मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

१९७७ मध्ये आण्णांना अर्धांगाचा झटका आला. महिना-दीड महिना हॉस्पिटलमध्ये काढल्यावर आण्णा घरी आले. आपण कुणावर भार होऊ नये, असं आण्णांना सारखं वाटायचं. उजव्या हाताला पकड नव्हती आणि गिळण्याची क्रिया जवळ जवळ थांबली होती. पण प्रयत्नपूर्वक जेवणाच्या व्यतिरिक्त सर्व गोष्टी ते स्वत:च्या स्वत:च करू लागले. हा आघात त्यांची वाणी आणि त्यांची लेखणीही घेऊन गेला. उजव्या हाताची शक्तीच नाहिशीझाली.  `महाराष्ट्र एज्युकेशन जर्नल’ या इंग्रजीतून प्रकाशित होणार्‍या नियतकालिकाच्या संपादनाचे काम ते गेले २५ वर्षे करत होते. इतकंच नव्हे, तर त्यातील लेखनही बव्हंशी ते एकटाकी करत होते. आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.

आपल्या शिक्षकी पेशातून किती तरी वर्षांपूर्वी आण्णा निवृत्त झाले होते. पण पुढे कित्येक वर्षे अध्यापन, लेखन त्यामुळे ते खर्‍या अर्थाने निवृत्त झाले नव्हतेच. या दुखण्याने मात्र त्यांना निवृत्त केलं. आता ते इतके रिकामे रिकामे झाले,  की मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. बोलता येईना,  त्यामुळे संवाद थांबला. लिहिता येईना, त्यामुळे लेखन थांबलं. लोकसंपर्कही हळू हळू कमी झाला. आपल्यामुळे कुणाला कसला त्रास होऊ नये, म्हणून आण्णा विलक्षण जागरुक असायचे. पण या काळात आण्णांना नेमके काय हवे,  कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन ती गरज भागविण्यासाठी उज्ज्वला आपणहून पुढे आली. वहिनी अर्थात होत्या. पण त्या घर, स्वयंपाक-पाणी, आण्णांचं पथ्यपाणी यात गुंतलेल्या. त्यात त्यांचं वयही सत्तरीच्या जवळपास.

वर्षातून एकदा लांबचा प्रवास करून यायचा, असा आण्णा-वहिनींचा गेल्या ३०-३५ वर्षातील शिरस्ता. मागे एकदा कन्याकुमारीला भेट दिली, तेव्हा विवेकानंद स्मारकाचा विकास झालेला नव्हता. पुन्हा त्या भागात जाऊन ते स्मारक बघून येण्याची इच्छा दोघांच्याही मनात निर्माण झाली. आता आण्णांनी पंचाहत्तरी गाठलेली. वहिनी अडुसष्ठच्या पुढे. त्यात आण्णांची बोलण्याची, लिहिण्याची घास गिळण्याची समस्या. उज्ज्वलाने यावेळी पुंडलिकाची भूमिका बजावत वयाने वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या दांपत्याला, शरिराने काही प्रमाणात विकलांग, पण मनाने निरामय असलेल्या आपल्या गुरुला आणि गुरुपत्नीला दक्षिण भारताची मुशाफिरी व विवेकानंद स्मारकाचे दर्शन घडवले.

प्रवासाला गेलं की तिथली माहिती समजून घ्यायची. टिपणे काढायची आणि नंतर अत्यंत रोचक व माहितीपूर्ण प्रवासवर्णन लिहायचं,  हाही आण्णांचा नित्याचा प्रघात. यावेळी उजव्या हाताच्या बोटांना पकड नव्हती. त्यांनी हळू हळू डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला. अजून व्यवस्थित लेखन होत नव्हतं,  पण वाचून कळेल इतपत लिहायला जमू लागलं. लेखनाची उर्मी अशी उदंड की लेखन केल्याशिवाय राहवेना. प्रवास संपवून मंडळी घरी आली. आण्णांनी रोज थोडं थोडं जमेल तसं वेड्या-वाकड्या अक्षरात लेखन केलं. उज्ज्वलाने इतरांना समजेल, अशा अक्षरात त्याची मुद्रण प्रत तयार केली. दक्षिण भारताचे सुंदर प्रवास वर्णन पुढे प्रसिद्ध झाले. साधु वास्वानींच्या विचारांचा इंग्रजीवरून मराठी अनुवाद त्यांनी केला. शालेय मुलांना उद्बोधक अशी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या पाश्चात्य कतृत्ववान व्यक्तींचा परिचय करून देणारे माहितीपूर्ण लेखन त्यांनी `मानवतेचा दीपस्तंभ’ या दोन भागात केले. या सार्‍या लेखनाला वाचनीय अक्षरांचे रूप देण्याचे काम उज्ज्वलाने केले आणि नंतर ती प्रकाशित झाली.

उज्ज्वला अशी मुलीसारखी घरी येत राहिली. मुलीसारखी वहिनींना घरकामात, आण्णांना लेखनात मदत करत राहिली. आण्णांना क्वचित बाहेर त्यांच्या समवयस्क मित्रांकडे घेऊन जाऊ लागली. आण्णांना अर्धांगाचा झटका आल्यापासून वहिनींनी स्वत:च्या जेवणाची आबाळ करायला सुरुवात केली. आपण सवाष्णपणे या जगाचा निरोप घ्यायचा,  असा त्यांचा मनोनिग्रहच होता जणू. दवाखान्यातून आल्यावर आण्णांची प्रकृती सुधारली. कारण वहिनी त्यांचे पथ्यपाणी नीट सांभाळत होत्या. वहिनींची प्रकृती मात्र खालावत गेली,  कारण त्यांनी आपल्या प्रकृतीची फारच हेळसांड केली. जुन्या संस्काराचा मनावर पगडा असलेल्या वहिनींनी अहेवपणी जाण्याचा नियतीशी जणू हट्टच धरला. आणि अखेर ती शर्यत जिंकली. त्या ८९ जुलैमध्ये कालवश झाल्या.

