☆ अरूंद वाट प्रेमाची… भाग 3 (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पाहिले- मधुलिकाने खोलीत जाऊन ‘मोहिनी’कडे बघितलं, तेव्हा ती चकीतच झाली आणि तिच्या गळ्यातून सहाजोद्गार बाहेर पडले, ‘वा: काय सौंदर्य आहे. जो कुणी एकदा हिला बघेल, आपलं सारं राज्य तिच्यावर उधळून देईल.’ असं बोलता बोलता तिने आपल्या गळ्यातली मोत्यांची सुंदर माळ काढली आणि मोहिनीच्या गळ्यात घातली. अन्य स्त्री-रूपावर मोहित होऊन तिचा गौरव स्त्रीनेच करावा, अशी ही पहिलीच वेळ असेल आणि इथे तर गौरव करणारी खुद्द मधुलिकाच होती. आता इथून पुढे )
त्या दिवसात ‘मोहिनी’च्या पॅकिंगची तयारी चालू होती. एक दिवस पुन्हा एकदा मधु बिछान्यावर नाही असं पाहून मधुलिका ‘मोहिनी’च्या खोलीत गेली आणि तिथलं दृश्य पाहून ती हैराणच झाली. मधुने ‘मोहिनी’ला आपल्या बाहुपाशात घेतलं होतं आणि तो तिच्या गळ्यातील मोत्याच्या माळेशी खेळत होता. मधुलिकाने आपल्या मनाला समजावले की तो कदाचित माळेतील मोती सारखे करत असेल. नीट करत असेल आणि एवढ्यात तिला दिसलं की मधुने आपला उजवा हात ‘मोहिनी’च्या वक्षस्थळावर ठेवलाय आणि ओठ ‘‘मोहिनी’च्या ओठांवर. मधुलिकाच्या देहावर जणू काही एका वेळी शेकडो झुरळे सरपटू लागली. ती गुपचुप आपल्या बिछान्यावर परत आली.
दुसर्या दिवशी मधुलिका स्वत: बाजारात गेली आणि पॅकिंगसाठी आवश्यक ते सगळं साहित्य घेऊन आली. जितक्या लवकर शक्य असेल, तितक्या लवकर पॅक करून ‘मोहिनी’ ला बाजूला ठेवण्याचा तिचा विचार होता. रात्री ती पुन्हा मधुची बिछान्यावर वाट पाहू लागली. मध्यरात्र सरली पण मधु आला नाही. मधुलिका तडफडली आणि उठून ‘मोहिनी’च्या खोलीत गेली. ‘मोहिनी’च्या खोलीचा दरवाजा अनपेक्षितपणे बंद होता. मधुलिकाने हळूच एक दार उघडलं आणि आत नजर टाकली. आतील दृश्य कल्पनेपलिकचं होतं. तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. मधुने ‘मोहिनी’ला मिठीत घेतलं होतं आणि तो वेड्यासारखी तिची चुंबने घेत होता. तिच्या अंग-प्रत्यंगांशी खेळत होता. मधुलिकाला जसा काही अनेक विंचवांनी डंख मारला. ती आपली शुद्ध घालवून बसली. तिने धडकन दरवाजा उघडला नि ती आत घुसली. मग तिने झपाट्याने पूर्ण ताकद लावून ‘मोहिनी’ला मधुपासून दूर केलं आणि खोलीत असलेल्या मोठ्या पॅकिंग बॉक्समध्ये फेकून दिलं. क्रोध आणि मत्सर यामुळे तिच्या डोळ्यातून ठिणग्या बरसत होत्या. तिने मधुचं मनगट घट्ट पकडलं आणि त्याला जवळ जवळ ओढतच बेड-रूममध्ये घेऊन आली. म्हणाली-
इथे रात्र रात्र मी तुझी वाट बघत बिछ्न्यावर तळमळत असते आणि तू त्या मातीच्या मूर्तीला उराशी धरून रात्र घालवतोस. लाज नाही वाटत तुला? वेडा झालयास का तू? तू असं काय तिच्यात पाहिलंस, जे माझ्यात नाही? … आज एक महिना होऊन गेला, तू मला.. ‘
‘मी अजूनही तुझ्यावरच प्रेम करतो मधुलिका, अगदी सुरुवातीच्या दिवसात करत होतो, तितकंच…’ असं म्हणत म्हणत मधुने मधुलिकाला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला.
‘नाही. आज-काल तू माझ्याऐवजी मूर्तीवर अधीक प्रेम करू लागला आहेस.’
‘ती मूर्ती आता तुटून गेलीय मधुलिका. किती परिश्रमाने आणि प्रेमाने बनवली होती ती मूर्ती मी…. आणि तूसुद्धा … प्रदर्शनात आपल्याला पुरस्कार मिळेल म्हणून… ‘
‘मष्णात जाऊ दे ते प्रदर्शन…. आणि त्यातले पुरस्कार. आता तुझ्या-माझ्यामध्ये भिंत होऊन रहाणारी असली मूर्ती पुन्हा या घरात कधीही बनणार नाही.’ मधुलिका एखाद्या सिंहिणीसारखी चवताळून म्हणाली.
‘जरा विचार कर मधु! अग वेडे, आपल्या दोघांमधे ही मातीची मूर्तीसुद्धा तू सहन करू शकली नाहीस, मग कुणा स्त्रीला कशी सहन करशील? इतकं सोपं नसतं ग सगळं काही. आपले कबीरजी म्हणतात ना, ‘प्रेम गली अति सांकरी, जा में दो ना समाए.’ अग, प्रेमाची ही वाट इतकी अरुंद आहे, तिच्यावरून मी एकीसोबत, तुझ्या एकटीच्या सोबतच चालू शकतो. तिथे दुसरीला जागाच नाही मुळी. तुला हे समजावं, म्हणून तर हे सारं नाटक रचलं मी.’ आणि मधुने मधुलिकाला आपल्या मिठीत घेतलं. आता मधुलिकाने विरोध केला नाही.
बाहेर पाऊस कोसळत होता. आतमध्ये मधुलिकाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या. मधु त्यात किती तरी वेळपर्यंत भिजत राहिला. दोघांमध्ये कोणतंच शून्य आता बाकी उरलं नव्हतं.
समाप्त
मूळ हिंदी कथा – ‘गली अति सॉँकरी’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ अरूंद वाट प्रेमाची… भाग २(भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिले – ‘कोणत्या पोझमध्ये युवतीने उभं राह्यला हवं होतं?’ मधुचा हा प्रश्न, मधुलिकासाठी प्रश्न नसून एक प्रकारे आव्हानच होतं तिला. आता इथून पुढे -)
‘या पोझमध्ये …’ असं म्हणत, काही अंतरावर मधुलिका एक जीवंत कलाकृती होऊन झटकन उभी राहिली. डोळे अर्धवट मिटलेले. पापण्या, भुवया, हनुवटी, हाताचा सगळा दृश्यभाग, पायांची बोटे, पिंढरीपर्यंतचा सगळा भाग पांढर्या-करड्या मातीने माखलेला. मधु विस्मित होऊन बघत राहिला. त्याला वाटलं, मेनकेने उर्वशीला, स्वत:चा सगळा साज-श्रुंगार सोपवून स्वत: आपल्या हाताने तिला सजवलीय आणि खजुराहोच्या अप्रतिम शिल्प-सुंदरींच्या मध्ये आणून उभी केलीय. त्याने आत्तापर्यंत बनवलेल्या सगळ्या मूर्ती त्याला व्यर्थ वाटू लागल्या. त्याची दृष्टी तिचं एकेक अंग सावकाशीने न्याहाळू लागली, त्याचवेळी तिचा पदर आपल्या जागेवरून जरा सरकत मधुला जसं काही निमंत्रण देऊ लागला. तो सहजच पुढे आला आणि मधुलिकाच्या अगदी जवळ पोचला. मधुलिकाने आपले डोळे मिटले. मधुने मधुलिकाच्या नाभी-सरोवराला आपल्या उजव्या हाताच्या तर्जनीने स्पर्श केला. तिथली ओली माती काढली आणि आंगठ्यावर घेऊन मधुलिकेची भांग भरली. मधुलिकाचे ओठ कापले. मधुने आपल्या ओठांनी त्याला स्पर्श करत तिला आश्वस्त केले. वास्तविक मधुलिकाच्या मातीने माखलेल्या देहाचा, ओठ हा एवढा एकच हिस्सा असा होता, जो राखेमध्ये पेटलेल्या निखार्यासारखा भासत होता. मधुलिकाने त्या क्षणी आपलं सारं शरीर मधुच्या बाहूत झोकून दिलं. मगनभाई या दरम्यान केव्हा तरी आले. त्यांनी निर्जीव मूर्तींमध्ये गरम श्वास भरणार्या युगलमूर्तीला पहिलं, तेव्हा ते गुपचुप निघून गेले.
मधूने बनवलेल्या मूर्ती आता शिल्प आणि सौंदर्याची नवनवीन परिमाणं प्रस्थापित करू लागल्या. त्याची कीर्ती वाढली, तसाच त्याला पैसाही चांगला मिळू लागला. मूर्ती चांगल्या किमतीत विकल्या जाऊ लागल्या. आता तो, गणपती, सरस्वती, दुर्गा, काली यासारख्या उत्सवी मूर्तींकडे कमी लक्ष देऊ लागला कारण त्याच्याकडच्या कलात्मक मूर्तींना अधिकाधिक मागणी येऊ लागली. चांगल्यापैकी पैसा खर्च करून त्याने आपल्या वडीलोपार्जित घराचे नूतनीकरण केले. घरात दोन दोन दुचाकी वाहनांबरोबरच एक कारदेखील आली. मधुलिका आता कारखान्यात क्वचितच कधी येऊ शकत होती. तिच्याकडे मधूच्या संसाराबरोबरच मधूने बनवलेल्या मूर्तींची प्रदर्शने भरवणे, जाहिराती, चर्चा, विक्री या सार्याची जबाबदारीदेखील होती.
त्यांच्या विवाहाला आता सात वर्षे झाली होती, पण दोघांच्यातील प्रेम, अनुराग पाहून असं वाटत होतं की दोघांचा जसा काही कालच विवाह झालाय. मधूला कारखान्यातून यायला कधी उशीर झालाच, तर मधुलिका फोन करकरून त्याला नुसती हैराण करायची. आणि मधु… त्याच्या प्रत्येक कलाकृतीत कुठल्या ना कुठल्या कोनातून मधुलिकाच झळकायची.
‘मधुजी, आपण बनवलेल्या कलाकृती इतक्या जीवंत कशा दिसतात?’
‘नुसत्या दिसतातच नाही, तर त्या धडकतातसुद्धा श्रीमान! आपण कान लावून पहा. आपल्याला माझ्या कलाकृतीचं धडधडणं स्पष्ट ऐकू येईल.’
‘ कुणाच्या हृदयाची ही धडधड आहे, जी आपल्या कलाकृतीत धडधडते?’
‘हिची… ही मधुलिका. माझं जीवन, माझी प्रेमिका, माझी प्रेरणा, पत्नी… माझं सगळं काही….’ आणि मधूने शेकडो प्रेक्षकांसमोर मधुलिकाच्या गळ्यात हात टाकून तिला जवळ ओढले.
मधु आणि मधुलिकाचे दिवस, महीने, वर्षे पंख लावून प्रणयाकाशामध्ये मुक्त विहार करत होते, पण एक दिवस असा आला की समोर एक शून्य येऊन उभं राहिलं. ते वेळी-अवेळी दोघांमध्ये प्रगाढ मौनाचं रूप धरण करू लागलं. दिवसेंदिवस बिछान्याकडे जाताना विस्तारत जाणार्या या मौनाला तोडण्याचा प्रयत्न करत एक दिवस मधुलिका म्हणाली,
‘माझे सगळे रिपोर्टस आले आहेत. म्हणून म्हणते, तुम्ही दुसरं लग्नं करा…. आपल्याला मूल मिळेल.’
‘आपल्याला?’
‘हो. तुझं मूल माझंही असेलच.’
‘आणखीही दुसरा एखादा मार्ग असू शकतो. एखादं मूल अॅडॉप्ट करू या.’
‘नाही. माझी अशी इच्छा आहे की तुझ्या रक्ताचं असं मूल जन्माला यावं, की जे पुढच्या काळात जगातला एकमेवद्वितीय कलाकार असेल.’
‘तुला सहन होईल माझं दुसरं लग्नं?’
‘हो. एका कलाकाराच्या जन्माच्या तीव्र इच्छेसाठी मी काहीही सहन करीन!’
मधुच्या मनात आलं की तिला सांगावं, ‘नाही. तू नाही सहन करू शकणार!’ पण तो काहीच बोलला नाही. तो म्हणाला, ‘ठीक आहे. हे अखिल भारतीय प्रदर्शन होऊन जाऊ दे. मग कुणाला तरी पकडून आणीन या घरात. किंवा तू स्वत:च निवडून आण आपली सवत.’
अखिल भारतीय मूर्तीकला प्रदर्शनाला अद्याप दोन महीने अवकाश होता. त्याच्या तयारीसाठी मधु दिवस-रात्र एक करत होता. त्याने एक मानवी आकाराची स्त्री-मूर्ती घडवायला सुरुवात केली. तिला पृष्ठभाग नव्हता. दोन्हीकडे चेहराच होता. कुठूनही बघितलं, तरी ती सुंदर दिसायची. हळू हळू मूर्तीचं अद्भुत सौंदर्य झळकू लागलं. टायटल मधुलिकानंच दिलं, ‘मोहिनी’. प्रदर्शनाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला, तसतशी मधुची व्यग्रता वाढली. तिचं रंग-रूप, साज-शृंगार यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, म्हणून मधुने मूर्ती कारखान्यातून आणून घरीच एका खोलीत ठेवली.
एका रात्री मधुची वाट बघता बघता मधुलिकाला डुलकी लागली. झोप उघडली, तेव्हा तिने पहिलं, रात्रीचे दोन वाजलेत. मधु बिछान्यावर नाही असं पाहून, मधुलिका ‘मोहिनी’ला ठेवलेल्या खोलीकडे वळली. मधु नाकाचं नक्षीकाम करत कधी एका ब्रशने, तर कधी दुसर्या ब्रशने रंग भरत होता. त्या रात्रीनंतर तर जसं काही रूटीनच झालं. मधू रात्रीचा बराचसा वेळ मोहिनीच्या खोलीत काढू लागला. मधुलिकालाही रात्री मधु जवळ नसण्याची सवय होऊ लागली. खरं तर अखिल भारतीय मूर्तीकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी मधुलिकानेच मधुला भाग पाडलं होतं.
‘मोहिनी’ जवळ जवळ पूर्ण झाली होती. मधुने त्या दिवशी मधुलिकाला म्हंटलं,’ तुझ्या पारखी नजरेने एकदा आपल्या ‘मोहिनी’कडे बघ.’
मधुलिकाने खोलीत जाऊन ‘मोहिनी’कडे बघितलं, तेव्हा ती चकीतच झाली आणि तिच्या गळ्यातून सहाजोद्गार बाहेर पडले, ‘वा: काय सौंदर्य आहे. जो कुणी एकदा हिला बघेल, आपलं सारं राज्य तिच्यावर उधळून देईल.’ असं बोलता बोलता तिने आपल्या गळ्यातली मोत्यांची सुंदर माळ काढली आणि मोहिनीच्या गळ्यात घातली. अन्य स्त्री-रूपावर मोहित होऊन तिचा गौरव स्त्रीनेच करावा, अशी ही पहिलीच वेळ असेल आणि इथे तर गौरव करणारी खुद्द मधुलिकाच होती.
