मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओझं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ ओझं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मावळतीच्या उतारावरून परत निघालेला निस्तेज सूर्य रोजच दिसतो खरा. पण आज मात्र त्याला पाहून आपसूकच जाणवलं की, आपलीही गाडी आता उताराच्या दिशेने जायला लागली आहे. गाडीतल ओझं फारच वाढल्याचं आताशा  वाटायला लागलंच होतं; आणि उताराला लागण्याआधी ते हलकं करायला हवंच होतं. मग हिम्मत करून आयुष्याचं जडशीळ गाठोड एक दिवस उघडायला घेतलं. त्याला घातलेल्या गाठींमधली पहिली गाठ लवकर सुटली. हेही माझे, तेही माझे करताकरता किती काय काय साठवून ठेवले होते मीच…. आता या अडगळीची विल्हेवाट लावून टाकायचीच अशा निश्चयाने कामाला लागले. कारण अजून थोडी तरी शक्ती बाकी होती. तीही संपल्यावर, हे प्रचंड ओझं सोबत घेऊनच पुन्हा पुढच्या गाडीत बसावं लागणार याची खात्री होती. पहिली गाठ सोडताच दिसल्या, मीच साठवलेल्या असंख्य वस्तू…… काही गरज म्हणून, काही आवडल्या म्हणून, आणि त्याहीपेक्षा जास्त वस्तू, केवळ हिच्याकडे- तिच्याकडे आहेत, मग माझ्याकडे हव्यातच, या हव्यासापोटी घेतलेल्या ….. पण या वस्तू “दानधर्म” म्हणत वाटून टाकणं फारसं अवघड गेलं नाही. दरवेळी मनावर मोठा दगड ठेवून ते काम त्यामानाने सहज उरकलं.

दुसरी गाठ मात्र जास्तच घट्ट होती. ती सोडवण्यात खूप वेळ गेला. आणि मग तो पसारा कसा आवरायचा कळेचना. त्यात होत्या….. नात्या-गोत्यांमुळे, ओळखी-पाळखींमुळे, कळत-नकळतजमा झालेल्या असंख्य आठवणी… काही जागरूकपणे आवर्जून जपलेल्या, आणि बऱ्याचश्या नकळतच साठत गेलेल्या. तो गुंता सोडवतांना हळूहळू लक्षात आलं की, हा पसारा आवरण्यात वेळ घालवण्याची गरज नाही.  उतारावरून जातांना औपचारिक आठवणी आपोआपच घसरून पडतील. आणि आवर्जून जपलेल्या आठवणी.. सोबत नेण्यासाठीच तर वर्षानुवर्षे जपल्यात. मग ती गाठ हलकेच पुन्हा मारून टाकली.

शेवटची गाठ सोडवताना मात्र दम संपायला लागला. खूप प्रयत्नांती थोडे सैल झालेले काही पदर ओढून पाहताक्षणी प्रचंड दचकले. जणू गारुड्याची पोतडीच होती ती. नको नको त्या मिजासींचे खवले मिरवणारे अहंकाराचे पुष्ट साप, द्वेष-असूया-मत्सर अशा जालीम विषांचे डंख मारायला टपलेले विंचू, मोह-मायेचे गोंडस पण फसवे रूप घेऊन वश करणाऱ्या कितीतरी बाहुल्या, ऐहिक सुखाच्या राशींवर बसून अकारण फुत्कारणारे मदमत्त नाग, आणि लहानशा सुखासाठी सुद्धा सतत वखवखलेल्या इंगळ्या………

बाप रे….. हे इतकं सगळं माझ्याकडे कधी, कसं आणि का साठवलं गेलं होतं ते मलाही कळलंच नव्हतं. पण हे ओझं इथेच उतरवून टाकलं नाही तर जिथे जायचंय ते ठिकाण नक्कीच गाठता येणार नाही, याची मात्र आता उशिराने का होईना, खात्री पटली होती. हा पसारा आवरणे खूपच कठीण आणि वेळखाऊ असणार हे मनापासून उमगल आणि मग चंगच बांधला. सुरुवातीला अशक्य वाटून धीर खचायला लागला होता खरा. पण याच पोतडीत अगदी तळाला जाऊन दडलेली दिव्य अस्त्रे नजरेस पडली……. सतप्रवृत्ती, सारासार विवेक आणि आजपर्यंत कधीच न जाणवलेला स्वतःतला ईश्वरी अंश… अशी कित्तीतरी अनमोल अस्त्रे बाहेर काढून लखलखीत केली आणि त्या इतर घातक गोष्टींना वारंवार चांगलंच झोडपून नेस्तनाबूत करणे सुरू केले. हळूहळू पण निश्चितपणे तो पसारा बराचसा आवरला गेला. यात अतिशय वेळ गेला, अंगातलं त्राणच गेलं हे खरं. पण मन मात्र खूप प्रसन्न झालं. आता गाडीत बसतांना ओझं वाटण्यासारखं काहीच बरोबर असणार नव्हतं. असणार होत्या ठेवणीतल्या प्रसन्न आठवणी, आणि भक्तिभावाची कोरांटीची फुलं ….हो. कोरांटीच. कारण आयुष्य सरत आलं तरी, येतांना आणलेले भक्तीच्या मोगरीचे इवलेसे रोप नीट रुजले आहे का ते पहायचं, त्याला खतपाणी घालायच, हे विसरतांना कारणांची कमी भासलीच नव्हती कधी. आणि आवराआवर करतांना शेवटी, एका कोपऱ्यात तग धरून राहिलेली ही कोरांटी दिसली…. त्या मोगऱ्याच्या जागी. पण तिची फुलेही पांढरीशुभ्र होती, त्यामुळे मन जरा शांतावले.  आणि ज्याच्याकडे जायचं होतं त्याला भेट काय द्यायची हा संभ्रम तर नव्हताच …. मी स्वतःच तर होते ती भेटवस्तू…………..

आता गाडी कधीही आली तरी मी तयार आहे ………..

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आगळं वेगळं सुख ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ

 ☆ मनमंजुषेतून ☆ आगळं वेगळं सुख ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ ☆ 

आम्ही दोघेच शिळोप्याच्या गप्पा करत बसलो होतो. सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यापाठोपाठ पाऊस कोसळला. इतका की आम्हाला एकमेकांचे आवाज ऐकू येईनात. मग आम्ही दोघेच आमच्या नव्या नवलाईच्या दिवसांच्या आठवणी मनातल्या मनात आळवत शांत बसून राहिलो.

तीस वर्षांपूर्वी नवीन लग्न झालं. आम्ही आनंदात चिंब भिजत होतो आणि गळणाऱ्या घरात राहत होतो. कौलारू घर गळतीन भरून जायचं .   ठेवायची पातेली आणि थांबला पाऊस की त्यातलं मळकट पाणी द्यायचं  ओतून. ओली जमीन कोरडी करायची आणि पुन्हा परस्परांच्या प्रेमात चिंब व्हायचं असे ते छान दिवस होते.

दोघांनी मिळून घराच स्वप्न पाहिलं खूप मेहनत घेतली. तेव्हापासूनआमचा आयुष्य घाईगडबडीत झालं. उठा, आवरा, पळा, कामावरून या, झोपा ,आवरा, लवकर पळा असं चुकीचं पण आवश्यक. कारण भविष्यात सुख मिळायला हवं. भविष्याबाबत ची अनिश्चितता आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू असते. अशीच स्वस्त पणाने मी आताही घरात बसले होते. शिळोप्याच्या गप्पात कुठेच अनिश्‍चितता डोकावत नव्हती.  गप्पा सरणाऱ्या नव्हत्याच….. पावसाने थांबलेल्या होत्या. अचानक छतावरून एक पावसाचा  थेंब माझ्या डोक्यात पडला. भांबावून जात मी वरती पाहिले. ज्या घराला तीस वर्षे पुरी झाली होती. त्या वास्तुने आलेला पुराचा तडाखा सोसला होता.  आमच्या घराने गतवर्षी इतक्या पावसाने सुद्धा कुठे गळती झाली नव्हती म्हणून आम्ही दोघेही खूप आनंदात होतो.

मी छताकडे पाहिले .एका कोपऱ्यातून टप टप टप संततधार सुरू झाली होती. ती पाहताना माझे डोळे मिटले. जणू बाहेरचा पाऊस  या डोळ्यात आला होता. आमच्या नव्या संसाराच्या नवलाईच्या दिवसाच्या आठवणी जाग्या करत होता. पंखात बळ आल्यावर आमची पाखरे घरट्यातूनउडून गेली होती.

पुन्हा एकदा दोघेच होतो.

पुन्हा एकदा पाऊस होता.

पुन्हा एकदा छत गळत होतं.

तेच टपटपणारे थेंब नव्हते.   यंदा या अनिश्चित वातावरणात कोणी छताची दुरुस्ती करणार आहे नव्हतं.

नवा पाऊस पडणार होता.

मनाचा आभाळ स्वच्छ करणार होता. काऊच घरटं दुरुस्त होणारच होतं. तोवर आठवणींचे आगळेवेगळे थेंब टपटपत राहणार होते……. राहणार होते.

 

© सौ. सुनिता अनंत गाडगीळ

9420761837

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जेष्ठ नागरिक दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ मनमंजुषेतून ☆ जेष्ठ नागरिक दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

(काही तांत्रिक अडचणीमुळे  ‘जेष्ठ नागरिक दिन,’ हा  लेख काल लागू शकला नाही. तो आज लावत आहोत. –  ब्लॉग संपादक)

आयुष्यात घडलेल्या घटनांच्या माध्यमातून मला जे काही शिकायला मिळाले किंवा समाजात इतर ठिकाणी पाहावयास मिळाले त्याचेच हे सार. .

एक पिढी आणि दुसरी पिढी. . .  दरम्यान कोसळून पडलेल्या पुलाप्रमाणे घडलेल्या घटनांवर आधारित. .

वार्धक्याने वाकलेल्या खांद्याविषयी. . ज्यावर बसून आपण अनेक गोष्टींचा मनमुराद आनंद लुटला. . कंपवायूने थरथरत असलेल्या हातांनी कधी काळी मुलांना हाताला धरून चालायला शिकविले पडता पडता सावरले त्या हातांनी. . . मुलांना शांत झोप लागावी म्हणून ज्या ओठांनी अंगाई गीत म्हटले. . . त्याच ओठांना आपल्या मुलांकडून “गप्प बसा,  एक शब्दही बोलू नका ” असा धमकीवजा आदेश मिळतो.  हे सत्य आहे. . .  पण जमाना बदलला आहे.  त्याच बरोबर जीवनही बदलले आहे. . .

आमच्या वयाच्या लोकांनी आठवावे? कसे आपण नात्यांमध्ये एकमेकांच्या बंधनात गुरफटलेलो होतो.  आई वडिलांच्या हसर्‍या चेहर्‍यात साक्षात ईश्वराचे रूप बघत होतो.  त्यांच्या चरणी स्वर्ग दिसत होता. . पण आताची पिढी जरा जास्तच हुशार झाली आहे.  आणि खरं सांगायचे झाले तर अगदी प्रॅक्टिकल झाली आहेत. . . आजकालची पिढी (मात्रं काही अपवाद आहे हं बरं ) आई वडिलांना शिडीसमान मानते.  शिडीचा उपयोग फक्त वर जाण्यासाठीच असतो असा त्यांचा झालेला गोड गैरसमज. . . शिडी जुनी झाली की इतर अडगळीच्या वस्तूंबरोबर ती सुद्धा अडगळीत जाते किंवा कधी जाईल याचा भरवसा देता येत नाही. . आपल्या संसाराच्या ह्या रहाटगाडयात मुलांना योग्य संस्कार देण्यात कुठे कमी पडलो की काय? असा प्रश्न उपस्थित राहतो किंवा कळत देखील नाही. .  असो. . . .

जीवन हे एखाद्या वृक्षासारखे असते.  आई- वडील हे काही कुठल्या शिडीच्या पायर्‍या नव्हेत.  तर ते जीवनाच्या वृक्षांचे मूळ आहेत.  झाड कितीही मोठे होऊ दे हिरवेगार राहू दे. . परंतू त्याचे मूळच कापून टाकले तर ते हिरवेगारपणाचच काय ?मग ते समूळ झाडचं नष्ट होईल.

मुलांच्या जीवनातील पहिले पाऊल उचलण्या मध्ये ते मदत करू शकतात तर तीच मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांच्या लडखणार्‍या पावलांना सावरण्याचा प्रयत्न का करू शकत नाही?  आयुष्यभर आपल्या मुलांच्या सुखाची,  त्यांच्या आरोग्याची कामना करणारे,  त्यांच्या साठी कष्ट करणारे आई वडील या जगात कमी आहेत का? ज्यांच्यासाठी आपल्या आवडीनिवडीला तिलांजली देऊन त्यांना मोठे करणाऱ्या,  समाजात त्यांना मानाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या या आई वडिलांना आजच्या पिढीकडून किती उपेक्षा सहन करावी लागते/होते. त्यांना किती कष्टमय जीवन जगावे लागते.  आधार असूनही निराधार अवस्थेत रहावे लागत आहे.  आजकाल तर  असे चित्र पाहावयास मिळत आहे आणि पाहण्यातही आले आहे.  परंतू आजची ही पिढी हे विसरू पहात आहे कि आज ही स्थिती त्यांची झाली आहे तीच परिस्थिती उदया तुम्ही जेंव्हा वृद्ध व्हाल त्यावेळी तुमच्यावरही येणार आहे.

आपण देखील उद्या वृद्ध होणार आहोत.  आपल्यालाही प्रेमाची,  शारिरीक व मानसिक आधाराची गरज भासणार आहे. . . .  म्हणूनच म्हणते वेळीच सावध व्हा. . .

आपल्या वृद्धपकाळासाठी शक्यतो आधीपासूनच तरतूद करून ठेवा. . . जर आपण मुलांचे पालनपोषण करू शकतो तर स्वतःचे पालनपोषण शेवटपर्यंत नाही का करू शकणार?

असा मी मनाला विचारलेला प्रश्न. . . . पण त्याचे उत्तर मात्र अनुत्तरीतच. . .

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

9870451020

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक अविस्मरणीय अनुभव ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ एक अविस्मरणीय अनुभव ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

अविस्मरणीय प्रसंग –

हा प्रसंग आहे, नवसाक्षरांच्या मूल्यमापनाच्या समितीत मी होते आणि नवसाक्षरांचं म्हणजे प्रौढांच्या शैक्षणिक प्रगतीचं मूल्यमापन करत होते, तेव्हाचा. बहुदा 1994 हे वर्ष असावे.

मीरजेच्या वेगवेगळ्या भागात मूल्यमापनासाठी आम्ही जायचो. हे वर्ग संध्याकाळी भरायचे. मूल्यमापनाचे काम रात्री करावे लागे. समितीत आम्ही 8-10 जण होतो. शिक्षण विभागाची जीप साध्याकाळी सर्वांना घेऊन जाई. प्रत्येकाला एकेका गावात उतरवत. शेवटच्या गावात तासभर जीप थांबे व क्रमाक्रमाने सगळ्यांना घेऊन येई व घरोघरी पोचवलं जाई.

त्या दिवशी मिरज तालुक्याच्या पूर्व भागात आमचेमूल्यमापन होते. मी ठरलेल्या ठिकाणी उतरले. अरग, बेडगच्या पुढचं गाव होतं. गावात समितीचीच्या सदस्यांना सहकार्य करण्यासाठी सरकारी आदेश दिलेले होते. एका झाडाजवळ मला उतरवून जीप पुढल्या गावी निघाली आणि जोरात पाऊस सुरू झाला. तिथे बसलेल्या तिघांजवळ मी प्रौढशिक्षण वर्गाची चौकशी केली. तो तिथून दूरच्या वस्तीवर असल्याचे कळले. ‘तुम्ही म्हणत असात, तर जाऊ या’,  लोकांचा काही सहकार्य करण्याचा मानस दिसला नाही. तिथले लोक म्हणाले, या पावसात तिथे कुणी आलेले नसणार,’ मलाही तसंच वाटत होतं. वर्ग चालू नसेल, तर घरोघरी जाऊन  मूल्यमापन करावे, आशा आम्हाला सूचना होत्या. पण पावसानंतर इतका चिखल झालेला होता की चिखलातून त्या वस्तीवर जाणेही अवघड होते. दिवे गेलेले होते. सगळीकडे अंधार. काय करावे, या विचारात मी असताना तिथे मिरज तालुक्याचे तहसीलदार आले. ते गावात काही कामासाठी आले होते व मिरजेला घरी परत चालले होते. मी एकटीच बाई माणूस तिथल्या काही लोकांशी बोलते आहे असं बघून ते थांबले. पाऊस एव्हाना थांबला होता. मी त्यांना विनंती केली की ते मला घरी सोडतील का? कारण जीप येईपर्यंत कुठे कसे थांबावे कळेना. त्यांची मोटरसायकल होती. ते ठीक आहे म्हणाले. मी जीप आली की गेल्याचा निरोप द्या,  असं सांगून निघाले. त्यावेळी मोबाईल आलेला नव्हता. तिथल्या लोकांनी बला टळली म्हणून हुश्य केले असणार.

नाही म्हंटले तरी अनोळखी व्यक्तीबरोबर आपण रात्रीच्या वेळी निघालो आहोत. थोडीशी धडधड होत होतीच. रस्त्यात फारशी, का जवळ जवळ वाहतूक नाहीच. मला हिन्दी मराठी सिनेमातले, एकटी शिक्षिका किंवा नर्स निघाली आहे आणि तिच्यावर कसे, कसले प्रसंग ओढवतात, याची चित्रे मन:चक्षूंपुढे उभी राहिली.  वर्तमानपत्रातल्या बातम्या आठवू लागल्या.

वीसेक मिनिटांच्या प्रवासानंतर वाटेत एका ओढ्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असताना दिसले. पाण्याला चांगलाच वेग होता. तो वेग पाहून मी त्यांना विचारले, मी खाली उतरून चालत येऊ का? ते नको म्हणाले. त्यांनी योग्य गतीने मोटरसायकल त्या फरशीवरील पाण्यातून बाहेर काढली. 4-5 मिनिटात आम्ही त्या पाण्यातून बाहेर पडलो. चालत येणंच जास्त धोकादायक होतं, हे माझ्या नंतर लक्षात आलं. त्या चार-पाच मिनिटात मला ओढ्यातून कुणी कुणी वाहून गेल्याच्या बातम्या आठवत होत्या. थोडं पुढे गेल्यानंतर त्यांनी मला सूचना दिली की मी काहीही बोलू नये. सुमारे पंधरा- वीस मिनिटे गेली आणि ते म्हणाले, आता आपण सुरक्षित ठिकाणी पोचलो आहोत. मागचा टापू हा दरोडेखोरांच्या हल्ल्यासाठी कुप्रसिद्ध होता. त्यानंतर आम्ही मिरजेत पोचलो. देवासारख्या धावून आलेल्या या तहसीलदारांनी मला सांगलीला घरी आणून पोचवले. या देवमाणसाचे नाव आज मला आठवत नाही, याची खंत वाटते.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळ आला होता पण ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ काळ आला होता पण ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

रोजच्यासारखीच मी बँकेत जायला निघाले होते. आदल्या दिवशी पित्ताचा प्रचंड त्रास झाल्याने खूप अशक्तपणा

जाणवत होता. पण किल्ल्यांची जबाबदारी असल्याने जाणे भागच होते. म्हणून टूव्हीलर ऐवजी रिक्षाने निघाले होते. एक दीड कि. मि. गेले असेन, आणि अचानक मला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. छाती जड झाली. कुणीतरी बरगड्यांची घट्ट मोळी बांधत आहे असं वाटायला लागलं. जीवाची घालमेल व्हायला लागली.

नकळत मी रिक्षाच्या सीटवरच आडवी झाले… परत उठत होते ..झोपत होते. माशासारखी तडफड व्हायला लागली. रिक्षा वाला पार घाबरून गेला. “परत” घरी सोडतो म्हणाला. पण परत जाईपर्यंत मी मरेन असं मला आतून तीव्रपणे जाणवत होतं. पुढे वाटेत एक नामांकित हॉस्पिटल असल्याचं आठवलं.

‘तिथे घेऊन चला’ म्हटल्यावर ‘रस्ता माहिती नाही’ म्हणत तोच रडवेला झाला. मग मीच कसातरी रस्ता दाखवला.

तिथे पोहोचताच तिथल्या मोठ्या लॉबीतून कशीबशी चालत मी रिसेप्शनपाशी गेले. तिथली मुलगी फोनवर बोलण्यात इतकी गुंग होती की तिने माझ्याकडे बघितलेही नाही. आता आधार घेत उभे राहणेही अशक्य होत होतं.

समोर एक स्ट्रेचर ट्रॉली दिसताच मी कशीतरी जाऊन त्यावर झोपले. काही मिनिटे मी तिथेच तडफडत पडले होते. तिथून चाललेल्या वयस्करशा दोन ‘ मावशींनी’ मला पाहिलं आणि पटकन ती ट्रॉली ढकलत मला आत कुठेतरी नेऊन ठेवलं.

शिकाऊ दिसणारे दोन तीन डॉक्टर्स तिथे बसलेले होते. वॉर्डबॉयने मला तिथल्या टेबलवर झोपवलं. माझी तळमळ जास्त वाढली होती. मग एक एक करत तिथला प्रत्येक जण घरचा, बँकेचा फोन नंबर विचारायला लागला.

‘आधी काहीतरी इलाज करा‘

असं शेवटी मी ओरडले, तेव्हा ऑक्सिजन मास्क लावला गेला यात किती वेळ गेला कोण जाणे. मग आमचे मॅनेजर सर्वात आधी तिथे पोहोचले.

कुठल्याशा फॉर्मवर त्यांनी सही केली, आणि ” काळजी करू नका” एवढेच बोलून, किल्ल्या घेऊन ते निघूनही गेले. पुन्हा मी सोडून सगळे शांत … एव्हाना माझा घसा आवळल्यासारखा व्हायला लागला होता. छाती-पाठ- मान गळच प्रचंड दुखत होतं. शुद्ध हरपेल असं वाटत होतं. मग त्यांनी मला एक इंजेक्षन दिलं, आणि स्ट्रेचर-ट्रॉलीवर झोपवून लिफ्टमध्ये नेले. लिफ्टमध्ये मला माझी बहीण दिसली आणि माझी शुद्ध पूर्ण हरपली.

संध्याकाळी कधीतरी मी शुद्धीवर आले….आणि सकाळपासून घडलेला एक एक प्रसंग मला आठवायला लागला. प्रत्येक प्रसंगात, माझं आयुष्य संपवायला आलेला काळ जाणवायला लागला.

पण तरी अजून मी जिवंत कशी काय होते?….. मग हळूहळू लक्षात यायला लागलं की…… काळ आला होता हे तर १००% सत्य होतं, कारण त्या अवस्थेत ते मला क्षणाक्षणाला जाणवत होतं. पण वेळ? ती नक्कीच आली नसावी. कारण ती आली असती ,तर त्याही अवस्थेत हॉस्पिटलमध्ये जाण्याची अंतः प्रेरणा श्री स्वामींनी मला दिलीच नसती. रिक्षावाला मला वाटेतच उतरवू शकला असता.

त्या दोन मावश्यांना माझ्याकडे लक्ष द्यावं असं वाटलं नसतं. जे एक अत्यावश्यक इंजेक्शन तेव्हा मला दिलं लं, ते केमिस्टकडून आणायला माझ्याबरोबर कुणीच नव्हतं हे लक्षात येताच तिथला वॉर्ड – बॉयरुपी देवमाणूस ट्कन जाऊन, त्या इंजेक्शनचे ४००० रू स्वतःच्या नावावर लिहायला सांगून, ते घेऊन आला नसता. अर्थात हे मला नंतर कळलं होतं……. आणि या सगळ्यांनी मिळून, काळ बरोबरच घेऊन आलेल्या त्या वेळेला भक्कमपणे अडवून गदी वेळीच परतून लावलं होतं, म्हणून मी जिवंत राहिले होते…..त्या सर्वांची मी आजन्म ऋणी आहे.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर तपासायला आले तेव्हा अगदी गंभीरपणे म्हणाले की” अजून अर्धा तास उशीर झाला असता तर यांचं काही खरं नव्हतं”……. आणि त्यांच्या त्या बोलण्याने मला मात्र तेव्हा नकळतच हसू आलं होतं.

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

पत्ता : ४, श्रीयश सोसायटी, ५७१/५७२, केंजळे नगर, पुणे  ४११०३७.

मोबाईल: ९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अहंकार ☆ डाॅ मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ अहंकार ☆ डाॅ मेधा फणसळकर ☆ 

मनुष्याला ‛मी’ पण मिळवून देणारा सार्थ शब्द म्हणजे ‛अहंकार’! मनुष्य हा बुद्धिवादी प्राणी आहे. म्हणूनच इतर पशु- पक्ष्यांपेक्षा तो वेगळा गणला जातो. आपल्या भावना तो आपल्या संवादातून , कृतीतून व्यक्त करु शकतो. म्हणूनच  जिथे सुख आहे तिथे दुःख, जिथे प्रेम आहे तिथे द्वेष आणि जिथे राग आहे तिथे लोभ हे हातात हात घालून असतात. त्यामुळेच जिथे स्वत्व आहे तिथे ‛अहम्’ असलाच पाहिजे असा अलिखित नियम आहे.

हा अहम् माणसाला कोणत्या स्तरापर्यंत पोहोचवू शकतो याची शेकडो उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात. या ‛अहम्’ नेच हिटलरचा बळी घेतला. जग जिंकणारा सिकंदर या ‛अहम्’ पुढेच नमला. आपल्या मुझद्दीपणाने अनेक लोकांचा बळी घेणारा औरंगजेबाचा  अहम् चा तोरा  संभाजीराजांसारख्या राष्ट्रनिष्ठ व्यक्तीच्या देशभक्तीपुढे फिका पडला. मात्र अहम् ला जिंकणारे या जगात अजरामर झाले.स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ,जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, मदर तेरेसा…… किती नावे घ्यावीत तेवढी थोडीच आहेत.

खरं तर मनुष्य जन्माला येताच त्याचा ‛को$हम्’ (मी कोण?) चा प्रवास सुरु होतो. परंतु ‛अहम् ब्रह्मा$स्मि’ (मी ब्रह्म आहे) पर्यंत सर्वांचा प्रवास होतोच असे नाही. त्यामुळे हा अहम् च आपण कुरवाळू लागतो.

लहान असताना आपण पंचतंत्रात एक गोष्ट वाचली होती . त्यामध्ये बेडकीची पिल्ले गाय बघून येतात आणि आईकडे तिचे वर्णन करतात. ती केवढी मोठी होती हे समजण्यासाठी ती स्वतःचे शरीर फुगवून “ एवढी मोठ्ठी का?”असे विचारते. तेव्हा मुले म्हणतात,“नाही, त्यापेक्षा मोठ्ठी!” मग बेडकी आणखी अंग फुगवते. पुन्हा विचारते, मुले पुन्हा नकार देतात, पुन्हा ती फुगते व फुगत फुगत शेवटी मरुन जाते. त्याचप्रमाणे आपण या अहम् चा  फुगा फुगवू लागतो. आपल्याच कौतुकात आपण मग्न होऊन जातो. त्यामध्ये आपण इतरांचा बळी घेतो आहोत हे लक्षातच येत नाही.मात्र कधीतरी या भ्रमाचा भोपळा फुटतो व आपण जमिनीवर येतो. पण त्यावेळी हातात  बाकी शून्य राहिलेली असते.

पण अहंकार सोडणे म्हणजे स्वाभिमान सोडणे नव्हे. जिथे गर्वाची भावना येते तिथे अहम् वाढतो.मात्र आत्मसन्मान स्वाभिमान वाढवतो. आमचा ‛आयुर्वेद’ म्हणता म्हणता अमेरिकेसारखा देश आमच्या देशातील हळदीसारख्या औषधी वनस्पतींचे पेटंट मिळवते. जगात क्रिकेटमध्ये  अव्वल नंबरवर असणारे आम्ही वर्ल्ड कप क्रिकेटमधून बाहेर पडतो किंवा एक अहवाल ओबामाना सांगतो की त्यांच्या देशातील बरीच ‛ टॅलेंट’ ही भारतीय आहे ज्याचा उपयोग ते त्यांच्या देशाच्या प्रगतीसाठी करुन घेतात. किंवा आमच्या सहिष्णुतेला दुर्बलता समजून पाकिस्तान किंवा चीनसारखे देश आम्हालाच आव्हान देत घुसखोरी करतात.  या सर्व घटना खरोखरच आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या आहेत. म्हणूनच आता केवळ अहम् कुरवाळण्यापेक्षा स्वाभिमानाची कास धरण्याची गरज आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विस्मरणात खरोखर जग जगते ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी 

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

स्वपरिचय 

मी एस्. एन्. कुलकर्णी. मुळचा सोलापूरचा. शालेय आणि काॅलेज शिक्षण सोलापुरातच पूर्ण झाले. बॅंक ऑफ़ महाराष्टमधून ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालो. नौकरीनिमीत्त महाराष्टातील अनेक शहरात राहणे आले. तेथील समाजजीवन अनुभवता आले. लहानपणापासून वाचनाची आवड़ती  आजपर्यंत जोपासली आहे . आता पुणे येथे स्थिरावलो आहे.

☆ मनमंजुषेतून ☆ विस्मरणात खरोखर जग जगते  ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

जवळ जवळ ५३/५४ वर्षापूर्वीचा प्रसंग/घटना आहे ही. १९६७ मध्ये मी मॅट्रीकला शाळेत शिकत होतो. मार्च महीना होता. बोर्डाच्या परिक्षेचे दिवस होते. मॅट्रीकला आम्हाला त्यावेळी पुष्पा आगरकरबाई ह्या मराठी शिकवत होत्या. अतिशय छान मराठी शिकवावयाच्या. गद्य असो वा पद्य त्या अाम्हाला मन लावून शिकवायच्या. “मरणात खरोखर जग जगते” ही भा. रा. तांबेंची कविता त्यानी आम्हाला खुप छान प्रकारे शिकविली. या विषयावर बोर्डाच्या परिक्षेत निबंधसुध्दा येऊ शकेल अशी शक्यता बोलुन दाखविली. त्यामुळे त्यानी निबंधाचीपण तयारीपण करून घेतली.

बोर्डाची परिक्षा सुरू झाली. पहीलाच पेपर मराठीचा होता. पेपर सुरू झाला. ऊत्तरपत्रिका तसेच प्रश्र्नपत्रिकेचेही वाटप झाले. पहिलाच प्रश्र्न निबंधाचा होता.  चार पांच विषय होते आणि त्यामध्येच “विस्मरणात खरोखर जग जगते” हाही विषय होता. मुलांमध्ये चुळबुळ सुरू झाली. मी शेवटी वर्गावरच्या शिक्षकांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली.  छपाईची चुक असावी असेही मी बोललो. त्यानीपण ही गोष्ट गांभीर्याने घेऊन मुख्याध्यापकांच्या नजरेस आणून दिली. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते.  एका शहारातून दुसर्‍या शहरात फोन लावायचा असेल तर फोन बुक करावा लागायचा. बराच वेळ लागायचा फोन लागायला. जवळ जवळ तासानी पुण्याला बोर्डाकडे फोन लागला. बोर्डाने स्पष्ट केले की निबंधाचे सर्व विषय बरोबर आहेत. त्यामध्ये छपाईची चुक नाही. हे समजताच विद्यार्थी नाराज झाले. आज  आठवत नाही पण कोणत्या तरी विषयावर निबंध लिहुन ऊत्तरपत्रिका शिक्षकांकडे दिली आणि मी बाहेर पडलो.

आज हा प्रसंग आठवला आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात आले. बरे झाले मी त्यावेळी “विस्मरणात खरोखर जग जगते” या विषयावर निबंध नाही लिहीला. या विषयाला मी न्याय देऊ शकलो नसतोच.  आपल्या रोजच्या जीवनात असे अनेक कटु प्रसंग घडतात, दु:खद प्रसंग घडतात. प्रिय व्यक्तिंचा मृत्यु असो, अपघात असो, अपमानाचे प्रसंग असो अशा अनेक गोष्टी आपण जस जसा काळ सरत जातो तस तसे अशा गोष्टी आपण विसरण्याचा प्रयत्न करतो. खर तर अशा गोष्टी विसरल्या तरच आपण वर्तमानकाळात जगु शकतो. अशा दु:खद गोष्टींचे आपल्याला विस्मरण झाले तरच आपण रोजचे आयुष्य जगु शकतो.  वाईट गोष्टींचे विस्मरण हेच तर आपल्या रोजच्या जगण्याला अतिशय आवश्यक बाब आहे. भुतकाळाचे विस्मरण हे रोजच्या आनंदी जगण्याचा पाया आहे.  भुतकाळातील वाईट गोष्टी, दु:खद प्रसंग आपण विसरले पाहीजेत.  आत्ता मी या विषयावर इतका विचार करू शकलो.  मॅट्रीकमधील विद्यार्थ्यानी इतका विचार केला असता कां आणि विषयाला न्याय देऊ शकला असता कां? नक्कीच नाही.

 

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थोडं स्वतःसाठी ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ थोडं स्वतःसाठी ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

 

“स्वत:साठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास” हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत असतो. ते पूर्णपणे खरं आहे. पण या वाक्याचा विपर्यास ही झालाय असं आपलं मला वाटतं.

आजूबाजूला काय दिसतं?

पूर्ण आयुष्य संसाराला, मुलांना वाहिलेली गृहिणी असते. तिचं समर्पण वंदनीय असतं. पण सतत दुसऱ्यांच्या म्हणजे मुलांच्या, घरातल्या संदर्भात जगण्याची तिला सवय होते. मात्र एका वळणावर मुलं स्वयंपूर्ण होतात. त्यांचं आईवर खूप प्रेम असलं तरी दैनंदिन आयुष्यात आईची गरज कमी होते. घरही स्थिरस्थावर होतं. मग मिळालेल्या या एवढ्या मोठ्या वेळेचं करायचं काय हा प्रश्न पडतो. शरीराची दुखणी, मनाचा एकटेपणा यांचा संबंध मग जुन्या घटनांशी, व्यक्तींशी, अगदी ज्यांच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकलं, त्या

मुलांशीही जोडला जातो.

पुरूषांचं  हेच होतं. नोकरी, व्यवसायातले कष्ट संपतात. घरात राहण्याचा वेळ वाढतो. मग घरातल्या अनेक गोष्टी ज्या वर्षानुवर्षे चालू होत्या पण जाणवलेल्या नव्हत्या , त्या अचानक जाणवायला  लागतात. बारिक सारिक गोष्टीत हस्तक्षेप सुरू होतो. समाजातल्या,  राजकारणातल्या समस्यांवर कृतीशून्य चर्चा मोठ्या उत्कटतेने सुरू होते. आणि समवयस्कांखेरीज इतरांना त्यातली निरर्थकता जाणवल्यामुळे ती निरस वाटू लागते.

या दोन्ही मागचं कारण मला वाटतं, आपण नेहमी”दुसऱ्यांच्या संदर्भात”जगतो. “दुसऱ्यांसाठी”असं मी म्हणणार नाही. कारण दुसऱ्यांसाठी आपण जे करतो त्याचा आपल्याला आनंद होतो म्हणून करतो हे खरं आहे. त्यामुळं तसं आपण दुसऱ्यांसाठी काहीच करत नाही. दुसऱ्यांच्या संदर्भात करतो. तर आपण मूलतः आपल्यासाठी जन्मलो आहोत आणि आपल्यासाठी जगतो आहोत हेच आपण विसरतो.

आपण सवड असली तरी व्यायाम करत नाही,  फिरायला जात नाही. स्वत:साठी योग्य ते खात नाही.

मनाला विकसित करण्यासाठी ध्यान, स्वसंवाद,  विवेकपूर्ण विचारप्रक्रियेची समज याकडे लक्ष देत नाही. (अर्थात या विवेकाची सवय लगेच होत नाही. बऱ्याचवेळा अविवेकानं वागून झाल्यावर “अरेरे. . . चुकलं आपलं”असं वाटतं. )पण तेही ठीक आहे. निदान यामुळे दुसऱ्यांवर रागवण्याचा क्षणिक उद्रेक झाला तरी नाराजीची पुटं चढत नाहीत मनावर.

स्वत:साठी काही पाठांतर करण्यात आपण वेळ देत नाही. कारण पाठांतर वगैरे लहान मुलांशी संबंधित. . . आता या वयात मला काय गरज? असं वाटतं. पण वाढत्या विस्मरणशक्तीवर काही श्र्लोकांच्या पाठांतरासारखे इतरही स्मरणशक्तीचे व्यायाम उपयुक्त असतात.

यातल्या कशालाही पैसे लागत नाहीत. २४तासात कमी होत चाललेल्या आणि कधीकधी वाढलेल्यासुध्दा जबाबदाऱ्या सांभाळून यातलं सगळं नाही पण थोडं काहीतरी आपण करू शकतोच. पण असं फक्त स्वत:साठी काही करायची आपल्याला सवय नसते. या अर्थानं स्वत:साठी जगणं हे फार महत्त्वाचे आहे. पैसा उडवणं आणि गुंतवणं यात फरक आहे. तोच फरक स्वत:पुरतं जगणं आणि स्वत: साठी जगणं यात आहे असं मला वाटतं. स्वत:पुरतं जगताना तुम्हाला दुसऱ्याचा विचार करायची,  दुसऱ्यासाठी झिजण्याची गरज नसते. पण स्वत:साठी जगण्यासाठी दुसऱ्यांसाठीचं जगणं सोडायची गरज नसते. गरज असते ती फक्त सतत दुसऱ्यांच्या संदर्भात जगणं सोडायची.

हेच तर “कैझान”आहे जे आपण कंपन्यांमध्ये राबवतो पण स्वत:च्या  आयुष्यात कैझानची गरज आणि ते अत्यंत छोट्या गोष्टीतून कसं इंम्प्लिमेंट करता येईल याचा विचार करतच नाही. माझ्या posts हे माझं loud thinking ही असतं हं. . . कारण मीही प्रवासीच आहे की कैझानची.

© सौ. राजलक्ष्मी देशपांडे

मोबाईल नं. ९८५०९३१४१७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  व्यूह आणि रचना ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ मनमंजुषेतून ☆  व्यूह आणि रचना ☆ श्री अरविंद लिमये ☆

मराठी भाषेच्या शब्दसौंदर्याइतकाच तिचे शब्दसामर्थ्य हाही सखोल अभ्यासाचा विषय आहे. व्यूह हा शब्द याचीच प्रचिती देणारा वाटतो. चांगले आणि वाईट असे दोन्ही अर्थ ल्यालेला हा शब्द!बेत, योजना, धोरण, युक्ति, हे जसे सकारात्मकता ध्वनीत करणारे अर्थ, तसेच कट, कारस्थान, डाव, डावपेच असे नकारात्मकतेच्या कृष्णछायाही याच शब्दाच्या. . ! युध्दात युध्दनीति, रणनीति ठरवताना शत्रुपक्षाच्या कसब/कुवतीचा अंदाज/अभ्यास जसा महत्वाचा तसाच त्यांच्या रणनीतिला छेद देण्यासाठी बुध्दीकौशल्यही तेवढेच आवश्यक. . ! हे बुध्दीकौशल्य अपरिहार्य ठरतं जेव्हा शत्रूपक्ष सर्वार्थाने प्रबळ असतो. ठाम निर्धार, खंबीर मन,  संघटन कौशल्यआणि उत्कट राष्ट्रप्रेम याच मुख्य भांडवलाला तीव्र बुध्दीमत्तेची जोड मिळाली आणि शिवाजीमहाराजांनी अतिशय प्रबळ मोगलसम्राटाशी लढताना युध्दनिती ठरवली ती स्वनिर्मित अशा ‘गनिमी कावा’या संकल्पनेनुसार. . !

व्यूह या शब्दाला रचनाकौशल्याची जोडही तेवढीच आवश्यक असते. विशेषत: बुद्धीबळासारख्या खेळात(लुटूपुटूच्या लढाईत)सुध्दा व्यूहरचनाकौशल्य अपरिहार्यच. . !

युध्दरचना, युध्दनीति यांची कसोटी लागते ती रणांगणावर हे कालपरवापर्यंतचं

वास्तव होतं. पण कालौघात व्यूहरचनेची गरज ही आज कुटुंबव्यवस्थेलाच खिळखिळी करु पहात आहे. सहजीवनातील अस्वस्थता, घटस्फोटांचं वाढत चाललेलं प्रमाण ही कौटुंबिक पातळीवरील छुप्या युध्दाचीच परिणती. या रणांगणावर व्यूह शब्दाचे नकारात्मक अर्थच ठळक होतात आणि ते सार्थ ठरवायला कट कारस्थानं प्रबळ होतात. टोकाचा आत्मकेंद्रीपणा नात्यातला गोडवा शोषून घेत स्वत; पुष्ट होत जातो आणि युध्दशस्त्रं परजली जातात. परस्पर सामंजस्य रणांगणावरील युध्दविरामासाठी अपरिहार्य असतं तसंच गृहकलहातही. देवाणघेवाण तिथल्यासारखी इथेही. पण इथे त्याची जाणिव  व्हायची तर ती उशीरा सुचलेल्या शहाणपणा सारखी नसावी हे आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण त्या युध्दांच्या बाबतीत रम्य वगैरे असणार्या ’ युध्दस्य कथा’ या प्रकारच्या युध्दात मात्र अतिशय क्लेशकारक असतात. . . !

 

© श्री अरविंद लिमये

सांगली.

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनोबल ☆ सुश्री अनुराधा फाटक

☆ मनमंजुषेतून ☆ मनोबल ☆ सुश्री अनुराधा फाटक

मन हे माणसाचे सहावे इंद्रिय आहे.नाक,कान,डोळे, रसना आणि त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांना माणूस जेवढा ओळखतो त्याच्या पावपटही तो या सहाव्या इंद्रियाला ओळखत नाही.त्याचे सर्वात महत्वाचे कारण ही पाच ज्ञानेंद्रिये शरीरबाह्य आहेत आणि मन हे देहान्तर्गत आहे.जशी पाच ज्ञानेंद्रिये आपण दाखवू शकतो तसे मन दाखविता येत नाही.

मन दिसत नसले तरी सर्व इंद्रियामध्ये ते बलवान असते.सर्वावर त्याची सत्ता असते.जेव्हा माणसतली राक्षसी वृती जागृत होते माणसाचे मनोबल त्याला दुष्कृत्य करण्यास भाग पाडते.ही मानवी जीवनाच्या

विनाशाची सुरवातच म्हणावी लागेल.माणसाचे पहिले दुष्कृत्य म्हणजे सुधाकराचा एकच प्याला असतो.

हे लक्षात घेऊन आपण आपले मनोबल विधायक कामासाठी वापरले पाहिजे.विधायक कामासाठी मनही सदाचारी होणे महत्वाचे!

मन सदाचारी बनवायचे असेल तर आपल्या सहा शत्रूंना आपण जिंकले पाहिजे.हे सहा शत्रू म्हणजे काम,क्रोध, मद, मत्सर, लोभ! त्याना जिंकणे तसे सोपे नसते तरीही प्रतत्नपूर्वक सोपे करण्याचा प्रयत्न अशक्य नसतो. भूतकाळातील चांगल्या घटना, आठवणीना उजाळा देत आपण सकारात्मक विचार करू शकतो,आपल्या शत्रूंना आपल्यापासून दूर करण्याच्या प्रयत्नात हळूहळू यशस्वी होऊ शकतो.अशा यशस्वी होण्याने आपोआपच आपले मनोबल वाढते.

आनंद हे सुध्दा मनोबल वाढविण्याचे महत्वाचे कारण होऊ शकते.त्यामुळेच आपली आनंदीवृत्ती सहजपणे संकटाशी सामना करू शकते .प्रत्येकाने आनंदीवृत्ती जोपासून आपले मनोबल वाढविले जगणे सोपे होईल.अर्थात प्रत्येकाचे आनंद मिळवण्याचे मार्ग निश्चितच वेगळे असतात.

मनोबल वाढण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन फार महत्वाचा असतो.एखादा पाण्याने अर्धा भरलेला पेला बघताना तो अर्धा भरला आहे म्हणायचे की अर्धा रिकामा आहे म्हणायचे हे जसे त्या पेल्याकडं बघण्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते तसेच मनोबलाचे असते.मानवी जीवनाच्या विकसासाठी सकारात्मक मनोबल उपयोगी पडते.जगायचेच आहे तर स्वप्नपूर्तीच्या मनोरथावर स्वार व्हावे म्हणजे जीवन यशस्वी होईल.

 

©  सुश्री अनुराधा फाटक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares