मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग २ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग २ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

डॉ सुधा ओम ढींगरा

3     जीवनरंग —

“ नंदू आणि आनंद….. “  ( अनुवादित कथा )–       भाग दुसरा

हिंदी कथालेखिका : सुधा धिंगरा.

मराठी अनुवाद : उज्ज्वला केळकर

 

नंदू आणि आनंद ( अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग २

(मागील भागात आपण पहिले – वयाची दहा वर्षे होईपर्यंत त्याने आपल्या मम्मीचं अतिशय सुंदर रूप पाहिलं होतं. नंतर त्याने जे पाहिलं, त्यामुळे तो घाबरूनच गेला. आता इथून पुढे)

दहा वर्षापर्यंत तो एकत्र कुटुंबात वाढला. मोठा झाला. आजोबा- आजी, काका-काकी, आत्या सगळी घरात होती. तो तेव्हा सगळ्यांचा नंदी होता. सगळ्यांच्या कडे-ख्ंद्यावर चढून उड्या मारत, त्याचं बालपण सरलं. आजी-आजोबांच्या प्रेमाने भरलेल्या, खेळकर जीवनातील पहिली दहा वर्षे, विसरायची म्हंटली, तरी तो विसरू शकणार नाही.

त्याने घरात फक्त प्रेम आणि आपलेपणा, जिव्हाळाच पाहिला. नोकरांबरोबर देखील इथे मित्रांसारखीच वागणूक असायची. सागळा परिवारच गोड आणि प्रेमाने बोलणारा होता. तिरस्कार काय असतो, ते त्याला मुळीच माहीत नव्हतं, पण या परिवाराला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक?

आत्याचं लग्न झालं आणि लग्नानंतर सगळंच बदललं. आत्याचं लग्न झाल्यावर आजोबांनी आपली सारी संपत्ती तीन हिश्श्यात वाटली. दुर्दैवाने त्याच्या पप्पांची बदली त्याच वेळी दिल्लीला झाली. दुर्दैव अशासाठी की दिल्लीला आल्यावर घरातलं सुख, चैन संपलं.

दिल्लीतल्या आपल्या नवीन घरात प्रवेश करताच, जीवनातला एक दु:खद अध्याय सुरू झाला. दिल्लीत त्याचं आजोळ होतं. त्याच्या आजोळच्या लोकांचा विचार त्याच्या गावाकडच्या लोकांपेक्षा वेगळा होता. ही गोष्ट त्याला लहानपणापासूनच कळलेली होती. एका दिलाने रहाणारे, पशू-पक्षी, निसर्ग, कुणालाच न दुखवणारे असे गावाकडचे लोक होते. आजोळचे लोक सामंती विचाराचे, समोरच्यांना भिववून, दाबून वरचष्मा दाखवणारे होते.

दिल्लीत नव्या घराची वास्तुशांत होते न होते, तोवरच मम्मीच्या मम्मीने, पप्पांकडे बघत कर्कश्य आवाजात म्हंटलं, ‘ सुगंधा तुझ्या सासर्‍याने तुमच्यावर खूप अन्याय केलाय. दहा वर्षे नवनीतची कमाई त्यांनी घेतली. तू जीव तोडून त्या सगळ्यांची सेवा केलीस आणि आता इस्टेटीची वाटणी करायची वेळ आली, तर सगळ्यांना एका तराजूत तोललय. मुलीचं लग्न इतकं थाटा-माटात, वाजत- गाजत केलं, तर तिला इस्टेटीतला वाटा द्यायची काय गरज होती?’

पप्पांनी त्या कर्कश्य आवाजाला मधुर आवाजात उत्तर दिलं, ‘ मम्मी, केवळ माझीच नाही, तर माझी आत्या, भाऊ, वाहिनी, बहीण सगळ्यांचाच पगार घरात खर्च होत होता आणि लग्नाचं म्हणत असाल, तर आम्हा सगळ्यांचंच लग्न थाटा-माटात, वाजत- गाजत झालं होतं. केवळ काजलच्या लग्नाचाच विचार कशाला करायचा? जितका आमचा हक्क इस्टेटीवर आहे, तेवढाच तिचाही आहे. ’

‘मोठ्या मुलाचा हक्क नेहमीच इतरांपेक्षा जास्त असतो.. ’ आजीने पुन्हा तिखटपणे मम्मीला सांगितलं.

‘आपण आपल्या मोठया मुलाला बाकीच्या दोघांपेक्षा जास्त हक्क द्याल?’ पप्पा पहिल्यांदाच तिखटपणे बोलले होते. भविष्यात कदाचित बोलणं वाढतच जाईल, असं त्यांना वाटू लागलं होतं आणि ते, ते सारं आधीपासूनच थांबवू इच्छित होते.

मम्मीचा मोठ्या आवाजात आक्रोश सुरू झाला. ते पाहून तो आणि त्याचा दोन वर्षाचा धाकटा भाऊ आमोद दोघेही घाबरले. त्यांच्या छातीत धडधड होऊ लागली. कसं दृश्य होतं ते. चारी बाजूंनी मोठमोठे आवाज. त्यांनी इतक्या मोठ्या आवाजातलं बोलणं यापूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. सगळे हळू आवाजात बोलायचे. त्याच्या चेहर्‍यावर घामाचे थेंब डवरले. मम्मी रडून रडून आजीला संगत होती, ‘आई, ऐकलस नं यांचं तिरकस बोलणं! कळलं ना तुला इतके दिवस मी काय काय सहन केलं असेल ते! दहा वर्षे मी तिथे कसे दिवस काढले, मलाच माहीत! आपल्या संस्कारामुळेच मी गप्प बसले आणि सारं सहन केलं. नशीब, मी आता दिल्लीला आपल्या लोकांमध्ये आलीय. ’

पप्पा आणि दोघे भाऊ हैराण होऊन उभे होते. काहीच काळात नव्हतं. हसत्या-खेळत्या परिवारात मिसळून गेलेली मम्मी हे काय बोलते आहे? आणि इतकी का रडते आहे?

या सगळ्या आवाजात फोनची रिंग वाजली. पप्पांनी फोन उचलला. गृहप्रवेशाच्या निमित्ताने पतियाळाहून आजोबांचा फोन होता.

‘बाबा, दंडवत!’ पप्पा एवढे बोलतात, न बोलतात तोवर आजीने त्यांच्या हातून फोन हिसकावून घेतला आणि आजोबांना काहीही बोलू लागली. बरळूच लागली. आजीच्या चढलेल्या आवाजाने धाकटी बहीण घाबरली आणि मम्मीच्या मांडीत डोकं खुपसून रडू लागली. आनंद आणि आमोदने बघितलं, त्यांचे पप्पा आवाक होऊन बेचैनसे उभे होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. आजीने फोन खाली ठेवला, तेव्हा पप्पा इतकंच बोलू शकले, ‘सुगंधा इतकं खोटं कशासाठी?’ त्यापेक्षा जास्त काही बोलूच शकले नाहीत ते. त्यांना खूप मोठा धक्का बसला होता.

हे ऐकून आजोबा उभे राहिले आणि कडवट, दर्पयुक्त आवाजात म्हणाले, ‘नवनीत भुल्लर, आपण आमच्या समोर आमच्या मुलीला खोटं ठरवताय, मग पतियाळात आपल्या  सगळ्या परिवारासोबत ती एकटी होती, तेव्हा तिला कशी वागणूक मिळत असेल, आलं आमच्या लक्षात!’

आजी आखडून म्हणाली, ‘नवनीतजी, यापुढे आपण आमच्या मुलीला काही बोललात, तर आपण पतियाळात रहाल आणि सुगंधा इथे मुलांना घेऊन आमच्याजवळ राहील.’ 

पप्पा नि:स्तब्धसे उभे राहून बघत होते. दोन्ही भाऊ त्यांना जाऊन चिकटले. पप्पांनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्यांना घेऊन ते बेडरूममध्ये आले. पप्पांनी त्यांना मिठीत घेतलं. त्यांच्या डोळ्यातून टपकणारे गरम अश्रू मुलांच्या डोक्यावर पडले. मुलांना काही तरी जाणवलं.

‘पप्पा, मम्मी खोटं बोलत होती. आपण काहीच का बोलला नाहीत?’ त्याने विचारले.

‘बेटा, घराचा मालक, घर बांधणाराच जर घर जाळायला निघाला, तर आग विझवण्यासाठी पाणी कसं घालणार?’

‘पप्पा, मम्मी, आजी, आजोबा आपल्याला का रागावत होते?’ आमोदने विचारलं.

‘हं… मला कळलं असतं तर… मला कळतच नव्हतं, हे काय चाललय?’ त्या रात्री ते दोघे आपल्या पप्पांजवळच झोपले. मम्मी खोलीत आलीच नाही. गृहप्रवेशानंतर घरात एकच आवाज सतत गुंजत राहिला. तो आवाज मम्मीचा होता. पप्पा जवळ जवळ गप्पच असायचे.

‘नंदी बेटा, ऊठ. शाळेला उशीर होईल. ’ पप्पांचा आवाज ऐकून मम्मी संतापाने म्हणाली, ‘तुम्ही लोक किती आडाणी आहात. कुणाचं नावसुद्धा नीट उच्चारत नाही. नावात बिघाड करण्यात मोठी मजा वाटतेय तुम्हा लोकांना! खबरदार आजपासून याला कुणी नंदी म्हंटलं तर. मी त्याचं इतकं चांगलं नाव ठेवलय, आनंद. आनंद तू पण ऐकून ठेव, जर कुणी नंदी म्हंटल्यावर तू उत्तर दिलस, तर तुलाच शिक्षा करीन!’

त्या दिवसापासून तो आनंद झाला. नंदीला त्याने आपल्या आत लपवून ठेवलं. तो दिवस आणि तो क्षण असा होता, की पहिल्यांदाच ते दोघे भाऊ भाऊ आपल्या आईला घाबरले. दहा वर्षे तिने त्यांच्यावर खूप प्रेम केलं होतं. आता त्यांच्या मम्मीचं व्यक्तिमत्वच बदलून गेलं होतं. प्रत्येक गोष्टीत राग. प्रत्येक गोष्टीत अहंकार.

‘मम्मी खूप बदललीय. ’

‘होय. बदललीय. का? कारण काही कळत नाही. ’ पप्पांनी दीर्घ श्वास घेतला. ते सतत ते क्षण आठवत त्यांची चिरफाड करायचे.

सकाळी मुलांना तयार करून पप्पा शाळेत पाठवायचे. शाळेनंतर दोघेही भाऊ बाहेर खेळत रहायचे. पप्पा घरी आले की ते घरी यायचे. आमोद या काळात याच्या खूप जवळ आला होता आणि ते दोघे पप्पाच्या. मम्मीने त्यांच्याकडे लक्ष देणं बंद केलं होतं. तशीही पहिल्यापासूनच मम्मी त्यांच्याबाबतीत निश्चिंत होती. आजोबा-आजी आणि आत्याने त्याचं पालन केलं होतं. दिल्लीत आल्यावर मम्मी जास्त करून आपली आई, बहिणी, भाऊ, वाहिनी यांच्यासोबत असायची. किटी पार्टी, मैत्रिणी, क्लब यातच आपला वेळ घालवायची. त्यांचे पप्पाच त्या तिघांना सांभाळायचे.

एक दिवस तो हट्टालाच पेटला. ‘पप्पा, मम्मी घरी नाहीये. आजोबांशी बोलायला द्या ना!’

‘नाही बोलायला देता येणार बेटा! तुमची मम्मी बाहेर जाण्यापूर्वी फोनला कुलूप लावून जाते. ‘ असं म्हणता म्हणता पप्पांना रडू आलं. तो काळ लँडलाइन फोनचा होता.

मुले मोठी होऊ लागली होती. घरातील लहान-मोठ्या गोष्टी कळू लागल्या होत्या. एक दिवस घरात पुन्हा भांडण झालं. आजोळची सारी माणसे घरात एकत्र झाली होती. त्याच्या आजोबांनी आपल्या इस्टेटीचे जे तीन हिस्से केले होते, त्यापाकी त्यांच्या हिश्श्याचे पैसे मम्मी, आजोबा आणि मामाच्या बिझनेसमध्ये घालू इच्छित होती. पप्पांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती. मम्मीने सगळी कागदपत्रे आजोबांच्या आणि मामाच्या स्वाधीन केली. मग काही दिवसांनंतर मम्मी आणि पप्पांच्या सह्याही घेतल्या गेल्या.

त्याला वडलांचा राग यायचा. ते इतके गप्प का बसतात. काहीच का बोलत नाहीत?

ती दोघे आपला राग गिळून टाकत. ती इतकीही मोठी झाली नव्हती की पप्पांना काही विचारावं किंवा मम्मीला काही सांगावं.

ज्या दिवशी त्याला मुंबईला आय. आय. टी. ला प्रवेश मिळाला, त्या दिवशी तो, आमोद, पप्पा खूप खूश होते. तो पतियाळातील लोकांशी बोलू इच्छित होता. आजी-आजोबांना सांगू इच्छित होता की त्याला आय. आय. टी. ला प्रवेश मिळालाय. पण त्याला पप्पांचं बोलणं आठवलं. ‘आपल्या पायावर उभं राहून तू आपले निर्णय घेशील आणि निवड करशील, तेव्हा तुला कुणीच काही म्हणणार नाही. सगळं विश्व तेव्हा तुझं असेल!’ हा विचार करून तो गप्प बसला.

क्रमश: भाग २ 

मूळ हिंदी  कथा 👉 ‘कभी देर नहीं होती…’- मूळ लेखिका – सुधा ओम ढींगरा

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग १ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग १ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

डॉ सुधा ओम ढींगरा

टेक लेफ्ट..’ तो कार डावीकडे वळवून दूरवर घेऊन गेला. ‘नव टेक राईट ऑन स्टॉप साईन. …’ त्याने स्टॉप खुणेशी गाडी उजवीकडे वळवली आणि ड्राईव्ह करत तो त्याच जागी पुन्हा आला, जिथून त्याने सुरुवात केली होती. दिशा निर्धारित यंत्राच्या निर्देशांचा, तो गेले अर्धा तास पालन करत होता आणि शहरात वसलेल्या घरांच्या समूहाला तो प्रदक्षणा घालत होता. पण अजूनही त्याला हव्या त्या घरापाशी तो पोचला नव्हता.

‘अरे यार, तू मला किती फिरवणार? मला हव्या या घराशी पोचवणार की नाही? ‘ नेव्हिगेटरकडे बघत तो चिडून म्हणाला.

दिशा निर्धारित यंत्राच्या निर्देशांनुसार तो त्या सब-डिव्हिजनमध्ये पोचला होता॰ त्याला हवं ते घर तिथेच, त्याच सब-डिव्हिजनमध्ये होतं. त्याचा पत्ता त्याला दिला गेला होता आणि आता तिथे तो निघाला होता, पण गेले दहा-बारा मिनिटे नेव्हिगेटर त्याला कधी डावीकडे, तर कधी उजवीकडे फिरवत होता. पण कुठल्याही घराशी थांबायला मात्र संगत नव्हता. एरिया नवीन होता. काही घरं नुकतीच तयार झाली होती. काही तयार होत होती. त्यामुळेच कदाचित ती गुगल मॅपमध्ये नव्हती आणि त्यामुळे नेव्हिगेटर दिशा निर्देश देऊ शकत नव्हता. ज्या रस्त्यावर त्याला हवं ते घर होतं, तो रस्ताही कळत नव्हता.

एवढ्यात त्या ला रस्त्यावरून, म्हणजे साईडवॉकवरून चालत जाणारा एक भारतीय दिसला. त्याने आपली कार त्याच्याजवळ नेऊन थांबवली आणि खिडकीची काच खाली केली. आपल्या हातातला पत्ता त्याच्यापुढे करत विचारलं, ‘सर, हे घर कुठे आहे, आपण सांगू शकाल?’ दक्षिण भारतातली ती एक प्रौढ व्यक्ती होती. पत्ता बघून ते म्हणाले, ‘ मी इथे मुलाकडे आलोय. नवीन आहे इथे मी. मला काहीच माहीत नाही…. त्यांना विचारा.’ त्यांनी समोरच्या घरातील, एका गोर्‍या माणसाकडे बोट दाखवलं. तो आपल्या बागेला पाणी देत होता.

त्याने कार तिथेच थांबवली आणि पत्ता घेऊन तो त्या माणसाकडे गेला.

‘हॅलो ….’

‘हाय…’

‘कॅन यू टेल मी वेयर इज दीज हाऊस?’ 

त्या गोर्‍या माणसाने त्याच्या हातातून पत्ता घेतला आणि हसत म्हणाला, ‘ तू घराच्या अगदी जवळ आला आहेस. तू घरासाठी चकरा मारताना मी पाहिलं तुला.’ त्याने आपल्या एका हाताच्या तळव्यावर दुसर्‍या बोटाने रेघा काढत त्याला रस्ता समजावला. ‘ थॅंक्स’ म्हणत तो कारपाशी आला. रस्ता दाखवण्याची ही पद्धत त्याला खूप आवडली. आत्ता त्या माणसाने दाखवलेल्या रस्त्यानुसार तो पुढल्या गल्लीत उजवीकडे वळला. गल्लीच्या शेवटी ते घर त्याला दिसलं. घर नव्याने तयार झालेलं होतं आणि त्याच्याशेजारी एक नवीन घर बनत होतं. त्याने थोड्या आंतरावर कार पार्क केली.

तो योग्य जागी आला होता खरा, पण कारमधून उतरण्याची त्याची हिंमत होत नव्हती. त्याच्या मस्तकाच्या आखाड्यात वर्तमान आणि भूतकाळ यांच्यात कुस्तीच चालली होती जशी. त्यामुळे त्याच्या डोक्यात गोंधळ चालला होता. त्याला आश्चर्य वाटलं, अचानक मागे सरलेल्या वर्षांनी त्याला असं कसं बांधून ठेवलं.

भूतकाळाचा त्याच्यावर इतका दबाव पडला होता की तो त्याला कारसीटपासून हलूच देत नव्हता. कसा जाणार तो त्या घरात? तो जसा काही कारच्या सीटला जखडला गेला होता. 

भूतकाळाचा हाच तर वैताग असतो. त्याचे पापुद्रे सुटू लागले की सुटतच जातात. आठवणी पिंगा घालू लागल्या की पाठ सोडतच नाहीत. त्याच्याबाबतीत हेच तर होतय. गेले दोन दिवस घालवलेला वेळ वर्तमानावर दबाव आणतोय. स्वत:ला सामान्य करण्यासाठी त्याने कार सीटवरच मागच्या बाजूला डोके टेकले आणि डोळे मिटून घेतले.  

एका फोन कॉलवरील स्नेहाळ आवाजाने त्याला भावूक बनवलं होतं…. ‘हॅलो…’

‘इज दिज मिस्टर आनंद.’

‘यस.’

‘मिस्टर आनंद आपल्याशी कोणी तरी बोलू इछितय. घ्या. बोला.’

तो हैराण झाला होता. कुणाला त्याच्याशी बोलायची इच्छा होती? एवढ्यात मधात घोळलेला एक मधुर आवाज त्याच्या कानावर पडला. – ‘नंदी…’ फोनच्या या बाजूला आणि त्या बाजूला आवेगाच्या पावसाचे थेंब झरझरू लागले. दोन्ही बाजूला तन-मन भिजून चिंब झालं. कामाची घाई होती, तरीही आनंद तासभर त्या आवाजाशी बोलत राहिला. तो त्याला भेटायला उत्सुक झाला. कधी एकदा त्याला भेटतो, असं आनंदला होऊन गेलं. एका प्रोजेक्टचा शेवटचा दिवस उद्या होता, त्यामुळे दोन दिवसांनंतर भेटायचं नक्की ठरलं. दोन दिवस तो अशा बागेत फिरत होता, जिथे सप्तरंगी फुले फुलली होती. त्यांचा सुगंध तो ऑफीस, घर, बिछाना, इतकच काय, आपल्या श्वासातही अनुभवत होता. एक अजबशी खुमारी चढत होती.  मधुर मधुर आवाज,  ‘नंदी… नंदी…’ म्हणत त्याला बोलावत होता. हा आवाज लहानपणी तो देवघरातून ऐकत होता.

लहानपणाचा त्या घराचा सुगंध त्याच्या आत आत अजूनही वसलाय. बनारसी, बालदेव आणि हरी त्यांच्याकडे कामाला होते, पण ते त्याचे मोठे काका- छोटे काका होते. त्याने घरात प्रेम आणि मधाळ आवाजच ऐकला होता. कामगारांच्या बरोबरही कोणी मोठ्या आवाजात बोलत नसत.  त्याला नेहमीच वाटतं, लहानपणी त्याच्या आत सामावलेला स्नेहाचा सुगंध त्याला इतका सुगंधित करत राहिला, की तो कुणाचा तिरस्कार करूच शकत नाही. तिरस्काराची बीजे अनेकदा रोवली गेली, पण प्रेमाच्या छायेत ती वाढू शकली नाहीत.

प्रथम तर त्याचा विश्वासच बसला नाही. इथे विदेशात येऊन कुणी, जे बर्‍याच दिवसांपूर्वी हरवलं होतं, ते विश्वासाने त्याला शोधून काढेल, त्याला फोन करेल, या खात्रीने फोन करेल की त्यांच्याविषयीची त्याच्या मनातली प्रेमाची ठिणगी विझलेली नसणार आणि खरोखरच नंदीच्या मनातली, जी प्रेमाची ज्योत त्यांनी लावली होती, ती अजूनही जळतेच आहे. विदेशात आल्याबरोबरच तो आनंदाचा नंदी झालाय आणि खरोखरच आपल्या आतली ती प्रेमाची ज्योत त्याने कधीच विझू दिली नव्हती. तो त्यांना कधीच विसरला नव्हता. त्याच्या बालपणीची दहा वर्षे त्यांच्याशी जोडलेली होती. इथे आल्यावर तर तो स्वत:ला त्यांच्या अधीकच जवळ आल्याचं अनुभवत होता. इथे आठवणींच्या आधारेच तर माणूस आपली सुख- दु:खे भोगत असतो. हां! आनंद बनून तो काही वर्षे त्यांच्यापासून दूर राहिला. आता नंदी बनून तो त्यांच्याजवळ आलाय.

नंदी आणि आनंदचं अंतर्द्वंद् कधीपासून सुरू झालं? मम्मीने नंदीला आनंदपासून हिसकावून घेतलं आणि आनंद एकटा झाला. आनंदसाठी तो मोठा कठीण काळ होता. अवघा दहा वर्षाचा होता तो तेव्हा, पण तो जसजसा मोठा होईल, तसतसा त्याने आपल्या आतल्या नंदीला संभाळून जीवंत ठेवला होता.

आठवणींचे पक्षी फडफडू लागले. डोक्यात गोंधळ माजला. आठ्ठावीस वर्षापर्यंत तो ज्या परिवेशात वाढला, तिथे प्रचंड विरिधाभास होता. तो जसा जसा मोठा होत गेला, तसतशी त्याला समज येऊ लागली. आता तर त्याला खूप गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. परदेशातील वातावरण आणि कार्यप्रणाली याने त्याचा विवेक जागृत झालाय. बुद्धिमत्ता अनेकांमध्ये असते, पण बुद्धिमान कमी असतात. या देशाने त्याची अंतर्दृष्टी व्यापक बनवलीय. गोष्टींकडे बघण्याच्या दृष्टीत परिवर्तन आलय. भिन्न भिन्न देशातील भिन्न भिन्न लोकांसोबत काम करण्याने एक वेगळ्याच प्रकारची सजगता त्याच्या ठायी आलीय.

तो आपल्या वडलांना सांगू इच्छित होता की वयाच्या त्या थांब्यापर्यंत ते जे काम करू शकले नाहीत, ते काम करायला तो निघालाय. परंतु त्याने जेव्हा जेव्हा आपल्या पप्पांना फोन लावला, तेव्हा तेव्हा, त्याच्या मम्मीनीच तो उचलला, त्यामुळे तो काहीच बोलू शकला नाही. मम्मीला कळणं, म्हणजे घरात वाद-विवाद, क्लेश. इथे आल्यानंतर त्याने मम्मीच्या अनेक गोष्टींना विरोध केला होता. मम्मी त्याला काही म्हणायची नाही, पण घरात पप्पांची धडगत नसे. त्यांना मम्मीचं तिरकस बोलणं ऐकून घ्यावं लागे-

‘तुमचा मुलगा तुमच्यावर गेलाय. मोठा चलाख आहे. मनमानी करणारा. माझी पर्वा तुम्ही कधी केलीत, म्हणून तो करेल. एक मुलगीच तेवढी आहे, जी मला समजून घेते. ‘

कधी काळी तो आपल्या आईवर खूप प्रेम करायचा. पण दिल्लीला आल्यानंतर, तो आणि त्याचा भाऊ दोघेही आपल्या पाप्पांच्या निकट आणि मम्मीपासून दूर होत गेले. छोट्या  छोट्या बाबीत, त्याची मम्मी, पप्पांना खाली बघायला लावायची, त्यांचा अपमान करायची,  ते भावाभावांना मुळीच आवडत नसे. प्रत्येक वेळी त्याचे पप्पा मान खाली घालून मम्मीची प्रताडना सहन करायचे. त्यांच्या डोळ्यात समुद्र उसळताना त्याने पाहिलय. जेव्हा तो कोपर्‍यातून वाहू लागेल, असं वाटे, तेव्हा ते आपल्या खोलीत निघून जात. त्याला अनेक वेळा आपल्या पप्पांचा राग येई. वाटे, ते बोलत का नाहीत? 

वयाची दहा वर्षे होईपर्यंत त्याने आपल्या मम्मीचं अतिशय सुंदर रूप पाहिलं होतं. नंतर त्याने जे पाहिलं, त्यामुळे तो घाबरूनच गेला.

क्रमश: भाग १

मूळ हिंदी  कथा 👉 ‘कभी देर नहीं होती…’- मूळ लेखिका – सुधा ओम ढींगरा

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आभारी आहे भाऊ…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘आभारी आहे भाऊ…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

किदवई नगर चौकात टेम्पोमधून उतरून पुढे जाऊ लागताच तीन चार सायकल रिक्शावाले माझ्याकडे येत म्हणाले, ” चला साहेब, के-ब्लॉक….”

सकाळ संध्याकाळचे तेच प्रवासी व तेच रिक्शेवाले. सर्व एक दुसऱ्याचे चेहरे ओळखू लागले आहेत. ज्या रिक्शांवर बसून मी सायंकाळी घरी पोहोचायचो ते मोजके तीन चारच होते. माझ्या स्वभावामुळे मी नेहमीची खरेदीसाठीची दुकानं, वाहने किंवा मित्र निवडकच ठेवतो, त्यांच्यावरच विश्वास ठेवतो आणि त्यांना पुन्हा पुन्हा बदलतही नाही.

एका रिक्शावर मी बसलो. आज ऑफिसमध्ये डायरेक्टरसाहेब विनाकारणच माझ्यावर नाराज झाले होते, म्हणून डोके जड व मन दुःखी होते. रिक्शा मुख्य रस्त्यावरून केव्हा वळली आणि केव्हा घरासमोर येऊन उभी राहिली मला समजलेच नाही. 

“चला, साहेब, आपले घर आले.” रिक्षावाल्याचा आवाज ऐकून मी विचारातून बाहेर आलो. रिक्शा घरासमोर पोहोचल्याचे बघून मी खाली उतरलो व खिशातून पैसे काढून रिक्शावाल्याला दिले आणि घराकडे जाऊ लागलो. 

“ साहेब ” …  

रिक्शावाल्याचा आवाज़ ऐकून मी मागे वळलो आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पहात म्हणालो, 

” काय, चुकून पैसे कमी दिले का मी? “

” नाही साहेब.”

” मग काय आहे? तहान लागली आहे का? “

” नाही साहेब.”

” मग भाऊ, काय झाले?”

” साहेब, ऑफीसमध्ये काही बिघडले आहे का?”

“ हो… पण तुला कसे समजले ! ” मी आश्चर्यचकित होत विचारले.

” साहेब, आज तुम्ही घर येइपर्यंत रिक्शात बसून माझ्याशी काहीच बोलले नाही. माझ्या घर परिवाराविषयी काही विचारलेही नाही. प्रवासात गप्प गप्प व अगदी शांत बसून होतात‌. “

” हो भाऊ, आज मन जरा अशांत आहे म्हणून गप्प बसलो होतो मी. पण पैसे तुला तर पूर्ण दिले ना !”

“साहेब, पैसे तर दिले पण …”

” पण काय …?”

” साहेब, थैंक्यू नाही म्हटले आज तुम्ही.. साहेब, आम्हा रिक्षेवाल्यांच्या  जीवनात आम्हाला सन्मानाने कोण वागवतो. काही लोक तर भाडे पण नाही देत. काही तर मारपीट पण करतात. एक तुम्ही आहात जे रिक्शात बसताच आमची चौकशी करता, घर परिवाराविषयी, मुलांचे शिक्षण, अभ्यासाविषयी विचारपूस करता, खूप चांगलं वाटतं जेव्हा कुणी आपलेपणा दाखवतो. हे सर्व करून तुम्ही भाडे तर पूर्ण देताच, घरी येऊन थंड पाणी ही प्यायला देता आणि वरून आम्हाला थैंक्यू पण म्हणता. आम्ही चौकातले लोक तुमच्याविषयी बोलताना  ” थैंक्यूवाले साहेब ” म्हणून बोलतो… पण आज तर…” त्याचा आवाज भरून आला होता.

मी आपली पाठीवरची बॅग काढून गेटजवळ ठेवली, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूच म्हणालो, ” भाऊ मला माफ कर. मन अशांत होते म्हणून ही सर्व गड़बड़ झाली. माझ्या घरापर्यंत आणून सोडल्याबद्दल तुझे मनापासून आभार व धन्यवाद. थैंक्यू भाऊ।”

तो हसला आणि पॅडलवर पाय मारत तेथून निघून गेला.

हिंदी लेखक – अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘ती…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘ती…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

तिनं स्कूटर लावली, हँडल लॉक केलं. डिकीतली पर्स अन् पुस्तकं काढून घेतली. पर्स खांद्याला अडकवली अन् पुस्तकं हातात धरून चालू लागली. नेहेमीसारखीच कुठंही न बघता थेट फ्लॅटच्या दाराशी आली. दाराचं कुलूप काढून घरात गेली. लगेच मागं वळून दरवाजा बंद केला.

…बस एवढंच तिचं दर्शन रोज आजूबाजूच्यांना होत होतं. तिचा हा रोजचाच दिनक्रम होता. सकाळी ठराविक वेळेला ती घरातून बाहेर पडायची अन् संध्याकाळी ठराविक वेळेला परतायची. आली की फ्लॅटच्या बंद दरवाजाआड लुप्त व्हायची. तिच्या जाण्याच्या अन् येण्याच्या वेळा आजूबाजूच्या लोकांना माहीत झाल्या होत्या. दोन्ही वेळेला रिकामटेकडे न् अतिचौकस लोक तिला डोळे भरून न्याहाळून घेत. दार बंद झालं की, तिचं दर्शन दुर्लभ व्हायचं. तिच्या घरातून कधी बोलण्याचे, रेडिओ, टी.व्ही.चे कसलेच आवाज यायचे नाहीत. खिडकीतूनसुद्धा ती कधी डोकावताना दिसायची नाही. आत सदैव एकटी काय करत असावी, याची अनेकांना उत्सुकता होती.

दिसायला फार देखणी नसली, तरी आकर्षक होती. राहण्यात मेकअप किंवा नटवेपणा कधी दिसला नाही. पण, साधासुधा नेटकेपणा होता. केसांचा बॉयकट, साधी सुती साडी, कुंकवाची एवढीशी टिकली. बस. बाकी कानात, हातात, गळ्यात कुठं दागिने नसायचे. गळ्यात मंगळसूत्र पण नव्हतं. यामुळंच तिच्याबद्दल अनेक तर्क-कुतर्क प्रत्येकजण लढवत होता.

ती एकटी होती म्हणून आजूबाजूच्या टगे मंडळींना तिच्याबद्दल फार कुतूहल होते. त्यांच्या दृष्टीनं विवाहित असो, कुमारिका असो की विधवा. काहीही असलं तरी तिचं आकर्षक रूप अन् एकटं असणं फार महत्त्वाचं होतं. तिची स्कूटर वगैरे बंद पडेल, कधी कधी गॅसची टाकी वर न्यावी लागेल किंवा काही मदत लागेल, त्यानिमित्ताने तिच्या घरात जाण्याची संधी मिळेल, याची सगळे वाट पाहत होते. पण, 6 महिन्यांत अजून तरी तशी वेळ आली नव्हती.

तिला राहायला येऊन 6 महिने झाले होते. पण, ती सकाळी जाते, संध्याकाळी येते अन् एकटी राहते, यापलीकडे फारसं कुणालाच तिच्याबद्दल काही माहीत नव्हते.

बिल्डिंगमधल्या बायकांना मात्र, तिचं एकटं राहणं आवडायचं नाही. तसा तिचा काही त्रास कुणाला नव्हता. पण, तिच्याबद्दल कुणालाच, काहीच माहीत नव्हतं, याचाच सगळ्यांना संताप यायचा. त्यांच्या दुपारच्या वेळातल्या लोणची-पापडांच्या गप्पांत तोंडी लावायला त्यांना तिचा विषय घेता येत नव्हता. मग तिच्या एकटं राहण्याबद्दलच त्या नाना तर्क लढवत.   ती विधवा की अविवाहित की घटस्फोटित ते कळत नव्हतं. ती कुणाची कोण हे माहीत नव्हतं. तिचे लागेबांधे कुणाशी, हे कळण्याशिवाय तिचे स्थान पक्कं करता येत नव्हतं. ‘आमचे हे’ या पलीकडं विश्व नसलेल्या त्या बायकांना तिच्या विश्वाची कल्पनाच करता येत नव्हती. मग कुणी म्हणत, ‘चार बायकांच्यात मिसळायला काय झालं?’

’शिष्ट आहे.’

‘गर्वीष्ठ दिसतेय.’

‘कशाचा एवढा गर्व आहे, कुणास ठाऊक?’

‘ समजते कोण स्वत:ला?

त्या सारखी माझ्याकडं तिच्याबद्दल चौकशी करत. कारण आमची अन् तिची एक भिंत कॉमन होती. पण, मलाही तिच्याबद्दल जास्त काही माहीत नव्हते.

त्या दिवशी रात्री मात्र काही वेगळाच प्रकार घडला. रात्री 11 चा सुमार होता. तिच्या दारापाशी काही माणसं बोलत होती. तिच्या दारावर टक्टक् करीत होती. ते काय बोलतायत ते ऐकू येत नव्हतं. पण, रागरंग काही चांगला वाटत नव्हता. मी खूप वेळ चाहूल घेत होते. पण, काय करावं, ते मलाही काही कळेना. नाही नाही ते विचार मनात येत होते. भीती, शंका-कुशंका… यामुळे मी बेचैन झाले. घरातल्यांना उठविण्याच्या विचारातच मी होते.

तेवढ्यात आमच्या मागच्या खिडकीच्या काचेवर, दारावर खूप आवाज झाला. पाहते तर ती! भेदरलेली…, घाबरलेली…, जोरजोरात दार आपटत होती. मी पळतच दार उघडलं… तर तिनं मला घट्ट धरून ठेवलं. तिच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता. एवढी ती घाबरली होती. खाणा-खुणा करून सांगत होती. पुढच्या दाराशी कुणी आहे म्हणून. एवढ्यात आवाजाने बरेच लोक जागे झाले. ते बाहेरचे लोक निघून गेले. ती मला घट्ट पकडूनच तिच्या घरात घेऊन गेली. अजूनही थरथर कापत होती ती. घरात जाताच ती माझ्या गळ्यात जवळ-जवळ कोसळलीच. गदगदून… रडत होती. शहारत होती. मीही फक्त तिचा थोपटत राहिले. हळूहळू हुंदके देतच तिला झोप लागली. मीही तिथंच लवंडले. पहाटे उठून हलक्या पावलाने घरी आले. सगळं आवरून तिच्यासाठी चहा घेऊन पुन्हा आले, तर ती सुस्नात… प्रसन्न एखाद्या पारिजातकाच्या फुलासारखी! ध्यानस्थ बसलेली. डोळे बंद. तिला माझी चाहूलही लागली नाही.

घरात फारसं सामानसुमान नव्हतं. समोरच्या भिंतीवर एक सुंदर पेंटिंग होतं. त्याखाली तिचंच नाव असावं… अश्विनी. मी त्या पेटिंगकडं पाहात मनात प्रश्न जुळवू लागले. कालची माणसं कोण असावीत? कशाला आले असतील?

तिच्याकडे नजर गेली अन् तिनं डोळे उघडले.  पण, त्या अथांग डोळ्यात प्रगाढ दुःख दिसत होते. अन् मिटलेल्या ओठात ते सहन करण्याची ताकद!

मी काही विचारायच्या आत ती माझ्याजवळ आली. तिने मला चक्क मिठी मारली. माझे हात हातात घेऊन माझ्याकडे पाहत राहिली. काय बोलावं तेच मला सुचेना. कारण ती खुणा करून सांगत होती ‘‘मला बोलता येत नाही’’ –

तिच्या सगळ्यांच्यात न मिसळण्याचं, इतरांशी न बोलण्याचं हे कारण होतं तर… आणि आम्ही बायका काय काय समजत होतो तिच्याबाद्दल. मलाच लाज वाटली.

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिचे माहेरपण आणि… भाग – १ ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ तिचे माहेरपण आणि… भाग – १ ☆ श्री मयुरेश देशपांडे

ऐनवेळी गोंधळ नको म्हणून त्याने एसटीची तिकिटे आधीच आरक्षित करून ठेवली होती. अगदी तिला आवडते तसे खिडकीतले तिकीट आणि अगदी पुढची जागा. त्याने सामान वरती लावले, तिला खिडकी उघडून दिली आणि खाली उतरला. बस निघेपर्यंत तिच्या सूचना चालूच होत्या आणि एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे आठवणीच्या वहीवर तिच्या सूचना नोंदवून घेत होता. बस स्थानकातून बाहेर पडली तशी त्याची पावले मागे वळाली.

ती तिच्या परीक्षेला गेली होती. पण खरी परीक्षा त्याचीच होती. माहेरच्या गावी परीक्षा केंद्र खालच्या सरकारने नव्हे तर वरच्या सरकारने ठरवून दिले होते. ” कधी नव्हे ते सणांव्यतिरिक्त माहेरी येणे होतेय, राहू देत की लेकीला चार दिवस “, सासूबाईंचा थेट त्याला फोन. पडत्या फळाची आज्ञा मानत, मी देखील,

“हो ना, तेवढाच मोकळा वेळ मिळेल तिला.”, असे म्हणत त्याने त्यांच्या होकारामध्ये होकार भरला.

“तुम्हाला काय जातंय होय म्हणायला, दोन लेकरं आहेत पोटाशी. त्यांचे कोण पाहणार? तुम्ही सकाळी जाणार कामावर, ते संध्याकाळी उजाडणार. आणि उजाडले तरी कोपऱ्यावर मित्र मंडळीत जाणार. माझी लेकरं राहायची उपाशी. त्यांना शाळेत सोडणार कोण – आणणार कोण, शंभर धंदे असतात माझ्यापाठी. आईला काय जातंय म्हणायला ‘ ये चार दिवस म्हणून ‘ .” तिने दांडपट्टा चालवला.

तिचे माहेरी राहणे बहुधा रद्द होते आहे पाहून तो आतून सुखावला. पण मग पट्ट्याची पट्टी झाली आणि तिही खाली उतरली. त्याचा आनंद काही फार काळ टिकला नाही.

“आईचेही बरोबर आहे म्हणा. सणवार सोडले तर एरवी कुठे तिच्याकडे जाणे होतेय. आणि सणवार म्हणजे पाहुण्यांची उठबस. बरं घरात दुसरं बाई माणूस नाही. भावाचं  लग्न लावून दे म्हटले तर तो बसलाय तिकडे राजधानीत. आम्हाला बोलायला उसंत काही मिळत नाही. मी काही सांगेन म्हणते, ती काही सांगेन म्हणते, जरा बाबांच्या मांडीवर डोके ठेवेन म्हणते, पण कसले काय. तिकडे जाऊनही रांधा वाढा उष्टी काढा. आता जाईन तर छान गप्पा होतील. आवडी निवडीचे हक्काने मागून खाता येईल. बरे मागे मुलांचा व्यापही नाही. ते काही नाही. आई म्हणते ते बरोबरच आहे. परीक्षा झाली की, तशीच आईच्या घरी जाते आणि चांगली चार दिवस राहून येते. कळू देत मुलांनाही माझी किंमत.” … तिचा खालचा सूर कधी वरती गेला तिलाही कळाले नाही. तो मात्र चेहऱ्यावर कसलेच भाव न दाखवता आत गेला.

आपल्याला इथेच ठेवून आई एकटीच माहेरी जात आहे म्हटल्यावर मुले जाम खूश. बाबा काय दिवसभर बाहेर असतो. म्हटल्यावर दिवसभर घरावर आपले साम्राज्य म्हणून मुले आनंदली. लेकीची शाळा दुपारची तर लेकाची सकाळची. दोघांनी टीव्ही, संगणक, मोबाईल व इतर खेळांच्या वेळा आपापसात वाटून घेतल्या. चार दिवस अभ्यासाला सुट्टी. पण चार दिवस बाबा सुट्टी काढून घरी थांबणार आहे कळल्यावर त्यांच्या आनंदावर विरझण पडले, अगदी मगाशी बाबांच्या आनंदावर पडले तसे. बाबांना त्यांच्या साहेबांशी बोलताना तिघांनी चोरून ऐकले होते. हो तिघांनी म्हणजे आईनेसुद्धा. तिने तर लगेच पिशवी भरायला घेतली.

“अग हो, वेळ आहे ना अजून. आधी परीक्षा मग माहेरपण. तेव्हा आधी अभ्यास मग पिशवी भरणे.” त्याने उसने अवसान आणून रागे भरले. तिचा पुढचा आठवडा माहेरपणाचे नियोजन करण्यात, तिच्या पश्चात घरात करायच्या कामांची त्याला व मुलांना सूचना देण्यात आणि मधेआधे वेळ मिळेल तसा अभ्यास करण्यात गेला. आणि शेवटी त्याच्यासाठी महाप्रलयाचा तर तिच्यासाठी महाआनंदाचा दिवस उजाडला.

गाडी सकाळचीच होती आणि तिची कालपासून तयारी सुरू होती. तिच्या डोळ्यांतले पाणी आता हे तिघे चोरून पाहात होते. हो, पुन्हा तिघेच. यावेळी बाबा त्या दोघांना सामील झाले होते. तिचा पाय निघत नव्हता. तरी बरं ती निघाली तेव्हा मुले साखरझोपेत होती. धाकट्याचं मी पण येणार हे पालूपद आठवडाभर चालूच होतं, पण तिने काही त्याला दाद दिली नाही.

तिने देवापुढे निरांजन लावले. देवाला धूप अगरबत्ती दाखवली. नमस्कार करून पिशव्या उचलायला गेली. ” सगळे  घेतलंय ना बघ एकदा.”, त्याने बाहेरूनच गाडी काढता काढता आवाज दिला. ” हं काही राहिले तरी मी माघारी थोडीच फिरतीये.” उंबरा ओलांडतानाच तिचे प्रत्युत्तर आले. ” अगं तसं नव्हे, परीक्षेचे सगळे घेतले का?”, असे मला म्हणायचे होते. त्याने सारवासारव करतच गाडी सुरू केली.

पुढे तिच्या पिशव्या आणि मागे ती अशी ओझ्याची कसरत करीत ते स्थानकावर पोहोचले. बस अजून फलाटावर लागायची होती. दोघांनी गरमागरम चहा घेतला. तसे तिचे माहेरी जाणे आता काही कौतुकाचे राहिले नव्हते. लग्नाला जेवढी वर्षे झाली नसतील त्याहीपेक्षा अधिक वेळा ती माहेरी गेलेली होती. दोन जीवांची आई झाली तशी सोबतच्या पिशव्या वाढल्या, पण जाणे कमी झाले नाही. पण यावेळी तिची कच्चीबच्ची बरोबर नव्हती आणि म्हणून जीव तुटत होता.

“अगं राहतील व्यवस्थित. आता मी चार दिवस रजा घेतली आहे ना, मग काय काळजी करतेस. आणि सोबतीला राधाक्का आहेच की. तूच तर नेहमी म्हणतेस ‘ मुले तुझी कमी आणि राधाक्काची जास्त वाटतात.’ मग कशाला काळजी करतेस. तू फक्त परीक्षेवर लक्ष केंद्रित कर आणि मग माहेरपणावर. इकडली काळजी इथेच फलाटावर सोडून दे.”, तिला बसवता बसवता त्याने धीर दिला. पण खऱ्या धीराची गरज तर त्याला होती. हे तो कोणाला सांगणार.

तिची गाडी दिसेनाशी झाली तशी त्याने गाडी काढली आणि घराची वाट धरली. गाडी लावून घराकडे वळला तशी जिन्यातच राधाक्का भेटली. ” पोरं अजून झोपली आहेत. लेकीला झोपू दे हवे तर, पण मुलाला उठवावे लागेल, नाहीतर उशीर होईल शाळेला.”, राधाक्काच्या चेहऱ्यावर काळजी आणि प्रेम एकाच वेळी दिसून येत होते. “आणि हो, डबा मी बनवते खाली. तू त्याला तयार करून खाली घेऊन ये.”

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क ट्ट प्पा” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ “क ट्ट प्पा” ☆ श्री मंगेश मधुकर

शेठचं आयुष्यातलं मोठं स्वप्न पूर्ण झालं. आजोबांनी सुरु केलेला व्यवसाय नंतर वडील, स्वतः शेठ यांनी सचोटीने, मेहनतीने नावारूपाला आणला. पुढच्या पिढीने काळानुरूप बदल करून झळाळी आणली. पिढ्यानपिढ्याची मेहनत फळाला आली. दहा बाय दहाच्या जागेत सुरु केलेलं दुकान सत्तर वर्षानंतर भव्य तीन मजली झालं. शेठ आणि कुटुंबीय प्रचंड आनंदात होते. नवीन वास्तूचे उदघाटन दणक्यात करायचे यावर एकमत झाले, परंतु उदघाटनाला कोणाला बोलवायचं यावर खल सुरु होता. घरातले सगळेच उत्साहाने सहभागी होते.

“ कुठल्या तरी मोठ्या माणसाला बोलवू ”

“ फिल्मस्टार आला तर पब्लिसिटी चांगली मिळेल ”

“ हिरो नको,हिरोईनला बोलवा ”

“ नको,हे लोक लाखात पैसे घेतात. आपल्याला परवडणार नाही ”

“ माणूस फेमस पाहिजे.म्हणजे त्याच्या जोडीने आपल्या दुकानाची हवा होईल.”

“ असल्या पब्लिसिटीची गरज नाही. आपलं काम आणि नावं फार मोठंय ”

“ मग क्रिकेटर?”

“ नको,”

“ कोणालाही बोलवा.  फक्त राजकारणी, नेते मंडळी अजिबात नको ”

“ मग राहिलं कोण?? ”

 

उदघाटनावरून चर्चा रंगली. घरातील लहान मुलांपासून–मोठ्यांपर्यंत सगळे हिरीरीने मत मांडत होते. प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय सुचवत होता.बराच वेळ होऊनही एकमत झालं नाही. शेठ मात्र शांत होते. निर्णय होत नव्हता म्हणून थोरल्यानं शेठना विचारलं.

” बापुजी,तुमचं मत !!”

“ कोणाला बोलवायचं तो तुमचा अधिकार. उदघाटन दिमाखात करा, पण पाहुण्यांसाठी उगाच फालतू पैसा खर्च करू नये असं माझं मत आहे ” 

“ तुम्ही सुद्धा एक नाव सुचवा ”

“ नाही नको.”

“ का?? “

“ मी सुचवलेलं नाव आवडणार नाही ” .. शेठ.

“ आतातर सांगाच ” – सगळयांनी एकदम आग्रह केला.

“ सगळे चेष्टा कराल.त्यापेक्षा राहू दे ”–शेठ.

“ बापुजी, सस्पेन्स वाढवू नका. खात्रीने सांगते ते नाव वेगळं असणार ”

“ त्यामागे नक्कीच काहीतरी विचार असणार. तुम्ही सांगा.”

“ आप्पांच्या हस्ते उद्घाटन करावं ”–असं शेठ बोलल्यावर ते गंमत करताहेत असं वाटून सगळे मोठ्याने हसले.

“ आपला एवढा मोठा कार्यक्रम आणि तुम्ही ….”

“ काहीही काय?? ”

“ तेच ना, खरं नावं सांगा ”

“ मनापासून सांगतोय. गंमत नाही ” –शेठ 

“ या नावाला माझा विरोध आहे ”

“ माझा बिनशर्त पाठींबा आहे ” –माई

“ आप्पांच्या हस्ते उद्घाटन, का? कशासाठी? ”

“ कितीही केलं तरी आप्पा आपले नोकर !!”

“ एक मिनिट,मान्य नसेल तर ठीक आहे. पण आप्पांविषयी काही बोलू नका ” – शेठचा आवाज वाढला. एकदम शांतता पसरली.

“ माफ करा. जरा आवाज चढला. पण आप्पांविषयी बरेच गैरसमज आहेत. आम्ही विनाकारण नोकर माणसाला मान देतो असं सगळ्यांनाच वाटतं.” 

“ बापुजी,रागावू नका. पण आता विषय निघालाच तर स्पष्टच विचारतो.  त्या आप्पांचे एवढे कौतुक?? ”

“ आप्पांविषयी तुम्ही जरा जास्तच भावूक आहात.  पण दुकानात केलेल्या कामाचे आपण त्याना पैसे देतो. हा एक व्यवहार आहे. आपल्याकडे असे बरेचजण काम करतात. आप्पा अनेक वर्षापासून काम करतायेत हाच काय तो फरक. पण म्हणून मग ….” – शेठच्या दोन्ही मुलांनी नापसंती व्यक्त केली.

“ आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पहायचा नसतो. काही माणसं ही व्यवहारापलीकडची असतात. आप्पाविषयी सांगायचे तर माझ्या जन्माच्या आधीपासून ते दुकानात काम करतायेत. दुकान सुरु झाल्यावर सहा महिन्यातच गावाकडून आलेला एक अनाथ, गरीब, गरजू मुलगा कामाला लागला आणि नंतर दुकान हेच त्याचं आयुष्य झालं. एकोणसत्तर वर्ष आणि सहा महिने आप्पा या दुकानात काम करतायेत. डोळे झाकून विश्वास ठेवावा असा माणूस. प्रामाणिकपणाचा मापदंड, दुकानातली खडा न खडा माहिती. आपली चौथी पिढी दुकानात आलीय आणि अजूनही ऐंशी पार केलेले आप्पा दुकानात काम करतात.” – शेठ 

“ हे भारी आहे. मला आप्पांना भेटायला आवडेल.” – शेठची नात.

“ लग्नानंतर आप्प्पांची ओळख सासऱ्यांनी घरातला माणूस म्हणून करून दिली. घरात आप्पांना कधीच नोकर म्हणून वागणूक दिली गेली नाही आणि आप्प्पांनीसुद्धा मान मिळाला म्हणून आपली मर्यादा ओलांडली नाही. आजही आपल्यापैकी लहानमोठा कोणी दुकानात गेले कि आप्पा उभे राहतात. हात जोडून नमस्कार करतात. वयाकडे न पाहता मालकांचा मान राखतात.” – माई 

“ हे मी बघितलंय ”

“ मी सुद्धा हा अनुभव अनेकदा घेतलाय ”

“ आपलं दुकान म्हणजेच आप्पांचं आयुष्य. गावाकडून आले आणि इथलेच झाले. आजोबांनी एक खोली घेऊन दिली, त्याचे सगळे पैसे सुद्धा आप्पांनी फेडले. स्वतःविषयी कधीच बोलले नाहीत. अनेकदा विचारलं पण तेव्हा हसून उत्तर टाळलं. दुकानावर त्यांचा अतिशय जीव, दुकानाच्या बदलत्या रूपाचे आप्पा हे एकमेव आणि चालता बोलता साक्षीदार आहेत. त्यांच्याइतका योग्य माणूस दुसरा नाहीच  म्हणूनच… .” शेठ एकदम बोलायचे थांबले. पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. 

“ माझा आग्रह नाही. तुम्ही निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात.” – शेठ 

“ उदघाटन आप्पांच्या हस्ते करायचे हे सर्वांना मान्य ” – माईंनी विचारताच आपसूक सगळ्यांचे हात वरती गेले. 

“ आप्पांची ओळख कशी करून द्यायची? ”

“ बाहुबली सिनेमात महिष्मती साम्राज्यासाठी जसे कट्टप्पा तसे आमच्या दुकानासाठी आप्पा !!! ”

… थोडक्यात शेठनी समर्पक ओळख सांगितली तेव्हा सगळ्यांनी जल्लोष केला.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आसावरी… – भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आसावरी…– भाग- २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(बरं, मी तसा काही रूपवान नाही. धन म्हणाल तर स्वत:चं घरही नाही आणि प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. विद्या म्हणाल तर बी. कॉमच झालोय.” त्या काही बोलल्या नाहीत.) – इथून पुढे. 

“बरं, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा.” असं सुधाकरनं म्हटल्यावर वहिनी म्हणाल्या, “मी असं ऐकलंय की मागे तुम्ही घरोघरी पेपर टाकत होता, हे खरं आहे का?”    

सुधाकर मनातल्या मनात चरकला. तो एकेकाळी पेपर टाकत होता म्हणून या आधी एका स्थळाकडून नकार आलेला होता. सुधाकरने सांगून टाकलं, “होय, खरंय मी पेपर वाटप करीत होतो.”

आसावरी वहिनी म्हणाल्या, “खरं सांगू, तुम्हाला होकार देण्यासाठी मला एवढं एकच कारण पुरेसं वाटलं. जो माणूस श्रमाला एवढी प्रतिष्ठा देतो तो माणूस आयुष्यात कधीही मागे राहणार नाही. प्रतिकूल परिस्थितीत देखील घट्ट पाय रोवून उभी असणारी माणसं मला आवडतात. आजचा दिवस उद्या राहणार नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही नक्कीच प्रगती कराल याची खात्री वाटली म्हणूनच मी होकार दिला.” 

लगेच मी म्हटलं, “सुधाकर तुला आसावरी रागातील गाणी आवडतात. आता ‘आसावरी’ याच नांवाची कन्या तुझ्या आयुष्यात पत्नी म्हणून येते आहे. चला हा सुंदर योगायोग आहे.” यावर ते दोघेही हसले. 

मार्चमध्ये लग्न ठरलं आणि झालं ते डिसेंबरमध्ये. सुधाकरने तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. एकमेकांना संपूर्णपणे अनोळखी असणाऱ्या दोन व्यक्तींनी एकदम एकत्र राहायला येणं, सहजीवन सुरू करायला लागणं हे त्याच्या हिशेबात बसत नव्हतं. एकमेकांना समजून घ्यायला, पुरेसं जाणून घ्यायला, महत्वाचं म्हणजे दोघांमध्ये भावनिक ओढ, एक भावबंध निर्माण व्हायला एवढा अवधी असणं त्याला गरजेचं वाटलं होतं. 

सुधाकरच्या आयुष्यात आसावरी वहिनी आल्या आणि त्याला पावलोपावली यश मिळू लागलं. पुण्यातल्या एका प्रख्यात चार्टर्ड अकौंटंट फर्मकडून त्याला चांगली ऑफर आली. त्यांनी राहण्यासाठी छोटासा फ्लॅटही दिला. 

इकडे गावाकडे असलेल्या त्याच्या बहिणींच्या लग्नांच्या जबाबदाऱ्या ते जोडपे यथासांग पार पाडत होते. वहिनींकडून सुधाकरच्या कर्तृत्वगुणांना सतत प्रोत्साहन मिळत गेले. संसारवेल फुलताना दोन मुलं झाली. त्याचबरोबर आर्टिकलशीप करता करता तो एकदाचा चार्टर्ड अकौंटंट झाला आणि सुधाकर त्याच्या क्षेत्रात नावाजला जाऊ लागला. 

आजच्या कार्यक्रमाला डॉ. भीमाशंकर देखील सपत्निक आला होता. आम्ही तिघे मित्र सहकुटुंब दरवर्षी न चुकता सहलीला जात असतो. 

सौ. वहिनींच्या वाढदिवसानिमित्त घरी धार्मिक अनुष्ठान केलेले होते. मोजकेच नातेवाईक आणि मित्रांच्या समवेत तो सोहळा साजरा होत होता. सौ. वहिनींचं औक्षण झाल्यावर कुलदेवतांचे स्मरण करून उपस्थित वरिष्ठांनी त्यांच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकल्या. 

‘जन्मदिनं इदं अयि प्रिय-सखे I शन्तनोतु ते सर्वदा मुदम II प्रार्थयामहे भव शतायुषी I ईश्वर: सदा त्वां च रक्षतु II पुण्य-कर्मणा कीर्तिमर्जय I जीवनं तव भवतु सार्थकम II आधीच रेकॉर्ड करून ठेवलेली मंगलकामना करणारी प्रार्थना वाजवली गेली. त्यावेळी वातावरणात एक वेगळीच सात्विकता भरून राहिली होती. 

ते जोडपे कुणाकडूनही कुठलीच भेटवस्तू घेत नसत. सर्वांनी मन:पूर्वक अभिष्टचिंतन केले. उपस्थितांचे तोंड गोड करण्यासाठी पेढे देण्यात आले.  

सुधाकर बोलायला उभा राहिला. “आज आसावरीचा साठावा वाढदिवस आहे. आजवर तिच्याविषयी बोलायचा कधी प्रसंग आला नाही. एवढंच सांगतो, आम्हाला परस्परांच्या विषयी खूप आदर आहे. आम्ही एकमेकांच्या मनातलं वाचू शकतो. माझ्या क्षमतेवर सदैव विश्वास दाखवत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे म्हणून मी यशस्वी चार्टर्ड अकौंटंट होऊ शकलो. आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात तिची मोलाची साथ लाभली.

एवढ्या वर्षाच्या सहजीवनात ती मला कधीच सोडून राहिलेली नाही. माहेरी कधी जाऊन राहिल्याचं मला आठवत नाही कारण माझ्याबरोबर अखंड चालण्याचा तिने वसा घेतलेला होता आणि तो वसा ती अतिशय प्रेमाने निभावते आहे. 

आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी आसावरीला सांगत असतो, त्याशिवाय मला राहवत नाही. एकमेकांवरचा अटळ विश्वास हेच आमच्या सहवासाच्या यशस्वीतेचं गमक आहे. मुलांच्यावर उत्तम संस्कार करीत तिने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 

घर सांभाळत ती माझ्या ऑफिसचं व्यवस्थापनही सांभाळते. आमच्याकडे आर्टिकलशीपसाठी ती गरीब घरांतल्या होतकरू मुलांना निवडते. त्यांच्यासाठी घेतलेल्या फ्लॅटमध्ये त्या मुलांची जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून ती काळजी घेते. आसावरीबरोबरचं माझं आयुष्य सुखात चाललं आहे.” सुधाकर आसावरी वहिनींविषयी अत्यंत समरसून बोलत होता.

समोर बसलेल्या एका युवकाने विचारलं, “साहेब, तुमची कधी भांडणं होत नाहीत का?”

सुधाकर हसत हसत म्हणाला, “भांडणं नाही पण अधूनमधून वादविवाद होतात. एखादे जोडपे, ‘आमचे कधीच वादविवाद होत नाहीत’ असं म्हणत असेल तर खुशाल समजावं की ते चक्क खोटं बोलताहेत.

दोन स्वतंत्र व्यक्तिमत्वे एकत्र आली की कमी जास्त वादविवाद होणारच. कित्येक वेळा वादविवादातून चांगलंच फलित निष्पन्न होतं याबद्दल आम्हाला कधीच शंका नसते. त्यामुळं अशा वादविवादामधून आमचं नातं अधिक घट्ट होत गेलं आहे. ती अजूनही पूर्वीसारखीच साधी राहते. आसावरी ‘थाट’ राग असतो हे तिला ठाऊकच नाही. 

माझे दोनच जीवलग मित्र आहेत, एक रत्नाकर आणि दुसरा भीमाशंकर, पण लग्नानंतर मला मात्र आसावरी नांवाची एक जीवलग मैत्रिण देखील लाभलेली आहे. आणखी काय हवंय?” 

कुणीतरी म्हणाले, “सर, आसावरी रागातलं एखादे हिंदी गाणे असेल तर सांगा ना.” 

सुधाकर उत्साहाने म्हणाला, “सांगायचं कशाला? आज गाऊनच दाखवतो” आणि वहिनींच्याकडे पाहत अगदी रोमॅंटिक मूडमध्ये सुधाकरने गायला सुरूवात केली, “जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन. तू हाँ कर या ना कर……..” आसावरी वहिनींचा चेहरा लाजेने चूर झाला होता. 

गाणं संपताच बिस्मिलाखाँ साहेबांचे सनईचे सूर आसमंतात घुमत होते आणि उपस्थित मंडळी स्वच्छ चांदण्यांत प्रीतीभोजनाचा आस्वाद घेत होती. 

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आसावरी… – भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आसावरी…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सकाळीच सुधाकरचा फोन आला होता. सौ. आसावरी वहिनींच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजिलेल्या स्नेह-संमेलनाला आम्हा उभयतांना आग्रहाचं आमंत्रण होतं.

‘आसावरी’ हा शब्द मी पहिल्यांदा एका ज्युकबॉक्स सेंटरमध्ये ऐकला होता. लक्ष्मी टॉकीजच्या शेजारच्या हॉटेलात नुकताच ज्युकबॉक्स बसवलेला होता. पंचवीस पैश्यात मनपसंत गाणं ऐकायला मिळायचं. 

सुधाकरची फर्माइश एका गाण्यासाठीच असायची ती म्हणजे, ‘लो आ गयी उनकी याद, वो नही आए.’ लताजींनी गायलेल्या असंख्य सुरेल गाण्यातील दो बदन या चित्रपटातलं हे एक उत्कृष्ट गाणं आहे. आम्ही वैतागून म्हणायचो, “अरे यार, दरवेळी हे दर्दभरं गाणं काय आम्हाला ऐकायला लावतोस? एखादं उडत्या चालीचं गाणं ऐकव ना.” भीमाशंकरने तक्रार केली. मग त्यानं ‘बडी बहेन’ या जुन्या चित्रपटातलं, ‘चले जाना नही नैन मिला के’ या गाण्याची फर्माइश केली.  

भीमाशंकरच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे पाहून गल्ल्यावर बसलेला गृहस्थ बोलला,  “साहेब, तुमच्या मित्राने फर्माइश केलेली ही दोन्ही गाणी ‘आसावरी’ रागातील आणि केहरवा तालातील आहेत बरं कां. त्यांची संगीतातली जाण चांगली दिसतेय.” 

आम्ही आपलं “हो कां?” म्हणून गप्प बसलो. आमचे कानसेन मित्र सुधाकर मात्र डोळे मिटून ‘आसावरी’ रागाचा आस्वाद घेत होते. 

अभ्यासाला, सिनेमाला, फार कशाला संध्याकाळी फिरायला जाताना देखील आम्ही तिघेच असायचो. सुधाकर, मी म्हणजे रत्नाकर आणि भीमाशंकर असं आमचं त्रिकूट होतं. आमच्या त्रिकुटाला बाकीचे मित्र ‘सु-र-भी’ म्हणायचे. त्या गोष्टीला जवळपास पन्नास एक वर्ष झाली असतील.

सुधाकरच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. बाहेर गेलो की चहापाण्याचा, सिनेमाचा खर्च मी किंवा भीमाशंकरच करीत असू. “पचीस पैसे भी बडी चीज होती है बाबू” असं तो म्हणायचा.

आठवड्याच्या मंगळवार बाजारात जाऊन तो पंचवीस पैश्याला एक या भावाने जुनी इंग्रजी मासिके खरेदी करायचा. त्यातून स्वत:ची शब्दसंपदा वाढवत राहायचा अन त्यात वाचलेली छानशी माहिती आम्हाला सांगत राहायचा. रात्री आमच्याबरोबर बसून तो अभ्यास करायचा. आम्ही गाढ झोपेत असताना पहाटे पाच वाजता उठून तो पेपरलाईनवर जायचा. सायकल दामटत दीड दोनशे घरात वृत्तपत्रे टाकून साडेसात वाजता गडी परत यायचा. एक मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र स्वत:साठी ठेवायचा. 

आम्ही चेष्टेत म्हणायचो. “एक तर मराठी पेपर वाच किंवा इंग्रजी तरी वाच. बातम्या त्याच असतात ना? इंग्रजीच्या किचकट बातम्या वाचायला नकोशा वाटतात.” 

सुधाकर म्हणायचा, “लेको, आधी मराठी पेपरातल्या बातम्या वाचा. मग इंग्रजी पेपरातल्या बातम्या वाचताना किती सोप्या वाटतात ते बघा. हा मराठी पेपर घरच्यांसाठी आहे.” असं म्हणत त्याने त्याच्या दफ्तरमधून एक लांबडीशी वही काढली आणि म्हणाला, “आता मी डायरेक्ट इंग्रजी पेपर वाचतो. इंग्रजी पेपरातला कुठलाही शब्द अडला की ते संपूर्ण वाक्यच काढून या वहीत लिहायला लागलो. त्यातल्या अवघड शब्दाला अधोरेखित करून त्याचा नेमका अर्थ डिक्शनरीत पाहून बाजूला मराठीत लिहित राहिलो. 

किती मोठा संपादक असला म्हणून काय झालं, तो आपल्या सात आठशे शब्दांच्या वर्तुळातच फिरत असतो. महिन्यानंतर लक्षात आलं की संपादकांचा नवीन शब्दांचा ओघ संपलेला आहे. मग इंग्रजी पेपर सुगम मराठीसारखा होऊन गेला. आहे काय, नाही काय?” सुधाकर आम्हा दोघांच्यासाठी इंग्रजीचा ‘सुधारक’ ठरला हे आम्हा दोघांना मान्य करावंच लागेल. 

इंटरसायन्स नंतर इंजिनियरिंगसाठी म्हणून मी सांगलीला गेलो आणि भीमाशंकर मेडिकलसाठी हुबळीला गेला. आमच्या आग्रहाखातर सायन्सला अ‍ॅडमिशन घेतलेल्या सुधाकरला सायन्सचा खर्च झेपणे अवघड चालले होते. इंटरसायन्सला असतानाच तो नोकरी शोधत राहिला. लेखी परीक्षा व इंटरव्यू या दिव्यातून पार पडल्यानंतर एका प्रायव्हेट कंपनीत क्लार्क म्हणून रूजू झाला. कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेतल्याने त्याला पेपरलाईन सोडावी लागली. सकाळी कॉलेजच्या पहिल्या तीन तासांना हजेरी लावून तो कंपनीचं ऑफिस गाठायचा. 

जात्याच हुशार असल्याने सुधाकर प्रथम श्रेणी मिळवून बी. कॉम झाला. कंपनीच्या अकाउंट्स खात्यात त्याला प्रमोशनही मिळालं. दोनशे सत्तर रूपयावरून त्याचा पगार चारशेपर्यंत वाढला. 

सुट्ट्या पडल्या अन गावात आलो की सुधाकरबरोबर आमचे नेहमीप्रमाणे फिरणे असायचे. आता मात्र सुधाकर आम्हाला खिशात हात घालू द्यायचा नाही. 

सुधाकरच्या घरच्यांनी वधू संशोधन सुरू केलं. कमी शिकलेल्या मुली सांगून येत होत्या. मुलगी किमान मॅट्रिक पास झालेली तरी हवी ही सुधाकरची अपेक्षा चुकीची नव्हती.

त्याच दरम्यान आसावरी वहिनींचं स्थळ सांगून आलं. त्या चक्क पदवीधर होत्या. चहा पोह्यांच्या सर्व सोपस्कारानंतर त्यांच्याकडून होकार आला. अंतिम निर्णय घ्यायच्या अगोदर सुधाकरला परत एकदा नियोजित वधूशी बोलायचं होतं. मध्यस्थांकरवी कळवून मी आणि सुधाकर त्यांच्या घरी गेलो. 

आसावरी वहिनी आमच्या समोरच बसल्या होत्या. काही वेळ असाच गेला. मग सुधाकरनं हळूच विचारलं, “कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम् । बांधवाः कुलमिच्छंति मिष्टान्नमितरे जनाः ॥”  हा श्लोक ऐकला आहे काय?”

वहिनींनी माहीत नसल्याचं सांगितलं. 

शाळेत असताना सुधाकर संस्कृत टॉपरच होता. त्याने अर्थ सांगितला – कन्येला वराचे रूप पाहिजे असते, मातेला धन व पित्याला त्याची विद्या हवी असते; बांधव कुल पाहतात.  इतर लोकांना मात्र नुसते मिष्टान्न पाहिजे असते. बरं, मी तसा काही रूपवान नाही. धन म्हणाल तर स्वत:चं घरही नाही आणि प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. विद्या म्हणाल तर बी. कॉमच झालोय.” त्या काही बोलल्या नाहीत. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘वऱ्हाड…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘वऱ्हाड…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

लालजी शेतकरी आहे. शिकलेले नाहीत पण समजदार व्यक्ती आहेत .धार्मिक वृत्तीचे लालजी संतुष्ट व्यक्ती आहेत. बालपणापासून त्यांची एक सवय आहे. जवळपास दररोज गावातील आठ दहा मंदिरांतील कोणत्याही एका मंदिराची साफ सफाई ते जरूर करतात….. लालजींच्या चेहऱ्यावर सदा स्वस्थ आणि तरुण हास्य असे विलसत असते, जसे त्या हास्याने अमृत प्राशन केलेले आहे.

आईच्या आशिर्वादापासून बालपणापासूनच वंचित असलेल्या लालजींना वडिलांचा आशीर्वाद अजूनही प्राप्त होत आहे. बालपणापासूनच त्यांचा आवाज नाही, थोड़ी ऐकण्याची क्षमताही कमजोर आहे. परंतु पत्नी वर ते खूप प्रेम करतात. असे ही.… भावना या शब्दांच्या अधीन नसतात. लालजींना नन्हकी देवीच्या रूपात खूपच सुंदर पत्नी मिळाली आहे. बहुतकरून ज्या कुटुंबात स्त्रिया नसतात, त्या कुटुंबात आलेली नवी सून घरातील सत्ता लवकरच आपल्या हातात घेते. पण नन्हकी देवीचे वागणे  याच्या एकदम उलट होते. बहुतेक तिची इच्छा असेल, आपल्या मूक बधिर पतीच्या अधीन राहण्याची, की आपल्या पतीला असे वाटायला नको की या स्रीने मूक बधीर पुरुषाचा पतीच्या रूपात स्वीकार करुन उपकार केला आहे. संतुष्ट स्वभावाच्या लालजींना सत्ता, अधिकाराशी काही  घेणेदेणे नव्हते…… या दोघांचे आपसातील प्रेम व समर्पणाचा  भाव यात घराची सत्ता ठोकर खात लालजींच्या वडिलांजवळच पडून राहिली होती. 

लालजींना दोन मुलं झाली. जसे मोठा मुलगा मंटूने तारुण्यात पदार्पण केले, तसे लगेच त्याचे लग्न करून लालजीने घराचा कारभार मुलगा व सूनेच्या हातात देऊन टाकला. मुलंही आपल्या बापावरच गेली होती. सर्व काही छान चालले होते. लालजींचे कुटुंब आजच्या काळात एक आदर्श कुटुंब होते. मंदिरात झाडू मारणाऱ्या लालजींच्या घराची सफाई करण्याचे काम ईश्वराकडे सोपवलेले होते. लालूच, द्वेष, छळ, कपट यांसारखा कचरा लालजींच्या घराच्या आसपासही फिरकत नव्हता.

जेव्हा लालजींच्या वयस्कर वडीलांवर पक्षवाताने हलकासा आघात केला, तेव्हा त्यांना स्वतः चालण्या फिरण्याला त्रास होऊ लागला. असेही ते खूपच म्हातारे झाले होते. आता लालजींचा दिनक्रम बदलला होता. आपल्या वडिलांच्या सेवेला त्यांनी आता आपल्या दिनचर्येत प्राधान्य दिले होते. शेती मोठा मुलगा आधीपासून सांभाळत होताच. त्याचे वागणेच असे होते की लवकरच तो मंटू ऐवजी “मंटू भाऊ” झाला होता. 

छोटा मुलगा बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होता. त्याच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने आपापल्या हिश्श्याचा त्याग केला होता. भावाने आपला घाम दिला तर वहिनीने आपले दागिने मोडले. नन्हकी देवीने आयुष्यभराचे सारे आशिर्वाद एकत्र करून लहान मुलावर ओवाळून टाकले होते. लालजी काय देऊ शकतील, नेहमीप्रमाणे मंदिरा-मंदिरांत जायचे आणि आता देवांकडे काही वेळ बघतच रहायचे. मुक्या तोंडाने काय बोलणार….? पण म्हणतात ना !! आज मिळेल किंवा कदाचित उद्या मिळेल, पण प्रत्येक पूजेचे फळ जरूर मिळेल.

देवांनी या मुक्या तोंडाच्या आवाजाचा मान राखला. हेमंत उर्फ हेमूने सरकारी इंजीनियरची नोकरी मिळवण्यात यश प्राप्त केले. मंटूभाऊची छाती अजून फुगली. लालजींचे संतुष्ट हास्य अजून विस्तारले. 

आता छोट्या भावाला लवकरात लवकर विवाहबंधनात अडकवावे अशी मंटू सिंगची इच्छा होती. बोली लावली जावू लागली. अचानक मंटू सिंगचे खूप सारे दोस्त, नातेवाईक पैदा झाले. लालजीच्या क्षमतेला तोलले जावू लागले. 

वहिनीने एक फोटो बघून मुलीला बघण्याची इच्छा व्यक्त केली. दोन्ही कुटुंबे भेटली. नन्हकी देवी ला मुलीचे काही शोधणारे, भिरभिरणारे डोळे आवडले. वहिनीचे मन  इतक्या शिकल्या सवरलेल्या मुलीने तिला वाकून पाया पडून नमस्कार करण्याने जिंकून घेतले. मुलीला तिचे नाव विचारले गेले, मुलगी काही बोलू शकली नाही. शोधक नजरेने लालजींकडे बघत राहिली. ‌अगदी तसेच…. जसे लालजी मंदिरातील मूर्तींना बघत रहात होते. त्रासाने त्रासाला ओळखले. लालजी जीवनात पहिल्यांदा बोटाने इशारा करत “आँ आँ” म्हणत ओरडत काही मागत होते – ” हीच सून पाहिजे !!! हीच पाहिजे !!!”

आणि अचानक तेथे खूपच गुढ शांतता पसरली. मुलगी आपल्या वाहत्या डोळ्यांनी, शोधक नजरेने लालजींना एकटक बघत होती. लालजी कधी मंटू तर कधी हेमूकडे खूपच विवश व लालूच भरल्या नजरेने  एकटक बघत होते. दोन्ही बाजूंचे कुटुंबीय हेमंतकडे बघत होते. 

हेमंत हातवारे करत म्हणाला – ” मी काय …..माझा आवाका तरी काय?? त्यांची मागणी प्रत्यक्ष इंद्रानेही नाकारली, तर मी त्याच्याशी भिडेन !!! ते वडिल आहेत माझे !! पण एकदा मुलीला तर विचारा.” 

मुलीला इशारे करून विचारण्यात आले तर ती उठून पुढे आली आणि तिने लालजींचे पाय पकडले. लालजींनी दोन्ही हात तिच्या डोक्यावर ठेवले. गूढ शांततेला एक आनंदी चित्कार भेदून गेला. 

सर्वच्या सर्व अति उत्साहात होते. मुलीच्या शोधक नजरेत आता संतुष्टीचा भाव होता. शोध पूर्ण झाला. डोळ्यांतील अश्रूंची धार वाहू लागली.  रितीरिवाजाप्रमाणे हुंडा देण्याघेण्याचा विषय निघाला. मुलीच्या दोन्ही भावांनी मंटू सिंहच्या समोर हात जोडले – ” तुम्ही काहीच मागू नका. वडील खूप संपत्ती मागे सोडून गेले आहेत. आम्ही तुमच्या अपेक्षेच्या चारपट देवू. यासाठी नाही की तुम्ही आमच्या मुकबधीर बहिणीला स्विकारले !!! यासाठीही नाही की तुमचा भाऊ सरकारी इंजीनियर आहे !! पण यासाठी की असे कुटुंब आम्ही न बघितले….न ऐकले आहे‌.” 

वरातीची तयारी जोरात सुरू होती. मंटू भाऊ आपल्या लग्नात ज्या इच्छा अपूऱ्या राहिल्या होत्या त्या भावाच्या लग्नात पूर्ण करू पहात होता त्यामुळे खूपच व्यस्त होता.  पण एक दिवस हेमू घरातील सर्वांसमोर मोठ्या आवाजात आपल्या मोठ्या भावाला बोलला– ” दादा !!! प्रत्येक गोष्टीत तुमची दादागिरी नाही चालणार.”

सर्वांना एकदम धक्का बसला. मंटू जेथे होता तेथेच थांबला. हेमू पहिल्यांदाच आपल्या मोठ्या भावाशी मोठ्या आवाजात बोलला होता.

मंटूने हबकून विचारले- ” वेडा झालास का?? काय बोलत आहेस ?” 

भावाच्या दटावण्याने आतल्या आत थरकापला हेमंत. पण पुन्हा हिम्मत करुन बोलला – ” वेडा नाही आहे दादा !!! लग्न माझे आहे, माझ्याही काही इच्छा आहेत.” 

” काय हवे आहे तुला ? ” 

” नवरीसाठी जे पण दागिने बनवत आहात, ते भले थोडे कमी बनवा…. पण प्रत्येक दागिन्यांचे दोन सेट बनवा…. एक तिला आणि एक वहिनीसाठी पण !! ” – हेमंत आपल्या वहिनीच्या सुन्या गळ्याकडे पहात बोलला.

मुलाचं बोलणं ऐकून  नन्हकी देवीचे मन गर्वाने प्रफुल्लित झाले. वहिनी भावूक झाली. मंटू बडबडत , मानेला झटका देत तेथून निघून गेला – ” वेडा कुठला.”

हेमंत व्हाट्सएप वर आपल्या होणाऱ्या नवरीला मेसेज टाइप करु लागला – ” तुझी इच्छा पूर्ण झाली.”  इंजीनियरने एकदाचे तोंड उघडले आणि ते बंदच करू शकला नाही. 

” हेमूसाठी फॉर्च्यूनर ठरवून दिली आहे, पप्पांसाठी बोलेरो केली आहे,” – मंटू सिंह घरात सांगत होता.

” पप्पांसाठी पण फॉर्च्यूनरच ठरवा दादा ” – हेमंतने आपली इच्छा जाहीर केली.

” का?? “

” ते वडील आहेत माझे ” – हेमंत गर्वाने बोलला.

” बाबा आणि पप्पांसाठी धोतर आणि शर्ट शिवायला दिला आहे.” 

” माझ्या आणि तुमच्यासाठी ?? “

” कोट पॅंट चे माप दिले आहे ना !! “

” पप्पांसाठी पण कोट पॅंट घ्या ना दादा ” – हेमंत मोठ्या भावाची मनधरणी करत बोलला.

” वेडा आहेस का?? ” 

” वडील आहेत ते माझे !!” – इंजीनियर गर्वाने बोलला.

नन्हकी देवीने डोक्याला हात लावला, म्हातारपणी बापाला कोट पॅंट घालायला लावणार?? वहिनी हसत राहिली, पण मंटू सिंह ‘हो’ म्हणत घरातून गेला.

सर्व तयारी झाली होती. आजोबा प्रकृतीमुळे लग्नाला जायला असमर्थ होते. त्यांची काळजी घ्यायला एक माणूस घरी ठेवला होता. लालजी कोट पॅंट घालून मुलाच्या लग्नात मिरवतील हा साऱ्या गावात चर्चेचा विषय होता.  व-हाड निघायची वेळ झाली. सर्व लोक व्यवस्थित गाडीत बसले की नाही हे बघण्यासाठी मंटू स्वतः गाडीमध्ये बघत फिरत होता. त्याला पप्पा कुठे दिसत नव्हते. दोन चार लोकांना विचारले – कुणालाच काही माहित नव्हते. सर्व लोक कुजबुज करू लागले. सगळे व-हाडी घाबरून एक दूसऱ्याला विचारू लागले. लालजींना शोधू लागले. 

अचानक काहींची नजर घराकडे वळली. बघून सर्वांना आश्चर्य वाटले. सगळे आपल्या आसपासच्या लोकांना इशारा करत घराकडे बघायला सांगू लागले. सर्व व-हाडी डोळे फाडून घराकडे बघत होते. मंटू सिंह ने घराकडे बघितले आणि डोके धरून खालीच बसला.—

—  घरातून लालजी निघाले. आपल्या खांद्यावर आपल्या वृद्ध बापाचा हात ठेवत, त्यांना सांभाळत, अडखळत ते गाड़ीकडे येत होते. स्वतः साठी शिवलेला कोट पॅन्ट आपल्या म्हाताऱ्या वडिलांना घालून त्यांच्यासाठी घेतलेले धोतर कुडता त्यांनी स्वतः घातला होता !!!  नजर वर करत गावकऱ्यांकडे बघत, ते म्हणत होते – ” हे वडील आहेत माझे !!!”

मंटू सिंहने पळत जात आजोबांच्या दुसऱ्या खांद्याला आधार दिला.

हिंदी लेखक – अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दोघी… – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ त्या दोघी… – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पाहिले – एवढ्यात बाहेर गेलेला अभय आला. त्या दोघीना बघून खुश झाला. सुलभा किती वर्षांनी अभयला पाहत होती. मागे कधी यायची तेव्हा तो क्लबमध्ये गेलेला असायचा.) ‘‘खूप धक्का बसला ना तुला? आठ दिवस बेशुध्द होतीस अस समजलं’’ अभय म्हणाला. ‘‘धक्का बसणारचं, आमची मैत्री होती तशीच ! कोल्हापूरात असताना सतत दोघी बरोबर असायचो. वर्गात शिक्षक ‘‘त्या दोघी’’ कुठे गेल्या असे विचारायचे.’

‘‘खरंच अशी मैत्री विरळाच आजकाल’’ अभय म्हणाला.

‘‘स्मितू गेली म्हणजे माझ्या शरीराचा अर्धा भाग लुळा पडला असच मला वाटतं. त्या शेवटच्या दिवशी ती माझ्याकडे आली होती. मला कल्पना न देता. तणावाखाली होती. खूप दिवसांनी मी तिच्या केसांना तेल लावलं. केस विंचरुन दिले. मग तिने गरम पाण्याची आंघोळ केली. आम्ही जेवलो आणि मी तिला थोपटून थोपटून झोपवलं. कोल्हापूरात असताना झोपवायची तशी. सुलभा जुन्या आठवणीत रमली.

‘‘तिच्या सर्व विमा पॉलिसीज, म्युच्युअल फंड, शेअर्स ही सर्व गुंतवणूक किती आहे ? तसेच नॉमिनीवगैरे बरोबर आहे ना याची तिने खात्री करुन घेतली. तिच्या पॉलिसीज बघून मी तिला म्हटलं – अग हे पैसे तुला नाही, तुझ्या वारसांना मिळणार। मला काय कल्पना त्या पॉलिसीज एवढ्यात ड्यू होतील. अभय, तेजू स्मितू गेली पण तुम्हाला कोट्याधिश बनवून गेली. या तुमच्या पॉलिसीज, फंड डिटेल्स, शेअर्स तुमच्या ताब्यात घ्या आणि मला मोकळं करा. एवढ्यासाठीच मी आले होते.

तेजश्री – मावशी खरं आम्हाला नको हे पैसे, आईच्या बँकेतून मिळणारा फंड खूप झाला आमच्यासाठी, आम्ही पैसे मिळवू. एवढे दिवस ऐतखाऊ सारखं जगलो आता स्वाभिमानाने जगू.’

अभय – जो पर्यंत ती व्यक्ती आजूबाजूला असते, तो पर्यंत तिची किंमत नसते. स्मिता गेली तेव्हा लक्षात आलं, आम्ही खर्‍या अर्थाने अनाथ झालो. आम्ही तिला गृहित धरले. ती नोकरी करणार, घरातले सामान आणणार, जेवण बनवणार, कपडे ईस्त्रीला पाठवणार, गुंतवणूक करणार. सुलभा हे सर्व आम्हाला नकोच. स्मिता म्हणत होती कोल्हापूरातल्या शाळेची इमारत पडायला आलीय. त्यासाठी पैसे जमवणं सुरु आहे. हे पैसे त्यासाठी वापरुया.

सुलभा – कोल्हापूरच्या शाळेसाठी पैसे जमवणे सुरु आहे हे खरे, पण ती जबाबदारी दोन हजार माजी विद्यार्थ्यांनी घेतलीय. त्यात पाहिजे तर या पैशातील पाच लाख देऊया. पण बाकी पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील. कारण तिची तशी इच्छा होती.

तेजश्री – मावशी आई गेल्यानंतर मामा-मामी आले होते. खूप रडला गं श्यामू मामा. त्याची लाडकी ताई ना गं ती! मावशी, मामाचे कोल्हापूरातील घर तीन-चार पिढ्यांचे जुने. मी मागे पाहिले तेव्हा फार जीर्ण झाले होते. आईची इच्छा होती मामाला घर बांधून द्यायचं. त्याची घर बांधण्याची परिस्थिती नाही. मला वाटते की, आईच्याच पैशातून मामाला घर बांधून देऊ. मजबूत, पुढिल तीन पिढ्यांनी काळजी करता कामा नये असे मजबूत.

सुलभा – स्मितू माझ्याशीपण हे बोलली होती. खरंच चांगली कल्पना आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या आईवडिलांना, भावांना मदत करायलाच हवी. तुझ्या श्यामू मामाला गरज आहे. मला वाटतं यातून पन्नास लाख रुपयात ते घर बांधता येईल. आणि वर दोन ब्लॉक्स बांधले तर त्याचे भाडे मामाला मिळेल.

तेजश्री – पण मावशी या सर्व पैशांच्या देवीघेवी तुलाच करायला हव्यात. तुला एकदम यातून मोकळं होता येणार नाही. आम्ही फक्त सह्या करायला येणार.

सुलभा – हो, ग हो. माझं पिल्लू ते! तुला सोडून कशी जाईन मी ?

अभय – सुलभा, तुझ्या मनात एक विचारायचं असेल तेजूचं लग्न ? ते तुला तेजूच सांगेल. तेजश्री – मावशी आईची बँकेत मैत्रीण होती कल्पना, आईची इच्छा होती कल्पनाचा मुलगा विराज याच्याशी माझं लग्न व्हाव, तो चांगला सीए आहे. आणि वडिलांच्या फर्ममध्ये काम करतोय. पण माझ्या डोक्यात खुळ भरलं होतं. मी वेळीच सावरले पण आईच्या अपघाताचे मोल देऊन. विराजशी लग्न ठरते आहे माझे. तेजश्री रडत रडत सांगत होती.

सुलभा – रडू नकोस तेजू, ती असताना हे सर्व झाले असते तर ती समाधानी झाली असती. तिच्या डोक्यातील वादळे कमी झाली असती. पण….

अभय – आणि सुलभा लग्न फक्त वीस पंचवीस जवळच्या लोकांमध्येच आणि ते पण सहा महिन्यानंतर लग्न करायचं आहे. तो पर्यंत आम्हाला पण सावरु दे. आणि कन्यादान तुला आणि राजनला करायचं आहे. नाही म्हणून नकोस. स्मिताला असेल तिथून समाधान वाटेल.

‘‘ठिक आहे’’ सुलभा डोळे पुसत म्हणाली. मी आले होते तुमचे सर्व व्यवहार तुमच्या हाती देऊन त्यातून मोकळी होण्यासाठी पण तुम्ही दोघांनी मला पुन्हा अडकवलंत याच्यात. पण तिच्यासाठी हे मला करावचं लागेल. कारण आमची जोडी होतीच तशी..

 – समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print