क्रमश: —-

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ ऋणानुबांधाच्या गाठी’ – भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

‘आण्णा, आज संध्याकाळी येताना आंबे घेऊन येते बरं का!’  पुष्पा घड्याळाचा पट्टा बांधून, टेबलावरची पर्स उचलत, पायात चपला सरकवता सरकवता म्हणाली. नकारार्थी मान हलवत हाताने आण्णांनी `नको’ अशी खूण केली. याचा अर्थ `आंबे नकोत’, असा नसतो. `तू एवढा त्रास घेऊ नकोस’, असा असतो. गेल्या पंध्रा-वीस वर्षांच्या परिचयाने, सहवासाने, त्यांच्या नकारामागील मतितार्थ पुष्पाला नेमका कळतो. ती म्हणते,

`आण्णा मला कसला आलाय त्रास? आज काही शाळा नाही. आज मी घरून निघेन आणि मंडईत उतरेन. आंबे आले असले, तर घेईन, आणि तिथेच कॉलनीची बस करीन.’

आण्णांनी `ठीक आहे.’ अशा अर्थाने मान हलवली. कुणाही अपरिचिताला वाटेल, की हा संवाद, जो एका बाजूने शाब्दिक आणि दुसर्‍या बाजूने खाणा-खुणांच्या सहाय्याने चाललाय,  तो बाप-लेकीतला,किंवा भावा-बहिणीत चालू असणार. किंवा निदान काका –पुतणी, मामा-भाची अशा अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्तींमध्ये चालू असणार. प्रत्यक्षात हा संवाद चालू असतो,  गुरु-शिष्यामध्ये.

कधी काळी गुरूच्या आश्रमात गुरूची सेवा करत विद्यार्थी विद्या संपादन करत असत, असं आपण सगळ्यांनी वाचलय. आज एकविसाव्या शतकात गुरुजनंविषयी अलिप्ततेने,  इतकेच नव्हे,  तर तुच्छतेने, हेटाळणीने बोललं जाणार्‍या जमान्यात, गुरूविषयीच्या कृतज्ञतेने त्याच्या शारीरिकदृष्ट्या आपत्काळात, मुलगी, बहीण, आई होऊन त्यांची सेवा करणारी उज्ज्वला ही जगावेगळीच म्हणायला हवी. विशेषत: आयुष्यात दु:ख, कष्टच वाट्याला आल्यानंतर, विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर, सुखाचे चार घास आता कुठे निवांतपणे खाण्याची शक्यता असताना आपला सुखाचा जीव सेवाव्रताच्या तप:साधनेत व्यतीत करणार्‍या  उज्ज्वलाबद्दल बोलावं तेवढं थोडंच!

आण्णांनी आपल्या आयुष्यातील ४७ वर्षे शिक्षण क्षेत्रात काढली. आण्णा म्हणजे गो. प्र. सोहोनी. पुण्यातील कॅम्प विभागातील कॅम्प एज्यु. सोसायटी व त्याच संस्थेच्या सर राजा धनराज गिरजी हायस्कूल या दोन शाळांमधून त्यांनी अध्यापन केले. दोन्ही शाळा तशा तळा- गाळातल्या म्हणाव्या आशा. या शाळांमधून त्यांनी जवळ जवळ 35 वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली. निवृत्तीनंतर 5 वर्षे फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांना बोलवण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विनंतीवरून सासवड येथे कंडेन्स कोर्ससाठी ते सासवडला गेले.  स्वत: उत्कृष्ट शिक्षक होते, पण उत्कृष्ट अध्यापन एवढीच त्यांची खासियत नव्हती. ते आदर्श शिक्षक होते. आपल्या विद्यार्थ्यांवर वर मुलाप्रमाणे प्रेम करणारे होते. सेवानिवृत्तीनंतर सरकारच्या विनंतीवरून त्यांनी सासवड येथील कस्तुरबा विद्यालयाचा कारभार पाच वर्षे सांभाळला. इथे बहुतेक सर्व विषयांचे अध्यापन ते करीत. मुख्याध्यापक आणि वसतिगृहाचे रेक्टर याही जबाबर्‍या त्यांच्यावर होत्या. रुढार्थाने आपल्याला परिचित असलेल्या शाळांसारखी ती शाळा नव्हती. शालांत परीक्षेपर्यंत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही,  अशा असहाय्य,  परित्यक्ता,  विधवा स्त्रियांसाठी सरकारने हा अभ्यासक्रम सुरू केला होता. शाळा कोणत्याही इयत्तेत सोडलेली असली,  तरी इथे दोन वर्षात दहावी-अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाई. आणि दुसर्‍या वर्षी शालांत परीक्षेला बसवलं जाई. अभ्यासक्रम,  पाठ्यपुस्तके,  प्रश्नपत्रिका अन्य शालेय विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच असत. विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सोय होती. विद्यार्थिनींच्या राहण्या-जेवण्याचा सारा खर्च सरकार करत असे. आण्णा सुपरिंटेंडेंट म्हणून काम पाहत असत. त्यांची सहकुटुंब राहण्याची सोयही तिथेच केलेली होती. आण्णा आणि वहिनींच्या रुपाने शाळेत शिक्षण घेणार्‍या  आणि वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनींना आई-वडलांचे छत्र लाभले होते. आर्थिक भार सरकारने उचलला असला, तरी मानसिक आधार,  उमेद,  उत्साह आण्णा-वहिनींनी त्या वेळच्या विद्यार्थिनींमधे वाटला.

—- क्रमश:

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी शाळा बोलतेय. ….! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ मी शाळा बोलतेय. ….! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

अवघ्या विश्वावरी काळ कठीण आला

करोनाने अवचित घातला घाला

निसर्ग झालाय मुक्त

परी माणूस झाला बंदिस्त

माझ्या नशिबी आला विजनवास

मला विद्यार्थ्यांच्या भेटीची आस !!

नमस्कार मंडळी ! मला ओळखलं ना ? अहो, मी शाळा बोलतेय.  हो ! तुमची, तुमच्या मुलांची, नातवंडांची शाळा.आत्ताच्या बंदीवासाने खूप आलाय कंटाळा. खरं सांगू का,

मुलं म्हणजे माझा प्राण,

मुलं म्हणजे माझ्या वास्तूची शान,

मुलं म्हणजे माझ्या जगण्याचे भान,

मुलं म्हणजे माझ्या अस्तित्वाचा मान !!

पण आता आम्ही एकमेकांना पारखे झालोय. कधी एकदा हे संकट दूर होतेय आणि कधी आम्ही भेटतोय असं झालंय मला.

अहो, माझी आणि मुलांची साथ-संगत कैक वर्षांपासूनची आहे. अगदी सुरूवातीला शाळा कोणाच्यातरी घरात, एखाद्या वाड्यात भरत असे. मुलांची वेगळी आणि मुलींची वेगळी शाळा होती.  कापडी पिशवीचे दप्तर, स्लेटची जडशीळ पाटी-पेन्सिल होती. शाळेचा ड्रेस एकदम साधा होता. मुली तर दोन वेण्या, साडी, दोन खांद्यावर पदर अशा वेषात असायच्या. काळाबरोबर राहणीमानात, वागण्या-बोलण्यात, जगण्यात अनेक बदल होत गेले. हळूहळू माझेही सगळे चित्र बदलत गेले.

मुला-मुलींची शाळा एकत्र झाली. भारी युनिफॉर्म, टाय-बूट आले. खेळांचे स्वरूप बदलले. आता वेगवेगळ्या स्पर्धा, परीक्षा यांची रेलचेल झाली आहे. स्नेहसंमेलनंही खूप छान आयोजली जातात. मुलांचे विविध कला-गुणदर्शन पाहून मला खूप आनंद होतो. यातूनच अनेक चांगले कलाकार पुढे नावारूपाला आले.

अनेक डॉक्टर, इंजिनीअर, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, व्यापारी, खेळाडू उदयाला आले. त्यांनी उत्तम करिअर केले. त्यांनी स्वतःबरोबरच माझेही नाव मोठे केले. मला यशस्वी, कीर्तीवंत बनविले.

स्पर्धा गाजवणाऱ्या मुलांचे वक्तृत्व, गायन ऐकून माझे कान तृप्त होतात. त्यांचे खेळ, चित्रकला, नाट्यकला, नृत्यकला कौशल्य पाहून माझे डोळे तृप्त होतात. मन आनंदाने भरून येते. मी त्यांना मनोमन शुभेच्छा देते, आशीर्वाद देते. माझी ही सगळी गुणवान लेकरे देशात-परदेशात खूप नाव कमावतात. यशस्वी होतात. पण मला विसरत नाहीत.

आता तंत्रज्ञान बदलले. ह्या नव्या “स्मार्ट” युगात हे सगळे एकमेकांपासून दुरावलेले जीव पुन्हा एकत्र आले. पुन्हा गळ्यात पडून हसले-रडले-बागडले. सर्वजण मिळून मला भेटायला आले. किती किती आनंद झाला म्हणून सांगू? ते मला कोणीही विसरत नाहीत, उलट मला आणखी समृद्ध करून जातात. मन खूप भरून येतं अशावेळी.

मी मनापासून माझ्या या लेकरांना आशीर्वाद देते. त्यांच्या यशाची, कीर्तीची कामना करते. माझं आणि त्यांचं भावविश्व खूप वेगळं आहे. सदैव एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे. ते असंच राहावं आणि माझी लेकरं सुखात, आनंदात रहावीत हीच मी देवाला प्रार्थना करते.

“देवा दयाघना, लवकर हे संकट दूर कर. माझ्या मुलांची आणि माझी भेट घडव. डोळ्यात प्राण आणून मी त्यांची वाट पहाते आहे. माझे सगळे वर्ग, माझी घंटा, प्रयोगशाळा,  कलादालन, खेळाचे मैदान मूक रुदन करते आहे. मुलांची वाट पहात आहे.लवकर हा काळ संपू दे आणि पुन्हा माझा सगळा परिसर हसता खेळता होऊ दे. मुलांचे हसणे,  ओरडणे, दंगा ऐकायला मी आसुसले आहे. आता सगळे पुर्ववत होऊ दे.”

 पुन्हा घणघणू दे माझी घंटा

 धावत येतील माझी लेकरे

 प्रार्थना घुमेल माझ्या दारी

 माझ्या वर्गांची उघडू दे दारे ||

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-2 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆  मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-2 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

बाबा हरहुन्नरी होते. ते चांगले लेखकही होते. त्यांची पत्रे वाचणे हा माझा एक हळवा अनुभव असायचा. कविताही करायचे. विशेष म्हणजे त्यांच्या कविता छंदोबद्ध,  शार्दूलविक्रीडित वृत्तात असायच्या. अप्रतिम अक्षर, मराठी आणि इंग्लिश पण. घोटीव, मोत्यासारखे. बघत रहावे असे. घडलेले प्रसंग, आयुष्यातला एखादा ह्दयस्पर्शी प्रसंग इतका छान वर्णन करून सांगायचे की आम्ही गुंग होऊन ऐकत रहायचो. ते एक उत्तम नाट्यकर्मी होते. त्याकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात देवमाणूस,  तुझे आहे तुजपाशी,  सारं कसं शांत शांत अशा अनेक नाटकातून त्यांनी कामे करून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट घेतला आहे. ते एक उत्तम हार्मोनियम वादक होते. तसेच नाट्यसंगीत ही त्यातल्या ताना आणि आलापांसह म्हणायचे. एकदा बाबा एक नाट्यगीत बाहेरच्या खोलीत म्हणत होते,  आतून आईला वाटले, रेडिओवर लागलंय, म्हणून आई म्हणाली “अहो, रेडिओ जरा मोठा करा..”

चित्रकला हा त्यांचा आणखी एक गुण. त्यांनी कोळशानी रेखाटलेलं रविंद्रनाथ टागोरांचे रेखाचित्र इतके हुबेहूब आहे कि टागोरांच्या चित्राच्या डोळ्यांतून व्यक्त होणारे वात्सल्यपूर्ण भाव अजूनही,  इतक्या वर्षांनी सुद्धा तसेच जाणवतात. राजूनं ते रेखाचित्र जपून ठेवले आहे.

आमची आजी, म्हणजे बाबांची आई गेली, तेव्हा सगळ्यांत लहान आत्या 2 वर्षाची होती. ती एकसारखी आई आई म्हणून रडत होती. तिला आई दाखवावी म्हणून या भावानं, आजीचा अंगठ्याच्या वरच्या पेराएवढा लहान फोटो होता,  त्यावरून पेन्सिलीने फोटो म्हणजे आजीचं चित्र काढलं. आईचं इतकं खरं आणि तंतोतंत रूप बघून सगळीच भावंडे आईला बघून रडू लागली. ही आठवण एकदा बाबांनीच सांगितली आहे. आजीचा तो एकच फोटो आमच्या घरात कोल्हापूर ला उज्वलनं, माझ्या भावानं जपून ठेवलाय.

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 13 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 13 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

प्रात्यक्षिक परीक्षेची माझी तयारी जोमाने सुरु होती.  माझी त्या  बद्दलची मनातली भीती ही पूर्ण निघून गेली. केव्हा एकदा परीक्षक येतात आणि माझी परीक्षा घेतात याची मला उत्सुकता लागून राहिली.

मनामध्ये लेखी परीक्षेची मात्र धाकधूक होतीच. आत्तापर्यंत पूर्ण दृष्टी गेल्यानंतर चौथी ते बीए पर्यंतच्या सगळ्या परीक्षा मी खालच्या वर्गातील लेखनिक अर्थात रायटरच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. आता मात्र एम ए या परीक्षेसाठी असणारा अभ्यास, हा वरच्या पातळीवरचा होता. त्यासाठी मला संदर्भग्रंथ ही वाचून घ्यावे लागणार होते. त्यासाठी रोज दुपारी गोखले काकून बरोबर तीन ते साडेचार पर्यंत जोरदार वाचन सुरू झाले होते. आमची खरी कसरत होती ती तत्त्वज्ञानाचे गाढे, जाडजूड पुस्तक वाचताना आणि ऐकताना. त्यामधली गूढ तत्वे, अवघड विचार बोजड नावे आणि त्यातल्या संकल्पना मधली जटिलता डोक्यात लवकर शिरू शकत नव्हती. आम्हाला हे जड जाते,  लवकर लक्षात येत नाही हे समजल्यावर आम्हा दोघींनाही हसू येत होते. पण नेटाने वाचन मात्र आम्ही सुरुच ठेवले. हा किचकट अभ्यास सुरू असताना अधेमधे कधी आई,  तर कधी बाबा आम्हाला वेलची घातलेला चहा, आल घातलेलं थंडगार लिंबू सरबत देऊन आम्हाला उत्साही करत असत. गोखले काकू जेव्हा वाचन करत असत, त्यावेळी मी माझ्या टेप रेकॉर्ड वर त्याच्या कॅसेट्स बनवून घेत असे आणि मला वेळ मिळाल्यावर ते ऐकून माझ्या मेंदूमध्ये मी सेव्ह करून ठेवत होते. असा सगळ्या विषयांचा माझा अभ्यास वेग घेत होता.

टी म वी म्हणजे ज्या विद्यापीठाचे परीक्षा देत होते त्यांचेही सहकार्य मला खूप लाभले होते. पेपर मध्ये प्रश्नांचा अंदाज येण्यासाठी, मी फोन करून आधीच्या परीक्षांचे पेपर्स मागवून घेत असे.  ते हि ते लगेच पाठवून देत. थोड्या वेळ झाला तरी माझा फोन लगेच गेलाच म्हणून समजा. त्यांनाही माझा आवाज ओळखीचा झाला होता. मी पूर्ण अंध असूनही स्वतः फोन करते याचे कौतुक वाटून ते मला त्वरित मदत करत असत.

प्रत्यक्ष परीक्षा देण्याकरता, मला रायटर ची जुळवाजुळव आधीच करून ठेवावी लागणार होती. मला लेखनिक असा हवा होता की त्याचे अक्षर चांगले असेल, जो मी  सांगितल्या सांगितल्या त्याच वेगाने भरभर लिहून काढेल. तो किंवा ती माझ्यापेक्षा वयाने आणि शिक्षणाने लहान असेल. परमेश्वर कृपेने श्रद्धा म्हस्कर नावाची मुलगी मला भेटली, माझी मैत्रीण झाली आणि तिने माझे पेपर्स, माझ्या मनाप्रमाणे उत्तम तऱ्हेने लिहून काढले. लेखी परीक्षा अशी कडक होती ज्यामध्ये मी आणि श्रद्धा हॉलमध्ये दोघीच असू आणि परीक्षक आमच्या मागेच बसलेले असत. मी सांगते ती प्रत्येक ओळ न् ओळ, शब्दन शब्द श्रद्धा लिहिते ना,  आणखी दुसरे काही वाचत तर नाही ना,  यावर त्यांची कडक नजर असे. अशा तऱ्हेने माझी.  प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा उत्तम रित्या पार पडली.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शेती भाती ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

 ☆ मनमंजुषेतून ☆ शेती भाती ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

आईचं वय झाले आहे. आता शेतीतील कामे होत नव्हती. गुडघे दुखत होतेच. तरी तिचे माळवे लावायचे वेड कमी होत नव्हते. गवार भेंडी, पावटा, मिरच्या, असं लावायची. माळवं निघायला लागले की सुनेच्या मागे पिरपिर , “तेवढ्या गवारीच्या शेंगा तोडून दे पोरांना.”

सुनेने बाकीची कामे सोडून गवारी तोडाव्यात. नाहीतर रोजाच्या बाईला घेऊन माळवं तोडून तालुक्याच्या गावाला पाठवावे. तिथं मुलं शिकायला एक कुटुंब ठेवलेले. शेती करणारा भाऊ म्हणायचा, ” होत नाहीतर कशाला अबदा करून घेतीस? त्यांना पावशेर शेंगा विकत घेणं होईना काय…”

रोजाची बाई लावून भाज्या तोडून पाठवणे त्याला पटत नव्हते आणि परवडत ही नव्हते. पण एवढी मोठी शेती आणि पोरांनी विकतच्या भाज्या खायचे हे आईला पटत नव्हते. ती कोंबड्या पाळायची. अंडी लागतात पोरांना म्हणून. स्वतःच्या गळ्यात माळ असली तरी गावात मटण पडले की घ्यायला लावायची. पाठवून द्यायची.शहरात काहीच चांगले मिळत नाही हा तिचा समज. दूधवाला तर एक ठरवूनच टाकलेला. घरचे दूध रोज पोरांकडे पोच व्हायचे.

कोवळी गवार लोखंडी तव्यावर परतलेली पाहून तिला लेकिंची आठवण यायची. चुलीत भाजलेली वांगी पाहून तिचे डोळे भरायचे. भाजलेली, उकडलेली मक्याची   कण सं पाहून जीव तीळ तीळ तुटायचा. हे सगळं पोरांना पोच व्हायलाच पाहिजे हा तिचा अट्टाहास असायचा.

मातीशी असलेलं हे नातं तिच्या आरपार रुजलेले आहे. बाई शेतीशी कशी एकरूप, एकजीव होते हे तिच्या वागण्या बोलण्यातून जाणवत राहते. तिला कुठल्याही पाटाचे पाणी पवित्र वाटते. तहान लागली की ती ते पाणी पिते. साचलेले असले तरी. ” त्याला काय व्हत?” हेच तिचे पालुपद. आणि तिला खरेच पाणी बादले आहे असं झाले नाही. ही तिची अतूट श्रद्धा,  वावरा शिवाराची एक ताणता जाणवत राहते. पायात चप्पल न घालता शेताच्या सरीतून, बांधातून फिरायचे काटा मोडण्याचे भय तिला कधीच वाटले नाही. शेतातून फिरणारे साप तिला राखणदार वाटतात. त्यांचीही भीती कधी वाटली नाही.

आता नुसतीच मोठी पिकं घेतात. जवसाची मुठ, तिळाची मुठ कुणी पेरत नाही म्हणून ती हळहळत असते. तिळाची पेंढी असली की तेवढीच बडवून, पाखडून गाडग्या  मडक्यात भरून ठेवायची.

कधीही माहेरी गेली की ती धडधाकट होती तेव्हा रानात कामे करायची, घरी राहायला लागल्यावर सतत काही तरी निवडणे, पाखडणे चालूच असायचे. कुठल्या ना कुठल्या मडक्यात महत्वाचे ठेवलेले काढून द्यायची. ती उतरंड च आता गायब आहे.

असेच कितीतरी बदल होत राहतील. काळा बरोबर हे होतच राहणार… रानाशिवाराशी एकजीव झालेलं हे जुनं खोड बदल न्याहाळीत राहते. नजर कमकुवत झाली आहे तेही बरेच आहे.

© सौ. सावित्री जगदाळे

१७/२/१९

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-2 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

☆ इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-2 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

दुसऱ्या दिवशी महाराज पिराजी मिस्त्रीला घेऊन आले. तेव्हा जखमेची पाहणी करुन पिराजी म्हणाला,”उरलेल्या दाताला जिथून दात्र्या पडल्या आहेत तेथून दात कापून टाकू.” महाराजांनी पिराजीच्या योजनेस संमती दिली. शस्त्रक्रियेसाठी हत्तीला सोनतळी कँपवर हलविण्यात आले. लोखंडही कापू शकतील आशा धारदार करवती पिराजीने आणल्या. मोतीला शांत ठेवण्याचे काम महाराजांनी अंबादास माहूताकडे सोपवले. मोतीचे पाय साखळदंडाने जखडून टाकले. हत्ती ठाणबंद झाला खरा पण सोंड मोकळीच होती. शस्त्रक्रियेसाठी जवळ जाणाऱ्याला तो सोंडेने उचलून फेकून देईल ही भीती होती. सोंड कशात तरी गुंतवून ठेवली पाहिजे यासाठी महाराजांनी एका नवीन साधनाचा शोध लावला. त्याचे तंत्र पिराजीस सांगितले व कुशल पिराजीने ते साधन तयार केले. “गळसाज” असे नाव देऊन ती साखळी हत्तीच्या गळ्यात घातली. लॉकेटप्रमाणे या साखळीत भक्कम काटेरी गोळा अडकविण्यात आला होता. हत्तीने हालचाल केली कि त्या गोळ्याचे अनकुचीदार काटे हत्तीच्या सोंडेला व पायाला टोचत. गोळ्याचे काटे टोचू नयेत म्हणून हत्ती साखळी सोंडेने उचलून धरी. अशाप्रकारे मोतीच्या सोंडेला गोळा उचलून धरण्याचे काम लागले !

अशाप्रकारे मोतीला ठाणबंद करुन पिराजी करवत घेऊन दात कापण्यासाठी मोतीच्या मानेखाली गेला. अंबादास हत्तीला गोंजारुन शांत ठेवू लागला पण पिराजीने दाताला करवत लावताच मोती बिथरला. हा माणूस आपल्याला इजा करणार असे वाटून तो पिराजीस पकडण्याचा प्रयत्न करु लागला. सोंड गुंतली असल्याने तो इकडेतिकडे झुकू लागला. त्यातूनही पिराजीने दाताला करवत लावली पण हत्तीने हिसडा दिल्यामुळे ती तुटली. तो दुसरी करवत लावणार तोच महाराज ओरडले, “पिराजी निघ बाहेर. मोती पायाखाली धरतोय तुला.” पिराजी पटकन हत्तीपासून दूर झाला. यानंतर हत्तीला झुलता येऊ नये म्हणून हत्तीच्या दोन्ही बाजूना बळकट दगडी भिंत बांधण्यात आली आणि पुन्हा एकदा शस्त्रक्रियेस सुरुवात झाली. आता मोतीला हालचाल करता येत नव्हती. पिराजीने दाताला करवत लावली. मोतीला राग आला व सोंडेला टोचणाऱ्या काट्यांची पर्वा न करता मस्तक फिरवू लागला.एकापाठोपाठ एक करवती मोडत होत्या. पिराजी आपल्या कामात मग्न होता. मोतीने दुसरीच युक्ती योजली. तो पुढचे पाय पुढे व मागचे पाय मागे पसरु लागला. त्याचे पोट खाली येत पिराजीला भिडले. पिराजी हत्तीखाली चेंगरणार तोच महाराजांनी पिराजीला ओढून बाहेर काढले.

महाराजांनी डाकवे मेस्त्रींना बोलावून दोन्ही बाजूंस हत्तीच्या पोटाला घासून भिंत बांधून घेतली. परत शस्त्रक्रिया सुरु झाली. मोतीला किंचितही हालता येईना. पाय पसरु लागताच पोट भिंतीला घासू लागले. त्यामुळे पायही पसरता येईनात. पिराजीने करवतीने काही दात्र्या कापल्या. हत्तीलाही कळून चुकले की हि माणसे आपल्याला इजा करणार नाहीत, तर आपल्या वेदना कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तोही समंजसपणे वागू लागला; मुळात मोती होताच समंजस ! हत्तीने सहकार्य करताच आठ दिवसांत पिराजीने खुबीदारपणे दात कापला. कापलेला दात तसाच राहू दिल्यास इन्फेक्शन होऊन हत्तीस इजा होईल म्हणून, एक चांदीचे टोपण तयार केले व दाताला भोके पाडून स्क्रूने आवळून गच्च बसविले. मोती यातनामुक्त झाला. शस्त्रक्रियेचा प्रयोग यशस्वी झाला. हा प्रयोग यशस्वी करणाऱ्या पिराजी मेस्त्री, डाकवे मेस्त्री व अंबादास माहूताला स्वतःच्या पंगतीला बसवून घेऊन महाराजांनी मेजवानी दिली.

मोतीने एक दात गमावला. त्याचबरोबर त्याच्या भोवती असलेले वैभवाचे वलयही विरुन गेले. अंबारीला, छबिना मिरवणुकीला आता तो घेतला जाणार नव्हता. हे शल्य अंबादास माहूताला बेचैन करत होते. मोतीला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले पाहिजे, ही महाराजांची उत्कट इच्छा होती. मोती होताच तसा विलोभनीय शरीरयष्टीचा व समंजस वृत्तीचा. एकदा महाराज मोतीजवळ उभे असता पिराजीला म्हणाले, “पिराजी, मोतीला दात बसवला पाहिजे. त्याशिवाय त्याला अंबारीसाठी घेता येणार नाही की मिरवणूकीसाठी बाहेर काढता येणार नाही.” तेव्हा पिराजी म्हणाला, ” बसवूया की महाराज. त्यात काय अवघड हाय ! भेंडीच्या लाकडाचा दात करतो. ते वजनाला हलकं, हत्तीच्या दाताच्या रंगाचं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला हिर नसतात. त्यामुळे दातासारखा दात करता येईल.” पिराजी कामाला लागला. अगदी तुटलेल्या दातासारखा हूबेहूब दात त्याने केला. त्याला पॉलिश केले. पाहणाऱ्याला तो खरा हस्तीदंत वाटायचा. हा लाकडी दात पिराजीने मोठ्या कौशल्याने चांदीच्या विळीच्या सहाय्याने मूळच्या दातास बेमालूम जोडला. दुसऱ्या दाताभोवतीही चांदीची विळी अडकवली. त्यामुळे पाहणाऱ्यास चांदीची विळी म्हणजे हत्तीचा अलंकार वाटे. दोन दातांचा डौलदार मोती पाहून महाराजांना अपरिमित आनंद झाला. अंबादास आनंदाने नाचू लागला आणि मोडक्या दाताच्या ठिकाणी आलेला दात पाहून मोतीसुद्धा आनंदित झाला. पुढे मोतीचा छबिना मिरवणुकीचा मानही अबाधित राहिला.

संग्राहक – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-2☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-2 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

दयानंदांनी वेदांचा अधिकार स्त्रियांना, शूद्रांना सर्वांनाच आहे, हे वेदांच्या सहाय्यानं समजावून दिलं.त्यामुळं घडलेली क्रांती मोठी होती.वेदच नव्हेत तर आधुनिक शिक्षणही स्त्रियांना देण्यात ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला, त्यांच्यावर दयानंदांच्या विचारांचा परिणाम होत होता किंवा त्यांना यामुळे अधिकृतपणे धर्माचा पाठिंबा मिळाला.स्त्रीशिक्षण,जातिनिरपेक्षता हे धर्माविरुद्ध आहे असं म्हणणाऱ्या सनातनी लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळालं.

आज व्यवसाय म्हणून पौरोहित्याचा मार्ग स्त्रियांना खुला झाला आहे यामागे दयानंदांचं खूप मोठं योगदान आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कधीच प्रसिद्ध न झालेला पैलू म्हणजे भारतात घड्याळाचा कारखाना काढता येईल का,यासाठी त्यांनी विचार व पत्रव्यवहार केला होता.आर्थिकदृष्ट्या देश स्वावलंबी असावा हा यामागचा विचार! अर्थात तो अयशस्वी झाला.

तरी भारत “राष्ट्र”म्हणून उदयाला यावा ही त्यांची धडपड होती.

परकीय आक्रमणाची टांगती तलवार डोक्यावर असणाऱ्या उत्तरेकडच्या प्रांतात विशेषतः पंजाब,हरियाणात आर्य समाज रुजला कारण मूर्तीपूजा,त्याचा थाटमाट,मंदिरांचे ऐश्वर्य यासाठी त्यांच्याकडे स्वस्थता आणि सुरक्षितता नव्हती.त्यामानाने स्वस्थ, सुरक्षित दक्षिणेकडील प्रांतात आर्य समाज रुजला नाही.पण आजही आर्य समाजाचं काम चालू आहे.

दयानंदांवर माउंट अबू इथे विषप्रयोग झाला.त्यांना वैद्यकीय मदत लवकर मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आली होती.तो कुणी केला, याबद्दल मतभेद आहेत.त्यांच्या कार्यामुळे हिंदू सनातनी, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मप्रसारक, ब्रिटिश सरकार, काही विलासी संस्थानिक या सर्वांच्याच हिताला बाधा येत होती.पण एक नक्की…..

भारतातील अनेक पुरोगामी,देशहितकारी विचारांवर दयानंदांच्या विचारांची छाया आहे.प्रगतीच्या शिडीतील ही एक विस्मरणात गेलेली महत्त्वाची पायरी आहे,हे विसरता येणार नाही.

© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

मो – 7499729209

(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-1 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-1  – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

ब-याच वर्षानंतर मनात बालपणीच्या आठवणी रुंजी घालू लागल्या. विचार केला लिहून काढू. लिहिता लिहिता सगळा खजिना हाताशी लागला. आठवणींनी शब्दांचं रूप घेतलं, ” खजिना”  खुल जा सिम सिम म्हणून अवतरला.

खजिना – 1

रात्रीची जेवणे झाली.  आई स्वयंपाक घरातली आवरा आवर करून येईपर्यंत आम्ही दुस-या दिवशीची दप्तरे भरून,  शाळेचे युनिफाॅर्म वगैरे ची तयारी करून अंथरूणे घालायचो. आणि मग आमच्या टिवल्या बावल्या चालायच्या. तोपर्यंत बाबा पण दुस-या दिवशीची कामाची तयारी करणे, डायरीत  हिशेब नोंद करणे अशी कामे आटोपून घ्यायचे.

आई आली की आम्ही आपापली अंथरूण पटकावायचो. पुढचा एक तास हा फक्त कथा श्रवणाचा असे. रोज रात्री बाबा पु.ल.देशपांडे,  द.मा.मिरासदार, शंकर पाटील  यांच्या कथा, व्यक्तीचित्रे वाचून दाखवत.

मुळात लेखक नावाजलेले,  लेखन दमदार, त्यात बाबांचं वाचन म्हणजे ऐकणा-याला निखळ आनंद मिळत असे. पु.लंची अनेक व्यक्तीचित्रे, गणगोत, व्यक्ती आणि वल्ली,  पूर्वरंग, अपूर्वाई अशी प्रवासवर्णने आम्ही बाबांच्या बरोबर स्वतः अनुभवली आहेत. शंकर पाटलांच्या ग्रामीण कथेतील उसाचा हिरवागार मळा, गार गोड पाण्याची विहीर, त्यावरची मोट, तिचा कुई कुई आवाज, पखालीतलं पाणी पाटात पडल्यावर वहाणारा खळाळता झरा, हे सर्व बाबांच्या अस्सल ग्रामीण वाचन शैलीतून अनुभवलं आहे.

वर्णनात्मक उतारे वाचताना ते कंटाळवाणं कधीच वाटत नसे.कारण वाचनाच्या चढ-उतारा तून प्रत्येक शब्द आणि वाक्य जिवंत होत असे. वाचताना मध्येच आलेले संवाद सुरू करण्यापूर्वी बाबा एक pause घ्यायचे. त्यामुळे नकळत संवादाची चाहूल लागायची. आणि गोष्टी ची लज्जत वाढायची. गोष्ट संपता संपता आम्ही चौघेही निद्रादेवी च्या पांघरूणात गुडुप झोपी गेलेलो असायचो.

अशा अनेक पुस्तकांचं सामूहिक वाचन आम्ही केले आहे. वाचनाचे संस्कार नकळत आमच्यात रुजले.  पुढे मुलांना गोष्ट वाचून दाखवताना ही आठवण झाली. आणि जाणवलं, माझंही वाचन बाबांसारखंच होतंय की.. त्यांच्या इतकं छान नाही जमत पण मला वाचताना आणि मुलांना ऐकताना आनंद मिळतोय, तो काय कमी आहे?

स्पष्ट उच्चार, ठणठणीत आवाज, शब्दांची अर्थपूर्ण  पेशकश,  पल्लेदार वाक्ये,  बोली भाषेतला गोडवा आणि हे सर्व सादर करणारी बाबांची रसाळ वाणी.

जिभेवर ओघवत्या सरस्वतीचं स्थान, डोळ्यात श्री गणेशाचे आश्वासक भान, प्रसंग आणि व्यक्तिरेखा सजीव करणारे बाबांचे वाचन या सर्वांचा मिलाफ म्हणजे आनंदाचे सुख- निधान!

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 12 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 12 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

माझी एम ए अभ्यासाची घोडदौड सुरु झाली, पण मला एंट्रन्स ची परीक्षा पास झाल्याशिवाय एम ए ला प्रवेश मिळणार नव्हता.. ताईंनी माझी कसून तयारी करून घेतली आणि मी एन्ट्रन्स ही पास झाले.माझ्या मनामध्ये संमिश्र प्रकारच्या भावना होत्या. एका बाजूला उत्सुकता आणि आनंद र दुसर्‍या बाजूला अभ्यासाची जबाबदारी.एकीकडे आई-बाबांच्या तब्येतीची खूपच काळजी लागून राहिली होती.तसं बघायला गेलं तर ताईंना आणि मला ना हे शिवधनुष्य पेलायचे होतं आणि आम्ही ते यशस्वीपणे पेललही !

नृत्याच्या सुरूवातीच्या दिवसातला आणि आत्ता चा अभ्यास,रियाज यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता.आता शारीरिक आणि मानसिक हालचालींच्या माध्यमांमधून प्रेक्षकांपर्यंत भावभावना पोहोचवायच्या होत्या.शारीरिक हालचाली म्हणजे अंग, प्रत्यांग आणि उपांग.अर्थात हात पाय मस्तक ही अंगे,हाताचे पंजे बोटे कोपरे खांदे ही प्रत्यां गेआणि डोळे डोळे पापण्या ओठ, नाक, हनुवटी ही उपांगे.यांच्या हलचाली मधून आणि आणि मनामध्ये उठणाऱ्या भावतरंग यांमधून अभिनय सहज आणि सोप्या माध्यमातून मला प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा होता.अर्थातच हे माझ्यासाठी खूप कठीण होते आणि त्यामध्ये मनाच्या एकाग्रतेची गरज होती.

नृत्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ताई मला स्पर्शाने मुद्रा शिकवत असत.त्याचे एक सांकेतिक भाषा ठरलेली असे. स्पर्शाने मुद्रा जाणून हे मी सहज आत्मसात केले होते आणि ती सवय माझ्या अंगवळणी पडली होती. आता मात्र मला नृत्यातल्या, अभिनयाचे कौशल्य, त्यातली खुबी अधिक सफाईदारपणे प्रेक्षकांच्या मनावर बिंबेलअशा पद्धतीने मांडायची होती आणि तीही संगीताचा आधार घेऊन.कारण नृत्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये एखादी शेजारी उभी असणारी व्यक्ती मला दोन हात बाजूला करून, नुसते बोट दाखवूनही दाखवता येत असे. पण आता मात्र या दोन्ही बरोबर मान आणि नजर त्या बाजूला चेहऱ्यावरील हावभाव सहित प्रेक्षकांना ती दाखवायची होती. माझ्या बाबतीत नजर हा मुद्दा नव्हताच मुळी. फोन मला परीक्षक आणि प्रेक्षक यांना ही गोष्ट अजिबात जाणवू न देता माझी कला, नृत्य सादर करायचे होते. त्यातही मी बाजी मारली.

माझ्या या अभ्यासाला मला सर्वात जास्त आवडलेली रचना म्हणजे अभिनयावर आधारित असलेले “कृष्णा  नी बेगनी बारू” (कन्नड – अर्थ – कृष्णा तू माझ्याकडे ये.) या रचनेमध्ये मला यशोदेच्या मनातील भाव, मातृत्वाच्या भावभावना, बालकृष्णाच्या अवखळ लीलाअभिनयातून रंगवायच्या होत्या. यात बालकृष्ण रुसलेला आहे आणि त्याला मनविण्यासाठी यशोदा माता कधी लोण्याचा गोळा दाखवते तर कधी झेंडू खेळायला बोलावते. तर बाल कृष्ण तिला आपल्या अवखळपणानी

सतावतो आणि शेवटी त्याच्याच मुखात तिला म्हणजे मातेला विश्वदर्शन ही घडवतो. या दोन्ही भावभावना वेगळेपणाने दाखवणे ही माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. मी ती नृत्यामध्ये रंगून जाऊन, तन मन अर्पून केली आणि त्या  अभिनयासाठी फक्त परिक्षकानीच नाही तर प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून दाद दिली.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print