मूळ हिंदी कथा – ‘गली अति सॉँकरी’ मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्वयंप्रकाशी रवी… भाग – २… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
(खरं तर मला पुढे काय बोलू हेच कळत नव्हतं. पण उत्सुकता सुद्धा तितकीच वाढलेली होती.) इथून पुढे —-
“ देव आहे साहेब. भेटतो कुठे ना कुठे, कोणत्या तरी रुपात. बहिणीचं कार्य उरकून हिला घेऊन मुंबईत येत होतो. अशीच वेळ होती रात्रीची. ट्रेनमधे विशेष कोणी नव्हतं. कसाऱ्यावरून ट्रेन सुटली, जेमतेम खर्डीला पोचली आणि पोरीने गळा काढला, ती पुढचा एक दीड तास रडत होती. बाटलीने दूध पाजत होतो, तर तेही घेत नव्हती. ही बाई सुद्धा त्याच डब्यात होती. तो तास दीड तास नजर रोखून बघत होती माझ्याकडे. डोंबिवली येता येता एका क्षणाला पोरगी अचानक रडायची थांबली. श्वास घट्ट धरून ठेवलेला. छाती भरल्यासारखी वाटली. चेहरा निळा पडायला लागला. माझं अवसान गळून पडलं. मला वाटलं खेळ खलास. तेव्हा ही बाई अचानक जागेवरून उठली. तिच्या कडेवरचं मूल बाजूच्या माणसाकडे देत, माझ्या अंगावर जवळपास किंचाळली. तिच्या डोळ्यांत आग आणि पाणी एकत्र दिसत होतं. पुढचं एक दीड मिनिट तिच्या भाषेत संतापून काहीतरी बोलली ज्यातला मला एकही शब्द कळला नाही. शेवटी तिने तिचे दोन्ही हात पुढे केले. मी काहीही कळण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी चुपचाप पोरीला तिच्या हातात दिलं. ती तिथेच थोडं वळून पोरीला छातीशी घेऊन बसली. दहा मिनिटानी तिने पोरीला परत माझ्याकडे दिलं. पोरगी समाधानाने झोपली होती. इतकी शांत झोपलेली मी तिला कधीच पाहिलं नव्हतं.”
भेटल्यापासून पहिल्यांदा त्याचा आवाज भरल्यासारखा वाटला. डोळे सुद्धा भिजल्यासारखे वाटले. त्याने नजर फिरवली..
“ मग, पुढे?? ”
“ मग काही नाही साहेब.. तिच्या सोबत असलेल्या त्या माणसासोबत तोडक्या मोडक्या हिंदीत बोलता बोलता कळलं की ते लोक इथे राहतात म्हणून.”
“रोज येतो का मग इथे?”
“ रोज नाही गरज पडत सर. पण कधी कधी रात्र झाली की ही पोरगी रडायची थांबतच नाही. तेव्हा मग तिला घेऊन मी इथे येतो. ही अम्मासुद्धा मी येताना दिसलो की तिचं स्वतःचं मूल छातीपासून खेचून लांब करते आणि हिला आधी जवळ घेते. ”
माझ्या डोक्याला मुंग्या येत होत्या. मेंदू सुन्न पडत चाललेला..
“ मी सोडू का तुला घरापर्यंत? मी इथेच समोर राहतो. पटकन गाडी घेऊन येतो.”
“ नको साहेब, आमच्या गावाकडचा एक मुलगा इथं कॉल सेंटरला बस चालवतो. शिफ्टवाल्याना सोडून या वेळेला रिकामी बस घेऊन जातो तो या बाजूला. तो सोडतो मला बांद्रा कोर्टापर्यंत. मग तिथून जातो मी चालत.”
नशीबाने खेळलेल्या प्रत्येक चालीवर उत्तर शोधलं होतं त्याने. त्याच्या प्रत्येक वाक्यागणिक माझे शब्द आटत चाललेले. मला कळत नव्हतं काय बोलू? शब्दच नव्हते उरलेले, ना याच्या जखमांवर फुंकर मारू शकणारे, ना त्याच्या झगड्याचं कौतुक करू शकणारे..
अर्ध मिनिट शांततेत गेलं. पाऊस थांबला होता. आम्ही रस्ता क्रॉस करून समोरच्या बाजूला आलो, जिथून त्याच्या त्या मित्राची बस जाणार होती.
“ तुम्ही जा सर, मी जाईन इथून ”
“ पुढे काय करणारेस? ठरवलं आहेस काही? ”
“ प्रयत्न सुरू आहे सर. मागच्या वर्षीची पीएसआयची मुख्य परीक्षा पास केलीये . मुलाखतीचा कॉल पण आलेला सर. पण हे कोविडमुळे अडकून पडलं सगळं सर. आणि एम ए सुरू आहेच. बघू सर, जमेलच कुठेतरी काहीतरी..” नशिबाचे सगळे फासे उलटे पडत असताना सुद्धा त्याचा नशिबावरचा विश्वास जराही कमी होत नव्हता. कदाचित त्याला त्याच्या जिद्दीवर जास्त विश्वास असावा.
“ तुझा मोबाईल नंबर देतो का ?”
“ तुमचा सांगा सर..” खिशातून मोबाईल काढून त्याने माझा नंबर टाईप केला.
“ मिस्ड कॉल दे मला ”
“ नको सर, राहू देत ”
“अरे दे की, काय झालं?”
“ नको सर, राहू देत. मला शोधत मदत करायला याल. नकोय मला ते सर. आयुष्यात काही झालोच तर स्वतः पेढे घेऊन येईन तुम्हाला. इथेच राहता ना तुम्ही?? ” त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं स्माईल होतं.
“……….” कुठून आणत असेल हा इतकी सकारात्मता.
“ बस आली सर, ती बघा ”—
तरीही जाता जाता याच्या हातात थोडे पैसे ठेवतोच असं मनात ठरवून मी समोरून येणाऱ्या बसकडे बघता बघता पाकिटाला हात घातला. शंभर-पाचशे देऊ की हजार-दोन हजार देऊ असा विचार करेपर्यंत त्याने स्वतःच्या खिशातून दहादहाच्या तीन नोटा काढून माझ्या बॅगच्या कप्प्यात टाकल्या,
“ हे तुमचे तिकिटाचे पैसे सर.. त्या दिवशी घाईघाईत राहून गेलेले..”
मी काहीही म्हणेपर्यंत तो बसमध्ये चढला होता आणि बस पुढे निघालीही होती,
“ पुन्हा भेटू सर..”
मी बराच वेळ पुढे जाणाऱ्या बसकडे बघत बसलो.
मी अर्धा एक मिनिट तिथेच उभा होतो. नक्की कोणी कोणाच्या पाठीवर हात ठेऊन “लढ” म्हणायला हवं होतं, याचा विचार करत.
मी चालत घराकडे निघालो. सिग्नलवर सायकलवरच्या कॉफीवाल्याकडे एक कॉफी घेतली. आणि सुन्न डोक्याने घरी आलो. असं म्हणतात, की असे प्रसंग तुम्हाला आयुष्यात नवीन ऊर्मी देऊन जातात. मला याच्या अगदी उलट वाटतंय. आत खूप मोठी आणि खोल पोकळी तयार झाल्यासारखी वाटतेय. रितेपणाची जाणीव. वन बीएचकेचा टू बीएचके आणि हॅचबॅकची सेडान करण्याइतपतच खुरटी स्वप्नं बाळगणाऱ्यांना ही जगण्याच्या खऱ्याखुऱ्या लढाईची गोष्ट अंगावर येते. तूपात घोळवलेली आणि साखरेत लोळवलेली दुःखं चघळायची सवय झालेल्या शहरी मध्यमवर्गाला ही दाहकता पेलवत तर नाहीच, पण ऐकवतही नाही. ‘बलुतं’ किंवा ‘झोंबी’ सारखी दुःखानी डबडबलेली आत्मचरित्रं वाचल्यावर आपल्यात जी शून्यत्वाची भावना निर्माण होते तीच भावना. पण सगळीच पुस्तकं लायब्ररीत मिळत नाहीत. काही पुस्तकं तुम्हाला अशीच रस्त्यावर, पूलाखाली चालता बोलता भेटतात. तुमच्याशी गप्पा मारतात.. जिवंत होऊन.
सलाम आहे रवी तुला.. हो रवीच.. स्वयंप्रकाशी रवी..
……. आणि हो, गरवारेच्या पूलाखाली पार्ल्यातली काही सर्वात श्रीमंत कुटुंबं राहतात. बेघर असतील पण गरीब नक्कीच नाहीत.
