मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नरहरीरायाचे दर्श…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “नरहरीरायाचे दर्शन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

नरहरी राया यायला निघाले बघ तुझ्या दर्शनाला..

 मनातूनच अशी ओढ लागते.. तुझी तीव्रतेने आठवण येते.. आणि यायला निघतेच….

 तशी सगळ्याच देवांवर श्रद्धा आहे पण तू……. कुलदैवत आहेस ना.. म्हणून तुझ्यावर जरा जास्त माया आहे…. त्या ओढीनेच निघते.

मला तर वाटते… कुलदैवत ही संकल्पना यातूनच आली असावी.

हा देव माझा आहे….. ही भावना मनात रुजते.. त्या देवी.. दैवता विषयी मनात भक्ती बरोबरच आपलेपणा वाटतो… तो जवळचा वाटतो.. तो देव हक्काचा वाटतो…

टेंभुर्णी फाट्याला वळून वीस-बावीस किलोमीटर गेलं की येतं तुझं नरसिंगपुर….

नीरा नदीच पाणी संथ वाहतं असतं. पुलावर गाडी गेली की लांबूनच कळसाचं दर्शन होतं.

अरे देऊळ जवळ आलं की……

थोड्याच वेळात तुझ्या पायऱ्यांपाशी येऊन पोहोचते. तुझे ते भव्य बुरूज त्यावर उडणारे पोपट पहात क्षणभर उभी राहते. नंतर पायऱ्या चढायला सुरुवात करते. हल्ली अर्ध्या पायऱ्या चढून गेलं की जरा वेळ थांबते… सत्तरी झाली रे आता.. पूर्वी कसं भरभर चढून येत होते. आसपास बघते थांबते.

 आजकाल अस थांबणं पण आवडायला लागलं आहे… न पाहिलेलं दिसायला लागलं आहे….

आधी प्रल्हादाला भेटते. त्या लेकराचं दर्शन घ्यायचं.. त्याच्या थोर भक्तीमुळे तू आम्हाला मिळालास.

 आरतीत म्हटल्याप्रमाणे..

” प्रल्हादाच्या इच्छेसाठी

 देव प्रगटे स्तंभा पोटी

 ऐसा ज्याचा अधिकार

 नमु त्यासी वारंवार…. “

त्याला वंदन करून मग तुझ्याकडे यायला निघते. तुझ्यासमोर बसलं की मन आनंदून जातं…. प्रेमभराने तुझ्याकडे बघत राहते. लाल पगडी, पिवळा पितांबर, शेला पांघरलेला, गळ्यात हार.. तुझं रूप मनात साठवते..

मंद समई तेवत असते. धूप, उदबत्ती फुलांचे हार, यांचा संमिश्र वास आसपास दरवळत असतो.

समोर बसून काय बोलू रे तुझ्याशी…. आता ते पण कमी झालं आहे… तुला सगळं कळतं.. आता मागणं तर काहीच नाही. आहे त्यात समाधानी आहोत. तुझी सेवा घडू दे. अंतरंगाला तुझा ध्यास असू दे. तेवढ्यानी मन शांत होणार आहे… तूच एक त्राता आहेस हे समजले आहे.

” दया येऊ दे आमची मायबापा

करी रे हरी दूर संसार तापा

अहर्निश लागो तुझा ध्यास आम्हा

नमस्कार माझा नरहरी राया… “

प्रेमाने परत डोळे भरून बघते.. आणि निघते लक्ष्मीआईंना भेटायला…

 एक सांगू…. तुझा थोडा धाक वाटतो रे.. बापासारखा…

लक्ष्मी आई मात्र भोळी भाबडी.. साडी चोळी घालून. साधंसं मंगळसूत्र घालून उभी असते. तिला काही भपका नाही.. मला तर ती आई, मावशी, काकू सारखीच वाटते.. आमची वाट बघत तुझ्या बाजूला उभी असते बघ… तिच्याजवळ दारात बसून मनमोकळं बोलते.

बापाशी बोलता येत नाही ते आईलाच सांगणार ना रे लेक…… तिला सगळं सांगून झालं की मन भरून येत.. शांत वाटतं. तिचा आश्वासक चेहरा बघून मन तृप्त होतं…

…. प्रदक्षिणा पूर्ण करून तुझ्याकडे येते. परत दर्शन घेते.. तू भक्कम पाठीशी आहेस म्हणून काळजीच नाही रे…. देवळात येऊन आसपास हिंडून, तुला बघून खूप आनंद होतो बघ… म्हणूनच आठवण आली की येते तुला बघायला….

आता मात्र निघते रे… खूप कामं पडली आहेत… काही नाही रे….. आज सकाळीच तुझी आठवण आली म्हणून आले होते भेटायला…… लागते आता कामाला… दूध आलं आहे ते तापवायचे आहे.. चहा करायचा आहे… पेपर आत घ्यायचा आहे.. सुरू झाला आमचा संसाराचा गाडा…..

तुम्हाला मनातलं सांगू का…..

पूर्वीसारखं वरचेवर त्याला भेटायला जाणं होत नाही.. मग अशीच जाते….. हल्ली तेच आवडायला लागलं आहे. कुणी नसतं देवळात… नरहरी राया आणि मी … त्या निरामय शांततेत त्याच्याशी मनानी जोडली जाते … ते काही क्षणच खरे असतात.. सच्चे असतात…. निर्मळ असतात हे आता कळलेले आहे… त्यामुळे ते फार हवेसे वाटतात….

 तुम्ही पण अनुभव घेऊन बघा… तुम्हाला पण येईल ही प्रचिती…

…… आपल्या मनातल्या देवाची…. मग तो देव कुठलाही असू दे…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ५ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी  ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

डोंगल ते वाय फाय (बालपण) भाग – ५ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

श्रावण तसा मन भावन. भरपूर पाऊस होऊन गेलेला. श्रावणाची रिमझिम, उनं पावसाचा खेळ, सोनेरी सूर्याची किरणे त्यात पडणारा पाऊस मध्येच आकाशात इंद्रधनुष्याचे आगमन, मन प्रसन्न करणारे वातावरण.

मातीच्या भिंतीनी धरलेली ओलं. प्रत्येक भिंतीवर बाहेरून उगवलेले गवत आणि आघाडा गवतावरची फुले, बारीक तुरा. रस्त्यावर पण हिरवळ. झाडानी धरलेलं बाळस. परसात भारलेली फुलांची झाड. फुलांच्या वसातील दरवळ. त्यात गुलबा क्षची लाल चुटुक फुले, झेंडूचा वास अनेक प्रकारच्या वेलिंचे जाळे, न सांगता उगवलेले. ही साक्ष म्हणजेच, श्रीचे आगमनाची चाहूल.

 घरात गणपतीची लगबग.

गणपतीचा कोनाडा व जवळ जवळ सगळा सोपा रंगानी सुशोभीत केलेला. श्रीची मखर तयार करण्यासाठी दिवस रात्र एक.

 कुंभार वाड्यात सगळ्यांची वर्दळ. अनेक प्रकारच्या गणेश मुर्त्या तयार झालेल्या. त्यातीलच एकाची निवड करून आमच्या नावाची चिठी त्या गणेशाच्या किरीटवर लावलेल्या असतं.

 एकदाचा तो दिवस आला की सगळीकडे धामधूम. आम्ही गल्लीतील सर्वच जण एकत्रित मूर्ती आणित असू. प्रत्येकांच्या कडे पाट. त्यावर श्री बाप्पा विराजित होतं असतं. कुंभारला पान सुपारी व दक्षणा देऊन मुर्त्या बाहेर पडत, त्या निनाद करतच. प्रत्येकाकडे

घंटी, कैताळ, फटाक्यांचा आवाज आणि जयघोष करत, आपापल्या घरी बाप्पा येत. दरवाज्यात आले की, त्याच्यावरून लिंब लोण उतरून टाकले की बाप्पा मखरात बसत. फटाके फक्त गणपतीच्या सणात मिळत एरवी नाही.

 प्रत्येकाच्या घरी रोज सामूहिक आरती, मंत्रपुष्प, प्रसाद वाटप हे ठरलेलं. रोज वेगवेगळे नैवेद्य. असे दहा दिवस कसे सरत जात होते ते कळत नसे. त्यात भजन कीर्तन वेगळेच. शाळेत पण गणपती बसवत व ते आणायला आम्हालच जावे लागे. रस्ता पावसानी राडेराड कुठे कुठे निसरडे रस्ते. त्यावेळी डांबरी सडक नव्हतेच. त्यात आम्हा मुलांची मिरवणूक. नेमके दोन चार जण तर पाय निसरून पडत असतं. मग ते इतर जण हसतात म्हणून, घरी पोबारा करीत.

 सातवी संपली बरेच मुले दुष्काळी परिस्थिती मुळे इकडे तिकडे कामाला लागली. मलाही पाणी भरण्याचा कंटाळा आलेला. मी पण सातवीत जे गाव सोडले ते आजतागायत!

 गावापासून पाचशे किलोमीटर लांबवर मी आठवीत प्रवेश घेतला त्यावेळी माझं वय होतं ते फक्त 12 वर्षे! एक वर्ष लवकरच शाळेत घातलं गेल.

अनोळखी गाव व तिथले राहणीमान ही वेगळेच. भाषा मराठी पण मराठवाडी. येथे मात्र गोदावरी कठोकाठ वाहत होती. दिवसातून चार वेळा मुबलक पाणी नळाला येत असले तरी, माझी अंघोळ ही गंगेकाठी चं सलग तीन वर्षे नदीत अंघोळ. महापुरात पण पोहण्याचा सराव.

 तस हे तालुक्याचे गाव पण चहुकडे मोठे मोठे दगडी वाडे. एक एक दगड दोन फुटांचा लांब आणि रुंद. निजामशाही थाटातील वड्यांची रचना. तीन तीन मजली वाडे. निजामचे बहुतेक सगळेच सरदार, दरकदार असावेत असे. प्रत्येक घराला

टेहळणी बुरुज पण असलेला. अजूनही बरेच वाडे जश्यास तसेच आहेत.

 मंदिराच गाव असं म्हटलं तर वावगे ठरु नये. गावात बरीच हेमाड पंथी मंदिरे. गोदा काठी तर अगणित मंदिरे. काठाला दगडी मजबूत तटाची बांधणी. बऱ्याच मंदिराचे जीर्णोद्धार हे अहिल्यादेवी होळकर ह्यांनी केलेले. गावात सुद्धा दगडी रस्ता. पण गाव हे गल्ली बोळाचे. अरुंद रस्ता व बोळ. वाडे मात्र टोलेजंग. गाव तस सनातनी धार्मिक. पूजा, अर्चना, भजन कीर्तन, पुराण हे सगळीकडे चालूअसलेलं. का बरं असणार नाही.

हे चक्क संत जनाबाईचे जन्मस्थान! संत जनाबाईचे गाव. वारकरी संप्रदाय पण मोठा. सगळ्या देवी देवतांची मंदिरे.

त्यात तालुक्याचे गाव. निजामशाहीचा ठसा मात्र जश्यास तसाच होता. घराच्या दगडी महिरपी चौकट्या, त्यावर महिरपी सज्जा, सज्यातून वरच्या बाजूला महिरपी लाकडी चौकट. अवाढव्य मोठी घरे प्रत्येक घरात दोन्हीही बाजूला पाहरेकऱ्यांचा देवड्या लादनी आकारात सजलेल्या. प्रत्येक घरात सौजन्य, ममता आस्था, कणवाळू प्रिय जनता.

 तरीपण मला तिथे रमायला काही दिवस लागले, मित्र पण मिळाले. पण आमचे गावठी खेळ तिथे नव्हतेच. प्रत्येक घरात कॅरम बोर्ड, व पत्ते. पत्त्यात पण फक्त ब्रिज खेळण्यात पटाईत लोक दिसलें. कब्बडी खोखो हे मैदानी खेळ, मला आवडणारा खेळ फक्त लेझिम होता, बस्स. चिन्नी दांडू, वाट्टा, धापा धुपी, ईशटॉप पार्टी नव्हतीच! सायकल पण नव्हती! हे विशेष! शाळा झाले की रोज रेल्वे स्टेशनं वर नियमित फिरायला जाणे. सकाळी तासभर नदीत डुंबणे. कधीतरी मित्रासह मंदिरात जाणे. एवढाच कार्यक्रम.

शाळेत असताना मात्र बँड मध्ये सहभागी म्हणून पोवा फ्लूट वाजवायला घरी मिळाला. त्यावर मास ड्रिलचे काही वेगवेगळ्या धून आणि राष्ट्रगीत वाजवत बसणे. गावात असताना भजनात बसत असल्यामुळे सूर पेटीचा नाद लागलेला होता. तो आता येथे येऊन मोडला. स्वरज्ञान, राग आलाप हे आता फक्त फ्लूट वर येऊ लागले. कारण सुरपेटी वाजवायला मिळत नव्हतीच. कसेबसे तीन वर्षे त्या संत जनाबाईच्या गावात काढले, पण बालपण विसरून गेलो. खरी खोटी माणसे वाचवायला फार लवकरच शिकायला मिळाले.

 सुट्टीत गावी आल्यावर काही जुने मित्र भेटत, काही कायमचीच निघून गेलेली होती.

कॉलेज सुरु झाले तसे परत नवीन मित्र मंडळी भेटत गेली. आणि जगण्याची व्याख्या पण बदलत गेली.

क्रमशः…

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ याद ना जाये… – लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

??

☆ याद ना जाये… – लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

काल संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. नंतर कितीतरी वेळ पाऊस नुसता कोसळत होता. सगळीकडे १५ मिनिटात पाणीच पाणी झाले. घराच्या उंच गॅलरीतून दिसणा-या रस्त्याच्या तुकड्यावर क्षणाधार्त रंगीबेरंगी छत्र्या फिरताना दिसू लागल्या. पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावरील पाण्यात पडल्यावर वेडीवाकडी प्रतिबिंबे लक्ष वेधून घेत होती. कॉलनीच्या कंपाउंडमधील उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि पाने अक्षरश: वेड्यासारखी हलत होती. गुंगीत घर सोडून चाललेल्या एखाद्याला कुणीतरी दंड धरून गदगदा हलवावे तसे! त्यावेळी शेंड्याजवळच्या पानामागे लपलेले एक कावळ्याचे घरटे दिसले. घरटे म्हणजे काय दोन फांद्या फुटत होत्या तिथे काड्याकाटक्यांचे तुकडे कसेबसे गोलगोल रचलेले. आता घरट्यात काहीच नसावे कारण पिल्ले असती तर कावळ्यांनी कोलाहल करून सगळा परिसर डोक्यावर घेतला असता. कावळेही कुठे दिसत नव्हते.

पावसाळ्यात हे ठरलेलेच असल्यासारखे चालू असते. अनेक पक्षांची पिले उडून गेलेली घरटी उध्वस्त होतात. पण त्याचे खुद्द त्या पक्षांनाही फारसे काही वाटत नाही. त्यांचे सगळे आयुष्य निसर्गाने कसे शिस्तीत बसविलेले असते. ठरलेल्या ऋतूतच जन्म, ठरलेल्या वेळीच प्रणयाराधन. ते झाल्यावर दिवसभर मनमुराद शृंगार. मग जेंव्हा दोनतीन नव्या पाहुण्याची चाहूल लागते तेंव्हा त्यांच्यासाठी तात्पुरता निवारा तयार करायची दोघांची लगबग. त्यासाठी दिवसभर आळीपाळीने कुठून कुठून काड्या, कापूस, तारा, काहीही जमा करत राहणे. मग पक्षीण अंडी देवून त्यावर दिवसदिवस बसून राहते. एका दिवशी अंड्यातून एकही पीस अंगावर नसलेले चिमुकले जीव बाहेर आले की काही दिवस डोळ्यात तेल घालून त्यांचे रक्षण. पिलांना मिळेल ते अन्न चोचीने भरवायची जबाबदारी मात्र आई-बाबा अशी दोघांचीही ! आणि पिले काही दिवसातच मोठी होऊन, उडून गेली की स्वत:ही त्या घराचा त्याग करून निघून जायचे. कसा अगदी संन्याशाचा संसार !

कालच्या त्या कावळ्यांच्या घरट्याचे अवशेष पाहताना सहज आठवले. लहानपणी कितीतरी गोष्टी अगदी वेगळ्या होत्या. मोठ्या शहरातील काही प्रशस्त बंगले, मोजकीच दुमजली घरे सोडली तर बहुतांश घरे बैठी आणि कौले किंवा पत्रे असलेली असायची. सिमेंटचे किंवा लोखंडी पत्रे लाकडी बल्ल्यांवर खिळ्यांनी ठोकून बसविलेले असत. सिमेंटचे पत्रे आणि पन्हाळीच्या उंचवटयाखालील एवढ्याश्या जागेत सायंकाळी एकेक चिमणी येऊन बसायची. रात्रभर तिचा मुक्काम घरात किंवा व्हरांड्यात असायचा. खाली जमिनीवर अंथरून टाकून झोपल्यावर आम्ही आज किती चिमण्या मुक्कामाला आहेत ते मोजायचो. रात्रीपुरत्या आमच्या पाहुण्या होणाऱ्या चिमण्या पहाट होताच बसल्या जागीच थोडी थोडी चिवचिव करून भुर्रकन उडून जात. चिमण्याशिवाय कोणताही पक्षी कधी घरात येत नसे.

चिमण्या कधीकधी छताजवळ घरटीही करत. मग अचानक अगदी बारीक आवाजात अधीर असे ‘चिवचिव’ ऐकू येऊ लागले की समजायचे चिमणीला पिल्ले झालीत. मग चिमणा चिमणी त्या पिल्लांना दिवसभर काही ना काही भरवत. पिल्ले अन्नासाठी फार अधीर होत. उतावीळपणे ती कधीकधी चिवचिवाट करून हळूहळू पुढे सरकत आणि त्यातले एखादे उंचावरून खाली पडे. ‘टप्प’ असा पिलू पडल्याचा अभद्र आवाज आला की जीव कळवळत असे. एवढासा जीव इतक्या उंचावरून जमिनीवर पडला की अर्धमेला होऊन जाई. पिकट लाल-पांढुरके लिबलिबीत अंग, पारदर्शक त्वचेतून दिसणा-या त्याच्या लाल निळ्या रक्तवाहिन्या, अंगापेक्षा बोंगा अशी डोनाल्ड डकसारखी पिवळी मोठी पसरट चोच, धपापणारे हृदय असा तो अगदी दयनीय गोळा असे. फार वाईट वाटायचे. लगेच आम्ही मुले दिवाळीतील पणती कुठून तरी शोधून आणायचो. तिच्यात पाणी भरून त्याच्याजवळ ठेवायचो. शेवटच्या घटका मोजत असलेले ते पिल्लू स्वत:ची मानसुद्धा उचलू शकत नसायचे. मात्र आम्हाला भूतदया दाखवायची फार घाई झालेली असल्याने वाटायचे त्याने घटाघटा पाणी प्यावे, ताजेतवाने व्हावे आणि उडून परत आपल्या घरट्यात जावून बसावे. अर्थात असे काही व्हायचे नाही. लहान मुले देवाघरची फुले असतात, म्हणे ! पण देव त्याच्या घरच्या अशा किती निरागस फुलांच्या प्रार्थना नाकारतो ना ! फार राग यायचा तेंव्हा देवाचा ! पिलू मरून जायचे. त्याच्या मृत्यूचे दृश्य मोठे करुण असायचे. सगळेच अवयव अप्रमाणबद्ध असल्याने विचित्र दिसणारे, मान आडवी टाकून मरून पडलेले पिल्लू, त्याच्या अवतीभवती आम्ही टाकलेले काही धान्याचे दाणे आणि आमच्या त्याला पाणी पाजायच्या प्रयत्नात जमा झालेले बिचा-याला भिजवून टाकणारे पाण्याचे थारोळे ! आम्ही अगदी खिन्न होऊन जायचो. मग आईकडून त्याच्या मृत्यूची खात्री करून घेतल्यावर आम्ही बागेत त्याचा दफनविधी पार पडीत असू. माणसाच्या पिलाच्या मनात जिवंत असलेले सा-या सृष्टीबद्दलचे ते निरागस प्रेम नंतर कुठे जाते कोणास ठावूक !

चाळीसमोर अशीच एक कुत्री होती. तिचे नाव चंपी. गडद चॉकलेटी रंगाची चंपी दुपारी बाराच्या सुमारास चाळीतल्या प्रत्येक घरासमोर जाई. घरातील बाई तिला आधल्या रात्रीच्या उरलेल्या भाकरीचा तुकडा टाकीत असे. तो खावून चंपी पुढचे घर गाठी. कधीकधी बायका आतूनच ओरडत, “काही नाहीये ग चंपे, आज. ” चंपी तशीच पुढे सरकत असे. चंपीला कसे कुणास ठावूक मराठी समजायचे. चंपीलाच काय, ३०/४० वर्षापूर्वीच्या त्या साध्यासरळ काळात गाय, बैल, घोडा, कुत्रीमांजरी, पोपट असे सगळ्यांनाच मराठी छान समजायचे. हल्लीसारखे त्यांच्यासाठी मराठी माणसाला इंग्रजी शिकावे लागत नसे.

पावसाळ्यात चंपीला हमखास पिले होत. त्यावर चाळीतील सगळ्या मुलांचा हक्क असे. पहिले काही दिवस पिलांचे डोळे बंद असल्याने चंपी पिलांजवळून हलायचीच नाही. मग चाळीतील बायका चंपी ज्या कुणाच्या बागेत, आडोसा बघून, माहेरपणाला गेली असेल तिथे जावून तिला भाकरी वाढीत. आम्ही मुले लांबूनच पिलांचे निरीक्षण करायचो. त्यातील पिले आम्ही बुकही करून टाकलेली असत. पांढ-याकाळ्या ठिपक्याचे माझे, काळे सत्याचे, चॉकलेटी न-याचे अशी वाटणी होई. पिले मोठी झाल्यावर, आम्ही त्यांचा ताबा घेत असू. अर्थात त्या काळच्या आईवडिलांच्या गळी असल्या फॅन्सी कल्पना लवकर उतरत नसत. तरीही एकदोन मुले त्यात यशस्वी होत. मग त्या पिलाला खाऊ घालणे, त्याच्यासाठी घरासमोरच्या अंगणात सातआठ विटांचे घर तयार करणे. त्यात त्याला जबरदस्तीने घुसवायचा प्रयत्न करणे अशा गोष्टी आम्हाला कराव्या लागत. अनेकदा पिलू रात्रभर रडे मग घरच्या दबावाने आम्हाला त्याची कायमची मुक्तता करावी लागे. आम्ही एकदोन दिवस तरी हिरमुसले होऊन जात असू.

कॉलेजला असताना एक फर्नांडीस नावाचा मित्र शेजारच्या दुस-या गावाहून येत असे. त्याच्या खिशात त्याने पाळलेली एक खार असायची. असा विचित्र प्राणी पाळणारा म्हणून फर्नांडीस आमच्या कॉलेजसाठी एक हिरोच होता. खार त्याचे ऐकून कॉलेजचे सर्व पिरीयडस होईपर्यंत खिशात गपचूप कशी काय बसून राहायची देवच जाणे. एक दिवस ती मेली. पण सगळ्या वर्गाला उदास वाटले.

तान्ह्या मुलांना पाळणाघरात आणि आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा आधुनिक ‘करीयरिस्ट’ काळ हा ! आता या असल्या पक्षी आणि प्राण्यांच्या लळ्याच्या गोष्टी तशा कालबाह्यच म्हणा ! पण जुन्या आठवणी आल्या की महंमद रफीच्या आवाजातले आठवणींबद्दलचे गाणेही आठवत राहते –

“दिन जो पखेरू होते, पिंजरे मे, मैं रख लेता,

पालता उनको जतन से, मोती के दाने देता,

सीने से रहता लगाये,

याद ना जाये, बीते दिनो की |”

 *******

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

 ७२०८६ ३३००३

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

खजिना.

मी स्वतःला नेहमीच भाग्यवान समजते. त्याला तशी अनेक कारणे आहेत पण त्यातलं मुख्य कारण म्हणजे मला खूप मित्र आणि मैत्रिणी आजही आहेत. मी जिथे जाते तिथे माझी कोणाशी ना कोणाशी मैत्री होतेच आणि ती सहजपणे घट्ट होत जाते.

आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर माणसं भेटतात. काही कालपरत्वे स्मृतीआड होतात तर काही मात्र आपल्याबरोबर आयुष्यभर सोबत राहतात. घट्ट मैत्रीच्या रूपात. अगदी जीवाला जीव देणारे वाटावेत इतके जवळचे असतात ते!

मैत्रीचा पहिला टप्पा असतो तो बालपणीचा, शालेय जीवनातला.

अशी एक सर्वसाधारण भावना, समजूत आहे की बालपणी जी मैत्री होते तशी आयुष्याच्या पुढील जाणत्या टप्प्यात ती कुणाशीही होऊ शकत नाही. खोटं नसेल, खरंही असेल.

भूतकाळात रमताना अनेक चेहरे माझ्यावर आजही माया पाखडताना मला जाणवतात. पुरुषांच्या बाबतीत ‘लंगोटीयार’ असा घट्ट मैत्रीच्या बाबतीत वापरला जाणारा शब्द आहे. स्त्रियांच्या बाबतीत मी मैत्रीविषयी माझा स्वतःचाच शब्द योजिते. ‘चिंचाबोरांची मैत्री. ’ या रिंगणातल्या माझ्या सख्यांनी तर माझा बालपणीचा काळ अधिक रम्य केला आहे.

कुठलीही समस्या त्यावेळी गंभीरच असते ना? त्यावेळी गृहपाठ केला नाही म्हणून बाई रागावल्या, शाळेच्या पटांगणात खेळताना दाणकन् पडून जखमी झाले, कधी कुठल्यातरी कार्यक्रमातून डावललं गेलं, एखादं खूप कठीण गणित सुटलं नाही, परीक्षेच्या वेळी आजारी पडले, शालेय सहलीला जाण्यासाठी घरून परवानगी मिळाली नाही, स्पर्धेत नंबर आला नाही अशा आणि अशा तऱ्हेच्या अनेक भावनिक प्रसंगी माझ्या जिवलग सख्या माझ्यासोबत सदैव राहिल्या आहेत. खरं म्हणजे आता भेटीगाठी होत नाहीत. आयुष्याच्या वाटेवर मैत्रिणींची खूप पांगापांग झाली पण मनात जपून ठेवलेली मैत्री मात्र तशीच उरली. आता या वयात कधीतरी कुणाकडून तरी,

“ती गेली” अशा बातम्या कानावर येतात पुन्हा ती चिंचाबोरं, त्या लंगड्या, फुगड्या, कट्टी—बट्टी आठवते. आयुष्यात सगळं काही धरून ठेवता का येत नाही याची खंत वाटते.

त्यादिवशी वेस्टएन्ड मॉलमध्ये मी फिरत होते आणि दुरून एक हाक आली. “बिंबाsss” या नावाने इथे मला हाक मारणारं कोण असेल? मी मागे वळून पाहिले आणि मीही तितक्याच आनंदाने चक्क आरोळी ठोकली.

“ भारतीsss”

दुसऱ्या क्षणाला आम्ही एकमेकींच्या गळ्यात. हातातल्या पिशव्या, भोवतालची माणसं, आवाज, गोंगट कशाचेही भान आम्हाला राहिले नाही. वयाचेही नाही.

“किती वर्षांनी भेटतोय गं आपण आणि तुझ्यात काहीही बदल नाही..! ”

यालाच म्हणतात का जीवाभावाची मैत्री? मग पुढचे काही तास त्या रम्य भूतकाळात विहरत राहिले.

मी बँकेत नोकरी करत असताना माझा एक दोस्त होता. त्याला मी ‘मिस्टर दोस्त’ म्हणत असे. संसार सांभाळून नोकरी करणं हे कधीच सोप्पं नव्हतं. कालही नव्हतं आणि आजही नाही पण या माझ्या दोस्ताने मला त्या काळात, प्रत्येक आघाडीवर जी मदत केली ती मी कधीही विसरू शकणार नाही. एकदा तर मी कंटाळून माझा राजीनामाही तयार केला होता. त्या दिवशी याच माझ्या दोस्ताने मला जो मानसिक आधार दिला त्यामुळेच माझी नोकरी टिकून राहिली असे मी नक्कीच म्हणेन. कुठल्याही समस्येच्या वेळी त्याच्या नजरेत हेच निर्मळ भाव असायचे,

“मै हूँ ना!”

माझ्या या मित्र परिवाराच्या यादीत डॉक्टर सतीशचे नाव खूप ठळक आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक समस्येत तो माझ्याबरोबर असायचाच पण एका प्रसंगामुळे ‘मला सतीश सारखा मित्र मिळाला’ याचे खूप समाधान वाटले होते.

कठीण समय येता कोण कामास येतो? अथवा फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड किंवा अमित्रस्य कुत: सुखम् यासारख्या उक्त्या आपण वाचतच असतो पण प्रत्यक्षात जेव्हा जीवनात त्याचा अनुभव येतो, तो क्षण असतो खरा भाग्याचा! अमेरिकेहून भारतात परत येण्याच्या काही दिवस अगोदरच मला किडनी स्टोनचा भयंकर मोठा अॅटॅक आला होता. सतीशला, माझ्या मिस्टरांनी कळवले. ते कळताक्षणी त्याने सांगितले, “तुम्ही ताबडतोब भारतात या. आपण इथेच ट्रीटमेंट घेऊ, सर्जरी करू. मी सगळी व्यवस्था करतो. काही काळजी करू नकोस. ”

जळगाव स्टेशनवर पहाटे तीन वाजता माझा मित्र आम्हाला घ्यायला आला होता. वास्तविक तो गाडी आणि ड्रायव्हर पाठवू शकत होता पण तो स्वतः आला. जळगाव शहरातला अत्यंत व्यस्त आणि नामांकित सर्जन अशी ख्याती असलेला हा माझा मित्र स्वतःच्या प्रतिमेचा विचार न करता केवळ मनातल्या तळमळीने, काळजीने, मैत्रीसाठी आम्हाला स्टेशनवर घ्यायला आला होता. तेही अशा अडनेड्या वेळी. गाडीतून उतरताच त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या प्रेमळ स्पर्शाने माझा आजारी चेहरा क्षणात खुलला. ”आता मी बरी होईन” असा दिलासा मला मिळाला.

जीवाभावाचे मित्र मैत्रिणी यांचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून बघताना जाणवते की बाल्याचा उंबरठा ओलांडतानाच आई ही कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही आणि वडील तर फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होतेच. हे सारे संस्कार मित्र! यांचे आयुष्यातले स्थान ते नसतानाही आबाधित आहे आणि खरं सांगू का? बाहेरच्या जगात तर खूप मोठा मित्रपरिवार होताच पण घरात आमचा पाच बहिणींचा समूह होता. आजही आम्ही तितक्याच घट्ट मैत्रिणी आहोत. बहिणींपेक्षा जास्त मैत्रिणी. जीवाला जीव देणाऱ्या. कुणाच्या आयुष्यात थोडं जरी खुट्टं झालं की आमचा मजबूत वेढा असतो एकमेकींसाठी.

माझ्या घरात बारा वर्षे काम करणारी माझी बाई माझ्यासाठी कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही. तिला मी मैत्रीण का म्हणू नये? कामाव्यतिरिक्त आम्ही दोघी एकमेकींच्या जीवन कहाण्या एकमेकींना कित्येकदा सांगत असू. आमच्यामध्ये एक निराळाच बंध विणला गेला होता. तो स्त्रीत्वाचा होता. मी तर तिला माझी कामवाली म्हणण्यापेक्षा मैत्रीणच म्हणेन.

तशी तोंडावर गोड बोलणारी, ’ओठात एक पोटात एक’ असणारी अनेक माणसं भेटली. ज्यांच्याशी मैत्री होऊ शकली नाही त्यांना मित्र/मैत्रीण तरी का म्हणायचे? ते मात्र फक्त संबधित होते.

माझ्यासाठी जीवाभावाच्या मैत्रीची आणखी एक व्याख्या आहे, नेहमीच काही संकटात मैत्रीची परीक्षा होत नाही. खरी मैत्री जी असते, ज्या व्यक्तीबरोबर आपण कम्फर्टेबल असतो, ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला न्यूनगंड जाणवत नाही, सगळी बाह्य, ऐहिक अंतरे सहज पार होतात, जिला आपण अगदी मनाच्या तळातलं विश्वासाने सांगू शकतो आणि जिला आपलं ऐकून घ्यायचं असतं. भले तिच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे नसतील पण तिच्या खांद्यावर आपण डोकं टेकवू शकतो.

मी भाग्यवान आहे. मला असे मित्र-मैत्रिणी आजही आहेत आणि तोच माझा खजिना आहे, आनंदाचा ठेवा आहे.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वसंत ऋतूतला रंगोत्सव… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ वसंत ऋतूतला रंगोत्सव… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

वसंत ऋतु सुरू झाला की निसर्गाचे रूप पालटायला लागते. सध्या रस्त्यावरून जाताना सहज दिसणाऱ्या झाडांकडे बघा. पानगळं झालेली आहे.

आता नवीन.. नाजूक.. अलवार.. अशी पानं झाडांना अक्षरशः लगडलेली आहेत. हे दृष्टीसुख जाता जाता तुम्हाला मिळेल….

वसंत उत्सव सुरू झालेला आहे.

काहीं पानांचा रंग अजून लालसर आहे. पानं तलम नाजूक आहेत. हळूहळू रंग हिरवा होत जाईल. या हिरव्या रंगाच्या निसर्गात इतक्या असंख्य छटा दिसतात…. त्या बघून आपण थक्क होतो.

फुलं तर बघण्यासारखी असतातच. पण कोवळी पानं पण डोळ्यांना सुखावतात.

त्यावरून हळूच हात फिरवून बघा. लहान लेकराच्या जावळातून हात फिरवल्यासारखं वाटतं.

चाफा आता चहुअंगाने फुलून येतो. त्याच्या शुभ्र फुलांची कधी पिवळ्या धमक रंगांची तर कधी लालसर रंगाची उधळण हिरव्या रंगातून चालू असते. एखाद्या भल्या मोठ्या पुष्पगुच्छा सारखे हे झाड दिसत असते.

बोगनवेल बिचारी दुर्लक्षित.. तिचं व्हावं तेवढं कौतुक होत नाही. पण ती बघाच…

केशरी, लाल, पिवळ्या.. पांढऱ्या रंगात ती रस्तोरस्ती नटलेली दिसते.

संपूर्ण झाडाला लगटून वर वर जाते.

डेरेदार गुलमोहर त्याच्या नाना रंगात सजलेला आहे. त्याच्याकडे पाहून आपल्याच मस्तीत दंग असलेले हे झाड आहे असे मला वाटते…

आंब्याला मोहर लागलेला आहे.

त्याचा एक धुंद मधुर असा वास वातावरणात पसरलेला आहे. त्याची मऊसर पानं लक्ष वेधून घेतात. गुढीपाडव्यापर्यंत ती तयार होतात.. मग दाराला तोरण करण्यासाठी ती काढली जातात.

खरंतर अनेक वृक्षांची, फुलांची नावे पण आपल्याला माहीत नसतात. त्यांच सौंदर्य बघावं आणि निसर्ग राजाला सलाम करावा.

बहाव्याच्या पिवळ्या धमक सोनसळी रंगाचं फार सुंदर आणि समर्पक वर्णन श्रीयुत मंदार दातार यांनी केलेले आहे.

” इतके सारे सोने मजला

 अजून पाहणे झाले नाही

 अमलताशच्या जर्द फुलांनी

 असे नाहणे झाले नाही “

विशेष म्हणजे ऋग्वेदातही त्याचे वर्णन आले आहे. त्याला राज वृक्ष असे संबोधले आहे.

जांभळी, निळी, गुलाबी अशी अनेक छोटी-मोठी फुलं आसपास दिसतात.

खरतर इतक्या छोट्या लेखात त्यांचं वर्णन करणच अशक्य आहे….

प्रत्यक्षच बघा…

घंटेची फुलं पिवळ्या रंगाची असतात. अगदी सकाळी गेलं तर एखादा गालिचा अंथरावा तशी झाडाखाली पसरलेली असतात. गच्च हिरव्या पानांनी झाडही मोहक दिसत असते.

लाल फुलं असलेलं नागलिंगाचं झाड उंच उंच वाढते. त्याच्या खोडावर ही फुलं उगवतात. त्याचा सुवास झाडाखाली उभं राहिलं तरी येतो. बाहेरचा पांढरा भाग बाजूला केला की आत पिंडीचा आकार असलेलं लिंग दिसते.

झाडाखाली या फुलांचा सडा पडलेला असतो. त्यातील दोन उचलून बघा. मादक असा गंध त्या फुलांना आहे. कमला नेहरू पार्कच्या दारातच हे झाड आहे.

अनेक फांद्या.. पारंब्या यांनी लगडलेलं मोठ्ठं वडाचे झाड मला तर एखाद्या प्रेमळ मायाळू आजोबांच्या आणि त्यांच्या समस्त परिवाराचे चित्र आहे असंच वाटतं. वसंत ऋतूत त्यांच्या पानांना तजेलदारपणा आलेला असतो. अनेक पारंब्यांना खंबीरपणे आधार देऊन ठामपणे उभं असलेले हे झाड शांतपणे एकदा न्याहाळून बघा…. त्याचे अनेक अर्थ मनात उलगडत जातात….

ही झाडे एकटी नसतात. अनेक पक्षी त्यांच्यावर घरं करतात. त्यांचा किलबिलाट चालूअसतो. झाडाखाली उभं राहिलं की तो आपल्याला ऐकू येतो. चैतन्याची विलक्षण अशी अनुभूती अशावेळी येते.

फुलांनी, फळांनी लगडलेलं झाड बघुन मला तर.. सर्व अलंकार घालुन, जरतारी वस्त्र लेऊन एखाद्या वैभवसंपन्न घरंदाज स्त्रीच रूपच त्याच्यात दिसतं…

खरंच आपल्या डोळ्यांना, मनाला रिझवायला, शांत करायला निसर्ग राजा नाना रुपात अनेक रंगात आसपास सजला आहे.

आपण त्याच्याकडे पाहतच नाही.

उद्या एकमेकांवर रंग टाकून त्याची मजा घ्या…

तसाच निसर्ग विविध रंग आपल्यासाठी घेऊन आलेला आहे ते पण जरूर बघा

खूप लांब जाऊन हे पहा ते पहा असं करण्याच्या नादात जवळच असलेल्या या अलौकिक सौंदर्याकडे आपलं लक्षच जात नाही.

एक सांगु…. एकदा बघायला लागलं की ती नजर आपोआप तयार होते.

 बघायला सुरुवात तर करा…

 खरंच थांबावं थोडं झाडाजवळ..

बघाव त्यांच्याकडे.. निशब्द शांततेत…. ते बोलतात सांगतात ते ऐकू येत…

…. मायेनी स्पर्श करावा खडबडीत खोडाला.. वयस्कर माणसाच्या पायाला स्पर्श करतो तसा.

आशीर्वादच मिळेल…

आणि अखेर आपलं जीवनच त्यांच्यावर अवलंबून आहे हे कधी विसरायचं नाही.

फळा फुलांनी गच्च भरलेली झाडं बघून कृतज्ञता म्हणून तरी नमस्कार करायचा..

– – – निसर्ग रूपात अवतीर्ण झालेल्या प्रत्यक्ष परमेश्वराला…

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पिढी अशीच घडवावी लागते” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

“पिढी अशीच घडवावी लागते” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

४) मनमंजुषा —

 “ पिढी अशीच घडवावी लागते…. “ लेखक : मयुरेश डंके 

” पिढी अशीच घडवावी लागते “

” तुमचा सगळा प्रोग्रॅम आधी पाठवा. ते वाचून मग ठरवतो. ” असा एक उद्धट फोन महिन्याभरापूर्वी आला. सहसा असले फोन आले की, मी किंवा पूर्वा उत्तरं देण्याच्या भानगडीत पडत नाही. ओळख पाळख नसणारा माणूस ‘मीच भारी’ अशा स्वरात अन् तोऱ्यात बोलायला लागला की, आम्ही पुढं काही बोलत नाही. त्यामुळं, आम्ही प्रतिसाद दिला नाही.

दोन दिवसांनी पुन्हा तोच फोन..

” तुम्ही पाठवला नाहीत प्रोग्रॅम.. मी पाठवा असं म्हटलं होतं तुम्हाला. ” समोरुन अरेरावी..

” पण मी ‘पाठवतो’ असं म्हटलं नव्हतं तुम्हाला. ” मी शांतपणे म्हटलं.

” तुम्ही पाठवा. ” 

” आम्ही प्रोग्रॅम जाहीर करत नाही. तो आदल्या दिवशीच सांगितला जातो आणि केवळ नोंदणी केलेल्यांनाच. ” 

” असं का बरं? ” 

” गेली एकोणीस वर्षं आमची हीच पद्धत आहे. आम्ही प्रवासाचे डिटेल्स जाहीर करत नाही.” 

” असं असेल तर मला माझ्या मुलाला पाठवण्यात इंटरेस्ट नाही. ” समोरुन जोरात आवाज.

” ठीक” मी म्हटलं अन् फोन ठेवून दिला.

तीन चार दिवस उलटून गेले. पुन्हा एकदा तोच फोन..

” मला माहिती पाठवा.. “

मी फोन ठेवून दिला. पुढचे काही दिवस वेगवेगळ्या फोन नंबर्स वरुन तो माणूस फोन करत राहिला. मी आमच्या नियमानुसार अनुभूती चा प्रोग्रॅम दिला नाही.

एके दिवशी माझ्या एका मित्राचा मला फोन आला.

” अनुभूतीच्या जागा भरल्या का रे? ” 

” नाही अजून. का रे? ” 

” अरे, एकजण तुला फोन करतायत. तू त्यांना कुठले कुठले गड किल्ले आहेत, याची माहिती दिली नाहीस, अशी त्यांची तक्रार आहे. तू त्यांना माहिती दे ना. ” 

” अनुभूतीचे काही नियम आहेत रे. आम्ही प्रोग्रॅम आदल्या दिवशीच सांगतो. आणि तोही पूर्ण सांगत नाही. उद्या कुठं जायचं आहे तेवढंच सांगतो. संपूर्ण प्रोग्रॅम जाहीर केला जात नाही. ” मी सांगितलं.

” पण असं का? ” 

” अनुभूती चा अर्थ काय? अनुभूती म्हणजे आपलं आयुष्य अधिक समृद्ध करणारा विलक्षण अनुभव. तोच तर या कार्यक्रमाचा प्राण आहे. आपण सगळी ठिकाणं सांगून टाकली की, लोक गूगल सर्च करतात, युट्यूब वर शोधून पाहतात. सगळी उत्सुकता, अप्रूप, आनंद घालवून टाकतात. मग त्या कार्यक्रमाचा उद्देशच साध्य होत नाही. “

” अरे, पण त्यातले अनेक किल्ले त्यांनी आधीच पाहिले असतील तर? मग त्यांना तेच तेच पाहावं लागणार नाही का? ” 

” हे बघ. मी आठ वर्षांचा असताना पहिल्यांदा रायगडावर गेलो. आज ३२ वर्षं झाली, मी जवळपास चारशे हून जास्त वेळा तिथं जातोय. पण अजूनही असं वाटतं की, प्रत्येक वेळी तो गड मला वेगवेगळा दिसतो. ” 

” पण तुला आवड आहे म्हणून तू सारखा सारखा तिथं जातोस. लोकांना तशी आवड नसेल आणि फक्त दहा दिवस काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणून पाठवायची इच्छा असेल तर? ” 

“अनुभूती त्यांच्यासाठी नाहीच मुळी. कारण हा इतिहास, समाज, संस्कृती, परंपरा, ज्ञान, आपला वारसा यांच्याशी मुलांना नातं जोडायला शिकवणारा कार्यक्रम आहे. तो टाईमपास प्रोग्रॅम नाही. म्हणूनच असा विद्यार्थी आणि असे पालक आम्ही आमच्या गटात घेतच नाही. माझ्याहीपेक्षा जास्त पॉश कॅम्प्स आयोजित करणारे कितीतरी तज्ञ लोक आहेत. त्यांनी अगदी अवश्य तिकडं नाव नोंदवावं. पण माजुरडे पालक आणि विद्यार्थी आम्हाला नकोत. ” 

” पण त्यांना त्यांच्या मुलाला तुझ्याच प्रोग्रॅमला पाठवायचं आहे. तुझा प्रोग्रॅम वेगळा असतो अन् मुलांना खूप शिकायला मिळतं, असं त्यांना अनेकांनी सांगितलं म्हणूनच त्यांना इंटरेस्ट आहे. ” 

” मग त्यांनी आमचे नियम पाळायला हवेत. तेही कोणतीही तक्रार न करता. तू त्यांना हे स्पष्ट सांग आणि या विषयात अजिबात मध्यस्थी करु नकोस. ” असं सांगून मी विषय थांबवला.

काही वर्षांपूर्वी अनुभूती च्या प्रवासातच एका पालकांचा मला फोन आला होता. त्यांची मुलगी आमच्या सोबत होती. आणि “दहा दिवसांत एकदाही फोन करायचा नाही” अशीच अट सगळ्या पालकांना घातली होती. आम्ही कोल्हापुरात होतो. मला फोन आला.

” सर, तुम्ही कोल्हापुरात आहात ना… तिथल्या *** नावाच्या हॉटेलात बेस्ट नॉनव्हेज मिळतं. ” 

“पण आपण अनुभूती मध्ये जेवण पूर्णतः शाकाहारीच असतं. हे आधीच स्पष्ट सांगितलेलं आहे. “

” सर, माझा एक जवळचा मित्र कोल्हापुरातच राहतो. तो तिला घ्यायला येईल आणि नॉनव्हेज जेवण करवून पुन्हा आणून सोडेल. तुम्ही सगळे तुमचं तुमचं व्हेज जेवण करा. ” मुलीचे वडील म्हणाले.

” तसं जमणार नाही. ” मी.

” आता कोल्हापूर मध्ये जाऊन नॉनव्हेज खायचं नाही, असं कसं चालेल? ” 

” तुम्ही नॉनव्हेज खाऊ घालण्यासाठी तिला खास कोल्हापूर ला घेऊन जा. आत्ता मी इथून तिला कुणाहीसोबत सोडणार नाही आणि पुन्हा अशा गोष्टींसाठी मला फोन करु नका. ” ठणकावून सांगितल्यावर पुन्हा असा फोन आला नाही.

असाच आणखी एक प्रसंग. आम्ही सिंहगड – तोरणा असा ट्रेक करुन खाली उतरलो आणि विश्रांतीसाठी थांबलो. भल्या पहाटे माझा एक मित्र तिथं कार मधून पोर्टेबल शेगडी आणि आप्प्यांचं पीठ घेऊन आला. तीन शेगड्या होत्या. आणि आम्ही सगळे जण सेल्फ कुकिंग पद्धतीनं आपापले आप्पे करुन घेऊन मनसोक्त ताव मारत होतो. पण आमच्यात एक मुलगी होती.

“मला आप्पे नकोत. आमच्याकडे सारखेच केले जातात. तुम्ही खा, मी खात नाही. ” आम्ही सगळ्यांनी दोन तीन वेळा आग्रह करुन पाहिला, नंतर विषय सोडून दिला.

नाश्ता करुन आम्ही राजगड कडे रवाना झालो आणि माझ्या विशेष आवडीची गुंजवणे मावळाची वाट धरली. ती वाट खरोखरच घाम फोडणारी आहे. शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारी आहे. शेवटचा टप्पा आणखीनच आव्हानात्मक आहे. कारण तो दरवाजाच तशा कठीण ठिकाणी आहे. झालं.. हट्टानं 

रिकाम्या पोटी बसलेल्या बाईसाहेब गुंजवण्याच्या जंगलातच फतकल मारुन खाली बसल्या. अंगातलं बळ संपलं होतं. पोटात भूक उसळ्या मारत होती. डोकं लागलं दुखायला. निम्मे जण वाट काढत वरती वरती सरकत होते. ते सगळे होते तिथं थांबले. ग्लुकोन डी आणि लिंबाचं सरबत पाजत पाजत तिला हळूहळू वरती आणलं. गुंजवणे दरवाज्याच्या उंबऱ्याशी बसूनच ती जेवली अन् मग अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर तिच्या अंगात त्राण आलं.

पण ह्या अर्धवट ज्ञानी हट्टी उद्योगामुळे अडीच तीन तासांचं खोबरं झालं. संजीवनी माची सोडून द्यावी लागली..! स्वतःचंच म्हणणं खरं करण्याची सवय अनेक मुलामुलींना असते आणि आयुष्यात अनेक ठिकाणी महागात पडते ती अशी…

फुटाणे, शेंगदाणे खाण्याची सवय आता “जुनाट” ह्या प्रकारात समाविष्ट झाली आहे. पेरीपेरी, फ्रेंच फ्राईज हे प्रकार आता रुढ झाले आहेत. मुलं पेरुची जेली खातील, पण पेरु खाणार नाहीत. जामुन शॉट घेतील, पण जांभळं खाणार नाहीत. मसाला पापड खातील, पण भाताचे सांडगे किंवा कोंड्याच्या पापड्या खाणार नाहीत. त्यांना लाह्यांचा काला माहितीच नसतो.

भल्या पहाटे गडावर चढून जावं. सकाळच्या उन्हात गड फिरावा. न्याहारी करण्यासाठी लाह्या, राजगिरा किंवा पोहे सोबत घ्यावेत. तिखट मिठाच्या डब्या असाव्यात. एका डबीत शेंगदाण्याचा कूट घ्यावा. बचकभर हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे असावेत. गड फिरुन झाल्यावर एखाद्या देवडीशी किंवा गडावरच्या देवळात बसावं. धोपटी उघडून सगळं साहित्य बाहेर काढावं. आजूबाजूला फिरुन दोन दगड शोधावेत. टाक्याच्या पाण्यानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. दगडावर दोन तीन मिरच्या अन् बोटभर आलं चांगलं ठेचून घ्यावं. लाह्यांवर पाण्याचा सपका मारावा. मग त्यात कूट, मिरच्या, आलं, तिखट, मीठ घालून एकत्र करुन घ्यावं. गडावरच्या गडकरणी भगिनींकडून सुगडातलं घट्ट कवडीचं दही घ्यावं. अन् दह्यात सगळं कालवून ताक घालून झकास काला तयार करावा. पोटभर खावा. वरुन पुन्हा दही, ताक रिचवून तृप्त मनानं ढेकर द्यावी. तिथंच पथारी पसरून दोन तास ताणून द्यावी. ह्यातलं सुख आपल्या मुलांना ठाऊकच नाही.

गडावर जाऊन तिथं फ्रूटीसारखी बाटलीबंद कोल्ड्रिंक्स पिऊन लोकांना नेमकं काय मिळतं हे मला आजतागायत समजलेलं नाही. लोक तिथंही पिझ्झा बर्गर मिळेल का हे शोधतात. आईस्क्रीम शोधतात. पण लिंबाचं सरबत त्यांना महाग वाटतं. वास्तविक पाहता, गडभ्रमंती करणाऱ्याच्या सोबत दोन चार लिंबं, दोन चार कांदे बटाटे असायलाच हवेत. थंडगार शिळ्या भाताचा डबा सोबत असला तरीही उत्तम. म्हणजे गडावरुन दही ताक मिळवून दहीभात ताकभात करुन खाता येतो. हे सगळं आपल्या मुलांनी आवर्जून अनुभवायला हवं. मनगटी घड्याळाशी असलेला संबंध जरा कमी करुन सूर्याच्या घड्याळानुसार जगायला हवं. म्हणजे मग नव्या जगाची ओळख व्हायला लागते. आणि हेच जग अत्यंत श्रीमंत, समृद्ध, निकोप आणि सर्वतोपरी उत्कृष्ट असल्याची अनुभूती येते.

आपल्या पूर्वजांची ज्ञानसमृद्धता किती उच्च दर्जाची होती, याचा परिचय आताच्या पिढीला होणं आवश्यक आहे. पुरातन लेण्या, मंदिरांवरची शिल्पकला, कोरीवकाम, योग्य दगडाची निवड, बांधकामाचा भक्कमपणा, पुष्करण्या, बारवा, पाण्याची टाकी, जिवंत झऱ्यांचा शोध ही केवळ भटकंती नव्हे. ही आपल्या पूर्वजांच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि कर्तृत्वाची जिवंत साक्ष आहे. ते वैभवच आपलं भूषण आहे. दऱ्याडोंगरांत, निबीड अरण्यात वसलेली देवस्थानं पाहणं, त्यांचा अभ्यास करणं आणि तिथली शांत प्रसन्नता अनुभवणं ह्यात जो आनंद आहे तो “मॉलोमॉल” भटकण्यात अन् प्ले स्टेशन खेळण्यात नाही, हे आपल्या मुलांना योग्य वयातच शिकवायला हवं. त्यांच्या करिअरमधला राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा स्कोअर जितका महत्वाचा आहे, तितकाच त्यांचा व्यक्तिमत्व विकाससुद्धा महत्वाचा आहे. त्यांची नाळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी घट्ट जोडली जाणं हे फार फार गरजेचं आहे. तरच हा वारसा जपणारे हात अन् त्याविषयीच्या संवेदना जागृत ठेवणारी मनं तयार होतील.

बलोपासना, मनोपासना, ज्ञानोपासना आणि राष्ट्रोपासना या चारही उपासना आपल्या मुलांनी नित्यनेमाने केल्या तर त्यासारखा व्यक्तिमत्व विकासाचा दुसरा उत्तम मार्ग नाही. ही उपासनेची चतु:सुत्री जितकी घट्ट रुजेल तितके आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचे वटवृक्ष तयार होतील आणि गगनाला भिडतील. उत्तमतेचं अन् चारित्र्याचं अधिष्ठान ज्याच्या आयुष्यात असतं, त्याचं भवितव्य उज्ज्वलच असतं.

ह्याच विचारानं “अनुभूती” ची सुरुवात आम्ही १९ वर्षांपूर्वी केली. यंदा सुद्धा दहा दिवसांची ही विलक्षण प्रेरणा देणारी आणि नवं आयुष्य जगायला शिकवणारी “अनुभूती” ८ मे ते १९ मे, २०२५ या कालावधीत आहे. दहा किल्ले आहेत, तीन जंगल ट्रेक आहेत, विविध पुरातन मंदिरं आहेत, समुद्रावर मनसोक्त खेळणं आहे, ऐन रत्नागिरीत आमराईतला अस्सल हापूस आंब्याचा आस्वाद घेण्याचा अनुभव आहे आणि अर्थातच रात्रीच्या अंधारात गड चढून जाण्याचा थरारक अनुभव तर आहेच…!

आपल्या मुलांना घडवण्यासाठी हे करायलाच हवं ना…

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लोखंडी काॅट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “लोखंडी काॅट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी एकंदरीत सर्वच समाज साधा मध्यमवर्गीय असा होता. अर्धे अधिक लोकं गरीबच होते. घरं बैठी साधी लहान लहान दोन- तीन खोल्यांची असायची. तेव्हा लोकं आहे त्यात सुखासमाधानात, काटकसरीत राहणारी असायची. घरात दहा-बारा लोकं सहज असायचे. इतके जण असुनही घरात एकचं लोखंडी कपाट असायचे, ज्याला सगळेच ” गोदरेजचे कपाट ” म्हणत असत. त्यात घरातल्यांचे चांगले कपडे ठेवलेले असायचे.

घरातलं सगळ्यांत मुख्य एकमेव फर्निचर म्हणजे… ” लोखंडी कॉट” असायची.

तिचा अनेक प्रकारे उपयोग व्हायचा. त्या कॉटवर एकावर एक गाद्या ठेवलेल्या असायच्या त्या सुद्धा दोन किंवा फारतर.. तीन असायच्या. घरातला कर्ता पुरुष कॉटवर झोपणार हे ठरलेले असायचे. बायका तर कधीच कॉटवर झोपायच्या नाहीत. खाली सतरंजीवरच झोपायच्या.

शर्टाची घडी घालून गादीखाली ठेवली की झाली इस्त्री… कारण तेव्हा क्वचितच कोणाकडे इस्त्री असायची.

काॅटखाली लोकं लोखंडी ट्रंक, लाकडी पेट्या ठेवतं. त्यात कागदपत्रांची एक पेटी असायची. स्वेटर, मफलर, टोप्या अशा कधीतरी लागणाऱ्या गोष्टी ट्र॔केत ठेवत असत.

नेहमी न लागणारं सामान गाठोड्यात बांधून ती गाठोडी पण कॉटखाली ठेवलेली असायची.

आणि खालचा हा सगळा पसारा दिसू नये म्हणून खालची बाजू झाकायला जुन्या साडीचा एखादा पडदा केलेला असायचा.. तो लावलेला असायचा.

चादरी काही ठिकाणी गादीखाली ठेवलेल्या असायच्या. उशा कॉटवर एका बाजूला भिंतीला लागून रचून ठेवलेल्या असायच्या. जरा धक्का लागला की त्या पडायच्याच. … मग आई रागवायची…

प्रत्येक घरी असंच असायचं.. त्यामुळे कोणाला त्याची लाज वाटायची नाही. काही कार्यक्रम असला की घरातली ती काॅट घडी करून ठेवता येत असे. तेव्हा घर एकदम मोठे वाटायचे. ती बाहेर अंगणात ठेवली जायची.

पन्नास वर्षांपूर्वी माझं लग्न झालं तेव्हा पहिली खरेदी म्हणजे यांनी मोठी, भक्कम अशी लोखंडी कॉट घेतली. तेव्हा फार आनंद झाला होता. खूप मोठी खरेदी केली असं वाटत होत. कारण तेव्हा पगार अगदी कमीचं होता. काॅटला कडेला छान गोल असे बार होते. त्याला टेकवून तक्या ठेवला की पाय पसरून आरामात बसता येत असे. दर दोन वर्षांनी हे त्याला रंग देत असत. वापरातल्या वस्तूंची नीट काळजी घेऊन जपून, सांभाळून ठेवायच्या असा नियमच होता. आणि तो बहुतेक वेळा पाळला जायचा.

आमची बदली माढा, उदगीर, उस्मानाबाद, मुरुड, पुणे आणि सांताक्रुज मुंबई येथे होत गेली. या सगळ्या प्रवासात ती कॉट आमच्याबरोबरच होती. डबल बेड घेतले तरी ती कॉट काढायचा विचार कधीच मनात आला नाही. मुंबईला सांताक्रुझला बँकेचे क्वार्टर होते. तिथे वर गच्चीत काॅट ठेवली होती. आम्ही मैत्रिणी काॅटवर बसून गप्पा मारत असू…

हे रिटायर झाल्यानंतर आम्ही पुण्याला आलो. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. तिथे पण गच्ची होती. मग ती काॅट गच्चीत ठेवली. नातवंडांनी त्या कॉटचा चांगला उपयोग केला. आता रंग द्यायचं काम त्यांच्याकडे होतं. पण दोघं अगदी उत्साहाने दर दोन वर्षांनी कॉटला रंग देत असत. त्यामुळे इतकी वर्ष 

होऊन सुध्दा कॉट अगदी छान होती. आमची डबा पार्टी त्या कॉटवर होत असे. नातू सतरंज्या, गालीचा, ऊशा घेऊन वर जायचा. तक्या ठेवायचा. काॅटवर झोपायला त्याला फार मजा वाटायची.

या काॅटचा पुरेपूर आनंद आम्ही घेतला. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगचे री डेव्हलपमेंट होणार म्हणून ती जागा सोडावी लागणार होती.

तेव्हा आता या काॅटच काय करायचे? … हा विचार मनात आला.

तेव्हा अश्विनीला भाचेसुनेला विचारले. कारण त्यांचा बंगला आहे. ती म्हणाली, ” मामी ती कॉट मी नेते “

ती नेते म्हणाली याचा मला फार आनंद झाला. टेम्पो आणुन ती काॅट घेऊन गेली. आता काॅट तिच्या गच्चीत आहे. त्यावर बसून तिचा अभ्यास चालू असतो.

पन्नास वर्षाच्या संसारात साथ दिलेली काॅट योग्य स्थळी गेली असे मला वाटले.

सहवासात असलेल्या या गोष्टी निर्जीव नसतातच… त्यांच्यात आपला जीव गुंतलेला असतो.

आपण आयुष्यभर वापरलेल्या वस्तूंची मनात असंख्य आठवणींची साखळी असते…. ठेव असते.

या आठवणींचा मनात एक हळवा.. सुखद असा कोपरा असतो. तो असा मधूनच उघडायचा…

मग त्यांच्या आठवणीत आपले आपण दिवसभर रमुन जातो…. घरी बसून मिळणारा हा सहज सोपा आनंद उपभोगायचा….

तुमच्याकडे होती का अशी कॉट? आल्या का काही आठवणी? …

आता आपलं ठरलंच आहे … अशा गोष्टीत रमायचं…

… त्याचा मनाने पुन्हा एकदा अनुभव, आनंद, आस्वाद घ्यायचा… हो की नाही…

… मग कळवा तुमच्या आठवणी…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चूक की बरोबर?” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ “चूक की बरोबर?” ☆ श्री मंगेश मधुकर

नेहमीच्या वेळेत ऑफिसला निघालो. पिकअवर असल्यानं रस्त्यावर तोबा ट्राफिक. गाडी इंच इंच पुढे जात होती. ही रोजचीच परिस्थिती त्यामुळे आताशा राग, संताप, चिडचिड यापैकी काहीही होत नाही. डोकं शांत असतं. काही वेळानं पुढे सरकत चौकात पोचलो तर रेड सिग्नल लागला. सिग्नलच्या आकड्यांकडे पाहताना “वॉव, वॉव” असा सायरनचा आवाज यायला लागला लगेचच सगळ्या नजरा आवाजाच्या दिशेनं वळल्या. शांत जलाशयावर दगड मारल्यावर जसे तरंग निर्माण होतात अगदी तसं सायरन ऐकून गाडीवाल्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली.

“घ्या पुढे.. ”

“रस्ता मोकळा करा”

“लाल गाडी हो की पुढे.. ”

“ए बुलेट, फोनवर नंतर बोल आधी गाडी बाजूला घे” एकेक गाडीवाले बोलायला लागले सोबत हॉर्नचा किलकिलाट होताच. अंब्युलन्सला वाट देण्यासाठी जो तो प्रयत्न करू लागला. सिग्नलजवळ सर्वात पुढे असलेल्या पाच-दहा जणांना मागचे गाडीवाले पुढे जाण्यासाठी आग्रह करायला लागले.

“ओ, गाडी घ्या पुढे! ! ”एकजण माझ्याकडे बघत ओरडला.

“सिग्नल! ! ”

“घ्या पुढे काही होत नाही. मामांनी पकडलं तर अंब्युलन्सचं कारण सांगायचं. ते पण काही करत नाही. ”सिग्नल तोडण्यासाठी दबाव वाढत होता. आम्ही मात्र कफ्यूज काय करावं ते समजेना. शेवटी माणुसकी जिंकली. तीस सेकंद बाकी असताना आम्ही गाडी पुढे दामटली आणि काही वेळातच अंब्युलन्स मार्गस्थ झाली परंतु मी मात्र पोलिसांच्या तावडीत सापडलो. पन्नाशीचा पोलिस जाम खतरुड दिसत होता. माझ्याआधी पकडलेल्या लोकांशी उर्मटपणे बोलत होता. माझं लायसेन्स, पीयूसी, गाडीची कागदपत्रे तपासल्यावर साहेब तुसडेपणाने म्हणाले “सभ्य दिसताय आणि सिग्नल मोडता. ” 

“सभ्य म्हणालात त्याबद्दल धन्यवाद! ! सिग्नल मुद्दाम मोडला नाही. महत्वाचं कारण होतं.”

“काहीही असो”

“अहो, अंब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला” 

“दंड भरावा लागेल”

“साहेब, मी नियम पाळणारा माणूस आहे”

“असं तुम्ही म्हणताय पण आत्ताच सिग्नल तोडला हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालंय. ”

“सिग्नल मी एकट्यानेच तोडला नाही अजून चारपाच जण होते. ”

“पण सापडलेले तुम्ही एकटेच. बाकीच्यांना नोटिस जातीलच. ”

“चांगुलपणा दाखवला ही चूक झाली का? ”

“ते मला माहिती नाही”

“अहो, जरा समजून घ्या. सीरियस पेशंट असलेल्या अंब्युलन्ससाठी सिग्नल तोडला”

“तुम्हांला काय माहिती की ऍम्ब्युलन्समध्ये सीरियस पेशंट होता. ”

“अंदाज…. साधी गोष्ट आहे. थोडी माणुसकी दाखवली”

“त्यासाठी ट्राफिकचे नियम तोडायची गरज नव्हती. गाडी कडेला घ्यायची”

“एवढं मलाही कळतं पण जागा नव्हती म्हणून.. ”

“तुमच्यासारखे जंटलमन लोक असे वागतात आणि मग ट्राफिकच्या नावानं.. ”

“ओ, बास!! जास्त बोलू नका. इतका वेळ समजावतोय पण ऐकतच नाही. जनरली अशावेळी पोलिस मदत करतात पण तुम्ही..”

“नियम म्हणजे नियम”

“पण काही परिस्थिती अपवाद असतात ना. उगीच दुसऱ्या कोणाचा राग माझ्यावर काढताय. जाऊ द्या. ”

“मी कुठं थांबवलयं. तुम्हीच वाद घालताय. दंड भरा आणि जा”

आमची वादावादी सुरू असताना बघ्यांची गर्दी जमली. आधीच खूप उशीर झालेला त्यामुळे मी माघार घेत दंड भरून पावती घेतली आणि गाडी घेऊन निघालो तेव्हा संतापाने डोकं भणभणत होतं. काहीही चूक नसताना खिशाला भुर्दंड पडला तोही एक चांगलं काम केलं म्हणून… डोक्यात विचारांचं वादळ, मी वागलो ते चूक की बरोबर????

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(१० मार्च.. कविवर्य कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन.. त्यांना ही स्मृतिसुमनांची आदरांजली.)

दि. २२ जानेवारी ९९ हा दिवस मी कधीही विसरणार नाही. तो दिवस म्हणजे आदरणीय कुसुमाग्रजांची आणि माझी अखेरची भेट!

नाशिकहून एक कार्यक्रम आटोपून परतताना, नेहमीप्रमाणे कुसुमाग्रजांचे दर्शन घेऊन निघायचे आम्ही ठरवले. तात्यांची तब्येत बरीच खालावली असल्याने शक्यतो त्यांना कुणाला भेटू देत नाहीत, असे ऐकले होते. दीर्घ आजारानंतर ते कसे दिसत असतील, याचा विचार करत, थोडं बिचकतच मी त्यांच्या खोलीत शिरले. “या S या S ” म्हणून त्यांनी, अर्ध्या तिरक्या पलंगावर पहुडलेल्या अवस्थेत, अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. त्यांची ती हसरी मूर्ती पाहून मनाला बराच दिलासा मिळाला. मी आणि सुनील त्यांना नमस्कार करून शांतपणे बाजूच्या खुर्च्यांवर बसलो. माझ्या मुलाने, आदित्यनेही नमस्कार केला.

“सध्या नवीन काय चाललंय? ” क्षीण आवाजात तात्यांनी विचारलं. मी म्हटलं. “अटलजींची ‘आओ फिरसे दिया जलाएँ’ या कवितेला चाल लावून मी रेकॉर्ड केलीय. ” तात्या म्हणाले, ” मग म्हणाना. ” एवढ्यात तात्यांच्या जवळचे एक सद्गृहस्थ काळजीने म्हणाले, “अहं. तात्यांना आता काहीही त्रास देऊ नका. आता काही ऐकवू नका. ” परंतु तात्या हसत हसत म्हणाले, ” अहो, तिचं गाणं ऐकणं म्हणजे आनंदच आहे. आणि तो आनंद घ्यायला आपल्याला काहीच हरकत नाही. म्हणू द्या तिला. “

मी गायला सुरुवात केली. शेवटचा अंतरा –

‘आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा

अंतिम जय का वज्र बनाने, नवदधिचि हड्डियाँ गलाएँ…. ” गाता गाता मी डोळे किलकिले करून माझा ‘व्हिडिओ ऑन’ केला. तात्यासाहेब प्रसन्न दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. मला धन्य धन्य वाटलं त्याक्षणी!

“वा, फारच सुंदर झालंय नि किती वेगळा आणि सुंदर विचार दिलाय अटलजींनी. अशाच चांगल्या कविता गात रहा… ” असा ‘आयुष्यभर जपावा’ असा आशीर्वाद त्यांनी मला दिला. दुसऱ्या कवीलाही मनमुराद ‘दाद’ देणाऱ्या या महाकवीला पहात मी नमस्कार केला.

कुसुमाग्रजांची पहिली कविता ‘खेळायला जाऊ चला’ व ‘मोहनमाला’ त्यांच्या वयाच्या १७व्या वर्षी प्रकाशित झाली. प्रत्येक प्रतिभासंपन्न कलाकाराला, त्याच्या सुरुवातीच्या काळात पाऊल टाकायला जर खंबीर आधार आणि प्रोत्साहन मिळालं तर त्याची झेप ही ‘गरुडझेप’ ठरू शकते. ‘रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य, डौलदार शैली, भव्य कल्पना, ज्वलंत भावना, मानवतेविषयीच्या प्रेमामुळे किंवा अन्यायाच्या चिडीमुळे प्रक्षुब्ध झालेल्या कवीमनाचा आविष्कार यांपैकी काही ना काही या कवितांत आपल्याला आकृष्ट करते आणि रातराणीच्या सुगंधाप्रमाणे आपल्या अंतर्मनात असणाऱ्या अनेक चिरपरिचित ओळींचा गोडवा जागृत होऊन आपण म्हणतो, “ही कुसुमाग्रजांचीच कविता आहे…. ’’ असं कुसुमाग्रजांविषयी, त्यांच्या ‘विशाखा’ या संग्रहाची प्रस्तावना अत्यंत प्रेमानं आणि गौरवपूर्ण लिहिणाऱ्या वि. स. खांडेकरांनी तात्यांमध्ये ‘स्वधर्म’ या कवितेचं बीज तर पेरलं नसेल? ‘स्वधर्म’ या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात;

‘दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण शामलता

गुण गगनाचा निराकारता, मेघाचा गुण व्याकुळता…

तसेच आहे मी पण माझे, तयासारखे तेच असे

अपार काळामध्ये, बनावट एकाची दुसऱ्यास नसे. ‘

आणि तेच वैशिष्ट्य खांडेकरांनी उद्धृत केलंय. योगायोग म्हणजे ‘ज्ञानपीठ’ पारितोषिकाचे मराठीतील पहिले मानकरी वि. स. खांडेकर आणि दुसरे खांडेकरांना ‘गुरुस्थानी’ मानणारे कुसुमाग्रज!

तात्यासाहेबांनी माझ्याही आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा दिली. माझ्या आयुष्यात ते ‘दीपस्तंभ’ ठरले. बऱ्याच वर्षांपूर्वी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संतांना ‘जनस्थान पुरस्कार’ मिळाला. त्यादिवशीचे गाणे ऐकून मला, माझे पती सुनीलना व नाशिकच्या बाबा दातारांना (माझ्या सर्व कॅसेट्सचे प्रायोजक) बोलावून त्यांनी स्वत: निवडून दिलेल्या इंदिराबाईंच्या व स्वत:च्या कवितांना चाली लावून, कॅसेट करायची अत्यंत मानाची आणि मौलिक जबाबदारी आमच्यावर सोपवली. प्रखर राष्ट्रप्रेमाइतकेच मराठीवर जाज्वल्य प्रेम करणा-या या महाकवीनं मराठीतील नितांत सुंदर कवितांची मणिमौक्तिकंच माझ्या ओंजळीत दिली.

“मातीचे पण तुझेच हे घर, कर तेजोमय, बलमय सुंदर,

आत तुझे सिंहासन राहे, ये *क्षणभर ये, म्हण माझे हे,

फुलवी गीते सुनेपणावर…….

तिमिराने भरल्या एकांती, लावी पळभर मंगल ज्योती

प्रदीप्त होऊनि धरतील भिंती, छाया तव हृदयी जीवनभर…….! ” असाच आशीर्वाद देऊन कुसुमाग्रजांनी माझा प्रवास पवित्र, अधिक आनंददायी, सुखकर आणि तेजोमय केला.

या मिळालेल्या मणिमौक्तिकांमधून घडलेला पहिला दागिना म्हणजे ‘रंग बावरा श्रावण’ – (निवड कुसुमाग्रजांची – भाग १ ध्वनिफीत) व दुसरा, भाग २ म्हणजे ‘घर नाचले नाचले’ ही ध्वनिफीत ते असताना पूर्ण होऊ शकली नाही, याची राहून राहून खंत वाटते. तरी त्यांच्या आवडीच्या कविता, कॅसेटद्वारे साहित्याच्या पूजकांकडेच नाही, तर जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत पवित्र काम हाती घेतल्याचं आज समाधान आहे.

तात्यांनी ‘रंग बावरा श्रावण’चा प्रकाशन समारंभ इंदिराबाईंच्या प्रति आदर व्यक्त करण्याकरता, इंदिराबाईंच्या बेळगावलाच जाऊन करा, असा सल्ला दिला. असे विचार म्हणजे, एका महान कलावंताने दुसऱ्या महान कलावंताचा केलेला सन्मानच! आम्हीही एखाद्या लग्नसमारंभापेक्षाही जास्त थाटात हा सोहळा २३ ऑगस्ट ९७ रोजी साजरा केला. त्यावेळी ‘बेळगावसारख्या टाकलेल्या शहरात, तू आमचीच आहेस हे अत्यंत प्रेमानं सांगायला ही सारी मंडळी दुरून इथं आलीत आणि आज कुबेराचा सन्मान आहे की काय; असं वाटतंय, ’ अशा भावपूर्ण शब्दांत इंदिराबाईंनी आपला आनंद व्यक्त केला. ही सर्व बातमी तात्यांना त्यांच्या सुहृदांकडून कळली. त्यानंतर मी पुन्हा नाशिकला गेल्यानंतर, त्यांनी आमचे आनंदाने स्वागत केले….. ‘या S S, बेळगाव जिंकून आलात म्हणे, ‘ अशी अत्यंत मायेनं माझी पाठ थोपटली आणि मला एव्हरेस्टचं शिखर चढून आल्याचा आनंद झाला. केवढं सामर्थ्य त्यांच्या स्पर्शात! ‘स्पर्श’ म्हटला कि तात्यांची’कणा’ ही विलक्षण ताकदीची कविता आठवते. गंगामाईमुळे घर वाहून खचून गेलेल्या नायकाला, त्याक्षणी पैशाची गरज नसते; गरज असते फक्त ‘सरांच्या’ आश्वासक आशीर्वादाची. तो म्हणतो,

‘मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून, नुसतं लढा म्हणा…. ‘

या ओळी कधी कठीण प्रसंगी आठवल्या तरी अंगात तानाजीचं बळ येतं. ‘सरणार कधी रण… ’ म्हणताना बाजीप्रभू संचारतो अंगात! पण अशा अनेक कल्पना वाचून बुद्धी अवाक् होते.

गेल्या १० मार्चला तात्यासाहेब गेल्याची बातमी ऐकून धस्स झालं. मराठी भाषेचे ‘पितामह’ ज्यांना म्हणता येईल असं वादातीत व्यक्तिमत्व – तेजोमय नक्षत्रांचं आश्वासन – निखळून पडलं. ताबडतोब आम्ही नाशिकला पोहोचलो. तिथं बाहेरच्या अंगणात त्यांचं’पार्थिव’ सुंदर सजवलेल्या चबुतऱ्यावर ठेवलं होतं. त्यामागे मोठ्या अक्षरात पाटी होती,

“अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्, मला ज्ञात मी एक धूलीकण

अलंकारण्याला परी पाय तूझे, धुळीचेच आहे मला भूषण…..! ” ही अक्षरे पाहून वाटलं, पृथ्वीचे प्रेमगीत लिहिणारा पृथ्वी होऊन – 

‘गमे कि तुझ्या रुद्र रूपात जावे,

मिळोनी गळा घालूनिया गळा… ’ असे म्हणत सौमित्राला त्याच्या तीव्र ओढीनं भेटायला तर गेला नसेल?

त्यांचं ते अतिशांत स्वरूप पाहून मला, शेजारच्याच पायऱ्यांवरती उभे राहून –

‘आकाशतळी फुललेली, मातीतील एक कहाणी

क्षण मावळतीचा येता, डोळ्यांत कशाला पाणी…

हे गुणगुणणारे तसंच,

‘ती शून्यामधली यात्रा वाऱ्यातील एक विराणी,

गगनात विसर्जित होता, डोळ्यांत कशाला पाणी… ‘

हे तत्वज्ञान भरलेलं अंतिम सत्य कुसुमाग्रज स्वत: सांगताहेत, असाच भास झाला. ‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी… ‘ हे विचार आचरणात आणणं तर सोडाच, परंतु सुचणेसुद्धा किती कठीण आहे, हे त्याक्षणी जाणवले आणि या महामानवाची प्रतिमामनात उंच उंच होत गेली.

दुसऱ्या दिवशी गोदाकाठ साश्रुनयनांनी निरोप देण्याकरता तुडुंब भरला होता. लहान-मोठी, सारी मंडळी, प्रत्येक मजल्यावर, गच्च्यांवर, झाडांवर बराच वेळ उभी होती. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ मधून क्रांती नसांनसांत उसळवणारा, सामाजिक जाणिवेचा ओलावा असणारा, माणुसकी जपणारा, ‘नटसम्राट’सारखं कालातीत नाटक लिहिणारा, कादंबरी, लघुकथा, काव्य, लघुनिबंध, अशा अनेक क्षेत्रांत स्वच्छंद संचार करणारा, संयमी कलाकार आणि मला ‘स्वरचंद्रिका’ हा अत्यंत सन्मानाचा मुकुट चढवणारा ‘शब्दभास्कर’ अनंतात विलीन झाला… गगनात विसर्जित झाला. मला मराठीची गोडी लावणाऱ्या, वैभवशाली करणाऱ्या महामानवाला पाहून बराच वेळ मी आवरून धरलेला बांध फुटला…

“एकच आहे माझी दौलत, नयनी हा जो अश्रु तरंगत

दुबळे माझे ज्यात मनोगत, तोच पदी वाहू

मी काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव..

काय तुला देऊ.. ’’

असं मनात म्हणत, मी या नाशिकच्या ‘श्रीरामा’च्या चरणी पुष्पहार वाहिला आणि शेवटी हारातली दोन सुटी फुलं घरी घेऊन आले…. आठवणी कायमच्याच जपून ठेवण्यासाठी!

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पक्षी जाय दिगंतरा… कवयित्री : कै. डॉ. मीना प्रभू…संग्राहक : डॉ. शेखर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

पक्षी जाय दिगंतरा… कवयित्री : कै. डॉ. मीना प्रभूसंग्राहक : डॉ. शेखर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

काय मरण मरण – मला नाही त्याची भीती

होते सामोरी घेऊन – पंचप्राणाची आरती 

माझं मरण मरण – त्याने यावं अवचित 

त्याच्या शुभ्र पंखावरी – झेपावीन अंतरात 

दवओल्या पहाटेस – त्याचे पाऊल वाजावे

उषा लाजता हासता – प्राण विश्वरूप व्हावे.

माध्यान्हाच्या नीलनभा – जाई गरुड वेधून 

त्याच्यापरी प्राण जावे – सूर्यमंडळा भेदून 

किंवा गोरज क्षण यावा – क्षण यावा आर्त आर्त

जीवितास काचणारी – हुरहुर व्हावी शांत

शांत रजनी काळोखी – घन तिमिर निवांत 

शंकाकुल द्विधा मन – विरघळो सर्व त्यात 

वैशाखीच्या वणव्यात – एक जीव अग्नीकण 

शांतवेल होरपळ – जेव्हा वरील मरण 

जलधारांचा कोसळ – होता सृष्टीचे वसन 

जीव शिवाला भेटावा – बिंदू सिंधूचा होऊन

गारठली पानं सारी – हिमवार्‍याशी झोंबत 

देठी सहज तुटता – न्यावे मलाही सोबत 

नको चुडा मळवट – नको हिरे, मणी, मोती

नका सजवू देहाला – नाही आसुसली माती 

नको दहन दफन – नको पेटी वा पालखी 

मंत्र, दिवा, वृंदावन – मला सगळी पारखी 

नको रक्षा हिमालयी – गंगा अस्थी विसर्जन 

धुक्यात जावी काया – आसमंती झिरपून 

पंच भूतांनी बांधला – देह होता एक दिनी 

पंचतत्वी तो विरावा – नकळत जनांतूनी

खरे सांगू माझे निधन – झाले कार्तिक संपता 

आज त्याची जनापुढे – घडे निव्वळ सांगता 

जाता जाता एक ठेवा – उरी पोटी जो जपावा 

माझ्या कार्तिकची बट – फक्त हृदयाशी ठेवा.

त्याच क्षणी समस्तांची – स्मृती जावी निपटून 

मागे ऊरू नये माझी – भली बुरी आठवण 

स्मृतींची त्या ढिगातून – आठवांचे ढग येती 

डोळा इवला प्रकाश – वेडी आसवे गळती 

नको सोस आता त्यांचा – जीव सत्यरूप झाला 

कशासाठी कष्टी व्हावे – ओघ पुढती चालला.

दुवा मागल्या पिढीचा – पुढचीशी जुळवून 

माझे बळदले काम – सार्थ आता निखळून

असे अब्ज अब्ज दुवे – आजवर निखळले 

विस्मृतीच्या पंखाखाली – दुवे त्यांचेच जुळले 

 दुवे त्यांचेच जुळले… 

या कवितेच्या शेवटी कवयित्रीने लिहिलंय – 

‘सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार आणि माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मन:पूर्वक क्षमायाचना आता तुमची नसलेली, मीना.’ 

प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू

प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचे १ मार्च २०२५ रोजी दु:खद निधन झाले. पेशाने भूलतज्ञ असलेल्या प्रभू यांनी आपल्या लेखनाने प्रवासवर्णनाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले होते. मराठीत प्रवासवर्णनपर लेखन सातत्याने करणाऱ्या डॉ. मीना प्रभू यांची प्रवास वर्णनाबरोबर कादंबरी आणि कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. पण त्यांची मराठी साहित्यात ओळख होती ती प्रवासवर्णनकार म्हणूनच. त्यांनी याद्वारे मराठी साहित्यात एक नवा प्रवाह रूढ केला. मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच त्यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी पुण्यात २०१७ मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.

कै. मीना प्रभू यांनी काही वर्षांपूर्वी त्यांचे मनोगत वरील कवितेतून व्यक्त करून ठेवले होते ही गोष्ट अचंबित करणारी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

संग्राहक – डॉ. शेखर कुलकर्णी 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares