श्री विनय माधव गोखले
मनमंजुषेतून
☆ “कंडक्टर…” भाग-१ – लेखक : श्री सुधीर खांडेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
व्यवसायाच्या निमित्तानं माझं खूप वेळा बाहेरगावी जाणं व्हायचं. त्यामुळे खूप वेळा प्रवास घडायचा, त्यांच्या खूप आठवणी माझ्या मनात घर करून आहेत. या सर्व घटना साधारण ८/९ वर्षांपूर्वी घडलेल्या असल्या तरी कधीतरी अचानक मनाच्या खोल कप्प्यातून बाहेर पडतात आणि आजूबाजूला रुंजी घालायला लागतात . मानवी स्वभावाची जडणघडण, त्यांचे वेगळेपण, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. यात भेटलेल्या सर्वच व्यक्ती या सामान्य आणि अतिसामान्य वर्गातील होत्या, पण त्यांच्या वर्तणुकीचा जो वस्तूपाठ पाहायला मिळाला त्यामुळे त्यांनी गाठलेली उंची ही त्यांना असामान्यत्व बहाल केल्याशिवाय राहात नाही. ही असामान्य व्यक्तिमत्वच आपली प्रेरणा स्थानं आहेत याची नव्याने जाणीव झाली.
ह्या सर्व घटना वर म्हटल्याप्रमाणे २०१५ ते २०१८ या काळात घडलेल्या आहेत.
त्यावेळी मी प्रत्येक बुधवारी मुंबईला जात असे.
जाताना सकाळी लवकर रेल्वेनं जाऊन येताना मिळेल तसं रेल्वे किंवा बस पकडून पुण्याला परत यायचं हे अनेक वर्षं रुटीन चालू होतं. येताना आमच्या व्यवसायाकरीता लागणारी वेलची वाशी मार्केटमध्ये जाऊन घेऊन येणं हा सुद्धा रूटीनचा भाग होता.
असंच एका बुधवारी वाशीहून पुण्याकडे जाणा-या बस स्थानकावर बसची वाट पाहत होतो. वेलचीचं दहा किलोचं छोटं बाजकं पण बरोबर होतंच. वेलचीचा खूप घमघमाट सुटायचा हे वेगळं सांगायला नको. तास दीड तास झाला तरी शिवनेरीचा पत्ता नव्हता. ज्या एक दोन आल्या त्या भरुन येत होत्या. त्यामुळे दोन तासांनी नाईलाजाने मिळेल त्या कर्नाटक राज्याच्या बसमध्ये बसलो. बसमध्ये मोजून ५/६ जणच होते. कंडक्टर आला तिकीट घेतलं, त्यानं चौकशी केली साब ” वेलची का अच्छा खुशबू आता है ” मग वेलची कुठून आणली, कशासाठी आणली, त्याचा उपयोग काय इ.ची जुजबी माहिती त्याला दिली. इतरांना तिकीटं देण्यासाठी पुढे निघून गेला. मी आपलं नेहमीप्रमाणे वाचन करायला सुरुवात केली.
काही वेळाने कानावर कानडीमध्ये चालू असलेली जोरदार बाचाबाची ऐकू आली. एका तरुण बाईबरोबर कंडक्टर तावातावाने बोलत होता. समजत काही नव्हतं पण बहुदा तिकीटाच्या पैशाबाबत काही तरी बोलणं चालू होतं असं लक्षात आलं. शेवटी त्यानं बस थांबवली आणि त्या बाईला खाली उतरण्यासाठी आग्रह करू लागला. तेंव्हा मात्र ती गयावया करून रडायला लागली. त्याबरोबरच तिचं एक वर्षांचं बाळ आणि ३/४ वर्षांचा मुलगा पण रडायला लागले.आणि एकच गोंधळ उडाला. त्यांचं कानडी बोलणं समजत नसल्याने मीच कंडक्टरला काय प्रकार आहे हे विचारलं. त्यानं सांगितलेली गोष्ट ऐकून एकदम धक्काच बसला…..
…… ती बाई म्हणे नव-याशी भांडण करून हाताला लागतील तेवढे कपडे आणि पैसे घेऊन तिच्या माहेरी कर्नाटकात जायला निघाली होती. पण पैसे अपुरे पडत असल्यानं कंडक्टर पुण्याला उतर आणि नंतर काय करायचं ते कर असं बजावत होता. मोठाच बाका प्रश्न निर्माण झाला होता. ती तरुण बाई लहान मुलांना घेऊन कुठं आणि कशी जाईल याची काळजी मला वाटायला लागली. काहीतरी तोडगा काढण्यासाठी मी पुढे झालो पण त्या बाईला कानडीशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती. मग कंडक्टरलाच दुभाष्या बनवून मी अडचण समजून घेतली. ती बाई मला म्हणाली, ” तुम्हीच माझे अण्णा (मोठा भाऊ) आहात, मी रात्री अपरात्री छोट्या मुलांना घेऊन कुठं उतरू ? तुम्ही मला थोडे पैसे उधार द्या. मी गावाकडे गेले की तुम्हाला मनीऑर्डर करून पैसे परत पाठवते.”
अशा गोष्टींचा अनुभव असल्याने माझा तिच्यावर विश्वास बसणं शक्यच नव्हतं. पण तरीही ती बाई चांगल्या घरातील वाटत होती त्यामुळे तिला पैसे देऊन टाकावेत, जाऊ देत बुडीत खात्यात, असा विचार मनात आला. नाहीतरी शिवनेरी बसनं गेलो असतो तर ४५०/- रुपये तिकीट पडलं असतं आणि आताच्या बसला १५०/- रू खर्च झाले आहेत. मग जास्तीचा विचार न करता ५०/- रू. जवळ ठेवून ४००/- रू. कंडक्टरकडे दिले आणि एवढे पैसे तिला तिच्या गावापर्यंत पोचायला पुरतील का असं विचारलं तेव्हा त्याने आताचं गुलबर्ग्यापर्यंतचं आणि दुस-या पुढच्या बसचं तिकीट जाऊन १०/२० रू. शिल्लक राहतील असं सांगितलं. हा प्रकार बघून बसमधील इतर ४/५ जणांनी २००/- रू गोळा करून मुलांना खाऊ म्हणून दिले. हे बघून ती बाई अक्षरशः उठून रडायला लागली , पाया पडायला लागली. तुमचा पत्ता द्या. मनीऑर्डरने पैसे पाठवते असं म्हणायला लागली. पण मी नको म्हणून सांगितलं आणि गावाला गेलीस की नव-याला बोलावून घेऊन भांडणं मिटवून टाक असा सल्ला कंडक्टरकरवी दिला.
कोथरूड आल्यावर मी उतरण्याआधी, तिला जपून जा, मुलांकडे लक्ष दे असं सांगितलं आणि कंडक्टरला पण तसं बजावून तिला सकाळी तिच्या गावाकडे जाणा-या बसमध्ये बसवून देण्याची सूचना दिली. घरी गेल्यावरसुद्धा ती सुखरूप घरी पोचेल की नाही याची काळजी करत बसलो आणि एकीकडे तिला आपण मदत केली यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेत राहिलो. अर्थात हे प्रकरण आठवडा भरात विसरून गेलो. माझं रूटीन चालूच होतं. दीड दोन वर्षे पूर्ण झाली असावीत या घटनेला.
क्रमशः भाग पहिला
लेखक : श्री सुधीर खांडेकर, पुणे.
संग्राहक – श्री विनय माधव गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