मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगणं साठवत राहायचं बस…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “जगणं साठवत राहायचं बस…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

खाकी चड्डी पांढरा शर्ट घालून, जुनी चप्पल पायात असायची. शाळेत जाईपर्यंत तिचा पन्ना चार वेळा निघायचा. तो बसवत बसवत शाळा गाठायची. नंतर दिवस बदलले.. संघर्ष बदलला. मग पुण्यात भाजीपाला भरलेली हातगाडी घेऊन ओरडत पुणे तुडवले.. नंतर वाचमन झालो… पुण्यात विमान दिसायचं म्हणून पुणे आवडू लागलेलं… काही काळ हाऊस किपिंगचे काम…. एखाद्या सिनेमातच दुसरा देश बघायला मिळायचा. लै वाटायचं आपण कधी इमानात बसणार.. कधी हा देश बघणार… मनातल्या मनात हे चालायचं..

कवितेने पोट भरत नाही हा टोमणा ऐकतच मी कवितेला जवळ धरलेलं… मी आज हक्काने सांगू शकतो, कवितेने पोट भरते, आणि कविता भरभरून खूप काही देते… फक्त कविता मिरवण्यासाठी नाही तर गिरवण्यासाठी लिहायची असते… तुम्हाला एक खरं सांगू का? आपल्या कवितेचा दराराच इतका वाढवला मी की जाती- धर्माच्या भिंती फोडून मी सीमा ओलांडून अलगद बाहेर पडलो…. आता फक्त राज्यातच नाही तर पूर्ण जगात फिरतोय.. फक्त सगळ्या अपडेट मी सोशल मीडियावर देत नाही किंवा त्याबद्दल व्यक्त होत नाही..

दर महिन्याला किमान एका तरी देशात कवितेचा कार्यक्रम होत आहे.. हे सगळं मी पुस्तकात लिहिणार आहे आणि ते पुस्तकच तुमच्या स्वाधीन करणार आहे..

आणखी एक.. अगदी खेड्यातल्या एखाद्या चौकात छोट्याश्या स्टेजवरसुद्धा मी कविता घेऊन उभा असतो. तिथं मानधन ही लै त लै तीन हजार असतं.. पण कधीच कुणाला नकार देत नाही.. मानधनाच्या रक्कमेवरून मी कुणाला नकार दिलाय असा संयोजक शोधूनही सापडणार नाही. कधी कधी तर संयोजकाची परिस्थिती फार बेताची आहे आणि त्याच्या खिशातून खर्च करून आपल्याला आणलं आहे हे जाणवू लागलं की, लगेच मिळालेलं मानधन परत द्यायला माझे हात कायम खुले होतात.. असं जेव्हा करतो तेव्हा संयोजक असणाऱ्या माणसाच्या डोळ्यात खळकन् पाणी आलेलं मी बऱ्याचवेळा अनुभवलेले आहे..

बाकी अती प्रसिध्दी नसावी, आपले फॉलोवर कमी असावेत पण रॉयल असावेत.. कमी प्रसिध्दी असली की रानटीपणाने हिंडता येतं जगता येतं… कधी कधी गर्दीत कुणी ओळखले आणि जवळ आले की छातीत धडक भरते.. नको वाटतं.. स्टेजवर असतो तेव्हाच काय तो नितीन चंदनशिवे.. इतर वेळी मला माझं मैदान हवं असतं.

बाकी काचेचा मॉल असो किंवा गावातला चौक, विमान असो किंवा एस टी, आपण कायम असाच हाताच्या बाह्या वर सरकवून रेडा फिरल्यासारख हिंडत राहायचं…  शेवटी आयुष्य हे आपलं आहे.. अंगाला माती लावून जगत असताना आकाश मोजता मोजता ओंजळीत भरभरून जगणं साठवत राहायचं… बास इतकंच…

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोन्याची पानं, बॅडमिंटन आणि खिचडी…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

परिचय

शिक्षण : DME, AMIE, Diploma in Design.

जन्मतारीख: ७/८/७२

साहित्य:- कथा, कविता, ललित लेख, स्तंभ लेखन महाराष्ट्रातील नावाजलेल्या दैनिक, दिवाळी अंक आदीमधून.. आकाशवाणी नागपूर, युवावाणी, दैनिक सकाळ, लोकमत, तरूण भारत, मटा,जनवाद, लोकसत्ता, लोकशाही वार्ता, नावाजलेल्या विविध दिवाळी अंकासाठी लिखाण…

साहित्य पुरस्कार:-  शब्दवर्षा, तेल्हारा, अकोला, कालिदास पुरस्कार, वर्धा, काव्य साधना , भुसावळ, उ.रा.गिरी. अमरावती असे लिखाणासाठी पुरस्कार

संपादन:- (१) इंद्रायणी काठी… कवितेसाठी.. त्रैमासिक (२) आशा दिवाळी अंक (३) अभियान वार्षिकांक

? मनमंजुषेतून ?

☆ “सोन्याची पानं, बॅडमिंटन आणि खिचडी…” ☆ प्रा. भरत खैरकर 

३० x ९ x६ =१६२० दिवस! निकेतनात घालविलेले हे दिवस.. तब्बल एक हजार सहाशे वीस जवळपास.. ह्यातल्या एका एका दिवसाविषयी लिहायचं म्हटलं तर एकूण एक दिवसच खूप खूप लिहीण्याजोगा.. प्रत्येक दिवस कधी मित्रांचा.. कधी शिक्षकांचा. कधी कर्मचाऱ्यांचा.. तर कधी एकूणच सर्वांचा. असा असायचा.

निकेतनात व्यक्तिशः असा अनुभव फार कमी यायचा.. त्यात ग्रुप सामील असायचाच.. निदान दोघे तिघे तरी असायचेच.. एकाटं दुकाटं उनाड पोर इथे मिळणं कठीणच..! जोडी जोडीने बऱ्याचश्या जोड्या होत्या. आठवण परस बागेतली असो.. हॉलमधली असो.. एनसीसी मधली असो… स्काऊट मधली असो किंवा वर्गामधली.. नाहीतर मेस मधली. असे एक ना अनेक दिवस आणि आठवणींनी निकेतन अंगात संचारतं त्यातलेच हे तीन दिवस…

बहुदा माझ्या सातवीतला तो दसरा असावा. विद्यानिकेतनात सर्व मुलांची दसरा मैदानावर कार्यक्रम बघायला जाण्याची गडबड चालली होती. मी मात्र कुठल्याशा आजाराने फणफणलो होतो. डोळ्यावर गुंगी होती. रूम बाहेर चाललेली मुलांची लगबग मला कळायची.. पण उठवेना आणि काही त्राणच माझ्या अंगात नव्हते. हळूहळू सर्व कोलाहल शांत झाला( की मला झोप लागली होती!) नक्की सांगता येत नाही! रात्री सात आठ वाजता चांगला दरदरून घाम फुटला.. जाग आली.. तेव्हा सर्व हॉस्टेल सामसूम झालं होतं. कर्मचारीही लवकर जेवण आटोपून बाहेर गेले असावे कारण दसरा असल्याने आपापल्या घरी नातेवाईकांसह सण साजरा करीत होते बहुदा..

मला खूप एकटं-एकटं वाटत होतं. घरची खूप आठवण येत होती. आपण आता घरी असायला पाहिजे होतं. ह्या विचारानं स्पुंदून स्पुंदून मी रडत होतो. ऐकायला कोणीच नव्हतं. किती वेळ रडलो माहिती नाही.. मग खूप खूप गाढ झोपलो. तर सकाळ झाली होती.. तेव्हा माझ्या अंथरुणावर चांगली अर्धा टोपली भरेल एवढी सोन्याची पानं म्हणजे आपट्याची पानं होती.. रात्री बहुदा एकटा एकटा असलेल्या मला माझे एवढे सवंगडी, एवढे नातेवाईक कधी भेटून गेले कळलंच नाही!! रात्री दसरा मैदानाहून परतल्यावर मित्रांनी, शिक्षकांनी, आठवणीने मी झोपलो असतानाच दिलेल्या शुभेच्छा.. नंतरच्या कितीतरी दसऱ्यांमध्ये मला मिळाल्या नाहीत. ती रात्र.. ती सोन्याची पानं.. अजूनही दर दसऱ्याला मला, बायकोला, मुलाला माझ्या होस्टेलची आठवण करून देतात..

असाच एक दिवस सकाळी सकाळी पिटी आटपून आलो.. तर नेहमीप्रमाणे नंदकिशोर आणि विकास मधल्या चौकात बॅडमिंटन खेळत होते. कां कुणास ठाऊक या खेळाचे एक अनामिक आकर्षण मला पूर्वीपासूनच आहे.

मला हे ठाऊक नव्हतं की ह्या दोघांनी आपापल्या पैशाने ती रॅकेट अन फुल( शटल कॉक) आणलेलं म्हणून! मला वाटायचं की स्पेशल ह्यांनाच कसं खेळायला देतात.. ?? वगैरे.

खूप दिवसाचा तो खेळ खेळायचा म्हणून मी चंग बांधला होता. पण दुसरा पार्टनर हवा ना! कारण आम्हांला दोघांचीही रॅकेट हिसकावून गेम खेळायचा होता. एकाची हिसकावून चालणार नाही कारण दुसरा मग खेळणारच नाही. आता काय करायचं? दुसरा एवढा  ‘प्याशीनेट’ गडी शोधायचा कुठे? म्हटलं अजून नको वेळ घालवायला.. मधल्या चौकात जाऊन सरळ सरळ नंदकिशोर जवळून जवळपास मी रॅकेट हिसकावली.. तो लहान जीव.. लागला त्याच्या परीने विरोध करायला.. !! मी इकडे विकासला ” अरे, चल टाक सर्विस.. ” म्हणून एकदम रंगात आलो होतो.. शटल कॉक मागे नंदकिशोर इकडून तिकडे धावत होता.. मला गंमत वाटायची.. पण ही सगळी गंमत आमचे सर कुठून तरी बघत होते.. मला कळलं नाही ! मी आपला गुंग होतो. इतर सीनियर मुलही सरांच्या मागे मागे हळूहळू पुढे होणाऱ्या मनोरंजनाची वाट बघत होते.

सर दबक्या पावलांनी आले. त्यांनी माझी मानगुट पकडली आणि सपकन ‘व्हीसल कॉड ‘माझ्या पोट-यांवर उमटविला.!! आकाशात उडालेलं फुल आता ताऱ्यांमध्ये रूपांतरित झालं होतं! दुसरा ‘व्हीसल कॉड ‘ बसेस्तोवर.. प्रकरण काय आहे.. ते माझ्या ध्यानात आलं होतं. म्हटलं “नाही सर, नाही.. आता नाही करणार. “

“लहान मुलांना त्रास देतोस त्यांची वस्तू आणि त्यांनाच मारतोस.. ” वगैरे.. वगैरे.. पुढचं काही आठवत नाही.

पण बॅडमिंटनचे फुल आजही सकाळी बायकोसह बॅडमिंटन खेळताना निकेतनाची आठवण करून देत आणि सांगतं आपल्याच वस्तूवर हक्क सांगा.. दुसऱ्यांच्या नाही.. हवी असल्यास ती कष्टाने मिळवा.. ओरबाडू नका..

मोझरी… राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गाव… ह्या गावापासून साधारण तीन-चार किलोमीटर अंतरावर  “दास टेकडी” आहे. त्या दासटेकडीच्या पायथ्याला दरवर्षी अमरावती जिल्हा स्काऊट गाईड आणि एनसीसीचे कॅम्प त्याकाळी भरायचे..

सन १९८६ ची घटना असावी.. आम्ही सर्व ‘ शिवाजी पथक ‘ नावाने स्काऊट गाईड कॅम्पला सरांच्या मार्गदर्शनाखाली मोझरीला गेलो होतो.. तिथे दास टेकडीच्या पायथ्याला आम्हांला दिलेल्या जागेवर एक चौकोनी आकाराची जागा स्वच्छ करून आम्ही आमचा तंबू उभारला होता.. तंबूभोवती कुठल्याही प्रकारचा सरपटणारा प्राणी येऊ नये, म्हणून खोल खड्डा करून घेतला होता..

दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या ग्रुप मधील आठपैकी सहा जणांसह सर कुठल्यातरी ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यायला गेले होते. मी आणि सोहेल या दोघांकडे त्यादिवशी स्वयंपाकाची जबाबदारी होती. आम्ही दोघेही स्वयंपाकात तसे हुशारच(!).. मग करायचं काय? तर खिचडी करायचं ठरलं… तर पाणी एवढं टाकलं गेलं की खिचडी काही केल्या घट्ट होईना.. पाणी काही आटता आटेना!

आम्हांला ते जास्त पाणी बाहेर काढून टाकावं एवढं साधं ज्ञानही त्यावेळी नव्हतं! आता काय करायचं ? तोवर खिचडीचा चांगलाच ” घाटा ” तयार झाला होता.

थोड्यावेळाने इतर मित्र परतले.. भुकेलेले होते पटकन जेवायला द्या.. म्हणू लागले.. आमचे चेहरे पाहून सरांनी ओळखलं होतं “कुछ तो गडबड है ” त्यांनी चुलीवरचं भांड बघितलं.. त्यात भरपूर पाणी असलेला ” भात कम खिचडी कम घाटा ” त्यांना दिसला. त्यांचं डोकं चांगलं सटकलं.. सटकणारच.. कारण भुकाचं तेवढ्या लागल्या होत्या.. पण ते मारू शकत नव्हते.. कारण ” स्काऊट गाईड “होता ना! एनसीसी नव्हे!

