मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चांगले कर्म ☆ संग्राहिका: सुश्री विमल माळी ☆

? जीवनरंग ❤️

☆ चांगले कर्म ☆ संग्राहिका: सुश्री विमल माळी ☆

एक स्त्री दररोज रोजच्या  स्वयंपाकातील एक चपाती गरजू माणसाला देत असते.एका पायाने जरा लंगडा असलेला माणूस रोज तिच्या दारात येऊन तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी  म्हणत असे ..

“तुमचं वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील, आणि तुम्ही केललं चांगलं  कर्म तुमच्याकडे परत येईल.”

तिला वाटायचं,चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायचं सोडून हा भलतंच काही तरी म्हणतोय.

तिने वैतागून ठरवलं… याला धडा शिकवलाच पाहिजे .

तिने एके दिवशी चपातीत विष कालवले आणि त्या लंगड्या मनुष्याला ती चपाती द्यायला निघाली.त्याक्षणी तिला वाटले… ‘हे मी काय करतेय?’ असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तिने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या लंगड्या मनुष्याला दिली.

नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला, “तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहील आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल”.आणि तो चपाती घेऊन गेला.

*तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची. खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती.त्या दिवशी तो अचानक आला. दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं.त्याचे कपडे फाटलेले होते . त्याला भूक लागली होती. आईला बघताच मुलगा म्हणाला “आई, मी इथं पोहोचलो एका  लंगड्या बाबांच्यामुळे.मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे  बाबा आले , मी त्यांच्याकडे खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली. तो बाबा  म्हणाला “रोज मी हेच खातो, आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे”.हे  ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला. तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर… तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता.

आता तिला लंगड्या बाबाच्या शब्दांचा अर्थ कळला.’तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येतं’.

 

संग्राहिका :सुश्री विमल माळी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्हिलचेअर…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ❤️

? व्हिलचेअर…. अनामिक ? प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

विवियाना मॉल मध्ये रविवारी संध्याकाळची वेळ म्हणजे तरुणांची गर्दीची वेळ.. त्यांचा चिवचिवाट, भरलेले कॉफी हाऊसेस, सेल्फी टाईम.

अशा गर्दीच्या वातावरणात चटकन नजर गेली ती एका व्हीलचेअर वर एका आजीबाईंना प्रेमाने नेणारा एक माणूस आणि सोबत 12-13 वर्षाचा एक मुलगा.. मी आणि माझी मैत्रीण तिथे एका बाजूला बाकावर बसलो होतो. आम्ही बघत होतो.. व्हीलचेअर ढकलत तो माणूस त्या आजीबाईंना इकडून तिकडे नेत होता आणि त्याचा मुलगा ही त्याच्या सोबत होता..

 5 मिनिटांतच तो माणूस त्या आजींची व्हीलचेअर आमच्या अगदी बाजूला आणून उभं करून त्या मुलाशी इंग्रजीत बोलत होता. “मी ATM मधून पैसे काढून 1, 2 कामे करून येतो, तू आजी जवळ थांब” असं सांगून निघून गेला.

त्या आजी आमच्याकडे थोडं बघून हसल्या.. दोन – तीन मिनिटं गेली आणि हिंदीत मला सांगू लागल्या.. “हा माझा नातू. मुलाचा मुलगा, आणि तो गेला नां पैसे काढायला तो माझा मुलगा.. आम्ही ठाण्यातच राहतो.. आज ‘सुईधागा’ सिनेमा बघायला आम्ही आलो. सुनेला तिच्या कॉलेज ग्रुप बरोबर बाहेर जायचं होतं, मग माझ्या मुलांनी आमचा हा बेत जुळवून आणला..”

नकळत माझ्या तोंडून “अरे वाह!”  निघून गेलं..

आजी पुढे सांगू लागल्या… माझं वय 73 आहे.. मला चालता येत नाही म्हणून ही खुर्ची आणि ही फोल्डिंग काठी.. सिनेमा, नाटक बघायला जायचं तर थिएटर मध्ये काळोख व्हायच्या आत आम्हाला आत शिरावं लागतं. म्हणून मी कुठे जायचं म्हणजे माझी वरातच असते.. पण मुलगा, सून ऐकत नाहीत..

अजून दोन मुलं आहेत मला.. पण ते मला सांभाळायला तयार नाहीत.. हा मुलगा सायकॉलॉजिचा प्राध्यापक आहे. तो मला आनंदाने सांभाळतो.. दुसरी भावंडे सांभाळत नाहीत, त्या बद्दल त्याचा आकस नाही. मला माझा मुलगा थिएटर मध्ये काळोख व्हायच्या आतच घेऊन येतो.

आज आम्ही बाहेर जेवून सिनेमाला गेलो.. आता मॉल मध्ये या खुर्चीतून मला फिरवतो.. मी नको म्हणत असताना त्याचं म्हणणं.. ‘बघ नं जग किती बदललंय. सुंदर गोष्टीही आहेतच. असं फिरलीस, चार माणसं बघितलीस की तुझं मन व शरीर ही फ्रेश होईल. मी मनाचा अभ्यास केलेला माणूस आहे म्हणूनच सांगतोय.'”

हे सांगत असताना त्यांचा मुलगा काम आटपून परत आला.. आजीबाई माझ्याशी बोलत असलेल्या बघून त्यांनी त्यांना हिंदीत मला निर्देश करून विचारलं, “कौन है? किससे बात कर रही हो मम्मा..?”

आजीबाईंनी लगेच सांगितलं, “यहिपे बैठी थी। ऐसे ही मैने बात की उससे।”

मला वाटलं, हा माणूस वैतागेल. कोण कुठली ही बाई ! पण त्यांनी चक्क हसून मला जे सांगितलं त्यावर मी थक्क झाले.

ते म्हणाले, “आम्ही आईला दर महिन्याला एकदा असं बाहेर फिरवून आणतो.. रोज आम्ही व्यस्त असतो. मग एक दिवस तिला असं बाहेर घेऊन येतो. माझे वडील असतांनाही आम्ही हेच करायचो. ते नाहीत आता.. आज माझी बायको नाही येऊ शकली, नाहीतर आम्ही तिघे येतो. एक दिवस तिला देतो. कधी सिनेमा, नाटक, ते नाही जमलं तर संध्याकाळी तरी काहीतरी प्लॅन करतो आणि तिला फ्रेश व्हायला मदत करतो. त्यामुळे तिची तब्बेत चांगली राहायला मदतच होते ना.”

आम्हाला त्यांनी धन्यवाद म्हटलं, “माझ्या आईला तुमची सोबतच झाली” म्हणून ते तिघेही निघून गेले नि मी आणि माझी मैत्रीण सुन्न झालो. अरे किती नशीबवान या आजी..

कुठे ही परिस्थिती नी कुठे ‘आईवडील नकोत’ ही भावना जोपासणारी काही मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात..  समाजात एकाच परिस्थिती बाबत दोन भिन्न बाजू दिसल्या.

वय झालं आहे.. चालता येत नाही.. गर्दीत कुठे न्यायचं.. असा विचार न करता हा आजींचा मुलगा, सून आणि नातू ही यांच्या लेखी ‘आई म्हातारी झाली पण मी नेईन, तिला आनंद मिळावा’ ही भावना..

अशी ही माणसं समाजात आहेत हे बघून आम्हां दोघींना खरंच खूप बरं वाटलं. आणि किती तरी वेळ आम्ही शांत पणे त्या तिघांच्या पाठमोर्‍या आकृती कडे शांतपणे बघत होतो आणि डोळे कधी पाणावले कळलंच नाही…

@अनामिक.

??️?

सुश्री संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 4 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 4 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

‘मी गेले तीन वर्षे कॉलेजला जात आहे पण माझा एकही मित्र काय एकही मैत्रीण सुद्धा नाही. ‘ चिन्नू सांगत होती. जर मी कोणाशी मैत्री केली असती, तर काही दिवसांनी त्यांना माझी खरी ओळख ‘कचरेवाल्याची मुलगी’ ही  कळली असती. त्या ओळखीची मला लाज वाटत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला नावे असतात आणि आम्हीही माणूस म्हणूनच जन्माला आलो आहोत याचा लोकांना विसर पडलेला असतो. आज मी कितीही चांगले मार्क्स मिळवून कॉलेजमधून पहिली आलेव, तर उद्या न्यूज पेपरला हेडिंग येणार ‘एका कचरेवाल्याची मुलगी पहिली आली’. आमची ओळख तेवढयापुरतीच सिमीत रहाते. पुढे मी तुमचा स्विकार केला काय किंवा दुसऱ्याशी लग्न केले काय तरी सगळ्यांसाठी, तुमच्या घरच्यांसाठी माझी ओळख ही एक कचरेवाल्याची मुलगी म्हणूनच राहणार आणि म्हणूनच मला खूप शिकून अवकाश शास्त्रज्ञ व्हायचे आहे. मलाच माझे नाव मोठे करून माझ्या खऱ्या नावाने जगायचे आहे.” चुन्नीने मनापासून तिच्या मनातली सल रवीला बोलून दाखवली.

चुन्नीने रवीच्या प्रेमाचा स्वीकार नाही केला तरी रवीच्या  डोक्यातून काही चुन्नी जात नव्हती. तिच्या विचाराने रवी अधीकच प्रभावित झाला होता. त्याला ह्यातून काहीतरी मार्ग काढावासा वाटत होता. दोन दिवस सतत त्याच्या डोक्यात चुन्नीचाच विचार चालू होता आणि त्याने एक वेगळाच मार्ग निवडला.

चुन्नीच्या नकाराने अस्वस्थ झालेल्या रवीने दुसऱ्याच दिवशी आपल्या आईवडिलांना सांगितले, मला काही येथे रहायला आवडत नाही. माझे सगळे मित्र मैत्रिणी अमेरिकेत आहेत तर मी परत अमेरिकेत जातो आणि आपले अमेरीकेतील ऑफिस सांभाळून मी आपल्या निर्यात वाढीवर जोर देईन. रवीच्या ह्या निर्णयाचे त्याच्या घरून स्वागतच झाले. पुढच्या आठवड्यात रवी परत अमेरिकेत परतला. अमेरिकेत स्वतःचे बस्तान  बसविल्यानंतर त्याच्या डोक्यात चुन्नीचे विचार चालू झाले. तसे दोन एक दिवसातून तिच्याशी चाट करणे त्याचे चालूच होते आणि त्यातूनच त्याने चुन्नीला अमेरिकेत शिक्षणासाठी येण्याचे सूचित केले. चुन्नीला तिच्या शिक्षणासाठी अमेरिकेचा विचार करणे म्हणजे जरा जोकच वाटला पण रवीने तिला मार्गदर्शन करून स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करायला लावले. रवीही  तिकडून तिला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची माहिती पुरवीत होता. दोघांच्या प्रयत्नाला यश येऊन थोड्याच दिवसात चुन्नीला तिच्या पुढील शिक्षणासाठी चांगल्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली. तिला तिथे स्कॉलरशिप मिळेल ह्याची रवीने सोय केली. आता प्रश्न होता विमानभाड्याचा. तेवढे पैसे काही चुन्नीकडे नव्हते. त्यासाठीही रवीनेच तोडगा काढला. स्वतःच्याच अमेरिकेतल्या कंपनीत तिला अर्धवेळ काम देऊन तिचा व्हिसा आणि तिकीट पाठविले. रवीने चुन्नीच्या मनातील अवकाश शास्त्रज्ञ होण्यासाठीचा मार्ग सुकर केला होता.

आता त्याला खात्री होती अमेरिकेत चुन्नीला कचरेवाल्याची मुलगी असे न ओळखता सगळे चुन्नी या नावानेच ओळखतील आणि ती शास्त्रज्ञ झाल्यावर जर तिला वाटले तर रवीशी नाहीतर कोणाशीही लग्न करून भारतात जाईल तेंव्हा चुन्नीची ओळख ही एक कचरेवाल्याची मुलगी अशी न रहाता शास्त्रज्ञ चुन्नी अशी असेल आणि मुन्ना वाल्मिकी ह्या कचरेवाल्याची ओळख एका शास्त्रज्ञ मुलीचा बाप अशी होईल. 

खरचं मनात असले तर कुठच्याही कठीण प्रसंगात, आहे त्या परिस्थितीत मार्ग  काढता येतो…..फक्त नीट विचार करून समोर आलेल्या प्रश्नाला संयम ठेऊन सामोरे जायला लागते….. अगदी आपल्या रवी सारखे.

समाप्त

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

दुपारी २.३० वाजता दारावरची बेल वाजली. रामूकाकानी दरवाजा उघडला. रवीने तिला आत बोलाविले. सोफ्यावर  बसवले. रामूकाकानी पाण्याचा ग्लास भरून आणून तिच्या हातात न देता पुढे असलेल्या टेबलावर ठेवला. रवीच्या निदर्शनात ते आले तसे रवीने पुढे होऊन तो पाण्याचा ग्लास पुन्हा उचलला आणि तिच्या हातात दिला. तिच्या चेहऱ्यावर जराशी स्मितरेषा झळकली. तिच्या समोरच्या सोफ्यावर रवी बसला. ती आजूबाजूला बघून घर निरखत होती.

“बोला साहेब काय विचारायचे आहे ? ” तिनेच बोलायला सुरवात केली. रवीने तिला पहिले तिचे नाव विचारले. ती काही न बोलता काही वेळ रवीकडे बघत राहिली.

 रवीने परत विचारले, ” काय झाले ? ” तिच्या डोळ्यात पाणी आले होते. तिने एक आवंढा गिळून बोलायला सुरवात केली. ” साहेब मी आता काहीच दिवस माझे वडील आजारी आहेत म्हणून कचरा न्यायला येते पण माझे वडील गेले पंचवीस वर्षे ह्या भागातला  कचरा गोळा करतात पण त्यांनाही आज पर्यंत कोणी त्यांचे नाव विचारले नाही. आम्हा लोकांना जे कचरा गोळा करतात त्यांना कचरेवाला किंवा कचरेवाली हीच नाव असतात. कितीही पाऊस असला  किंवा आणखी काही  असले तरी आम्ही काम करतोच. आम्हाला सुटी नाहीच. कुठलाही सण असला तरी तो  घरी साजरा करायच्या आधी आम्ही दुसऱ्यांच्या घरचा कचरा गोळा करत असतो॰ तरीही कोणीही आम्हांला नावाने ओळखत  नाहीत. तुम्ही पहिले आहात, माझे काम माहिती असूनही माझे नाव विचारले. तर माझे नाव चिन्नू मुन्ना वाल्मिकी. आमची पूर्ण जमात ह्याच कामामध्ये आहे. आमच्या आधीच्या पिढ्यांनीही हेच काम केले आहे. कोणीतरी  हे काम केलेच पाहिजे ते काम आमची जमात करत असते आणि ते ही अविरत पिढ्यान पिढ्या.”  रवीला तिच्या बोलण्यातले तथ्य जानावाले.

पुढचा अर्धा तास रवी आणि तिचे बोलणे चालले होते. तिच्या बोलण्यातून तिचा स्वतः वरचा आत्मविश्वास दिसत होता. लहानपणापासून रात्री झोपतांना मोकळे आकाश बघत आलेल्या चिन्नूला आकाशाचे विलक्षण आकर्षण होते आणि त्यामुळेच कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चिन्नूला अवकाश शास्त्रज्ञ व्हायचे आहे. पुढच्या वर्षीपासून तिला कचरा व्यवस्थापन डिप्लोमा कोर्स ही चालू करायचा आहे. रवी तर सगळे चिन्नूचे विचार आणि तिची बोलायची पद्धत ऐकून खुश झाला होता. त्याने रामुकाकांना सांगून चिन्नूसाठी जेवायला वाढायला सांगितले पण चिन्नूने त्याला नकार देऊन म्हंटले, ” साहेब नका वागू असे. नंतर तुमच्या घरच्यांना कळले की एक कचरेवाली तुमच्या घरात येऊन जेऊन गेली तर खूप अनर्थ होईल. माझ्या वडिलांचे नुसते तुमच्या घरचे नाही तर तुमच्या संपूर्ण सोसायटीचे काम जाईल. तेंव्हा प्लिज असे काही करू नका. आम्ही तुमच्या सगळ्यांपासून खूप लांब आहोत ते बरे आहोत. कृपया आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न करू नका. मला आणि तुम्हांला, आपल्या दोघांनाही त्याचा खूप त्रास होईल.”

चिन्नू जे सांगत होती ते बरोबर होते. रवीच्या मगाशीच निदर्शनात आले होते की चिन्नूला घरात घेतली तेंव्हा रामूकाकांना ते आवडले नव्हते. रवीने काहीतरी वेगळे केले अशा नजरेने त्यांनी बघितले होते. रवीने पुढची काही मिनिट्स तिला स्वतःची ओळख करून देऊन त्याच्या शिक्षणाबद्दल सांगितले आणि तिचा मोबाईल नंबर घेऊन तिला स्वतःचा मोबाइल नंबर दिला.

पुढे एक आठवडा त्यांचे दिवसातून चार ते पाच वेळेला फोनवरून बोलणे होत होते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती  रवीला आवडायला लागली होती. तिच्या ध्येयपूर्ती करण्यासाठी चाललेल्या वाटचालीत रवीला तिला मदत कराविशी वाटत होती आणि खूप विचारांती एकदा रवीने तिला भेटून एका कॉफी रेस्टारंट मध्ये कॉफी प्यायला नेले. प्रथम कॉफीला नकार देणारी चिन्नू रवीच्या अती आग्रहामुळे तयार झाली. हॉटेल मध्ये बसल्यावर चिन्नूनेच सुरवात केली, “साहेब, काय झाले, माझ्या प्रेमात वगैरे पडला नाहीत ना! तसे असेल तर स्वतःला सावरा.” तिच्या ह्या बोलण्याने रवीने डायरेक्ट विषयाला हात घातला, ” चिन्नू, खूप विचार करून मी तुला विचारतोय, तुला प्रपोज करतोय, मला तू पहिल्यावेळी बघितल्या क्षणीच आवडली होतीस आणि गेले काही दिवस तुझ्याशी बोलून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. माझ्याशी लग्न करशील का ? “

रवीचे बोलणे ऐकून चिन्नू जरा जास्तच सिरिअस झाली. एकटक रवीकडे बघून तिने संथ लयीत बोलायला सुरवात केली,  “साहेब जरा स्वतःला सावरा. तुम्ही नुकतेच अमेरिकेत शिकून आला आहात. तुमच्या समोर तुमचा तयार फॅमिली बिझनेस आहे. तुमच्या घरचे तुमची तुम्ही त्यांच्या बिझनेसला सामील होण्याची वाट बघत आहेत आणि तुम्हाला हे विपरीत काय सुचतंय. साहेब आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही जिला आत्ता प्रपोज करत आहात, तीची ओळख सगळ्यांसाठी कचरेवाल्याची मुलगी अशी आहे. त्यामुळे उगाच नको त्या भानगडीत पडू नका. चक्रव्यूह भेदायला शिरायच्या आधीच जरा स्वतःला आवरा. स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नका.  मी काही तुमच्या प्रेमाचा स्विकार करू शकत नाही.

क्रमश:….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

दुसर्याल दिवशी रवी सकाळी लवकर उठून तयार होऊन बसला. नेहमीप्रमाणे सगळे आपापल्या कामाला बाहेर पडले तसे त्याने रामूकाकांना काहीतरी आणायला बाहेर पाठविले आणि ती कचरेवाली यायची वाट बघत बसला. ठराविक वेळेला घरच्या बेलचा आवाज आला. त्याने लगेच दरवाजा उघडला. तीच होती. तिचे निखळ सौंदर्य कालच्यापेक्षा आज जास्तच उठून दिसत होते. पिवळा पंजाबी ड्रेस आणि त्याच कलरची ओढणी तिने तिच्या डोक्यावरून घेतला होता. कपाळावर बारीक  पिवळ्या रंगाची टिकली लावल्यामुळे शालीनता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. कालच्यासारखेच तिने, ” साहेब कचरा” असे म्हंटले. रवीने कचरा आणून दिला आणि तिला विचारले, ” जरा तुझ्याशी बोलायचे होते. तुझे नाव काय आहे?” रवीने बोलायला सुरवात केली.

तिने एकच क्षण रवीकडे बघितले आणि गालातल्या गालात हसत म्हणाली, ” साहेब मला बोलायला वेळ नाही. साडे दहा वाजेपर्यंत मला सगळ्यांचा कचरा जमा करायचा असतो. ती कचऱ्याची मोठी गाडी एकदा येऊन गेली तर माझी पंचाईत होईल.” रवी थोडा हिरमुसला पण लगेच त्याने तिला सांगितले, ” तू मोकळी झाली की येशील का ? तुझ्याविषयी मला खूप जाणून घ्यायचे आहे. तुझ्या बद्दलचे खूप प्रश्न माझ्या मनात आहेत. तू तुझी सगळी कामे आटपून येऊ शकशील का ? ” भराभर बोलत रवीने तिला सांगितले तिनेही लगेच उत्तर दिले, ” आज तरी नाही जमणार साहेब. नंतर मला कॉलेजला जायचे आहे. रविवारी वेळ  काढता येईल. तेंव्हा बघू. ” आणि ती तिचे नावही न सांगता  तशीच गेली.

रामूकाका बाहेरून आल्यानंतर रवीने त्यांच्याकडे कचरेवाल्याचा विषय काढला. तो कुठे राहतो, त्याच्याघरी कोण कोण आहेत ह्याची माहिती काढण्याचा रवीने प्रयत्न  केला पण रामूकाकानाही कचरेवाल्याबद्दल काहीच माहित नव्हते. तो रोज सकाळी येतो आणि काही न बोलता दिलेला कचरा त्याच्या डब्यातून  घेऊन जातो. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीनशे रुपये घेऊन जातो. कधीही खाडा करत नाही.  एवढीच माहिती रवीला मिळाली.

दुसऱ्या दिवशी ती कचरा न्यायला आल्यावर रवीने तिला सांगितले, “आज तुझे कचरा गोळा करण्याचे काम झाल्यानंतर कॉलेजला जाताना मी तुझ्याबरोबर येऊ का ? तू कॉलेजला जातांना आपल्याला बोलता येईल.” तिने आज गालातल्या गालात हसत उत्तर न देता जरा खडसावूनच विचारले,” साहेब, एवढे काय काम काढलेत. अहो मी साधी कचरेवाली आहे. कचरेवाल्याची मुलगी. माझ्याकडे कसले तुमचं काम. साहेब आम्ही लहान जातीतले असलो तरी आम्हालाही इज्जत आहे. तुमच्या बरोबर मला कोणी बघितले तर लोक काहीतरी वेगळेच समजतील. तुमच्याही सोसायटी आणि समाजात तुमची नालस्ती होईल. तुम्हांला खरेच काही बोलायचं असेल तर दुपारी २ वाजता कॉलेज सुटल्यावर मी येथेच येते पण ते तुमच्याकडे काका आहेत त्यांना घरीच असू दे. मग आपण सविस्तर बोलू.”

क्रमश:….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

सहा वर्षांनी रवी मुंबईतच नाही तर भारतात परत येत होता.  रवी सूर्यकांत घरवारे. घरवारे शिपिंग अँड क्लीअरिंग कॉर्पोरेशनचा पुढच्या पिढीचा वारसदार. लहानपणी उष्टावण सोन्याच्या चमच्याने झाले असल्याने पुढचा प्रवासही श्रीमंतीतच झाला. बंगल्यात त्याची वाढ झाली असली तरी त्याच्या डोक्यात श्रीमंती कधीच शिरली नाही. दहावी झाल्यावर पुढील पदवी अभ्यासासाठी त्याला अमेरिकेत पाठविण्यात आले आणि तो आज सहा वर्षांनी बिझनेस मॅनेजमेंटचे यशस्वी शिक्षण घेऊन भारतात परत आला होता. गेल्या सहा वर्षातला मुबईतला फरक त्याला जाणवत होता. स्वच्छतेबद्दल लोकांच्यात झालेली जागरूकता त्याला दिसत होती.

आता दोन आठवडे जरा आराम करून त्याला त्याच्या फॅमिली बिझनेस मध्ये सामील केले जाणार होते . तशी त्यांच्या प्रमुख ऑफिसमध्ये त्याच्यासाठी एक प्रशस्त अशी केबीन तयार करून ठेवली होती आणि ह्याची जाणीव रवीलाही देण्यात आली होती. लहानपणीपासून एक साचेबंद आयुष्य, ते पण भावनिक संबंधाला थारा न देता काढलेल्या रवीला  अमेरिकेत शिकायला गेल्यावर स्वतःच्या विचारांची प्रगल्भता वाढवायला पुरेसा वेळ मिळाला. श्रीमंत गरीब, जात पात ह्याच्या पुढचा विचार करून माणसांना माणूस म्हणून पहिले बघितले पाहिजे ह्याची त्याला जाणीव झाली होती आणि त्यामुळेच मुंबईत आल्यावर दोन दिवसानी असे काही घडले की त्याचे पुढचे सगळे आयुष्यच त्यामुळे बदलले.

विमानाचा लांबचा प्रवास करून आल्याने रवीचे  झोपायचे शेड्युल जरा बिघडले होते. रात्री उशिरा झोप आल्याने आज तो जरा जास्तच वेळ झोपला होता. घरातले सगळे म्हणजेच रवीचे आई वडील आणि मोठा भाऊ सगळे त्यांच्या नेहमीच्या वेळेत त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. रामूकाका जे खूप वर्षांपासून घरवारे फॅमिलीकडे कामाला होते तेच आता घरात होते. त्यांनाही बाहेरून भाजी आणण्यासाठी बाहेर जायचे होते पण रवी झोपला होता म्हणून ते ही खोळंबले होते. खूप वेळ वाट बघून रवी उठत नाही म्हणून ते दरवाजा बाहेरून ओढून घेऊन भाजीपाला आणायला मार्केटला गेले. त्याच वेळेमध्ये दरवाज्याशी कोणीतरी आले आणि दरवाजा उघडण्यासाठी बेल मारली. घरात रवी एकटाच होता पण तो झोपला असल्याने त्यालाही त्याच्या बेडरूममध्ये बेल ऐकू आली नाही. जेंव्हा  तिसऱ्यांदा बेल वाजली तेंव्हा रवीची झोपमोड झाली. डोळे चोळतच रवी बाहेर आला.  तो रामूकाकाना बघू लागला. पण ते न दिसल्याने तो दरवाज्यापाशी गेला. डोळे किलकिले करतच त्याने दरवाजा उघडला आणि समोर बघितल्यावर  त्याची नजर एकदम स्थिर झाली. कोणीतरी त्याच्यावर मोहिनी केल्यासारखा तो समोर एकटक नुसता बघतच राहिला. त्याच्या समोर एक त्याच्यापेक्षा दोन ते तीन वर्षांनी लहान असलेली, पंजाबी ड्रेस घातलेली, सुंदर मुलगी उभी होती. तिने चेहऱ्यावर काहीही लावले नव्हते तरी तिच्या चेहऱ्यावरील तेज ओसंडून वहात होते. समोर रवीला बघून तिच्या चेहऱ्यावरही जरा वेगळ्या छटा  उमटल्या.

“रामूकाका नाहीत का ? कचऱ्याचा डबा देता का ? “

तिने रवीला विचारले.

” कचऱ्याचा डबा ? का ? तुम्हाला का कचऱ्याचा डबा द्यायचा? आमचा कचरेवाला येतो रोज कचरा न्यायला  “

” तसे नाही साहेब. मी तुमचा कचरा न्यायला आले आहे. मी तुमच्याकडे येणाऱ्या कचरेवाल्याची मुलगी. माझ्या वडिलांना काल ब्लड प्रेशरचा त्रास झाल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले आहे. त्यामुळे काही दिवस मीच येत जाईन कचरा न्यायला. ” तिने रवीला सगळे उलगडून सांगितले. रवी परत घरात गेला आणि किचनमध्ये असलेला कचऱ्याचा डबा  घेऊन बाहेर आला. तिने तो डबा तिच्याकडे असलेल्या मोठ्या डब्यात उलटा केला आणि दोनवेळा तो डबा त्या मोठ्या डब्यावर आपटून रवीला परत दिला आणि थँक्स म्हणून ती उलटी फिरली. रवी ती दिशेनासी होईपर्यंत बघतच राहिला. जे काही आत्ता त्याच्यासमोर घडले होते ते त्याच्यासाठी खूप वेगळे होते. कोण एक टापटीप असणारी सुंदर मुलगी येते काय आणि घरचा कचरा घेऊन जाते काय आणि जातांना वर त्यालाच थॅंक्सही म्हणून जातेकाय? तो पूर्ण दिवस रवीच्या डोळ्यांसमोरून तिचा तो सुदंर चेहरा काही जात नव्हता.

क्रमश:….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जुगार…. (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ जुगार…. (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘गावातील सद्दीलाल नावच्या व्यक्तीने आत्महत्या केली.’ वर्तमानपत्रात बातमी छापली होती. अनेक तर्हेलने चौकशी सुरू झाली. पत्रकारांची टीम सद्दीलालच्या घरी पोचली. त्यापाकी एकाने सद्दीलालच्या बायकोला विचारले,

‘सद्दीलाल काय करत होते?’

‘जुगार खेळत होते.’

काय? त्याला जुगार खेळण्याचं व्यसन होतं?’

‘होय! जुगारात हरत होते, तरीही पुन्हा पुन्हा जुगार खेळणं सोडत नव्हते.’

‘जुगारात हरल्यावर पैसे कुठून आणत होते?’

‘प्रथम माझे दागिने विकले. मग माझ्या घरातली भांडी-कुंडी गेली. मग जमीन गहाण ठेवून बॅँकेतून कर्ज घेतलं…. मग कृषी सोसायटीतून … मग सवकाराकडून…. जिथून जिथून कर्ज मिळणं शक्य होतं, तिथून तिथून त्यांनी कर्ज घेऊन त्यांनी ते पैसे डावावर लावले.’

‘जुगारात ते नेहमीच हरत होते की कधीमधी जिंकतही होते?’

दोन-चार वर्षात कधी तरी एखादी छोटीशी रक्कम जिंकतही होते.’

दोन-चार वर्षात?

‘होय. कधी गव्हाचा पीक चांगलं यायचं तर कधी कापसाचं.कधी ज्वारी किंवा डाळ, कधी आणखी काही…’त्यामुळे आशा वाटायची. उमेद वाढायची. वाटायचं, एखादं तरी वर्षं असं येईल की घातलेलं सगळं वसूल होईल. पण असं कधी झालं नाही. याच कारणासाठी ….’

‘म्हणजे सद्दीलाल शेती करत होता?…. शेतकरी होता?

‘शेतकरी… शेती हे शब्द आता जुने झालेत साहेब….आता आम्ही याला जुगार म्हणतो. खूप मोठा जुगार…. प्रत्येक वर्षी हजारो रुपयाचं बियाणं खरेदी करायचं, पिकाच्या उमेदीत हजारो रुपयाचं खत मातीच्या हवाली करायचं। झुडपांवर हजारो रुपयांचं औषध मारायचं., पाणी देण्यासाठी हजारो रुपये खर्च करायचे. ढोर मेहनत करायची. अचानक आलेल्या एखाद्या  विपत्तीमुळे उभं पीक नष्ट होणं … कधी पीक आलंच तर त्याचे भाव आम्ही नाही, दुसर्यावच कुणी तरी निश्चित करणं… त्यांची मर्जीने… हे सगळं जुगार नाही तर काय आहे?’

पत्रकाराची जीभ टाळूला चिकटली.

मूळ हिंदी  कथा – ‘जुआ’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हृदय मिलन – भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ हृदय मिलन – भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

त्याने लग्नाची मागणी घातली खरी. तो सर्व दृष्टीने उत्तम आहे, हेही खरे पण मग ‘मीच का?’ हा मोठा प्रश्न रजनीला झोप लागून देत नव्हता.

ठरल्याप्रमाणे गेला एक आठवडा ते रोज अर्ध्या तासासाठी भेटत होते. तो एकदाही लेट आला नव्हता. रजनी येण्याच्या आधी तो तेथे हजर असायचा. सुरवातीला साधे कपडे आणि तोंडाला हलकासा पावडरचा हात फिरवून कामाला जाणारी  रजनी रोज काहीतरी ठेवणीतले कपडे घालून आणि तोंडाला जरा पॉण्डस क्रीम आणि ओठांवर पुसटशी लिपस्टिक फिरवायला लागली. तिच्यातला तो बदल तिच्या आईच्या लक्षात आला होता तसे आईने तिला त्याबद्दल विचारले. तिच्या आयुष्यात जे काही घडत होते त्याबद्दल तिने जसेच्या तसे सर्व तिच्या आईला सांगितले. प्रथम तिच्या आईलाही धक्का बसला आणि तिने त्या मंगेश पराडकरला घरी घेऊन ये असा सल्ला दिला. रजनीने आईची समजूत काढून, ती हे प्रकरण व्यवस्थित हाताळत आहे ह्याची तिला खात्री दिली आणि लवकरच जर तिच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली तर ती आधी मंगेशला तिला भेटायला घेऊन येईल ह्याची  ग्वाही दिली.

पूर्ण आठवडा ते दोघे रोज भेटत होते. दोघेही आता एकमेकांशी मन मोकळे होऊन बोलत होते. रजनीने त्याच्या बद्दल काढलेल्या माहितीत काही वावगं असे तिला काहीच मिळाले नाही तर त्याच्या ऑफिसमधला त्याचा स्टाफ त्याला देवमाणूस मानत होते. आज तिला मंगेशला त्याने केलेल्या प्रपोजला उत्तर द्यायचे होते.

बरोबर २ वाजता मंगेशला  भेटायला ती स्टारबक्समध्ये आली. मंगेशने आज खूपच आकर्षक सूट परिधान केला होता. तो नेहमी सारखाच हँडसम दिसत होता. ती जाऊन त्याच्या टेबलावर बसली. दोन मिनिट्स दोघेही काही न बोलता एकमेकांकडे बघत होते. आज रजनीनेही तिची केस रचना वेगळी केली होती. तिच्या गालांवर एक वेगळाच ग्लो दिसत होता. आज नेहमीपेक्षा ती खूपच आकर्षक दिसत होती. दोघांमधली शांतता मंगेशनीच मोडली. ” काही बोलणार आहेस का अशीच बसणार आहेस. तुझ्या परीक्षेत मी पास  झालो की नाही. आज तू उत्तर देणार आहेस. मी खरंच तुझ्या उत्तरासाठी आतुर आहे. ” रजनी थोडी गंभीर झाली. जेंव्हा  ती आली त्यावेळच्या आणि आत्ताच्या तिच्या चेहऱ्यात फरक पडला. थोडा दीर्घ पॉज घेऊन रजनीने बोलायला सुरवात केली. ” मंगेश तुझ्याबद्दल जी मी माहिती काढली त्यामध्ये तू खरंच  एक उत्तम माणूस म्हणून पास  झाला आहेस. तुझ्यात असे काहीच वाईट नाही की ज्यामुळे तुला मी नकार द्यावा तरीपण आज तुला होकार द्यायची माझी हिम्मत होत नाही आणि त्याला कारण एकच आहे ते म्हणजे तू केलेली  माझी निवड. मीच का ? ह्या माझ्या प्रश्नाचे उत्तर तू मला आजपर्यँत दिलेले नाहीस आणि जोपर्यंत मला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तिथपर्यंत माझ्या होकाराची अपेक्षा करू नकोस. जे काही असेल ते खरे सांग आज….. ह्या वेळे नंतर परत तुला कधीच तो चान्स मिळणार नाही. तू निवडलेली मुलगी मीच का ? “

मंगेशही गंभीर झाला. ” रजनी ते मी तुला सांगणारच आहे पण ते सांगण्याचे मी थोडे टाळत होतो पण तुझेही बरोबर आहे. तुझी माझी ओळख नसताना, तुला शोधून काढून, तुला तडक लग्नाची मागणी घालतो. का ? तुलाच का ? हा तुला पडलेला प्रश्न रास्त आहे. त्यासाठी तुला माझ्याबरोबर थोडे भूतकाळात यावे लागेल. गेले वर्षभर मी माझ्या हृदयाच्या दुखण्याने आजारी होतो. खूप स्पेशालिष्ट डॉक्टरांची फौज माझ्यावर उपचार करत होती आणि शेवटी माझ्या हृदयाचे प्रत्यारोपण  करणे हा एकच उपाय होता नाहीतर फक्त तीन महिन्यांचे माझे आयुष्य होते. थोड्याच वेळात नवीन हृदय मिळणे तेवढे सोप्पे नव्हते आणि माझ्या आयुष्यात चमत्कार झाला. एका देवीने तो चमत्कार केला. एक अल्पशा आजाराने  देवाघरी गेलेल्या तिच्या वडिलांचे हृदय त्या मुलीच्या निर्णयामुळे हृदयदान केले गेले. त्या दानशूर माणसामुळे माझ्या हृदयाचे प्रत्यारोपण झाले. आज जे काही माझे पुढचे आयुष्य माझ्या वाटेला आहे ते मला त्या मुलीच्या म्हणजेच तू… रजनी… तुझ्यासाठी जगायचे आहे. पहिल्या भेटीत मला तुझे फक्त आभार मानायचे होते पण तुला भेटल्यावर तुझा साधेपणा, तुझा खरेपणा, माझे व्हिजिटिंग कार्ड बघून सुद्धा तुला त्याचे काहीच न वाटणे ह्यामुळे मी तडक तुझ्याशी  लग्न करायचाच विचार केला. त्या निमित्ताने जिच्यामुळे, जिच्या वडिलांमुळे मला माझे नवीन आयुष्य मिळाले ती कायम माझ्याबरोबर असणार आणि जिने आपल्या सर्वात प्रिय असलेल्या तिच्या वडिलांना गमावले तिला तिच्या वडिलांच्याच हृदयाजवळ रहायला मिळेल ह्या साठीच मी फक्त तुझीच निवड केली पण आता गेला आठवडा तुला रोज भेटून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. भले माझे आत्ताचे हृदय माझे असले तरी त्यावर पहिला हक्क तुझा आहे. माझ्या हृदयाचा आता तूच सांभाळ कर. कृपया माझा स्विकार कर.”

मंगेशच्या डोळयांत पाणी होते. रजनीला तर गेल्या सहा महिन्यांपूर्वी घडलेले ते हॉस्पिटलमधले दृश्य डोळ्यासमोर  आले. जेंव्हा डॉक्टरनी तिला तिचे वडील गेल्याचे सांगितले  तेंव्हा त्यांनी तिला त्यांचे ह्रदयदान करण्याविषयी विचारणा केली आणि रजनीने त्याचे महत्व ओळखून त्यांनी दिलेल्या डोनेशन फॉर्मवर सही केली होती. रजनी बसलेल्या जागेवरून उठली आणि तिने मंगेशच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओझरत होते. मंगेशच्या उंचीमुळे तिचे डोके मंगेशच्या छातीवर टेकले गेले आणि तिला तिच्या वडिलांच्या हृदयाची स्पंदने ऐकू आली. तिने मान वर केली. वरून मंगेशच्या डोळ्यांतले अश्रू रजनीच्या गालावर पडून दोघांच्या अश्रुंचे मिलन झाले होते.

स्वतःचा स्वार्थ न बघता केलेले कोणते ही दान हे दान करणाऱ्याला काही ना काही चांगलेच देऊन जाते. हे आज  परत  सिद्ध झाले होते.

समाप्त 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हृदय मिलन – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ हृदय मिलन – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆क्रमश:….

मंगेश जे काही सांगत होता त्यामुळे रजनी विचारात पडली. आधी फक्त आभार मानायचे होते आणि आता खरोखरचे एक काम आहे. जे काही मंगेश सांगत होता ते काही तिला कळत नव्हते. ” हॅलो….. तुम्ही… तुम्ही  काय  बोलत आहात काही कळत नाही. आपली आधी काहीच ओळख नसतांना तुम्ही माझे का म्हणून आभार मानणार होतात आणि आता  भेटल्यावर काय काम आहे? तुम्ही जरा स्पष्ट बोलाल तर बरे होईल माझ्याकडे जास्त वेळ नाही. मला माझ्या ड्युटीवर परत जायला लागणार आहे तरी कृपा करून जे काही असेल ते स्पष्ट सांगून टाका. ” रजनीने लांबड न लावता त्याला स्पष्ट  बोलायला सांगितले.

मंगेशने जरा आवंढा घेतला आणि बोलायला सुरवात केली,  “तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मी जरा स्पष्टच बोलतो. माझ्याशी तुम्ही लग्न कराल का ? मी तुम्हाला माझ्याशी लग्न करण्यासाठी मागणी घालत आहे. विचार करा, माझी पूर्ण माहिती काढा आणि नंतरच तुमचा निर्णय कळवा. तुमचा होकार असेल तर मी आणि माझे आई वडील तुमच्या आईला  भेटायला येऊन पद्धतशीर मागणी घालू. ” रजनी  आता मात्र खरंच गोंधळून गेली होती. काय चाललंय तिला काहीही  कळत नव्हते. कोण कुठचा रोज फोन करून भेटायला काय बोलवतो आणि भेटल्यावर कळते की तो मोठा बिझनेसमन आहे आणि आता तर काय डायरेक्ट लग्नाची  मागणी.

“हॅलो …. तुम्ही शुद्धीवर आहात ना. काय बोलत आहात? ना आपली ओळख ना पाळख. जरा काय मी आज भेटायला तयार झाले तर डायरेक्ट तुम्ही लग्नाची मागणी घालताय. जरा वास्तवात या. लग्न अशी एका भेटीत ठरत नसतात आणि हो मुख्य म्हणजे माझ्यात असे काय आहे, मी काही सौंदर्यवती नाही, माझी उंची….. शरीराची म्हणा किंवा स्टेटसची म्हणा तुमच्याशी जुळत नाही आणि महत्वाचे म्हणजे काहीतरी वेगळे असे माझ्यात काही नसतांना तुम्ही मलाच का निवडत आहात ?” रजनीचा जो काही तोंडाचा पट्टा चालू झाला त्याला मंगेशनेच लगाम लावला. “अहो …. जरा ऐकून  घ्या. मी काही तुमचा निर्णय आत्ता मागत नाही. तुम्ही पूर्ण एक आठवडा  घ्या. माझी चौकशी करा. माझ्याबद्दल माहिती काढा. जमल्यास आमच्या ऑफिसला भेट द्या. तुमची तयारी असेल तर मी एक आठवडा रोज येथे २ वाजता येऊन तुमची भेट घेईन. जे काही प्रश्न तुमच्या मनात असतील ते तुम्ही मला विचारत जा. महत्वाचे म्हणजे मी माणूस म्हणून कसा आहे ह्याची तुम्ही पारख करा आणि नंतरच  तुमचा काय निर्णय असेल तो सांगा”. मंगेशने रजनीला शांत करून समजावले. रजनीला एक कळून चुकले होते की तो जे काही बोलत होता त्यात कुठेही घाई आणि आक्रस्ताळेपणा नव्हता. त्याने जसा शांतपणे त्याचा निर्णय घेतला आहे तसाच तो तिलाही घ्यायला वेळ देत होता. सगळे ऐकल्यावर रजनीने एक आठवडा रोज दोन वाजता ह्याच ठिकाणी स्टारबक्समध्ये भेटायचे ठरविले.

घरी गेल्यावर तिने त्याची गुगलवरून खूपशी माहिती जमा केली. प्रथम  त्याचा गुगलवरील फोटो आणि तो एकच आहे ह्याची खात्री केली. त्यांच्या पराडकर आणि पराडकर कंपनीचे मागील  रेकॉर्ड चेक केले. त्यांच्या कंपनीचा खूप मोठा पसारा होता. महत्वाचे त्याच्या वडिलांनी उभा केलेल्या आणि मंगेशने तो वाढविलेल्या साम्राज्याचा तो एकुलता एक वारीस होता. रजनीला अशी एकही  गोष्ट मिळत नव्हती त्यामुळे तिने मंगेशला नकार द्यावा. आता फक्त नी फक्त एकच प्रश्न रजनी समोर उभा होता तो म्हणजे मंगेशने काहीही ओळख नसतांना तिची निवड का केली आणि जो माणूस फक्त आभार मानायला आला होता ते पण कशाबद्दल ते न सांगता तडक त्याने एकदम ल्ग्नाचीच मागणी घातली. का? का?

क्रमशः 2 ….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हृदय मिलन – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ हृदय मिलन – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

आजचा तिसरा दिवस होता. रजनीला रोज एकाच नंबरवरून फोन येत होता आणि रोज तोच तो…..मी मंगेश पराडकर असे सांगायचा आणि मला तुम्हाला भेटायचे आहे असे सांगून  रजनीकडे तिला भेटण्यासाठी वेळ मागायचा.

रजनी मुंबईतली परेल परिसरात राहणारी मध्यमवर्गीय ‘हम दो हमारे दो ‘ अशा चौकोनी घरातली मुलगी. एका  वर्षापूर्वी तिचे वडील अल्पशा आजराने गेले आणि घरचा सगळा भार रजनीवर पडला.  नुकतीच कॉमर्स शाखेतली पदवी घेऊन एम. बी. ए.  करण्याचा विचार करत असणाऱ्या रजनीला आई आणि लहान भावाच्या शिक्षणासाठी कॉलेज सोडून ठाण्यातल्या विवियाना मॉल मध्ये एका साडीच्या दुकानात सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी करायला भाग पडले. दिसायला साधारण पण हुशार असणाऱ्या रजनीने आधी त्या ओळख ना पाळख अशा मंगेश पराडकरला भेटायला नकारच दिला पण आज जेंव्हा तिसऱ्यांदा त्याचा फोन आला तेंव्हा तिला त्याचे काहीतरी काम असणार ह्याची  जाणीव झाली आणि उद्या आपण भेटायची जागा आणि वेळ ठरवू असे सांगून तिने त्याचा सांगून फोन ठेवला.

रजनीकडे मंगेशला भेटायच्या आधी हातात पूर्ण दिवस होता. त्याची काही माहिती मिळावी म्हणून तिने पूर्ण सोशल मिडिया  पालथे घातले. मंगेश पराडकर नावाचे जवळ जवळ २० जण तिला फेसबुकवर मिळाले. त्यातला हा मंगेश पराडकर कोण ह्याचा अंदाज घेण्यासाठी त्याचे वय माहित असायला पाहिजे ते ही रजनीकडे नव्हते. रजनीचा तो पूर्ण दिवस आणि रात्र त्या मंगेश पराडकरच्या नावाने बैचैनीत गेली.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रजनीला त्याचा फोन आला, “हॅलो…. मी मंगेश…. मंगेश पराडकर. ” अशा नेहमीच्या सुरात त्याने बोलायला सुरवात केली. ” हां बोला ….. मला  फक्त अर्धा तास सुट्टी मिळेल. त्यामध्ये आपल्याला भेटता येईल. तुम्ही असे करा ….. मला विवियाना मॉल मध्ये स्टारबक्स मध्ये बरोबर २ वाजता भेटा. मी तेथे येते. ” रजनीने त्याला काही न बोलू देता तिच्यानुसार भेटायचे ठिकाण आणि वेळ ठरविली. त्यानेही त्याला दुजोरा दिला आणि फोन ठेवला.

रजनीने अनोळखी असणाऱ्या त्या मंगेशला भेटायला बोलविण्यासाठी सुरक्षित अशी जागा शोधून तिचा वेळही फुकट जाऊ नये म्हणून लंच टाइममध्ये त्याला बोलाविले होते.

त्याला ओळखायचे कसे हा प्रश्न तिला होताच पण तो  स्टारबक्स मध्ये आल्यावर तिला फोन करेलच हयाची तिला खात्री होती.

बरोबर दोन वाजता रजनीने स्टारबक्समध्ये प्रवेश केला आणि एक उंच, देखणा, रुबाबदार, सुटाबुटातला साधारण वयाने २५ ते २८ च्या तरुणाने तो बसलेल्या टेबलावरून उठून तिच्या  समोर येत ” हाय रजनी ….. मी … मी मंगेश पराडकर. ” प्रथम तर  रजनी त्याच्याकडे बघतच राहिली….. तिच्या तोंडून काही शब्दच फुटेना. कसेबसे तिने त्याला हाय केले आणि त्याने तिला तो बसलेल्या टेबलवर बसायला नेले.

रजनीने भानावर आल्यावर विचार केला, ह्याने मला ओळखले कसे…. रजनीला त्याच्याआधी कधी त्याला भेटलेले  किंवा बघितलेले आठवत नव्हते. त्याने त्याच्या खिशातून त्याचे व्हिजीटींग कार्ड तिला दिले आणि रजनीला तिच्या आवडीनुसार कॉफी ऑर्डर देण्यासाठी रिक्वेस्ट केली. रजनीने दोन कॉफी ऑर्डर करून ते व्हिजिटिंग कार्ड वाचायला सुरवात  केली. सी इ ओ ऑफ पराडकर अँड पराडकर पॅकेजिंग इंडस्ट्रीज.

रजनीच्या मनात खूपच खळबळ चालू होती. एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीजच्या सी इ ओ चे माझ्याकडे काय काम असेल, का हा सगळा फसवा प्रकार चालू आहे. तिला काहीच कळत नव्हते तरीही तिने त्याचे काय काम आहे ते तरी बघू असे स्वतःलाच समजावून त्याला ” हा …. बोला  काय काम काढलेत माझ्याकडे…हो…. त्याच्याआधी मला एक सांगा, आपण ह्या  आधी कधी भेटलो आहोत का ….. म्हणजे तुम्ही  मला ओळखले कसे.” त्याने हसूनच उत्तर दिले , ” नाही …. आपण आज पहिल्यांदाच भेटत आहोत. गेल्या सहा महिन्यांपासून मला  तुम्हांला भेटायचे होते पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला मिळत नव्हता पण खूप प्रयत्न करून, खूप जणांच्या हातापाया पडून तो आत्ता चार दिवसांपूर्वी मिळाल्यावर मी तुम्हाला फोन केला. तसे आत्ता आपण भेटेपर्यंत माझे असे काही खूप  महत्वाचे काम नव्हते. फक्त तुम्हांला भेटून मनापासून तुमचे आभार मानायचे होते आणि तुमच्या काही माझ्याकडून अपेक्षा असतील तर, मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार होतो पण आत्ता तुम्हांला भेटल्यावर माझा विचार बदलला आहे आणि आता माझे तुमच्याकडं खरंच एक काम आहे.’   

क्रमश:….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print