मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जावे त्यांच्या वंशा ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ जावे त्यांच्या वंशा ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆

गावाकडे घर केलं तेव्हाच घराशेजारी दोन गुंठे जागेत भाजीपाला करायचा असं ठरवलं. यावेळी शेतात मूग पेरला. कडेने  पावटा, भेंडी, गवार, दोडका, गोसाळी, कारले यांच्या बिया  टोकल्या. वांगी, फ्लॉवर, कोबी, मिरच्या यांची रोपे लावली. शेपू, चाकवत, पालक, मेथी, कोथींबीरच्या  बियांची चिमूट चिमूट लावली. सतत पाऊस पडत होता त्यामुळे पाणी द्यायची गरज पडली नाही. मूग चांगला आला. शेंगा काळ्या पडू लागल्या की तोडायच्या. पहिल्या दिवशी दोन बादल्या भरल्या. वाकून तोडाव्या लागत त्यामुळे कंबर दुखू लागली. तरी घरच्या शेतातला आणि खत, किटकनाशके न वापरता आलेला. त्यामुळे त्याचं समाधान जास्त. नंतर एक दोन दिवसांनी थोड्या निघत राहिल्या. यासाठी गौरी गणपती गावाकडेच बसवायचे ठरवले. त्यामुळे वरचेवर मुगाच्या शेंगा तोडता येतील. गौरी गणपती बसवताना सून, मुलगा आलेले. घरातली सगळी कामे  झाल्यावर सुनबाई कुठेतरी फिरून येऊ म्हणाली. खेड्यात शेताशिवाय कुठे जाणार…

लांबच्या शेतात गेलो. हल्ली जास्त ऊसाचीच शेती केली जाते. आमच्या शेतात उंच वाढलेला ऊस होता. टॅक्टरने नांगरल्या मुळे बांध राहतच नाही. मग शेतातूनच वाट काढत जावं लागतं. शेजारच्या सोयाबीनच्या शेतातून निघालो. गुडघ्या एवढं पीक त्यात गवतही भरपूर. अनेक ठिकणी लाल मुंग्यांची वारुळे. साप असण्याची शक्यता. नीट बघूनच चालावे लागते. आम्ही दोघे, सूनबाई, सहा वर्षाचा नातू असे निघालो. मुलगा आदल्या दिवशीच जाऊन आल्यामुळे येणार नाही म्हणाला. त्याला अनुभव आलेला.

 थोडे चालणं झाल्यावर ह्यांनी मागे वळून बघण्याच्या नादात वारुळावर पाय पडला. त्यांच्या पॅण्टवर सगळीकडे लाल मुंग्याच. पॅण्ट काढून मुंग्या झटकून मग पुन्हा घातली. थोड्याफार मुंग्या आम्हालाही चावल्या. शौर्य नाचायला लागला. सूनबाई म्हणाली, कशाला आलोय आपण इकडे? म्हटलं तुलाच हौस फिरायला जायची.  माझ्या आणि शौर्यच्या कपड्यांना कुसळे भरपूर लागली. सोयाबीनचे शेत संपल्यावर ऊसाच्या शेतातून जावं लागलं. ऊसाचे काचोळे हाताला कापत होते. हाताने ऊस धरला तरी मागच्या येणाऱ्या च्या अंगावर पडत होता. शौर्य वैतागला. ऊसाच्या बाहेर आल्यावर शेजारच्या काकी मुलाला बघून म्हणाल्या, आमच्या शेतातून वाट होती की. इकडून यायचं नाही का?  त्यांचा मूग काढल्यामुळे शेत मोकळं होतं. शेजारी हिरवंगार आल्याचे भरघोस पीक होते. पुन्हा एक ऊसाचे शेत ओलांडून उंबराच्या झाडाखाली आलो. तिथे कपड्यावरची कुसळे काढली. शौर्यने खाऊ खाल्ला. नुकतीच एका शेतात ऊसाची लागण केलेली. गेल्यावर्षी भुईमूग, हरभरा होता तेव्हा शेत छान वाटत होतं.

आता उंच वाढलेल्या ऊसामुळे जंगलात आल्यासारखे वाटत होते. थोडावेळ थांबून निघालो. येताना मात्र शेजारच्या आल्याच्या, मुगाच्या शेतातून आलो. तरी वर खाली बांध, पावसाने भरपूर तण वाढलेले आणि निसरडी जमीन. सापाची भिती. मुंग्यांची वारूळे चुकवत आलो. रस्त्यावर आल्यावर  सुटकेचा निश्वास सोडला. हे दोन तीन दिवसांनी शेतात चक्कर मारतात. त्यांना काही वाटले नाही. पण आम्हाला ट्रेकींगपेक्षा अवघड अनुभव आला. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव झाली. रोज किती यातना त्यांना सहन कराव्या लागतात. जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळते.

 

© सौ. सावित्री जगदाळे

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जागर… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  मनमंजुषेतून ?

☆ जागर… ☆ सौ राधिका भांडारकर 

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी माझे काही विचार या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करते—-

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम:

नम:प्रकृत्यै  भद्रायै नियत:प्रणता स्मताम् ।।

अश्विन शुद्धप्रतिपदेपासून घरोघरी घटस्थापना होते. देवीचे मूर्त तेज वातावरण उजळते.मंत्रजागर, आरत्या, यांचा नाद घुमतो.उदबत्त्या ,धूपार्तीचे सुगंध दरवळतात. दररोज नवनवे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात. नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रेही परिधान केली जातात. सर्वत्र उत्साह, मांगल्य, पावित्र्य पसरलेले असते.

लहानपणापासून आपण एक कथा  ऐकत आलो आहोत– महिषासुराची.  या महिषासुराने पृथ्वी आणि पाताळात  अत्याचार माजवला होता. आणि त्यास स्वर्गाचे राज्य हासील करायचे होते. सर्व देव इंद्रदेवांकडे जाऊन ,महिषासूरापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात. इंद्र आणि महिषासुरात युद्ध होते व या युद्धात इंद्रदेव पराभूत होतात. हतबल झालेले देव ब्रह्मदेवाकडे येतात.व आसुरापासून रक्षण करण्याची विनंती करतात. महिषासुराचा वध हा मनुष्यमात्राकडून होणे असंभव होते. मग ब्रह्मा, विष्णु,महेश यांच्या तेजातून एक स्त्रीशक्ती निर्माण केली जाते. ही स्त्रीशक्ती म्हणजेच आदीमाया.–“ आदीशक्ती.दुर्गामाता.”

शंकराचे त्रिशूळ, विष्णुचे चक्र, वरुणाचा शंख, यमाची गदा, तसेच कमंडलु, रुद्राक्ष, अशा दहा शस्त्रांची परिपूर्ण शक्ती…दशभुजा दुर्गा..सर्वशक्तीमान रुप– तिचे आणि महिषासुराचे घनघोर युद्ध होते. व महिषासुराचे दारुण मर्दन होते. म्हणून ही महिषासुरमर्दिनी—सिंहारुढ ,पराक्रमी, तेज:पुंज देवी.

नवरात्रीचे ,महाराष्ट्रात आणखी एक विशेष म्हणजे भोंडला. भोंडला म्हटले की शालेय जीवनातले दिवस आठवतात. नवरात्रीत सगळ्या सख्या,नऊ दिवस वेगवेगळ्या सखीकडे जमतात. पाटावर सोंडेत माळ धरलेल्या हत्तीचं चित्र काढायचं, अन् त्या पाटाभोवती फेर धरुन एकेक प्रचलित लोकगीतं गायची—तर असा हा भोंडला, भुलाई, हादगा —

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा।।

–अशी सुरुवात होऊन मग गाणी रंगत जातात. सख्या आनंदाने फुलतात. आणि मग शेवटी—

बाणा बाई बाणा स्वदेशी बाणा

गाणे संपले खिरापत आणा..।।

खिरापत ही गुलदस्त्यातील. ती ओळखायची. अन् नंतर चट्टामट्टा करायचा…नवरात्रीच्या या उत्सवातील, असा हा पारंपारिक खेळ…सामुहिक आनंदाचा सोहळा.

अर्थात् नवरात्र म्हणजे देवीचाच उत्सव. तिची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री ही निरनिराळी नऊ नावे असली, तरी ती त्या एकाच आदीशक्तीची विविध रुपे आहेत. देवीच्या कथाही अनेक आहेत. पण सामाईकपणे ही नारीशक्ती आहे.आणि तिचा अवतार,अहंकार, क्रोध, वासना, पशुप्रवृत्ती, यांचा संहार करण्यासाठीच झाला आहे…

दरवर्षी नवरात्री उत्सवात या सर्वांचं,मोठ्या भक्तीभावाने  पूजन,पठण होते. गरबा, दांडीयांचा गजरही या आनंदोत्सवाला सामायिक स्वरुप देतोच..

पण मग एका विचारापाशी मन येऊन ठेपतं—-आपले सर्वच सण, हे आध्यात्मिक संदेश घेऊन येतात..अर्थपूर्ण.नैतिक संदेश.—पण उत्सव साजरे करताना या संदेशाचं काय होतं..?

ज्या स्त्रीशक्तीची नऊ दिवस पूजा केली जाते, दहाव्या दिवशी अनीतीचा रावण जाळला जातो, आणि मग अकराव्या दिवसापासून पुन्हा तीच हतबलता…??

खरोखरच स्त्रीचा सन्मान होतो का? स्त्री सुरक्षित आहे का आज? ज्या शक्तीपीठाची ती प्रतिनिधी आहे , त्या स्त्रीकडे किंवा त्या स्त्रीबाबत विचार करण्याचा समाजाचा दृष्टीकोन नक्की कसा आहे ?  —-आज तिच्या जन्माचा आनंदोत्सव होतो का? का तिला उमलण्याच्या आतच खुडलं जातं…?

ज्या पवित्र गर्भातून विश्वाची निर्मीती होते, त्या देहावर पाशवी,विकृत वासनेचे घाव का बसतात…?

विद्रोहाच्या घोषणांनी काही साध्य होते का?–समाजासाठी मखरातली देवी,आणि आत्मा असलेली, चालती बोलती स्त्री.. ही निराळीच असते का?—–

असे अनेक प्रश्न ,अनेक वर्षे युगानुयुगे,अगदी कथांतून, पुराणातून, इतिहासातून व्यक्त झाले आहेत.

आणि आजही ते अनुत्तरीत आहेत.

स्त्रीचा विकास झाला म्हणजे नक्की काय झाले? ती शिकली. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली. उच्चपदे तिने भूषविली,  तिच्या वागण्या बोलण्यातही फरक पडला. तिचा वेशही बदलला. ती आत्मनिर्भरही  झाली—-पण तिचा संघर्ष संपला का? तिचे हुंदके,तिची घुसमट,तिची होरपळ..आहेच त्या चौकटीत—एका मोठ्या रेषेसमोरची ती एक लहान रेषच–दुय्यमच. म्हणून डावलणं आहेच. सन्मान कुठे आहे तिचा…? 

मग हा जागर कधी होणार? तिच्या सामर्थ्याचं त्रिशूळ, बुद्धीचं चक्र, विचारांची गदा, सोशिकतेचं कमंडलु ,भावनांची रुद्राक्षं, तेजाचे तीर —जेव्हां धार लावून तळपतील ,तेव्हाच या शक्तीपीठाचा उत्सव सार्थ ठरेल…

नवरात्री निमित्ताने जोगवा मागायचाच असेल तर  स्त्री-जन्माच्या  पावित्र्याचा. .मांगल्याचा .शक्तीच्या आदराचाच असला पाहिजे हे मनापासून वाटते…

हे देवी ! तुझ्या दशभुजा, सर्व शस्त्रांसहित पसर आणि तुझ्या दिव्य तेजाचंच दर्शन दे…..!!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मसाला डोसा….पाणी पुरी…वडा पाव ☆ संग्राहक – सुश्री प्रभा हर्षे

? मनमंजुषेतून  ?

☆ मसाला डोसा….पाणी पुरी…वडा पाव ☆ संग्राहक – सुश्री प्रभा हर्षे ☆

१. “मसाला डोसा” 

बाबा आणि मी, दोघांच्या बऱ्याच आवडी-निवडी सारख्याच….. 

….लहानपणी ते माझे सुपरहिरो.. त्यांचीच कॉपी करायचो…                  

….आयुष्याच्या शाळेत ठामपणे उभं रहायला त्यांनीच भक्कम आधार दिला….. काळानुसार दोघांचे आयुष्य वेगवेगळे झाले…. मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड  लाईफ…..                           

….वाद नव्हता, पण संवाद कमी मात्र नक्कीच कमी झाला….. अचानक…. आम्ही दोघंच.. असे खूप वर्षांनी हॉटेलात जाण्याचा योग आला…… पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी बाबांचा हात हातात घेतला….. बाबा हसले…… त्यांच्या मनात काय आले असेल याची कल्पना आली….. 

