मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टिप टॉक !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “टिप टॉक !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

टीप हा शब्द अगदी मनाच्या तळाशी जाऊन बसला आहे लहानपापासूनच ! जो पर्यंत टीप द्यावी लागत नव्हती तो ही टीप तशी तळटीपच होती !

ही टीप पुस्तकांत खाली छापलेली दिसायची. आमंत्रण पत्रिकेत जवळ जवळ धमकी या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून नजरेस पडायची.

कपडा फाटला की त्याला टेलर काकांना विनंती करून ही टीप मारून घ्यावी लागे ! त्यांनी जास्त पैसे मागितले की डोळ्यांतून टिपे गळायची बाकी रहात ! अशावेळी एवढ्याशा कामाचे एवढे पैसे? असे शब्द अगदी tip of my tongue यायचे ! पण घाबरून जिभेची हीच टीप चावावी आणि गप्प बसावे,असे होई !

काही लोक पोलिसांना टीप देतात, किंवा त्यांना ती कुठून तरी मिळते,असेही वाचनात येते अधून मधून !

टीपटॉप नावाची टेलरिंग दुकाने असतील तर अशी टीप मारून देणे ते लोक कमी पणाचे समजतात ! असो.

शहरातल्या हॉटेलात जायला लागल्यापासून टीप शब्दाचा आणि त्यामागचा ‘ अर्थ ‘ समजू लागला.

खरं तर या कल्पनेमागे खूप सुंदर कल्पना आहे,असे वाटते ! विशेषतः hospitality industry मध्ये नम्रता, ग्राहकाभिमुख सेवा, आणि अचूक सेवा या बाबी महत्त्वाच्या असतात. लोक सारं काही छान, भारी मिळावं म्हणून पैसे खर्च करतात. हल्ली तर hospital industry आणि hospitality industry सारख्याच महाग असतात. कोरोना काळात या दोन्ही सेवा मेवा मिळवत राहिल्या ! श्रीमंतांनी five star उपचार घेतले आणि गरिबांनी दिवसा star पाहिले डोळ्यांसमोर ..बिलाचे आकडे पाहून ! असो. .. तर ..वेटर इत्यादी मंडळी हसतमुख सेवा देतात, काय खावे, काय परवडेल याचे मार्गदर्शन करतात, वेळेवर पदार्थ आणून देतात, उरलेले पदार्थ तत्परतेने पार्सल करून देतात, इत्यादी शेकडो कारणांनी या सेवकांना काही रक्कम स्वखुशीने देणे,अपेक्षित असते. यात आता स्वखुशीे दूर गेली आहे ! काही हॉटेल मध्ये काम करणाऱ्या वेटर मंडळीमध्ये सुका आणि ओला असे दोन प्रकार असतात म्हणे ! सुका म्हणजे फक्त पगार घ्यायचा ! तिथले अन्न मिळणार नाही. ओला म्हणजे अन्न आणि पगार ! या ओलाचा पगार तसा कमीच असणार !

मुळातच या व्यवसायात बिचारी नाडलेली मंडळी दिसतात. नाईलाजाने हा डगला अंगावर चढवलेली… बँडवाल्यांसारखी ! अन्न वाढणारे वेटर आणि आनंदाच्या धुना वाजवणारे वादक यांचे चेहरे पाहून घ्यावेत !

या लोकांची काही वरकमाई करण्याची इच्छा असते. ग्राहकाने झालेलं Bill पूर्ण देऊन काही रक्कम यांच्यासाठी ठेवावी,अशी त्यांची मूक मागणी असते. विशेषतः आपण त्यांच्याकडे bill चे पैसे दिले, त्याने ते pay करून आणून त्या पाकिटात ठेवले तर उरलेले सुट्टे पैसे ग्राहकाने तसेच ठेवावेत,असे त्यांना वाटते. त्यासाठी हे सेवक आपल्या टेबलच्या आसपास अदबीने आणि छुप्या रीतीने घुटमळत राहतात. आपली पाठ वळताच लगबगीने त्यातील पैसे खिशात घालतात. अपेक्षेनुसार रक्कम नसेल तर एकमेकांना नजरेने इशारे करत राहतात. अर्थात हे हॉटेलनुसार बदलते. भारी हॉटेलात जाणारे भारी लोक काही वेळा keep the change असं म्हणून उठून जातात. त्यांच्यामुळे इतर सामान्य लोकांना change व्हायला लागले आहे.  मोठ्या हॉटेलांत पहिल्यांदा गेलेले लोक चक्क तिथल्या स्मार्ट वेटर बांधवांना काहीसे बिचकुन असतात !

मोठ्या हॉटेलच्या bill मध्येच काही टक्के रक्कम आधीच कापून घेतात म्हणे ! काही ठिकाणी टीप टाकण्यासाठी box असतात. ही रक्कम वेटर आपसात वाटून घेत असावेत. जास्त महागडे पदार्थ मागणाऱ्या ग्राहकांकडून जादा टीप मिळण्याची शक्यता असल्याने तिथे अधिकचे सौजन्य दाखवले जात असावे का? टिप देण्यास टाळाटाळ केली किंवा अगदीच कमी दिली तर कदाचित पुढल्या वेळच्या सेवेत काही बदलही होऊ शकतात ! आपला नवरा किंवा मुलगा वेटरसाठी किती रक्कम मागे ठेवतो,यावर काही पत्नी,माता लक्ष ठेऊन असतात. आणि त्यातील काही रक्कम परस्पर कमीही करतात !

पण टीप देणे ही एक नाजूक गोष्ट असते. याचे चलन आपल्याकडे परदेशातून आले असले तरी दिवाळी पोस्त,बक्षिसी इत्यादी प्रकार आहेतच आपल्याकडे आधीपासून. राजे लोक तर चक्क त्यांच्या हातातल्या, गळ्यातल्या सोन्याच्या वस्तू सेवकांना बहाल करीत असत. 

परदेशात आणि आता आपल्याकडेही महिला वेटर मोठ्या प्रमाणात असतात. गोष्ट परदेशातील आहे…एक गरोदर महिला वेटर…ती धावपळ करीत होती..तिला आणखी काही महिने तरी काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. एका टेबलवरील चार मित्रांनी तिची अवस्था जाणली..आणि तिला तीन महिने पुरेल एवढी रक्कम आपसात जमा करून टीप म्हणून दिली…तिच्या डोळ्यांतील भाव अवर्णनीय होते !

एक आणखीन गोष्ट ! दुपारी हॉटेल बंद होण्याची वेळ. एक आठ दहा वर्षांचा मुलगा सायकलवर घाईघाईत आला. महिला वेटर वैतागली..आता हा कशाला आला काम वाढवायला ! तिने विचार केला. काहीशा नाराजीनेच त्याच्यापुढे मेन्यू कार्ड ठेवले. त्याला ice cream पाहिजे होते. एक छान ice cream १०० रुपयांचे होते आणि त्यापेक्षा स्वस्त आणि साधेसे ८० रुपयांचे. त्याच्याकडे १०० रुपये होते ! पण त्याने ८०चे मागवले. वेटर महिलेने काय भिक्कार ग्राहक म्हणून नाराजीने order serve केली आणि ती आवरायला निघून गेली. ती परत टेबलाशी आली तोवर तो मुलगा निघून गेला होता…तिने bill ठेवतात ते पाकीट उघडलं.. त्यात २० रुपये ठेवले होते…टीप म्हणून ! तिला टीप देता यावी म्हणून त्यानं कमी किमतीचे ice cream order केलं होतं ! ती वेटर महिला आपल्या डोळ्यांतले अश्रू रोखू शकली नाही !

टिप: इथेच थांबतो. बाकी तुम्ही सांगा… शेवटी या विषयाच्या हिमनगाचे हे मी लिहिले ते फक्त एक tip म्हणजे टोक आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टिपकागद व्हावे… सौ विदुला जोगळेकर☆ सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ टिपकागद व्हावे… सौ विदुला जोगळेकर☆ सौ उज्ज्वला केळकर ☆

जाड बुडाच्या कढईत साजूक तुपातले बेसन…हलकेच रंग बदलत होते…

तुपात लपथपलेले…थुलथुलीत…उलथन्याने जरा हलवता कढयीभर गोळा होत फिरणारे…अजून किंचित भाजायला हवे आहे…पिठीसाखर पडली की बेसनाचा रंग फिका होईल…आता मात्र खमंग तांबूस रंग दिसायला लागला..तिने गँस बंद करून टाकला.आच संपताच पीठ स्थिरावले….तुपाचा चकचकीतपणा अंगाखांद्यावर लेऊन मस्त कढईभर सैलावून बसले. ‘ तूप जास्त होणार कदाचित ‘, तिच्या मनाला सराईत नजरेने सांगितले… व्याप वाढणार…तिने कोरडे पीठ भाजून घालावे या विचाराने डब्याकडे बघितले…घर म्हणून ठेवलेले जेमतेम वाटीभर पीठ होते…पिठीसाखर घातल्यावर किती आळते ते बघून ठरवू काय करायचे ते … तिने लाडवातून डोके काढून पुढच्या कामांना सुरुवात केली. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात अति सैलावलेला लाडू ठाण मांडून बसलाच होता.

निवलेल्या पिठाच्या गोळ्यात पिठीसाखर घालून…ती लाडू आळण्याची वाट बघत बसली…साखर मुरल्यावर जरा आळले तर आळतील…वाऱ्याच्या दिशेला जरा पसरुन ठेवले तर आळतील…सतराशेसाठ वाटा…चुकलेल्या दिशेला जागेवर आणायला धावत येतात…! पण छेः … बाहेरच्या तापमानाशी सख्य साधत लाडवातलं तूप अगदी मनसोक्त साखरेसहित परत ऐसपैस पहुडलेलं बघून…आता या अतिरिक्त स्निग्धतेचं काय करावं हा प्रश्न तिला पडला. 

कमी पडलं तर वरुन पटकन घालता येतं.  पण जास्त झालं तर मात्र त्यातून सहजासहजी काढून घेणे होत नाही….. मग ते पदार्थ असो, नाहीतर माणुस असो. समत्वाला ममत्व येऊन मिळाले की अतिरिक्त स्नेह वाढतोच…आणि गोष्टींचा थोडा तोल ढळल्यासारखा होतो, आणि मग तो कधीकधी असा तापदायक ठरतो.

याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे स्वयंपाकघरातले पदार्थ ! अशी अतिरिक्तता माणसांच्या स्वभावातूनही वेगवेगळ्या तऱ्हेने ओसंडून वहात असते…!

काही काळापुरता टिपकागद होऊन जडलेले नाते…ती अतिरिक्तता शोषून घेते आणि अलिप्त होऊन पुढचा मार्ग चालू लागते….. 

… येस्स…खरंच की…थोड्या कोरड्या कणिकेवर तिने टिश्यू पेपर (टिपकागद) पसरला आणि त्यावर ते लाडवाचं मिश्रण पसरुन ठेवलं…हलके हलके मिश्रणातील तूप टिश्यूवर दिसू लागले….आणि खालची कणिक तो स्निग्धांश स्वतःत शोषून घेऊ लागली…! लेकीने विचारले, “ आई साखरेचा गोडवा तर नाही 

ओढून घेणार तो टिपकागद…?” 

“ नाही ग…शोषून फक्त ओलावा आणि स्निग्धता घेता येते. कोरडेपण फक्त आपलं अस्तित्व जपत मिसळून जाते फार तर ! “

न सांगता काय अन् किती टिपावं हे त्या कागदाला स्वभावतःच समजलेलं असतं …उगाच गरजेपेक्षा जास्त लगट ते इतक्या जवळ असूनही करत नाही…हे जर ज्या त्या नात्याला कळलं तर…टिपकागद होऊन प्रत्येक नात्यातली भूमिका निर्लेपपणे पार पाडता येईल. अतिरिक्त ओल/स्निग्धता तेव्हढी शोषून घेउन ,परत ज्याचं त्याचं स्वातंत्र्य मान्य करुन…अलिप्त होणारा टिपकागद तिला फार आपलासा वाटला. कागदावरचे लाडवाचे मिश्रण आता लाडू बांधण्याइतके नक्कीच आळले होते…कणकेतला मिसळून गेलेला स्निग्धांश वायाही गेला नव्हता…मधला कागद मात्र आपलं काम बजावून शांतपणे बाजूला झाला…!

नात्यात ही असा टिपकागद होता आलं पाहिजे… म्हणजे नाती आकारात, गोडव्यात, आणि व्यवहारातही देखणी राहतात …… होय ना !

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उमलत्या वेळा… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ उमलत्या वेळा… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

सकाळी उठून बाहेर आलो आणि बागेत एक फेरफटका मारला. सूर्याची सोनेरी कोवळी किरणं सगळ्या सृष्टीला न्हाऊ घालत होती. झाडं, पानं, फुलं जणू चातक होऊन त्या सूर्यप्रकाशाचं रसपान करीत होती. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. रात्री मिटलेली कमळाची कळी आपले डोळे अर्धवट उघडून साऱ्या परिस्थितीचा अंदाज घेत होती. हळूहळू तिला उमलून यायचंच होतं. गुलाबाच्या कळ्यांनाही आता जाग आली होती. जाई, जुई तर सूर्यदेवांचं स्वागत करण्यासाठी कधीच्या तयार होत्या. झेंडूची फुलं उमलली होती. सोनेरी, पिवळसर झेंडूच्या फुलांवर सोनेरी सूर्यकिरणे पडल्यामुळे त्यांचं सौंदर्य काही आगळंच भासत होतं. मोगरा, जाई, जुई आपल्या अत्तराच्या कुपीतून सुगंधी शिडकावा करून वातावरण सुगंधित करीत होते. वाऱ्याच्या शीतल लहरी हा सुगंध अलगद वाहून नेत होत्या. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांवर अलगद नर्तन करून आपला आनंद व्यक्त करीत होती.

सृष्टीच्या अंगणात हा प्रभातोस्तव रंगला होता. विविधरंगी पानं, फुलं, पक्षी यांनी हा रंगसोहळा साकार केला होता. सृष्टीमध्ये अव्यक्त असलेल्या निर्गुण निराकाराची पूजा निसर्गानं आपल्या परीनं मोठी सुरेख मांडली होती. या पूजेसाठी फुलं आपल्या पूर्ण शक्तीनिशी पूर्णपणे उमलून आली होती. त्यांच्या अंतरंगातून सुगंधाच्या भक्तीलहरी बाहेर पडत होत्या. पक्षी आपल्या सुरात त्याची आरती गात होते. सूर्यदेवांच्या सोनेरी प्रकाशात सृष्टीचा गाभारा उजळून निघाला होता.

कुठूनतरी भूपाळीचे सूर अलगद कानी आले.

मलयगिरीचा चंदनगंधीत धूप तुला दाविला 

स्वीकारा ही पूजा आता उठी उठी गोपाळा…

माझ्या तोंडून आपोआप उद्गार बाहेर पडले. ‘ वा, किती सुंदर! ‘ मनात एक प्रश्न आला. हे सगळं कशासाठी? काही विशेष कारण आहे का? इतका सुंदर असलेला हा सोहळा, हा उत्सव रोज कशासाठी?

माझ्या मनातल्या प्रश्नाला सगळ्यांनी आपापल्या परीनं उत्तर दिलं. सूर्यकिरणं म्हणाली, ‘ कालची रात्र अंधारात गेली ना! तुला उद्याची चिंता होती. मावळलेल्या दिवसाबरोबर तुझ्या कोमेजलेल्या आशा अपेक्षांना पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आम्ही आलो आहोत. या प्रकाशाप्रमाणेच तुझा आजचा दिवसही प्रकाशमान होवो. ‘ 

फुलं म्हणाली, ‘ अरे रोजचा दिवस नवा. रोज आपल्या आयुष्याच्या पुस्तकाचे एक नवीन पान आपण उघडतो. मग तो रोजचा दिवस हा आपल्या जीवनातील एक सोहळाच नाही का? म्हणून त्याची सुरुवात आम्ही पूर्णपणे फुलून करतो. उमलता उमलता सौंदर्याची बरसातही करतो. आम्ही कसे टवटवीत असतो! तसंच प्रसन्न, टवटवीत तुम्हीही राहावं असं आम्हाला वाटतं. तुम्हीही आपला दिवस आपले निहित कार्य, चांगली कामं करण्यात घालवावा. तोही आम्हाच्यासारखा प्रसन्न, हसतमुख आणि टवटवीतपणे. आणि जमलं तर सुगंधाची उधळण करावी. तुमच्या कर्तृत्वाचा सुगंध परिसरात दरवाळावा असं आम्हाला वाटतं. ‘ 

मी म्हटलं, ‘ अहो, थांबा थांबा. जीवनाचं सारं तत्वज्ञानच तुम्ही उलगडून सांगितलंत. तुमचे हे शब्द मला माझ्या अंतरंगात साठवू द्या. ‘ खरंच रोजची पहाट म्हणजे आमच्यासाठी त्या विधात्यानं दिलेलं अमूल्य वरदान आहे. प्रत्येक दिवस आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहे. कधी ऊन, वारा, पाऊस असेल. वादळे झेलावी लागतील. थंडीचा कडाका असेल. फुलं उमलण्याची थोडीच थांबली आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या या छोट्याशा आयुष्यात संकटे, सुखदुःख येणारच! त्यासाठी उमलण कशाला सोडायचं? कोमेजायचं कशाला? दुर्मुखलेलं का राहायचं? जमेल तसं फुलून यायचं. आपल्या सुगंधाची बरसात करायची.

फुलांचं मनोगत समजून घेता घेता शीतल सुगंधी वायू लहरी कानाशी येऊन गुणगुणू लागल्या. ‘ अरे, रोजचा दिवस म्हणजे सगळ्या गेलेल्या इतर दिवसांसारखाच एक असतो का? कदाचित तुला तसं वाटेल. पण आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आगळावेगळा असतो. जे काल होतं ते आज नाही. आणि जे आज आहे ते उद्या असणार नाही. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव असतो. म्हणूनच या बदलाला रोज नव्या उत्साहानं, उमेदीनं सामोरं जायचं असतं. तुला माहिती असेलच की आम्ही सदा सर्वकाळ वाहत असतो. कधीही थांबत नाही. आम्ही थांबलो तर ही सृष्टी थांबेल. तुझ्या श्वासात आणि रोमारोमात आम्ही असतोच. तेव्हा मित्रा, या सकाळच्या प्रसन्न वेळी मोकळा प्रसन्न श्वास घे. आपल्या तनामनात नवीन ऊर्जा भरून घे आणि आजच्या दिवसाला सामोरा जा. ‘

मी वाऱ्याच्या लहरींना म्हटलं, ‘ अगदी खरं आहे तुमचं. तुम्ही आमचा प्राण आहात. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सोबत असते तुमची. तुमचा संदेश मी लक्षात ठेवीन. नवीन ऊर्जेनं भारून माझ्या कामाला सुरुवात करीन.

तेवढ्यात फुलाफुलांवर नाचणाऱ्या, बागडणाऱ्या फुलपाखरांकडे माझं लक्ष गेलं. त्यांचे विविध रंग मनाला प्रसन्न करीत होते. त्यातलं एक डोळे मिचकावीत म्हणालं, ‘ आमचंही थोडं ऐकशील का रे? ‘ मी म्हटलं, ‘ जरूर. आज तुम्ही सगळेच मला अतिशय सुंदर संदेश देत आहात. तुमचं मला ऐकायचंच आहे. ‘ 

फुलपाखरू म्हणालं, ‘ आमच्या पंखांवरचे रंग तुला आवडतात ना? पण नुसतं त्यावर जाऊ नकोस. तुला कदाचित माहिती नसेल आम्हा सुरवंटाचं फुलपाखरू होताना आम्हाला किती दिव्यातून जावं लागतं! पण आम्ही त्याचा विचार करत बसत नाही. आम्हाला जमतील तसे निसर्गाचे रंग आमच्या अंगावर माखून घेतो. तसं आमचं आयुष्य अल्पजीवी असतं. पण आम्ही ते जगतो मात्र आनंदानं. दुसऱ्यालाही आनंद देतो. किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे महत्वाचं आहे, नाही का? ‘ असं म्हणून आपल्या पंखांची सुंदर उघडझाप करीत ते दुसऱ्या फुलावर जाऊन बसलं.

सूर्यदेवांची किरणं आता थोडी अधिक प्रखर होऊ लागली होती. निसर्गातले सगळेच घटक आपापल्या कामाला लागले होते. सगळी फुलं पूर्णपणे उमलली होती. दिवस उमलला होता. उमलत्या वेळा मला प्रसन्न करून गेल्या. माझं मनही उमललं होतं. रोमारोमात नवचैतन्याचा संचार झाला होता. उमलत्या वेळी होणारा सृष्टीचा सोहळा मी अनुभवला होता. तोच सोहळा माझ्याही जीवनात प्रतिबिंबित व्हावा म्हणून त्या निर्गुण निराकाराला मी हात जोडले.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सारे प्रवासी घडीचे !… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ सारे प्रवासी घडीचे !… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कोणताही प्रवास म्हटला की निघायचे ठिकाण नक्की असते. कुठे पोहोचायचे तेही ठरलेले असते. कसे आणि कधी निघायचे तेही ठरवलेले असते . लहानपणापासूनच मला प्रवासाची फार आवड ! वडिलांच्या बदली निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या गावी गेलो. बदली झाली की आई वडिलांना टेन्शन असे. नवीन गावात जागा मिळवणे, मुलांच्या शाळा बघणे अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागे. आम्हाला मात्र या सगळ्याची गंमत वाटत असे. जसजसे मोठे होत गेलो, हायस्कूल शिक्षण संपले तशी प्रवासाचीही सवय झाली आणि त्यातील गंमत कमी होऊन जबाबदारीची जाणीव वाढू लागली !

अजूनही प्रवास म्हटला की माझी तयारी जोरात चालू असते. कुठलीही ट्रीप असो किंवा कौटुंबिक कार्यक्रम असो, प्रवासाची पूर्ण तयारी झाल्याशिवाय मला चैन पडत नाही. माझे मिस्टर तर मला कायमच चिडवतात, ‘ तुझा प्रत्येक प्रवास हा पहिलाच असल्यासारखे टेन्शन घेतेस !’ पण स्वभावाला औषध नसते 

ना ! कुठेही गेले तरी प्रवासात आपली गैरसोय होऊ नये आणि दुसरीकडे गेल्यावर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, म्हणून मी जास्तीत जास्त काळजी घेत असते. पैसे, मौल्यवान वस्तू, कपडे सगळं जागच्या जागी असावं असं मला वाटतं ! 

आम्ही जेव्हा प्रथमच एका लांबच्या ट्रीपला गेलो त्यावेळी किती पैसे लागतील याचा अंदाज नव्हता. ह्यांच्या एका बॅंकर मित्राने आग्रह केला आणि पैशाचा प्राॅब्लेम आला तर आमच्या बॅंकेची ब्रॅच तिथे आहे, मी पैसे काढून देऊ शकतो असा दिलासा दिला. ट्रिपला निघणार होतो त्या दिवशी शनिवार होता.त्यामुळे बॅंकही बंद झाली होती. अचानकच ठरल्यामुळे आहे ते पैसे घेऊन ट्रीपला गेलो. त्यामुळे ऐन वेळी ठरलेल्या त्या ट्रीपला आम्ही उत्साहाने निघालो.

प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर हाॅटेल खर्च, प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी गाडीचे बुकिंग केले आणि मार्केटमध्ये गेलो. बंगलोरमध्ये जाऊन बंगलोर सिल्क घ्यायची नाही असं कसं होईल ! बरीच खरेदी केली..

२/४ दिवस हाॅटेलवर रहाणे, फिरणे, खाणे पिणे यांवर भरपूर पैसे खर्च केले. बॅंकवाल्या मित्राला ऐनवेळी पैसे मिळू शकले नाहीत आणि शेवटी परतीच्या तिकिटाचे पैसे जेमतेम उरले ! आणि असा तो प्रवास संपवून घरी आलो तेव्हा एक मोठा धडा शिकलो की प्रवासाला जाताना जरा जास्तच पैसे बरोबर लागतात !

असा हा पहिला पहिला मोठा प्रवास मला कायमचा स्मरणात राहिला !

आता वयाची साठी उलटली तरी यात फारसा बदल झाला आहे असं वाटत नाही. उलट विसरायला नको म्हणून आधीपासूनच तयारीला सुरुवात होते.

हा झाला व्यावहारिक जीवनातला नेहमीचा प्रवास ! पण अलीकडे मात्र मन वेगळ्याच दिशेला धावतं ! 

हा जीवन प्रवास केव्हा सुरू झाला? माणूस जन्माला येतो तोच आपल्या जीवन प्रवासाची सुरुवात करून !

या प्रवासाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही माहिती नाही. तरीही आपण त्या जीवन प्रवाहात स्वतःला झोकून देतो. जीवनातील सुखदुःख भोगतो. जीवनाचा आनंद घेतो. वृद्धत्वाने खचून जातो, तर कधीतरी मृत्यू हा त्याचा शेवट आहे या जाणिवेने परिस्थितीला सामोरा जातो !

काही वेळा कोणाच्यातरी मृत्यूची बातमी येते .कोणी वृद्धत्वाने, तर कोणी आजाराने, तर कोणी  आत्महत्येने, अकाली जीवन संपवते. असे काही ऐकले की मन नकळत मृत्यूचा विचार करू लागते.

 कधी वाटते की हे मानवी आयुष्य किती छोटे, मर्यादित आहे. देवाने माणसाला विचारशक्ती, बुद्धी दिली आहे. त्या जोरावर तो निसर्गाला टक्कर देत असतो. खरंतर निसर्ग हा अनाकलनीय आहे, त्याच्याशी आपल्या बुद्धीची तुलना करणे अशक्य आहे. तरीही आधुनिक काळात माणसाने केलेली प्रगती पाहिली की अश्मयुगापासून आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीने खूपच थक्क व्हायला होते. हा तर अखंड जीवन स्त्रोत आहे आणि या स्त्रोताचे आपण एक बिंदू आहोत.

त्या प्रवासाची आपल्या बुद्धीला कल्पना सुद्धा करता येणार नाही ! असंख्य विचारांचा गुंता कधी कधी मनाला अस्वस्थ करतो. निसर्गाच्या अद्वितीय श्रेष्ठ शक्तीचे एक बिंदू रूप म्हणून आपला हा जीवन प्रवास सुरू होतो. तो अधिकाधिक चांगला श्रेयस्कर  करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे.

आता या प्रवासाचा शेवटचा टप्पा जगताना आपण जे चांगले करता येईल ते करावे. जगण्याचा आनंद भरभरून घ्यावा, तरच शेवटचा दिस गोड जावा असे म्हणत त्या जीवन प्रवासाचा निरोप आपल्याला घेता येईल…..  शेवटी काय, सारे प्रवासी घडीचे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भाऊ आणि बहिणी…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ भाऊ आणि बहिणी…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

भाऊ आणि बहिणी हे आपल्या आई-वडिलांनी म्हातारपणी आपल्यासाठी ठेवलेल्या सर्वात मौल्यवान ठेवी आहेत याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते.

आम्ही लहान असताना भाऊ-बहिणी आमचे सर्वात जवळचे सवंगडी होते. दररोज, आम्ही एकत्र खेळत होतो आणि गोंधळ घालत होतो.  आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो. मोठे झाल्यावर, आम्ही आमच्या स्वतःच्या कुटुंबात रमलो, स्वतःचे वेगळे जीवन सुरू झाले. आम्ही भाऊ बहिणी सहसा क्वचितच भेटतो. आमचे पालक हा एकमेव दुवा होता ज्याने आम्हा सर्वांना जोडले.

आपण हळूहळू म्हातारे होईपर्यंत वाट पाहत राहू, आपले आई-वडील आपल्याला सोडून गेले आहेत आणि आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांची संख्या कमी होत चालली आहे, त्याचवेळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळते.

मी नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये १०१ वर्षांचा मोठा भाऊ त्याच्या ९६ वर्षांच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता.  थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते, तेव्हा धाकट्या बहिणीने कारचा पाठलाग केला आणि तिच्या भावाला २०० युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितले.  तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले. असे काही नेटिझन्स होते ज्यांनी टिप्पणी केली की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे.

होय, आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळते की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताने बांधलेला असणे किती महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आई-वडील दोघेही गेले असतील, तेव्हा तुमचे भाऊ आणि बहिणी या जगातील सर्वात जवळचे लोक असतात. मित्र दूर जाऊ शकतात, मुलं मोठी होतात, तीही दूर जातात. पण तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असेल नसेल, तरी फक्त तुमचे भाऊ आणि बहिणी आहेत जे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उत्तरार्ध पूर्ण करण्यासाठी पुरेशी साथ देवू शकतात.

आपण म्हातारे झालो तरी बंधु भगिनी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे. त्यांच्या सहवासात आम्हाला उबदारपणाची कमतरता भासणार नाही.  त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही.  वृद्धापकाळापर्यंत, कृपया आपल्या बंधू आणि बहिणींशी जुळवून घ्या.

भूतकाळात काहीही अप्रिय घडले असले तरीही, भाऊ आणि बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील आणि क्षमाशील असले पाहिजे. अशी कोणतीही गाठ नाही जी भाऊ-बहिणीमध्ये बांधता येत नाही.  अशी कोणतीही ढाल नाही जी काढली जाऊ शकत नाही.—  बंधू-भगिनींनी कधीही जुने हिशेब मांडू नयेत किंवा जुनी नाराजी बाळगू नये.  थोडे अधिक परस्पर अवलंबित्व आणि परस्पर पालनपोषणाने, संबंध अधिक चांगले आणि चांगलेच होतील, कारण —– 

—  कारण या जगात आपल्या पालकांनी फक्त आपल्यासाठी दिलेल्या या सर्वात मौल्यवान भेटवस्तू आहेत.

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जीवनसे भरी तेरी आंखे !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “जीवनसे भरी तेरी आंखे !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

तुझ्या डोळ्यांत पाहू जाता !

जीवनाची उत्पत्तीच पाण्यातून झाली असल्यानं पाण्याला जीवन म्हणणं तसं सयुक्तिकच ! वारि, नीर, तोय,सलिल,अंबु,उदक,जल ह्या अन्य नावांनीही तृषातृप्ती करणारं हे द्रव जेंव्हा डोळ्यांतून स्रवणा-या अश्रूंचं आवरण घेऊन वाहू लागतं तेव्हाच पाण्याचा आणि जीवनाचा अर्थ खोल आहे, याची जाणिव होऊ लागते.

तुझ्या डोळ्यांतलं पाणी म्हणजे जीवनच जणू. या जीवनाच्या ओलाव्यानेच तर तुझी नेत्रकमळं सदोदित ओली दिसतात…पापण्यांवरचे दंवबिंदु मोत्यांसारखे चमकत असतात सकाळच्या कोवळ्या उन्हांच्या तिरीपेत. माझ्या जगण्याचा डोह आता मरणासन्न आहे….तप्त सूर्य या डोहातले शेवटचे थेंब शोषून घ्यायचा कंटाळा करतोय बहुदा. त्याला काही एकच डोह शुष्क करायाचा आहे थोडाच! जगभरातले सर्व सागर,सर्व जलाशय त्याच्याच तर धाकात जगत असतात.

का जगावं असा यक्षप्रश्न सतत शिल्लक पाण्याच्या अंतरंगात ठिपकत असतो सारखा…तेव्हा जगण्याला उभारी तरी का म्हणून यावी? पण तुझे हे डोळे….जगण्याचा किनारा सोडून दूर जाऊ देत नाहीत .

सागराला तसं काय कमी आहे गं? सर्व खळाळत्या नद्या त्याच्याच तर बाहुपाशात विसावतात अखेरीस….येताना मातीला धावती आलिंगनं देत आलेल्या असल्या तरी. त्यांचे सुगंधी श्वास तर त्याच्याच अंगणात भरती-ओहोटीचा फेर धरून नाचत असतात की. किना-यावर येण्याचं नुसतं नाटक…त्यांना परत त्याच्याच कडे जायचं असतं हे काय कुणाला ठाऊक नाही होय? पण हा सागरही तुझ्या रूपाच्या रसाची आस बाळगून असतो…..म्हणूनच तर पुनवेला दोन पावलं पुढं येत असतो….न चुकता. आणि रुसून माघारीही जातो कोस दोन कोस !

तुझं रूप रंग-रेषांच्या क्षितिजावर मावत नाही, आकारांचे बांध तुझ्या रुपाला अडवून ठेऊ शकत नाही…तुझं हुबहू चित्र कोण कसं आणि कधी काढू शकेल, देव जाणे ! आणि तुझ्या वर्णनासाठीचे शब्द, त्यांना बद्ध करणारे छंद-वृत्त कवींना सुचावेत तरी कसे? तुझं रूप शब्दांना, चित्रांना कायमच अनोळखी राहून जातं…त्यांचा शोध सतत सुरू असला तरी.

काळजाला जागं ठेवणारे श्वास आणि त्याची आवर्तनं आहेस तू . तू आहेस म्हणून हृदय धडधडतं आहे त्याच्या अधीर वेगानं आणि तुझ्या रुपाच्या आवेगानं. तू  म्हणजेच जगणं, तू म्हणजेच जगत राहणं…अविरतपणे.

तुझ्या श्वासांच्या सुगंधाला मधुबनाचं कोंदण लाभलंय…आणि तुझे बाहुपाश…पाश नव्हेत कमलदलेच जणू. त्यातून स्वतंत्र होण्याचा विचारही मनाला शिवत नाही. अपार पसरलेल्या नभात तुझा मुखचंद्र म्हणजे किरणांची पखरणच जणू. या किरणांच्या उजेडात जीवनाचा अंधार विलुप्त होऊन जावा ! हिरव्यागर्द हिरवळीतून तुझी पावलं एखाद्या हरिणीच्या वेगाशी लीलया स्पर्धा करतील अशी नाजूक आणि तितकीच चपळ. तू गोड गोजि-या हरिणांच्या सोबत चार पावलं जरी चाललीस तरी त्यांच्यातलीच एक दिसशील…..गोड !

आयुष्याच्या धकाधकीत काळजाला पडलेल्या चिरा तशाच राहतात…ठसठसत. या जखमांना टाके घालणं म्हणजे आणखी वेदना पदरात पाडून घेण्यासारखं…दुखणारं. पण तुझ्या पदराचा एक धागाही पुरेसा होईल हे जीवनवस्त्र पुन्हा होतं त्या रूपात पाहण्यासाठी….तुझ्या डोळ्यांतील जीवन पाहून का नाही कुणाला पुन्हा जीवनाच्या सावलीत विसावा घ्यावासा वाटणार? हे तर हवेहवेसे वाटणारे बांधलेपणच ! जोपर्यंत तुझ्या डोळ्यांतल्या जीवनाचा निर्झर खळाळत राहील…तोवर माझं आयुष्य वहात राहील…तृप्ततेच्या आभाळाखाली !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पसारा…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ पसारा…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

शेजारणीने आवाज दिला म्हणून बायको कुकर लावून शेजारी गेली …. 

.. म्हणाली ३ शिट्या झाल्या की बंद करा गॅस .. वर टाकीतही पाणी भरतंय, लक्ष असू द्या .. मोटर बंद करा वेळेत …  मी म्हटलं हो ..

इतक्यात नळाला पाणी आलं .. लगेच धावत जाऊन बादली नळाखाली धरली धावताना शेंगदाण्याचा डबा उपडी झाला .. शेंगदाणे जमा करीतच होतो, इतक्यात कुकरची पहिली शिटी झाली .. अचानक झाली त्यामुळे दचकलोच .. 

झटकन मागे गेल्यामुळे दळून आणलेल्या पिठाची पिशवी कलंडली , आणि त्या सांडलेल्या पीठात कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, भाज्या, गोऱ्यापान झाल्या .. 

काय करावं ? सुचेना ….  

परत नळाखाली भरत असलेल्या बादलीची आठवण झाली. लगबगीने बादलीकडे गेलो तर अजून बादली भरली नव्हती … 

पुन्हा शिटी झाली … पटकन गॅस बंद केला. नंतर लक्षात आलं …  दुसरीच शिटी होती ती .. 

लाईटरने गॅस पेटवायला भीती वाटते .. मग माचीस घेतली .. १, २, ३ श्या ! माचीस काड्या फुकट गेल्या .. मग काय आधी कंटाळा केला ते केलं .. पंखा बंद केला … गॅस पेटवला .. 

आता सांडलेले पीठ उचलू, की पसरलेले शेंगदाणे भरू.. बादली भरत आली ते पाहू.. की वर पाण्याची टाकी किती भरली ते पाहू .. 

…. मी हैराण …काय करावं ? सुचेना 

आवाजावरून लक्षात आलं .. पाणी वाहून जातंय .. बादली भरून सांडत होती .. 

भरलेली बादली काढून दुसरी लावतोय .. तोच तिसरी शिटी झाली .. 

तसं धावत येऊन पंखा लावला .. मनात म्हटलं माझं डोकं फिरलंय नक्कीच .. 

सगळं सोडून आधी गॅस काढला .. इतक्यात पाणी वाहून जातंय असा आवाज .. वरची टाकी ओव्हर फ्लो … मोटर बंद केली …. 

पण या नादात पंखा जरा उशिराच बंद केला .. 

वाऱ्याने पीठ चांगलंच पसरलं, त्यात माझे ओले पाय … लादी चिकट.. बाप रे .. 

व्हायचा तो पसारा झालाच .. आता बायको ओरडणार, हे मनात आलं तोवर  बायको ही आलीच दारात.. काय करावं ? सुचेना 

झाला पसारा पाहून आता ही मला झापणार .. म्हणेल “ काय हो, किती हा पसारा ?”

पण ती मात्र एकच म्हणाली.. “ अहो, तुम्ही या बाहेर. मी आवरते सगळं. तुम्ही तुमचं काम करा.” 

एक टप्पा बॉल सारखा .. मी तडक किचनमधून हॉल मध्ये .. पण ह्या उडीत ही ओट्यावरची तेलाची बाटली कलंडलीच .. मी पुन्हा किचनमध्ये प्रवेश करणार तोच.. 

बायको पुन्हा त्याच स्वरात .. “राहू दे मी आवरते.”

मी सोफ्यावर शांत … चिडीचूप काय करणार ..?

…. पसारा का होतो याचे उत्तर मिळाले होते ना …….. 

(किती तो पसारा असं बायकोला कितीतरी वेळा ठणकावून विचारून नवरेशाही गाजवणाऱ्या त्या सर्व नवरोबांसाठी) 

लेखक – अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ।। एक होती राणी।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

??

।। एक होती राणी ।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले

मला  माणसांशी बोलायला, त्यांच्याशी संवाद साधायला फार आवडतं आणि खरं सांगायचं तर ते जमतंही पटकन ! माणसं मनातल्या गाठी माझ्याजवळ उकलतात हे मात्र खरं. त्यादिवशी दवाखान्यात नुसतीच बसले होते. मनात दुसरेच विचार घोळत होते. इतक्यात एक बाई दवाखान्यात शिरली. मी नीट बघितलं तर ती एक तृतीयपंथी व्यक्ती होती.

“ दीदी,आप मुझे दवाई दोगी क्या? पेटमें बहुत दर्द हो रहा है “. ती कळवळून सांगत होती. मी तिला टेबलवर घेतले आणि नेहमीप्रमाणे तपासले. ‘ माझ्याजवळच्या गोळ्या लगेच घ्या ‘असं सांगितलं आणि घरी घ्यायला दोन दिवसाचं औषधही दिलं. पाण्याचा ग्लास पुढं केला आणि ‘ गोळ्या घ्या ‘ असं म्हटलं. तिने त्या गोळ्या घेतल्या आणि मी म्हटलं,” थोडा वेळ बसा इथं खुर्चीवर.अर्ध्या तासानंतर जा.बघूया किती कमी होतं ते हं.” मी तिला बसवलं आणि वाचनात गुंगून गेले.अर्धा तास सहज झाला. ती संकोचून म्हणाली, “दीदी मला  खूप बरं वाटायला लागलंय. खूप थांबलंय पोट दुखायचं. थँक्स दीदी “.ती स्वच्छ मराठीत माझ्याशी बोलत होती. “अहो,तुमचं नाव काय? कुठं रहाता? ” – “ दीदी, इथंच तर रहाते मी ! तुम्ही रोज स्कूटरवरून त्या शॉर्टकटने येता ना, मी रोज बघते तुम्हाला. आज खूप त्रास व्हायला लागला ना, म्हणून तुमची आठवण आली. नाहीतर कोणी डॉक्टर आम्हाला तपासायला तयार होत नाहीत. तुमचे खूप आभार ! “

मी म्हटले “ नाव काय म्हणालात तुमचं? ”  

“ राणी “ किती सुंदर होती राणी . नीट बघितल्याशिवाय समजणारही नाही हिच्यात असं काही कमी आहे.

 “ दीदी,किती पैसे झाले? “ 

 मी म्हटलं “ राहू द्या हो !मग बघू.”

” असं नको !आहेत माझ्याकडे.” ती संकोचून म्हणाली. 

मी म्हटलं, “ पुढच्या वेळी द्या नक्की. आज राहू दे. “ 

राणी खुशीनं हसली .तिचे अगदी एक ओळीत असलेले पांढरेशुभ्र दात चमकले.  हळूहळू राणी माझी नेहमीची पेशन्ट झाली. माझ्या दवाखान्यात बाकावर बसलेल्या इतर पेशन्टनाही  तिची सवय झाली होती.  किती अदबशीर वागणं होतं तिचं ! आपला नंबर येईपर्यंत ती टेबलावर ठेवलेली मासिकं वाचायची. माझ्या चौकस स्वभावानुसार मी हळूहळू तिची माहिती विचारायला लागले. 

राणीचं कुटुंब पुण्यातलंच ! मी जिथून शॉर्टकटने येते त्या वस्तीत तिची आई भाऊ त्याची बायका मुले सगळे एकत्रच रहातात. राणीचा भाऊ सिक्युरिटी गार्ड आहे. भावजय एका मॉलमध्ये नोकरी करते. राणी खरं तर एस.एस.सी.झालीय,  पण आपल्या इथले दुर्दैव ! तिला कुठेही नोकरी मिळाली नाही. पण राणी फार उत्तम शिवण शिवते. तिच्याकडे वस्तीतल्या सगळ्या बायका कपडे शिवायला टाकतात. निरनिराळे फॅशनेबल  ब्लाउज राणी इतके सुंदर शिवते की बस. वस्तीतल्या बायका तिच्याशी अगदी मैत्रिणीसारख्या वागतात. 

सहज एकदा तिला विचारलं, “ किती ग मिळतात महिन्याला पैसे?” 

” मिळतात की सहज दहा हजार रुपये ! “ ती म्हणाली. मी हे ऐकून गारच पडले. तशी राणी हसून म्हणाली, “ दीदी,तसं नाही. माझं शिवण बघून कॅम्पमधला एक माणूस मला शोधत आला. मला बघून म्हणाला, ‘अरे बापरे, तूच का ती राणी ?”  मी म्हणाले, “ हो मीच ! नेमकं काय काम आहे तुमचं माझ्याकडे ? “  तो म्हणाला, “ तुमचं शिवण फार छान आहे. मी तुम्ही शिवलेले ब्लाउज बघितले आहेत, माझ्या एका गिऱ्हाईकाने घातलेले ! तिने तुमचा पत्ता दिला ! पण ….” आणि तो माणूस क्षणभर काहीच बोलला नाही.  मग अवघडत म्हणाला .. “ पण तुम्हाला माझ्या दुकानात नोकरी नाही देऊ शकणार मी ! “ मग मीच आपणहून त्यांना म्हटलं ..  “भय्या, तुम्ही मला कटिंग करून आणून द्या, मी तुम्ही सांगाल तसे देईन शिवून. माझी ऍक्टिवा गाडी आहे. मी आणून पोचवीन की दुकानावर.” मी त्यांना नमुन्याचे ब्लाउज आणि ड्रेस शिवून दिले. तो इतका खूष झाला. आता माझ्याकडे त्याचे खूप काम असते. मला सहज दहा हजार रुपये मिळतात त्याच्याकडून. दीदी, मी आता फॅशन डिझाइन मशीनही  घेतली आहे मागच्या वर्षी ! “ किती अभिमानाने राणी सांगत होती. 

मला राणीचं अतिशय कौतुक वाटलं. मी दवाखान्यात जातायेता राणी दिसायची. रस्त्यावरच घर होतं त्यांचं ! राणी भांडी घासताना, केर काढताना दिसायची. तिची आई, शेजारणी, गप्पा मारताना दिसायच्या. राणी बाहेर टाकलेल्या खाटेवर बसून तिच्या भाचरांचा अभ्यास घेतानाही दिसायची कधीकधी. मला मोठं कुतूहल आणि कौतुक वाटायचं या कुटुंबाचं. मी राणीच्या आईला हळूहळू बोलतं केलं. राणीच्या आई फार साध्या, अगदी गरीब स्वभावाच्या होत्या. मी बिचकतच विचारलं, “ राणीच्या आई, असं मूल झाल्यावर तुम्हाला काय वाटलं हो? राग  नाही ना आला माझा? नाहीतर नका देऊ उत्तर.” — “ नाही हो बाय ! कसला राग आणि काय ! पहिला मुलगा माझा एकदम छान हो. त्याच्या पाठीवर  हे बाळ झालं. आम्ही घाबरूनच गेलो असलं मूल बघून. तो डॉक्टर म्हणाला, “ देऊन टाका याला कोणत्यातरी आश्रमात. तुमचं आणि त्याचं जिणं हराम होईल बघा.”  पण माझा जीव नाही झाला हो असं करायला. म्हटलं मी वाढवीन याला. कसाही असला तरी माझ्या पोटचा आहे ना हा. चार वर्षे होईपर्यंत मी मुलगा म्हणूनच वाढवला याला. पण मग मोठं झाल्यावर तो मुलाचे कपडे घालीचना. बहिणींचे फ्रॉक, स्कर्ट घालायचा. दिसायलाही किती सुंदर आहे तुम्ही बघताच की ! मग मी त्याला मुलींसारखा वाढवला. लै हाल काढलं लेकरानं शाळेत. पण झाला बघा एसएससी. पण नोकरी कोण देणार हो याला… पण देवानं बघा कशी कला ठेवली हातात. मस्त पैसे मिळवते राणी. आम्ही मोठ्या भावाचं लग्न करताना हेही सगळं आपणहूनच सांगितलं. त्या मुलीला याला भेटायला पण सांगितलं. तीही पोरगी इतकी गुणांची बघा, म्हणाली, ‘ मला आवडल्या राणीताई. मी एकत्र राहीन तुमच्या सगळ्यांबरोबरच. आणि बघा आता, आज किती वर्षे झाली, मोठ्या भावाला दोन लेकरं झाली. अजूनही आम्ही सगळे गुण्या गोविंदानं राहतोय बघा. तेवढं व्यंग सोडलं तर काय कमी आहे हो माझ्या राणीत? बायकांना मागं सारील अशी कामं करती माझी राणी. वस्तीत पण सर्वांना आवडती बघा. धावून जाती मदतीला लोकांच्या. तिचा मोठा भाऊ म्हणायचा, ‘राणीला सिग्नलला टाळ्या  वाजवून पैसे  मागताना नाही बघायची आपल्याला. तिला पायावर उभी करू आपण.’  कोणी चेष्टा केली तर हा धावून जायचा अंगावर. खूप केलं त्यानं राणीसाठी ! आता वस्ती धड वागती…  पण आधी? जिणं हराम केलं व्हतं आम्हाला याच लोकांनी. पण राणीनं सगळं निमूट सोसलं. आपल्या गोड स्वभावानं जिंकून घेतलं लोकांना. म्हणून आज उभी आहे मानानं. भाऊ भावजयीचा भक्कम आधार आहे तिला.” राणीच्या आई सांगत होत्या. क्षणभर थांबल्या आणि आवंढा गिळत म्हणाल्या, “ काय सांगू डाक्टरबाई, पन्नासवेळा आले हिजडे, आमचं आहे हे मूल, आम्हाला देऊन टाक. तिच्या भावाने मग पोलीस  कम्प्लेन्ट केल्यावर गेले बघा. खूप दिलाय त्रास त्यांनी पण हो. पण आता सगळं छान आहे. काळजी वाटतं हो की हिचं पुढचं आयुष्य कसं जाईल. पण भाऊ भावजय सांभाळतील नीट. खूप चांगले आहेत दोघे.”  राणीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाल्या,” असतात तुमच्यासारखी देवमाणसं पण जगात. तुम्ही नाही का, कोणत्याही चौकश्या न करता औषध दिलं त्या दिवशी ! राणी लै नाव काढती बघा तुमचं.” 

त्या दिवाळीला मी माझ्या मुलींचे दोन ड्रेस  राणीकडे शिवायला टाकले. राणी दवाखान्यात आली. म्हणाली, “ ताई,दोघींचे ड्रेस शिवून तयार आहेत. पण एक विचारू? मला तुमच्या घरी बोलवाल का? मला खूप आवडेल तुमच्या मुली, घर हॉस्पिटल बघायला. बोलवाल का?’ माझ्या पोटातच तुटलं. किती साधी अपेक्षा यामुलीची ! मी म्हटलं, “ अग त्यात काय ! ये की या रविवारी. मला सुट्टी असते ना तेव्हा.”  

ठरल्या दिवशी राणी आपल्या आईला घेऊन ऍक्टिव्हावरून ऐटीत आली. छान साडी, माफक मेकअप. माझ्या सगळ्या नर्सेस,आया बघतच राहिल्या. मी राणीला हॉस्पिटल दाखवलं, सगळ्या स्टाफशी ओळख करून दिली. राणी वर घरात आली. माझ्या देवघरात तिने डोक्यावर पदर घेऊन देवांना नमस्कार केला. माझ्या मुलींना जवळ बोलावलं आणि म्हणाली, ‘ बघा ग पोरीनो… आवडले का मावशीनं शिवलेले ड्रेस?”  त्यांनी तिला ते लगेच घालून दाखवले. काय सुरेख शिवले होते आणि किती सुंदर एम्ब्रॉयडरी केली होती राणीनं ! केवळ अप्रतिम ! माझ्या मुलींची अलाबला घेऊन म्हणाली, “ सुखात रहा ग पोरीनो. आई कसली, देवी आहे देवी तुमची आई ! माझी पण आईच आहे हो ही.” माझ्या बाईने केलेले पोहे ,लाडू आनंदानं खाल्लं दोघीनी. मी राणीला सुंदर भारी साडी आणि तिच्या आईलाही साडी दिली. डोळ्यात पाणीच आलं दोघींच्या. “ कशाला हो बाई? आमच्याशी इतकं चांगलं कुणीपन वागलं नाही हो आजपर्यंत ! तुम्ही खूप वेगळ्या आहात बाई ! देव तुम्हाला काही काही कमी नाही पडू देणार ! “ राणीच्या आईनी म्हटलं. “ अहो त्यात काय एवढं? माझ्या मैत्रिणींना नाही का मी देत? तुम्हीही नाही का माझ्या मैत्रिणी? आणि राणी लहान मैत्रीण !”  राणीनं माझं हॉस्पिटल हिंडून नीट बघितलं. पाळण्यातली लहान बाळं बघितली. आमच्या नर्सेस, आयांशी गप्पा मारल्या  आणि हसतमुखाने गेली सुद्धा.

सगळा स्टाफ हळहळला तिच्यासाठी ! “ बया,द्येव तरी कसा बाई अन्याय करतो हो एखाद्यावर ! किती हो गुणांची आहे तुमची राणी !”  आमची सिस्टर मनापासून कळवळून म्हणाली. 

याही गोष्टीला खूप वर्षे लोटली. नंतर राणीच्या भावाने ती जागा सोडली आणि ते मुंबईला गेले असं ऐकलं मी. अजूनही मला राणीची आठवण येते. कोणी तृतीयपंथी सिग्नलवर पैसे मागताना दिसला तर सांगावेसे वाटते…… 

…… “ अरे,त्या राणीचं उदाहरण घ्या रे ! बघा किती सन्मानाने जगतेय ती आयुष्य. देवानं एवढा अन्याय करूनही कधी तिने त्याला दोष नाही दिला.” …… अजूनही वाटतं कधीतरी …..  राणी अशीच समोर येऊन उभी राहील आणि विचारील, “ बाई, बऱ्या आहात ना? राणीला विसरला नाहीत ना?” आणि माझे डोळे माझ्याही नकळत पाणावतात राणीसाठी !

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रीमंत पदर… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? मनमंजुषेतून ?

☆ श्रीमंत  पदर… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आपल्या संस्कृतीत सोळा श्रृंगार सांगितले आहेत, त्यातील एक साडी परिधान करणे हा आहे. मग साडी म्हटलं की ओघाने पदर येणारच•••

पण राज्य बदलले की साडी तीच रहाते पण पदर घ्यायची पद्धत बदलते. कोणी डाव्या खांद्यावर घेतो कोणी उजव्या खांद्यावरून पुढे घेतो, कोणी त्याला चावीचा गुच्छा बांधून दुसर्‍या खांद्याच्या मागे सोडतो कोणी डोक्यावर घेतो कोणी दोन खांद्यावर कोणी डोक्याच्याही पुढे चेहर्‍यापर्यंत ओढतात तर कोकणी स्त्रिया चक्क कमरेला गुंडाळतात. कसेही कोणत्याही प्रकारचे पदर घेतलेले हे स्त्रीचे रूप नेहमीच मनाला मोहवित आले आहे. 

पण या पदराची किमया त्याच्यापुढे लावलेल्या क्रियापदामुळे कृष्णलीला वाटतात. या पदराच्या लीला काही पाहिलेल्या काही अनुभवलेल्या काही ऐकलेल्या एकत्र वाचायला नक्कीच मजा येईल.

दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेली उषा आईला म्हणाली आई हीच साडी तू घे. अगं पदर बघ किती छान आहे . युनिक आहे युनिक. 

नुकताच पदर आलेल्या म्हणजे पदरेकरीण झालेल्या आपल्या लेकीचं ज्ञान पदरात पडलं आणि तीच साडी आईने घेतली. 

जरी पदरेकरीण झाली असली तरी आईचा पदर धरून चालणे तिची सवयच होती. आईने पदर खोचून दिवाळीची सफाई केली.

दिवाळीच्या वेळेस आईने लक्ष्मी पुढे पदर पसरला म्हटली सगळ्या चुका पदरात घे आणि सगळ्यांचे सुख आरोग्य पदरात टाक गं आई. माझ्या पदरी निराशा नको येऊ देऊ.

आईचा जरतारी पदर भरून पावला होता जणू. पदरात मावेल एवढे दान मिळाल्याचा भास तिला झाला होता पण पदरात न मावेल एवढा आनंद उत्साह चेहर्‍यावरून ओसंडत होता.

त्याच उत्साहात दिवाळी संपली आणि आई उषाला म्हणाली आता पोरी तू मोठी झालीस. आता आईच्या पदरामागे लपणे, आईच्या पदराला तोंड पुसणे, शेंबुड पुसणे असे करायचे नाही. आता आपल्या पदराला आपणच जपायचे . पदर ढळू देऊ नकोस. पण जर कोणी पदराला हात घालू पाहील त्याला पदर झटकून वठणीवर आणायचे आणि मानानं पदर डोईवर घ्यायचा .  

हे काही पदरचं सांगत नाही. अगं समाजाची रीत आहे ही. 

आईच्या संस्कारामुळे उषाच्या जीवनाला पदर लाभत होते.एक एक पदर छान सुटून येत होते. दोघींचाही पदर फाटका नाहीये हे समजत होते.

स्वाभिमानाची शिकवण देताना आई म्हटली अंगी असेल ते काम अन् पदरी पडेल तो दाम करण्याची तयारी हवी. अगं पोरी पदरचे खावे पण नजरचे खाऊ नये.  नेहमी पदरचे खावे अन चौघात जावे उषा अजून मोठी झाली. तिच्यावर प्रेम करणारा तिच्या आयुष्यात आला आणि ती नकळत पदराशी चाळे करू लागली.आईच्या नजरेतून हे सुटले नाही. आई म्हटली आता त्याची तुझ्या पदराशी गाठ बांधली की होईल बाई जबाबदारीतून सुटका. जरा पदर फडकायला मोकळा होईल. 

तू तुझ्या मनाने त्याला निवडलं आहेस तर छान पदर अंथरून स्वागत कर त्याचं. त्याचे काही चुकले तरी शक्य तेवढे सावरून घेत ‘ पदरी पडलं अन पवित्र झालं ‘ म्हणायचं . एकमेकांचे होऊन रहाताना पदरी पडली झोड हसून केली गोड  म्हणत गुण्यागोविंदाने रहायचे.

आईचे  पाठ , शिकवण यातुन सुसंस्काराने न्हाऊन उषाच्या पदराशी त्याची गाठ पडली एकदाची. आयुष्याचा हा पदरही चांगला असल्याने ती कधी पदराची चवरी करून त्याची रिद्धी तर कधी पदराने वारा घालून त्याची सिद्धी होत होती. जरी सुखवस्तु कुटुंबात पडली असली तरी पदरपेशी होऊन जगणं तिला जमतच नव्हते तिला समजून घेणारा तिच्या पदरचा माणूस ; तिचा नवरा तिला काही कमी पडू देत नव्हता म्हणून गरजूंना ती पदरमोड करून मदत करत होती. चांगल्या मनाने केले तर पदरास खार पडणार नाही हे तिला माहित होते. पदर खर्च करून जणू स्वत:च्याच पदरात पुण्याचे माप घालत होती. 

त्यामुळे पदर गमावण्याचा प्रश्न नव्हताच. ती क्षम्य चुकांवर हसत पदर घालत होती. आईने सांगितल्या प्रमाणे पदर सावरत “ पदरचे द्यावे मग सांगावे “ या धोरणाने मदत करत जीवन जगत होती. सासरच्या कुत्र्याला सुद्धा अहो म्हणायचे या संस्कारातून ती कधीच एक पदरावर येत नव्हती. शिवाय आपला पदरही पाडत नव्हती. त्यामुळे नियतीच  पदरचं घालायला तिच्यापुढे ठेपली तेव्हा दैव आले द्यायला अन पदर नाही घ्यायला अशी तिची गत झाली नाही.  तोंडाला पदर आणि गावाला गजर तिच्या बाबतीत घडले नाही. कायम पदराची शुद्ध जपत पदरास खाच न पाडता ती समाधानाने रहात होती. म्हणूनच उषाच्या जीवनात सुवर्णपहाट येण्याची चाहूल तिला लागली होती. ती आई होणार होती. सातव्या महिन्यात ओटी पदरात भरून ती आईकडे बाळंतपणासाठी आली होती.  

आता ती सुखरूप प्रसूत झाली होती आणि चिमुकले बाळ तिचा पदर ओढत होते आणि त्या कान्ह्याला पदराखाली घेताना तिला पदराची महती समजली होती आणि असा श्रीमंत पदर लाभण्याचे भाग्य आपल्या पदरी आहे या जणिवेने तिच्या डोळ्याचे पदर ओलावले. 

जीवनाच्या चिरोट्याचा एक नाजूक पदर खुलला होता तो हृदयाच्या एका पदरात तिने लपेटून घेतला होता.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती ‘गुलाबी’ नोट !… लेखक – श्री रवी वालेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ ती ‘गुलाबी’ नोट !… लेखक – श्री रवी वालेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

काल ICICI मध्ये पैसे काढायला गेले होतो. फार नाही पण बऱ्यापैकी गर्दी होती. पैसे जमा करायला आणि  काढायला अशा दोन वेगवेगळ्या रांगा होत्या. सगळ्यांनाच लगीनघाई ! २०-२२ वर्षांच्या दोन-तीन चुणचुणीत मुली हा सगळा पसारा हसतमुखाने सांभाळत होत्या. रांगेत मोदी हा एक आणि मागच्या आठवड्यात पैसे नसल्याने झालेली तारांबळ हा दुसरा, हेच विषय सगळे चघळत होते. गुलाबी नोटेवरून हमखास होणारे विनोद होतेच. एकंदरीत झकास चालले होते.

सत्तरीच्या आत बाहेर असणारे ५-६ जण घाबरतच आत आले. बँकांमध्ये असणाऱ्या गर्दीविषयी टीव्हीवर येणाऱ्या बातम्या बघून धास्तावलेले असावेत (बहुतेक NDTV जास्तच बघतं असावेत !).

ह्या नव्या बँका त्यांच्या त्या भव्यतेने, इंटिरियरने अगोदरच कोणालाही बिचकाउन सोडतात. त्यात ते मधाळ इंग्रजीतले अगत्य ! जुन्या बँका कशा ‘आपल्या’ वाटायच्या ! टेबलाटेबलांच्या गर्दीतुन आपला-आपला ‘साहेब’ हुडकायचा आणि डायरेक्ट काम सांगायचं ! नमस्कार करायचीही गरज नसायची. एकदम घरगुती वातावरण अन् रोखठोक बोलणे !

‘ ऊद्या या ‘ 

‘ ह्याच नोटा मिळतील ‘

‘आम्ही काय गोट्या खेळतोय का? ‘

‘ घरी नाही छापत आम्ही ‘

‘ जा,हो, कमिशनरला जाऊन सांगा, असले छप्पन पायलेत ‘

— असा कसा स्वच्छ, आरस्पानी कारभार ! या नव्या बँका एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखेच नव्या पिढीलाही दबकुन वागायला लावतात, तिथे जुन्या पिढीचं काय !

मी लांबून त्या सगळ्या ग्रुपकडे बघत होतो. एकमेकांत चर्चा करून त्यांच्यातल्या एकाने धीर करून फॉर्म भरत असलेल्या एकाला काही विचारले, त्यानेही त्याचे हातातले काम थांबवून त्यांना एक फॉर्म आणून दिला. त्या फॉर्मचे सामुदायिक वाचन झाल्यावर ग्रूपमध्ये पुन्हा चर्चा झडली. मी अंदाज बांधला की या प्रत्येकाचे काम वेगवेगळे असावे. कोणाला पैसे भरायचे होते, कोणास नोटा बदलून हव्या होत्या, तर कोणाला पैसे काढायचे असावे. त्यांच्यातला जीन्स- टी शर्ट घातलेला एकजण धीटपणे सर्वांना सांभाळत होता. ( हे काका बहुधा बँकेतूनच रिटायर झालेले असावे ) तरीपण त्यांच्याही चेह-यावरचा गोंधळ काही लपत नव्हता ! सिनीयर सिटिझन्ससाठी वेगळी रांग असावी, अशा अंदाजाने आलेले ते, रंगीबेरंगी हाफपँटी न घालणाऱ्यांची तिसरी रांग चष्म्याआडून शोधत होते आणि ती काही सापडत नव्हती !

लोक येतच होते, रांग वाढतच होती. त्याचवेळी अजून  २-३ वरिष्ठ नागरीक बँकेत आले ! पहिल्या ग्रूपमधल्या दोन चतुर काकांनी लगेच एका रांगेत उभे राहून घेतले ! (फॉर्मचं काय ते नंतर बघू, नंबर तर लाऊन ठेऊ !)

गर्दी वाढलेली बघून, काचेच्या केबिनमधून ब्रँच मॅनजेर बाहेर आल्या. त्या सुद्धा पंचविशीच्या आत बाहेर ! (या नव्या बँका तिशीतच VRS  देतात का?) त्या गेल्या त्या डायरेक्ट या ग्रुपकडे ! २ मिनीटे बोलल्या असतील नसतील, सारी सिनीयर मंडळी निवांत सोफ्यावर बसली ! त्या ब्रँच मँनेजरने हाक मारून स्टाफमधल्या एका मुलीला बोलावले. ती आली. एकदम उत्साही आणि तरतरीत ! (या नव्या बँका बायोडेटात ‘चुणचुणीत’ आणि ‘तरतरीत’ हे शब्द असतील, तरच नोकऱ्या देत असावेत !)

त्या विशीतल्या पोरीने तिथेच त्यांच्या बरोेबर सोफ्यावरच  बसुन कोणाला फॉर्म देे, कोणाला चेक लिहून दे, कोणाची आयडी प्रूफवर सही घे, पेईंग स्लिप चेक कर असा झपाटा लावला ! एवढच नाही, मध्ये उठून ती खुद्द ‘रोकड’ सुद्धा या काका लोकांना सोफ्यावरच हातात आणून देत होती, कोणाच्या नोटा बदलून आणत होती !

१५ ते वीस मिनीटात तिने सगळ्या कामाचा फडशा पाडला ! सारे अवाक होऊन बघत राहिले !

१५-२० मिनीटात सगळ्या वरिष्ठांना वाटी लाऊन,जवळ जवळ २-४ लाखांची ऊलाढाल करून, २-४ कोटींचे पुण्य कमवून, ती कन्यका आपल्या स्वत:च्या जागेवर जाऊन कामाला भिडलीसुद्धा !.. रांगेतल्या कनिष्ठांचे माहित नाही, पण आम्ही (ना कनिष्ठ ना वरिष्ठ असे मधल्यामधले ) आदराने तिच्याकडे आणि असूयेने वरिष्ठांकडे बघतच राहिलो!

माझा नंबर आला, नोटा मिळाल्या. नवी दोन हजाराची नोट पहिल्यांदाच हातात आली होती ! नोट अपेक्षेपेक्षा छोटी होती, आणि खरं सांगू? खोटी वाटतं होती !  पण काहीही असो, पाकिटात व्यवस्थित बसली. छान वाटले ! पूर्वीची हजाराची नोट उनाडपणे पाकिटाबाहेर डोकवायची. ही नवी नोट निव्वळ दिसायलाच देखणी नव्हती, तर घरंदाज- शालिनही होती, तरतरीतही होती !

मला एकदमं त्या ओरीजनल ‘तरतरीत’ मुलीला भेटावसं वाटलं.

‘स्सर?’ मोठ्ठे डोळे माझ्यावर रोखत तिने प्रश्नार्थक चेहरा केला. तिटकारा किंवा तुसडेपणाचा भावही त्या निर्मळ चेहऱ्यावर नव्हता ! मी तिला वरिष्ठांसाठी तिने जे केलं आणि जी धावपळ केली, ते सगळ्यांना कसे आवडले, ते सांगितले. (आणि हो, थोडेसे  अस्पष्ट असे आभार ही मानले !)

‘अरे स्सरं! सालभर थोडी ऐसा करना पडता है? ये तो बस, हप्ता दस दिन की बात है ! और ऐसे समय पर सबको मदद करना अच्छा लगता है !’

घरी येईपर्यंत तिचे ते ‘अच्छा लगता है ‘ कानात, मनात घुमत होतं !

मोदीजींनी भारताची सर्वात जास्त किंमतीची नोट ‘गुलाबी’ का बनवली, याचा लख्ख उलगडा झाला !

या नव्या पिढीने आणि या असल्या ‘अच्छा लगता है!’ म्हणण्याऱ्या मुलीनेच त्यांना २०००ची नोट ‘Pink’ बनवायला भाग पाडले असणार !

जगलो-वाचलो तर एक दिवस मी पण ‘सिनीयर सिटिझन’ होईन, पण तेव्हा सुद्धा जेव्हा-जेव्हा दोन हजाराची नोट बघेन  तेव्हा-तेव्हा हे ‘अच्छा लगता है’ आठवेल आणि मी माझ्या नातवांना विचारेन, ‘ ही नोट ‘गुलाबी’च का आहे, माहितीये?

लेखक : रवि वाळेकर             

(ही नोट कधीकाळी रद्द होईल, असे हा लेख लिहिताना वाटलेही नव्हते!)

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print