आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.त्यामुळे आपण कोण आहोत हे दुसर्यांना सांगण्याची गरज नाही, फक्त चांगले कर्म करत रहा.
वरील मजकूर मला व्हाट्सअप वर आला होता. अशा प्रकारचे सुविचार अनेक येतात. या सारख्या बऱ्याच गोष्टींबद्दल सविस्तरपणे सांगावेसे वाटते. वस्तुतः चंदनाचे झाड हे लक्षात येत नाही. गावाकडे आमच्या बागेत काही चंदनाची झाडे उगवली होती. परंतु आम्हाला ती झाडे चंदनाची आहेत हे समजलेच नव्हते. कोणीतरी आम्हाला हे झाड चंदनाचे आहे हे सांगितले तेव्हा समजले. झाडे थोडी मोठी झाल्यावर त्याचा गवगवा होऊन चोरीला जाण्याची शक्यता कोणीतरी व्यक्त केली म्हणून गावाकडच्यांनी ती विकून टाकली. घरात चंदनाचे खोड असेल तर घरात त्याचा सुगंध पसरलेला आम्ही तरी कधी अनुभवला नाही. पूर्वी पूजेसाठी चंदनाचे खोड प्रत्येकाच्या घरी असायचं. चंदनाचे खोड जेव्हा उगाळले जाते तेव्हा त्यातून सुगंध पसरतो त्यामुळे चंदनाला, कुणीतरी हे चंदन आहे हे सांगावेच लागते. आमच्या गावाकडचे घर विकल्यानंतर तेथील सामान देऊन टाकणे व विकून टाकणे ही प्रोसेस चालू असताना चंदनाचे खोड हे वेस्टेज मध्ये टाकले गेले होते. कोणीतरी हे चंदनाचे खोड आहे म्हणून उचलून आणले. हिरा सुद्धा पैलू पाडल्याशिवाय हिरा आहे हे कुणालाही समजत नाही. तसे पाहता पैलू पाडल्यानंतर सुद्धा खरा हिरा आणि खोटा हिरा हे कोणाला समजते?
हिरा ठेविता ऐरणी, वाजे मारिता जो घणी, तोचि मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. असे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले आहे. त्यामुळे अज्ञानी किंवा फारसा विचार न करणाऱ्या लोकांना एखादा चुकीचा मुद्दा सुद्धा पटवून देण्यासाठी अशा प्रकारच्या चुकीच्या मजकुरांचा किंवा चुकीच्या दृष्टांतांचा उपयोग केला जातो. लोकांना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी दृष्टांतांची परंपरा कीर्तनकारांनी फार पूर्वीपासून आपल्या समाजात रुजवली आहे. कीर्तनकाराला स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी काही दृष्टांत द्यावयाचे असतात. परंतु ते दृष्टांत किती योग्य आहेत याचा विचार केला जात नाही. फारसा विचार न करणाऱ्या लोकांसमोर अशा दृष्टांतांचा उपयोग होतो. सध्या व्हाट्सअप वर असे दृष्टांत देऊन एखादी चुकीची गोष्ट सुद्धा पटवून देण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे कोणतेही उदाहरण किंवा दृष्टांत याबाबत आपण सजग पणे आणि विचारपूर्वक पाहिले पाहिजे.
कुणीतरी गुड मॉर्निंग साठी असे काहीही सुविचार व्यावसायिकपणे तयार करून पाठवतात. ज्याला खरोखरीचा तर्क लावून तपासून पाहिले तर तो विचार योग्य आहे असे वाटत नाही. परंतु कट पेस्ट संस्कृती आणि आलेले फॉरवर्ड करा विचार करू नका. या प्रवृत्तीमुळे अनेक चुकीचे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आपला उपयोग काही लोक करून घेतात. त्यामुळे अविचाराने फॉरवर्ड करणे किंवा आला मजकूर की कट पेस्ट करणे ही सवय चांगली नाही. या गोष्टी शक्यतो टाळाव्यात जी गोष्ट विचारपूर्वक आपल्याला पटली असेल, विचारपूर्वक म्हणजे खरोखरच त्यावर विचार करून मान्य झाली असेल तरच ती पुढे पाठवावी. ही सवय स्वतःच्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न मी सुरू केला आहे. आपणही सर्वांनी अशा पद्धतीने करावे आणि दुसऱ्याचा विचार फॉरवर्ड करण्यापेक्षा जे फॉरवर्ड कराल तो तुमचा विचार असला पाहिजे. निदान तुम्हाला सर्वतोपरी विचार करून पटलेला तरी असला पाहिजे. तो मान्य असला पाहिजे. ‘फॉरवर्ड ॲज रिसिव्हड’ अशा पद्धतीने करणे टाळावे, नव्हे, करूच नये!
पहा जमते का? आपण सर्वच हे जमवूया. अर्थात आपणास विचार करायची सवय असेल तर! नसेल तर लावून घ्यायला काही हरकत आहे का? सुशिक्षित आहात ना? शिक्षित नसला तरी सुविचारी तरी आहात ना? करा करा .. प्रयत्न करा माझ्याबरोबर !
☆ सिग्नलला भेटलेली कविता !… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
तिन्ही सांजची वेळ… हवेतला उष्मा बराच नरम झाला होता. रस्ताही कधी नव्हे तो निवांत वाटत होता. ना वाहनांची फारशी वर्दळ, ना माणसांची… उन्हाच्या दिवसभराच्या तडाख्यानंतरचा हा हलकासा माहोल खरंतर दिलासा देणारा असाच होता. कधी गाडीच्या खिडकीतून बाहेर कटाक्ष टाकत, तर कधी हातातल्या कवितेच्या पुस्तकातल्या ओळींकडे पाहत माझा प्रवास चालला होता. बाहेरचा प्रवास आणि आतला प्रवास दोघंही बरोबर विरुद्ध दिशेने जात होते त्यामुळे मन काहीसं अस्वस्थ होतं. कवितेतल्या कडव्यांवरून नुसतीच नजर फिरत होती. ना अर्थ पोहोचत होता, ना लय गवसत होती.
थोडा वेळ डोळे बंद करून मी आतल्या प्रवासाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. शेजारी बसलेला नवरा मध्येच मला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. पण मला त्याच्या बोलण्यालाही नीट प्रतिसाद देता येत नव्हता. वास्तव-कल्पना यांच्यामध्ये तोल सांभाळणारा लंबक आज जरा भरकटलाच होता. कारण सारं काही यंत्रवत, रुटीनसारखं वाटत होतं. मनाला स्पर्श होणारं, भावणारं, नवं निर्मितीला चालना देणारं असं काही भवतालात घडतंय असं वाटत नव्हतं. लिहायचं तर होतं पण शब्द मध्येच कुठेतरी रुसून बसले होते. काय करावं?
पुन्हा डोळे उघडले. कवितेच्या ओळींवर नजर फिरवली आणि मनातल्या मनात घोकत पुन्हा डोळे मिटले. असाच थोडा वेळ गेला. अचानक कर्कश्श आवाज यायला लागले. म्हणून डोळे उघडून पाहिलं तर आमची गाडी सिग्नलला थांबली होती. आजूबाजूच्या वातावरणात काहीतरी बदल झाल्यासारखं वाटलं. टिश्यू पेपर विक्रेते, खेळणी विक्रेते, फळवाले, फुलवाले या साऱ्यांना जणू ग्रीन सिग्नल मिळाला होता. जणू त्यांचं थांबलेलं जग सुरू झालं होतं.
उत्सुकतेनं माझ्या औदासिन्यावर मात केली. मी आजूबाजूला पाहू लागले. इतक्यात रस्त्याच्याकडेला पण मधोमध फुलं घेऊन विकणाऱ्या एका बाईने माझं लक्ष वेधून घेतलं. कमाल सौंदर्य होतं ते… सावळा रंग, अंगावर साधी पण कसंलतरी फुलांचं डिझाईन असलेली साडी, त्याला अजिबात सूट न होणारा वेगळ्याच रंगाचा ब्लाऊज. चेहरा अगदी चंद्रासारखा गोल, विलक्षण बोलके रेखीव टपोरे डोळे, सरळ टोकदार नाक, त्याला अगदी प्रमाणबद्ध अशी जिवणी आणि मुख्य म्हणजे अत्यंत प्रसन्न, आनंदी चेहरा. रस्त्यावरतीच उभं असलेल्या एकाशी ती बोलत होती. काय बोलत होती हे माहित नाही पण बोलताना तिचा चेहरा प्रसन्न होता. तिच्या पुढ्यात असलेल्या टोपल्यातल्या फुलां इतकीच टवटवीत दिसत होती. बोलता-बोलता तिने मान खाली केली आणि टोपलीतली फुलं काढून आपल्या हातात धरली. तेव्हा तिच्या जाडजूड आणि काळ्याभोर अंबाड्याकडे माझं लक्ष गेलं. त्यावरती तिनं दोन-तीन गजरे मस्त गोलाकार फिरवून माळले होते. सावळ्या हातात अलगद धरलेल्या त्या रंगीबेरंगी फुलांकडे पाहू की तिच्या चेहऱ्याकडे असं मला प्रश्न पडला. फुलवालीला एकूणच नीटनेटकेपणाची आवड होती असं जाणवत होतं. नक्की काय जास्त सुंदर आहे? असा विचार करत तिचा फोटो टिपावा म्हणून मी माझा मोबाईल काढायला पर्स उघडली…
इतक्यात एक कोवळा आवाज आला. ‘ताई गजरा घ्या ना मोगऱ्याचा आहे पन्नासला पाच.’ नकळत मी वळून पाहिलं तर एक सात-आठ वर्षाचा मुलगा हातात गजरे घेऊन आमच्या कारच्या खिडकीशी उभा होता. मी नकळतच त्याला नाही म्हटलं. तसं त्याचा चेहरा जरा पडला. ‘निदान एक तरी घ्या’ असं तो म्हणू लागला. तेव्हा मात्र माझं त्याच्या चेहऱ्याकडे व्यवस्थित लक्ष गेलं आणि एकदम चमकायला झालं. फुल विकणाऱ्या त्या बाईचाच तो मुलगा होता हे त्याचा तोंडावळा सांगत होता. त्याचे साधे कपडे, पण नीटनेटकेपणा, चेहऱ्यावरचे शांत भाव, विलक्षण बोलके डोळे… हे सगळं अतिशय सात्विक, निरागस होतं.
‘घ्या ना ताई एक तरी’ तो पुन्हा म्हणाला. यावेळी त्याच्या डोळ्यात आर्जव दिसलं… ज्या प्रकारे त्यानं गजऱ्यांना हातात जपून धरलं होतं त्यात निरागसता आणि त्या फुलांविषयीची त्याची आपुलकी दिसली. माझ्या मनात आता द्वंद्व सुरू झालं घ्यावं की?? नं घ्यावं?? शेजारी बसलेल्या नवऱ्याने ते अचूक ओळखलं. “अगं घे एखादा तरी, तो एवढं म्हणतोय तर…” तो असं म्हणता क्षणी त्या मुलाचा चेहरा क्षणात आनंदाने चमकला. आणि ते पाहून काय झालं ते मला कळलं नाही मी पटकन म्हटलं, “एक नको मला पन्नासचेच दे!” हे म्हणताच क्षणी तर त्याचा चेहरा आनंदाने फुलून आला होता. मग मी त्याला विचारलं, ‘सुट्टे पैसे आहेत का रे बाळा?’ तेव्हा त्यांनं निराशेनं नाही अशी मान डोलावली. मी म्हणलं, “हरकत नाही थांब! माझ्याकडे असतील मी शोधते.” आता त्याला परत नाराज करणं हे मलाच बरोबर वाटत नव्हतं. मग आम्ही दोघेही आपापल्याकडच्या पैशांमध्ये सुट्टे पैसे शोधू लागलो. नवरा म्हणाला, “सिग्नल संपत आलाय लवकर आटप… ” तो मुलगाही थोडासा बैचेन झाल्यासारखा वाटला. घाई गडबडीत हाताला लागतील ती तीन-चार नाणी गोळा केली आणि त्याच्या हातात पटकन सोपवली. “किती झाले रे?” अंधार पडत असल्यामुळे मला पटकन लक्षात आलं नाही. तो म्हणाला, “पस्तीस रुपये झालेत ताई, अजून पंधरा हवेत.” गडबडीने मग दोघांनी मिळून उरलेले पंधरा रुपये कसेबसे त्याच्या हातात दिले. तोवर सिग्नल सुटला होता.
गाड्या हळूहळू हॉर्न वाजवत आमच्या पुढून जायला लागल्या होत्या. ‘सांभाळून जा रे बाळा’ असं मी मागं वळून त्याला म्हणत होते. तेव्हा त्याचा फुललेला, आनंदी झालेला चेहरा मला खूप समाधान देऊन गेला. मला वाटलं आता हे पैसे जेव्हा तो त्याच्या आईला देईल तेव्हा तिचा आधीच प्रसन्न आणि आनंदी असलेला चेहरा आणखीन आनंदाने फुलून येईल. मग दोन चालती बोलती सुगंधी झाडं आनंदाने डवरलेली मला डोळ्यांपुढं दिसू लागली. मघाचची उदासीनता कुठल्या कुठे पळून गेली. सहज वर आकाशात बघितलं तर तिथेही बिनवासाची पण चमचमणारी फुलं हळूहळू उमलत होती. एकदा त्यांच्याकडे पहात आणि एकदा हातातल्या गजऱ्यांचा वास घेत माझा पुढचा प्रवास सुरू झाला. आता कवितेच्या पुस्तकात डोकावण्याची गरज नव्हती कारण सिग्नललाच मला एक जिवंत कविता भेटली होती.
खरंच काही साध्या घटना किती निरागस आनंद सहजपणे देऊन जातात ना!
अगदी लहानपणापासून कानावर पडत गेलाय हरीपाठ. आजी रोज रात्री झोपताना हरीपाठ म्हणायची. त्यामुळे ‘हरीमुखे म्हणा.. हरीमुखे म्हणा.. ‘हे शब्द ओळखीचे झाले होते.
काही वर्षांनी बाबामहाराज सातारकरांच्या कैसेटस् आल्या. हरीपाठाच्या. खुपच सुश्राव्य होत्या. टाळ, म्रुदुंगाच्या तालावर म्हटलेला हरीपाठ आता गुणगुणु लागलो.
काही काळाने अगदी अथपासून इतिपर्यंत हरीपाठ वाचायची सवय लागली आणि मग तो एक नित्यनेमच होऊन गेला.
तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरकालीन मराठी म्हणजे प्राकृत मराठी. सगळीच आपल्याला समजते असं नाही. हरीपाठामधल्या सगळ्याच पदांचा अर्थ समजतो असं नाही. काहींचा आशय समजतो. त्यात मुख्यतः हरीनामाचा महिमा वर्णन केला आहे. हरीचे.. नारायणाचे.. म्हणजेच विष्णुचे नामस्मरण सतत करत रहा हेच हरीपाठात सांगितले आहे.
विष्णुविणे जप.. व्यर्थ त्याचे ज्ञान
रामकृष्णी मन नाही ज्याचे.
असं सांगुन माऊली म्हणतात..
हरी उच्चारणी अनंत पापराशी
जातील लयासी क्षणमात्रे
अशी खुप साधी सोपी पदे आहेत. समजायला सोपी.. हरीनामाचा महिमा सांगणारी..
एक तत्व नाम द्रुढ धरी मना
हरीसी करुणा येईल तुझी
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद
वाचेसी सद्गद जपे आधी
यात ज्ञानेश्वर महाराज नामाचा महिमा सांगतान अजून एक मोलाचा संदेश देतात.
सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी
रिकामा अर्धघडी राहु नको
हे खुप महत्वाचं आहे. ‘रिकामं बसु नको. सतत काहीतरी करत रहा.’
(whatsapp, facebook बघणं म्हणजे सुध्दा एका अर्थी रिकामं बसणंच ना!)
ज्ञानेश्वर महाराजांच्या हरीपाठात अवीट गोडवा आहेच. पण एकनाथ महाराज आपल्या हरीपाठात म्हणतात.. —
किती सुंदर संदेश दिला आहे. या संतांचे सांगणे एकच आहे.. देवाचा जप करा.. ध्यान करा.. हात जोडुन आग क्षणभर का होईना देवासमोर उभे रहा. ते रुप डोळ्यात साठवा. त्यातुन तुम्हाला खुप काही मिळेल.
पुण्यात तुळशीबागेत रामाचे मंदिर आहे. खुप सुंदर मुर्ती आहे रामाची. गोड भाव आहेत चेहर्यावर. दर्शन घेऊन झाल्यावर प्रदक्षिणा घालत होतो. तर या प्रदक्षिणा मार्गावर अगदी अरुंद बोळात एक ओटा आहे. मंदिराचाच एक भाग असलेला. अगदी गुळगुळीत झालेला जेमतेम दोन तीन जण बसु शकतील एवढा. दर्शन झाल्यावर अगदी थोडावेळ का होईना.. देवाच्या दारी बसावं असं म्हणतात. आणि तसं बसण्यासाठी म्हणुन ही जागा. खास बनवलेली.
☆ ‘साबुदाण्याची उसळ—’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
‘नववधू प्रिया मी बावरते’ असे होते ते दिवस. “उगवत्या चंद्राला लागली रजनीची चाहूल…. माजगावकरांची कन्या गोपीनाथ रावांच्या संसारात ठेवते पाऊल. .” असा काहीसा कुणीतरी शिकवलेला घोटून घोटून पाठ केलेला उखाणा अडखळत धडधडत मी घेतला खरा पण डोळ्यासमोर काजवे चमकत होते. कसं असेल बाई हे सासरच गाव ? आपण अस्सल पुणेरी आणि सासर अस्सल खान्देशी.. त्यातून भुसावळ कधी पाह्यलेलं पण नाही. शाळेत भूगोलाच्या पुस्तकात डोकं खुपसतांना नकाशात ठिपका बघितला होता. बस एवढीच काय ती त्या गावाची ओळख. आणि आता तर सगळं आयुष्यच काढायचय तिथे. मनात भीती, हुरहूर सगळ्या भावनांचं मिश्रण होतं. त्यातून . महाराष्ट्र एस्प्रेसचा बारा तासांचा प्रवास. दुसऱ्या गाडीने गेलं तर मनमाडला गाडी बदलावी लागायची . मनमाड स्टेशन हें sssभलं मोठ्ठ, आणि तें बघून मॅडच व्हायची वेळ यायची. तर अशा ह्या भुसावळ गावांत माझा गृहप्रवेश झाला. खान्देशी आमटी जिभेला चव आणायची, तर ठेचा आणि भरीत मेंदूला झटका देऊन डोळ्यात पाणी आणायचं. पण माझी खरी त्रेधा तिरपीट उडाली ती खान्देशी भाषेशी हात मिळवणी करतांना.
एकदा काय झालं, बस स्टॉपवर उभी होते .एका आजी बाईंना विचारलं,” बस गेली का हो आजी?” खडया आंवाजात उत्तर आलं , ” बस कवांच चालली गेली. सरळ जाऊन फाकली बी असलं ., ” अरे बाप रे ! फाकली काय, चालली गेली काय, माझ्या मेंदूला काही अर्थ बोधच होईना. काय करावं ? हे गावात वाट बघत असतील. मी भांबावून उभीच . तोवर आजींचा दणदणीत आवाज कानावर पडला , “आता काय करून राह्यली तू ? तरणीताठी पोरगी हायेस. जा कीं झपाझपा चालत. नायतर घरी जाऊन दादल्या संगट ये सायकल वरन डब्ब् ल शीट. ” काय सांगू त्यांना,दादला घरी नाही तर गावात वाट बघतोय म्हणून . मख्ख उभी राहयले. आता कुठला नविन गोंधळात टाकणारा शब्द कानावर पडणार ह्या भीतीने गप्प बसले. बाईं गं ! धसकाच घेतला होता मी त्या आजींच्या शब्दांचा. अहो काय सांगु तुम्हाला ? दुसरी फजिती माझी घरीच झाली की हो !. त्याचं असं झालं सासूबाईंचा उपास होता. आपली पाककृती दाखवून त्यांना खुश करावं म्हणून मी विचारलं . “आई काय करू उपवासाच ? कुणाशी तरी बोलताना त्यांनी उत्तर दिलं. “कर की साबुदाण्याची उसळ”.. मी उडालेच. बाप रे! साबुदाण्याची उसळ ? आणि आता हा कुठला नवीन पदार्थ ?
माहेरी लाडोबा आणि त्यातून शेंडेफळ . मोठ्यां तिघी बहिणी,आई ,आत्या, काकु अशा गृहकृत्यदक्ष अन्नपूर्णा होत्याच की घरात.त्यामुळे वहिनीवर पण सून असून जबाबदारी नव्हती. मग माझी काय कथा ! त्यातून माझी नोकरी. स्वयंपाक घराशी सबंध खाण्यापुरताच . जरा इकडे तिकडे केल., कधीतरी वरणाला मोहरी जाळून सणसणित फोडणी दिली, तरी वडील कौतुक करायचे. अशा सुगरणीला सासूबाईनी साबुदाण्याची उसळ करायला सांगितली… दिवसा तारे चमकले डोळ्यासमोर. सासूबाई वयानी माझ्यापेक्षा बऱ्याच मोठया. मला संकोच आणि भीती वाटायची त्यांची. त्यातून त्या चार बायकात बसलेल्या . साबुदाण्याची उसळ कशी करायची ? हें त्यांना विचारू कसं बाई ? अज्ञानाला आमंत्रणच कीं हो ! मनात नुसता गोंधळ चालला होता. साबुदाणा भिजेल पण ==पण त्याला मोड कसे आणायचे ? हे दिवे आईपुढे पाजळावे.तर फोनची सोय पण नव्हती तेव्हा. तरी आई लग्नाआधी कानी कपाळी ओरडायची, स्वयंपाकाची सवंय ठेव म्हणून. आता काय करायच ? बसा आता रडत. घड्याळ तर पुढे सरकत होतं. जरा वेळाने सासरे व सासूबाई फराळाला आत येतील. साबुदाणा तर केव्हाच भिजवलाय., डोकं लढवून. पण???त्याची उसळ???फराळाच्या ताटलीत सासऱ्यां पुढे काय ठेऊ? दरदरून घाम फुटला मला. आणि मग एकदम, शेजीबाई आठवली. मागच्या दाराने तिच्याकडेपळत गेले. ‘ ‘उसळीच ‘ अज्ञान तिच्या पुढे उघडं केल. तीने पण एवढंही येत नाही कां हीला? अशा नजरेने बघून कृती सांगितली. आणि मग एकदम ट्यूब पेटली. ‘अय्या !अगंबाई! हीं तर साबुदाण्याची खिचडी ..ही तर येते कीं मला.सोप्पी तर आहे . उगीचच घोळ घातला बाई इतका वेळ .आणि अहो मग काय!खिचडी जमली कीं हो मला ! सासुबाई आणि सासरे एकदम खुश झाले,खिचडी खाऊन. पण एक मात्र झालं हं! आपल्याकडच्या साबुदाण्याच्या खिचडी ला तिकडे ‘ साबुदाण्याची उसळ ‘ म्हणतात ह्या नविन शब्दाची ज्ञानात भर पडली.आणि तेव्हाच साबुदाण्याची उसळ पदार्थाचा शोध मला लागला. अशी खानदेशी भाषेशी फुगडी खेळता खेळता भुसावळ वास्तव्यातला बहिणाबाईंच्या भाषेतला ‘अरे संसार संसार ‘ पार पाडला. आणि बरं कां मंडळी!अजूनही बरेच किस्से आहेत बरं का ! पण आपली फजिती एकाचं वेळी सगळी सांगणं बरं नव्हे ! नाही का ? सांगेन हं,पुढच्या वेळी,पुन्हा कधी तरी , केव्हा तरी…
श्री. विनायक दामोदर सावरकर , आज आपल्या पश्चात जवळपास साडेपाच दशकांचा कालावधी उलटून गेला, पण आपण स्वातंत्र्यवीर की माफी वीर, हा वाद काही मिटता मिटत नाही. परवाच रणदीप हुडाने तयार केलेला आपल्या जीवनी वर आधारीत नवनिर्मित सिनेमा पाहिला आणि माझ्या मनात या द्वंद्वाने पुन्हा उचल खाल्ली. तुमच्या विषयींचे मनोगत, हे तुम्हाला सांगणेच योग्य म्हणून हा प्रपंच…..
प्रथमदर्शनी तर हेच दिसते आहे की चूक नव्हे प्रचंड मोठा अपराध हा तुमच्याकडूनच झाला आहे. संपूर्ण आयुष्यात तुम्ही लहानमोठ्या इतक्या चूका केलेल्या लक्षात येते की त्यामुळेच तुमच्या कार्यकर्तृत्वाची ही जी काही आजही उपेक्षा सुरू आहे, हे योग्यच आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. मी जरा जास्त स्पष्टपणे माझे मत मांडतो आहे, कृपया राग मानू नये. काय करणार… तुमचाच स्पष्टवक्तेपणा कणभर का होईना झिरपला आहे… अर्थात हा दोषही तुमचाच.असो.
खरं पाहता छान शिष्यवृत्ती मिळालेली, त्या काळात विलायतेत राहून अभ्यास पूर्ण करून , बॅरिस्टरची पदवी पदरात पाडून, तिथेच सेटल व्हायचे , अथवा भारतात परतून तत्कालीन इतर बॅरिस्टर मंडळींप्रमाणे छान प्रॅक्टीस करत गडगंज पैसा कमवत ऐषोआरामाचे जीवन जगत केवळ एक छंद, टाईमपास म्हणून सवडी नुसार राजकारण करायचं, ही पद-पैसा-प्रतिष्ठा मिळवून देणारी त्रिसूत्री अवलंबायची सोडून नको ते डोहाळे तुम्ही स्वताचे पुरवत बसलात. यात सर्वस्वी दोष तुमचाच आहे, हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. नेहरू, गांधी, जिन्ना यांची जीवनशैली, यशस्वीता , प्रसिद्धी पाहून सुद्धा तुम्हाला कधी आपला मार्ग तसूभरही बदलावा वाटला नाही हे एक महद् आश्चर्यच !!!!
अहो, तुम्ही शिक्षणासाठी विलायतेला गेलात आणि शिक्षणासोबत नको नको त्या गोष्टी करत राहिलात.स्वत: तर भरकटलातच पण सोबतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासा पासून विचलीत करण्यात यशस्वी झालात. काय गरज होती १८५७ चे स्वातंत्र्य समर , सहा सोनेरी पाने अशी पुस्तके लिहिण्याची ? तुम्ही अभ्यास करत होता वकिलीचा आणि इकडे इतिहास संशोधन व दुरुस्ती. काय साधलं त्यातून ?? म्हणे दृष्टीकोन बदलायचा आहे. तुम्ही काय मानसशास्त्रज्ञ झाला होता ? अहो, जिथे गीता-ज्ञानेश्वरी वाचून काही फरक पडला नाही, राजा हरिश्चंद्र, श्रीराम, श्रीकृष्ण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज प्रभृतींनी आपल्या जीवाचं रान केलं तरी ज्यांचा दृष्टीकोन बदलला नाही , असे आम्ही दगड , आणि तुम्ही अशा दगडांना घडवायला निघालात !!!!
१८५७ साली जे काही झालं , त्याला शिपायांचे बंड म्हणा किंवा भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले गेलेले सशस्त्र युद्ध म्हणा , त्याने काय मोठा फरक पडणार आहे ? सर्वसामान्य जनता तेव्हाही उदासीन होती व आजही उदासीनच आहे. कारण त्यातून भाकरी मिळत नाही तात्या. पोटाची भूक नाही भागत. राजकीय स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी जुन्या पिढीतली मंडळी अजूनही इंग्रजी राज्य होतं तेच बरं होतं अशी हळहळ व्यक्त करताना दिसतात. काय आहे ना , की आम्हाला तुमच्या सारखे स्वताच्या सुखी संसाराला स्वताच्या हाताने चूड लावणे नाही पटत. तुमच्या हट्टापायी, देशप्रेमापायी तुम्हा दोघा भावांना काळा पाण्याची शिक्षा झाली, संपूर्ण घराची अन्नान्न दशा झाली. तुमच्या वंशाच्या अस्तित्वावरच संकट आले…. क्षमा करा पण हा पूर्णपणे अव्यवहारी वेडाचार आहे. अहो, शिवाजी जन्माला यावा , त्याने रामराज्य निर्माण करावं , हे सगळे आदर्श वाचायला बोलायला ठीक आहेत.
…. पण हे सगळं शेजारच्या घरात, आम्ही त्याचे फायदे घेण्यात , सुखात भागीदार होण्यात नक्कीच धन्यता मानू , पण आम्हाला काही त्रास होता कामा नये, असेच धोरण असायला नको का ? जेणेकरुन आमच्या जीवनाची शांती, सुरक्षितता, आमची लाईफस्टाईल कुठेही बाधीत होणार नाही, आणि याची काळजी मलाच कुटुंब प्रमुख म्हणून घ्यायला हवी , ” माझे कुटुंब, माझी जबाबदारी “
आपण मात्र प्रत्येक क्षणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वताच्या व सावरकर कुटुंबाच्या , तसेच तुम्हाला मानणाऱ्या इतर तरुण क्रांतिकारकांच्या आयुष्याचा होम करत होतात. तुम्ही एवढे भारावले होता की, ज्यांच्या साठी एवढा आटापिटा तुम्ही आयुष्यभर चालवला होता, त्यांना ते हवे आहे का ? याचा किंचितही विचार करण्याची तुम्हाला गरज सुद्धा वाटली नाही….
चिखलात लोळणाऱ्या आम्हा डुकरांना, उकिरड्यातच स्वर्ग उपभोगणाऱ्या गाढवांना तुम्ही आलिशान महालात नेवू पाहण्याचा हा तुमचा अट्टाहासच आजच्या तुमच्या या अवस्थेला जबाबदार आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.
लक्षात घ्या, छत्रपतींना स्वराज्य स्थापनेपासूनच सर्वात जास्त संघर्ष वा विरोध कुणाचा सहन करावा लागला ?? सो कॉल्ड, खानदानी मराठ्यांचा, त्यांच्याच जातभाईंचा .
क्रांतिकारकांच्या लपण्याच्या जागांची माहिती इंग्रज अधिकाऱ्यांना कोण पुरवत होते, भारतीयच ना….
तुम्ही तुरूंगवासातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या स्वागताला किती जण होते, हे जनतेने तेव्हाच तुम्हाला दाखवून दिले होते. तुमच्या त्यागाची, भावनांची , संघर्षाची , कष्टाची किंमत त्यांना किती आहे ते. तुमचे विचार म्हणजे वाघिणीचे दूध, ते वाघाचा बछडाच पचवू शकतो. आमच्या सारख्या मेंढरांचे ते कामच नाही. तेव्हा ही ते शक्य नव्हते व आजही नाहीच.
अजून एक सांगायचं राहून गेलं. आजकालचा फण्डा आहे, ” जो दिखता है , वही बिकता है ” पण अशी आपली दिखावा करण्याची मानसिकताच नाही, मग समाजमान्यता तुम्हाला मिळणार तरी कशी ?? तुम्ही अंदमानात सहन केलेल्या यमयातनांची, अमानवीय छळाची मार्केटिंग करावी असा तुमचा पिंडच नसल्याने तिथला तुमचा जाच , शारीरिक पिडा , उपासमार, बौद्धिक, भावनिक कोंडमारा यापेक्षा आम्हाला सूत कताई सोबत केलेल्या प्रतिकात्मक उपोषणाचे महत्त्व जास्त वाटलं तर यात आमचा दोष कसा काय असू शकतो ??
वर्गात जो विद्यार्थी प्रत्येक वेळी पहिला असतो, शिवाय खेळात , नाटकात ….तो इतर विद्यार्थ्यांच्या रोषालाच पात्र ठरतो. कारण तो सर्व शिक्षकांचा आवडता असतो. प्रत्येक शिक्षक त्याचच कौतुक करत असतात, त्याचच उदाहरण सर्वांना आदर्श म्हणून घालून देत असतात. आपण भारतमातेचे लाडके सुपुत्र आहात , तिच्या गळ्यातील रत्नहार आहात, पण आपलं अनेकांगी व्यक्तिमत्त्व, आपली नैतिक, वैचारिक, बौद्धिक उंची आमच्या कल्पनेच्याही खूप खूप पलिकडची. तुमची बरोबरी आम्ही नाही करू शकत. मग निर्माण होणाऱ्या द्वेषाचे, असूयेचे काय करायचे ? तुमच्या छोट्या बंधूंना १९४८ साली दगडांनी ठेचून ठेचून मारण्याच्या महापराक्रमाने आम्ही हे दाखवून दिलेलेच आहे.
शेवटचं पुन्हा सांगतो, तात्याराव सर्व आयुष्य भर तुम्ही या देश, धर्म अन् समाजा करता केलेले सर्वस्व समर्पण. तुमची ओजस्विता , तेजस्विता , सर्व सर्व काही आमच्या दृष्टीने मातीमोल . आकाशातील सुर्य आकाशीच शोभून दिसतो. आम्ही तुम्हाला आमच्या रंगाने नाही रंगवू शकत… तुमचं तेजही नाही सहन करू शकत. म्हणूनच तुमच्या वर थुंकण्याचा आमच्या लायकी प्रमाणे आम्ही प्रयत्न करत राहणार. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडच राहणार , आमची ही अगतिकता तुम्हीच समजून घ्याल अशी अपेक्षा करून आता आपला निरोप घेतो.
☆ कुकर आणि गॅसवरचा पाडवा !☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
“अहो ऐकलंत का जरा !”
“अगं लग्न झाल्यापासून तुझ्या शिवाय कुठल्या बाईच ऐकलंय का मी ?”
“आता मला कसं कळणार, ऑफिसमध्ये कोणा कोणाचं ऐकता ते ?”
“बरं, बरं, कळतात हो मला टोमणे ! ते जाऊ दे, सकाळी सकाळी मला सणा सुदिला वाद नकोय ! बोल काय म्हणत होतीस तू ?”
“अहो आपण किनई या पाडव्याला स्वर्गात जाऊ या !”
“काय s s s s ?”
“अहो केवढ्या मोठ्याने ओरडताय ? शेजारी पाजारी बघायला येतील, काय झालं म्हणून !”
“अगं मग तू बोललीसच तशी ! दसऱ्याला जसं सिमो्लंघन करतात तसं पाडव्याला काय स्वर्गारोहण करतात की काय ?”
“अहो नीट ऐकून तर घ्याल किनई, का लगेच सुतांवरून स्वर्ग गाठाल ?”
“अगं मी कुठे स्वर्ग गाठायला चाललोय ? तूच म्हणालीस नां, की आपण या पाडव्याला स्वर्गात जाऊ या म्हणून ?”
“अहो हा स्वर्ग म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची शो रूम !”
“अगं मग असं सविस्तर सांग नां, मला कसं माहित असणार तुझ्या डोक्यात कुठला स्वर्ग आहे ते ? पण तिथून तुला काय घ्यायच आहे ते नाही बोललीस.”
“अहो आता मला प्रत्येक पाडव्याला नवीन साडी वगैरे नकोय. अजून पाच सहा कोऱ्या साडया तशाच पडल्येत !”
“पण त्या साडया काय तुला ‘इधर का माल उधर !’ करण्यात कधीतरी कामाला येतीलच नां ?”
“म्हणजे ?”
“अगं म्हणजे एखादी मिळालेली साडी आवडली नाही, तर तोंड दाबून बुक्क्याचा मार खाल्ल्यागत तुम्ही बायका ती ठेवून घेताच की नाही ?”
“मग तोंडावर कसं बरं सांगणार आवडली नाही म्हणून ? ते बरं दिसत का ?”
“हो ना, मग तीच साडी कधी ना कधी तरी दुसऱ्या बाईला देता नां, त्यालाच मी ‘इधर का माल….’
“कळलं, कळलं ! आम्हां बायकांचं ते ट्रेड सिक्रेट आहे !”
“यात कसलं आलंय सिक्रेट, ओपन सिक्रेट म्हणं हवं तर ! बरं ते जाऊ दे, तुला त्या स्वर्गाच्या शो रूममधे कशाला जायचय ते नाही कळलं.”
“मला ‘ठुशी’ घ्यायची आहे ! सासूबाईंनी त्यांची खरी ‘ठुशी’ मोठ्या जाऊबाईंना दिली, तेंव्हा पासून माझ्या डोक्यात निदान एक ग्रॅमची ‘ठुशी’ घ्यायच फारच मनांत आहे.”
“अगं पण तुला आईनं, वहिनीला दिलेल्या ठुशीच्या बदल्यात तिचा ‘घपला हार’ दिला ना, मग?”
“अहो त्याला ‘घपला हार’ नाही ‘चपला हार’ म्हणतात!”
“तेच ते, अगं पण मी काय म्हणतो आपण तुला एक ग्रॅमची खोटी खोटी ‘ठुशी’ कशाला घ्यायची ? आपण त्यापेक्षा वा. ह. पे. कडून किंवा पु. ना. गा. कडून खरी सोन्याची ‘ठुशी’ घेऊ या की ?”
“नको गं बाई, हल्ली खरे दागिने घालायची सोय कुठे राहील्ये ? सगळ्या बायकांचे सगळे खरे दागिने लॉकरची शोभा वाढवताहेत झालं.”
“मग माझ्या डोक्यात एक नाही दोन वस्तू आहेत, ज्या नुकत्याच बाजारात नव्याने आल्येत. त्या नवीन आणि इनोव्हेटिव्ह असल्यामुळे खूप म्हणजे खूपच महाग आहेत, त्या घेऊ या का ?”
“अगं बाई, त्या आणि कुठल्या ?”
“प्रेशर कुकर आणि…..”
“काय s s s ?”
“अगं किती जोरात ओरडलीस ? शेजारी पाजारी बघायला येतील ना ?”
“अहो तुम्ही बोललातच तसं ! प्रेशर कुकर काय बाजारात नवीन आलेली वस्तू आहे ? गेली कित्येक वर्ष मी वेग वेगळे कुकर वापरत्ये.”
“अगं खरंच सांगतो, हा प्रेशर कुकर बोलणारा आहे, जो नुकताच नवीन आलाय बाजारात!”
“काय सांगताय काय ?”
“अगं खरं तेच सांगतोय, या कुकर मधे ना शिट्याच होत नाहीत !”
“मग कळणार कसं कुकर झाला आहे का नाही ते ?”
“अगं जरा नीट ऐक. मी तुला म्हटलं ना, की हा बोलणारा कुकर आहे म्हणून, मग त्याच्यात शिट्या कशा होतील ? तुला किती शिट्या हव्येत त्यावर तो सेट करायचा आणि गॅस चालू करायचा !”
“बरं, मग ?”
“मग त्यातून थोडया थोडया वेळाने one, two, three असे आवाज येतील, त्यावरून तुला कळेल की कुकरच्या किती शिट्या झाल्येत त्या.”
“अस्स होय ! मग बरंच आहे, सिरीयल बघायच्या नादात मला मेलीला कळतच नाही किती शिट्या झाल्येत त्या ! चालेल मला, आपण तो बोलणारा कुकर घेऊयाच. ते ठुशी बिशीच जाऊ दे, पुन्हा कधी तरी बघू !”
“Ok, मग उद्याच जाऊन बोलणारा कुकर घेऊन येवू, काय ?”
“हो चालेल, पण तुम्ही दुसरी वस्तू पण म्हणाला होतात, ती कुठली ?”
“आहे, म्हणजे तुझ्या लक्षात आहे मी दोन वस्तू म्हटल्याचे.”
“म्हणजे काय? आम्हां बायकांची मेमरी तशी पुरुषांपेक्षा बरी असते असं म्हणतात!”
“असं कोण म्हणत ?”
“आम्ही बायकाच!”
“अगदी बरोबर, पण ती फक्त तुम्हाला हव्या असलेल्या खरेदीच्या बाबतीतच बरं का ! बाकी सगळा उजेडच म्हणायचा.”
“कळलं, कळलं ! मला पण तुम्ही म्हणालात तसा सणा सुदीला वाद नकोय, ती दुसरी वस्तू काय आहे ना, ती बोला चटचट, मला अजून बरीच कामं पडल्येत !”
“अगं त्या दुसऱ्या नवीन वस्तूच तू नांव ऐकलंस ना, तर नाचायलाच लागशील बघ !”
“नाच करायचा कां आनंदाने गायचं ते नंतर बघू, पटकन त्याच नांव….”
“रिमोट कंट्रोलची गॅस शेगडी !”
“का s s य ?”
“अगं आपल्या टीव्हीला कसा रिमोट कंट्रोल असतो ना, तसाच या गॅसच्या शेगडीला पण असतो. बसल्या जागेवरून तू गॅस चालू किंवा बंद करू शकतेस. बोल कशा काय आहेत या दोन नवीन वस्तू !”
“झ ss का ss स ss ! आता सिरीयल सोडून मधेच उठायला नको गॅस बंद करायला !”
एवढं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी…. खरी सोन्याची ठुशी परवडली असती, पण या दोन नवीन, त्याहून महागडया वस्तू घ्यायचे कबूल करून, स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून नाही ना घेतला, या विचारात पाडव्याला आडवा पडलो !
☆ उत्पादन, निगा आणि मशागत — ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
(Manufacturing, maintenance and cultivation)
माधव – पाचवीतला एक सत्शील मुलगा. हल्लीच्या मुलांत आढळतो तसा आक्रस्ताळेपणा क्वचितच त्याच्यात दिसे. माझी बायको आणि मी – आम्ही दोघेही त्याच्या आईवडिलांचे याबद्दल नेहमीच कौतुक करत असतो. आणि ते दोघेही नेहमीच त्यांच्या गुरूंच्या तसबिरीकडे बोट दाखवत “महाराजांची कृपा” म्हणत नम्रपणे ते कौतुक स्वीकारत असत.
“यात महाराजांच्या manufacturing चं कौतुक आहे, आमचं काही त्यात श्रेय नाही,” अशी त्यांची यावर नेहमीची टिप्पणी असे.
माधवचे आईवडील नव्या पिढीतले. तो इंजिनिअर, स्वतंत्र व्यवसाय, आणि व्यवसायानिमित्त अनेकदा फिरतीवर. तीसुद्धा इंजिनिअर – संगणक क्षेत्रातली. जरी work from home करत असली, तरी कधी जपान – हाँगकाँगचे clients, तर कधी युरोप अमेरिकेचे clients, त्यामुळे तिचा दिवस कधी अगदी पहाटे सुरू व्हायचा तर कधी अगदी मध्यरात्रीपर्यंत चालायचा.
त्रिकोणी कुटुंब छान बहरत होतं.
एकदा माझ्या बायकोनं माधवला डझनभर “किंडरजॉय” चॉकलेटं आणून दिली. आणि त्याच्या आईला सांगून ठेवलं, “लेकाला सांगू नकोस हो. उगाच एकदम बकाबका खाऊन टाकायचा.”
त्यावर माधवची आई हसली आणि म्हणाली, “नाही, आमच्याकडे तो प्रॉब्लेम नाही. त्याच्यासमोर सगळी चॉकलेटं ठेवली, तरी तो एखाददुसरंच खाईल. त्याला नाही सांगावं लागत.”
काहीच न बोलता, मी नुसतं सहेतुकपणे तिच्याकडे पाहिलं, तिनंही नेहमीप्रमाणे महाराजांच्या कृपेला याचं श्रेय दिलं.
“फक्त तेवढंच नाहीये,” मी यावेळी प्रश्न धसाला लावायचं ठरवलं होतं. “एखाद्या गोष्टीचं उत्पादन manufacturing अतिशय छान असलं, तरी त्याची नीट निगा maintenance राखणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. मग ती मर्सिडीज गाडी असो किंवा मुलं…. लहान असताना छान असलेली मुलं आईवडिलांच्या अती लाडांनी बिघडलेलीही पाहिली आहेत, किंवा करिअरच्या नादापायी मुलांकडे झालेल्या दुर्लक्षाने ती वाया गेलेलीही पाहिली आहेत…. आणि तुमच्या बाबतीत तुम्ही नुसती त्याची निगा राखत नाहीत, तर त्याच्या चांगल्या गुणांची मशागतही cultivation करत आहात. त्याच्या चांगल्या गुणांची जोपासनाही करत आहात.”
आणि हे खरंच होतं…
माधवचे आईबाबा त्याचे लाडही करायचे, पण त्याला लाडावून ठेवायचे नाहीत. ते कामात गर्क असतील आणि तो काही विचारत असेल, तर त्याला तसं समजावून सांगायचे, नंतर वेळ देऊ म्हणायचे. पण त्याचबरोबर माधवचं खरंच काही – तेवढंच महत्त्वाचं आणि तातडीचं काम असेल तर हातातलं काम बाजूला ठेवून त्याला मदतही करायचे.
मुख्य म्हणजे ते त्याच्याशी संवाद साधायचे, या वयात असतात तशा त्याच्या निरनिराळ्या शंकाकुशंकांचं – अगदी राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत आणि शाळेतील इयत्ता पाचवीतील partiality पर्यंतच्या सर्व अगत्याच्या विषयांचे – ते मनापासून – न कंटाळता – न वैतागता – न चिडचिड करता निरसन करायचे.
“तू गप्प बस, तुला काय करायचाय नसता चोंबडेपणा ?” किंवा “तू अजून लहान आहेस, मग मोठा झाल्यावर सांगू.” अशी उत्तरं द्यायचे नाहीत.
आज दुपारी जेवताना असंच झालं. मी कॉलेजला होम सायन्सला शिकवतो म्हणजे नक्की काय करतो असा माधवला प्रश्न पडला होता. मग होम सायन्स म्हणजे “घर कसं चालवायचं त्याचं सायन्स” अशी मी काहीशी बाळबोध व्याख्या केली, त्यावर “म्हणजे फक्त होम कसं चालवायचं ते शिकायला एवढा मोठ्ठा तीन वर्षांचा अभ्यासक्रम ?” असा माधवचा पटकन् प्रश्न आला.
त्याचं वाक्य पूर्ण होतंय की नाही त्याच्याआत, त्याच्या बाबांनी “थांब, थांब. फक्त होम कसं चालवायचं असं म्हणून अपमान करू नकोस.” असं म्हणत त्याला होम सायन्सचे कंगोरे समजावून दिले, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ‘घर चालवणं किती श्रेष्ठ आणि तेवढंच किचकट काम आहे’ हे माधवला समजावलं.
त्याच्या आईनेही “बघ, मी किंवा आजी आजोबा घरी काम करताना कधी कधी चुका करतो, मग त्या चुकांतून आम्ही शिकत जातो. असं चुका करून शिकण्यापेक्षा त्याचा readymade तयार अभ्यासक्रम असेल तर किती छान ना ? म्हणजे आज्जी lifetime मध्ये जे शिकली ते इथं तीनच वर्षांत शिकता येईल,” असं सांगत, आणखी काही उदाहरणं देत होम सायन्सबद्दल माधवला माहिती दिली.
त्यांना इतक्या उत्स्फूर्तपणे त्याला माहिती देताना पाहून मी आणि माझ्या बायकोने एकमेकांकडे पाहिलं.
महाराजांच्या कृपेची निगा आणि मशागत छान सुरू होती.
… आणि आम्हासकट सगळ्यांसाठीच तो एक आदर्श वस्तुपाठ होता.
(सत्य घटना — आणि आज माधवच्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवसही आहे, हा एक सुंदर योगायोग.)
लहानपणीची गोष्ट.घरच्यांसोबत दर गुरुवारी दत्ताच्या देवळात जाणं व्हायचं.मंदिराच्या बाहेर प्रशस्त फुटपाथ होता.त्या फुटपाथवर एक दत्ताचं चित्र काढलेलं असायचं. रंगीत खडुंनी रंगवलेल्या त्या चित्रावर असंख्य नोटा.. नाणी असायच्या. आणि त्यांची राखण करत एक काळासावळा मुलगा बसलेला असायचा. प्रत्येक गुरुवारी चित्र असायचं दत्ताचचं.. पण त्यातील रंगसंगती बदललेली असायची. त्यामुळे नेहमी ते नवीनच वाटायचं.
मला एक खुप उत्सुकता होती. ते चित्र काढताना बघायची.मग एकदा मी सकाळी लवकरच त्या मंदिरात गेलो.बाहेर फुटपाथवर तोच तो काळा सावळा मुलगा उभा होता. शर्टची बटणं काढत होता. त्याने शर्ट काढला. तो हातात धरला.. आणि फुटपाथ झटकायला सुरुवात केली. त्याच्या द्रुष्टीने फुटपाथ एकदम क्लीन झाला.. मग जवळच्या पिशवीतुन त्यानं कोळसा काढला.
त्या कोळश्यानं त्यानं एक चौकोनी आऊटलाईन काढली.. चित्राच्या आकाराची.मग निरनिराळ्या रंगांचे खडू घेऊन त्यांचं चित्र काढणं सुरु झालं.कधी कुठं चुकलं की सरळ त्या भागावर थुंकायचा… आणि तो भाग दुरुस्त करायचा.त्याबद्दल त्याला काहीच वाटायचं नाही.
चित्र काढुन झाल्यावर त्यानं खिशातुन काही नोटा काढल्या.त्या दत्ताच्या चित्रावर ठेवल्या.काही नाणी विखरुन ठेवली.त्याच्या द्रुष्टीने सगळं चित्र पुर्ण झालं होतं.आता तो दिवसभर त्या चित्राशेजारी बसुन लोकांची वाट पहाणार होता.
नंतर मला त्या चित्रकार मुलाबद्दल बरीच माहिती मिळाली.दत्तु त्यांचं नाव.तो जसा गुरुवारी दत्ताचं चित्र काढतो..तसाच शुक्रवारी देवीच्या मंदिरासमोर देवीचं चित्र काढतो.. सोमवारी शंकराच्या मंदिराबाहेर चित्र काढतो.त्याचा बापही पुर्वी मंदिराबाहेर बसायचा.देवादिकांची चित्रे.. पुस्तके विकायचा.लहानगा दत्तु बापाजवळ बसलेला असायचा.मग बाप त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगे.एकदा कधीतरी पुस्तकात बघून दत्तुनं चित्र काढलं..तिथेच.. रस्त्यावर.एवढ्याश्या मुलानं काढलेलं ते चित्र बघुन चार लोकांनी त्यावर पैसे टाकले.आणि मग त्याला तो नादच लागला.
कुठलंही कलेचं शिक्षण न घेतलेले हे कलाकार.त्यांच्यात उपजतच हा एक सुप्त गुण असतो.कितीतरी कलाकार असतात असे.अगदी डोंबाऱ्याचे खेळ करणारे पहा.उंचावर दोरी बांधलेली असते.त्यावरुन तोल सावरत जाणं सोपं तर नक्कीच नसतं.हातात आडव्या धरलेल्या काठीने ते शरीराचा तोल सावरत जीवघेणा खेळ करत असतात.
काही जणांकडे एक अगदी छोटी लोखंडी रिंग असते.एका बाजुने त्यात घुसायचे.. आणि दुसर्या बाजुनं बाहेर यायचं.शरीराचं अगदी छोटं मुटकुळं करुन हा खेळ करताना किती कसरत करावी लागत असेल.
रस्त्यावर गाणी म्हणत फिरणारा वासुदेव हाही खरंतर कलावंतच.मी एकदा अश्याच एका वासुदेवाला तयार होताना पाहिलंय.पहाटे साडेचार वाजताच तो उठला होता. स्नान करुन शुचिर्भूत झाला. अगदी छोटंसं घर होतं त्याचं.लाकडी फडताळातुन त्यानं अंगरखा काढला.हा अंगरखा म्हणजे एक बाराबंदीच होती. धोतर नेसलेलं होतंच. त्यावर तो बाराबंदीच सारखा अंगरखा चढवला.एका बाजुला असलेल्या नाड्या खेचुन तो घट्ट बांधला.
एका पिशवीतुन काही माळा काढल्या. त्यात कवड्यांची माळ होती.. एक मोठ्या टपोर्या मोत्यांची माळ होती.. पिवळ्या मण्यांचे सर होते. ते परिधान केले. मग मेकअप. कपाटातुन काढलेल्या झोळीत एक छोटा आरसा होता. त्यात बघुन वासुदेवानं कपाळावर सुरेख गंध रेखलं. त्या उभ्या गंधाच्या मधोमध बुक्क्याचा टिळा काढला. हातात चिपळ्या घेतल्या.. आणि दान पावलं..दान पावलं..म्हणत पहाटेच्या सुमारास बाहेर पडला.
बहुरुपी हाही कलावंतच.पूर्णपणे पोलिसाच्या गणवेशात तो दुकानात येऊन उभा रहायचा.दारात पोलिस आल्यावर जरा दचकायला व्हायचे.त्याच्या हातात वही पेन.
“चला निघा दुकानातुन.. तुमच्या नावाचं वॉरंट आणलंय”
असं एकदम दरडावून बोलायचं.सुरुवातीला खरंच घाबरून जायचो.. हे काय आपल्यामगे लागलंय म्हणून भीती वाटायची. पण मग लक्षात यायचं.. अरे हा तर बहुरुपी. जराशी हुज्जत घालुन दहा वीस रुपये मग त्याला द्यायचो.
आणि तो त्याचा अधिकार असायचा.. असं आत्ता वाटतं.हातावर पोट असणारी ही माणसं.वर्षातले आठ महिने शेती करणं..ती नसेल तर कोणाच्या तरी शेतावर राबणं.. अगदी काहीच नाही तर बिगारी काम करणं. आणि हे करत आपली कला दाखवत चार पैसे मागणं हेच यांचं आयुष्य.
याचना करणे म्हणजे भीक मागणे. देवळाबाहेर बसुन.. हात पसरुन जे मिळेल त्यात भागवणारे वेगळे. त्यांना भिकारी म्हणणं एकवेळ ठीक.. पण हे भिकारी नसतात. ते लोकांपुढे हात पसरतात..पण त्याआधी ते आपली कोणती तरी कला सादर करतात. म्हणुनच ते असतात.. ‘ कलाकार.’
बघता बघता अख्खा मार्च महिना सुद्धा संपला की राव … !
मला आठवतं… लहानपणी मार्च महिना म्हणजे एकतर परीक्षा किंवा पुढील महिन्यातील परीक्षेचे टेन्शन….!
डॉक्टर झाल्यानंतर असं वाटलं…. चला परीक्षांचे टेन्शन कायमचं संपलं….
पण खऱ्या परीक्षा तिथूनच पुढे सुरू झाल्या… त्या आजपर्यंत सुरूच आहेत…. !
एकूण काय ? आयुष्यातल्या परीक्षा कधीच संपत नाहीत…!
पूर्वी मला वाटायचं, परीक्षेत जास्त “मार्क” पाडले म्हणजे मी जिंकलो….
खरंतर दर दिवशी… दरवर्षी तुमच्यातले “गुण” किती वाढले हे जास्त महत्त्वाचं असतं, मार्क हा फक्त आकडा असतो…. पण दुर्दैवाने चार भिंतीतली शाळा आम्हाला ते शिकवू शकली नाही… !
मला आठवून सांगा, आज पर्यंत तुम्हाला आठवी, नववी, दहावी, अकरावी, बारावीचे मार्क कोणी विचारलेत… ? मी छातीठोकपणे सांगतो; तुम्हाला आजपर्यंत ते कोणीही विचारलेले नाहीत…!
आपण काटकोन -त्रिकोण -लघुकोन -चौकोन सर्व कोन शिकलो …. एक “दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला…!!! खरं आहे ना ???
माकडापासून आपण माणूस झालो…..! .. खरंच झालो का …. ??? हा वादाचा विषय आहे…!
साइन कॉस थिटा बीटा…. अल्फा गॅमा लॉगरिदम… यात मला कधीही रस नव्हता… जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत मला या गोष्टीचा काहीही उपयोग झाला नाही…! इंजिनीयरिंगला या बाबी कदाचित उपयोगी असतील…!
मला मात्र लहानपणापासून कायम हृदयाची धप धप आवडायची…. आमच्या मेडिकलच्या भाषेत याला Lub Dub असं म्हणतात…. ! .. नाव काहीही द्या हो…. शेवटी जगवते ती हृदयातली धडधड …!
यानिमित्तानं एक प्रसंग आठवला…
लहानपणी शाळेत त्यावेळी, डब्यात वयानुसार एक पोळी आणि भाजी सोबत लोणचं असणं, हि आमची श्रीमंती होती… दिवसा शाळा आणि रात्री एसटी स्टँडवर हमाली काम करणारा आमच्यासोबत त्यावेळी शाळेत एक मुलगा होता… खिशात तो त्यावेळी एक गुळाचा खडा आणायचा… आम्ही मिटक्या मारत; पोळी भाजी लोणचं खात असताना तो आमच्याकडे बघत, हसत गुळाचा खडा चघळायचा आणि शाळेतल्या नळाशी, ओंजळ धरून घुटुक घुटुक पाणी प्यायचा… वरून मस्त हसायचा…!
… पण ते हसू कारुण्यपूर्ण होतं हे आज कळतंय…आम्ही वॉटर बॅग मधून पाणी प्यायचो….उपाशी राहून तो तृप्त होता…. पोटभर खाऊन आम्ही मात्र अतृप्त होतो…. !
का नाही मी कधीच बोलावलं त्याला माझी भाजी पोळी खायला… ?
का नाही काढून घेतला मी तेव्हा त्याच्याकडून गुळाचा तो खडा…. ?
माझा डबा त्यावेळी त्याला खायला देऊन, माझी वॉटर बॅग त्याच्यापुढे धरून, त्याच्या खिशातला गुळाचा खडा काढून, चघळत चघळत शाळेतल्या नळाला ओंजळ धरून मी सुद्धा घुटुक घुटुक पाणी प्यायलो असतो एखाद वेळी तर ??? … तर… मी सुद्धा माणूस झालो असतो…!!
पोटार्थी मी…. एक चपाती, थोडी भाजी आणि नखभर लोणचं माझ्याकडून सोडवलं गेलं नाही तेव्हा….
मात्र गुळाचा तो खडा मी हरवून बसलो कायमचा … !!!
कारण…. कारण , “गाढवाला गुळाची चव काय”… ?
मराठीत हा वाक्प्रचार सुद्धा माझ्याच मुळे रूढ झाला असावा…. आता कुठेही गुळ बघितला, की मला त्याचं ते कारूण्यपूर्ण हसू डोळ्यासमोर येतं… आणि मग गुळ पाहून सुद्धा माझा चेहरा कडवट होतो…!
आज तो कुठे असेल … ? असेल तरी का ???
तो नक्कीच असेल; आणि कुठेतरी चमकतच असेल, कारण आयुष्यामध्ये असे संघर्ष करणारेच नेहमी यशस्वी होतात…! तो जिंकला नसेलही कदाचित, परंतु यशस्वी मात्र नक्की असेल…
जिंकणं आणि यशस्वी असणं यात फरक आहे… ! जिंकलेला प्रत्येक जण यशस्वी असतो असं नाही…. परंतु यशस्वी असलेला प्रत्येक जण जिंकलेला असतो….!
जिंकणं म्हणजे शर्यतीत दरवेळी पहिलं येणं नव्हे …. शर्यतीत धावताना, वाटेत आलेल्या काट्याकुट्या दगड धोंड्यांना तुडवत त्यांना पार करणं… धावताना छाती फुटायची वेळ येते, त्यावेळी स्वतःला सावरत, आपल्या सोबत पळणाऱ्याला धीर देणं म्हणजे शर्यत जिंकणं….! यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!!
आपल्या सोबत धावणारा एखादा प्रतिस्पर्धी पायात पाय अडकून पडला, तर त्याला उठवून पुन्हा धावायला प्रवृत्त करणं, म्हणजे शर्यत जिंकणं…. यावेळीही तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे पण कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!!
नाती जोडता जोडता नेमकं कुठं हरायचं ते कळणं, म्हणजे शर्यत जिंकणं…
यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!!
पडणं म्हणजे हरणं नव्हे…. पडल्यानंतर उठून उभंच न राहणं म्हणजे हरणं, हे समजणं….म्हणजे शर्यत जिंकणं….! … दुर्दैवानं…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!!
असो, विषय लांबत जाईल… मुळ मुद्द्यावर येतो….
तर, अशाच पडणाऱ्या आणि पडून उठणाऱ्या अनेक लोकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, आपण सर्वांनी मदत केली आहे…. आणि म्हणूनच, मार्च महिन्यातील हा गोषवारा …. आपणासमोर सविनय सादर… !
*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*
भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी
– श्री बाकले सर यांनी शेकडो नवीन शर्ट (पॅकिंग आणि प्राईस टॅग सुद्धा न काढलेले) आम्हाला दिले.
हे सर्व शर्ट आम्ही 6 अपंग लोकांना विक्रीसाठी दिले. “आयुष्यात अंधार असेलही; परंतु मनातला प्रकाश विझलेला नाही, आम्हाला भीक नको, आमच्याकडून वस्तू विकत घ्या” अशा आशयाची पाटी, व्यवसाय करताना त्यांच्या जवळ दिसेल अशा पद्धतीने ठेवली आहे…. एक रुपया …. दोन रुपये भिक द्या हो…. म्हणून लाचार होणारे हे लोक, आज दर दिवशी कमीत कमी 800 ते 1000 रुपयांचा व्यवसाय करत आहेत…! आज ते भिक्षेकरी नाहीत, कष्टकरी झाले आहेत…!
एका महिन्यात 6 दिव्यांग लोक स्वतःच्या पायावर उभे राहिले याचे सर्व श्रेय मी समाजाला देतो.
मला जर कोणी पाच मूठ गहू दिले, तर मी ते तसेच कोणाला वाटणार नाही …
मी गहु जमिनीत रुजवेन, खत पाणी घालेन आणि मग जेव्हा पाच पोती धान्य होईल, तेव्हा ते माझ्या लोकांना मी विकायला लावून व्यवसाय करायला लावेन… यातल्या पाच मुठी पुन्हा बाजूला काढून त्यांनाही त्या जमिनीत पेरायला लावेन…!
आपण अशा पाच मुठी नाही…. हजारो मुठी आम्हाला दिल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही आपल्यासमोर नतमस्तक आहोत… !
वैद्यकीय सेवा, अन्नपूर्णा प्रकल्प, खराटा पलटणहे सर्व इतर उपक्रमही नियमितपणे सुरु आहेत.
शैक्षणिक
भीक मागणाऱ्या पालकांच्या अनेक मुलांना आपण दत्तक घेतलं आहे. हे सर्व खर्च आता माझ्या अंगावर साधारण मे महिना अखेर किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला पडतील.
माझ्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर आधारित जे पुस्तक लिहिले आहे, त्याच्या विक्रीच्या पैशातून या सर्व मुलांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहे.
माझं पुस्तक आपण विकत घेत आहात… पुस्तक आवडो न आवडो माझं कौतुक करत आहात… मुलगा म्हणून स्वीकारून; आई बापाच्या प्रेमळ नजरेने पाठीवर हात ठेवत आहात… आपण माझ्या सोबत आहात याचा काही वेळा मलाच माझा हेवा वाटतो…!
आपल्या एका मुलीला कलेक्टर व्हायचे आहे, तिची स्वप्नं खूप मोठी आहेत…. काही वेळा बाप म्हणून मी हतबल होऊन जातो… पण तुम्ही सोबत आहात; याची आठवण झाली की मी पुन्हा निर्धास्त होतो…!
मनातलं काही …
Zee Yuva TV यांनी”सामाजिक” या कॅटेगरीमध्ये मला आणि मनीषाला एक मोठा पुरस्कार दिला.
अगदी खरं सांगायचं तर या पुरस्कारावर आमचा हक्क नाही, तुम्हा सर्वांचा हक्क आहे….!
अगदी मनापासून बोलतोय मी हे…. कारण तुम्ही सर्वजण काहीतरी देत आहात; आम्ही फक्त ते तळागाळात पोचवत आहोत…
रेल्वे स्टेशनवर एखादी बॅग हमालाने डोक्यावर घेतली म्हणून तो त्याचा मालक होत नाही…. मालक कुणीतरी वेगळा असतो….! आमच्याही बाबतीत तेच आहे…. आपण दिलेली जबाबदारी; आम्ही फक्त आमच्या डोक्यावर घेतली आहे, आम्ही मालक नाही…. आम्ही फक्त भारवाहक आहोत…. मालक आपण सर्वजण आहात….!!!
माझे आजोबा कै. नामदेवराव व्हटकर ! (माझ्या आईचे वडील)… कवी, लेखक, गीतकार, संगीतकार, अभिनेता असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व….!ते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचे निस्सीम भक्त होते.
आदरणीय बाबासाहेब अनंतात विलीन झाल्यानंतर, आजोबांनी स्वतःचे घर आणि छापखाना विकून बाबासाहेबांची अंतिम यात्रा चित्रबद्ध करून ठेवली आहे…. या एका चित्रफिती शिवाय, बाबासाहेबांची अंतिम यात्रेची चित्रफीत जगामध्ये इतरत्र कुठेही नाही…
जवळची व्यक्ती गेल्यानंतर प्रत्येकाची धडपड असते, आपल्या त्या प्रिय व्यक्तीचे शेवटचे दर्शन घ्यावे.
आदरणीय बाबासाहेबांना आई किंवा वडीलच मानणाऱ्या करोडो कुटुंबीयांना मात्र या अंतिम दर्शनाचे भाग्य मिळाले नाही…
माझ्या आजोबांनी तयार केलेल्या, जगात एकमेव असणाऱ्या, या चित्रफितीमुळे आदरणीय बाबासाहेबांच्या समस्त भारतीय कुटुंबीयांना आता आदरणीय बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेता येईल.
आदरणीय बाबासाहेबांच्या चरित्रावर आधारित महापरिनिर्वाण या नावाने एक सिनेमा नुकताच येऊ घातला आहे. या चित्रपटामध्ये आदरणीय बाबासाहेबांच्या अंतिम यात्रेचे दर्शन सर्वांना नक्की घडेल…!
या चित्रपटामध्ये माझ्या आजोबांचाही जीवनपट ओघाओघाने आला आहे….
माझ्या आजोबांची भूमिका करत आहेत, सुप्रसिद्ध अभिनेता श्री प्रसाद ओक..!
हि चित्रफीत बनवून माझ्या आजोबांनी समस्त भारतीयांवर उपकार केले आहेत…. असं माझं प्रांजळ मत आहे….!
असो, भाषेची गरज फक्त बोलण्यासाठी असते, समजून घेण्यासाठी भावना पुरेशा असतात….!