सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ रिसायकल- बिनमध्ये मल्लिका… भाग १ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
माझा बडोद्याला जाण्याचा कार्यक्रम काही पूर्वनियोजित नव्हता. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी ऑफिसात पोचलो, एवढ्यात विभाग प्रबंधकांनी मला बोलावलं आणि सांगितलं, की एका व्हिजिलन्स- केसचे कागदपत्र आणण्यासाठी मला तत्काल बडोद्याला जायला हवं. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. त्याचबरोबर आतल्या आत गुदगुल्याही होऊ लागल्या. गुदगुल्या अशासाठी की मल्लिकाची अनायासेच भेट होईल आणि चकित अशासाठी झालो की तिची भेट एवढ्या अवकर होऊ शकेल, ही गोष्ट माझ्या स्वप्नातदेखील आली नव्हती. हे म्हणजे, एखाद्या तृषार्त झाडावर अनपेक्षितपणे पाऊस पडावा, तसं घडलं होतं. मल्लिकेची आठवण तर खूप होत होती, पण कशा तर्हे्ने पुढे बोलणं करावं, हे काही कळत नव्हतं. कदाचित मल्लिकेचीही इच्छा असेल की पुढाकार माझ्याकडून घेतला जावा. असं अर्थात् माझं अनुमान. तिने सहजपणे, ‘डायव्हर्स मंजूर झाला’, एवढंच बोलून इतिश्री केली होती.
आई तर जशी काही संधीच्या शोधात होती. तिने सगळं ऐकताच, माझ्या मागेच लागली. मी बडोद्याला जाऊन मल्लिकाशी स्वत:च बोलायला पाहिजे. म्हणाली, ‘अरे, तिने जर घटस्फोटाची बातमी आपणहून तुला सांगितली, तर त्याचा अर्थ असा की तिने चेंडू तुझ्या पारड्यात टाकलाय. आता पुढाकार तू घेतला पाहिजेस.’
‘अग आई, पण तू समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीयेस? ती घटस्फोटीत जरूर आहे, पण दिसायला इतकी सुंदर आहे की तिच्याशी लग्न करायला कुणी करोडपतीही सहज तयार होईल.’
‘पण असं जर असतं, तर ती तुझ्याशी वारंवार का बोलत राहिली असती? तुला माहीत आहे, अनेकदा ती लॅंडलाईनवरून विथीशीही बोलली आहे.’
मल्लिकाची आणि माझी ओळख सुमारे पाच वर्षांपूर्वी बडोद्यातच झाली. तिथे आमची झोनल लेव्हलवरची कॉन्फरन्स होती. जेवणाच्या सुट्टीत किती तरी अधिकारी मल्लिकाला गराडा घालून उभे होते. कुणी कुणी तर मधे घुसून तिचं अभिनंदन करत होते. चालू वर्षाच्या दुसर्या तिमाहीत मल्लिकाचा परफॉर्मन्स आमच्या वेस्टर्न झोनमधे सर्वात उत्कृष्ट झाला होता. त्यामुळे तिला प्रथम पुरस्कार देऊन तिचे कौतुक केले गेले होते. मला तिसरा पुरस्कार होता, त्यामुळे कॉन्फरन्समधे मीही निमंत्रित होतो. या तिमाहीत बर्यातचशा शाखा मायनस राहिल्या होत्या. आशा परिस्थितीत मल्लिकाने चाळीस टक्के वाढ केली होती. मी साधारणपणे बारा टक्के वाढ केली होती. त्यासाठी मला दिवस–रात्र एक करावा लागला होता.
‘कमेंडेबल परफॉरमन्स इनडीड’ झोनल मॅनेजरने पुरस्कार प्रदान करताना मल्लिकाला म्हंटलं होतं. मल्लिका याच वर्षी सेंट्रल झोनमधून ट्रान्सफर होऊन आली होती आणि मी तिला आज प्रथमच पहात होतो. नुसताच पहात नव्हतो, तर चांगलाच प्रभावितही झालो होतो. अतिशय सुरेख होती मल्लिका. इतकी सुंदर की जो बघेल, तो बाकी सगळं विसरून बघतच राहील तिच्याकडे. मनात विचार आला, इतकी सुंदर स्त्री ज्या क्षेत्रात जाईल, त्या क्षेत्रात यशस्वी होणारच. मल्लिका स्वत: हात पुढे करत करत इतरांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत होती. हे सगळं पहात असताना माझ्या मनात सहजच विचार येऊन गेला की काही लोक केवळ स्पर्शसुख मिळवण्यासाठी मल्लिकाशी हस्तांदोलन करत आहेत. अर्थात तसं असलं, तरी मला काय त्याचं? ते तर तिला स्वत:लाच समजायला हवं. बायका तर असल्या गोष्टींच्या बाबतीत अधीकच संवेदनाशील असतात. आता ती स्वत:च आपला स्लीव्ह-लेस हात पुढे करते आहे, तर मला का जळफळायला व्हावं? मी स्वत:च स्वत:ला समजावलं आणि मल्लिकापासून थोडी दूरची जागा घेतली. थोड्याच वेळात मला जाणवलं की मल्लिकाची नजर माझाच वेध घेत माझ्यापर्यंत पोचली आहे. गुळाभोवती माशा गुणगुणायला वेळ लागला नाही. आता मल्लिका माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे. मी काही करणार, इतक्यात मल्लिका स्वत:च माझ्यापाशी पोचली आणि हात पुढे करत म्हणाली, ‘आपण बलदेवजी आहात नं?’
‘हो. आपण चाळीस टक्के व्यवसाय वाढवलात, त्याबद्दल आपले अभिनंदन. आपल्याभोवती इतकी गर्दी होती की मी विचार केला, सगळ्यांचं भेटून झाल्यावर आपण नंबर लावावा.’ मी एक अनावश्यक खोटं जोडून दिलं.
‘आपल्याला नंबर लावायची काही गरज नाही. मी स्वत:च आपल्याला भेटू इच्छित होते. मी या झोनमध्ये नवी आहे. आल्यानंतर गेल्या दोन वर्षातली बिझनेस स्टेटमेंटस बघितली. गेली दोन वर्षे आपण आपल्या झोनमध्ये नंबर वन आहात. मी स्वत: आपल्याकडून जाणून घेऊ इच्छित होते की हा चमत्कार आपण कसा केलात? माझी परिस्थिती तर दुसर्याप क्वार्टरमधेच पातळ झालीय.’
‘आपल्याला पाहून काही तसं वाटत नाही आणि जर खरोखरच तसं असेल, तर मी म्हणेन, देव करो आणि अशी स्थिती प्रत्येकाच्या नशिबी येवो.’
‘स्तुती करणं ही एक कला आहे आणि महाशय आपल्याला ती चांगलीच अवगत आहे. ठीक आहे. आपण कुठे उतरला आहात?
‘हॉटेल ग्रीन-व्हॅली. ३०४ नंबर. आणि आपण?
‘मी पण तिथेच उतरले आहे. ४०७ मध्ये. खरं तर माझी धाकटी बहीण इथे बडोद्यातच रहाते. मेहुणे एस.बी.आय. मधे आहेत. पण मी त्यांच्या घरी जाण्यापेक्षा हॉटेलमध्ये रहाणं प्रीफर केलं. बडोद्यात ट्रान्सफर मिळावी, अशी इच्छा होती पण त्यांनी मला भाडोच दिलं. भोपाळमध्ये तशीही चार वर्षं झाली होती. बदली होणारच होती.’
‘ठीक आहे. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन! उद्या प्लॅनिंग मिटिंगच्या वेळी भेट होईलच. ‘
क्रमश:…
मूळ हिंदी कथा – ‘रिसायकल-बिन में मल्लिका’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