— समाप्त —
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्वयंप्रकाशी रवी… भाग – १… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
काल संध्याकाळची शिफ्ट संपवून घरी जात असताना ऑफिस बसमधून उतरलो आणि अचानक पावसाची सर आली. सर ओसरायची वाट बघत मी इथेच पुलाखाली थांबलो. रात्री पाऊण एकची वेळ. इतक्यात कानावर आवाज पडला…
“ सर, ओळखलं का? ”
“…. नाही ”
“आता??” त्याने चेहऱ्यावरचा मास्क खाली घेतला. फार तर वीस बावीस वय असेल.
“सॉरी, पण नाही आठवत आहे”
“कुर्ला स्टेशन?? कसाऱ्याचं लोकल तिकीट??”
“ओह ओके ओके.. आत्ता आठवलं ”
दोन वर्षांपूर्वी पहिला कडक लॉकडाऊन लागला होता, तेव्हा लोकल प्रवास फक्त अत्यावश्यक सेवांपुरता मर्यादित होता. कुर्ला स्टेशनवर मी तिकिटासाठी रांगेत उभा असताना हा मुलगा माझ्याजवळ येऊन “ सर, प्लिज एक तिकीट काढून द्याल का?? कसारा पर्यन्त. प्लिज सर प्लिज, अर्जंट आहे, आई आजारी आहे ” असं कळवळून म्हणाला होता. मुलगा खरं बोलतोय असं वाटत होतं, आणि शिवाय पैसेही मागत नाहीये.. तिकीटच मागतोय, म्हटल्यावर मीही त्याला माझ्या ओळखपत्रावर लोकलचं तिकीट काढून दिलं होतं. आज तो दोन अडीच वर्षांनी असा अचानक भेटलेला.
“ तू इथे कसा?”
“आलो होतो सर एका कामासाठी, आता घरी जात होतो. पाऊस आला म्हणून थांबलो ”
“हम्म.. पाऊस कधीही पडतोय या वर्षी ”
“ हो ना..”
पुढची काही सेकंद शांततेत गेली..
“ कसाऱ्याला राहतोस का तू? आता घरी कसं जाणार? ”
“ माझं गाव आहे सर तिकडे. स्टेशनपासून तीस किलोमीटरवर ”
“अच्छा.. आई बरी आहे का आता?” पावसाची सर ओसरेपर्यंत मी संभाषण वाढवायचा प्रयत्न केला.
“ ती गेली साहेब ”
“ओह..” मला ओशाळल्यासारखं झालं.
“ म्हणजे मागच्या वेळेला आपण भेटलो त्यानंतर बरी होती. आता सहा महिन्यापूर्वी वारली ”
“ओह….आणि हे बाळ तुझं आहे का?” त्याच्या हातात तीन-चार महिन्यांच मूल होतं.
“ हे?? माझंच म्हणा आता ” तो बाळाकडे बघत बोलला.
“ म्हणजे?? ”
“ म्हणजे आहे तसं बहिणीचं आहे. चौदाव्या वर्षी लग्न लागलेलं तिचं. चार महिन्यातच पोटुशी राहिली. सातव्या महिन्यात डिलिव्हरी. डिलिव्हरीच्या वेळी बहीण गेली . ही पोर तेवढी वाचली. मुलाच्या दुसऱ्या लग्नात अडचण नको म्हणून मुलाकडच्यानी जबाबदारी नाकारली. आमची आई जिवंत असती तर तिने बघितलं असतं हिच्याकडे. आता ती पण नाही. आणि दुसरं कोणीच नाही जवळचं ”– क्रिकेट मॅचचे हायलाईट्स सांगावे तशी तो त्याच्या आयुष्याची गोष्ट सांगत होता.
“मग आता हिला घेऊन इथे कुठे राहतो?”
“इथेच पुढे, धारावीजवळ. भाड्याने घेतलीय खोली”
“काय करतो आणि?”
“जिथे राहतोय तिथेच दोन खोल्या सोडून एक इमिटेशन ज्वेलरीचा कारखाना आहे. त्याच्याकडे काम करतो”
“अच्छा… शिकलाय किती तू?”
“एम ए पार्ट वन ला आहे सर, हिस्ट्री.. डिस्टन्स मधून..”
“अरे मग चांगली नोकरी का नाही बघत? ही असली मजुरीची कामं का करतोय?” मला कौतुक वाटलं.
“इथं पगार कमी आहे पण हिच्याकडे बघता येतं साहेब. मी सगळं मटेरियल खोलीवर आणून काम करत बसतो. या पोरीकडे पण लक्ष राहतं मग.”
“तुझं अख्ख आयुष्य बाकी आहे अजून..” मला थेट बोलायची हिम्मत होत नव्हती.
“हो साहेब, मागे एकदा ही पोर रात्रभर रडली होती. खूप राग आलेला मला. कंटाळून सकाळी एका अनाथ आश्रमात घेऊन गेलो होतो. पण गेटवरूनच मागे फिरलो सर. नाही हिम्मत झाली..” तो निग्रहाने सांगत होता सगळं.
“हम्म.. इथे काय काम मग?”
आता तो थोडा वरमल्यासारखा वाटला. इकडे तिकडे बघत मग बोलला,
“ ती हिरव्या रंगाच्या साडीत बाई बसलीय बघा ” पूलाखाली उघड्यावर संसार थाटलेल्या एका बाईकडे नजर करत तो बोलला, “ तिच्याकडे दूध पाजायला आणतो हिला ”
जेमतेम विशीच्या मुलाला अकाली आलेलं, उसनं पालकत्व बघून मी आधीच भारावून गेलो होतो, तेवढ्यात त्याने हा नवीन बॉम्ब टाकला..
“दूध पाजायला म्हणजे..??” कसाऱ्याच्या कुठल्याशा आदिवासी पाड्यातला मुलगा, धारावीत भाड्याने राहतो आणि चार महिन्याच्या बाळाला दूध पाजायला पार्ला-अंधेरीत येतो.. रात्री एक वाजता?? मला कळत नव्हतं काय बोलू..
“जेमतेम चार महिन्यांची आहे ही.. दूध लागतंच ना लहान जीवाला ”
“ तू मिल्क बँकबद्दल ऐकलय का कधी?? आई नसलेल्या बाळांना…..”
“ दूध मिळतं साहेब तिकडे. आईची छाती नाही मिळत.”
माझं वाक्य मधेच तोडलं त्याने– “ एरवी ही पोर पिशवीतल्या दुधावर दिवसभर राहते. पण कधीकधी रात्री भरल्या पोटाचीसुद्धा इतकी रडते की काय करू कळत नाही. नुसत्या दुधाने पोट नाही भरत सर ”
“ हम्म..खरंय.. पण त्या बाईला कसं काय ओळखतो तू??” खरं तर मला पुढे काय बोलू हेच कळत नव्हतं. पण उत्सुकता सुद्धा तितकीच वाढलेली होती .
—क्रमशः भाग पहिला
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ दोन हिरे…. लेखक – अज्ञात ☆ भावानुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
🐪
एका व्यापाऱ्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता.
आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली .
व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने उंट विकत घेऊन घरी नेला !
घरी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले ..!
काजवेच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यामुळे उघडकीस आले की ते मौल्यवान हिरे व रत्नांनी परिपूर्ण आहेत ..!
सेवक ओरडला, “मालक , तुम्ही एक उंट विकत घेतला, परंतु त्या बरोबर काय? विनामूल्य आले आहे. ते पहा!”
व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखी चमकत होते आणि चमकत होते.
व्यापारी म्हणाले:
“मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करावे!”
नोकर मनात विचार करत होता “माझा मालक किती मूर्ख आहे …!”
तो म्हणाला:
“मालक काय? आहे. हे कुणालाही कळणार नाही!” तथापि, व्यापाऱ्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली.
उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, “मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान हिरे काजवेखाली लपवले होते!
आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा!
व्यापारी म्हणाला,
“मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही!”
जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता!
शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला:
खरं तर मी थैली परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते.
या कबुलीजबाबा नंतर, उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने थैली रिकामी केली आणि त्यातील हिरे मोजले !
पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जशेच्या तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही तेव्हा तो म्हणाला, “हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान हिरे कोणते?
व्यापारी म्हणाला:… “माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान.”
विक्रेता मूक होता!
यापैकी दोन हिरे आपल्याकडे आहेत की नाही हे शोधण्यासाठी आपण स्वतःमध्ये पहावे.
ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, ‘स्वाभिमान अन् प्रामाणिकपणा’ तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे…
लेखक : अज्ञात
भावानुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ बंदे आणि सुट्टे ! … अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
एका मिठाईच्या दुकानात गल्ल्यावर बसायचा ‘तो’. त्याच्या शेजारी बसत असे त्याचा सहकारी. आठ – दहा सेल्समनही असत उभे काऊंटरच्या पलीकडे… दुकानाचा मालक कधी दुकानात येई… तर कधी त्यांची मिठाई जिथे बनत असे त्या फॅक्टरीत जाई. थोडक्यात मालक दुकानात नसतांना, त्याचीच ती जबाबदारी असे– झालं – गेलं बघण्याची. आणि अर्थातच तो ती जबाबदारी, इमाने इतबारे पारही पाडत असे.
जितके मिठायांचे नमुने होते दुकानात, त्याहूनही जास्त नमुन्याची लोकं बघायला मिळत असत त्याला.
कोणी निवांत तर कोणी घाईत… कोणी शांत तर कोणी कोपीष्ट… कोणी अगदी वरची चिल्लरही देणारा तर कोणी वरच्या शे – दोनशेचं हक्काने डिस्काऊंट मागणारा. आणि ह्या प्रत्येकाबरोबर त्याला मात्र अतिशय शांतपणे, संयमितपणे वागावं लागत असे….
तर आजही अशाच विविध तर्हेच्या लोकांची येजा चालू असतांनाच, त्याला दुकानात शिरतांना दिसल्या ‘त्या’, साठीच्या बाई.
त्या बाईंना बघताच, तो किंचितसा मोठ्यानेच बोलला… ” आल्या.. शंभरच्या आत खरेदी करणार नी दोन हजाराची नोट देणार… सुट्टे द्या म्हंटलं तर आरडाओरडा करणार “. एवढं बोलून त्याने शेजारी बसलेल्या त्याच्या सहकार्याकडे बघत, मान हलवली. प्रत्युत्तरादाखल सहकार्यानेही “नायत्तर काय” ह्या अर्थाची किंचितशी मान उडवली.
तोपर्यंत ऐंशी रुपयांची रसमलाई घेऊन, त्या बाई गल्ल्यावर पैसे द्यायला आल्या. अपेक्षेप्रमाणेच त्यांनी दोन हजाराची नोट काढली, नी त्याला दिली. त्यानेही दरवेळेप्रमाणे त्या बाईंकडे सुट्टे मागितले… आणि दरवेळीप्रमाणेच त्यांची बडबड ऐकून अखेर, एकोणीसशे वीस त्या बाईंना परत केले. चेहर्यावर यत्किंचितही धन्यवादाची रेघ न उमटवता त्या बाई, निर्विकारपणे बाहेर पडण्याकरता वळल्या.
त्या बाईंच्या मागेच थोड्या अंतरावर उभा असलेला एक इसम मग गल्ल्याजवळ सरकला. त्याने त्याच्या बिलाचे पैसे देऊ केले. पाठी मान वळवून त्याने त्या दरवाज्यातून बाहेर पडणार्या बाईंकडे पाहिलं, नि गल्ल्यावर बसलेल्या त्याला बोलला…
… ” त्या बाईंबद्दलचं तुमचं मघाचं बोलणं ऐकलं मी… पण तुम्हाला माहितीये का, त्यांचं हे असं करण्यामागचं नेमकं कारण ?… नक्कीच माहित नसावं… देन लेट मी टेल यू दॅट…….
…. त्या बाई एक्स्ट्रीम डायबेटीक आहेत आणि तरीही त्या इथून मिठाई घेऊन जातात… ह्याच दुकानातून बरं का…
आणि गेली दोन वर्ष खंड न पाडता, हे असं करताहेत त्या…
जेव्हापासून… जेव्हापासून ….
ते तिघेजण ॲक्सिडेंट होऊन, हे जग सोडून गेले… हो… ते तिघे… त्या बाईंचे विद्यार्थी होते ते…
दहावीच्या परीक्षेत तिघेही नव्वदहून जास्त टक्के मिळवून, उत्तीर्ण झाले होते… त्यांनी फोनवरुनच हे त्यांच्या बाईंना कळवलं… आणि त्यांच्या पाया पडायला घरी येतोय, असंही बोलले ते…
त्या दिवशी बाईंनी अत्यानंदाने इथूनच मिठाई घेतली… ‘ पाचशे एक ‘ ची तीन पाकीटं तयार केली त्यांनी… आणि आपल्या घरी वाट बघत बसल्या त्या, त्या तिघांच्या येण्याची…
पण… पण, ते तिघे आलेच नाहीत, तर आली त्यांची बातमीच…
त्यांच्या ऑटोला एका ताबा सुटलेल्या ट्रकने उडवलं होतं… आणि… आणि जागीच ते तिघेही…
पंचवीस तारीख होती ती…
तेव्हापासून दर महिन्याच्या पंचवीस तारखेलाच त्या बाई, इथे ह्या दुकानात येतात… मिठाई घेतात… आलेल्या सुट्ट्यातून पाचशे-एक ची तीन पाकीटं तयार करतात आणि वाट बघत बसतात त्या तिघांची…
हे सगळं मला कसं माहीत, असा तुम्हाला अर्थातच प्रश्न पडला असेल…
तर त्याचं उत्तर असं की मी… मी त्या तिघांपैकी एका मुलाचा बाबा आहे… मी आणि त्या बाकी दोन मुलांचे बाबा असे आम्ही तिघे, दर महिन्याच्या पंचवीस तारखेला बाईंकडे जातो… त्यांनी आणलेली मिठाई खातो… त्यांच्याकडून ती पैशांची पाकीटं घेतो… आणि गरजू विद्यार्थ्यांना त्या पैशांतून, वह्या – पुस्तकं घेतो…
त्या बाईंना ह्यातलं काहीच माहित नाही… त्यांच्या मनावर त्या घटनेचा इतका परिणाम झालाय की, त्या बाई आम्हा तिघांनाच ती तीन मुलं समजतात… गेली दोन वर्ष दर महिन्याच्या पंचवीस तारखेला, हे नी अगदी असंच घडतंय…
…. तेव्हा तुम्हाला रिक्वेस्ट आहे की यापुढे, म्हणजेच पुढच्या पंचवीस तारखेला त्या बाईंकडे बघून नाराज होऊ नका… त्यांनी बंदे दिले तर त्याचे सुट्टे देण्यासाठी, का-कू करु नका… चला… आता निघायला हवं मला… बाकी दोघांना भेटून, त्या बाईंच्या घरी जायचंय “.
इतकं बोलून तो माणूस निघायला वळला. त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत बसले… गल्ल्यावर बसलेला तो, अन् बाजूला बसलेला त्याचा सहकारीही… अगदी निःशब्दपणे, एकमेकांकडे पाहत… मग त्यांनी उघड्या गल्ल्यातील पैशांकडे पाहिलं…
त्या दोघांनाही जणू, आजच खरी ‘जाण’ आली होती… बंदे आणि सुट्टे ह्यांतली……..
लेखक – अज्ञात
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
शेखर परत ओरडा आरडा करत घराबाहेर पडला.रोजचंच झालं होतं हे.रेवा निमूटपणे त्याच्या रागीट स्वभावाला सहन करत दिवस रेटायची..’तो खूप प्रेमळ आहे पण … ‘हे ऐकवत ऐकवत सासूबाईंनी तिला नेहमीच समजावत, ‘संसार म्हणजे स्त्रीचं बलीदान’ वगैरे ऐकवत ऐकवत मुलगा- सुनेच्या मधे वाटाघाटी केल्या होत्या.. त्यांच्यापरीने त्यांनी उत्तराला उत्तर टाळून घरात शांतता नांदवायचा प्रयत्न केला होता.
मुलाला समजावण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे, हे कळल्यावर त्यांनी त्याला काही समजावणं टाळलेलंच होतं.
शेखर चे बाबा खूप तापट म्हणून नातेवाईकांमधे प्रसिद्ध होते. त्यामुळे,वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन वळणाचं पाणी वळणावरच जाणार, म्हणून सोडून दिलं होतं आईने.
सुनेसाठी मनापासून जीव तुटायचा ,पण मुळात बुजऱ्या स्वभावाची असल्याने विशेष करताही येत नव्हतं.
एक दिवस सकाळीच हृदय विकाराच्या झटक्याने शेखरची आई वारली. आणि मग रेवाला वाटलं आपलं सुख-दुःख समजून घेणारी एकुलती एक व्यक्तीपण गेली.तिचे आई वडील तर तिला कधीच पोरकं करून गेले होते.
आई गेल्यानंतर गरम डोक्याचा असला तरी मनाने हळवा असलेला शेखर अजूनच बिथरल्यासारखं वागायला लागला.
कालपर्यंत वडील म्हणजे आदर्श मानलेला असल्याने त्यांचंच वागणं बघून तंतोतंत तसंच वागत आयुष्याची ५५ वर्ष घालवली होती. ‘स्वभावो दुरतिक्रमः’ ह्या उक्तीनुसार त्याच्या आणि बाबांच्या वागण्यात काही फरक पडेल,अशी सर्व आशा रेवाने सोडूनच दिली होती.
रेवा आणि तिची दोन्ही मुलं आपापल्या परीने बाबा आणि आजोबांना शांत ठेवण्याच्या प्रयोगाला कंटाळत चालली होती.
रेवाला आजकाल बाबांच्या वागण्यात मात्र फरक जाणवत चालला होता. आई गेल्यापासून ते अचानक शांत राहायला लागले होते, रेवाला मदत करण्याकडे त्यांचा कल वाढत चालला होता.ते आजकाल तिचं मन सांभाळायचा प्रयत्न करायचे.
रेवाने आवर्जून मैत्रिणींना ही गोष्ट संगितली.तर त्या तिला म्हणाल्या सुद्धा, “आता त्यांना माहीत आहेना, त्यांना तुझ्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हा तात्पुरता बदल.सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को”
पण आजही बाबा स्वतःचं सर्वकाही स्वतः करायला सक्षम आहेत,हे रेवा जाणून होती. त्यामुळे बाबांमधला हा सुखद बदल तिला आवडला होता..
आईंना जाऊन जेमतेम तीन महिने उलटले असतील.अचानक एक दिवस शेखर ऑफीसमधून घरी आला आणि चहामधे साखर जास्त पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून त्याने घर डोक्यावर घेतलं. तीन महिन्यापासून असलेली थोडीफार शांतता आज शेवटी भंग पावली.
रेवा चार-चारदा म्हणत होती, “मी दुसरा चहा देते”. पण एक कप चहा न पटल्यावरून थेट तिच्या शिक्षणापासून ते दिवंगत आई वडील.. सगळ्यांचा उद्धार झाला.
बाबा बाजूलाच बसले होते. ते अचानक म्हणाले, “रेवा, आज मी आणि शेखर डिनरला घरी नाही.”
चहात आज साखर जास्त झाली, म्हणून रागावून आज हे लोक घरी जेवणार नाहीत, असे समजून रेवा खूप वेळा ‘सॉरी’ पण म्हणाली.पण…
इकडे आज बाबांचा आपल्याला सपोर्ट आहे असे बघून शेखरला जरा जास्तच चेव आला होता.
तो म्हणाला, “हो, बाबा. आपण बाहेरच जाऊ.जेवणासाठी इतकी मरमर करायची आणि तेच अन्नपाणी चविष्ट मिळत नसेल तर काय उपयोग? आपण आत्ताच निघूया चला आठ तर वाजलेच आहेत. ह्या चहाने तोंडाची पार चव गेली आहे.”
बाबांनी रेवाकडे पाहून ‘गप्प राहा’,असे खुणेनेच सांगितले.
बाबांचा हा पवित्रा नवीन होता रेवासाठी.
पण ह्या दोघांपैकी एकालाही प्रश्न विचारायची तिला कधीच हिम्मत नव्हती.
शेखरने गाडी काढली आणि बाबांना घेऊन जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये दोघे पोहोचले.
शेखर आणि बाबा बरेचदा ड्रिंक पार्टी करायला इथेच यायचे.आई गेल्यानंतर आज पहिल्यांदाच आले होते.
पुरुषांनी कसा पुरुषार्थ बाळगावा,पुरुष जरा तडक फडकच शोभून दिसतो, शेमळट नाही वगैरे बाळकडू इथेच शेखरला मिळालं होतं.
पण आज बाबा चक्क ड्रिंक्स घ्यायला ‘नाही’ म्हणाले,शेखरसाठी हा धक्काच होता.
तो म्हणाला, “बाबा तुम्ही आणि व्हिस्कीला ‘नाही’ म्हणत आहात.काय झालं तुम्हाला ?आजकाल शांत शांतही असता?”
बाबा अचानक रडायला लागले.बराच वेळ कोंडलेल्या भावना उफाळून आल्या. आर्त स्वरात शेखरला म्हणाले, “स्वतःला शिक्षा कशी द्यायची हा विचार करतोय.माझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी सोडून देईन,सगळं करेन पण तिची माफी कशी मागू ?तो एक मार्ग देवाने सुचवावा… तिचीच काय आजपर्यंत ज्यांना ज्यांना जिव्हारी लागणारं बोललो त्यांची माफी मागितली तर माफ करतील का मला ते ?
तिने शेवटचा श्वास घेतला त्या दिवशीसुद्धा मी तिला वाटेल तसं बोललो होतो.. आज त्या भांडणाचं कारण जरी आठवलं तरी लाज वाटते आहे स्वतःची. माणूस इतका कसा स्वार्थी होऊन जातो ?स्वतःच्या काही विक्षिप्त कल्पनांसाठी आपण दुसऱ्याला किती गृहीत धरतो ना?
पण एक दिवस असा येतो आयुष्यात की चूक झाली, आपण दुसऱ्याला दुखावलं हे समजल्यावरही काहीच करता येत नाही.
बेटा, हे कालचक्र आहे ना, ते गोल फिरत रे,पण पुढे …मागे नाही नेता येत.मला ह्याची जाणीव झाली आणि माझी सगळी नशा खाडकन उतरली.आता कुठलीही व्हिस्की मला कामाची नाही.
तुझ्या आईची मनापासून माफी मागायची आहे रे.पण कुठून आणू तिला ?आता एका क्षणासाठी तरी.तिला सांगायचं होतं तिच्यावर हक्क गाजवायचो,तिचा सतत पाणउतारा करायचो पण माझं खूप प्रेम होतं तिच्यावर.तिला माहीत असेल का ते ?की एक तामसी माणूस नवरा म्हणून नशिबी आल्याने ती आयुष्य संपल्याचा आनंद मानून ह्या जगातून गेली असेल ?
काय माहीत सगळेच प्रश्न आता अनुत्तरित राहतील…
एक धडा घेतला मात्र मी त्या दिवशीपासून..
बोलताना १०० वेळा विचार करून बोलायचं.आजनंतर तो माणूस आपल्याला आयुष्यात परत कधीच दिसला नाही तरी ‘आपण तेव्हा असं नको होतं बोलायला’ ही आपल्याला बोचणी राहता कामा नये.अत्यंत विचारपूर्वक बोलायचं.
आयुष्यं असं जगायचं जणू काही ही आपली शेवटची भेट…
कधी चुकून दुखावलंच कोणाला तर पटकन मनापासून ‘साॅरी’ म्हणून टाकायचं.काय माहीत पुन्हा संधी मिळेल का?
फार भयंकर असतं रे अपराधीपणाची भावना घेऊन जिवंत राहणं.खास करून जेव्हा ती माणसं आपल्याला सोडून जातात,जी आपल्या जगण्याचं कारण असण्याची जाणीव होते आपल्याला नंतर..
