मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नमस्कार मंडळी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ मनमंजुषेतून ☆ नमस्कार मंडळी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

वाल्याकोळ्याची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. त्याने अयोग्य जीवनप्रणाली अंगिकारिली होती. परंतु जेव्हा त्याला त्याची जाणीव झाली तेव्हां त्याने प्रायश्चित्त घेतले. परिणामतः वाल्याचा एक महान ॠषि वाल्मिकी झाला. ही गोष्ट परत-परत ऐकताना एका गोष्टीची मला तीव्रतेने जाणीव झाली.   ‘प्रायश्चित्त’! हे एव्हडे सोपे होते का? कि पाप करायचे-प्रायश्चित्त घ्यायचे आणि परत पुण्यवान् व्हायचे!नाही मंडळी!यात खरी विचार करण्याची आणि घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे- ‘चुकीची जाणीव होणे- पश्चात्ताप होणे आणि प्रायश्चित्त घेणे; म्हणजेच सुधारणा करणे. चुकीची पुनरावृत्ती न होऊ देणे-हेच खरे प्रायश्चित्त आहे.

आज या कोरोनाच्या धांदलीत ही गोष्ट आणि त्यातील स्व-सुधारणेची गोष्ट परत-परत डोके वर काढत आहे. तुम्ही म्हणाल काय संबंध? तर विचार करता असे लक्षात येते की चूक-जाणीव- पश्चात्ताप-प्रायश्चित्त -ही साखळीच माणसाला सुधारण्याच्या मार्गावर नेते आणि त्यायोगे प्रगती साधली जाते.

कोरोना भारतात प्रवेशला ही काही आपली चूक नाही.  परंतु त्याचा फैलाव इतक्या वेगाने झाला , होतो आहे ही मात्र नक्कीच आपली चूक आहे. कारण आपल्यात स्वयंशिस्त, स्व-अनुशासन या गोष्टींची कमालीची कमतरता आहे. साध्या-साध्या गोष्टींतूनही ही कमतरता जाणवते. फक्त प्रशासनाला दोष देऊन काय ऊपयोग? प्रशासनाने काळजीपूर्वक आखलेल्या योजना कागदावर किती छान वाटतात !पण मग त्यांचे अपेक्षित परिणाम का दिसत नाहीत? तर ऊत्तर परत तेच आहे-स्वयंशिस्त नाही. शिस्त आपण तर पाळायलाच हवी, परंतु इतरांनाही पाळायला लावायला हवी.  आज तर ‘ माझ्यापुरतेच ‘ पहाण्याचा अलिखीत नियमच झाला आहे जणूं!वेगाने पसरणार्या या महामारीचा आवेग एकट्या-दुकट्याला आवरणारा नाही. समूह-संसर्गाला समूहशक्तिच आटोक्यात आणु शकते. विलगीकरण हाच जर उपाय आहे तर तो तितक्याच प्रखरतेने पाळायलाच हवा. विलगीकरण हे आपले प्रायश्चित्त आहे. ते जितक्या काटेकोरपणे पाळले जाईल तितक्या लवकर वाल्याकोळ्याचे पाप नाहीसे होईल. प्रायश्चित्तातील कठोरताच शांत जीवनाचे  फळ देईल.

म्हणूनच स्वयंशिस्तीचा झेंडा फडकवायला हवा.  स्वयंशिस्त हीकाही आताचीच गरज आहे असेही नाही. सदा  सर्वदा सदाचारी समाज घडविण्याची ती एक गुरूकिल्ली आहे किंवा व्यवहारी भाषेत बोलायचे यर असे म्हणता येइल की काही दिल्याशिवाय काही मिळत नसते. म्हणूनच स्वयंशिस्त पाळा, म्हणजेच स्व-संतुलन राखा तरच प्रगती होइल. प्रत्येक गोष्ट जशी मला हवी तशीच ती दुसर्यालाही हवी हे ध्यानात घेतले पाहिजे. माझे सुख मिळवण्यासाठी मी इतरांच्या सुखाला पायदळी तुडवू नये.  ‘स्व’ ला अनुशासित ठेवा तरच निरोगी , सभ्य, स्वच्छ, सदाचारी समाज निर्माण होईल.

©  सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अद्वैत ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

परिचय

  • एम. ए. (म्युझिक), SNDT विद्यापीठात प्रथम क्रमांक
  • संगीत अलंकार (अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय) विशेष योग्यता प्राप्त.
  • एम. कॉम. (अकाउंट्स अँड कॉस्टिंग)
  • PHD student (ABGMVM)
  • सध्या चेन्नईस्थित असून ऑस्कर विजेते संगीतकार  ए. आर. रहमान ह्यांच्या KM College of Music & Technology मधे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या प्राध्यापिका आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायनाचे कार्यक्रम सादर करतात.
  • गेल्या दहा वर्षांपासून मराठी मासिकांमधे, दिवाळी अंकामध्ये सातत्याने लेखन.
  • पूर्वी शब्दबंध हा कथासंग्रह, गवतूचं गाणं आणि घनिष्ठ मैत्री हे बाल कथासंग्रह व कल्पवृक्ष कन्येसाठी ही काव्यसंवादरुपी पुस्तिका प्रकाशित झाली आहे.
  • गेल्याच महिन्यात निरभ्र  व भूपातला निषाद हे दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
  • कालच जाहीर झालेल्या डॉ. सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय कथस्पर्धेच्या निकालानुसार ‘ज्याचं त्याला’ ह्या कथेस विभागून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

☆ विविधा ☆ मनमंजुषेतून ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

असतील लाख कृष्ण कालिंदिच्या तटाला

राधेस जो मिळाला तो एकटाच उरला

अर्थातच कविवर्य ग्रेस!

आज अचानक ह्या ओळी सामोऱ्या आल्या आणि नव्यानं भेटल्या! पूर्वी हे वाचल्यावर काय उमटलं होतं मनात आठवत नाही… मात्र आज राधा आणखी खोलवर रुतली…! खरंतर पदोपदी मोहवणाऱ्या, भूल पाडणाऱ्या ह्या गोष्टी तरीही सगळ्याचे अर्थ लागणं तितकं सोपं नाही.. पण माणूसपणातला न आवरणारा हाही एक मोह… आपल्या नजरेतून सगळं पाहाण्याचा!.. म्हणून अक्षरं मांडणं अनावर झालं!

राधा स्वतः कृष्णमय होऊन गेली आणि कृष्णाला तिच्याजवळ असण्या-नसण्याचा  पर्यायच तिनं ठेवला नाही… तिनं त्याला कधी स्वतःपासून वेगळं केलं/मानलं नाही आणि ना कधी स्वतः त्याच्यापासून वेगळी झाली… त्यामुळं तिच्याजवळ नुरण्याचा पर्यायच त्याच्याकडे उरला नाही… म्हणूनच तो तिला पुरून उरला… आजही तो उरलाय तो फक्त राधेसोबत… राधाकृष्ण होऊन!

इतकं अतूटपण निभावणं म्हटलं तर खूप सोपं आणि म्हटलं तर क्षणोक्षणी चटके सोसत निखाऱ्यावर चालत राहाणं… त्यातला सोपं वाटण्याचा पर्याय विश्वासाशी जोडलेला… अंतरी तो आहेच ह्या अढळ विश्वासाशी… जगण्यातल्या क्षणांत त्याच्या असण्या-नसण्याशी तसूभरही संबंध नसलेला…! अपार मोह पडला तरी हे निभावणं सोपं नाही… पण हे जमलं तर मिळवण्यासारखं काही  उरतच नाही… तोच मोक्ष तीच मुक्ती म्हणजेच ‘राधा’ अनुभवणं!

तुलना मनात उभी राहातेच राहाते… ग्रेस प्रभृतींनीही ह्या रचनेत रूक्मिणी-सत्यभामा आणि राधा ह्यांच्यातलं तुलनात्मक वेगळेपणच इतकं अचूक मांडलंय की वाचताक्षणी राधा नेमकेपणी कडकडून भेटावी… त्यांनी म्हटलंय रुक्मिणी-सत्यभामेला साध्यापेक्षा साधन महत्वाचं वाटलं आणि राधेला साध्य कळलं होतं, तिचं लक्ष फक्त साध्याकडं होतं… फक्त कृष्ण, कृष्ण आणि कृष्ण… म्हणूनच त्यानं त्यांना साधन दिलं आणि स्वत: राधेला साध्य झाला!

मनात आलं की  रुक्मिणी-सत्यभामेला कृष्णापेक्षा  कृष्णाचं आपल्यावरचं  प्रेम आणि आपला त्याच्यावरचा हक्क जगासमोर सिद्ध होणं जास्त गरजेचं वाटलं आणि राधेनं त्याला ते सिद्ध करून दाखवायचा पर्यायच ठेवला नाही, अर्थात तिला त्याची गरजही भासली नाहीच… कारण तो आपल्याजवळ च असल्याचा तिचा विश्वास!… तसंही आपणच पर्याय निर्माण न करणं किती चांगलं! आपल्याला मिळणार असलेल्या गोष्टीवर आणि ती मिळणारच ह्यावर अतूट विश्वास ठेवणं हा एकच पर्याय, हे एकच ध्येय आणि हा एकच ध्यास… कुठल्या अडथळ्याला मधे येण्याचा पर्यायच उपलब्ध नाही… आणि त्यातूनही काही आलंच आड तरी विश्वासाच्या भक्कम तटबंदीसमोर ते दिसणार नाही आणि टिकणारही नाही!… केवढं प्रचंड आत्मबल, केवढा दुर्दम्य आशावाद आणि किती अर्थपूर्ण जगणं… कृष्णानं राधेला बहाल केलेलं कि राधेनं कृष्णमय होऊन अल्लद ओंजळीत पाडून घेतलेलं!?

सत्यभामा-रुक्मिणीच्या बाबतीत तो लौकिकार्थाने त्यांचा होऊनही त्यांच्याजवळ उरला नाही आणि राधेजवळ नुरण्याचा पर्यायच त्याच्याकडं नव्हता!… भूल पडते ह्या अशा आयुष्याची… त्याच्याशिवायही त्याच्यासोबत त्याचं होऊन जात जगण्याची आणि खरंतर राधेचं गारूड पसरत जातं मनभर… पण ती स्वतः उरलीच कुठं होती म्हणून मग तिच्या अवघ्या अस्तित्वावरचं त्याचं गारूड आपल्यातही भिनत जातं आणि आपल्या दृष्टीनं सर्वव्यापी ठरतो तो! तसा तो आहेच सर्वसाक्षी, सर्वव्यापी.. पण राधेचा होऊन अंतरी ठसला, तिच्या नेत्रांतून दिसला, तिच्या जाणिवांनी अनुभवला की परिपूर्णतेचं एक वेगळं वलय त्याच्याभोवती तेजाळतं आणि कसलाच किंतू मनात न उरता त्याच्या अस्तित्वाचीच खात्री पटते!

अस्तित्वाची खूण ही अंतरीच पटावी… प्रतिकांतून नाही, दृश्य स्वरूपात नाही! बाह्यरूपात भुलावण होऊ शकते, अंतरी नाही! त्याच्या प्रीतीच्या प्रतिकाचा ध्यास घेतलेल्यांना साधं ते प्रतीकही पूर्णपणे मिळालंच नाही आणि फक्त त्याचा ध्यास घेतलेल्या राधेसोबत तो युगानुयुगे उरलाय! एका दृष्टीनं हाही त्याच्या अस्तित्वाचा पुरावाच… ज्याला जे हवं त्याला ते देणारा ‘तो’… राधेला ‘तो’च हवा होता तर फक्त त्या एका जन्मी नाही तर युगानुयुगे तिची साथ निभावणारा!

कुणाची आस धरण्यापेक्षा कुणाचं तरी होऊन जाणंच खरं… कारण ती आपली स्वत:ची अनुभूती, कुणावरही अवलंबून नसलेली… हे ढळढळीत सत्य राधा जगली आणि अनंतयुगे त्याच्यासोबत अमर झाली!

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मधली पिढी ☆ सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ मधली पिढी ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

ती आईला आणि नातवाला भेटायला निघालीय. म्हातारपण लहान मुलासारखं अस तं  म्हणून आईला काय खाऊ न्यायचा, नातवाला काय न्यायचा याचा ती विचार करते. आता तीही थकलीय पण दोन्ही ठिकाणी काळजाचे घड होते. त्यांच्यासाठी काहीही करण्यासाठी तिला उत्साह येतोच. नवऱ्याच्या रिटायरमेंटनंतर  ते गावाजवळ राहत होते। मुलगा नोकरिमित्त शहरात। माहेर जवळच होतं तिथून.  आईला भेटून तसंच मुलाकडे जायचं.  दोघांनाही काहीतरी न्यायला हवं हे सतत आतून वाटतं. मोकळं जाणं बरं वाटत नाही. विकतचे खाण्याचे पदार्थ घेणे पटत नाही. भले ही भेट महिन्या दोन महिन्यातून का असेना.  विकतचे काही नेणं तिला आवडतच नाही.  विकत त्याचं ते घेऊ शकतातच की.  आपलं माया, प्रेम त्यात उतरणार आहे का?

आईसाठी बिनतिखटाची चार थालीपीठ केली.  नातवाला एक घेतल. खजूर आईसाठी तर काजू बदाम नातवासाठी खडीसाखर दोघांना आवडते.  रव्याचे लाडू लेकासाठी बेसनाचे सुनेला आवडतात.  माहेरी भाऊभवजयीला, भाचरांना लाडू. असा सगळा हिशोब करत तिची आवरा आवरी चाललेली.  नवऱ्याचा दोन्ही वेळेचा सैपाक करायचा.  उद्यासाठी मदतनि

साला सांगायचं कसा कसा सैपाक कर…  नवऱ्याला बजावलं, चारदा जेवण झालं की, नीट झाकून ठेवा। चपतीचा डबा पाण्याच्या ताटात ठेवा, नाहीतर मुंग्यांनी लगेच भरतो। वेळेत गोळी खा आणि तसा मेसेज करा. हे सगळं करुन नऊच्या गाडीने निघायला हवं. नाहीतर गाडी चुकली कीं बारालाच एकदम. तिची घाई चाललेली.

नवऱ्याच्या सूचना ऐकयला लागत होत्याच.  परवा लवकर निघ. वगैरे, वगैरे…

तिला आईजवळ दोन दिवस आणि नातवाजवळ चार दिवस राहावं वाटत होतं, पण नवऱ्याला एकटं सोडून नकोही वाटत होतं. ती म्हणायची आपण मुलाजवळच राहू पण नवऱ्याला हे पटत नाही.  स्वातंत्र हवं प्रत्येकाला.

एकत्र राहून नाही का मिळत????  कुणाच्या जगण्यात ढवळाढवळ नाही करायची.  आपापली कामे करायची.

तिला मात्र एकत्र राहण्यामुळे सुरक्षित वाटतं. तसं एकेकट नाही वाटत. आतापासून सवय लागली एकमेकांची तर पुढे सेवा करतील. तिला मुलांपासून दूर राहणं पटतच नाही. मुलांच्या स्वातंत्र्याच्या गप्पा करणाऱ्या नवऱ्याला बायकोच्या भावना का कळू नयेत???

ती एसटीत बसली तेव्हा तिला विसावा मिळाला. शांतपणे ती डोळे मिटून बसली.  काय घेतलं, काय राहिलं तर नाही ना याची मनोमन उजळणी करत असताना तिचं मन भरून आलं.  का कुणास ठाऊक तिला रडावस वाटलं.  दुःख नाही राग नाही तरी असं का व्हावं????

ती विचार करत असताना जाणवलं,  आपली आई असच सगळ करायची.  नको म्हटलं तरी ऐकायची नाही. तिचा त्रास बघून रागवायचेही, तरी ती करत राहायची॰  एकदा दिवाळी झाल्यावर आम्ही गेलो होतो आणि तिचे लाडू संपलेले. लेक आली आणि लाडू नाहीत म्हणजे काय….

आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी परतायचे होते. ती पहाटे उठली,  जात्यावर डाळ दळली.  कारण बेसनही संपले होते। आम्ही उठायच्या आत तिचे लाडू तयार झाले होते. किती वाजता उठली होतीस असं विचारलं तर म्हणाली,  झोपले कुठे होते ?…

आत्ता कळू लागलंय ती हे सगळं का करत होती?  हे करण्यात तिला केवढी ऊर्जा मिळत होती. कष्टाचं तिला काहीच वाटत नव्हतं. यालाच तर प्रेम माया जिव्हाळा म्हणतात.

हे प्रेम एकत्र राहून नातवाला शिकवायला हवं.  सहवासातील प्रेम त्याला नाही मिळालं तर तो माणूसघाणा होईल, असं तिला वाटायचं. पण नवरा ऐकत नाही.

तिला नातवापासून दूर राहावं लागतं.  त्यामुळे तिला वाईट वाटतं….

आई फोनसाठी जीव तोडते. सतत फोन कर म्हणते,  तेव्हा कळते की आपल्या माणसाचा आवाज ऐकण्यासाठी जीव किती आसुसलेला असतो.

ही असोशी कशानेही मिटत नाही. नातवाचा आवाज ऐकण्यासाठी तीही अशीच व्याकुळ होते.  आत्ता तिला आईचं मन कळू लागलंय.  ती आजी झाल्यानंतर……

 

© सौ. सावित्री जगदाळे

१४/२/१९

१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नातं ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ मनमंजुषेतून ☆ नातं ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

नातं कस असावं, तर एखादा गोफ सुरेख विणलेला असतो तस असावं. एकमेकांची मने घट्ट सुबक विणलेली असावीत.

एकाच्या दुःखाने नकळत दुसर्‍याच्या पापण्या ओल्या व्हाव्यात, तर एकाचे सुख दुसर्‍याच्या चेहर्‍यावर ओसंडून वहावे.

नात्याला कोणते लेबल असलेच पाहिजे असे नाही,पण असलाच तर खरेपणा असावा, प्रेम, जिव्हाळा असावा, विश्वास असावा आणि महत्त्वाचे म्हणजे नात्यात पारदर्शकता असावी. जे असेल ते उघड आत बाहेर काही नाही, लख्ख प्रकाशा सारखे.

नातं माऊ गोधडी सारख असावं, मायेच्या उबेन भरलेल हव. हव हव असवाटणार खरखरीत रगा सारख नसावं, जे हव तर असत पण नाईलाज म्हणून.

मला खरच मनापासून वाटते की एखाद तरी नातं अस नक्की असावं, जिथे हक्काची एक हाक असावी, मायेची एक थाप असावी आणि न मारलेली हाक सुद्धा त्या व्यक्तिला ऐकु जावी.

खूप कमी जणांच्या नशिबात अशी नाती असतात आणि ज्याला ती मिळतात तो खरा भाग्यवान नाही का? असे मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते??

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शहाणपणाची उघडा कवाडे ☆ श्री सतीश स. कुलकर्णी

श्री सतीश स.कुलकर्णी 

☆ मनमंजुषेतून ☆ शहाणपणाची उघडा कवाडे ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆ 

‘The only thing you absolutely have to know is the location of the library.’

अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. आमच्या वाचनालयाचं स्थळ माझ्यासह सगळ्याच सभासदांना अगदी चांगलं माहीत आहे. पण आमच्यासारख्या सामान्यांच्या जगण्यात त्याचं नेमकं ‘स्थान’ काय आहे (किंवा काय असावं!), हे प्रशासनाला किंवा राज्यकर्त्यांना उमगलेलं नाही. त्यामुळंच सार्वजनिक वाचनालयांची दारं अजून बंदच आहे. ती कधी उघडणार, ह्याची काहीच कल्पना नाही.

राज्य सरकारनं ५ ऑक्टोबरपासून बार, रेस्टॉरंट उघडायला परवानगी दिली. आणखी काही गोष्टी केल्या आणि काही जुने निर्बंध चालूच ठेवले. ह्यात कुठेच ग्रंथालयांचा-वाचनालयांचा उल्लेख नाही, हे विशेष. असा अनुल्लेख म्हणजे उपेक्षाच!

साक्षरतेचे प्रमाण ८० टक्क्यांच्या घरात गेलेल्या आपल्या देशातील बहुसंख्यांना वाचनालये उघडावीत, त्यासाठी काही मागणी करावी, असं वाटल्याचं दिसलं नाही. (काही तुरळक अपवाद असतील.) वृत्तपत्रांद्वारे कोरोनाचा फैलाव होतो, अशा ‘व्हॉट्सॲप विद्यापीठीय’ बातम्यांचा पूर आल्यानंतर तसा तो होत नाही, हे सांगण्यासाठी वृत्तपत्रांची एकच घाई उडाली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी ह्यांना बोलते करून त्या बातम्या पहिल्या पानावर ठळकपणे छापण्यात आल्या. वृत्तपत्रांच्या माध्यमातून विषाणू पसरत नसेल, तर तो पुस्तकांच्या पानांमधून कसा पसरेल, असा प्रश्न वाचनालयांच्या बाबतीत विचारायचं मात्र विसरूनच गेलं.

‘अनलॉक : ५’च्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेला मात्र जाग आली. ‘ग्रंथालये बंद असणं, ही बाब एकूण साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे ती उघडण्यास परवानगी द्यावी,’ अशी मागणी साहित्य परिषदेनं केल्याची बातमी शुक्रवारच्या दैनिकांमध्ये आहे. पण एकूणच साहित्य व्यवहार पाहणाऱ्यांना काय किंमत द्यायची किंवा त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा, हे प्रशासन हाकणाऱ्यांना किंवा राज्यकर्त्यांना माहीत आहे. त्यामुळे ‘मागणी केली, बातमी आली’ एवढ्यावरच समाधान मानण्याची वेळ.

अधिकृत परवानगी मिळाल्याच्या किती तरी दिवस आधीपासून रेस्टॉरंट आणि बारमध्ये सहजपणे ‘बसता’ येते, अशी चर्चा कर्णोपकर्णी असते. तिथे ग्रंथालयावरचे निर्बंध मात्र कडकपणे चालू असतात. त्यावाचून कुणाचे काही अडत नाही, ही तर भावना त्यामागे नसावी ना?

ह्या कसोटीच्या काळात वाचन-संस्कृतीच्या कसोटीला आपण उतरावं, ह्या भावनेनं वाचनालयाकडून काही झाल्याचं दिसलं नाही, ह्याचं वाईट वाटतं. वाचनालय सुरू व्हावं ह्यासाठी आम्ही सभासदांनीही रेटा लावला नाही. (हा लेख khidaki.blogspot.com इथे प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवसांपासून काही वाहिन्या व वृत्तपत्रे ह्यांनी ही मागणी लावून धरली.)

इंटरनेटवर भटकताना कॅनडाच्या ओंटारिओ परगण्यातील ‘किचनेर पब्लिक लायब्ररी’ चं संकेतस्थळ दिसलं. काही शाखा असलेलं हे वाचनालय १० ऑगस्टपासून पुन्हा चालू झालं. त्याचा आनंद संकेतस्थळावर व्यक्त झालेला दिसतो. सभासदांना उद्देशून तिथं लिहिलं आहे – ‘आमच्या ह्या जागेत तुमचं पुन्हा स्वागत करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे! खूप दिवसांपासून आम्हाला तुमची आठवण येत होती…’ सरकारच्या अनुदानावर (म्हणजे जनतेच्या पैशातून) चालणाऱ्या इथल्या सार्वजनिक वाचनालयांना आपल्या वाचकांची अशी मनापासून आठवण झाली का?

समर्थ रामदास स्वामींनी ‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ असं लिहून ठेवलं. त्यातलं अखंडित महत्त्वाचं आहे. सफ़दर हाशमी ‘किताबें’ कवितेत लिहितात –

किताबें करती है बातें

बीते जमानों की

दुनिया की, इंसानों की

आज की कल की

एक-एक पल की।

खुशियों की, ग़मों की

फूलों की, बमों की

जीत की, हार की

प्यार की, मार की।

सुनोगे नहीं क्या

किताबों की बातें?

आपण सगळ्याच पातळ्यांवर कान बंद करून घेतल्यानंतर पुस्तकांचे हे अस्फुट उद्गार त्या पानांतून कसे ऐकू येतील!

वाचल्यानं माहिती मिळते, ज्ञान वाढतं. माणूस शहाणा होतो म्हणतात.

आपली प्रजा शहाणीसुरती असावी, असं कोणत्या जमान्यातील राज्यकर्त्यांना वाटत असतं हो!

हा सविस्तर लेख व असे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – khidaki.blogspot.com

 

©  श्री सतीश स.कुलकर्णी 

संपर्क – [email protected],  [email protected]

(चित्र साभार श्री सतीश स. कुलकर्णी )

 

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विलक्षण योगायोग ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ विलक्षण योगायोग ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

माझ्या मैत्रिणीला तिच्या वैभवसंपन्न,विद्याविभूषित,अशा माहेरच्या आठवणींचे पुस्तक करायचे होते त्याचे पुनर्लेखन करताना, त्यात १९६२ च्या चीन युद्धात वीरगती मिळालेल्या तिच्या भावाची हकीकत आहे.

पुण्याला लष्कर भागात, दक्षिण कमांडच्या वीरगती प्राप्त झालेल्या जवानांचा स्मृतीस्तंभ उभारला आहे. एका संध्याकाळी मी व माझी मुलगी हा स्तंभ बघायला गेलो. थोडासा अंधारच झाला होता, परावर्तीत प्रकाश दिवे तो परिसर उजळून टाकत होते. विस्तीर्ण आवारचे सुशोभित फाटक बंद होते. बाहेर सुगंधित बुचाच्या फुलांचा सडा पडलेला होता तेवढ्यात एका लष्करी जवानाने फाटक उघडले. आम्ही स्तंभाच्या दिशेने मार्गक्रमित झालो तेथील शांततेमुळे वातावरण उगाचच गंभीर वाटत होते. स्तम्भाशी जाऊन आम्ही मनोमन नमस्कार केला. स्तंभाच्या मागील बाजूस संगमरवरी फरश्यांवर धारातीर्थी पडलेल्या जवानांची नावे दिमाखाने झळकत होती. आम्ही डाव्या बाजुने उतरलो व नावे वाचण्यास सुरुवात केली. मनात विलक्षण भावना गोळा झाल्या होत्या. एवढ्या नावात अपेक्षित नाव कस मिळणार ? भ्रमणध्वनीचा प्रकाश बघता बघता एका नावावर स्थिरावला, ‘व्ही. एन. आठल्ये’. दूरभाष संचावर टंकलिखित केले, “IC  12635 21 LtAthaley VN.” !

विष्णू भावाच्या नावामागील क्रमांक लष्कराच्या रेकॉर्ड मधील होता. स्तंभाला प्रदक्षिणा घालून शेजारच्या पांढऱ्या शुभ्र फ्लोरीबंडा जातीच्या गुलाबपुष्पातील एक सुंदर पुष्प तोडून घेतले सद्गदित अंत:करणाने ती पुष्पमय श्रद्धांजली आपल्या विष्णूभाऊबरोबर इतर वीरजवानांना अर्पण केली. नकळत डोळ्यात अश्रू आले.

इतक्या फरश्यावर असलेल्या अनेक नावात नकळत अपेक्षित नावाच्या फरशीसमोर पोहोचले हा एक ‘विलक्षण योगायोगच नव्हे का’ !

त्या घरातील व्यक्तींशी नकळत माझा पूर्वीचा ‘ऋणानुबंध’ असावा असं मला जाणवलं.

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंडित संजीव अभ्यंकर ☆ श्री प्रसाद जोग

☆ मनमंजुषेतून ☆ पंडित संजीव अभ्यंकर ☆ श्री प्रसाद जोग ☆

पंडित संजीव अभ्यंकर

वाढदिवस / जन्म : ५ ऑक्टोबर १९६९

त्यांना घरातच गुरु हजर होता. त्यांची आई शोभा अभ्यंकर यांनी त्यांना प्राथमिक  सांगीतिक  धडे दिले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांनी  संजीव अभ्यंकर याना  मार्गदर्शन केले. हिराबाई बडोदेकर आणि वसंतराव देशपांडे यांनी त्यांना जसराजांकडे शिकायला पाठविण्याची शिफारस केली. जसराजांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांची दिनचर्या पूर्णत: बदलली.

गुरु शिष्य परंपरेप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी गुरूच्या घरातील वेगळा दिनक्रम सुरु झाला. आपले आपण उठून शिष्यांनी रियाजाच्या खोलीत रियाज सुरू करावा, अशी गुरुजींची   शिकवण होती. त्यांच्या घराच्या गच्चीत रियाजाची छोटी खोली होती. तिथे जाऊन गायला बसायचे, त्यांना मनात येईल तेव्हा जसराज यायचे आणि शिकवायचे. त्यांनी शिकवलेले सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तीन वेळा गायचे असा नियम होता. त्या त्या वेळचे राग म्हणायचे. रोज तेव्हा चार ते साडेचार तास गायन व्हायचे. त्यावेळी गळा तयार करायचा होता त्यामुळे सगळे राग गळ्यावर चढवायचा रियाज असायचा.

गुरु-शिष्य परंपरेनुसार त्यांचे शिक्षण चालू असताना,पं. जसराजांच्याबरोबर भारतभर दौरे, संगीत मैफिलींमध्ये त्यांना साथ-संगत आणि त्याचवेळी हिंदुस्तानी संगीतातील अभिजात स्वरांचे धडे, अशा नानाविध मार्गांनी त्यांची सांगीतिक प्रगती झाली . अकराव्या वर्षी संगीताची पहिली मैफल गाजविणार्‍या संजीव अभ्यंकरांनी त्यानंतर देशभरातील विविध महोत्सवांमध्ये आपल्या गायकीची छाप पाडली.

देशभरातील प्रख्यात संगीत महोत्सव आणि परदेशातील अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या भागांतही  पं.संजीव अभ्यंकरांची गायकी  पोचली आहे. अभिजात शास्त्रीय संगीताबरोबर पार्श्वगायन, भावसंगीत आणि भक्तिसंगीताच्या प्रांतांतही त्यांनी स्वतःची छाप  उमटवली. हिंदी-मराठी भजने आणि बंदिशींच्या माध्यमातून  देशभरातील संगीतरसिकांच्या घरांत त्यांचे नाव पोचले आहे. स्वतःच्या काही बंदिशी रचून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

महाराष्ट्र शासनाने समर्थ रामदास स्वामी लिखित “दासबोध “पं.संजीव अभ्यंकरांच्या कडून गाऊन घेतला आहे व तो शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे व तो विनाशुल्क डाउन लोड करता येतो.

‘माचिस’, ‘निदान’, ‘दिल पे मत ले यार’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. ‘गॉडमदर’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पं. जसराज जीवनगौरव पुरस्कार, सूररत्‍न यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेश शासनाने ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवले आहे.ऑल इंडिया रेडिओ ने १९९० साली त्यांना उत्कृष्ठ पार्श्वगायकाचा पुरस्कार दिला होता.

थोड्या  दिवसांपूर्वी आयॊध्येला राममंदिराच्या उभारणीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि जगभरातली सर्वाना ध्यान लागलें रामाचें त्या प्रित्यर्थ पंडित संजीवजीं नी गायलेला अभंग

ध्यान लागलें रामाचें । दुःख हरलें जन्माचें

राम पदांबुजावरी । वृत्ति गुंतली मधुकरी

रामवदनमयंकीं । चक्षुचकोर जाले सुखी

तनुमेघश्याम मेळे । चित्तचातक निवाले

कीर्तिसुगंधतरुवरी । कुजे कोकिळा वैखरी

रामीरामदासस्वामी । प्रगटले अंतर्यामीं

यूट्यूब लिंक >>>  ध्यान लागलें रामाचें

पंडित संजीव अभ्यंकरांना  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .

 

© श्री प्रसाद जोग

सांगली.

९४२२०४११५०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रसन्नतेची प्रचिती ☆ श्रीशैल चौगुले

☆ मनमंजुषेतून ?प्रसन्नतेची प्रचिती? श्रीशैल चौगुले☆

आपण जीवन जगत असताना आपल्या देहाशी निगडीत आप तेज, वायू, पृथ्वी, आकाश या पंचतत्वाचा आत्मप्राणाशी सबंध येत असतो हे आपणा सर्वांना माहित आहे.

पण मन म्हणून जी एक आंतरीक भावनेशी क्रीयाशील अदृश्य ज्ञानस्पर्शाची शक्ती असते. हे मन चैतन्य प्रवृत्ती व विवेकजागृतीस चालना देत असते. म्हणून अध्यात्म गीताग्रंथातही भगवंताने मनाचे सामर्थ्य आपला शिष्य अर्जुनास सुंदर पध्दतीने वर्णन करुन सांगितले आहे.

‘मन करा रे प्रसन्न!’ अशा ओळी जेंव्हा मनालाच भावतात तेंव्हा सत्यप्रचिती येत असते. त्यास प्रसन्न अशी व्याख्या देता येईल.

एखाद्या सजीव-निर्जीव वस्तुवरील भावरुपी श्रध्दा-निष्ठा असलेस ती प्रत्यक्ष अपेक्षापूर्तीत ऊतरते तेंव्हा मनास आत्मप्रचिती भावते.

जसे संतांना पांडुरंग प्रसन्न, मिरेस श्रीकृष्ण, तुलसीदास, नरहरीस भगवान प्रसन्न तसे.

पण विस्मयचकीत होणेचे नाही. कारण इथे अनुभव माझ्या सामान्य निष्ठेचा एका महान व्यक्ती प्रसन्न होणेसी आहे.  ना मी पामर, ना ते भगवंत.

तसा माझा बाहेरचा प्रवास अत्यंत कमी. त्यात मला अधिक समरसतेची ऊत्सुकताही नसते. पण ज्या त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील वातावारणाशी जुळवून घेणेची निश्चीतच प्रवृत्ती स्वभाव माझेजवळ आहे.

सासरेंनी मुंबईप्रयाणाची एका शब्दाने विचारणा करावी.आणि एका आपल्या घरच्या व्यक्तीसमवेतची ही संधी यावी याव्यतीरिक्त दुसरे भाग्य कोणते नसावे.झाले,सर्व माझ्या तयारीने सासरेसमवेत रात्री८-००च्या रेल्वेने मुंबई प्रवासास रवाना झालो.रात्रभर आमचे समोरच्या बैठकीवर असलेले दोन वकीलमित्रांशी वैचारीक गप्पा मारणेत कशी पहाट झाली हे कळले नाही.मात्र वाद-विवादात नक्कीच मला शिकायला काही मिळाले. ते ही नवोदीत प्रँक्टीस वकील मुंबई हाय कोर्टात निघालेले बहाद्दर आणि मला विचारवादाशी छेडछाड करणेची खोड सवय अर्थातच काही नव्याने ज्ञान प्राप्त करणेचा हेतू.

असो.अगदी साडे-पाचचे सुमारास व्हि. टी. स ऊतरुन साखर संघाचे निवास स्थानी स्नान वगैरे आटोपते झालो.सासरेंचै सर्व राजकीय नेत्याशी जवळीक असले तरी. मा. कै. विलासराव देशमुखजी त्यांचे खास मित्र व तेच संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्या फोनमुळे पंधरा मिनीटे प्रतिक्क्षेत गेलेनंतर मुख्य मुंबईत म्हणजे मुंबई पोलीस मुख्यालय,नरिमन पॉंईंट, मरीन लाईन्स, तिथूनच दिसणारे, हॉटेल अँम्बँसिडर, समुद्राच्या बीचवरील मलबार हिल  सारे पाहून बरोबर सकाळी साडे नऊचे सुमारास चहा घेणेकरीता स्टेटस् हॉटेलवर चहा नाष्टा सेंटरवर पोहोचते झालो. हॉटेल दहा चे सुमारास चालू झाले. तोपर्यंत मी वृत्तपत्राची पाने चाळीत तेथील वृक्षविसावा पार्यावर बैठक मारुन थांबलो. तोपर्यंत सासरे,मेहुणेसोबत नाष्टा सेवन करीतच चाळत असलेले वृत्तपत्राचे शेवटचे पानांवरील क्रीकेटचे विशेष वृत्त पहात पहात महान खेळाडू सचिन तेंडूलकर यांचे दहा हजार पूर्ण झालेचे विक्रमी वृत्त वाचत राहिलो. ईतक्यात सासरेंनी ‘आणखी हवे का?’अशी विचारणा करता  वर मान करुन पाहिलो तर समोर हॉटेलमधे स्पोर्ट किटमधे दोघे चौघे नास्टा करीत होते. त्यांना मी कुठेतरी पाहिल्यासारखे वारंवार जाणवत राहिले. पण मनाने नेमकेपणा साधला नाही. सासरे-मेहुणे यांचेकडे काही मतीची गती थांबवणेचे शास्त्र असो वा नजरबंदीसारखे गारुड माकडनिती त्या क्षणी माझी वेळ दुर्भाग्यातच होती हे नक्की.कारण समोर चक्क तेंडूलकर, झहिर, कांबळी….असे मातब्बर कि जेआपल्याष देशाचे नाव ऊंचावण्याचे महान सत्कार्य आपल्या खेळकौशल्याने धन्य करतात.आणि मी मात्र वेड्यासारखा त्यांचेच वृत्तसमाचार पुढच्या ओळी वाचत रहातो.समोरुन लहान मुले छोट्या बँटवरती त्यांची सही आठवाण म्हणून घेत आहेत. मेहुणेही मला ‘तुम्ही सही घेणार का ? ‘ म्हणून विचारतात. पण मला पंढरीत जाऊन संतांसोबत पांडुरंग समोर प्रसन्न होऊनही न कळावा’ तसे हे जीवनातले दुर्भाग्य.

पुन्हा तेच तेंडूलकरच्या विक्रमी खेळाचे वृत्त पुढे वाचत रहातो वृत्तही संपते, नाष्टा संपवून बाहेर येतो. तिथून समुद्राकिनाराही जवळ असावा. हे सर्व खेळाडूही चक्क माझ्या काही अंतरावर डोळ्यासमोर टू-व्हिलरवरती बसतात. व मी माझे सासरे-मेहुणेसमवेत फोर्ट, गेटवे ऑफ़ इंडिया, लोखंडवाला, झवेरी बझारच्या प्रवासासाठी निघून जातो.

आता यामधे मीशकाही मुंबईशी परिचीत नसलेचा दोष वा वानखेड स्टेडियम तिथून जवळ असलेने ते खेळाडू सरावानंतर नियमीत या हॉटेलमधे नाष्टा करुन जात असलेचा माहितीचा अभाव.

पण काहीही म्हणा,या प्रंसंगात आत्मप्रचिती प्रसन्नतेची कृपा असलेली जाणीव आहे. जी अदृश्य स्वरुपात कृपाशील असावी. देशासाठी त्या-त्या सत्शीला सद्भावनेने देशभक्ती सेवा  देणारेही परमरुप म्हणजे देवच. कारण त्यांचे कार्याशी भक्ती-निष्ठा हे भाव आपणास भक्त बनवून जातात. समोर श्रीदत्त ऊभे आणि मी मंदिरात त्याचे ध्यानात दंग,अशी स्थिती निर्माण झाली.

वरील प्रसंगाचा ‘मन करा रे प्रसन्न //सर्व सिध्दीचे कारण//’

याचा प्रत्यक्ष साक्षात्कार.कृष्ण लिलेसारखा लिलया फसवा.

ज्या खेळाडूचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चेंडू फलंदाजीच्या ऊत्सुकतेत समालोचन ऐकणेसाठी आतुर होऊन आकाशवाणीवर कर्ण एकरुप होतात व जागतीक दर्जाचा महान फिरकी गोलांदाजावर षटकार ठोकून लिलया आपल्या भारतदेशाचे फलंदाजीचे नेतृत्व सिध्द करताना आनंदाने त्या महान खेळाडूचे कौतुक करित रहातो .ते महान दैवत समोर प्रसन्न असूनही मी त्याच दुर्भाग्य क्षणात मनातून सलत रहातो.

हा प्रसन्नतेचा साक्षात्कार प्रत्येकाच्या जीवनात येत रहातो. फक्त सत्य स्विकारुन मन त्याच ध्यासात असावे लागते.सतत पाठांतर केलेला प्रश्नच परिक्षेत पडावा व नेमके त्याचवेळी ऊत्तरच आठवू नये अशी स्थिती या माझीया मनाची.

मा,खा.सचिन तेंडूलकर व त्यांचे सहाकारी खेळाडूंच्या या प्रसन्न दर्शनापुढे अस्वस्थपणे मन नतही होते.

(मुंबई प्रवासः २००४ प्रत्यक्ष अनुभवातून.)

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओझं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ ओझं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मावळतीच्या उतारावरून परत निघालेला निस्तेज सूर्य रोजच दिसतो खरा. पण आज मात्र त्याला पाहून आपसूकच जाणवलं की, आपलीही गाडी आता उताराच्या दिशेने जायला लागली आहे. गाडीतल ओझं फारच वाढल्याचं आताशा  वाटायला लागलंच होतं; आणि उताराला लागण्याआधी ते हलकं करायला हवंच होतं. मग हिम्मत करून आयुष्याचं जडशीळ गाठोड एक दिवस उघडायला घेतलं. त्याला घातलेल्या गाठींमधली पहिली गाठ लवकर सुटली. हेही माझे, तेही माझे करताकरता किती काय काय साठवून ठेवले होते मीच…. आता या अडगळीची विल्हेवाट लावून टाकायचीच अशा निश्चयाने कामाला लागले. कारण अजून थोडी तरी शक्ती बाकी होती. तीही संपल्यावर, हे प्रचंड ओझं सोबत घेऊनच पुन्हा पुढच्या गाडीत बसावं लागणार याची खात्री होती. पहिली गाठ सोडताच दिसल्या, मीच साठवलेल्या असंख्य वस्तू…… काही गरज म्हणून, काही आवडल्या म्हणून, आणि त्याहीपेक्षा जास्त वस्तू, केवळ हिच्याकडे- तिच्याकडे आहेत, मग माझ्याकडे हव्यातच, या हव्यासापोटी घेतलेल्या ….. पण या वस्तू “दानधर्म” म्हणत वाटून टाकणं फारसं अवघड गेलं नाही. दरवेळी मनावर मोठा दगड ठेवून ते काम त्यामानाने सहज उरकलं.

दुसरी गाठ मात्र जास्तच घट्ट होती. ती सोडवण्यात खूप वेळ गेला. आणि मग तो पसारा कसा आवरायचा कळेचना. त्यात होत्या….. नात्या-गोत्यांमुळे, ओळखी-पाळखींमुळे, कळत-नकळतजमा झालेल्या असंख्य आठवणी… काही जागरूकपणे आवर्जून जपलेल्या, आणि बऱ्याचश्या नकळतच साठत गेलेल्या. तो गुंता सोडवतांना हळूहळू लक्षात आलं की, हा पसारा आवरण्यात वेळ घालवण्याची गरज नाही.  उतारावरून जातांना औपचारिक आठवणी आपोआपच घसरून पडतील. आणि आवर्जून जपलेल्या आठवणी.. सोबत नेण्यासाठीच तर वर्षानुवर्षे जपल्यात. मग ती गाठ हलकेच पुन्हा मारून टाकली.

शेवटची गाठ सोडवताना मात्र दम संपायला लागला. खूप प्रयत्नांती थोडे सैल झालेले काही पदर ओढून पाहताक्षणी प्रचंड दचकले. जणू गारुड्याची पोतडीच होती ती. नको नको त्या मिजासींचे खवले मिरवणारे अहंकाराचे पुष्ट साप, द्वेष-असूया-मत्सर अशा जालीम विषांचे डंख मारायला टपलेले विंचू, मोह-मायेचे गोंडस पण फसवे रूप घेऊन वश करणाऱ्या कितीतरी बाहुल्या, ऐहिक सुखाच्या राशींवर बसून अकारण फुत्कारणारे मदमत्त नाग, आणि लहानशा सुखासाठी सुद्धा सतत वखवखलेल्या इंगळ्या………

बाप रे….. हे इतकं सगळं माझ्याकडे कधी, कसं आणि का साठवलं गेलं होतं ते मलाही कळलंच नव्हतं. पण हे ओझं इथेच उतरवून टाकलं नाही तर जिथे जायचंय ते ठिकाण नक्कीच गाठता येणार नाही, याची मात्र आता उशिराने का होईना, खात्री पटली होती. हा पसारा आवरणे खूपच कठीण आणि वेळखाऊ असणार हे मनापासून उमगल आणि मग चंगच बांधला. सुरुवातीला अशक्य वाटून धीर खचायला लागला होता खरा. पण याच पोतडीत अगदी तळाला जाऊन दडलेली दिव्य अस्त्रे नजरेस पडली……. सतप्रवृत्ती, सारासार विवेक आणि आजपर्यंत कधीच न जाणवलेला स्वतःतला ईश्वरी अंश… अशी कित्तीतरी अनमोल अस्त्रे बाहेर काढून लखलखीत केली आणि त्या इतर घातक गोष्टींना वारंवार चांगलंच झोडपून नेस्तनाबूत करणे सुरू केले. हळूहळू पण निश्चितपणे तो पसारा बराचसा आवरला गेला. यात अतिशय वेळ गेला, अंगातलं त्राणच गेलं हे खरं. पण मन मात्र खूप प्रसन्न झालं. आता गाडीत बसतांना ओझं वाटण्यासारखं काहीच बरोबर असणार नव्हतं. असणार होत्या ठेवणीतल्या प्रसन्न आठवणी, आणि भक्तिभावाची कोरांटीची फुलं ….हो. कोरांटीच. कारण आयुष्य सरत आलं तरी, येतांना आणलेले भक्तीच्या मोगरीचे इवलेसे रोप नीट रुजले आहे का ते पहायचं, त्याला खतपाणी घालायच, हे विसरतांना कारणांची कमी भासलीच नव्हती कधी. आणि आवराआवर करतांना शेवटी, एका कोपऱ्यात तग धरून राहिलेली ही कोरांटी दिसली…. त्या मोगऱ्याच्या जागी. पण तिची फुलेही पांढरीशुभ्र होती, त्यामुळे मन जरा शांतावले.  आणि ज्याच्याकडे जायचं होतं त्याला भेट काय द्यायची हा संभ्रम तर नव्हताच …. मी स्वतःच तर होते ती भेटवस्तू…………..

आता गाडी कधीही आली तरी मी तयार आहे ………..

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आगळं वेगळं सुख ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ

 ☆ मनमंजुषेतून ☆ आगळं वेगळं सुख ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ ☆ 

आम्ही दोघेच शिळोप्याच्या गप्पा करत बसलो होतो. सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यापाठोपाठ पाऊस कोसळला. इतका की आम्हाला एकमेकांचे आवाज ऐकू येईनात. मग आम्ही दोघेच आमच्या नव्या नवलाईच्या दिवसांच्या आठवणी मनातल्या मनात आळवत शांत बसून राहिलो.

तीस वर्षांपूर्वी नवीन लग्न झालं. आम्ही आनंदात चिंब भिजत होतो आणि गळणाऱ्या घरात राहत होतो. कौलारू घर गळतीन भरून जायचं .   ठेवायची पातेली आणि थांबला पाऊस की त्यातलं मळकट पाणी द्यायचं  ओतून. ओली जमीन कोरडी करायची आणि पुन्हा परस्परांच्या प्रेमात चिंब व्हायचं असे ते छान दिवस होते.

दोघांनी मिळून घराच स्वप्न पाहिलं खूप मेहनत घेतली. तेव्हापासूनआमचा आयुष्य घाईगडबडीत झालं. उठा, आवरा, पळा, कामावरून या, झोपा ,आवरा, लवकर पळा असं चुकीचं पण आवश्यक. कारण भविष्यात सुख मिळायला हवं. भविष्याबाबत ची अनिश्चितता आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू असते. अशीच स्वस्त पणाने मी आताही घरात बसले होते. शिळोप्याच्या गप्पात कुठेच अनिश्‍चितता डोकावत नव्हती.  गप्पा सरणाऱ्या नव्हत्याच….. पावसाने थांबलेल्या होत्या. अचानक छतावरून एक पावसाचा  थेंब माझ्या डोक्यात पडला. भांबावून जात मी वरती पाहिले. ज्या घराला तीस वर्षे पुरी झाली होती. त्या वास्तुने आलेला पुराचा तडाखा सोसला होता.  आमच्या घराने गतवर्षी इतक्या पावसाने सुद्धा कुठे गळती झाली नव्हती म्हणून आम्ही दोघेही खूप आनंदात होतो.

मी छताकडे पाहिले .एका कोपऱ्यातून टप टप टप संततधार सुरू झाली होती. ती पाहताना माझे डोळे मिटले. जणू बाहेरचा पाऊस  या डोळ्यात आला होता. आमच्या नव्या संसाराच्या नवलाईच्या दिवसाच्या आठवणी जाग्या करत होता. पंखात बळ आल्यावर आमची पाखरे घरट्यातूनउडून गेली होती.

पुन्हा एकदा दोघेच होतो.

पुन्हा एकदा पाऊस होता.

पुन्हा एकदा छत गळत होतं.

तेच टपटपणारे थेंब नव्हते.   यंदा या अनिश्चित वातावरणात कोणी छताची दुरुस्ती करणार आहे नव्हतं.

नवा पाऊस पडणार होता.

मनाचा आभाळ स्वच्छ करणार होता. काऊच घरटं दुरुस्त होणारच होतं. तोवर आठवणींचे आगळेवेगळे थेंब टपटपत राहणार होते……. राहणार होते.

 

© सौ. सुनिता अनंत गाडगीळ

9420761837

Please share your Post !

Shares
image_print