मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लिमलेटची गोळी आणि बरंच काही… ☆ श्रीरंग खटावकर ☆

श्री श्रीरंग खटावकर  

? मनमंजुषेतून ?

☆ लिमलेटची गोळी आणि बरंच काही… ☆ श्रीरंग खटावकर  ☆

बाजारात फिरताना अचानक एका दुकानात “ती” दिसली आणि मी एकदम ३५ वर्षांपूर्वीच्या काळात गेलो. 

शाळेतली धावण्याची स्पर्धा, जीव तोडून धावलो, नंबरात नाहीच आलो, पण शर्यत संपल्यावर मराठे बाईंनी हातावर ठेवली, तीच ती लिमलेट ची गोळी.

शर्यतीत धावताना बक्षिसापेक्षा त्या गोळीची क्रेझ जास्त होती. 

नारंगी केशरी रंगातली ती अर्धचंद्रकोर आकारातील गोळी बघूनच तोंडाला पाणी सुटायचं! 

कदाचित त्या काळी फारशी व्हारायटीच नसल्याने त्या गोळीचं अप्रूप असायचं. ५ पैशाला पा….च गोळ्या मिळायच्या हे सांगितलं तर माझी मुलं सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत. 

असो!

काही विशिष्ट गोळ्याच मिळायच्या त्या काळी! त्यातली सगळ्यात आवडती सगळ्यांना परवडणारी हीच ती लिमलेटची गोळी, हिच्या थोड्या वरच्या पातळीवर होती ती छान प्लास्टिक च्या कागदात गुंडाळून येणारी रावळगाव गोळी, तिच्याच पातळीवर लाकडी काडी लावलेली स्ट्रॉबेरीच्या आकाराची आणि खाल्ल्यानंतर जिभेवर रंग रेंगाळणारी स्ट्रॉबेरीची गोळी. एखादा धाडसी मुलगा कधीतरी हुबेहूब सिगरेट सारखीच दिसणारी, टोकाशी निखारा असल्यागत लाल ठिपका असलेली सिगरेट ची गोळी ऐटीत तोंडात ठेऊन यायचा. उभट चौकोनी आकारात मिळणाऱ्या पेपेरमिंट च्या गोळ्या तर खायला कमी आणि रुखवतात तुळशी वृंदावन नाहीतर बंगल्यासाठी जास्त वापरल्या जायच्या. त्या नंतर कधीकाळी दिसायची ती आठवलेची काजू वडी, परफेक्ट चौकोनी आकारातली, वर सोनेरी कागदाचा रुपया असणारी!! 

पूर्वी शाळेत वाढदिवसाला वाटली जाणारी एकमेव गोळी म्हणजे लिमलेटच!! 

पण काही श्रीमंत मुलं मात्र आम्हाला जणू गुलबकावलीच्या फुला प्रमाणे असलेली, सहजसाध्य नसलेली, वेष्टनापासून चवीपर्यंत सर्वांगसुंदर अशी इकलेअर वाटायचे तेव्हा काय भारी वाटायचं, आणि तेवढया दिवसापुरता त्या मुलाचा भाव वधारायचा!!

आमच्या आईचा एक मामेभाऊ दर दिवाळीच्या आसपास भाऊबीजेला यायचा. आईला ओवाळणीत बंद पाकीट घालायचा. पण आम्हाला त्या चंदुमामा ची ओढ वेगळ्याच कारणासाठी असायची! 

तो आम्हा भावंडांसाठी चक्क एक मोठं फाईव्ह स्टार चॉकलेट आणायचा!!

वर्षातून एकदाच मिळणाऱ्या त्या चॉकलेटची वर्षभर वाट पाहायचो आम्ही!!

कधीतरी बाबा खुश असले तर बाजारातून येताना चंदेरी किंवा सोनेरी वेष्टनात मोल्ड केलेले चॉकलेट आणत तो दिवस म्हणजे तर दिवाळीच!!

आमची एक मावशी परदेशात राहते तिनं पहिल्यांदाच आणलेल्या फॉरेन च्या चॉकलेटची चांदी तर कित्येक वर्षे माझ्या अभ्यासाच्या वहीत होती, आणि त्यावर फुशारकीही मिरवलेली आठवतेय. 

हे सगळं आठवलं ते त्या लिमलेटच्या गोळी मुळे! 

लिमलेटच्या, जिऱ्याच्या, जिऱ्यामीऱ्याच्या, सिगारेटच्या, पेपेरमिंटच्या, एक्स्ट्रा स्ट्रॉंगच्या आठवेलच्या काजू वड्या, इकलेअरच्या गोळ्यांनी आमचं बालविश्व व्यापून उरलं होतं. 

त्याच तंद्रीत ते गोळ्याचं पाकीट घेतलं आणि घरी आलो, मुलांसमोर धरलं तर नाक मुरडत मुलगी म्हणाली “ईई ह्या काय गोळ्या आणल्यास बाबा, अनहायजीनिक असतात त्या” 

आता त्यांना काय डोंबल सांगू की तुमच्या कॅडबरी सिल्क किंवा हल्ली घरोघरी दिसणाऱ्या फॉरेन चॉकलेट (म्हणजे खरंतर एअर पोर्ट च्या ड्युटी फ्री शॉप मध्ये मिळणाऱ्या) च्या जमान्यात आमच्या करता अजूनही लिमलेटची गोळी म्हणजेच फिस्ट आहे म्हणून……..

© श्रीरंग खटावकर

मो – +91 7039410869

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अदृश्य बंधनातून ‘मुक्त’ होऊयात? ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

डॉ. प्राप्ती गुणे

? मनमंजुषेतून ?

☆ अदृश्य बंधनातून ‘मुक्त’ होऊयात? ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

… ” वाॅव ! सगळेजण किती छान डान्स करत आहेत… मी पण जाऊ का?…. नको राहू देत.”

…  ” मला वाटतंय आज हा राणी पिंक ड्रेस घालूयात…. पण नको, जरा जास्तच भडक वाटायचा तो…..   बघू, नंतर घालू पुन्हा केव्हातरी.”

…  “आज असं वाटतंय की स्पा मध्ये जाऊन,  छान रिलॅक्स व्हावं…पण नको, परीक्षा दोन महिन्यांवर आल्या आहेत.”

…  “ढोल पथक पाहून मला एकदम भारावल्यासारखं वाटतं. किती जोशपूर्ण वातावरण निर्माण होतं. मीही यावर्षी ढोल पथकात भाग घेऊ का ? अरे… पण ऑफिसहून आल्यावर मला खूप दमून गेल्यासारखं होतं.”

प्रत्येक वेळी मनात एखादी कल्पना आली– की काहीतरी नवीन ‘ट्राय’ करून बघूयात, की त्याला क्षणार्धात ‘प्रत्युत्तर’ देणारा आवाज नेहमी हजर होतोच. आणि बऱ्याचदा तो नकारात्मक आणि डीमाॅरलायझिंग असतो  ….. ” मला नाही जमणार, मला वेळ नाही, मला आता शक्य नाही, उगाच वेळ वाया जाईल ” …. वगैरे वगैरे…… या  प्रत्युत्तरांची यादी कधीही न संपणारी आहे.

मला प्रश्न पडतो की हे सगळे मनाचे इन्स्टंट रिप्लाय नकारात्मक असतील तर आपण लगेच ऐकतो आणि कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टींचा पिच्छा पुरवणं लगेच सोडून देतो. 

पण मन म्हणालं की –

…   जा, डान्स कर !

…  तो राणी पिंक ड्रेस घाल !

….  रिलॅक्स हो !

….  ढोल पथकात भाग घे !