तेवढ्याकरता मी तुला आज इथे आणलं. मी ज्या यातना भोगतो आहे, त्या तुझ्या वाटेला येऊ नयेत म्हणून आज तुला माझा हा एक मोलाचा सल्ला समज…
कारण इथेच बसून नाही नाही त्या पुरुषार्थाच्या खुळचट कल्पना तुझ्या डोक्यात घुसवल्या मी.. बघ. आजच जागा हो…
आपल्या मृत्यूनंतर रडणारे नसले ना तरी चालतील.पण निदान कुणाला सुटकेची भावना वाटेल इतकं दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू नये माणसांनी.आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात तोपर्यंतच त्यांची किंमत कळलेली बरी.
किती क्षुल्लक कारणांनी आपण जिवाभावाची माणसं तोडतो.आणि मग झुरत बसतो त्यांच्यासाठी आयुष्यभर.. ”
बाबा असे हताश,केविलवाणे शेखरने ५५ वर्षात कधीच पहिले नव्हते.आईला कधीच खिसगणतीतही न पकडणारे बाबा आज आईच्या आठवणीने इतके कासावीस होताना पाहून शेखरही खूप भावुक झाला.
बाबांना समजावण्यासाठी तो म्हणाला, “बाबा, तसंच काहीतरी कारण घडल्याशिवाय तुम्ही भांडला नसणार आईशी,मला माहीत आहे.जाऊद्या. कुटुंबात होत असतात अशी भांडणं … ”
तसे बाबा म्हणाले, “हो रे. आपण जेव्हा दुसऱ्याला बोलतो तेव्हा आपल्याला असंच वाटत असतं की आपण योग्यच गोष्टीसाठी बोलतो आहोत.पण आपण नुसती चूक दाखवून गप्प नाही बसत ना ?आपण त्या माणसाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो.नाहीच जाणवत हे सगळं जोपर्यंत डोळ्यासमोर निमूटपणे ऐकून घेणारी ती व्यक्ती दिसत असते.
पण आज मला जे आतून होत आहे ना ते शब्दात सांगणं कठीण आहे बाळा.. काही म्हणजे काहीच श्रेष्ठ नसतं जगात ज्यासाठी आपण आपल्या माणसाला इतकं दुखवावं,अगदी आपला अहंकार सुद्धा!
किती क्षुद्र भांडणाचं कारण होतं त्या दिवशी!मी सहज दुर्लक्ष करू शकलो असतो.पण कुठे माहीत होतं इतकं धडधाकट आरोग्य असलेली तुझी आई,तो तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल… आणि आमची शेवटचीच भेट.. तिच्यापेक्षा मोठं नक्कीच नव्हतं ते कारण”
शेखरने न राहवून विचारलं, “बाबा काय झालं होतं एवढं त्या दिवशी ज्यामुळे तुमचं मन तुम्हाला इतकं खात आहे ?”
बाबा हताशपणे म्हणाले, “सकाळी सकाळी माझ्या कितीतरी आधी उठून, तयार होऊन मला आवडतो म्हणून माझ्या बरोबर चहा घ्यायला, माझ्या आवडीचा चहा घेऊन तुझी आई खोलीत आली.माझं बेड टी प्रकरण तिला कधीच आवडायचं नाही.तरी ती माझ्याबरोबर चहा घ्यायची.मी पहिला घोट घेतला आणि रागात तो चहाचा कप फेकून दिला.”
शेखरने कुतूहलाने विचारलं “का ?”
तसे बाबा म्हणाले, “तुझाच बाप ना मी!तिने चुकून चहामधे साखर घालताना माझ्याच कपात दोन वेळा साखर घातली होती.
त्या गोडव्याला इतकं वाईट झिडकारलं मी आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातला गोडवा कायमचा संपला…तिच्याबरोबर.
हे सगळं ऐकून
शेखरचे डोळे खाडकन उघडले , “बाबा प्लीज, पटकन घरी चला.”असं म्हणून हॉटेलमधलं वाढलेलं ताट अर्धवट सोडून टेबलवर पाकिटातले सगळे पैसे ठेवून तातडीने शेखर बाबांना घेऊन घरी पोहोचला..
रेवाने दार उघडल्याबरोबर सुटकेचा निश्वास टाकून तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, “ रेवा, मला माफ कर. मी परत कधीच तुझा अपमान करणार नाही.”
देव्हाऱ्याकडे बघून नकळत त्याच्या तोंडातून शब्द फुटले, “ थँक यू,देवा. मला आयुष्यात एक संधी दिल्याबद्दल .. !”
लेखिका :सुश्री ऋचा मायी
गौरी गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मानसीचे आईवडील कारच्या अपघातात गेले तेव्हा मानसी चार वर्षाचीच होती. आजीने तिला मामाच्या घरी आणले. मामीला स्वतःची मुलगी होती, मानसीहून 3 वर्षांनी मोठी. मधुरा तिचं नाव. मधुरा खरोखरच अतिशय हुशार होती. मानसीला घरी आणल्यावर मामाच्या जबाबदाऱ्या वाढल्या. तो मध्यमवर्गीय, जरा बेताचीच नोकरी, आणि मामी शाळेत शिक्षिका,आणि त्यात ही जबाबदारी ! मामीला खरंतर हे ओझे नको होते, पण सासूबाईंसमोर बोलायची मामीची टापच नव्हती. मानसीच्या वडिलांचे विम्याचे पैसे मिळाले. पण ते मामाने, तिच्या शिक्षणासाठी, आणि लग्नासाठी म्हणून गुंतवून टाकले.
मामाने मानसीला शाळेत घातले. मानसी मधुराला नेहेमी म्हणायची, “ ताई, तू किती हुशार आहेस. पण मला खरंच नाही गं जमत तुझ्यासारखा अभ्यास करायला.”
मुली बघता बघता मोठ्या झाल्या. मधुराने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. दोन वर्षांनी मानसीही चांगल्या मार्कानी एसएससी झाली. “ मामी,मी कॉमर्सला घेते ऍडमिशन. लवकरात लवकर माझ्या पायावर उभं रहायचंय मला. “ – मामीने मान डोलावली. अर्थात तिला मधुराचे जास्त कौतुक होते. पण आताशा तिचा आढ्यतेखोर बनत चाललेला स्वभाव मामीच्या नजरेतून सुटला नव्हता. मानसी मात्र नेहमीच आपली पायरी ओळखून वागत असे. ‘आपण या घरात मामामामीच्या आश्रयाने राहतोय’ हे ती कधीही विसरली नाही.
मधुराला बी,ई झाल्यावर चांगली ऑफर आली आणि ती लंडनला गेली. मानसीलाही एमबीए झाल्यानंतर चांगल्या कंपनीत जॉब मिळाला. मिळणाऱ्या पगारात मानसी खूषच होती. पहिल्यांदा जेव्हा तिला पगार मिळाला तेव्हा सगळा पगार तिने मामीच्या हातात ठेवला. दोघांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, “ मामा, आज मला आजीची उणीव फारच जाणवते आहे. आज माझे हे यश बघायला ती हवी होती. मामा-मामी तुम्ही दोघे नसतात तर काय झाले असते हो माझे ?”– मामीच्या डोळ्यात पाणी आले. “ वेडे, हा पगार ठेव बँकेत. आम्हाला काय करायचाय तो घेऊन ? तुझ्यासाठीच वापर हे पैसे. “ असं म्हणत मामीने पगाराचे पाकीट तिला परत दिले. दोघींचेही डोळे पाणावले होते.
मधुराचे लंडनचे कॉन्ट्रॅक्ट संपले आणि ती भारतात परत आली. मानसीने आनंदाने तिचे स्वागत केले.
मधुराने आता जॉब बदलला. सतत ती ऑनलाईन असे, आणि घरी असली तरी खोलीचं दार बंद.
“ मधुरा, अग जेवायला येते आहेस ना ? थांबलोय आम्ही तुझ्यासाठी.. “
“ आई, मला नाही आवडत तू माझ्यासाठी अशी थांबलेली. जेवून घेत जा ग तू तुझी वेळ झाली की. “
मधुरात होत असलेले बदल मामीच्या लक्षात येत होते.
“ मधुरा,आता तुझे लग्न करावे, असे वाटते आम्हाला. तुझ्या मनात कोणी आहे का? नसेल तर मग नाव नोंदवायचे का कुठे? मोकळेपणाने सांग गं बाई आम्हाला. “
“ आई, इतक्यात लग्नाचा वगैरे अजिबात विचार नाही हं माझा. “
“ इतक्यात नाही तर मग कधी ? मधुरा, अगं आता सत्तावीस वर्षे पुरी होतील तुला. अजून किती थांबायचे आहे ? आणि कशासाठी ? बाबा आता रिटायर होतील. त्याआधी तुझे आणि मानसीचेही लग्न होऊन जावे असं आम्हाला वाटतं आहे.”
“ हे बघ आई, स्पष्टच सांगते. तुम्ही माझ्या भानगडीत पडूच नका. माझे मी बघून घेईन. मानसीचे लागा बघायला.
तिला कोणताही अगदी साधासा नवराही चालेल. पण माझे तसे नाही. मला माझ्या अटीत बसणाराच मुलगा हवाय.
तुम्ही मानसीसाठी वरसंशोधनाला लागा. नाहीतरी हल्ली सारखे तिचेच तर गुणगान ऐकतेय मी. बराच बदल झालाय या घरात– मी नसताना.” मधुरा कुत्सितपणे म्हणाली.
“ अगं काय बोलतेस तू हे? ती बिचारी असते का तरी घरी ? आणि असते तेव्हा मला मदतच करते ती. तू सख्खी मुलगी ना माझी? मग किती चौकशी केलीस ग माझी गेल्या दोन वर्षात? मध्यंतरी बाबांना खूप बरे नव्हते, हे तरी माहिती आहे का तुला? तेव्हा मानसीने अगदी जिवाचे रान केले होते. हॉस्पिटलचे सगळे बिल तिने भरले. अहोरात्र बसली होती हॉस्पिटलमध्ये. तुला कळवलं होतं की आम्ही सगळं. पण तुला यायला जमणार नाही असं कळवलं होतंस तू. आम्ही तेही समजू शकत होतो. पण निदान एकदा फोन करून मानसीला विचारायचेस तरी. मला हल्ली प्रश्न पडतो, की तू माझी पोटची मुलगी आहेस ,का मानसी ? ते अनाथ लेकरू जेव्हा घरात आणले ना तुझ्या वडिलांनी, तेव्हाच त्यांनी मला बजावलं होतं की ‘ माझ्या ताईच्या मुलीशी सावत्रपणाने वागलीस तर याद राख.
मला ते अजिबात चालणार नाही. ताईच्या आत्म्याला काय वाटेल?’ – त्या पोरीनेही मला जीव लावला. तू बाहेर उनाडक्या करायचीस. सतत तुझे करिअर आणि मित्र मैत्रिणींबरोबर बाहेर भटकणे. कधी हातभार लावलास का कामाला? तेव्हा मानसी घरात मला मदत करायची. गुपचूप भांडी घासायची, धुणे धुवून टाकायची. तेव्हा होती का आपली ऐपत मशीन घ्यायची? आत्ता हे जे सगळं दिसतेय ना, वॉशिंग मशीन, फ्रीज, नवा रंग, नवीन फर्निचर, हे सगळं मानसीने हौसेने आणलंय-आपणहून–माझे कष्ट कमी व्हावेत म्हणून. तू किती वेळा पाठवलेस पैसे मधुरा ?
म्हणजे आम्हाला मुळीच अपेक्षा नाहीये ग मुलींच्या एका रुपयाचीही. पण कृतीतून दिसते ना प्रेम. तू अजिबात बोलूच नकोस तिच्याबद्दल.” –आई तरातरा तिथून निघून गेली.
मधुराला अतिशय संताप आला. तिने बंगलोरला बदली करून घेतली. त्यानंतर तिने घराशी फारसा संबंध ठेवलाच नाही. मानसीला अतिशय वाईट वाटले.
“ मामी, खरंखरं सांग, माझ्यामुळे ताई घर सोडून गेली ना ? पण माझं इतकं काय चुकलं म्हणून तिला माझा इतका राग यावा ? मी दुसरीकडे फ्लॅट घेऊ का? कंपनी मला भाडे देईल.”
“ अगं वेडे, तुला वाईट वाटायचे काहीच कारण नाही. हा तिचा स्वभाव आहे म्हणायचे. तुम्हा दोघींना मी सारखेच वाढवले ना. उलट कधीतरी तुलाच मी काही कमी केले असेल– तुझ्यासाठी काही आणण्यात,देण्यात. पण तू मात्र त्यात कधीही वैषम्य मानले नाहीस. तिचा वाढदिवस मी खूप जोरात साजरा करायची. तुझा मात्र कधीही नाही तसा साजरा केला. पण तू मोठ्या मनाने तिच्या समारंभात सामील व्हायचीस- कुठलीही तुलना न करता– कोणावरच न रागावता– मनात अढी न ठेवता. आता मला समजतं आहे गं ,माझेही किती चुकले तेव्हा. किती दुजाभाव केला तुम्हा दोघींच्यात. “
“ नाही ग मामी,असे नको म्हणूस. माझ्या वाढदिवसालाही तू मला ओवाळायचीस, आणि पन्नास रुपये द्यायचीस. तेच खूप वाटायचे मला.”
“ नाही ग मानू, मी कितीकदा वाईट वागले तुझ्याशी. माझ्या हातूनही नक्कीच होत होता भेदभाव. पण मी हेतूपूर्वक खरंच नाही ग वाईट वागले. तू अजिबात जायचे नाहीस हे घर सोडून. आता जाशील ना ती एकदम फक्त सासरीच.” मानसी लाजली. “ मामी, मला तू आईची आठवणसुद्धा होऊ दिली नाहीस कधी. किती चांगले आहात गं तुम्ही दोघं. आणि अग मधुराताई तुमची सख्खी मुलगी आहे. नक्की येईल बघ घरी परत. ताई खूप चांगली आहे ग स्वभावाने. अग खूप हुशार माणसे असतात अशीच जरा विचित्र.”
“ काय म्हणायचे ते तूच म्हण बाई. तू कधी कुणाला नावं ठेवतेस का ? आता काय– होईल ते बघत राहायचे इतकेच आहे आमच्या हातात. “
मानसी एक दिवस विनयला घेऊन आली.
“ मामी,हा विनय. माझ्याच कंपनीत माझा टीम लीडर आहे. आम्हाला लग्न करायचे आहे, पण ताईचे झाल्याशिवाय नाही. आणि विनयला हे मान्य आहे.”
मामामामीला विनय अतिशय आवडला. घरबसल्या जावई चालून आला होता. पुन्हा देखणा, घरंदाज, शिकलेला.
पण तरीही मामीच्या मनात कुठेतरी दुखलंच की असं सगळं आधी मधुराच्या बाबतीत व्हायला हवं होतं. आणि ते स्वाभाविकही होतं. पण मामा शांत होते. ते मामीला म्हणाले, “ हे बघ विजू, याबाबत मधुराला खूप वेळा विचारून झालंय आपलं. तिच्याकडून आणखी किती वेळा अपमान करून घ्यायचाय तुला? आणि मुख्य म्हणजे तिच्यासाठी मानसीने का म्हणून थांबायचे? आपण मानसीचे लग्न करून टाकूया. मधुराचा योग आला,की तिचेही होईल.”
मामाने रीतसर कन्यादान करून, मानसीचे थाटामाटात लग्न करून दिले. मधुरा लग्नापुरती दोन दिवस येऊन गेली.
पण ना तिने आनंदाने कशात सहभाग घेतला, ना ती मानसीशी नीट बोलली. मामा, मामी, मानसी, सगळेजण प्रयत्न करून थकले, अगदी हताश झाले.
या गोष्टीलाही आता सहा वर्षे झाली. मानसीची दोन गोड मुले या आजी आजोबांना जिवापेक्षा प्रिय आहेत.
पोरांनाही या आजी आजोबांना भेटल्याशिवाय चैन पडत नाही. मधुराने अजूनही लग्न केलेले नाही. आणि ती आईवडिलांकडेही कधीच येत नाही.
माणसाच्या मनाचे अंदाज लागत नाहीत हे तर खरंच आहे .
आणि मनात बसलेल्या गाठी, ब्रम्हदेवालाही सोडवता येणे कठीण, हे त्याहून खरंय —–