पण शिक्षा तर द्यायलाच हवी. मग आम्हां दोघांनाच तो घाटा.. ती खिचडी.. दोन दिवस खाऊन संपवावी लागली.. तेव्हापासून मी स्वयंपाकात परिपक्व झालो.. स्पेशली “फोडणीचा भात ” मी अप्रतिम बनवितो! आणि खिचडीही तेव्हापासून माझी आवडती झाली ती आजतागायत.. !!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इमेज जपताना…  लेखिका : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ इमेज जपताना…  लेखिका : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

“ ए ये गं, शुक्रवारची सवाष्ण म्हणून जेवायला… किती दिवस झाले आपण रोजच बाहेर भेटतो… घरी कधीतरी तुला घरी बोलवायचे… हे ठरवलंच होतं…. या निमित्ताने येशील तरी…! “ तिचा आर्जवी सूर मोबाईल मधून उमटला.

माॅर्निग वाॅक ला न चुकता भेटणारी ती…! उन असो, थंडी पाऊस असो… तिची वेळ कधीच चुकत नाही… एका ठराविक ठिकाणी तिचे भेटणे ठरलेलेच असते. सडसडीत बांधा आखूड केसांचा वर बांधलेला पोनी… ट्रॅक सूट… निळसर बूट घालून, झपझप तिचं बाजूने पास होणे… ठरलेले असायचे.

एक नेटकं आणि स्वतंत्र विचारांचे व्यक्तिमत्व असणार ही म्हणजे… तिची अशीच इमेज माझ्या मनात दृढ होत गेली…. आम्ही एकमेकींना फक्त अंतरावरुन बघत होतो… रोजच्या भेटण्यातून कधीतरी एक स्मितहास्याची रेष दोघींच्याही चेहऱ्यावर… अशीच कधीतरी विसावून गेली. माझ्यासारखीच मध्यमवयीन… त्यामुळे अर्थातच… स्थिरावलेल्या संसारातील… थोडी निवांत गडबड… जशी मला असते… तशीच तिलाही असणारच…!

थांबून खास गप्पा मारण्याइतका परिचय नसला तरी.. अंतरीक आपलेपण दोघींनाही सारखंच जाणवत असणार… कधी चुकामुक झाली किंवा… कधी फिरण्याची दांडी पडली तर… आज तिची भेट झाली नाही… याची हुरहुर क्षणभर जाणवून जाई… तिलाही आणि मलाही.

मग आपोआप समोर येताच ‘कुठे दोन दिवस ? ‘चे प्रश्नचिन्ह एकमेकींचे डोळे वाचून जात… आणि न विचारताच कारणांचा पाढा वाचला जाई.

परवा मात्र मला थांबवून तिने मोबाईल नंबर घेतला… आणि मी तिचे जेवणाचे आमंत्रण ही सहजच स्विकारले.

आटोपशीर पण निवडक गोष्टींनी सजवलेला तिचा टू बीएचके… इरकलीचे पंचकोनी तोरण सागवानी दारावर उठून दिसत होते…. उंबऱ्याच्या दोन्ही बाजुला छोटीशी रेखीव शुभ्र रांगोळी… फक्त लालचुटुक कुंकवाच्या शिंपणाने पवित्र वाटून गेली. मोकळा… जुजबी फर्निचर मांडलेला हाॅल… समोरच्या काचेच्या काॅर्नर स्टॅण्डमध्ये… ठेवलेल्या ट्राॅफीज… तिच्या लवचिक… देह मनाची साक्ष देणाऱ्या भरतनाट्यम नृत्याविष्काराचा छंदांची जणू पावतीच देत होत्या. ती बॅंकेत सर्व्हिस ला आहे ही जुजबी माहिती तिच्या बोलण्यातून मला समजली होती.

तिच्या दोन मुली आणि सासूबाई… हसत बाहेर येत, वातावरणात मोकळेपणा पसरवून गेल्या. पहिल्यांदाच तिच्याकडे गेल्यावर… तिच्याशिवाय कोणी ओळखीचे नाही… ही माझी थोडी uneasy भावना, त्या आजी नातींनीं सपशेल मोडीत काढली.

थोड्या गप्पा होईपर्यंत… तिने भाजी आमटी गरम करायला ठेवले. ती खासच सुगरण असणार… गरम होत असणारी भाजी आमटी जठराग्नी चेतवून गेली. नैवेद्याच्या ताटासाठी भाताची मूद करण्यासाठी कुकर उघडताच… आंबेमोहोर तांदळाचा वास दरवळून गेला… चांदीच्या ताटवाटीतला तो भरगच्च नैवेद्य तुळशीपत्राने परिपूर्ण होऊन गेला.

सवाष्णीसाठी चे ताट, वाटी तांब्या भांडे, पानं फुलांच्या सुबक रांगोळीत, टेबलावर सजलेले‌ होते. मी मलाच शाबासकी दिली… आपण मनात तिची नेटकी जपलेली इमेज बरोबर आहे.

गरम पोळी करुन वाढण्यासाठी… तांदळाच्या पिठी पासुन… भिजलेली कणिक, पुरणाचे उंडे… तिची किचन ओट्यावरची आटोपशीर तयारी तिच्यातल्या गृहकर्तव्यदक्षतेची साक्ष होती जणू.. !

ती एक उत्तम सून.. उत्तम आई.. उत्तम पत्नी.. उत्तम मुलगी… असणार, हे तिच्या एकंदर वावरातून लक्षात येऊनच गेले होते.

तिची मुलींना सासूबाईंना सोबत घेऊन जिवतीची आरती औक्षण करण्याची लगबग… सारे घर भारल्यासारखे झाले. औक्षणाचे तबक खाली ठेवताना… माझे लक्ष देवघराजवळच लावलेल्या उमद्या चेहऱ्याच्या दोन तसबिरी कडे गेले. तसबिरीस लावलेले गंधटिळे खुप काही बोलून गेले… !

माझी तसबिरीत अडकलेली नजर तिच्या‌ चाणाक्ष नजरेने लगेचच पकडली. माझे धाकटे दिर आणि माझे मिस्टर… तिची फोटोतल्या कुटुंब प्रमुखांची ही अनपेक्षित ओळख… मी क्षणभर सुन्नच होऊन गेले… !

आठ एक वर्षांपूर्वी एका अपघातात दोघेही on the spot गेले, ही माझ्या धाकट्या दिराची मुलगी… आणि ही माझी… !

अवयव दानाचा फाॅर्म केवळ आठ दिवस आधीच दोघा भावांनी भरला होता. तो सर्वांगाने नाही पण काही अंगांनी… अन् कित्येक अर्थाने माझ्यासाठी अजुनही इथे अस्तित्वात आहे… !

या समाजात, कुणाचे डोळे… कुणाची किडनी, कुणाची स्किन होऊन वावरत आहे.

तिच्या कपाळावरची लालचुटुक टिकली आणि गळ्यात पदराआड विसावलेले छोटेसे मंगळसूत्र… क्षणमात्र लखलखीत झाल्याचा भास मला होऊन गेला.

चार वर्षापूर्वी धाकट्या जावेला नव्याने तिचा पार्टनर मिळून गेला. हिला मात्र मी माझ्या जवळच ठेवून घेतले… माझी दुसरी मुलगीच ही पण… तिने तिच्या पुतणीला जवळ ओढले.

तिचे डोळे क्षणभर गढुळल्यासारखे झाले… आणि पुन्हा घरातल्या पवित्र वातावरणात मिसळून नितळ झाले…. !

चला आता जेवायला बसा… मी गरम गरम पोळी करते… तुमचा वरणभात संपेपर्यंत… !

तिच्यातल्या गृहिणींची लगबग सुरु झाली.

… ती ओटी भरताना… तिचे दोन्ही हात माझ्या ओंजळीत भरून घेत मी तिला जवळ ओढलं… हां तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैने सोचता था… !

प्रत्येक नात्यात तू उत्तमच आहेस… पण एक माणुस म्हणुन… तुझ्यातली स्त्री अत्यंत संवेदनशील, कर्तव्य तत्पर आहे. तुझ्या देहबोलीतूनच तुझी इमेज  माझ्या मनात चढत्या आलेखात निर्माण झाली होती, त्याच्या कैकपटीने… तू प्रगल्भ आहेस. सन्मानित होणं आणि सन्मानित करणं.. तुझ्याकडून शिकावं, सलामच तुला!

ती प्रसन्न हसली… सकाळच्या माॅर्निग वाॅक मध्ये हसते तशी… एकदम ओळखीची… जवळची!

मुठीतून निसटलेल्या वाळूची खंत करत बसण्यापेक्षा मुठीत शिल्लक उरलेल्या वाळुस कसा न्याय द्यायचा… हे ज्यास समजते… तिथे शांती आणि समाधान हात जोडून उभे राहते… इतकंच खरं!!!

लेखिका : सौ. विदुला जोगळेकर

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विसर्जन…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “विसर्जन…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज बाप्पा तुझे विसर्जन 

डोळ्यात पाणीच आले टचकन 

१० दिवस कसे संपले ना झर्रर्रकन 

अन तुझ्या शिकवणींचा विचार 

डोळ्यांपुढे आला सर्रर्रकन….

 

खरंच बाप्पा तुझे येऊन जाणे परंपराच नाही 

तर आयुष्याची किती मोठी शिकवण आहे ना…

 

बाप्पा, येणार तो जाणारच हाच तर पाठ तू देतोस ना?

जगामध्ये तुम्हीपण पाहुणेच आहात हेच नकळत सांगतोस ना?

 

दीड तीन पाच सहा सात… अनंतचतुर्दशी पर्यंत तुझे येथील वास्तव्य…

तसेच कोणाचे किती वास्तव्य आहे हे काळावर अवलंबून आहे 

हेच खरमरीत सत्य तुला दाखवायचे आहे का रे?

 

गेल्यानंतरही आठवण रूपे मागे उरावे 

त्यासाठीच सगळ्यांच्या संकटात धावून जातोस ना?

लोकांचे दुःख हरण करून त्यांना सुख देतोस ना?

ज्यांना कोणी नाही त्यांचा आधार होतोस ना?

अजून कितीतरी आदर्श तू जनमानसांपुढे ठेवतोस ना?

 

आणि बाप्पा जाताना तुला हसत हसत नाचत निरोप देतात ना? 

 

मग विसर्जनचा खरा अर्थ आपला आत्माही सगळी विधायक कार्यें करून अनंतात समर्पित करावा असेच सुचवायचे आहे का?

– – हसत यावे, हसतच जावे, कीर्ती रूपाने मागे उरावे – एवढे भरदार कार्य करावे – सगळ्यांनी पुन्हा बोलवावे 

 

बाप्पा या शिकवणींचा विसर नको पडू देऊ 

एवढाच साधा भाव तुला अर्पण 

पुनरागमनायच म्हणत करीतो तुझे विसर्जन…

बाप्पा मोरया रे 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मखर रिकामं झालं !!…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “मखर रिकामं झालं !!…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता… 🙏

आता कुठं ओवाळू आरत्या नंतर चंद्रभागे मधे सोडोनीया देती जमायला लागलं होतं.. 🙏

आता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागत होती.. 🙏

एरव्ही स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या… 🙏

रिमोट साठी भांडणाऱ्या आमचं टिव्ही बंद करून, तुझ्या समोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं… 🙏

भाजीच्या पेंढीला न लागणारे हात दूर्वा निवडायला शिकत होते… 🙏

साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते.. आणि एवढ्यात 

…. एवढ्यात हा दिवस आणलास पण? 🙏

काल तर आलास आणि आज निघालास पण?

 

कठोरपणाने सृष्टीचे नियम 

शिकवणारा तू आदिगुरू ! 🙏

जिथं सृजन आहे तिथं 

विसर्जन अपरिहार्य..

असते असं म्हणत 

निघालास देखील, , , ,..

 

पण गजानना जाताना एवढं कर.. 🙏

 

फक्त तुझ्याच नाही तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहानं

कातर होणारं

साधं सरळ मन दे‌. 🙏

 

भाजी भाकरी असो वा 

पुरणपोळी सारख्याच आनंदाने 

खाण्याची स्थीर बुद्धी दे !! 🙏

 

प्रत्येकाच घर आणि ताट 

भरलेलं असू दे. 🙏

 

आणि त्या भरल्या ताटातलं 

पोटात जाण्याची सहजता दे. 🙏

 

लोकांचं दुःख कळण्याची 

संवेदना दे !! 🙏

 

अडचणीला धावून जाणारे 

तुझे पाय दे !! 🙏

 

अपराध क्षमा करून पोटात घेणारे 

तुझे लंबोदर दे !! 🙏

 

सूक्ष्मदृष्टीने पाहणारे 

बारीक डोळे दे !! 🙏

 

सार स्विकारून फोल नाकारणारे 

सुपासारखे कान दे !! 🙏

 

भलंबुरं लांबूनच 

ओळखणारी सोंड दे !! 🙏

 

शत्रूला न मारता त्याला आपला 

दास करणारा पराक्रम दे !! 🙏

 

सगळ्यात महत्त्वाचं, सर्वांचं 

मंगल करणारी बुद्धी दे !! 🙏

 

बहुत काय मागू गणेशा? 💐

 

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बुधवारातली खाऊगल्ली-

या परिसराचं प्रमुख आकर्षण म्हणजे ‘ बुवा आईस्क्रीमवाले ‘ मधुर, मुलायम चवीचं असं सुंदर आईस्क्रीम, आम्हा मुलांच जीव की प्राण असलेल्या या दुकानाचे नांव ‘बुवा’ कां ठेवले असेल? हे कोडं सोडवणं आमच्या बुद्धी पलीकडचं काम होत. आमच्यात तशी खूप चर्चाही व्हायची. शेवटी एकाने दिवे पाजळले, दुकानाच्या मालकांच्या भरगच्च मिश्यांमुळे ते ‘बागूल बुवा’ सारखे दिसतात म्हणून असं नाव ठेवलं असावं. पण काही म्हणा, हे ‘बुवा आईस्क्रीमवाले’ पुण्यात खूप प्रसिद्ध होते. धंदाही दणक्यात चालला होता. लग्न मुंजीसाठी मुहूर्ताची पहिली अक्षत कसबा गणपती पुढे असायची. नंतर दुसरा मान होता जागृत ग्रामदैवत तांबड्या जोगेश्वरीचा. भर उन्हांत कसबा गणपती नंतर श्री जोगेश्वरी ला अक्षत देऊन बाहेर पडल्यावर कोऱ्या साडीला खोचलेल्या चार बोटाच्या टिचभर रुमालाने घाम पुसत, नऊवारीचा बोंगा आंवरत, नथीचा आकडा सांवरत वधू माय नवऱ्याला म्हणायची, काय बाई हे ऊन! इश्य! कित्ती उकडतंय ! अहो आपण आइस्क्रीम खाऊया का गडे!” गौरीसारख्या नटून थटून आलेल्या बायकोकडे बघून आणि तिच्या गोड बोलण्याला विरघळून नवऱ्याचं आईस्क्रीमच व्हायच. आणि मग ती जोडी त्या गारव्यात शिरायची. आम्हाला त्यांच्यामागे दुकानात शिरावंस वाटायच. पण फ्रॉकचा खिसा रिकामाच असायचा. मन मारून मग आम्ही प्रसादाचा, खडीसाखरेचा खडा मिळवण्यासाठी देवीच्या गाभाऱ्यात शिरायचो. आईस्क्रीमची किंमत चार आणे बाऊल होती. ते आम्हाला परवडणार नव्हतं त्यापेक्षा फुकटची देवीसमोरची खडीसाखर परवडायची. ‘– दुधाची तहान ताकावर दुसरं काय ‘—- –

टकले आत्या नावाची आमची एक मानलेली आत्त्या होती.. त्यावेळची गर्भ श्रीमंत, दागिन्यांनी नटलेली, आत्त्या कारमधून उतरली की आम्ही विट्टी दांडू फेकून जीव खाऊन पळत सुटायचो. कारचा दरवाजा उघडायला एकमेकांना ढकलत पुढे जायचो. ही आत्त्या आली की आमचा आनंद गगनाला भिडायचा, कारण श्रीमंत माहेरवाशिणीला कान तुटक्या कपातून पांचट दुधाचा चहा कसा काय द्यायचा?अशा धोरणी विचाराने आमची आई सौ. टकले आत्यांकरिता चक्क आईस्क्रीम मागवायची. आम्ही आशाळभूत पणे गुलाबी थंडगार आईस्क्रीम कडे बघत तिथेच घिरट्या घालायचो. आत्याच्या ते लक्षातच यायचं नाही. आत्याचा बाउल साफ- सूफ व्हायचा. आणि मग तिच्या लक्षात आल्यावर ती म्हणायच, ” हे काय वहिनी मुलांसाठी नाही का आईस्क्रीम मागवलत? आईला काय बोलावं काही सुचायचच नाही कारण तिच्याजवळ इतके पैसेच नसायचे. चाणाक्ष आत्या ‘त ‘ वरून ताकभात ओळखायची. आणि मग हळूवारपणे आपल्या मखमली, चंदेरी टिकल्या लावलेल्या बटव्यातून नाणी काढायची, अलगद आमच्या हातावर ठेवून म्हणायची, पळा रे पोरांनो आईस्क्रीम खाऊन या. ” हे वाक्य ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो. पैसे हातात पडताच छताला टाळू लागेल अशी उंच उडी मारावीशी वाटायची. पण मग धाड्दिशी जमिनीवर आदळायचो. कारण आईचे डोळे मोठे झालेले असायचे. आईच्या डोळ्यांकडे नजर गेल्यावर आम्ही चुळबूळ करायचो, आत्या म्हणायची “आईकडे काय बघताय ? मी सांगतेय ना! हे पैसे घ्या आणि पळा लौकरआणि जा बुवांकडे” मग काय आम्ही हांवरटासारखे चार आण्याचं नाणं मुठीत पकडून जिन्यावरून एकेक पायरी वगळत उड्या मारत बुवा आईस्क्रीम वाल्यांच्या दुकानात शिरायचो. आणि मग काय बुवांकडे गुलाबी पोपटी, पिस्ता आईस्क्रीम खाताना मनांत यायचं आपला ढग झालाय आणि आपण हवेत तरंगतोय… अहाहा! काय तो सुखद गारवा. , आईस्क्रीमची मिठ्ठास चव, अजूनही जिभेला विसर पडला नाही. आणि मग मनाला सुखावणारा गारवा अंगावर घेता घेता आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. स्वर्गच आमच्या हातात आला होता. आईस्क्रीमची चटक लागली होती, पण पैशांचा ताळमेळ जमत नव्हता. अखेर पगार झाल्यानंतर माझ्या वडिलांनी ति. नानांनी आईस्क्रीमचा पॉटच घरी आणला तो फिरवतांना नाकी दम आले. घामाच्या धारा लागल्या, पण नंतर मात्र तीन-तीन वाट्या आईस्क्रीम हादडायला मिळाल.

गेले ते दिवस, गेली ती आईस्क्रीमची तेव्हांची चव, पण अजून रंग उडालेली –‘ बुवा आईस्क्रीमवाले ‘ — ही पाटी डोळ्यासमोरून हालत नाहीय्ये. मनाचे पांखरू अजूनही त्या दुकानाभोवती गिरट्या घालतय.  .

– क्रमशः भाग दुसरा 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ …पिक्चर रस्त्यावरचा… लेखक  : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆पिक्चर रस्त्यावरचालेखक  : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

आमच्या मित्राने पडद्यावरच्या पिक्चर संदर्भातील फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 50 60 वर्षे मागे भूतकाळात गेले. असंख्य आठवणींचा कल्लोळ  झाला. राव काय दिवस होते ते. माझे जे अनुभव आहेत तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील त्यांच्यासाठी खास हा लेख !

आमच्या लहानपणी  तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्री हा  रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर  बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो ते. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात  बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत.. मुख्य म्हणजे फुकट असायचे मंडळातर्फे खर्च करायचे. दिवसा सायकलवर  फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे. आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या. मग तारीख लक्षात ठेऊन जायचो आणि विसरलो की हळहळ वाटायची. एका दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असायची मग चांगला सिनेमा असेल तिथे जायचे तो संपला की दुसरीकडे जायचे तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा. गणपतीमधे 10 दिवस रोज सिनेमा असायचा.

सिनेमा बघताना मधेच पाऊस यायचा मग आडोशाला पळायचे. प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरायचे. त्याकाळी गणपतीत फार कमी पाऊस असायचा एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे.

आम्ही कुठे कुठे जायचो. कसेही कुठेही बसायचो. रस्त्यावर बसायचे गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून, अगदीच काही मिळाले नाही तर वर्तमानपत्र किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो. त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही. घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.

प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे खूप मजेशीर गोष्ट असायची. गंमत म्हणजे पडद्याच्या  एका  बाजूला लेडीज बसायच्या  तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि आपण जेन्टस नेहमी अपोझिट साईडला. त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसली असे वाटायचे, सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची. हे सगळे नको असेल तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभे राहून बघायचं नाहीतर कडेला रेतीवर, खडीवर बसून बघावे लागायचे. ती खडी टोचायची. जेवढे लांब बसू तेवढा सिनेमा छोटा दिसायचा म्हणून पुढे बसायचे. सिनेमा बघताना भरपूर डास चावायचे मुंग्या चावायच्या  तरीसुद्धा नेटाने प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवायचे त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायचे. त्यांना  टेबल फॅन असायचा. त्यांचा खूप हेवा वाटायचा.

त्यावेळी. सिनेमा चालू असताना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे मग बोंबाबोंब. मधेच उंदीर किंवा घूस यायची नाहीतर कुत्रे घुसायचे, मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या. आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करताना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे स्क्रीनवर यायचे तेव्हा नंबर ओरडायचो. एक रीळ संपले की दुसरे लावायचे.. काहीवेळा पिक्चरचा  आवाज आणि चित्र सिंक्रो नाही झाले तर विचित्र वाटायचे. ऍक्शन आधी आणि आवाज नंतर तरी बघायचो.

सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या मग परत रिवाइंड करून वन्स मोअर. इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे तेवढे वेळा रिवाइंड. पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत सोड सोड म्हणून ओरडत.

केश्तो, असितसेन, मेहमूद, असरानी, जगदीप, राजेंद्रनाथ यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची. गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे. शम्मी, देव, ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेशखन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची. सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे. शोले, जंजीर दिवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम, तिसरी मंझिल. वो कौन थी, कालिचरण किती नावे घेऊ हे सिनेमे थिएटर आणि रस्त्यावर  असंख्य वेळा बघितले.

मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे दामुअण्णा शरद तळवलकर राजा गोसावी निळू फुले सूर्यकांत रमेश देव अशोक सराफ दादा कोंडके रवींद्र महाजनी  सीमा चित्रा रेखा जयश्री गडकर रंजना उमा  यांचे पिक्चर असायचे. सासुरवाशीण सिनेमा बघताना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या. त्यावेळी ते दोघ तिथे आले असते तर त्यांनी नक्की मार खाल्ला असता अशी परिस्थिती असायची.

आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात. कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.

गेले ते दिन गेले

रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही. आणि खिशातून पांच पैशाचे चणे, दाणे खाण्याची चव फ़्रेंच फ्राईज बर्गर आणि पॉप कॉर्न ला येणार नाही. आताच्या मुलांना ही मजा अनुभवाला कधीच मिळणार नाही.

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गणराज आला… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ गणराज आला … ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

सकाळी जाग आली ती या ओळी गुणगुणतच…

दोन ओळी सुचल्या त्या काम करता करता गुणगुणत राहिले. आणि पुढे इतकं काही सुचू लागलं की काम बाजूला ठेवून मला त्या लिहून काढाव्या लागल्या. पूजा करतानासुद्धा इतकी तन्मयता झाली असेल की नाही माहिती नाही, पण या ओळी लिहिताना मात्र एक विलक्षण तन्मयता, आनंद, चैतन्य जाणवत होतं. लिहिल्यावर जाणवलं की ही एक साधीसुधी आरती म्हणता येईल अशी रचना आहे. गणपतीची विविध नावं यात गुंफली गेली आहेत.

गणेशाने हे काम करून घेतलं असावं.

अबीर गुलाल उधळीत आमुचा ‘गणराज’ आला|

आमुचा ‘गणपती’ आला||

*

ढोल, ताशे, झांजांचा नाद ‘विनायका’ तव त्रिभुवनी निनादला|

नाद तव त्रिभुवनी निनादला||

*

दारी सडा रांगोळी तोरण सजले ‘गजानना’ तुज स्वागतासाठी|

गजानना तुज स्वागतासाठी||

*

धूप, दीप, अत्तर, गुलाब ‘हेरंबा’ तुज वाहतो दुर्वांच्या राशी|

वाहतो मस्तकी दुर्वांच्या राशी||

*

मोदक लाडू पेढे ‘लंबोदरा’ पंगत प्रसादाची,

वाढली पंगत प्रसादाची|

*

म्हणू आरती करु प्रार्थना ‘एकदंता’ तव चरणापाशी|

प्रार्थना तव चरणापाशी||

*

बुद्धी, शक्ती अन् कलेचे ‘विनायका’ लाभो वरदान आम्हाला|

देशी वरदान आम्हाला ||

*

‘भालचंद्रा’ तव कृपेने सौख्य- सुख-शांती लाभो भक्तांना|

लाभो आम्हा भक्तांना||

*

जळो भेदभाव नुरो वासना ‘विघ्नेशा’ अहंकाराला दे आमुच्या मुक्ती|

आम्हास दे आता मुक्ती ||

*

चराचरातील तुझ्या रूपाशी ‘गजवक्रा’ राहो सदा प्रीती||

‘गौरीपुत्रा’ राहो सदा प्रीती||

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गौरीमायला निरोप…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गौरीमायला निरोप…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सोन्या रुप्याच्या पावलांनी गौरी घरात आल्या. प्रत्यक्ष त्या महालक्ष्मींच आगमन होतं घरी… किती भाग्याची गोष्ट आहे ना… सगळं घर त्यांना फिरून दाखवलं. दोघींना  नीट बसवलं. दागिने हार घातले. आरती, मंत्रपुष्पांजली झाली. आल्या दिवशी साधी भाजी भाकरी ती दाखवून झाली. दूध देऊन दोघींना आराम करायला सांगितलं.

दुसऱ्या दिवशीची लगबग सुरू झाली. पुरणावरणाचा स्वयंपाक, भाजी, कोशिंबीर, भात वरण, दोघींचा चेहरा तृप्त दिसत होता. गौरी  प्रसन्न हसतमुख दिसत होत्या. घरात आनंद उत्साह  भरला होता.

तो दिवस गडबडीतच गेला. रात्री निवांत  दोघींसमोर बसले… मनातलं तिला ओळखता येतच…. तरी सांगितलं… तिच्याशी बोललं की मन  शांत  होत.

तीन दिवसांच्या पाहुण्या म्हणून  आलेल्या गौरी….. निघाल्या की परत…. मुरडीचा कानवला, दहीभाताचा नैवेद्य दाखवला. अक्षता टाकल्या… जाता जाता  निरोप देताना म्हटलं..

…. “ आई… क्षणभर जरा थांब ग.. तुझ्या लेकीबाळींचा निरोप सांगते तुला…  गौरी माय तू यायच्या आधीच आम्हाला शहाणं केलं होतंस.. त्यामुळे तुझं सांगणं  सगळ्यांनी ऐकलं बरं का… त्यामुळे आम्ही अन्न वाया  नाही घालवलं.. मोजकच केलं.. खूप जणींनी  मला हे सांगितलं. त्यांचा  स्वयंपाक  लवकर झाला. एका ताईंची सवाष्ण दरवर्षी अडीच वाजता  जेवायची. यावर्षी त्यांनी तुला बारालाच नैवेद्य दाखवला. तुझी आरती करून साडेबाराला घरच्यांना जेवायला वाढलं. खूप आनंदानी ताईंनी मला हे सांगितलं.

लेकी सुनाच घरच्या लक्ष्मी आहेत ते सर्वांना  फार  पटलं बघ… किती जणींनी पहिल्यांदाच तुझ्यासमोर बसून श्रीसूक्त, देवी अथर्वशीर्ष, नवीन नवीन आरत्या म्हटल्या. तुझी गाणी गायली.. तू  ऐकली  असशीलच  तरीपण सांगते ग आई…

…. बऱ्याच जणी शहाण्या आणि सुज्ञ झाल्या. तू सांगितलं तसंच वागल्या… घरचे पण आनंदित झाले.

हळूहळू  जमेल तसा थोडा थोडा बदल करत आहेत.. सगळ्याजणी…. रूढी, परंपरा, रीती, रिवाज यांचा पगडा मनावर अजून खूप आहे. नव्हे.. त्याचे दडपण  आहे. बदल करताना  मनात अजून  भीती मात्र आहे ग……

… काय होतं आई खरं सांगू का… बदल केला आणि काहीतरी विपरीत घडलं की वाटतं आपण बदल केला म्हणूनच  हे असं झाल. लगेच मनात संशय येतो देवी  किंवा देव आपल्यावर  कोपला तर नसेल…

आमचं कसं आहे.. आमची प्रगती, भरभराट झाली, चांगल्या गोष्टी घडल्या की आम्हाला वाटतं ते आमचं कर्तृत्व….. माझ्यामुळेच ते झालं.. मी कष्ट केले म्हणून ते झालं.. अस आम्ही म्हणतो..

तेव्हा” ही देवाची कृपा “अस क्वचितच म्हणतो….. पण विपरीत काही झालं की आम्ही आपलं देवावर  ढकलून देतो… हे अगदी खरखुर आमच्या मनातल आज तुला सांगते बरं का…

…. पण आता नाही…. आता आम्ही शहाणे होऊ… तू सांगितलं आहेस तसेच वागू…. तसं  तुला आश्वासन देते…. भेटूया आता पुढच्या वर्षी….. पुनरागमनायच…. “ 

.. असं म्हणेपर्यंत डोळे भरून आले होते. घर शांत झालं होतं. त्यांचं येणं आनंदाचं, सुखाचं समाधानचं असतं. घर भारुन टाकणार असतं. इतर कशाचीच आठवण या तीन दिवसात येत नाही. त्याच्याभोवतीच मन फिरत असतं. हे दिवस झटकन  जातात..

…. आता लक्षात येतं… त्यासाठीच गौरी घरी येतात.. मन तृप्त करायला.. भरपूर सुख आनंद द्यायला…

 राहिलेले दिवस त्यांच्या आठवणी काढत  जातात.. सुखदुःख, राग, लोभ, करत  संसार चालूच राहतो……

हात जोडून तिला सांगितलं…… “ गौरीमाय तू अपार सुख देणारी आहेस. तुझा आशीर्वादाचा हात  सदैव आमच्या पाठीवर असू दे. हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना. तू  साथीला असलीस की आम्हाला बळ येतं ग माय… “ 

.. तुझ्याच लेकीबाळी…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ।। पुनरागमनायच ।। ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ ।। पुनरागमनायच ।। ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

श्रावण मास कसा सरला ते कळलंच नाही. व्रतवैकल्ये, श्रावणाची रिमझिम, हवं हवेस वाटणार सोनेरी कोवळ उन ! हवेत गारवा ठेवत. भाद्रपद मास आलाच ! 

दोन चार दिवस आधीच बाप्पाच्या आगमनाची गोड चाहूल होतीच ! त्याची तयारी पण चालू झाली. गणेश मूर्ती ठरवण्यासाठी कुंभार वाड्यात नेहमीप्रमाणे हेलपाटे. पण आनंदाचे ! मूर्तिकाराला अनेक सूचना, रंगसंगतीचा सल्ला ! तो पण हो दादा हो ! अगदी सालाबादप्रमाणेच, तुमचा बाप्पा सजवून तुम्हाला सुपुर्द करतो ! काळजी सोडाच ! सकाळी लवकरच येणार ना. बाप्पाला न्यायला ! 

होय महादू नक्कीच लवकर येणार, नन्तर मग गर्दी खूप वाढते. महादू कुंभार हा अख्या गावातील एकमेव मूर्तिकार ! पण अव्वल दर्जाचा कलाकार. दादांचा स्वभाव त्याला माहित होताच ! गणेशोत्सव व गणपती बाप्पाची मूर्ती ह्यात प्रत्येकाच भाव विश्व गुंतलेलं असतच ! 

आले आले म्हणत, बाप्पा वाजत गाजत आले.

घरोघरी बाप्पा विराजमान पण झाले. त्यापूर्वीच आरास, सजावट मखर आणि घरातील पण रंग रंगोटी झालेली ! रोज नवीन पक्वान्न, आरत्या, मंत्रपुष्पांजलीची चढाओढ रात्री चक्री भजन. दिवसभर फटाक्यांची आतषबाजी ! गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी गौराई आणि गणेश भोजन उर्फ मोठा नैवेद्य. हो त्याच दिवशी राधा अष्टमी चा योग असतो.

त्यातच श्रावण मासात राहिलेली सत्यनारायण पूजा.

दिवस कसे सरले ते कुणालाही कळलं नाहीच !

आणि तो दिवस येऊन ठेपला ! नको नकोसा वाटणारा ! 

आज अनंत चतुर्दशी, गणपती बाप्पा येऊन दहा दिवस कसे सरले ते कळलंच नाही. ह्या दहा दिवसांत घर कस भरभरून गेल्याच जाणवत होतं. वर्षातील अपूर्वाई तर होतीच. रोज नवविध पक्वान्न, पूजा, आरती, मंत्रपुष्पांजली, कस सगळं साग्र संगीत चाललं होतं. आज शेवटचा दिवस, मनाला हुरहूर लागली होतीच. आज गणपती बाप्पाच विसर्जनकाल येऊन ठेपला होता. गुरुजींची वाट बघत दादा उभे होते.

गुरुजी लवकर येउ नयेत अस वाटत होतं.

 जरा अंमळ चार वाजताच गुरुजी आले, घरी पण सर्व तयारी झाली होतीच, गुरुजी नी गडबड केली, चला अजुनी वरच्या आळीत जायचं आहे.

 तस दादांनी मुकटा सोहळ नेसल व बाप्पाची आता बाप्पासमोर आरती करण्यासाठी उभा ठाकले आरत्या झाल्या, मंत्रपुष्पांजली झाली. पंच खाद्य तसेच दहीभात पाट वड्या, कडबोळी इत्यादी प्रसादाचा नैवेद्य झाला.

 गुरुजींनी अक्षता हातात घेतल्या 

 ।।”यांतु देवागणांनाम सकळ पुर्वमादाय 

 इच्छित कामना सिद्धर्थम

 पुनरागमनायच ” ।।

 अस मंत्र म्हणुन अक्षता “श्री मुर्ती “वर टाकल्या तस डोळ्यात टचकन पाणी आलं, सर्वांचे डोळे ओले झाले, पाट रिकामा होणार, केलेला थाट आरास निर्माल्यागत होणार. घर ओकबोक वाटु लागणार होतं पण नाइलाज होता.

 मंडळी वर्षातुन एकदा बाप्पा येणार दहा दिवस राहणार, कोड कौतुक करून घेणार व बघता बघता दहा दिवस कसे निघुन गेले ते कळतच नव्हते. दहा दिवसांत घर कस भरलेलं वाटत होतं, रोज नवीन पक्वान्न, नैवेद्य आरती, मंत्रपुष्पांजली जागर इत्यादी गोष्टींची रेलचेल. जगण्याचा एक एक क्षण सोहळाच! शिकवत होता.

बघा मंडळी जे जे पार्थिव आहे ते ते विसर्जित होण्यासाठीच!! मग बाप्पा असो वा तुम्हींअम्ही, सकळ पशु पक्षी, चराचर पार्थिव च की ! पार्थिव म्हणजे काय ? 

तर जे जे पंचभुताने निर्मित ते ते सर्व पार्थिव. ह्या नियमात सर्व सजीव श्रुष्टी आलीचकी म्हणजे एक ना एक दिवस आपलं पार्थिव शरीर सोडुन आपणास पण गेले पाहिजेच ! 

विसर्जन आपलं पण होणारच हे त्रिकालाबाधित सत्य ! बाप्पाचं अनंत चतुर्दशी ही तिथी ठरलेली आहे. तस तुमची आमची तिथी ठरलेली नाही ! ते सर्व बाप्पाच्या हातात !

एक ना एक दिवस आपल्याला विसर्जित व्हावं लागणार ! श्रुष्टी नियमच आहे तो. जुनी पान गळुन पडणार नवीन पालवी येणार, जसा वसंत ऋतु येतो तसाच ग्रीष्मही येतो

हीच निसर्गाची ख्याती आहे. 

पान फुल फळ मोहर काही झाड, याना पण विसर्जित व्हावं लागतच की, विविधरंगी फुल उमलतात, विविध गंध ते देतात, फळात रूपांतर झाले की आपलं अस्तीत्व ते फळात ठेऊन बाजुला होतात. नवीन रोप त्याच बहरण, त्याच अस्तीत्व, वयात आलं की कळी ते फुल, फुल ते निर्माल्य त्याचा गंध शेवटी मातीत पार्थिव रुपात विसर्जित होतो. हेच तर श्रुष्टी चक्र आहे, मग गणपती असो व इतर तुम्ही आम्ही सजीव ! 

हो पण गम्मत अशी आहे की, मन व आत्मा हे अविनाशी, ते परत सृष्टीत अनेक रुपात पुनर्जन्म घेतात च की !

गीतेत श्रीकृष्ण म्हणतात

 “पुनरपि जननं पुनरपि मरण म ।

पुनरपि जननी जठरे शयनम”।।

 याचाच अर्थ “

।।” इच्छीत कामांना सिद्धर्थम पुनरागमना यच ” ।।

पार्थिवं शरीर जन्म घेणे व परत मरणे व परत पुनर्जन्म घेणे ! हाच सृष्टी चक्राचा नियम मग तो कोणी ही असो. तुम्हाला आम्हाला चुकलेल नाही, हेच गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्याने बाप्पाला सांगायचं असत ! अस नाही का वाटत तुम्हाला ? 

 

म्हणूनच मला ह्या तत्वावर काव्य सुचलं ते तुम्हाला कस वाटलं, विचार योग्य आहेत का ते जरूर कळवा..

☆ विश्व चक्र ☆

असेन मी नसेन मी 

सुगंध जतन करेन मी

कोण मी कोण तु ? 

फुल मी पान तु 

बहरू सदैव चराचरी

 

निर्माल्य मी निर्माल्य तु

येता ग्रीष्म हा ऋतु

मिसळु चैतन्य नवे

होऊन माती श्रांत तु

 

थेंब थेंब बरसता

नवं संजीवनी वर्षा ऋतु

फुटून येऊ पानोपानी

फळ मी पान तु

 

सृजनशील गीत गात

नवजन्माने मग परतु

असेन मी असशील तू

सुगंध कुपी देशील तू

 “पुनरागमनायच”

… हाच संदेश आपल्याला बाप्पाकडुन घ्यायचा आहे 

अस नाही का वाटत तुम्हाला ! 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares