सौ. अमृता देशपांडे
☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-4 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
बाबांची बदली “कद्रा ” येथे झाली. कारवारच्या पुढे काळी नदीच्या पलीकडे कद्रा हे छोटेसे खेडेगाव. गाव म्हणजे आदिवासी जमात आणि जंगल. तिथले सगळे वर्णन बाबा आम्हाला अगदी रंगवून सांगत असत. बाबांनी सांगितलेल्या त्या आठवणी बाबांच्या शब्दात मांडल्या आहेत.
“मेडिकल ऑफिसर म्हणून माझं पोस्टिंग कद्रा येथे झालं. कद्रा म्हणजे जवळजवळ जंगलच. तेथील एक छोटीशी वस्ती असलेलं गाव. मनुष्यवस्ती अतिशय विरळ. लांब लांब वसलेल्या छोट्या छोट्या घरांची वसाहत. मी व सौ दोघे 2-3 गाड्या बदलून कद्र्याला पोचलो. गावातील लोकांना हे आलेले जोडपे डाॅक्टर आहेत, हे सहज लक्षात आले. जाॅन कपौंडरने दवाखाना दाखवला. एका ब्रिटिशकालीन बंगल्यामध्ये आमच्या रहाण्याचा इंतजाम केला होता. तो बंगला पाहिल्यावर मधुमती सिनेमातील महालाची आठवण झाली. भले मोठे दरवाजे, काचेची तावदाने असलेल्या चौकोनी मोठमोठ्या खिडक्या, त्यावर अर्धगोलाकार रंगीत काचा, उंच छतावरून लोंबणारे दिवे, हंड्या, मोठाली दालने, अशा भव्य बंगल्यात रहाणार आम्ही दोघे.
पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येई. खिडकीतून येणा-या सूर्यकिरणांनी दिवसाची सुरुवात होत असे. सूर्य मावळला की दिवस संपला. घर ते दवाखाना, दवाखाना ते घर. दुसरे काहीच नाही. इतरही वेळ घालवण्याचे साधन नाही.
आसपास चार घरे सोडली तर इतर सर्व परिसर जंगलच होतं. संध्याकाळ झाली की घराचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवा अशा सूचना वस्तीवरच्या लोकांनी दिल्याने दिवसाही खिडक्या उघडण्याची भीती वाटत होती.
एकदा रविवारी सकाळी जाग आली तेव्हा जरा बाहेर जाऊन चक्कर मारून येऊ या असा विचार मनात आला. दरवाजा उघडण्यापूर्वीच घाण वास यायला लागला. घरात शोधलं, उंदीर मरून पडलाय की काय? काहीच सापडलं नाही.. तेवढ्यात बाहेर घुर्र घुर्र आवाज आला. हळूच खिडकी किंचितशी उघडून बघतो तर काय? ? बाप रे!
असा मोठ्ठा पिवळा जर्द पट्टेरी ढाण्या वाघाचं धूड व्हरांड्यात पसरलं होतं. माझी तर बोबडीच वळली. खिडकी आवाज न करता बंद केली आत जाऊन बसलो. दर दहा पंधरा मिनिटांनी कानोसा घेत होतो. सगळा दिवस तो तिथेच होता. संध्याकाळ झाली तसा तो निघून गेला. दुस-या दिवशी जाॅनला सांगितलं तेव्हा तो हसायला लागला. सायेब, अशेच आसता हंय….
एक दिवस कोवळी उन्हे अंगावर घेत व्हरांड्यात बसलो होतो. अचानक एक. कुत्र्याचं छोटुलं , गुबुगुबु पिल्लू शेपूट हलवत आमच्या जवळ आलं. बराच वेळ ते घोटाळत होतं. त्याला बहुतेक भूक लागली असावी असं समजून सौ ने चतकोर भाकरी दिली त्याला. ती खाऊन पिल्लू तिथेच रेंगाळलं. दुस-या दिवशी दार उघडलं तर पिल्लू हजर! दोनच दिवसात पिल्लू आपलंसं वाटू लागलं. आता रोज दोन्ही वेळी त्याची भाकरीची ताटली तयार असे. सौ ने त्याचं नाव ठेवलं “रघुनाथ”.
आता रोजचा वेळ रघुनाथ बरोबर छान जाऊ लागला. जवळपास फिरायला गेलो तरी रघुनाथ सोबत असेच. आम्हाला एक छान सोबती मिळाला.
एक दिवस अचानक रघुनाथ दिसेनासा झाला. दोन दिवस झाले, याचा पत्ताच नाही. मन अस्वस्थ झाले. जाॅनला विचारले, तेव्हा तो सहजपणे म्हणाला, कुत्रे दिसत नाही, तर नक्कीच वाघरानं खाऊन टाकलं असणार.
एवढंसं गोड पिल्लू वाघानं खाल्लं असं ऐकून खूप वाईट वाटलं. खूप चुकल्या चुकल्या सारखं वाटलं. मुक्या प्राण्यांची सवय होते. पुढे नित्य व्यवहारात आठवण कमी होत गेली. कालाय तस्मै नमः II
क्रमशः…
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