:पस्तीस वर्षापूर्वी परिस्थिती बरोब्बर उलटी होती……                                                               

….तेव्हा त्यांनीच मला आधार दिला होता, आता मी……                           *

…. काळानुसार आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्यासुद्धा….. 

…बाबांच्या चेहऱ्यावरचे समाधान खूप काही सांगून गेले…. बाप-लेकाचे नाते अपडेट झाले….. 

…. खुर्चीवर बसताना त्यांनी पाठीवर थोपटले…. तेव्हा खूप इमोशनल झालो…. वेटर आला, तेव्हा दोघांनी एकदम ऑर्डर दिली  “मसाला डोसा”……. 

2 “पाणीपुरी”

लग्नानंतर तिने संसारालाच सर्वस्व मानले…… 

…..शिक्षण, करियर…. नोकरी बाजूला ठेवून हाउसवाईफ झाली….. 

….. तिचं आयुष्य घर… मुले आणि मी यांच्यापुरतेच झाले तर मी माझ्याच विश्वात… तिचा कधी विचारच केला नाही… कायमच टेकन फॉर ग्रँटेड….. 

….आठ दिवसांपूर्वी आजारपणामुळे ती झोपून होती..  तेव्हा घर थांबले, कारण सगळे प्रत्येक गोष्टीत तिच्याचवर अवलंबून… याचाच तिला प्रचंड गिल्ट आला… मीच समजूत काढली….                                             

“दोन दिवस घरीच थांबता का?”  तिने विचारले…… 

…त्यामागची तळमळ जाणवली….. मी थांबलो…. ती प्रचंड खूष…  परिणाम… रिकव्हरी लवकर झाली….. 

मी आठवडाभर सुट्टी घेतली… तिला सुखद धक्का!!

तिला पाणीपुरी प्रचंड आवडायची…. मला अजिबात नाही….. म्हणून तिने कधीच आग्रह केला नाही….. 

तिला सरप्राईज…. “चल आज पाणीपुरी खाऊ”…  असे मी म्हणल्यावर भूत पाहिल्यासारखे तिने पाहिले….. 

….तिला प्रचंड आनंद झाला होता, पाणीपुरी खाताना ती खूप बोलत होती, हसत होती. तिला खूप काही सांगायचे होते….. 

फक्त माझ्यासोबत वेळ घालविण्याची किती साधी अपेक्षा, पण तीसुद्धा मला समजली नाही. माझे डोळे भरून आले, तिच्या लक्षात आले…. 

“काय झाले?”…. 

“पाणीपुरीची चव आज कळली” मी हसत उत्तर दिले…. ‘अजून खाणार?’ विचारल्यावर तिने आनंदाने मान डोलावली…. 

मी आता ठरवलंय… तिला जपायचं…. तिच्या आवडीत माझी आवड शोधायची….. 

संसारसुद्धा आंबट, गोड, तिखट, चटपटीत, रुचकर असतो – जणु काही पाणीपुरीच…. 

३. “वडापाव”

रुटीन ऑफिस वर्कमुळे खूप दमलो आणि कंटाळलो होतो.

उगीचच चिडचिड चालू होती, बोर झालो….. 

अचानक डोक्यात ट्यूब पेटली.  ….जिवलग मित्राला फोन केला…  तोसुद्धा रुटीनला वैतागलेला… दोघं समदु:खी लहानपणी कायम सोबत असणारे आम्ही…  बऱ्याच दिवसात भेटलोच नव्हतो….

समोरासमोर आल्यावर गळाभेट घेतली… “किती बदललोय यार… एकमेकांपासून लांब गेलो”,   मी…..“बघ ना… एकाच शहरात राहून भेटू शकत नाही….. साली लाईफ फालतू झाली आहे”… मित्र भावुक झाला….. 

….“चलो तर मग….”  मी म्हणालो….

….दोघांचे मोबाईल सायलेंट मोडवर….  ….“वडापाव” आमचा वीक पॉईंट…… 

….आतापर्यंत शेकड्याने खाल्ले, पण मित्रासोबत खाण्याची मजा काही औरच…

…..नेहमीच्या दुकानात गेलो, वडापाववर ताव मारायला सुरूवात केली…..  दोन राउंड झाले, सोबत कटिंग चहा… पोटभर गप्पा मारल्या…. फार मस्त वाटले…. एकदम फ्रेश झालो…..!!!!

….मी, मित्र आणि वडापाव असा झकास सेल्फी काढला…..

…..दोस्ती रिचार्ज करून पुन्हा आपापल्या वाटेने निघालो….. 

 …. आयुष्य वेगळे झाले, तरी दोन गोष्टी अजूनही तशाच होत्या – आमची मैत्री आणि  आवडीचा वडापाव……   

 

©  सुश्री प्रभा हर्षे

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवनातील “परतफेड” – अज्ञात ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून  ?

जीवनातील “परतफेड” – अज्ञात ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(–आणि उरलेले आयुष्य आनंदात कसे जगावे?)

“ कसे आहात..?”

एवढा एकच प्रश्न त्यांनी विचारला.. आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या व्यक्तीसमोर मी मनसोक्त रडलो..

तो म्हणाला.. “भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधीसुध्दा डोळ्यांतून पाणी काढायचं नाही..”

त्यानंतर त्याने जे काही सांगितलं– त्यामुळे माझा आंतरबाह्य असा  कायापालट झाला..!

“त्याने काय सांगितलं..??”

तो शांतपणे म्हणाला की, “आपण हा जो मनुष्यजन्म घेतलाय, तो आपल्या अपेक्षापूर्तींकरिता नाही किंवा नसावा.. कारण आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत.. त्यामुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!”

“माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाहीच आहे.  तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहून गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी…”

जसं तुमच्या आयुष्यात अचानक जोडीदार हे जग सोडून गेला, तुम्ही त्याचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्याचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्याकडून झाली..  तो अकाउंट तुमचा संपला..! आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा..

मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत, किंवा आपल्या लाडक्या लेकीने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन परस्पर लग्न केले, ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात.. परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हांला मरण नाही… तेव्हा मनातल्या मनांतसुद्धा परमेश्वराला उद्देशून, “तू मला का जगवलंस..?” हा प्रश्न विचारू नका.. *जे झाले ते चांगले झाले,जे होईल ते चांगले होईल “ असा दृष्टिकोन ठेवून सकारात्मक जीवन जगा व इतरांना प्रेरणा द्या.

कुठलीही व्यक्ती असो, ती तुमच्याशी विचित्र वागली.. तुमचा अपमान केला.. तुमच्याकडे दुर्लक्ष केलं.. तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं—तेव्हा “एकेक अकाउंट पूर्ण झाला “ असे समजा आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा..

बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर,  ‘Account Closed..’ असा शिक्का मारतात ना…  त्याप्रमाणे जेव्हा एकांत मिळेल तेव्हा आपले किती  ‘Account Closed’ झाले, ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका…

कदाचित सुरुवातीला तुम्हांला जड जाईल.. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं..

तेव्हा मनाला सांगा.. “बाबा रे.. आयुष्यभर तुझं ऐकलं.. तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून तुला मी मुक्त केलं..!”

हा प्रयोग करा…  आणि किती खाती पटापट बंद होतायत ह्याची प्रचिती घ्या.. मीसुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही.. तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती, असं समजा..

परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त.. “परतफेड आणि परतफेड” हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल, तुमच्या आयुष्यातून निगेटीव्हीटी कायमची निघून जाईल…..

आणि मी येतो…” असं म्हणत तो निघून गेला..

इतकं सगळं बोलून मी उठलो आणि म्हणालो..

” आज ही मुक्ती मिळून पाच वर्षं झाली.. मी आयुष्य खूपच मस्त जगत आहे.. तृप्त आहे..” तुम्ही 

“ सहन करतो, सहन करतो..” हे इतक्या वेळा सांगितलंत,  ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाहीत.. तुम्ही फक्त दुःख वाटत असता..”

“जो सहन करतो ना.. तो कधी बोलत नाही..!”

चला तर मित्रांनो, आजपासून आपणसुध्दा आपल्या आयुष्यात कोणाकडून अपेक्षाभंग करुन घेण्याऐवजी फक्त ” परतफेडीचं ” आयुष्य जगायला सुरुवात करुन आयुष्य मजेत घालवूया..

एक छोटासा प्रयत्न…

– ले. अज्ञात 

संग्राहक :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनातली अडगळीची खोली… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

? मनमंजुषेतून ?

☆ मनातली अडगळीची खोली ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

काय डोकावले आहे का कधी ह्या खोलीत… ?

प्रश्न जरा विचित्र वाटतो खरा, पण बघा जरा विचार करून शेवटचं कधी डोकावलं होत ते.

आपण आपल्या घरातल्या अडगळीच्या खोलीत अधून मधून डोकावत असतो. नेहमी नाही पण महिन्यातून एकदा तरी नक्की डोकावतो. एखादी वस्तू जी क्वचित लागते ती तिथे ठेवलेली असते,  ती आणायच्या कारणाने तरी, आणि नाहीच तर साठलेले धुळीचे थर झटकून खोली स्वच्छ करण्याच्या हेतूने तरी. सगळं सामान, अर्थात बरचस नको असलेलं झटकून स्वच्छ पुसून नीट लावून ठेवतो. उगीचच सगळ्या वस्तूंवरुन हात फिरवतो, काही खास गोष्टींवर घातलेले कव्हर बाजूला सारून ते झटकून परत घालतो.

काय काय सापडत म्हणून सांगू—. आरामखुर्ची, पेंड्युलमचे घड्याळ, कधी काळी शिवणकाम शिकलो आहे ह्याचा शिक्कामोर्तब करणारे मशीन, एफेम रेडियो, पिढ्यानपिढ्या चालत आलेला पाळणा, तीनचाकी सायकल जी आता कोणीही चालविणार नाही, पाटावरवंटा ज्यावर चटणी वाटण्यासाठी आपल्याकडे शक्तीही नाही, रॉकेल वरचे कंदील- आता रॉकेल न का मिळेना, स्टोव्ह जो पेटवता सुद्धा येत नाही अशा एक ना अनेक वस्तू असतात.

परवा मी पण सहज माझ्या अडगळीच्या खोलीत गेले होते. तिथे धूळ झटकून खोली आवरताना एक खुर्ची सापडली.  ती पाहून मला माझ्या माळीकाकांची आठवण झाली. परवाच ते मला विचारत होते, ताई एखादी खुर्ची असेल तर द्याल का? त्यांचे वडील आले होते गावाकडून आणि त्यांना खाली बसता येत नव्हतं. पटकन ती खुर्ची काढली, झटकली आणि देण्यासाठी सज्ज केली. तेव्हाच ठरवलं अश्या वस्तू ज्या आपल्याला नको आहेत त्या आता ठेवायच्या नाहीत. ज्या चांगल्या आहेत त्या देऊन टाकायच्या. खराब झालेल्या टाकून द्यायच्या.  नाही तर भंगारात द्यायच्या. 

हा विचार करत असतानाच मला असं वाटलं—-की माणूस नुसते अडगळीच्या खोलीतच अडगळ ठेवत नाही, तर त्यापेक्षाही जास्त अडगळ मनात ठेवतो. ती साठवतो आणि त्याला खतपाणीही घालतो. त्या गाठोड्यात असतात अनेक गोष्टी— जसे मान, अपमान,अपयश, काही तुटलेली अपूर्ण राहिलेली स्वप्न, दुखावलेली दुरावलेली नाती, आपल्या मित्र मैत्रिणीशी झालेले भांडण, ते कोण मिटवणार म्हणून मनात असलेली अढी, अश्या एक ना अनेक गोष्टी. एकावर एक थर चढतच जातात, आणि नकळत त्याची अडगळीच्या खोलीपेक्षाही जास्त मोठी खोली मनांत तयार होते.

तेव्हा ठरवलं– घरात नको असलेल्या वस्तूंची खोलीच ठेवायची नाही. नको असलेल्या वस्तू ठेवायच्याच नाहीत, ना घरात आणि ना मनात. नको असलेल्या वस्तू देऊन मोकळं व्हायचं. सगळया गोष्टींचा कसा रोखठोक हिशोब ठेवायचा. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर तिथल्या तिथे सांगून मोकळे व्हायचे. त्याचे व्याजावर व्याज चढवायचे नाही मनांत. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली म्हणून कुढत बसायचे नाही, धुळी सारखी झटकायची आणि पुढे जात रहायचे. अपयशाला गोंजारत बसायचे नाही, तर त्याला यशाची पहिली पायरी समजून यश मिळेपर्यंत प्रयत्न करत रहायचे.

आज ह्या गोष्टी तुमच्या समोर मांडायच कारण आपण सगळेच जणं मनात खूप काही साठवून ठेवतो.   भूतकाळाला जास्त महत्त्व देऊन वर्तमान हरवून बसतो. तसं न करता वर्तमानात जगूया ह्या क्षणाचा आनंद घेऊया. 

बघा आठवून तुम्ही शेवटचे कधी डोकावले होते मनातल्या खोलीत?? 

आज नक्की डोकावा.  नको असलेल्या साचलेल्या विचारांना काढून टाका, काही गैरसमज झाले असतील तर त्या व्यक्तीशी बोलून दूर करा. कुढत बसू नका आणि सगळ्यात महत्वाचे— विचार साठवून ठेवूच नका.  कोणापाशी तरी बोलून मन मोकळं करा. साठलेली धूळ आपोआपच निघून जाईल—-एक स्वच्छंद, निरोगी मनाचे आयुष्य जगता येईल. 

खुश रहा आनंदी जगा.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुक्रवारची कहाणी …. ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ शुक्रवारची कहाणी …. ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

(व्हाट्सअपवरून आलेल्या एका अतिशय चांगल्या मेसेजवरून सहज सुचलेलं.)

कीर्ति लहान असल्यापासून मी तिला ओळखत होते.आमच्या शेजारीच राहायचे हे लोक.

कीर्ति फार हुशार मुलगी– स्वभावाने गरीब, भिडस्त, सर्वांना मदत करणारी.  पुढे ते दुसरीकडे राहायला गेले, मग  फारसा  संपर्क नाही राहिला. पण कानावर येत असत बातम्या, की कीर्ति  छान शिकतेय– एका चांगल्या फर्ममध्ये नोकरीही लागलीय. कीर्तिला लहान भाऊही होता, तोही एमबीए झाला, चांगला पगारही मिळवू लागला.

मग असे कानावर आले,की कीर्तीने आईवडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केले. मुलगा  गरीब कुटुंबातील होता, कीर्तिइतका पगारही नव्हता त्याला. माहेरची श्रीमंत कीर्ति, आता भाड्याच्या घरात राहू लागली. पण ती खूश होती. 

भावाचे लग्न झाले. आईने अगदी श्रीमंत घरातली सून शोधली. मुलगी दिसायला अगदी बेताची.  शिक्षणही फारसे नाही. पण म्हणतात ना, पैसा बोलतो. सगळी उणीव पैशाने भरून काढली होती त्या लोकांनी. कीर्तिची आई फारच खुश होती. नवीन भावजय  श्रीमंत घरातली. उशिरा उठायची. सासूबाई आयता चहा-नाश्ता  हातात द्यायच्या. कामाची सवय होती कुठे?

दरम्यान,कीर्तिच्या आईचा एक फ्लॅट रिकामा झाला.  बाबा म्हणाले, “ कशाला भाडे भरत बसतेस? तुम्हीच रहा या फ्लॅटमध्ये. “ —ते  त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. फ्लॅट तिच्या माहेरपासून जवळच होता.  कीर्तीला मुलगा झाला. तिच्या भावजयीलाही दोन मुली झाल्या. वहिनीला उरक बिलकुल नाही. मुली अभ्यासात मागे. आईचे लक्षच नाही ना. कीर्तीचा मुलगा मात्र हुशार. कीर्ति अभ्यास घ्यायची  त्याचा.

एक दिवस कीर्तिची आई म्हणाली, “ अग, त्या मुलींचाही घे ना अभ्यास, किती कमी मार्क पडलेत.” —-मुली कीर्तिकडे जाऊ लागल्या. मग, रोज मुलींचे जेवणखाणही कीर्तीच करू लागली. हळूहळू अशी परिस्थिती झाली की, कीर्तिच्या गळ्यात सगळेच पडू लागले– “ अग, आज माझी बाई नाही आली, तुझ्या बाईकडून पोळ्या घे ना करून, आणि दे पाठवून इकडे.”—हे रोजचेच सुरू झाले,आणि कीर्तीला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू झाला. नवराही सगळे दिसत असून  बोलू शकत नव्हता. वैतागून कीर्ति एक दिवस माझ्या घरी आली. म्हणाली,” मावशी, मला काहीतरी सल्ला द्या, माझी फार घुसमट होते आहे. अगदी कठीण झालंय सगळं. माझी भावजय इतकी स्वार्थी आहे— सगळच माझ्या गळ्यात टाकून गावभर फिरत असते. पण आईला तिचेच कौतुक.

‘श्रीमंतांची मुलगी,’ हा एकच गुण आहे तिच्यात. माझी कोणतीही गोष्ट तिला चांगली वाटतच नाही.” 

मी तिला म्हटलं, “ कीर्ति,यासाठी तुला काही गोष्टी कराव्या लागतील. बघ पटतंय का.

एक तर तू आता स्वतः चे घर घ्यायच्या मागे लाग. आणि तेही आईच्या घरापासून लांब घे. 

तुम्हाला चांगले पगार आहेत ना ? मग घ्या की कर्ज.  .किती वर्षे अशी तू राबत राहणार ग.

तू सांगतेस ते ऐकून कीवच येतेय मला तुझी. हे बघ,लहानपणी आपण शुक्रवारची कहाणी ऐकलीय ना, ती सत्यच आहे बरं बाळा. या युगात गुणांना किंमत नाही, तर पैशालाच आहे ..अजूनही.

दागिन्यांनाच  जिलब्या आणि पक्वान्ने वाढतात लोक.—आता तुला बदलले पाहिजे. इतके सहन केलेत, आणखी थोडे करा. लवकर बुक करा फ्लॅट. वेळ असेल तर आईची कामे जरूर कर,

पण नसेल तर तसे स्पष्ट सांग, “  मला ऑफिस मध्ये खूप काम आहे.”  गोष्टी गोड बोलुनही होतात कीर्ति. किती गृहित धरलंय तुला माहेरच्यांनी. आपलेच दात आणि आपलेच ओठ, असं झालंय तुझं.  

पण मला तरी , तू घर घेणे, आणि यापुढे उगीच काही  गळ्यात न घेणे, हेच उपाय दिसतात सध्या.” 

कीर्ति विचारात पडली. तिलाही आईच्या घरात बिनभाड्याचं रहायचा मोह होताच की. तिने तिच्या नवऱ्याला विश्वासात घेतलं . तोही बिचारा भोगत होताच. सासरेबुवांची बरीच कामे करावी लागत त्यालाही..

त्यांनी आईच्या घरापासून दूर फ्लॅट बुक केला. कीर्तीने आईबाबांना त्याबद्दल सांगितलं . बाबांना मनापासून आनंद झाला, पण आईला हे आवडले नाही. “ कशाला ग जातेस एवढ्या लांब, आम्ही काय जा म्हणणार होतो का?”—कीर्ति निमूट राहिली. यथावकाश ते तिकडे राहायला गेले.

वास्तुशांतीला  मला बोलावणे होते. कीर्तीने फ्लॅट सुंदर सजवला होता. अभिमानाने मला घर दाखवतांना म्हणाली, ”आता इथे आम्ही सुखाचा श्वास घेऊ शकू. रोजरोजची कटकट, सुनेचे गुणगान, खोटी स्तुती ऐकणे,  माझ्या गरीब नवऱ्याचा उपहास– काहीच नको.”

मी मनापासून आशीर्वाद दिला– “ कीर्ति, मस्त आहे घर. अशीच सुखात रहा  दोघेही.”  कीर्ति हसत म्हणाली, ” होय गुरू, तुमचा सल्ला ऐकला, आणि सगळे शक्य झाले. ती शुक्रवारची कहाणी सांगितलीत, ती मात्र खरीच आहे हो. या जगात गुणांना किंमत नाही– फक्त श्रीमंतीलाच आहे–  कटु सत्य आहे —- “ दागिन्यांना जिलब्या— “,  हो ना ?” 

मी हसले, आणि म्हटलं , “ विसर ते–आता गोष्टीतली गरीब बहीणही झालीये  घरदारवाली.  आणखीही घेशील सगळे.” 

बघा ना–

आपल्या  पूर्वीच्या शहाण्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी या काळातसुद्धा कशा लागू पडतात ना—

 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अहो आश्चर्यम् ! ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ अहो आश्चर्यम् ! ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

ज्येष्ठा कनिष्ठा गौरी बद्दल खूप माहिती आपल्याला मिळत आहे. एक अनुभव सांगते. सांगलीला होतो आम्ही त्यावेळेस. वाड्यात बरीच बिर्‍हाड होती. त्यात माझ्या मामी पण राहत होत्या

मामीकडे सुगडाच्या गौरी होत्या. झोकात गौरी हळदी कुंकू झाले. दुसरे दिवशी विसर्जन पण झाले. मामी म्हणाल्या, “ सगळ्या  आमच्या घरी या.  तुम्हाला गौरीचा चमत्कार दाखवते.”  

त्या म्हणाल्या, “ आज विसर्जन केले तरी गौरीचं अस्तित्व घरात असतं. तिला खेळायचं असतं.”  त्यांनी आपले दोन अंगठे जमिनीवर हात ठेवून उभे केले. समोर एका सवाष्णीला बसवून तिला पण त्यांच्या प्रमाणे दोन अंगठे  उभे करायला सांगितले .आणि चार अंगठ्यावर ती सुगडाची गौर म्हणजे सुगडच ठेवायला सांगितले. त्या म्हणाल्या, “ आता तुम्ही फक्त यात अक्षत टाका आणि तुमची इच्छा बोला .जर इच्छा पूर्ण होणार असेल, तर गौर  उजवीकडे फिरायला लागेल व नसेल तर डावीकडे फिरेल—–.

——-आणि अहो आश्चर्यम् !— प्रथम मीच त्या गौरीवर अक्षत टाकली आणि माझी एक इच्छा बोलून दाखवली आणि अक्षरशः 4 अंगठ्यांवर ती सुगडरुपी गौर उजवीकडून गरगर गरगर जोरात फिरायला लागली. नंतर दुसरी इच्छा बोलून दाखवली.  अक्षत टाकून मनातल्या मनातच मी काही विचारले. आणि गौर डावीकडे जोरजोरात फिरायला लागली. फक्त चार अंगठ्यावर  ती उभी होती. मग हळूहळू वाड्यातल्या सगळ्या जमल्या. आणि दीड तास हा खेळ रंगला. नंतर मामी म्हणाल्या, “ आता गौर दमली, आता बास करा. कुणीतरी अक्षत टाकली आणि म्हटले,” गौरी माते खूप खेळलीस, दमलीस आता तुझ्या तुझ्या घरी जा.”  त्यानंतर ती जागच्या जागीच हलली आणि शांत झाली. पुढे कितीही अक्षत टाकून कोणी काही विचारले तरी ती सुगडरुपी गौर अजिबात हलली नाही. हे स्वतः आम्ही अनुभवले आहे .

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रोमँटिक दळण ☆ प्रस्तुती – कौस्तुभ केळकर नगरवाला

? मनमंजुषेतून ?

☆ रोमँटिक दळण ☆ प्रस्तुती – कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

आपलं हे असं आहे.

आपण कशातही कधीही कधीच गुंतून पडत नाही…

संसारात तर बिलकूलच नाही.

भाजी,दळण,इस्त्रीचे कपडे, वाणसामान वगैरे वगैरे गोष्टी आणण्यासाठी आपला जन्मच झालेला नाही.

असं आपलं मी माझं मलाच समजावतो.

 

गेला बाजार माझी स्वतःचीच समजूत पटत नाही..

बायकोला काय पटणार…?

जरा कुठे निवांत सोफ्यावर सांडलेला दिसलो की…

बायकोला कसंसंच होतंय.

जा दळण आण.

जा ईस्त्रीचे कपडे टाकून ये..

ईस्त्रीचे कपडे घेऊन ये.

अर्धा किलो मैदा घेऊन ये…

भाजी आण.

जाऊ दे..

तुम्हाला सहन नाही व्हायचं.

सांगकाम्या झालोय मी आमच्या बिगबाॅसचा.

 

कालचीच दुपारची गोष्ट.

दोन ऊशा डोक्याखाली अन् दोन पायाखाली.

मी शेषाशायी मोडवर सोफ्यावर सांडलेलो.

रिमोट भरल्या गोलपोटावर.

नजर टीव्हीकडे.

डोळे मिटलेले.

ब्रह्मानंदी टाळी की का काय ते झालेलं…

एवढ्यात साहेब कडाडले..

जा दळण घेवून ये.

दहा किलो गहू दिलेत काल दळायला.

80 रूपये होतील…

मी दचकून जागा झालो.

सरपटत गिरणीच्या दिशेने.

आमच्या बिल्डींगखाली चौकातच गिरणी आहे.

पुण्याला शिफ्ट झाल्यापासून ईथंच ईथलंच दळण दळतोय.

गिरणीचं काम एकदम सिस्टीमॅटीक.

काऊंटरवर मार्कर ठेवलेला असतो.

दळणाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंना आपलं नाव टाकायचं..

मागाहून घोटाळा नको.

 

आपला नगरी बाणा.

आमची दळणाची एक पुश्तैनी पिशवी आहे.

नगरच्या कोहीनूर क्लाॅथ स्टोअरची.

लाल रंगाची, भलीमोठी, कापडी, दणकट, युनिक.

एकदम ओळखणेबल…

मार्करची आपल्याला गरजच पडलेली नाहीये. 

गिरणीत कोहीनूरवाली पिशवी आपल्याशिवाय दुसर्या कुण्णा कुण्णाकडे नाहीये.

माझा फुरफुरणारा ओव्हरकाॅन्फीडन्स.

मी तडक गिरणीत धडकलो.

80रू मालकांच्या हाती टेकवले.

घरी परत.

कोहीनूरची पिशवी स्वयपाकघरात आदळली.

 

शून्य मिनटात सोफ्यावर आडवा.

जरा कुठे डोळा लागतोय तर…

केळकरांचं घर आपट्यांचं झालेलं.

 

नुसती आदळआपट, धूसफूस.

बिगबाॅस कडाडले…

“कुणाची पिशवी ऊचलून आणलीयेस ?

यात दहा किलो भाजणी आहे.

कुठं लक्ष…..”

चलता है.

मी परत गिरणीत.

असं कसं झालं ?

तिथं पोचतो अन्…

 

माझा खपली गहू झालेला.

जुन्या खपल्या.

आमच्या वर्गातली, हमारे जमानेवाली,

सगळ्यात सुंदर अप्सरा…

अजूनही तश्शीच.

हाय मै मर जावा.

काळजात ड्रिल मारल्यासारखं वाटलं.

अप्सरा आली…

 

हातात लाल कोहिनूरची पिशवी घेऊन.

ती कनफ्युजलेली तिथं ऊभी.

गिरणीवाल्यानं मला ऊसासारखा सोलला.

 

तिकडे लक्ष न देता ती म्हणाली…

“तू ईकडे कुठे ?

किती वर्षांनी भेटतोयस ?

आमचीही दळणाची पिशवी सेम टू सेम.

तेवढीच माहेरची आठवण.

बरं झालं कोहिनूरच्या लाल पिशवीनं घोटाळा केला, 

अन् तू भेटलास..

 

कसा आहेस ?”

ती नुकतीच मुंबईहून ईथं शिफ्ट झालेली.

ऊभ्या ऊभ्या गप्पा.

सेल नं. ची देवाणघेवाण.

‘ ये ना घरी ‘ ची नाजूक विनंती.

 

ठार मेलो..

दळण इतकं रोमँटिक असेल असं वाटलंच नव्हतं कधी..

ठरलं—-

आजपासून कधीही कुठल्याही संसारिक कामाला नाही म्हणायचं नाही.

आपल्या वर्गात साडेनऊ सुंदर अप्सरा होत्या..

आज गिरणीत एक भेटलीये.

न जाणो ऊद्या मातीगणपतीपाशी भाजीवाल्याकडे दुसरी—-

आशाँए—-

अवघाची संसार…

सुखाचा करीन—–

 

प्रस्तुती –  कौस्तुभ केळकर नगरवाला

(*माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.)

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुभंकरोती….….! ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ शुभंकरोती….….! ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

आज्जी भूषणला म्हणाली,  “बाळा, दिवेलागणीची वेळ झाली, शुभंकरोती म्हणायला चल. हातपाय धुवून ये हं.”  भूषण आला नि आज्जीजवळ बसला. आज्जी  शिकवायला लागली.” शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम धनसंपदा———-बाहेरची लक्ष्मी घरात येवो,  घरातली इडापिडा बाहेर जावो,”  हे सगळं आज्जीने शिकवलं. 

भूषण म्हणाला, “आजी, लक्छुमी म्हंजे काय?”

आज्जीने सांगितलं, “लक्ष्मी म्हणजे पैसे, दागिने, धान्य, वगैरे.” 

“आनी इलापिला म्हंजे काय?”

त्याला समजेल अशा भाषेत आज्जीने  सांगितलं—- 

” इडापिडा म्हणजे गरिबी, खायला मिळत नाही, फाटके कपडे, आजारी पडणं असं सगळं  “

“इलापिला बाहेल जाऊदे म्हंजे कुथे?”

“जाऊदे तिकडे रस्त्यावर”  आज्जीने उत्तर दिलं . 

“मी शुभंकलोती म्हननाल नाही.”  

“कारे”?आज्जीने विचारलं.

“लश्त्यावल पबीचं घल आहेना!  (पबी म्हणजे त्याची छोटी मैत्रिण प्रभी,ती झोपडीत रहाते.)

इलापिला तिच्याकले गेली तल ती आजाली पलेल”. 

लहानशा भूषणचा समाजवाद ——

—–आज्जीला खूप काही शिकवून गेला.  

 

प्रस्तुती :  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साठवणीतल्या आठवणी – स्व. ह. मो. मराठे ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ साठवणीतल्या आठवणी – स्व. ह. मो. मराठे ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

७६-७८चा सुमार असेल. मी जरा उत्साहाने कविता लिहित होते. चांगल्या, दर्जेादर मासिकातून याव्यात असं वाटत होतं. पण एकूण स्वभावात न्यूनगंडच जास्त. एकदा माझ्या इंदूरच्या मामेभावाला शरदला मी कविता वाचायला दिल्या. तो म्हणाला, `चांगल्या आहेत.’ मी म्हंटलं, `स्त्री-किर्लोस्कर’कडे यायला पाहिजेत.’  तो म्हणाला, `त्यात काय? किर्लोस्क प्रेसमध्ये जा. मुकुंदरावांना भेट आणि तुझ्या कविता दे. एकदम बाड त्यांच्यापुढे टाकू  नकोस . दोन-तीन कविता दे.’

माझ्यात आत्मविश्वास जरा कमीच. त्यात अक्षर चांगलं नसणं,  हा आणखी एक मायनस पॉइंट. मी जरा का कू  करतेय,  असं पाहिल्यावर,  माझी वहिनी ललिता मला पुढ्यात घालून प्रेसमध्ये घेऊन गेली.

एका मध्यम आकाराच्या हॉलमध्ये काही सुट्या सुट्या टेबल-खुच्यांवर बसून लोक काम करत होते. अजून संगणक आला नव्हता. साहित्य वाचणं,  तपासणं, टायपिंग,  फायलिंग वगैरे कामं चालली होती. समोरच एका टेबलामागच्या खुर्चीवर एक उंच, गोरे, चष्मिष्ट गृहस्थ बसलेले दिसले. आम्ही त्यांच्यापुढे उभे राहिलो.

`काय पाहिजे?’

`मुकुंदरावांना भेटायचय.’

`ते बाहेर गेलेत. काय काम आहे?’

`अं… कविता द्यायच्यात.’

`बघू…’ मी कविता त्यांच्या हातात दिल्या आणि लहान मुलीसारखं बजावलं, `नक्की द्या हं त्यांना.’ त्यांनी हसून मान डोलावली. मग वाटलं आपण आपली मौल्यवान इस्टेट  (कविता) कुणाकडे सोपवली, त्यांचं नाव तरी माहीत असावं, म्हणून नाव विचारलं. ते म्हणाले, `ह. मो. मराठे’’. तोपर्यंत तरी एक लेखक म्हणून हे नाव मला परिचित नव्हतं. मासिकातून त्यांच्या कथा-लेख वाचलेही असतील,  पण ते लेखन आणि ह.मो. हे नाव,  याचं समीकरण डोक्यात फिट्ट झालं नव्हतं. तोपर्यंत साहित्य क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करायची ह.मों.ची धडपड चालू होती, पण प्रथितयशाचं वलय त्यांच्या नावाभोवती अद्याप तेजाळायचं होतं.

त्यानंतर दोन महिन्यांनी माझी एक कविता किर्लोस्करमध्ये प्रकाशित झाली. आणखी काही महिन्यांनी दुसरी. पुढे कळलं, किर्लोस्कर मध्ये छापायच्या साहित्याची बहुतेक सारी निवड तेच करतात.

जानेवारी ७७ पासून ‘किर्लोस्कर’ ने एक उपक्रम राबवला. दरमहा जिल्हावार कविसंमेलने घ्यायची व त्यातल्या ७ कविता किर्लोस्करमध्ये प्रसिद्धीसाठी निवडायच्या. ज्या जिल्ह्यात, ज्या गावी हे कविसंमेलन आयोजित करायचं. तिथल्या एका संस्थेने जबाबदारी घेऊन कविता संकलित करायच्या. त्यापैकी ३० कविता (प्रत्येकी १ किंवा २ ) संमेलनात वाचण्यासाठी निवडायच्या. सांगली नगर वाचनालयाने या उपक्रमाचे यजमानपद स्वीकारले. ३५० कविता आल्या होत्या, असे नंतर कळले. माझ्या `जन्म’ आणि `पेपर’ या दोन्ही कवितांची निवड वाचनासाठी झाली होती. किर्लोस्करकडून ह. मो. मराठे,  संजीवनी मराठे या ज्येष्ठ कवयित्रींना घेऊन आले होते. त्यातून ज्या ७ कविता छापण्यासाठी निवडल्या गेल्या, त्यात माझी ‘पेपर’ कविता होती.

त्यानंतर ह.मों.चं एक पत्र आलं. तुमची परवानगी असेल, तर मी `तुमच्या `पेपर’ कवितेवर एक कथा लिहू इच्छितो.’  या मधल्या काळात ह.मोच्या कथा माझ्या वाचनात आल्या होत्या आणि त्या मला आवडल्याही होत्या. एक चांगला, जाने -माने कथालेखक आपल्या कवितेच्या कल्पनेवर कथा लिहितोय म्हंटल्यावर मी जरा फुशारलेच आणि त्यांना आनंदानं परवानगी दिली. त्यानंतर किती तरी महिन्यांनी त्यांची भेट झाल्यावर मी त्यांना विचारलं, `माझ्या `पेपर’ कवितेवर तुम्ही कथा लिहिणर होतात,  लिहीलीत का?’

`हो! गोमंतकच्या दिवाळी अंकात ती छापूनही  आली.’

‘मला वाचायला का पाठवली नाहीत?’

`तुम्ही कुठे म्हणाला होतात, कथा पाठवा म्हणून?’

`अच्छा? म्हणजे असं मुद्दाम सांगायला लागतं का? मला वाटलं माझ्या कवितेवर लिहिताय,  म्हणजे आपणहून पाठवाल तुम्ही!’ त्यानंतर तो विषय तिथेच थांबला. मला ती कथा कधीच वाचायला मिळाली नाही.

किर्लोस्करमध्ये माझी `पेपर’ कविता प्रकाशित झाली आणि पाठोपाठ ह. मों.चं पत्र. `नियमाप्रमाणे तुम्हाला मानधन मिळेल, पण मी एक गोष्ट सुचवू इच्छितो, त्याऐवजी, पुढल्या महिन्यापासून तुम्हाला वर्षभर किर्लोस्करचे अंक पाठवले तर चालतील का? (या महिन्याचा अंक तुमची कविता आल्यामुळे तुम्हाला येईलच.)’ मी वर्षभर किर्लोस्करच्या अंकाचा पर्याय स्वीकारला. एवढंच नाही,  तर पुढेही किती तरी वर्ष स्त्री-किर्लोस्करची वर्गणी भरत राहिले. मला वाटतं,  अनेकांनी दुसरा पर्याय स्वीकारला असणार. कारण त्यावेळी, घराघरात टी.व्ही.ची इडियट बॉक्स बसलेली नव्हती. त्यानंतरही पुढे कितीतरी वर्षं मी स्त्री-किर्लोस्करची वर्गणी नियमितपणे भरत राहिले. मला वाटतं,  अनेकांनी तसंच केलं असेल.

त्यानंतर काही वर्षांनी ह.मों.चं `मधलं पान’ पुस्तक वाचनात आलं. त्यात त्यांनी आपण लोकप्रभा,  सामना,  घरदार, इ. नियतकालिकांचा खप वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले,  कोणते उपक्रम राबवले,  ते सारं विस्तारानं लिहिलय. ते सगळं वाचताना वाटलं, किर्लोस्करचा जिल्हावार कविसंमेलनाचा उपक्रम हा नव्या दमाच्या कवींच्या प्रतिभेचा शोध ( म्हणजे तसं त्यावेळेला म्हंटलं गेलं तरी…) यासाठी नसून तिथेही किर्लोस्करचे वर्गणीदार वाढवावेत हाच हेतू असावा.

 

प्रस्तुती –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print