मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोपं नाही हो हे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “सोपं नाही हो हे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीचे आम्ही सर्वजण एका  वृद्धाश्रमाला भेट द्यायला निघालो होतो. संचालकांनी  “एकदा येऊन बघून जा” असे सांगितले होते . आमचे अध्यक्ष श्री जोशी यांची बायको आणि मी जाताना  जवळ बसलो होतो. त्या जरा वेळाने मला म्हणाल्या ,

“अग माझी नणंद यांची सख्खी बहिण तेथे आहे. आज  आठ महिन्यांनी आमची भेट होईल.”

” ती तिथे असते” ?

मला आश्चर्यच वाटले .

” हो..अग तिचा मुलगा अमेरिकेत.. तो एकुलता एक.. आईची इथं सोय करून गेला आहे. गेली आठ वर्ष ती तिथेच आहे. पहिल्यांदा आम्ही सारखे  जात होतो तिला भेटायला. पण आता आमची आमची ही वयं झाली ….प्रेम आहे ग… पण ….”

यावर काय बोलणार? सत्यच होते ते…

“तुमच्या घरी त्या येत होत्या का?”

” त्या लोकांनी सांगितलं ..घरी जास्ती नेऊ नका .कारण नंतर मग त्यांना इथे करमत नाही. “

“त्यांना  ईतरांच्या अनुभवाने ते जाणवले असणार…”

“हो ग… पहिले काही दिवस भाचे, पुतणे, नातेवाईक त्यांना भेटायला गेले. नंतर हळूहळू त्यांचेही जाणे कमी होत गेले …. हल्ली इतका वेळही नसतो ग कोणाला..”

हे सांगताना  वहिनींचा गळा दाटून आला होता….

आम्ही तिथे पोहोचलो. गाडीतून उतरलो .एक नीटस, गोरीपान, वयस्कर अशी बाई धावतच आली…..

तिने जोशी वहिनींना मिठी मारली. शेजारी काका उभे होते. त्यांना वाकून नमस्कार केला .तिघांचे डोळे भरून आले होते .

मी ओळखले या नणंदबाई असणार… त्यांना झालेला आनंद आम्हालाही जाणवत होता. तिथे आम्ही चार तास होतो .तेव्हढा वेळ त्या दोघांच्या आसपासच होत्या .

सेक्रेटरींनी संस्थेची माहिती दिली. आणि संस्था बघा म्हणाले.सगळेजण गेले.

मी जोशी वहिनींबरोबर त्यांच्या नणंदेच्या रूममध्ये गेले .वहिनी दमल्या होत्या. नणंदेनी त्यांना कॉटवर झोपायला लावले. चादर घातली आणि पायाशी बसून राहिल्या.

विश्रांती घेऊन वहिनी उठल्यानंतर ते तिघ गप्पा मारत बसले. लहानपणीच्या ,आईच्या, नातेवाईकांच्या आठवणी काढत होते. हसणं पण चालू होतं.

इतक्यात “जेवण तयार आहे” असा निरोप आला.

जेवण वाढायला तिथे लोक होते. तरीसुद्धा नणंदबाई स्वतः दोघांना वाढत होत्या. काय हवं नको बघत  विचारत होत्या .

त्यांचं जेवण संपत आल्यावर त्यांनी पटकन जेवून घेतलं.

थोड्यावेळाने आम्ही निघालो.

तेव्हा नणंदबाईंना रडू आवरेना… तिघही नि:शब्द रडत होते.. बोलण्यासारखं काय होतं?

सगळं समोर दिसतच होत….

सर्वात शेवटी दोघे गाडीत चढले.

बाहेर पदर डोळ्याशी लावून उभ्या असलेल्या नणंदबाई….

आम्हाला सर्वांनाच पोटात कालवत होत.

परत येताना वहिनी तर हुंदके देऊन रडत होत्या.

गप्प गप्प होत्या….

नंतर काही वेळानंतर म्हणाल्या

” वाईट वाटतं ग.. पण माझ्याकडे तरी कस आणणार? आमची एक मुलगी. आमचचं आजारपण करताना तिची किती तारांबळ होते …नणंदेची जबाबदारी तिच्यावर कशी टाकणार?तीलाही तिचा संसार नोकरी आहे. आणि हा एक दोन दिवसाचा प्रश्न नाही ग….पण नणंदेला एक  सांगितलं आहे …आमच्या दोघांपैकी एक जण गेलं की मी  किंवा हे तिकडेच राहायला येणार…”

हे ऐकल आणि  माझेही डोळे भरून आले..

जे वास्तव आहे ते वहिनी सांगत होत्या तरीपण…….

वहिनी पुढे म्हणाल्या

 ” ती नेहमी म्हणते  तुम्ही दोघ एकत्रच रहा…..तुम्हाला  दोघांना उदंड आयुष्य देवो देवांनी… “

पण ते झालंच नाही…. जोशी काका गेले आणि पंधरा दिवसांनी वहिनी पण गेल्या……

अशाच कधीतरी मला नणंदबाई आठवतात …आणि डोळे भरून येतात…. 

तिथे राहणाऱ्या प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे………

तुम्ही घरी तक्रार न करता सुखात आनंदात रहा…

कारण असं जाऊन राहणं सोप्पं नसतंच…..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुपाची धार…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “तुपाची धार…” ☆ सुश्री शीला पतकी 

सोलापूरपासून जवळच असलेल्या एका खेड्यामध्ये आमचा कार्यक्रम होता कार्यक्रमानंतर आम्ही एका ब्राह्मण कुटुंबाकडे जेवायला गेलो ते वडिलांचे मित्र होते …सोबत आणखीन गावातली दोन ब्राह्मण माणसे होती घरातल्या बाईंनी खूप सुंदर स्वयंपाक केला होता अगदी छोट घर.. परिस्थिती अत्यंत सामान्य… चार माणसांना जेवायला बसता येईल इतकीच जागा आणि थोड्याशा उंचावर बाईंचं स्वयंपाकघर.. त्या मला म्हणाल्या “तु सगळ्या लोकांना वाढशील का म्हणजे मी गरम गरम पोळ्या करेन…” मी तेव्हा सातवीत होते म्हणजे बारा वर्षाचे वय असेल आणि मी म्हंटले हो… मी पानं घेतली. मीठ चटणी लोणचं एक भाजी आमटी भात भातावर वरण हे सगळं मी वाढलं त्या बाई पोळ्या करायला बसल्या! हे सगळं चुलीवर चाललं होतं.  तेव्हा लाईट वगैरे काही नव्हते जेवणाऱ्या मंडळीसमवेत एक कंदील होता आणि बाई स्वयंपाक करत होत्या तिथे एक चिमणी होती .मी सगळं वाढल्यावर त्यांना विचारलं भातावर तूप वाढायचं का? तर त्या म्हणाल्या हो आणि त्यांनी माझ्या हातात एक पितळेची वाटी दिली ज्यामध्ये दूध होतं आणि एक चमचा होता …मला वाटलं त्यांना बहुतेक अंधारात दिसल नव्हत ..मी म्हणाले काकू हे दूध आहे तूप नाही.. त्यांनी हळू आवाजात मला सांगितलं तूप नाहीये , संपले आहे.  दुधाचा एक एक चमचा भातावर वाढ म्हणजे ती मंडळी जेवायला बसतील. त्याप्रमाणे मी दुधाचा एक एक चमचा भातावर वाढला …

मंडळी जेवण करून उठले. माझ्या तोंडावरच प्रश्नचिन्ह त्यांना दिसत असाव बहुधा !मग मी आणि त्या जेवायला बसलो तेव्हा त्या म्हणाल्या.. “ खेडेगावात परिस्थिती खूप बिकट असते. त्यात आमच्या वाटण्या झाल्या.  तूप दररोज जेवणात आता जमत नाही, पण आपला ब्राह्मण धर्म आहे ना ..  भातावर तूप वाढल्याशिवाय कोणी जेवत नाही.. असे जेव्हा असते ना तेव्हा थोडेसे दूध वाढावे ..!” मला त्या फारसं  न शिकलेल्या बाईचं मोठं कौतुक वाटलं …

तेव्हा काही कळत नव्हतं पण तो प्रसंग माझ्या मनात कोरला गेला होता आणि आता त्याचा विचार करताना वाटतं की खरंच आपल्या स्त्रियांनी धर्मसंस्कार संस्कृती आणि आपली असणारी परिस्थिती याच्याशी किती उत्तम सांगड घातली होती आपल्या घरचे न्यून कधीही कोणाला दिसू दिले नाही ती प्रत्येक वेळ साजरी करत होत्या म्हटलं तर चुकीचं होणार नाही.. म्हणूनच स्त्री ही शक्ती आहे तिची भक्ती केल्याशिवाय संसार चालत नाही अडचणीतून मार्ग कसा काढावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्री… प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन कसे मिळवावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्त्री ..किती प्रश्नांची ती सहज सोडवणूक करते आणि ते कुणाला कळतही नाही. आजही मी त्या बाईला मनापासून नमन करते आणि खूपदा गंमत म्हणून वरणभातावरती दूध घेऊन  पाहते त्या प्रसंगाची आठवण म्हणून—–!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘पाणबुड्या भातातली वांगी –’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘पाणबुड्या भातातली वांगी ’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

मला वाटतं संसारात पदार्पण केल्यानंतर आईची जरा जास्तच आठवण येते काहो ? कारण एकेक चटके बसायला लागले की आई गं ! असं  म्हणून आईच आठवते  नाही कां आपल्याला ? बघा नं ! टोपली भरून वांगी बघून तुमचही असच झाल  असत . पुराणातली नाही कांही खऱ्या वांग्याची गोष्ट सांगतीय मी. सोबतीला माझी फजिती पण ऐका.  पहिल्यापासूनच सगळं सांगते तुम्हाला, 

‘कंटाळा,’आणि ‘ हे मला  येत नाही ‘! हे दोन शब्द माझ्या आईच्या कोशातच नव्हते. ही कडक शिस्त तिने आम्हा भावंडांना मारून मुटकून लावली होती .

 संसाराचे धडे आईने आमच्याकडून गिरवून घेतले.ते धडे लग्न झाल्यावर ,संसारात पडल्यावर फार फार उपयुक्त आणि मौल्यवान ठरले.

एकदा गंमतच झाली कशी कोण जाणे ह्यांनी  वांगी जरा जास्तचं आणली होती .  कदाचित भाजीवालीने गोड बोलून साहेबांच्या गळ्यातच मारली असावीत, आता या एवढ्या वांग्याचे काय करू ? त्यांना प्रेमाने गोजांरू म्हटलं तर  काटे हातात टोचणार .  चरफडत पिशवी रिकामी केली.  अहो टोपल भरलं  की हो वांग्यानी !  माझ्यापुढे मोठा यक्षप्रश्न,! संसारात पडून सुगरणपणाच्या मोरावळा झाला नव्हता . त्यामुळे मला सुगरणीला ते आव्हानच होत. आईच डाळवांग  अप्रतिम व्हायच. बुद्धीला ताण देऊन पहिल्या दिवशी आई कसं करायची ? काय काय घालायची ? हे आठवून आठवून  केल एकदाच डाळ वांग.   दुसऱ्या दिवशी केली भरली वांगी. तिसऱ्या दिवशी  कांदा बटाटा वांग्याचा रस्सा. हाय रे देवा!  तरीपण द्रौपदीच्या थाळीसारखी  टोपलीत काही वांगी उड्या मारतच होती.आता काय करायच बाई ह्या वांग्याच ? पुन्हा  भल मोठ्ठ प्रश्नचिन्ह  ??? आणि मग एकदम ट्यूब पेटली. आईने केलेली मिश्र डाळींची, दाणे आणि अगदी दोनच चमचे, तांदुळाची सगळं काही थोडं थोडं घेऊन भाजून, वाटून  मसाला घालून  केलेली चविष्ट रस्सा भाजी आठवली. मग काय बांधला की हो पदर.! सगळ्या डाळी, दाणे भाजून, वाटून रस्सा केला. अय्या ! पण भाजलेले  तांदूळ वाटायचे राहयलेच की जाउं दे ! घालू तसेच सबंध तांदूळ,एवढ्याशा तांदुळानी काय होणार आहे ? असं म्हणून मी तांदुळाची वाटी रिकामी केली.काय तरी बाई ह्या वांग्या वांग्यांनी डोकच फिरवलय. रसरशित फुललेल्या दगडी कोळशाच्या शेगडीवर भाजीचा हंडा चढवलाएकदाचा . “आज काय मग बेत” ?असं  म्हणतच सगळेजण  स्वयंपाक घरात डोकावले. मी थंडपणे उत्तर दिल, ” आज पण शेवटच्या वांग्याची, वेगळ्या प्रकारची,रस्सा भाजी केली आहे चला जेवायला “. सगळे नाक मुरडत मागच्या मागे पसार झाले. ह्यांना तर बोलायला जागाच नव्हती. कारण किलो दोन किलो वांगी हयांनीच तर आणली होती. माझ्या चेहऱ्याकडे बघून नवरोबांनी   पण  चक्क पळ काढला. पण काही म्हणा हं, भाजीचा सुगंध लपत नव्हता. बारा वाजले. पंगत बसली.आणि —

बापरे ! वाढताना लक्षात आल,भाजीत न वाटलेल्या तांदुळाचे प्रमाण  जरा जास्तच झालय. एकजीव न झालेले अखंड तांदूळ माझ्याकडे डोळे वटारून बघताहेत आणि पाणबुडी सारख्या उड्या मारताहेत. चार घास खाऊन कसंबसं जेवण उरकून, ” ए आई आम्ही ग्राउंड वर  जातो गं ” म्हणून मुल पसार पण झाली. हे मात्र भाजी चिवडत बसले होते. शेवटी न राहून इकडून विचारणा झाली “आजचा वांग्याचा प्रकार जरा वेगळा वाटला  नाही कां?म्हणजे कुठे मासिकांत वाचलात कीं कुणी सखीनी शिकवला?   नाही म्हणजे सहज विचारतोय, नक्की काय आहे हे ? वांग्याची भाजी का वांगी  भात,?  काय म्हणायच ह्याला ?”

 मसाल्याबरोबर न वाटता सबंध तांदूळ घालून आधीच माझ्या चारी मुंड्या  चीत झाल्या होत्या. तरी पण हार मानेल ती बायको कसली ? मी ठसक्यात उत्तर दिल, “आमच्याकडे  ह्याला ‘ मसाला वांगी रस्सा भाजी ‘ , म्हणतात आणि माझ्या आईनेच तर मला ही शिकवलीय. आई पण अशीच करते ही मसाला वांगी. ह्यांचा घास हातातच राहयला. आ वासून  ते माझ्याकडे बघतच  राह्यले. ‘आता हीच्या आईने, म्हणजे आपल्या सासूबाईंनीच  शिकवलं म्हणजे….

 जाऊदे झाल ! पुढे काही न बोलणंच चांगल  अशा धूर्त विचाराने, अगदी शेवटचं एकच राह्यलेलं वांग आ वासलेल्या तोंडात महाशयांनी कोंबल.आणि मी  हुश्यss  केल. संपली ग बाई एकदाची भाजी. 

पुढे आईकडे गेल्यावर अगदी जस्सच्या तस्स आई पुढे मी ते वांगी पुराण मांडल. आणि लाडात येऊन म्हणाले, “ए आई अशीच करतेस नां गं तू ही भाजी ? मी तस ह्यांना सांगूनही टाकलंय की माझ्या आईने शिकवलीय ही भाजी मला.” आई काम करता करता एकदम थबकली . कपाळावर हात मारून पुटपुटली, “कार्टीनी तिच्याबरोबर जावयांसमोर माझीही अब्रू घालवली.जावई म्हणाले असतील, “अरे वा रे वा!  आपली इतकी सुगरण बायको,आणि तिची आई म्हणजे आपली सासू खरंच किती सुगरण असेल.आईला नुसत्या कल्पनेनेच लाजल्यासारख झाल. आणि काय योगायोग  बघा हं!   हे नेमके त्याच दिवशी आईकडे यायचे होते. आई मधली सासू जागी झाली. पटकन माझ्या हातात पिशवी कोंबत ती म्हणाली,       ” लवकर जा आणि मंडईतून वांगी घेऊन ये.  आणि हो वाटेत मैत्रिण भेटली तर चकाट्या पिटत बसू नकोस.जावई यायच्या आत भाजी तयार झाली पाहिजे.” आहे का आता ! आई म्हणजे ना! मी  कुरकुरले, ” आई  अगं पुन्हा वांगी ? हे वैतागतील माझ्यावर” माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष   करीत आई म्हणाली, “जा लवकर आणि ताजी, छोटी, काटेरी वांगी आण  पटकन.” हाय रे दैवा ! कुठून आईला हा किस्सा सांगितला असं झाल मला .कंटाळा तर खूssप आला होता पण आई पुढे डाळ शिजणार नव्हती. एकदाची चरफडत  वांगी आणली. आणि जरा हाश हुश करीत दमले ग आई !असं म्हणून  टेकले, लोडावर रेलून लोळण फुगडी घेऊन , माहेरपणाचा  विसावा,घेण्याचा सुखद विचार  करत होते . इतक्यात आईसाहेबांचे फर्मान आले.,” लोळू नकोस इकडे ये ,मी भाजी कशी करतेय ते नीट बघ. आणि तांदुळाचं वगैरे प्रमाण किती घेते तेही बघून ठेव.” मंडळी बघताय ना तुम्ही? माहेरी आले पण सासुरवासच कीं हो हा.! कुठून आईला ही वांग्याची गाथा सांगितली असं झालं मला. आणि हे तरी आजच का यावेत ? लगेच बायकोच्या मागे सासुरवाडीचा पाहुणचार झोडायला ? सगळे  ग्रहच फिरलेत गं बाई  माझे, पण  करणार काय ? झक्कत उठले. आणि आईसमोर बसले. बघता बघता सगळी धान्य थोडी थोडी घेऊन भाजून,वाटून मसाला घालून चमचमीत भाजी तयार पण झाली. संपूर्ण घरभर भाजीचा घमघमाट सुटला होता. काय तरी बाई ! याच भाजीचा भुसावळला आपण केवढा मोssठ्ठा घोळ घातला होता. आणि ती तर मसाला भाजी नाही, तर मसाले भातच झाला होता. पाणबुडी सारखे अखंड तांदूळ त्यात उड्या मारत होते. पणअहाहा!ही आईने आत्ता केलेली भाजी रस्सेदार अशी,कित्ती छान दिसतीये . हे आले बारा वाजले. म्हणजे घड्याळयाचे हं . 😃 पानं मांडली . हात धुवायला जावई मोरीपाशी गेले. तेव्हा टॉवेल द्यायचं निमित्त करून मी पण हळूच पिल्लू सोडल, “अहो ऐकलंत का?आज जेवणात वांग्याची भाजी आहे बरं का! मी जेवढं हळू सांगितलं नां तेवढे हे जोरात  किंचाळले “काsssय वांगी? आमच्या घरात आईकडे बाथरूम नव्हतं तर चौकोनी  मोरी होती. तिथेच भला मोठा तांब्याचा वहिनीने  लखलखीत घासलेला बंब आईने कोपऱ्यात त्रिकोणी तिवईवर व्यवस्थित बसवला होता.

हं तर काय सांगत होते, हे का  s  s sय ? करून ओरडल्यामुळे माझ्या भावाला शरद आप्पाला वाटल ह्यांना  बंबाचा चटका बसला की काय ? तो एकदम पुढे येत म्हणाला, ” काय झालं बाळासाहेब ? बंबाचा चटका बसला का ? नाही  म्हणजे ! एकदम ओरडलात म्हणून म्हटलं.” हे गडबडले ओशाळून म्हणाले, “नाही ! नाही! तसं नाही.,! “असं म्हणत मी दिलेल्या  टॉवेलमध्ये त्यांनी तोंड खूपसलं. तेवढ्यात, शरद आप्पासाहेब गरजले” अरे त्या बंबाची जागा बदला रे कुणीतरी. ” एवढ्या सगळ्या गोंधळात मी कशाला थांबतीय तिथे? वांग्याच्या भाजीचे पिल्लू सोडून मी पळ काढला. आईजवळ येऊन उभी राहयले तर आई गालातल्या गालांत हंसत होती.’ त ‘ वरून ताकभात ओळखण्या इतकी ती नक्कीच हुशार होती .या सगळ्या प्रकरणाची काहीच माहिती नसल्याने वहिनी मात्र विचार करीत होती,बंब कुठे ठेवायचा? असा हा सावळा गोंधळ कुठून कुठे चालला होता.

 पानावर बसल्यावर जावई सासुबाईंना म्हणाले, “सासूबाई भाजी जरा कमी करता का? नाही म्हणजे वांग्याची भाजी मला सोसत नाही अलर्जी आहे .” हा इशारा मला होता. मुकाट्याने वाटी उचलून त्यात फक्त दोनच चमचे भाजी वाढून मी वाटी ह्यांच्या पुढे ठेवली.पहिला वरण भात संपला.आता पाळी आली भाजीची. ह्यांनी भाकरीचा तुकडा मोडून घास तोंडात घातला.आणि डोळेच विस्फारले. एका सेकंदात वाटी  रिकामी झाली.अगदी चाटून-पुसून वाटी घासल्यासारखी लख्ख झाली. उस्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, ” सासूबाई काय कमाल आहे!मस्त  झालीय हो भाजी.  खूपच छान ! नाहीतर आमच्याकडची बाई साहेबांनी केलेली भाजी, नव्हे.. नव्हे वांगी भातच म्हणावं लागेल त्याला .नको नको ती आठवणच नको!. असं म्हणून  चेहरा वेडा वाकडा करत जावयांनी विनवल, ” सासुबाई एक विनंती आहे, तुमची लेक माहेर पणाला आली आहे ना,  तर रोज शाळा घ्या तिची. “आई झटकन पुढे झाली. आणि म्हणाली,”असं नका  हं म्हणू, ही भाजी तुमच्या बायकोनीच केली आहे ” आईने पांघरूण घातल्यावर मीही नाक फुगवून  म्हणाले, ”  बर का आई ! आत्ता तुझ्या देखरेखी खाली मी भाजी केलीय . अशीच भाजी पुन्हां मी करूनच दाखवीन.” खाली मान घालून घे पुटपुटले नको नको!काही दिवस तरी नको. ” लगेच वहिनी म्हणाली,”  आता सासुबाईंच्या  देखरेखी खाली मी पण तयार होणार आहे.आणि म्हणणार आहे ,” हम भी कुछ कम  नहीं ” 

मैत्रिणींनो –वांगी पुराण– संपलं. एक गोष्ट मात्र लक्षात आली, माझी आई,सुगरण, संसार दक्ष, संसाराचा समन्वय   साधणारी आणि सगळ्यांना शिस्तीत मार्गदर्शन करणारी होती. तसंच मला व्हायचं आहे. पण या कथेवरून तुम्हीही  एक धडा घ्या बरं का ! वांगी खूप नका हं आणू? नाहीतर रोज वांगी..वांगी.वांगीपुराणच होईल तुमच्या घरी.            .

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जेथे कर माझे जुळती-… लेखक : श्री प्रवीण राणे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

जेथे कर माझे जुळती-… लेखक : श्री प्रवीण राणे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे 

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. निवडणुका कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पाडावे याकरिता मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या कुशल व  प्रभावी नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबई पोलीस दलाने मरगळ  झटकून कंबर कसली होती…

अभिलेखावरील उपद्रवी आरोपींवर प्रतिबंधक कारवाया करून त्यांचा बीमोड करणे, अवैध धंद्यांवर धडक कारवाया करून त्यांचे उच्चाटन करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता गोपनीय माहिती मिळवून वेळीच प्रतिबंधक उपाय योजना करणे. अशा धडक कारवाया एकीकडे सुरू असताना दुसरीकडे निवडणुकीच्या बंदोबस्ता करीता आवश्यक असणाऱ्या मनुष्य बळाचे नियोजन, बंदोबस्ताची आखणी, इत्यादी करीता घेतल्या जाणाऱ्या बैठकांचा देखील धडाका सुरू होता…

मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी या लोकसभा निवडणुका शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता  संपूर्ण मुंबई पोलीस दलास भावनिक आवाहन केल्याने, त्यामुळे प्रेरित होवून संपूर्ण मुंबई  पोलीस दल युद्ध पातळीवर कामास जुंपले होते…

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्या नात्याने पोलीस ठाणे स्तरावर देखील आमची जोरदार तयारी सुरू होती. मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरिता रजेवर असलेल्या, गैरहजर असलेले, कर्तव्य टाळून गैरहजर रहाण्यात आणि वारंवार खोट्या सबबी सांगून रुग्ण निवेदन करण्यात निर्ढावलेले पट्टीचे कामचुकार अधिकारी व अंमलदार, यांना आवाहन करून, प्रसंगी शिस्तीचा धाक दाखवून कर्तव्यावर हजर करून घेतले जात होते… निवडणुकीशी संबंधित कामाबरोबरच पोलीस ठाण्याशी निगडित इतर दैनंदिन कामे हाताळताना सर्वांचीच पुरती दमछाक होत होती…

दिनांक २०/०५/२०२४… लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येवू लागली तसा तसा  बैठका, मॉक ड्रिल, प्रतिबंधक कारवाया, बंदोबस्ताची आखणी, इत्यादी कार्यांना वेग आला होता. क्षणाचीही उसंत मिळत नव्हती… रजा मिळणार नाहीत याबाबत निक्षून सांगण्यात आल्याने अधिकारी व अंमलदार रजेचे अर्ज पुढे करण्यास धजावत नव्हते…

अशा परिस्थितीत दिनांक १५/०५/२०२४ रोजी मी माझे दैनंदिन काम करण्यात गर्क असताना… सुमारे २०.३० वा. माझा सहायक पो. ह. फड  माझ्या केबिनमध्ये आला आणि बोलू.. की …नको !, अशा संभ्रमावस्थेत चुळबुळ करीत माझे टेबल जवळ उभा असल्याची जाणीव झाल्याने माझ्या कामाची तंद्री भंगली….. 

“काय रे !, …काय काम आहे ?” मी थोड्या त्रासिक मुद्रेनेच विचारले ….

“सर,… रागावणार नसलात तर सांगतो!….” फड चाचरत चाचरत म्हणाला.

एव्हाना मी थोडा नॉर्मल झालो होतो…. “सांग, एवढं काय अर्जंट काम आहे.” मी शांत स्वरात विचारले…..

“तसं काही विशेष नाही!… मला माहिती आहे की आपण जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याकरिता  शर्थीचे प्रयत्न करीत आहात, अशा परिस्थितीत मी काही सांगणं योग्य होणार नाही ! …पण!…..” अगदी संथ लयीत परंतु परिस्थितीचा आणि  माझ्या मुडचा अंदाज घेत सावधपणे फड उद्गारला ……

“नक्की काय झालंय ?…. तुझा काही प्रॉब्लेम आहे का ?” मी उत्कंठावर्धक स्वरात त्याला विचारले….. “अगदी बिनधास्त सांग ! …” मी त्यास पुन्हा आश्वस्त करीत म्हटलं.

“आपले एएसआय कदम आहेत ना !…. त्यांची आई सिरीअस आहे. ते तुम्हाला भेटण्याकरीता सकाळ पासून दोन – तीनदा येवून गेले परंतु तुम्ही सतत कामात होता म्हणून त्यांची तुम्हाला भेटण्याची हिम्मत झाली नाही. आताही ते केबिनच्या बाहेर उभे आहेत”. फड ने एवढा वेळ मनात साठवून ठेवलेलं सगळं एका दमात सांगून टाकलं.

“ठीक आहे !,आत पाठव त्यांना…” असे सांगताच फड ने एएसआय कदमनां  आत बोलावलं…  एक सॅल्युट. मारून एएसआय कदम चाचरत म्हणाले.. “सर, एक रिक्वेस्ट होती!…”

“कोणती?….”

“सर. गेल्या दिड दोन महिन्यांपासून गावी माझी आई अत्यंत आजारी आहे. गावाहून बरेचदा, येऊन जा म्हणून फोन येत आहेत, पण निवडणुकीचे कारण सांगून मी आता पर्यंत टाळत आलो. परंतु आता डॉक्टरांनी गॅरंटी नाही, हृदयाची झडप फक्त २० टक्के काम करीत आहे कधीही काहीही होवू शकते असे सांगितले….. सर, कसं आणि कोणत्या तोंडाने विचारू कळत नाही, पण मला दोन दिवस रजा मिळेल का ? … गावी जावून आईला भेटतो आणि लगेच परत येतो… इलेक्शन होईस्तोवर आई राहील की नाही याची शाश्वती नाही…..” घशाला कोरड पडलेल्या आवाजात एएसआय कदमांनी मला विनंती केली……

मलूल चेहऱ्यावरील चष्म्याचे आतील पाणावलेले डोळे एएसआय कदमांची अगतिकता स्पष्ट पणे अधोरेखित करीत होते….. एएसआय कदमांच्या विनंतीवर मेंदूने विचार करण्या अगोदरच हृदयाने जीभेचा ताबा घेतला… “कदम साहेब, आपण द्या आपला अर्ज आणि जावून या…” क्षणाचीही विलंब न लावता मी भावविवश होवून परवानगी देवून टाकली…

“धन्यवाद !” म्हणून पुन्हा एक सॅल्युट करून  एएसआय कदम रवाना झाले…. आणि मी पुन्हा माझ्या कामात गर्क झालो….

जेम ते एक दिवस मध्ये गेला असेल…. प्रभारी हवालदार गायकवाड यांनी मला येवून सांगितले की, एएसआय कदमांची आई गेली …..

“अरेरे ! वाईट झाले… असो, पण एएसआय कदमांची नेमणूक निवडणूक क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली आहे ना ?” …..मी प्रभारी हवालदारांना विचारले. 

“होय साहेब!…. आता त्यांची निवडणूक बंदोबस्ताकरीता येण्याची शक्यता नाही. आपल्याला दुसरी अरेंजमेंट करावी लागेल!…” प्रभारी हवालदारांनी आपला अभिप्राय सांगितला….

“बरोबर आहे तुमचं !, अशा दुःखद प्रसंगी त्यांना कर्तव्यावर या म्हणून सांगणं संवेदनशून्य पणाचं ठरेल ! ते काही नाही, तूम्ही दुसरी रीप्लेसमेंट शोधा !…” मी प्रभारी हवालदारांना फर्मावले…. 

सायंकाळी सातच्या सुमारास एएसआय कदमांचा फोन आला….. मी काही बोलणार इतक्यात ते म्हणाले ! “साहेब तुमच्या मुळे आईला जिवंतपणी शेवटचं पाहू शकलो. सकाळीच अंत्यविधी उरकला… रात्रीच्या गाडीत बसतोय. उद्या सकाळी ड्युटी जॉईन करतोय.” असे सांगून एएसआय कदमांनी फोन ठेवला.

काय बोलावं तेच कळत नव्हतं. एकीकडे काहीतरी क्षुल्लक सबब सांगून कर्तव्य टाळणारे महाभाग कुठे ! …आणि स्वत:च्या जन्मदात्रीच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून कर्तव्यास प्राधान्य देणारे, प्रामाणिकपणाचा वसा जपणारे एएसआय कदम कुठे !….. माझ्यासाठी हा आश्चर्य आणि एएसआय कदमां प्रती आदर अशा संमिश्र भावनांचा उमाळा आणणारा अविस्मरणीय प्रसंग होता…..

शब्द दिल्याप्रमाणे एएसआय कदम दुसऱ्या दिवशी कर्तव्यावर रुजू झाले… आणि यथावकाश निवडणुकाही  निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडल्या….

घोडखिंडीत अतुलनीय पराक्रम करून बाजीप्रभू जरी मराठ्यांच्या इतिहासात कायमचे अजरामर झाले तरी देखील त्यांचे सोबत सिद्धी जौहरच्या बलाढ्य फौजेशी लढून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कित्येक अनामिक बांदल वीरांचा पराक्रम देखील बाजी प्रभूंच्याच तोलामोलाचा होता हे विसरून चालणार नाही !….

त्याचप्रमाणे निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या पोलीस बांधवांमध्ये एएसआय कदमांसारख्या कोणाच्याही खिजगणतीतही नसलेल्या प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलिसांचे योगदान हे निश्चितच कौतुकास्पद व गौरवास पात्र ठरणारे आहे…. 

यथावकाश एक दिड वर्षात एएसआय कदम सेवा निवृत्त होतील आणि काळाच्या ओघात लोकांच्या विस्मृतीत जातील… त्याअगोदर त्यांची कर्तव्यनिष्ठा इतरांसाठी निरंतर प्रेरणादायी ठरावी याकरीता हा लेखन प्रपंच…….

अत्यंत दुःखद प्रसंगीही भावनेपेक्षा कर्तव्यपूर्तीस अग्रक्रम देणाऱ्या ह्या पोलीस वीरास माझा मानाचा मुजरा….

लेखक : श्री प्रवीण राणे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समता नगर पोलीस ठाणे, मुंबई

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एकोहं बहुस्याम ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

एकोहं बहुस्याम ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

लडिवाळ उन्हा,

कधी आणि केव्हा आपले ऋणानुबंध जुळले ते सांगता येत नाहीये मला. कदाचित पूर्वजन्मीचंच आपलं काही देणंघेणं असावं. कारण या सुंदर जगात पहिला श्वास मी घेतला, तो तुझ्या वैशाखातल्या दमदार तडाख्यातच… त्यामुळे माझ्या जन्मापासून तुझ्या आणि माझ्या नात्याची नाळ गुंफली गेली. पुढे कळत्या वयात तुझ्याशी अधिकाधिक सलगी होत गेली. प्रकाशाची विलक्षण ओढ तुझ्यापासून क्षणभराचा दुरावासुद्धा सहन होऊ देत नाही. तुझी सगळी रूपं नजरेत, स्मृतित गोंदली गेली आहेत.

पावसाळ्यातल्या ढगाआडून हळूच डोकवणारे तुझे हळदुले किरणं… ओलेत्या मातीला, हिरव्यागार वनराईला  हळूच सोनेरी वर्ख लावून जातात. कधी कधी तर मुलांच्याच भवितव्यासाठी त्यांच्यापासून दुरावा सहावा लागणाऱ्या, सटीसामाशी येणाऱ्या वडिलांसारखाच बिलगतोस तू धरतीला. पण पुन्हा कर्तव्यदक्ष वडिलांसारखा ओलेतेपण टिपून लगेच निघूनही जातोस आपल्या कामाला.

हिवाळ्यात, थंडीच्या अंतरंगात शिरून तिच्याशी गुफ्तगू करत अलगद बाहेर पडणारी तुझी उबदार मऊसुत सोनेरी किरणं… जणू गोधडीची हवीहवीशी वाटणारी उबच… ठराविक वेळी अंगभर लपेटता येणारी. स्वप्नांना रंग देणारी. माध्यान्हीच्यावेळी तुझा हलकासा आश्वासक स्पर्श रेंगाळणाऱ्या रजनीलाही तोंड द्यायला पुरेसा असतो.

आम्हा माणसांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रुपांत सावरत राहतोस तू…

आणि उन्हाळ्यात तर धरतीवर तुझंच साम्राज्य असतं… त्याचा थाट तो काय वर्णावा…

त्यावेळी प्रत्येक क्षणाक्षणाला दिसणारी तुझी रूपं किती मोहक…. रसांनी, गंधानी, रंगांनी भारलेली.

एखाद्या गायकानं बेभान होऊन कधी तीव्र… कधी मध्यम…  कधी मंद्र वेगवेगळ्या सप्तकांत, स्वरात अविरत गुणगुणत राहावं तसा असतोस तू…

तुला तमाही नसते रे तुझं हे गुणगुणणं आम्ही कुणी ऐकतोय की नाही याची.

एखाद्या चित्रकाराने एकाच रंगाच्या कुंचल्याचे वेगवेगळे फटकारे, वेगवेगळे आकार, वेगवेगळे पोत कॅन्व्हासवर दाखवावेत आणि आपल्या नितळ अन् तजेलदारपणाने तो सबंध कॅन्ह्वास व्यापून उरावास तसाच आहेस. तू…

एकाच रंगात बुडूनही अनेक रंगछटा दाखवणारा…

तू म्हणजे एकोहं बहुस्याम!

मला ना त्यामुळे तू एखादा जोगी वाटतोस. आपण जे काही रसरसून जगलो आहोत ते सगळं… अगदी सगळं काही अर्पण करण्याचा तुझा हा सोहळा असतो. खरं सांगू, विरक्तीची आसक्ती आहे तुला… का विरक्तीच्या आसक्तीचं रूप आहेस तू! असो.

आणि ती याची देही याची डोळा पाहायला मिळते ना तेव्हा सहन होत नाही… इतकं नितळ तजेलदार असणं…

अन् लडिवाळा, तू काय देतोयस , त्यापेक्षा तू काय देत नाहीस हे बघण्यातच सामान्य ऊर्जा खर्च होत राहते रे…

तेव्हा वाटतं अगदी आतून वाटतं वर्षानुवर्षं आपलं काम निरसलपणे करणारा एखाद्या ऋतूला समजण्यासाठी

एक सामान्य जन्म पुरेसा नसतोच रे!

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ते हरवलेले जादुई शब्द — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ ते हरवलेले जादुई शब्द —  लेखक – अज्ञात ☆ श्री सुनील देशपांडे

“अल्ला मंतर कोल्हा मंतर

कोल्ह्याची आई कांदा खाई

बाळाचा बाऊ बरा होई”

तुम्हाला आठवतंय, जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं, तर आई/बाबा तुम्हाला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवुन म्हणायचे “काही झाल नाही, तो बघ उंदीर पळाला!” आणि आपणही त्या नसलेल्या उंदराकडे बघत लागलेलं विसरून जायचो आणि पुन्हा खेळायचो किंवा ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई/बाबा हळूच चापट द्यायचे आणि त्या जागेकडे/वस्तूकडे डोळे वटारून म्हणायचे “हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . .” आणि असं म्हटल्यावर आपल्याला ही आनंद व्हायचा, वाटायचं कि आपल्याला कोणी काही केलं तरी त्याला ओरडायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम, ते दुःख विसरून जायचो.

कधी आपल्याला काही चावलं आणि ते आपण आई-बाबांना दाखवायला गेलो की ते त्यावर ‘फूsss’ असं करून फुंकर मारायचे आणि म्हणायचे “काही नाही. . . आता फू  केलंय ना , मग बरं होईल हं ते.”

पण का कुणास ठाऊक जसे जसे मोठे होत गेलो तसं तसं आई-बाबांना या शब्दांची आवश्यकता वाटेनाशी झाली. त्यांनी ते शब्द बोलणं बंद केलं आणि आपणही ते ऐकणं !

मोठं झाल्यावर वाटायला लागल हि काय बालिशपणा होता तो. . . अस फू करून कधी जखम बरी होते का?

पण खरं तर एवढं मोठं होऊनही आपल्याला त्या शब्दांची खरी ताकद कळलेलीच नसते. 

जखम ‘फू’ नी नाही बरी व्हायची . . . . तर त्या हळुवार ‘फू’ मधल्या प्रेम, माया आणि विश्वासाने बरी व्हायची

खरं तर ते शब्द हे आपलं लक्ष त्या दुःखापासून विचलित करण्यासाठी असायचे. त्या शब्दांमुळे आपण दुःख विसरून पुन्हा एकदा दंगा करायला तयार व्हायचो. 

जसे मोठे झालो तसे आपण सो कॉल्ड ‘ओपन वर्ल्ड’ मध्ये आलो. कॉलेज, नोकरी, छोकरी, स्पर्धा, करियर, मान मरातब, पैसा या आणि अशा अनेक गोष्टीनमधें गुरफटत गेलो. रोज अनेक शारीरिक, मानसिक जखमा व्हायला लागल्या, अनेक गोष्टी खुपू लागल्या, धर्मवाद, जातीवाद, राजकारण, व्यसनं, भोंदूगिरी, गरीबी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, कमिशनखोरी, उच्शृंखलता, दहशतवाद, जीवघेणी स्पर्धा लचके तोडायला लागली. . रोज नवी आव्हान समोर येऊ लागली . . . रोज नव नवीन कृत्रिम गरजांना बळी पडायला लागलो . . . . पण दुर्दैवाने या वेळी “काही झाला नाही, उंदीर पळाला!”, “हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय. . . .” अस करून त्या सर्व दुःखांकडे डोळे वटारून बघायला, “फू  केलंय ना , मग बरं होईल हा ते” असं  म्हणून त्या जखमांवर फुंकर मारायला कोणी कोणी नव्हतं.

ते जादुई शब्द हरवले होते आता . . . . कदाचित असते तर हे सारं घडलंच नसतं.

कितीही मोठे झालो तरी त्या ‘बालिश’ वाटणा-या शब्दांचं खरं मूल्य आता कळायला लागलं. . .

ते शब्द फक्त सांत्वन करणारे नव्हते तर सामर्थ्य देणारे होते. आपलं दुःख विसरून जगापुढे पुन्हा दिमाखात उभं राहायला शिकवणारे, आपल्या जखमा विसरून पुन्हा  खेळायला लावणारे शब्द होते ते. वर वर पोरकट वाटणाऱ्या या शब्दांमध्ये प्रेम, माया आणि विश्वास यांचं प्रचंड सामर्थ्य होतं.

कधीतरी वाटतं कि कितीही मोठं झालो आणि कितीही मोठं संकट आल, तरी जर का पुन्हा कोणी “. . . . उंदीर पळाला!”, “हाट रे. . . . ”  “फू. . .” हे शब्द उच्चIरले, तर सारी संकट, सारी दुःखं पळून जातील त्या लहानपणीच्या अदृष्य उंदराप्रमाणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या नियतीशी दोन हात करायला, पुन्हा एकदा त्या ओपन वर्ल्ड मध्ये दंगा करायला आपण सज्ज होऊ. . . . . 

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी त्या ‘फु sss’ ची गरज पडतेच. अगदी  आई बाबांना सुद्धा . . . . . 

त्याला/ त्यांना त्याच्या/ त्यांच्या किमान एका विश्वासू माणसाकडून मिळालेली एक ‘फू sss’ नवसंजीवनी देऊन जाते.

जाता जाता वि. वा. शिरवाडकर यांच्या कालातीत कवितेतील एक ओळ आठवते:

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा. . . “

माझ्याकडून एक फूsssss सर्वांच्या संकट निवारण्यासाठी !!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मन पाखरा रे… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

मन पाखरा रे ! ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मी स्वतःला स्थितप्रज्ञ मानत नाही पण माझी बुद्धी स्थिर आहे असे मला वाटते. मी चंचल नाही. मी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करते आणि निर्णय घेते. माझ्या आजूबाजूला एक मोठा जनसमुदाय असतो, त्यांच्यात होणारे संवाद मी ऐकते पण त्याचा माझ्या मनावर नेहमीच परिणाम होतो असे नाही. खूप वेळा तर मी ऐकते आणि सोडून देते शेवटी मला जे वाटते तेच मी करते.

लोक मला म्हणतात,

“ तू हट्टी आहेस.”

“आहे मी हट्टी!”

लोक मला ‘शिष्ट’ म्हणतात.

“ हो! आहे मी शिष्ट!”

पण त्या दिवशी एक अगदी लहानशी  घटना घडली.  मला माझ्या नवऱ्याने एक चॉकलेट दिलं. मी चॉकलेटचा रॅपर उघडून चॉकलेट मोकळं केलं आणि खाऊनही टाकलं.  सवयीप्रमाणे रॅपर ट्रॅश मध्ये टाकायला उठले आणि त्यावरच्या अक्षरांवर सहज नजर गेली. रॅपर थोडासाच चुरगळला होता.  तो पुन्हा नीट उघडला. त्यावर लिहिले होते,

“ तुझा तुझ्याविषयीचा गैरसमज दूर कर. तू घातलेला हा गंभीर मुखवटा फाडून टाक आणि त्यात तडफडणाऱ्या मनाच्या पाखराला मुक्त कर.”

खरं म्हणजे एक बाजारी कागद! त्यावर लिहिलेल्या शब्दांना काय महत्त्व द्यायचे? कोणीही काहीही  लिहावं. अखेर  एक गंमतच ना? त्याचे काय एवढे?  पुन्हा एकदा मी तो कागद चुरगळला आणि केराच्या टोपलीत फेकूनही दिला.

पण नाही हो!  हे प्रकरण एवढ्यावर नाही मिटलं.  मनात कोंडलेलं एक पाखरू फडफडत राहिलं.  मनाचा गाभारा चोचीनं टोकरत राहिलं. वेदना जाणवायला लागली, जखम भळभळायला लागली. मन  पाखरू बनलं. मुक्ततेसाठी धडपडू लागलं आणि उगीचच वाटू लागलं,

 “मी खरी का खोटी?” 

“मी स्थिर की अस्थिर?”

“ मी सुखी का दुःखी?”

“ मी मुक्त की बंधनात?”

“ कोणतं माझं आकाश?  फक्त डोक्यावरचं की दूरवरच्या त्या डोंगरावरचंही?” 

मिटल्या कमळात एखादा भुंगा तडफडावा ना तसा हा मनाचा भ्रमर आतमध्ये नि:शब्द कोंडल्यासारखा जाणवू लागला. पार नदीच्या उगमापासून ते पावलापाशी थांबलेल्या पाण्यापर्यंत विचार वाहू लागले.  मनात कोंडलेलं एक पाखरू आकाशाचा वेध घेत उंच उंच उडायला लागलं.  माझं मनच पाखरू झालं.  कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर, इकडून तिकडे— तिकडून इकडे.  कधी जमिनीवर, कधी पंख भिरभिरत आभाळी आणि मनाच्या या पाखराला मी जेव्हा पंख पसरून उडताना पाहिलं ना तेव्हा माझ्यातली मी, खरी, खोटी, हरवलेली दिसू लागले. माझंच मन मी पाहू लागले.

वारंवार झालेले मनावरचे घाव गोंजारत राहिले. मनावर  झालेल्या ओरखड्यांच्या खुणा मी तपासू लागले. मन माझं हसलं, रुसलं, भांबावलं, आक्रंदलं आणि पुन्हा पुन्हा पिंजऱ्यात कोंडलं गेलं.

“ हा रंग तुला शोभत नाही.”

 नाही घातला.

“ हे तुला जमणार नाही.”

 नाही केलं.

 “अंथरूण पाहूनच पाय पसर.” तेच केलं. “मुलीने मुलीसारखे रहावे, वागावे.” म्हणजे नेमकं काय पण नाही विचारले प्रश्न.

आता वाटतं मन माझं स्थिर असणं, चंचल नसणं म्हणजे चौकटीत राहणं होतं का? 

आयुष्याचे अनेक कप्पे झाले. ते नीटनेटके रचताना खूप दमछाक झाली. स्वतःपेक्षा इतरांचाच विचार केला. याला काय वाटेल त्याला काय वाटेल यातच बरीचशी ऊर्जा कामी आली.  मनातल्या पाखराने बंद दारावर अनेकदा थाप मारली पण दार उघडून त्या बंद पाखराला मोकळं करण्याचं बळ म्हणण्यापेक्षा धाडस झालं नाही. भय कधी संपलं नाही.  एक कोष विणला आणि त्यातच स्वतःला गुंतवून ठेवलं. शिवाय मला जे योग्य वाटलं ते मी केलं या समाधानातही राहिले.  प्रवाहच पकडून ठेवला.  कधी कुणाविषयी हेवादावा, द्वेष, मत्सर वाटलाच नाही असं नाही. एका सरळ रेषेत आयुष्य जगत असताना रेषेबाहेरचं आपलं सामर्थ्य, आपलं भविष्य तपासून पहावं,  सारे बंध तोडावेत, पूजलेले उंबरठे हटवावेत असं वाटलंच नाही का?

तुज अडवितो कैसा उंबरा 

आकाशी झेप घे रे पाखरा 

सोडी सोन्याचा पिंजरा ..

हे स्वर तसे नेहमी गाभाऱ्यात घुमले.  नाही सोडला पिंजरा.  कम्फर्ट झोन होता तो आपला.  तो सोडून जाण्याचं प्रचंड भय होतं  मनात आणि म्हणून असेल कदाचित तक्रार नव्हती आयुष्याबद्दल.  जे आहे ते चांगलं आणि तेच आपलं यात सुखाने सारं काही चाललं होतं. 

मग इतक्या वर्षानंतर जवळजवळ आयुष्याचा  उत्तरार्धही संपत असताना एका चॉकलेटला गुंडाळलेल्या कागदावरच्या अक्षरांनी इतकी मोठी क्रांती करावी मनात  की सुप्तावस्थेत असलेल्या  क्रांतीच्या बीजाला एकदम मोड यावेत?  विरुद्ध प्रवाहात झेप घ्यावी असे वाटावे?  खरं म्हणजे कुठला प्रवाह? मनाचा की समाजाचा?  आयुष्यभर विरुद्ध प्रवाहातच हातपाय मारले की पण तो होता मनाचा प्रवाह. 

आता आत अंतरात फडफडणारं एक पाखरू उडू उडू पाहतंय.. मनाच्याच प्रवाहात  जाण्याचं आव्हान करतंय.

“ बा पाखरा!  आता उशीर झाला रे! कुठे उडशील? कुठे झेप घेशील? पंखातली ताकद संपली रे!  आणि कितीही भरारी मारलीस ना तरी मुक्त कसा होशील? उगीच भटकंती होईल.  घरट्याची आठवण येईल.मळलेल्या वाटेवरून चालणारे आपण. म्हणून  सांगते,

“या चिमण्यांनो! परत फिरा रे 

घराकडे आपल्या 

जाहल्या तिन्ही सांजा…”

खलील जिब्रान  म्हणतो,

THE RIVER NEEDS TO ENTER THE OCEAN,

नदीचा शेवट सागरातच.

 म्हणून विनविते,

“ मनाच्या पाखरा पुरे झाले उडणे. आवर पंख. घरट्यात  ये.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “साठवणीतल्या आठवणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “साठवणीतल्या आठवणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची…

आमच्या परीक्षा झाल्या की आई वर्षभराच्या साठवणीच्या कामाला  लागायची. प्रथम फळीवरचे मोठे पत्र्याचे  आणि ॲल्युमिनियमचे डबे खाली काढले जायचे. डबे  धुऊन उन्हात वाळवले जायचे.

ऊन कडक आहे… याचा आईला आनंद व्हायचा .त्यात घडी करून ठेवलेले प्लास्टिकचे मोठे कागद असायचे. ते स्वच्छ धुऊन ऊन्हात  वाळवायचे .आदल्या दिवशी गच्ची  झाडून घ्यायची. संध्याकाळी बादलीने पाणी वर न्यायचे आणि गच्ची धुऊन काढायची.

सगळ्यात प्रथम मान सांडग्यांचा असायचा. लाकडी पाट धुवून वाळवून ठेवलेला असायचा. रात्री हरभरा, मूग, उडीद डाळ भिजत घालायची. सकाळी पाट्यावर मिरची आले मीठ घालून जाडसर वाटायची .

पाटावर मध्यभागी सुपारी ठेवली जायची .त्यावर हळदीकुंकू वाहून आई मनोभावे नमस्कार करायची. वर्षभराचे पदार्थ चांगले व्हावेत म्हणून गणपतीची प्रार्थना करायची.

कामाचा” श्री गणेशा” व्हायचा…

त्या सुपारीभोवती गोल गोल सांडगे घालायचे .पाट उचलून वर गच्चीत ठेवायचे काम आमचे असायचे. बाकीच्या पिठाचे सांडगे वर गच्चीत प्लास्टिक वर घातले जायचे. त्यांचा आकार जराही कमी जास्त झालेला आईला चालायचा नाही .एकसारखे सांडगे सुरेख दिसायचे. ते जरासे वाळले की आमची खायला सुरुवात व्हायची.  वरून कडक आणि आतून ओलसर सांडगे खाऊनच निम्मे संपायचे. साठवणीचे करण्यासाठी आई परत एकदा करायची. हे सांडगे तळून भाजलेल्या दाण्याबरोबर खाल्ले जायचे. भाजी नसेल त्या दिवशी  खोबरं,कांदा,लसुण यांच वाटण करून  त्यात सांडगे घालून आई त्याची भाजी करायची .तळून कढीत टाकले की गरम भाताबरोबर खाताना भाताची चव मस्त लागायची.

नंतर पापडाचा नंबर लागायचा. उडीद आणि मूग डाळ गिरणीत समोर उभं राहून आई दळून आणायची. सकाळीच पापडखार, काळीमिरी, घालून उडदाचे पीठ घट्ट भिजवले जायचे .अगदी “दगडासारखे” हा शब्द आईचाच… ते कुटुन द्यायचे काम भावाचे असायचे. वरवंट्याने दणादण तो पीठ कुठून द्यायचा. आई तेलाचा हात लावून बोट्या करून ठेवायची. त्याची चव अप्रतीम लागायची. येता जाता आम्ही ते पापडाचे पीठ आवडीने खात असू. शेजारच्या दोन-तीन काकु त्यांचे जेवण झाले की पोलपाट लाटणे घेऊन यायच्या .गोल बसून घरात गप्पा मारत पापड लाटणे सुरू व्हायचे. लाटलेले पापड हातावर घेऊन आम्ही वर उन्हात नेऊन घालत असु.हे  पापड सारखे हलवायला लागायचे नाही तर कडक  होऊन त्यांचा आकार  बदलायचा. आई खालूनच सांगायची..”पापडाचा द्रोण होऊ देऊ नका रे” वर एकदा येऊन आई नजर टाकून जायची.  रात्री मुगाची खिचडी व्हायची .त्याच्याबरोबर ताजा तळलेला पापड असायचा…

सगळ्यात जास्त व्याप असायचा तो गव्हाच्या कुरडयांचा. त्यासाठी आई तीन दिवस गहू भिजत घालायची. नंतर ते पाटावर  वरवंट्याने वाटायचे .मग  भरपूर पाण्यात कालवायचे. चोथा  व सत्व वेगळे करायचे.  त्याला गव्हाचा  चीक  म्हणायचे.आई लवकर उठून तो चीक  शिजवायची. तो गरम असतानाच कुरडया घालायला लागायच्या.  पात्र भरून  द्यायचं काम बहिणीचे व माझे असायचे. हा.. हा म्हणता.. पांढऱ्याशुभ्र कुरडयांनी प्लास्टिक भरून जायचे. त्यावर्षी काही मंगल कार्य असेल तर रंगीत कुरडया घातल्या जायच्या. सूर्यदेव वर यायच्या आत कुरडया घालून झाल्या पाहिजेत असे आईने ठरवलेले असायचे.

नंतर आई आम्हाला खाण्यासाठी चिक शिजवून द्यायची. त्यात तूप घालून किंवा दूध साखर किंवा हिंग जिऱ्याची कडकडीत फोडणी करून खाल्ला तरी तो छान लागायचा.

सुट्टीच्या दिवशी वडील सकाळीच सायकलवरून मोठ्या मंडईत जायचे.  भरपूर बटाटे आणायचे. बटाटे किसायची मोठ्या भोकाची किसणी वर्षातून एकदाच माळ्यावरून खाली यायची. पहाटे उठून बटाटे उकडायचे ,सोलायचे व थेट प्लास्टिक वर खीसायचे. उन्हाने चार-पाच वाजेपर्यंत  कीस कडकडीत  वाळून जायचा .त्यात  दाणे ,तिखट, मीठ ,साखर घालून  चिवडा केला जायचा. कधी त्यात नाॅयलाॅन साबुदाणा तळून घातला जायचा. गावाला जाताना गाडीत खायला आई हा चिवडा करून घ्यायची.

साबुदाणा दळून आणून त्या पीठात ऊकडलेला बटाटा  घालून  ऊपवासाचे पापड केले जायचे. त्यातही मिरचीचे व  तिखटाचे असे दोन प्रकार होते. बटाट्याचे चिप्स लहानपणी खूप आवडायचे. जाळीचे व प्लेन असे वेफर्स करणारी चपटी किसणी होती .त्या वेफर्सची ट्रायल घेण्यातच बरेचसे बटाटे खर्ची व्हायचे. कितीही प्रयत्न केला तरी तीन-चार फक्त पातळ व्हायचे बाकी जाडच…… तरीसुद्धा ते जाडे जुडे वेफर्स आम्ही आवडीने खात होतो. त्याची दरवर्षी काहीतरी निराळी पद्धत आईला कोणीतरी सांगे. तरी बटाटा पातळ  कापला जायचा नाही. कंटाळून आई विळीवर पातळ काप करून घ्यायची. विकतचे वेफर्स हा फार महाग पदार्थ समजला जायचा त्यामुळे तो आणला जायचा नाही. साबुदाण्याच्या पापड्या घातल्या जायच्या. मध्ये जरा ओलसर असलेल्या त्या ओल्या कच्च्या पापड्या सुद्धा छान लागायच्या. थोडीशी खारट साबुदाण्याची व जिऱ्याची चव यांचा मस्त मेळ जमायचा… या पापडाच्या पिठात शिजवताना बटाटा किसून घालायचा व मिरची वाटून लावायची त्या जरा वेगळ्या पापड्या तळल्यावर सुंदर दिसायच्या.

मसाल्याच्या भरलेल्या मिरच्या, साबुदाणा भरलेल्या उपासाच्या मिरच्या ,कुटाच्या मिरच्या असे मिरच्यांचे प्रकार व्हायचे. दहीभाताला किंवा दही पोह्याला हीच मिरची लागायची.

शेवयांसाठी खास दोन-तीन दिवस राखून ठेवलेले असायचे .त्याचे पीठ जमले….. शेवयांची बारीक तार निघालेली पाहिली की आई खुष व्हायची .हातावर शेवया  करायच्या. लांब करून त्या न तुटतील इतक्या ताणायच्या. लाकडी काठीवर वाळवायच्या. केशर ,बदाम आणि अटीव दुधातल्या त्या खिरीची चव अजून जिभेवर  आहे . त्या शेवयांचे जे तुकडे खाली पडायचे त्याचा कांदा, कोथिंबीर,भाज्या घालून उपमा केला जायचा. तो फारच चवदार लागायचा .तेव्हा नूडल्स हा प्रकार नव्हता . नूडल्स पेक्षा हा प्रकार  टेस्टी असायचा. पण शेवया खूप मेहनत घेऊन केलेल्या असल्यामुळे त्या खिरीसाठीच वापरल्या जायच्या.

ज्या दिवशी जो पदार्थ केला असेल त्या दिवशी रात्रीच्या जेवणात तो पदार्थ असे .वडील ऑफिसमधून आल्यावर आवर्जून चौकशी करायचे.

“वा वा “म्हणायचे. आई खुष होऊन  हसायची. एक एक पदार्थ तयार होऊन डब्यात भरला जायचा त्यावर कोहाळ्याचे सांडगे ,उपवासाच्या पापड्या ,लसणाचे पापड, असे खडू ओला करून लिहिले जायचे. वरची फळी गच्च भरून जायची.

आईला या महिन्यात आराम नसायचाच. कारण हे प्रकार करून संपेपर्यंत वडील मिरच्या, हळकुंड, शिकेकाई आणून द्यायचे. मिरच्यांची डेखे काढायची .मिरच्या, हळकुंड गच्चीत वाळवायचे .वर्षांचे तिखट हळद होऊन जायचे. खूप दिवसापासून लिंबाची साले साठवलेली असायची.” गव्हला कचरा” म्हणजे काय असायचे कोण जाणे? पण  लांब असणाऱ्या आयुर्वेदिक औषधी दुकानातून वडील तो आणून द्यायचे. आवळकाठी, रिठे गच्चीत वाळत घातलेले असायचे .हे सगळे घालून  शिकेकाई दळून आणायची  .रविवारी आई या शिकेकाईचे भरपूर पाणी गरम  करून द्यायची. त्यानी केस धुवायचे असा दंडक होता.

महिन्यातून एकदा आई स्वतः चोळून न्हाहु  घालायची. आईच्या हातात  केस होते तोपर्यंत केस लांब आणि जाड होते .कॉलेजमध्ये गेल्यावर केसांना पहिला साबण लावला तेव्हा आई खूप चिडली होती.

मे महिना संपता संपता आईची लोणच्याची गडबड उडायची. कैरीचे तिखट ,गोड लोणचे. तक्कु ,कीसाचे लोणचे, लवंगी मिरची लोणचे असे विविध प्रकार आई करायची. गुळांबा ,साखरआंबा, मुरांबा हे पदार्थ व्हायचे .झाकणाला पांढरे स्वच्छ कापड लावून आई बरण्या बंद करायची .सेल्फ मधला वरचा कप्पा या बरण्यांचा असायचा. शाळा सुरू झाल्यावर डब्यात पोळी भाजी बरोबर लोणचे, गुळांबा असायचा .

कितीतरी दिवस आईचा हा उद्योग चालायचा .आता विचार केला तर आश्चर्य वाटते… पण तेव्हा ते सर्व लागायचे.  वर्षभर बरोबर पुरायचे.

सध्या सारखी शिबीर ,क्लास असे काही नसायचे  पण आम्हाला सुट्टीचा कधी कंटाळा यायचा नाही.

आईला मदत करताना त्यातून खूप शिकायला मिळायचे .आजकाल  एवढे प्रकार कोणी करत नाही आणि लागतही नाहीत .जे पाहिजे ते तयार मिळते. पाकिटे आणायची खायची… पण ती पूर्वीची मजा त्यात नाही एवढे खरे….

 सुमारे दीड फूट उंचीची चिनीमातीची लोणच्याची बरणी ,पत्र्याचे चौकोनी, गोल डबे बरेच वर्ष माझ्या माहेरी माळ्यावर पडून होते .दरवेळेस माळा साफ करताना त्याची अडचण वाटायला लागली..

 पण  ते  काढून  परत वर ठेवले जायचे. 

एके वर्षी वडिलांनी ती  मोठी बरणी  देऊन टाकली ……किती तरी दिवस आम्ही बहिण भाऊ त्या बरणीसाठी हळहळत होतो………. उगीच टाकली असे अजूनही वाटते.

 ती बरणी नुसती बरणी नव्हती…  ते आमचे लहानपण होते.

 तो जपून ठेवावा असा  ठेवा ….आमच्या आनंदाची.. ती एक साठवण होती.

 ती  बरणी म्हणजे  आमच्या कष्टाळू आईची आठवण होती  ……

आजही साठवण लिहिताना आईच आठवली…

आई गेली आणि सारे संपले…… 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जत्रेतील नाटक…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “जत्रेतील नाटक —” ☆ सुश्री शीला पतकी 

माझ्या गावी हन्नूर अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी अक्षतृतीयानंतर गावची जत्रा भरत असे आमच्या या छोट्या गावाचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर त्या शिवाय गावात मुस्लिम वसाहत भरपूर त्यामुळे त्यांचा देव लगीनशा वली तसेच गावात भुताळसिद्धाचे आणि पांडुरंगाचे देऊळ नदीच्या उतारावरून जाण्यापूर्वी चावडीच्या शेजारी दोन पीर…. ही साधारणपणे माथा टेकण्याची देवळे… 1974 सालापासून सिद्धेश्वर आणि लगीनशा वली यांची जत्रा अक्षय तृतीया नंतर येणाऱ्या गुरुवारी भरते ती साधारणपणे तीन दिवस असते गुरुवार शुक्रवार शनिवार जत्रेसाठी बरीच मंडळी एकत्र येतात. नातेवाईक येतात आसपासच्या गावचे लोक येतात ..एकूण वातावरण सणाप्रमाणे असते. गावांमध्ये त्यावेळी असलेल्या तरुण मुलांमध्ये आत्ताचे तडफदार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे वडील पंचप्पा कल्याण शेट्टी हे गावाच्या विकासासाठी धडपडत असत त्यांनी जत्रेमध्ये नाटक बसवण्याची कल्पना मांडली ती सर्वांनी उचलून धरली त्या काळात नाटकांमध्ये स्त्रिया काम करत नसत खेडेगावातन तर नाहीच ! मग पुरुष पार्टीतीलच काही लोकांना स्त्री पार्टी बनवले जायचे

तिसऱ्या दिवशी हा नाटकाचा कार्यक्रम असे. हिंदू मुस्लिम सर्वच जत्रेमध्ये आनंदाने सहभागी  होत असत पांडुरंगाच्या सप्त्याला बाशा मुल्ला सरपंच पुढे होऊन सर्व कार्य पार पाडीत तर कित्येक हिंदू घरामधून पिराला नैवेद्य जाई असे हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुंदर गाव… दीड दोन हजार लोकसंख्या.. गावाला सुंदर देखणी स्वच्छ हरणा नदी वाहत असे …गाव सुखात होत! माणसाचे नाते सुखाशी असले की मग ती रसिक होतात आणि कलांकडे वळतात तसं या गावातल्या मंडळींनी नाट्यकलेकडे आपला मोर्चा वळवला .गावातील हौशी कलावंतांनी यात भाग घेतला होता नाटकाचे नाव होते भगवा झेंडा योगायोगाने मी सेवासदन येथे नुकतीच शिक्षिका म्हणून रुजू झाले होते आपल्या गावची मुलगी शिक्षिका झाली याचा अभिमान होता त्यांनी मला अध्यक्ष म्हणून बोलवले आमचे घरच तेथे होते त्यामुळे काही प्रश्नच नव्हता माझे काका श्री रामचंद्र पत्की हे तेथे वास्तव्याला होते मोठा वाडा होता शेती होती त्यामुळे आमचे हन्नूर ला येणे जाणे भरपूर होते मी तात्काळ निमंत्रण स्वीकारले सकाळी गावाला पोहोचले काकू ने बनवलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला स्टेज आमच्या घराच्या जवळच होते स्टेजच्या पाठीमागे रंगपट होता तिथेच मेकअप वगैरे कपडे बदलणे अशा सोयी होत्या आमच्या घरातून हे सगळं दिसत होतं साधारणपणे तीन चार वाजताच रंगपटाची पूजा होऊन आत मध्ये स्त्री पार्टी जे आहेत त्या पुरुषांचे केस कमी करणे दाढीकटिंग मिशा काढण्यासाठी न्हावी हजर झाला ..तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण कसे दिसतोय ते वारंवार आरशात पाहत होते… त्यानंतर तोंड रंगवणे हो हो अगदी रंगवणेच असते भुवया कोळशाने कोरून काळ्या  करणे ओठाला लाल करण्यासाठी हिंगूळ लावणे त्याचेच पावडरमध्ये मिश्रण करून गालावर लाली आणणे आता काळ्या रंगाला गोरं करून त्यावर लाली  म्हणजे मेकअप मनचे  कौशल्य होते… त्यानंतर नाटक ऐतिहासिक असल्यामुळे त्या प्रकारची ड्रेपरी परिधान करणे शिवाजी महाराजांची दाढी.. मिशा ..टोप अंगरखा तलवारी मावळे हे सगळे तयार झाले… इथं पर्यंत  सात वाजले सात नंतर स्टेजची पूजा माननीय सरपंच यांच्या हस्ते झाली स्टेजच्या दोन्ही बाजूला असलेल्या खांबांना एकीकडे भगवा झेंडा तर दुसरीकडे हिरवा झेंडा लावलेला होता खऱ्या अर्थाने सद्भावना होती ती राष्ट्रीय एकात्मतेची …!त्यानंतर बत्त्यांची सोय झाली बत्त्या अडकवण्यात आल्या समोरच्या मैदानावर पाली टाकल्या गेल्या मधल्या वयाची तरणी पोर मेकअपच्या पाली असलेल्या खोलीला भोकं पाडून पाडून आत डोकावत होती स्त्री पार्टी कशा दिसतात याची सगळ्यांनाच उत्सुकता होती नाटकासाठी संगीत म्हणून एक पाय पेटी शेजारी असलेल्या वागदरी या गावांमधून डोक्यावरून चालत उचलून आणावी लागायची ती तशी आणली कारण एसटीमध्ये आणली तर तिच्या पट्ट्या निखळण्याची शक्यता असते ही पायपीट सुद्धा अनेक तरुण करतात ती पेटी आणि डग्गे आणि तबला झांज यावर सर्व म्युझिक अवलंबून होते…

तयारी जय्यत झाली नाटकाची अनाऊन्समेंट झाली नावे घोषित झाली प्रत्येक नावाला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आणि नंतर नाटकाचा पडदा उघडला मागे दरबाराचा सीन बागेचा सीन दऱ्याखोऱ्याचा सीन असे पडदे होते ते वरून सोडण्याची व्यवस्था होती नाटकाच्या कथानका प्रमाणे सिन पुढे जात होते स्त्री पार्टीचे आगमन झाले की लोकांच्या शिट्ट्या आणि टाळ्या….. छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले की…. जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा असे पिटातल्या नाटकासारखे लोक नाटक एन्जॉय करत होते…. युद्धाचा प्रसंग चालू झाला की मागे पायपेटी आणि तबला डग्गा याच्यावरती सगळे आवाज काढले जायचे घोड्याचे टापाचे आवाज डग्यावर वाजवले जायचे एखादा शिवाजी महाराजांचा सरदार मुस्लिम सरदाराच्या छाताडावर वर पाय रोवून तलवारीने त्याची मान उडवतो अशी एक्शन करी त्या वेळेला झांज वगैरे जोरात वाजायची…. प्रेक्षकांमध्ये टाळ्या शिट्ट्या आणि घोषणा …वाद्याचे आवाज दुपटीने वाढायचे आणि तो सीन तिथे थांबायचा.  प्रेक्षकांमधून त्या प्रसंगाला वन्स मोअर यायचा आणि वेगवेगळ्या नावाने बक्षीस पुकारले जायचे  बक्षीस साधारणपणे एक रुपयापासून पाच रुपये पर्यंत असे हा कार्यक्रम साधारणपणे दर पंधरा मिनिटांनी होत होता बक्षीस देणारा माणूस प्रत्यक्ष स्टेजवर येऊन बक्षीस देत असे मागे पुन्हा वाद्य आणि समोर टाळ्या साधारण नाटक एक तासभर पुढे गेलं की ते थांबत असे आणि स्त्री  पार्टी करणाऱ्या पात्राला त्याच्या सासुरवाडीकडून पूर्ण आहेर व्हायचा म्हणजे त्याच्या ओरिजिनल बायकोला शेजारी बसवायचे, स्टेजवर पाट टाकले जायचे, मग सासूरवाडीची मंडळी नवरा बायकोला आहेर करायचे गंमत म्हणजे स्टेजवर पाटावर बसलेली दोन्ही मंडळी साडी या वेषातच असे. टॉवेल टोपी धोतर सदरा, त्याच्या बायकोला उत्तम लुगडे म्हणजे साडीचोळी असा आहेर व्हायचा काही हौशी अर्ध्या तोळ्याची अंगठी सुद्धा घालत असत जावयाला कारण त्याने नाटकात स्त्री पार्ट केला आहे म्हणून.  अशा पद्धतीने आहेर बक्षीसे आणि वन्स मोअर असे नाटक पहाटपर्यंत चाले माझ्या काकांनी… माझ्या मुलीला उद्या कामाला जायचे तिचे भाषण आटोपून घ्या असे सांगितल्यामुळे मला स्टेजवर बोलवण्यात आले माझे भाषण झाले माझ्या हस्ते काही बक्षीस वाटण्यात आली ती बक्षीसे वाटत असताना मध्येच एक फेटेवाले गृहस्थ उठले आणि त्याने अध्यक्षरू  छलो भाषण माडिदरू अद्रसलवागे ऐद  रुपये बक्षीsssस …..आणि टाळ्यांचा कडकडाट म्हणजे अध्यक्षांनी उत्तम भाषण केल्याबद्दल पाच रुपये बक्षीस मी कपाळावर हात मारून घेतला आज तागायत कुठल्याही अध्यक्षाला  प्रेक्षकाकडून असे पाच रुपयाचे बक्षीस आले नसेल पण मला ते मिळाले आणि गावात ते नाकारता येत नसते तो त्यांचा अपमान होतो त्यामुळे मी मुकाट्याने ते घेतले अशा पद्धतीने नाटक रात्रभर चालायचे शिवाजी महाराज लढाई जिंकायचे तेव्हा अख्खा गाव जल्लोष करायचा त्यावेळेला हिंदू मुसलमान हे त्यांच्या डोक्यात येत नव्हतं आज मात्र हे सार दुर्दैवाने बदलले आहे

…नाटकाच्या मध्ये विश्रांती काळात रंगपटात चहा जायचा तिथे अध्यक्षाला ही चहा घ्यायला बोलवायचे पुरुष पात्र आपल्या झुपकेदार मिशा संभाळत चहा प्यायची तर तलफ आलेली स्त्री पार्टी थोडसं तोंड वळवून मस्त बिडीचा झुरका घेत बसलेले असायचे मला या सगळ्या दृश्याचे आजही हसू येते ….पण खर सांगू खेडेगावातल्या नाटकांनी आपली नाट्यकला जिवंत ठेवली तिचा आनंद उपभोगला आज सर्वत्र भव्य स्टेज भपकेबाज लाइटिंग विविध तंत्रज्ञानाचा उपयोग एसी थिएटर या सगळ्या सोयी मध्ये पाचशे रुपयाचे तिकीट काढून लोक नाटक पाहतात पण ही मजा नाही हा सर्व गावरान बाज माणसाला निखळ आनंद देऊन जात असे नाटक पहाटे संपायचं त्यावेळेला लहान लहान पोरं पालीवर कुठेतरी झोपलेली म्हातारी माणसं आडवी झालेली बाया बापड्या घराकडे परतलेल्या कार्यकर्ते मंडळी स्टेजच्या विझू पाहणाऱ्या बत्त्या मेंटल गेलं का रॉकेल संपलं याचा शोध घेत हिंडायचे मग स्टेज आवरलं की तिथेच मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर मंडळी झोपून जायचे आणि मग या नाटकाचे पडसाद आणि गुणगान आसपासच्या गावागावातून कितीतरी दिवस चालायचे एखाद्या जत्रेतल्या फोटोग्राफरला बोलवून काढलेला फोटो त्यांच्या घराघरातून खांबाला लटकवलेले असायचे आणि त्या घराला वाटायचे की आपल्या घरात जणू नटसम्राट आहे घरातली माणसं फार भक्ती भावाने आणि अभिमानाने त्या फोटोकडे पाहत राहायचे आणि आल्या गेलेल्यांना त्या नाटकाची वर्णन सांगायची…. मंडळी खेड्यातलं असलं भन्नाट नाटक अनुभवायचे दिवस संपले. ज्यांनी ते अनुभवलं ते समृद्ध झाले या नाटकाची …त्याच्या तयारीची हजामत करणाऱ्या पासून सुरू झालेली त्याची तयारी ..ती बक्षिसे ते आहेर ती वाद्य …रंगपटात ओढल्या गेलेल्या  बिड्या.. मिशी सांभाळत प्यालेला चहा ..ऐनवेळी म्यानातून न निघालेल्या त्यांच्या गंजक्या तलवारी सगळं काही अफलातून …..! याची मजा ज्यानी घेतली ते धन्य …!! हे सगळं आठवलं की आज म्हणावसं वाटतं ….असं असतं  नाटक राजा … देखण  सुरेख निरागस आणि सुंदर निखळ मनोरंजन करणार…….!!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ असाही एक भीतीदायक अनुभव… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

??

☆ असाही एक भीतीदायक अनुभव… ☆ सौ. वृंदा गंभीर

ही कथा नसून माझ्या जीवनातला एक भयानक अनुभव आहे. माझं नावं प्राजक्ता संजय कोल्हापुरे. मी जेव्हा लहान होते तेव्हा मी सायकलवरून शाळेत जात होते. माझी शाळा होती आमच्या घरापासून जवळ जवळ 4km अंतरावर आणि शाळेत जाताना व घरी येताना मला फार दम लागायचा,

मला थकवा जाणवायचा पण वाटायचे सर्वांना होते त्यात काय वेगळं? म्हणून सारखं मी त्याकडे दुर्लक्ष करायचे. आई पण मला म्हणायची ‘ दिदू जेवणं वेळेवर करतं जा किती थकवा येतो तुला ‘ पण मी मात्र दुर्लक्ष करणार. पण त्याचे परिणाम पुढे जाणवतील हे कुणालाच लक्षात आले नाही. मी मोठी झाले पण माझा हा त्रास कुणाच्याच लक्षात आला नाही. ४ वर्षाखाली माझी आई वारली. तिने आत्महत्या केली, सगळे जण म्हणतात मी फार रडलेच नाही. पण  माझं फार प्रेम होत तिच्यावर म्हणून मला फार आठवण यायची.  ती गेल्यावर मी एकटीच असायचे घरी, मी फार रडतच नव्हते त्यामुळं सर्व त्रास मी निमूटपणे सहन केला, भावनाहीन झाले होते. 

मग मला स्थळ आले. मलवडीमध्ये दाखवण्याचा कार्यक्रम अगदी उत्साहात झाला.  माझं एक वर्षाखाली धूमधडक्यात लग्न झालं, आणि तेही माझ्या आईच्या पुण्याईने.  तिने माझ्यासाठी करून ठेवलेले सोने माझ्या उपयोगाला आले. स्वामींच्या आशीर्वादाने खूप चांगले लग्न झाले. मला एक छान आणि सुंदर व्यक्तिमत्व असणारा नवरा मिळाला, आणि त्या कुटुंबातील माणसं फार चांगल्या स्वभावाची आणि निर्मळ मनाची होती,. मी झाले प्राजक्ता संघर्ष गंभीर, गंभीर घराची मोठी सून.  

सर्वजण  फार आनंदात होते, नित्य नियमाने सगळी कामे होत होती, कुलाचार पण चांगला होत होता.  पण आमच्या हसणाऱ्या कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली. आमच्या घरी मामीच्या दोन मुली आल्या होत्या, नम्रता आणि गौरी. आम्ही सगळे शनिवारी पिक्चरला गेलो.  पिक्चर बघून घरी आलॊ तर आमचा फ्लॅट आहे तिसऱ्या मजल्यावर.  मी चढून वर आले तर मला थकवा जाणवायला लागला.  फार दम लागला ..  १० मिनिटे झाली पण माझा दम काही थांबेना. मागच्या आठवड्यात मी आणि माझे मिस्टर दवाखान्यात जाऊन आलॊ होतो तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की ऍसिडिटी झाली आहे आणि त्यांनी मला गोळ्या दिल्या, पण माझा  त्रास काही थांबेना.  त्याच दिवशी रात्री मला फार त्रास झाला, मला नीट आणि पुरेसा श्वास घेता येत नव्हता.  आडवे झोपले कि श्वासाच प्रमाण कमी अधिक होत होते.  त्या दिवशी मी काही झोपले नाही, पण दुसऱ्या दिवशी मी आईंना सांगितले कि मला दम लागतोय मग त्या मला म्हणाल्या  कि, आपण दवाखान्यात जाऊ, मी टाळाटाळ केली, लक्ष दिले नाही.  मग मात्र आईने मागे लागून माझ्यावर रागवून मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं.  तिथे त्यांनी टेस्ट केली आणि त्या टेस्टमध्ये कळले कि माझ्या छातीत पाणी झाले आहे.,आधी  एकदा होऊन गेले आहे आणि ते छातीत साठून चिटकून बसले आहे हृदयात. म्हणून मला श्वास घेता येत नव्हता. डॉक्टर म्हणाले लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे नाहीतर मुलगी वाचणार नाही.  दुसऱ्या दिवशी मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेले.  तिथे त्यांनी टेस्ट केली आणि मला ताबडतोब वोर्डमध्ये ऑक्सिजनवर ठेवले होते, आणि भीती घालण्यात आली होती कि ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करा नाहीतर मुलगी वाचणार नाही. ते डॉक्टर हृदयात होल पाडून पाणी काढणार होते, असा आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमधला भोंगळ कारभार.  तिथे बिल तर फाडले जातेच पण भीती देखील दाखवली जाते.  या भीतीखाली रात्रभर कुणालाच झोप लागली नाही.  सगळे हॉस्पिटल मधेच होते पण तेवढ्यात त्यांना कुणीतरी कळवले कि मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, तिथे चांगली ट्रीटमेंट केली जाते.  मला प्रायव्हेटवरून गव्हर्नमेंटमध्ये ऍम्ब्युलन्समधून न्यावे लागले. ऑक्सिजन लावलेलाच  होता.  असा अनुभव परत कधीच कुणाच्या वाट्याला येऊ नये. मी ससूनला आले.  फार गर्दी होती आणि बेडदेखील शिलक नव्हता.  कसाबसा बेड आरेंज केला.  मी त्रासाने कळवळत होती, त्यानंतर मला वरच्या हॉलमध्ये हालवण्यात आले.  सगळे जण घाबरून गेले होते मला अशा अवस्थेत पाहून आणि माझ्या आई तर फार रडत होत्या मला पाहून, कारण तशी भयानक दिसत होते मी त्या अवस्थेत! मला तिथून बाहेर काढून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हालवण्यावरून फार वाद झाले सासर कडच्यामध्ये आणि माहेर कडच्यामध्ये, पण शेवटी मला ससूनमध्ये ठेवण्याचा निर्णय पक्का झाला, कारण प्रायव्हेट मध्ये पैसे जास्त घेणार होते आणि शिवाय पायपिंग करून पाणी बाहेर काढणार होते, ससून मध्ये मात्र मला गोळ्यांनी बरे केले,

रोज मला दोन गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी सुरु केल्या, स्टेरॉईड आणि इंजेकशन तर वेगळाच जीव घेत होते, आणि ऑक्सिजन आणि सलाईन वेगळेच, मी फार गळून गेले होते.  मात्र त्या 10 दिवसात जो अनुभव आला तो वैऱ्याला पण येऊ नये, कारण त्या दिवसात मला माझी माणसं कळली, कोण जवळचे आणि कोण परके सर्व दाखवलं स्वामी महाराजांनी.  माझे पाळीचे प्याड बदलण्यापासून माझी युरीन फेकण्यापर्यंतचे सगळे काम माझी सासू म्हणजेच दुसरी आई करतं होती.  शेवटी काय, ” परदु:ख शितळ असतं ” असे सर्वांना वाटतं असेल , असो.  आईने कधीच मला सून म्हणून ट्रीट नाही केले.  तिथे असणारे सर्व पेशन्ट आणि त्यांचे कुंटूब जेव्हा आम्हाला पहायचे  तेव्हा त्यांना नवलच वाटत होते, जेव्हा आई माझी तेल लावून वेणी घालायचे, मला रोज गरम गरम जेवायला आणायची, तेव्हा सर्व म्हणायचे कि काय मुलीच नशीब, आणि आई नाही तर सासरे म्हणजेच बाबादेखील माझे ताट धुवून ठेवायचे तर सर्व फक्त माझ्या कडेच पाहायचे त्या दिवसात खूप dr लोकांनी खूप भीती घातली कि हे या लहान वयात होणे चांगले नाही.  खूपच वाईट वाटले कि ‘असे कसे झाले तुमच्या सुनेचं ‘ असे टोमणे देखील ऐकायला मिळाले.  मात्र माझी आई माझ्या सोबत होती आणि बाबा देखील.  त्या दिवसात मला एक देखील जवळचे नातलग भेटायला आले नाहीत, माझा भाऊ देखील मला अर्ध्यावर सोडून गेला निघून गेला, माझा सखा बाप पण मला पाहायला आला नाही कि माझी मुलगी कशी आहे? म्हणून.  फक्त मावशीचे mr भेटायला आले.  बाकीच्यांनी तर तोंड फिरवली होती.  मुलगी जिवन्त आहे कि मेली कुणाला काहीच देणं घेणं नाही आणि मी खुळी त्या दरवाज्याकडे नजर लावून होती कि कोणी तरी येईल भेटायला, पण देवाने माणसे मात्र दाखवली. 

त्या दिवसापासून ठरवलं कि सासरकडची माणसं आपली, कारण ज्या सख्या आईने जीव सोडला तरी दुसऱ्या आईने जीव वाचवला. आज ती नसती तर मी पार खचून गेले असते.  ती रोज तुळजाभवानी मातेला प्रार्थना करायची, महाराजांना विनंती करायची कि माझ्या सुनेला घरी सुखरूप घेऊन ये, तिला पूर्ण बरे कर आणि तसेच झाले. त्यांनी माझ्यासाठी शुक्रवार धरले आणि कालभैरवाने  तिचे मागणे पूर्ण केले.  त्याला आईने साकडं घातलं होते कि सुनेला पूर्ण बरे कर आणि देवाने प्रार्थना ऐकली.  मी पूर्ण बरी झाले.  मला घरी आणण्यात  आले.  आज ही मी व्यथा मांडत आहे पण माझ्या डोळ्यातले अश्रू काही थांबायला तयार नाहीत.  तरी देखील हे सत्य मला मांडायचे होते कारण असं म्हणतात कि देव तारी त्याला कोण मारी……,

लेखिका : सुश्री प्राजक्ता संघर्ष गंभीर

प्रस्तुती – दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print