मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदाचे डोही ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदाचे डोही ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

असं ऐकलं होत की अमरनाथ दर्शनाचे फळ काशीच्या दहा पट, प्रयागच्या त्रिवेणी संगमाच्या शंभरपट,आणि कुरुक्षेत्राच्या 1000 पट इतकं त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे अमरनाथला जाण्याबद्दल एक कुतूहल आणि जिज्ञासा होती. तीव्र इच्छा असली की योग जुळून येतो. आणि तसंच झालं.

ऑगस्ट 1999 सालची गोष्ट. रोटरी क्लबने अमरनाथ, काश्मीर, वैष्णोदेवी यात्रा आयोजित केली होती. 187 जणांची  टीम निघाली. जम्मूला पोहोचल्यानंतर दुसरे दिवशी आमच्या बस जम्मुहून  पहाटे चार वाजता निघाल्या. जम्मू ते पहेलगाम 300 कि.मी. चा चौदा तासांचा संपूर्ण घाटाचा प्रवास होता. मी खिडकीत बसून सुंदर मनोहर निसर्गाचे नेत्रसुख घेत होते. वाटेत रामवनला खाणे पिणे झाले. बनिहाल ला जम्मू आणि काश्मिर यांना जोडणारा तीन किमीचा जवाहर टनेल. या बोगद्यावर काश्मीर पोलीस, बी एस एफ, आणि आर्मी यांचा कडक पहारा होता.  रात्री सात ते सकाळी सहा बोगदा बंद. त्यामुळे लवकर पोहोचणे गरजेचे होते. वेळेत बोगदा पार केला. आणि समोर काय वा वा निसर्ग देवतेचे सुंदर हसरं गोजिरवाण लावण्य रूप, जन्नत का नजारा  असं काश्मीर दिसायला लागलं. डोळे दिपून गेले. झेलम च्या काठावर वसलेलं अनंतनाग, तेथील डोलणारी भात शेती, लपतछपत खळखळत वाहणारी अरु नदी साथ करत होती. जागोजागी तपासणी केंद्रातून पार पडावं लागत होत. पहेलगामला पोचायला संध्याकाळ झाली. नंतर प्रथम सामानाची विभागणी केली. फक्त एक पाठीची सॅक बरोबर घ्यायची होती. व दुसरी बॅग परस्पर श्रीनगरच्या हाऊस बोटीत जाणार होती. रात्री झोपायला प्रत्येकाला स्लीपिंग बॅग दिल्या. पण रात्रीच्या मुसळधार पावसाने त्या  गारठून गेल्या. थंडीने झोपतर नाहीच लागली. पण उद्याचं काय ? हे प्रश्नचिन्ह समोर उभं राहिलं. अमरनाथालाच आवाहन केलं. त्याने आमच्या हाकेला  ओ दिली. आणि सकाळी सूर्यनारायणाच दर्शन झालं. सर्वानी  त्याला हात जोडले. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पसरल. सूर्यनारायणाच्या साक्षीने छोट्या गाड्या मधून जाताना एकोणीस किमीचा अत्यंत अवघड आणि अरुंद घाट, लीडर नदीच रौद्र पात्र, भीषण खळाळणारा  फेसाळणारा दुधाळ  प्रवाह  पाहून जीव मुठीत घट्ट धरला होता. बहात्तरशे फूट उंची पासून  9 हजार पाचशे फूट उंचीवरील चंदन वाडी ला पोचलो. 50 ते 60 घरांचं इतकं छोटं गाव होतं ते. 15 ऑगस्ट चा दिवस होता.तिरंगा झेंडा फडकवला. आधाराची छडी घेतली. घोडे ठरवून निघालो. आता खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात झाली.

“पाऊले चालती अमरनाथ वाट, जिज्ञासे भरिले  मन  काठोकाठ.” अशा भारावून गेलेल्या मनाने पिसू घाटीचा चढ चढणे सुरू झाले. मान पूर्णपणे आकाशाकडे करून पाहिलं की डोंगराच्या टोकावरील माणसे छोट्या बाहुली पेक्षा लहान दिसायची. आता आपण तिथं कधी पोहोचणार, असं म्हणत तिथे पोहोचलो की पुन्हा तीच पुनरावृत्ती. असं कितीदा तरी व्हायला लागलं. उंच उंच चढण, वाकडेतिकडे दगड गोटे यातून वाट काढत, आमचे ओझे पाठीवर घेऊन बिचारे घोडे चालत होते. रस्ता संपत नव्हता. शंकराला भेटायला जाणाऱ्या देवांचे दान वांशी झालेले युद्ध आणि त्यात देवांनी दानवांना  मारुन टाकून, त्यांच्या वाकड्यातिकड्या हाडांचा झालेला  ढीग म्हणजेही पिसू घाटी असं म्हणतात. तीन किमी चढून, अकरा हजार पाचशे फूट उंच असलेल्या पिसू टॉप वर पोचलो. आणि एक अवघड टप्पा फार केला. आता पुढील टप्पा शेषनाग.

उंच, खोल वाकडीतिकडी अरुंद पायवाट, वळणे वळणे असे मार्गक्रमण चालू होते. घोड्यावर बसूनही प्रत्येक श्वास महत्त्वाचा वाटायला लागला. थोड्याच वेळात निळ्याशार पाण्याचे सुंदर शेषनाग सरोवर, त्यातून वहाणारी शेषनाग नदी आणि त्याच्या आरक्षणाला उभा असलेला शेषनाग पर्वत दिसायला लागला. देवांना त्रास देणाऱ्या वायुरूपी राक्षसाला,शेषनागाने पाताळातून येऊन, सहस्त्र मुखांनी वायु ग्रहण करून, त्याचा वध केला. तोच पर्वत शेषनाग म्हणून अमर झाला. पुढे निघालो आणि शेषनागचे पत्त्याच्या बंगल्यासारखे, आमच्या मुक्कामाचे तंबू दिसायला लागले. हुश्श वाटलं. चंदन वाडी ते शेषनाग बारा किमी अंतर करायला सहा ते सात तास लागले. माझ्यासारख्या  प्राणीप्रेमीला घोडे आणि त्यांना धरून चालणारे घोडेवाले, यांच्याबद्दल खूपच सहानुभूती वाटायला लागली.आमच्यापेक्षा तेच पुण्यवान आहेत असं वाटायला लागलं. रात्री लंगरमध्ये अगदी सात्विक, राजसिक, उत्तम जेवण होते. पण तोंडावर ताबा ठेवला होता. आरोग्य सुविधा, प्रचंड कडाक्याची थंडी, झोपायला तंबू, त्यावर एक टांगलेला कंदील, शांत एकाकी वाटणारा आसमंत, विरळ हवा, बाहेर प्राणी पक्षांचे आवाज नाहीत अशा वातावरणात झोप झाली. सकाळी उठून पुढील टप्पा पंचतरणी.

सकाळी शेषनाग ते पंचतरणी असा पुन्हा 12 किमीचा प्रवास सुरू झाला. खडतर म्हणावा असा. वळणावळणातून दरीच्या कडेकडेने, पाय वाटेने पावले वाटचाल करीत होती. जागोजागी जवान होते. हसतमुखाने त्यांच्या लंगर मध्ये “चहा तरी घ्या ” असा आग्रह करत होते. “जय जवान” “जय जवान”, म्हणून आम्ही त्यांना आदरणीय हाका मारत होतो. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून “ओम नमः शिवाय” ” बम बम भोले” ” जय जय भोले “, उच्चार तोंडून येत होते. सर्वजण उत्साहात दिसत होते. महागुनाजपास या सर्वोच्च उंचीवरील, 14800 फूट या ठिकाणी पोहोचलो. पुढे अर्धा कि.मी. वर  पाबीपाल  आणि थोडे पुढे पोषपत्रीला थोडी विश्रांती घेतली. सर्वत्र बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. मेंढीच्या दुधाचा बिन साखरेचा, काश्मिरी चहाची चव  चाखायला मिळाली. थोड्याच वेळात पंचतरणीच्या कॅम्पचे तंबू दिसायला लागले. पोषपत्री ते पंचतरणी अंतर पूर्णपणे दगडा दगडातून कापत १४८०० फुटावरून १२०००फूट उतारावर आलो. वाटेत तुषार उडवत वाहणारे झरे, -झुळझुळ वाहणारे थंडगार पाणी पाहून मन तृप्त होत होते. दुरूनच रुंदच्या रुंद  पंचतरणीच पात्र  दिसलं. खरंतर पाच नद्यांच्या संगमाने तयार झालेल्या नदीचे पात्र हे गोठलेलं ग्लेशियर असत. पण बर्फ वितळायला लागल्यामुळे पात्र ओलांडायला त्रास झाला नाही. रात्री उत्तम जेवणाचा आस्वाद घेतला. पंचतरणीच्या अंगाई गीताने निद्रा देवतेच्या अधीन झालो. आणि सकाळी तिच्याच  गाण्याच्या भूपाळीने जाग आली. आता पुढील सात कि.मी. चा अर्ध्या दिवसाचा टप्पा,

पंचतरणी ते अमरनाथ गुहा. असाच खडबडीत मार्ग. दोन तासात संत सिंग पहाडी आणि तसेच पुढे चार किमी पूर्ण गलेशियार. अमरगंगा नदी कधी समोर उभी ठाकायची, कधी डोंगराला ठोसा देऊन भगदाड पाडायची. मधूनच लपाछपी करायची. अवखळ मुलीसारखी, लांब उंच उड्या मारत नाच करायची. अमर गंगेची अशी रूप न्याहाळत गुहा कधी दिसायला लागली हे कळलंच नाही. गुहेच्या पायथ्यापासून चारशे पायऱ्या पायी चढून 13500 फुटावर जायचे होते. अमरनाथाच्या ओढीने तोही चढ कसा पार झाला लक्षातच आलं नाही. पहातो तो काय! महाकाय आणि प्रचंड बर्फाचं शिवलिंग! पूर्ण समर्पित होऊन हात जोडले. डोळ्यात कृतकृत्यतेचे  भाव आले. आणि आनंदाश्रू तरळले जायला लागले. आनंदाला शब्द नव्हते. देवदेवतांना मृत्यूपासून रक्षण करून त्यांच्यावरील प्रेमाने द्रवीभूत झालेल्या, रसमय शिवलिंगाचे, बाबा बर्फानीचे दर्शन हव  होत  ते मिळालं. शिवाने डोक्यावरून खाली घेऊन, पिळलेल्या चंद्रातून निघालेल्या अमृतधारेच -अमरगंगेच तीर्थ बरोबर घेतलं. वरती  फडफड आवाज आला. म्हणून पाहतो तो, दोन कबुतर शंकराला नृत्य समयी कुरकुर करणाऱ्या शिष्यांना, दिलेल्या शापाने झालेली ही ती कबूतर.काय खात पीत असतील कुणास ठाऊक !तेथेच असलेल्या बर्फमय पार्वती आणि गणेशाचं दर्शन घेऊन, तृप्त मनाने गुहेतून बाहेर पडलो.परतीचा रस्ता संगम टॉपला पोचलो. मोहम्मद अली आणि फारुख घोडेवाले यांना बक्षीस दिली. त्यांचे आभार मानले.घोड्यांच्या अंगावरून हात फिरवून निरोप घेतला.आता पुढील बालताल च्या वाटेला दुसरे घोडे ठरवले.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता.

मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अव्यक्त आत्मवृत्त ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ अव्यक्त आत्मवृत्त ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆ 

“कित्ती सुंदर दिसतोय ना हा? पहातच राहावंसं वाटतंय—” जरा लांबूनच हे वाक्य मला ऐकू आलं आणि नेहेमीसारखंच मी खुद्कन हसलो…. कारण मला बघणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून हेच वाक्य मी ऐकतो  आणि या वाक्याचा मला अजून तरी कंटाळा आलेला नाहीये. उलट ते ऐकतांना दरवेळी मला प्रचंड आनंद होतो. त्यांच्यापैकी कुणीच सहसा माझ्या जवळ येत  नसलं,  प्रेमाने मला कुरवाळत नसलं, तरी याची मला अगदी पहिल्यापासूनच सवय झाली आहे.  मोकळी आणि स्वच्छ हवा, आजूबाजूला प्रसन्न हिरवाई असणाऱ्या या सुंदर जागी मी माझ्या मनाचा राजा असतो.  मुळात मला एकटं असायला आवडतं—मग कुणाचंच कसलंच बंधन नसतं मला हुंदडायला. आसपास दोन-पाच भावंडं असतात बरेचदा– पण सगळे स्वतःतच गर्क– तसं शिकवलंच जातं आम्हाला लहानपणापासून– कुणाच्या पायात पाय अडकवायचे नाहीत. स्वतःचा आनंद स्वतः शोधायचा  आणि हीच माझी वृत्ती झालीये.  माझं कुणावाचूनही काहीही अडत नाही. आणि तशी आई सतत असतेच ना माझ्याबरोबर.  आईला ना, उन्हाळा अजिबातच सोसत नाही. थंडी सुरु झाली कीच तिला अशक्तपणा जाणवायला लागतो. आणि उन्हाळ्यात ती खूपच हडकुळी दिसायला लागते. बरं आजारी आहे म्हणून ती माहेरीही जाऊ शकत नाही. कारण ते खूप खूप लांब आहे म्हणे. एकदा माहेरघर सोडलं, की पुन्हा कधीच ती तिथे जाऊ शकणार नाही,  इतकं लांब–म्हणजे असं तीच म्हणते.

माझे वडील म्हणजे खूप मोठा माणूस आहे म्हणे पण तेही खूप लांब रहातात. मी तर अजून पाहिलेलंही नाही त्यांना. पण त्यांचं सतत आईकडे, तिच्या प्रकृतीकडे लक्ष असतं म्हणे. ती रोडावलेली दिसताच ते काहीही करून तिच्यासाठी औषध पाठवतात.– ते नुसतं पाहिलं तरी बरं वाटायला लागतं तिला आणि ते औषध घेताच ती एकदम ठणठणीत बरी  होते–. बाबांची खूप आठवण यायला लागते तिला  आणि त्यांच्याकडे जायचं म्हणून लगबग-धावपळच सुरु होते तिची — मग काय, आम्हा भावंडांची चंगळ सुरु होते. अशावेळी आम्ही कुठे किती हुंदडतो याकडे ती लक्षही देत नाही आधी सहा-आठ महिने आम्ही शहाण्यासारखे वागलेलो असतो,  घराबाहेर पळण्याचा हट्ट करत नाही,  म्हणून असेल बहुतेक–

तसं आमचं कुटुंब–म्हणजे आजोळचं कुटुंब खूप मोठं आहे. मला कित्तीतरी मावश्या आहेत–माम्या आहेत,  त्यामुळे मला भावंडेही खूपच आहेत… आणि चुलत-मावस-मामे-आत्ये असे किती आजोबा असतील, ते मोजण्याच्या फंदात मी पडतच नाही कधी. कारण ते सगळेजण जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत म्हणे आणि आमच्यातला सर्वात मोठा भाऊ अमेरिकेत आहे-आफ्रिकेत आहे- की आणि कुठे,  हे एकाही नातेवाईकाला नेमकं सांगता येत नाही, याचं आश्चर्यच वाटतं मला. पण आम्हा भावंडातला प्रत्येकजणच अगदी देखणा, प्रसन्न, कुणालाही आवडावा असाच आहे,  असं आई सांगत असते. पहाताक्षणीच कुणीही प्रेमातच पडतो म्हणे त्याच्या. मला तर खात्री आहे की तुम्ही माझा एक तरी भाऊ कुठे ना कुठे बागडतांना नक्कीच पाहिला असेल—तो लहान असो, मोठा असो–बघत रहावा इतका देखणा असतोच असतो.

काय? अजून पाहिला नाहीत? नक्की?–   कमाल आहे खरंच तुमची— मग एक काम करा–  तुमच्या त्या सिमेंटच्या खुराड्यातून बाहेर पडा—गावाच्याही बाहेर पडा—डोंगर-दऱ्यात जा. आमच्यापैकी कुणी ना कुणी भेटेलच  आणि तुमची चक्कर वाया जायला नको असेल, तर मग पावसाळ्यातच जा.  आम्हाला सगळ्यांनाच पावसाळा आवडतो,  त्यामुळे अशा ठिकाणी आमच्यापैकी कुणीतरी तिथे पावसात भिजत मनसोक्त हुंदडतांना— अवखळपणे बिनधास्त धडाधडा उडया मारतांना दिसेलच नक्की तुम्हाला  आणि खात्रीने सांगतो, रेनकोट- छत्री टाकून देऊन तुम्हीही तो आनंद हमखास अनुभवाल.——- विचारत-विचारत यावं लागेल म्हणता? अहो, माझं नुसतं नाव सांगितलंत तरी जवळपासचं कुणीही सांगेल तुम्हाला—- काय?—माझं नाव काय सांगायचं?  आता हद्द झाली तुमच्यापुढे— अहो मी धबधबा—डोळ्यावरची झापडं काढलीत ना,  तर पावसाळ्यात डोंगर-दऱ्यात ,आमच्यापैकी कुणीतरी नक्कीच भेटेल  तुम्हाला–आणि नावात काय आहे? तुम्हाला हवं ते नाव देऊन टाका की. —मग येताय ना? वाट पहातो –

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 11 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 11 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

माझा भरत नाट्यम् च्या नृत्यातील एम.ए. चा अभ्यास सुरु झाला. ताईनी मला नृत्यातील एक एक धडे द्यायला सुरवात केली. एम. ए.. करताना मला ज्या ज्या अडचणी आल्या.,  त्याचे वर्णन करताना.,  त्या आठवताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो आणि आधीच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आल्या त्याचे काहीच वाटेनासे होते. कारण एम.ए. सारखी उच्चपदवी मिळविण्यासाठी अखंड परिश्रम.,  मेहनत आणि मुख्य म्हणजे एकाग्रता यांची अत्यंत गरज असते. त्यावेळी माझा हा अवघड अभ्यास सुरु असताना माझ्या आई बाबांच्या वृद्धापकाळामुळे.,  वयोमाना प्रमाणे खालावणारी प्रकृति.,  त्यांच्या तब्येतीत होणारे चढउतार यामुने मी खूप अस्वस्थ आणि अस्थिर होऊन गेले होते.

त्यावेळी माझ्या भावाने मिरज – सांगलीच्या मध्यावर असणाऱ्या विजयनगर या भागामध्ये घर बांधले होते. त्याचवेळी माझ्या आईच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे आम्हा तिघांनाही तो तिकडे घेऊन गेला होता. पण माझा नृत्याचा क्लास मिरजेत असल्यामुळे मला तिकडून ये- जा करावी लागत असे. शक्यतो माझा भाऊ मला कार मधून सोडत असे पण ज्यावेळी कामामध्ये तो व्यस्त असे त्यावेळी बाबा वडाप रिक्षाने मला सोडत असत. नेमका त्याच वेळी बाबांचा पार्किसन्स चा विकार विकोपाला गेला होता. पण मी एम.ए. करावे ही त्यांची जबरदस्त इच्छा होती. त्यामुळे कोणत्याही अडचणीना आम्ही कोणीच दाद देत नव्हतो.

वडाप रिक्षाची वाट पाहात आम्ही जेव्हा उभे असू त्यावेळी आम्हाला बरेचदा रहदारीचा रस्ता क्रॉस करून जावे लागत असे.त्या रस्त्यावरून दोन्ही बाजूंनी भरधाव धावणाऱ्या गाड्या सुसाट धावत असत.त्यामुळे आम्ही ही जीव एकवटून रस्ता ओलांडत असू.त्यावेळी मला बाबांच्या हाताची थरथर जाणवत होती आणि चालताना ही त्यांना होणारे परिश्रम समजून येत होते.पण ते कोणतीही तक्रार न करता माझ्यासाठी भर दुपारी येत होते.त्यांच्या जिद्दीचे पाठबळ होते म्हणूनच तर सगळे जमू शकले.

नृत्याच्या प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन सुरू झाले होते.पण आता प्रश्न होता तो थिअरी चा.एम ए च्या अभ्यासासाठी., भारतीय नृत्यांच्या अभ्यासाबरोबर तत्त्वज्ञान या सारखा किचकट विषय होता.अशा एकूण प्रत्येक वर्षी चार पेपर्स चा अभ्यास मला करायचा होता.आता मोठा प्रश्न होता तो वाचनाचा.मला., मी अंदमानला जाऊन आल्यावर., ज्यांनी माझी मुलाखत घेतली होती., त्या सौ अंजली  ताई गोखले यांची आठवण झाली.आणि मी त्यांना  फोन केला.त्यांनी मला वाचून दाखवायला सहज आनंदाने होकार दिला.अशारितीने माझा तोही प्रश्न सुटला.ताईंनी त्यांच्या एमएच्या काही नोट्स मला वाचण्यासाठी दिल्या होत्या.त्याव्यतिरिक्त खरे मंदिर वाचनालय यामधून संदर्भग्रंथ आम्ही मिळवले होते.अशा तऱ्हेने एम एच या अभ्यासाचे रुटीन छान बसले.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भूदान चळवळ…. ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

स्व विनायक नरहरी भावे ( आचार्य विनोबा भावे)

Vinobabhaveji.jpg

(जन्म –  11 सितम्बर 1895 मृत्यु – 15 नवम्बर 1982)

☆ मनमंजुषेतून ☆ भूदान चळवळ…. ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

प.पू. आचार्य विनोबा भावे व भूदान पदयात्रा

प.पू. विनोबा भावे यांचे कार्य हे एखाद्या संताप्रमाणे दीपस्तंभासारखे आहे. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी निःस्वार्थी सेवेची शपथ घेतली. आध्यात्मिक सत्य व नित्य व्यवहारातील  कर्मे व कर्तव्ये यांचा सुंदर संगम असलेल्या महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाने ते प्रभावित झाले. क्रियाशून्य व सुस्त अशा कमजोर समाजात नवचैतन्य आणणे व सत्य,  अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे या गांधीजींच्या कार्याबद्धल विनोबाजींनी एके ठिकाणी म्हटले आहे,  ” महात्मा गांधींच्या रूपात मी हिमालयातील शांती व क्रांतीकारी शक्ती  अनुभवली. शांतीद्वारे क्रांती आणि क्रांती द्वारे शांती रा दोन्हींचा मिलाफ मी त्यांच्याकडे पाहिला.”  तर महात्मा गांधीनी विनोबाजींच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात ते.म्हणतात,  ” इतक्या कोवळ्या वयात विनोबांनी जी आध्यात्मिक पातळी गाठली आहे,  ती उंची गाठण्यासाठी मला परिश्रम व सहनशक्ती ची पराकाष्ठा करून आयुष्यातली अनेक वर्षे खर्ची घालावी लागली आहेत.”

अशी ही गुरूशिष्याची जोडी.  1940 साली अहिंसक मार्गाने चळवळ करण्यासाठी महात्मा गांधीनी पहिला सत्याग्रही म्हणून विनोबाजींची निवड केली

सत्य,  अहिंसा व प्रेमाची विश्व व्यापक शक्ती या मूल्यांवर असलेला ठाम विश्वास,  या तत्वांशी असलेली वचनबध्दता  या गुणांमुळे त्यांचे संतस्वरूप निश्चितच वेगळे होते.  मनाचे आंतरिक सौंदर्य म्हणजे विचार  व बाह्य सौंदर्य म्हणजे आचरण यांचा अलौकिक परिपोष म्हणजे पू. विनोबाजींचे जीवन.

स्वातंत्र्यानंतरही पूर्वापार चालत आलेली भारतीय भूमि समस्या कायमच होती. जमीनदार आणि भूमिहीन यांच्यात प्रचंड आर्थिक दरी होती.तेलंगणामध्ये समानता आणण्याच्या कव्पनेने कम्युनिस्टांनी हिंसक मार्गाने चळवळ उभी केली होती. शासन कायद्याने त्याचा प्रतिबंध करू पहात होते. ‘ कत्ल किंवा कानून’ हे मार्ग भूमि समस्या सोडविण्यासाठी उपायकारक ठरणार नाहीत. त्यासाठी करूणेचा शाश्वत मार्ग शोधावा लागेल असे आचार्य विनोबांचे चिंतन होते.  त्यातून भूमीदान यज्ञाचा प्रारंभ झाला.

जगात विनोबाजींचे भूदान कार्य इतिहासात अभूतपूर्व मानलं जातं.  विनोबाजींनी भारतभर पदयात्रा केली.

श्रीमंत जमीनदारांनी आपल्या जमिनीला काही भाग भूमिहीनांना स्वेच्छेने दान करणे हे भूदान चळवळी चे मुख्य आणि एकमेव ध्येय होते. अशा मिळालेल्या जमिनी भूमिहीनांना वास्तव्यासाठी व पीक उत्पादनासाठी वापरून त्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका करावी हा हेतू होता. अशाप्रकारे कष्टकरी वर्ग गाव सोडून रोजीरोटीसाठी इकडेतिकडे न जाता गावातच रहावा व त्यांच्या कामाची मदत धनवान शेतक-यांना व जमीनदारांना व्हावी, तसेच मोबदल्यात मिळालेलं धन गरीब शेतक-याना मिळावे व अशा रितीने गावातील धन गावातच रहावे हा उद्देश.  अशी दानात मिळालेली जमीन विकता येत नसे. जमीनदारांनी आपल्या जमिनीचा तुकडा आपल्याच भूमिहीन बांधवांना दान करावा,  म्हणून ही भूदान चळवळ.

चित्र साभार >> – विनोबा भावे – विकिपीडिया (wikipedia.org)

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ते” होते म्हणून ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ “ते” होते म्हणून ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

आई म्हणायची, “आण्णा कर्वे, म. फुले आगरकर होते, न्या. रानडे होते म्हणून तू आणि मी इतकं छान जगतो आहोत. नाहीतर स्वयंपाकघर आणि माजघरापलिकडे जग नसतं आपलं.” हे आठवलं की अनेक नावं आठवतात आणि “ते होते म्हणून” असं त्यांच्याबद्दल म्हणावंसं वाटतं.

त्यापैकी एक स्वामी दयानंद सरस्वती.

आर्य समाजाचे संस्थापक. शाळेत असताना दयानंद सरस्वती हा एक मार्काचा प्रश्न असायचा. दयानंद सरस्वती आणि आर्य समाज ही जोडी जुळलेली की झालं! तिसरीत असताना शंकराच्या पिंडीवर नाचणारा उंदीर बघून त्यांचा मूर्तीपूजेवरचा विश्वास कसा उडाला, हा धडा होता. तो शिकवताना माझा मूर्तीपूजेवरचा विश्वास बिलकुल उडू नये आणि त्याचवेळी दयानंदांबद्दल आदर मनात राहील याची काळजी घरी वडिलांनी घेतली होती. पुढे पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमधे दयानंदांवर संशोधन केलं गेलं आणि या व्यक्तिमत्वानं मी भारून गेले.

गुजरातमध्ये ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या दयानंदांचा मूर्तीपूजेवरचा विश्वास उडाला आणि खऱ्या ईश्वराच्या शोधात ते घरातून बाहेर पडले. अत्यंत ज्ञानी संन्यासी गुरुंकडून त्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला.

त्या काळी मॅक्समुल्लर या जर्मन पंडिताने ५०वर्षांच्या कष्टाने प्रथम ऋग्वेदाची लिखित प्रत बनवली होती. त्यांना या संस्कृतीबद्दल आदर होता. पण पूर्ण ज्ञान नव्हतं. पाणिनीच्या व्याकरणाचे नियम लावून त्यांनी वेदांचा अर्थ लावला आणि त्यांना “मेंढपाळांची गाणी” म्हटलं. काही हिंदू पंडितांनीही वेदांचा चमत्कारिक अर्थ लावला होता. पण मुळात वेदांचा व्याकरण वेगळं आहे. त्याला “निरुक्त” म्हणतात. त्याच्या आधाराने वेदांचा अर्थ लावून त्यातील उदात्त,  विश्ववंद्य विचारांची ओळख दयानंदांनी समाजाला करून दिली आणि वेदांना प्रतिष्ठा मिळवून दिली. ही त्या काळाची गरज होती. कारण ख्रिश्चनांच्या सुटसुटीत, फारशी कर्मकांड नसलेला,  भेदभाव विरहित धर्म लोकांना आवडू लागला होता. मुस्लिमांचा एकेश्वरवाद आणि मूर्तीपूजा न मानणं पटू लागलं होतं. हिंदू लोक मोठ्या प्रमाणात धर्मांतर करीत होते. ‌याचे दोन परिणाम झाले असते.

एक… राजकीय! ख्रिश्चन धर्म आवडला की ब्रिटिशांची गुलामगिरी जाचण्याचं कारण नाही. पारतंत्र्य, आपल्यावरचा अन्याय, देशाची आर्थिक लूट. . काहीच झालं नसतं. “राष्ट्र” म्हणून आपण संपलो असतो. पूर्ण राजस्थानात इस्लाम धर्माची छाया होती. तिथल्या आदिवासी जमातीत आपल्या मुली मुस्लिमांना द्यायची प्रथा होती. ही प्रथा दयानंदांमुळे बंद झाली. अन्यथा फाळणीच्या वेळी राजस्थान पाकिस्तानात गेला असता.

दुसरं म्हणजे… एक पूर्ण विचारधाराच नष्ट झाली असती. वेदांमधील भूमिती, शून्याचा शोध,  विज्ञान, पशुविज्ञान,  वृक्षायुर्वेद,  आयुर्वेद,  राज्यशास्त्र,  समाजशास्त्र, काव्य,  जीवनविषयक तत्त्वज्ञान.. जे पूर्ण सृष्टीतील चैतन्याचा शोध घेतं… फक्त मूर्ती रुपातील देवतेचा नाही.. हे सगळं कालौघात विसरलं असतं. म्हणून हिंदू धर्मात मुळात एकेश्वरवाद आहे, मूर्तीपूजेचं अवडंबर नाही. जातिव्यवस्था नाही, तर गुणांनुसार व्यवसायाच्या संधी आहेत (aptitude नुसार…) हे सारं दयानंदांनी पटवून दिलं आणि वेदांचा व धर्माचा ऱ्हास थांबवला. त्यांनी या व्यतिरिक्त खूप कामं केली. त्यांच्याबद्दल पुढच्या लेखात!!

 

© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

मो – 7499729209

(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ 2020 – 2021 – हरवलं….गवसल…. ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆2020 – 2021 – हरवलं….गवसल…. ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

2020….. या वर्षी हरवले: 

खूप जवळची माणसे, मनःशांती,  मुक्त वावर, मंदिरातून देवदर्शन,  प्रवास, भेटीगाठी, असं खूप खूप..

हाती राहिलं:

भीती, सावधपणा, अलिप्तता,  उदासी.

हरवलेलं मिळालं:

  • -स्वच्छतेचे, आत्मनिर्भरतेचे आणि कुटुंब व्यवस्थेवर ठाम उभ्या असलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीचे आचारविचारांचे संस्कार.
  • आपल्यातलेच  हरवलेले, विसरलेले, दुर्लक्षित केलेले कलागुण .

नवीन मिळालं:

विश्वासाठी प्रार्थना करण्याची इच्छा, रक्ताच्या एका थेंबाची किंमत, एका श्वासाची किंमत, आणि आपल्या माणसाच्या अस्तित्वाची किंमत आणि अनमोल असा ई-अभिव्यक्ती चा सहवास.

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.  संपादक मंडळाचे आभार.

सर्व लेखक- लेखिका, कवी- कवयित्री ना 2021 च्या शुभेच्छा!

2021 सर्वांना मनसोक्त लेखनाचे, आनंदाचे, आरोग्याचे व सुरक्षिततेचे असो.  हीच सदिच्छा!!

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रकाश ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ मनमंजुषेतून ☆ प्रकाश ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

प्रकाश हा अखंड उर्जास्त्रोत आहे. चैतन्याचा झरा आहे. ज्ञानाचा दीपक आहे. आपल्या सभोवतीचा प्रकाश हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे त्याचे वेगळे अस्तित्व जाणवतही नाही.

आपल्याला सहसा अंधाराचा सामना करायची वेळच येत नाही. त्यामुळे संध्याकाळी प्रकाश कमी झाला की आपण उदास होतो. ती वेळ ‘कातरवेळ’ असते. तसेच ढगाने सूर्य झाकला गेला की अंधारते. आपण बेचैन होतो. मळभ दाटून आले म्हणतो. त्यामुळे पूर्ण अंधाराची आपण कल्पनाच करू शकत नाही.

आम्ही दोघे पती-पत्नी १३-१४ वर्षे एका नेत्रपेढीसाठी ‘नेत्रमित्र’ म्हणून काम करत होतो. त्यावेळी अंधत्वाचे विविध पैलू लक्षात आले. दृष्टिदान संकल्पने विषयी अज्ञान, गैरसमज, अपुरी माहिती या गोष्टी विशेषत्वाने लक्षात आल्या. पण प्रकाशाचे महत्त्व जास्ती लक्षात आले ते एका खास कार्यक्रमात‌.

एका वर्षी जागतिक दृष्टिदान दिवसाच्या निमित्ताने नेत्रदानातून दृष्टीलाभ झालेल्या तीन जणांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली.

त्यांना समक्ष भेटल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंदच त्यांच्या भावना सांगत होता. एक वीस-बावीस वर्षांची विवाहित मुलगी स्वतःच्या मुलाला डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येते हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे हे सांगताना रडू आवरू शकत नव्हती. एक पन्नाशीच्या बाई आणि ६५ वर्षांचे आजोबा हे खूप भारावले होते. घरातली स्वतःची कामे स्वतः करणे, स्वयंपाक करणे, एकटे फिरायला जाणे, बाजारहाट, बँकेतली कामं या सर्व गरजेच्या गोष्टी स्वतः करताना मिळणारा आनंद शब्दांबरोबर त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. आपल्या दृष्टीने किती क्षुल्लक कामे, पण त्यासाठी त्यांना परावलंबित्व आले होते. थोडक्यात निरुपयोगीपणाची अगतिक भावना त्यांच्या मनातून आता दूर झाली होती.

त्यांच्याबरोबर आम्हा सर्वांना पण समाधानाचा आनंद मिळाला होता आणि मन वेगळ्याच प्रकाशाने भरून गेले होते. आम्ही आमच्या कुटुंबातील पाच जणांचे नेत्रदान करवून त्यांच्या जगण्याची सफल सांगता करताना या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे आणि अमूल्य समाधानाचे वाटेकरी झालो आहोत.

आपले आयुष्य आनंदात घालवल्यानंतर आपल्या पश्चात आयुष्याचे  सार्थक करण्याचा नेत्रदान हा अतिशय महत्त्वाचा सोपा उपाय आहे. त्यामुळे दोन अंधांची आयुष्य प्रकाशमान होतात. त्यासाठी नेत्रदाना बाबत जागरूक असायला हवे. आपण तर नेत्रदानाचा संकल्प करायचाच पण जवळपास, ओळखीत कुणाचा मृत्यू झाला तर अगदी शांतपणे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना नेत्रदाना विषयी सुचवायचे. कारण दु:खामुळे त्या व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येईलच असे नाही. तेव्हा अशी जागृती करीत प्रत्येक जण नेत्रमित्र बनू शकतो.

आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. त्याचा आनंदाने उपभोग घेतला. आपल्या पश्चात या छोट्या कृतीने आपण आनंद वाटू शकतो. मग काय हरकत आहे. हीच आपल्या माणुसपणाची जाणीव जागृती आहे.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ || देवत्व || ☆ सुश्री मनीषा कुलकर्णी

☆ मनमंजुषेतून ☆ || देवत्व || ☆ सुश्री मनीषा कुलकर्णी ☆ 

? || देवत्व || ?

 दिव्यत्वाची जेथ प्रचिती | तेथे कर माझे जुळती ||

१९४७ मधली गोष्ट..! डाॅ .आर्. एच्. कुलकर्णी नामक २२ वर्षाच्या तरूणाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या चंदगढ़ गावी दवाखान्यात नोकरी मिळाली. दवाखान्यात तुरळक पेशंटस् असायचे…!

तो जुलै महिना होता. रात्री तुफान पाऊस पडत होता. डॉक्टरांचा दरवाजा कोणीतरी जोरजोराने वाजवत होतं. बाहेर दोन गाड्या घोंगडी पांघरलेली, हातात लाठ्या-काठ्या घेतलेली सात-आठ माणसं उभी होती.. काही कळायच्या आतच त्यांना गाडीत ढकलण्यात आलं. सुमारे दीड एक तासाच्या प्रवासानंतर गाडी थांबली. काळाकुट्ट अंधार..! लाठीधार्‍यांनी डाॅक्टरना एका खोलीत ढकललं. खोलीत एक चिमणी मिणमिणत होती. खाटेवर एक तरुण मुलगी.. बाजूला एक म्हातारी स्त्री बसली होती…!

डाॅक्टरांना तिचं बाळंतपण करण्यासाठी फर्मावण्यात आलं. ती मुलगी म्हणाली, “डाॅक्टर.. मला जगायचं नाही. माझे पिताजी खूप श्रीमंत जमिनदार आहेत. मी मुलगी असल्यामुळे मला शाळेत पाठवलं नाही. घरी शिकवायला एक शिक्षक ठेवला. मला या नरकात ढकलून तो पळून गेला. गावाच्या बाहेर या घरात या दाईबरोबर मला गुपचूप ठेवण्यात आलं आहे.. त्या मुलीनं एका कन्येला जन्म दिला पण बाळ रडलं नाही. ती म्हणाली, “मुलगीच आहे नां.. मरू दे तिला माझ्यासारखे भोग तीच्या नशिबी येतील…!”

डाॅक्टरांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा वापर करून बाळाला रडायला लावले. डाॅक्टर बाहेर येताच त्यांना १००रु. देण्यात आले.. त्याकाळी ही रक्कम मोठी होती. आपलं सामान घेण्याच्या निमित्ताने डाॅक्टर खोलीत आले.. त्या मुलीच्या हातावर शंभराची नोट ठेवत म्हणाले, ” आक्का.. आपल्या किंवा मुलीच्या जीवाचं बरंवाईट करून घेऊ नको. संधि मिळेल तेव्हा पुण्याच्या नर्सिंग काॅलेजला जा. आपटे नावाच्या माझ्या मित्राला डाॅ. आर्. एच्. कुलकर्णींनी पाठवलंय असं सांग.. ते तुला नक्की मदत करतील. ही भावाची विनंती समज…! ”

पुढे डॉक्टरांनी स्त्री-प्रसूती विषयात विशेष प्राविण्य मिळवले. अनेक वर्षांनंतर औरंगाबादला एका काँन्फरन्स्ला ते गेले असता अत्यंत उत्साही आणि तडफदार अशा डाॅ.चंद्राच्या भाषणानी ते खूप प्रभावित झाले.. डाॅक्टर चंद्राशी बोलत असताना कोणीतरी त्यांना अदबीने ” डाॅ.आर्.एच्.कुलकर्णी सर.. “अशी हाक मारली.. हे ऐकताच डाॅ. चंद्रानं चमकून डॉक्टरांकडे पाहिलं आणि म्हणाली, “सर.. तुम्ही कधी चंदगढ़ला होता कां..?” “हो.. पण बरीच वर्ष झाली या गोष्टीला बेटा..”

डोळ्यांत टचकन् पाणी आलं.. स्वतःला सावरत ती म्हणाली, ” तर मग तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल…!”

” डाॅ.चंद्रा.. मी तुला आज पहिल्यांदाच बघतोय.. तुझं भाषण खूप आवडलं म्हणून तुझं कौतुक करायला भेटलो.. असं अचानक घरी यायचं म्हणजे..” “सर please…” “आई.. बघितलंस काम कोण आलंय ते..?”

डाॅ. चंद्राच्या आईने क्षणभरंच पाहिलं आणि डाॅक्टरांचे पायच धरले.. ” डॉक्टर.. तुमच्या सांगण्यावरून मी पुण्याला गेले.. आपटेंना भेटले.. स्टाफ नर्स झाले.. माझ्या मुलीला मी खूप शिकवलं.. तुमचा आदर्श ठेवून तीला स्त्री विशेषज्ञ डाॅक्टर बनवलं…! ”

आता आश्चर्यचकित व्हायची वेळ डाॅक्टरांची होती. ” चंद्रा.. बेटा तू मला कसं ओळखलंस..? ”

“तुमच्या नावामुळे.. सतत जप चाललेला असतो आईचा..” ” तुमचं नाव रामचंद्र म्हणून हिचं नाव चंद्रा ठेवलं..  तुम्हीच आम्हाला जीवदान दिलंय.. तुमचाच आदर्श ठेवून चंद्रा गरीब स्त्रियांना निःशुल्क तपासते…!”

डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या.. सुप्रसिद्ध लेखिका.. इन्फोसिसच्या सर्वेसर्वा. असलेल्या सुधा मूर्तींचे वडील…!

तुझ्यामाझ्या जड देही …| देव भरोनिया राही … || 

© सुश्री मनीषा कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ मावळण ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ मावळण ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

1953-54 ची ऐकिवात आठवण.  वडील वयस्क आणि आई देवाघरी गेलेली. पाठोपाठची 11 भावंडे. सगळ्यात धाकटी 2 वर्षाची . बाकी सगळी 2-3 वर्षांनी मोठी, एकमेकांच्यात. जमीन जुमला फक्त नावावर. मोठ्ठे घर असले तरी या कुटुंबाला एक कोपरा. अशा परिस्थितीत खायचे वांधे, तिथे मुलांचे लाड ते कसले?

परिस्थितीनं मुलांना वयापेक्षा खूप मोठ्ठं केलं होतं. सगळीचजणं समंजस.  कसला हट्ट नाही,  कसलेही मागणे नाही.  जे असेल त्यात आनंद मानणे.

दिवस सरत होते.  सणवार येत आणि जात. ही सगळी भावंडे दिवाळी ला गोडधोड,  फराळ, फटाके याची इच्छा न धरता, आनंदाने दिवाळी साजरी करायचे. कशी? तर सुंदर सुंदर रांगोळ्या काढून..त्यातच इतके मग्न होत कि, दुस-या कशाचेच भान नसे. देवानं कलेचं वरदान दिलं होतं प्रत्येकाला.

काळ पुढे सरकला. परिस्थिती ही हळूहळू सुधारली. शिक्षणं चालू होती. 1955- 1960, त्या काळी मॅट्रीक पास हे शिक्षणाचं लिमिट होतं मुलींसाठी. ते झालं की लग्न.

कोल्हापूर सोडून सासरी जाणे..अशाप्रकारे चौघीजणी सासरी पुण्यात पोचल्या. सासरी गेलेली, दुधात साखर विरघळावी तशी सासरी माणसांत मिसळून जायची.  आणि तसंच झालं पाहिजे,  हा अलिखित नियम आणि हेच संस्कार.

ही पण अगदी लवकर संसारात रमली. घरी सासू सासरे, दीर असं एकत्र कुटुंब. नंतर तेही वाढत गेलं. जावा आल्या.  मुलं झाली. मिस्टर एकटेच कमावते. पण ही झाशीची राणी.  घर सांभाळून अंगी असलेल्या कलागुणांची मदत घेत कलावस्तु करून विकणे,  गरजूंना जेवणाचे डबे देणे, अशा मार्गांनी आर्थिक बाजू पण उचलून धरत होती. तेही अगदी आनंदाने. सास-यांना तिचं खूप कौतुक वाटत होतं.

संसारवेलीवर चार गुलाब एकापाठोपाठ एक फुलले.जणु रघुवंशाचे चार सुपुत्र.

आर्थिक परिस्थिती गडगंज नसली तरी समाधानकारक झाली. ती पण कष्ट घेत होती.  कष्ट करणा-याचे हलाखीचे दिवस जास्त टिकत नाहीत.  पण एका शब्दानं माहेरी चुगली केली नाही.

ती माझी आत्या.  आम्ही आते-मामे भावंडे कधी सुट्टीत एकत्र खेळायचो.  हळूहळू अभ्यासात मग्न झालो,  जाणं येणं कमी झालं. त्यावेळी मोबाइल सोडाच, साने फोनही घरोघरी नव्हते.त्यामुळे संपर्क नव्हता.

माझ्या लग्नाच्या दिवशी आली होती,  माझी तिची भेट झाली नाही. नंतर खूप दिवसांनी फोटो बघितल्यावर कळलं.

जवळजवळ 38-40 वर्षांनी तिला भेटायचा योग आला. तिला नुकतंच 90वं वर्ष लागलं होतं. मुलं छान शिकून मोठ्या पदावर काम करत होती. सुना आल्या. नातवंडे झाली.  मागच्या वर्षी नातवाचं लग्न झालं. काकांना जाऊनही बरीच वर्षे झाली.

मी येते असं फोनवर सांगितल्यावर बाल्कनीत वाट  बघत होती.  मी गेल्यावर   तिला नमस्कार केला.  तिनं मला घट्ट मिठीत घेतलं. खरंतर माझा जन्म झाला तेव्हा ती लग्न होऊन सासरी गेली होती.  नंतर तीनचार वेळाच भेटलो असू. आज तिच्या मिठीत खूपकाही हरवलेलं सापडलं होतं.  दोघींचंही बालपण आणि माहेरपण.

खूप गप्पा मारल्या.  नव्वदाव्या वर्षी स्वतः केलेल्या थालिपीठ आणि चहाचा आग्रह करत होती.  भेटून पोट भरलं होतं.  चहाचा घोटन् घोट तिच्या काळजातल्या प्रेमानं गोड गोड लागत होता.

बोलता बोलता मुलांच्या प्रगतीचा अभिमान तिच्या शब्दाशब्दांमधून  जाणवत होता. सुना कशा छान आहेत, नातवंडांचं कौतुक करताना मोहरून गेली होती.

माझी निघण्याची वेळ झाली.  थांब थांब म्हणत अर्धा तास गेला. पुढच्या वेळी रहायला येते असं सांगून    जड अंतःकरणाने निघाले. मनाशी ठरंवलं पुढच्या वेळी नक्की दोन दिवस तिच्या बरोबरच रहायचं. तीनच महिने झाले तिला भेटून.

एका दुपारी तिच्या मुलाचा फोन आला. ” आई गेली”.

मन सुन्न झालं.  तो दिवस चैत्र शुद्ध तृतीयेचा. 13 वर्षांपूर्वी माझे बाबा याच दिवशी गेले.त्यांच्या पाठची ही बहीण.  त्याच तिथीला गेली. योगायोग…….

रात्री मी आतेभावाला फोन केला.  इतक्या दुरून मी फक्त शब्दानीच धीर देऊ शकत होते.

बोलताना तो म्हणाला, ” आता कसं करायचं बघू, कारण आईनं तिची इच्छा सांगितली होती की मी गेल्यावर माझ्या अस्थी कोल्हापूर ला पंचगंगेत विसर्जित करा, म्हणून. “मला हुंदका आवरेना.

आमच्या कोल्हापूर भागात माहेरवाशिणीला ” मावळण” म्हणतात. लग्न होऊन सासरी नांदणा-या लेकी, बहिणी जेव्हा गौरीच्या सणाला, सुट्टीला माहेरी येतात तेव्हा”मावळण केव्हा आली? कशी हाईस पोरी? म्हणून प्रेमानं, आपुलकीने आणि मानानं विचारपूस करतात.

आत्यानं मनाशी ठरंवलंच होतं की काय , इथून आता निघायचं ते माहेरी जायचं.

 

अशी ही मावळण.

आयुष्य भर संसारासाठी

पुण्यभूमित राहिली..

चैत्र गौरीच्या तीजेला

परत निघाली…

जणु भेटण्या माहेरा

आतुर मावळण

पंचगंगी समर्पित झाली……

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 10 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 10 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

अंदमानच्या त्या रमणीय प्रवासाने माझ्या नृत्याच्या क्षेत्रात आणि माझ्या आयुष्यातही मानाचा शिरपेच खोचला गेला. अंदमान हून परतल्यानंतर मला ठिकठिकाणी नृत्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रणे येऊ लागली. अनेक छोट्यामोठ्या ठिकाणी अगदी गल्लीबोळातून सुद्धा मी माझे नृत्याचे कार्यक्रम सादर केले आणि माझ्या परीने सावरकर विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. माझी ती झेप आणि प्रयत्न खारुटीचा असला तरी माझ्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनात आनंद निर्माण करणारा होता. माझ्या या जिद्दीची दखल मिरजकर यांनी सुद्धा घेतली आणि 2011 च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या मिरज महोत्सवांमध्ये “मिरज भूषण” हा पुरस्कार देऊन मला सन्मानित केले.

अपंग सेवा केंद्राच्या संस्थेने मला “जीवन गौरव” हा पुरस्कार देऊन पुरस्कृत केले. मी शिकत असलेल्या कन्या महाविद्यालयात “मातोश्री” हा पुरस्कार देऊन माझ्या विशेष सन्मान केला.

माझा नृत्याचा हा सुवर्णकाळ सुरू असताना माझ्या गुरु धनश्री ताई यांच्या मनामध्ये वेगळाच विचार सुरू होता. त्यांना केवळ एवढ्यातच मला समाधानी ठेवायचे नव्हते. त्यांचा विचार ऐकून मला केशवसुतांच्या कवितेच्या ओळी आठवल्या, “खादाड असे माझी भूक, चकोराने मला न सुख कूपातील मी नच मंडूक, मनास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला हे  साहे. ”

आणि ताईनी मला भरत नाट्य घेऊन एम ए करण्याविषयी चा विचार माझ्यासमोर मांडला. ज्याला मी सहजच होकार दिला. कारण ताईंना अगदी प्राथमिक स्वरूपातली आणि नृत्याच्या वर्गात छंद म्हणून नृत्य करणारी मुलगी नको होती तर त्यांना माझ्यातून एक प्रगल्भ, परिपक्व आणि विकसित झालेली नर्तिका हवी होती कि जिच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय नृत्य “भरतनाट्यम” या प्रकाराचा प्रचार आणि प्रसार योग्यरीतीने सर्वत्र केला जावा.

ताइनी केवळ प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि स्वतःच्या मनावर अवलंबून न राहता त्यांनी माझे नृत्य त्यांच्या गुरु सुचेता चाफेकर आणि नृत्यातील सहकारी वर्ग यांच्यासमोर सादर करून, त्यांच्याकडून पोच पावती मिळवली आणि मला एम ए करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print