तर आपण आपल्या मनाचं ऐकत नाही. आपल्याच मनामध्ये हे द्वंद्व सतत चालू असते आणि आपण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत राहतो. आणि मग स्वतःच देवाकडे तक्रार करतो की मला जे हवं ते मला कधीच मिळत नाही.

मग ही अदृश्य बंधने कोणती आहेत जी आपल्याला आपलं मन म्हणते तसं जगण्यापासून अडवत असतात? आपल्याला हवे ते मिळवण्यापासून रोखत असतात ?…….  

तर ही बंधने म्हणजे …… आपल्या मनात खोलवर रुजलेल्या ” गैरसमजुती “ !

नकळतपणे लहानपणापासून  घडलेल्या काही गोष्टींचा, घटनांचा, समजुतींचा किंवा त्यावेळच्या काळानुरूप दिल्या गेलेल्या शिकवणुकींचा आपल्यावर खोलवर परिणाम घडत असतो. त्या गोष्टींचा इम्पॅक्ट जरी प्रत्यक्षात त्या क्षणापुरता घडून येत असला, तरी त्याचे परिणाम मात्र आपल्याही नकळत लाईफ-लॉन्ग आपल्या मनात रेंगाळत राहिलेले असतात. आणि प्रत्यक्ष आयुष्यात त्याच परिणामांचे दडपण आपण विनाकारण बाळगत राहतो… काळाबरोबर त्या पूर्वीच्या गोष्टींचे संदर्भ किंवा अन्वयार्थ नक्कीच बदलतात आणि ते आवश्यकही असते. पण आपण मात्र त्या पूर्वीच्या परिणामांच्या बंधनातून मनापासून बाहेर यायला उगीचच कचरत असतो. आता हेच बघा ना ….  

जाता येता कोणीतरी तिसरा त्याला वाटलं म्हणून काहीतरी कमेंट पास करतो …. 

… राणी पिंक कसा भडक रंग वाटतो….

…  परीक्षा संपेपर्यंत मी रिलॅक्स होऊच शकत नाही…

…  कंपनीचं काही सांगता येत नाही, आज सांगेल, उद्या कामावर येऊ नका… रिस्कच नको.

… सगळ्यांसमोर डान्स करायला जायचं आणि सगळेजण आपल्यावर हसायचे…

— आणि आपल्या मनात दडलेल्या अशाच काही गैरसमजुती अशावेळी नेमक्या आपल्या मनाला आत्ता  मनापासून जे वाटतंय ते ऐकण्यापासून थांबवतात…. हीच ती मला अनेकदा जाणवणारी आणि विचार करायला अगदी भागच पडणारी बंधने … 

परंतु ही बंधने शब्दशः ‘अदृश्य’ असल्याने आपल्याला ही प्रत्यक्ष दिसत नाहीत.  आणि जे बंधन ‘प्रत्यक्ष’ दिसत नाही ते तोडणार कसं ना ? …हा एक बाळबोध प्रश्न स्वतःला विचारून आपण एक प्रकारे स्वतःची खोटी समजूत घालत असतो. बरोबर ना …  

पण या प्रश्नाचे उत्तर मी सांगू ?……  मन जे म्हणते ते एकदा प्रत्यक्ष करून तर पहा ! आणि मग ही अदृश्य बंधने तुमच्याही नकळत तुटलीच किंवा तुटायला सुरुवात झाली असं नक्की समजा.

मग नुकत्याच साजऱ्या झालेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपणही  मनाच्या ह्या अदृश्य बंधनांतून “ मुक्त “  होऊयात ?…. 

… मनापासून प्रयत्न केला तर नक्कीच जमेल … Try n try n try … But never cry …

© डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय परमेश्वरा… ☆ सौ. अंजली धडफळे ☆

सौ. अंजली धडफळे

अल्प परिचय

गेली ३५ वर्ष योगाच कार्य करते.

शिक्षण – संगीतातले ,आवाज शास्त्र शिकवते.

योग थेरपिस्ट – आजपर्यंत योग या विषयावर ६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

? मनमंजुषेतून ?

☆ प्रिय परमेश्वरा… ☆ सौ. अंजली धडफळे ☆

प्रिय परमेश्वरा!… 

दंडवत प्रणाम 

‘तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम ‘ …. खरंच तुझ्यामुळे हा जीवनाचा प्रवास चालला आहे. तुझी रुपं तरी किती ! अगाध आणि अफाट !! 

परमेश्वर – देव आहे की नाही, तर ‘ आहेच ‘ असं उत्तर येतं.

कारण या जीवनरुपी सागरात नौका घातली… आणि आता  पैलतीर जवळ येऊन ठेपला… हे कोणी केले..‌. तूच केलेस रे परमेश्वरा ! देवा ! तूच ताकद देतोस. 

काल माझी नात म्हणाली, ‘God is there or not I don’t know. But I feel God.’ एवढ्या छोट्या मुलीला देव आहे का नाही कळत नाही, पण तो कळतोही. मी तिला म्हटलं, ‘ तू मोठी झालीस ना, की तुला कळेल देव आहे का नाही. ‘ 

तुझ्या परवानगीशिवाय झाडाचे एकही पान हलू शकत नाही. तू ब्रम्हांडात आहेस, पिंडात आहेस, पंचमहाभूते तुझ्यामुळे निर्माण झाली. मग दर्शन का देत नाहीस? ही सृष्टी हेच तुझे दर्शन मानायचे ना! 

कर्ता करविता तूच आहेस. `दळिता कांडिता तुज गाईन अनंता |` 

सोमवारी तू शंकर भगवान असतोस, मंगळवारी दुर्गा माता, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी तुळजाभवानी, शनिवारी वीर मारुती, रविवारी खंडोबाराया. कोणत्याही रूपात असलास तरी तुझं दर्शन विलोभनीय आहे, हेच खरं. 

किती दिवस सगुणाची उपासना करायला लावणार? निर्गुणाकडे जायचंय. द्वैत सोडून अद्वैताची साधना करायची आहे. त्यासाठी तूच हवास बळ यायला. 

ईश्वरीय भक्ती अगाध, अनाकलनीय आहे. तुझ्या दर्शनाचा तुझा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झालीये. त्यातही तूच साथ देतोस, देणार आहेस. 

शब्देविण संवादू अशी तुझी भाषा. शब्दांशिवाय पण तुझं असणं कळतं बरं का ! 

घराबाहेर पडताना मी तुला नमस्कार करते व म्हणते,

‘देवा माझ्याबरोबर चला !’ 

‘गातांना देवा माझ्या गळ्यात या !’

‘चालताना देवा माझ्या पायात या !’ 

‘खाताना देवा जेवायला या माझ्याबरोबर !’ 

‘झोपताना देवा उद्याची सकाळ प्रेरणादायी होण्यासाठी रात्रभर माझ्याजवळ राहा !’ 

लिहिताना हातात, शिकवताना गळ्यात रहा असे म्हटले की तुझी जाणीव प्रकर्षाने होते….  असे म्हणत राहण्यासाठी ताकद दे. दर्शन दे.

तुझ्या दर्शनाची आस असणारी सेविका…

© सौ. अंजली धडफळे

योग थेरपिस्ट

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दाभोळकर सर, विनम्र अभिवादन… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ दाभोळकर सर, विनम्र अभिवादन… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे

दाभोळकर सर ..  विनम्र अभिवादन..!!

दाभोळकर सर तुमचा खून होऊन आज १० वर्षे झाली.

अनावश्यक रुढी-रिती-रिवाज, परंपरा लादल्या गेलेल्या, उपास-तापास मुकाटयाने सहन कराव्या लागणाऱ्या,.. अंधःश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचा तुम्ही आवाज होता..!

