☆ “मोलाचा संदेश देणारी छोटी घटना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
माझी मलाच लाज वाटली. खजिल झालो.
आजूबाजूच्या छोट्या छोट्या घटना आपल्याला काही सुचवत असतात.
आज दक्षिण मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या जेवणासाठी गेलो असताना व सोबत कोणी नसल्यामुळे एक भाजी आणि दोन तंदूर रोटी ऑर्डर केल्या. मला पहिलेच कल्पना होती की भाजी खूप जास्त देण्यात येणार आहे त्यामुळे मी पहिलेच मन बनवलं होतं की आपण भाजी आणि एक जास्तीची तंदूर रोटी पार्सल म्हणून बांधून सोबत घेऊन गरजूला द्यायची.
माझं जेवण अर्ध्यात असतानाच एक उद्योजक अथवा व्यावसायिक असलेला तरुण माझ्या टेबलवर येऊन बसला. त्याने पण काही ऑर्डर केले. माझं जेवण संपण्याच्या आधी त्याची ऑर्डर आली त्यांनी आधी वेटरला बोलावून जेवण सुरू करण्याआधी त्यानी मागितलेल्या भाजीचा अर्धा भाग आधीच सोबत नेण्यासाठी पार्सल करण्यास सांगितले. सोबत माझ्यासारखेच त्यानी काही तंदुरी रोटी ऑर्डर करून त्यात भाजी सोबत द्यायला सांगितले. त्याने ऑर्डर केलेल्या भाजीचा अर्धा भाग पार्सल म्हणून पॅक झाल्यानंतरच त्याने जेवायला सुरुवात केली.
त्याच्या या कृतीमुळे व त्यामागच्या भावपूर्ण व्यवहारामुळे मला माझीच लाज वाटली. मी त्याला विचारले की हे पार्सल घरच्यांसाठी आहे का ? तो म्हणाला नाही कोणीतरी गरजूला मी जेवण झाल्यावर देइन. मी त्याला विचारले की पार्सल जेवण झाल्यानंतरही घेता आली असते. तो तरुण मला म्हणाला जेवण झाल्यानंतर पार्सल करून कुणाला दिल्याने आपण कोणावर तरी उपकार केल्याचा आणि अहंकाराचा भाव येतो आणि जेव्हा आपण जेवण सुरू करण्याआधीच शिल्लक राहणारे अन्न कोणासाठी पॅक करून घेतो त्यात मदत, समाधान, स्वाभिमानाचा भाव येतो. समोरचा माणूस पण स्वाभिमानी आहेच हा विचार करून आपण त्यालाही मदत केली पाहिजे आणि मी कुणालाही देताना हे आवर्जून सांगतो की हे मी जेवणापूर्वीच पॅक करून घेतले आहे असं जर मी सांगितलं नाही समोरच्यालाही संकोचल्यासारखे अपराध्यासारखे वाटते.
घटना छोटी आहे पण संदेश खूप मोलाचा आणि जीवनाकडे आपली पाहण्याची दृष्टी अधिक विकसित व संवेदनशील करण्याचा होता.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माझ्या घरी काम करणारी प्रीति सांगत आली, “ काकू, आपल्या बागेत ते छोटे झाड आहे ना, त्यावर एक कबूतर मरून पडलंय आणि दुसरं अर्धवट जिवंत आहे. मला हात बी लावायची भीति वाटतीय.”
मी काहीतरी वाचत होते. म्हटलं “ थांब. बघून येते काय झालंय ते.”
घाई घाईने बागेत गेले. खरंच की. एक कबुतर मरून लोंबकळत होतं आणि बिचारं दुसरं फडफड करत पंख उडवून उडायचा प्रयत्न करत होतं. जवळ जाऊन बघितलं तर त्या दोघांचे पाय एका प्लास्टिकच्या पातळ दोरीत गुंतले होते आणि त्या दोरीचा गळ्याला फास लागून बिचारं एक गतप्राण झालं होतं. मला इतकं वाईट वाटलं सांगू… दुसरं जिवाच्या आकांताने फडफड करत होतं पण बिचाऱ्याच्या पायात गुंतलेली ती दोरी काही सुटत नव्हती.
मुलीला म्हटलं, ” जरा छोटी कात्री आण ग ”.. तिने कात्री आणून दिली. बिचाऱ्याच्या त्या नाजूक काडीसारख्या पायातून रक्त आलं होतं. मी हळूच कात्रीने ती निळी वायर अगदी अलगद हाताने थोडी कापली. इतक्या करकचून गाठीवर गाठी बसल्या होत्या की समजेचना नक्की कुठे कापावे. आपले पाय सोडवण्याच्या प्रयत्नात आणखी आणखीच निरगाठी बसल्या होत्या. करुण डोळ्यांनी ते माझ्याकडे बघत होतं.
माझ्याही नकळत मी त्याच्याशी बोलत होते, “ कसा रे बाळा अडकलास ?अशी कशी दोघांना एकदमच गाठ बसली रे? थांब हं. आपण मोकळं करू तुला हं.”
आमच्या झाडाला आधारासाठी दिलेली काठी मी हळूच बाजूला केली. ती फांदी वाकवली. जिथे ती निळी वायर दिसली तिथे अगदी नाजूक हातानी अगदी छोट्या कात्रीने कापत गेले. मला भीति वाटत होती, याच्या नाजूक पायाला कापताना दुखापत होणार नाही ना? शिवाय ते मेलेले कबूतर आणि हे, दोन्ही विचित्र तऱ्हेने असे गुंतले होते की मला दिसतच नव्हते नक्की कसे ते अडकले. मी हळूच निळी वायर कापत होते.
माझी मुलगी हळहळ करत मागे उभी होती. “आई, किती ग दुखत असेल त्याला. कोणी मुद्दाम बांधलंय का ग असं?खेळ म्हणून?” तिच्या डोळ्यात पाणी होतं.
मी अलगद हातांनी दिसेल तिथली गाठ मोकळी करत होते. आता त्याचा एक पाय मोकळा झाला. त्याची फडफड वाढली. मला दिसत होतं, याचा पाय चांगलाच दुखावलाय.
शेवटची गाठ सोडवली आणि त्या मृत कबुतरासकट हे जिवंत कबूतर धपदिशी फरशीवर पडलं. पटकन मी ते मेलेलं कबूतर हातात धरून त्याच्यात अडकलेले जिवंत कबूतर मोकळं केलं. त्याने पंखांची फडफड केली आणि पटकन खुरडत का होईना, बागेच्या वाफ्यात जाऊन बसलं… घाबरून त्याची छाती धपापत होती. पण जिवंत राहिलं ते.
लेकीने छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. आम्हाला ते जगल्याचा अतिशय आनंद झाला. पण भिऊन ते आपल्या मेलेल्या जोडीदाराकडे बघत होतं. त्याला वाटत होतं का की आता हा आपला जोडीदार पण उठेल आणि आपण उडून जाऊ असं….
मग आला आमच्या बागेत काम करणारा मुलगा. चंदन. त्याला लेकीने सगळी हकीकत सांगितली.
तो म्हणाला, ” ताई, हे इथेच रात्रभर राहिलं तर मांजर खाऊन टाकील हो त्याला. ”
ते बिचारं खुरडत बसलं होतं वाफ्यात. चंदनने थोडा विचार केला आणि म्हणाला, “ मी याला उचलतो आणि सुरक्षित जागी ठेवतो. ”
दरम्यान मी कबुतराला थोडे शेंगदाणे जवळ टाकले. इकडेतिकडे बघत ते हळूच खाऊ लागलं. पुन्हा आम्हाला आनंद झाला.
मग चंदन म्हणाला, “ ताई, थांबा हं. मी हातावर घेतो त्याला. ”.. त्याने जवळ जाऊन त्याला उचलण्यासाठी हात लावताच कबूतर पंख फडफडवत शेजारच्या टाकीजवळ उडून बसलं. इतका आनंद झाला आम्हा सगळ्याना. मी कामासाठी बाहेर जाऊन आले तरी ते तिथेच बसून होतं.
चंदन म्हणाला, ” अहो, त्याला उडता येत असेल पण आपल्या जोडीदाराच्या उठण्याची वाट बघत ते बसलं होतं बिचारं. ”…. फार वाईट वाटलं आम्हाला.
पण हे प्रीतीने सांगितलं नसतं तर आमच्या लक्षात आलं नसतं आणि याचाही जीव नक्की गेला असता. आम्हाला फार आनंद झाला जेव्हा ते उडून गेलं आणि समोर जाऊन बसलं. , आता त्याचा दुखवलेला पाय हळूहळू बरा होईल. बिचारं खूप वेळ एकटं बसलं होतं टाकीवर. असंही मनात आलं की..
‘समजलं असेल का त्या मुक्या जिवाला, आपला जोडीदार आता आपल्याबरोबर कधीच उडणार नाही ते?’
असो. एक तरी मुका जीव वाचवल्याचा आम्हाला मनापासून आनंद झाला…
…. आणि अचानक आठवले वंदनीय ज्ञानेश्वर महाराज – – “ भूतां परस्परे जडो.. मैत्र जीवाचे “ – अगदी आत्मीयतेने सगळ्यांसाठी ही प्रार्थना करणारे….
आज मराठी भाषा दिन आहे. खरं म्हणजे तू श्वासातच इतकी भिनलेली आहेस की तुला वेगळं काढून एखादा दिवस तुझी गाणी गावीत असं शक्यच नाही. पण असो. श्वास आजन्म घेतला तरी प्राणायामातून घेतलेल्या श्वासानं जसं निर्मळ वाटतं, श्वासाचं खरं मूल्य समजतं तसंच तुझ्याबाबतीत आहे.
आज असंच तुझ्याशी शिळोप्याचं काही बोलावंसं वाटलं. बघितलंस? शिळोप्याच्या गप्पा… किती दिवसांनी वापरला हा शब्द! अगं तो वापरावा इतका वेळच नसतो आणि आता ज्येष्ठ वयात शिळोप्याचं बोलावं तर आहेच कोण रिकामं? मग वाटलं तू आहेस की. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून थोडंसं स्मरणरंजन करावं.
आई, आज ना मला जुन्या स्वयंपाकघरात जाऊन तुला शोधावंसं वाटतंय. आमच्या नव्या किचनमध्ये तू आगदीच मला गरीब वाटायला लागलीयस.
बघ ना, चूलपोतेरे, सांडशी, ओगराळं, उभे लावून रांधप करणं. (अगं, माझ्या नातवंडांनी उभे लावून म्हटल्यावर आ केला. तेव्हा समजावून सांगावं लागलं, बाबांनो, उभेलावणं हा सोवळ्यातल्या स्वयंपाकाचा गणवेश होता. आडजुनं (म्हणजे अगदी पार फाटलेलंही नाही आणि सरसकट नेसायच्याही अवस्थेतलं नाही असं लुगडं अंघोळीनंतर घट्टमुट्ट कासोटा घालून, दोन्ही खांद्यांवरचा पदर पोटाशी खोचून गृहीणी रांधप करायच्या. नंतर सावकाशीनं नेहमीचं लुगडं चोळी परिधान करायची,) बघ शब्द शोधताना त्याच्या संदर्भसंदुकीही उघडाव्या लागतात.
तर, आता कुटणे, वाटणे, निपटून घेणे, चिरणे, परतणे, फोडणीस टाकणे, आधण, वैरणे, लाटणे, थापणे, वळणे या सगळ्यासाठी एकच… ‘बनवणे. ‘ चहासुद्धा बनवतात. जेवण बनवतात.
शिजवलेल्या अन्नाला स्वयंपाक म्हणतात, ताटात वाढलेल्या अन्नाला जेवण म्हणतात. हे विसरलोय आम्ही.
शकुंतला भांडं, पेढेघाटी डबा, फिरकीचा तांब्या, ताकाचा कावळा (चोच असलेलं झाकणाचं भांडं) गडवा (म्हणजे छोटा उभट तांब्या) वेळणी (म्हणजे पसरट थाळी.. पातेल्यातला भात थेट पानात वाढण्याची पद्धत नव्हती. तो वेळणीत घेऊन उलथन्याच्या टोकाने अगदी शिस्तशीर पंगतीत वाढायचा. ) कर्म माझं… पंगत पण शोधावी लागेल.
पदार्थात मीठ तिखट मिसळत होतो. आता अॕड करतो. भाज्या चिरत नाही. कट् करतो.
तुझ्यात घुसखोरी करणारे हे शब्द आमच्या पिढीला खटकतात गं. पण तू बाई, उदार आहेस हो. सामावून घेतेस सगळ्यांना.
समजावतात काहीजण की, मनातल्या भावना पोचवू शकते ती भाषा. भाषिक आग्रह सोडला तर तळागाळातून संवेदनशील माणसं मोकळेपणे व्यक्त होऊ शकतात. त्यांना काय सांगायचंय ते कळलां म्हणजे पुरे.
काळानुसार झालंय खरं तसं.
पण सांगू का?
तू मुळातच डौलदार, सौष्ठवपूर्ण आणि श्रीमंत आहेस. काही दागिने आता कालमानानुसार कालबाह्य झालेले असले तरी आपल्या संतांनी आपल्या अभंगात, साहित्यिकांनी त्यांच्या प्रातिभ आविष्कारात, आपल्या वेल्हाळ मालणींनी त्यांच्या लोकगीतांत तुला सजवून ठेवलेलं आहे. तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आमचीच आहे. हेच तर आजच्या दिवशी स्वतःला बजावायचं आहे.
मन ओतलं तुझ्याजवळ. खूप हलकं वाटलं बघ.
येत राहीन अशीच तुझ्या उबदार कुशीत.
सारस्वत माये, तुझी कन्या..
वैशाली.
लेखिका : सुश्री वैशाली
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ वाय फाय बालपण… भाग – ३ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी☆
(त्यातला कल्याणी म्हणून एक मित्र होता तो जरा बेरकी होता. _ – इथून पुढे —-
उशिरा येऊन झोपणार आणि लवकर उठून जाणार. तो एका कोपऱ्यात शेवटी झोपत असे. उठून गेला की त्याची चादर व त्याच बेडशीट तसाच टाकून जात असे. हे त्याच बरेच दिवस चालले होतं. एकेदिवशी राजाने मजा करायची ठरवली. सगळीजण लवकरच झोपेच सोंग घेतलं. ट्यूबलाईट विझवली. दरवाजा नुसतं पुढ केला. कल्याणी लाईट बंद आहे बघून आला. त्याने दरवाज्याला कडी लावलं. खालच्या पायाच्या अंगाने सरकत आला. व जोरात अंग अंथरुणात अंग टाकून दिलं. तसा जोरात किंकाळ्या मारत उठला. तस पक्याच्या पायाजवळ लाईट बटन होते, त्यांनी लाईट लावली. सगळी हसत हसतं उठले. कल्याणीला मात्र अंथरुणात लपवलेले खडे दगड जोरात टोचली होती. नंन्तर पक्क्याने त्याला ताकीद केली, तुझं अंथरून तुझं तू काढणे. चादर घडी घालून ठेवणे.
असेच एक दिवस सगळी रात्री झोपले होते. सागऱ्या रोज सकाळी उठल्यावर म्हैस चारायला मोती तळयावर जात होता. जाता जाता पाण्याचा लोटा घेउन जात असे. एके दिवशी रात्री तो सोप्यात येऊन लवकर झोपला. आम्ही सगळी मजा म्हणून.
चुना पातळ केला, कोळसा पण पाण्यात उगाळून त्याच्या चेहऱ्यावर राक्षसचे चित्र कोरले त्यावर सोनकांवाने लाल ठिपके पण दिले. झालं हे महाशय उठल्यावर नेहमी प्रमाणे म्हैस सोडली. आणि हातात लोटा. हे ध्यान चावडीवरुनं जाताना सगळेच लोक बघू लागले व फिदी फिदी हसू लागले. असं जवळ पास दोन तास चालले होते. त्यात आमची रात्रीची झोपणारी मुलं होती. मुद्दाम बाहेर काय चाललंय बघण्यासाठी मोती तल्यावर गेले व लांबून नजारा बघत फिदी फिदी हसतं परंतु लागले. झाले परत हे ध्यान घरी आल्यावर त्याचीच आई बघून हसू लागली. गल्लीत पण सगळे हसतं होते. शेवटी नं राहवून त्याने आरसा बघितला. गरम पाण्याने तोंड धुवून घेतले. ते तडक आमच्या घराकडे आला. पण घरात कोणीच दिसलें नाही. आम्ही परस दारी मुद्दाम बसलो. ते ध्यान परत घरी फिरले. मग आम्हाला पण हसू आवरले नाही.
दिवस उन्हाळ्याचे पाण्याचे हालं होतं होते. जो तो उठला की घागरी घेउन पाणी भरण्यासाठी जाऊ लागला. अडाचे खार पाणी खर्चाला. आणि प्यायचे पाणी दवाखान्याच्या विहिरीचे. हा सरकारी दवाखाना पार गावापासून दीड किलोमीटर लांब. पण नाईलाज होता. गावात चहुकडे हेच चित्र होते. पाणी भरले की अकरा वाजता न्याहरी. शिळ्या भाकरी दही चटणी काय असेल ते खाऊन, पोहायला विहीरवर. चांगले दोन तीन तास पाण्यात उड्या मारून, तिथे पण शिवाशिवीचा खेळ रंगत असे. गावातील सगळी मुलं विहिरीवर. कोण शिकणारा, कोण शिकवणारा असं चालेल असे. घरात अंघोळ केली की परत दोन बार्डी पाणी वाया जायला नको म्हणून घरात पण काही बोलत नसतं. पोहून आले की जेवण व दुपारी पत्ते कुटणे किंवा चिन्नी दांडू.
उन्ह वाढत चाललेल. उष्मा व घामाच्या धारा, घरातील उन्हाळी कामे चालूच होती.
पाणी भरणे, म्हसर चरयाला सोडणे. येताना शेतातून कडबा वैरण आणणे. दुपारी खेळ. संध्याकाळी फिरायला जाणे. चिकोडी रोडवर एक स्वामी आलेले. वय झालेलं. अंगाने कृष व सावळे, लहान मूर्ती होती. म्हूणन त्यांना मरी बाबा म्हणत असतं. मरी म्हणजेच कानडीत लहान बाबा. भाविक त्यांना येऊन रोज नमस्कार करीत. आणि आपले गाऱ्हाणं सांगत. त्याप्रमाणे त्यांना उपाय पण स्वामी सांगत असतं. लोक त्यांना मानत असतं.
आम्ही पण रोज संध्याकाळी फिरायला गेलो की नमस्कार करून. त्यांना सगळेच एकच प्रश्न विचारत होतो. बाबा आम्ही परीक्षेत पास होऊ का. त्यावर ते होणारच असं उत्तर देत. संध्याकाळी गार वारा सुटला की, आम्ही तो अंगावर मनसोक्त घेत असू. येताना वरच्या बस स्टॅन्ड जवळ, कोठारी यांची ऑइल मिल.
त्यात सरळ आत घुसून शेंगतेल कस काढल जात असे ते रोज बघत होतो. शेंगदाणे पण खाऊन, आवर्जून गरम पेंड पण खात होतो. ति खायला गोड आणि तेलकट लागतं होती.
तसेच मिरज रोडला एकमेव स्लॅब असलेली इमारत होती. त्याचा जिना बाहेरून असल्यामुळे, आम्ही त्या टेरेस वर जाऊन गार वार अंगावर घेत असूत. इमारतीत निलगिरी तेल, कांही औषधी तयार होतं असतं.
घरात आले की मग गाण्याच्या भेंड्या, गावाच्या नावच्या भेंड्या खेळत असू. उन्हाळ्यात रात्री आमच्या अंगणात चांदणी भोजन होतं असे. प्रत्येक जण घरातून ताट वाढून घेउन येत असे. नाही म्हणायला, घरातून आम्ही पाणी, लोणचे चटणी आंबील आणि ताक मधो मध आणून ठेवलेले असणार. ज्यांना जे पाहिजे ते ताटात वाढून घेत असे. अंगत पंगत चांदणी भोजन झाले की, अंगणातच सगळी झोपत होतो. त्यामुळे आम्हाला उन्हाळा जाणवत नसे.
उन्हाळ्यात शेंगाचे बी तयार करण्यासाठी शेंगा फोडायला सगळेच मित्र जमत. सकाळ पासून संध्याकाळी पर्यंत हे काम चार दिवस चालत असे.
मापट्याला पाच पैसे, त्यावेळी मिळत असे. शिवाय दुपारी भडंग आणि चहा सुद्धा. पण कोणीच मित्र मंडळी कंटाळा करीत नसतं. घरचेच काम काम समजून ते नेटाने पार पडत असे. वर त्यांना पैसे ही मिळत असतं.
घरची शाखारणी करावी लागे. घरे ही कौलरू असल्यामुळे वर्षाला, पावसाळ्या आधीच हे काम होतं असे. बघता बघता रिझल्ट लागे. आणि सगळेच पास होतं असू. वर्षे भरभर निघून गेली. आम्ही सातवी पास झालो. आमच्या वेळी ही बोर्डाची परीक्षा असे, फायनल व्हरनाकुलर म्हणत.
1972 ला आम्ही सहावी पास झालों आणि पाण्याचे दुरभीक्ष. दुष्काळी दिवस चालू झालेले. पाऊस सतत दोन वर्षे पडला नाही. गावात दुष्काळी कामे चालू झालेली.
रोजगारसाठी लोक धडपड करीत रानो माळ भटकंती करत होते. सुखडी वाटली जाऊ लागली. शेति ओस पडलेली. बंडिंगचे काम चालू झाले. विहिरीनी तळ गाठलेला. प्यायला पाणी मिलने अवघड झालेले. पाच किलोमीटर वरुनं प्यायला पाणी आणावे लागे. घरे रिकामी पडू लागली. पीक पाणी नव्हतेच. लोक घरातील धान्य जपून वापरू लागले. दिवस रात्र लोक पाण्यासाठी भटकंती करत होती. काही विहिरीत रात्री दोन वाजता घागर भरत असे. लोक उठून रात्री दोन वाजता पाणी भरत. आमचं टोळक त्यात पुढे असे. रात्री दोन पर्यंत पत्ते कुटायचे. दोन नंन्तर विहिरीवर जाऊन पाणी भरायचे. घरी त्यासाठी सगळ्यांना मुभा दिली जायची.
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा…
मानाच्या पहिल्या कसब्यातील गणपतीला, श्री गणेशाला कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याची प्रार्थना करून, मानाचे आमंत्रण देऊन, मंडळी श्री जोगेश्वरी कडे वळायची. तिथेही जगदंबेला साडीचोळी, ओटी, पत्रिका अक्षत, पान सुपारी देवून मानाच आमंत्रण दिलं जायच. अर्थात श्री गणेश, जोगेश्वरी कृपेने कार्य निर्विघ्नपणे पार पडायचचं आणि वाजंत्री सनईच्या सुरांत शुभमंगल शुभ कार्य साजरं व्हायच. व्हीनस बँड किंवा अप्पा बळवंत चौकातला’ प्रभात ब्रास बँड वरातीची रंगत वाढवायचा. त्याकाळी गाजलेली सुंदर गाणी बँड वर वाजवली जायची. मुलगी सासर घरी गृहप्रवेश करतांना हमखास ‘ जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा ‘ हे गाणं बँडच्या सुरातून अलगद बाहेर पडायचं तेव्हां डोळे भरून आलेल्या वधू मायचा पदर डोळ्याकडे जायचा आणि वधू पित्याचा कंठ दाटून यायचा. पाठवणीच्या त्या हळव्या क्षणी बँन्ड वाल्यांच्या सुरेल स्वरांनी सगळ्यांनाच गहिवरून यायच. इतकं ते गाणं बँड वाले अगदी सुरेख, तन्मयतेने वाजवायचे जोडीला कारंजा सारखे उंच उसळणारे भुईनळे लाल, पिवळ्या चांदण्याची बरसात करायचे. झगमग करणाऱ्या गॅस बत्त्या वरातीची शान वाढवायच्या. माझ्या नातवाची चि. यज्ञसेनची मुंज 2012 साली झाली. इतकी दणक्यात आणि अप्रतिम झाली होती की अशी मुंज उभ्या आयुष्यात प्रथमच आम्ही बघितली. डोळ्याचं पारणं फीटलं आणि आमच्या जन्माचं सार्थक झाल. पूर्वीपासून चालत आलेलं प्रसिद्ध ‘खाऊवाले पाटणकरांचे’ दुकान बाजीराव रोडला आहे त्यांनी मौजीबंधनासाठी उत्तम सहकार्य केले होत. गुरुगृही अध्ययनासाठी आश्रमात आलेल्या बटूचा प्रवेश देखावा, इतका सुंदर होता की आम्ही त्या काळात त्या सोज्वळ रम्य वातावरणात पोहचलो. चि. राजेश चि. प्रसाद या दोन्ही मामांसह बटू मांडवात आला माझा हा नातू चि. यज्ञसेन इतका गोड दिसत होता की नजर लागू नये म्हणून, बोट काजळडबी कडे वळलं. मांडवात बटू प्रवेश देखावा अतिशय सुंदर अप्रतिम होता ‘खाऊवाले पाटणकरांनी’ उत्तम योजना केली होती पालखी वजा शामियान्यातून आमचा यज्ञसेन बटू सगळ्यांचे आशिर्वाद घेत शुभ कार्य मंडपाच्या दिशेने कार्यालयात प्रवेश करीत होता मातृभोजनाला बसलेली माझी लेक सौ मीनल व चि. यज्ञसेंनच्या चेहऱ्यावरचे तेज बघून जिजामाता आणि शिवबा आठवला. आमचे जावई श्री सुजित सु. जोशी कमालीचे हौशी आहेत पेशवे काळात पुण्यामध्ये शुभ, आनंद प्रसंगी हत्तीवरून साखर वाटली जायची आमच्या जावयांनी चि. यज्ञसेनची भिक्षावळ त्याला हत्तीवर बसवून साजरी केली. पगडी घातलेला पेशवाई थाटातला मुंज मुलगा अंबारीत खुलून दिसत होता. ‘हौसेला मोल नाही आणि हौसेला तोड नाही’ म्हणतात ही म्हण जोशी कुटुंबांनी सार्थ करून दाखवली. हा नेत्र दीपक सोहळा अवर्णनीय होता. पुण्यातले प्रत्येकजण शुभ मौज्य बंधन, शुभविवाह सोहळा श्री गणेश श्री जोगेश्वरीचे आशिर्वाद घेऊनच साजरा करायचे आणि आजतागायतही करतात. शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडणाऱ्या श्रीगणेशाला आणि श्री जोगेश्वरीला माझा नमस्कार..
☆ वाय फाय बालपण… भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी☆
(टॉस झाला राज्यावर डाव आला तस त्याच्या टीम मंडळीनी चावडीच्या कट्ट्यावर हात ठेवून वाकली, त्यांचा घोडा झाला. जिंकलेल्या टीम मंडळी ने घोड्यावर जाऊन बसली.) — इथून पुढे —
इकडे राजा आणि पक्क्याने डाव सुरु केला. हातात दांडू घेऊन चिंन्नी ठेवली व उंच हवेत उडवत दांडूने जोरात मारली. चिन्नी जोरात हवेतून भिरभिरून उडाली राज्या कॅच घ्यायच्या प्रयत्नात पळत पळत गेला खरा त्याचा लक्ष्य वर हवेत होतं. वर बघत बघत तो पळत होता, नेमक वाटेत शांता पाण्याची घागर घेऊन जात होती. ती आडवी आली अन राज्याची धडक शांतला लागली. शांताची पाण्याची घागर पडली आणि राज्या शांताच्या अंगावर पडला. पारावर बसलेली लोक आली अन राज्याला बडवायला लागली. तस शांता पण लाजून चूर झालेली तिचा परकर पूर्ण भिजला होता. घोडे आणि घोडेसवार ह्यांना काही कळलंच नाही काय झाले ते. पक्क्याने तर चावडीच्या मागच्या बोळातून पसार झाला. राज्या बसलेल्या लोकांच्या तावडीत सापडला.
घोडे अन घोडेसवार ह्यांच्या ढुंगणावर काठीने मार बसल्यावर ती उठली आणि मिळलं त्या रस्त्याने पळत सुटली. तेवढ्यात शांताची आई काठी घेऊन आली तस गाव गोळा झाले. सगळ्यांनी सुटका करून घेऊन मारुतीच्या देवळात लपून बसली. राज्या अन पक्क्या पण तिथे आले, काय झाले ते पक्क्याने सांगताच जोर जोरात हसत बसली.
शांता लग्नाला आलेली पोर दिसायला देखणी, सावळा रंग मॅट्रिक पास होऊन घरातील घरकाम करत होती. तिची आई गौरा तणतणत काठी घेऊन आली.
मेल्यानो तुम्हाला आया बहिणी आहेत की नाहीत. माजलेत नुसते. आता दावतेच माझा हिसका असं म्हणत इकडं तिकडं मुलांना हुडकायला लागली. तेव्हड्यात बायक्का आली म्हणाली. गौरा गावची पोर हैती, लहान हाईत. खेळता खेळता असं व्हतंय. जा गुमान तूझ्या घरला आता.
मी सांगते त्यांना असं म्हटल्यावर गौरा घरी गेली. अन पडदा पडला.
तस सगळी जण मारुतीच्या देवळातन निसटली आणि सरकार वाड्याच्या पटांगणात आली.
ती जागा पूर्ण पटवर्धन सरकाराची पडीक होती. तिथे कोण पण जात नसे.
तिथलाच चिरर घोडा डाव परत चालू झाला. पक्क्याने परत चिन्नी दांडू वर घेतला आणि हवेत उंच उडवत मारला.
मगाचीच घोडी त्यावरचे घोडे स्वार परत बसलेले. असच खेळ खेळता खेळता चिन्नी उंच उडाली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाच्या डोक्यात पडली. त्याला जोरात लागलं. तस सगळीच मुलानी घर जवळ केलं.
दुपारची जेवण झाली तस परत गल्लीत मुलं जमा झाली. सगळ्यांनी हातात हात घेत चकले. नंन्तर जो शेवट राहिला त्याला घोडा केला. आणि त्याच्यावर पळत येऊन पाठीवर दोन हात ठेवायचे आणि दोन तंगड्या फासून त्याला ओलांडून जायचे. एकलम खाजा दुब्बी राजा तिराण भोजा चार चौकडी असा खेळ सुरु झाला ओलांडून असं करता करता एकाला पाठीवरून ओलांडता आले नाही. दोघेही पडली त्यातला गजाच्या नाकाला मार लागला. नाकातून रक्त येऊ लागले तसा डाव सम्पवण्यात आला.
फाल्गुनी महिना तस उन्ह सुरु झालेलं. शिमग्याचे तसेच वार्षिक परीक्षेचे वेध लागलेले. त्यावेळी शौचालये नव्हती. निसर्ग विधि उघड्यावर ओढ्या काठी किंवा गावंधरीत शेतात होतं असे. आमची सगळीच मुलं वेगवेगळ्या ठिकाणी विधिला जात. कारण कुठे कुठे शेणकुटाचा (गोवऱ्या ) हुडवा रचला आहे. ते पाहून ठेवत. जवळपास कोण आहे, नाही ह्याची पण दखल घेतला. कारण शिमग्याला तो हुडवाचं उचलायचा आमचा प्लॅन असे. प्रत्यके हुडव्यात जवळपास हजार बाराशे शेणकूट असतात.
एक दोन हुडवा उचलला तरी आमची होळी सात आठ फूट उंच जाणारी होती. झाले मग हे काम रात्रीच दहा नंन्तर करायच असेलतर घरी कळणार. म्हणून परीक्षा जवळ आली अभ्यासाला आमच्या घरी झोपायला जाणार असं प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या घरात सांगे. त्यामुळे कुणालाही संशय येत नसे.
आमचा लांब लचक सोपा होता सहजपने दहा पंधरा मुलं मावत होतीच. एक पान पट्टी ( गुडार – झाडीपट्टी ) हंथरली की सगळेच जण झोपत. फक्त येताना ते त्यांची वाकळ, चादर काहीतरी घेऊन येत असतं. एवढा जामा निमा पुरेसा होता.
घरातले दहा पर्यंत झोपत. आम्ही बाहेरून कडी लावत असू जेणेकरून घरात त्रास नको म्हणून. दोन दिवस अभ्यास झाला. पुढे दहा नंन्तर दोन रिकामी पोती घेउन दोन टीम करून पसार.
वेशीबाहेरची, हाळ विहीर आजूबाजूला एक टीम दुसरी टीम पांनंदी कडे. त्यावेळी गावात लाईट पण नव्हती. आम्ही अंदाजे जाऊन शेण कूट गोळा करायचे. व कुणालाही संशय नं येता पागेतील जागेत ढीग रचायचा. असं सगळं चालू होतं. एक दिवशी गम्मत झाली. सगळेच जण चिंचोळ्याच्या विहिरी कडे गेलो. तिथे हुडवा होता. तो हुडवा खुरप्यानी फोडला तीन पोती भरली. चौथ्या पोते भरताना सागऱ्याने हात घातला अन काय ते बोंब मारत खाली निजला. काय झाले कळेना.
मग सगळी जण पोती उचलून पागेकडे आले. सागऱ्याला सायकल वरुनं आणला. आणि त्याला कट्ट्यावर बसवले तो तळमळत होता. कळा पार एकाच हाताला खांद्यापर्यंत गेल्या. मग कळले ह्याला हुडव्यात विंचू चावला होता. घरातून पाणी आणून पाजले. रात्री गावातील डॉक्टरला उठवला आणि इंजेकशन करून आणले. मग शेवटी त्याला आमच्या घरात एक औषध होते. ते चावलेल्या ठिकाणी लावले. मग सगळी झोपली. झोपायला रात्री एक वाजला.
पुढे गावात चर्चा चालू झाली. शेणकूट गायब होतायत. जेवण ते लोक सावध झाले. तोपर्यंत आमचे टार्गेट पूर्ण झाले होते.
शेवटी शिमग्याची पौर्णिमा उजाडली. संध्याकाळी आमची रसद बाहेर काढून गल्लीतील चौकात होळी रचली. ती जवळपास चार फूट रुंद आणि सात फूट उंच होळी रचली गेली. होळी पेटवायला चार मशाली तयार झाल्या. नेहमीप्रमाणे मारुती च्या देवळात नंदादीप वर मशाली पेटवून होळी प्रज्वळीत केली. गल्लीतील सगळ्या घरातील नैवेद्य नारळ त्यात घातले गेले. रात्री धापर्यंत होळी पेटलेली. त्यात कोणी हरभर भाजले कोणी कणसं, भाजून प्रसाद म्हणून वाटू लागले.
दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली. काही जणाकडून पैसे पण वसूल केले. व रात्री उठून मदत केली म्हणून डॉक्टरांचे बिल पण देऊन त्याची सांगता केली.
आता मात्र सगळी जण अभ्यास करण्यात गुंतले. परीक्षा जवळ आलेली. रात्री अभ्यास दिवसा शाळा. घरातील पण कोणीच काम पण सांगत नव्हतेच.
परीक्षा चालू झाल्या, सम्पल्या.
तस बारा बैलाचं बळ आला. घरची कामे. शेतातील कामे वेळ मिळाला की पत्ते कुटणे. जर बुधवार मात्र रात्री नऊ वाजता सोपा गच्च भरु लागला. आमीन सायांनी आणि बिनाका गीत मला ऐकण्यासाठी कान आतुर होऊ लागले. त्यावेळी गावात एकमेव HMV चा रेडिओ बाहेर आणून लावत असू. ते गीत ऐकण्यात धन्यता पण होती. परीक्षा झाल्या तरी मुलं मात्र आमच्या सोप्यातच झोपत होती. त्यातला कल्याणी म्हणून एक मित्र होता तो जरा बेरकी होता.
☆ वाय फाय बालपण… भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी☆
पाव चीट्टी मिट्टी घोडा पुक डोळा झूल !!
एकलम खाजा, डुब्बी राजा तिराण भोजन चार चौकडे पंचलिंग पांडु सायमा गांडू सात कोतडे आष्टिका नल्ली नवी नवं किल्ली दस गुलाबा !!!
मंडळी काय आठवतंय का बघा!! नाही आठवत, बरं. अहो हीच तर आमची परिभाषा! हेच आमचे परवलीचे शब्द. होय हे शब्द आता कोणाला माहित पण नसणार. आमच्या बालपणीचा मोबाईल ग्रुप. आम्ही एका ठिकाणी कधीच शांत बसलो नाही. आमचा ग्रुप हा फिरता होता. अगदी पिंपळावरचा मुंजा! आता गल्लीतील खोताच्या कट्ट्यावर असलो तरी, एकदम डोक्यात काय शक्कल येईल, व सगळेच एकदम गप्प होतील सांगता येत नव्हतं.
त्यावेळी मोबाईलचं काय साधा फोन सुद्धा कुठेही नव्हता! फोन फक्त पोस्ट ऑफिस मध्येचं बघायला मिळणार.
आमची चांडाळ चौकडी ह्या गल्लीतून त्यागल्लीत तर कधी चावडीत, तर कधी कुणाच्याही मळ्यात धुडगूस घालणारी.
सुट्टीचे दिवस तर आम्हाला दिवाळी सारखे वाटायचे. शनिवारी दुपारी शाळा सुटली की, गल्लीतील चौकात यायचे, मग चिंन्नी दांडू पाव चीट्टी मिट्टी — चालू व्हायचे.
ते अगदी घरातील कोणीतरी बोलवे पर्यंत. अरे ये पांड्या तुला पोटाची काय खबर हाय की नाय असं डबाड्याची काशी वरडत यायची. झाले मग सगळी सावध व्हायची. डबाड्याची काशी म्हणजे, गल्लीतील आग, दिवसा ढवल्या तिच्या समोरून कोण जात नसे. उठ पांड्या तुझं मड मी बसवलं असं आरडत येणारी पांड्या ची आई काशीबाई! आली तुला पटकी आं, असं उद्धार करणारी पांड्याची आईच, भाकर तुकडा गिळ अन म्हसर सोड असं तीन म्हटलं की, सगळेच घरचा रस्ता धरायचे. पण सगळीच जेवण करून प्रत्येक जण आपापल्या घरातील म्हसर सोडून सगळीच जण मोती तळ्या कडे.
गल्लीतून नाही म्हटली तरी पंचवीस जनावर! सगळी जण चावडीला वळसा घालून वेशीत, वेशितून मारुतीच्या देवळा जवळून हम रस्ता. तेथून मिरज रोडवर तीतून खालच्या अंगाला ओढा पार केलं की मग मोती तळ. मोती तळ तस गावंधरीत असल्याल. मोती तळ्याच्या आजूबाजूला गायरान जमीन. तिथे सगळी म्हसर गेली की आम्ही परत रिकामेच.
म्हसर एकदा सोडली की झाले. परत आमची टोळ की, चिंचेच्या झाडाखाली हजर.
त्याला झाडाखाली आरामात बसलो की झाले. किरण्या खिश्यात पत्ते घेऊन यायचं. हळूच पत्ते काढले की, पक्क्या डोक्यावरचं खोळ करून आणलेलं पोत झटकून हांतरायचा. खोता चा सागऱ्या, पक्या, हणम्या, किरण्या, राज्या असे सगळेच मिळून पत्ते कुटण्यात गर्क. असा डाव रंगत आला असताना सिद्राम येऊन बोन्म्ब मारायचा.
सुकाळीच्यानों म्हसर दुसऱ्यांच्या रानात सोडून पत्ते खेळता व्हय असं म्हटला की आम्ही काय ते समजायचो.
नक्कीच जवळच असलेल्या सिद्रामच्या शेतात म्हसर चर्याला गेलेत. म्हटल्यावं सगळी खडकन उभी ते धुमशान सिद्रामच्या मळ्यात दाखल.
बघतोय तर काय सगळ्या म्हशी गाजरच्या मळ्यात आरामात चरत होत्या. तोपर्यंत सिद्रामची बायको बोंब मारत आलीचं. मड बशीवलं तुमचं, म्हशी आमच्या रानात सोडून, पत्ते कुटत बसता काय?
सरळ गावात जाते अन तुमच्या घरात जाऊन सांगते. असं म्हटल्यावर सगळीच तिच्या पाया पडू लागली गया वया करू लागली. काकू आमची चूक झाली, परत असं होणारच नाही. त्यावर ती त्रागा करत म्हणे, ह्या पिकाचे नुकसान तुमचा बाप भरून देणार काय ? असं सगळं रंगात येत असताना पक्या पुढ झाला अन गचकन तीच पाय धरु लागला. कारण ती पक्याची चुलत मावशी लागतं होती. मग सगळं वातावरण थंड झाल्यावर, म्हसरांना सरळ मोती तळ्यात सोडल आणि सुटका करून घेतली. आता म्हशी आणि पाणी ह्यांचं जूनं नातं. एकदा का म्हैस पाण्यात गेली की दोन तास गच्चन्ति. बिनघोर होऊन सगळी परत झाडाखाली आले. पत्ते गोळा करून ठेवले.
राज्या हणम्या दोघेही चिंचच्या झाडावर चढली आणि खाली पिकलेल्या चिंचा खाली टाकू लागले तस आम्ही गोळा करत बसलो. एव्हाना संध्याकाळ झालेली. म्हसरांना पाण्यातून कसबस बाहेर काढून घरी परतत, रविवारी सकाळची खेळण्याची अखणी पण झालेली.
आणलेल्या चिंचेत मीठ लसूण गूळ घालून त्याला उखळात चेचलं आणि जोंधळ्या च्या धाटवर त्याला बांधून सगळ्यांना वाटलं. तशी सगळी परत संध्याकाळी तोंडात घणं घट धरून लॉलीपॉप सारख चोखु लागली. खोताच्या दगडी कट्ट्यावर गप्पा चालू झाल्या.
परत दबड्याची काशी आली आणि बोंब मारायला सुरवात केली. तस सगळीजण घरात पसार झाली. रविवार सुट्टी सकाळ उठून धपाधुपी खेळायचं ठरले. चेंडू कुणाकडं नव्हताच. मीच शेवटी घरात आलो. घरात केळीच्या पानांचे द्रोण होते, त्यावर केळीच्या पानांचा चेंडू होता तो घेतला. त्यावर कपडाच्या चिंद्या गुंडाळून बॉल तयार केला अन धपाधुपी चालू झाली. बऱ्याच वेळा तो चेंडू गटारीत पण पडला तसाच उचलला. आणि कापडं रंगीत व्हायला लागली. चेंडू किरण्याच्या हातात लागला. त्याने समोर असलेल्या हणम्या वर नेम धरला व मारला. नेमक हन्म्याने वार चुकवला तो खाली बसला अन समोरच्या पडवीत पोथी वाचत बसलेल्या मोरे काकांच्या तोंडाला लागला ते गटारीच्या
शिक्क्या सकट! ते बघून सगळी पोर घरात पसार झाली. तस शिंदडीच्यानों करत मोरे काका काळ तोंड घेऊन बाहेर आले. बघतात तर कोणच नाही. रागात शिव्या देऊन न्हणी घरात तोंड धुवायला गेले.
मुलं पण घरात जाऊन शिळी भाकरी दही चटणी खाऊन परत चावडीत जमा झालेली. चावडीच्या पटांगणात चिरर घोडा खेळायचं ठरले. त्यात दोन पार्ट्या करायला पाहिजे होत्या. दोन कॅप्टन झाले बाकीचे जरा लांब जाऊन एकमेकांना संगणमत करून कॅप्टन जवळ जोड्यानी जवळ आले. आला आला घोडा काय काय फोडा असा त्यांचा वाय फाय शब्द होता. एक जोडी आली म्हणाली तुम्हाला राम पाहिजे की कृष्ण, एकानी राम घेतला दुसऱ्या नी कृष्ण अश्या विविध नावानी जोड्यांचे वरगीकरण झाले व ग्रुप तयार झाला. आता दोन्ही कॅप्टननी टॉस करायचा होता. पण पैसे कुणाकडंच नव्हते. मग नेहमी प्रमाणे पातळ दगड घेतला, त्यावर एका बाजूला थुंकी लावली. त्याचाच टॉस तयार केला. पाऊस पाहिजे का उन्ह! पाऊस म्हणजेच थुंकी लावलेलीली बाजू.
त्याच्या विरुद्ध उन्ह टॉस झाला राज्या वर डाव आला तस त्याच्या टीम मंडळीनी चावडीच्या कट्ट्यावर हात ठेवून वाकली, त्यांचा घोडा झाला. जिंकलेल्या टीम मंडळी ने घोड्यावर जाऊन बसली.
(28 फेब्रुवारी.. राष्ट्रीय विज्ञान दिन.. एक अनमोल आठवण)
माझी मैत्रीण आणि मराठी विज्ञान परिषदेची कार्यकर्ती, डॉ. मानसी राजाध्यक्षने मला बीएआरसीमधील ‘अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदे’च्या, सुवर्णमहोत्सवी अधिवेशनात ‘मंगलदीप’ कार्यक्रमासाठी विचारले नि अत्यानंदाने मी या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमास होकार दिला. तत्क्षणी डोळ्यांपुढे मी सर्व वैज्ञानिकांसमोर गातेय असे मनोहारी दृश्य तरळले आणि एका इतिहास घडवणार्या कार्यक्रमाचा वर्तमानपट चालू झाला. हा कार्यक्रम सर्वांच्या चिरंतन स्मरणात रहावा, या ध्येयानं मी झपाटले. गाण्याबरोबर विज्ञानाशी सांगड घालून निवेदनही उत्तम व्हावे, या तळमळीने विज्ञानावरची माहिती जळी-स्थळी, मधुमक्षिकेप्रमाणे गोळा करत गेले.
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासून रियाझ करताना ‘मंगलदीप’ डोळ्यांसमोर फेर धरू लागला. कोर्या कॅनव्हासवर माझे रंगांचे फटकारे सुरू झाले. संध्याकाळी प्रचंड मोठे आवार असलेल्या जगप्रसिद्ध बीएआरसीमध्ये शिरताना ‘उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा’ असा आनंद होत होता. खचाखच भरलेल्या सभागृहात समोरच बसलेले थोर वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. जयंतराव नारळीकर, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, डॉ. ज्येष्ठराज जोशी व अनेक विद्वान मंडळी मला ऐकायला आलेली पाहून मलाच माझ्या भाग्याचा हेवा वाटला! ‘‘बालपणी शाळेच्या पुस्तकात ज्या दिग्गजांची नावे वाचली त्यांना पाहण्यासाठी, ते दिसतात कसे, बोलतात कसे हे ऐकण्यासाठी हा कार्यक्रम मी त्वरित घेतला, ’’ असे सांगितले. यावर सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात देशाच्या खर्या हिरोंचे स्वागतच केले. ‘न हि ज्ञानेन सदृशमं, पवित्रं इह विद्यते, ’… ‘‘या जगात ज्ञानाशिवाय इतकी पवित्र आणि सुंदर कुठलीच गोष्ट नाही, ’’ असे सांगून या बुद्धिवंतांसमोर ‘मंगलचरणा गजानना’ या बुद्धिदेवतेच्या वंदनेने प्रारंभ केला. नंतर कविवर्य शंकर रामाणींच्या ‘दिवे लागले रे दिवे लागले’ या कवितेविषयी म्हटले, ‘‘ही एका स्पेशल जागी म्हणजे न्हाणीघरात स्वरबद्ध झालीय! जिथं कॉन्सन्ट्रेशन होतं. ’’ अशाच जागी आर्किमिडीजलाही त्याचा सिद्धांत सुचल्यावर तो ‘युरेका युरेका’ म्हणत ध्यानमग्न अवस्थेत बाहेर आल्याचे सांगताच, छप्पर फाड के टाळ्या कोसळल्या! अक्षरशः लाव्हारस भूगर्भातून उसळल्यासारखा! एकाच वेळी माझ्या नि हजार बुद्धिमंतांच्या मनातले विचार, एक होऊन त्याला अशा टाळ्या येणं याला मी ‘परमेश्वरी कृपाप्रसाद’ म्हणेन. मी म्हटलं, ‘दिवे लागले…’ ही कविता शंकर रामाणींऐवजी थोर शास्त्रज्ञ एडिसननेच विजेच्या दिव्याचा शोध लावल्यावर ‘युरेका युरेका’ म्हणण्याऐवजी ‘दिवे लागले रे दिवे लागले… तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले…’ असेच म्हटले असेल.
त्या काळी विजेच्या दिव्याचा अन् अनेक शोध लावून एडिसनने संपूर्ण जग देदीप्यमान केलं, उजळवलं आणि तुमच्यासारख्या विद्वान मंडळींनी समाजाला असं भरभरून दिलंय, की ‘कुणी जागले रे कुणी जागले…’ आपण सारे एकत्र गाऊन हे सभागृह सुरांनी उजळूया… विज्ञानाशी व एडिसन, आर्किमिडीज यांच्याशी नाळ जुळल्याने सारे सभागृह गात गातच टाळ्या वाजवत समरसून गेले.
आत्तापर्यंत संपूर्ण हॉलभर रसिकांनी ‘पद्मजाला’ अलवारपणे ओंजळीत उचलून, एका सुंदरशा कमळाच्या पाकळ्यांवरती स्टेजवर विराजमान केलं होतं.
पुढचे काव्य इंदिरा संतांचे! केवळ सजीवच नाही, तर संपूर्ण निसर्गातल्या निर्जीव गोष्टींनाही जिवंतपणे मांडण्याची ताकद त्यांच्या कवितेत दिसते. तसंच वनस्पतींनाही प्राण्यांप्रमाणे जीव असतो, त्याही श्वासोच्छ्वास करतात, असं सिद्ध करणार्या थोर वनस्पती शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचं कार्य आणि इंदिराबाईंच्या काव्याची गुंफण घालून ‘दारा बांधता तोरण घर नाचले नाचले, आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले…’ म्हणत सोनचाफ्याच्या पावलांनी आलेल्या सर्वांचे पुन्हा स्वागत केले. शास्त्रज्ञ हा कल्पनेची मोठी झेप घेतो आणि त्याचे स्वप्न सत्यात उतरवतो. ‘स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले…’ हेच खरं! परंतु कवीच्या बाबतीत मात्र ‘जे ना देखे रवी ते देखे कवी, ’ असं म्हणतात. मंगेश पाडगांवकरांबद्दल हेच म्हणावे लागेल. कारण मध्यंतरी ‘‘शुक्र हा ग्रह आहे की तारा?’’ असं विचारल्यावर अनेक सुजाण मंडळींनी अगदी सहज तारा असं उत्तर दिलं
( हशा!) ‘शुक्रतारा मंद वारा ’सारख्या लोकप्रिय गाण्यांमुळे शुक्र हा नक्कीच ‘तारा’ आहे, असा सर्वांचा ‘ग्रह’ होतो. पण माझा तसा ‘आग्रह’ नाही. हा श्लेष ऐकून प्रत्येकजण खळाळून दाद देत होता. नंतर पाडगांवकरांची ‘मी तुझी कुणी नव्हते’ कविता गायले, ज्यातही शुक्रतारा आहेच!
त्यानंतर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत !… सूर्याच्या आकंठ प्रेमात बुडालेली पृथ्वी (कणखर स्त्री) सूर्याला म्हणते…
‘‘परी भव्य ते तेज पाहून पुजून घेऊ गळ्याशी कसे काजवे,
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनी साहवे…’’
हे संगीतात माळलेलं, पृथ्वीचं परिवलन नि परिभ्रमणही सादर केलं. ‘स्थिर स्थिती सिद्धांत’ मांडणारे नि ‘आकाशाशी जडले नाते’ असलेल्या डॉ. नारळीकरांना मी हे गीत अर्पण केलं. टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना स्वीकारताना त्यांच्या चेहर्यावर अतुलनीय आनंद दिसत होता.
त्यानंतर ‘केव्हा तरी पहाटे…’ झाल्यावरच्या धो धो टाळ्या म्हणजे ‘उरले उरात काही आवाज चांदण्यांचेच…’ होते. मी म्हटले, ‘‘इथं अनेक स्वयंप्रकाशी, देदीप्यमान तारे या नभांगणात तेजाळत आहेत. ’’ तेव्हा या चांदण्यारूपी टाळ्या म्हणजे अंगावर प्राजक्ताचा सडाच होता !
यानंतर भारताला ‘जय जवान जय किसान जय विज्ञान’ हा महामंत्र देणार्या, तसंच १९९८ च्या पोखरण अणुचाचणीनंतर भारताची ज्ञान आणि विज्ञानातली प्रगती, यांचं महत्त्व ज्यांनी अधोरेखित केलं, असे भारताचे लाडके माजी पंतप्रधान… अटलजींची कविता ‘गीत नया गाता हूँ…’ किस्सा सांगून सादर केली. अटलजींच्या कवितांचे रेकॉर्डिंग त्यांना ऐकवण्याकरिता आम्ही १३ मे १९९८ ला दिल्लीला गेलो. त्याच दिवशी नेमकी पोखरण अणुचाचणी झाल्याने पी. एम. हाऊस मीडियावाल्यांनी गच्च भरलेले.
भारतावर इतर देशांचा प्रचंड दबाव असल्याने तणावामुळे अटलजींना भेटणे कठीण होते.
शेवटी ३ मिनिटे ठरलेली भेट, ते त्यांच्या कवितेत रममाण झाल्याने २० मिनिटांपर्यंत लाभली… या चाचणीने शांतताप्रिय भारताने, ‘हम भी कुछ कम नहीं’ हे जगाला दाखवून दिले. ‘‘या चाचणीच्या मुख्य चमूचे तसेच थोरियमवर आधारित भारतीय अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक असलेल्या डॉ. अनिल काकोडकर यांना मी अभिवादन करते…’’
माझे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच टाळ्यांचा महापूर झाला!
डॉ. काकोडकरांचा हजार शास्त्रज्ञांच्या साक्षीने त्यांच्याच बीएआरसीमध्ये माझ्या सुरांनी सन्मान करतानाच्या अलौकिक क्षणी, माझा ऊर नि डोळे अभिमानाने भरून आले.
कार्यक्रमाची सांगता मी संगीत नि शास्त्रज्ञांचे नाते उलगडत केली. ‘‘भारतरत्न डॉ. कलाम साहेब उत्तम वीणा वाजवत. ’’ हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या चेहर्यावर १००० व्हॅटचा तेजस्वी प्रकाश होता. आज ते असते तर कार्यक्रमाचा मुकुटमणी ठरले असते.
दिल्लीतील माझ्या संसदेच्या कार्यक्रमात डॉ. राजारामण्णांना उत्कृष्ट पियानो वाजवताना जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं. डॉ. राजारामण्णांचे नाव ऐकताच, आपल्याच घरच्या व्यक्तीचे नाव घेतल्याचा आनंद आणि टाळ्या टाळ्या टाळ्या…! (नंतर मला कळले की, ते डॉ. काकोडकरांसारख्या अनेक महान वैज्ञानिकांचे गुरू होते.)
तसेच फॅबियोला गियानोटी ही स्त्री वैज्ञानिकही उत्तम पियानो वाजवते. हर्शेलसारख्या संगीतकाराने सूर्यमालेतील सातव्या ग्रहाचा, युरेनसचा शोध लावून मग खगोल शास्त्रज्ञ म्हणून नाव केले.
‘‘विश्वातला प्रत्येक शास्त्रज्ञ हा देश व मानव कल्याणासाठी झटत असतो. ज्ञानेश्वरी तर विश्वकल्याणाचे सार आहे, ’’ असे सांगत मी संपूर्ण वंदे मातरम्ने सांगता केली.
रसिकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर मी डॉ. नारळीकरांना भेटले. ‘‘पृथ्वीचे प्रेमगीत मला परत कुठे ऐकायला मिळेल?’’…. हा प्रश्न ‘वन्स मोअर’सारखा आनंद देऊन गेला.
डॉ. काकोडकरांना भेटल्यावर, ‘‘तुमचे शब्द गातात नि सूर बोलतात’’ असा त्यांनी गौरव केला.
संपूर्ण कार्यक्रम नि टाळ्यांचा पूर आजही मनात इंदिराबाईंच्या शब्दाप्रमाणे रुंजी घालतोय…
१९६०/६१ साल असेल ते. एक दिवस भाईंनी (आजोबा -आईचे वडील) पप्पांना त्यांच्या ग्रँड रोडच्या ईश्वरदास मॅन्शन मध्ये बोलावून घेतले. अनेक वेळा अनेक कामांसाठी भाई पप्पांना असे बोलवायचे आणि पप्पा कितीही व्यस्त असले तरी त्यांच्या फिरोजशहा मेहता रोडवर असलेल्या ऑफिस मधून ते बीईएसटी च्या बसेस बदलून ग्रँट रोडला पोहोचत. या वेळच्या त्यांच्या भेटीत भाईंचं नक्कीच काहीतरी विशेष काम असावं.
भाई पपांची वाटच पहात होते. त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला.
“ जना! मी एक प्रस्ताव मांडतोय तुमच्यापुढे. ”
“ मांडा. ”
“मला असं सुचवावसं वाटतंय की आता किती दिवस तुम्ही त्या धोबी गल्लीत राहणार? मला मालूला भेटायला यावसं वाटलं तर त्या लहानशा गल्लीत माझी गाडी पार्क करायलाही जागा नसते. ”
“ मग तुमचं काय म्हणणं आहे?” पप्पा थेट पण शांतपणे म्हणाले.
“ हे बघा जना, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ठाण्यातच तुम्ही एखादा चांगल्या भागात प्लॉट बघावा आणि बंगला बांधावा असे मला वाटते. ”
“ सुंदर कल्पना!”
पांढरे स्वच्छ धोतर आणि सदर्यातलं, सहा फुटी उंच, गोरंपान, करारी डोळे असलेलं एक आदरणीय ताठ व्यक्तिमत्व! त्यांनी त्यांच्या लेकीसाठी ठेवलेला एक प्रस्ताव आणि होकार किंवा नकाराला टाळून दिलेलं पप्पांचं उत्स्फूर्त उत्तर.
पण फार घोळ न घालता भाई पुढे म्हणाले, ” जना! तुम्हाला फक्त प्लॉट खरेदी, जागा निवडणे, कायदे, नंतरच्या बांधकामविषयक बाबी आणि यातायात सांभाळायची आहे. एकही पैसा तुम्ही खर्च करू नका. हा बंगला मला माझ्या लेकीला गिफ्ट म्हणून द्यायचा आहे. ”
“तुमचा निरोप मी मालूला देतो. ” इतकं म्हणून काही अवांतर गप्पा मारून, चहा नाश्ता घेऊन पप्पांनी भाईंचा निरोप घेतला.
या भेटीनंतर पप्पांची मनस्थिती नेमकी काय झाली असेल याचा आता माझ्या मनात विचार येतो.
आमचं रहातं घर जिजीचं होतं. जिजीच्या अपार कष्टातून ते उभं राहिलं होतं. पपांची जडणघडण त्याच घरात झाली होती. अनेक भावनिक आठवणींशी जोडलेलं होतं. शिवाय तसेही
पप्पा पक्के थीअॉसॉफीस्ट होते. भौतिकतेपासून कित्येक योजने ते कायम दूर होते. कुणीतरी आपल्याला काहीतरी देतोय म्हणून आनंदात वाहून जाणारे ते नव्हतेच पण देणारा आणि घेणारा यांच्या नात्यातला भावबंध जपण्याइतका संवेदनशीलपणा त्यांच्यात होताच आणि तितकाच अलिप्तपणाही ते सांभाळू शकत होते. शिवाय भाईंनी त्यांच्या मनातला हा विचार परस्पर स्वतःच्या लेकीला न सांगता जावयापुढे मांडला होता यातही कुठेतरी त्यांचा समंजसपणा, अदब, नम्रता, कोणाच्याही जीवनात ढवळाढवळ न करण्याची वृत्ती स्पष्टपणे जाणवत होती. त्यामुळे कुणाचाच अभिमान दुखावण्याचा प्रश्न नव्हता. आपापल्या जागेवर दोघांचे श्रेष्ठत्व टिकूनच राहिले.
जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर, क्रिकेटर खंडू रांगणेकर यांच्या घराजवळचा एक प्लॉट खरेदी करण्याचं नक्की ठरलं. हा प्लॉट पॅट्रीक कोहिलू नावाच्या कॅथलिक माणसाचा होता. वास्तविक तो जरी त्याच्या नावावर असला तरी तीन-चार भावांचा वडिलोपार्जित इस्टेट म्हणून कायद्याने त्यावर हक्क होता. दलाला तर्फे अनेक बैठकी, व्यवहारासंबंधीच्या, भाव निश्चित करण्याबाबतच्या पार पडल्या. प्लॉट घ्यायचा, की नाही घ्यायचा यावर कधी बाजूने कधी विरोधात चर्चाही झाल्या. प्लॉटची ही कॅथलिक मालक माणसं अतिशय चांगली आणि धार्मिक वृत्तीची होती. व्यवहारात कोणती फसवणूक होणार नाही याची खात्री झाल्यावर आणि पूर्व -पश्चिम, व्याघ्रमुखी, रस्त्याला लागून वगैरे भौगोलिक आणि पुराणोक्त बाबींचा, संकेतांचा नीट अभ्यास करून या जमीन खरेदीवर एकदाचे शिक्कामोर्तब झाले आणि प्रारंभीचे साठेखत करून पपांनी संपूर्ण किमतीवरची पाच टक्के रक्कमही कोहिलू कुटुंबास कायदेशीर दस्तऐवज करून देऊन टाकली. साधारणपणे वर्षाच्या आत जमीन खरेदी करण्याबाबत नियोजन करण्यात आले. मामला व्यवस्थित, निर्वीघ्नपणे पार पडला. आता पुढील एक दीड वर्षात बंगल्यात रहायला जाण्याची स्वप्नं आम्ही रंगवू लागलो.
पण हकीकत हवीच. पप्पांचेच हे वाक्य. साधं कुठे प्रवासाला जायचं असलं वा एखादा कार्यक्रम ठरला असेल, कुणाला भेटायचं असेल तरी ठरलेला प्लॅन रुळावरून व्यवस्थित मार्गक्रमण करेलच याची कधीच हमी नसायची. काहीतरी प्रासंगिक छोटं मोठं विघ्न हे यायचंच आणि त्यालाच पप्पा विनोदाने “आपली हकीकत हवी” असे म्हणायचे.
जमीन खरेदी बाबतची हकीकत मात्र एक अत्यंत कडवट घाव देऊन गेली. अचानक एका रात्री साऱ्या धोबी गल्लीत निजानिज झाल्यानंतर, आमच्या घराच्या खाली, दारू पिऊन पार नशेत असलेला, झिंगलेला एक माणूस जोरजोरात पप्पांच्या नावाने चक्क अत्यंत घाणेरड्या इंग्लिश शिव्या देऊन बोलत होता.
माझ्या पप्पांसारख्या संत वृत्तीच्या माणसाला अशा कोणी शिव्या देऊ शकतो यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही आणि हे केवळ त्याच दिवसापुरतं नव्हतं. नंतरचे एक दोन महिने तरी याच स्वरूपात ते कायम चाललं. ते दिवस फार वाईट गेले आमचे. रात्र झाली की आमच्या मनात एक भय दाटायचं. पपांना काही झालं तर? या भयाने आम्ही सारेच थरकापून जायचो.
कोण होता तो माणूस?
ज्याच्याकडून आम्ही जमीन खरेदीचा वायदा केला होता त्या पॅट्रीकचा हा वाळीत टाकलेला, व्यसनी भाऊ होता. वास्तविक जमिनीच्या या पैशात त्याचा कायदेशीर वाटा होता आणि तो त्याला दिला गेला नसावा म्हणून त्यांनी हा गलिच्छ, हिंसक, त्रास देणारा, धमकावणीचा मार्ग पत्करला होता आणि त्यात कुठेतरी आम्ही आणि आमचं बंगला बांधायचं स्वप्न विनाकारण भरडत होतं. वास्तविक हा त्यांचा कौटुंबिक मामला होता. त्यात आमचा दोष काय होता पण नाही म्हटले तरी एक माणूस रोज रात्री आमच्या घराखाली उभा राहून नशेत बरळतो, शिव्या देतो, नाही नाही ते बोलतो त्यामुळे आमच्या मध्यमवर्गीय, अब्रू सांभाळून, नीतीने जगणाऱ्या कुटुंबाला नक्कीच धक्का पोहोचत होता. गल्लीतले लोक पप्पांना म्हणायचे,
“ तुम्ही फौजदारी करा त्याच्यावर. ”
हो.. खरं म्हणजे करायलाच हवी होती पण त्यातही एक गंमत होती. या कोहिलूला चार-पाच मुलं होती. त्याची बायको कुठेतरी घरकाम करून या दारुड्याचा संसार ओढत होती. रात्री हा माणूस शिव्या देऊन जायचा आणि एखाद्या सकाळी त्याची फाटकी तुटकी, बापुडवाणी दिसणारी बायको घरी येऊन पप्पांचे पाय धरायची, पोलिसात तक्रार करू नका सांगायची, त्याच्या भावांनी त्याला फसवलंय म्हणायची.. म्हणूनच तो असा बेवडा झालाय. त्याच्या मनात तुमच्याविषयी काही नाही म्हणायची. तो हार्ट मध्ये चांगला आहे असे बजावायची.
कथा कोणाची आणि व्यथा कोणाला असे झाले होते.
दारू पिऊन शिव्या देणाऱ्या झिंगलेल्या कोहिलूसमोर, खाली उतरून जिजी उभी राहायची.
“खबरदार! माझ्या बाबाला काही बोलशील तर? तुझ्या त्या क्रूसावरचा गॉड तुला कधी माफ करणार नाही. ”
पप्पा मात्र शांतच असायचे. खरं म्हणजे त्यांनी त्याचा नुसता हात जरी पकडला असता तरी तो कळवळला असता. कदाचित बेशुद्धही झाला असता पण कुठलाही हिंसक मार्ग त्यांना हाताळायचाच नसावा. ते शांत राहिले. आमच्या भयभीत बालमनांवर मायेचं, धैर्याचं पांघरूण घालत राहिले.
॥ चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्प तया॥
जणू काही या संस्कारांचाच प्रयोग आमच्यावर होत असावा.
अखेर एक दिवस पॅट्रीक कोहिलूला दलालातर्फे निरोप धाडून त्याला सारी हकीकत सांगितली गेली आणि हा तुमचा कौटुंबिक मामला असल्यामुळे झालेला जमिनीचा सौदा सामंजस्याने रद्द करावा असा निर्णय त्याला कळवण्यात आला.
पॅट्रिक आणि त्याचे इतर भाऊ पप्पांना भेटायला आले. त्यात हाही होता. पॅट्रीकने पप्पांची पाय धरून क्षमा मागितली.
“ हा जॉर्ज दारूत पैसे उडवतो. त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी नाही म्हणून आम्ही त्याच्या हाती पैसे देत नाही पण त्याच्या हक्काची रक्कम बँकेत सुरक्षित ठेवली आहे जी त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी उपयोगी यावी. तुम्ही सौदा रद्द करू नका. त्याला सांभाळून घेण्याची जबाबदारी आमची. ”
अशा रीतीने ते प्रकरण निस्तरलं. आमच्या माथ्यावरच्या आभाळातला तो काळा ढग दूर झाला. वातावरणात विरघळूनही गेला. सारं काही शांत झालं. एक वादळ आलं आणि ओसरलं. मन थोडं ढळलं, पडलं.
आता मागे वळून पाहताना मनात विचार येतो कुठला धडा शिकवण्यासाठी हे घडलं असेल? एखादे कडू औषध प्यायल्यानंतर बराच काळ घशात कडवटपणा टिकून राहतो ना तसं मात्र झालं …