☆ नववधू प्रिया मी बावरते — ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित ☆
श्रावण धारा कोसळत होत्या अंगणात ऊन पावसाचा खेळ सुरु होता, तर माझ्या मनात त्या मंगळागौरीच्या आठवणींचा फेर चालू होता.
त्याचं असं झालं, भाऊजींचं लग्न झालं आणि जावेच्या रुपानें मैत्रीण म्हणून बिल्वा आमच्या घरांत आली. पहिला वहिला सण आला मंगळागौरीचा. भाऊजींची आणि बिल्वाची नव्याची नवलाई अजून ताजी, साजरी, गोजरी आणि लाजरी अशी टवटवीत होती. चोरटे स्पर्श, कुठं बिल्वाची लांबसडक वेणी ओढ, तर कधी पाणी उडव: असे चोरटे क्षण ते दोघेजण लाजून साजून साजरे करत होते.
सौ. बिल्वा खूप साधी आणि मुलखाची लाजाळू होती. सासु- सासरे समोर असले की ही नवऱ्याच्या वाऱ्याला ही उभी राहात नसे. भाऊजींना चहा देतांना सुद्धा या लाजाळू झाडाच्या पापण्या खाली झुकलेल्याच असायच्या. तिचं म्हणणं “वडिलधाऱ्यां समोर बरं दिसतं कां हे असले अल्लड अवखळ वागणं ?”
तर अश्या या बिल्वाची, माझ्या जावेची पहिली मंगळागौर होती. दोन्ही घरचे पाहुणे उपस्थित झाले होते. हिरव्यागार शालूमध्ये ठसठशीत दागिन्यांमध्ये आमची ही नववधु चौरंगावरच्या मंगळागौरीइतकीच सजली होती. अतिशय सुंदर दिसणाऱ्या आपल्या बायकोकडे भाऊजींची नजर पुन्हा पुन्हा वळत होती. भाऊजींच्या खाणाखुणांना दाद न देता या बाईसाहेब त्यांना नजरेनीच दटावत होत्या.
दिवसभराचा कार्यक्रम संपला. आता आली झिम्मा फुगडी खेळण्याची वेळ. तेव्हा मात्र हे लाजाळूचं झाड संकोच सोडून अवखळ वारं झालं होतं.
सगळ्यांबरोबर सगळे खेळ अगदी दणक्यात, अगदी देहभान विसरून खेळले गेले. तिची ती भरारा फुगडी बघून कुणी तरी म्हणालं, “चल बाकीचें राहूदे, आता तुझ्या नवऱ्याला गरागरा फिरव. “
“इश्य !”असं म्हणून पळायच्या बेतात होत्या बाईसाहेब. पण भाऊजींनी मात्र हात धरून तिला मैदानातच आणलन. सभोवती आम्ही लगेच फेर धरला आणि ओरडलो, “भाऊजी सोडू नका हं हिला. ” आणि मग काय भाऊजींना तेच तर पाहिजे होते.
बोलताबोलता पायांचा ताल आणि फुगडीचा वेग यांनी सूर धरला. मग रिंगणांत नवराबायकोची फुगडी चांगलीच रंगली. अगदी दणदण दणक्यात.
कशी कोण जाणे, बिल्वाला एकदम भोंवळ आली आणि ती भाउजींच्या अंगावर कोसळली. त्यांनी तिला सावरलं.
बराच वेळ झाला, ती दोघं दूर होईनांत. आम्हाला वाटलं भाऊजी तिला सोडत नव्हते म्हणजे मस्करीच चाललीय.
मध्येच कुणीतरी वडिलधारं ओरडलं, “अरे तिला चक्कर आली असेल. खाली बसवा तिला हात धरून. कुणीतरी पाणी आणा रे लवकर. “
खाली बसायच्या ऐवजी बिल्वाने तर डोळेच मिटून घेतले. होते. आणि भाऊजींचा चेहरा अगदी फोटो काढण्यासारखा झालेला होता.
हा काय प्रकार आहे बाई । कुणाला काहींच कळेना, आणि ते दोघे तर जागचेही हलेनात. अखेर भाऊजींच्या खट्याळ मेव्हणीच्या लक्षांत सारा प्रकार आला. पुढे होऊन जिजाजींच्या शर्टच्या बटणामधून सौ. ताईची नाजुक केसांची बट तिनें नाजुकपणे सोडवली आणि म्हणाली. ” जिजाजी, पुढच्या मंगळागौरीला बटणांऐवजी हुक असलेला शर्ट घाला, म्हणजे सगळ्यांसमोर नेहमी नेहमी असा सिनेमा घडायला नको. ”
सगळे गडगडाटी हसले. नुसता टाळ्यांचा, हास्याचा धबधबाच जणू काही कोसळला. आणि बिल्वा !! ती तर गालावर गुलाब फुलवून केव्हाच आत पळाली होती.
…. तर मंडळी अशी फुलली ही आमच्या घरातील बिल्वा-भाऊजींची पहिली वहिली मंगळागौर.
☆ ताक… लेखक – श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
का कोणास ठाऊक, पण दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकाची उगाचच बदनामी झालीये. पोळणारं दूध आणि समंजस ताक यांच्यात तसंही फक्त एक रंग सोडला तर बाकी काहीही साम्य नाही. ताकाचं पालकत्व तर दुधाकडेच, पण जन्मदाता आणि हे अपत्य यांच्यात किती तो फरक!! जसा सूर्य आणि चंद्रात फरक.
दुधाची साय, सायीचं दही, ते घुसळून मग वर जमा होणारं लोणी आणि मग ती सगळी स्निग्धता काढून घेतल्यावर उरतं ते परमप्रिय ताक. त्याचं दुसरं नाव अमृत आहे म्हणे… मला आवडतं ताक. उगाच ताकाला जाऊन भांडं लपविण्यात काय हशिल? जेवण झाल्यावर आमटीच्या वाटीत घेतलेलं ताक म्हणजे निव्वळ नशा. थोडीशी आमटीची चव आणि थोडी ताकाची. भरपेट जेवणावर खात्रीचा उतारा. पचण्यासाठी.
पूर्वी जेवणाचा शेवट ताकभातानेच व्हायचा. मला आठवतंय, माझा एक मामा मागचा भात घेतल्यावर त्यात ताकासाठी आळं करायचा, ताक वाढणारा/वाढणारी आल्यावर आधी ओंजळ पुढे करून ताकाचा भुरका मारायचा, सणसणीत आवाज करत आणि मगच भातावर ताक घेऊन तो कालवायचा. कोण काय म्हणेल असा विचारही त्याला नाही शिवायचा. आज जरी तो नसला, पण ताकभात खाताना त्याच्या भुरक्याची मात्र हमखास आठवण होते. असा भात जेवताना इतस्ततः पळणारं ताक निपटताना त्याची कोण तारांबळ उडायची तरीही तो ताकभात त्याच पद्धतीने जेवायचा.
ताकावर वेगवेगळ्या प्रकारचे साज चढवले की त्याची खुमारी प्रचंड वाढते आणि ते चढवण्यात आपल्या गृहिणींचा हातखंडा असतो. वादातीत.
आंबट ताकाला डाळीचं पीठ, मिरच्या, कोथिंबीर, जिरं, हिंग, हळद, लसूण इत्यादी लेण्यांनी मढवले की त्याची कढी तयार होते. या कढीत गोळे घातले की तयार होणारं अफलातून रसायन म्हणजे क्या बात. थोडासा फडफडीत भात, सोबत लोणच्याची फोड आणि कढी हे ज्यानं अनुभवलंय तोच त्याची महती जाणो.
हेच ताक वापरून होते उकड. उकड म्हणजे एक वेगळंच प्रकरण. कोकणातला एक साधासा पण अप्रतिम पदार्थ. बोटांनी चाटूनपुसून खाऊन फस्त करावा असा. एक विशेष आणि खास न्याहारी. कितीही खाल्ली तरी कंटाळा न येणारी. ती चाखुनच तिचा अनुभव घ्यावी अशी. हेच वापरून केलेली पालकाची ताकातली भाजी, डाळ किंवा शेंगदाणे घालून म्हणजे आणखी एक भारीतली चीज. ही सगळी व्यंजनं म्हणजे सुगरणीचा आत्मा आणि खाणाऱ्याचा खात्मा, निःसंशय !!!
पण ताकाचं एक सगळ्यात खास द्रावण म्हणजे मठ्ठा. लग्नात जेंव्हा पंक्ती उठायच्या तेंव्हा मठ्ठा पंक्तीचा समारोप करायचा. ताक, मिरच्या कोथिंबीर, जिरं, थोडीशी साखर असं लावून तयार झालेला मठ्ठा म्हणजे मठ्ठा. त्याला कशाची उपमा द्यायची? जिलबी त्यात बुडवून ठेवायची आणि मग ती हलकेच तोंडात सोडायची.
मठ्ठा आणि जिलबी ही जोडगोळी म्हणजे मातब्बर जुगलबंदी. अगदी तोडीस तोड. जिलब्यांची रास संपवून वर वाटीभर पाक पिणारे बहाद्दर पण मी याची देही याची डोळा पाहिलेले आहेत. त्यांना नव्हती मधुमेह, cholesterol वगैरे राक्षसांची दहशत? का अज्ञानात सुख होतं? का देवाक् काळजी म्हणत लढणारे लढवय्ये होते ते? त्यांनाच विचारायला हवं होतं.
नुसतं मीठ घालून ताक, जिऱ्याची पूड किंवा हिंग लावलेलं ताक, चाट मसाला घातलेलं ताक, सगळेच प्रकार निव्वळ अप्रतिम. तहानलेलं असताना पंचवीस रुपयांचं कोला नामक विष पिण्यापेक्षा ताक नामक अमृताला मी नेहमीच पसंती देत आलोय आणि आयुष्यभर देत राहीन हे नक्की.
हल्ली बरेच पॅकबंद ताकाचे प्रकार उपलब्ध आहेत बाजारात पण ते अडीनडीला ठीक. आईनं केलेलं, रवीनं घुसळलेलं, जीव ओतलेलं आणि लोण्याचा गोळा काढून पाण्यात सोडल्यानंतरचं ताक म्हणजे खरंखुरं ताक. त्याची कशाशीच तुलना नाही ही मात्र काळ्या दगडावरची रेघ, कधीच न पुसली जाणारी.
ता. क: बायकोला ताकास तूर लागू न देता हे लिहितोय, नाहीतर आईची स्तुती केली म्हणून माझी ताकाची रसद बंद व्हायची…
सकाळी घरातलं आटपून कामावर निघाली आणि तिच्या चप्पलचा अंगठा तुटला. बाहेर पावसाची रीपरीप चालूच होती. खड्ड्यातल्या रस्त्यातून, चिखलातून चालत कामाच्या ठिकाणी पोहोचायचं, म्हणजे एक कसरतच !!
आज थोडा उशीर झालेला, म्हणून ती चप्पल सोडून अनवाणीच झपाझपा चालत सुटली. कामावर तिच्या दोन मैत्रीणी आजारी आणि दोघी घरच्या शेतात भाताची पेरणी या कारणांनी गैरहजर. मग आज आपण वेळेत जायलाच हवं, ही ओढ ! बेफिकिरीने वागू शकली असती, पण स्वभावात ती नव्हती. कामावरची मालकीण खूप चांगली, प्रेमाने, आपुलकीने वागणारी, रागावली तरी तितकीच समजून घेणारी. तिलाही वाटायचं एरवी कधीतरी चालेलं, पण आज कामही खूप आहे, आपण पाच सहा जणीचं आहोत, तर वेळेवर पोहोचायलाच पाहिजे. असा विचार घोळवतचं कामावर येऊन कामाला लागली.
दोन तासांनी तिचे यजमान आले. काय झालं? अचानक का आले?तिलाही घरी न्यायला आले की काय? काय घडलं असेलं?नाना शंका मनात घेऊन, मालकीण सहजचं दरवाज्या जवळ गेली.
ती म्हणत होती, “तुम्ही कशाला घेऊन आलात?”ते म्हणाले, “अग! तुझ्या पाठोपाठ मी बी कामावर निघालो, बगीतलं तर तुज्या चपला दारात पडल्येल्या. पायलं तर अंगठा तुटल्याला. जीव कळवळला माजा. मंग अंगठा शिवून घ्यून आलो. “
☆ स्वातंत्र्य दिन 🇮🇳 ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
(१५.०८.२०२४)
आज भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिवस. 🇮🇳
मागील ७८ वर्षात भारताने लक्षणीय प्रगती केलेली आहे. त्याबद्दल सर्व भारतीयांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यात राहूनही काही वर्षात अशी नेत्रदीपक प्रगती करणे हा पराक्रम म्हणावा लागेल….!
अनेक क्षेत्रातील प्रगतीची उंच शिखरे गाठत असताना, आपण माणुसकीच्या शिखरावरून खाली तर येत नाही ना याचाही विचार केला पाहिजे.
आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीने मागील हजारो वर्षात कोणावरही आक्रमण केले नाही, तर याउलट सर्व विचारधारांना आपल्या मध्ये सामावत माणुसकी धर्म वाढवण्याचा प्रयत्न केला.
*भगवंताने गीतेत सांगितलेला उपदेश प्रत्यक्ष आचरणात/कृतीत आणण्याचा कालावधी सुरू झाला आहे असे म्हणता येईल. देशातंर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आपल्याला आढळून येईल. भागवतांनी सांगितलेली गीता अर्जुनाने नुसती पाठ केली नाही, तर ती समजून घेऊन अधर्मी लोकांचा नाश केला. हा इतिहास आपण आजच्या पावन दिनी आठवूया.
अर्जुनाने शमी वृक्षावर ठेवलेली शस्त्रे काढून युद्ध केले. आज आमच्या घरात उंदीर मारायला काठी असेल असे सांगता येत नाही. आपल्या सर्व देवी देवतांच्या हातात शस्त्र आहे आणि ते चालवण्याची धमक आणि कुशलता देखील आहे. आपण याचे अनुकरण आणि अनुसरण करण्याची गरज आहे.
अधर्माचा नाश आणि धर्माची प्रतिष्ठापणा करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. भारत विश्विजेतेपदी विराजमान होण्यासाठी दुर्जन सक्रिय आणि सज्जन निष्क्रिय हे समीकरण उलट करावे लागेल.
यासाठी आरक्षणाची नाही तर स्वतः देशाचे, धर्माचे संरक्षण करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
आजच्या पावनदिनी आपण अशी प्रतिज्ञा करू की भारतमातेच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत, यापुढे माझी भारतमाता कधीही खंडीत होणार नाही…!!
महात्मा फुले बसस्टॉप . बस मध्ये बायका मुले, वयस्कर मंडळी रिकाम सीट पकडण्यासाठी धावत पळत धडपडत वर चढत होती. हो बसायला जागा तर मिळायला हवी ना ! खिडकी जवळची सीट मिळाल्यामुळे मी अगदी खुशीत होते. इतक्यात ती आली आणि माझ्या शेजारचं सीट तिने चपळाईने पकडलं. हातातल्या भाजीच्या जड पिशव्या खाली ठेवताना, मी तिला न्याहाळलं. गोरापान गोल चेहरा धावत पळत आल्याने लाल झाला होता.
इतक्यात कंडक्टरचा कर्कश आवाज आला “ओ दादा, किती वेळा सांगायचं तुम्हाला? धड चालता येत नाही तर येता कशाला बस मध्ये धडपडायला? घरी पडा की एका कोपऱ्यात आरामात . त्यातून हा पांगुळगाडा बरोबर. वर चढताना इतर पॅसेंजरना त्रास, आणि रोज रोज पुढच्या बस स्टॉप वर उतरवून देताना आम्हाला त्रास, आमचा वेळ जातोच की फुकट.”
आजोबांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत कंडक्टर ओरडतच होता, “चला उतरा, उतरा खाली. एकदा सांगून कळत नाही का तुम्हाला? रोजची साली कटकट.”
आजोबांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पायरीवर चढवलेला पांगुळगाडा आणि एकच पाय असलेलं पाऊल मागे सरकलं.
माझ्या शेजारी बसलेल्या तिच्या कानावर हा वरील संवाद पडला. ती ताडकन उठली. आता तिचा गुलाबी चेहरा रागाने लालीलाल झाला होता. मला तिचं सीट पकडायला सांगून ती आवेशाने खाली उतरली. आजोबांना बस मध्ये चढायला मदत करताना ती म्हणाली, “चढा हो आजोबा, मी उतरवून देईन तुम्हाला तुमच्या स्टॉप वर.”
कंडक्टर खेकसला,”ओ बाई, तुम्ही कशाला मध्ये पडताय? खाली पिली टाईम जातोय आमचा. तुमचा काय संबंध?”
ती कडाडली, “संबंध? माझा काय संबंध ? माझा संबंध आहे माणुसकीशी. आणि काय हो ? वेळेच्या गोष्टी कुणाला सांगता? पानाच्या पिचकाऱ्या टाकत, टाळ्या देत इतका वेळ तुम्ही टाईमपास करीत बसला होतातच ना? बस सुटायची वेळ उलटून गेलीय. बस मधली वृद्ध माणसं, अवघडलेल्या बायका, ओझ्याने वाकलेल्या मावश्या आणि शाळा सुटल्यावर दमलेली, दप्तराच्या ओझ्याने थकलेली भुकेलेली ही शाळकरी चिमणी पाखरं, किती जणांना ताटकळत ठेवलंत तुम्ही,? तेव्हां कुठे गेला होता तुमचा वेळ ?असंच काहीतरी कारण असल्याशिवाय हे आजोबा घरा बाहेर पडले नसतील. काहीतरी काम असेल, कुणाला तरी भेटायच असेल. त्यांनाही शारीरिक त्रास होत असेलच ना! एकाच पायावर भर टाकून चढताना. त्यांचा तरी काही विचार करा.” कंडक्टरच्या गुर्मीला न जुमानता तिने आजोबांना वर चढवून, माझ्या शेजारी, म्हणजे तिच्या सीटवर बसवलं आणि म्हणाली, “बाबा! तुमचं काय काम असेल तर मला सांगा. अगदी नाईलाजानेच तुम्हाला कुठे जाण्याची वेळ आली तर मला आधी फोन करा. मी रोज असते या बसला. माणुसकी सोडून, या लोकांनी बस सुरू केली तर मी बस अडवून तुम्हाला वर चढवीन. आणि हो,अहो बाबा कुणा करता?, कुणाच्या ओढीने एवढा स्वतःला त्रास करून तुम्ही हा बसचा अवघड प्रवास कशाकरता? आणि का करताय ? तुमच्या परिस्थितीचा, वयाचा पण विचार करा ना जरा! रिक्षा करावी नां!”
दम लागल्याने डोळे मिटून शांत बसलेले आजोबा उत्तरले,”ते समद खरं आहे पोरी, पर रिक्षासाठी रोज पैसा आणू कुठून?”
आता मलाही आजोबांची दया आली आणि प्रश्न पडला. न राहून मी विचारलं, “बाबा काही त्रास आहे का तुम्हाला? रोज कुणाला भेटायला जाता ? बरोबर तुमचा मुलगा का नाही येत?”
बाबा म्हणाले,”काय सांगू ताई माझी कर्म कहाणी? मुलगा नशेत असतो नेहमी. मोठ्या मुलाला अटॅक आला म्हणून त्याच्या आजारात पैका लावला. अन धाकट्याचं डोकं फिरलं, भाऊबंदकी आडवी आली.”
आजोबांची गाडी वळणावर आणत मी विचारलं,” सांगा ना बाबा, तुम्ही अशा परिस्थितीत रोज का आणि कुठे जाता?”
आता बस मधल्या सगळ्यांचे लक्ष बाबांच्या उत्तराकडे लागलं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. अगदी कंडक्टर आणि ड्रायव्हर सुद्धा थबकले होते. आजोबा पुढे म्हणाले, “संपत्तीची जमिनीची, घराची, वाटणी होते. पण आमची, — आमची नवरा-बायकोची वाटणी केली, या आमच्या मुलांनी. मुलगा म्हणाला, ‘आम्ही नाही तुम्हाला दोघांना पोसू शकत.’ आईला हाकललं मोठ्याकडे आणि मी तुकडे मोडतोय धाकल्याकडं. घरात सारखी कचकच चालतीया. त्यातून कारभारीन जवळ नाही. दुखल्याखुपल्याला भाकर तुकड्याला, ह्या वयात जवळचं मायेचं माणूस आपल्याजवळ हव़च ना हो ताई? ती तिकडं झुरतीया आणि मी बी इकडं कणाकणाने मरतोया. आज पंधरा दिवस झाले ती आजारी आहे. हातापायाच्या काड्या झाल्यात. सरकारी दवाखान्यात टाकलंय तिला. आज काही वंगाळ तर ऐकायला नाही ना मिळणार? या विचाराने धडधडत्या छातीने तिला भेटायला मी रोज जातो. तिला पाहून मला असं वाटतं माझी साता जन्माची सोबतीण,माझी रोज वाट पाहतीय आणि मग मला पाहून तिच्या सुकलेल्या चेहऱ्यावर हंसु उमटतं.. मायेने माझ्या हातावरून ती हात फिरवते. तिच्या डोळ्यात हसूं ही असतं आणि आसवंही असत्यात. पण मला पाहून ती खुलते, एवढं मात्र खरं, आणि त्यासाठीच, फक्त तिला भेटण्यासाठी, तिच्या थकलेल्या सुकलेल्या चेहऱ्यावरचे हंसू बघण्यासाठीच मी रोज तिथे जातो, तिच्याजवळ घडीभर बसतो. तिला चमच्याने चहा पाजतो, बिस्किटाच्या पुडा हातांत सरकवतो, घडीभर सुखा दुःखाच्या गोष्टी करतो आणि जड अंतकरणाने एका पायात मणा मणा चे ओझं बाळगून दवाखान्याच्या बाहेर पडतो. मागे वळून बघताना तिचे आसवांनी भरलेले डोळे बघत, माझ्या डोळ्यातलं पाणी लपवत या काठीचा, या पांगुळ गाड्याचा आधार घेत, मी परतीची वाट धरतो. या वयात मला तिची सोबत हवी असते. तिला माझा आधार हवा असतो. पण दुर्दैव माझं, मलाच या काठीचा आधार घ्यावा लागतोय”. आजोबा बांध फुटावा तसे घडाघडा डोळे मिटून अखंड बोलत होते.
अपंगत्वा बरोबर दुसरं आणखी एक दुःख त्यांच्या मनात सलत होतं. हे ऐकून बस मधले प्रवासी आणि मी पण निशब्द झाले. वरवर सामान्य दिसणाऱ्या या आजोबांची व्यथा ऐकून सगळे अंतर्मुख झाले होते.
माझ्या मनात आलं, प्राप्त परीस्थितीला सामोरं जाणं, आहे ते स्विकारून मार्ग काढणं, कठीणच आहे किती कौतुक करण्यासारखं आहे आजोबांचं हे असं वागणं! दुःख प्रत्येकालाच असतं. पण प्राप्त परिस्थितीला सामोरं जाऊन नेटाने त्यांनी पुढचं पाऊल टाकलं होतं. कोंडलेली मनातली खळबळ कुणापाशी तरी त्यांना मोकळी करायची होती. पण ती व्यथा सांगताना त्यांचे डोळे मिटलेले होते. जणू काही पापण्यांच्या पडद्याआड ते आपले अश्रू लपवत असावेत. काय सांगावं कदाचित मिटल्या डोळ्यातून ते आशेचा किरणही शोधत असतील. त्यांच्या मनात विचार येत असतील, ऋतू बदलतो, हवामानही बदलतं. तसं आजचं हे परिस्थितीचं वादळही मिटेल.आणि आम्ही सगळे एकत्र येऊ. आज नाही उद्या मार्ग निघेल आणि नवरा बायकोची ही ताटातूट संपेल. ही आशा असेल त्यांच्या मनात.मला ‘तू तिथे मी’ सिनेमा आठवला. ते ही नवरा बायको एकमेकांपासून दूर मुलांकडे राहण्याच्या व्यथेमुळे असेच कासाविस झाले होते. आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांची सोबत ही हवीच नाही का ?
मी विचारांच्या तंद्रीत होते. अचानक तीरा सारखा कंडक्टर पुढे आला. आजोबांना हात जोडून म्हणाला, ” बाबा चुकलं माझं! तुमच्या रोज येण्याचं कारण नव्हतं माहित मला! गर्दीच्या या ड्युटीमुळे आम्हीपण चिडचिडे झालो आहोत. तरी पण रागाच्या भरात असं टाकून बोलायला नको होतं मी तुम्हाला. मला माफ करा आजोबा.”
आजोबा कनवाळु होते. ते म्हणाले, “आरं माझ्या लेकरा,पोरासारखा आहेस तु मला! माझ्या चढण्या उतरण्याचा त्रास बघवला नाही तुला! म्हणून तू रागावलास बाळा.”
कंडक्टर पुढे म्हणाला, “या ताईंनी झणझणीत अंजन घातल्यामुळे माझे डोळे उघडले, आणि तुमचंही सांठलेलं दुःख मोकळं झालं. नाव काय तुमचं ताई.?”
“अरे दादा तिचं नाव अहिल्या आहे अहिल्या. सगळ्यांच्या सुखाचा विचार करून प्रत्येकाला मदत करते ती..” बस मधली एक मावशी ओरडून सांगत होती कंडक्टरला.
अहिल्येचा राग केव्हाच पळाला होता. ती रोज येणाऱ्या प्रवाशांकडे वळून म्हणाली, “आपण बाबांना बसमध्ये चढा उतरायला मदत करायचीय बरं का! रोज दोन तरी फळं बाबां बरोबर त्यांच्या कारभारनी साठी द्यायची, म्हणजे त्यांची व बाबांची शक्ती भरून येईल. बाबांना बसमधून त्यांच्या स्टॉपला उतरवून दवाखान्यात पोहोचवण्याचं काम माझं. आणि हो! माझ्या मुलाचं कॉलेज दुपारी नसतं. बाबा आणि मी तिथे पोहोचेपर्यंत तो बसेल दवाखान्यात अभ्यास करत आजींजवळ, त्यांना हवं नको ते बघायला. आणि हो! बस मधल्या प्रत्येकाला मी विनंती करते, जमेल तशी जमेल तेव्हा बाबांना आपण मदत करायची आणि आर्थिक बाबतीतही थोडी मदत करू या. तुमच्यापैकी कुणाची ओळख आहे का सरकारी दवाखान्यात? म्हणजे डॉक्टरांना भेटून आपण आजींची चांगली देखभाल करायला सांगू, बाबांची पण काळजी मिटेल, हो ना बाबा ?” एका दमात सगळं बोलणाऱ्या
अहिल्येचा हात हातात घेत बाबा गहिवरून म्हणाले, “हो गं पोरी हो! मग तर माझी अख्खी काळजी मिटल. बसचं इंजिन बंद करून ड्रायव्हर उडी मारून पुढे आला आणि म्हणाला, “उद्या माझी रेस्ट आहे, सरकारी दवाखान्यात माझी ओळख आहे. उद्याच भेटतो मी डॉक्टरांना. बाबा तुमच्या कारभारणीचं नांव सांगा. कॉट नंबरही सांगा,
पुढचं मी बघतो. काळजी करू नका.”
अहिल्या पण उत्साहाने म्हणाली, “बाबा मी कामाला जाते शनि पाराजवळ. तिथे वरकामाला एक बाई हवीय. तुमच्या सुनेसाठी विचारू का? त्यांना वरकामासाठी बाई आत्ताच हवी आहे.”
एक सदृहस्थ उठले आणि म्हणाले,”आमच्या रोटरी क्लब तर्फे बाबांच्या पायासाठी काही मदत नक्कीच मिळेल. खर्च बराच आहे पण शक्य तितकी मदत मिळेलच.”
अहिल्या म्हणाली, “आपण मदत केंद्राकडूनही मदत घेऊ शकतो. आमच्या मालकीण बाईची खूप ठिकाणी ओळख आहे. जगात नुसत्या पैशांनी नव्हे तर मनानेही श्रीमंत दानशूर आहेतच.
बाबांसाठी असा चहूबाजूनी पैशाचा ओघ आला तर, त्यांच्या पायाच्या मापाचा बुटही करता येईल. आणि हो! व्यसनमुक्ती केंद्रात माझ्या दादाची ओळख आहे. आता काळजी करू नका बरं का बाबा! तिकडे गेल्यावर तुमच्या मुलाचं व्यसनही सुटेल “.
मी त्या चुणचुणीत व भराभर प्रश्न सोडवून मदत करणाऱ्या अहिल्याकडे बघतच राहयले. अहिल्याबाई होळकरांची पुण्यतिथी आपण नेहमी उत्साहाने साजरी करतो. त्यांच्यासारखीच लोककल्याणासाठी झटणारी ही समोर उभी असलेली सेवाभावी वृत्तीची आधुनिक अहिल्याच भासली ती मला.
मी आजोबांकडे बघितलं, मघाचा त्यांचा काळवंडलेला दुःखी चेहरा आता या सगळ्याच्या दिलाश्याने उजळला होता. आधीसारखे डोळ्यातले अश्रु आता दुःखाचे नसून आनंदाश्रु होते. माझ्या मनातं आलं, आधार देणारा हात नेहमी श्रेष्ठच असतो. मग तो हात आधार देणारा असो की मानसिक बळ देणारा असो.
60 मिनिटांचा बसचा प्रवास होता तो. पण आम्ही सारे एक आहोत, समदु:खी आणि सम -सुखीही आहोत. ही भावना प्रत्येकाच्या मनात होती. मनात विचारआला ‘आम्ही सारे भाऊ भाऊ, एक दिलाने सुखी राहू .l
बाहेर बघितलं तर १५ ऑगस्ट चा तिरंगा महात्मा फुले मंडईवर डौलाने फडफडत होता. सळसळणाऱ्या उत्साहाने तो आम्हाला संदेश देत होता ‘हर घर घर मे तिरंगाl हर मन मन मे तिरंगा l’ देशभक्तीपर गाणं रेकॉर्डवर लागलं होतं माझा हात सलामी साठी वर उचलला गेला.
“शिखा” ह्या शब्दाचा अर्थ साधारण माझ्या पिढीतील, सत्तरी क्रॉस केलेल्या लोकांना माहित असण्याचा संभव जास्त. हल्लीच्या तरुण पिढीला “शिखा” ऐवजी “शाखा” हा शब्द जास्त जवळचा व कानावरून जात असलेला. मग ती “शाखा” सकाळी, सकाळी एखाद्या मैदानात, शाळेच्या पटांगणात भरणारी असो, अथवा एखाद्या राजकीय पक्षाचे वेगवेगळ्या विभागातील ऑफिस. पण तेच जर का आपण “शिखा” ऐवजी “शेंडी” म्हटले, तर शंभरपैकी नव्याणव तरुण, तरुणींना ते लगेच कळेल आणि मग त्यांच्या तोंडातून आश्चर्याने “ओह आय सी, शिखा म्हणजे शेंडी काय!” असे शब्द बाहेर पडल्या शिवाय राहणार नाहीत !
आपल्या लहानपणी आपले आई बाबा, आजी-आजोबा आपण काही कारणाने जेवत नसलो तर, “माकडा माकडा हूप, तुझ्या शेंडीला (खरं तर शेपटीला) शेरभर तूप” असं काहीतरी बोलून आपल्याला भरवत असत. तेंव्हा आपल्या बालबुद्धीला, माकडाला शेंडी कुठे असते, असं विचारणं कधी सुचलं नाही ! पण त्या ओळी गाऊन आपल्याला बळे बळे जेवायला लावणारे आपले आई – बाबा किंवा आजी-आजोबा यांनी आपल्याला तेंव्हा एक प्रकारे शेंडीच लावलेली असते, हे आपल्याला आपण मोठे झाल्यावरच कळते ! त्यामुळे मोठेपणी आपण सुद्धा दुसऱ्या कोणालातरी कधीतरी शेंडी लावण्याचे संस्कार आपल्याला त्यांच्याकडूनच मिळालेले असतात, असं जर मी या ठिकाणी म्हटलं तर, मी आपल्याला शेंडी लावतोय असं वाटण्याच काहीच कारण नाही ! असो !
आजही मुलाची मुंज करताना, साधारण एप्रिल-मे मधला मुहूर्त धरला जातो. कारण नंतर शाळेला सुट्टी असल्यामुळे त्या सुट्टीत बटूचे केस वाढून, त्याला शाळेत “ऑकवर्ड फिल” होऊ नये हा एक विचार त्याच्या मम्मी पप्पांच्या मनांत असतो. शेंडी व्यतिरिक्त तिच्या भोवती थोडे बारीक केस ठेवण्याची पद्धत आहे, ज्याला घेरा असे म्हणतात.
शेंडी ठेवण्या मागे काही वैज्ञानिक कारणे पण आहेत, असं जर मी या ठिकाणी सांगितलं तर पुन्हा मी आपल्याला शेंडी लावतोय असं वाटण्याचा संभव आहे, पण आपण गुगल करून (ज्याला बहुतेक शेंडी असावी) मी जे आता सांगणार आहे त्याच्या सत्य असत्याचा नक्कीच शोध घेऊ शकता. तर डोक्यावर ज्या ठिकाणी शेंडी असते तिथेच सार्या शरीराच्या नाड्या एकत्रित होतात असं आधुनिक विज्ञान सांगत. इतकंच कशाला, या ठिकाणाहूनच मनुष्याची ज्ञानशक्ती निर्माण होते. तसेच शेंडी सार्या इंद्रियांना स्वस्थ ठेवते व कोणाही व्यक्तीचं क्रोधावर नियंत्रण राहतं आणि विचार करण्याची त्याची क्षमतादेखील वाढते !
हिंदू धर्मात ऋषी मुनी डोक्यावर शेंडी ठेवायचे. गुरुगृही “अध्ययन” करतांना पूर्वी शिष्याच्या शेंडीला दोरी बांधून ती खुंटीला बांधत असत. जेणेकरून जर “अध्ययन” करतांना त्याला झोप लागली, तर शेंडीला हिसका बसून त्याला जाग यावी, हा हेतू ! याच अनुषंगाने इतिहासात होऊन गेलेले प्रकांड पंडित आर्य चाणक्य, यांच्या बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या डोक्यावर असलेल्या घेरा व शेंडीचा सुद्धा काही संबंध असू शकतो का, असं मग कधी कधी मला वाटायला लागत.
आपण साऱ्यांनी विदेशी लोकांचे अंधानुकरण करून, आपल्या पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टींचा त्याग केला, त्यातली एक गोष्ट म्हणजे शेंडी ! पण आता त्याच विदेशी लोकांना शेंडीचे वैज्ञानिक महत्व कळल्यामुळे “हरेराम हरेकृष्ण” हा पंथ आचरणारे सारे पुरुष अनुयायी लांब लचक शेंडी बाळगून असल्याचे पहायला मिळत !
आपल्याकडे पौरोहित्य करणारे काही ब्राम्हण अजूनही शेंडी बाळगून आहेत, आता त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असावी इतकेच ! पण दाक्षिणात्य पुरोहित, जे माझ्या पाहण्यात आलेत, ते सगळे डोक्यास घेरा व त्या मधे शेंडी बाळगून असतातच असतात !
तसेच अजूनही पानपट्टीचा ठेला चालवणारे काही पुरभय्ये लांब लचक शेंडी बाळगून वर त्याला छोटी गाठ बांधून, कपाळी लाल, पिवळे गंध लावून आपल्या पानाच्या ठेल्यावर बसल्याचे दिसतात ! असे पानाचे ठेले आणि ते पुरभय्ये काळाच्या ओघात आता नष्ट झाले आहेत, हे आपण सुद्धा मान्य कराल.
फार पूर्वी एखाद्या राजाने शिक्षा म्हणून शेंडी कापण्याची आज्ञा दिल्याचे इतिहासात दाखले सापडतात. पण त्या काळी अशी शिक्षा, देह दंडाहून कठोर समजली जायची, असा तो काळ होता आणि तेवढंच आपापल्या शेंडीला लोक महत्व देत होते !
आपल्या मराठी भाषेत शेंडी शब्दाचा उपयोग अनेक म्हणी अथवा वाक्प्रचारात केलेला आढळतो. तुम्हांला कोणी फसवलं तर लगेच तुम्ही, “तो मला शेंडी लावून गेला” असं म्हणता ! एखादी गोष्ट आपण या पुढे कधीच करणार नाही, यासाठी आपण “आता शेंडीला गाठ” असं शेंडी नसली तरी, बिनदिक्कत म्हणतोच ना ! तसंच वेळ पडल्यास आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, तर “शेंडी तुटो अथवा पारंबी” या म्हणीचा वापर शेंडी नसली तरी करण्यास आपण मागे पुढे पहात नाही !
शेवटी, शेंडी ठेवावी का ठेवू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण शेंडी कोणी कोणालाच लावू नये यावर सगळ्यांचे मतैक्य होण्यास शेंडी नसली तरी काहीच अडचण नसावी !
काही शब्दांचा अर्थ बालवयात कळत नसेल पण असे काही संबोधनात्मक शब्द मनाच्या आत कुठेतरी नक्कीच गुदमरणारा तीव्र गोंधळ घालायचे. त्यापैकी दोन शब्द मला चांगलेच आठवतात. “वांझोटी आणि प्रौढ कुमारिका”
शब्दांसारखे शब्द पण ते उच्चारताच अर्थापेक्षा त्यामागचा उपहास, तुच्छता, भोचकपणा, भावनाहीन चेष्टा मात्र मला जाणवायची आणि मी विचारात पडायची. भाषेतला, उच्चारातला, भावनेतला गोडवा अजिबात न जपणारे हे शब्द आहेत आणि अशा शब्दांची वाणीतून, मनातून हकालपट्टी झाली पाहिजे असे मला माझ्या आतील प्रवाहातून त्यावेळी वाटायचे.
एखाद्या बाईला मूल नसणं अथवा तिची मुलं जन्मत:च मृत असणं याबाबत समाजाची होणारी प्रतिक्रिया किती ओंगळ असू शकते हे मी त्या न कळत्या वयात नकळत अनुभवलं.
आमच्या घरासमोर एक चाळवजा इमारत होती. ती इमारत कोणाच्या मालकीची होती ते मला आठवतं नाही. एक खणी लहानलहान घरं असलेली ती इमारत होती. तिथे जयवंत नावाचं एक दांपत्य रहात होतं. गल्लीतले सगळे त्यांना जयवंत आणि जयवंतीण असेच संबोधत. वास्तविक हे असं दांपत्य होतं की जे गल्लीत कोणात फारसं मिसळतच नसे. सगळ्यांपासून अलिप्तच होतं म्हणाना !
सकाळी ठराविक वेळेला जयवंत शर्टाच्या पाठीमागच्या कॉलरला, पावसाळा नसला तरीही लांबलचक छत्री अडकवून कामावर जायला निघायचे. ते कुठे आणि काय काम करत होते हे माहीत नव्हतं. अगदी संपूर्ण मळेपर्यंत एकच शर्ट आणि विजार त्यांच्या अंगावर आठवडाभर असायची. जयवंतीण दिसायला खरोखरच सुरेख होती. गोरीपान, नाकीडोळी नीटस पण अत्यंत गबाळी ! सदैव केस विस्कटलेले, साडी अंगावर कशीबशी गुंडाळलेली, चेहऱ्यावर उदास चैतन्यहीनता, बोलण्यात हसण्यात कशातच जीव नसल्यासारखा. सगळेजण तिला “मळकट पांढरी पाल” म्हणायचे. कोपऱ्यावरच्या घरातल्या मीना मथुरेची आई दिवसभर पायरीवर बसून कोण आलं, कोण गेलं यांच्या नोंदी ठेवायची. कुठे कशासाठी कोण चाललं आहे घराबाहेर याचीही ती अत्यंत कर्तव्य बुद्धीने चौकशी करायची पण जयवंतीण दिसली की पटकन घरात जायची आणि “वांझोटी” म्हणत जोरात दरवाजा लावून घ्यायची.
जयवंतीणबाईला मूल नव्हतं कारण तिचं जन्माला येणारं प्रत्येक मूल हे मृतावस्थेतच जन्म घ्यायचं. जयवंतीण बाईचं मातृत्व हे जन्म आणि मृत्यूच्या रेषेवर विद्रुपावस्थेत टांगलेलं राहिलं. मात्र एक होतं की तिच्या प्रत्येक बाळंतपणाच्या वेळी गल्लीतला तिच्याविषयी असणारा एक उपहासात्मक प्रवाह मात्र काहीसा स्तब्ध असायचा. “या खेपेस तरी या बाईचं मूल जगू दे !” अशी भावना सगळ्यांच्या मनात असायची. प्रत्येक वेळी एक ताण, एक दडपण, एक अत्यंत अप्रसन्न शांतता गल्लीने जाणवलेली आहे. घरीच एक सुईण यायची. दार बंद असायचं आणि हे बंद दार जेव्हा उघडायचं तेव्हा जयवंतच्या हातात फडक्यात गुंडाळलेला एक ओला रक्तामासाचा बरबटलेला मृत गोळा असायचा आणि ते एकटेच त्या गोळ्याला मातीत पुरवून टाकायला निघालेले असत. ना कुणी नातेवाईक ना कोणी मित्र. माणूसकी म्हणून गल्लीतलेच न सांगता कुणी त्यांच्याबरोबर जात असत आणि घरात अत्यंत कळाहीन अवस्थेत जयवंतीण बाई चा आक्रोश चालायाचा. माझी आजी ब्रांडीची बाटली घेऊन तिच्या घरात जायची, तिच्या हातापायांना त्याही अवस्थेत चोळत राहायची तिच्या पांढऱ्या फट्टक चेहऱ्यावर मायेने गोंजारून तिचं डोंगराएवढं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करायची. कुणाच्या दुःखाला कसं मायेनं गोंजारावं हा संस्कार आजीच्या या लहानशा कृतीतून नकळतच रुजला.
अशाच एका असफल बाळंतपणातच जयवंत बाईचा शेवट झाला आणि गल्लीतला दरवर्षी घडणारा दुःखद अध्याय कायमचा संपला. जयवंत नंतर कुठे गेले, त्यांचं काय झालं याची खबरबात गल्लीने कधीच घेतली नाही. एका अंधाऱ्या, चैतन्यहीन, बोडक्या, एक खणी घराला कायमचं एक कुलूप लागलं.
या घटनेच्या अशा धूसर रेषा माझ्या स्मरणात आजही आहेत. हे अत्यंत वेदनादायी दृश्य काळाबरोबर वाहून गेलंही असेल पण त्या दृश्याचे मनावर झालेले परिणाम कधीकधी वेगळ्या स्वरूपात आजही जाणवतात. जगताना माणसाच्या जाणिवा जेव्हा प्रगल्भ होतात ना तेव्हा मनावर उमटलेले हे पुसट ठसे पुन्हा पुन्हा दृश्यरूप होतात.
आता माझ्या मनात विचार येतो जयवंतीणबाई वांझोटी कशी ? ती जन्मदा तर होतीच ना ? दुर्दैवाने तिची कूस भरली नाही त्यात तिचा काय दोष ? त्यावेळी विज्ञान इतकं प्रगत नव्हतं का की समाजाचं प्रबोधन कमी पडलं? जयवंतीणबाई बरोबर जे घडत होतं त्याभोवती अंधश्रद्धेचे विचार प्रवाह ही वेढा घालून असावेत. विज्ञानाचे कुंपण तिथे नव्हतं. डीएनए, क्रोमोझोम्स, निगेटिव्ह रक्तगटांचे ज्ञान नव्हतं किंवा अशा प्रगत विचारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजाने पायऱ्याच बांधल्या नव्हत्या का ? अशावेळी जयवंतीणबाई माझ्या नजरेसमोर प्रातिनिधिक स्वरूपात उभी राहते. आज व्यंधत्वावर मात करणारी प्रचंड प्रगत वैज्ञानिक तंत्रे उपलब्ध आहेत. ज्ञान आणि जागरूकता यांची सांगड सकारात्मक दृष्टिकोनातून घातली जात आहे. थोडं विषयांतर करून मला इथे हेही नमूद करावसं वाटतं की माझ्या परिचयातल्या, नात्यातल्या, माझ्या काही मैत्रिणींनी मूल न झाल्याचं दुःख न बाळगता अनाथ मुलांचं मातृत्व आनंदाने स्वीकारलेलं आहे. आयुष्यातल्या उणिवा भरून काढताना एक उदार समाजदृष्टिकोनही त्यांनी जपला आहे. मला त्यांचा अत्यंत अभिमान वाटतो आणि आज अशा भावना निर्माण होण्यामागे किंवा अशी मानसिकता तयार होण्यामागे न कळत्या वयात न समजलेलं जयवंतीणबाईचं दुःख कुठेतरी अजूनही ओलं आहे असं वाटतं आणि पुन्हा यातना होतात जेव्हा आजही कधी “वांझोटी” हा शब्द कानावर पडला तर.
एकाच वेळी समाज सुधारलाय असे म्हणताना भाषेतून अशा गलिच्छ उपहासात्मक, दुसर्याच्या भावनांची बूज न राखणार्या शब्दांची कायम स्वरूपात हकालपट्टी का होत नाही याचाही खेद वाटतो. आणखी एक अपराधीपणाचा सल आहे.
का कोणीच जयवंतीणबाईच्या दुःखापर्यंत पोहोचू शकले नाही ? आम्ही गल्लीतली मुले तिला जयवंतीणबाई असेच म्हणायचो. आमच्यापैकी एकाने तरी तिला जयवंत आई किंवा जयवंताई म्हणून हाक मारली असती तर ..कदाचित त्या कोमेजल्या रोपाची पाण्यासाठीची तहान किंचित तरी भागली असती का ? आज तो सल आहे— आम्ही हे का केलं नाहीv?
☆ “घर थकलेले संन्यासी…” – लेखक : प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
घर थकलेले संन्यासी
हळूहळू भिंतही खचते ….
नागपुरातल्या प्रताप नगर, रविंद्र नगर, टेलिकाॅम नगर परिसरातून रोज जाणेयेणे करताना ग्रेसच्या या ओळी मनात येतात. नागपूर म्हणजे तसे ऐसपैस अघळपघळ शहर होते. ४० – ५० वर्षांपूर्वी तत्कालीन नोकरदारांनी थोडे शहराच्या बाहेर मोकळ्या हवेत घर बांधूयात म्हणत दक्षिण, नैऋत्य नागपुरात मौजा जयताळा, मौजा#e-abhivyakti भामटी, मौजा परसोडी शिवारात प्रशस्त प्लाॅटस घेतलेत. त्यावर खूप नियोजन करून सुंदर टुमदार घरे बांधलीत. त्यात आपल्या कुटुंबाचा, मुला नातवंडांचा विचार करून छान ३००० ते ५००० चौरस फुटी प्लाॅटसवर प्रशस्त वास्तू उभारल्यात. तळमजला आणि पहिला मजला.
त्या प्लाॅटसवर तेव्हाच्या मालकांनी छान छान झाडे लावलीत. जांभूळ., पेरू,आंब्यासारखी फळझाडे, पारिजातक, सदाफुली, चाफ्यासारखी फुलझाडे, मोगरा, मधुमालती, गुलमोहराचे वेल. आपण लावलेले आंब्याचे झाड आपल्या नातवाला फळे देईल, फुलझाडांची फुले रोज देवपूजेला कामाला येतील, मोकळी हवा मिळेल, मस्त जगू हे साधे सोपे, कुणालाही न दुखावणारे स्वप्न.
सुरूवातीच्या काळात मुख्य शहराबाहेर वाटणारी आणि “कुठच्याकुठे रहायला गेलात हो !” अशी पृच्छा सगळ्यांकडून होणारी ही वस्ती शहर वाढल्याने अगदी शहराचा भाग झाली. सगळ्या सोयीसुविधा इथे मुख्य शहरासारख्याच किंबहुना त्यापेक्षा वरचढ उपलब्ध होऊ लागल्यात. घरमालक सुखावलेत. तोपर्यंत ते त्यांच्या निवृत्तीच्या आसपास पोहोचले होते. मुले हाताशी आलेली होती. मुलींची लग्ने झालेली होती, ठरलेली होती. सगळं छान चित्र.
पण १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आलेल्या संगणक क्रांतीने जग बदलून गेले मग नागपूर तरी त्याला कसे अपवाद असणार ? संगणक क्रांती नागपूरच्या आधी पुणे, हैद्राबाद, बंगलोर ला आली. होतकरू, हुशार तरूणांचे नोकरीनिमित्त फार मोठे स्थलांतर सुरू झाले. काही काहींचे तर अगदी सातासमुद्रापार अमेरिकेत स्थलांतर झाले.
सुरूवातीला “माझा मुलगा बे एरियात आहे, डाॅलर्समध्ये कमावतोय. गेल्या वर्षी आम्ही दोघेही जाऊन आलो अमेरिकेत. म्हातारा म्हातारीला मुला – सुनेने पूर्ण अमेरिका दाखवून आणली हो. अगदी लास वेगासला नेऊन कॅसिनोत कधी नव्हेतो जुगारही खेळलो.” असे कौतुक झाले.
पण नंतर अमेरिकेत गेलेले, पुणे बंगलोरला गेलेले मुलगा – सून नागपूरला परतण्याची चिन्हे दिसेनात. तिथली प्रगती, तिथल्या संधी इथे नव्हत्या. नातवंडांचा जन्म जरी नागपुरात झाला असला तरी त्यांची वाढ, शाळा या सगळ्या घाईगर्दीच्या महानगरांमध्ये झाल्याने त्यांना नागपूर हे संथ शहर वाटू लागले. इथे फक्त आपले आजी – आजोबा राहतात, हे आपले शहर नाही हे त्यांच्या मनात बिंबले गेले. त्यात त्यांचाही काही दोष नव्हता. करियरला संधी, उभारी मिळणारी ठिकाणे कुणालाही आपलीशी वाटणारच. घरमालक आजी आजोबा नागपूरला अगदी एकटे पडलेत. तरूणपणी एकत्र कुटुंबात वाढावे लागल्याने राजाराणीच्या संसारासाठी आसुसलेल्या या पिढीला आता हा राजाराणीचा संसार अक्षरशः बोचू लागला. भरलेले, हसते खेळते असावे म्हणून बांधलेले घर आता फक्त झोपाळ्याच्या करकरणार्या कड्यांच्या आवाजात आणि संध्याकाळी मावळत्या सूर्यासोबत अंगणातल्या झाडांच्या लांब सावल्यांमध्ये बुडून जायला लागले. मुला – नातवंडांच्या संसाराची वाढ लक्षात घेऊन बांधलेले चांगले ८०० – ८५० फुटांचे प्रशस्त स्वयंपाकघर सकाळी साध्या भातासोबत फोडणीचे वरण आणि संध्याकाळी त्याच उरलेल्या भाताला फोडणी दिलेली बघू लागली. स्वयंपाकघरातल्या ताटाळात असलेल्या ३० – ४० ताटांवर धूळ जमू लागली. सकाळ संध्याकाळ एक कुकर, दोनतीन भांडी, एक कढई आणि दोन ताटल्या एवढ्यातच भांड्यांचा संसार आटोपू लागला.
मालकांची मुलेही पुण्यात, बंगलोरला स्थाइक झालीत. ही दुसरी पिढीही आता निवृत्तीच्या आसपास आली होती. त्यांची मुलेही तिथेच रमली होती, पोटापाण्याच्या उद्योगाला लागली होती. नागपूरच्या त्यांच्या फेर्या वर्षातून सणांसाठी एकदोन वेळा किंवा ते ही जमेनासे झाले तर म्हातारा – म्हातारीला पुणे बंगलोरला बोलावून तिथेच महालक्ष्म्या गणपती हे सण साजरे होऊ लागलेत. “आमच्या घरच्या महालक्ष्म्या या वर्षी म्हैसूरला बसल्या होत्या हं” हे अभिमानाने सांगण्यातल्या सुरांत “कधीकाळी महालक्ष्म्यांसाठी लागतील म्हणून खूप फुलझाडे, केळीच्या पानांसाठी केळी नागपूरच्या घरात लावलेली होती त्यांचा या वर्षी उपयोगच झाला नाही. सगळी तशीच सुकून गेलीत.” हा सूर मनातल्या मनातच खंतावू लागला.
म्हातारा – म्हातारी आजारी पडू लागलेत. हाॅस्पिटलायझेशन साठी मुले येऊ लागलीत. ती पिढी तर यांच्यापेक्षा जास्त थकलेली. “बाबा / आई, तुम्ही तिकडेच चला ना आमच्यासोबत. सगळ्यांनाच सोईचे होईल.” असा व्यावहारिक मार्ग निघू लागला. म्हातारा – म्हातारी सहा महिने, वर्ष आपल्या वास्तूपासून, जीवनस्वप्नापासून दूर राहू लागलेत.
जीवनक्रमात अपरिहार्य म्हणून दोघांपैकी एक देवाघरी गेल्यावर तर राहिलेल्या एकट्यांचे जिणे अधिकच बिकट होऊ लागले. छोटीछोटी दुखणीखुपणी, अपघात अगदीच असह्य होऊ लागले. नागपुरात रूजलेले, वाढलेले हे वृक्ष आपल्या मुळांपासून तुटून दूरवर कुठेतरी रूजण्यासाठी नेल्या जाऊ लागलेत. नाईलाज असला तरी ही मंडळी मुला नातवंडांमध्ये रमू लागलीत. नागपुरातली घरे मात्र यांच्या जाण्याने यांच्यापेक्षा जास्त थकलीत.
अशा विस्तीर्ण प्लाॅटसवर आणि मोक्याच्या जागांवर बिल्डरांचे लक्ष गेले नसते तरच नवल. एवढ्या मोठ्या प्लाॅटवर फक्त २ माणसे राहतात ही बाब त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाला पटण्यासारखी नव्हती. अशा टुमदार घरांचे करोडोंचे व्यवहार होऊ लागलेत. त्याजागी ५ – ६ मजली लक्झरीयस फ्लॅटस बांधले जाऊ लागलेत. थकलेली घरे जमीनदोस्त झालीत. सोबतच घर मालक मालकिणींची स्वप्नेही नव्या फ्लॅटस्कीमच्या खोल पायव्यात गाडली जाऊ लागलीत. एक दीड कोटी रूपये मिळालेत तरी ते घर, त्याच्याशी निगडीत स्वप्ने, त्याचा टुमदारपणा, ऐसपैसपणा याची किंमत कितीही कोटी रूपयांमध्ये होऊ शकत नाही ही जाणीव आयुष्याच्या संध्याकाळी काळीज पोखरत राहिली.
थकलेल्या संन्यासी घराची भिंत अशीच हळूहळू खचत राहिली.
लेखक : प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
प्रस्तुती : मोहन निमोणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
संस्थेत कामाला जाण्यासाठी मी घरातून निघाले साधारणपणे साडेबारा एक ची वेळ होती मी गेटच्या बाहेर आले तर आमचे सर भेटले.मी म्हणाले सर कुणीकडे चालला आहात?… ते म्हणाले, शनी देवळाकडे… मी म्हटलं चला मी सोडते तुम्हाला… आणि मग रिक्षा केली माझ्या शेजारी बसलेले माझे शिक्षक हे माझे पूर्वीचे मुख्याध्यापक ज्यांच्या नावाने मी तो ट्रस्ट चालवते ते श्री तडवळकर सर होते. मग रिक्षात बसून मी संस्थेत झालेल्या ऍडमिशन्स ..असलेले शिक्षक.. इंग्रजी माध्यमाचे प्रवेश बंद झालेले तुडुंब भरलेले वर्ग… याबद्दल मी सर्वांना माहिती देत होते मी विस्तृत पणे काय योजना केली आहे ते विचारत होते हे …सर्व बोलणे समोरचा रिक्षावाला मुलगा छान पद्धतीने ऐकत होता. सरांना मी दत्त चौकात सोडलं आणि मी संस्थेत येण्यासाठी निघाले.
त्यावेळेला रिक्षावाल्या पोराने विचारलं ,बाई तुम्ही शाळेत शिकवता का?.. मी म्हणाले हो. मी शिक्षिका आहे…. मी त्याला विचारलं तू किती शिकला आहेस? . तो म्हणाला मी बारावी पास आहे. तो मुस्लिम समाजाचा होता तो म्हणाला आमच्याकडे जास्त शिकत नाहीत लगेच कामधंद्याला लावतात त्यामुळे पुढे इच्छा असून मी शिकू शकलो नाही. कारण घरात माणसं खूप आहेत प्रत्येकाला कमवावाच लागतं. मग मी नापास मुलांवर करीत असलेल्या कामाची त्याला माहिती दिली त्याला त्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे असे मला लक्षात आले संस्थेजवळ रिक्षा आल्यावर त्याला मी पैसे दिले आणि त्याला म्हटलं तुला शाळा पाहावयाची आहे का? .. तो म्हणाला हो मला खूप आवडेल…. मग मी त्याला संस्थेत घेऊन आले प्रत्येक वर्गात त्याला फिरवलं त्याची थोडी माहिती मुलांना दिली आणि मुलांना म्हणाले बघा त्याची इच्छा असून त्याला शिकता येत नाही तुम्ही नापास झाला तरी तुम्हाला पालकाने पुन्हा शिकण्याची संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करा मग तोही मुलांना म्हणाला… अरे खूप चांगले चांगले शिक्षक तुम्हाला मिळालेले आहेत आणि आई बाबा सुद्धा छान आहेत.. शिकल्यावर तुम्हाला चांगले काम मिळेल आणि तुमचे आयुष्य सुधारेल
….त्याच्या परी तो दोन वाक्य बोलून गेला चारही वर्गातून आल्यानंतर मी त्याला दारापर्यंत सोडायला गेले काही झालं तरी तो तरुण पोरगा होता त्याच्या मनामध्ये अशा अस्था निर्माण झाल्याच पाहिजेत त्याने मला मध्येच प्रश्नही विचारला तुम्ही याचा पगार घेता का? मी म्हणाले नाही एक रुपया सुद्धा घेत नाही त्याला त्याचे खूप आश्चर्य वाटले होते दारापर्यंत आल्यावर तो मुलगा मागे वळला आणि झटकन माझे दोन्ही हात हातात घेतले थोडासा झुकला आणि म्हणाला “आप महान पुरुष हो “…हे कुठेतरी बहुदा त्याने वाचलेले किंवा ऐकलेल वाक्य असावं मला खूप हसायला आलं तो प्रचंड भारावलेला होता मी म्हणलं नाही नाही महान स्त्री हू असं म्हण पाहिजे तर पुरुष नको रे त्यावर तो हसला …वही वही… आम्हाला कुठल्या एवढ्या चांगलं बोलता येते मॅडम तुम्ही मला एवढ्या प्रेमाने शाळा दाखवली लय छान वाटलं लई मोठं काम करता हो तुम्ही खरच मॅडम तुम्ही महान आहात!… मी म्हणलं नाही अरे प्रत्येकाने समाजासाठी असं थोडं काम करायलाच पाहिजे अगदी तू तुझ्या रिक्षात सुद्धा एखादा गरजू आजारी म्हातारा माणूस फुकट नेऊन सोडलास किंवा अडवाडवी न करता सोडलास तरीसुद्धा ते एक मोठं काम आहे हे लक्षात ठेव….! त्याने पुन्हा एकदा माझ्यासमोर कमरेपासून मान झुकवली आणि हसत हसत तो रिक्षा घेऊन निघून गेला……..!
मला वाटतं आपल्या तरुण मुलांना अशा कामाची ओळख करून देणे गरजेचे आहे तर त्यांच्यामध्ये आपण असं काम करावं अशी भावना निर्माण होईल त्यांच्यासमोर जो आदर्श असेल तो त्यांना नक्की भारावून टाकतो शाहरुख खान सलमान खान हे आज त्यांचे आदर्श झालेत तेही कदाचित खूप चांगलं काम करत असतील पण त्यापेक्षा ते जे पात्र साकारतात त्याच्यावर त्यांचे प्रेम असते त्या पात्राच्या आदर्श भूमिकेवर नसते आता तरुण मुलांचे हिरो बदलण्याची गरज आहे त्यासाठी त्यांना चांगले काही दाखवणे आणि ऐकवणे गरजेचे आहे असे मला वाटते तुम्हाला ही असेच वाटते ना?…. मग आपण एक छोटासा आदर्श त्यांच्यासमोर उभा करायला काय हरकत आहे….!
क्लिनिकमध्ये एसी चालू होता तरी घाम फुटलेला कारण समोर डॉक्टर माझे टेस्ट रिपोर्ट तपासत होते.डॉक्टरांच्या म्हणजेच राजाकाकांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच शांत आणि गंभीर भाव.त्यामुळे धाकधूक वाढली.
‘मन चिंती ते वैरी न चिंती’ हेच खरं.आता काय ऐकायला लागणार?या विचारानं पोटात भीतीचा गोळा आला.
“तब्येतीकडे फार दुर्लक्ष केलंलं दिसतंय” राजाकाकांनी विचारलं.
“एनिथिंग सिरीयस”घाबरून विचारलं पण राजकाकांनी काहीच उत्तर दिलं नाही उलट चेहरा जास्तच गंभीर केला तेव्हा धाबं दणाणलं.माझा केविलवाणा चेहरा बघून राजाकाका हसायला लागले.
“अरे गंमत करतोय.उगीच टेन्शन घेऊ नकोस.रिपोर्ट नॉर्मल आहेत.बीपीचा त्रास सोडल्यास विशेष काही नाही. गोळी सुरु करावी लागेल.”
“तुमची रिअॅक्शन बघून हादरलो ना.”
“सॉरी!!”
“हुssssश!!सुटलो.सगळं व्यवस्थित आहे ऐकून जीव भांड्यात पडला.आता टेंशन नाही.या तब्येतीच्या नादात बरीच काम राहिलीत.थँक्यू सो मच!!”
“ओ मिस्टर,एकदम उड्या मारू नका.१०० % फिट नाहीयेस.कसाबसा काठावर वाचलायेस.आता लक्ष दिलं नाही तर नंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील.”
“म्हणजे”
“अजून चाळिशी गाठली नाहीस तरी ब्लडप्रेशरचा त्रास.हे चांगलं लक्षण नाही.पळापळ कमी कर.जरा जीवाला विश्रांती दे.लाईफ स्टाईल बदलावी लागेल.”
“मग ज्याच्या भरोशावर हे सगळे करतोस त्या शरीरासाठी काही इन्व्हेस्टमेंट केलीय का?”
“समजलं नाही”
“बहुतेकजण स्वतःच्या तब्येतीसाठी काहीच करत नाही.स्वतःला गृहीत धरून मला काही होणार नाही.एकदम फिट आहे या भ्रमात राहतात आणि आजारी पडले की घाबरतात.एक गोष्ट कायम लक्षात ठेव अचानक कोणताही आजार होत नाही.आपलं शरीर वेळोवेळी सूचना देतं परंतु त्याकडं दुर्लक्ष केलं जातं.आवश्यक ती काळजी घेतली जात नाही आणि मग त्रास वाढल्यावर डॉक्टरांकडे जातो.तिथंही घाई असतेच.चटकन बरं व्हायचं असतं.”
“काका,मनातलं बोललात.मनकवडे आहात.”
“साधी गोष्ट आहे रे.तब्येत ठणठणीत तर सगळं चांगलं.नाहीतर काहीही उपयोग नाही.स्वतःच्या बाबतीत केला जाणारा बेफिकिरी हा फक्त तुझाच नाही तर अनेकांचा प्रॉब्लेम आहे.”
“खरंय,कामाच्या टेंशनमुळे खूप दिवस डिस्टर्ब आहे. शांत झोप नव्हती. जेवण जात नव्हतं.डोकं दुखायचं,अस्वस्थ होतो.
खाण्या- पिण्याचं काही ताळतंत्र नव्हतं.कामाच्या नादात त्रासाकडं लक्ष दिलं नाही.आता असह्य झालं तेव्हा तुमच्याकडे आलो.
“अजूनही वेळ गेलेली नाही.आजपासून आधी स्वतः मग फॅमिली आणि नंतर कंपनीचा विचार करायचा. दिवसातली ३० मिनिटं तरी व्यायाम करायचाच.खाण्यावर कंट्रोल ठेव.मी सांगतो तसं वागलास तर काहीही होणार नाही.”जिवलग मित्रासारखं राजकाकांनी समजावून सांगितलं.काकांशी बोलल्यावर एकदम फ्रेश वाटलं.
राजाकाका, वयाची सत्तरी पार केलेली तरीही तरुणांना लाजवेल असा उत्साह, पूर्णपणे फिट, प्रसन्न आणि बिनधास्त डोळे झाकून विश्वास ठेवावा असं व्यक्तिमत्व.आमचे फॅमिली डॉक्टर.आजोबा नंतर बाबा आता मी आमच्या तीन पिढ्या त्यांच्याकडून औषध घेतोय.राजाकाका म्हणजे कुटुंबाचाच भाग.आमच्याप्रमाणे अनेकांचे फॅमिली डॉक्टर होते.
आजच्या काळात अनेक डॉक्टर्स भरमसाठ फी घेतात,गरज नसताना वेगवेगळ्या टेस्ट करायला लावतात याची राजकाकांना प्रचंड चीड होती कारण काकांची डॉक्टरकी ही ओल्ड मेथड होती.पेशंटचं पूर्ण ऐकून त्याला हवा तेवढा वेळ देऊन त्रास समजून घ्यायचा.त्यावर आधी बिनखर्चाचे उपाय सुचवायचे आणि आवश्यकतेनुसार उपचार करायचे.नेमकी औषधं आणि काळजी घेतली तर पेशंट नक्की बरा होतो हा आजवरचा अनुभव.अगदीच आजार गंभीर असेल तरच आवश्यक तपासण्या करण्याचा सल्ला.पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल तर कोणतीही व्हिजिट फी न घेता स्वतःहून भेटायला जाणार.
त्याकाळच्या असलेल्या ‘फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेचं “राजाकाका” हे मूर्तिमंत प्रतीक.
सुमारे २५ वर्षापूर्वी ‘फॅमिली डॉक्टर’ सगळीकडे होते. त्यांच्याकडे जाताना अपॉटमेंट वैगरेची भानगड नव्हती. पैसे असले-नसले तरी उपचार व्हायचे. औषधं मिळायची. कधी गरज पडली तर एक्स्ट्रा चार्ज न घेता डॉक्टर घरीसुद्धा यायचे. कौटुंबिक समारंभात डॉक्टरांचा सहभाग हा ठरलेलाच. इतर अडी-अडचणींच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला जायचा. पेशंट आणि डॉक्टर एवढ्यापुरतं न राहता परस्परांशी प्रेमाचं ,जिव्हाळ्याचं आणि माणुसकीचं नातं होतं.
—–
आजच्या स्पेशालीस्ट,सुपर स्पेशालीस्टच्या जमान्यात ‘फॅमिली डॉक्टर’ संकल्पना जवळपास संपली.हॉटेलसारख्या टापटीप,चकचकीत क्लिनिकमध्ये डॉक्टर आणि पेशंट यांच्यात फक्त व्यवहार होतो.जेवढ्यास तेवढं बोलणं.आपुलकी वैगेरे काहीही राहिलं नाही.
“माणसापेक्षा पैसा मोठा झाला अन दवाखान्याचं दुकान झालं.” अशावेळी सगळ्यात मोठी उणीव भासतेय ती फॅमिली डॉक्टरांची.