मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जरी आंधळा मी ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

जरी आंधळा मी ! श्री संभाजी बबन गायके 

जन्माला झाली असतील पंधरा-सोळा वर्षं. जातीवंत आईच्या पोटी जन्मलो तेव्हा सर्वांनाच आनंद झाला होता. वीसेक एकर शेती, शिवाय इतरांची कसायला, अर्धलीनं घेतलेली तेवढीच शेती…   माझ्या येण्याने शेत-शिवार आणखी फुलून यायला मदतच होणार होती….    लेकरं चार घास आणखी मिळवणार होती.

आईनं दुधाला कमी पडू नाही दिलं. अंगी बळ वाढत होतं आणि लवकरच शेतावरही जाऊ लागलो. माझे मोठे डोळे, काळेभोर. त्वचेवर पांढ-या ढगांची जणू पखरण झालेली. दमदार चाल आणि बैजवार चालणं…   कुणाच्या अंगावर जायचं नाही आणि कुणी अंगावर आलंच तर त्याला आईचं दुध आठवावं असा माझा प्रतिहल्ला…  बाहेरचे शहाणे माझ्यापासून त्यामुळे थोडे अंतर ठेवीत असत. मात्र घरातले सर्व माझ्या अगदी अंगाशी खेळणारे..  लहान मुलं तर माझ्याभोवती निर्धास्त खेळत.

फार काही अंगाला झोंबलं, लागलं, दुखलं म्हणून कधी डोळ्यांतून एक टिपूस पाणी नाही आलं कधी…   पण एके दिवशी उजव्या डोळ्याला धार लागली. डोळ्यांत काहीबाही जातं शेतात कामं करीत असताना म्हणून मी आणि सगळ्यांनीच ही गोष्ट डोळ्याआड केली….    कामाचा धबडगाच इतका असतोय रानात….    आजारा-बिजाराला आणि त्यांचे कोड पुरवायला शेतक-याला कसली आली सवड?

पण मोठ्या दादांच्या ध्यानात आलं दोनच दिवसांत. काहीतरी गडबड आहे म्हणाला…   डॉक्टर साहेबांकडे लगोलग घेऊन गेला. “डोळा वाचणार नाही!” मी ऐकले आणि दादाने सुद्धा. पण माझ्याआधी त्याच्याच डोळ्यांत काळजीचं आभाळ दाटून आलं. डॉक्टर म्हणाले, ”कुठं खर्च करीत बसता! बघा काय निर्णय घेताय ते…   पण याला सांभाळत बसावं लागेल घरीच ठेवलं तर!”

तसं दादा लगबगीने म्हणाले, ” हा आमचाच आहे..  आमचाच राहील. सांभाळू की घरच्या घरी. काय खर्च व्हायचा तो करू…   पण याचा हा डोळा वाचतोय का बघा…   दुसरा डोळा आहेच की अजून शाबूत. ” 

डॉक्टर साहेबाचं मन ओलं झालं…   ”तुम्ही एवढी नुकसानी पदरात घेताय…   तर माझा पण शेर असू द्यात की या कामात. माझी फी बी काही नको. करून टाकू आपण जे काही गरजेचे असेल तेवढं!’ 

मी माझ्या चांगल्या डोळ्याने त्या दोघांकडे एकवार पाहून घेतलं….    दुसरा डोळा त्याच मार्गाला जाणार असं मला आपलं वाटून गेलं! 

दुखलं खूप तो डोळा डॉक्टर टाके घालून शिवत होते तेंव्हा….    पण या देहाला सवय होती सोसायची…   जन्मच तसा दिलाय देवानं…   करणार काय? 

घरी आलो…   पण खूप दिवस बसून राहणं मनाला पटेना. उभारी धरली आणि कामाला जुंपून घेतलं स्वत:ला..  जमेल ते करीत राहिलो…   एका डोळ्याने अजिबात दिसत नाही हे पार विसरून गेलो. देवाची पण काय करणी पहा…   महत्त्वाच्या चीजा एक एक जास्तीच्या दिल्यात त्यांनं…   एक निसटलं तर दुसरं हजर. बघा ना, दोन-दोन कान, दोन-दोन डोळे!

पण हे दान मला नाही पुरलं…   वर्षभरात दुस-याही डोळ्याने पहिल्या डोळ्याची वाट धरली! आता तर कुणाचा काही इलाज असेल असं वाटावं अशी हिंमतच नाही उरली काळजात. पण याही वेळेस दादा, डॉक्टर आणि इतर सर्वच माझ्या पाठीशी उभे राहिले. राहू द्या…   एका कोप-यात पडून राहील जन्मभर…   आम्ही खायला-प्यायला घालू…   शेतकरी आहोत…   घासातला घास देऊ! आमच्यात घरातल्यांना वृद्धाश्रम दाखवला जात नाही…..     उद्या आपली सुद्धा तीच गत होते…   म्हणून आपलं म्हणून जे कोणी आहेत त्यांना घरात आणि उरात जागा करून द्यायची रीत मातीत पावलं रुतवून असणा-या कृषीवलांची.

याही वेळी कुणीच माझ्या दादाकडून एक नवा पैसा घेतला नाही. पुण्य करण्याची अशी एखादी लहानसहान संधी चांगली माणसं बरी सोडतील….    मोठं पुण्य करण्याची ताकद देव देईल तेंव्हा देईल! 

आता उरलेला उजेडही माझ्यासाठी परका झाला…   आणि मी हिरव्या शेताला पोरका झालो….    मातीला पारखा झालो!

दादांची आई होती म्हातारी झालेली. तिने तिच्या सुरकुत्या पडलेल्या हातांनी मला घास भरवले…   बाकीची कामांत गुंतले असताना ही माऊली या तिच्या नातवाला गोंजारत राहिली…   दुखलं-खुपलं पाहू लागली. आणि माझ्याही नकळत मी तरुण झालो..  धष्टपुष्ट बनलो! माझा मी मला पाहू शकणार नव्हतो शेतातल्या पाटात वाहत असलेल्या पाण्यात माझं प्रतिबिंब पडेल पण मी पाहू शकणार नव्हतो….    हो…   दादाच्या डोळ्यांनी मात्र पाहीन..  त्याने शेतात नेलं तर.

एखाद्या लहानग्या पोरांचं करावं तशी माझी काळजी घेतली गेली. येणारे-जाणारे पाहुणे मला बघायला यायचे..  आणि कुणी काही, कुणी काही म्हणून जायचे. या बिनाकामाच्याला नुसतं सांभाळून होणार तरी काय? असा सर्वांचा सवाल होता…   आणि त्यात काहीही खोटं नव्हतं! 

दुसरं कुणी असतं दादाच्या जागी तर माझी रवानगी एव्हाना झालीही असती आणि माझ्या खुणा कायमच्या पुसल्या गेल्या असत्या या जन्माच्या सारीपाटावरच्या! 

गिधाडं आभाळात घिरट्या घालून घालून थकली….    पण मी कोसळून पडलो नाही. कारण बाकीचे अवयव शाबूत..  बुद्धी जागेवर..  आणि मनाची तयारी भरभक्कम होती. एखाद्या चित्रातील सुंदर चेह-यावर चित्रकार डोळे रंगवायचे विसरून गेला असावा..  तशी त-हा! 

जागच्या जागी बसून राहणे…   माझ्यासाठी चांगले नव्हते आणि मलाही ते नकोच होते. शरीर धडधाकट आहे…   का नाही काम करायचं? त्याच्या मनात नसूनही दादाने माझ्या खांद्यावर थोडं ओझं टाकून पाहिलं…   मी नको म्हणालो असतो तर त्याने जबरदस्ती नसती केली…   माझी खात्री आहे! 

पण इतक्या दिवसांच्या आरामाने स्नायू जरा आळसावलेले होते..  त्यांना सरळ करायला पाहिजेच की. लागलो कामाला. इतका का हळूहळू मी आणि सारेच विसरून गेले…   मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे ते! 

डोळ्यांना माती दिसत नसली तरी पावलांना तिची ओळख आधीपासूनची. पण जराशी पावलं चुकली की थांबायचो…   मग दादा म्हणायचा…   सोन्या…   जरा थोडा इकडं सर…   पलिकडं हो…   थांब…   आणि आता चल! बास…   हे चारच शब्द पुरू लागले…   मी आपसूक योग्य रस्ता धरून चालू लागलो. मजबूत खांद्यांना ओझ्याची तमा नव्हती…   पाठीवर दादाचा राठ पण प्रेमाचा हात पडला की दिसत नसलेलं आभाळ समोर येऊन उभं ठाकायचं…   आभाळातली गिधाडं मला तर केंव्हाच विसरून गेली असतील! 

घरातल्या लग्नांना जाताना मी सोबत असायचो…   खळाळून हसणा-या कलव-या, नटलेली बाया माणसं…   नाचणारी पोरं..  आणि लाजणा-या नव्या नव-या…   सारं काही अनुभवलं या शिवलेल्या डोळ्यांमधून….    दिवस गोडीने आणि जोडीने पुढे पुढे चालत होते…   माझ्यासारखे!

दादाचा संसात वाढत गेला…   खाणारी तोंडं वाढत गेली आणि माझं शेतातलं काम सुद्धा. मग कधी दुस-याच्या शेतावर जाऊ लागलो…   वाट दावायला सर्व होतेच सोबत. मला काही पाहण्याची गरज उरली नव्हती. खाल्लेल्या घासाला जागायचं म्हणून जगायचं होतं…   शेवटापर्यंत…   दादाच्या जवळ..  त्याच्या वावरात…   त्याच्या अंगणातल्या झाडाखाली!

खूप दिवस…   नव्हे खूप वर्षे उलटून गेली की माझे काळीज अंधारून गेले होते त्या गोष्टीला…   आता शरीर थकलं! दादाने मला आता शेतावर नेणं बंद केलंय…   पण घरी मन रमत नाही….    धाकल्या-थोरल्या भावंडांना इतरांनी मारलेल्या हाका ऐकल्याशिवाय गमत नाही! मला जायचं असतं…   दादासोबत शिवारात…   पण दादा नको म्हणतोय! किती केलंस आमच्यासाठी…   आता पुरे झालं की रं मर्दा! सुखानं पडून रहा…   गळ्यातल्या घाटी हलवत हलवत…   तो आवाज घुमू दे अंगणात, घरात! नातवंडं-पतवंडं खेळतात की तुझ्या नजरेच्या पहा-यात! 

शेवट दिसत नसला तरी जाणवतोय हल्ली….    देहातली शक्ती क्षीण झालीये…   पैलतीर दिसतो आहे! 

दादा कुणाला तरी सांगत होता…..     याचा देह मातीत गेला तरी याची समाधी बांधीन….    याला नजरेसमोरून हलून देणार नाही….    मी असेतोवर! 

हे ऐकून डोळ्यांच्या आत पाझारलेली आसवं…   थेट काळजात घुसली…   आणि काळीज ओलं ओलं झालं! देवा…   मी गेल्यावर डोळे भरून पाहण्याची एकवार मुभा देशील मला…   माझ्या या शेतकरी दादाला पाहण्याची? 

(गोवंश हा आपल्या मातीचा खरा आधार. आईच्या आणि गाईच्या पोटी जन्मलेलं प्रत्येक लेकरू शेतक-यास प्राणाहुनी प्रिय. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील वाळूज गावात एक शेतकरी दादा राहतोय…   शेती कसतोय. त्यांचं नाव…   इंद्रसेन गोरख मोटे. त्यांच्या कपिलेने एका खोंडाला जन्म दिला. दोन वर्षात हा सोन्या औतकाठीच्या कामाला आला. पण दुर्दैवाने त्याचा एक डोळा निकामी झाला. लोकांनी हा बैल बाजारात विकून टाकण्याचा व्यवहारी सल्ला दिला. पण दादांनी सोन्याला विकले नाही. कालांतराने सोन्याने दोन्ही डोळे गमावले. आता तर सोन्याची कसायाच्या कत्तलखान्यात रवानगी होणं निश्चित होतं..  पण इंद्रसेन आणि त्यांच्या कुटुंबाने सोन्याला शेवटापर्यंत सांभाळण्याचे ठरवले आणि ते करूनही दाखवले. दोन्ही डोळ्यांनी दिसत नसूनही सोन्याने शेतीच्या कामांत प्रचंड कौशल्य कमावले! दादांच्या एका शब्दावर त्याला नेमकं कुठं वळायचं, चालायचं, थांबायचं हे सर्व समजू लागलं…   आणि दादांचा संसार चौखूर चालला! 

 सोन्यावर उपचार करणा-या सर्व डॉक्टर साहेबांनी बहुतांशी मोफत उपचार करून मानवतेचा धर्म पाळला. हा सोन्या आता म्हातारा झाला आहे. सोन्या आज न उद्या हे जग सोडून जाईल…   प्राण्यांची आयुष्ये तशी कमी असतात….    पण दादा सोन्याचे स्मारक बांधणार आहेत…   त्याच्या स्मृती जपणार आहेत! महाराष्ट्र टाईम्सच्या इरफान शेख यांनी या सोन्याची आणि त्याच्या शेतकरी मालकाची एक सुंदर विडीओ बातमी केली आहे. ही बातमी पाहून मी सोन्या झालो…   आणि हे शब्द सुचले…… 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाटणी… भाग – ४ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ वाटणी… भाग – ४ ☆ श्री दीपक तांबोळी

(“ध्येय आणि जिद्द असली की सगळं जमतं. रमेशचंच बघा ना!किराणा दुकानात साफसफाईचं आणि पुड्या बांधण्याचं काम करणारा रमेश आज क्लास वन ऑफिसर झालाय. ते या जिद्दीमुळेच ना?”) – इथून पुढे —

बैठकीत शांतता पसरली. कुणाला काय बोलावं ते सुचत नसावं. तेवढ्यात आतून शैला वहिनी बाहेर आली

“पण भाऊजी मी काय म्हणते….. “

“एक मिनिट शैला वहिनी. बायकांनी या प्रकरणात सहभागी होऊ नये असं मला वाटतं.

याच कारणास्तव आपण सुरेखा वहिनीला बोलावलेलं नाही. खरं ना?”

शैला वहिनी चुप बसली. मी पुढे बोलू लागलो

“आणि हा जो मी निवाडा केलाय तो फक्त दोन्ही भावांत भांडणं होऊ नये, गोष्टी कोर्टकचेऱ्यांपर्यंत पोहचू नयेत याचकरीता. शेवटी निर्णय बापूकाकांना घ्यायचा आहे “

” योग्य निवाडा केलाये तुम्ही वकीलसाहेब. बापू आता जास्त ताणू नका. मृत्युपत्र ताबडतोब बनवून घ्या. आमच्या सह्या घ्या आणि सगळ्यांना मोकळं करा “एक प्रतिष्ठित बोलले.

” ठिक आहे जयंता बनवून घे मृत्यूपत्र” बापूकाका माझ्याकडे बघत  म्हणाले तसा मी माझ्या असिस्टंटला इशारा केला. तो लगेच कारमधून लॅपटाॅप आणि प्रिंटर घेऊन आला. मृत्यूपत्र  बनलं. बापूकाकांनी आणि दोन्ही प्रतिष्ठित व्यक्तींनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या.

” उद्या तालुक्याला जाऊन हे मृत्यूपत्र रजिस्टर करुन घ्या. मी माझ्या माणसाला पाठवतो. तो सर्व काही व्यवस्थित करुन घेईल ” मी बापूकाकांकडे पहात म्हणालो. त्यांनी आणि रमेशने होकारार्थी मान हलवली. बैठक संपली.

सगळे निघाले. मीही निघालो.

” चला येतो ” बाहेर उभ्या असलेल्या रमेश आणि योगेशकडे पाहून मी म्हणालो. नेहमी मला निरोप द्यायला बाहेर येणारी शैला वहिनी आज मात्र बाहेर आली नव्हती. मी मघाशी तिला बोलायची मनाई केली होती याचा कदाचित तिला राग आला असावा.

मी घरी पोहचलो. आज बैठकीत काय निर्णय झाला हे सुनंदाला सांगितल्यावर ती म्हणाली

“तुम्ही असा कसा काय निर्णय बदललात?इथून जाण्यापुर्वी तर तुम्ही योगेश भाऊजींनाच सर्व काही देऊन टाकू असं ठरवलं होतंत “

” हो सुनंदा. मी तसंच ठरवलं होतं. पण गावाच्या अलीकडे माझा मित्र शरद मला भेटला. त्याने मला योगेशबद्दल जे सांगितलं ते ऐकून मी माझा हा निर्णय लांबणीवर टाकायचं ठरवलं. तो सांगत होता की योगेश शेतीकडे लक्ष देत नाही. तो सध्या गावातल्या राजकारणात जास्त रस घेतोय. नदीकाठच्या मंदीराजवळ तो आणि त्याचे हे राजकारणी मित्र कामंधामं सोडून दिवसभर एकतर चकाट्या पीटत असतात नाहीतर पत्ते खेळत बसलेले असतात. योगेशला आता सरपंच व्हायचे वेध लागले आहेत त्यामुळे तो या रिकामटेकड्या लोकांबरोबर भटकत असतो. या लोकांमुळेच त्याला गुटखा खाण्याचं आणि दारु प्यायचं व्यसन जडलंय”

“अरे बापरे!”

” शरद खरं बोलतोय का हे तपासण्यासाठी मी मुद्दामच मंदिराकडे गेलो आणि खरोखरच योगेश तिथे पत्ते खेळतांना सापडला. त्याला घेऊन मी त्यांच्या घरी गेलो. घराची अवस्था अजूनही वाईटच आहे. घराचे वाटेहिस्से करतांना ते कदाचित विकावं लागेल या भीतीने योगेशची घरासाठी खर्च करायची तयारी नाही हे शरदचं म्हणणं खरं ठरलं. संसाराला हातभार लागावा म्हणून सुरेखावहिनीने शैला वहिनीला महिनाभर आपल्याकडे ठेवून शिलाईचा क्लास लावून दिला. स्वखर्चाने तिला शिलाई मशीन घेऊन दिली. पण ती मशीन धुळ खात पडलीये. शैला वहिनी त्या मशीनकडे ढूंकून पहात नाही. रमेश आणि सुरेखा वहिनी योगेशच्या कुटूंबासाठी नेहमीच धडपड करत असतात. मदत करत असतात. पण योगेश आणि शैला वहिनी त्यांची किंमत ठेवत नाहीत हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मी ठरवलं की योगेशला दया दाखवण्यात काही अर्थ नाही. इस्टेटीची वाटणी दोघांना समान करुन द्यायची म्हणजे भांडणाची शक्यताच उरणार नाही. तुला काय वाटतं मी योग्यच केलं ना?”

” तुम्ही म्हणता ते मीही बऱ्याचदा अनुभवलंय. ती सुरेखा नेहमी या दोघांची तक्रार करत असते त्यात तथ्य आहे म्हणायचं. तुम्ही योग्य तेच केलंत”

मृत्यूपत्र रजिस्टर्ड होऊन सोळा दिवसही होत नाहीत तर बापूकाका गेल्याची नकोशी बातमी

रमेशने फोन करुन मला दिली. मी सुनंदाला घेऊन गावी गेलो. अंत्यसंस्कार होण्यापूर्वी आणि झाल्यानंतरही योगेश माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. बापूकाकांच्या जाण्याचं त्याला नक्कीच दुःख झालं असणार कारण रमेशपेक्षा तो त्यांच्या जास्त जवळ होता. शिवाय तो त्यांचा लाडकाही होता. दुसऱ्या दिवशी एका महत्वाच्या खटल्यात ऑर्ग्युमेंट असल्यामुळे मला नाईलाजास्तव घरी परतावं लागलं. सुनंदा मात्र तिथेच राहिली. तिसऱ्या दिवशीच्या धार्मिक विधीसाठी मात्र मी परत गांवी गेलो. दुपारच्या जेवणानंतर मी निरोप घेण्यासाठी योगेशकडे गेलो. “मी निघतो. काही मदत लागली तर कळव “असं त्याला म्हंटल्यावर त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. मी आणि सुनंदा गाडीत बसून निघालो. थोडं अंतर गेल्यावर सुनंदा म्हणाली

” योगेश भाऊजी तुमच्याशी काही बोलले नाहीत वाटतं?”

” सध्या तो दुःखात असेल. बापूकाकांवर फार प्रेम होतं त्याचं “

” प्रेमबीम होतं ते ठिक आहे. पण दुःख्खबीख्ख काही नाही. आपला राग आलाय त्यांना”

” काय सांगतेस?”

” हो मग!बापूकाका त्यांना पुर्ण प्राॅपर्टी देणार होते आणि तुम्ही ती अर्धी करुन टाकली. मग त्यांना राग येणं स्वाभाविक आहे. ती शैलाही माझ्याशी तीन दिवसांत एक शब्दही बोलली नाही. मी काय घोडं मारलंय तिचं?तुम्ही तिला बैठकीत बोलू दिलं नाही त्याचा राग ती माझ्यावर काढतेय. सुरेखाही सांगत होती की योगेश भाऊजी आणि शैला दोघंही तिच्याशी बोलत नाहियेत. वाटण्या झाल्यावर शैला तिच्याशी फोनवर खुप भांडली. सुरेखाने तुमच्या मनात योगेशभाऊजींबद्दल काहीबाही भरवून दिलं असं तिचं म्हणणं होतं”

” कमाल आहे या लोकांची. भांडणं होऊ नये म्हणून दोघांना समान वाटे करुन दिले. तरी त्यावरुनही भांडणं करताहेत. बापूकाकांनी बोलावलं, त्यांनी निर्णय माझ्यावर सोपवला म्हणून मी मध्यस्थी केली. नाहीतर मला त्यांच्या भानगडीत नाक खुपसायचं काही कारण नव्हतं. असो. आता बापूकाका गेले. आता दोघं भाऊ भांडोत की प्रेमाने राहोत आपल्याला काय करायचंय “

नवव्या दिवशी रमेशचा फोन आला. दशक्रिया विधी, गंधमुक्ती आणि उदकशांतीच्या कार्यक्रमाला मला निमंत्रण देत होता. मी त्याला म्हंटलं

” रमेश खरं तर निमंत्रण देण्याचं काम योगेशचं आहे. पण तो आणि त्याची बायको आमच्याशी बोलतही नाही. मग आम्ही यायचं तरी कशासाठी?”

” दादा ते आमच्याशीही बोलत नाहीत पण म्हणून आपल्याला आपलं कर्तव्य तर टाळता येत नाही ना? तुम्ही माझ्याकडे बघून कार्यक्रमाला या. तुम्ही आला नाहीत तर बापूंच्याही आत्म्याला शांती मिळणार नाही “

त्याने असं म्हंटल्यावर माझा नाईलाज झाला. इच्छा नसतांनाही मी आणि सुनंदा  कार्यक्रमाला जाऊन आलो.

बापूकाका जाऊन तीन महिने उलटून गेले. या तीन महिन्यात ना योगेशचा फोन आला ना रमेशचा. मीही आता सगळं आलबेल झालं या समजुतीने कुणालाही फोन करणं टाळलं. इस्टेटीच्या वादात स्वतःहून नाक खुपसणं म्हणजे मुर्खपणा असतो याचा मी अनेकदा अनुभव घेऊन चुकलो होतो.

एकदिवस संध्याकाळी सुरेखावहिनीचा फोन आला आणि मी धास्तावलो.

” हं. बोल वहिनी. आज बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीस “

” हो भाऊजी. मला तुम्हांला हे विचारायचं होतं की आमच्या वाट्याची प्राॅपर्टी योगेश भाऊजींच्या नावावर करायला काय करावं लागेल?”

ते ऐकून मला धक्काच बसला.

” योगेशच्या नावावर?का गं?अचानक असा धक्कादायक निर्णय का?”

” खरं सांगू भाऊजी ह्यांना तर नाहीच नाही पण मलाही त्या प्राॅपर्टीत कसलाही इंटरेस्ट नव्हता. देवाच्या दयेने आमच्याकडे सगळं काही भरपूर आहे. मात्र बापूंनी आयुष्यभर ह्यांच्यावर जो अन्याय केला तो मला सहन होत नव्हता. ह्यांनी त्या घरासाठी इतकं काही केलं पण बापूंनी त्याची किंमत नाही केली. सतत लहान मुलाचे लाड केले. एखादा बाप असा दोन मुलात भेदभाव कसा करु शकतो या विचाराने माझा संताप व्हायचा. बघा ना त्यादिवशी तुम्ही मध्यस्थी केली नसती तर सगळी प्राॅपर्टी बापू योगेश भाऊजींना द्यायला निघाले होते. मग संताप येणार नाही तर काय?”

” तुझं म्हणणं बरोबर आहे. पण अर्धा हिस्सा मिळाल्यानंतर आता परत करायचं काय कारण?”

” भाऊजी परवा शैला आणि योगेशभाऊजी शैलाच्या तपासणीसाठी आमच्याकडे आले होते “

 “का काय झालंय शैलाला? आणि ते तर तुमच्याशी बोलत नव्हते ना?”

“भाऊजी माणसावर संकटं आली की त्याची गुर्मी, ताठा गायब होतो. त्याला बरोबर नातेवाईक आठवतात. गावातल्या डाॅक्टरांना शैलाला ब्रेस्ट कँन्सरचा संशय होता. तो इथल्या डाॅक्टरांनी खरा ठरवला”

“ओ माय गाॅड!मग आता?”

“आता काय!तिला मुंबईला जावं लागणार आहे. केमोथेरपी सुरु करावी लागणार आहे. ऑपरेशन करावं लागेल. लाखो रुपये खर्च होतील. ते दोघं तर ते ऐकूनच खचूनच गेले आहेत. म्हणून मग मीच ह्यांना म्हंटलं की जाऊ द्या आपल्या हिश्शाची प्राॅपर्टी त्यांना परत देऊन टाका. अशीही ह्यांची प्रमोशनवर पुण्याला बदली झालीये. आम्ही सगळेच पुण्याला शिफ्ट होणार आहोत. आमचं असंही त्या प्राॅपर्टीकडे लक्ष देणं होणार नाही. मग कशाला तिचा मोह करायचा?”

“पण तरीही वाट्याला आलेली  तीसचाळीस लाखाची इस्टेट अशी  सोडून देणं तुम्हांला चुकीचं नाही वाटत?”

“असं बघा भाऊजी देव आपल्याला जन्म देतांनाच स्वभावगुणांची वाटणी करत असतो. कुणाला तो स्वार्थ, मत्सर, लोभ, बेजबाबदारपणा देतो तर कुणाला परोपकार, चांगुलपणा, निस्वार्थीपणा. देवाने अशी स्वभावगुणांची वाटणी करतांना ह्यांच्या वाट्याला प्रेम, दयाळूपणा, निस्वार्थीपणा, कर्तव्यपरायणता हे गुण दिलेत. मी माझी स्वतःची तारिफ करत नाही पण थोड्याफार प्रमाणात हेच गुण माझ्याही वाट्याला आलेत. मलाही दुसऱ्यांची दुःखं बघवत नाहीत. आणि कुणीही मदतीचा हात मागितला तर मलाही धावून जावंसं वाटतं. त्याच्या उलट शैला आणि योगेशभाऊजींच्या वाट्याला लोभीपणा, द्वेष, निष्क्रियता, दुसऱ्यांकडून फक्त घेण्याची प्रव्रुत्ती हे दुर्गुण दिलेत. जशी ही वाटणी होते तसा माणूस वागत असतो”

” हो बरोबर आहे तुझं. हो पण मग काय आता शैलाच्या ट्रिटमेंटचा खर्चही तुम्हीच उचलणार की काय?”

” हो. आमच्याकडून शक्य होईल तितका उचलू. काय करणार!शेवटी स्वभावाला औषध नसतं. बरं तुम्ही सांगताय ना ती प्रोसेस?”

मी तिला सगळं समजावून सांगितलं. सगळं कायदेशीर काम करुन देण्यासाठी माझ्या एका असिस्टंट वकीलाला पाठवण्याचंही कबूल केलं. तिनं समाधानाने फोन ठेवला तशी माझी नजर समोरच्या गणपतीच्या फोटोवर गेली. सुरेखावहिनीचे शब्द आठवले आणि माणसाला केलेल्या वाटणीसाठी मी देवाला मनापासून हात जोडले.

– समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाटणी… भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ वाटणी… भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(तेवढ्यात मला पसारा आवरल्याने कोपऱ्यात शिलाई मशीन दिसली.) – इथून पुढे —- 

” मशीन नवी घेतली वाटतं. ५-६ महिन्यांपूर्वी आलो होतो तेव्हा नव्हती “

” हो. सुरेखा वहिनींनी घेऊन दिली “शैला वहिनी उत्तरली

” पण शिवणार कोण?तुला येतं?”

” हो येतं ना!उन्हाळ्यात मी महिनाभर सुरेखावहिनींकडे होते. त्यांनीच मला आग्रह करुन शिवण क्लास करायला लावला होता “

” अरे वा!मग आता गावातल्या बायकापोरी तुझ्याकडेच ब्लाऊज वगैरे शिवायला येत असतील”

” नाही हो भाऊजी. शेतीची कामं, घरची कामं, स्वयंपाक यात वेळच मिळत नाही. बरं बसा गप्पा मारत मी चहा करुन आणते “

मग मी बापूकाका आणि योगेशशी गप्पा मारत बसलो. हल्ली गावागावात राजकारण थैमान घालतंय. आमचं गांवही त्याला अपवाद नव्हतं. योगेशही एका राजकारणी पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता होता. येत्या सहा महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या. चहा पिता पिता कोणता पक्ष बाजी मारणार यावरच चर्चा सुरु होती. योगेश जरा अस्वस्थ वाटत होता. आणि तो का अस्वस्थ आहे याची मला चांगलीच जाण होती. ३-४ तासानंतर बापूकाकांच्या प्राँपर्टीचा निवाडा मी करणार होतो. त्यामुळे माझं मत जाणून घ्यायचा तो प्रयत्न करत होता. पण तो त्या विषयावर आला की मी दुसरा विषय काढत होतो.

एक वाजता आमचं जेवण आटोपलं. मला जेवण फारसं आवडलं नाही. जास्त तेलकट आणि मसालेदार म्हणजे चांगलं जेवण असा बहुतेक शैला वहिनीने समज करुन घेतला असावा. मला सुरेखा वहिनीच्या हातचा स्वयंपाक आठवला. तिच्या हाताला विलक्षण चव होती. शिवाय वेगवेगळे नवीन पदार्थ करण्यात ती तरबेज होती. बापूकाकांकडे मात्र आलं की तोच तोच मेनू जेवायला असायचा.

दुपारी तीन वाजता रमेश आला. माझ्या सांगण्यानुसार त्याने सुरेखा वहिनीला आणलं नाही त्याचा मला आनंद झाला.

चार वाजता गावातली दोन तीन प्रतिष्ठित मंडळी येऊन बसली. त्यातल्या दोघांना मी ओळखत होतो. तिसऱ्याला मात्र मी ओळखलं नाही. तसं मी योगेशला विचारलं

” हे आमच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष” योगेशने ओळख करुन दिली. मी त्यांना नमस्कार केल्यावर ते हसत म्हणाले

“वकीलसाहेब मी तुम्हाला चांगला ओळखतो. आमच्या पक्षाच्या तीनचार कार्यकर्त्यांच्या केसेस तुमच्याकडेच आहेत “

मग त्यांनी त्या कार्यकर्त्यांची नावं सांगितली. अर्थातच मी त्यांना ओळखत होतोच.

चहापाणी झाल्यावर मी मुद्द्यावर यायचं ठरवलं.

” मग मंडळी सुरु करायचं?”मी विचारलं

“हो हो करा ना”सगळे एक सुरात बोलले

मी सावरुन बसलो.

” या इस्टेटीचे मालक बापूकाका आहेत. तेव्हा त्यांचं काय मत आहे हे अगोदर जाणून घेणं आवश्यक आहे. काका तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं ते “

” मला काय दोन्ही मुलं सारखीच आहेत. दोघांना समान वाटणी करुन द्यावी असं मलाही वाटतं. पण रमेश शहरात रहातो. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. तेव्हा त्याने मन मोठं करुन लहान भावाला सगळं देऊन टाकावं असं मला वाटतं. अर्थात सर्वसंमतीने जे ठरेल ते मला मान्य राहील “

मी रमेशकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर काही भाव मला दिसले नाहीत. म्हणून मी योगेशकडे वळलो.

” योगेश तुझं काय मत आहे?”

“दादा शेतीशिवाय माझ्याकडे उत्पन्नाचं दुसरं साधन नाही. आणि तुम्ही तर जाणताच शेतकऱ्यांची परिस्थिती किती वाईट आहे ते. या शेतीत वाटेहिस्से  झाले तर मला जगणं मुश्किल होईल. तीच गोष्ट घराची. हे घर जर रमेशदादाला दिलं तर आम्ही रहायचं कुठे?नवीन घर बांधण्याची तर माझ्यात क्षमता नाही”

बैठकीत शांतता पसरली. मी रमेशकडे पाहिलं तो अजुनही तसाच स्थितप्रज्ञ दिसत होता

” रमेश तुझं काय म्हणणं आहे?”

मला वाटलं तो आता सुरेखा वहिनीने जे त्याला पढवलं असेल ते बोलेल पण तो शांततेनं म्हणाला

” दादा मला काहीच म्हणायचं नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल आणि मला माहित आहे तुम्ही योग्य तोच निवाडा कराल”

आता सुरेखा वहिनी असती तर ती नक्कीच रमेशवर संतापली असती. कदाचित रमेशला तिने पुढे बोलूच दिलं नसतं. स्वतःच आपली बाजू मांडली असती. या कुटूंबासाठी आम्ही कायकाय केलं त्याचा पाढा वाचला असता. तिला बैठकीत येऊ दिलं नाही ते चांगलंच झालं असं मला जाणवून गेलं.

” मंडळी तुम्हाला काय सांगायचं आहे?”समोरच्या दोघा प्रतिष्ठितांना मी विचारलं

” वकील साहेब तुमचं पुर्ण जिल्ह्यात नांव आहे. आपल्या गांवातही तुमच्या शब्दाबाहेर कुणी नाही. तुम्ही काय चुकीचा निवाडा करणार नाही. तेव्हा तुम्हीच काय तो निर्णय सांगून सगळ्यांना मोकळं करावं असं आम्हांला वाटतं.

मी सगळ्यांच्या चेहऱ्यावरुन नजर फिरवली. बापूकाका निश्चिंत झालेले वाटले. योगेश आणि त्याच्या सोबतच्या पक्षाध्यक्षाच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव दिसत होते. रमेश मात्र पुर्वीसारखाच स्थितप्रज्ञ दिसत होता. जणू कोणत्याही निर्णयाने त्याला काहीच फरक पडत नव्हता.

मी एक दिर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली

” मंडळी मी गेली वीस वर्ष वकीलीचा व्यवसाय करतोय. या वीस वर्षात मी प्राॅपर्टीच्या वादाच्या अनेक केसेस पाहिल्यात. या प्राॅपर्टीमुळे सख्ख्या भावाभावात, भावाबहिणीत वाद निर्माण होतात. कोर्टात केसेस केल्या जातात. दहादहा पंधरापंधरा वर्षं या केसेस चालतात. काही वेळा तर आजोबाचा खटला नातू चालवतो. पैसा, वेळ आणि मानसिक स्वास्थ्य सगळ्यांचा अपव्यय या खटल्यांमध्ये  होतो. आपापसातलं प्रेम, संबंध कायमचे संपून जातात. नव्वद टक्के केसेसमध्ये शेवटी  तडजोड होते. मग दोन्ही पक्षांना वाटायला लागतं की हीच तडजोड अगोदर केली असती तर इतका पैसा, इतकी वर्षं वाया गेली नसती. बरं वादग्रस्त प्राॅपर्टीमधून जे इन्कम मिळणार असतं तेही ठप्प पडलेलं असतं. म्हणजे इतकं करुनही हातात काय येतं तर शुन्य. योगेश आणि रमेशच्या बाबतीत मला हे होऊ द्यायचं नाहीये. दोघा भावांचे संबंध पुर्वीसारखेच रहावेत आणि दोघांपैकी एकावरही अन्याय होऊ नये या हेतूने मी माझा निर्णय आता सांगणार आहे. तो निर्णय मान्य करायचा की नाही हे सर्वस्वी रमेश आणि योगेशवर अवलंबून आहे “

” नाही नाही दादा. तुमचा कोणताही निर्णय मला मान्य असेल” रमेश घाईघाईने म्हणाला.

मी योगेशकडे पाहिलं. तो काही बोलला नाही पण चांगलाच अस्वस्थ वाटत होता.

“वकीलसाहेब तुम्ही बरोबर म्हणताय. नकोच त्या कोर्टाच्या भानगडी. आम्हीही तो वाईट अनुभव घेतलाय. सोळा वर्ष खटला चालला. होता नव्हता तेवढा पैसा वकीलाच्या मढ्यावर टाकला. आणि हातात काय आलं तर भोपळा” एक प्रतिष्ठित उद्वेगाने म्हणाले. त्यावर दुसऱ्या प्रतिष्ठितानेही मान हलवून सहमती दर्शवली

” तर मंडळी माझा निर्णय एकदम साधा सोपा आहे ” मी क्षणभर थांबलो. सगळे श्वास रोखून माझ्याकडे पाहू लागले. मी पुढे बोलू लागलो

” जी चार एकर शेती आहे त्यातले दोन दोन एकर दोघा भावांनी वाटून घ्यावेत. रमेश शहरात रहातो. त्याच्याकडून शेती होणार नसेल तर तो ती कसण्यासाठी योगेशला देऊ शकतो. आणि एक ठराविक वार्षिक उत्पन्न योगेशकडून घेऊ शकतो. मात्र मालकी रमेशकडेच राहील. आज त्या शेतीचा भाव एकरी दहा लाख आहे. जर योगेशला ती पुर्ण शेती हवी असेल तर त्याने रमेशला वीस लाख देऊन विकत घ्यावी. आता प्रश्न उरला या घराचा. मी काढलेल्या माहितीनुसार आजच्या बाजारभावाने या घराची किंमत वीस लाख आहे. हे घर विकून दोघा भावांनी दहा दहा लाख रुपये वाटून घ्यावे. जर योगेशला याच घरात रहायचं असेल तर त्याने दहा लाख रमेशला द्यावे. जर तो एवढे पैसे एकदम देऊ शकत नसेल तर त्याने पाच वर्षांत तेवढी रक्कम रमेशला द्यावी. या रकमेवर व्याज घ्यावं की नाही हा रमेशचा प्रश्न असला तरी त्याने ते घेवू नये असं मी त्याला सुचवेन “

मी थांबलो आणि सगळ्यांकडे नजर टाकली. बापूकाका मान खाली घालून बसले होते. त्यांना हा निर्णय पटलेला दिसत नव्हता. रमेशच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. योगेशच्या चेहऱ्यावर मात्र राग, निराशा, दुःख यांचं अजब मिश्रण दाटून आलेलं दिसत होतं.

“एकदम बरोबर निवाडा केला वकीलसाहेब. दोघांना समान वाटणी करुन दिलीत हे छान केलंत “एक प्रतिष्ठित म्हणाले

” होय वकीलसाहेब तुमचा निर्णय आपल्याला एकदम आवडला. कुणालाच कमी किंवा जास्त नाही. त्यामुळे भांडणाची आणि कोर्टकचेऱ्यांची शक्यताच नाही “दुसऱ्या प्रतिष्ठितांनीही पहिल्याची री ओढली.

” पण वकीलसाहेब तुम्ही योगेशच्या आर्थिक परिस्थीतीचा विचारच केलेला नाही. आता दोन एकर शेतीमध्ये तो पिकवेल काय आणि खाईल काय?लेकराबाळाची पोटं त्याने कशी भरायची?”पक्षाध्यक्ष नाराज होऊन बोलले.

” तुम्ही आपल्या गावातल्या शरद पाटीलला ओळखता?” मी प्रतिप्रश्न केला

” हो मग!शरद पाटीलला कोण ओळखत नाही?तो तर आता मोठा माणूस झालाय ” एक प्रतिष्ठित म्हणाले

“दहा वर्षांपूर्वी शरद आणि त्याच्या तीन भावांमध्ये शेतीची वाटणी झाली. शरदच्या वाट्याला फक्त दोन एकर शेती आली. पण त्या एवढ्याशा शेतीत शरदने सोनं पिकवलं. त्याने शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांवर भर दिला. पावसाच्या लहरीपणाचा त्यालाही फटका बसला असेलच की नाही पण गडी हरला नाही. फक्त शेतीवर अवलंबून रहाता येणार नाही हे ओळखून त्याने म्हशी विकत घेतल्या. दुधविक्रीचा व्यवसाय सुरु केला. आता त्याच्याकडे चाळीस म्हशी आहेत. गावात एक डेअरी आहे. तालुक्याला एक डेअरी आहे. दोन्हीकडे त्याचा व्यवसाय तुफान चालतो. शेतीतली एक काडीही तो वाया जाऊ देत नाही. तो, त्याची बायको आणि आता मुलं रात्रंदिवस झटत असतात. त्यांना एक मिनिटाचीही फुरसत नसते. शरदचे भाऊ आजही दहा वर्षांपूर्वी होते त्याच स्थितीत आहेत. पण शरद आज शेठ झालाये. त्याच्याकडे दोन ट्रॅक्टर आहेत. एक कार आहे. गावात बंगला आहे. तालुक्याला दोन प्लाॅट आहेत. मागच्याच वर्षी त्याने वीस एकर शेती विकत घेतली हे तर तुम्हांला माहित असेलच”

सगळ्यांनी माना डोलावल्या. क्षणभराने पक्षाध्यक्ष म्हणाले “पण वकीलसाहेब जे शरदला जमलं ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. योगेशला तर ते अजिबातच जमणार नाही”

“ध्येय आणि जिद्द असली की सगळं जमतं. रमेशचंच बघा ना!किराणा दुकानात साफसफाईचं आणि पुड्या बांधण्याचं काम करणारा रमेश आज क्लास वन ऑफिसर झालाय. ते या जिद्दीमुळेच ना?”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाटणी… भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ वाटणी… भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(अर्थात कायद्याच्या भाषेत आणि संपत्तीचे वाटेहिस्से करतांना या वैयक्तिक भावनांना काही स्थान नव्हतं.)  – इथून पुढे —

” बरोबर आहे तुझं वहिनी ” मी तिला सहानुभूती दाखवत म्हणालो ” रविवारी मी तिथं जाईन तेव्हा तुझ्या या भावना नक्की लक्षात ठेवेन “

” थँक्यू भाऊजी.माझी तुम्हांला एकच विनंती आहे की सारासार विचार करुनच निवाडा द्या.बापूंवर तुमच्या वडिलांचे आणि तुमचेही खुप उपकार आहेत.त्यामुळे तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत “

” चालेल वहिनी. बघतो काय करायचं ते “

“ओके भाऊजी “

तिने फोन कट केला आणि मी विचारात पडलो.

बापूकाकांचा सगळा इतिहास मी आठवला आणि मला सुरेखा वहिनी जे म्हणत होती ते सगळं पटू लागलं.पण योगेश आणि रमेशच्या आर्थिक परीस्थितीतला जमीन आसमानाचा फरक मला वकील या नात्याने सुरेखा वहिनीच्या बाजूने निवाडा करण्यास थांबवत होता.

शनिवारचा दिवस उजाडला.आज कोर्टात खुप कामं होती.दोनतीन केसेसमध्ये ऑर्ग्यूमेंटस् होती.सगळ्या केसेस मालमत्ता विवादाच्या होत्या.दहादहा पंधरापंधरा वर्ष चालणाऱ्या या खटल्यांमध्ये खरं तर काहीच दम नव्हता.दोन्ही पक्षांनी समजूतीने वाद सोडवला तर एका क्षणात निकाल लागू शकत होते.पण माणसाची दुसऱ्याला ओरबडण्याची स्वार्थी प्रवृत्ती त्याला तसं करु देत नाही. अर्थात या प्रवृत्तीमुळेच आमच्यासारखे वकील पोट भरत होते नव्हे गब्बर होत चालले होते.खेड्यापाड्यातून कामधंदा सोडून आलेली आणि दिवसभर कोर्टाच्या आवारात उदासवाणा चेहरा करुन बसलेली माणसं पाहिली की वाईट वाटायचं.कोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये असं जे म्हणतात ते अगदी खरं होतं.कोर्टात फिरतांना मला सहजच रमेश आणि योगेशची आठवण आली.रविवारी जर दोघंही अडून बसले तर कदाचित बापूकाका वारल्यानंतर त्यांचाही खटला कोर्टात उभा राहिल.आणि अशा वेळी आपण कुणाचं वकीलपत्र घ्यायचं हा मला पेच पडणार होता.पण मी मनाशी निश्चय केला की काही झालं तरी दोघांना कोर्टाची पायरी चढू द्यायची नाही.

रात्री नऊ वाजता जेवण झाल्यावर मी बातम्या बघण्यासाठी टिव्ही लावला तोच मोबाईल वाजला.शैला वहिनीचा फोन होता.मला हसू आलं.या दोन्ही जावांनी मला जज्ज बनवून टाकलं होतं आणि दोघीही एखाद्या वकिलासारखी आपापली बाजू मांडत होत्या.

” हं बोल शैला वहिनी”

” भाऊजी उद्या येताय ना?”

” हो.येतोय ना “

” भाऊजी तुम्ही म्हणाल ते आम्ही मान्य करु.तुम्ही इतके मोठे वकील.तुम्ही योग्य तोच निर्णय द्याल.पण भाऊजी तुम्हांला आमची परिस्थिती माहिती आहेच.आम्ही कसं धकवतो आमचं आम्हांला माहित.शेती अशी बेभरवशाची.जेव्हा उभं पिक पावसामुळे किंवा वादळामुळे वाया जातं तेव्हा शेतकऱ्याच्या मनाची काय स्थिती होत असेल हे सुरेखा वहिनींना कसं माहित असणार?मागच्या वर्षी  टमाट्याचं बंपर पिक आलं.पण भाव इतका पडला की टमाटे अक्षरशः फेकावे लागले.कर्ज काढून शेती करावी आणि सावकाराचं व्याज भरु शकू इतकंही उत्पन्न मिळत नाही अशी परीस्थिती असते. आता घराचे वाटेहिस्से झाले आणि अर्धी शेती जर रमेश भाऊजींनी घेतली तर आम्हांला उपाशीच मरायची वेळ येणार आहे.तीच गोष्ट घराची.त्यातही भाऊजींना वाटा द्यायचं म्हंटलं तर आम्ही रहायचं कुठे?सुरेखा वहिनी नेहमी सगळ्यांना सांगत असतात की आम्ही घराला इतके पैसे लावले ,शेतीसाठी इतका पैसा दिला पण आमच्या अडचणी त्यांच्या लक्षात येत नाहीत. तुम्हांला तर माहितच आहे की बापू किती तिरसट स्वभावाचे आहेत,त्यातून ते सतत आजारी असतात.पण आम्ही सांभाळतोच आहे ना त्यांना?दर महिन्याला त्यांना तीनचार हजाराची औषधं लागतात.कोण करतं हा खर्च?आम्हीच ना?भाऊजी रमेश भाऊजींकडे कशाचीच कमतरता नाही. दणदणीत पगार आहेच शिवाय सुरेखा वहिनींची कमाईही काही कमी नाही. असं असतांनाही बापूंच्या इस्टेटीवर त्यांनी डोळा ठेवणं कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा.कमीतकमी आमच्या परीस्थितीचा तर त्यांनी विचार करावा”

मी गोंधळात पडलो.तिचंही म्हणणं खरंच होतं.सुरेखा वहिनीचं असा इस्टेटीतला वाटा मागणं म्हणजे स्वतःचं ताट भरलेलं असतांनाही दुसऱ्याच्या ताटातले पदार्थ मागण्यासारखंच होतं.खरं तर सुरेखा वहिनी मोठ्या मनाची आहे हे मी अनेकदा अनुभवलं होतं.कुणालाही मदत करतांना ती सढळ हाताने मदत करायची.पाहुणचारातही ती कसलीच कसर सोडायची नाही. मग बापूंच्या संपत्तीच्या बाबतीतच ती का अडून बसलीये हे काही मला समजत नव्हतं.अर्थात मी आता माझं मत मांडणार नव्हतोच.

” वहिनी उद्या मी येतोच आहे.तर सगळे मिळून ठरवूया ना “

” भाऊजी माझी तुम्हाला एकच विनंती की रमेश भाऊजींना सांगा की सुरेखा वहिनींना उद्या आमच्याकडे आणू नका.तसं बापूंनी सांगितलं आहेच पण तुमचं त्या ऐकतील.त्या आल्या तर रमेश भाऊजी त्यांच्या मताप्रमाणेच चालतील”

” बरं मी सांगून पहातो “

” धन्यवाद भाऊजी.या मग उद्या.बैठक दुपारी चार वाजता आहे.पण तुम्ही जेवायलाच या.सुनंदा वहिनींनाही घेऊन येताय ना सोबत?”

“नाही. उद्या रोटरीक्लबचा एक कार्यक्रम आहे तिथे ती जाणार आहे “

” बरं पण भाऊजी मी जे बोलले ते नक्की लक्षात ठेवा “

” हो नक्की”

तिने फोन बंद केला आणि मी विचारात पडलो.बापूकाका खरं तर माझ्या वडिलांचे चुलत भाऊ.पण माझ्या वडिलांनी सर्वांशी संबंध जपले होते.अगोदर नामांकित सरकारी वकील आणि नंतर जिल्हा न्यायाधीश झाल्यामुळे त्यांना आमच्या सर्वच नातेवाईकांमध्ये मानाचं स्थान होतं.त्यांचा शब्द सहसा कुणी खाली पडू देत नसायचं.तीच परंपरा वारशानुसार माझ्याकडे चालत आली होती.प्रतिष्ठित वकील असल्यामुळे माझ्याही शब्दाला खुप मान होता.त्यातून बापूकाकांच्या कुटुंबावर माझ्या वडिलांचे खुप उपकार होते.त्यांच्या पत्नीच्या म्हणजे लक्ष्मीकाकूंच्या कँन्सरच्या आजारात त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता.विशेष म्हणजे त्यातला एक रुपयासुध्दा त्यांनी बापूकाकांना मागितला नव्हता.मी स्वतः रमेशला सरकारी नोकरीत लावून दिलं होतं शिवाय योगेशला अनेकदा आर्थिक मदत केली होती.या सगळ्या कारणांनी बापूकाकांच्या संपत्तीच्या वाट्याहिश्शाचा मी जो निवाडा करेन तो सर्वांना मान्य होणार होता.अर्थात शैला वहिनी म्हणत होती ते मला पटत होतं शिवाय बापूकाकांची स्वतःचीही इच्छा योगेशला सर्व काही देऊन टाकायची होती.रमेश त्याला हरकत घेईल असंही वाटत नव्हतं.त्यामुळे सुरेखावहिनी कितीही बरोबर असली तरी माझा निर्णय योगेशच्या बाजूनेच झुकला होता.

रविवारी सकाळी घरी आलेल्या काही पक्षकारांशी चर्चा करुन मी दहा वाजता माझ्या असिस्टंटसोबत निघालो.साठ किलोमीटरवर आमचं गांव होतं.अकरा सव्वाअकराशी मी बापूकाकांकडे पोहचणार होतो.जातोच आहे तर जरा शेताकडेही चक्कर मारावी या हिशोबाने मी लवकर निघालो.रमेश मात्र तीन वाजताच तिथे पोहचणार होता.जेवतांना या वाटणी प्रकरणावर चर्चा होणार आणि साध्यासरळ रमेशला बापूकाका गुंडाळतील असं वाटून सुरेखा वहिनीने तर त्याला लवकर जायला मनाई केली नसेल हा विचार माझ्या मनात चमकून गेला.

गावापासून पाचेक किलोमीटर अंतरावर असतांना माझा बालमित्र शरद मला दिसला.बाईकवर कुठेतरी जात होता.त्याला पाहून मी कार थांबवली.

” काय रे शरद कुठे निघालास?”मी गाडीबाहेर येत त्याला विचारलं.

” तालुक्याला काम होतं जरा.आज काय बैठक आहे म्हणे वाट्याहिश्शाची?योगेश काल सांगत होता “

” हो अरे.खरं तर अशी मध्यस्थी करणं मला बरं वाटत नाही. पण बापूकाकांचा आग्रह होता म्हणून आलो “

” बरं झालं तू आलास.गावांतही तुला मान आहे.तुझा शब्द कुणी खाली पडू देणार नाही.आणि तू योग्यच निवाडा करशील यात शंका नाही “

मग आम्ही बराच वेळ बोलत बसलो.तो निघाल्यावर मीही निघालो.बापूकाकांच्या घराकडे न जाता मी नदीकडे गाडी वळवली.नदीच्या काठावर एक शंकराचं पुरातन मंदिर होतं.त्याचं दर्शन मला घ्यायचं होतं.मंदिराजवळच्या वडाच्या पारावर काही मंडळी पत्ते खेळत बसली होती.ती खेळण्यात इतकी मग्न होती की मी गाडी बंद करुन मंदिराजवळ आलो तरी त्यांचं लक्ष नव्हतं.मी शंकराचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि मला योगेश त्या मंडळीत पत्ते खेळतांना दिसला.

” योगेशsss” मी हाक मारली तसा तो दचकला. मला पहाताच तो पत्ते टाकून उठला.त्याच्यासोबत खेळणाऱ्यांचा मात्र चांगलाच रसभंग झालेला दिसला.

” दादा तुम्ही इकडे कसे?”ओशाळवाणं हसत त्याने विचारलं.

“काही नाही. मंदिरात दर्शनासाठी आणि नदीत पाणी किती आहे ते पाहण्यासाठी आलो होतो.तू इथे काय करतोहेस?”

“काही नाही दादा.बस काहीतरी टाईमपास करतोय “

“का?आज शेतीची कामं नाहीत?”

” माणसं गेली आहेत दादा.मीही सकाळी एक चक्कर मारुन आलो ” तो घाईघाईत बोलला ” बरं चला घरी जाऊ.बापू वाट बघत असतील तुमची”

” हो चालेल.चल बैस गाडीत “

त्याला गाडीत घेऊन मी त्यांच्या घरी आलो.घर अनेक वर्षांपासून आहे त्याच स्थितीत होतं.मी आत शिरलो.बाहेरच्या खोलीत खुप पसारा पडला होता.योगेशने खुर्च्यांवरचा पसारा उचलला.

“बसा दादा.शैला जयंतदादा आलेत गं.पाणी घेऊन ये “योगेश आत गेला आणि शैला वहिनी लगबगीने बाहेर आली.

” अरे बापरे.भाऊजी लवकर आलात?तुम्ही तर बारा वाजता येणार होतात ना?”

तिने मला वाकून नमस्कार केला आणि ती भरभर पसारा आवरायला लागली.तेवढ्यात बापूकाका बाहेर आले.तब्येत बरीच खराब दिसत होती.मी त्यांना नमस्कार केला.

” लवकर आलास?”

” हो.शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन करायचं होतं आणि म्हंटलं जरा नदीही किती भरलीये ते बघू.जास्त काही पाणी दिसत नाहिये”

” सध्या पाऊसच कुठे व्यवस्थित पडतोय?जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही आणि नको तेव्हा मुसळधार पडून सगळी पिकं खराब करतो “

तेवढ्यात मला पसारा आवरल्याने कोपऱ्यात शिलाई मशीन दिसली

– क्रमशः भाग दुसरा.  

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाटणी… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ वाटणी… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

एका केसची फाईल चाळत असतांनाच मोबाईल वाजला. बापूकाकांचं नांव स्क्रीनवर पाहून मला आश्चर्य वाटलं. कारण काका क्वचितच कुणाला स्वतःहून फोन करत.

” बोला काका. आज बऱ्याच दिवसांनी फोन केलात. तब्येत वगैरे ठिक आहे ना?”

” तब्येतीचं काय सांगायचं?तशी ठिक आहे पण सतत काहितरी आजारपण सुरुच असतं. जीवाला काही आराम नाही “

“आता वय झालं की असं होणारच. बोला आज कशी काय आठवण काढलीत?”

” फोन याचकरीता केला की आता माझ्या तब्येतीचं काही खरं राहीलं नाही. म्हंटलं काही बरंवाईट होण्याच्या आत घराचे वाटेहिस्से करुन द्यावेत. म्हणजे आपण गेल्यानंतर पोरांनी कोर्टकचेऱ्या करायला नकोत “

काका योग्य तेच म्हणत होते. मागेही त्यांना तसं सुचवण्याचा विचार माझ्या मनात आला होता पण ते त्यांना कितपत रुचलं असतं हा विचार करुन मी चुप बसलो होतो.

” हो बरोबर. मग तुमचा काय विचार आहे तसं मला सांगा म्हणजे तसं मृत्युपत्र तयार करता येईल”

” या रविवारी तुला गांवी यायला जमेल का?रमेशलाही बोलावून घेतो. गांवातल्या एकदोन प्रतिष्ठित मंडळींनाही सांगावा धाडतो. एकत्र बसून सगळ्यांच्या सल्ल्याने ठरवू. मग मृत्युपत्र बनवू “

” हो चालेल. पण तुमची इच्छा काय आहे ते तरी कळू द्या “

” तशी काय आपली फार मोठी इस्टेट नाही. एक घर आणि शेती याव्यतिरिक्त आपल्याकडे काहिही नाही. आणि तू तर बघतोच आहेस की रमेशचं सगळं व्यवस्थित चाललं आहे. सरकारी नोकरी आहे. शहरात स्वतःचं मोठं घर आहे. चारचाकी गाडी आहे. योगेशकडे त्यातलं काही नाही. कशीबशी शेतीवर गुजराण करतो बिचारा. म्हणून रहातं घर आणि शेती दोन्ही त्याच्या नावावर झालं तर बरं होईल “

काका योग्य तेच म्हणत होते. मी स्वतःही ते जाणून होतो.

“हो बरोबर. मला वाटतं काका रमेशही काही हरकत घेईल असं वाटत नाही. तो तसा समजदार आहे “

” मलाही तसंच वाटतं. रमेश चांगलाच आहे रे पण त्याची बायको जास्त शहाणी आहे. ती त्याला तसं करु देणार नाही “

सुरेखा वहिनी हुशार होती. उच्चशिक्षित होती हे मला माहित होतं पण आपल्या दिराची आर्थिक परिस्थिती तिलाही दिसत होती आणि अशीही तिच्या संसारात कोणत्याच गोष्टींची कमतरता नव्हती. त्यामुळे ती काही आडकाठी घेईल असं मला वाटत नव्हतं. अर्थात इस्टेटीचा प्रश्न आला की माणुसकी, रक्ताची नाती विसरली जातात, भाऊ भावाचा, मुलगा वडिलांचा खुन करायला मागेपुढे पहात नाही हे माझ्या वीस वर्षांच्या वकिली व्यवसायात मी अनेकदा अनुभवलं होतं.

” ठिक आहे काका. मी येतो. समोरासमोर बसुनच ठरवू. मात्र रमेशला सांगून ठेवा की सुरेखा वहिनीला सोबत आणू नकोस. भावांऐवजी जावांचीच भांडणं व्हायची ” मी हसत म्हणालो

” तसं काही होणार नाही पण ती भानगडच नको. मी रमेशला तसं सांगून पहातो. पण त्याचंही बायकोपुढे फारसं चालत नाही “

” तसं तर बहुतेक नवऱ्यांचं बायकोपुढे चालत नाही ” मी हसत म्हणालो ” पण ठिक आहे. सुरेखावहिनी आलीच तर मग काही इलाज नाही “

” खरंय. ठिक आहे. ये मग नक्की “

असं म्हणून काकांनी फोन बंद केला. माझ्या डोळ्यासमोर सुरेखावहिनी उभी राहिली आणि माझ्या लक्षात आलं की कुणी कितीही तिला नावं ठेवली तरी तिच्या हुशारीमुळेच रमेशची भरभराट झाली होती हे मात्र शंभर टक्के खरं होतं. ती महत्वाकांक्षी होती. रमेशला प्रमोशनच्या परीक्षा द्यायला लावून तिने हट्टाने त्याला अधिकारी बनवलं होतं. तिच्या तुलनेत रमेश अतिशय साधा होता. मी त्याला सरकारी नोकरीत लावलं नसतं तर तो आजही कुठल्यातरी दुकानात फालतू नोकरी करीत बसला असता. तसा तो मेहनती होता. मात्र स्वतःची प्रगती करुन घ्यायची हुशारी त्याच्यात नव्हती.

संध्याकाळी कोर्टातून घरी आलो. चहा घेऊन होत नाही तोच मोबाईल वाजला. स्क्रीनवर सुरेखावहिनीचं नांव वाचल्यावर माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. आता ही बया काय म्हणते या विचारातच मी फोन उचलला

” भाऊजी मी सुरेखा बोलतेय. कामात तर नाही ना?नाहीतर नंतर फोन करते “

” नाही नाही. बोल ना “

” भाऊजी बापूंचा तुम्हांला फोन आला असेल. रविवारी तुम्हांला बोलावलं असेल. खरं ना? “

” हो बरोबर. का?काही अडचण?”

” नाही अडचण काही नाही. पण ते तुम्हांला हेच सांगतील की रमेशला काही कमी नाही तर घर आणि शेत योगेशला देऊन टाकूया “

मी सावध झालो. माझ्यातला वकील जागा झाला. ती माझं मत विचारणार होती आणि ते आताच उघड करणं चुकीचं झालं असतं

” तसं ते मला काही बोलले नाहीत. पण तसं ते पुढे बोलले तर मग तुझा विचार काय आहे ?”

“भाऊजी मी तुमचं मत विचारतेय. तुम्हांला काय वाटतं देऊन टाकावं सगळं योगेशभाऊजींना?”

मी आता काय बोललो त्याचा उल्लेख रविवारी होणाऱ्या चर्चेत नक्कीच झाला असता त्यामुळे मी माझं मत व्यक्त करणं चुकीचं होणार होतं.

” मला काय वाटतं यापेक्षा दोघा भावांना विशेषतः बापूकाकांना काय वाटतं ते महत्वाचं आहे वहिनी. कारण इस्टेट त्यांची आहे. रविवारच्या बैठकीत त्यावर चर्चा होईलच”

” भाऊजी मला मान्य आहे की आम्हांला कशाचीच कमतरता नाही. ह्यांची चांगली नोकरी आहे आणि माझा ब्युटीपार्लरचा व्यवसायही उत्तम सुरु आहे. पण मला सांगा लहानपणापासून आतापर्यंत बापूंनी ह्यांना काय दिलं?कोणतं बापाचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं?माझ्यापेक्षा तुम्हीच हे जाणता की वयाच्या दहाव्या वर्षापासून हे काम करताहेत. त्याच्याही अगोदर पाच वर्ष हे त्यांच्या मामाकडेच शिकायला होते. म्हणजे जन्मल्यापासून फक्त पाच वर्ष बापूंनी ह्यांना सांभाळलं. ती पाच वर्षही अतिशय गरीबीची होती असं मला ऐकून माहित आहे. आज हे बेचाळीस वर्षाचे आहेत. या बेचाळीस वर्षात कधी बापूंनी ह्यांना नवीन कपडे केलेत?कधी ह्यांची मुलगा म्हणून हौसमौज पुर्ण केली?कधी ह्यांच्या शिक्षणावर खर्च केला?सांगा ना कोणतं बापाचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं?उलट बापाने ह्यांना पोसायच्या ऐवजी ह्यांनीच आईबापांना पोसलं हे तर जगजाहीर आहे “

ती पोटतिडकीने बोलतेय आणि तिच्या बोलण्यात काही चुक नव्हती हे मला समजत होतं. पण काहितरी बोलावं म्हणून मी म्हणालो

” हो हे मान्य आहे मला वहिनी पण बापूकाकांची आर्थिक परीस्थितीच तशी होती. शेती अशी बिनभरवशाची. कधी दुष्काळ तरी कधी अतिवृष्टी तर कधी पिक जोमाने आलं तर शेतमालाला भाव नाही. चार एकर शेतीत कसं करावं माणसाने?ते स्वतःच कसंबसं पोट भरत होते. मुलांची हौसमौज त्यांनी करावी तरी कशी?ते नेहमीच आर्थिक विवंचनेत असत. माझ्या वडिलांनीही त्यांना बऱ्याचदा आर्थिक मदत केलीये”

” हो भाऊजी ते कळतंय मला. पण माझ्या नवऱ्याने काय नाही केलं त्यांच्यासाठी?जीवापाड कष्ट करुन शेतीला वेळोवेळी पैसा पुरवला. प्लाॅट घेऊन घर बांधायला मदत केली. योगेश भाऊजींचं शिक्षण केलं. दहा वर्षांपूर्वी आई वारल्या तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराचा आणि धार्मिक विधींचाही खर्च ह्यांनीच केला. बापूंनी आणि योगेश भाऊजींनी एक रुपयाची मदत केली नाही. दोन वर्षांपूर्वी बापूंची एंजिओप्लास्टी झाली तेव्हाही तसंच. सगळा खर्च ह्यांनीच केला. तेव्हाही योगेश भाऊजींनी एक रुपयाची मदत केली नाही. या गोष्टींची तरी त्यांनी जाणीव ठेवायला हवी होती की नाही?योगेश भाऊजी कामाला लागले, शेतीत चांगलं उत्पन्न मिळू लागलं तेव्हा तर बापू काही करु शकले असते?मुलाला एखादं शर्टाचं पीस आणि सुनेला एखादी साधी साडी घेण्याचीही त्यांची ऐपत नव्हती?”

“म्हणजे आजपर्यंत त्यांनी कधीही तुम्हांला कपडे वगैरे घेतले नाहीत?तुम्हांला नसतील तर तुमच्या मुलांना तर केले असतील?”

ती आता रडायला लागली. रडतारडता म्हणाली

” भाऊजी एक छोटंसं खेळणं, एखादं चाँकलेटसुध्दा बापूंनी माझ्या मुलांना कधी घेऊन दिलं नाही. कधी विषय काढला तर म्हणतात, तुम्हांला काय कमी आहे. धो धो पैसा वाहतोय. पण मग आम्ही सतत देतच रहावं का?त्यांच्याकडून कधी अपेक्षाच करु नये का?दिवाळीला गांवी गेलं की आम्ही सगळ्यांना कपडे करतो. योगेश भाऊजींच्या मुलांसाठी खुप सारा खाऊ घेऊन जातो. फटाके घेऊन जातो. आणि ते आम्हांला काय देतात?दोन किलो मुगाची आणि तुरीची डाळ?योगेश भाऊजींना आणि त्यांच्या बायकोला कळत नसेल तर बापूंनी तर त्यांना सांगायला पाहिजे?”

ती म्हणत होती तो एकूण एक शब्द खरा होता. बापूकाकांचा स्वभाव तसाच होता. माझ्या वडिलांनीही त्यांना अनेकदा मदत केली होती पण कधीही त्यांनी माझ्या वडिलांना काही घेतलं नव्हतं. एवढंच काय आम्ही त्यांचे पुतणे असूनही कधी आमच्यासाठी खाऊ आणल्याचं ही मला आठवत नव्हतं. यावरुन घरात माझ्या आईवडिलांचेही बऱ्याचदा वाद झालेले मी बघितले होते. मला काय बोलावं ते सुचेना. क्षणभराने मी तिला विचारलं

” मग रमेश काय म्हणतो अशा वेळी?”

” ते काय म्हणणार?तुम्हांला तर माहितच आहे की ते हरीश्चंद्राचे अवतार आहेत. मी काही म्हंटलं की म्हणतात ‘जाऊ दे आपण मोठे आहोत, आपण आपलं कर्तव्य करत रहायचं. देवाच्या कृपेने आपल्याला कसलीच कमतरता नाही. ते गरीब आहेत. त्यांच्याकडून आपण कशाला अपेक्षा करायची?’ भाऊजी मला सांगा झोपडपट्टीत रहाणारेसुध्दा आपल्या कर्तव्याला चुकत नाहीत. आमच्या घरी काम करणारी बाई तिचा श्रीमंत भाऊ तिच्याकडे आला तर त्याला आणि त्याच्या बायकोला कपडे केल्याशिवाय सोडत नाही. मग बापू आणि योगेश भाऊजी एवढे भिकारी तर नाहीत ना?”

सुरेखा वहिनीचा दुखरा कोपरा माझ्या आता लक्षात आला होता. बापूकाका, योगेश आणि त्याची बायको रमेशच्या कुटुंबाला किंमत देत नव्हते आणि हीच गोष्ट सुरेखा वहिनीच्या जिव्हारी लागली होती. अर्थात कायद्याच्या भाषेत आणि संपत्तीचे वाटेहिस्से करतांना या वैयक्तिक भावनांना काही स्थान नव्हतं.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दर्शन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “दर्शन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

“विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येते” ती सुनबाईला म्हणाली.

“कुठे जाता ?आज एकादशीची गर्दी असेल. “

“अग पंढरपूरला जायचं नशिबात नाही. ईथल्या तरी विठ्ठलाला भेटून येते.. देऊळ जवळ तर आहे”

“आजे मी येणार….. “

बारका नातु मागे लागला.

“अरे तुला कुठे गर्दीत सांभाळू… “

तस नातवानं भोकाडच पसरलं…

“मला पण विठ्ठलाला यायचयं “

तशी सुनबाई म्हणाली,

“एवढं रडतयं तर न्या की…

हे घ्या अकरा रुपये ठेवा देवाला… या दोघं दर्शन करून”

पोरगं खुष झालं खीदळायला लागल.

देवळात ही गर्दी होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोरगं आनंदलं होत. नाचत होत. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तस पोरग मात्र थोड्या वेळा नंतर कंटाळलं……

“आजे कधी दिसणार तुझा विठ्ठल?”

“आता थोड्या वेळानं दिसेल हं… जवळ आलो.. लगेच दर्शन होईल.. “

तिनी नातवाची समजुत काढली.

जरा वेळानं पोरगं म्हणालं,

“आजे गोष्ट सांग ना “

“अरे इथे कुठे ? घरी गेल्यावर सांगते”

“इथच सांग “

पोराला काहीतरी सांगून नादी लावायला हवं… म्हणून तीनी जनी दळण दळताना दमते… मग विठुराया येऊन तिला दळायला मदत करायचा ती छोटी गोष्ट सांगितली…

“आजे तुला दिसला का कधी तुझा विठ्ठल ? “

“माझं कुठलं बाबा एवढा भाग्य.. मला कुठला दिसायला विठ्ठल.. ” ती म्हणाली,

ईतक्यात पोराचं लक्ष गोळ्या विकणाऱ्या मुलाकडे गेलं. लगेच म्हणाला..

“आजे मला गोळ्या घे की…. “

“गप रे… पैशे नाहीत”

“ए आजे घे की.. “

पोरग ऐकेच ना.. हट्टच करायला लागलं…

देवाचे पैसे… अकरा रूपये तेवढे होते.

दुसऱे आणलेच नव्हते… पण पोरगं हट्टानं आलय खरं.. जाऊ दे.. लहान लेकरू आहे….

म्हणून… दहा रुपयाच गोळ्यांच पाकीट तीनी घेतलं. पोरगं जरा रमलं… पुढच्या दोन चार बारक्या पोरींनाही त्यानी गोळ्या दिल्या…

तसं त्या पोरीपण खुषं झाल्या..

“आजे तुला घे की गोळ्या…. “

“नको रे… “

आजीचं लक्ष विठ्ठलाकडे…

बऱ्याच वेळानी नंबर जवळ आला. तसं आजीनी पोराला कडेवर घेतलं.

“हा घे रुपया जवळ गेलं की त्या पेटीत टाक…. “

“आज दुसरं काहीच आणल नाही देवा… परत येईन तेव्हा आणीन रे… ” 

हात जोडून तिने विनवणी केली.

समोर विठ्ठलाला पाहिलं तस तिला कृतकृत्य झालो असं वाटलं.. आज ईथे का होईना.. त्याच दर्शन तर झालं….

ते सावळे रूप समोर दिसलं…

 पिवळा पितांबर, जरीचा शेला, गळ्यात तुळशीचे हार , कपाळाला बुक्का भक्ती भावानी आजींनी दर्शन घेतलं आपल्याबरोबर नातवाचही डोकं विठ्ठलाच्या पायावर टेकवलं….

पोरगं हसलं….

पुजाऱ्यान पोराच्या कपाळाला बुक्का लावला विठ्ठलाचा हार पोराच्या गळ्यात घातला…

पोरगं हरखूनच गेलं…

आजी बघायला लागली… गर्दीतून बाहेर आली. नातू गळ्यातला हार काढू देईना..

“मी नाही काढणार “म्हणायला लागला… तशीच घरी आली.

आता पोरगं जाम खुष होतं. नाचत होतं

दारातच सुनबाई.. म्हणाली,

“झालं का दर्शन ? आणि ह्याच्या गळ्यात हार कोणी घातला ?”

“अगं दर्शन झालं आणि लगेच पुजाऱ्याने ह्याच्या गळ्यात हार, कधी घातला मलाही कळलं नाही “

“बसा पाणी देते. पोरान त्रास नाही ना दिला…. “

तसं पोरगं आईवर रागवलं.. कमरेवर हात ठेवून आईकडे बघायला लागलं….

“बघा सासूबाई ध्यान कसं दिसतय….. “

आईनी असं म्हटल्यावर पोरगं हसायला लागलं…

आजी बघायला लागली…

कमरेवर हात, कपाळाला बुक्का, आणि गळ्यात तुळशीचा हार घातलेला नातू तिच्याकडे बघून गोड हसत होता… काय झालं कळलंच नाही.. पण नातवाचा चेहरा तिला वेगळाच दिसत होता…

तिचे डोळे भरून आले….

क्षणभर काही समजेच ना….

तिला नातवाच्या जागी विठ्ठल दिसायला लागला…. साक्षात्कार झाल्यासारखंच झालं…

नातु हसतच होता….

ती निरखून बघायला लागली..

नातवाने मगाशी विचारलेलं..

“आजे तुला दिसला का ग तुझा विठ्ठल “हे तिला आठवलं…

आता तिचे डोळे भरून आले होते

ती बघतच राहिली…

हसत हसत… नातु एकदम धूम पळाला…

सुनबाई खिचडी करायला आत गेली..

भरल्या गळ्यान आजी म्हणाली

इथे जवळच आहेस…

इतका वेळ कडेवर होतास का रे…

धन्य रे बाबा तुझी…..

जनाबाईची दळणं तू दळायला गेला असशील पटलं बाबा मला आज..

आतूनच तिला लख्खपणे काहीतरी जाणवलं….

ती मनात म्हणाली…

“ईतकी वर्षे झाली अजूनही आमच्या आसपास आहेस… आम्हालाच समजायला उशीर होतोय…….. “

एकादशीला पंढरपूरला जायला मिळालं नाही याचं दुःख कुठल्या कुठे पळालं… विठ्ठलानी स्वतः येऊन क्षणभरका का होईना… आपल्याला दर्शन दिलं असंच तिला वाटलं.

त्याला कशात बघायचं हेही तिला आज नीट ऊमगलं…

आपल्याही आसपास असेलचं आपलाही विठ्ठल…

जरा नीट बघू आपण.. हळुहळु येईल ती दृष्टी…. ,

आपल्यालाही दिसेल मग… कुठल्या न कुठल्या रूपात..

आपला विठुराया…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माझी दुर्गा, माझी अष्टभुजा… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ माझी दुर्गा, माझी अष्टभुजा… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

आमची सोळा वर्षाची लेक मृण्मयी, कन्या-लक्ष्मी आहे. असंच समजा नां, आमच्या घरातली दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणजेच देवीच्या अनेक रूपातली ती एक अंश आहे. धोक्याच्या वयातही ती कधीच चुकीचे पाऊल उचलणार नाही, उलट इतरांना धोक्यातून वाचवते.

खडकवासला धरणाचं पाणी सोडल्याचा तो काळाकुट्ट दिवस, आजही माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. खडकवासला धरणातून सुटलेले पाणी थेट आमच्या घरांत शिरल होत. सन सिटी रोड वरच्या, उतारावरच्या, एकता नगर, निंबज नगर सोसायटी, धोक्यात असल्याच्या बातम्या टी. व्ही. वर झळकल्या. बऱ्याच जणांची घरे धुवून निघाली. पाणी आमच्याही घरांत शिरल. आम्ही गांगरलो. बायको माहेरी गेली होती. माझी वयस्कर आई तर मटकन् खालीच बसली. प्रसंगावधान राखून मृण्मयीने पदर बांधला आणि ती अष्टभुजा झाली. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे, कपडे तिने साडीच्या गाठोड्यात बांधल्या. आजीच्या पोथ्या आणि मुख्य म्हणजे तिची औषधे गोळ्यांची पुरचुंडी आजीच्या ताब्यात देतांना नातीनें बजावल, ” आजी ही तुझी इस्टेट नीट सांभाळ”.

थोडी आवराआवर झाल्यावर तिने माझ्याकडे मोर्चा वळवला, ” बाबा आता इकडचं आणि आजीचं मी बघते. तुम्ही आता आपल्या दुकानाकडे बघा. ” 

“अरेच्चा ! खरंच की ! दुकानांत पण पाणी शिरलं असेल. बापरे! मी विसरलोच होतो. वास्तवाचं भान मला आल आणि कापरंच भरलं. अगदी कालच मी दुकानात लोखंडी सामानाचा 80 हजाराचा माल भरला होता. वाटेतला चिखल तुडवत मी दुकान गाठल. तर खालचा कप्पा पूर्ण पाण्यात होता. मी हताश झालो, डोळ्यात जमा झालेले अश्रू ओघळले. आणि पाण्यात मिसळले. दिलाश्याची थाप पाठीवर पडली. आणि लेकीचा आवाज कानावर पडला, ” बाबा दुकानात शिरलेल्या पाण्यात तुमच्या डोळ्यातल्या पाण्याची भर कशाला ? ऐका ना! शेजाऱ्यापाजाऱ्यांची, मुलाबाळांची, आजीची व्यवस्था करून आमची टीम आता आपल्या दुकानाकडे वळली आहे. ” इतक्यात उत्साही मुला-मुलींच्या मेळाव्यातून पुढे येत यशपाल हसत म्हणाला, ” काका शांत व्हा. इथे आरामात खुर्चीवर बसा बरं! आणि हे खडकवासल्याहूनच आलेलं पण शुद्ध, आणि घरचं पाणी प्या. आता सगळं आमच्यावर सोपवायचंय. आणि हो! अहो काका, सकारात्मक विचार करायला तुम्हीच तर शिकवलंत ना आम्हाला ?अर्धा पेला रिकामा झाला तरी अर्धा भरलेला आहे, ते बघायचं असत. असं तुमच्याकडूनच शिकलोय आम्ही हो ना? ” घोळक्यातली एक मैना चिंवचिंवली, “अय्या खरंच की! दुकानातला अर्धा माल पाण्यात आहे पण वरचा कप्पा अगदी कोरडा ठणठणीत आहे. काका बघा तर खरं! आपलं खूप नुकसान नाही झालं ” असं म्हणत उड्या मारत ती वानरसेना पुढे सरसावली. इतर कामांचा फडशा पाडून आबाल वृद्धांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था लावून ही ‘गॅंग’ आता आमच्या मदतीसाठी पुढे धावली होती.

पाणी ओसरल. बोल बोलता भिजलेल्या मशीनचे भाग सुट्टे झाले. पुसायला कोरडी फडकी मिळेनात. एक दोघांनी तर मशिन पुसायला अंगातला शर्ट काढला, आणि मशीन्स साफ केली. काही तासातच ओला कारभार कोरडा झाला. आता लोखंडी मालाला गंज चढण्याची भीती नव्हती. नुकसान टळलं होतं, ते वेळीच धाऊन आलेल्या या समाजसेवक तरुणांमुळे, हे मान्य करावेच लागेल. पाण्यामुळे मशीनचा काही भाग निकामी झाला होता, तो मित्रांच्या मदतीने, माझ्या कन्येने गाडीवर घालून जुन्या बाजारात विकला. तिजोरीच्या गल्ल्यात भर पडली. काही दिवसातच दुकान पहिल्यासारखं चकचकीत झालं. आता आलं नवरात्र, नंतरच्या दसऱ्यादिवाळीला मृण्मयी दुकान सजवणार आहे. ती म्हणाली, “बाबा आपण यावेळी फुलांच्या माळा सजावटीसाठी नको आणायला” वर्धमान ओरडला, “अगं मार्केट यार्ड मधून आणूया की आपण फुलं, स्वस्त आणि मस्त मिळतील. ” त्या तरुणाईत इतका सळसळता उत्साह संचारला होता की, मला वाटलं, हा आत्ताच मार्केट यार्ड गाठतोय की काय, त्याला खाली बसवत मृण्मयी म्हणाली, ” ऐक ना वर्धमान! आपण यावेळी लोकरीचेच तोरण आणि माळा आणूया. फुलं काय लवकर सुकतात. आणि कचऱ्यात जमा होऊन डासांची भरती होते. फुलं कुजल्यावर प्रदूषणही वाढतं त्यापेक्षा लोकरीच्या माळा टिकतातही हो कीनाही? आणि अरे आपली संस्कृती, आपली पारंपारिक कलाकुसर, काळा आड लोप पावतीय ना!तिला उजाळा तरी मिळेल. आणि हो लोकरीच्या माळा धुताही येतात. शिवाय प्रत्येक टाक्यात जिव्हाळा असतोच असतो, पण करणारीच्या हाताची उबही त्यात सामावलेली असते आणि निर्मितीचा आनंद असतो तो वेगळाच. ” 

तिचा बोलण्याचा धबधबा आवरतांना, मिस्किल संकेतला चेष्टेची लहर आली तो म्हणाला, ” बरं राहयलं! नाही आणत आम्ही फुलं आणि कागदाच्या माळा सुद्धा नाही आणत. मी बापडा तुळशीबागेतून लोकर आणि सुयांचे बंडलच आणतो. मग आमची मृण्मयी विणकाम शिकेल नंतर मग सावकाश विणत बसेल, आणि मग थोड्या दिवसांवर आलेल्या दसरा दिवाळीसाठी विणकामाच्या सुयांशी लढाई करत करत, माळा विणेल. क्या बात है” l त्याच्या चेष्टेच्या सुरात सगळ्यांचा सूर मिसळला आणि मग काय!हास्याची कारंजी उसळली. मी हा सगळा गंमतीचा मामला कान देऊन ऐकत होतो. नाकाचा शेंडा उडवत गाल फुगवून संकेतला चापट मारत, आमचं कन्यारत्न काहीतरी बोलणार इतक्यात छोटया गजुनी मुक्ताफळ उधळली,

” झाssल! मृण्मयी ताई लोकरीच्या माळा विणायला बसल्यावर, मग काय! पुढच्या वर्षीचाच दसरा दिवाळी उगवेल. “आणि मग पुन्हा हास्याची कारंजी उसळली.

काही वेळापूर्वी निराश झालेला मी खळखळून हंसलो. मित्र-मैत्रिणींना दटावत बाईसाहेब उत्तरल्या, ” ऐका ना बाबा! शेजारच्या सोसायटीतल्या वझे काकू लोकरीच्या माळा खूप छान करतात. त्यांच्या घरातही पाणी शिरलं होतं पण त्यांच्या तयार माळा वरच्या कप्प्यात असल्यामुळे वाचल्या. बाकी इतर नुकसान खूप झालंय त्यांच. त्यामुळे बाबा खूप निराश झाल्यात हो त्या. आपण मदत म्हणून त्यांच्याकडूनच माळा घेऊयात का हो बाबा ?त्यांची थोडीशी नुकसान भरपाई पण होईल आणि नर्व्हस झालेल्या वझे काकू खुशही होतील. बघा पटतंय का तुम्हाला सगळ्यांना? मी डोळे विस्फारून मृण्मयी कडे बघतच राहयलो कालपर्यंत शाळकरी असलेली माझी ही साळुंकी, मनानी, विचारांनी मोठी कधी झाली?ह्या सुखद प्रश्नचिन्हातच मी अडकलो, काही तासांपूर्वी निराशेच्या काळोखात अडकलेल्या माझ्या मनानी, खुशीनें होकार भरला. खडकवासला धरणाच्या पुराच्या पाण्याबरोबर माझी निराशा वाहून गेली. आणि हो! हे सगळं माझ्या लाडक्या लेकीमुळे आणि तिच्या चिरउत्साही चिरतरुण अशा मित्रमैत्रिणीमुळेच घडलं होत. प्रत्येक घराघरांत जाऊन ही ‘गॅंग ‘आशेचा दिवा लावते आणि अंधाराला पळवते. आता दसरा दिवाळी सगळेजण उत्साहाने साजरी करतील. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. पुराच्या पाण्याने चिखलमय झालेला मार्ग त्यांनी त्यांच्या कृतीने सुकर केला होता. आता नव्या उमेदीने आम्ही दसरा दिवाळी आणि पुढील येणाऱ्या वर्षांची वाट पाहत आहोत. तुम्हालाही आमच्या शुभेच्छा आणि त्याबरोबर धन्यवाद.

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “स्मरणाचं गच्च जावळ…” – भाग – २ ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील ☆

श्री संजय जगन्नाथ पाटील 

“स्मरणाचं गच्च जावळ… – भाग – २ ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील 

(घरात तर सुतक पडल्यागत.. कुणाच्याच तोंडात घास गिळवला नाही..

मेंढपाळानी माळ सोडलेला…

पुढचा मुक्काम कुठं असंल कुणास दखल… ।) – इथून पुढे —- 

मी चिडी ला आलेलो…

शाल्या नाही हे सहन होत नव्हतं…

सकाळीसकाळी सायकलवर टांग टाकली.. आजूबाजूच्या पंचवीस तीस किलोमीटरच्या शेतारानातनं, पायवाटेनं, वड्या वघळीतनं वाट दिसंल तिकडं सायकल दामटली…

मेंढपाळांच्या राहुट्या धुंडाळल्या.. वाड्या वस्तीवरचं एक एक कुत्रं बघत फिरलो.. हाकारे घातले..

शाल्या कुठंच नाही.. पाळीव कुत्रा जाईलच कसा.. ? निराश होऊन परतलो…

दुसऱ्या दिवशी दुसरी दिशा.. दुसरी गावं..

उपाशीपोटी प्रचंड वणवण.. कुठंतरी शाल्या नजरेस पडेल.. पण पदरी निराशाच..

कुणी म्हणायचं, ” या दिशेनं मेंढरं गेली बघा.. ” कसलाही विचार न करता तिकडं निघायचो..

दिशा कळायच्या बंद झालेल्या..

संध्याकाळ झाली की थांबायचो.. निराशेनं प्रचंड थकवा यायचा.. पुन्हा माघारी.. दारात अण्णा वाट बघत असायचे.. एकटाच येताना बघायचे.. निमुटपणे मागं वळायचे..

कुणीसं सांगितलं म्हणून पार दंडोबाच्या डोंगरापर्यंत पल्ला मारलेला.. एका ठिकाणी रानात मेंढरं दिसली.. राग आवरला नाही.. तिथल्या मेंढपाळाना म्हणालो..

” जर माझा शाल्या मला मिळाला नाही तर बघा.. भोकशीन एकेकाला.. “

धमकी देतानाच गळा दाटून आलेला.. डोळे गच्च भरून आलेले.. हुंदका फुटला.. रडतंच निघालो..

धनगरं अवाक झालेली…

नंतर आशाच सोडली….

शाल्या सोडून गेला आता तो परत येणार नाही अशी समजूत करून घेऊ लागलो.. घरात सुतकाचा सन्नाटा बरेच दिवस होता..

” मालकानू ss ” 

एक दिवस दुपारचीच हाक आली.. दारात एक धनगर म्हातारबुवा.. डोकीला मुंडासं.. हातात काठी.. बरोबर दोरीला बांधून शाल्या.. मी झडप घातली…

” आमच्या कळपात आलतं.. तकडं सोयरं भेटलं.. तुमी हुडकतायसा सांगितलं.. घ्यून आलुया.. “

चौकशी केली तर कळलं म्हातारा पंचवीस तीस किलोमीटर चालत आलाय.. आला, तसा झाडाबुडी चवड्यावर बसला.. घटाटा पाणी प्याला.. मला त्याची कीव वाटतेली..

” पाळलेलं कुत्रं तुमच्या मागं कसं आलं ?” मी त्याला विचारलं..

तो सांगू लागला…..

” लगट.. मालक लगट वं… लय वंगाळ..

मेंढराच्या कातडीचा वास कुत्र्याच्या नाकात बसला की भली भली धुंदावत्याती.. शेळीचं दूध प्याला दिलं की त्याची चटक लागती…. माणूस काय आन् जनावर काय, सारखीच की… मग आपसूक मागंमागं येतंय.. हाकाललं तरी मेंढरा मागं वड करतं.. मेंढरा मागं मेंढरू हुतं… अशी अंगचटी बघा.. “

म्हाताऱ्याचा हा अनुभव मला नवाच होता…

शाल्याला दोन दिवस बांधून ठेवला.. मग मोकळा सोडला..

पुढं आसक्ती चं वर्णन करताना धनगराच्या त्या ओळी कवितेत आबदार उतरल्या..

भरारा माझ्या डोळ्यासमोर सगळी चित्रं दिसू लागलेली..

पुढं काही वर्षात शाल्याला खरूज लागली.. सगळ्या अंगभर जखमा झाल्या.. त्याच्या अंगावरची केसं पुंजक्या पुंजक्यानं झडू लागली.. रात्रभर वेदनेनं व्हिवळायचा… स्वतःचं अंग, पाय कचाचा चावायचा.. जोरजोरात डोकं झिंजाडायचा.. त्याला वेदना सहन होत नव्हत्या.. आम्हाला बघवत नव्हतं.. उपचार केले.. पण फरक नाही…

खंगत गेला हाडाचा नुसता सापळा उरला.. डॉक्टर म्हणाले घरात ठेवू नका..

रात्री घराबाहेर काढलं की दार खराखरा वाजवायचा.. हाक मारल्यासारखा आवाज द्यायचा.. आम्ही डिस्टर्ब झालेलो.. काहीच कळत नव्हतं… ठरवलं, कुठंतरी याला दूर सोडून यावं….

रात्री दहाची वेळ..

काळजावर दगड ठेवला.. ” चल शाल्या.. ” म्हणालो आणि सायकलवरून निघालो.. आज्ञाधारकपणे तो शब्दाला मान देऊन माझ्या मागं धावत येतेला..

मी वळून वळून पाहायचो… तो जीवाच्या आकांतानं शक्ती एकवटून मागं येत होता.. घरापासून दूर धामणी रस्त्याला माझा मित्र अरुण थांबलेला… एमएटी गाडी घेऊन… आदल्या दिवशी तस ठरलं होतं.. मी सायकल बाजूला लावली.. खिशातलं बिस्किट त्याच्यासमोर धरलं.. त्यानं ते मान वर करून फक्त हुंगलं.. खाल्लं नाही…..

काळीज फाटल्यागत झालं.. त्याला डोळे भरून पाहिलं.. मेलेल्या डोळ्यांनं तो माझ्याकडं पहात होता.. निर्विकार….

मला भडभडून आलेलं… गाडीवर मागं बसलो. अरुणनं गाडी भन्नाट पळवली… त्याला कुठंतरी आड बाजूला चुकवायचं होतं.. शक्ती नसलेला शाल्या मागं उर फुटंस्तोवर धावत होता.. आडवी तिडवी गाडी मारत गल्लीबोळातनं उलट सुलट फेऱ्या मारल्या.. शाल्या मागं पडलेला पाहून गाडीचा वेग वाढवला.. गाडी लिमये मळ्यातल्या उसातल्या पायवाटेवर घातली.. तिथून बाहेर पडून धामणीच्या मूळ रस्त्याला बगल देत वाट फुटेल तशी गाडी पळवली… अर्धा पाऊण तास धड उडाल्यासारखं आम्ही बेभान झालेलो.. तिथून उदगाव.. शाल्या कुठं मागं राहिला ते कळलंच नाही.. घरापासून जवळ जवळ वीस-पंचवीस किलोमीटरवर आम्ही त्याला चकवा दिलेला…

कुठं असेल तो ?

काय करत असेल ? 

प्रचंड अपराधीपण उराशी घेऊन घरी आलो.. मध्यरात्रीचे बारा वाजून गेलेले– पोटातली भूक मेलेली.. दिवा मालवला..

अंधारात टक्क जागा राहिलो…

उशिरा कधीतरी झोप लागलेली….

सकाळी उठून बाहेर आलो.. पाहतो तर बाहेरच्या वाटेवर शाल्या पाय पसरून पडलेला.. भकाळी गेलेलं पोट भात्यासारखं हापसत होतं.. जीव बाहेर लाळेचे थेंब भुईवर साडतेले.. शाल्या भुईसपाट झालेला…

रात्रीत कसा आला असेल हा ? 

इतक्या दूरवरून त्याला घर तरी कसं सापडलं असेल ? किती वणवणला असेल ?

अंधारात वाटेतल्या असंख्य कुत्र्यांनी त्याला कसा फाडला असेल ? 

दिशा तरी कशी कळली असेल त्याला ? 

आणि का म्हणून तो आमच्याकडे आला असेल ? आम्ही असं वागूनसुध्दा ??

चूक झाली.. माफी कर..

आता कसाही राहूदे.. जे व्हायचं ते इथंच डोळ्यासमोर होऊदे.. आम्ही ठरवलं…..

पुढं एक-दीड महिन्यात तो खंगत खंगत गेला… त्याच्यासाठी बाहेर पोतं टाकलेलं असायचं.. रोज त्यावरच झोपायचा… गेला त्या दिवशी नारळाच्या. झाडाच्या आळ्यात जाऊन झोपला… कायमचा…

जणू जागाच दाखवली त्यांनं…..

रात्रभर खुळ्यासारखा पाऊस कोसळंत होता….

तिथंच खड्डा खोदला… आणि दृष्टी आड केला..

खत झालं त्याचं….

आणि आज असा उठून समोर उभाय.. कवितेतल्या ओळीमागनं…..

स्मरणाचं गच्च जावळ अंगभर लेवून…

अंगचटी आल्यावानी…..

– समाप्त – 

© श्री संजय जगन्नाथ पाटील
9422374848

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “स्मरणाचं गच्च जावळ…” – भाग – १ ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील ☆

श्री संजय जगन्नाथ पाटील 

“स्मरणाचं गच्च जावळ… – भाग – १ ☆ श्री संजय जगन्नाथ पाटील 

“धनगरी मेंढराच्या कातडीनं दर्पाळून मुलुखभर पसरलेली धुंदावली कुत्री, एकटाक गोळा व्हावीत अन् मेंढराच्या मागं मेंढरं बनून जावीत अशी अंगचटी आसक्ती बेताल..”

 माझ्याच एका कवितेतल्या या ओळी माझ्या नजरेसमोर थबकलेल्या..

धुरळा झटकत, जुन्या वह्या तपासत बसलेलो.. कधीकाळी काहीतरी कसंबस कुठंतरी खरडलेलं…

पिवळी पडलेली पानं.. बरीच शिवण सोडत असलेली.. कुबट वासाची.. जर्जर..

त्यावर आडवंतिडवं लिहिलेलं..

रात्री उशाला वही पेन ठेवायचो.. इतरांना लाईटचा डोळ्यावर त्रास नको झोपताना म्हणून अंधारातच अदमासानं चाचपडत लिहायचं..

त्याला आकार नव्हता..

काहींचे संदर्भ अजूनही लागत होते..

काही फक्त शब्द उभे त्रयस्थासारखे.. न देणं.. न घेणं अशा थाटात..

तशात या ओळी समोर आल्या…

आणि कैक वर्षात विस्मृतीत गेलेला शाल्या ‘ समोर आला.. तरी शाल्याला मातीआड करून चाळीस वर्षं झाली..

इथंच घरापाठीमागच्या नारळाच्या झाडाखाली पुरलेला..

वरनं सुप्पानं पाऊस..

खड्डा मारताना, चिखलाच्या पाट्या उपसताना चित्त उडालेलं..

खाली पोतं अंथरलं.. ओलं कीच्च..

नुसती हाडं राहिलेली.. रया गेलेली..

अलगद झोपवला.. मनाचं भाबडं समाधान.. कुठं त्रास होऊ नये अंतिम प्रवासाला..

चिखल ओढला..

कितीतरी वेळ मातीच्या ढिगावर ठिबकत राहिलेलो…

 

शाल्याचं नाव शाळीग्राम.. अण्णांनी ठेवलेलं..

एवढंएवढंसं गोजीरवाणं कुत्र्याचं पिल्लू.. भलतंच केसाळ.. सगळ्या अंगभर पांढऱ्या भू-या केसांची लव.. ती ही फणीनं विंचरल्यागत.. एखादी गोंडस झिपरी पोरगीच वाटायची..

डोळे एकदम घारे.. रात्रीच्या अंधारात डोळ्याच्या कडा हिरव्या गार दिसायच्या. त्यातला कनवाळूपणा काळजाला भिडायचा..

कुत्र्याच्या जन्माला येऊन इतकं निष्पाप दिसावं ? गाईच्या समजूतदार डोळ्यागत.. खोल खोल..

 

एसटीतनं उतरलो..

रात्री साडेआठ नऊची वेळ असावी,..

रस्त्यापुरतं अंधाराला भेदत एसटी टेकाड उतरत अस्पष्ट झाली..

हातात जेवणाचा डबा.. अण्णांचा…

माळ तुडवंत बांधकामाकडं निघालेलो.. एकटाच.. आभाळ भरून आलेलं.. गार वारा झोंबायला लागलेला.. गावाच्या बाजूकडं असलेल्या खिलाऱ्याच्या रानातल्या उसाचा गारवा माळभर लहरतेला.. दीड दोन किलोमीटरचं अंतर होतं, जागेवर पोहोचायला.. खरबुड्या माळावरनं आडवंतिडवं पावलं उचलत होतो.. दूरवर मुल्लाच्या माडीवरच्या पेंगुळल्या चाळीसच्या पिवळ्या बल्बचा दुम धरून निघालेलो..

मध्ये निर्मनुष्य वाट.. सरत नव्हती..

चुकून अंधाराच्या गचपणात पाय पडला तो एका कुत्र्याच्या पिल्लावर.. जमिनीत खोबणी धरून बसलेलं पिल्लू व्हिवळलं तसा पटकन पाय काढला..

वाटलं कुठूनही अंधारात पिल्लाची आई माझ्या मांडीचा अवचित लचका तोडणार…

अंदाज घेत भरारा पावलं उचलू लागलो… भ्यालेलो..

लांबून येणारा पिल्लाचा आवाज बंद झाला तसं हायसं वाटलं.. मटकन जमिनीवर बसलो.. धपापत..

जेवणाचा डबा तिथंच खाली टेकवलेला…

अंधारात पायाजवळ काहीतरी हुळहुळलं. सापाकिरडाच्या भयानं पटकन उठून उभारलो.. पुन्हा पिल्लाचा आवाज.. कणव यावा असा..

पाहतो तर, कुत्र्याचं पांढरंधोप कापसावानी मऊशार पुंजका असावा असं पिल्लू.. डबा हुंगतय..

सारा प्रकार लक्षात आला..

डब्यातली चतकोर भाकरी तोडून समोर टाकली..

तसं ते चघळू लागलेलं.. बोळक्या तोंडानंं…

दातलून झालं आणि ते पायाशी लगट करायला लागलं.. मी अलगद त्याच्या जावळातून हात फिरवला..

मऊशार कोवळं अंग..

बोटांना हवाहवसं वाटणारा स्पर्श..

लुसलुशीत…

मोह आवरला.. हळूहळू पावलं टाकत पुन्हा माळाच्या उताराला लागलो..

लिंबाबुडी अण्णा बसलेले.. पाहताच उठले.. डबा घेऊन खडीच्या ढिगावर सप्पय जागा बघून बसले..

मी बांधकामाच्या भवती फेरी मारू लागलो..

” अरे कुण्या पावण्याला घेऊन आलायस.. “

अण्णांची हाक ऐकू आली.. बघतो तर कुत्र्याचं पिल्लू… तेच….

माझ्या मागं कधी आलं ते कळलंच नव्हतं..

आता दिव्याच्या प्रकाशात ते अधिकच उजळून आलेलं..

” माझ्याच मागनं आलेलं दिसतंय.. “

ते अधिकच घसटीला आलं.. कमालीचं निरागस भाबडं..

अण्णा म्हणाले.. “मया लागली.. असूदे.. माळावरंच असंल.. यील आई वासानं हुडकत.. “

आई काही आली नाही….

 

कुत्र्याचं ते इवलसं पिल्लू तिथंच आमच्याभवती रमलं…

“अय.. शाळीग्रामा.. “

अधेमधे अण्णा हाक मारू लागले..

शाळीग्रामाचा दगड म्हणजे देवळातल्या मूर्तीचा काळाकरंद दगड.. आणि हा तर गोरापान.. परदेशच्या पोरापोरीं सारखा..

कलंदर.. नेहमी फकीर मस्तीत…

पुढं शाळीग्रामाचा झाला तो.. शाल्या ‘..

 

शाल्यानं घर ताब्यात घेतलं.. उन्हाळ्यात पसरायचा न्हाणीत.. हिवाळ्यात कुणाच्याही अंथरुणात उब धरून… हक्कानं..

सकाळी माणूस अंथरून सोडताना हा फक्त मान उचलून बघायचा.. पुन्हा तारवटून पाय पसरून निजायचा… रातपाळी करून आल्यागत…

शाल्यावरची नजर हटायची नाही.. इतका देखणा.. कुणी म्हणायचं…

” कुत्री आहे का ?”

“नाही.. गंडय.. “

” कसलं चिकनाट.. “

रोज दृष्ट काढली जायची.. माणसासारखी..

शाल्या इतका माणसाळला की लहान मुलासारख्या त्याला सगळ्या सवयी लागलेल्या… लाड करून घ्यायचा.. जसा मोठा होत गेला तसं त्याचं रूप आणिकच साजरं झालं..

कधीच त्याच्या गळ्याला दोरी बांधली नाही..

पाळीव आहे हे कळावं म्हणून पट्टा फक्त…..

 

माळावर नेहमी पाण्याच्या टाकीजवळ आडोसा धरून धनगराची पालं पडायची… भटकंतीतली….

बरोबर शे पाचशे मेंढरांचा जत्था….

कुत्री घोडी.. मोठा बारदाना.. दिवसभर इकडं तिकडं करून रात्री विश्रांतीला माळावर यायची.. संध्याकाळी शेळ्या मेंढरांच्या कलकलाटानं माळ गजबजायचा… दोन-चार दिवसाचा मुक्काम आवरून मेंढपाळ खालतीकडं सरकायचे..

असाच एकदा शाल्या गायब झाला..

 दुसऱ्या दिवशी आजूबाजूला चौकशी केली तर कळलं तो मेंढ्यांच्या कळपातल्या कुत्र्यांबरोबर खेळत होता…. घरी सगळे हवालदिल झालेले..

घरात तर सुतक पडल्यागत.. कुणाच्याच तोंडात घास गिळवला नाही..

मेंढपाळानी माळ सोडलेला…

पुढचा मुक्काम कुठं असंल कुणास दखल… ।

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संजय जगन्नाथ पाटील
9422374848

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्याग… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील ☆

सुश्री सुजाता पाटील

? जीवनरंग ?

☆ त्याग… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील 

डॉ हंसा दीप

(मी हे कदापि सहन करु शकलो नसतो…. की आज तिच्या जाण्यान जे दुःख मी सहन करतोय ते दुःख, ती तळमळ माझ्या जाण्याने तिला सहन करावी लागली असती.) – इथून पुढे — 

मी एकटक आश्चर्याने पप्पांकडे पहात बसलो…. जस की कुठल्यातरी रहस्यावरचा पडदा हटवावा. पप्पांचे शब्द कानावर पडत होते…. ” मी तिला माझ्या पश्चात सुद्धा दुःखी पाहू शकत नव्हतो. माझ्या जाण्याने ती रडून रडून अर्धमेली झाली असती, आणि हे मी सहन करू शकलो नसतो. कमीतकमी तिच अस पहिल्यांदी निघून जाण्याने ‌ती ह्या एकटेपणाच्या दुःखातून तरी वाचली. तिच्या ह्या आनंदात मी सहभागी होऊ इच्छित आहे. ते बोलत जात होते…. आणि माझ्या आत जी पप्पांची पाषाणाची मूर्ती होती ती बर्फासारखी वितळत माझ्या डोळ्यावाटे अश्रुंच्या रूपाने वाढत निघाली होती.

तुला माहित आहे, तुझ्या आईसोबत माझा दीर्घ प्रवास 

राहिला. कितीतरी पहाट आम्ही आमच्या एकत्रित डोळ्यांनी पाहिल्या. ; अगणित संध्याकाळी आम्ही एकत्र फिरलो. आज निवांतपणे एकांतात जेव्हा गतकाळातील आठवणींना वाकून बघतो, कधी भविष्यातील योजना बनवत सुंदर भविष्य रंगवत‌. ह्या लांब टप्प्याच्या प्रवासात आम्ही कित्येक घर बदलली, देश बदलले. न जाणो कित्येक वेळा सोबत आम्ही पॅकिंग व अनपॅकिंग केली. प्रत्येक नवीन घराला अशाप्रकारे आम्ही सजवत राहिलो जस की हे घर आता आमच आयुष्यभराच सोबती असेल. जेव्हा नवीन घरात गेलो की त्या घराला ही मन लावून सजवायचो, पण तरीही मागच्या घराला मनापासून आठवत रहायचो. प्रत्येक नव्या घरासोबत आमचा एक टप्पा नावासहित जोडला जायचा.

भारतापासून न्युयॉर्क, आणि न्युयॉर्क पासून टोरंटो चे बदलणारे जग, ‌बदलणारे लोक पण आम्हाला व आमच्या एकसंध विचारांना ही बदलू शकले नाहीत. आम्ही दोघ ठेठ झाबुआई ला राहिलो, जराही बदललो नाही. आमच राहण -खाण नक्कीच बदलल. वर्षानुवर्षे एकत्र रहात, भांडत -झगडत, प्रेम करायचो, खायचो -प्यायचो, आयुष्याचा लेखा -जोखा नमूद होत राहिला की कोणी कितीवेळ काम केल, आराम केला. सगळी पसरलेली काम विकून -सावरून मुलासाठी कमीतकमी झझंट ठेवून त्याच्या संगोपनाची योजना आखली होती. वृद्धापकाळात चिंतेची गरज नव्हती, सरकारी सोय होती. जर चिंता होती ती फक्त एकच की, कोण पहिल जाईल, जो पाठीमागे रहाणार, त्याच्यासाठी आपल्या आयुष्यातील उरलेले दिवस व्यतीत करण कठिण होणार.

सहज व स्पष्ट स्वरात पप्पा आज बोलत होते व मी ऐकत होतो. कोणत्या उपदेशापलीकडची दोन लोकांची जीवनगाथा होती ही. मी पप्पांचा वाढीस लागलेला मुलगा हा विचार करत होतो की ह्या सगळ्यात कुठेतरी विषयवासना किंवा फक्त सेक्शुअल डिजायर ची झलक तर दिसत नाही. इथे फक्त दिसत आहे तर तो आहे…. दोन व्यक्तींचा आपापसातील ताळमेळ, कटिबद्धता. ही एकप्रकारे पाहता दोन व्यक्तींची कंपनी होती. एक घरंदाज -खानदानी कार्पोरेशन सारख, जिचा जिवनकाल सतत पुढे सरकत राहिला. मध्ये अडथळा आणण्यासाठी कोणी नव्हतं. परिवार आणि समाज निश्चितच त्या बंधनात होते, पण त्या दोघांमध्ये कोणी नव्हतं.

पप्पांनी ‌माझी अव्यक्त भाषा समजली…. “एका स्त्री सोबत पंचावन्न वर्ष आयुष्याची भागिदारी करण काय असत, ह्याची आपण फक्त जाणीव करू शकतो. शरीराच्या गरजा तर क्षणिक असतात पण त्याव्यतिरिक्त प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक वर्षाचा, हिशेब शब्दात कसा काय व्यक्त होऊ शकतो. विनारक्ताची नाती कशी जुळली होती, त्या हजारो क्षणांची गहनता समजण्यासाठी हजारो ग्रंथाची गरज लागेल. “

पप्पा दोन मिनिटे थांबले होते. आपल्या कपाळावर दरदरून आलेल दोन थेंब हाताने पुसत सांगू लागले, ” खूप साऱ्या संकटात आम्ही एकत्र राहिलो. मंदिरात एकत्र प्रार्थना केली, एकाचवेळी एका टेबलावर कित्येक वेळा जेवतो… ब्रेकफास्ट, लंच, डिनर. ती माझ्या सोबत माझ्या कामात बरोबरीची भागिदार होती, आनंदात व दुःखात ही. माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट होती की मला जाळण्याची जीवघेणी पीडा तिला सहन करावी लागली नाही. मी तिला एकट सोडू शकलो नसतो. आता जेव्हा पण मी ह्या जगातून जाईन तेव्हा मनात कुठली चिंता न बाळगता जाईन. आणि तेव्हा तिच्या सोबत घालवलेले, तिच्या शिवाय जगलेल्या क्षणांची आठवण माझ्या सोबत राहणार. उद्या, आज आणि काल च्या बाबतीत हा विचार करणच माझ्यासाठी दिलासा देणार आहे. तिच जाण ह्यासाठी एक चांगला दिवस होता. खरच मी खूप आनंदी आहे की मी तिला माझ्या हातून स्वर्गापर्यंत पोहचवल. तिच्या शिवाय फक्त मीच अपूर्ण नाही तर ह्या घरातील प्रत्येक वस्तू अपूर्ण आहे. ह्या अपूर्णतेसोबत मी जगेन, परंतु कदाचित ती जगू शकली नसती. “

अस बोलत ते दोन क्षण तिथे बसले, भोळ्याभाबड्या मुलासारख तसच हास्य चेहऱ्यावर लेवून जो आपल वचन पूर्ण करून आनंदी होतो.

मी आज त्या पतीला बघत होतो, त्याच्या आनंदाला, आनंदाच्या पाठीमागे लपलेल्या त्या दुःखाच्या गडद छायेला. त्या वडिलांना ही अपुर्णतेची जाणिव असूनही एक संपूर्णतेने परिपूर्ण होते. दुःखातून बाहेर आल्यानंतर एखाद्या पाषाण मूर्ती समान शांतता. कदाचित पप्पा आपल्या मनातील व्यथा -व दुःखाच बलिदान देऊन मुर्ता कडून अमुर्ताच्या प्रवासाकडे निघाले होते. त्यांच हे मौन आता माझ्या आत खोलवर कुठेतरी वर्णित होत होत.

पप्पा उभे राहिले. फुले हातातून खाली पडली. स्मारकावर आईचा चेहरा हसताना परावर्तित होत होता. तिचा चेहरा म्हणजे दोन किनाऱ्याचे अंतर एकजूट करणारा सेतू. घरी परतताना मी पप्पांचा हात पकडला, कदाचित आता त्यांना माझ्या सहाऱ्याची, सोबतीची खऱ्या अर्थाने गरज होती.

♥♥♥♥

मूळ हिंदी कथा : उत्सर्जन

मूळ हिंदी लेखिका : डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील

अणुशक्ती नगर मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares