सौ. मंजुषा सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ उद्धरली कोटी कुळे… लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
सुमारे ३५/४० वर्षापूर्वीची ही आठवण. औरंगाबाद एम. आय. डी. सी. च्या स्टाफ-क्वार्टर्स स्टेशनजवळच्या औद्योगिक क्षेत्रातच होत्या. त्याकाळी स्वत:चे घर असणे ही गोष्ट दुरापास्तच होती. क्वचित सेवानिवृत्तीनंतर ती शक्य होत असे. त्यामुळे बहुतेक कर्मचारी क्वार्टर्समध्येच राहत. या कॉलनीच्या मागेच एकनाथनगर हा भाग होता.
एकनाथनगर आणि कॉलनीदरम्यानच्या मैदानात हळूहळू एक झोपडपट्टी तयार झाली. छोट्याछोट्या झोपड्यांची गरीब वस्ती! तिथे नेहमी काहीतरी चहलपहल सुरु असे. वेगवेगळ्या सणांना लाउडस्पीकरवरून गाणी लावली जात. लाउडस्पीकर लावूनच लग्ने लागत, कॉलनीतील लोकांना घरात बसूनही मांडवात काय काय घडते आहे ते कळायचे. लग्नातील भांडणे, रुसवेफुगवेही सर्वांना ऐकू येत. आहेराच्या रकमाकी लाउडस्पीकरवरून जाहीर होत.
इथेच ६ डिसेम्बर आणि १४ एप्रिलच्या आधी एकदोन दिवसापासून भीमगीते लावली जात. महापरीनिर्वाण दिन बराचसा गांभीर्याने पाळला जायचा. मात्र १४ एप्रिलला मोठ्या सणाचा आनंद, उत्साह, सगळ्या वातावरणात जाणवायचा. त्याकाळी ऐकलेली गाणी अशा दिवसात नेहमी आठवतात. त्यातले छान ठेका असलेले, ‘पहा पहा मंजुळा हा माझ्या भिमरायाचा मळा’ आपोआप गुणगुणले जायचे. ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना’ हे काहीशा गंभीर सुरातले गाणेही सुरेश भटांच्या मनस्वी कवितेमुळे गोडच वाटायचे. त्यातले धृवपद प्रत्येक वेळी एक सुंदर चित्र उभे करायचे. समोर जणू बाबासाहेबांचा पुतळा नसून तेच उभे आहेत आणि स्वच्छ पिवळ्या कफन्या घालून तरुण भिक्कु त्यांना उभे राहून गुरुवंदना देत आहेत असे दृश मनासमोर तरळायचे. या गीतातील-
‘कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे,
तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे?
या भरा-या आमुच्या, ही पाखरांची वंदना’
हे कडवे आले की पुन्हा भटांची चित्रमय शैली अनेक चित्रे मनासमोर उभी करायची. त्यापुढचे कडवे तर अंगावर शहारे आणायचे-
कालचे सारे मुके, आज बोलू लागले,
अन तुझ्या सत्यासवे, शब्द तोलू लागले.
घे वसंता, घे, मनांच्या मोहरांची वंदना..
भटांनी बाबासाहेबांच्या कार्यामुळे घडून आलेल्या बदलाचे फक्त ६ शब्दात किती प्रभावी वर्णन केले होते- “कालचे सारे मुके, आज बोलू लागले, ”! त्याशिवाय बाबासाहेबांना वसंत ऋतूंची उपमा आणि अनुयायांना मोहराची उपमा म्हणजे खास ‘सुरेश भट टच’ होता! एक जण माणसांच्या आयुष्याचे सोने करणारा महामानव तर दुसरा शब्दांचे सोने करणारा परीस!
बहुतेक भीमगीतात बाबासाहेबांनी वंचित समाजाला मिळवून दिलेल्या नव्या जीवनाबद्दलची कृतज्ञता व्यक्त झालेली असते. कधीकधी ती इतकी उत्कट, हृदयातून आलेली, असते की तिचे रुपांतर भक्तीभावनेपर्यंत होते.
भटांच्या गाण्यात त्यांनी केवळ शब्दांनी बाबासाहेबांचे असेच किती भव्य शिल्प उभारले होते, पहा-
तू उभा सूर्यापरी, राहिली कोठे निशा,
एवढे आम्हा कळे, ही तुझी आहे दिशा,
मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना…
सूर्याच्या नुसत्या दर्शनाने सुप्त बीजातून अंकुर फुटतात ही किती सार्थ प्रतिमा!
असेच एक सुंदर भीमगीत लिहिणा-या महान कवीशी माझा अगदी जवळून परिचय होणार होता हे मला तेंव्हा ठाऊक नव्हते. त्यानंतर बरोबर १५वर्षांनी मी त्या कवीच्या घरी राहिलो, त्यांच्याबरोबर जेवण केले आणि नाशिकच्या मुक्त विद्यापीठात मुलाखतीला गेलो. यामागे होते आमच्या औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयातील कवी आणि विचारवंत असलेले माझे मित्र प्रा. ऋषिकेश कांबळे! त्यांनीच मला विद्यापीठाचे बोलावणे आले तेंव्हा रहायची व्यवस्था व्हावी म्हणून चिठ्ठी देवून वामनदादांकडे पाठवले होते.
‘चल ग हरिणी तुरु तुरु, चिमण्या उडती भुरू’ ‘ह्यो ह्यो ह्यो पाहुणा, सखूचा मेहुणा’ ‘सांगत्ये ऐका’ या सिनेमातील ‘सांगा या वेडीला, माझ्या गुलछाडीला, हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला’ यासारखी लोकप्रिय गाणी किंवा
‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट,
तिथूनच जाई माझ्या माहेरची वाट’
सारखे मधुर भावगीत लिहिणारे दादा एका झोपडपट्टीवजा वस्तीत पत्र्याच्या घरात, राहत. तेच ‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’चे कवी आहेत हे मला माहित नव्हते. श्रावण यशवंते यांनी गायलेले त्या गाण्याने बाबासाहेबांच्या आयुष्याचे संपूर्ण फलित चार कडव्यात मांडले!
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे,
एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती,
तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती,
अंधार दूर तो पळे, भीमा तुझ्या जन्मामुळे.
मुळात लोकशाहीर असल्याने वामनदादांच्या प्रत्येक रचनेत गेयता आणि ठेका आपोआप यायचा. त्यांनी केलेले वर्णन इतके यथार्थ, आणि तरीही काव्यमय होते की ज्याचे नाव ते!
जखडबंद पायातील साखळदंड,
तडातड तुटले तू ठोकताच दंड,
झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…
“झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे” ही ओळ ऐकताना आपोआपच डोळे ओलावत. बाबासाहेबांच्यापूर्वी केवढ्यातरी समुदायाला कोणतेच अधिकार नव्हते. साधे माणूस म्हणून जगणेही नशिबी नव्हते. जातीयता आणि भेदाभेदाची कीड लागलेल्या समाजवृक्षाला बाबासाहेबांनी स्वच्छ केले, शुद्ध केले, त्याला पुन्हा नवी पालवी आणवली आणि समतेची, प्रगतीची, गोड फळे सर्वांना चाखायला दिली. हे सगळे दादा किती कमी शब्दात सांगतात पहा-
कुजे वृक्ष तैसाच होता समाज,
हिरवीहिरवी पाने अन तयालाच आज.
अमृताची आली फळे, भीमा तुझ्या जन्मामुळे..
अभंगात संत जसे शेवटच्या ओळीत आपले नाव टाकत, उर्दू शायर शेवटची ओळ स्वत:लाच उद्देशून लिहित, तसे दादाही त्यांचे नाव गाण्यात चपखलपणे गुंफत-
काल कवडीमोल जिणे वामनचे होते,
आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते,
बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे..
बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या आधारे आपण प्रगतीच्या दिशेने केवढेतरी अंतर कापले आहे. तरीही परस्पर-सामंजस्याच्या अभावाच्या पार्श्वभूमीवर वामनदादांची ही ओळ- ‘आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते’ विचार करायला लावते. युद्धाच्या छायेत वावरणारे आजचे जग पाहता ‘बुद्धाकडे जग हे वळे, भीमातुझ्या जन्मामुळे’ ही ओळ महत्वाची ठरते. जुनी गाणी आजही केवढा सकारात्मक, रचनात्मक संदेश घेऊ उभी आहेत. आपण तो किती स्वीकारतो हाच खरा प्रश्न आहे.
☆
लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे.
७२०८६३३००
प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