मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अबोल… ☆ श्री विकास शहा ☆

? मनमंजुषेतून ?

☆ अबोल… ☆ श्री विकास शहा ☆

“अबोल Attachment”

माझ्या आई-बाबांनी एकमेकांना त्यांच्या नावाने कधीच हाक मारली नाही… निदान आमच्यासमोर, चार चौघात तरी नाहीच.

त्यावेळी यांना एकमेकांजवळ बसून अगदी प्रेमाचं तर सोडाच, पण कधी साधं कुजबुजतांनाही ऐकल्याचं आठवणीत नाही.

बाबा आईसाठी साडी घेऊन येत असत नवी, तेव्हा तिला जवळ बोलावून, प्रेमाने तिच्या हातात ती साडी देणं, हा प्रकार नसे, तर पिशवी टेबलावर ठेऊन बाहेरुनच ओरडून सांगत असत “अगं हे बघ जरा बरंय का?”

आणि आईला ते बरं नाही, तर कायम अप्रतिमच वाटत असे…! बदला बदलीचा प्रश्न कधीच ऊद्भवला नाही.

बाबा आईवर ओरडायचे… चिडायचे… अगदी आमच्यासमोर तिला बोलायचे.

पण आईने चुकून कधी ‘अरे’ ला ‘कारे’ केल्याचं पुसटसही स्मरणात नाही.

तसं करणं चुकीचं आहे, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण त्याकाळातही बाई नोकरी करत असे…

कदाचित घरच्या परिस्थितीमुळेही, असेल, पण…

“मीही कमावते… मीही खुप दमते… मग मीच एकटीने का म्हणून करायची ही राब राब?” हे वाक्य त्या पिढीतील कुठल्याही बाईने, तिच्या नव-याला ऐकवलं नसेल… कधीच.

राग यायचा बाबांचा… एक wicked thought यायचा खुप लहान असतांना मनात की, सुट्टीच्या दिवशी दुपारचं जेऊन मस्त घोरत पडलेल्या बाबांच्या ऊघड्या राहिलेल्या तोंडात भांडंभर पाणी ओतावं नी पळून जावं…

पण हा विचार मी त्या कधीच न घेतलेल्या भांड्यातील पाण्याच्या घोटाबरोबरच गिळत असे.

पण जसं वय वाढू लागलं तसं बाबांचंही घरातलं contribution  कळू लागलं…

एक भक्कम अस्तित्व त्यांचं, आम्हा सगळ्यांना निर्धास्त करत असे, यात काडीमात्र शंका नाही.

या माझ्या बाबांना आईच्या आजारपणांत… दोन-एक मोठ्या आँपरेशन्स दरम्यान मी दिवस रात्र तिच्यासाठी झटतांना पाहिलंय… तिच्या उशाशी जागतांना पाहिलय, एखाद्या क्षणी हतबल… हळवं होऊन डोळ्यांची ओली किनार रुमालात लपवतांना पाहिलंय.

गोवंडीला झालेली आईची बदली जीवाचा आटापीटा करुन, महिन्याभराच्या आत विक्रोळीला आणून ठेवल्याचंही पाहिलंय.

माहेराला गिरगावात आलेल्या आईला नी आम्हाला, दिवसाआड आँफिसमधुन येऊन… भेटुन… फक्त डोळ्यांवाटे तीची चौकशी करुन… आधी डोंबिवली नी मग मुलुंडला अपरात्री परततांना पाहिलय.

आताशा आई बाबांवर ओरडते… आणि बाबांची गोगलगाय होते… पण आईचा राग येत नाही… ऊलट मजा वाटते,फिरलेली चक्र पाहून. कारण, मला माहित असतं, की, ‘हे तिचं ओरडणं म्हणजे स्वतःआधी बाबांसाठी जगणं असतं.’

बाबांची औषधं… पथ्य-पाणी ही तीची priority झालीये अगदी स्वतःची, वितभर वरुन बोटभर झालेली खळगी भरण्याही आधीची.

‘बाबांनी कमरेला पट्टा बांधलाय/ नाही बांधलाय,’ याला ती ‘आपण गळ्यात मंगळसुत्र घातलय/ नाही घातलय’, या गोष्टीईतकच महत्व देते.

रात्री झोपतांनाही मंगळसुत्र गळ्यातुन न काढणारी ती, बाबांनी पट्टा काढलाय की नाही हे आवर्जुन बघते.

आमच्या पिढीच्या  उघड… उथळ… दिखाऊ प्रेमापेक्षा, ह्या पिढीचा अव्यक्त… अबोल… खोल जिव्हाळा, हे अनाकलनीय सत्य आहे माझ्यासाठी… अगदी निर्विवादपणे.

आयुष्यभर एकमेकांशी चार घटकाभरही निवांत होऊन न बोललेली ही पिढी, एव्हढी घट्ट एकमेकांशी कशी राहू शकते?

 एकमेकांना कधी चोरटा स्पर्श ही न करणारी ती पीढी, फक्त डोळ्यांतून साठलेल्या प्रेमावर एव्हढा लांबचा पल्ला एकत्रीत कसा गाठू शकते?? हे मला सतावणारे गहन प्रश्न होते… आहेत… राहतील.

ह्या त्यांच्या अबोल ‘Attachment’ ला खरंच माझं साष्टांग दंडवत आहे  🙏

पत्रकार विकास शहा

दैनिक लोकमत, शिराळा (सांगली)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आत्महत्या करावी वाटते…संजय आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆  आत्महत्या करावी वाटते…संजय आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

“आत्महत्या करावी वाटते”, म्हणून एकजण डॉक्टरांकडं गेला. डॉक्टर माझे मित्र. त्यांनी समुपदेशनासाठी त्याला माझ्याकडं पाठवलं.

“आत्महत्या करायचीच आहे”, यावर गडी ठाम होता. त्याला त्याची कारणं होती. ती कारणं अगदी तकलादू नव्हती. जगावंसं वाटू नये, अशी कारणं होती ती. विष्ण्ण, खिन्न करणारी आणि उपाय आवाक्यातही नसणारी अशी कारणं होतीच ती.

मुळात तो तसा बुद्धिमान. विचारी. कलासक्त. पन्नाशीच्या उंबरठ्यावर. पण, अशा वळणावर उभा होता की आता जगाचा निरोप घेणं अधिक सोईचं. आगामी काळ फारच कठीण. इतके सारे गुंते होते आयुष्यात की त्या प्रत्येकावर काम करत बसण्यापेक्षा अलगद जगाचा निरोप घेणं चांगलं. त्याचं लॉजिक काही अगदीच चुकीचं नव्हतं.

आमच्या गप्पा सुरू झाल्या.

यथेच्छ गप्पा ठोकल्या.

दोनेक तास गप्पा झाल्यावर त्याला म्हटलं, “यार. मजा आली. उद्या भेटू.”

त्यावर तो म्हणाला, “अहो, पण मला आत्महत्या करायची होती. म्हणून मी आलो होतो तुमच्याकडे. समुपदेशनासाठी. तुम्ही त्यावर काही बोललाच नाहीत.”

मी म्हटलं, “अरे हो. विसरलोच. बोलू पुढच्या वेळी. घाई कुठं आहे. एक फक्त करा. आपण बोलल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घ्यायचा नाही.”

त्यानंही तसं आश्वासन दिलं.

*

या गोष्टीला काही महिने उलटले.

आज तो मित्र पुन्हा भेटला.

“यार, काय मूर्खासारखा विचार करत होतो मी? आत्महत्या वगैरे…”

तोच हसायला लागला.

मग मनसोक्त गप्पा झाल्या.

*

दरम्यानच्या काळात नेमकं काय घडलं?

माझ्याकडं येऊन तो म्हणाला होता, “मी आत्महत्या करणार म्हणजे करणार.”

मी म्हणालो होतो, “जगावं की मरावं हा ज्याचा-त्याचा निर्णय. माझी विनंती एकच. मला नव्वद दिवस दे. आपण बोलत राहू. त्यानंतर तुला हवं ते कर. तू जगत राहिलास तरी जगात क्रांती होणार नाही आणि मेलास तरी कोणाला काही फरक पडणार नाही. पण एवढी पन्नास वर्षं म्हणजे १८००० दिवस जगलास ना! आणखी नव्वद दिवस मरू नकोस. बाकी आपण बोलू.”

आम्ही नव्वद दिवसांचा कार्यक्रम आखला.

त्याला सांगितलं, “तुझ्या हातात ९० दिवस आहेत. म्हणजे दोन हजार तास. त्यातले हजारेक तर झोपेत आणि बाकी असेच गेले. उरले हजार तास. नाही तरी, मरायचेच आहे. हे हजार तास वापरू ना मस्त.”

सुरूवात आम्ही केली तीच मुळी माथेरानात.

कारण, त्याच्या माथेरानातल्या आठवणी मोठ्या रम्य होत्या!

रम्य माथेरानात आम्ही दोन दिवस राहिलो.

त्याला आवडणारी वाइन. मासे. असं भरपेट खाल्ल्यावर तो झोपी गेला.

दुस-या दिवशी सकाळी सकाळी त्याला घेऊन बाहेर पडलो. हिवाळा होता तेव्हा. धुक्याच्या दुलईत पहुडलेलं माथेरान आणि शांत तळ्याकाठी निःशब्द बसलेलो आम्ही.

‘तुझी लायकी काय, माझी लायकी काय आणि आपल्या सभोवताली जे विसावले आहे, त्याचे मोल काय! किती मिळतंय आपल्याला… आपली लायकी नसतानाही! जोवर तू जिवंत आहेस, तोवर ही सुखं तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत. तेव्हा, यार धमाल करत राहा.”

एवढंच त्याला सांगितलं आणि आनंदानुभव घेऊन आम्ही परत फिरलो.

दुस-या दिवशी त्याच्या सोसायटीचं गेट टुगेदर होतं. सांस्कृतिक कार्यक्रमात त्याला गायचं होतं. पण, दडपण होतं. ‘जमेल का? नाही चांगले गायलो, तर लोक काय म्हणतील?’

“काही का म्हणेनात? आपल्याला कुठं जगायचंय? गेलं उडत जग. गायचं आणि निघायचं. जगायचं त्यांना आहे. आपल्याला निघायचं आहे. आपल्याला काय फरक पडतो? ते हसतील वा खिदळतील. आपल्याला कुठे आहेत त्यांच्या जगण्याचे नियम? आपल्याला तर मरायचंय.”

तो बिन्धास्त मनापासून गायला.

ग्रेट नाही, पण लोकांना चक्क आवडलं. त्यालाही भारी वाटलं.

पुढच्या दिवशी त्याला घेऊन गेलो, ते अशा घरात.

जिथं कोरोनामुळं घराची पार वाताहात झालेली.

बाप मेला. आई मेली. तीन कच्चीबच्ची उरली.

आणि, एक म्हातारी.

त्यांना जेवण घेऊन गेलो.

ती पोरं याला बिलगली.

यानं मग त्यांना गोष्टी सांगितल्या. शाळेतल्या कविता म्हणाला. एका सामाजिक संस्थेनं या मुलांची जबाबदारी घेतलेली. हा म्हणाला, “माझी सगळी इस्टेट यांच्या नावानं करतो.”

म्हटलं, “इस्टेट सोड. तू त्यांना वेळ दे. प्रेम दे. ही तीन आयुष्यं उभी राहातील.”

दुस-या दिवशी त्याला फोन केला.

तर, काही शेड्यूल ठरण्याच्या आधीच हा त्या गोतावळ्यात जाऊन रमलेला.

आता मला तो शेड्यूल सांगू लागला.

“अरे, हिला पुस्तकं आणायचीत. त्याला कॅडबरी आवडते. मधली जी आहे ना, ती अप्रतिम चित्रं काढते. तिला रंगपेटी आणायचीय. म्हातारीचे पाय दुखताहेत. मी गुगलवर सर्च केलं. ते अमुक तेल चांगलं आहे. तुला काय वाटतं?”

दिवस असेच गेले.

त्याला मी सांगितलं-

“नव्वद दिवस होऊन गेले. आता, हवं तर तू मरू शकतोस.”

तो म्हणाला,

“मूर्ख आहेस का तू? त्या पोरांना आणि म्हातारीला घेऊन मला माथेरानला जायचंय.”

मी म्हटलं, “साला तू काही मरत नाहीस!”

तर म्हणतो कसा –

“मरायला आयुष्य पडलंय. थोडं जगू तर दे. “

 

– संजय आवटे

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाणमाय… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆पाणमाय… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

पाणमाय।

याही गोष्टीला झाली 10 वर्षे.

अचानक माझा गुडघा दुखायला लागला.

गेले ऑर्थोपेडिक  मित्रा कडे.

त्याने सगळे xray काढले, म्हणाला, काय करतेस ग व्यायाम.

म्हटले रोज  जाते की बाबा तळजाई चढायला.

म्हणाला, उद्यापासून ते बंद.

अरे बाबा, मग करू तरी काय या गुडघ्याला.. म्हणाला, येते का पोहायला, पोहायला सुरवात कर, नाहीतर खरे नाही त्या गुडघ्याचे.

अरे बाप रे.

आता शाळेत असताना पट्टीची पोहणारी मी आता, साठी नंतर कुठे जाऊ पोहायला.

पण इलाज नव्हता.

चौकशी केली आणि जवळच एक सुंदर तरणतलाव सापडला.

हा माझ्या घराजवळ, आणि पुन्हा Covered होता.

म्हणजे12 महिने मी पोहू शकणार होते लगेच पैसे भरले.

पहिल्या दिवशी पाण्यात उतरताना आणि उतरल्यावर अशी भीति वाटली.

मला नुसता वॉटर वॉक घ्यायचा होता. काठावर सर बसले होते.

सर कसले, 25 वर्षाचा मुलगाच.

म्हणाले, मॅडम, येतंय ना, पोहायला मग करा की सुरवात.

देवाचे नाव घेऊन सुरवात केली आणि काय आश्चर्य.

शरीर बेटे, मुळीच विसरले नव्हते, हो काहीही.

 किती आनंदात मी पोहायला लागले.

 वावा. फार् मजा वाटली.

मग हळूहळू माझ्या सारख्या, बायका भेटल्या.

सगळ्या जणी माझ्या वयाच्या, थोड्या लहान मोठ्या.

आमची मुले आणि महिला अशी  बॅच होती.

एरव्ही वर्षातले जवळजवळ 8 महिने हा तलाव केवळ आमचाच असायचा.

 

पण एप्रिल मध्ये परीक्षा झाल्या, की छोटी छोटी मुले पोहायला येऊ लागायची.

ती आमच्या बरोबरच असायची.

मग काय. आमचे सर अगदी बिझी असायचे या पोरांना शिकवण्यात.

किती मनापासून शिकवायचे सर त्यांना.

4 वर्षांपासूनची मुले यायची शिकायला.

आई वडिलानाच किती हौस.

काठावर बसून सूचना करायचे.

आणि पोहून वर आले, की लगेच छानसा बाथरोब, आणि डब्यातील खाऊ.

कौतुक तर कित्ती.

आधी रोज रडारड, मग सर म्हणायचे अरे काही नाही होत. बघ बघ.

तो दादा कसा पोहायला लागला.

तुला हसतील की सगळे, भित्रा म्हणून.

काही मुले तर रडून रडून तलाव डोक्यावर घ्यायची.

आमच्या  बॅच ला  ध्रुव यायचा.

अगदी, बारीक, गोरापान, आणि चारच वर्षाचा जेमतेम.

बाहेर असेपर्यंत, बडबड.

सरांनी पाण्यात घेतले की आक्रोश सुरू.

आईबाबा, मावशी, आजी. , सर्वांना हाका मारूनमोठमोठ्याने रडायचा मग आम्ही पोहत असलो की सरांना म्हणायचा.

ही मावशी माझ्या मध्ये येतेय तिला बाजूला करा.

मग सर म्हणायचे मावशी, ध्रुव पोहतोय, बाजूला व्हा हं.

असे करत ध्रुव मस्त पोहायला लागला.

 त्याचे रडणे, थरथर कापणे बघून एकदा मी त्याच्या वडिलांना विचारले होते,

अहो, इतका लहानआहे ध्रुव, का घाई करताय त्यालापोहणे शिकवायची किती रडतोय तो रोज.

ते हताश पणे म्हणाले, काय सांगू हो, तुम्हाला, घरी 3 वाजले की हा मला पोहायला न्या असा टाहो फोडून डोके उठवतो मग इथे आणले की गप्प बसतो.

ते, मी सर आणि इतर सगळ्या हसायलाच लागलो आणि ध्रुव लाजून वडिलांच्या मागे लपला होता.

साधारण पंधरा दिवसात सगळी मुलं सरांनी तरबेज करून टाकलेली असायची मग शेवटच्या दोन तीन दिवसात मुलांचे आजीआजोबा, कौतुकाने आपल्या नातवंडांचे पोहणे बघायला यायचे. मग एकच गोंधळ.

आजी बघ ना मी कशी उडी मारतो आजोबा माझा विडिओ घ्या ना.

आजीआजोबा कौतुकाने विडिओ काढायचे इतर वेळी शूटिंग ला बंदी असायची.

ते जून पर्यंत चे 4 महिने नुसते गडबडीने असत.

मग तो पर्यंत आमचीही या छोट्या दोस्तांशी मैत्री झालेली असे.

नावानिशी आम्ही त्यांना ओळखू लागलेले असू  मग शेवटच्या दिवशी, ती मुले आमचा निरोप घेत.

मावशी बाय बाय.

आता उद्या शाळा सुरू आमची.

आता पुढच्या वर्षी येणार हं नक्की आम्ही तुम्ही सगळ्या पण असणार ना एखादी निकिता, इशिता, श्लोक, समर्थ विचारायचे.

हो तर. आम्ही बाराही महिने येतो रे, तुम्ही नक्की या हं.

मग आम्ही त्यांच्या साठी घरून खाऊ नेलेला त्यांना देत असू पुन्हा पूल रिकामा व्हायचा.

काही दिवस मग आम्हाला करमायचे नाही.

पुन्हा आमच्या आम्ही,आमचे पोहोणे सुरू करत असू सर ही मुकाट हरवल्या सारखे काठावर बसून असत.

 या दोन वर्षात,कोरोना मुळे सर्व तलाव बंद होते किती  किती मिस केले आम्ही या आमच्या दोस्ताला.

दोन वर्षे तलाव पूर्ण रिकामा केलेला होता.

तो नुसत्या रिकाम्या खोली सारखा तलाव बघून वाईटच वाटले.

पण आता आम्हाला सगळ्यांना मेसेज आले.

आपला तलाव सुरू झाला या.

आम्ही एकमेकींना फोन केले आणि लगेच जायला लागलोही खूप आनंद झाला, ते स्वच्छ निळेशार तुडुंब भरलेले नितळ पाणी बघून.

मला या तलावाने, काय दिले नाही?

तर सगळेसगळे दिले.

माझा उत्साह परत दिला.

माझे गुडघे थाम्बले.

मला खूप छान मैत्रिणी मिळाल्या.

तिथली माणसे आमची दोस्तच झाली.

माझ्या आणि मैत्रिणींच्याही, खूपशा तक्रारी नाहीशाच झाल्या आपले जी ए कुलकर्णी म्हणतात, तसे पाणी ही पाणमाय आहे.

तुम्ही तिच्या कुशीत शिरलात की ती तुमच्यावर आपले उबदार पांघरूण घालते.

आई सारखे प्रेमच करते पाणी तुमच्यावर.

त्यात नसतो स्वार्थ, नसतो काही हेतू.

पाणमायच ती.

या पाणमायेची ओढ लागते.

 दुपारी 3 वाजले की आमची पावले तलावा कडे वळतातच.

बाहेर धुवाधार पाऊस पडत असतो.

आणि ते धारा नृत्य बघत आम्ही निवांत पोहत असतो.

खूपच थंडी पडली की मग म्हणतो अग काल 6 होते की temperature. मग आता, जरा नको ना यायला.

की मग आम्ही पुन्हा थोडे थांबतो की पुन्हा आमचं पोहोणे सुरू होतं.

ही पाण मायेशी जमलेली गट्टी या जन्मी तरी सुटायची नाही.

 

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गीतरामायण.. एक सुखद अनुभव… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? मनमंजुषेतून ?

☆ गीतरामायण.. एक सुखद अनुभव… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आयुष्यातील एक सुखद अनुभव.  गीतरामायण.

आधुनिक वाल्मिकी कविवर्य ग. दि.माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांचे गीत रामायण माझ्या विशेष जिव्हाळ्याचे आहे. एप्रिल १९५५ मध्ये या गीतरामायणाचे पहिले गीत प्रसारित झाले आणि १९५५ मध्ये माझा जन्म झाला. नकळत त्या गीतांशी नाळ जोडली गेली असणारच. मला आठवते बारा तेरा वर्षांची असताना पुन्हा ही सर्व गाणी वर्षभर आकाशवाणीवर सादर होत होती. तेव्हा रेडिओ वरून ऐकत ऐकत सर्व गाणी लिहून घेतली होती.  पुढे त्याचे पुस्तक घेतले.बहुतेक सर्व गाणी मला पाठ होती.

बाबुजी सुधीर फडकेंचे गीतरामायण मैफिलीत अगदी त्यांच्या गादीसमोर बसून ऐकलेले आहे.त्यांची सही जपून ठेवली आहे.

सुधीर फडके, पुरुषोत्तम जोशी यांचे निवेदन मनाला भुरळ घालत होते. वयाबरोबर या गीतरामायणाची ओढ वाढतच गेली, जी आजही टिकून आहे. शहरापासून लांब राहत असल्याने कधी संधीच मिळाली नव्हती. पण कधीतरी या गीतरामायणाच्या सादरीकरणाचा भाग होण्याची तीव्र इच्छा होती.गीतरामायणाला पन्नास वर्ष पूर्ण होताना ही इच्छापूर्ती झाली.

२००५ साली सुवर्णमहोत्सवी वर्ष होते.सांगलीत श्री. फडणीस सर आणि त्यांचे सहकारी सुवर्णमहोत्सवानिमित्त मोठा कार्यक्रम करणार होते. मला त्याचे निवेदन करण्यासाठी विचारणा झाली. अनपेक्षितपणे हे सुवर्णदान माझ्या झोळीत पडले.

दोन दिवस कार्यक्रम करून ३६ गाण्यांचे सादरीकरण आम्ही केले. खूप मोठा बहारदार कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दोन्ही दिवशी नाट्यगृह तुडुंब भरून आवारात गर्दी झाली होती. कार्यक्रम अप्रतिम झाला. लोकांकडून कौतुकाची पसंती भरभरून मिळाली. अतिशय आनंद झाला. एका वेगळ्याच तृप्तीने मन भरून गेले.

आणखीन तीन चार ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही सादर केला.माझी इच्छा रामरायानेच अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण केली होती. माझ्या वयाची पन्नाशी  गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवाबरोबर अशी दणक्यात साजरी झाली. ही गोष्ट माझ्या मर्मबंधातली ठेव बनून राहिली आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ समज, गैरसमज, अंदाज मांडू नका ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆  समज, गैरसमज, अंदाज मांडू नका ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

समज ,गैरसमज, अंदाज मांडू नका🙏

तहानभुकेने अगदी व्याकुळ घामाने चिंब झालेले तुम्ही  बऱ्यापैकी सावली असलेलं  झाड शोधून आसपास कुठे पाणी मिळतय का हे बघताय तेवढ्यात समोरच्या बिल्डिंग मधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष जात आणि ती व्यक्ती तुम्हाला पाणी हवंय का विचारते !

त्या क्षणी तुम्हाला काय वाटेल ?

त्या व्यक्तीबद्दल तुमचं मत काय होईल ?

ती व्यक्ती मग  खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते , तुम्ही लगबगीने तिथे जाता पण नंतरची 15 मिनटं तिथे कोणीही येत नाही !

आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल  काय वाटेल?

हे तुमचं दुसरं मत असणार आहे

थोड्यावेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते “सॉरी मला जरा उशीर झाला पण तुमची अवस्था बघून मी तुम्हाला नुसत्याच  पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे ! “

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे ?

तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येत की अरे ह्यात साखर अजीबातच नाहीये !

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत होईल ?

तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊच काढते आणि म्हणते

 तुम्हाला चालत असेल नसेल आणि किती कमी जास्त गोड आवडत असेल हा विचार करून मी मुद्दामच आधी साखर घातली नाहीये !

आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत झालं आहे ?

मग विचार करा अवघ्या 15 -20 मिनिटात तुम्हाला तुमची मत , तुमचे आडाखे भरभर बदलावे  लागतायत   अगदीच सामान्यातल्या सामान्य परिस्थितीत क्षणात आपले विचार, आपली मतं तद्दन चुकीची ठरू शकतात तर मग कोणाबद्दल फारशी काहीच माहिती नसताना,ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे हे माहीत नसताना केवळ वरवर पाहून त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं  योग्य आहे का ? जर नाही तर एखाद्या बद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणे योग्य नाही का ?

असं आहे की जोपर्यंत कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतय तोपर्यंतच ते चांगले असतात नाहीतर वाईट ? गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात तेव्हा “एकमेकांना समजून घ्या” म्हणजे जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत.

इंटरेस्टिंग आहे की नाही?

मत बनवताना घाई करु नये…!!.                           वाचता वाचता सहज वेचलेलं….

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंडिता रमाबाई सरस्वती… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

? पंडिता रमाबाई सरस्वती ? सौ राधिका भांडारकर ☆

पंडिता रमाबाई सरस्वती

५ एप्रिल १९२२. पंडीता रमाबाई सरस्वती यांचा मृत्युदिन.

राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय स्तरावर,मूलभूत सामाजिक कार्यासाठी गाजलेलं पहिलं अलौकिक भारतीय महिला व्यक्तीमत्व!

स्त्रियांसाठी अत्यंत भीषण असा काळ. बालविवाह,जरठ कुमारी विवाह,पतीनिधनानंतर केशवपन करुन केलेला तिचा मानसिक छळ. माणूस म्हणून जगण्याचे तिचे सारे अधिकारच हिसकावून घेतले जायचे. मन मारुन एका अंधार्‍या खोलीत तिचं जीवन कुरुपतेत सडायचं. अशा समाजानं अव्हेरलेल्या पीडीत स्त्रियांच्या मागे पंडीता रमाबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या. बालविधवांच्या पुनर्वसनासाठी त्या झटल्या.

वास्तविक त्या काळातल्या अनेक सांकेतिक, पारंपारिक समाजजीवनाला हादरून सोडणार्‍या घटना त्यांच्या जीवनात घडल्या. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही  तशीच होती.

त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी  त्यांच्या पत्नीलाही शिक्षित केले. आणि रमाबाईंना विवाह बंधनात न अडकवता तिच्यासाठी शिक्षणाचे दार ऊघडले. त्यांचा संस्कृत या भाषेचा पाया मजबूत करुन घेतला. मातृभाषेइतकेच संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.

रमाबाईंच्या डोळ्यासमोर अनेक स्वप्ने होती. त्यांचे गगन अफाट अथांग होते. पण त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांच्यावर दुर्दैवाचे अनपेक्षित आघात झाले. सोळाव्या वर्षीच त्यांचे प्रिय माता पिता, बहीण यांचे निधन झाले. मात्र तरीही त्यांनी स्वत:ला सावरलंं. त्यानंतर त्या भारतभर हिंडल्या.

जिथे जातील तिथे त्यांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला.

स्त्रियांची परवशता,गुलामगिरी,विधवांची विदारक स्थिती त्यांनी जवळून पाहिली. त्यांच्या दु:खाने त्यांचे काळीज विदीर्ण झाले आणि या स्त्रियांसाठी काहीतरी ठोस  केलेच पाहिजे हेच त्यांचे जीवन ध्येय बनले. स्त्रीशिक्षण या मूळ मुद्याचाच विचार करताना, स्त्रियांसाठी विद्यालय काढण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

भावाच्या निधनानंतर त्या खूप एकट्या पडल्या. बंगालमधे असताना,बिपीन बिहारी मेघावी या तरुणाच्या प्रेमात त्या पडल्या. विवाहबद्धही झाल्या. मात्र हा युवक खालच्या जातीतला असल्यामुळे त्यांच्या विवाहाला प्रचंड विरोध झाला.

त्याकाळातला हा पहिला अंतर्जातीय, अंतर्प्रांतीय अंतर्भाषिक विवाह होता. संकुचित समाजाचा विचार न करता स्वत:च्या मनाचा कौलच त्यांनी मानला.

पतीबरोबर त्या आसामला आल्या. त्यांना एक कन्याही झाली. पण दैवयोग निराळेच होते. सुखाचे दिवस फार काळ थांबले नाहीत. जोडीदाराच्या स्वर्गवासाने त्या पुन्हा एकट्या पडल्या. आणि पुन्हा महाराष्ट्रातच आल्या.

स्त्रीशिक्षणाचा सतत पाठपुरावा करत त्या व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन करु लागल्या. महात्मा ज्योतिबा फुल्यांप्रमाणेच त्यांनी १८८२ साली हंटर कमीशन समोर स्त्रीशिक्षणाच्या बाजूने साक्ष दिली. त्यांच्या भाषणाने स्वत: हंटर हेही प्रभावित झाले. इंग्लंडला परतल्यावर ते रमाबाई. . एक विलक्षण स्त्री व्यक्तीमत्व यावरच बोलले. सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सर्वांनी ऊभे राहून रमाबाईंना मानाचा मुजरा दिला.

त्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. त्यावेळी मद्रास मेडीकल काॅलेजात स्त्रियांना प्रवेश मिळत असे. पण रमाबाईंना मात्र इथे प्रवेश नाकारला. मग त्या ‘द सिस्टर्स आॅफ द कम्युनिटी अॉफ सेंट मेरी द व्हर्जीन,वाँटेजया संस्थेच्या मदतीने त्या इंग्लंडला गेल्या. मात्र तिथेही त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना प्रवेश मिळाला नाही. कारण त्यांना कमी ऐकू येत होतं. भारतात प्रवास करत असताना ,अघोरी थंडीत त्यांचे श्रवणकेंद्र बाधित झाले होते.

पण इंग्लंडमधे त्यांचे वास्तव्य गाजले ते त्यांच्या धर्मांतरामुळे. त्यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. भारतात तेव्हां हाहाकार उडाला. धर्म बदलला तरी त्यांनी भारतीयत्वाचा त्याग केला नव्हता. त्यांच्या क्राॅसवरचे शब्दही संस्कृत भाषेत कोरले होते. त्या म्हणाल्या, “जुन्या आणि चांगल्या गोष्टी मला प्रिय आहेत. देशहिताला बाधक असणार्‍या गोष्टी माझ्या हातून कधीही घडणार नाही.”

स्वतंत्र बाण्याच्या, चिंतनशील वृत्तीच्या त्या होत्या.

सदैव त्यांनी मनाचा कौल स्विकारला. समाजाचे,परंपरेचे भय बाळगले नाही. त्यांचे विचार स्पष्ट होते. आत्मनिष्ठा जबरदस्त होती. कोणत्याही सत्तेला  ठणकावून जाब विचारण्याचा बंडखोरपणा असलेली ती एक तेजस्विनी होती.

पहिली भारतीय महिला डाॅक्टर आनंदीबाई जोशी या त्यांच्या समकालीन. रमाबाईंचा त्यांच्याशी स्नेह होता. त्यांच्यात समान विचारधारा होती. पीडीत, शोषित भगिनींचे पुनर्वसन हेच दोघींचे ध्येय होते. परंतु या समान विचारांच्या बुद्धीमान स्त्रियांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली असती तर  नवसमाज घडला असता. डॉ. आनंदीबाईंचे अकाली निधन  झाल्यामुळे समाज एका क्रांतीस मुकला.  

रमाबाई म्हणजे एक वैचारिक तुफान होते. प्रश्नांच्या मुळांशी त्या जात. त्या अत्यंत जागरुक आणि तितक्याच संवेदनशील होत्या. ग्रंथवाचन, धर्मचिकीत्सा, चर्चा, भाषणे, प्रवास, पत्रलेखन हे त्यांचे आवडते कार्यक्रम. समाजाने त्यांच्या निष्ठेची ऊपेक्षा केली. निंदा केली.. पण तरीही, येशुच्या तत्वासमान त्यांनी त्यांना माफ केले. त्याच समाजासाठी त्या मनापासून झटल्या.

त्यांचे गडद तेजस्वी घारे डोळे,सरळ नाक, शुभ्र दंतपंक्ती, काळे दाट केस हे त्यांचे सुंदर रुप!  विलक्षण मोहमयी तेजस्विताच! बुद्धीमत्तेचं एक वेगळं वलय त्यांच्या भोवती होतं.

कलकत्ता ही राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन यांसारख्या सुधारकांची भूमी. सन १८७८ मधे या भूमीने, रमाबाई डोंगरे या प्रज्ञावतीला पंडीता रमाबाई सरस्वती ही पदवी बहाल केली.

केशवचंद्रांनी त्यांना वेदांचा अभ्यास करायलाही लावला. जो त्या काळी स्त्रियांसाठी निषीद्ध होता.

अशी ही स्वयंसिद्धा! केडगाव ही त्यांची कर्मभूमी. तिथे त्यांनी विधवांच्या पुनर्वसनासाठी आश्रम उभारला. आज तिथे काही सामानसुमान आहे. रमाबाईंची काही पेंटींग्ज आहेत. त्यांचे थडगेही आहे.

पण वाईट याचेच वाटते की हे सारं मोडकळीस आलेलं असून दुर्लक्षित आहे. डाॅ. आनंदीबाईंचं  स्मृतीस्थळ अमेरिकेत जतन केलं गेलं मात्र पंडीता रमाबाई सरस्वती या, स्त्रियांच्या समस्येसाठी जाणीवपूर्वक लढा देणार्‍या तेजस्वितेचे स्मृतीस्थळ मात्र आज शोचनीय स्थितीत आहे!

त्याचा जीर्णोद्धार व्हावा ही आशा बाळगून,एक स्त्री म्हणून कृतज्ञतेने मी त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना वंदन करते!!

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वठलेला मोहोर… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ वठलेला मोहोर… ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆ 

त्या दिवशी माझी  जुनी पेशंटभेटायला आली.

“आज मी औषधासाठी नाही आलेय डॉक्टर पण एक काम आहे तुम्ही सवड काढून एक दिवस आमच्या गावी व्याख्यानाला याला का आमच्या खेडेगावात मुलींना जरा आरोग् आणि क्षणाचे महत्व याबद्दल चार शब्द सांगाल का खूप खेडे आहे आमचे आणि फार गरज आहे मुलींना हे तुम्ही सांगण्याची मी विचार करून सांगेन म्हटले ती म्हणाली बाई याच आम्ही तुमची उतरायची छान करू व्यवस्था काळजी नका करू. गाडी आहे ना सरपंचाची आणि मी 24 तास असेन बरोबर मी हो म्हटले आणि ठरलेल्या दिवशी गेले पण  गुंजे वाडी लाहोते बरेच लांब पण छान छोटेसे खेडेगाव होते.”

शाळेतच ठेवले होते माझे व्याख्यान मला वाटले त्याहीपेक्षा मुली चुणचुणीत हुशार आणि  चौकस होत्या माझे व्याख्यान त्या मन लावून ऐकत होत्या त्यांना या खेड्यातून बाहेर पडून काहीतरी करण्याची खरोखरच इच्छा दिसत होती व्याख्यान झाले आणि समोर लक्ष गेले

समोर थोडासा ओळखीचा चेहरा दिसला माझ्यातही कितीतरी बदल केला असणार ना काळाने. मी त्या बाईना  नीटसे ओळखले नाही या अरुणा ताई काळे बर का आमच्या येथे बँकेत ऑफिसर आहेत गेली 5 वर्ष इथे आहेत बर का खूप हुशार आहेत बाई आणि खूप मदतही करतात सगळ्यांना मला आता अरुणाची नीट ओळख पटली अरुणा हसली आणि म्हणाली

“एवढा वेळ लागतो हो मैत्रिणीला ओळखायला काय तू तरी. मी तर तुला पाहताक्षणीच ओळखले आहे तशीच आहेस अगदी चल ग, काही ही काय अरुणा तू।मात्र खूप बदललीस .कुठे कॉलेज मधली मॉडर्न बॉयकट असलेली बिनधास्त अरुणा आणि कुठे की पोक्त चष्मा लावलेली गंभीर बँक मॅनेजर.”

अरुणा म्हणाली “चल आता माझ्याच घरी.”

“सरपंच माझी मैत्रीण आता माझ्याच घरी नेणार हं।” सरपंच हसून बर म्हणाले

अरुणा चा फ्लॅट सुंदरच होता “अग त्यात काय बँकेने दिलाय गाडीही दिलीय बरं. जेवल्यावर

मस्त गप्पा मारुया” 

“बाई, तू डॉक्टर झाल्याचे समजले आपल्या वाटा इंटर नंतर वेगळ्याच झाल्या अरुणा रागावणार नसलीस तर एक विचारू?”

“तुझे आणि श्रीरंग चे किती गाजलेले affair होते त्याचे काय झाले?”

“तुम्ही अगदी मेड फॉर इच  आदर होतातच मग तुमचे लग्न नाही का झाले?”

“माफ कर हं, पण उत्तर नसेल द्यायचे तर नको देऊ ह.”

अरुणा हसली आणि म्हणाली,

“किती वर्षांनी भेटतोय आपण. तुला हक्कच आहे हे मला विचारायचा. काय सांगू तुला मी पूर्ण बुडूनच गेले होते त्याच्यात त्या वर्षी मी काहीही अभ्यास केला नाही कशीबशी पास झाले मग मी side बदलून कॉमर्स ला गेले, तुम्ही तिघी गेलात मेडिकलला, अंजु इंजिनीअर झाली, मी मात्र झाले बीकॉम श्रीरंग म्हणजे माझा जीव की प्राण होता. त्याच्या शिवाय मला करमायचेच नाही. कित्ती बेत आखले आम्ही आयुष्याचे। छान बंगला बांधू, सजवू, आपली मुले, होतील, त्याच्यासाठी बागेत झोपाळा झुलेल. पण हे सगळे,रांगोळी पुसून जाते तसे एका फटक्यात पुसून गेले.  दरम्यान खूप गोष्टी घडल्या. अचानकच काय कसे झाले, पण श्रीरंग   इंजिनीरिंग साठी दूर निघून गेला मी इकडे त्याची वाट बघत होते डोळे लावून. पण त्याने परस्पर एका भलत्याच मुलीशी लग्न केले. मला माहित ही नाही मी वेडी व्हायची शिल्लक राहिले बघ, आई बाबांना ही खूप वाईट वाटले बघ, पण मग मी जिद्दीने M Com पूर्ण केले, बँकेत नोकरीही मिळाली मला माझ्याच एका सहकाऱ्याने मागणी घातली. मी आईबाबांना विचारून त्याच्याशी लग्न केले खूप खूप चांगला होता माझा मनोज. मला एक मुलगी आहे ती खूप शिकून अमेरिकेला गेली खूप सुखात आहे ती. मी जाते ना तिच्याकडे। दुर्दैव तरी बघ, लग्ना नंतर 9च वर्षात मनोज कॅन्सर ने गेला माझी इथे बदली झाली अरुणा ने सुस्कारा सोडला, असे आहे बघ सगळे.”  

“अरु, , अजूनही तू खरोखर छान दिसतेस, का अशी एकटी राहतेस कर की लग्न.”

“अग माझी मुलगी पण हेच म्हणाली की आई, तरुणपणीच बाबा गेले तू एकटीने मला इतके सुंदर वाढवलेस कर की लग्न. मला आवडेल, आई, अशी एकटी नको राहू ना. तुला गम्मत सांगू? नियती कशी असते बघ पाच वर्षांपूर्वी माझा शोध घेत श्रीरंग मला भेटला. म्हणाला तुला खूप भेटायची इच्छा होती.”

मी म्हटले “हो की काय? मग मला लग्न केलेस ते नाही सांगितलंस ते? लाज वाटली का मला सांगायची? मी तुला अडवले नसते रे। श्रीरंग, तब्बल 5 वर्षे आपले affair असताना खुशाल दुसरीशीच लग्न केलेस तेही गुपचूप. बर,आता का आला आहेस बाबा लोन बीन हवंय का तर बँकेत ये.”

श्रीरंग या सरबत्ती पुढे गप्प बसला. म्हणाला “अरुणा मला माफ कर. मी आहेच तुझा गुन्हेगार

पण ते झाले खरे. पण माझी बायको 3 वर्षांपूर्वी accident मध्ये गेली आम्हाला मूल नाहीच झाले. आता हा एकटेपणा खायला उठतो बघ. मला काही कमी नाही खूप पैसा मिळवला मी लग्न करशील माझ्याशी. माझी चूक दुरुस्त करू दे मला अग हे ऐकून तर मी अवाक झाले

किती हा निर्लज्ज पणा याने गेल्या इतक्या वर्षात माझी चौकशी तरी केली का, आता  पन्नाशी उलटून गेल्यावर आला शोध काढत तुला सांगते, इतका संताप झाला माझा मी म्हटले “श्रीरंग, तू निघून जा इथून अरे, माझी मुलगी फक्त 7 वर्षाची असताना माझा नवरा गेला तेव्हा आली का आठवण. कसे रे काढले असतील मी दिवस, देव माणूस होता बर माझा नवरा, मी काहीही लपवून नव्हते ठेवले. त्याने कधीही माझा भूतकाळ उकरून काढला नाही, पूर्ण विश्वास होता त्याचा माझ्यावर. खूप सुख दिले त्याने मला, सगळे तरुणपण मी त्या आठवणींवर घालवले आता तुला एकटे पण खायला उठले म्हणून तू आलास हो? मी घालवून दिले त्याला, मी बरोबर केले ना ग? अपमान केला त्याने माझा, माझ्या त्या कोवळ्या वयातल्या प्रेमाचा.”

अरुणा च्या डोळ्यातून अश्रू वहात होते मी तिला जवळ ओढून घेतले, म्हणाले

“शाब्बास. बाई. आहेस खरी धीराची. काहीही चुकली नाहीस. तू काय हा स्वार्थी माणूस बाई.”

अरुणा म्हणाली, “वठलेला झाडाला कधी मोहोर येतो का याने? माझा कोवळा मोहोर जाळून टाकला आणि आता पानगळ सुरु झाल्यावर हा जुना डाव नव्याने मांडू बघतोय केवळ अशक्य आहे हे. मी एकटी राहीन, पण असला पोकळ तकलादू आधार नकोय मला”

मी अरुणा चे डोळे पुसले, तिला जवळ घेतले “हे बघ अरुणा, तू योग्यच केलेस, आता दैव वशात आपण भेटलोय ना, आता हे हात सोडायचे नाहीत, सतत सम्पर्कत राहू, तू  माझ्याकडे हक्काने ये, मीही येत जाईन, एकटी आहेस असे नको म्हणू.”

अरुणाने डोळे पुसले म्हणाली, “बघ दैवाने भेट घडवून आणली, मीच माझ्या कोषात होते आणि कोणालाही भेटायला नकोच वाटायचे. पण आता भेटलोय आपण, खूप बरे वाटले मला आता कायम राहू संपर्का मध्ये मला खूप हलके वाटले तुझ्याशी बोलून अपराधी वाटत होते, की मी चूक तर नाही ना केली, पण आता तू म्हणाल्यावर खूप धीर आला”

पुन्हा पुन्हा भेटण्याचे वचन घेऊनच मी पुन्हा पुण्याला माझ्या जगात परतले, पण अरुणाला आता एकटे पडू द्यायचे नाही, हे मनाशी ठरवूनच।

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोकणातील-रत्नागिरीची होळी! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ कोकणातील-रत्नागिरीची होळी! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

होळीचे दिवस,  परीक्षांचे दिवस आणि कैर्याचे दिवस!या तिन्ही गोष्टी रत्नागिरी च्या आठवणींशी निगडित आहेत! लहानपणी मार्च महिना आला की अभ्यासाचे पडघम वाजायला घरात सुरूवात व्हायची! आणि अभ्यासाबरोबर कैरीचे तुकडे तिखट मीठ घालून मिक्स करून खाण्याची आमची सुरूवात असायची! कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो,  त्यामुळे मुंबई चे चाकरमानी या दिवसात सुट्टी घेऊन कोकणात यायचे!मग खरी होळीच्या उत्सवाची मजा सुरू व्हायची! रोज रात्री अंगणात खेळे यायचे!’खेळे’ म्हणजे वेगवेगळे नाच करणारी ठराविक लोकं असायची. पारंपारीक गाण्या बरोबरच नवीन नवीन सिनेमा च्या गाण्यांवर नाच केले जायचे.  ते काही शास्त्रशुद्ध नाच नसायचे, पण त्यांत उत्साह, जोश इतका असायचा की ते बघायला वाड्यातील सर्व लोक उत्सुकतेने,  उत्साहाने गोळा व्हायचे! तेव्हा टिव्हि नव्हता,  त्यामुळे ही जिवंत, उत्साहाची करमणूक सर्वांना च फार आवडायची! या सगळ्या सांस्कृतिक होळीच्या काळात पुरणाची पोळी लज्जत आणत असे ती वेगळीच!

होळीच्या खुंटावर होळी उभी करण्यात येत असे आणि भैरीची पालखीही पाच दिवस असे. दरवर्षी एखाद्या च्या बागेतील माडाचे झाड होळीसाठी निवडले जाई. ते तोडून त्या ठिकाणाहून वाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणले जाई मुख्य म्हणजे ते माणसे वाहून आणतात .  त्यामुळे त्यासाठी ४/५तास लागत असत. आमच्या घरापासून जवळच होळीचा खुंट असल्याने आम्ही दुपारपासून च ते बघण्यात दंग असायचो. एकदा का होळी उभी राहिली की पाच दिवस तिथे जत्राच असे. रोज देवीची पालखी मंदिरापासून मिरवणुकीने येई . तेव्हा खूपच गर्दी उसळत असे. होळीच्या खुंटावर उभे रहाणार्या होळीसाठी सुरमाडाचा  उपयोग केला जातो. हा सुरमाड जिथे असेल तिथे देवीची पालखी जाते आणि मिरवणुकीने होळीच्या सुरमाडाबरोबरच खुंटावर येते. रोज दुपारी आणि रात्री वाजत-गाजत देवीची पालखी मंदिरापासून खुंटापर्यत येते. कोकणात सगळीकडे होळीचा उत्सव थोड्या बहुत प्रमाणात असाच असतो. काही ठिकाणी होळी लहान असते, पण उत्साह तेवढा जास्तच असतो!

पाच देवीच्या पालखीचे असतात. देवीची पालखी उठली तरी होळी मात्र पंधरा दिवस उभी असते. पाडव्याला ती होळी उतरवतात. लोकांनी नवसाचे म्हणून बांधलेले अगणित नारळ असतात.  होळी खाली आली की ते प्रसादाचे नारळ घेण्यासाठी झुंबड उडते. दरवर्षी लोक श्रध्देने देवीकडे मागणे मागत असतात, तिचा कौल  मिळाला की ते काम होते असे मनापासून वाटतं असते. मग पुढच्या वर्षी नारळाची तोरणे बांधली जातात!

होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. मुलांच्या आवडीचा हा सण विविध रंगांचे पाणी उडवून साजरा होतो. पुढे येणार्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी ही सगळी तयारी असते. थंड पन्हं,  कैरीची डाळ,  लोणचं यांचे स्वाद येऊ लागतात. देशावर धुळवड साजरी केली जाते, पण कोकणात मात्र रंगपंचमीची मजा जास्त येते. परिक्षा तोंडावर आलेली असते, पण अभ्यासाबरोबर च हे रंगीबेरंगी दिवस ही मनाला खूप आनंद देतात!रत्नागिरी ची आणि कोकणातील होळी अशीच माझ्या डोळ्यासमोर येते!इतकी वर्षे झाली, काळ बदलला पण सणवार, प्रथा आहे तशाच हेत. काळानुसार त्यात थोडे बदल झाले असतीलही पण ती पालखी, होळीचा खुंट,  तो लोकांचा उत्साह हे सगळं तसंच असणार आहे! पुन्हा एकदा मनाने मी रत्नागिरी फिरून आले. तेथील होळी सणाला अनुभवायचा योग पुन्हा कधी येतो पाहू या!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कळताच नाही काय करावं! ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

 ? मनमंजुषेतून ?

☆ कळताच नाही काय करावं! ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

आपण आणि आपल्या मागच्या पिढीच्या आचार विचारात फारसं अंतर नव्हतं फक्त बायकांना शिक्षण नोकरी करता आल्यामुळे वैचारीक आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पण त्यामुळे मागच्या पिढीला थोडासा बदल स्विकारावा लागला! पण आपल्या पिढीला नव्या पिढीशी जुळवताना रेस मधे धावल्यासारखं पळावं लागतय्! प्रचंड वेगाने ती पुढे चाललीय्!

आपल्या पिढीसाठी हा बदल अतिशय वेगवान आणि वेगळाच आहे!

ममा…. अग कशाला एवढ्या लवकर उठतेस?

खुप केलसं जन्मभर आता आराम कर!

अग….पण तुला ॲाफिस आहे नं नाश्ता देते करून जा! नको मी खाईन ओट्स,फ्रुटस् ते हेल्थ साठी पण चांगले असतात!

कळतच नाही काय करावं ?

ममा……. आज तुला बाहेर जायचं आहे नं?

किती वाजता ते सांग मी गाडी ड्रायव्हर पाठवते! नाहीतर उबर बुक करून देतो

अरे जाईन मी रिक्षा नाहीतर बस ने! तु काळजी नको करूस!

ममा….. घरची गाडी असताना किंवा गाडी अफोर्ड करायची ताकद असताना का तुला बस नाहीतर रिक्षाने जायचय्? आणि ह्यापुढे शहराबाहेर जायचं तर No train travel सरळ फ्लाईटची तिकीटं काढायची!

कळतच नाही काय करावं ?

अरे आज गाण्याचा कार्यक्रम चांगलाच रंगला उशीरच झाला जरा! थांब पटकन् खिचडी टाकते

ममा…….. मुलांसाठी पिझ्जा ॲार्डर केलाय् आणि आपल्यासाठी “थाय” जेवण मागवलय् उगाच घाईगडबड करू नकोस! रिलॅक्स!

कळतच नाही काय करावं?

जरा भाजी घेऊन येते आणि वाण्याला सामानाची यादी पण देऊन येते म्हणजे तो वेळेवर पाठवेल संपत आलय् सगळं आणि येताना मार्केटमधून ताजे मासे पण मिळतात का पहाते!

अहो आई……माझ्याकडे लिस्ट द्या सगळी, “नेचर बास्केट” मधून भाजी, फळं, आणि ग्रोसरी मधून वाण सामान मागवते! २ तासात येईल फिश पण हवं ते सांगा येईल!

अग……  ताजी भाजी फळं मासे बघून आणायला लागतात! असे मागवले तर कसं?

आई……. अहो सगळं ताजंच असतं तिकडून मागवलं तरी! कशाला उगाच घावपळ करताय?

कळतच नाही काय करावं?

जरा बॅंकेत जाऊन येतो रे! एक दोन चेक पण टाकायचं आहेत! बीलं ही भरायची आहेत!

बाबा कॅश ATM मधून काढा आणि बीलं आणि चेक कोणाला द्यायचे ते सांगा Transfer करून टाकतो ! NEFT करतो २ तासात जातील

कळतच नाही काय करावं?

दिवाळी जवळ येतेय् जरा वेळ काढ गं….. पूर्ण घराची साफसफाई करून टाकूया

आई……… अहो हाऊसकिपींगच्या माणसाला बोलवलय् करून जाईल तो ५/६ तासात,  काळजी करू नका!……,,

कळतच नाही काय करावं ?

वाढदिवस होता माझा! म्हटलं साऱ्यांना बोलवून साजरा करूया ! छान स्वयंपाक करते! सगळ्यांच्याच आवडीचा! फोन आला,मॅाम तुझ्या आवडीच्या गाण्याच्या कार्यकर्माची तिकीटं काढली आहेत जा संध्याकाळी! गेले तर,

सारा मैत्रिणींचा गोतावळा तिथे हजर ! त्यानंतर छोट्याश्या हॅालमधे केक कटींग देखील आणि

मेजवानी सुध्दा, सरप्राईज म्हणे!

कळतच नाही काय करावं?

सर्वात कहर म्हणजे सोसायटीत परवा एकजण गेला. कोणि नातेवाईक नाही! अंत्यसंस्कार करायला! मुलाने एका event management कंपनीला फोन केला! भटजी पासून तिरडी, ॲम्बुलंन्स, दाहसंस्कार, ते Death certificate हातात येईपर्यंत सारी व्यवस्था केली त्यांनी!

कळतच नाही काय करावं?

आता कळलंय्, जास्त विचार करायचा नाही !आणि कळून ही घ्यायचं ही नाही! जो दिवस येईल तो सुखात घालवायचा! जुन्या आठवणी आणि जुने दिवस आठवायचे पण ह्या पुढे येणारा दिवस सुखात घालवायचा…….😀😀

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नजमा – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ? मनमंजुषेतून ?

☆ न ज मा – भाग – 3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

मैने राखी नही बांधी। हमारे मे ऐसा कुछ रहता नही ना. मी एकदा नजमाला म्हटलं, “नजमा, अगं रोज अंघोळ करून यावं. म्हणजे बरं वाटतं. ती काही बोलली नाही. नंतर सांगायला लागली. “भाभी तुम्हे  नळ छोडे  बराबर पाणी मिलता है। हमे बाहर से, कतार मे  ठहरनेके बगैर  पाणी नही मिलता। पकाना, भांडे, कपडे धोना, साफसफाई, सब के लिए बाहर से पानी  लाना पडता है। बरोबर है ना ?” मलाच डोळे उघडल्यासारखं झालं .घरात जागोजागी नळ असल्याने तिची परिस्थिती कधी लक्षातच आली नाही. फुकट उपदेश करायला काय जातंय, असंच मला वाटायला लागलं.

आता तिची अभ्यासाची गोडी वाढायला लागली होती .शाळेतून आली की, पुन्हा ” शिकवा ” म्हणून दप्तर उघडायची. परीक्षा आणि रिझल्ट ही झाला .नजमाचा  पहिला नंबर आला. शाळेत खूप कौतुक झालं. नाचत नाचत बातमी सांगायला प्रथम माझ्याकडे  आली.आणि    “भाभी, मुझे पहिला नंबर मिला। तुम्हारी वजहसे मिला। मलाही तिच्या इतकाच आनंद झाला. रोज ती जाताना मी तिला सांगायची,” नजमा “म्हणजे “चमकता तारा “तशीच मोठी हो, आणि चमकता तारा होऊन दाखव.

एकदा गणपती उत्सव होता. नजमाचा  धाकटा भाऊ सलीम मित्रांबरोबर, घरात न सांगता, पुण्याला मजा करायला गेला. घरच्यांनी दोन दिवस सगळीकडे शोध घेतला. पण सापडले नाहीत. शेवटी चैन करून पैसे संपले.आणि घरी परत आले. गणपतीचा दिवस होता तो. गणपती बरोबर तो घरी आला, अशा एका भावनेने एक नारळ, उदबत्ती, फुल, आणि केळी अशी सामुग्री घेऊन, नजमा घरी आली. तिच्या  भक्तीभावाचं मला आश्चर्य वाटलं.

दिवाळी जवळ आली. तिचा दिवाळीचा उत्साह दांडगा होता.  “दिवालीमे क्या क्या करेंगे भाभी? मै भी मदद करुंगी। अस तिच पालुपद सुरू होतं. दिवाळी म्हणून तिच्यासाठी, एका नवीन सुंदरशा साडीचा, फ्रील  फ्रॉक मी स्वतः तिला शिवला. मी शिवण  शिवत  असताना, तिचं निरीक्षण असायचं. ‘मला पण शिकवा’ म्हणायची. तिला केसाच्या  पिना,  रिबिनी, बांगड्या, मेहंदी बरच काही आणलं. मला मुलगी नसल्याने मीही मुलीची हौस भागवून घेत होते. दिवाळीत खुष होती ती. आवडेल ते मागून घेऊन फराळ केलान. “हमारे में दिवाली नही रहती, ऐसा सब कुछ नही बनाते।” नजमा आवडीने खात असताना पाहून मलाही समाधान झालं. ज्याला मिळत नाही त्यालाच द्यावं, असं माझं एक तत्त्व होतं. भाऊबीजेच्या दिवशीही तिने दोघा भैयांना ओवाळलन. तिला ओवाळणीत रस नव्हता. भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधात रस होता. एक दिवस अचानक काय झालं कोणास ठाऊक! नजमा  कामाला यायची बंद झाली. आणि तिची आई रूकसाना यायला लागली. पुन्हा पुन्हा विचारलं, नजमाला कुणी काही बोललं का? कुणी रागावलं का? खोदून खोदून विचारलं, तेव्हा रुकसाना ने सांगायला सुरुवात केली .”मुझे गलत समजू नको भाभी। नजमा बडी हो गई है। मै तो दिन भर काम को जाती हूँ। घर मे उसको अकेली रखना कठिन है । एक  सग्गेमेका लडका है । दारू नही पीता। सेंट्रींग का काम करता है। कमाई भी अच्छी है ।आज नही तो कल, शादी करनी है ।मेरे सर का बोज कम हो गया। नजमा 18 साल की नई है, तो शादी करना कानून के खिलाफ है।  बाहर जा के उसकी शादी की। मला मात्र मनोमन वाटत होतं, नजमा– चमकता तारा, ढग आले तरी तेवढ्यापुरता पुसट झाला तरी तो तारा पुन्हा चमकणारच.

नाजमा आज जबाबदार स्त्री झाली होती. माझं शिवण बघत असताना तिला शिवणाची आवड निर्माण झालेलीच होती. तिने शिवणाचा कोर्स केला. बाहेरच शिवण घेता घेता वाढायला लागलं. महिला उद्योजक, मधून कर्ज घेऊन, दोन  शिलाई मशीन घेतलींन. हाताखाली दोन मुली घेतल्यान. आणि उत्तम चाललं होतं .आणि हे सगळं करत असताना तिने मुलांच्या अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. भरपूर कष्ट घेत होती बिचारी.

नजमाचे कष्ट आज फळाला आले. मुलगी सायरा  पहिली आली. मुली बरोबर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ते ऐकून मलाही खूप खूप आनंद झाला. आम्हा तिघिंच्याही आनंदाचं, समाधानाच मूल्य वेगवेगळं होतं. आज तेच पेढे घेऊन ती आली होती .डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते .आता ती जबाबदारी स्त्री झाली होती. ती मला पुन्हा पुन्हा सांगत होती, “तुम्हारे कारण मैने यहअच्छा दिन देखा है। मै सदा के लिये तुम्हारी तरक्की मे एहसानमंद हूँ।  सायरा की यश का हिस्सा तुम्हारा भी है।”  तिच्या यशाचे श्रेय ती मलाही देत होती. नजमाला अभ्यासाची गोडी आणि शिक्षणाचे महत्त्व मी पटवलं, आणि तिनं ते मनावर घेऊन सायनाला शिकवलंन. असं तिचं म्हणणं ऐकून, मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटायला लागलं.

आज नजमाची  मुलगी सायरा चमकली. उद्या मुलगाहि चमकेल. मुलांना प्रकाश देणारा तारा –नजमा!! नाव सार्थ करणारी ठरली. जो स्वयंप्रकाशी असतो, तोच दुसर्याला प्रकाश देऊ शकतो. नजमाने तेच केल.      

समाप्त.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares