डॉ. प्राप्ती गुणे
मनमंजुषेतून
☆ ‘ट्रान्सफॉर्मेशन’ चा श्रीगणेशा… ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆
आजकाल जिकडे पाहाल तिकडे सोशल मीडियावर ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओज ची मांदियाळी आहे.
बिफोर अमुक वजन आणि आफ्टर 10 किलो, 20 किलो, 30 किलो कमी झाल्यानंतरचे हे व्हिडिओ आपल्याला प्रेरित केल्यावाचून राहत नाहीत. आपलाही असाच एक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ बनवावा, ही सुप्त इच्छा नकळत मनात जन्म घेतेय, अनेकांच्या ! आणि मग सुरू होतो या ‘ट्रान्सफॉर्मेशन’ चा प्रवास….
जिमला जायचंच असं पक्कं ठरवलं की मग चौकशी केली जाते. जिममध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर तिथल्या भिंतीवरचे मोटिवेशनल कोट्स वाचून, उत्साहवर्धक म्युझिक ऐकून, अनेक बॉडी बिल्डर मंडळींना ‘ हिरो ‘ स्टाईलने वजन उचलताना पाहून भारावून जायला होतं. मनातल्या ‘ ट्रान्सफॉर्मेशन ‘ची कल्पना डोळ्यासमोर तरळायला लागते आणि ती प्रत्यक्षात उतरणार, हे अगदी खरं वाटायला लागतं.
जिममध्ये सहा महिन्यांची, वर्षाची फी एकत्रित भरली की ‘ एवढा डिस्काउंट मिळेल ‘ अशी आकर्षक ऑफर बिंबवून सांगितली जाते. आणि आपणही आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात मान डोलावून मोकळे होतो. … चला, पहिलं काम तर झालं ! जिमची फी भरली…
आता एवढे भारी व्यायाम प्रकार करायचे तर त्याला शोभून दिसणारे कपडे नकोत, साजेशे शूज नकोत ?
चला, बाजारात खरेदीला…. हुश्श ! सगळी तयारी परफेक्ट झाली… आता जिमला जायचं फक्त बाकी राहिलं…
… जिमच्या पहिल्या दिवशी शरीराला सवय नसल्याने कमी व्यायाम करायचा असतो. पण काही उत्साही वीरांनी निश्चित टार्गेट एकाच दिवसात निम्म संपवायचं असं जणू मनात ठरवलेलं असतं.. सगळा व्यायाम आटोपला की थोड्या वेळाने अंगाची ओरडाआरडी सुरू होते.. हात जरासे हलवले तरी दुखतात… चालण्यासाठी पाय मुश्किलीने उचलावे लागतात… संपूर्ण शरीर ठणकत असतं… आणि मग…?
… मग, काय ? दुसऱ्या दिवशी जिमला सुट्टी !!!
मला कोणत्याही पद्धतीने व्यायाम, जिम अथवा जिम लावणारे यांच्यावर कोणताही आक्षेप घ्यायचा नाही.
वर सांगितलेलं हे फक्त एक जरासं रंजित पण खरं उदाहरण आहे. अनेकजण नियमितपणे व्यायाम करणारे आहेत, आरोग्याबाबत जागरूक असणारे आहेत व जिमला रेग्युलर जाणारे आहेत…
… पण माझा म्हणायचा मुद्दा एकच ! …
*जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला बाह्य शरीरात हवंय, ते होण्यासाठी आणि ते करण्याअगोदर आपण आपल्या अंतररुपी मनोधारणेत बदल करणं खूप आवश्यक आहे,.. असं मला वाटतं*.
स्वतःला प्रत्येकाने एक प्रामाणिक प्रश्न विचारला पाहिजे.. ” मला माझ्या शरीराबद्दल किती आदर वाटतो ?”
एकदा मनुष्याने स्वतःच्या आरोग्याचा सन्मान करायला सुरुवात केली की, ह्या बाह्यरूपी ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास सोपा होतो आणि तो पूर्ण व्हायला मदत होते. हे माझे स्वानुभवाचे बोल आहेत.
अनेकदा आपण आपलं निश्चित ध्येय गाठतो, परंतु कमी केलेलं वजन परत वाढतं आणि आपण पुन्हा पूर्वपदाला येऊन पोहोचतो. असं का ? एकदा ध्येय गाठलं की संपलं…पुन्हा खमंग आणि गोडाधोडाचे पदार्थ खाणं सुरू होतं. जिभेचे चोचले आणि पोटाचे लाड पुरवणं सुरू होतं…..
… आणि मग.. मग पुन्हा जैसे थे !
जर आपल्याला आपल्या शरीर आणि आरोग्याबद्दल रिस्पेक्ट असेल तर मात्र सगळं बदलतं…
आता गणपती बाप्पाचं आगमन होतंय. दहा दिवस खाण्यापिण्याची मस्त रेलचेल असेल…
– तर मग मी तीस मिनिटे जरा एक्सट्रा फिरतो..
– घरात मिठाई बनवताना साखरेचे प्रमाण मी कमी करते..
– बाहेरून मिठाई आणताना लक्षात ठेवून मी कमी गोड मिठाई आणतो..
– बाप्पा घरी सुट्टीसाठी आलाय, पण मी माझ्या व्यायामाला अजिबात बुट्टी होऊ देणार नाही..
– बाप्पाला वेगवेगळ्या फळांचा प्रसाद ठेवूयात..
– घरच्या घरी प्रयोगशील बनून, बाप्पाला आरोग्यदायी रेसिपीची नवलाई चाखवूया..
… वगैरे, वगैरे.. असं सगळं निश्चित ठरवता येईल की..
पण हे सगळं फक्त बाप्पा घरी आहे तेवढ्यापुरतंच ठरवून — फक्त ठरवून नाही, तर प्रत्यक्ष आचरणात आणून चालणारच नाही. हे सगळे नियम कायमसाठी पाळले तरच अपेक्षित ते ट्रान्सफॉर्मेशन होईल ना ? मग त्यासाठी काय करायला हवं तर कोणत्याही मोहाला बळी पडताना, एक क्षण थांबून आपण स्वतःलाच विचारावं .. ..
* मला माझ्या शरीराबद्दल आणि त्याच्या आरोग्याबद्दल खरोखरच मनापासून आदर वाटतो की नाही वाटत ? आणि वाटत असेल तर मग ही अमुक एक कृती माझ्या आरोग्यासाठी हितदायक आहे का ? जर ही कृती केल्याने माझ्या आरोग्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार असेल, तर या क्षणिक मोहाला मी बळी पडणार नाही* ! आणि हा निश्चय मात्र अगदी ठाम हवा बरं का .. “ केल्याने होत आहे रे – पण – आधी केलेची पाहिजे “ हा उपदेश आधी तुमच्या मनावर बिंबवला जायला हवा. आणि तो अगदी काटेकोरपणाने आणि अगदी मनापासून पाळला जायला हवा. मग बघा तुमच्याही नकळत हळूहळू कसे हवे ते बदल व्हायला लागतात.
सुरुवात जर या ‘ आंतरिक ट्रान्सफॉर्मेशन ‘ च्या नियमित सरावाने केलीत ना की तुमच्या ‘ बाह्यरूपी ट्रान्सफॉर्मेशन ‘ चा व्हिडिओ ‘ व्हायरल ‘ झालाच म्हणून समजा..!!!
मग आता लगेच करूयात अशा ट्रान्सफॉर्मेशन चा ‘ श्रीगणेशा ‘ ?
© डॉ. प्राप्ती गुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