मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परवड… भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? जीवनरंग ❤️

☆ परवड… भाग – 1 ☆ सौ. सुचित्रा पवार

गोदूबाई गेल्या शेवटी ! आयुष्याच्या सर्व कटकटीतून, दुर्भाग्यातून सुटका झाली अखेर !

गोदूबाई !गावातीलच दामाजी बुवाना दिली होती. दामाजीबुवा वारकरी – माळकरी – भजन कीर्तन पंढरीची वारी चुकायची नाही म्हणून सगळेजण बुवाच म्हणत त्याला. तरतरीत नाक, उंच -धिप्पाड शरीर , दररोज पांढरीशुभ्र परिट घडीची खळखळीत कपडे, जमीनजुमला  चिक्कार, गोठ्यात बैलजोडी, दुभती जनावरं, सोप्यात धान्याच्या थप्पी, एकूण खातं -पितं घर ; एकुलता एक पोरगा, आईवडील बस्स! एव्हढंच मर्यादित कुटुंब ;जास्त काही बघायची गरज नव्हती. खात्या पित्या घरात लेक पडत्या ना ? बास ! गोदाबाईच्या घरातल्याना तेवढंच बास होतं ; शिवाय लेक गावातच हाकेच्या अंतरावर नजरेसमोर रहाणार होती. गोदाबाई निरक्षर, कृश पण काटक देहाची, साधीभोळी, घरदार, गुरे ढोरं शेतातली कष्टाची कामे कशातच मागं नव्हती  ; हीच आपल्या लेकाचा  परपंच चांगला सांभाळील म्हणून दामाजी बुवाच्या आई वडिलांनी गोदूबाईला मागणी घातली.

लगीन हून गोदाबाई सासरी आली, गावातच सासर असल्यानं रुळायला वेळ नाही लागला. गोदुबाईंनी घराचा ताबा लगेचच घेतला  दिवसभर सारवण -पोतेरा, स्वयपाक, भांडी -धुण, दळण -जळण शेतातल्या मालाची उगानिगा गोदुबाईला काही सांगावे लागायचे नाही. घरादारात अंगणात गोदूबाईचा हात सतत हालत रहायचा, सासुसासरे खुश!

बघता बघता वर्ष दोन वर्षे गेली आता नातवंडांचं तोंड बघायचं आणि पंढरीची वारी धरायची म्हणून आस लागली पण दोन म्हणता चार वर्षे झाली तर गोदूबाईच्या पदरात देवाने काही दान दिलं नाही. त्या काळी डॉक्टर दवाखाने औषध असलं काही नव्हतं, गावातच झाडपाला, नवस, देवर्षी बघून झालं, काही उपाय चालला नाही. गोदाबाईला पण काळजी लागली होती पण तिला आशा होती ;तिच्या खानदानात कोणीच वांझोट नव्हतं सगळ्यांनाच डझनान पोरं होती. पण भावकीतल्या आया बाया गोदूच्या सासूला दबक्या आवाजात बोलू लागल्या, “येशे, ल्योक म्हातारा हुस्तोवर नातवाची वाट बघतीस का ? वाणी तिणीचा एकच हाय एकाच चार हूं देत बाई , लेकाचं दुसरं लगीन कर. “

आतापर्यँत यशोदाबाईला असलं काय सुचलं नव्हतं पण बायकांनी कान भरवल्यावर रात्रनदीन यशोदाबाईला जिथं तिथं नातवंड दिसू लागली, ‘घराचं गोकुळ व्हाया होवं ‘असं वाटू लागलं अन मग अशी कोण बरं आणावी ? म्हणून मनात खल सुरु झाला. गोदू रानात गेल्याचं बघून तिनं नवऱ्याच्या कानावर ही गोष्ट घातलीच. ल्योक तर थोडाच मर्जीभाईर होता ? दुपारच्या जेवणाला यशोदा बाई लेकाला  म्हणलीच, “आरं बुवा आमी थकत चाललो बग, तुझ्या पोटी एखादं मूल झालं की आमी काशीला जायाला बरं ! गुदीला काय आता मूल व्हायचं न्हाई तवा. . . दुसरी बायकू आणाया पायजे, तू वाणीवाणीचा योकच, एकाच दोन झालं मजी आमचं डोळ मिटलं तर चालंल. आणि आपल्याला काय कमी रं ?एक घर सांभाळल आन एक श्यात !कसं ? तू होय म्हण. ” बुवाला पण आळीत, चौकात लोकं ईचारायचीच ! बुवाच्या मागण लगीन झालेल्याना कुणाला दोन कुणाला तीन झाली होती, बुवान होकार देऊन टाकला . यशोदाबाई चा आनंद गगनात मावेना ! बुवाचा पाय हुंबऱ्यातन बाहेर पडुस्तोवर यशोदाबाई लगोलग  जावंच्या कानी लागली, “आग चम्पे ऐकलंस का ?बुवाच दुसरं लगीन करायचं म्हणतो तुज्या बघण्यात एकांदी हाय का गं ? धनधापुस नाकी डोळी नीट असली म्हंजी झालं. ” उंदरावर टपून बसलेल्या मांजरागत चंपाबाई जणू वाटच बघत होती, ती लगोलग म्हणाली, “एकांदी कशाबाय ? माज्या थोरल्या भावाची गेल्यासाली उरसाला आल्याली धुरपा काय वंगाळ हाय गं ? परक्याची आपल्या घरात घुसवण्यापेक्षा आपल्यात आपलं काय वाईट गं ?वाटीतलं ताटात सांडलं तर काय बिगाडलं ? आणि माझ्या नदरखाली पोरगी चांगली नांदल. बगा बाई, तुमचा समद्याचा इचार करून सांगा. “

क्रमशः…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रतिकृती… – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ प्रतिकृती… – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(कथा – प्रतिकृती – विज्ञान कथा या विज्ञान कथेला अखिल भारतीय विज्ञान कथा स्पर्धे मध्ये पारितोषिकाने सन्मानीत केले आहे.)

हे वाचून जॉन ची माहिती आपल्याला कशी मिळणार? कोणाची मदत घ्यावी.? हां !या हॉस्पिटल मधल्या मॅटर्निटी  मधले सगळे रिपोर्ट्स पाहायला हवेत. सगळे रेकॉर्ड्स पाहायला हवेत. इतक्या वर्षापूर्वीची माहिती मिळणार का? बघू तरी. म्हणून म्हणून तिने आपला शोध त्या दिशेने सुरू केला. वीस वर्षापूर्वी जन्माला आलेल्या बाळांची नावे, महिन्याचे रेकॉर्ड करत करत अचूक त्या दिवसापाशी ती आली. जॉन चे ना व पाचवे होते. शिवाय त्याच्या नावापुढे चांदणीची खूण केली होती. काय बरे सुचवायचे या चांदणीतून? त्या चांदणीच्या चिन्हाचा शोध घ्यायला तिने सुरुवात केली. त्या इन्स्टिट्यूट मधली अतिशय गुप्त बातमी तिला वाचायला मिळाली. त्या चांदणीची खूण म्हणजे ते बाळ” टिश्यू कल्चर”या नवीन प्रगत पद्धतीतून जन्माला आले. आहे. विशेष म्हणजे त्या बाळाची वाढ आईच्या युटेरस मध्ये नुसती झाली आहे. पण प्रत्यक्ष त्या आईचा, तो जीव निर्माण करण्यात काहीही वाटा नव्हता. फक्त वाढ करायची, त्याचे पालन पोषण करायचे. . नॉर्मल फलन प्रक्रिया इथे घडलीच नाही. टिशू कल्चर या अत्यंत प्रगत प्रक्रियेतून या बाळाचा जन्म झालाय.

त्यावेळी डॉक्टर सु झी हॉस्पिटल मध्ये जॉईन होऊन दोनच वर्षे झाली होती. सु झी ला संशोधनात खूप इंटरेस्ट होता. रोज चे पेशंट तपासत तपासत तिचे निम्मे डोके काहीतरी वेगळे करावे याचाच विचार करत असे. अचानक तिच्या वॉर्डमध्ये एक तरुण, तरतरीत महाराष्ट्रीयन मुलगा बेशुद्ध अवस्थेत ऍडमिट झाला. पाय घसरून पडण्याचे निमित्त झा ले आणि तो बेशुद्ध झाला. तो – आपल्या डॉक्टरेटचा शोध निबंध

वाचण्यासाठी पॉंडेचरी मध्ये आला होता. अन अचानक तिथे अपघात झाला. त्याच्याबरोबर त्याची काळजी घेणारे कोणी नव्हते. डॉक्टर सु झी आणि तिच्या स्टाफ ने त्याची जबाबदारी स्वीकारली. सु झीला त्या तरुणाचा चेहरा खूप आवडला. तिने तरी लग्न न करण्याचे ठरवले होते. याचा चेहरा बघून ती इतकी भूलली की अशा चेह्ऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आपल्याला असावी म्हणून तरी लग्न करावे असे तिला वाटले. पण तेवढ्यात साठी का त्या बंधनात गुंतायचे? छे छे ! नको. सु झीचे विचार चक्र जोरात फिरायला लागले. टिशू कल्चर च्या मदतीने आपण याच्या सारखे बाळ जन्माला घातले तर? यालाही काहीच कळणार नाही आणि आपली हौस फिटेल. हा आता बेशुद्ध असताना आज आपण त्याच्या शरीरातले टिश्यू प्रिझर्व करू शकू. पुढचे काम कसे करायचे नंतर पाहू आणि खरच सुहास च्या उजव्या दंडातली 5 एमजी टिशू काढून घेऊन दोन स्टिचेस घालून टाकले.

नंतर योग्य ट्रीटमेंट मुळे सुहास लवकर बरा होऊन आपल्या घरी गेला. त्याला काही पत्ताही नव्हता की आपल्या शरीराच्या प्रयोगासाठी अशा तर्‍हेने वापर झालेला आहे.

सुझीने मात्र नंतर आपल्या डि न ना आपली कल्पना सांगितली. त्या एक्स प्लांटचे इन प्लांटेशन स्वतःचा युटरस मध्ये करू घेऊन आपणच त्याला वाढवणार असल्याचे सांगितले.  

सुरुवातीला डिनअशा प्रकारच्या प्रयोगांना परवानगी द्यायला तयार नव्हते. अखेर खूप विचारांती आणि खूप गुप्तता पाळून डॉक्टर सु झिला परवानगी देण्यात आली. सु झी मोठ्या उत्साहाने कामाला लागली. तो टिश्यू तिने कल्चर मेडियम मध्ये त्याचे वाढ केली. पुढच्या योग्य त्या स्टेप्स वापरून छोटीशी सर्जरी करून सु झी च्या युटेरस मध्ये ते इम्प्लांट केले.

पूर्ण नऊ महिने सूझी डॉक्टरांच्या देखरेखी खालीच होती. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी डीन पासून नर्सेस पर्यंत सगळे जातीने लक्ष देत होते आणि अखेर दौंड मुलाच्या जन्मानंतर प्रयोगाची यशस्वी सांगता झाली. सुझीला अगदी हवा तसाच मुलगा झाला. हुबेहूब तिचा तो पेशंट !त्या बाळाचे रीत सर पालकत्व तिने मिळवले. आणि त्याला जीव लावून वाढवले.

मात्र म्हणतात ना, “रक्तातले अनुवंशिक गुण मुलात उतरतात”. इथेही तसेच झाले. हा मुलगा जरी  सुझी जवळ पांडेचरीत वाढत होता तरीआवड-निवड सगळी टिपिकल महाराष्ट्रीयन मुलाची होती. त्यात तसूभरही बदल नव्हता. सुझी ने ही त्याच्या आवडीप्रमाणे त्याला वाढवले.

तोच जॉन पॉंडेचरी हून महाराष्ट्रात इंटरव्यू साठी आला होता.

ही सगळी माहिती गोळा करता करता सुखदा चा मेंदू अगदी पुरता शीण होऊन गेला. पण सुहासला ही माहित नसलेले गुपित तिला समजले होते. हा जॉन म्हणजे सुहास चा मुलगा !. म्हणजे तिचाच. पण छे ! याला मुलगा कसा म्हणता येईल? प्रतिकृती !

आपण आरशात कसे आपले प्रतिबिंब पाहतो, कशी हा सुहास ची प्रतिकृती!

सुखदाने घड्याळात पाहिले. बापरे !रात्रीचे नऊ वाजून गेले होते. सगळा दिवस तिचा या संशोधनात गेला. एका नवीन संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वीच दुसरेच संशोधन नकळत तिच्याकडून झाले होते.

आता हे सगळे सुहासला कसे सांगायचे आणि कसे पटवून द्यायचे याचाच विचार करून ती परत आपल्या केबिन मधून गाडी कडे चालली.

ज्या उत्साहात ती सकाळी आली होती, त्याच उत्साहात पण मोठे गुपित शोधून ती घरी चालली होती. सुहास ला त्याच्या प्रतिकृती ची खबर सांगायला.

समाप्त

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रतिकृती… – भाग 3 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ प्रतिकृती… – भाग 3 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(कथा – प्रतिकृती – विज्ञान कथा या विज्ञान कथेला अखिल भारतीय विज्ञान कथा स्पर्धे मध्ये पारितोषिकाने सन्मानीत केले आहे.)

काय बरे करावे? सुखदा ला काही म्हणजे काही सुचेनासे झाले. आज तिचे कशातच लक्ष लागत नव्हते. दुपार झाली तरी स्वतःचा टिफिन ही तिने खाल्ला नाही. रोजच्याप्रमाणे घरी फोन सुद्धा केला नाही.

डायरेक्ट सुहासला विचारावे का? मनाला तरी पटते का ते ‘? काय विचारणार? इतक्या वर्षांचा सहवास इतका तकलादू का आहे? कसे जमायचे आहे? ऑन एवढा कसा सुहास सारखा? नेमका इथेच कसा आला? याचा ट्रेस कसा लावायचा? सुख दाला काही समजेना.

शांतपणे विचार करायला लागल्यावर तिला हळूहळू एक मार्ग दिसायला लागला. तू विचार अतिशय संयमाने आणि आपल्या ऑफिसच्या वजनाचा वापर करून ऑफिसला विश्वासात घेऊन, मदत घेऊन कसा सोडवायचा हे तिला सुचायला लागले. अगदी त्याच प्रोसिजरने तिने जायचे ठरवले.

उगाच आकांडतांडव करून, त्रास करून घेऊन किंवा भलतेसलते विचार करून हा प्रश्न निश्चितच सुटणार नव्हता. मनाशीठाम निर्णय करून सुखदा उठली. गार पाण्याने तोंड धुतले आणि ती फाईल घेऊन आपल्या सिनिअर ऑफिसर यांच्या केबिनकडे निघाली.

तिला येताना पाहताच दारातला शिपाई पुढे आला आणि हातातली फाईल घेऊन म्हणाला, “मॅडम आपण का आला? मला बोलवायचे ना!” ” अरे नुसती फाईल द्यायची नाही. आपल्या साहेबांची काही गोष्टी बोलायच्या आहेत. “त्यांनी साहेबांच्या केबिनचे दार उघडले. सुखदा साहेबांसमोर आली, ” का मॅडम काही विशेष काम? या बसा. “

साहेबांच्या टेबलासमोर च्या गुबगुबीत खुर्चीत बसत सुखदानेआपले काम, प्रॉब्लेम सांगायला सुरूवात केली, ”  सर, आजच्या उमेदवारांमधून या जॉन राईट ला सिलेक्ट करावे असे मला वाटते. पण सर, प्रॉब्लेम आहे एक. याचे नाव जॉन राईट. याच्या आई ची पूर्ण माहिती मिळाली. पण वडिलांचा रिकामाच आहे. त्याची आई ही माहिती द्यायला तयार नाही मी प्रयत्न केला. सर, आपल्या इन्स्टिट्यूट मधला रिसर्च इतका महत्त्वाचा आहे. कुठेही जराही होता कामा नये. आपल्या देशाच्या दृष्टीने ही हे घातक आहे. याचे वडील कोण? कुठले? याचा त्यांच्याशी किती संबंध आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या कामात काही अडथळे निर्माण करणार नाही ना, एवढे पाहिले पाहिजे. म्हणून मी आपली परवानगी मागायला आले. “

सुखदाने आपल्या कामाचा इतका सखोल विचार केल्यास पाहून त्यांना कौतुक वाटले. “ठीक आहे. त्यासाठी काय करायला हवे असे वाटते तुम्हाला? काही मदत हवी आहे का? ” “हो सर, त्याच्या बर्थ सर्टिफिकेट वरून आपण त्याचा जन्म कुठे झाला ते ड्रेस करू शकतोआणि त्या हॉस्पिटल मधून आईवडिलांची नावे माहिती मिळवू शकतो. ऑफिस च्या परवानगीने चौकशी करता आली तर पटकन माहिती मिळेल. तेवढी परवानगी हवी आहे सर. ” “ठीक आहे तुम्ही करू शकता. “” थँक्यू सर, येऊ मी? ” म्हणत सुखदा उठली.

तिच्या मनावरचे ओझे एकदम उतरल्यासारखे झाले. केबिनमध्ये घेऊन प्रथम ये घरी फोन मला घरी यायला उशीर होईल, कदाचित रात्रही होईल असे सांगितले. लगेच कॉम्प्यूटर पुढे येणे कामाला लागली. इंटरनेटवर पांडेचरी हॉस्पिटल ची फाईल तिने वाचायला सुरुवात केली. एक खूप जुने मोठे हॉस्पिटल होते ते. बऱ्याच वर्षापासून रिसर्च सुरु आहे. आपल्याकडे मुंबई बेंगलोर हैदराबादला ज्या ब्रांचेस आत्ता सुरू होत आहेत त्या िथे बर्‍याच आधीपासून सुरू आहेत. त्या वेगवेगळ्या ब्रांचेस वाचता वाचता”जेनेटिक इंजीनियरिंग”  इकडे तिचे लक्ष गेले. त्या ब्रँच मध ले सगळे रिसर्च पेपर्स शोधायला तिने सुरवात केली. टिश्यू कल्चर, टोटीपोटेन्सी, कॅलस, हॉर्मोनाल ट्रीटमेंट. अरे बापरे! किती पुढे गेले हे क्षेत्र! त्यामानानं आपण किती मागे आहोत अजून. सुखदा च्या मनात येऊन गेले.

क्रमशः…

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रतिकृती… – भाग 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ प्रतिकृती… – भाग 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(कथा – प्रतिकृती – विज्ञान कथा या विज्ञान कथेला अखिल भारतीय विज्ञान कथा स्पर्धे मध्ये पारितोषिकाने सन्मानीत केले आहे.)

तासामध्ये सहा उमेदवार झाले .

पण तिच्या मनासारखा काही येईना.कोणाला फर्स्टक्लास आहे पण आपल्याच विषयातले नॉलेज नाही. ज्याला नॉलेज आहे तो किंवा ती इंग्रजीमध्ये एक्सप्लेन करू शकत नाही. एक बोलली छान. पण तिला क्लास नाही.आपल्याला एकही चांगला असिस्टंट मिळू नये का? सुखदा मनात थोडी खट्टू झाली.

नेक्स्ट …म्हणताच” मे आय कम इन मॅडम?”सुखदाने नाव वाचले. जॉन राईट.अरे, एखाद्या क्रिकेटियर सारखेच नाव आहे की. आणि हा आपल्या भारतात?जॉन राईट? सुखदाने मान वर केली आणि आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसून तिच्या हातातले पेन खाली पडले. अगदी वीस वर्षापूर्वीचा सुहास! त्याच्याकडे पाहतच राहिली सुखदा. एवढी सेम टू सेम पर्सनॅलिटी असू शकते? कसं शक्य आहे हे? सुहास न आपल्याला  फसवलं?छे छे ते तर अशक्यच. मग काय पाहतोय आपण हे?

“मॅडम मेआय कम इन प्लीज?”   या प्रश्नाने सुखदा भानावर आली .” ओ … यस.. कम इन .. सीट डाऊन”

थँक्यू मॅडम.

त्याच्या चेहऱ्यावरून सुखदा ची नजर हटतच नव्हती .जॉन राइट सुहास सारखा कसा?.सुखदा ला काही समजेना. मॅडम, ही माझी सर्टिफिकेट्स!

आपल्या हातातील प्लॅस्टिक कव्हर ची फाईल पुढे करून जॉन बोलला .सुख दाआणखीनच दचकली .हा किती सहज मराठी बोलतोय .

“मॅडम एनी प्रॉब्लेम?” माझा बायोडाटा पाहताय ना?”जॉन सुखदा ला विचारत होता.पाठोपाठ आश्चर्याचे जबरदस्त धक्के बसल्याने तिला काही सुचत नव्हते.

ठीक आहे .याची माहिती तर काढू .असा विचार करून एकदा त्याचे निरीक्षण करत करत त्याचा बायोडाटा पाहू लागली . नाव – जॉन . एस . राईट .मधले sअक्षरसुखदा च्या नजरेत चांगल च झोंबल . आईचे नाव :डॉक्टर सूझी राईट .

वडिलांचं नाव – – – ( डॅश ? ) .जन्मस्थळ पॉंडेचरी .

ओ S पाँडेचेरी? सुहास त्याच्या डॉक्टरच्या पेपर प्रेझेंटेशन साठी गेला होता ना पाँडेचरीला ?नेमकी ती वर्ष कशी जुळत आहेत ?काय बरं प्रकार आहे ?

जॉन चं -शिक्षण त्याचं बोलणं इतकं इंप्रेसिव्ह होतं की त्याला सिलेक्ट न करण्याचं काही कारणच नव्हतं .पण याच्या दिसण्याचा काय प्रकार आहे ?बोलतो ही किती सुहास सारखं? त्याच्या जन्माचे रहस्य कसं काय शोधून काढायचं?

“मिस्टर जॉन तुम्ही पॉंडेचरी चे ना! इतक्या लांब महाराष्ट्रात कसं काय येणार? मराठी कसं काय बोलता?”

“मॅडम मला लहानपणापासून महाराष्ट्राची खूप  ओढ आहे . वेड आहे . माझी आवड बघून मॉ – मनच मला कॉम्प्युटर वरून मराठी शिकण्याची संधी दिली .शिकताना मला विशेष प्रॉब्लेम नाही आला   .माझी मॉम तिथल्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहे .”

“रियली? तुझ्या माॅमला मला भेटायलाच पाहिजे. तिचा , अॅडरेस, फोन नंबर ,  ई मेल ऍड्रेस देणार का ? “सुखदाने लगेच धागा पकडला आणि त्याच्याकडून लिहूनही घेतला.

पुढच्या मुलाखती तिन गुंडाळल्याच.

पटकन आपल्या कॉम्प्युटर पुढे येऊन इंटरनेटवरून ॲड्रेस शोधून काढला .लेटर टाईप केले .”जॉनला  जॉब मिळत आहे . पण त्याच्या वडिलांचं नाव, पत्ता, ते काय करतात कळ ले तर बरे होईल .”

 पण छे ‘ ! इतका अवघड प्रश्न असा चुटकी सारखा कसा सुटेल ?तिकडून उत्तर आले,” सॉरी . ते नाव गुप्त ठेवायचे आहे . सांगू शकत नाही .”

 क्रमशः…

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रतिकृती… – भाग 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ प्रतिकृती… – भाग 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(कथा – प्रतिकृती – विज्ञान कथा या विज्ञान कथेला अखिल भारतीय विज्ञान कथा स्पर्धे मध्ये पारितोषिकाने सन्मानीत केले आहे.)

नेहमीच्या उत्साहात सुखदा कार ड्रायव्हिंग करत होती. या इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल तीस वर्षे ती जॉब करते आहे. पण रोज आपण जॉईन होतोय याच मूडमध्ये ती घेत असे.

आज तर काय, ती स्वतः आपल्या हाताखाली काम करण्यासाठी ज्युनियर सायंटिस्ट या पोस्ट साठी मुलाखती घेणार होती ड्रायव्हिंग करता करता आपल्या करिअरचा सतत वर धावणारा आलेख तिच्या डोळ्यासमोर आला. शाळा -कॉलेज -पोस्ट ग्रॅज्युएशन -रिसर्च – जॉब अन मग लग्न -दोन सुंदर मुली -प्रमोशन. आणखी काय हवं माणसाला आयुष्यात?

सुहास सारखा तिला, तिच्या बुद्धीला आणि व्यक्तिमत्वाला समजून घेणारा साथीदार मिळाला म्हणून तर एवढे शक्य झाले. नाहीतर आपली मैत्रीण माधवी, आपल्या पेक्षा हुशार असून घरी  स्वयंपाक पाणी तेवढेच करत  बसली इतकी वर्ष.

पुअर माधवी !जाऊ दे ! बॉबकट चे केस उडवत सुखदाने तो विचार बाजूला टाकला.

आपल्या हाताखाली, काम करायला कोणाला बरं  निवडावे ?मुलगा की मुलगी ?कोणी का असेना, असिस्टंट हुशार, , चटपटीत, तल्लख आणि आवडीने काम करणारा पाहिजे. नुसत्या फेलोशिप च्या पैशात इंटरेस्ट असणारा नको. काय काय प्रश्न विचारायचे, कशाला महत्त्व द्यायचे हा विचार करतच इन्स्टिट्यूटच्या सुरेख वळणावरून आपली कार वळवुन पार्क केली आणि आपली पर्स घेऊन ती आपल्या केबिनमध्ये आली.

रोजच्याप्रमाणे आल्या आल्या तिने आपला ड्रॉवर उघडला आणि गणपतीच्या छोट्याशा मूर्तीला त्याचबरोबर आई-बाबांच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला.

लहानपणापासून गणपती तिचे आवडते दैवत !आणि त्याने दिलेल्या चांगल्या बुद्धीला खतपाणी घालणारे, आपल्या सगळ्या धडपडीला प्रोत्साहन देणारे, खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे आई बाबा म्हणून न चुकता सुखदा आपल्या या दैवतांना वंदन  करी.

‘मॅडम आत येऊ ?आज आपण मुलाखती घेणार ना ?दहा उमेदवार बाहेर आले आहेत. पाठवू का त्यांना एकेक करून ?’ तिची सेक्रेटरी विचारत होती. ” हो, जरूर करू या सुरवात. जेवढे हे काम लवकर होईल तेवढे बरे ना !दुपारच्या आत हेड ऑफिसला कळवता येईल आपल्याला. “”ओके मॅडम. ही या दहा जणांच्या नावांची त्यांच्या क्वॉलिफिकेशन ची लिस्ट! मी पाठवते त्यांना”.

आपल्या पर्सच्या छोट्या आरशात सुखदाने आपला चेहरा पाहिला. हो नाहीतर उमेदवार पॉशआणि मुलाखत घेणारी बावळट असे नको व्हायला. ग्लास मधले थंडगार पाणी पिऊन आपले प्रेम आणि पेपर पॅड घेऊन मुलाखत घ्यायला सुखदा सरसावून बसली.

क्रमशः…

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खार….भाग 5 ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ खार….भाग 5 ☆ मेहबूब जमादार ☆

तो दिवस उजाडला.ज्या दिवसाची ती वाट पहात होती.आज तिच्या पिल्लानीं तिच्याबरोबर पाचसहा झाडांचा प्रवास केला होता.सरसर…सरसर ती झाडावरून खाली बुंध्यावर यायची.क्षणात ती दुस-या झाडाच्या शेंड्यावर जायची.दोघात ईर्षा लागायची.हे सारं ती आनंदात पहात बसे.

आता ती वर्षाची झाली होती. ती चपळपणे झाडांवर झेप घ्यायला शिकली होती.त्यानां लागणारं अन्न ती खायला शिकली होती. लागणारं अन्न ती मिळवायला शिकली होती.

वानरांची टोळी पंधरा दिवसानीं वनात अगदी ठरल्यासारखी येई.सगळ्या झाडांवर ते नाचत.एकमेकाशी भांडत.खचितच दात वेंगाडून तिच्याकडे पहात.सहसा अंगावर येत नसतं.

पिल्लांपोटी तिला वाटणारी भिती हळूहळू निघून गेली होती. पिल्लं आता स्वतंत्र झाली होती. दिवसा ती जवळच्या झांडांवर बागडायची,खेळायची.सूर्यास्त होण्याआधी ती घरट्याकडे परत फिरायची.

सूर्य बराच वर आला होता.वनातील सारे पक्षी अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडले होते.मोरानीं शेजारच्या ऊसात जाणे पसंद केले होते. त्यांची छोठी पिल्लं व लांडो-या ही त्यांचे सोबत असत.

ती, तिची पिल्लं व तिच्या सहकारी खारी सोडल्या तर सारे बाहेर होते.वनांत कांही पक्षी पाहूणे म्हणून यायचे.

ती पिंपळाच्या शेंड्यावर बसून होती.

अचानक एक शिकारी तिला वनांत शिरतानां दिसला, तशी ती घाबरली. ती जोरात चित्कारली.आवाज ऐकून तिची पिल्लं तिच्याजवळ आली.दुस-या खारी लपून बसल्या.कांही पक्षानीं आपली मान उंच केली.खाली वनांत त्यानीं शिका-याच्या पावलांचा आवाज ऐकला.तो दबकत दबकत झाडावर पहात चालत होता.

कांही वेळ गेला.तिनं ठो…ठो…असा आवाज ऐकला.क्षणात, एक पक्षी तिला खाली पडलेला दिसला.तिचं सारं अंग शहारलं.तिनं बारकाईनं पाहिलं. त्याच्या हातात पूर्वीसारखी गलोरी नव्हती.पुढच्या नळीतून नेम धरून तो सावज टिपत होता.ती जिथं बसली होती.तिथून शिका-याला दिसत नव्हती.

त्या शिका-याकडे असणा-या हत्याराशी स्पर्धा करणं शक्य नव्हत.याची तिला जाणीव झाली.वनांत बरेचदा ठो…ठो… असे आवाज झाले.पडलेल्या पक्षांचे अगदी कांही क्षण चित्कार तेवढे ऐकू आले. पण ज्यावेळीं शिकारी वनांतून ओढ्याकडे गेला.त्याच्या हातात दोन पारवे अन दोन खारी होत्या.                                          

हे सारं पाहून आज खरंच ती खचली होती.ती जरी स्वत:ला अन तिच्या पिल्लानां वाचवू शकली असली तरी तिचे दोन सहकारी तिने गमावले होते.तिला याचं फार दु:ख झालं होतं.दिवसभर ती उदास होती.ना तिनं काय खाल्लं ना ती घरट्यांतून बाहेर पडली.

या घटनेनं तिचं मन सैरभैर झालं होतं!

तिला इथं रहावसं वाटत नव्हतं.तरीही तिचं मन हे घरटं सोडण्यास राजी नव्हतं.      

उजाडताच तिच्या सहकारी खारीनीं पलिकडच्या वनांत जायचं ठरविलं होतं.त्यानुसार ते संचार करत हळूहळू निघाले होते. तर कांही पलिकडच्या वनांत पोहचलेही होते.

पक्षांचा तर काहीच प्रश्न नव्हता.ते दिवसा मूळात असायचेच कमी.शिकारी आला तर ते भूर्र..कन ऊडून जायचे.

तिनं विचार केला आजची रात्र इथंच काढायची.ऊद्या हे घरटं अन पिंपळाचं झाड सोडायचं.रात्री तिला झोप लागली नाही.सारा भूतकाळ आठवत ती जागीच राहीली.तिच्या मनांत ब-याच प्रश्नांनी गोंधळ केला होता.

आपण जातोय खरं,

‘पण ते वन सुरक्षेच्या कारणास्तव भरवशाचं असेल का!

‘कांही नवीन झाडे,तिथे नवीन फळे मिळतील का?’

‘कदाचित तिथे घरट्यासाठी ऊंच झाडे असतीलही.’

पण हा सारा जरतरचा प्रश्न होता.

ब-याच प्रश्नांनी तिच्या मनांत गर्दी केली.शेवटी तिनं पिल्लानां विचारलं, पिल्लं एका पायावर हे वन सोडणेस तयार झाली.

नाविन्य सर्वांनाच भूलविते.भले तो माणूस असो वा प्राणी.

अजूनही तिचं मन भूतकाळांत होतं.तिच्या बालपणीचा काळ तिला आठवला.मागच्या भल्या-बू-या घटनांनी तिला व्याकूळ केलं.तिचे जातवाले तर कालच सा-या आठवणी काळात बुडवून पसार झाले होते.

मोठ्या खिन्न मनांन ती निघाली होती.घरटं सोडतानां तिला उचंबळून आलं.गेले सात ते आठ वर्षे ती या घरट्यात सुरक्षित होती. तिच्यापुढे प्रश्न बरेच होते.

नवीन घरट्यासाठी चांगली जागा मिळेल का?

तिथे सुरक्षीतता लाभेल का?

का? तिथेही शिकारी येतील?

हे सारे प्रश्न घेवून पुढे चालली होती.तिची पिल्लं तर एक-दोन झाडं पुढंच होती.

ती मात्र पुढचा काळ कसा असेल याची कुठलीच खातरजमा न करता सावकाशपणे निघाली होती…….मागे न बघता ….मागचा पुढचा विचार न करता……..!!!

समाप्त

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खार….भाग 3 ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ खार….भाग 3 ☆ मेहबूब जमादार ☆

सगळ्यांनी आपला मोर्चा फांदीवरून उड्या घेत जवळजवळ शंभर फूट लांब असलेल्या रानटी झाडाकडे वळविला.झाडांवर गोल गोल पिवळी फळे लगडली होती. सगळ्यानीं त्यावर झेप घेतली.ती फळे कुरतडुन खाण्याचा त्यानीं सपाटा लावला.सा-याजणी गाभा फस्त करत अन बिया खाली टाकत.खाली बियांचा बिछाना पडत होतां.

पोट भरल्यानंतर त्यानीं परतीचा प्रवास चालू केलांं.कांही सरसर…झाडावरून खाली उतरल्या.खालच्या पाचोळ्यावर त्यानीं बैठक मारली.भोवतालचे निरीक्षणं केलं अन त्या ओढ्याकडे पाणी पिण्यासाठी गेल्या.त्या पाणी प्यायल्या.काहीनीं पाणी घेवून एकदोनदा डोक्यावरून हात फिरविला.

दिवस मध्यान्हात होता.परत सरसर करीत त्यानी झाड गाठलं.तिनं मात्र घरट जवळ केलं.ती त्यात पहूडली.

सायंकाळी फिरत असता तिला जवळच जांभळाच झाड दिसल.निळीभोर जांभळ पिकलेली होती. तिनं बरीच फळं खाल्ली.येतानां तिनं कांही पानं,गवताच्या काड्या सोबत आणल्या होत्या.तिचा प्रसव काळ जवळ आला होता.त्याचीच ती तयारी करत होती. कांहीवेळा वा-याने उडून आलेले रूईच्या झाडांवरील बोंड ही ती गोळा करत होती.तिच्या घरट्यात आताशा मऊमऊ बिछाना तयार झाला होता.

दिवस पुढे जात होते.सारं वन ते पहांत होता. तीं ही बारकाईनं वनांच निरीक्षण करत होती.आंता ती जाड झाली होती.प्रसूतीचां काळ अगदी जवळ आला आहे असं तिला वाटू लागलं होतं.

ती रात्र कशीबशी तिनं कण्हत काढली.उजाडताच तिला राहवलं नाही.तिच्या तोंडातून असह्य असे चित्कार बाहेर पडू लागले.तिच्या सहका-यानीं ओळखलं.हळूहळू तिच्या घरट्याकडे पाच-सहा खारी गोळा झाल्या.एक म्हातारी खार तिच्या घरट्यात शिरली.ती तिच्या डोक्यावरुन व पाटीवरून हात फिरवत होती. ती तिच्या नजरेला नजर देत असह्यपणे चित्कार करत होती.                            

कांही वेळातच तिनं दोन गोंडस पिल्लानां जन्म दिला.इंच-दिड इंचाची पिल्लं पहाताच ती हरखून गेली.पिल्लानां ती चाटू लागली.तिनं पिल्लानां जवळ घेतलं.कारण त्यानां ऊबेची गरज होती. ती अशक्त झाली होती.निपचिप घरट्यात पडून होती.

त्या दिवशी तिनं कांहीच खाल्ल नाही.ती पिल्लानां पाहून फारच खूशीत होती.तो दिवस अन पूर्ण रात्र अशीच गेली.त्या पिल्लांचा श्वास सोडला तर जिवंतपणाचं त्याच्यात कुठलंही लक्षण नव्हतं.इवल्याश्या पिल्लांच संगोपन करणं एवढं सोप नव्हतं.पिल्लं एका महिन्यानंतर डोळं उघडणार होती.तिला या काळात तिच्या सहका-यानीं बरीच मदत केली.

तिला हवी असणारी छोटी छोटी फळं तिनं आधीच घरट्यात आणून ठेवली होती. पाला अन कापूसही घरट्यात होता. रात्र होताच ती पिल्लांना अगदी जवळ घेई.

पिल्लांना अन्नापेक्षा तिच्या गरम ऊबेची गरज होती.भूक लागली की ती लोचत होती                       

आठवडय़ानंतर ती आज बाहेर पडली. जवळच असणा-या चिंचेच्या झाडावर तिनं झेप घेतली.तिनं छोटय़ाशा चिंचा कुरतडल्या.तसेच चिंचेचा कोवळा पाला तर ती ब-याच दिवसानंतर खात होती. मोकळ्या हवेत ती आनंदली होती. अजून कांही झाडांवर जावं,सहका-याबरोबर खेळावं असं तिला क्षणभर वाटलं.पण लगेच तिला पिल्लं आठवायची.क्षणांत ती पिंपळ जवळ करायची.घरट्यात शिरायची.पिल्लं वाट पहात असायची.

हळूहळू पिल्लं वाढू लागली होती.तिच्या घरट्यात ऐसपैस जागा होती. त्यात असणा-या गादीवर ती दोन्ही पिल्लानां घेवून मजेत जगत होती.

ती आज चार-पाच झाडांच्या फांद्यावरून झेप घेत जांभळाच्या झाडावर आली होती.झाडांवर छानपैकी जांभळ पिकली

होती. तिच्या सह बरेच पक्षी जांभळांचा आस्वाद घेत होते. जांभळ खात होती. बिया खाली टाकत होती.ती खाण्यात दंग होती.

क्रमश:…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खार….भाग 2 ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ खार….भाग 2 ☆ मेहबूब जमादार ☆

एखदा एका नागानं तिचा हा चक्रव्युह भेदण्याचा प्रयत्नं केला होता,पण मोरांने त्याला रक्तबंबाळ केलं होतं. त्याला पळताभूई थोडी झाली होती. अगदी शर्थीने निसटून त्यानं त्याचा जीव वाचवला होता. जवळच्या घळीत तो अदृष्य झाला होता. तिनं निवडलेले घर निश्चितच धोकादायक नव्हतं.

सूर्य मावळतीकडे झूकू लागला होता.

ती झाडाच्या शेंड्यावर बसून वन पहात होती. तिच्या कानांवर फांद्यांचा मोठा आवाज येवू लागला. तिला कळून चूकलं वानरं जवळ येत असल्याचं. ती पंधरा ते वीस वानरांची टोळी होती. झाडांच्या फांदंयानां ते हलवून सोडत. ख्यॅ. . . ख्यॅ…. . करत तिच्याही अंगावर येत. ती झरकन आपलं घरटं जवळ करी. कांही वेळांतच हा कळप पुढच्या झाडावर सरके. या वानरांच्या मर्कट लीलानां अंत नसे. जणू काय वन आपलंच आहे असं ते वागत. छोट्या कै-या,जांभळ,पेरू, अशा अनेक झाडावरची फळे तोडत. त्यातली थोडीसीच खात. उरलेली अर्धी खाली भिरकावून देत. एखादा गरजू ते खाईल हे त्यांच्या डोक्यातच नसे. खचितच ही टोळी झाडावरून खाली उतरे. ओढ्याच्या काठावर जावून बसे. ते इकडेतिकडे पहात. कानोसा घेवून मगच पाणी पित. क्षणात झाडावरती पसार होत.

दिवस पुढे जात होते. पण आज तिला कांहीस उदास वाटू लागलं होतं. तिची समागमाची इच्छा तिचं मन सैरभैर करून सोडी. ती नराच्या शोधात फांदीवर बसून राहीली. ती चिर्र…. असा आवाज काढे,शेपटी इकडून तिकडे नाचवे. नराला बोलविणेचे हे संकेत होते. दोन जोडीदार तिच्याकडे आले. पैकी एक लगट करू लागला. तिला तो कांही वेळ धरू पाहे,पण लगेच अंगावरून ऊठे. ती ऊटली तिनं तिचं तोंड त्याच्या तोंडाजवळ नेलं. बहूधा ती म्हणाली असेल,अरे आवरनां,मी कितीवेळ अशी बसून आहे’. जोडीदाराला ती काय म्हणतेय ते कळलं असावं. त्यानं पुढच्या दोन्ही हातानीं तिला मागून उचललं. तिनं शेपूट बाजूला केलं. तीनचार मिनीटं दोघांच्या तोंडातून चित्कारण्याचा आवाज येत राहीला. दोघं अलग झाले. ती खूशीत घरट्याकडे वळली.                         

असं त्या आडवड्यात दोन चारवेळा घडलं. निसर्ग नियमांनूसार सारं कांही घडत होतं. त्याला ती अपवाद नव्हती.

महिन्याभरातच ती गरोदर असल्याचे तिला कळून चूकले. थोडंस आता सांभाळायला हवं हे तिला पटलं.

कांहीच दिवस उलटले. तिचं अंग आताशा जड होवू लागलं होतं. पहिल्यासारखं तिला झाडावर सरसर चढता येत नव्हतं. या फांदीवरून दुस-या फांदीवर तिला ऊड्या मारता येत नव्हत्या.                     

आज ती कांहीशा विचारात होती. घरटं सोडून शेजारच्या फांदीवर निवांत पहूडली होती. फांदीवर तिनं पुढचे दोन्ही हात व मागचे दोन्ही पाय दोन्ही बाजूस टाकले होते. ती सगळीकडे लक्ष ठेवून होती. खाली पहाताच तिच्या लक्षात आलं,एक साळूंखी ती राहतेल्या झाडाच्या बुंध्यापाशी कांही जमीन उकरत होती. तिच्या लगेच लक्षात आलं,तिनं मागच्या आठवडय़ात कांही बिया तिथं पूरून ठेवल्या होत्या. ती गरोदर असलेने पुढच्या अन्नाची तिला गरज होती. ती लगेच खाली आली. तिला पहाताच साळूंखी भूर्रकन उडून गेली.

साळूंखीनं उकरलेल्या बिया तिनं पुन्हा उकरून खाली घातल्या. परत त्यावर माती टाकली.                      

प्राण्यांत दुस-यांच चोरून खाणं हे सर्रास घडे. आता या सगळ्यांची काळजी घेणं ही तिची जबाबदारी होती. तिचा जोडीदार कामांपुरता आला होता. पुढचं सारं तिलाचं कराव लागणार होतं.

परत ती फांदीवर त्याच परीस्थितीत जावून पहूडली. तिचा डोळा केंव्हा लगला हे तिलाच कळलं नाही.

पक्षांच्या आवाजानं ती ऊटली. सारं झाड पक्षानीं भरून गेलवतं. हळूहळू अंधार वनाला लपेटू लागला होता. जसा पूर्ण अंधार वनांवर दाटलां तसा पक्षांचा आवाज बंद झाला. सगळीकडं सामसूम झाली. ती घरट्यात जावून शांतपणे झोपी गेली.

सकाळ ऊजांडली. तिनं घरट्यांतून पाहिलं. तिचे सारे सहकारी फांद्यांवर इकडेतिकडे झेप घेत होते. चिर्र. . चिर्र. . . असा चित्कार सगळीकडं ऐकू येत होता.

ती घरट्यांतून बाहेर आली. तिनं शेपटीचा झुबका दोन तीनदा हलवला. ती सगळ्या सहका-यामध्ये सामील झाली.

क्रमश:…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खार….भाग 1 ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ खार….भाग 1 ☆ मेहबूब जमादार ☆

ते ब-यापैकी घनदाट वन होतं.त्या वनातून वहाणारा सुंदरसा ओढा छान अशी वळणं घेत वनाबाहेर पडत असे.दोन्ही बाजूस असणा-या झाडांनी त्याला कवेत घेतलेलं. किंबहूना  त्याच्या पाण्यामूळेच ते वन वाढलेलं.सगळी झाडं तिथं गुण्यागोविंदानं नांदत होती.कांही रानटी झाडें तर कांही जांबळ,आंबा,सिताफळ,पेरू अशी फळवर्गीय झाडें गर्दी करून होती. मूळात वन निसर्गनिर्मित होतं.

सूर्य उगवला तरी चूकूनच त्याची किरणं झाडांच्या पायाशी खेळत.सूर्य डोक्यावर आला की तो वनांत ब-यापैकी तळांशी यायचा.झाडांच्या फांद्यानां चकवत. फांद्या डोलतील तशी किरणं डोलायची. वनांतलं वातावरण नेहमीच थंडगार असायचं.ओढ्याचं पाणी काठावरल्या झाडांच्या सावल्या घेवून पुढें पुढें सरकायचं.पाणी इतकं स्वच्छ की ओढ्याच्या तळातील गोल गोल गोटे,निरनिराळ्या प्रकारचे मासे प्रसंगी रेतीही दिसून येई.क्वचित बगळे भक्षासाठी काठांवर बसलेले असत.मासा पाण्यावर दिसताच ते अलगद पकडत.

वन फारसं मोठं नव्हत.बरीचशी झाडें इर्षेपोटी उंच वाढलेली.या झाडावरती मोर ,लांडोर, बगळे, कावळे, टिटवी, कोकिळा, पारवे,चिमण्या, सुतारपक्षी, साळूंख्या हे सर्वजन गुण्यागोविंदानं नांदत होते.प्रत्येकजन आपआपलं झाड निवडून आपलं राज्य प्रस्थापित करून होतां.कधीमधी वानरांची टोळी दंगा करायला यायची.थोडे दिवस थांबून निघून जायची.

थोडंस झुंजूमुंजू झालं.अवघ वन जागं झालं.मोरांचा आवाज वाढला.पक्ष्यांचा कलकलाट वाढला.आवाजाचं मधूर गुंजन सारं वन स्तब्ध होवून ऐके.हळूहळू पांगापांग होवू लागली.जो तो अन्नाच्या शोधार्थ घरट्यांतून बाहेर पडू लागला. 

हे सारं दृश्य मोठ्या पिंपळावरच्या ऊंच बिळातून(घरट्यातून) बाहेर येत एक खार आपल्या तीक्ष्ण नजरेनं पहात होती.राखाडी रंगाची,अंगावर तीन पांढरे पट्टे ल्यालेली व झुपकेदार शेपूट असलेली.खालच्या दोन पायावर बसून ऐटदारपणे ती वनांकडे पाही.

रोज  संध्याकाळी गजबजलेलं वन उजाडताच कुठं गायब होतं हे तिलाच कळत नव्हतं.ती जादातर पांच-दहा झाडावरती फिरून येई.आज फिरतानां तिला पेरूचं झाड दिसलं.तिनं मनसोक्त पेरू कूरतडले.त्यातला गाभा खाल्ला अन बिया खाली टाकून दिल्या.खात असता तिनं चिर्र…..असा आवाज दिला,शेपटी ऊंचावली.आवाज ऐकताच ब-याच खारी त्या झाडांवर झेपा टाकत आल्या.पेरूतला गाभा खायचा अन बिया खाली टाकायच्या.परत खाली जावून पुढच्या हातानीं उकरून त्या पुरायच्या.

हे सारं करत असतानां तिची चाणाक्ष नजर सभोवताली असे.कांही आवाज आला तर सर्र…दिशी ती झाडावर चढे.शेंड्यावर जावून बसे.

शेंड्यावर बसून ती ओढा न्याहाळत होती.तिला भला मोठा नाग ओढ्याच्या काठांवरून वनांत शिरतेला दिसलां.त्याच्या तोंडात बेडूक होता.बिचारा सुटण्याचा प्रयत्न करत होता,पण नागाने त्याच्या अणकुचीदार दातांनीं त्याला घट्ट धरलेलं होतं.

तिनं हे पाहिलं.तिचं सारं अंग शहारलं.तिनं दोन- तीनदा आपली शेपुट इकडेतिकडे नाचवली.तिनं जागा सोडली नाही.आता तर त्या नागाने बेडूक पूर्ण गिळला होता.हळूहळू त्याची चाल मंदावली होती.पण पुढं कांहीतरी संकट त्याला जाणवलं असांव.तो क्षणांत एका घळीत शिरून अदृष्य झाला.प्रत्येकजण आपल्या जीवाला सांभाळतो,हे तिला कळून चूकलं.                       

ती शेंड्यावरून खाली आली.ती आपल्या घरी जाणार तोच तिला एक शेतकरी आपले दोन बैल पाणी पाजण्यासाठी उतारावरून ओढ्याकडे येत असलेला दिसला.त्या वनांत हिच एक वाट होती.गुरंढोरं,शेळ्यामेंढ्या त्या वाटेने येत.पाणी पिवून जात.

तिला माहित होते, आपण चाणाक्ष नजरेनं सारं पाहिलं पाहिजे.वनांत सावज होते तसे शिकारीही होते.

तिला आठवलं मागच्या बाळंतपणांत नागाने तिच्या दोन्ही पिल्लांचा फडशा पाडला होता.ती ओरडली.चित्कारली.दु:ख करण्यापलिकडे तिला कांहीच करता आलं नाही.ती एकच करू शकली, तिनं तीचं घर बदललं.उंच अशा पिंपळाच्या झाडावर ती रहायला आली.तिला तिथं कांहींस सुरक्षित वाटायचं.त्याच झाडांवर मोरांचा अड्डा होता.कांही सुतार पक्षी रहात होते.नागाची आता तिला भिती राहीली नव्हती.

क्रमश:…

© मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘झुळूक’ – भाग-३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ ‘झुळूक’ – भाग-३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- मी आता त्याना एकटक न्याहाळत राहिलो. ते मला वेगळेच वाटू लागले. देवासारखे. खिशातून औषधे बाहेर काढणारा माझा हात तसाच घुटमळत राहिला. ती औषधे त्यांना दाखवायची मला आता गरजच वाटेना. “व्हॉट इज दॅट?” डॉक्टरांचं लक्ष माझ्या हाताकडे होतंच. )  

“मी सध्या ही औषधं. . ” मी काहीसं घुटमळत औषधं त्याना दाखवली. ती पाहून त्यानी परत दिली आणि ते प्रिस्क्रिप्शन लिहू लागले.

“ती औषधं बरोबर आहेत पण डोस थोडा माईल्ड आहे. तुमच्या खोकल्याशी तुमची फ्रेंडशीप झालीय. ती या माईल्ड डोसला जुमानत नाहीय. अर्लीअर रुटीन इन्फेक्शन आता क्राॅनिक स्टेजला पोचू लागलंय. सो यू हॅव टू टेक धीस स्ट्राॅन्ग डोस फाॅर अ वीक. यू वील बी ऑल राईट. जमेल तेव्हा रेस्ट घ्या. रुटीन चालू राहू दे. या. . “

“सर,तापाचं काय?”

ते हसले.

“त्याचं काय?तो या खोकल्याचा लहान भित्रा भाऊ आहे. पहिल्या डोसला घाबरुनच तो पळून जाईल. डोण्ट वरी. “

“सर, पैसे ?”

“थर्टी रुपीज”

मला आश्चर्य वाटलं. फक्त तीस रुपये ?मी काही बोलणार तेवढ्यात त्यानी पुढच्या पेशंटला बोलावलं. पैसे देऊन मी जायला निघालो. मला इथून बाहेर पडावंसंच वाटेना. दाराजवळ जाताच मी मागं वळून पाहीलं. ते समोरच्या पेशंटशी हसून बोलू लागले होते. माझा स्वीच त्यानी केव्हाच ऑफ केला होता. मी बाहेर पडलो ते डाॅ. मिस्त्रींबद्दलची उत्सुकता मनात घेऊनच.

मी घरी आलो. दोन घास खाऊन मी औषध घेतलं. अंथरुणावर पाठ टेकली. डोळे मिटले. ग्लानी आली तरी मनातून डाॅ. मिस्त्री जाईचनात.

“कसं वाटतंय?”रात्री गप्पा मारताना भावानं विचारलं.

“खूपच छान. “

“डाॅ. मिस्त्री कसे वाटले?” त्याने सहजच विचारलं. मला खूप काही बोलायचं होतं,पण ते शब्दात सापडेचना.

“खूsप वेगळे आणि चांगले”

बोलता बोलता मी प्रत्यक्ष पाहिलेला तो आजी-आजोबांचा प्रसंग त्याला सांगितला.

“असे अनुभव मी तिथे अनेकदा घेतलेयत. प्रत्येक पेशंटची कुंडली त्यांच्या मनात पहिल्या भेटीतच अचूक नोंदली गेलेली असते. तू पुन्हा कधी गेलास,तर कांही क्षण तुझ्याकडे रोखून बघतील. ते बघणं म्हणजे मनात साठवलेल्या त्या कुंडल्या धुंडाळणं असतं. आणि मग हसून तुझं नाव घेऊन तुझ्याशी बोलायला सुरुवात करतील. . ” भाऊ असंच खूप कांही सांगत राहिला आणि मी थक्क होत ऐकत राहिलो.

आधीच भारावून गेलेल्या मला डाॅक्टर मिस्त्रींची खरी ओळख आत्ता होतेय असंच वाटत राहीलं. पस्तीस वर्षांपूर्वी स्विकारलेलं वैद्यकीय सेवेचं व्रत सचोटीने अव्याहत  सुरु आहे. ‘पारखी नजर’ हे त्याना मिळालेल़ं ईश्वरी वरदान तर होतंच,पण आजच्या प्रदूषित वातावरणातही त्याचा बाजार न मांडता त्यानी ते निगुतीने जपलेलं होतं. मुलगा सर्जन होऊन अमेरिकेत स्थायिक झाल्यावर ते दुखावले असणारच ना?पण खचले मात्र नाहीत. आपला वारसा पुढे कोण चालवणार हा विचार डोकावला असणारच ना त्यांच्या मनात?पण ती सल ते कुरवाळत बसले नाहीत. रुग्णसेवेचं व्रत त्यानी वानप्रस्थातही अखंड सुरु ठेवलंय आणि मिळणाऱ्या पैशांचा अव्याहत ओघ त्यानी अलगद गरजूंकडे वळवलाय. तेसुध्दा कसलाही गाजावाजा न करता. कधीही सुट्टी न घेणारे डाॅ. मिस्त्री वर्षातून दोन दिवस मात्र आपलं क्लिनिक पूर्णपणे बंद ठेवतात. पण हे आराम करण्यासाठी किंवा बदल म्हणून नव्हे. त्या दोन दिवसातला एक दिवस दहावीच्या आणि दुसरा बारावीच्या परीक्षांचा आदला दिवस असतो. या दोन्ही दिवशी या परिक्षांना बसणाऱ्या मुलामुलींची डाॅक्टरांचे आशिर्वाद घेण्यासाठी रीघ लागलेली असते. त्या सर्वांची अडलेली शिक्षणं डाॅक्टरांच्या आर्थिक मदतीमुळेच मार्गी लागलेली असतात. म्हणूनच त्या मुलाना डाॅक्टरांच्या आशिर्वादाचं अप्रूप असतं आणि डाॅक्टरना त्या मुलामुलींच्या भावनांची कदर. . !

हे आणि असं बरंच काही. सगळं ऐकताना मी भारावून गेलो होतो.

मुंबईची असाईनमेंट पूर्ण करुन परतताना मी अस्वस्थ होतो. मुंबईला येतानाची अस्वस्थता आणि ही अस्वस्थता यात मात्र जमीन अस्मानाचा फरक होता. ती अस्वस्थता उध्वस्त करु पहाणारी आणि ही हुरहूर लावणारी. . !डाॅ. मिस्त्रीनी मला औषध देऊन बरं तर केलं होतंच आणि जगण्याचं नवं भानही दिलं होतं. डाॅ. मिस्त्रींचा विचार मनात आला आणि उन्हाने तापलेल्या वातावरणात एखादी गार वाऱ्याची सुखद झुळूक यावी तसं मला वाटत राहिलं. ती झुळूक मी इतक्या वर्षांनंतरही आठवणीच्या रुपात घट्ट धरुन ठेवलीय. . !!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print