तुम्ही देव वा देवावरची लोकांची श्रध्दा कधीच नाकारली नाहीत. तरीही तुमची भीती वाटली इथल्या काहींना.

विवेकनिष्ठ, विज्ञानवादी समाजाचं स्वप्न तुम्ही पाहिलं..सर्वांना दाखविण्याचा प्रयत्न केला..!

मायेचं छत्र हरविल्यानंतर, आईवडील गमावल्यानंतर, निराधार झाल्यावर जेवढं दुःख होतं ना…

त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त दुःख झालं… तुम्ही गेल्यावर..!

तुम्ही कळला नाहीत, रुचला नाहीत, पचला नाहीत,

तुमची भीती वाटली म्हणून तुम्हाला गोळ्या घातल्या गेल्या..!

….. पण .. .. कितीही गोळ्या घातल्या तरी तुम्ही मरणार नाहीत.

कारण गांधी, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश

मरत नसतात… हेच त्यांना कळत नाही.

विचारांची लढाई विचारांनी लढणाऱ्या प्रत्येक माणसांत तुम्ही आहात..तुमच्या विवेकनिष्ठ विचारांनी, तुम्ही केलेल्या प्रत्येक परिवर्तनवादी लढाईतील आठवणीत तुम्ही जिवंत आहात…

तुम्ही मांडलेल्या विचारांच्या रुपात,

तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांच्या रुपात,

तुम्ही उभा केलेल्या चळवळीच्या रुपात,

तुम्ही अजूनही जिवंत आहात.

आणि कायम जिवंत राहणार..!

तुमच्या डोळ्यातील विवेकी तेज .. अल्प का होईना इथं अनेकांच्या डोळ्यात उतरलं..!

तुमच्या रक्तातील विज्ञाननिष्ठता आमचं रक्त रंगवू पाहातेय..!

तुमच्या बोलण्यातील वादळी पण तितकीच संयमी लय, इथल्या मनामनात उसळू लागलीय..!

तुमच्या नसानसातून वाहणारा कार्यकारणभाव, तर्कशुद्ध विचार, थोडा का होईना समाजात ही रुजू लागलाय..

तुमचे श्रम, तुमचे बलिदान अजिबात वाया गेले नाहीत आणि जाणारही नाहीत.

झिरपत राहतील या मातीतच…. उद्याच्या उभ्या पिकात त्याचा डौल नक्की दिसेल अशी आशा आहे..!

… दाभोळकर सर …. तुम्हाला मनोमावे सलाम..! विनम्र अभिवादन 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ मेरा देश बदल रहा है! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ मेरा देश बदल रहा है! ☆ श्री मकरंद पिंपुटकर

हल्लीच्या पिढीबाबत, आपल्या देशाबाबत आणि अनेक सरकारी योजनांबाबत (आपापल्या वैयक्तिक अनुभवांमुळे) आपण कमालीचे निराशावादी असतो. पण दिल्लीच्या सौरभ वर्मा यांना २०१७ साली आलेला अनुभव म्हणजे या काळ्या ढगांची एक चंदेरी किनार आहे. 

सौरभ दिल्ली मेट्रोने प्रवास करत असताना एक typical कॉलेज विद्यार्थी कानांना हेडफोन्स लावून, गाणी ऐकत मांडीवर डबा ठेवून, खाताना त्याला दिसला. काहीतरी झालं आणि त्या विद्यार्थ्याचा डबा खाली पडला आणि मेट्रोच्या फ्लोअरिंगवर ते सगळं अन्न सांडलं. 

सौरभने मनातल्या मनात कपाळावर हात मारला. आता हे खरकटं दहा जणांच्या पायाखाली येणार, आणि सगळीकडे बरबट होणार हे सगळं भविष्य त्याला लख्ख दिसू लागलं.

पण पुढच्याच क्षणी त्याला एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ” लगे रहो मुन्नाभाई “चा परिणाम म्हणा किंवा ” स्वच्छ भारत अभियानाचा ” परिणाम म्हणा, पण तो विद्यार्थी उठला…  आपल्या वहीतून त्याने एक पान फाडून घेतलं, त्यात ते सगळं खरकटं गोळा केलं, जवळच्या पाण्याच्या बाटलीने ती जागा पुसून घेतली आणि चक्क स्वतःच्या हातरूमालाने जमीन पुसून काढली. जिथं अन्न सांडलं होतं तो मेट्रोचा भाग आता पुन्हा पूर्ववत स्वच्छ झाला होता.

सौरभने आवर्जून त्या विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारले. स्वच्छ अभियानाचा तो हिरो होता ” प्रांजल दुबे “.

सौरभने आपल्या फेसबुकवर ही कथा छापली होती. 

सत्कृत्य करणारा प्रांजल आणि ते लोकांपर्यंत पोचवणारा सौरभ यांच्याकडे पाहिलं की नक्कीच म्हणावंसं वाटतं —– “ मेरा देश बदल रहा है !” 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फक्त गॉगल काढा… ☆ श्री सुनीत मुळे ☆

??

फक्त गॉगल काढा…☆ श्री सुनीत मुळे ☆

” नही साब ” त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवत तो म्हणाला,

” इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है “

तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे उभा होता !

रस्त्याखालचा पाईप पूर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर उंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे !

मी अवाक झालो ! कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात उभा राहिलाय?

मी भर पावसात खाली उतरलो. त्याला म्हटले, ” बहोत बढिया, भाई !”

तो फक्त कसनुसं हसला आणि म्हणाला,

” बस, कोई गिरना नै मंगता इधर “

” कबसे खडा है?”

” दो बजे से “

घड्याळात पाच वाजले होते !

३ तास तसेच उभे राहून याला भू =क लागली असणार. दुदैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंद…  हा भुक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते !

… कुठल्या प्रेरणेने तो हे करत होता? त्या गुडघाभर उंचीच्या घाण पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवत होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक  जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?

… ही अशी छोटी छोटी माणसे हे जग सुंदर करून जातात !

मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा ‘ कालनिर्णय ‘ विकत बसलेला दिसला.

दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.

“कालनिर्णय’ केवढ्याला, काका? “

“फक्त बत्तीस रूपये, साहेब ” .. केविलवाणेपणाने  तो म्हणाला. सकाळपासून काहीच विकल्या गेलेले दिसत नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतच होता, की उंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला… 

“कितने का है ये? “

“बत्तीस रुपया “

“तने है? “

“चौदा रहेंगे, साब “

ज्याला मराठी येत नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोय?

त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले ! 

मी आश्चर्यचकित ! छापील किंमतीत विकत घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेत नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटत नव्हता. तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेच नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच !

हे मूळचे लखनौचे महोदय, एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते. शिवाजी पार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.

” वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढ़ सौ ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभर ऐसेही धुपमे बैठना पडता था. मैने उसका काम थोडा हलका कर दिया. बस इतनाही !”

मला काही बोलणेच सुचले नाही ! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणार काय होता?.. न राहवून शेवटी मी त्याला विचारलेच …. 

” सोसायटी मे बहुत मराठी फ्रेंडस है, उनमे बांट दूंगा !”

.. मी दिग्मूढ !

” तू एक मिनिट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता ! ” मला डोळा मारत, हसत तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा !

माणुसकी याहून काय वेगळी असते? 

एखाद्या हॉस्पिटलबाहेर ‘तत्काळ रक्त हवे ‘ असा फलक वाचून, ऑफिसला वा घरी जायला उशीर होईल, याची तमा न बाळगता रक्त देणारे कोण असतात? ते ही रांग लावून ! .. 

… कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? ‘ भैये ‘ असतात की ‘आपले’ मराठी?’

मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो ‘ चायवाले ‘ आहेत. बहुतांश उत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभर चहा ते रस्त्यावर फेकतात… पण दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक ‘ चायवाला ‘ मला माहिती आहे ! सकाळी सकाळी भिकारी आलाच नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो ! त्याबद्दल त्याला एकदा विचारले होते , तर 

“बर्कत आती है ” एवढीच कारणमीमांसा त्याने दिली होती.

डोळे उघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरच मेलेली असते.

परवा थायलंडमध्ये गुहेत अटकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले. गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले ? ज्याच्या शेतात ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातले तीन एकरातले उभे पीक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान. एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले… 

“नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परत करता येईल. मुलांचे प्राण परत आणता आले असते का?”…. हे उत्तर ऐकूनच डोळ्यात पाणी आले !

हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.

… फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती –  श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कमिटमेंट… ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ कमिटमेंट… ☆ श्री सुनील काळे 

निसर्गरम्य पाचगणीत प्रवेश करत असताना  उजव्या बाजूला टोलनाका आहे. हा  टोलनाका पार केल्यानंतर रस्त्यालगतच हॉटेल (Ravine) रविनचा बोर्ड दिसतो .या हॉटेलमध्ये  अनेक प्रसिद्ध ,मान्यवर व्यक्ती आणि बॉलीवूडचे सिनेकलावंत , शूटिंगसाठी येत राहतात . कारण हॉटेलच्या रूममधून दिसणारा कृष्णा खोऱ्याचा , धोम धरणाचा निसर्गरम्य व्हॅलीचा परिसर , पश्चिमेकडे महाबळेश्वरचे डोंगर , पूर्वेकडेचा सिडने पॉइंटचा परिसर सर्व मोसमांमध्ये नेहमीच विलोभनीय दिसतात .हॉटेलच्या मालकीणबाई बिस्मिल्ला सुनेसरा मॅडम व त्यांचा दक्ष परिवार येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना उत्तम पद्धतीचे जेवण, राहण्याची सर्व अत्याधुनिक सुखसुविधा व येथील दक्ष स्टाफ मेंबर्स सर्वोत्तम सर्व्हिस देतात. त्यामुळे बॉलीवुडचे अनेक नामवंत सुप्रसिद्ध कलाकार हॉटेल रविनमध्ये राहण्याला प्राधान्य देतात.

अशा या स्टार हॉटेलमध्ये माझे चित्रप्रदर्शन नुकतेच सुरू झाले होते . त्या काळात शाहरुख खान व दिग्दर्शक अशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेश‘ नावाच्या चित्रपटाची शूटिंग वाईजवळ मेणवली गावात सुरू होती . संपूर्ण दिवस शूटिंगसाठी शाहरुख खान व्यस्त असायचा .त्याच्या स्वतंत्र व्हॅनिटी कॅराव्हॅनमध्येच तो ये जा करत असल्याने व मुक्काम हॉटेलच्या टॉप रुममध्ये असल्याने त्याचे दर्शन दुर्लभ झाले होते .

एके दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकला सिडने पॉईंटच्या परिसरात चाललो होतो.  त्यावेळी हॉटेलच्या परिसरात सकाळी सकाळीच खूप धावपळ सुरू झाली होती. मी सहज चौकशी केली त्यावेळी कळले की आज मेणवली घाटावर सूर्योदयाचा शॉट आहे, आणि त्यासाठी आज भल्या पहाटे शहारुख खान तयार होऊन निघाला आहे. प्रथम तो रिसेप्शनच्या शेजारी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये येणार आहे. शाहरुख खान सकाळी फक्त एक ग्लास फ्रूट ज्यूस घेतो अशी माहिती तेथील ओळखीच्या  वेटरने मला सांगितली. मग मी देखील कोपऱ्यातली एक जागा पकडून शाहरुखच्या दर्शनासाठी थांबलो.

इतक्यात धावपळ सुरू झाली. शाहरुख खान मस्त ऑफव्हाईट कॉटनची पॅन्ट व स्काय ब्लू कलरचा बाह्या दुमडलेला शर्ट घालून रेस्टॉरंटमध्ये आला. त्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे सर्वांशी हसून सर्वांकडे प्रेमाने हात वर करून शुभेच्छांचा स्विकार केला. नंतर त्याच्या फेव्हरेट फ्रुट ज्यूसची मागणी केली .परंतु रात्रीच्या मॅनेजरने सकाळच्या मॅनेजरला व वेटरच्या टीमलीडरला इतक्या लवकर शूटिंग आहे याची माहिती दिली नव्हती, त्यामुळे फ्रुट ज्यूस तयारच केला नव्हता . मुख्य वेटरने पाच मिनिटात नवीन ज्यूस तयार करतो असे सांगितले. हे ऐकताच शाहरुख खान जरा तडकला, ‘मी रात्रीच इन्स्ट्रक्शन देऊन ठेवली होती तरी ज्यूस का तयार ठेवला नाही‘ अशी विचारणा त्याने केली. 

कमिटमेंट मीन्स कमिटमेंट.. नेव्हर फरगेट“ असे तो बोलला आणि काचेचा दरवाजा उघडून  शूटिंगसाठी कॅराव्हॅनमधून थोड्या रागानेच  नाराजीने निघून गेला.

इतक्यात हॉटेलच्या मालकीणबाई बिस्मिल्लामॅडम येथे आल्या. त्यांनी काय घडले याची सर्व माहिती घेतली. त्या कोणावरही रागावल्या नाहीत. सरळ किचनमध्ये गेल्या आणि संत्र्याचा  दोन ग्लास ज्यूस स्वतःच्या हाताने त्यांनी तयार केला. तो ज्यूस एका मोठ्या बंदिस्त जारमध्ये भरला आणि मुख्य वेटरकडे देऊन ड्रायव्हरला हाक मारली आणि मेणवलीला ताबडतोब शाहरुखच्या गाडीच्या पाठोपाठ लगेच जायला सांगितले. इतक्यात त्यांनी मला पाहिले. इतक्या सकाळी पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले व माझ्यासमोरच मॅनेजरला सांगितले ….  ” कमिटमेंट मीन्स कमिटमेंट ” नेव्हर  फरगेट . त्या मॅडम आपल्या इतर रोजच्या कामासाठी शांतपणे निघून गेले गेल्या .

मला मात्र मनातून राग आला. पाच दहा मिनिटे थांबला असता तर शाहरुख खानला काय धाड भरली असती का ? ही सगळी स्टार मंडळी पैसा, प्रसिद्धी मिळाली की भाव खातात. त्यांना इगो येतो.  .फुकटची हुशारी व स्टाईल मारत राहतात व इतरांवर इम्प्रेशन मारत राहतात. असा भलताच विचार करत मी परत घराकडे निघालो . 

मुख्य रस्त्यावरून जात असताना माझा एक जवळचा मित्र वाईच्या दिशेने मोटरसायकलवरून एकटाच चालला होता .माझ्या शेजारी मोटरसायकल थांबवून त्याने मला वाईला चाललोय, येतो का बरोबर  असे सहज विचारले .त्यावेळी मी मेणवली येथे शाहरुख खानच्या ” स्वदेश ” या पिक्चरचे शूटिंग चालू आहे व आत्ताच शाहरुख खान तिकडे गेला आहे असे त्याला सांगितले . हे ऐकताच आमचा मित्र चल ,येतोस का मग मेणवलीला ? असे विचारल्यानंतर मी ही लगेच तयार झालो . मला बघायचे होते की इतक्या घाईने शाहरुख खान का गेला ? तिथे जाऊन तो काय असा तीर मारणार  होता ?  मग जरा वेगाने मोटरसायकल चालवत आमच्या मित्राने शाहरुखची व्हॅनिटी कॅराव्हॅन गाठली. त्याच्यापाठोपाठ हॉटेल रविनची ज्युस घेऊन गाडी चालली होती .त्याच्या पाठोपाठ पाठलाग करत आम्ही देखील मेणवली घाटावर पोहोचलो.

मेणवली घाटावर पोहोचलो आणि मी थक्क झालो .सकाळच्या त्या थंडीत जवळपास तीनशे जणांचा समुदाय घाटावर उपस्थित होता . दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री गायत्री जोशी व इतर जेष्ठ स्त्री-पुरुष कलाकार व  मॉब सीनसाठी अनेक स्थानिक गावकरीही सर्व तयारीनिशी उपस्थित होते. कॅमेरामन, सहाय्यक तंत्रज्ञ, ज्युनिअर ॲक्टर्स  सर्व मंडळी शाहरुखचीच वाट पाहत होते. शाहरुखच्या नुसत्या एंट्रीनंतर सर्वांनाच जोश व उल्हास आला. सूर्याची कोवळी किरणे घाटावर व मंदिरावर नुकतीच पसरू लागली होती. आशुतोष लाऊडस्पीकरवरून कॅमेरामन व इतर तंत्रज्ञ व सहाय्यकांना  सूचना देऊ लागला . सगळे युनिट शॉटच्या तयारीला वेगाने लागले. शाहरुख खानचा ड्रेसमन धावत आला. पांढरी धोती व झब्बा घालून मेकअपसाठी समोर बसला. शाहरुख खानने एकदोन टेक मध्येच शॉट ओके केला आणि शूटिंगची सर्व मंडळी विश्रांतीसाठी थांबली. 

खुर्चीवर निवांतपणे बसलेल्या शाहरुख खानला पाहून रविन हॉटेलचा मुख्य वेटर ट्रेमधून ज्यूसचा ग्लास घेऊन समोर उभा राहीला . अनपेक्षितपणे शूटिंगच्या जागेवर आठवणीने बिस्मिल्ला मॅडमने ज्यूस पाठवलेला पाहून शाहरुख खानही भारावला  व त्याने वेटरला मिठी मारली आणि म्हणाला ‘ सॉरी , मी लगेच आलो .कारण या सूर्योदयाच्या शॉटसाठी माझ्यासाठी येथे तीनशे लोक पहाटेपासून थंडीत वेटिंग करत आहेत याची मला जाणीव होती . आपण प्रत्येकाच्या वेळेची किंमत केलीच पाहीजे ना ? कमिटमेंट्स मीन्स कमिटमेंट . नेव्हर फरगेट .सकाळी तुला रागावलो . सॉरी वन्स अगेन .’ 

हा प्रसंग मला मेणवली घाटावर फिरताना नेहमी आठवतो आणि त्यामुळे स्वदेश माझा ऑल टाईम फेव्हरेट पिक्चर आहे . एखादा कलाकार त्याच्या कलेविषयी व स्वतःच्या व इतरांच्याही  वेळेप्रती किती कमिटेड असतो याचे हे उत्तम उदाहरण मी स्वतः पाहिले होते .

पण आता दुर्दैवाने अनेक क्षेत्रात अशी कमिटमेंट न पाळणारी माणसेच जास्त आढळतात . आपल्या कृतीमुळे व अनकमिटेड वृत्तीमुळे इतरांच्या मनाला किती यातना सहन कराव्या लागतात याची जाणीव बोथट झाली आहे . व त्याची आता सर्वांना सवयही झाली आहे .

आपण एखाद्या चित्रकाराचे चित्र प्रदर्शन पाहायला जातो व त्यातील चित्र पाहत असताना चित्रातील रंग , आकार , पोत , माध्यम , चित्रातील विषयाचे सादरीकरण मनाला का आवडते ? याचा विचार केला तर कळते की त्या चित्रकाराची त्या चित्रासोबत एक भावनिक ” कमिटमेंट “असते.  त्यात त्याने जीव ओतलेला असतो म्हणून ते चित्र देखील पाहणाऱ्याच्याही हृदयाला भिडते . पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते .

एखाद्या गायकाचे श्रवणीय गाणे ऐकताना किंवा एखाद्या वादकाचे असामान्य कौशल्य पाहून सूर, ताल , लय , आवाजातील जादू, शब्दफेक तुम्हाला का भावते ? कारण त्यात प्राण ओतलेला असतो . कारण गायकाची ,संगीतकाराची , कवीची , वादकाची त्या गाण्यासोबत त्या वाद्यासोबत त्या कवितेसोबत एक मनःपूर्वक जिवंत ” कमिटमेंट ” असते .

एखादा अभिनेता ,अभिनेत्री त्यांची भूमिका इतकी जिवंत व उत्कृष्ट पद्धतीने सादर करतात की ते नाटक किंवा सिनेमा पाहताना प्रेक्षक स्वतःला विसरून जातात कारण त्या कलाकाराची त्या सिनेमातील कॅरेक्टरशी एकरूप होण्याची एक वेगळी ” कमिटमेंट “असते .ती भूमिका ते जगतात .एकरूप होतात , समरस होण्याची , भूमिकेला न्याय देण्याची कृती , रसिकवृत्ती रसिक प्रेक्षकानां खूप भारावून टाकते . 

एखादा फोटोग्राफर रोजच्या जीवनातील असा एखादा प्रसंग अशा बारकाईने व शोधक नजरेने टिपतो की तो फोटो पाहून प्रत्येक जण अचंबित होत जातो .हजारो शब्दांचे सामर्थ्य एका फोटोमध्ये असते असे म्हणतात, कारण त्या क्लिकमध्ये त्या फोटोग्राफरची दृश्य पकडण्याची एक “कमिटमेंट “असते .

एखादा लेखक त्याच्या लिखाणातून असे शब्दांचे मायाजाल पसरवतो की ते वाचत असताना वाचक मनातून फार हेलावून ,भारावून जातो . एका वेगळ्या अज्ञात विश्वात तो विहार करायला लागतो .कारण त्या लेखकाची त्या लेखाशी ” कमिटमेंट ” असते  ही ” कमिटमेंट ” सगळीकडेच फार फार महत्वाची असते .

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुमची कमिटमेंट त्या क्षेत्राशी प्रामाणिकपणाची असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होत रहाल याची खात्री आहे . तुम्ही शेतकरी असाल तर उत्कृष्ट बी बियाणे , उत्तम खते वापरून , मेहनतीने उत्तम पीक घेण्यासाठी तुम्ही कमिटेड असाल .

तुम्ही छोटे असो वा छोटे हॉटेल व्यवसायिक असाल तर तुमची सर्व्हिस व पदार्थांची चव चाखून हॉटेलबाहेर खाण्यासाठी खवय्यांची मोठी रांग लागते , लागणारच.

उत्कृष्ट वकील , उत्कृष्ट प्राध्यापक , उत्कृष्ट दुकानदार , उत्कृष्ट कारागीर ,उत्कृष्ट बिझनेसमॅन किंवा शालेय शिक्षक किंवा मोठे सरकारी उच्च ऑफिसर किंवा साधा कारकून असाल तरी तुम्ही तुमच्या क्षेत्राशी असलेली ” कमिटमेंट ” पाळली तर यशाची शिखरे  व दारे सर्वांना नेहमीच उघडी असतात . फक्त हवी असते एक कमिटेड झोकून देण्याची वृत्ती .

कारण… कमिटमेंट मीन्स कमिटमेंट…  

नेव्हर फरगेट… नेव्हर फरगेट…  

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तरुणाई … ☆ श्रीरंग खटावकर ☆

श्री श्रीरंग खटावकर  

? मनमंजुषेतून ?

