मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणी दाटतात— ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  मनमंजुषेतून ?

☆ आठवणी दाटतात ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

ऐकताच त्या काव्य ओळी—

आठवणी दाटतात—

माझे लग्न ठरले. त्यावेळी वडीलांनी आम्हाला सर्वांना ‘ या सुखांनो या’ हा सिनेमा दाखवला होता. आता केव्हाही  ‘या सुखानो या’ हे गाणे ऐकले की त्या मधुर आठवणी जाग्या होतात. एका निमित्ताने सीमाताई देवांशी बोलताना आम्ही या सिनेमाबद्दल, आठवणीबद्दल बोललोही आहोत.

माझ्या लग्नातली ही आठवण– लग्न अगदी थाटात लागले. ‘मिष्ठान्नम् इतरे जन:|’ या उक्तीप्रमाणे पंगतीवर पंगती उठत होत्या. लग्न मिरजेतील एका नामांकित कार्यालयात होते. त्याकाळी आजच्यासारखी सगळीकडे कार्यालयांची सोय नव्हती. त्यामुळे मिरजेतील कार्यालयांचा खूप नावलौकिक होता. माझे माहेर एक छोटेसे तालुक्याचे गाव होते. तिथल्या बऱ्याच जणांनी अशा कार्यालयातील लग्न पाहिलेलेच नव्हते‌. त्यामुळे बऱ्याच जणांना रंगीत पाटांची मांडणी, रांगोळ्या, उदबत्या, आग्रहाने वाढलेली पंगत या गोष्टींची खूपच अपूर्वाई वाटली.

ह्या पंगती सुरू असतानाच सर्व लग्न विधी पार पडले. आता दोन्हीकडची मानाची माणसे जेवायला बसणार होती. त्यामुळे या खाशा पंगतीसाठी गरम गरम भजी, पुऱ्या,  मसालेभात वगैरे खास व्यवस्था केली होती. रांगोळ्या, समया, उदबत्या, चांदीचे ताट- वाटी, असा थाट होता. आम्ही दोघे मध्ये आणि आजूबाजूला सर्व नातेवाईक असे जेवायला बसलो. उखाणे घेत आम्ही एकमेकांना घास दिले. हसत खेळत पंगत सुरू झाली

ह्यांच्या मामींनी  ‘ लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस गं लाडके ‘ हे गाणे खूप छान म्हटले. ऐकून जरा धीर आला‌. तोपर्यंत एक जणीने ‘ गंगा यमुना डोळ्यात उभ्या का ‘ हे गाणे सुरू केले आणि सगळे वातावरणच बदलून गेले.

माझे वडील आधीच खूप संवेदनशील होते. त्यातच आजी गेल्यापासून जास्तच हळवे झालेले होते. या गाण्यामुळे त्यांचे डोळे भरून आले. मी १- २ वर्षांची लहान असताना आई-वडील मला लाडाने बाळे म्हणत असत. ‘कडकडूनी तू मिठी मारता बाळे’  ही ओळ ऐकली आणि माझ्या वडिलांच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या. त्यांचे पाहून बहुतेकांचे डोळे पाणावले. एक दोघींनी तर हुंदके दिले. पाहता पाहता पंगतीचा सगळा नूरच पालटला. रंगाचा पुरता बेरंग झाला होता. पक्वान्नांची तर चवच गेली होती.

माझी अवस्था फारच केविलवाणी झाली होती. शेजारी नवरदेव आणि सासरची मंडळी. सर्वांच्या नजरा आमच्यावर खिळलेल्या. त्यामुळे तोंडावर उसने हसू आणत कसेबसे जेवण पार पाडले. दुपारचा हा प्रसंग अनुभवल्याने संध्याकाळी सासरी जायला निघताना रडू आवरण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. त्याचे माझ्या मनावर इतके दडपण आले की नंतर दोन-तीन दिवस चक्क दुखणे आले.

काही काही माणसांना काळ-वेळाचे भानच नसते. आपल्या कृतीने इतरांच्या आनंदावर विरजण पडते, याचे त्यांना काहीही देणे घेणे नसते. आमच्या लग्नाची ही पंगत माझ्या मनात कायमची घर करून बसली आहे. लग्नातल्या इतर सर्व आनंददायी गोष्टींवर तिने जरा जास्तच मात केलेली आहे. प्रत्येक गाण्याला गीतकार, संगीतकार, गायक यांच्या दृष्टीने एक विशिष्ट असा इतिहास असतो. या गाण्यामुळे हा असा इतिहास माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. लग्नाला यंदा ४५ वर्षे होतील. पण आजही जेव्हा केव्हा हे गाणे मी ऐकते तेव्हा नकळत डोळ्यांपुढे धुके दाटतेच.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबासाहेब…शुभा गोखले. ☆ सुश्री मीनल केळकर

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

?  मनमंजुषेतून ?

☆ बाबासाहेब…शुभा गोखले. ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

पद्मविभूषण महाराष्टभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शतक-वर्षात पदार्पण करत आहेत याचा आनंद सोहळा मनात सुरु असतांनाच, त्यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकावी लागली, आणि त्यांच्याविषयीच्या आठवणी मनात दाटून आल्या. त्यातली ही एक अगदी पहिली आठवण —–

पुण्यात रहात असल्यामुळे त्यांना अनेक प्रसंगी पाहण्याचं भाग्य मला लाभलंय… मग ते ‘ जाणता राजा ‘’च्या प्रयोगादरम्यान असो,  नाहीतर टिळक स्मारकमधे राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार समारंभात असो.  पण एका छोट्या प्रसंगी त्यांची-माझी झालेली प्रत्यक्ष भेट मी कधीच विसरू शकत नाही ! 

साधारण ४०-४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. पुण्यातल्या पेशवे-काळातल्या  विश्रामबागवाड्याला जुन्या वैभवाकडे परत नेण्याचा बाबासाहेबांनी विडा उचलला होता. त्याचाच भाग म्हणून असावा बहुधा, त्यांनी एक  प्रदर्शन तिथे आयोजित केलं होतं. प्रदर्शन दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणार होतं, पण संध्याकाळचे ७ वाजून गेले असल्याने  दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणून सगळ्या पाट्या, बॅनर वगैरे विश्रामबागवाड्याच्या तळमजल्यावर लागलेलेही  होते.  त्यावरची तारीख न पाहताच मी घाईघाईने वर पोहोचले (कारण प्रदर्शनाची वेळ ७.३०पर्यंत लिहिलेली होती)! 

आत गेले तर पांढरी दाढी असलेलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व प्रदर्शनाच्या तयारीवर शेवटचा हात फिरवत होतं. बाकी कुणीच नव्हतं ! माझी चाहूल लागल्यावर त्यांनी वळून प्रेमाने विचारलं, “ अगं आजच आलीस का ? प्रदर्शन तर उद्यापासून आहे ! “

मी पण निर्भयपणे सांगितलं की, “ आता खाली पाटी दिसली म्हणून आले. आम्ही लांब रहातो. आणि आता  परत गावात येता येणार नाही पुढच्या दोन दिवसांत ! “

मग त्यांनी ‘ बरं ‘ म्हणून सगळ्या प्रदर्शनाचं दर्शन घडवत मला वाड्याच्या गतवैभवाची कथा सांगितली. 

अशी exclusive treatment मिळणारी मी किती भाग्यवान होते हे कळायचं ते वय नव्हतं ! प्रदर्शनाची सैर संपल्यावर, शेवटाकडे पोहोचल्यावर तिथली पाटी वाचून मी चक्क फ्रॉकच्या खिशातून आठ आणे काढून त्यांना देऊ केले ! त्यांना माझं काय करावं हेच कळेना ! “ अगं राहू देत “ ते म्हणाले.  तर माझा एकच धोशा…’ प्रदर्शन बघण्याचं मूल्य ५० पैसे आहे ना पण !’ शेवटी माझी समजूत काढत म्हणाले की,” ते मूल्य उद्यापासून प्रदर्शन सुरू झाल्यावरसाठी आहे ! “ —   मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिला की ‘ शाळेत  इतिहास छान शिक ! ‘

—-आता इतक्या वर्षांनंतर या सगळ्या संस्कारांचं महत्व पटतंय ! आपला बहुमोल वेळ एका शाळकरी मुलीसाठी इतक्या सहजपणे खर्च करायची त्यांची तयारी, आता मला माझ्या विद्यार्थ्यांंसाठी केव्हाही वेळ द्यायला नेहमीच प्रेरणादायी ठरते ! 

श्री. बाबासाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

– शुभा गोखले

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोक्ष कशात आहे ? – मुकुंद पुराणिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ मोक्ष कशात आहे ? – मुकुंद पुराणिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार☆

चुनीलालजींना चालतांना कष्ट पडतात, पण आठवड्यातून कमीतकमी ३ वेळा ५०० मीटर लांब असलेल्या शंकर मंदिरात ते नियमित जात असतात. भाविक प्रवृत्तीचे आहेत. भगवान शंकराचं मंदीर आमची इस्टेट आहे, असं म्हणत ते दर्शनाला जातात. चांगली गोष्ट आहे ! 

माणूस श्रद्धावानच असावा. दगडाच्या देवावर, देवस्वरूप माणसांवर, सत् अशा कार्यांवर माणसाची श्रद्धा असणं स्वाभाविक आहे. पशू नसल्याचं… आणि माणूस असल्याचं ते एक लक्षण आहे. 

पण देवळांतील देवावर श्रद्धा ठेवत असता, आपल्या क्षेत्रात काही अन्य सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांद्वारे, राष्ट्र चिंतन,राष्ट्र आराधन, राष्ट्र उपासना चालत असते, तिकडे चुनीलालजी ढुंकूनही वळत नाहीत. 

मोक्ष हा वैयक्तिक पुरुषार्थ आहे. देवळात जाण्याने मोक्ष मिळतो….आणि मातृभूमीच्या संवर्धनार्थ योजिलेल्या कार्यात,आयामात, प्रकल्पांत तो मिळत नाही,असं वाटणं कितपत योग्य आहे ? 

मला वाटतं, या क्षेत्रात मोक्ष तर मिळतोच… पण ‘धर्म-पुरुषार्थ’ ही घडतो. आपल्या वैयक्तिक सत्कर्मात व संस्थांच्या सेवा प्रकल्पात धर्म आहे, ऋणमोचन आहे, ऋण फेडल्याचं समाधान आहे… हे आम्ही लक्षात घ्यायला हवे की नको ?  

जय भोलेनाथ ! जय श्रीकृष्ण ! प्रभू श्री रामचंद्रकी जय ! याच सुरात व याच भाव-भक्तीने, तन्मयतेने “भारत माता की जय !” चा जयजयकार तितकाच मोक्षदायी नाही का ?

देवासमोरचं कीर्तनसुद्धा आता अध्यात्मिक कमी व राष्ट्रीय अंगाने जाणारे अधिक होते आहे…. तेव्हा मोक्ष संकल्पनेचे तात्पर्य-अर्थ  देव, देऊळ यातच सिमीत आहेत… असं मानणं उचित नाही.

श्रीसमर्थ रामदास स्वामींनी राष्ट्र कारण केलं… संत गाडगेबाबांनी स्वच्छकारण केलं… कुणी महापुरूषांनी दलित समाजोद्धाराचं कार्य केलं… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व स्वयंसेवकांनी सेवा कार्ये पार पाडली, पाडताहेत…. मातृभूमीच्या रक्षणार्थ सैनिकांनी बलिदान केले… आजही करताहेत… या सर्वांना  ‘धर्म व मोक्ष’  हे दोन पुरूषार्थ तर प्राप्त झालेच, शिवाय अधिक काही ! 

जीवनाचा परमार्थ उलगडण्याचे  जिथे प्रामाणिक प्रयत्न होतात, तिथेही धर्म व मोक्षाचं दान पडतं, हे समजून घ्यायला हवे. 

आपल्याला काय वाटतं ?

ले : मुकुंद पुराणिक

संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुलसी विवाह ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ तुलसी विवाह ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नुकतीच दिवाळी संपली आहे, पण तरी परवापासून सुरु झालेल्या तुळशीच्या लग्नामुळे अजूनही मस्त सणाचे  वातावरण आहे, नुसते आजूबाजूला नाही, तर फेसबुक वर पण..

आज असंच दिरांशी बोलता बोलता , तुळशीच्या लग्नाचा विषय  झाला … आम्ही सांगलीत असताना दिरांकडे धडाक्यात ते लग्न साजरे करायचो.. तेव्हा माझ्या मनात लहानपणापासून पाहिलेली तुळशीची लग्नं आठवायला लागली ! आणि वाटलं की खरंच आपण का करतो तुळशी चे लग्न ?,हे आताच्या पिढीला समजेल अशा पध्दतीने सांगायला पाहिजे ! म्हणून हा लेखनप्रपंच !

आम्हीही लहानपणापासून तुळशीचे लग्न पाहिलंय. पण आता मुलींना त्याची कारणमीमांसा पण लागते. त्यामुळे मी लगेच त्याबद्दलची माहिती शोधायला सुरुवात केली. 

यामागची पौराणिक कथा आहे ती अशी–जालंदर नावाचा असुर देवांना अजिंक्य झाला होता. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. विष्णूने जालंदरचे रूप घेऊन वृंदेचे सत्वहरण केले. 

तेव्हा जालंदराने तिला शाप देऊन दगड केले. तेव्हा ती सती वृंदावनात प्रकट झाली. हीच ती  ‘तुळस ‘— विष्णूने याचे प्रायश्चित्त म्हणून तिच्याशी विवाह केला. विष्णूच्या कृष्णावतारात हे लग्न झाले. त्यामुळे आपण विष्णू आणि कृष्णाला तुळस वहातो.

—– या सर्व पुराणकथा झाल्या !

पण आताही आपण तुलसी विवाह का करतो ? आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्ट निसर्गाशी निगडीत केलेली आहे. निसर्गातील प्राणी, पशू- पक्षी, वनस्पती, वृक्ष- वेली, हे आपले सगेसोयरे आहेत. 

त्यामुळे माणूस या सर्वांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सव करतो. जसे वटपौर्णिमा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा… पंचमहाभूतांचे त्या निमित्ताने स्मरण केले जाते. 

तुलसी विवाहाची प्रथा ही अशीच आली असावी. तुळस ह्या वनस्पतीचे शास्त्रीय महत्व आहे. तुळशीचे झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे आहे. तिच्या मंजि-यांपासून असंख्य रोपे तयार होतात. सर्वांना ऑक्सिजन मिळावा म्हणून पूर्वी घराभोवती तुळशीची झाडे वाढवली जात. तुळशीमुळे कीटक येत नाहीत, इतकंच काय डासही कमी होतात. तुळशीचा रस अंगाला लावला की डास चावत नाहीत. तुळशीची पाने औषधी आहेत. तुळशीच्या पानांचा रस खोकल्यासाठी उपयुक्त आहे. तसेच त्वचेच्या रोगांवरही तुळशीचा रस उपयोगी असतो. अशी ही बहुगुणी तुळस पूजेसाठी योग्य ठरली !

पूर्वी च्या काळी स्त्रियांचे घराबाहेर पडणे समाजात मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना घराबाहेरची मोकळी हवा मिळत नसे. अशा विचाराने बहुतेक तुळशीला रोज स्त्रियांनी पाणी घालण्याची पध्दत  आली असावी. पूर्वी वाडा संस्कृती होती, तेव्हा वाड्यात शिरले की  मधोमध तुळशी वृंदावन असे. 

ती एक पवित्र जागा असे, जिथे संध्याकाळी घरातील स्त्रिया, मुले बाळे बसून शुभंकरोती, परवचा म्हणत असत. तुळशीसमोरच्या पणतीच्या शांत उजेडात मनही शांत होऊन जाई !

या दिवसात चिंचा,बोरे,आवळे यायला सुरुवात होते. ही फळे म्हणजे व्हिटॅमिन ‘सी’ चा साठाच जणू ! त्यामुळे तुळशी विवाहाच्यावेळी ही सर्व फळे पूजेसाठी असत.आपोआपच घरातील मुलांना ती  खायला मिळत. उसाची मोठी झाडे आणून ती तुळशीला मांडव म्हणून वापरली जात. दिवाळी  झाल्यानंतर मुलांसाठी तुळशीचे लग्न हा एक आनंददायी कार्यक्रम असे. दिवाळीत राहिलेले फटाके 

तुळशीच्या लग्नात उडवून संपवायचे. दिवाळी फराळ संपत आला असला तरी नवीन लाडू, करंजी लग्नासाठी बनवली जात असे. तुळशीचे लग्न झाले की विवाह- मुहूर्त सुरू होत असत. आणि वातावरण सणांकडून लग्न समारंभाकडे वळत असे.

तुळशीचे लग्न ही गोष्ट आता जरी कालबाह्य वाटत असली तरी तुळशीचे गुणधर्म काही नाहीसे होत नाहीत ! निसर्ग आणि ईश्वर  यांची सांगड आपल्या संस्कृतीत अशा पध्दतीने घातली गेली आहे. शिक्षणामुळे ज्ञान वाढले, सुबत्ता आली, पण अशांतता ही वाढली. एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. प्रत्येक कुटुंब म्हणजे एक बेट बनले आहे !  हे असे प्रसंग लोकांना जोडून ठेवायला मदत करतात. . हल्ली लोकांना एकटेपणा मुळे इतक्या मानसिक समस्याना तोंड द्यावे लागते.. नुसती  भौतिक प्रगतीच नाही तर मन:स्वास्थ्य  जपणे हे तितकेच महत्वाचे आहे . आपल्या संस्कृतीतून हे  आपसूकच घडून येत असे

— दुसऱ्याच दिवशी तुळशीचे लग्न करून मुलीने पण तुळशी लग्नाचे फोटो पाठवले. स्वत: छान साडी नेसलेला, नातीने परकर पोलके घातलेला, आणि नातवाने तुळशीसाठी अंतरपाट

धरलेला आणि हे सर्व कौतुकाने जावई बघत आहेत—असे फोटो मोबाइलवरून आले.आणि क्षणार्धात माझे मन विमानाच्या वेगाने दुबईला पोचले…तुलसी विवाह कसा साजरा झाला हे बघण्यासाठी !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बा.द.सातोस्कर….भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

??

☆ बा.द.सातोस्कर….भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिलं-  त्यांनी जाई ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्याचाच पुढचा भाग मेनका लिहिली. अनुपा, अभुक्ता, दिग्या शा अनेक कादंबर्‍या त्यांनी पुढे लिहून प्रकाशित केल्या.- आता इथून पुढे ) —-

बा. द. सातोस्कारांची  महत्वाची पुस्तके मात्र सागर साहित्यानी नाही,  शुभदा सारस्वत’चे प्रकाशक, गोगटे यांनी काढली आहेत. ही  पुस्तके केवळ लेखक सातोस्कर यांची नाहीत, तर लेखक आणि संशोधक सातोस्करांची आहेत. मराठी मासिकांचे पहिले शतक’  हे त्यांचे पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले. हे पुस्तक माहितीपूर्ण आहेच, पण संदर्भ साहित्य म्हणूनही उपयोगी आहे. गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार हे पुस्तक ‘सागर साहित्या’ने ७५साली  काढले. अर्वाचीन गोव्याचा इतिहास त्यांनी ३ खंडात लिहिला आहे. त्यांचे सर्वात महत्वाचे संशोधनपर पुस्तक म्हणजे गोमंतक प्रकृती आणि संस्कृती – ३ खंड.   हे ग्रंथ  शुभदा सारस्वत’ ने प्रकाशित केले आहेत . यात गोव्याचा प्राचीन इतिहास आहे, गोव्याचे प्राकृतिक वर्णन आहे. समाजव्यवस्था, लोकांची संस्कृती, सण , उत्सव सगळे आहे. या ग्रंथाचा पहिला खंड १९७९ साली प्रकाशित झाला. याला ‘केसरी मराठा संस्थेचा तात्यासाहेब केळकर पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर प्रकाशित झाले, ते बादसायन’ हे त्यांचे आत्मचरित्र. हे आत्मचरित्र म्हणजे काही केवळ ‘बा.द. सातोस्कर’ यांचे स्वत:चे चरित्र नाही. त्याला गोव्याचे अस्तर आहे. गोमंतकीय समाज , तिथले लोकजीवन, तत्कालीन गोव्याचे वातावरण , गोव्याचा निसर्ग याला जोडून ते येते. ‘बादसायन’ प्रकाशित झाले १९९३ मधे . ‘शुभदा सारस्वत’ नेच  ते प्रकाशित केले. या दरम्यान त्यांनी रामायणाचा अभ्यास करून अभिराम’ ही कादंबरी लिहिली. यावेळी त्यांचे वय होते ८० .  त्याच अभ्यासातून पुढे रामायणकालीन जमाती व संस्कृती असे एक छोटेखानी पुस्तकही लिहून टाकले. 

    १९८५ च्या दरम्यान दादा आजारी पडले. प्रकाशनासाठी करावी लागणारी दगदग त्यांना सहन होईना. आई आधीच गेली होती. मग त्यांनी ‘सागर साहित्य प्रकाशन’ बंद केले. ते शेवटचे माझ्या घरी आले, तेव्हा विषादाने म्हणाले होते, “ गोव्यात गेलो, तेव्हा दोन गोष्टी डोळ्यापुढे होत्या. मराठी हीच गोव्याची भाषा आहे, हे सिद्ध करायचे. आणि भाषिक व सांस्कृतिक एकतेच्या आधारावर महाराष्ट्र आणि गोवा यांचे एकीकरण घडवून आणायचे.” पण त्यांना हे शक्य झालं नाही, आणि याची बोच त्यांनी कायमची आपल्या काळजात वागवली. 

  पुढे माझ्या बहिणीने- लताने गोव्यातलं आपलं बिर्‍हाड – बाजलं हलवून पुण्याला मांडलं. मग गोव्यात जाणं झालंच नाही. नंतर दादा अर्धांगाने आजारी असल्याचे कळले. आई आधीच गेली होती.  दादांना भेटून यावं, असं खूप मनात होतं. पण त्यांना भेटायला जाणं नाहीच जमलं. नंतर दादा गेल्याचीच बातमी पेपरमध्ये वाचली.  

  दादा म्हणजेप्रकाशक, लेखक, संपादक, संशोधक, गप्पिष्ट, माणसांचे लोभी, कृतिप्रवण अशा व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंनी झळझळणारे लोलकाचे लखलखते झुंबर. ते मालवलं आणि गोव्याचं माझं माहेरही सरलं —-

-समाप्त-

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हितगुज ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? मनमंजुषेतून ?

☆ हितगुज ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

आज गौराईचे विसर्जन . प्रत्यक्ष जगत्जननी माहेरपणाला आली होती . तीन दिवस तटस्थ व्रतस्थपणे उभी होती . माझे घर न्याहाळत होती . नुसत्या कुंकवाचा तिलक  लावल्यामुळे किती तेजस्वी व प्रसन्न दिसत होती . घरभर फिरली . दृश्य अदृश्य गोष्टी पाहात होती . अगदी तिच्या स्वागतासाठीचा माझा आटापिटाही तिने पाहिला असेल . मी केलेल्या पाहुणचाराने ती खूश झाली असेल ना ! आज तिने निरोप घेतला .  तरीही तिच्या अस्तित्वाचा सुवास सुगंध घरभर दरवळत आहे . माझ्या मनातही तो रेंगाळून राहिला आहे . गौराईचा  निरोप घेताना डोळे भरून तर येतातच .  आरती मधील  शेवटच्या  कडव्यांचे उच्चारही कधी कधी नीट होत नाहीत . मन भरून येते .

चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी॥

लिहिल्या असतील माते माझे निज भाळी॥

पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी ॥

मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥

हे आई , माझ्या नशिबात सर्वच कुशल मंगल असणार नाही हे मी जाणते . पण तू माझ्याजवळ असलीस तर सर्व अमंगल आपोआप पुसून जाईल . प्रथम आम्हाला स्वतःमधील वाईट गुणांचे , वाईट सवयींचे विसर्जन केले पाहिजे . चराचरातील प्रत्येकाकडे सहृदयतेने पाहिले पाहिजे . तूच दिलेल्या दिव्य शक्तीची आम्हाला जाणीव झाली पाहिजे .

‘ थोडी श्रद्धा व विश्वास माझे ठायीं ठेवा म्हणजे या संसाररूपी खेळात तुम्हाला आनंद मिळेल,’ असेच काही तू सांगत होतीस ना !

खरेच आई आज थोडे थोडे कळते आहे . जीवनातील हा संसाररूपी खेळ म्हणजे एक श्रेष्ठ शाश्वत सत्य आहे . या सृष्टीत माणसाने सुखाने जगावे म्हणून तू किती भरभरून दिले आहेस . तुझी प्रत्येक  निर्मिती रसपूर्ण , सौंदर्य युक्त आणि परिपूर्ण आहे . पण आम्हाला हे समजून घेण्याला किती काळ जाईल कोणास ठाऊक ? चराचरात तुझ्यामुळे व्यापून असलेला आनंद आम्हाला कधी ओळखता येणार ? भरभरून देण्यामधले समाधान आम्हाला कधी कळणार ? केवळ ममतेने जग जिंकता येते हे कधी अनुभवता येणार ? प्रत्यक्षात पृथ्वीतलावर स्वर्ग लोकाची अनुभूती येईल असा सुदिन लवकर येवो, म्हणजे तुझ्या आरतीचा अर्थ खऱ्या अर्थाने आम्हाला कळेल .

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी॥

वससी व्यापक रूपे तू स्थूलसूक्ष्मी॥

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्ष – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ संघर्ष – भाग-2 ☆ संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 2

(नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते. ) इथून पुढे —–

नानाजी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. एका आंदोलनात इंग्रजांनी त्यांना घोड्याने तुडविले होते. त्याच्या खुणा त्यांच्या पाठीवर होत्या. शंकरला वाटायचे नानाजींनी स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारी पेन्शन मिळवावी.  पण नानाजींचा त्याला विरोध होता— “ मी स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले ते माझे कर्तव्य होते.  त्याचे पैसे मी का म्हणून घ्यावे ? जर पैसे घेतले तर हा व्यवहार झाला. माझ्या कार्याचा मला अभिमान आहे. माझ्या पाठीवरील व्रण हेच माझे सर्टिफिकेट आहे, नि त्याचा आनंद मला मिळतो. मी कधीही माझ्या देशप्रेमाची किंमत घेणार नाही. “  हे त्यांचे ठाम मत होते. नेमके तेच शंकरला आवडत नव्हते. जर सरकार देण्यास तयार आहे तर का घेऊ नये, हे त्याचे मत होते. पण नानाजी आपल्या मतावर ठाम असायचे. दुकानात अनेकदा आमच्या वडलांसमोर हा शाब्दिक संघर्ष व्हायचा.  दोघेही आपली बाजू वडलांसमोर मांडायचे.  वडील शंकरला समजवायचे की,

‘त्यांच्या संमतीशिवाय काही होणार नाही. तेव्हा नानाजींना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत शंकरने त्यांना त्याबद्दल आग्रह करू नये. ‘ शंकरला वाटायचे गुरुजींचे नानाजी ऐकतात.  तेव्हा गुरुजींनी त्यांना पेन्शनसाठी तयार करावे. पण आमचे वडील पक्के आदर्शवादी.  ते नानाजींना कधीच पेन्शनसाठी समजवायचे नाहीत. परिणाम असा झाला की शंकर नानाजीसोबत आमच्या वडलांचाही  विरोध करू लागला. आम्हाला मात्र शंकरचे पटायचे. पैशाची गरज काय असते ते आम्ही अनुभवले होते.  केवळ वडलांच्या तुटपुंज्या पगारावर आमचा मोठा परिवार चालवितांना आईची महिन्याच्या शेवटी होणारी ओढाताण आम्ही अनुभवत होतो. घरी शिकवणीला येणाऱ्या पोरांकडून फी घ्यावी असा तिचा आग्रह असायचा.  पण विद्यादानाचे पैसे घ्यायचे नाही हा आमच्या वडलांचा आदर्श. अनेकदा यावरून घरी झालेला संघर्ष आम्ही अनुभवला होता. त्यामुळे शंकर- नानाजींच्या संघर्षात आम्ही मनाने शंकरच्या बाजूला असायचो. तसे आमच्या विचारांना काहीच महत्व नव्हते, पण वाटायचे नानाजीनी पेंशन घ्यावी आणि घरचे,दुकानातील वातावरण आनंदी ठेवावे. पुढे पुढे नानाजीच्या दुकानातील वातावरण खूप तणावग्रस्त होत गेले. नानाजी आणि शंकर यांच्यात अबोला सुरू झाला. पुढे पुढे या तणावामुळे आमच्या वडलांचे नानाजींच्या  दुकानात जाणे कमी झाले. अचानक एक दिवस सकाळी शंकर आमच्या घरी येऊन धडकला.  त्याच्या हाती एक पोस्टाने आलेला लिफाफा होता, तो त्याने बाबांच्या हाती दिला. बाबांनी त्यातील पत्र काढून वाचायला सुरुवात केली.  कागदावरील अशोकस्तंभ खूण पाहून ते पत्र शासनाकडून आलेले आहे हे आम्हाला समजले. ते वर्ष महात्मा गांधीचे जन्मशताब्दीवर्ष होते, आणि शासनाने त्या निमित्ताने पेन्शन न घेणाऱ्या आदर्शवादी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या सत्काराचे आयोजन केले होते.  त्या यादीत नानाजींचे नाव होते, त्याचेच पत्र नानाजींना आले होते. पण नानाजी सत्काराला नाही म्हणत होते, त्यामुळे त्यांना समजवावे म्हणून शंकर आला होता. बाबांनी चौकशी केली, नकाराचे कारण विचारले–शंकर म्हणाला ‘ सत्कारासोबत अकरा हजार मिळणार आहेत  म्हणून ते नाही म्हणतात.’ आता मात्र बाबा गंभीर झाले.  विचार करून शंकरला म्हणाले,” तू जा. स्वीकारतील ते सत्कार “. दुपारी बाबा एकटेच नानाजीना भेटले. काय चर्चा झाली माहीत नाही, नानाजी तयार झाले. ठरलेल्या दिवशी बाबा, नानाजी, त्यांची पत्नी, व शंकर नागपूरला गेले.  तिथे नानाजींचा सपत्निक  सत्कार झाला.  ताम्रपत्र, खादीचे धोतर, बंगाली शाल, श्रीफळ व अकरा हजाराचा चेक नानाजीना,  व त्यांच्या पत्नीला नऊवारी पातळ- खण देऊन मंत्रीमहोदयाहस्ते सन्मानित केलं गेलं. सोबतच कार्यक्रमाच्या संचालकाने घोषणा केली. नानाजींनी मिळालेले अकरा हजार रुपये अनाथाश्रमाला देणगी म्हणून देऊन टाकले होते. केवळ ताम्रपत्र, चंदनाचा  हार,व खादीचे कपडे, शाल स्वीकारली. शंकरचा चेहरा उतरला.  पण वडलांनी त्याला समजावले, आश्वस्त केले –’ तुझा फायदा होईल.’- सारे चंद्रपूरला परत आले. आता मात्र शंकरचे बाबांकडे येणे वाढले. नानाजींना  मिळालेल्या ताम्रपत्रामुळे शंकरच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरू झाली. दोन्ही पोरांना स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून नोकऱ्या मिळाल्या.  शंकर जाम खुश झाला.आता मात्र नानाजी- शंकर अबोला संपला. पुन्हा बाबांचा दुकानातील वावर वाढला.  संघर्ष संपून आनंदोत्सव नांदू लागला.  पुन्हा बाबा- नानाजीचे कविता वाचन रंगू लागले. काही वर्षानंतर कळले की सत्कार होण्यासाठी नानाजींचे नाव आमदारांना सांगून बाबांनीच  शासनाला कळविले होते. आज नानाजीचे दुकान काळाचे ओघात नष्ट झाले.  तिथे नवीन दुकानांची इमारत उभी आहे.  पण आजही त्या रस्त्याने गेलो की नानाजीचे ते दुकान, तो संघर्ष डोळ्यासमोर  चलचित्रपटासारखा सरकत जातो.

समाप्त

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बा.द.सातोस्कर….भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

??

☆ बा.द.सातोस्कर….भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं,-  त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा मी जाई, तेव्हा तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील विजय सुराणाने लिहिलेल्या ओळी आठवत,

‘असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली ।

क्षणभरी पहुडाया अनंताने हांतरली।।  आता इथून पुढे – )

पुढे पुढे पुण्याला त्यांच्या मुलीकडे वृंदाकडे जाताना ते आमच्याकडे थांबत आणि मग पुढे पुण्याला जात. आमचा हा थांबा त्यांच्यासाठी  फक्त एक-दोन दिवसांचा असे. पण तेवढ्या वेळात वाङ्मय क्षेत्रातील काही घडामोडी, त्यांचे काही नवीन संकल्प, प्रसिद्ध  झालेले नवीन पुस्तक असं खूप काही कळत असे. 

दादांना दोन मुली आणि एक मुलगा होता. आणि साहित्याच्या रेशमी धाग्याने जोडलेल्या आम्ही दोघी मुली —माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर, लतावर त्यांचा स्वतःच्या मुली असल्यासारखाच लोभ जडला होता. दादांनी म्हणजे बा.द.सातोस्करांनी आपल्या ९१ वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यात काय काय आणि किती किती केलं, हे सांगायचं तर एक ग्रंथच होईल. ते ग्रंथपाल होते. प्रकाशक होते. लेखक होते, संपादक, संशोधक होते आणि गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्तेही होते. गोवा मुक्ति लढा धगधगता ठेवण्यासाठी त्यांनी सन ५४ ते ६२  दूधसागर हे पाक्षिक चालवले होते. गोवा मुक्त झाल्यावर त्यांना दैनिक गोमंतक वृत्तपत्राचे संपादन करण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी ती जबाबदारी ५ वर्षे सांभाळली आणि नंतर या जबाबदारीतून मुक्त झाले.  

दादा सातोस्कर साधारणपणे १९३२-३४च्या दरम्यान मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात काम करत होते. तिथल्या अनुभवाच्या जोरावर, पुस्तकांचे शास्त्रशुद्ध व निर्दोष वर्गीकरण कसे करावे, हे शिकवणारी द्विबिंदू वर्गीकरण पद्धत त्यांनी शोधून काढली आणि त्यावर पुस्तकही लिहिले. 

ते ग्रंथवेडे होते. त्यांनी ग्रंथ वाचले. ग्रंथांवर प्रेम केले. ग्रंथ लिहिले. ग्रंथप्रेमातून ग्रंथरक्षणाच्या म्हणजेच ग्रंथपालनाच्या शास्त्राकडे वळले. त्यावर पुस्तक लिहिले. गाव तिथे ग्रंथालय ही चळवळही त्यांनी सुरू केली. उत्कृष्ट प्रकाशक हा ग्रंथवेडा असतो- नव्हे असायलाच हवा, असं ते बोलून दाखवत. 

१९३४ साली दादा मुंबईत असताना, लक्ष्मणराव सरदेसाईंचे ‘ कल्पवृक्षाच्या छायेत ‘ आणि जयंतराव सरदेसाईंचे ‘ सुखाचे दिवस ’ ही पुस्तके विक्रीची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याकडे आली. त्याचवेळी त्यांच्या मनात आले, पुस्तकाशी संबधित असा पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय करावा. १९३५मध्ये बा.द. सातोस्कर पदवीधर झाले. त्या काळात त्यांना कितीतरी चांगल्या नोकर्‍या मिळाल्या असत्या. पण साहित्य प्रेमाने, त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. आणि ‘ सागर साहित्य प्रकाशन ‘ ही प्रकाशन संस्था काढली. १९३५ ते १९८५ या ५० वर्षांच्या काळात त्यांनी हा प्रकाशन व्यवसाय अव्याहतपणे, उत्साहाने व आनंदाने केला. मराठी प्रकाशक परिषदेच्या पहिल्या संमेलन प्रसंगी, जुन्यातला जुना प्रकाशक म्हणून त्यांचा सत्कार झाला होता, तर ५व्या संमेलन प्रसंगी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. 

सातोस्करांनी प्रकाशनासाठी पुस्तक निवडताना प्रथितयशांच्या पुस्तकांबरोबरच नवोदितांची पुस्तके काढून त्यांना प्रोत्साहन दिले. सुजाण वाचकांकडून दर्जेदार पुस्तक काढले, अशी वाहवा मिळवून घेण्यापेक्षा, अधिकाधिक लोकांपर्यंत आपले पुस्तक पोचले पाहिजे,  अधिकाधिक लोकांनी ते वाचले पाहिजे आणि अधिकाधिक लोकांना ते कळले व आवडले पाहिजे,  असा त्यांचा दृष्टीकोन होता. म्हणूनच पुस्तकाची निवड करताना त्यांनी ‘क्लास’चा विचार न करता ‘मास’चा विचार केला. प्रकाशन व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी दोन-तीन वर्षात स्वत:चा प्रेस घेतला. पुढे १९४३च्या दरम्यान कबूल केलेल्या लेखकांनी वेळेवर पुस्तके आणून दिली नाहीत, तेव्हा प्रेसला काम पाहिजे, म्हणून त्यांनी स्वत:च पुस्तक लिहिण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांनी पर्ल बकच्या ‘मदर’ कादंबरीचा ‘आई’ असा अनुवाद केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या द गुड अर्थ ‘ चा ‘धरित्री असा अनुवाद प्रसिद्ध केला. प्रकाशक सातोस्कर असे लेखक सातोस्कर झाले. त्यानंतर त्यांनी ‘जाई‘ ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्याचाच पुढचा भाग ‘ मेनका ‘ लिहिली. अनुपा, अभुक्ता, दिग्या अशा अनेक कादंबर्‍या त्यांनी पुढे लिहून प्रकाशित केल्या. 

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्ष – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ संघर्ष – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

वडिलांसोबत सायंकाळी आम्ही  जेव्हा बाजारात जात असू तेव्हा नानाजी टेलर यांचे दुकान हा थांबा निश्चित ठरलेला असायचा.

नानाजी टेलर अतिशय  जिव्हाळ्याने व आदराने आमच्या वडिलांचे स्वागत करायचा, विचाराने दोघेही आदर्शवादी असल्याने दोघांचेही खूप जमायचे. बाबा शिक्षक असल्यामुळे वर्तमानपत्र वाचन हा त्यांचा दिनक्रम असायचा. वाचलेल्या बातम्या ते नानाजींना सांगायचे नी मग त्यावर चर्चा रंगायची. आम्हाला या चर्चेतील काही समजायचं नाही, पण नानाजीच्या दुकानात जाणे आम्हाला आवडायचे. नानाजी टेलरचे दुकान म्हणजे काही ऐसपैस नी सुशोभित शो रूम नव्हती. दहा बाय बाराची एक खोली.  तिला उत्तर दक्षिण असे दोन्हीकडे रस्ते. त्यामुळे दोन्हीकडे दरवाजे. त्यात दोन शिलाई मशीन, एक कापड कटाईचा लाकडी पाट, कपडे ठेवण्याची एक लाकडी अलमारी आणि बसण्यासाठी ऐक बेंच, असा या दुकानाचा पसारा होता. पण त्यात नानाजी खूश असायचे. आम्हालाही या दुकानात बदल व्हावा असे वाटत नसे. तसे या दुकानात बसणे आम्हाला आवडण्याची इतरही अनेक कारणे होती.  त्यातील प्रमुख कारण म्हणजे नानाजींच्या दुकानाला लागून प्रसिद्ध कोहपरे यांचे हॉटेल होते. त्यांचा भटारखाना दुकानातून दिसायचा. त्यांचे कारागीर पदार्थ बनवायचे ते पाहणे आनंददायी वाटायचे. पदार्थांचा सुवास दुकानापर्यंत जाणवायचा.

वडिलांच्या कडक शिस्तीमुळे हॉटेलात जाणे आमच्यासाठी निषिद्ध गोष्ट होती. त्यामुळेही कदाचित बनणारे पदार्थ आनंद देऊन जायचे. एक किरकोळ शरीरयष्टीचा नोकर सतत खलबत्यात काहीतरी कुटत असायचा. बहुदा हॉटेलला लागणारे मसाले, अद्रक लसूण जिरे तो कुटत असावा. पण याव्यतिरिक्त काही इतर कामे करतांना मी त्याला पाहिले नाही. नानाजींच्या दुकानासमोर खाजांची सावकाराची पेढी होती. अनेक गरजू कर्जदार लोक तिथे बसून असायचे. त्यांचे चिंताग्रस्त चेहरे आम्हाला तेव्हाही जाणवायचे. त्यांची अगतिकता ,लुबाडणूक होते याची जाणीव आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. त्यामुळे कदाचित मला सावकार सिनेमातील कन्हय्यालाल किंवा जीवन या अभिनेत्यासारखा वाटायचा. समोर एक सोनाराचे दुकान होते. त्याच्या दुकानासमोर असलेल्या नालीतील माती साफ करून त्यातून सोने मिळविण्याचा प्रयास करणाऱ्या विशिष्ट जमातीच्या महिला नेहमी दिसायच्या.  त्यांच्या कडेवर  लहान मुले असायची. दिवसभर आपल्या कोहपऱ्यासारख्या पात्रातून पाण्याच्या सहाय्याने त्या माती गाळून सोने काढायच्या. त्यांच्या कार्याचे निरीक्षण करणे हे आमचे आनंददायी कार्य होते.

नानाजीं च्या दुकानात आलमारीलगत एक मोठी पिशवी ठेवलेली असायची. त्यात कापडाच्या चिंध्या असायच्या.  त्यांचा उपयोग  कापडी बाहुल्या बनविण्यासाठी व्हायचा.  माझी बहीण सोबत असली की तिची नजर त्या पिशवीवर असायची.  ,नानाजींचा मूड चांगला असला की तिला परवानगी मिळायची, नि रंगबिरंगी कापडी चिंध्यांवर ती खजिना मिळाल्यागत तुटून पडायची. नानाजींना कविता ऐकण्याची आवड होती आणि बाबांना कविता करण्याची. दोघेही एकत्र आले की रंग जमायचा. बाबांचे कविता ऐकवणे आणि नानाजींचे त्यांना दाद देणे, यात किती वेळ जातो याचे दोघांनाही भान नसायचे. आम्ही मात्र कंटाळून जात असू, अनेकदा बाजार बंद व्हायचा तरी दोघांचे चर्चासत्र थांबत नसे. नानाजींच्या दुकानात त्यांच्यासोबत त्यांचा शंकर हा मुलगाही काम करायचा. शंकर विवाहित व दोन मुलांचा पिता होता. नानाजी आणि शंकर यांचे कधी फारसे पटत नसे. तो व्यवहारवादी होता. त्याचा कल अधिक पैसे मिळविण्याकडे असायचा. विनाकारण दुकानात येऊन बसणारे व नानाजींशी चर्चा करणारे त्याच्या नजरेत बिनकामाचे असायचे. तो तसे बोलत नसे, पण त्याच्या देहबोलीतून ते जाणवायचे. मात्र त्याने आमच्या वडिलांचा कधी अपमान केला नाही. नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते. 

क्रमशः….

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बा.द.सातोस्कर….भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

??

☆ बा.द.सातोस्कर….भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

संपादकीयसाठी दिनविशेष बघताना दिसलं, २७ तारखेला बा. द. सातोस्कर यांचा स्मृतिदिन आहे. हे पाहिलं आणि आठवणींची पाखरं भिरीभिरी येऊन मनाच्या झाडावर उतरली आणि किलबिलत  राहिली.

त्यांची माझी पहिली भेट झाली, गोव्यातील डिचोली येथे झालेल्या साहित्य संमेलनात. त्यापूर्वी माझी मामेबहीण लता हिच्याकडून त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं. तेवढ्यानेही माझी छाती दडपून गेली होती. डिचोलीला लताच्या बालकविता- संग्रहाचे प्रकाशन होते. अध्यक्ष होते, पं महादेवशस्त्री जोशी. ते माझ्या मामांचे मित्रच. तिथे कार्यक्रमाच्या आधी लताने माझी बा. द. सातोस्कर यांच्याशी ओळख करून दिली आणि म्हणाली, ‘ ही माझी आत्येबहीण. हीसुद्धा कथा-कविता लिहिते.’ संमेलनाच्या दरम्यान मधल्या वेळेत त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या.  त्यांनी मोठ्या आत्मीयतेने माझी चौकशी केली. मी काय काय लिहिलं, कुठे कुठे छापून आलं, वगैरे विचारलं. मोठ्या (कर्तृत्वाने) लोकांशी बोलताना मी फारशी मोकळी होत नाही. त्यांच्याशी  बोलताना मला दडपणच येतं. धाकुटेपणाची ( कर्तृत्वाच्या दृष्टीने) भावना मनाला वेढून रहाते. पण सातोस्करांचं मोठेपण असं की, ते मधलं औपचारिकतेचं अंतर तोडून दादा स्वत:च  धाकुटेपणाजवळ आले. दादा म्हणजे सातोस्कर. जवळचे, परिचित त्यांना दादा म्हणत. मीही मग त्यांना दादा म्हणू लागले. त्यानंतर दादांनी मला मुलगीच मानलं आणि तसं घोषितही केलं. त्यानंतर सांगलीला आल्यावर त्यांचा आणि माझा पत्रव्यवहार वाढला. मी नवीन काही लिहिलं की त्यांना वाचायला पाठवावं असा त्यांचा आग्रह असे. हा पत्रव्यवहार प्रामुख्याने माझ्या बाजूने पाठवलेल्या कविता, मांडलेल्या कथा- कल्पना किंवा मग सगळीच कथा, लिहिलेले लेख या संदर्भात असे.  तर त्यांच्या बाजूने त्यांच्या नवीन लेखनाच्या योजना किंवा साहित्य क्षेत्रातील विविध घटनांची माहिती, या संदर्भात असे. 

पुढच्या वर्षी मंगेशीला साहित्य संमेलन झालं. अध्यक्ष होते, बा. द. सातोस्कर. एका परिसंवादात बोलण्यासाठी मला त्यांनी निमंत्रित केलं. संमेलनाला सुरुवात होण्यापूर्वी एका खोलीत दादा, गंगाधर गाडगीळ, जितेंद्र अभिषेकी , कृ. ब. निकुंब इ. थोर थोर मंडळी बसली होती. मला बघताच दादांनी मला आत बोलावलं. बस म्हणाले. मग त्यांनी ‘ ही माझी मुलगी, उज्ज्वला केळकर. ही सुद्धा लिहिते, बरं का! आणि चांगलं लिहिते.’  अशी माझी ओळख करून दिली. मला अतिशय संकोच वाटला. अनेक वर्षे शारदेची उपासना करणार्‍या व्यक्तीने, तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तींपुढे माझं कौतुक करावं, याची एकीकडे अपूर्वाई वाटत असताना, दुसरीकडे संकोचही वाटत होता. त्याचवेळी त्यांच्या एका मित्राने चेष्टेने विचारलं , ‘ आम्हाला माहीत नसलेली ही मुलगी तुला केंव्हा झाली? ’ दादा सहजपणे म्हणाले. ‘ डिचोलीच्या साहित्य संमेलनात. तिथेच तिची आणि माझी ओळख झाली.’ 

बा. द. सातोस्कर यांच्याशी नाते जुळले आणि  गोवा हे माझे माहेर झाले. शाळा- कॉलेजात आणि नंतरही बा.भ. बोरकरांच्या कविता वाचताना, त्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना गोवा माझी स्वप्नभूमी झाली होती. आता ते माझं माहेर झालं.  त्यावेळी दादांनी मला घरी येण्याचा खूप आग्रह केला होता. पण मला वेळ नव्हता. दुसर्‍या दिवशीचं परतीचं माझं रिझर्वेशन झालं होतं.

त्यानंतर मी ४-५ वेळा गोव्याला गेले, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे, मी आणि माझी बहीण लता गेलो. पणजीपासून १५-१६ कि.मीटर अंतरावर असलेल्या करंजाळे इथे ‘स्वप्नगंध’ हे काव्यात्मक नाव असलेली त्यांची टुमदार बंगली होती. घराच्या मागच्या बाजूला मांडवी नदीचे बॅक वॉटर. भोवताली स्निग्ध शांतता. अतिशय रम्य जागी त्यांची छोटी बंगली होती आणि बंगलीत होते स्वागतशील आई आणि दादा. त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा मी जाई, तेव्हा तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील विजय सुराणाने लिहिलेल्या ओळी आठवत-

     ‘असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली ।

      क्षणभरी पहुडाया अनंताने हांतरली।। 

क्रमश:….  

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print