मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुक्रवारचे गरम चणे…… ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? मनमंजुषेतून ?

☆ शुक्रवारचे गरम चणे…… ☆ श्री विजय गावडे ☆  

गेले ते दिन गेले. बालपणस्य कथा रम्य :

जे काय म्हणाल ते लागू पडेल त्या रम्य बालपणाला. त्या मंतरलेल्या दिवसांना. पावसाळा आला की मोठ्या प्रमाणेच आम्हा शाळकरी मुलांना सुद्धा श्रावण महिन्याची ओढ लागायची.  त्याच्या अनेक कारणामध्ये श्रावणी सोमवारची शाळा फक्त अर्धा दिवस असणे हे एक होतं.  तशी श्रावण महिन्यात सुट्ट्यांची रेलचेल असे.  गणपती बाप्पा च्या आगमनाची चाहूलहि श्रावण सुरु झाला की लागे.

श्रावणातील शुक्रवार हा  आम्हांला खूप आवडायचा. किंबहुना पावसाळ्यातील शुक्रवार म्हणजे तव्यावर भाजलेल्या खमंग चण्यांच्या मुठी तोंडात कोंबून साजरा करायचा  वार असायचा.  आंबोली चौकुळचा तो पाऊस त्या काळी खऱ्या अर्थाने कोसळायचा. साधारण होळी दरम्यान सुरु झालेला पाऊस गणेश चतुर्थी आली तरी न थकता आपलं अस्तित्व राखून असायचा. ‘ शिगम्यान पावस नी चवतीन गिम ‘ अशी मालवणी म्हणच प्रचलित होती त्यावेळी. अतिवृष्टीमुळे कित्येक वेळा शाळा अर्ध्यावरच सुटे. आमच्या आनंदाचं हेही एक कारण असे.  परंतु शुक्रवारी दुपार नंतर आम्ही वर्गात असलो की चणे विकत आणण्यासाठी पैसे गोळा केले जायचे. हि जबाबदारी मॉनिटर वर असायची. फक्त पाच पैसे वर्गणी देऊन मूठभर गरमागरम चणे बुक व्हायचे. आजूबाजूच्या घरातून तवा आणला जायचा. तात्पुरती चूल पेटविली जायची. दुकानातून एक, दोन किलो चणे आणले जायचे. चण्यावर मिठाचे पाणी शिंपडून ते खरपूस भाजले जायचे. हि सगळी कामे करतानाचा आमचा उत्साह कपडे ओले चिंब झाले तरी टिकायचा. घरी गेल्यावर पावसात उनाडक्या केल्या म्हणून आई कडून उत्तरपूजा बांधली जायची ती वेगळी. पण ‘शुक्रवारचे गरम चणे, कुणा हवे का फुसदाणे’ या मस्तीत असे कित्येक पावसाळी शुक्रवार आम्ही बालमित्र मैत्रिणींनी साजरे केलेले अजूनही स्मरणात आहे.

आता ते आठवलं की मनात चणे फुटतात आणि चणे न खाताही ती खरपूस चव जिभेवर रेंगाळते.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हे ईश्वरा – डाॅ.निलीमा गुंडी ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून  ?

☆ हे ईश्वरा – डाॅ.निलीमा गुंडी ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

हे ईश्वरा,

तुझ्या  असण्याविषयीच्या 

भोव-यात गुंतण्यापूर्वी

नि तुझ्या बासरीच्या सुरांनी 

मोहित होण्यापूर्वी 

विचारायचा आहे  तुला 

एक प्रश्न ! 

पुन्हा पुन्हा अवतार घेताना 

एकदाही तू स्त्रीचा जन्म 

कसा नाही  घेतलास ?

तिच्या दुर्दैवाचे दशावतार 

भोगायला का कचरलास ? 

सोपे होते रे तुझे 

कुब्जेला सुंदर करणे 

नि द्रौपदीला वस्त्रे पुरवणे ! 

जगून तरी पाहायचे 

त्यांचे अपमानित जगणे !

मोरपिसाच्या स्पर्शाने 

बुजतात का क्षणात 

सा-या जखमांचे व्रण ?

नि शिळा जिवंत होताच 

सरते का रे ,

तिचे अपराधीपण ? 

हे सर्वज्ञा, 

जन्माचे रहस्य  तूच 

जिच्याकडे  सोपवलेस,

तिच्या मनाचा थांग 

तुला कसा नाही लागला ?

  • डाॅ. नीलिमा गुंडी

संग्राहक :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दृष्टीकोन… ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? जीवनरंग ?

☆ दृष्टिकोन… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

” चौकट आपल्या विचारांची “

प्रत्येक गोष्टीला अनेक अर्थ असती

जैसी ज्याची दृष्टी तैसे त्यास भावती |

एकच गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळी वाटते. एका अंगणात एक मोठी छान रांगोळी काढलेली असते. काही जण ती बघतात.एकाला त्याचा आकार आवडतो, एकाला ती सुबक वाटते,एकाला रंगसंगती आवडते, एक म्हणतो ‘रेघ खूप छान बारीक काढली’,  तर दुसरा म्हणतो मध्य थोडा बाजूला गेल्याने बेडौल झाली,एकाला लहान वाटते तर दुसऱ्याला मोठी वाटते. प्रत्येक जण वेगवेगळ्या जागेवरून बघतो, प्रत्येकाची आवड वेगळी, त्यामुळे एकाच रांगोळीवर वेगवेगळे अभिप्राय येतात. सात आंधळे आणि हत्तीची गोष्ट तर सर्वश्रुतच आहे.

हा अनुभव नेहमीच प्रत्ययाला येतो. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि मग मतमतांतरे होतात.प्रत्येकजण आपापल्या जागी ठाम असतो आणि काही अंशी बरोबरही असतो. अशावेळी नुसता वाद घालत न बसता दुसऱ्याचे विचार, त्याचा दृष्टीकोन समजून घेतला तर आपल्या विचारांना पण वेगळी दिशा मिळू शकते. काही वेळेस आपण कल्पना पण केली नव्हती असा पर्याय मिळू शकतो. यासाठी सर्वात उत्तम उपाय ‘ऐकावे जनाचे अन् करावे मनाचे’. पण आपलेच खरे हा दुराग्रह न करता, आधी जनांचे ऐकावे हे मात्र नक्की. बहुश्रुत असणे हे खूपदा फायद्याचे ठरते.

संसाराच्या एवढ्या मोठ्या वाटचालीनंतर काही गोष्टी मनात पक्क्या रुजल्या आहेत. सुरुवातीला एखादी गोष्ट हवी तशी झाली नाही की त्रास व्हायचा. अनुभवाने बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. काही गोष्टी ह्या आपल्या हातात असतात.काही इतरांच्या हातात असतात तर काही दैवाधिन असतात.आपल्या गोष्टी आपण करू हे ठीक आहे. पण हातात नसलेल्यांचे काय करायचे ? 

मग विचारसरणीच बदलली.आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी प्रामाणिकपणे करायच्या, इतर गोष्टींमधील जे शक्य आहेत ते प्रयत्न करायचे आणि आपल्या हातात नसलेले सोडून देऊन शांत रहायचे. जे योग्य असते ते अवश्य घडतेच. फक्त यातले आपले प्रयत्न योग्य, प्रामाणिक आणि पुरेसे असायला हवेत.आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबद्दल त्रागा करून मनस्ताप वाढवायचा नाही. जे ‘आपले ‘आहे ते आपल्याला मिळतेच. मिळणार नाही ते मिळत नाहीच. मात्र खिलाडूपणाने हे वास्तव स्वीकारायचे. या सकारात्मक वृत्तीने आपला आनंद मात्र शाबूत राहतो.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तीन धडे – श्री नारायण मूर्ती ☆ संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? मनमंजुषेतून ??‍?

☆ तीन धडे – श्री नारायण मूर्ती ☆ संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

(यशस्वी उद्योजक नारायण मुर्ती यांनी सांगितलेले) 

जेव्हा मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही. 

माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली. 

एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला कोणती वाटी हवी आहे ती तू  घेऊ शकतो.”

त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे. 

म्हणूनच मी ज्या  वाटीत अंडे होते ती वाटी निवडली! आम्ही जेवण करायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास  सुरुवात केली. 

जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले,  “बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल.”

दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले : एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्‍या वाटीवर एकही अंडे नव्हते. पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले, “बाळा, तुला जी वाटी हवी असेल ती घे.”

ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली! मी अंड नसलेली वाटी निवडली. मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.

पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, “बाळा, तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही.”

तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले, एका  वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते. त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले, “बाळा, तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे?”

या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, “आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे.”

माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर  एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली. जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही. परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली, तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो!

माझ्या वडिलांनी  प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले, “माझ्या बाळा, हे कधीही विसरु नकोस  की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस, तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते!”

मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो. हे खरेच आहे, की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.. 

—— श्री नारायण मुर्ती

संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 6 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 6 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

बर्फीत पडले असावे?

आजोबांनी जे काही रागे भरले, त्याने भिवून मी दुकानाच्या पडवीतल्या दारातून शेजारच्या जिन्यावरून वरती माळ्यावर धूम ठोकली. खरं तर, वर माळ्यावर काळोख होता. एरवी मी वर जायला घाबरायचे. कारण तेथे वाळलेले भोपळे ठेवत, त्याची लहानपणी भिती वाटे का कोणास ठाऊक? बर्फी तयार झाली पण रॉकेल चा वास लपत नव्हता. म्हणजे आता विक्री होणार नाही थोडक्यासाठी नुकसानं झाले. मी त्यात नकळत दोषी ठरले अर्थात माझाही दोष नव्हताच. तो एक अपघाताच होता. पुढे जत्रेतल्या दुकानात ती बर्फी विकायला ठेवली की नाही ते माझ्या बालमनाला कळले नाही.

तेव्हा, दत्तजयंतीला दोन ठिकाणी जत्रा असत. एक थळ फाट्यावरून, आत येताना असलेल्या टेकडीवरच्या दत्तमंदिरात, तर दुसरी चौल च्या डोंगरावरच्या दत्त मंदिरात असे. दोह्नी ठिकाणी दुकाने थाटली जात. मग मुंबईला नोकरी करणारे मामा रजा टाकून, मदतीला येत असत. बरेच सामान डोंगरावर न्यावे लागे. मोरुकाका सुंकलेंची (आजोबा) मिठाई प्रसिद्ध होती. पाकवलेले काजू हीतर खास हातखंडा असलेली पाककृती. लोक आवडीने घेत.

मुल्लुंडला आमचेकडे आजी कमी पाकवलेले काजू, बर्फी असा प्रसाद दरवर्षी मामाबरोबर पाठवी मी फुलवेडी असल्याने माझ्यासाठी चाफ्याची, बकुळीची, गुलाब, अशी फुले केळीच्या पानात बांधून येत. मध्यंतरी चारवर्षा पूर्वी आम्ही दोघं भावंड दत्त जयंतीला तिकडे गेलो होतो आता चौलच्या दत्ताला वरपर्यंत मोटार रस्ता झाला आहे. पायऱ्या चढून जावे लागत नाही माझे बंधू खाली दुकानात पाकवलेले काजू मिळतील असे वाटून बघायला गेले तेव्हा तेथल्या दुकानदारांकडून कळले की ही खासियत फक्त सुंकल्यांच्या दुकानातच मिळत असे. आता पुढची पिढी, नोकर्या करायला लागली त्यांना यात रस वाटेना मग एकेकाळचे प्रसिद्ध दुकान बंदच झाले, अशीच जत्रा आवासला नागोबाच्या देवळात असे. तेथे हि मिठाईचे दुकान असे. महाशिवरात्रीला कनकेश्वर च्या डोंगरावर शिव मंदिर आहे तेथे जत्रा भरे येथेही पायऱ्या चढून वर जावे लागते. सर्व सामान वाहून वर न्यायला लागते अशी हि शेतीला पूरक उद्योगाची जोडणी असे.  

हळूहळू संक्रांतीचे सण जवळ येई, शेतात पेरलेल्या वालांना कोवळ्या कोवळ्या शेंगा लागत. मग एके दिवशी ‘पोपटी’ करायचा बेत ठरे ‘पोपटी’ म्हणजे वालाच्या अखंड शेंगा, कांदे, बटाटे, वांगी, सगळे तिखट मीठ मसाला घालून माठात भरायचे आणि तो माठ उलटे तोंड करून निखार्यावर भाताचा पेंढा पेटवून जमिनीत पुरायचा, म्हणजे आतले जिन्नस वाफ धरून शिजत असत. गरमागरम खाण्यात अनोखी लज्जत येई. पण आम्हाला शहरात पाठवताना पोहचेपर्यंत थंडच मिळे. हा प्रकार गुजरात मध्ये ‘उंदियो’ म्हणजे उलट, उपडे असा अर्थ, त्याच प्रकारातला शेतातला नव्या सोन्याचा नमुना! 

वायशेत या गावाला आजोबांची शेतजमीन होती तेथे शेतं लावले जायचे पुढे थळ-वायशेत खत प्रकल्पात ती जमीन सरकारने घेतली. घरटी कंपनीत नोकरी मिळण्याकरिता जेवढी तरुण पिढी होती त्यांना प्रकल्प तयार झाल्यावर नोकरीच्या हमीचे ओळखपत्र दिले होते. मग पुढच्या काही तरुणांनी कंपनीत नोकरी मिळवली, ते थळवासी झाले.

पूर्वी आम्ही ओढीने जमेल तेव्हा मामाकडे जात असू, आता आमचा लळा असलेले मामा, मामी नाहीत, आजी-आजोबा काळानुरूप कैलासवासी झाले, पुढची मामे भावांची पिढी आता घरचा व्याप नोकर्या करून सांभाळते गायी गुरे ही सांभाळणे आता होत नाही. विहीरीवर मोटार बसली, रहाटाची कुईsss कुईssss संपली, स्थल काळाच्या दुरत्वाने पुढच्या पिढीशी, आमच्यापेक्षा लहान असलेल्यांशी लळा जिव्हाळ्याचे नातं, नात्या पुरतचं उरलं. तरीही अजून वाटतं “मामाच्या गावाला जाऊ या, आंबे-फणस खाऊ या, सुट्टीची मजा चाखू या!”

—–समाप्त

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 5 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 5 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

परिमल आनंद देत राही? 

काही वेळच्या सुट्टीला पावसाळा सुरु होई. कोकणातला तो मुसळधार पाउस वेड्यासारखा बरसतच राही, हे चक्र दिवस रात्र चाले. आणि सात-सात दिवस थांबण्याचे नाव नसे. त्या पावसाला सातेरे म्हणत. पावसाच्या आवाजाला विशेषण कितीतरी आहेत, एकंदर पाऊस मनाला सुखवून जातो, त्याविना जीवन अशक्यच नाही का? 

पावसाळ्यात रानभाज्या उगवत भारम्बीची भाजी, टाकळा, मुद्दाम पेरलेला वाल, त्याच्या वितभर उगवलेल्या भाजीचे केलेले बिरडं सगळं कसं रुचकर लागे.

शेतात भात आता वितभर वाढू लागे. उन्हाळ्यात केलेली नांगरणी मग पेरणी थोडी रोपे तयार झाली की लावणी होई ‘गुडघा, गुडघा’ चिखलात, ‘गुडघा चिखलात’, भाताची पेरणी करू या की ग, करू या की ग! अशी भाताची पेरणी संपन्न होई. 

हळूहळू आषाढ संपे श्रावण येई उन पावसाचा खेळ चाले. डोंगरीच्या बाजूने इंद्रधनू दिसू लागे. मग गणपतीचे जुलैत महिन्यात सुरु केलेले काम वेग घेई. 

बाजूच्या माजघरात उंचीवर हारीने शाडूच्या मूर्ती विराजत, याची तयारी पावसाळ्या आधीच सुरु होई आजोबा मामा मुंबईला जाऊन शाडू माती रंग कुंचले आणि बरेच साहित्य घेऊन येत. श्रावणापर्यंत मूर्ती वाळल्या की रंगकाम सुरु होई. एका वर्षी मोठे झाल्यावर तेथे होतो घेतला हातात कुंचला मामाला विचारून गणपती रंगवायला बसले. तो आनंद अवर्णनीय होता! 

त्यावर्षी विष्णूमामाने गजेंद्र मोक्षाचा देखावा फारच सुंदर केला होता, भगवान विष्णूला खरोखरच लहानसं उपरणंही घातले होते, खूपच सुंदर कलाकृती झाली. आता सारखे पटापट फोटो काढता येत नव्हते एवढेच!

गणपतीच्या डोळ्याची आखणी करणे, हे विशेष कलात्मक काम असे, त्यान मोठा मामा तरबेज होता तो डोळ्यांचे रंगकाम करी. मग चतुर्थीचे आदल्या दिवशी पासून ज्यांनी नोंदणी केली आहे ते मूर्ती न्यायला येत. तो एक आनंदमय व्यापार होता. कलाकृतीचे कारागीर आणि गणेशभक्त यांच्यातला अलौकिक ऋणानुबंध! वर्षानुवर्ष येणारे अनेकजण!

मंगलमूर्तीची पूजा होई गौरीचे आगमन मग पितृपंधरवडा असे करत दसरा दिवाळीचे दिवस जवळ येत. शेतात भातं निसवायला येत (म्हणजे भाताचा दाणा तयार होणं) आणि मग कापणीचा हंगाम! खळ्यामध्ये कापलेले भाताचे भारे येऊन पडत मधे बसलेल्या खांबाला बैल जुंपत मग मळणीचे काम होई त्यावेळी आता सारखी मळणी यंत्र नव्हती बैलाने तुडवून भातं वेगळे होई पोती भरून कोठारात ठेवली जात. भात काढल्यावर वालाची काही भागात पेरणी होई.   

शेताची कामे झाली की दिवाळी झाल्यवर गावदेवातांच्या जत्रा सुरु होत. आजोबा पूर्वीपासून या जत्रात मिठाईचे दुकान थाटत असत. बेड्याच्या (गोठा) बाहेर भट्ट्या कायम स्वरूपी केलेल्या होत्या. मग मुंबईला जाऊन मावा (खवा) काजू व मिठाईला लागणारे सामान खरेदी होई. भट्ट्यावर कढया चढत, बत्तासे, मावा बर्फी, पाकवलेले काजू, भेंड, बदामी बर्फी, साखर फुटणे, दुधी हलवा, इत्यादी पदार्थ करत भेंड करण्यासाठी पक्का गोळीबंद, साखर होईल इतका पाक करत. मग त्या पाकाची थोडा थंड झाल्यावर लांब वळी करत. आणि ती एका खांबाला बांधलेल्या खिळ्याला अडकवून त्याला लांब लांब ओढत. पुन्हा वळकटी पुन्हा ओढणे, अस करत पांढरट रंग आल्यावर भेडांना जसे विळखे दिसतात ते पडल्यावर छोट्या वळकट्यांकरून भेंडे कापून लहान लहान आकारात तयार होत. 

एके दिवशी, मी त्या सुमारास तेथे होते. तशी लहान पोरंच! त्या वेळी वीज नव्हती कंदील, बत्ती, किंवा भुते असत. हे भुते म्हणजे जाड बाटलीला, वर वात ओवता येईल असे पत्र्याचे तिकाटणे आणि बाटलीत रौकेल वर जोत पेटवायची की उजेड पडे. त्या दिवशी आजोबा बर्फी कढईत ढवळत होते.  मला म्हणाले, “बाय, जरा वर उचलून भूत्याचा उजेड दाखव!” मी भूत्या हातात घेऊन तसे केले पण, तेवढ्यात खाली भट्टीला वैलाची तीन गोल गोल भोके होती त्यात पाय अडखळला, भुत्या हेंदकाळला व थोडेसे रॉकेल नकळत बर्फीत पडले असावे. 

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 4 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 4 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

त्याला (authentic) म्हणतात?

सकाळी न्याहरीला चुलीवर खूप वेळ शिजत ठे4वलेली घरच्या तांदुळाचे अटवलं, मऊ भात शिजत ठेवलेला असे त्यातच दारच्या वेलाची तोंडली शिजायला टाकलेली असत भाताबरोबर ती मऊ लुसलुशीत होत. खायला केळीच्या पानाच्या फाळक्यावर वाढून घेतले जाई. हे केळीच्या पानाचे फाळके मी व मावशी वाडीत जाऊन हाताने काढून आणत असू केळीच्या मोठ्या उभ्या पानातून अलगद आडवे पान कापुन घेऊन मग मधल्या दांड्यातून ते फाडून घ्यायचे. पण हा मधल्या दांड्याला जोडलेला पानाचा भाग काढायचे कौशल्याचे आणि रोजच्या सवयीचे असल्याने मावशी लीलया काढी. मी कधी प्रयत्न केला तर पान फाटे पण हळूहळू तेही जमले टाकीवर धुवून घेऊनच आत येत असू.

तर असे हे फाळके हारीने मांडून त्यावर गरम गरम भात आणि प्रत्येकाच्या पानात मऊ झालेले तोंडले ते कुस्करून त्यात दही तिखट मीठ प्रत्येकाने आपापले मिसळायचे हे तोंडल्याचे झटपट भरीत भाताबरोबर मुटू मुटू खाऊन तृप्तीची ढेकर द्यायची.

कधीकधी आजी तांदळाची उकड करत असे तीही रुचकर लागे पोहे घरचे असत घरच्या भाताचे जरा जाडसर करून आणलेले. त्यात दारातला नारळाचा चव लाल तिखट मीठ साखर व तेल एवढेच घालायचे त्याला म्हणायचं हात फोडणीचे पोहे इतके रुचकर लागत. आम्ही ते केव्हाच मटकावत असू. आंब्याचा हंगाम असल्याने सर्व झाडांना पाडाला आलेले आंबे लटकलेले असत. वारं सुटलं की आंबे बदा बदा खाली पडत. रायवळ, तोतापुरी, पायरी, अशी विविध जातीची झाडे होती. 

सकाळी भिक्षुकीची कामे आवरली की आजोबा घरी येत. उंच, गोरे, कानात बिगबाळी, धोतर व पांढरा शर्ट परिधान केलेला असे. ओल्या सुपार्या कातरून जेवण झाल्यावर अडकीत्त्याने कातरत मुखशुद्धी करिता खायला घेत, भिंतीत एक गोल तोंडाचा कोनाडा होता. त्यातही काही साहित्य ठेवलेले असे. कधी ते ओटीवर लोडाला टेकून बसलेले असत. आम्ही वाडीत आंबे मिळतील का असे त्यांना विचारात असु, ते म्हणत, “जा आंबा मिळेल!” मग भराभरा वाडीत जात असू. आंबे पडायची वाट बघत असू. एक गाणं ही म्हणत असू. ते असे, “आपटं धोपटं, पायलीचा पोपटं, पहिला आंबा पडेल तो देवाला!” आणि मग वारं येई आणि धपकन आंबे पडत. ते वेचून आणत असू. या रायवळ आंब्याचे ‘कोयाडं’ करत. बाठी पातेल्यात पिळायच्या, सालीचा गर पाण्यातून काढायचा, ते पाणी दाट असायचे, ते बाठीत ओतायचं खमंग मेथी, हिंग, मोहरीची फोडणी त्या पाण्याला द्यायची, मीठ, तिखट, गुळ घालून उकळी आणायची झालं ‘कोयाडं’ तयार. इतके रुचकर लागते की दिल आणि रसना खुश व्हावी. 

दुपारची जेवण झाल्यावर मोठी माणस अंमळशा झोपत, आम्ही मुल धाकटे मामा, मावशी आम्ही दोघ भावंड असा आमचा बेड्यात (गोठा) पत्याचा वख्खईचा डाव पडे दोन-तीन तास रंगत रंगत संध्याकाळ होई. त्याबरोबर दारच्या कैर्या तिखट-मीठ लावून खाता खाता आनंद सोहळाच साजरा होई. काहीवेळा ओटीवर असलेल्या खांबांना धरून आम्ही खांब, खांब, खाम्बोल्या असा खेळहि खेळत असू. अधूनमधून समुद्राकाठी संध्याकाळी फिरायला जाण ही होई. समुद्र तसा जरा दूर पश्चिम दिशेकडे होता, १ किलोमीटर  चालत जावे लागे. ही घरे पूर्वेकडे होती. समुद्रात पाण्यात खेळणे, वाळूवर किल्ले करणे, कधी कवड्या शिंपले  वेचणे चालू असे. काहीवेळा समुद्राच्या लाटेबरोबर लाट विरली की शंख , गोगलगायीचे गोल शंखही वाहात येत, चुकून वेचायला गेल तर आत किडा असेच मग जोरात फेकून देत असू. पुन्हा पाण्यात! थोडी भीतीही वाटे. मग सूर्याचे सागरात हळूहळू अस्ताला जातानाचे दृश्य विलोभनीय असे, मग सायंकाळचे तांबूस रंग आकाशात रेंगाळत थोड्यावेळात संधी प्रकाश दिसू लागे. आमची पावले घराकडे परतत. उन्हाळा म्हटलं की, काळीमैना डोंगराची मैना करवंद आणि जांभळं यांचाही हंगाम जोरात असे, मी व मावशी शेताच्या पलीकडे डोंगरीवर जात असू. तिथे करवंदीच्या जाळ्या भरपूर होत्या. इतकी ताजी करवंद खाण्यात अप्रूपच असे. वाडीत जांभळीची जांभळे वेचून ती गोडीही चाखण्यात आनंद असे. 

एका चुलत मामाचे घर शेजारी होतं तिथे बकुळीचे उंच झाड होतं. संध्याकाळच्या वेळेस बकुळीच्या फुलांचा सडा पडे आम्ही तीही आनंदाने वेचत असू. घरी जाऊन नारळाच्या झावळीचे कोवळे हिरं काढून बकुळीचा गजरा ओवत असू. त्या बकुळीचा घमघमाट अजूनही मला येत असल्यासारखा भासतो बकुळ फुलं सुगंधाने भरलेली कुपीच जणू! वाळलं तरी त्याचा परिमल आनंद देत राही.

—-क्रमश:

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 3 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 3 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

घरात परतत असू………. च्या पुढे?

आजीने केलेले ताजे लोणचे आमटी भात तोंडल्याची भाजी खाताना जेवणाची मजा येत असे. तसे पूर्वी भाकरी पोळी कमीच दोन्ही वेळा भातच असे. भाकरी संध्याकाळी तांदळाच्या गरम गरम आजी पंगत बसली की करत असे त्या भाकरी सोबत नारळाची लसुण व लाल तिखट, किंचीत आंबट घातलेली चिंच मीठ साखर आणि पाट्यावर वाटलेली चटणी लज्जतदार लागे.

असे करत रात्रीची जेवणे झाल्यावर, अंथरुणं पडतं फार उन्हाळा व उकाडा वाढला की मागच्या दारी घातलेल्या तात्पुरत्या मांडवात बिछाने घालत वार्यावर झोप लगेच येई काही वेळा गप्पा रंगत. मोठा मामा भुताच्या गोष्टी सांगत असे. त्यामुळे सुरुवातीला उत्कंठा वाटे पण नंतर बोबडी वळे. गिर्हा, जखीण, मुंजा, अशी काहीतरी नाव असत रात्रीच्या वेळी ते अधिकच भयप्रद होई. मग अंगाचे मुटकुळे करून डोक्यावर पांघरूण घेऊन डोळे गच्च मिटले जात. सकाळ कधी होई ते कळत नसे.

सकाळी उठून प्रात:र्विधी आवरण्याची घाई असे. तोंड धुण्यापासून सर्व मागच्या हौदावर जाऊनच करावे लागे. हल्ली सारखी घरातल्या घरात बेसिन नळाला पाणी अशी सोय नव्हती. शौचालाही खूप लांब घरापासून पाचशे फूट अंतरावर जावे लागे. पत्र्याची चौकोनी बांधलेली बंदिस्त खोली मागे चर पाडलेला असे. लहान मुलांसाठी लांब लाकडे टाकून केलेली तळात चर असलेली व्यवस्था म्हणजे त्याला ठाकुली म्हणत.

हौदात पाणी येण्याकरता विहिरीवर रहाट असत. मोठे लाकडी चक्र त्यावर सुंभा च्या दोरीने आडवे बांधलेले पत्र्याचे डबे किंवा मातीचे पोहरे म्हणजे मडके असे. त्या चक्राचा लांब दांडा विहिरीच्या बाहेरच्या बाजूला असे त्याला ही लाकडी चक्र जोडलेले असे आणि वरून खाली उभा खांब जमिनीत उभा केलेला असे. त्या खांबाला दुसरा एक आडवा बांबू जोडून ते जोखड बैलाच्या पाठीला बांधत बैलाच्या डोळ्यावर झापड बांधलेले असे मग त्याला जुंपले की तो गोल गोल फिरत राही.म्हणजे चाकांना गती मिळून रहाट फिरू लागे तसतशी एक एक पोहरा विहिरीत सर सोडलेल्या माळे वरून पाण्यात बुडे व भरून निघून रहाटावरून उलट होत वरच्या बाजूला जोडलेल्या पत्र्याच्या पन्हाळात उलटा होऊन पाणी पडे ते पुढे सिमेंट बांधलेल्या दांड्या तून थेट वेगाने हौदाकडे वाहू लागे मग टाकी भरून घेतली जाई

त्याच पाण्याने खाली गुरांना पाणी प्यायची टाकी असे तीही भरे मग या दोन्ही टाक्यांची तोंडे गच्च कपड्याच्या बुचाने रोखली जात आणि पाणी नारळ पोफळीची जी बाजू त्यादिवशी पाणी सोडायची असेल तिथे सोडले जाई. याला शिपणं करणे असे म्हणत. हे रोजचं काम आणि प्रत्येक घरातून सकाळच्या वेळी चालू असे.रहाटाचा कुईsss कुईsss आवाज येणे ठरलेलेच असे.

वेगवेगळ्या ऋतूत तेथे वेगवेगळी मजा असे उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे फणस जाम कोकम, पोह्याचे पापड याची मज्जा असे कोकम फळे आणून फोडून टाकून  बियांचा गर एका पातेल्यात जमा होई. वरची टरफले साखर भरून बरणीत ठेवली जात मिठ ही घातले जाई मग त्याला भरपूर रस सूटे. रस ओतून घेऊन त्यात प्रमाणात पाणी साखर मीठ घातले, थोडी जिरेपूड की झालं कोकम सरबत तयार हे ताज्या फळाचे सरबत अप्रतिम चवीचे लागे उन्हाळ्यात तखलीकीने कोरडा पडलेला घसा शांत होई

जाम हे किंचित पांढरे हिरवी झाक असलेले भरपूर पाण्याचा अंश असलेले फळ प्यास लागलेली शमन करत असे. एखादा दिवस पापड करण्याचे ठरे. लाकडी उखळीत पोह्याचे पीठ तिखट मीठ हिंग पापड खार पाणी हे प्रमाणात घालून मुसळाने कुटले की पापडाचा गोळा तयार होई, काही वेळेला कांडपिणी असत त्या कुटून देत मग मावशी, आई, आजी व मी मोठे मोठे पोळपाट घेऊन सरासरा पापड लाटत असू. मावशीचा लाटण्यावर खूपच हात चाले मग कोण जास्त पापड लाटतो अशी शर्यत ही लागे. असे पापड उन्हात घालून वाळल्यावर खाण्यातली मजा काही औरच असे. ताकातले हि पापड आजी चविष्ट करीत असे. तसे पापड आता मूळ चवीचे खायला मिळत नाहीत. हल्ली त्याला (authentic) म्हणतात. 

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 2 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 2 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

मग घरात प्रवेश मिळे…… च्या पुढे?

मामाच्या घरापुढे सारवलेलं अंगण असे. आठ दहा उंच दगडी पायर्या चढून गेले की घराच्या लांबी इतका पुढे खांब असलेला (हल्लीचा व्हरांडा) जवळ जवळ ५० फुट लांब ओटीच्या बाहेर पडवीचा भाग आणि मग चौकोनी ओटी, त्यावर गादी, तक्के अशी बैठक असे. भिंतीत बरेच कोनाडे होते. या कोनाड्यात धाकटे मामा, ‘बुगुबुगु’ असा तोंड घालून,नंदीबैलाचा आवाज काढीत. तो आत घुमत असे. मी लहानपणी त्या ‘बुगुबुगु’ आवाजाला घाबरत असे. डाव्या अंगाला एक दार आहे. तेथे आत बापूंच माजघर आहे, त्या माजघराला हे नाव पडले होते. पूर्वी एकत्र कुटुंब असे, त्यातल्या एकाचे नाव असेल. ओटीवर उजवीकडे काळ्या पॉलीशचे पितळी चकत्या असलेले दर्शनी दार, त्यातून प्रवेश केला की मोठ माजघर, एकीकडे उजव्या हाताला लागतो लाकडी बांधलेला झोपाळा. समोर स्वयंपाकघरात जायचे दार, डाव्या हाताला देवघर त्याच्या समोर मागच्या पडवीत जायचे दार दाराच्या आत छोटीशी ओटी सारखी जागा व समोर उतरले की पुन्हा घराच्या लांबी एवढीच मोठीच्या मोठी पडवी एका बाजूला नारळ ठेवलेले असत, भिंतीवर कोयताळे असे. त्यात निरनिराळे कोयते असत. समोरच बाहेर पडायचे दार टाकीकडे वाडीत जायला यायला. इकडे उजवीकडे चुली घातलेल्या होत्या. तेथेच पडवीत शिंकाळे टांगलेले होते. त्यात नारळ फोडला की उरलेल्या कवडी बागेतून आणलेल्या भाज्या केळीचे फाळके ठेवलेले असत. पडवीला अर्धीभिंत व त्यावर गजाचे उघड्या भिंतीवर रोवलेले मोकळे ढाकळे आवरण, ज्यातून मुक्तपणे हवा खेळे. त्यामुळे त्यावेळी फ्रीज नसले तरी नारळ भाजी हवेच्या गारव्यात टिकून राही. अलीकडल्या भिंतीला घुसळखाम्बा म्हणजे साईचे ताक साधे ताक घुसळण्यासाठी केलेले. दोन भिंतीतील हुक त्याला अडकवलेल्या दोऱ्या, त्यात रवी उभी करून बरणीत सोडायची व दुसरी दोरी रविला गुंडाळायची आणि दोरीची दोन टोके मागे पुढे ओढली की रवी अलगद ताकात फिरून लोणी चट्कन येई हे एक यंत्र म्हणाना कां? सोपं सुटसुटीत! पुढे गेल्यावर उजवीकडे दार होते बाहेर पडायला त्याच्याबाहेर सुम्भाच्या दोरीच्या शिंकाळ्यात छोटे मातीचे मडके टांगलेले असे. त्यात दात घासायला ‘कणे’ ठेवलेले असत. कणे म्हणजे भाताच्या वरची निघालेली फोलपटे, जाळून त्यांची केलेली राखुंडी, दात घासण्यासाठी व भांडीही स्वच्छ करण्यासाठी वापरत असत. तेथून बाहेर पडले की समोरच बांधलेला मोठा सिमेंटचा हौद आहे. तो सतत विहिरीच्या पाण्याने भरलेला असे. पाणी घ्यायला पितळी तपेल्या असत. किंवा छोट्या पत्र्याच्या बादल्या असत. एका बाजूला मोठी धोंड आडोसा केलेली, नारळाचे झाप विणून त्त्याला लावलेले असत. त्याने गोठा, घरे शाकारली जात. हे झाप विणायला बायका रोजंदारीवर येत असत. नारळाच्या हिरव्या झावळ्या काढून त्या चटई सारख्या विणल्या जात. ती एक उत्कृष्ठ कला होती. आता कितपत टिकून आहे माहित नाही. 

हौदाच्या उजव्या अंगास पाणी तापवायला चूल घातलेली असे. जळण वाडीतले भरपूर असे. नारळाची चोड, (अखंड नारळ सोलून निघालेली साल) नारळाच्या वाळलेल्या झावळ्या इतर काटक्या असत. पाणी काढून धोंडीवर बादलीत आणायचं भर घालायची की अंघोळीची तयारी व्हायची लहानपणी आजी कौतुकाने न्हायला घाली रिठ्याने केस धुवायची शिकेकाईनेही असे. किती जपले तरी थोडे तरी पाणी डोळ्यात जाई व डोळे चुरचुरत. पण आजीने घातलेली कौतुकाची अंघोळ या लाडावलेल्या नातीला मनापासून आवडे. 

माजघरातून उजव्या हाताला दार होते ते दुकानाच्या पडवीत उघडे. तेथेच लागून जिना होता, घराच्या माळ्यावर जायला, दुसरा आतून डाव्या बाजूला बापूच्या माजघराजवळ होता. पूर्वी खेडेगावातलं किराणा मालाचं दुकान आजोबा चालवत असत. म्हणून त्या पडवीला कायमचे नाव दुकानाची पडवी असे पडले. लाकडी झोपाळ्याच्या उजव्या हाताला बाळंतीणीची खोली होती. आणि एरवीची आजी आजोबांची खोली असे. त्यात महत्वाचे अंगावरचे डाग, रक्कम इत्यादी ठेवलेले असे. 

समोरच्या बाजूस स्वयंपाकघाराचे दार होते. आत प्रवेश करताच उजवीकडे दाराच्या बाजूला मांडणी. डावीकडे माजघराच्या भिंतीला भिंतीत कपाट, आणि पूर्वेच्या भिंतीला खाली दोन चुली, बाजूला वैल हि होता. पडवीच्या भिंतीला पाण्हेरे ( पाण्याचे हंडे , पिंप ठेवायची जागा) तेथे बाजूला हात धुवायला छोटी मोरी होती. बाहेर जायचे दाराच्या उजव्या हाताला भिंतीतले फडताळ असा हा स्वयंपाकघराचा सरंजाम. तेव्हा पितळी ताटे, वाट्या, भांडी, वापरायची पद्धत होती. ताटांना कल्हई लावली जाई.

आम्ही मुंबई हून आल्यावर घरात प्रवेश केल्यावर पहिले हौदावर (टाकी) जाऊन हात पाय धुवत असू. मग चपला घालून मामाच्या वाडीत भिरी भिरी हिंडून वाडीभर प्रत्येक झाडा पानांचे निरीक्षण करत असू. बोटीतून आल्याने डोळ्यात व डोक्यात सतत एकतास हलणारे फिरणारे पाणी पाहिल्याने काहीवेळ डोक्यात फिरल्यासारखी जाणीव होत राही. वाडी पाहतानाही असेच फिरल्यासारखे होई, पण सर्व नजरे खाली घालून आम्ही जेवायची हाकाटी आल्यावर घरात परतत असू.

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गिरगावातला गोविंदा ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ गिरगावातला गोविंदा ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

 

श्रावण महीना सुरू झाला की आपल्या सणांची सुरवात होते आणि नकळतच मन गिरगावात पिंगा घालायला लागते.

नाग पंचमी, राखी पौर्णिमा ह्यानंतर आठवड्यानी येणारी गोकुळाष्टमी हा सण गिरगावकर मोठ्या उत्साहाने आणि जोशाने साजरा करत. 

१९६३ सालचे ‘ब्लफमास्टर’ सिनेमा मधील शम्मी कपूरचे गोविंदयाचे गाणे हे गिरगावातील मांगलवाडीत चित्रित झाल्याने 

गिरगावातील गोविंदयाला खूपच प्रसिद्धी मिळाली. संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी हे तेंव्हा गिरगावात रहात असल्याने त्यांनी गिरगावातील गोविंदयाचे हुबेहूब चित्रण करून गिरगावातील गोविंदयाचे जगभर दर्शन घडविले. 

गिरगावात गोविंदा हा प्रत्येक वाडीमध्ये साजरा होत असे. प्रत्येक वाडीची गोविंदा टोळी ही आपल्या वाडीच्या हंड्या फोडल्या कि आपल्या आजूबाजूच्या दुसऱ्या वाडीच्या हंड्या फोडायला बाहेर पडत असत. ‘गोविंदा आला रे आला मडकी सांभाळ ब्रिजबाला’ तसेच ‘एक दोन तीन चार, XXX दादाची पोरे हुशार’ असे गात आणि नाचत गल्लोगल्ली फेरफटका मारला जायचा. तेंव्हा गिरगावात दादा लोकांची कमी नव्हती. जो गोविंदयाला जास्त पैसे देईल त्याचे नाव जोडले जायचे. हे करताना डावा  हात पुढच्याच्या पॅन्टला धरून, कमरेत वाकून, उजवा हात हलवत एक एक पाऊल  ठराविक लयीत टाकला जायचा. ह्याचे चित्रणही ब्लफमास्टरच्या गाण्यामध्ये व्यवस्थित केले आहे. त्या गाण्याच्या चित्रीकरणात मूळचे गोविंदा खेळणारे दिसत आहेत. हाल्फ पॅण्ट आणि बनियन ह्यावर गोविंदा बाहेर पडत असे. वाडीतील काही जण नेवैद्य म्हणून फळांचे ताट नाहीतर गोड  शिरा असे गोविंदा समोर ठेवत असत. गोविंदावर सर्व बाजूनी पाण्याचा वर्षाव केला जायचा. त्यामध्ये एखादयाकडून गरम पाणी अंगावर पडल्यास, अजून पाणी टाकण्याची मागणी केली जायची. ‘तुमच्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा’ असे मोठ्याने ओरडून वाडीतील रहिवाश्याना अजून पाणी टाकण्यास उद्युक्त केले जायचे. काही टवाळ मुले लांबूनच पाण्याचे फुगे मारायचे. ते फुगे मारण्यात एवढं तरबेज असत कि ज्याला फुगे लागायचे त्याला कळायचेही नाही कि फुगे आले तरी कुठून. वरून होणारा पाण्याच्या फुग्यांचा मारा चुकवत वाडीच्याबाहेर पडणे म्हणजे एक मोठे दिव्यच असे. 

पूर्वी गोविंदा हा राष्ट्रीय सण म्हणूनच मानला जायचा आत्तासारखे राजकीय सणाचे स्वरूप त्याला नव्हते. त्यामुळे टी शर्ट आणि मोठ्या बक्षिसांच्या थैल्यांचे आमिषही नव्हते. 

काही मोठ्या वाड्यांचे गोविंदा बरोबर एक सीन ही असे. एका ट्रक मध्ये वाडीतल्याच मुलांना चेहऱ्यावर रंग लावून पुराणातील एखाद्या प्रसंगाचे दर्शन घडत असे. नंतर काही राजकीय घडामोडींचे किंवा त्यावेळेच्या ज्वलंत घडामोडीचे विषय घेऊन सीन बनवले जायचे. 

बहुतेक हंड्या ह्या तीन ते चार थराच्या असायच्या. पूर्वी हंड्यांमध्ये उंचीची स्पर्धा नव्हती. हंड्या फोडून थोडे फार जे काही पैसे मिळायचे त्यामधून सगळ्यांना वडापाव मिळाला तरी बरे वाटायचे आणि जर काही जास्त प्रमाणात पैसे मिळाले असतील तर रात्री भुलेश्वरच्या कन्हैया ह्याच्या किंवा किका स्ट्रीटच्या पाव भाजीच्या गाडीवर त्याचे सेलिब्रेशन होत असे.  

त्याकाळी गिरगावात ठाकूम – माकूम, ढोल – ताशा हि वाद्य जाऊन कच्छी बाजा आणी ढोल हा जास्त वापरात येत होता. १९५१ च्या अलबेला सिनेमात संगीतकार सी रामचंद्रांनी त्याचा पहिला वापर हा भोली सुरत ह्या गाण्यासाठी केला होता. 

कच्छी बाजा आणि ढोल ह्याशिवाय गोविंदयाला पूर्णत्व मिळत नसे. तसे वाजवणारे खूप जण होते पण सनईवर अबूभाई आणि पोंक्षे, विजय चव्हाण, इब्राहिम, परश्या असे मोजकेच प्रमुख ढोल वाजविणारे ठरवायचे असले कि वर्गणी जमवण्यावर जोर द्यायला लागायचा. त्यासाठी वाडीतले सगळे एकवटून कामाला लागायचे. एकदा का गोविंदयाच्या दिवशी कच्छी बाजाचा आवाज यायला लागला कि आपोआप वाडीतले सगळे जमा होऊन आणि आपसूक टोळी तयार होऊन गोविंदा नाचायला सुरवात होत असे. कधी कधी दोन गोविंदा समोरासमोर आले आणि त्यामध्ये वरील दिग्गज वाजवणारे असले कि जुगलबंदी हि व्हायचीच आणि ऐकणाऱ्यांसाठी आणि नाचणाऱ्यांसाठी तो एक आयुष्यभरासाठी आठवणींचा ठेवा असायचा. 

पूर्वी राजेश खन्ना रहात असलेली ठाकुरद्वारच्या कोपऱ्यावरची सरस्वती निवास येथेच एक उंच हंडी बांधली जायची. ती हंडी फोडायला लालबाग, उमरखाडी असे लांबून गोविंद्याच्या टोळ्या येत असत. एखादा गोविंदा ती हंडी फोडायचा प्रयत्न करतोय असे समजले कि पूर्ण ठाकूरद्वारचे चारही रस्ते खचाखच भरून जायचे. प्रत्येकजण एक विलक्षण अनुभूतीचा साक्षीदार होण्यासाठी धडपडत असे. पहिले तीन थर आरामात लावले जायचे. चौथ्या थरापासून थरार चालू होयचा. पाचवा थर हा फक्त दोन  जणांचाच असायचा. प्रत्येकाचे श्वास रोखले जायचे. पाचव्या थरानंतर हंडी फोडायला दोन एक्के का तीन एक्के म्हणजे एकावर एक असे दोघे का तिघे लागतत ते ठरायचे आणि हंडीला कसाबसा फोडणाऱ्या गोविंदाचा हात लागायचा आणि हंडी फोडली जायची. हंडी फोडणारा आणि सगळे थर लगेच हळूहळू सावरत खाली यायचे आणि एकच जल्लोष व्हायचा. कच्छी बाजा जोरात वाजायला लागायचा आणि नुसता गोविंदाच नाही तर सगळेच जोशात नाचायला लागायचे. हंडी फुटल्याचे एक वेगळेच समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर असायचे. संध्याकाळ पर्यंत सगळीकडे असेच उत्साहाचे वातारण असायचे. सकाळपासून गजबजलेला गिरगाव रात्रीमात्र शांत आणि थकलेला असायचा पण तो एका दिवसापुरताच कारण दुसऱ्यादिवशी पासून लगेच गणेशोत्सवाच्या तयारीला गिरगावात सुरवात व्हायची. 

अजूनही गिरगाव सोडून गेलेला गिरगावकर गोविंदयाच्या दिवशी एकतर गिरगावातील गोविंदयाला हजेरी लावतो नाहीतर जेथे असेल तेथे गिरगावचा माहोल बनवून गोविंदा साजरा करतो. पण त्याचे मन मात्र गिरगावातच घिरट्या घालत रहाते हे ही तितकच खरं.

       

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print