत्यवती. दुष्ट मेली..

ज्योती – अरे ते करेनात, आपण उत्तम प्रयोग करायचा, आपला प्रयोग तिसऱ्या दिवशी आहे ना, तो करू आणि अन्याचा केव्हा आहें, आठव्या दिवशी आहें ना, तो पहायला सर्वजण जाऊ.

ज्योतीच्या या बोलण्याने सर्व गप्प झाले. पण सुदर्शनला अन्याचा राग आला होता,”साला आपल्याशी स्पर्धा करतो, तरी बरं हा स्टेज वर फापलतो,देवव्रताची भूमिका म्हणजे काय खाऊ वाटला काय याला? मोठी मोठी वाक्ये आहेत, आणि हा अन्या जाडा किती झालाय, दारू मारत असणार आणि बिड्यापण ओढत असतो.

सुदर्शनने तीन रंगीत तालमी आयोजित केल्या. भूमिकेचे कपडे, मेकअप करून, नेपथ्य रचून आणि प्रकाश योजना व संगीत साथीसह तीन प्रयोग. त्याच्या ओळखीच्या आणि नाट्यशास्त्र जाणणाऱ्या लोकांना बोलावून त्यांची मते घेतली. चर्चा केल्या. काही सुधारणा केल्या.

तीन रंगीत तालमी झाल्यामुळे कलाकारांना विश्वास मिळाला. ज्योती आता उठताना,झोपताना, जेवताना, बोलताना सत्यवतीची भूमिका जगू लागली. सुदर्शन देवव्रताचे संवाद मोठया मोठ्याने आरशात पाहून म्हणू लागला. मनोज, अरुण यांच्या पण अंगात भूमिका शिरली होती.

स्पर्धा सुरु झाली आणि तिसऱ्या दिवशी ग्रुप बसने स्पर्धेच्या गावात पोहोचला. दुपार पासून स्टेज मांडणी, लाईट जोडणे, पेटी तबल्याचे सूर मिळविणे, मग मेकअप, कपडे.

परीक्षक आले, आत सर्वाना भेटून गेले. या वर्षीचे परीक्षक नाट्यकला जाणणारे, संगीत उत्तम समजणारे होते, त्यामुळे सुदर्शन खूष होता.

मित्रमंडळी ,अनेक ओळखीचे आत येऊन शुभेच्छा देत होते, नाटक वेळेत सुरु झाले. पहिला अंक संपला. पुन्हा बाहेरून मित्र परिवार आत आला, ज्योतीचे, मनोजचे कौतुक करून गेला.

दुसरा अंक संपता संपता देवव्रत स्टेज वर आला आणि नाटकाने स्पीड पकडला. मग तिसरा अंक देवव्रत आणि सत्यवती, अंबा यांचा.

नाटक संपलं, लोकांनी खूप कौतुक केलं.

परीक्षक सुद्धा आत येऊन भेटून गेले. दुसऱ्या दिवशीच्या सर्व पेपर मध्ये कौतुक केलं गेलं. विशेष करून ज्योती जिने सत्यवती साकारली होती, जिला खुप गाणी आणि संवाद होते. स्पर्धेतील प्रयोग उत्तम झाला पण सुदर्शन आपल्या अभिनयावर खूष नव्हता. आपण या पेक्षा कितीतरी चांगली भीष्माची भूमिका करायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. भूमिका अत्यंत ताकदीने कानेटकरांनी लिहिली होती, पण आपल्याला सूर लागला नाही हे खरे.

कदाचित दिग्दर्शक असल्याने एका माणसावर खुप लोड पडतो, प्रत्येक गोष्टीत त्याला लक्ष घालावे लागते. त्यामुळे स्वतः च्या भूमिकेकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही, हेही कारण असेल किंवा स्पर्धा नुकतीच सुरु झाल्याने प्रेक्षक सुद्धा कमी आले असतील. काही तरी कारण झाले, पण भीष्म मनासारखा उभा राहिला नाही, हे खरे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कन्यादान— भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ कन्यादान— भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(आणि…” ते बोलतच होते. आपल्याभोवती कुणीतरी घट्ट दोरी आवळताहेत असं रेवाला भासत होतं. ती स्तब्ध झाली.) — इथून पुढे 

“हे बघ रेवा, ही आमच्या स्वामीजीने मंत्रून दिलेली ही पुडी आहे, ती सदैव जवळ बाळगायला हवंस. समजलं?” या वाक्यानं ती भानावर आली आणि म्हणाली, “होय मामंजी, समजलं. येऊ मी?” असं म्हणून ती तरातरा आपल्या खोलीत निघून गेली. फक्त आमच्याकडून आहेर म्हणून दिलेले कपडे आणि दागिने तिने एका सूटकेसमध्ये भराभर भरले. तितक्यात नवरदेव तिच्या खोलीत आला. “रोहित, बरं झालं तुम्ही आलात ते. पाठराखीण म्हणून थांबलेली माझी आत्या निघायचं म्हणतेय. मी त्यांना सोडून येते आणि येताना माझे नेहमीचे ड्रेसेस घेऊन तासाभरात येते.” म्हणून त्या दोघी टॅक्सी बुक करून तडक इकडे आल्या. पुन्हा त्या घरी पाऊल ठेवणार नाही हा रेवाचा निर्णय ठाम होता.”

“मग काय रोहित अन तिची सासरची मंडळी तिला न्यायला आलीच नाहीत काय?” हरीशने शंका विचारली.

वहिनी पुढे म्हणाल्या, “आले होते. नंतर पंचायत बोलावली गेली. कन्याच नांदायला जाणार नाही म्हटल्यावर कोण काय करणार? काय असेल तो दंड भरू पण आमची मुलगी त्या घरी येणार नाही असं आम्ही उभयतांनीही आग्रह धरला. खूप मनस्ताप झाला. सगळं एकदाचं मिटलं. रेवा आणि आम्ही दोघे मात्र त्या धक्क्यातून अजून सावरलेलो नाही.”

हरीश शांतपणे म्हणाला, “खरं आहे वहिनी, माझ्या लेकीचा साखरपुडा होऊन लग्न मोडलं होतं, तेव्हा साहेबांनीच मला धीर दिला होता. परंतु रेवाविषयीचं त्यांच्या मनात असलेले दु:ख मला आज कळलं. ‘तुझ्या बाबतीत त्या विधात्याने चूक वेळीच दुरूस्त केलेली दिसतेय’, असं त्यांनी म्हटलेल्या वाक्याचा उलगडा मला आज झालाय.  रेवाची काळजी करू नका, निश्चितच तिचंही चांगलं होईल या शक्यतेवर विश्वास ठेवा.”

तितक्यात रेवा आली.

रेवाकडे पाहत हरीश म्हणाला, “रेवा, एखादा अपघात घडला म्हणून रडत कुढत बसणं, नैराश्याच्या गर्तेत जाणं, आपलं भवितव्य अंधारात लोटणं हा त्यावरचा तोडगा नसतो. भविष्यात आणखी काही तरी चांगलं वाढून ठेवलेलं असेल, त्यामुळेच असा प्रसंग ओढवला असावा असा सकारात्मक विचार करायला हवा.”

तितक्यात दारावरची बेल वाजली. रेवानं दार उघडलं. सतीशची अन रेवाची नजरानजर झाली.

साहेब वहिनींच्याकडे पाहत म्हणाले, “सतीशसाठी चहा आणताय ना?”

सतीश नम्रपणे म्हणाला, “नको सर आताच झालाय, पुढच्या वेळी आलो की दोन कप घेईन.”

असं म्हटल्यावर लाटकर साहेब प्रसन्नपणे हसत म्हणाले, “नक्की येशील ना?”

हरीश आणि सतीशने साहेबांचा निरोप घेतला.

हरीशच्या मनात काय शिजत होतं कळत नव्हतं. काही तरी कारण काढून तो सतीशला वारंवार साहेबांच्या घरी पाठवत होता. कधी साहेबांना ही कागदपत्रे देऊन ये तर कधी हा रिपोर्ट नेऊन दे. या निमित्ताने सतीशची अन रेवाची वरचेवर भेट होत होती.

बेल वाजताच रेवाने दार उघडलं. सतीशला तिने दारातच सांगितलं, “आईबाबा चेकअपसाठी हॉस्पिटलला गेले आहेत. तासाभराने परत येतील.”

सतीश मिश्किलपणे हसत म्हणाला, “म्हणजे मी आत यायचं नाही की काय? माझ्यासाठी चहा टाकावा लागेल म्हणून बाहेरच्या बाहेर कटवताय की काय?”

ती दारातून बाजूला सरकताच काही रिपोर्ट्स आणि मिशेल ओबामाचं ‘बिलीव्ह इन दि पॉसिबिलीटी’ शक्यतेवर विश्वास ठेवा हे पुस्तक तिच्या हातात देत तो म्हणाला, “काकांनी हे पुस्तक तुम्हाला द्यायला सांगितलं आहे.” आणि आत जाऊन सोफ्यावर बसला. “तुम्ही हे पुस्तक वाचलंत काय?” रेवाने सतीशला विचारलं.

सतीश पटकन म्हणाला, “वाचलं नाही. परंतु माझाही शक्यतेवर खूप विश्वास आहे. एखादी गोष्ट शक्य वाटत असेल तर मी त्याचा पाठपुरावा करतो.”

“उदाहरणार्थ एखादी शक्य वाटत असलेली अशी किंवा संभाव्य गोष्ट सांगाल काय?.” रेवानं विचारलं.

“मी एमपीएससी परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण होईन या शक्यतेवर माझा प्रचंड विश्वास होता.”

“घडून गेलेली गोष्ट नव्हे, भविष्यकाळातील संभाव्य किंवा शक्य वाटत असलेली गोष्ट सांगा. मग तुमचा विश्वास कितपत खरा ठरतो ते मी पाहीन !”

“पण त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. कराल मदत? तरच मी ती शक्य वाटत असलेली गोष्ट सांगेन.”

“माझ्याकडून ती मदत होत असेल तर मी नक्की करीन. आधी ती शक्य वाटत असलेली गोष्ट कोणती ते तरी सांगा.”

“माझ्याशी लग्न कराल? पहिल्या भेटीतच मला ही गोष्ट शक्यता असलेली वाटली म्हणून मी विचारतोय. सांगा ना.”

“सतीश तुम्हाला माझा भूतकाळ माहीत आहे ना?”

“मला तुमच्या भूतकाळाशी काही देणं घेणं नाही. तुम्हीच माझं वर्तमान आणि माझे भविष्य आहात.”

“तुमच्यासाठी चहा आणते.” असं म्हणत रेवा पटकन निघून गेली.

दार उघडंच होतं. लाटकर दांपत्य सरळ आत आले. त्यांनी सतीशची विचारपूस केली. सतीश चहा घेऊन बाहेर पडला. पहिल्यांदाच रेवाच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकलेलं सतीशनं पाहिलं. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं.

सतीशने काकांच्या कानांवर ही गोष्ट घातली. हरीशला बहुधा हेच अपेक्षित असावं. लाटकरसाहेबांना भेटून हरीशने पुढील बोलणी केल्या. पंधरा दिवसाच्या आत तालुक्याच्या मंगल कार्यालयात अतिशय साधेपणाने सतीश आणि रेवाचा मंगल विवाह संपन्न झाला.

रेवाची पाठवणी करताना हरीशचे हात हातात घेत, भावविवश होऊन लाटकर साहेब म्हणाले, “हरीश, अगदी मनापासून सांगतो. आम्ही उभयता तुमचे खूप खूप ऋणी आहोत.”

हरीशदेखील भावुक होत बोलला, “साहेब, ‘कन्यादान’ तुम्ही केलंत. दान देणाऱ्या दात्याचे, दान स्वीकारणाऱ्याने ऋण मानले पाहिजेत. रेवासारखी सुशिक्षित, सुसंस्कृत, गुणी मुलगी आमची सून म्हणून आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो.” लाटकरांनी सगळ्या वऱ्हाडी मंडळींचा निरोप घेतला.

‘सकारात्मक शक्यतेवर विश्वास ठेवायला हवं, मग ते फलद्रूप होतं’ हे विधान खरं ठरल्यानं रेवाचा चेहरा प्रसन्न फुलासारखा उमललेला दिसत होता.

ही सुफळ कथा संपूर्ण झाली नाही, चांगुलपणाचं बीज रोवत, ती कथा पुढच्या घरी मंगल संदेश घेऊन पुढे पुढे निघाली आहे… !

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कन्यादान— भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ कन्यादान— भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

तो काळच असा होता, मुंबईतल्या कार्पोरेट ऑफिसच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांत उत्तर भारतीय आणि बंगाली अधिकारी वर्गच अधिक होता. त्याच सुमारास डिपार्टमेंटमध्ये जनरल मॅनेजर म्हणून लाटकर साहेबांची नियुक्ती झाली. जनरल मॅनेजर कुणीही येवोत हरीशला फरक पडत नव्हता. कारण ‘हेड ऑफ दि डिपार्टमेंट’ कुणीही असला तरी ‘ब्रेन ऑफ दि डिपार्टमेंट’ हरीशच होता. 

कंपनीच्या विक्रीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी काय करता येईल ह्याविषयी हरीश नवनवीन कल्पक प्रेझेंटेशन सादर करायचा. लाटकर साहेब मराठी असल्याने तो साहेबांशी चक्क मराठीतच बोलायचा. त्या अधिकाऱ्यांचा जळफळाट व्हायचा.

हरीश वेगळं काही करत नव्हता. पूर्वीसारखेच काम करत होता, परंतु आता साहेबांच्याकडून वेळोवेळी त्याच्या कामाचं कौतुक होत होतं, त्यामुळे त्याला एक वेगळंच समाधान लाभत होतं. हरीश दर शनिवारी पुण्याला जाऊन सोमवारी मुंबईला परत यायचा.  

हरीश अशाच एका सोमवारी सकाळच्या बसने मुंबईला पोहोचला. त्याचा नेहमीचा ओसंडून वाहणारा उत्साह मात्र आज कुठेतरी हरवला होता. साहेबांनी बोलावताच डायरी घेऊन त्यांच्या केबिनमध्ये हजर झाला.

“हरीश, पुढच्या तिमाहीत विक्रीचे लक्ष्य गाठण्यासाठी काय वेगळी स्ट्रॅटजी करता येईल याचा विचार करून आराखडा तयार कर आणि जमल्यास मला संध्याकाळपर्यंत दाखव.”

लाटकर साहेबांच्या आदेशावर हरीश थंडपणे म्हणाला, “होय साहेब, तयार करतो.” 

हरीशची देहबोली पाहून साहेब लगेच म्हणाले, “काय रे, आज तुझी तब्येत बरी नाहीये का? तुझा चेहरा पडलाय म्हणून विचारतोय.” 

हरीशच्या डोळ्यांत पाणी तरारलं. 

“हरीश तू आधी बस पाहू. कामं होत राहतील रे. सांग काय झालं ते ”

“साहेब, गेल्या महिन्यात मी किती उत्साहानं माझ्या लेकीचा वाङनिश्चय साजरा केला होता, डिसेंबरमध्ये लग्न ठरलं होतं. पण अतिशय क्षुल्लक कारणावरून हे लग्न मोडलं.”

“हरीश, अरे तुझं मन:पूर्वक अभिनंदन. अक्षता पडायच्या आधीच त्या कुटुंबाचं खरं स्वरूप बाहेर पडलं, तुझं पूर्वसंचित कामाला आलं आहे. तुझी कन्याही नशिबवान आहे म्हणायची. लग्न लागल्यानंतर असं काही झालं असतं तर मात्र अख्खं कुटुंब हवालदिल होऊन गेलं असतं. असो. तुझ्या बाबतीत तरी त्या विधात्याने आपली चूक वेळीच दुरूस्त केलेली दिसतेय. काळजी करू नकोस. तिला नक्कीच चांगला वर मिळेल.” 

हरीशला बरं वाटलं. मुलीचं लग्न मोडल्यानंतर असा सकारात्मक विचार किती लोक करतात? लाटकर साहेबांच्याविषयी हरीशचा आदर दुणावला. संध्याकाळी फोनवर पत्नीशी बोलताना साहेबांची प्रतिक्रिया सांगायला विसरला नाही. 

लाटकर साहेबांचं भाकित खरं ठरलं. हरीशच्या लेकीचं लग्न जमलं. लग्न धूमधडाक्यात पार पडलं. जावई चांगला भेटला त्याहून महत्वाचे म्हणजे लेकीला सुसंस्कृत सासू-सासरे लाभले याचा आनंद अधिक होता. हरीशला मात्र एक चुटपुट लागून राहिली होती. लेकीच्या लग्नाला नक्की येतो असं सांगून देखील लाटकरसाहेब आले नव्हते. फक्त अभिनंदनाची तार आली होती. 

लग्न पार पडल्यानंतर हरीश कामावर रूजू झाला. लाटकर साहेबांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने ते रजेवर होते. हॉस्पिटलहून ते कालच घरी परत आल्याचं आणि त्यांना आणखी पंधरा दिवसांची विश्रांती घ्यायला सांगितल्याचं कळलं. ही बातमी हरीशसाठी धक्कादायकच होती. 

हरीश आपल्या पुतण्याला सोबत घेऊन साहेबांना भेटण्यासाठी ठाण्याला गेला. बेल वाजवताच एका सुस्वरूप तरूणीने दार उघडले. 

“मी हरीश. साहेबांना भेटायला आलोय,” असं म्हटल्यावर, “हो, आत या. बाबांनी सांगितलंय, तुम्ही भेटायला येणार होता म्हणून. बसा. मी बाबांना निरोप देते.” म्हणत ती आत गेली. साहेबांना मुलगी आहे, हे पहिल्यांदाच हरीशला कळलं. 

थोड्याच वेळात साहेब आले आणि समोरच्या सोफ्यावर बसत विचारलं, “हरीश पत्ता शोधायला तुला त्रास नाही ना झाला?” 

“नाही साहेब, हा माझा पुतण्या सतीश. ह्याला या भागाची माहिती आहे, म्हणून त्याला सोबत घेऊन आलो.”

सतीशने साहेबांना नम्रपणे नमस्कार केला. ‘काका मी इथे जवळच माझा एक मित्र राहतो. मी त्याला भेटून लगेच येतो’ असं सांगून सतीशने निरोप घेतला.     

“हा सतीश काय करतो?” साहेबांनी उत्सुकतेनं विचारलं. 

“साहेब, तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. आठ दहा मोठ्या कंपन्यांत मिळत असलेली संधी नाकारल्या. राज्य सेवा आयोगाची परीक्षा पास व्हायचा ध्यास घेतला आणि विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता त्यानं उत्तम यश मिळवलं आहे. कठोर परिश्रम हेच त्याच्या यशाचे गमक आहे. आता पोस्टींगची वाट पाहतोय. माझा मोठा भाऊ आणि वहिनी अपघातात गेल्या तेव्हा तो तीन वर्षाचा होता. आम्ही त्याला मुलासमान सांभाळलं आहे.”

इतक्यात लाटकरवहिनी चहाचा ट्रे घेऊन आल्या. हरीशने त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि स्वत:ची ओळख करून दिली. 

वहिनी हसत म्हणाल्या, “साहेब ऑफिसच्या गोष्टी कधीच घरी सांगत नाहीत पण ते तुमच्या कामाचं कौतुक मात्र मला अधूनमधून सांगत असतात.”

हरीश सहज म्हणाला, “साहेब, तुमच्या कन्येविषयी तुम्ही कधी बोलला नाहीत ते.” 

लाटकर वहिनी गंभीर होत म्हणाल्या, “काय बोलणार ते? मी सांगते. दोन वर्षापूर्वी रेवाचं लग्न मोडलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या सासरेबुवानी तिला दिवाणखान्यात बोलावलं. सगळी घरची मंडळी आधीच जमलेली होती. रेवा येताच सासरेबुवानी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “रेवा, तू आता या घरची सून आहेस. इथल्या रीतीरिवाजाप्रमाणे तुला चालावे लागेल. सकाळी नऊच्या आत ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण एक वाजता आणि रात्रीचे जेवण आठच्या आत तयार असायला हवे. मंगळसूत्र आणि बांगड्या सोडून बाकीचे सर्व दागिने सासूच्याकडे सोपव. ती लॉकरमध्ये ठेवून देईल. सणासुदीला माहेरी जाता येईल. परंतु त्याच दिवशी माघारी यावे लागेल. आणि…” ते बोलतच होते. आपल्याभोवती कुणीतरी घट्ट दोरी आवळताहेत असं रेवाला भासत होतं. ती स्तब्ध झाली. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वंध्यत्व… भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 जीवनरंग 🌸

☆ वंध्यत्व… भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

(गजाभाऊ काय न्हाय तुझ्या नातवाला बघाय आलो व्हतो. अस गजाभाऊ म्हनला. तस नाम्यांनी चहाची अर्डर सोडली,  अन नातवाला बी भैर घेऊन यायल सांगीतलं.) इथून पुढे —- 

चहा झाला , नातवाला धुपट्यात गुंडाळून नाम्याच्या बायकोनं सोप्यात आणलं अन त्याला सुपात गजाभाऊ समोर ठेवलं . तस गजाभाऊ न शंभर रुपयांची नोट तीन आठवड्याच्या बाळाच्या मुठीत ठेवली .

बाळाला सरस्पतींन मुलाला सुपासकट आत न्हेल . मग गजाभाऊन प्रश्न केला ? नाम्या तुझ्याबी घरात

चारपाच वर्स पाळणा हलत नव्हता , तू काय केलंस ? तस नाम्या म्हणाला आर माज्या सरस्पतीच्या भावान , माझ्या मेव्हन्यांनं सूनबाईला मिरजला दाखवाय दवाखान्यात नेली . अन औषधांचा मारा चालू केला . तस दोघबी नवरा बायकू मिरजला एक वरीस खेट घालत व्हत ! तवा कुठं हे दिस बघाय मिळालं . गजाभाऊंन मिरजचा पत्ता घेतला . दुसऱ्याच दिशी , गंप्या अन गोदावरीला टकोटाक मिरजचा दवाखाना गाठला .  पण गप्प बसला न्हाय .

मरणाचा उन्हाळा ! उन्ह जरा मावळतीला कल्याल ! सावल्या लांब लचक व्हत हुत्या ! कागवाड तस मोठं गाव , शिरमंत पटवर्धन सरकारच संस्थानिक गाव ! पण गावाला यष्टी स्टॅन्ड नव्हतं ! गावच्या येशी भैर मोती तळ ! आता त्याला मोतीतळ का म्हणत्यात कुणाला बी म्हैत नव्हतं !  त्या तळ्याच्या म्होर एक फर्लांगवर , मोठं लिंबऱ्याच झाड , ततच समद्या यष्टी बस थांबत व्हत्या ! झाडाला लागून एक हॉटल , त्याच्या म्होर म्हमद्याच पानाचा ठेला . बाजूला बाजी मोरेच सायकलीच दुकान . दुकानाम्होर भाड्याने द्यायच्या सायकली , तीस पैसे भाड तासाला . पंचर झाली तर पन्नास पैसे ज्यास्त !

तेवढ्यात येक यष्टी मिरजकडून अथणी कड जाणारी आली . गाडी थांबली तस धुरळा उडाला .

गाडीतुन बरीच लोक उतरली . सगळ्याच तोंड घाम्याजलेली . अन मळकट ! मरणाचा  उन्हाळा! कसबस धोतर्याच सोगा पकडून गजा भाऊ उतरले . त्यांच्या मागोमाग त्यांची सून गोदावरी अन मुलगा गंप्या पण उतरला .

पडक्या सिनेमा टाकीज मधून गेलेल्या रस्त्याने आडवी वाट करत जाऊ लागले . तस बाजीराव न त्यांना हटकले , म्हनला तात्या असल्या उन्हात कुठं गेला व्हता ?  अस म्हनताच गंप्याला राग आला , पण गप्पगार बसला . बोलणार कस ! त्यावर गजाभाऊ म्हनलं काय न्हाय पावण्याच्या लग्नला गेलं व्हतो . गजाभाऊ मनातल्या मनात त्या बाजीला शिव्या हसडत व्हते . नसत्या चांभार चवकश्या लागतात ह्यांना!

येशीतन मारुती देवळा म्होरन चालत वरच्या डांबर कट्ट्यावरून त्यांनी वळसा घातला अन घर जवळ केलं . चार पायऱ्या चढून सोप्यात येऊन बसल . तोंडातील तंबाकू काढली . डोक्यावरील काळी टोपी बाजूला करून , हातानी घाम बाजूला केला . तेवढ्यात राधाकाकू म्हणजे गजाभाऊ च्या पत्नी मठातील गार पाणी आणून गजाभाऊ म्होर ठेवलं . तस गजाभाऊ नी तांब्या तोंडाला लावून गट गट आवाज करत पाणी खतम केलं . अन गार फरशी वर आडवे झाले !

गजाभाऊ कदम म्हणजे मोठी गावची आसामी ! गावात चिरेबंदी दुमजली  वाडा , मोठं ऐसपैस आंगण ! अंगणात पडवी त्यात खिल्लारी बैलजोडी ढवळ्या अन पवळ्या .  चार म्हसर , दोन गायी , दोन कालवड . अंगणातन वरच्या बाजूला चौसोपी कट्टा अन सोपा . मधोमध मोठा दरवाजा . बाजूला चबुतरा , माजघर , माजघरातल्या आतल्या बाजूस चार खोल्या . कोठीच्या खोलीत धान्यांनी भरल्याली पोती .

मधल्या बाजूला ऐसपैस कडेपाट ! त्यावर राधकाकू बसून हिंदोळे घेऊ लागल्या !

गंप्या नवसाचा पोरगा ! एकुलता एक ! त्याच लगीन होउन बारा वरीस उलटली तरी बी पाळणा हलीत नव्हता ! त्यासाठी राधा काकूंनी लै उपाय केलं , पण गोष्ट काय जमून येत नव्हती !

देव देवरूशी , अंगारे धुपारे , समद करून झालं व्हतंच ! कोण काय म्हणतील ते करत व्हती बिचारी .  चोळाप्पा मंत्रिकाकडे तर त्यांनी खेट घातलं ! त्यो सांगिल ते केलं  . उलट्या पखाची कोंबडी उतरून टाकली . समद झालं पण वीस एकर रानाला वारस घावंत नव्हता !

यल्लमाचा  जग आणून घरी बसवला ! देवीचा गोंधळ झाला पण , काय बी उपेग झाला न्हाय .

गंपू दादा अशी कोणतरी हाळी मारली तस त्या तंद्रीतन भानावर आल्या ! गोदानी चहा आणून हातात ठेवला . मग त्यानी कडेपाटवर बसून चहा घेतला भैर रानातला सालगडी गोप्या अन गोप्याची बायको आली व्हती . दोघांना एकदम बघून गजाभाऊ चमकलेच !

गजाभाऊ म्हनलं आज जोडीने आलायस ? त्यावर काय न बोलता गप्पगुमान आत माजघरात गेले . गोप्या गेली कित्येक वर्स त्यांचा घरगडी व्हताच . वहिवाट पण लै दिसची व्हती . गोदानी समद्याना चहा दिला . तस राधकाकू म्हंल्या आज काय काढलंय बाबा !

त्यावर गोप्याची बायकू म्हणली , काकू एवढं समद करतायसा एकडाव मरगुबाईल का जात न्हाईसा . तस राधकाकू म्हंल्या समद झालाय बघ . तीत बी जाऊन देवीची ओटी भरून पाळणा पण बांधून आले . आता देवच डोळे झाकून गप्प बसलाय तर आम्ही काय करणार . आमच्या हातात जेवढं जेवढं होत ते समद केलं . आता भार देवावर च !

पुढं गंप्या अन गोदा जवळपास वरीसभर,  मिरजला औषधाला जात व्हती , हे गावच्या लोकांना बी कळलं . अन एकदिस असा आला की गजाभाऊ अन राधकाकू हंरकून गेल्या . त्यांना काय करावं काय नकु अस झाल्याल .

कारण बी तसच व्हत , गोदाला दिस गेलं व्हत , अन तिची चोर चोळी करायचा घाट गजाभाऊ नी आखला व्हता . तीन महिन्याच्या आत चोरचोळी केली अन आख्ख्या गावाला जेवणाच

आवतान बी दिल !

— समाप्त — 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वंध्यत्व… भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 जीवनरंग 🌸

☆ वंध्यत्व… भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

पौषची हुडीहुडी भरणारी बोचरी थंडी, अन गार गार वारा. जिकडे तिकडे बनशांकरीच्या देवळात, घरोघरी नवरात्र झोकात चाललं व्हत. नैवेद्याची रेलचेल, भजन काकडा आरती समदीकडे जोमात सुरू व्हतीच. पण गजाभाऊंच्या घरी येगळीच वर्दळ चालू व्हती. राधकाकू तर भल्या पहाटे उठून रांधत व्हत्या. चपात्या, वाटलेली डाळ, घट्ट झुणका, दहीभात , लोणचं इत्यादी दुरडीत भरून घेत व्हत्या. 

दारात सवारीची बैलगाडी उभी व्हती. शेतातला वाटेकरी सिध्दाप्पा बैल जुंपून तयार व्हता. तस गजाभाऊ अन राधकाकू लगबगीनं गाडीत बसल्या. 

शुक्राची चांदणी इरघळत व्हतीच. कोंबड्याची बांग बी झाली. घराघरात छप्परा वरून धूर भैर पडत व्हता. आंबाबईच्या देवळात घंटा वाजत व्हती. 

चिमण्यांची चिवचिवाट चालू झाल्याली. अन बैलगाडी पांनदीच्या वाटला लागल्याली. धुकं शाल पसरून बसल्याल. दहिवर चौकडं पडल्याल. गाडी ओढ्या जवळ आली. तस मोराच केकाटन चालू झालं. 

मधीच कुठंतर वटवाघूळ फडफडत जाऊन झाडाला उलट टांगल्याल व्हत. आता गाडी मुख्य रस्त्याला आली. तस झुंजूमंजू झालं. गाडी मुत्नालच्या रस्त्याला लागली. मुत्नाल गाव तस छोटंसं पण तिथला ज्योतिषी व्होरा पंडित गुंडाचार्य लै परसिध्द गडी. त्याच्या अंगणात सकाळ दरण लोकांची गर्दी ! अडीअडचणी घेऊन लोक त्याच्याकडे येत व्हत व गुण पण येत व्हतंच ! 

गजाभाऊ अन राधकाकू आज त्याच कामगिरीसाठी चाललं व्हत. बघता बघता दिस कासराभर वर आला, हवेत जरा ऊब पण आली. 

गाडीच चाक करकरत एकदा मुत्नालच्या येशीत धडकली. 

जवळच् वडाचा पार , तिथंच सिद्धाप्पांन गाडी थांबवली. अन बैलाचा जु रिकामा केला. गाडीतन दोघबी उतरल्यालीच. गाडीतला कडबा बैलाम्होर टाकून बैल बांधली. 

गजाभाऊ कदम अन राधकाकू गुंडाचार्यच घर जवळ केलं. बघत्यात तर काय ! त्याच अंगण सोडून गल्लीतबी लोकांची तोबा गर्दी ! कसबस राधकाकू अंगणातून सोप्यात आल्या.

सोप्यात समदिकड जाजम घातल्याल. दाटी वटीन लोक अन बाया पण बसल्याल. 

गुंडाचार्य म्हणत्याला जरिकाटी धोतर,अंगात बारबंदी अन डोईवर कोषा पटका. खांद्यावर लाल जरिकाटी उपरण,  कपाळावर उभं गोपीचंदी टिळा, गळ्यात तुळशीची माळ अस साग्र संगीत बसल्याल. त्याच्या म्होर चौरंग त्यावर चार पाच नमुन्यांची पंचांग ! बाजूला कवड्याची रास ! 

एकेक गडी म्होर येत त्याला डोकं टेकवून नमस्कार करीत व्हता अन आपलं गाऱ्हाणं घालीत व्हता ! तस गुंडाचार्य काहीतरी बोटांची आकडे मोड करीत व्हता, पंचांग बघून त्याला काहीतर तोडगे सांगत व्हता. अस करताकरता जवळपास बारा वाजलं तस राधकाकू अन गजाभाऊचा लंबर लागला !

तस गुंडाचार्यन ईचारल बोला, काय अडचण हाय.

त्यावर दोघबी पंचांगला  डोस्क टेकवून नमस्कार केला, अन बोललं काय सांगणार गुरुजी – 

गुरुजी – काय असलं ते भीडभाड न ठेवता बोला. 

राधकाकू – आमचं एकुलता येक ल्योक अन सून. लगीन व्होहून बारा वरीस झालं ! अजून घरात पाळणा हलना, अन आम्हाला वारीस घावना ! अस म्हटल्याव

गुंडाचार्य डोळ मिटून शांत बसलं अन हातानी आकडेमोड केली. घड्याळ बघितलं अन पंचांग मांडलं. 

जवळच्या पाटीवर पेन्सिलने कुंडली मांडली. गजाभाऊंच्या हातात कवड्या देऊन फास फेकायला सांगितलं. त्याच दान पडल्यावर गुरुजींना डोळ जरा किलकिल करून, पांडुरंग पांडुरंग अस म्हटलं !

दोघबी गुरुजी काय सांगत्यात ह्याचाकड लक्ष्य व्हत. 

गुंडाचार्य – भिऊ नकोस इत्याल्या बुधवारी, मुलावरून अन सून वरून सात पिठाची दामटी, केळ, लिंबू, तेल तिखट अस घेऊन, दोघांच्या वरून उतारा कर अन गावच्या येशी भैर टाक ! 

राधकाकू – आणि काय दोष हाय म्हणायचं ? 

गुंडाचार्य – दोघांना पण कालसर्प दोष आहे ! त्याची शांती नरसिंह वाडीला करून घे ! म्हणजे  तुच्या घरात एक वर्षात पाळणा हललाच म्हणून समज ! 

तस दोघं गुंडाचार्यला परत नमस्कार करून जवळ असल्याला नारळ धोतर जोडी अन पान सुपारी दक्षणा ठेऊन, भैर पडलं. 

दुपारचं एक वाजला होता, परत वेशीबाहेर येऊन जवळच्या मारुती देवळात बसून आणलेली शिदोरी सोडली. जेवण झाली तस सिद्धाप्पांन परत गाडी जुंपली. अन परतीच्या मार्गाला लागलं ! 

घरी आल्याव गुंडाचार्य नी सांगितलेला सर्व तोडगा केला. दिस,मास करीत कॅलेंडर फिरू लागला. दोन वरीस झालं तरी, इकडची कडी तिकडं झाली न्हाय. 

गावच्या ग्रामदेवतेच नैवेद्य, ओटी अन दंडवत बी झालं. गजाभाऊ कटाळून गेलं. तस एकदा वडाच्या पारावर बसलं व्हत. गावची भावकी बी बसल्याळी. सीतारामन उगाचच खाकरून इशय काढला. गजाभाऊ काय काय केलसा औंदा शेतात. म्हटल्याव गजाभाऊनी पानांची चंची भैर काढली. अन सुपारी कातरत सीतारामला दिली. पान अन चुना बी दिला तस तांबकुची चिमट बी दिली. सीताराम गडी खुश झाला. अन म्हणाला वरच्या अळीतला,नाम्याच्या पोराला मुलगा झाला. एक वरीस दवाखाना करीत व्हता. असा विषय काढल्यावर, गजाभाऊच्या काळजात चरर झालं. अरर इसरलो गड्या मला रानात जाय पाहिजे ! आता सांच्याला कस काय काम हाय बा तुझं

इति सीताराम. 

त्याच काय हाय सीताराम, म्या रानात मेंढरं बसवल्यात, त्यांचं रातच जेवण शिदोरी द्यायचं ठरलं हाय. बर झालं तू राना ची आठवण करून दिली. अस म्ह्णूनश्यान गजाभाऊन पिचकारी टाकली अन तडक गप्पगुमान वरच्या आळीतील नाम्याच्या घरी गेला. 

नाम्या  म्हसरांचं धार काढीत व्हता. गजाभाऊ अलगदपणे आतल्या सोप्यात जाऊन बसला. धार काढल्यावर भैर येऊन बघतोय तर गजाभाऊ दिसलं ! तस राम राम गजाभाऊ आज हिकड कुठं

वाकडी वाट केलायस, अस नाम्या म्हणताच , गजाभाऊ काय न्हाय तुझ्या नातवाला बघाय आलो व्हतो. अस गजाभाऊ म्हनला. तस नाम्यांनी चहाची अर्डर सोडली,  अन नातवाला बी भैर घेऊन यायल सांगीतलं. 

 – क्रमशः भाग पहिला     

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print