मनमंजुषेतून
☆ फी बंदा रूपया….अनिल नलावडे ☆ संग्राहक – सुश्री माधुरी परांजपे ☆
भारतातील अग्रगण्य स्ट्रक्चरल ऑडिट कंपनी या स्ट्रक्टवेल इंजिनिअरिंग चे सर्वेसर्वा श्री चेतन रायकर सर ही अशीच एक राष्ट्रभक्तीने प्रेरित वेडी व्यक्ती आहे..26/11 या दिवशी जेव्हा कसाबने मुंबईवर हल्ला केला आणि ताज हॉटेल जाळत त्याचे अपरिमित नुकसान केले त्यानंतर सर्व स्थिरसावर झाल्यावर श्री रतन टाटा यांनी ताज पुन्हा नव्याने उभारण्यासाठी अखंड भारतात निविदा मागवल्या..
बऱ्याच प्रथितयश कंपन्यांकडून भरपूर रकमेच्या निविदा दाखल झाल्या.. यथोचित दिवशी सगळ्या निविदा उघडल्या गेल्या आणि त्यात एक निविदा आश्चर्य रित्या घोषित केली गेली..
ज्यामध्ये ताज हॉटेलच्या संपूर्ण कामाचा मोबदला फक्त आणि फक्त नाममात्र एक रुपया होते…सगळेच खजील झाले अथवा हसले तरी असतील.. पण जेव्हा रायकर सरांना विचारले गेले तेव्हा त्यांनी एकाच वाक्यात सांगितले ताज वरील हल्ला हा मी माझ्या राष्ट्रावरील हल्ला मानतो.. आणि राष्ट्राचे नुकसान हे पैशात मोजता येत नाही..
मिलिंद, एक वेळ उध्वस्त झालेल्या इमारती पुन्हा नव्याने उभ्या करता येतील पण दुभंगलेली मने पुन्हा सावरणे खूप कठीण.. ताज हॉटेल हे आपल्या राष्ट्राचे एक भूषण हॉटेल आहे.. रतन टाटांसारख्या सच्चा राष्ट्रनिष्ठेने भारावलेल्या व्यक्तीने ते कष्टाने बांधलेले आहे.. त्याचा चिरा आणि चिरा हा इमानदारीच्या घामाने उभारला गेला..
अशा वेळी त्याची पुनर्बांधणी करताना किती पैसे मोजायचे आणि टाटां सारख्या गब्बर उद्योगपतीला कसे लुबाडायचे हाच विचार इतरही निविदांमधून नक्कीच डोकावला असेल.. पण रायकर सर, हरीश साळवे सर यांच्यासारखी व्यक्तिमत्वे जो पर्यंत या भारतात आहेत ज्यांनी आपल्या व्यवसायाचा बाजार मांडलेला नाही तोपर्यंत हा देश अखंड अबाधित राहील.. ठरवून सुदधा याचे कुणी वाईट करू शकणार नाही. असो, अर्थातच जे अपेक्षित होते तेच झाले. टाटांनी श्री रायकरांना मानाने सन्मानाने पाचारण केले आणि हे देवकार्य त्यांच्याच पदरात टाकले… आणि हो, महत्वाचे म्हणजे रतन टाटा सुदधा तेवढेच देश भक्त आहेत हे आपण सगळ्यांनीच विसरता कामा नये.. कारण काम पूर्ण झाल्यावर त्यांनी श्री रायकरांना यथोचित सन्मानाने बोलावून रायकरांच्या निष्ठेचा गौरव करून त्यांना हट्टानेच झालेल्या कामाचा खर्च घ्यायला लावला. कारण शेकडो कामगार, इंजिनिअर ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करून देण्यासाठी अहोरात्र झटत होते.. टाटांचे याकडे बारीक लक्ष्य होते.. त्यांच्या सारख्या कर्मचाऱ्यांचा अतीव आदर करणाऱ्या उद्योगपती कडून ही गोष्ट कशी नजरंदाज होऊ शकते ?.
हे सगळं लिहिण्याचा खटाटोप एवढ्या साठीच की राष्ट्रभक्ती ही आपल्या देशवासीयांमध्ये कुटून कुटून भरलेली आहे..
मग तो सामान्य नागरिक असो की या देशाचा सर्वोच उद्योगपती असो की हरीश सरांसारखा मोठ्ठा आतंरराष्ट्रीय वकील असो, जेव्हा जेव्हा राष्ट्राच्या अस्मितेचा , स्वाभिमानाचा विषय येतो तेव्हा तेव्हा पैसा, मान, इज्जत, कुटुंब, व्यवसाय याहीपेक्षा राष्ट्र प्रथम ही भावना वाढीस लागते..कारण ते भूमीचे पिध्यापिढयांचे संस्कार आहेत..आणि म्हणूनच हा देश आजही इतक्या वर्षांनंतर सुदधा संपूर्ण जगात पाय भक्कम रोवून उभा आहे.. मानाचा मुजरा त्या हरीश साळवे सरांना, त्यांच्या कार्याची नोंद घेणाऱ्या सुषमा स्वराज या माऊलीला, श्री चेतन रायकर सरांना आणि सदैव राष्ट्रासाठी जगणाऱ्या श्री रतन टाटांना..
धन्यवाद,
अनिल नलावडे
संग्राहक : सुश्री माधुरी परांजपे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