☆ तरुणाई… ☆ श्रीरंग खटावकर  ☆

मॉर्निंग वॉकला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूने आवाज आला. ” काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!”

खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं, आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते. मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको, ज्याची जळते त्यालाच कळते, यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो, पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हाला काय होतंय खोटे दात काढायला.”

तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे, हे बघ” म्हणत बोळक उघडलं, तर टेडी बिअर सारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट! “दात दोनच असले, तरी कडक बुंदीचा लाडू खातो अजून.”

“खातोस की चघळतोस रे” ख्या ख्या, करून सगळे हसले.

“नान्या चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये.

“हाट, ते साखर फुटाणे होते देवळातले!”

असे मस्त संवाद चालू होते.

मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.

जवळपास पाच सहा महिने झाले असतील, मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही. फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने, भांडले होते.

“शिंच्या त्या मोदिने माझं पितळ उघडे पाडलन, बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो “

“मॅग, लापवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय?

एक दिवस अचानक सगळा च्या सगळा ग्रुप गैरहजर!

त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!

त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत?”

तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले.

” अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना!त्यालाच सोडायला गेलो होतो”

“कुठे??”

अरे कुठे म्हणून काय विचारतोस, स्वर्गात! ” त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे!” “काही म्हणा, मन्या भाग्यवान हो!

लेक अमेरिकेतून येतो काय, हाटेलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला, तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं!”

बाकी सगळे खिन्नपणे हसले. मी म्हंटलं, “तात्या इतकं लाईटली घेताय?”

“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून आपलं रुटीन चालू करायचं!”

एकदम काहीसं आठवून मला म्हणाले,” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला!”

मी डोक्याला हात लावला, ते बघून अजून एक आजोबा म्हणाले,” अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर, वर्षभरात अजून दोन चार तरी विकेट पडणार!” ख्या ख्या ख्या!

दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो, तेवढ्यात तात्यांनी हाक मारली,” ओ केटरर जरा इकडे या, आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची!”

“पार्टी?”

“अरे, नान्याच्या सेंच्युरी ला फक्त अकरा वर्ष उरलीत!”

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले,” एवढा कसा बावळट रे, आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे, फार काही नको, मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा, बारा प्लेट”

“बास एवढंच ना? दिलं!”

“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते, आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर, आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळी खाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना!”

संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो, आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.

“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!”

मला बघून सगळे थांबले, तात्या पुढे झाले, उपम्याची मुद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला, सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!

मी काहीश्या संभ्रमावस्थेत घरी आलो, आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला  असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल?

असायलाच हवी!

आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,

“कल खेल में, हम हों न हों

गर्दिश में तारे रहेंगे सदा

भूलोगे तुम, भूलेंगे वो

पर हम तुम्हारे रहेंगे सदा

रहेंगे यहीं, अपने निशाँ,

इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो

हम हैं वहीं, हम थे जहाँ

अपने यहीं दोनों जहां

इसके सिवा जाना कहाँ

जीना यहाँ मरना यहा,

इसके सिवा जाना कहा!!”

© श्रीरंग खटावकर

मो – +91 7039410869

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-२ ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-२ ☆ श्री सतीश मोघे

(तसे न करता आपण त्यांना नको तेवढी स्पेस देवून आपल्या जन्मदात्यालाच बेडरूममधे झोपायला स्पेस नाही, असे म्हणत असू ,तर ही स्पेस नात्याच्या, जिव्हाळ्याच्या, कुटुंबव्यवस्थेच्या विनाशाकडे नेणारी आहे, हे निश्चित.) – इथून पुढे —-

कुणीतरी आपल्याला निमंत्रण देतो, घरी बोलावतो, आपण जातो.  यजमानांचा मुलगा दहावीला असतो. परीक्षेला अजून ५ महिने बाकी असतात. मुलगा त्याच्या बेडरुममध्ये असतो. आई त्याला बोलवायला जाते. हेतू हा, की बाहेर येऊन आपल्याला त्याने भेटून मग जावे. आई, दारावर हळूच टकटक करते. “काका-काकू आले आहेत, थोडावेळ बाहेर येवून भेट त्यांना”. आतून नकार येतो. आई नाराज होऊन बाहेर येते. “उद्या क्लासमध्ये त्याची परीक्षा आहे, अभ्यास झालेला नाही “, असे सांगून, वेळ मारुन नेते. दुसरा असाच प्रसंग. आपण नातवाईकांकडे जातो. चहा-पोहे, गप्पा सर्व होतात. एक तासाने आपण जायला निघतो. त्यावेळी सहजच त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाची, अमितची आठवण होते. आपण सहजच म्हणतो, “अमित शाळेत असेल ना! त्याला सांगा ,आठवण काढली काकांनी.” असे म्हटल्यावर अमितचे बाबा म्हणतात, “अरे सॉरी, त्याला आज सुट्टीच आहे.त्याला बोलवायला विसरलो. आहे त्याच्या रुममध्ये, बोलवतो”  आणि ते त्याला हाक मारतात. “अरे  काका निघाले आहेत, लवकर ये” तो येतो. तोपर्यंत आपण लिफ्टच्या दारात असतो. या दोन्ही प्रसंगात प्रश्न निर्माण होतात की, आई-बाबा या मुलांना, “ते काही नाही. दोन मिनिटे बाहेर ये, नमस्कार कर आणि पुन्हा जा”, असे दटावून का सांगू शकत नाहीत? त्यांचा त्यांच्या मुलावरचा हक्क गमावला गेला आहे? की ही नाती पुढच्या पिढीने सांभाळायची आवश्यकता नाही, असेच संस्कार त्यांना करायचे आहेत ? की मुलांना स्पेसमधून बाहेर काढले की ते उगाच नाराज होतील, ही भीती त्यांना सतावते आहे? 

या आणि याला आनुषंगिक अशा असंख्य प्रश्नांची गर्दी डोक्यात होत असते.याची उत्तरे आपल्याला आणि त्या मुलांच्या आईबाबांनाही ठाऊक असतात.आपल्या पेक्षा त्यांना त्यांच्या मुलांची मने जपणे,ती दुखवू न देणे हे  प्राथम्याचे असते,हे आपल्याला समजून घ्यावे लागते. त्यांच्यात आणि आपल्यात मोठी स्पेस आहे,हे सत्य स्वीकारावे लागते.

कुटुंबात परस्परांना इतकी स्पेस दिली जाते, घेतली जाते की, नात्यात नकळत भावनिक अंतर पडायला लागते आणि एकमेकांवरचे प्रेमाचे हक्क गमावले जावू लागतात. घरी कोणीही नातेवाईक, कुटुंबातील कुणाचेही मित्र, मैत्रिण आले आहेत समजल्यावर खरे तर प्रत्येकाने आपली स्पेस सोडून स्वतःहून बाहेर येऊन त्या व्यक्तीला अल्पवेळ का होईना भेटणे, बोलणे आवश्यक आहे. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे या सवयी बालवयातच लावणे आवश्यक आहे.

पूर्वीच्या आणि आताच्या कुटुंबसंस्थेतील नातेसंबंधावर, व्यवहारांवर एका हिंदी विचारवंताचे खूप छान भाष्य आहे. ते म्हणतात, “पहले सबकुछ दिलसे होता था, क्योंकि दिल को दिमाख नही था… अब दिल को दिमाख आ गया है”. हदयाला स्वार्थी बुद्धीचे कोंब फुटले आहेत. माझे अस्तित्व, माझे हक्क, माझे विचार, माझे सुख या केंद्राभोवती ज्याची त्याची स्वतः ची वर्तुळे तयार होत आहेत. ही वर्तुळे कुटुंबाच्या वर्तुळात  

गुण्यागोविंदाने राहतात तोपर्यंत ठिक आहे. पण त्यापलिकडे ती विस्तारायला लागली की नात्यात सुवर्णमध्य गाठणे कठिण होऊन बसते. हदयाला बुद्धीचे कोंब फुटणे हे डोळसपणा म्हणून  चांगलेच.पण ते केवळ स्वार्थबुध्दीचे कोंब नकोत स्वार्थबुद्धीबरोबरच विवेकबुद्धीचेही त्याला कोंब फुटावेत आणि हे विवेकबुद्धीचे कोंब स्वार्थबुद्धीपेक्षा मोठे असावेत. तरच  स्पेस घेतांना सुवर्णमध्य साधला जातो. कुटुंबाची सोनेरी झळाळी आणि नात्यातली ओल, हिरवेपण टिकून राहते. 

नात्यात अधिकाधिक वेळ स्पेस घ्यायला मोबाईलचे आक्रमण हेही एक कारण आहे.हातात मोबाईल आल्यापासून तर प्रत्येक जण त्याला हवी तेव्हा हवी तेवढी स्पेस घेत असल्याचे दिसते. याला मी, तुम्ही कुणीही अपवाद नाही. पण याचा सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे. संध्याकाळी सर्वजण कामावरुन, शाळेतून, व्यवसायाच्या ठिकाणाहून घरी येतात, एकत्र जमतात. अशावेळी तरी थोडा वेळ दिवसभरातल्या गंमतीजमती, घडामोडी यावर गप्पा व्हायला हव्यात. तेव्हाही दिवाणखान्यात बसून सर्वजण मोबाईलमध्ये डोके घालून बसली असतील तर ही स्पेस नात्यात, अंतराळात असते तशी पोकळी निर्माण करणारी ठरते. कुछ ऐसे हो गए इस दौर के रिश्ते…आवाज अगर तुम न दो तो बोलते वह भी नही.. अशावेळी कुटुंबात एकतरी जागरुक सदस्य असावा की जो सर्वांना “मोबाईल खाली ठेवा, आता थोडे बोलू या”, असा आवाज देईल. नाहीतर घराचे घरपण संपून त्याला लॉजिंग बोर्डींगचेच स्वरुप येईल.

स्पेस घेण्यावरच्या मर्यादा या कुटुंबव्यवस्था, आपापसातले प्रेम, आपुलकी, संवाद टिकविण्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत.म्हणून त्या ठळकपणे सांगितल्या. पण मुलांचे करियर, उज्वल भविष्य घडायला हवे असेल आणि त्यासाठी त्यांना घडवायचे असेल तर त्यांना स्पेस द्यावीच लागेल आणि ती देणे योग्यही. मूले म्हणतात, “तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळले आहे. फक्त तसे करायला थोडा स्पेस द्या आम्हाला” इथे स्पेस म्हणजे ‘वेळ’ ते मागत असतात. ही स्पेस त्यांना द्यायला हवी. कधी ती म्हणतात, “तुम्ही सांगता ते योग्य आहे. ते करेनही मी. पण तुम्ही म्हणता त्याच पद्धतीने करायचा आग्रह धरु नका. मला थोडी स्पेस द्या”. इथे ते स्पेस म्हणजे करण्याच्या पद्धतीचे स्वातंत्र्य मागत असतात. ही स्पेसही त्यांना द्यायला हवी. बऱ्याचदा एखादी गोष्ट त्यांना करायची नसते. पण ती करण्याचा आग्रह होण्याची शक्यता जिथे असते, तिथे जाणे ते टाळतात. तिथे त्यांना ही स्पेस म्हणजेच न येण्याचे स्वातंत्र्य घेऊ द्यावे. त्यांचे करियर,जीवनाच्या वाटा, मूल्ये  याबाबत घरातल्या मोठ्यांच्या सांगण्याशी तत्वतः सहमत होऊन वाटचाल करताना त्यांनी त्यांना हवा तेव्हढा वेळ घेतला,हवी तशी पद्धत अंगिकारली तर त्यांचे हे स्पेस घेणे सुवर्णमध्य साधणारे होते. कोणीही दुखावले जात नाही.दोघानाही वेळ आली तर सहजपणे एक पाऊल मागे म्हणजेच बॅकस्पेसला सहज येता येते. नात्यांची वीण घट्ट राहते. अतिप्रेमाने नाती गुदमरत नाहीत वा कमी प्रेम मिळाले, अशी नात्यांत तक्रारही राहत नाही. एका मोठ्या वर्तुळात प्रत्येकाची वर्तुळे हातात हात घालून सुखात राहतात.

स्पेस तर प्रत्येकालाच हवी. पण ती अशी घ्यावी की, तेवढ्या काळात ताजेतवाने होऊन, उत्साहित होऊन पुन्हा बॅकस्पेसला जावून, उमटलेल्या नकारात्मक गोष्ट डिलीट करुन तिथे नवीन प्रेमाची, आपुलकीची अक्षर उमटविणे सहज शक्य होईल.स्पेस हवी,असे कोणी म्हटला,तर त्याला सांगू या,स्पेस जरूर घे..पण एकच अट..दूर रहकर भी दूरियां न लगे ,बस इतनासा रिश्ता बनाए रखना…

– समाप्त –

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-१ ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-१ ☆ श्री सतीश मोघे

संगणक वापरतांना आणि अलीकडे कुटुंबात वावरतांना एक गोष्ट नेहमी द्यावी लागते, ती म्हणजे ‘स्पेस’. संगणकावरील लिखाणात दोन शब्दात स्पेस दिल्याने वाक्याचा अर्थ समजणे सुकर होते तर कुटुंबात स्पेस दिल्याने नाती राखणे सुकर होते. ‘स्पेस’ या मराठीत रुळलेल्या इंग्रजी शब्दाचा शब्दकोशातला अर्थ अवकाश, अंतर, प्रदेश, जागा असा आहे. पण नात्यांमध्ये हा शब्द वापरतांना तो उसंत, वेळ, मोकळीक, स्वस्थता, सवलत, सूट अशा अनेक भावछटांच्या अभिव्यक्तीसाठी उपयोगात आणला जातो. 

‘मला स्पेस हवी’, ‘मला थोडी स्पेस द्या’ अशी मागणी अलीकडेच  मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे,हे खरे असले तरी  स्पेस देण्याघेण्याची ही क्रिया पूर्वापार चालत आली आहे. फक्त तेव्हा स्पेस मर्यादेत व ठरलेल्या वेळी, आई-वडील जेव्हढी देतील तेव्हढीच घेतली जायची. कुटुंबात स्वत:चे व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे अधोरेखित करण्याची वृत्ती नव्हती. डब्यांमध्ये ठरलेले अंतर ठेऊन कुटुंबाची ‘समझोता एक्सप्रेस’ ठराविक वेगात, ठराविक वेळेत धावत असायची. स्पेस मागायला जागाच नसायची आणि स्पेस मागायची वेळही यायची नाही. कारण छोटी घरे आणि भरपूर कामे. छोट्या घरांमुळे याची रुम वेगळी, त्याची वेगळी असे शक्यच नसायचे. एकाच खोलीत आजी-आजोबा, तिथेच बाबा, तिथेच मूले. स्पेस घ्यायची म्हटली तरी दुसरी मोकळी जागा उपलब्धच नसायची. तसेच भरपूर कामांमूळे स्पेस घ्यायला वेळच नसायचा. पाणी भरा, दळण दळून आणा, भाजीबाजार, रेशनिंग, किराणा, धुणी-भांडी, अभ्यास ही सर्व कामे कुटुंबातील सर्वांनीच विभागून करायची. या कामात संपूर्ण दिवस निघून जायचा. स्पेस घेण्यासाठी वेळही शिल्लक नसायचा. मुलांची धडपड, प्रयत्न, आई वडिलांचे कष्ट कमी करुन आई वडिलांना स्पेस (म्हणजे कष्टातून उसंत) देण्यासाठी तर आईवडिलांची धडपड मुलांनी स्पेसमध्ये (अवकाशात) भरारी घ्यावी म्हणून त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी, याची जाणीव दोघांना असल्यामुळे सर्व व्यवहार हदयाचा. बद्धीचे ‘पण’ ‘परंतू’ हे शब्द शब्दकोशातच नव्हते. त्यामुळे वेगळ्याने “स्पेस हवी…  स्पेस द्या” असे चिडून वैतागून म्हणण्याची वेळ यायची नाही. आईवर कधीतरी हे वेळ यायची. कुटुंबात कामाच्या ओझ्याने दबलेली आईच असायची. तिच्यामागे काही हट्ट, अभ्यासातली शंका यासाठी खूप मागे लागलो की कधीतरी ती म्हणायची, “आता जरा थांब. मला माझे हे काम करु दे”. अर्थात ती देखील  निवांत बसण्यासाठी नव्हे तर हातातले काम वेगाने पूर्ण करण्यासाठी ही स्पेस मागायची.

मध्यमवर्गीय  आणि श्रीमंत कुटुंबात स्पेस घेणे आणि देणे हल्ली अनिवार्य आणि त्याच जोडीला सहज शक्य झाले आहे. कारण मोठी घरे आणि बऱ्यापैकी मोकळा वेळ. प्रत्येकाला वेगळे बेडरुम. मोकळीक हवी असली की आपल्या बेडरुमध्ये शिरायचे की मिळाली स्पेस. घरात धुणी-भांडी,केरकचरा, स्वयंपाकाला  मोलकरणी, किराणा, भाज्या, पीठ इ. सर्व घरपोच. त्यामूळे मुलांना अभ्यास सोडला तर इतर कामे नाहीत,त्यामुळे स्पेस घ्यायला बऱ्यापैकी मोकळा वेळ, असे झाले आहे खरे. याबद्दल तक्रार करण्याचेही कारण नाही. कारण नशिबाने ही सर्व सुखे त्यांना, आपल्याला मिळाली आहेत. ही जरुर उपभोगावीत . पण एव्हढी सुखे आणि भरपूर स्पेस मिळत असूनही जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य दुसऱ्याला, “तू माझ्या डोक्यात जातेस/जातोस” असे सरळ तोंडावर बोलून, रागाने पाय आपटत आपल्या खोलीचे दार धाडकन आपटून आपल्या खोलीत जाते आणि बराच वेळ बाहेर येत नाही, तेव्हा या ‘स्पेस’ घेण्यावर आणि त्याला स्पेस देण्यावर विचार करावा लागतो. 

हे असे का घडते? याचा विचार केला तर दिवसेंदिवस कमी होत जाणारी सहनशीलता, हे त्याचे उत्तर म्हणावे लागेल. जीवन म्हणजे सहन करणे आहे. स्वत: ला आणि इतरांनाही. आपण जर संवदेनशील असलो तर आपल्या वागण्यातल्या चुका लगेच समजतात. रागावलो तरी थोड्याच वेळात वाटते, उगाच रागावलो. कुणाला काही हिताचे सांगितले आणि तो नाराज झाला की वाटते उगाच आपण सांगत बसलो. हे असे बऱ्याचदा  घडले की आपलाच स्वभाव आपल्याला सहन होत नाही. थोडक्यात ‘काही करू पहातो, रुजतो अनर्थ तेथे’ , असे होते आणि या नैराश्यात आपलाच आपल्याला राग येऊन आपण कोपऱ्यात जावून बसतो. नको तेवढी स्पेस द्यायला आणि घ्यायला सुरुवात करतो. आपल्याला आपण सहन करू शकत नाही. तसेच इतरांनाही आपण सहन करु शकत नाही. कुटुंब, प्रवास, नोकरीचे ठिकाण आणि जिथे जिथे आपल्याला जावे लागते अशा सर्वच ठिकाणी भिन्न प्रकृतीच्या,स्वभावाच्या व्यक्ती असतात. अशा व्यक्तींना सहन करण्याची आपली क्षमता अत्यल्प असल्याने तिथेही आपण अंतर ठेवून आणि मौन राखून राहायला लागतो. आपण अंतर ठेवले तरी त्या व्यक्ती जवळ यायच्या थांबत नाही.बोलायच्या थांबत नाहीत. अशा व्यक्ती जवळ आल्या,काही बोलल्या की त्या डोक्यात जातात. त्रास आपल्यालाच होतो. हा त्रास कमी करायचा तर स्पेस घेण्याची वृत्ती न वाढविता सहनशीलता वाढविणे आवश्यक आहे.

सहनशीलता ही बाल वयातच वाढू शकते. पूर्वी संस्काराचे वय सोळा वर्षापर्यंत होते. आता ते कमी होऊन सात ते आठ वर्षापर्यंत आले आहे. या वयातील मुलेच तुम्हाला समजून घेण्याच्या, स्वत: त बदल करण्याच्या, सहनशीलता वाढविण्याच्या मनस्थितीत असतात. या वयात त्यांच्यावर योग्य ते संस्कार झाले पाहिजेत. काका-काकू,वडीलधारी पाहुणे मंडळी घरी पाहूणे म्हणून आले तर मुलांना त्यांना नमस्कार करायला सांगितले पहिजे. “त्यांना खाली झोपता येत नाही.त्यांचे गुडघे,पाठ दुखतात. ते तुमच्या बेडरूममध्ये बेडवर झोपतील. तुम्ही हॉलमध्ये गादी घालून खाली झोपा”,असे त्यांना प्रेमाने सांगितलेच पाहिजे. दिलेली स्पेस केव्हा सोडायची, बॅक स्पेसला कधी जायचे, हे त्यांना समजले पाहिले.

या बाबतीत एका मित्राने सांगितलेला प्रसंग खरंच विचार करायला लावणारा आहे. पत्नीचे निधन झाल्यावर त्याचे व्यवसायाचे ठिकाण सोडून मुलाकडे राहण्याची इच्छा त्याने  व्यक्त केली. मुलगा म्हणाला, ” हरकत नाही. पण माझी मुले त्यांचे बेडरुम कुणाला शेअर करू देत नाहीत. तेव्हा तुम्हाला हॉलमध्ये झोपावे लागेल.” मुलांना स्पेस देणाऱ्या या वृत्तीला काय म्हणावे ! बरे मुलांची वयेही ७ वर्षे आणि ९ वर्षे. या वयातच त्यांना स्पेस कधी सोडायची हे शिकविता येते. कारण आई बाबा सांगतात ते योग्यच आहे, अशी ठाम समजूत असल्याने शिकवितांना ते नाराज होण्याची शक्यता कमी असते आणि नाराज झाले तरी वाद न घालता ते कृती करत असतात. तसे न करता आपण त्यांना नको तेवढी स्पेस देवून आपल्या जन्मदात्यालाच बेडरूममधे झोपायला स्पेस नाही, असे म्हणत असू ,तर ही स्पेस नात्याच्या, जिव्हाळ्याच्या, कुटुंबव्यवस्थेच्या विनाशाकडे नेणारी आहे, हे निश्चित.

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares