सावित्री ज्योतिबाने स्त्रियांच्या उद्धारासाठी स्त्री शिक्षणाचा पाया घातला अन स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली .जिथं माणूस म्हणून जगण्यास देखील ती लायक नव्हती, ती आता शिक्षण घेऊन साक्षर झाली ,अक्षर ओळख पाप नसून अक्षरे जीवनाची दशा आणि दिशा बदलतात हेच जणू ज्योतिबाना सिद्ध करायचे होते ! अन फल निश्चिती स्वरूपात अनेक स्त्रिया शिकल्या ,सुशिक्षित झाल्या ,कुणी उंबऱ्याबाहेर पडल्या ,कुणी हक्कासाठी ,न्यायासाठी लढू झगडू लागल्या ,उच्च पदावर गेल्या ,जग भ्रमंती करू लागल्या ,मनातल्या भावना कागदावर उतरू लागल्या ,आज विविध क्षेत्रातली त्यांची कामगिरी पहाता त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व सिद्ध होते ,घर नोकरी या जबाबदाऱ्या पार पाडत दमछाक झाली पण त्यांनी त्यांची स्वप्ने सत्यात उतरवली .हा झाला एक भाग.
शिक्षण सर्वदूर पसरले ,स्त्रिया जागरूक झाल्या समान संधी ,समान अधिकार मिळाले,आर्थिक स्वावलंबी झाली आर्थिक परावलंबित्व सम्पले, स्वतःची प्रगती झाली आणि आज ही गोष्ट सर्व सामान्य झालीय पण अपवाद वगळता असे दिसते की स्त्रियांची आत्मिक, वैचारिक प्रगती झालीय का ? त्याचे उत्तर ‘नाही’ असेच दिसून येते. आमचे शिक्षण फक्त साक्षरता अन करिअर नोकरी याभोवती फिरतेय,अजूनही आम्ही जुन्या ,बुरसटलेल्या रुढींचे, परंपरांचे,अन वैचारिक गुलामगिरीचे प्रतिनिधित्व करतो. आमच्याकडे सारासार विवेक बुद्धीचा अभावच दिसून येतो. अजूनही आमच्याकडे निर्णयक्षमता नाहीये ,आमची तेजस्विता ,तपस्विता संपून आम्हाला चमकण्यात धन्यता वाटू लागलीय. मनावर ,आत्म्यावर उत्कृष्ट संस्काराचा अभाव दिसून येतोय. भौतिक सुखांचा हव्यास अन अट्टाहास धरत आम्ही आत्मोन्नतीस हद्दपार केलेय. अन म्हणूनच कर्तृत्वाच्या पायऱ्या चढताना आम्ही त्याग ,संयम ,आत्मिक सुख ,समाधान ,शालीनता ,नात्यातले समर्पण ही अदृश्य पण सदृश्य चिरंतर परिणामकारक मूल्य विसरतोय. कुणी तरी सुंदर म्हणावे , कुणाला तरी खूश करण्यासाठी धडपडत असतो , बाह्य सौंदर्यावर मग मिळवलेले पैसे खर्च करतो .अजूनही आम्हाला शोभेची बाहुलीच होणे मान्य आहे. क्षणिक सुखासाठी आम्ही रात्रदिन झटतो पण आत्मिक सुखासाठी कमी झटताना दिसतो . अपवाद आढळतात पण अपवाद नियम होत नाही . आम्ही मग शिक्षणाच्या मूळ उद्देशापासून दूर चाललो आहोत भरकटतोय असे वाटते कारण वैचारिक प्रगतीचा अभावच दिसतोय ही झाली दुसरी बाजू !
आता तिसरी बाजू… स्त्री कितीही शिकली तरी तिच्या आत्मसन्मानाला कुटुंबात किंवा समाजात खरेच प्रतिष्ठा आहे ? तर ‘नाहीच !’ असेच म्हणावे लागेल , अजूनही कुटुंबातील तिचे स्थान दागिने ,साडी एवढेच मर्यादित आहे आणि आम्हालाही अजून यातच धन्यता वाटते ,आम्ही आमच्यासारख्या प्रगतीपासून दूर असलेल्या स्त्रियांसाठी काही करू इच्छित नाही , समाजात अजूनही आम्हाला एकटे रहाता येत नाही , एकट्याने जीवनाची मौज अनुभवता येत नाही कारण जिथे तिथे उरी भयच बाळगावे लागते एकविसाव्या शतकात आमच्या प्रति पुरुषांची ,समाजाची दृष्टी निकोप ,स्वच्छ नाही अन आम्हा स्त्रियांची देखील नाही आम्ही अजूनही पूर्ण भयमुक्त नाहीत ही खरेच शोकांतिका आहे !
कधी कधी वाटते की स्त्रियांचे मूळ प्रश्न थोड्याफार फरकाने तसेच आहेत. जेव्हा माणूस म्हणून ती स्वतःचा विचार करेल व समाजही तिचा विचार करेल, तेव्हाच आमचा खऱ्या अर्थाने उद्धार झाला असे म्हणता येईल अन उद्याची स्त्री आनंदाने आकाशात स्वैर भरारी घेईल आकाश स्पर्शून माणूस म्हणून स्वतःकडे पाहील…..
तरुणपणात कुणाची तरी येते ती आठवण…. म्हातारपणात होतं ते स्मरण…. यानंतरही जिवाभावात उरतात त्या मात्र स्मृती…. ! ऑक्टोबर महिन्यामध्ये घडलेल्या प्रत्येक घटना, स्मृती म्हणून माझ्या मनामध्ये कागदावर शिक्का मारावा त्याप्रमाणे उमटल्या आहेत…!
… काल घडलेल्या सुखद घटना, शिक्का मारलेल्या या स्मृती, आज घरी येऊन घरातल्या आपल्या लोकांना चौखूर बसवून पुन्हा रंगवून सांगण्यात मजा असते… मी त्यालाच लेखा जोखा म्हणतो !!!
आमच्या खेडेगावात पूर्वी बुधवारी बाजार भरत असे (आताही तो बुधवारीच भरतो)…. लहानपणी आजीच्या बोटाला धरून मी तिच्या मागेमागे फिरून बाजार करत असे….. सगळ्यात शेवटी ती माझ्यासाठी चार आण्याची भजी विकत घेत असे…. कळकट्ट पेपराच्या पुरचुंडीत बांधलेली ही सहा भजी मी जपून घरी आणत असे … बाजारातून घरी चालत जायला किमान एक तास लागे… तोवर मी साठ वेळा आजीच्या पिशवीतून भज्यांचा पुडा नीट आहे की नाही हे तपासात असे…. त्याचा वास घेत असे…. ! भजी खाण्यात जो आनंद आहे…. त्यापेक्षा त्याचा सुगंध नाकात भरून घेण्यात जास्त मजा असते…. !
… एखादं ध्येय प्राप्त करण्यापेक्षा त्या ध्येयप्राप्तीपर्यंतचा प्रवास कधीकधी आनंददायी असतो….!!!
तर…. घरी जाईपर्यंत त्या कळकट पेपरला भज्यांचं तेल लागलेलं असे…. खून दरोडे बलात्कार आणि राजकारण याच बातम्या त्याही वेळी होत्या… आजही त्याच आहेत….
या बातम्यांची शाई माझ्या भजाला आपसूक चिटकत असे…. पण मला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं !
आज वयाने मोठा झाल्यानंतर “भजी” म्हणतो…. लहानपणी “भजं” म्हणत होतो…!
वर्तमानपत्राचा कागद आज जरी बदलला असला तरी बातम्या मात्र त्याच आहेत…. वयाने कितीही मोठा झालो असलो, तरीसुद्धा सामाजिक परिस्थिती विशेष बदललेली नाही…
असो…..
फरक फक्त इतकाच पडला आहे….. भजी विकणारे, पटका बांधणारे आजोबा जाऊन, त्यांच्या जागी त्यांचा मुलगा आला आहे…
आजोबा भजी विक्री करून “व्यवसाय” करायचे, घराचा उदरनिर्वाह भागवयाचे, मुलगा आता ” धंदा ” करतो….!
मातीची घरं जाऊन सिमेंट ची पक्की घरं झाली आहेत….
घरं पक्की झाली पण नाती भुसभूशीत झाली….!
घरासमोरचं अंगण जाऊन, तिथे पार्किंग ची जागा झाली आहे….
पूर्वी पाऊस पडल्यानंतर अंगणातल्या मातीला “सुगंध” यायचा… हल्ली नुसताच चिखल होतो…. या चिखलात घरापासून दूर गेलेल्या कारच्या खुणा फक्त ठळक दिसतात…
गेलेली मुलं, नातवंडे परत घरी येतील या आशेवर दोन म्हातारे डोळे लुकलुकत असतात…. विझत चाललेल्या दिव्यासारखे ! ….
माझी आजी गेली त्याला कित्येक वर्ष झाली… परंतु पडक्या त्या वाड्याला तिच्या स्मृतीचा सुगंध आहे…!…
…. चार आण्याला हल्ली भजी मिळत नाहीत…. ते चार आणे भूतकाळात मी हरवून आलो आहे… तेलाचा डाग पडलेला तो वितभर पेपर…. पटका घालणारे ते बाबा… आन् वर दोन भजी जास्त घाल म्हणून वाद घालणारी ती माझी आजी…!
आज जरी मी हे सगळं हरवलं आहे, तरीसुद्धा….तेलाचा डाग पडलेल्या, त्या कळकट पेपरमधल्या भज्यांच्या सुगंधासारख्या…. या सर्व स्मृती अजूनही मनात दरवळत आहेत… खमंग… खमंग !!!
या महिन्यात दिवाळी होती….!
मोठ्या हौसेने आम्ही सुद्धा पणत्या घेतल्या पण आमच्या घरात त्या लावल्या नाहीत…. आम्ही त्या चार जणांना विकायला लावल्या…. !
… विकलेल्या पणत्यांनी एका बाजूचं घर उजळेल…. तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या घराची भूक शमेल…!
आम्ही घरीच उटणं केलं …. रस्त्यावरील याचकाकडून त्याचं पॅकिंग करून घेतलं…. त्या बदल्यात त्यांना पगार दिला… या उटण्यात आम्ही चंदनाचे चूर्ण घातले होते… या उटण्याला चंदनाचा सुगंध येतोय की नाही माहित नाही, पण कष्टाचा सुगंध नक्कीच आहे !
आमच्या खेडेगावात पूर्वी प्रथा होती… घरामध्ये फराळ तयार झाला की, ताटंच्या ताटं भरून ती गल्लीतल्या शेजार पाजारच्या लोकांना द्यायची….. जणू शेजारच्यासाठीच घरी फराळ तयार करत आहोत… आम्ही पोरं सोरं ही ताटं लोकांच्या घरी पोहोचते करत असू…. त्यावर एक फडकं झाकलेलं असे…. वाटेत जाताना हे फडकं हळूच बाजूला करून चिवड्यातल्या खमंग तळलेल्या खोबऱ्याच्या चकत्या आणि शेंगदाणे खायला मिळत, म्हणून हे ताट पोहोचवण्याचं काम अंगावर घ्यायला आम्ही प्रत्येक जण उत्सुक असत असू … घरातून भरलेलं ताट दुसरीकडे घेऊन जाईपर्यंत निम्मं व्हायचं… यात खूप “मज्जा” यायची….!
सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की खेड्यातली ही प्रथा आताच्या आपल्या समाजातल्या अनेकांनी आजही जपली आहे….
ताटंच्या ताटं भरून यावेळी समाजातल्या अनेक दानशूरांनी आमच्याकडे फराळ पाठवला… किमान 30 हजार लोकांना पुरेल इतका हा फराळ होता…
… गावाकडल्या स्मृतीचा गंध पुन्हा मनात दरवळला….… लहानपणीप्रमाणेच याहीवेळी आम्ही फडकं झाकून फराळाचं ताट घेऊन रस्त्यावर गेलो…. पण यावेळी तळलेल्या खोबऱ्याच्या खमंग चकत्या आणि शेंगदाणे आम्ही खाण्याऐवजी पोराबाळांची वाट बघणाऱ्या…. लुकलूकणारे डोळे आणि थरथरते हात घेऊन जगणाऱ्या जीवांना भरवल्या … .. आपण घेण्यापेक्षा, दुसऱ्याला देण्यामध्ये जास्त “मज्जा” येते हे आता कळलं…. !
वैद्यकीय उपक्रमांतर्गत या महिन्यात जवळपास ९०० रुग्णांवर रस्त्यावरच उपचार केले. आणि १६ गंभीर रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपचार करून घेतले आहेत. गरजूंना वैद्यकीय साधने (व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या, मास्क, sanitizer, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे,) दिले आहेत.
वृद्ध लोक, ज्यांना कानाने बिलकुल ऐकायला येत नाही, वृद्धापकाळाने डोळ्यांना दिसत नाही आणि त्यामुळे रस्ता ओलांडताना एक्सीडेंट होऊन मृत्यू होतात, अशा सर्वांना कानाची मशीन दिली आहेत, डोळ्यांची ऑपरेशन्स केली आहेत. या सर्व वृद्धांच्या, आवश्यक त्या सर्व तपासण्या आपण रस्त्यावरच केल्या आहेत.
शैक्षणिक उपक्रमांतर्गत ज्या मुलांनी शिक्षणाची वाट धरली आहे अशा सर्वांना काय हवं नको ते पाहून गरजेच्या शैक्षणिक बाबी पुरवल्या आहेत.
या महिन्यात अनेक गोरगरिबांना शिधाही दिला…
आमच्या परीनं आम्ही दिवाळी साजरी केली….
या अल्लाह…. दर्गाहमे हमने कोई चादर नही चढाई…. मगर रस्तेपे जो बुजुर्ग थंडमे मुरझाये पडे थे…. उनके शरीर पे चादर चढाई है ….
Dear Jejus, we have not offered a single candle to you in this Diwali …. But we have enlightened the houses of many poor people…!
वाहे गुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतह…
इस बार हम ने गुरुद्वारेपे नही….रस्तेपेही लंगर आयोजित किया था…
पंजाबी या गुरुमुखी भाषा तो आती नही मुझे… लेकिन बिना शब्दोंकी बोली जो हमने बोली ….क्या वो आपकी भाषा से अलग है ? …
देवी माते … नवरात्रात तुला साडी चोळी अर्पण करण्यापेक्षा, फुटपाथवरच्या मातेला आम्ही साडी चोळी अर्पण केली गं … ! त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले…. ते तुझेच तर होते…..
हे शंकर भगवान…. भोलेनाथा…. लोक तुम्हाला दुधाचा अभिषेक करतात…. तुम्हाला अभिषेक करण्याऐवजी उपाशी आणि नागड्या पोरांना मांडीवर घेऊन, आम्ही त्यांना दूध पाजले आहे… यानंतर तुमच्या मुद्रेवर जे प्रसन्न हास्य उमटलं…. ते मी दिवाळीचा दिवा म्हणून मनात साठवून ठेवलंय…..
हे गजानना…. चतुर्थीला तुला मोदकाचा “नैवेद्य” दाखवण्याऐवजी रस्त्यावर भुकेचा महोत्सव मांडून…. भुकेल्यांना मोदक भरवून त्यांचा आनंद “प्रसाद” म्हणून आम्ही मिळवला आहे… !
आणि हो… हे सारं करण्याबद्दल मी तुमची मुळीच माफी मागणार नाही…. !
रखमा कामाला आली की, तिच्याशी थोडावेळ बोलावं लागतं. सुखदुःख विचारपूस करावी लागते. मी तिला आज सहजच विचारलं, ” कसा चाललाय ग मुलांचा अभ्यास? बरी आहेत का?” रखमाला, दोन मुलं. एक मुलगा पाचवीत तर एक मुलगा तिसरीत. जखमेवरची खपली काढावी, तशी ती बोलू लागली. ” काय सांगायचं ताई, मुलांचा अभ्यास फोनवर झाला आहे म्हणे, शिकवणी बंद आहेत. आम्हाला शिकवाया येत नाही. त्यात फोनसमोर टाईमात बसायला लागतं म्हणे, आणि सारखं ते फोन रिचार्ज करायचं कसं जमणार आम्हाला? बंद झालाय त्यांचा अभ्यास. नुसतीच फिरत्यात. शाळा कधी सुरू होणार हो ताई?” काकुळतीला येऊन विचारत होती. तिच्या या प्रश्नाला माझ्याकडे तरी कुठे उत्तर होतं. .पण तरी जीव एकवटून मी तिला धीर देऊ लागले, ” सर्वांना लस मिळाली की, होईल कमी हा आजार “. ” कसलं काय. ताई, खरं सांगते, माझा मोठा मुलगा शाळेत लय हुशार होता. बाईंनी सांगितलेलं नीट करायचा. म्हणलं, असाच पुढे पुढे शिकला म्हणजे चांगलं होईल. त्याला उद्या मोठा झाला की, कुठं तरी हापिसात नोकरी लागेल. तर हयो काय संकट आलं. पोरं नुसती इथं बस तिथं बस. रिकामं फिरत्यात. कामात लक्ष लागेना माझं ताई ” आणि ती रडायला लागली. मलाही खूप पोटात कालवाकालव झाली..एका आईची सर्व स्वप्नं काचेसारखी ताडताड तुटत होती.आता मी तिला आणखी धीर देऊ लागले. ” हे सगळं लवकर संपेल गं. तूर्त मोबाईलवर अभ्यास परीक्षा चालूच राहतील.” त्यावर ती म्हणाली, “अहो ताई, मुलांना फोनवर अभ्यास करायला जमेना. अभ्यासावरचं लक्ष उडालं. समोर बाई नाहीत, फोटोत दिसतात. त्यामुळे भीती राहिली नाही. आणि आदरबी वाटे ना. त्यांना फोन घेता येत नाही. काही कळत नाही. जून महिन्यात दरवर्षी शाळेची फी, शिकवणीच्या बाईंची फी, दप्तर, डबा देऊन मुलांना शाळेला धाडीत होते. आता सगळं संपलंच ना.” तिच्या डोळ्यात भीती व बोलण्यात निराशेचा सूर होता. मी पुन्हा धीर देत म्हणाले,. ” शाळा बंद आहेत गं,पण अभ्यास चालू ठेवायचा आहे. आता असं कर, तू त्यांना मोबाईल घेऊन माझ्याकडे पाठव. मी सांगेन कसं पाहायचं ते. सगळी पुस्तकं असतात मोबाईलमध्ये. मी घेईन त्यांचा
अभ्यास “. झाले… हे ऐकून मात्र तिचे डोळे हसू लागले. मनातली निराशा आता निघून गेली. तिच्या मनाने उभारी घेतली, व मला म्हणाली, ” खूप उपकार होतील ताई, आत्ता घरी जाते. आणि लावून देतो त्यास्नी तुमच्या घरी. चालंल का?” मी म्हणाले, ” पाठव की “. आणि मग खूप उत्साहाने झपाझप पाऊले टाकीत ती निघून गेली. तिची स्वप्नं पूर्ण करण्याचा तिला मार्ग सापडला होता. तिची पाठमोरी आकृती पाहून मला भरून आले. किती वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत समाजात. लोकांचा आत्मविश्वास ढळतो आहे. कधीकधी आपण अशांसाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे.मनामनांतील अशांतता मिटवू या. धीर देऊ या. मदत करू या. कधी शब्दाने तर कधी कृतीतून. त्या़च्या इवल्या इवल्याशा स्वप्नांना खतपाणी घालू या. मग त्यातूनच येणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखराची वाट पाहूया. असाच निश्चय करूया…… भावकोश जपू या.
डिसेंबरचा महिना होता,सगळीकडे ख्रिसमसची धूम होती. बाजारपेठा आकर्षक वस्तूने सजल्या होत्या. खेळणी, कपडे,खाऊ,केक,ख्रिसमस ट्री,सगळीकडे आनंदी आनंद आणि उत्साह भरलेला होता.पाईन -देवदारच्या गच्च फांद्यात निवांत झोपलेली हवा पहाट होताच चटकन उठली.सगळीकडे अजून अंधार होता. झाडाच्या एका फांदीला शरीराला पिळदार वळण देत लटकून तिनं आळोखे पिळोखे दिले, मग हलकेच झोका घेत फांद्याच्या आधाराने हळुवार ती जंगलातून बाहेर आली. गुलाबी फुलांचे ताटवे सगळीकडे बहरले होते. ती ताटव्यावर येऊन जरा पहुडली… इतक्यात पाखरांचा किलबिलाट कानावर आला,’आता आळस करून चालणार नाही,आपल्याला निघायलाच हवं ‘ ती स्वतःशीच पुटपुटली. गुलाबी ताटव्यावरून उठताच तिचं लक्ष स्वतःकडे गेलं. तिचा रंग गुलाबी झाला होता ! तिला खूप छान वाटलं. मंद मंद शीळ घालत ती वेळूच्या बेटातून हळुवार निघाली.
निशिगन्ध, शेवंती, जाई -जुई सर्वांना हलकेच स्पर्श करताच सर्व सुगन्ध तिच्या अंगाला लागला. तिला खूप प्रसन्न वाटले.मंद मंद हसत ती पुढे निघाली. भल्यामोठ्या बागेत एक पांढरी इमारत तिला दिसली. ती कुतूहलाने आत शिरली. भल्या मोठ्या गोल घंटेभोवती तिनं स्वतःला वेढले व हलकेच एक झोका घेतला तसे घंटा किणकिणू लागली. सर्वत्र दिवे झगमगत होते, फुलांची आरास होती. ती अजून आत गेली.सर्वत्र शांतता होती. समोर क्रुसाला लटकलेली शुभ्र मूर्ती होती.तिने मूर्तीला वळसा घातला अन पुन्हा घंटेजवळ आली. तिचा हलकासा स्पर्श होताच घंटा पुन्हा किणकिणू लागली. ती बाहेर आली.सूर्याची पिवळी,तांबूस सोनेरी किरणे वाट काढत बागेत लपाछपी खेळत होती. तिनं किरणांत प्रवेश केला. तिचं सर्व अंग गुलाबी -सोनेरी दिसू लागलं. तिला मज्जा वाटली.बागेतल्या तळ्यापाशी येऊन ती हलकेच विसावली.बदकांचा एक थवा पाण्यात सावकाश पोहत होता.पाण्यावर सोनेरी किरणं तरंगत होती. तिनं पाण्यावर हलकेच फुंकर मारली तसे किरणांनी पाण्यावर हेलकावे खायला सुरुवात केली. सोनेरी पाण्याचे ते तरंग हेलकावे खातानाचे मनोहारी दृश्य पाहून ती हरखून गेली.मग तिनं हळूच बदकांच्या थव्यावर फुंकर घातली. त्यांची मऊ पांढरी शुभ्र पिसे वाऱ्याने विस्कटू लागली अन ते हेलकावे खात खात आपोआप पाण्याच्या त्या तरंगावरून पुढे जाऊ लागले. तिला गंमत वाटली.
इतक्यात तिला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला.ती पटकन तिकडे गेली.एक लहान मुलगा थंडीने कुडकुडत होता.ती त्याच्याजवळ गेली तिच्या ऊबदार स्पर्शाने लपेटले, त्या मुलाला बरे वाटले.ती आणखीन पुढं गेली. रस्त्याकडेला बऱ्याच झोपड्या होत्या.तिने एका झोपडीत हळूच डोकावले.फुंकर मारून मारून एक स्त्री चूल पेटवत होती, धुराने झोपडी गच्च झाली होती. तिच्या नाकातोंडात धूर गेला. तिला गुदमरू लागले,ती तशीच थोडावेळ डोळे बंद करून थांबली अन चुलीत जाळ पेटला ! जाळ होताच सर्व धूर बाजूला झाल, त्या स्त्रीला हायसे वाटले,हवा तिथून बाहेर पडली.
भटकत भटकत ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली. उंच टेकडीवर एक मंदिर दिसले.पायऱ्या चढून ती वर आली अन पायरीवर विसावली अन आतले दृश्य पाहू लागली. देवाच्या प्रसन्न मूर्तीपुढं दिवा तेवत होता,मूर्ती फुलांच्या ताज्या हाराने सजली होती. ताज्या फुलांमुळे ती अजूनच सजीव वाटत होती.उदबत्तीचा सुगंध तिच्या शरीरावरील सुगंधासारखाच होता.एक तरुण जोडपे मूर्तीसमोर हात जोडून उभे होते.प्रार्थना संपताच ते बाहेर आले.बाहेर येताच तिला जवळ घेऊन तो हळूच काही पुटपुटला अन दूर गेला.तिच्या डोळ्यात अश्रू आले.ती तिच्याजवळ गेली अन गालांवर विसावली तसे तिचे गाल गुलाबी झाले. मग तो मागे फिरला अन कानात हळूच बोलला,” धीर धर,मी लगेच परत येईन,सीमेवर माझी आता गरज आहे,असा जातो न असा येतो “.तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले तसे हवा खुदकन हसली अन तिथून दूर गेली.
आता ती रानात गेली अन पिकांतून वाहू लागली.पिके आनंदाने डोलू लागली,पाखरे दाणे टिपू लागली, तीही आनंदाने बागडू लागली, पाखरांची गाणी ऐकून आनंदून गेली, मग फळांच्या झाडांवरून झोके घेत वेगवेगळ्या फळांना स्पर्श करू लागली.आंबट गोड सुवास तिच्या अंगाला लागला.शेतकरी शेतात काम करत होते. ती हळूच जवळ गेली. घामाने निथळलेल्या त्यांच्या शरीराला झुळुकीचा स्पर्श होताच त्यांना हायसे वाटले.
आता ऊन चांगलेच तापले होते. तिचा रंग लाल झाला.आंब्याच्या भल्यामोठ्या झाडाखाली तिनं विश्रांती घेतली.गार गार सावलीत तिला झोप लागली.
तिला जाग आली तेव्हा सूर्याची किरणे मावळतीला गेली होती. आता तिला घरी परतायला हवं होतं.ती झपाट्याने चालू लागली; त्याच रस्त्याने भरभर ती परतली…. आनंदाने गीत गात, आणि पुन्हा तिच्या घरात जाऊन शांतपणे विसावली.
☆ तीन धडे… श्री नारायण मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
जेव्हा मी लहान होतो, त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो. हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही.
माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली.
एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या. एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, “बेटा, तुला कोणती वाटी हवी आहे ती तू घेऊ शकतो.”
त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते! आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे.
म्हणूनच मी ज्या वाटीत अंडे होते ती वाटी निवडली! आम्ही जेवण करायला सुरुवात केली, तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास सुरुवात केली.
जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला. मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो. माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले, “बाळा, नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही. जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे. शेवटी तुमची हारच होईल.”
दुसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले : एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्या वाटीवर एकही अंडे नव्हते. पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले, “बाळा, तुला जी वाटी हवी असेल ती घे.”
ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली ! मी अंडं नसलेली वाटी निवडली. मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.
पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, “बाळा, तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये कारण जीवनात खूप अनिश्चितता असते. कधी कधी, वन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो. अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये, फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही.”
तिसऱ्या दिवशी, माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले, एका वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते. त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले, “ बाळा, तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे? ”
या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की, “आधी तुम्ही घ्या, कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात, आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे.”
माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली. जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही. परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली, तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो !
माझ्या वडिलांनी प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले, ” माझ्या बाळा, हे कधीही विसरु नकोस की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस, तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते !”
मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो. हे खरेच आहे, की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे..
☆ वयाची सत्तरी पार करतांना !!… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
वयाची सत्तरी पार करतांना !!
एकदा एका पासष्टी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, “मित्रा, तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?” त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकासाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित ! त्याने जे उत्तर दिले ते असे…
१. आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यावर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.*
२. मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.*
३. आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना ! *४.आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.*
५. आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.*
६. आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.*
७. आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.*
८. ज्यांना माझी किंमत नाही अशांकडे मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.*
९. आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.*
१०. आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.*
११. आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून ! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.*
१२. आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न करतो. मला जे करावसं वाटतं ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो.
१३. मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत… आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा…!!*
*आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.*
*आता लक्षात आले आहे की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जावून रडतो. त्याचा तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असलेली भावनाही मनात येते.*
खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?
आत्ता कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.
खूप खूप शुभेच्छा सत्तरीच्या.वाटेवर असणाऱ्या मित्रांना !!
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
मी—-अगबाई ! नवं वर्ष उगवलं.जानेवारी महिना सुरु झाला. आता संक्रातीचे वेध लागले. .स्वच्छ तीळ चिकीचा गुळ आणायलाच हवा..शिवाय सुगडी..बोरं ऊस आवळे..कितीही ठरवलं ना या वेळेस चितळेकडूनच आणूया लाडू, आता नाही हो होत…पण मन नाही ना मानत..नाही म्हटलं तरी संस्काराची मुळं नाही सुटत हो..
पण अधिक माहिती देण्यासाठी संक्रात आणि तिळगुळ माझ्या घरीच आले आहेत..अम्मळ बोलूच या का त्यांच्याशी..
“ काय म्हणताय् तिळगुळजी..? ”
*तिळगुळ..*— “ सर्वप्रथम मी तुझं कौतुकच करतो की या वयातही तू अजून तिळगुळ घरी बनवतेस…
संक्रात — “ अरे पण तुझं महत्व सांग ना..”
तिळगुळ— “ हे बघ तीळ आणि गुळाचं बंधन म्हणजे मी..तिळगुळ. हेमंत ऋतुत येते संक्रांत..थंडीची शिरशिरी..तीळ हे उष्णवर्धक , स्निग्ध. शिवाय त्यातली अमीनो प्रथीने ,लोह शरीरास पोषक असतात. गुळातही सुक्रोज आणि ग्लुकोज आणि लोह असते. ते शरीराचे तपमानही राखते अन् कांतीही सतेज राहते…म्हणून संक्रातीला माझे महत्व असते बरं का? शिवाय स्नेह आणि मैत्रीचे मी प्रतीक. राग हेवे दावे विसरून जायचे. नवे स्नेहसंबंध प्रस्थापित करायचे..तीळगुळ घ्या गोड बोला म्हणत आनंदाचे, प्रेमाचे बंध जोडायचे..”
मी— “ किती छान !!आपल्या भारतीय सणातली ही तत्वंच महत्वाची..”
*संक्रांत.*— “ अगदी बरोबर !”
मी— “ पण संक्रातबाई,,”काय बाई संक्रांत आली माझ्यावर..”असं लाक्षणिक अर्थानं ,थोडंसं कडवट का बरं
बोलतात ?”
संक्रांत— “ कारण यावेळी एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करणं असतं ना..१४जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.आणि या भ्रमणास मकर संक्रांत असं म्हणतात. याचवेळी उत्तरायण सुरु होते. हा काळ धर्म परंपरेच्या दृष्टी कोनातून अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. अन्न ,वस्तु यांचं दान केलं जातं.. सूर्याची पूजा केली जाते. शुक्राचाही उदय होतो.. “
मी — “ भारतात संक्रातीला वेगवेगळी नावेही आहेत ना..?”
संक्रांत – “हो .तामीळनाडुत पोंगल असतो. बिहार मधे तर मला खिचडीही म्हणतात…”
मी — “ खिचडी?”
संक्रांत — “ हो. कारण या दिवशी तूर मसूर तांदळाची खिचडी बनवून खायचीही प्रथा आहे. तिळाचे लाडू, वड्या, रेवडी, गजक, गुळपोळी या खाद्य पदार्थांची तर रेलचेलच असते…”
मी— “ वा !! किती छान माहिती मिळाली. भारतीय सण म्हणजे नुसतीच संस्कृती किंवा परंपरा नव्हे, त्यामागे शास्त्रीय विचार आहे. बदलणार्या ऋतुमानाचा आणि मानवी जीवनाचा केलेला वैज्ञानिक अभ्यास आहे…मग स्त्रियांसाठी हळदीकुंकु, वाण वाटणे ,लहान मुलांचे बोर नहाण, पतंग उडवणे, या आनंदकृती असल्या तरी भारतीय कृषीपरंपरेला आणि निसर्गाला मानणार्या आहेत…आनंदाचे संकेत आहेत.”
खरोखरच आज मला मी, तिळगुळ आणि संक्रांत यातील परस्परसंबंध डोळसपणे जाणता आले…
☆ ‘व्हीलचेअर…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
विवियाना मॉलमध्ये रविवारी संध्याकाळची वेळ म्हणजे तरुणांची गर्दीची वेळ.. त्यांचा चिवचिवाट, भरलेले कॉफी हाऊसेस, सेल्फी टाईम.
अशा गर्दीच्या वातावरणात चटकन नजर गेली ती एका व्हीलचेअरवर एका आजीबाईंना प्रेमाने नेणारा एक माणूस आणि सोबत 12-13 वर्षाचा एक मुलगा.. मी आणि माझी मैत्रीण तिथे एका बाजूला बाकावर बसलो होतो. आम्ही बघत होतो.. व्हीलचेअर ढकलत तो माणूस त्या आजीबाईंना इकडून तिकडे नेत होता आणि त्याचा मुलगाही त्याच्या सोबत होता…. ५ मिनिटांतच तो माणूस त्या आजींची व्हीलचेअर आमच्या अगदी बाजूला आणून उभं करून त्या मुलाशी इंग्रजीत बोलत होता. ” मी ATM मधून पैसे काढून एकदोन कामे करून येतो, तू आजी जवळ थांब. ” असं सांगून निघून गेला.
त्या आजी आमच्याकडे बघून थोडं हसल्या.. दोन – तीन मिनिटं गेली आणि हिंदीत मला सांगू लागल्या.. ” हा माझा नातू. मुलाचा मुलगा. आणि तो गेला ना पैसे काढायला तो माझा मुलगा.. आम्ही ठाण्यातच राहतो.. आज ‘सुईधागा’ सिनेमा बघायला आम्ही आलो. सुनेला तिच्या कॉलेज ग्रुपबरोबर बाहेर जायचं होतं, मग माझ्या मुलांनी आमचा हा बेत जुळवून आणला..” नकळत माझ्या तोंडून “अरे वाह!” निघून गेलं..
आजी पुढे सांगू लागल्या… “ माझं वय 73 आहे.. मला चालता येत नाही म्हणून ही खुर्ची आणि ही फोल्डिंग काठी.. सिनेमा, नाटक बघायला जायचं तर थिएटरमध्ये काळोख व्हायच्या आत आम्हाला आत शिरावं लागतं. म्हणून मी कुठे जायचं म्हणजे माझी वरातच असते.. पण मुलगा, सून ऐकत नाहीत.. अजून दोन मुलं आहेत मला.. पण ते मला सांभाळायला तयार नाहीत.. हा मुलगा सायकॉलॉजीचा प्राध्यापक आहे. तो मला आनंदाने सांभाळतो.. दुसरी भावंडे सांभाळत नाहीत, त्याबद्दल त्याचा आकस नाही. मला माझा मुलगा थिएटरमध्ये काळोख व्हायच्या आतच घेऊन येतो.
आज आम्ही बाहेर जेवून सिनेमाला गेलो.. आता मॉलमध्ये या खुर्चीतून मला फिरवतो.. मी नको म्हणत असताना त्याचं म्हणणं.. ‘बघ नं जग किती बदललंय. सुंदर गोष्टीही आहेतच. असं फिरलीस, चार माणसं बघितलीस की तुझं मन व शरीर ही फ्रेश होईल. मी मनाचा अभ्यास केलेला माणूस आहे म्हणूनच सांगतोय.'”
हे सांगत असताना त्यांचा मुलगा काम आटपून परत आला.. आजीबाई माझ्याशी बोलत असलेल्या बघून त्यांनी त्यांना हिंदीत मला निर्देश करून विचारलं, ” कौन है? किससे बात कर रही हो मम्मा..?”
आजीबाईंनी लगेच सांगितलं, ” यहीपे बैठी थी। ऐसे ही मैने बात की उससे।”
मला वाटलं, हा माणूस वैतागेल. कोण कुठली ही बाई ! पण त्यांनी चक्क हसून मला जे सांगितलं त्यावर मी थक्क झाले.
ते म्हणाले, “आम्ही आईला दर महिन्याला एकदा असं बाहेर फिरवून आणतो.. रोज आम्ही व्यस्त असतो. मग एक दिवस तिला असं बाहेर घेऊन येतो. माझे वडील असतांनाही आम्ही हेच करायचो. ते नाहीत आता.. आज माझी बायको नाही येऊ शकली, नाहीतर आम्ही तिघे येतो. एक दिवस तिला देतो. कधी सिनेमा, नाटक, ते नाही जमलं तर संध्याकाळी तरी काहीतरी प्लॅन करतो आणि तिला फ्रेश व्हायला मदत करतो. त्यामुळे तिची तब्येत चांगली राहायला मदतच होते ना.”
आम्हाला त्यांनी धन्यवाद म्हटलं, ” माझ्या आईला तुमची सोबतच झाली ” म्हणून ते तिघेही निघून गेले नि मी आणि माझी मैत्रीण सुन्न झालो. अरे किती नशीबवान या आजी..
— कुठे ही परिस्थिती नी कुठे ‘आईवडील नकोत’ ही भावना जोपासणारी काही मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात.. समाजात एकाच परिस्थितीबाबत दोन भिन्न बाजू दिसल्या.
वय झालं आहे.. चालता येत नाही.. गर्दीत कुठे न्यायचं.. असा विचार न करता हा आजींचा मुलगा, सून आणि नातू ही यांच्या लेखी ‘आई म्हातारी झाली पण मी नेईन, तिला आनंद मिळावा’ ही भावना..
अशीही माणसं समाजात आहेत हे बघून आम्हा दोघींना खरंच खूप बरं वाटलं. आणि कितीतरी वेळ आम्ही शांतपणे त्या तिघांच्या पाठमोर्या आकृतीकडे शांतपणे बघत होतो आणि डोळे कधी पाणावले कळलंच नाही….
लेखका : अज्ञात.
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
यू ट्युबला एका आहारतज्ञाचं भाषण ऐकण्यात आलं. त्यात त्यांनी योग्य आहार,सप्लिमेंट्स यांद्वारे अनेक रुग्णांना विविध आजारांतून कसं बरं केलं ,ते प्रभावीरीत्या सांगितलं होतं..
काही महिन्यांपूर्वी निघालेली B12 व D जीवनसत्त्वाची कमतरता व काही तब्येतीच्या तक्रारींमुळे मी या
आहारतज्ञांकडे फोन केला.फोन साहजिकच रिसेप्शनिस्टने घेतला…. ” आमच्या मॅडम ऑन लाईन तुमच्याशी ३० ते ४० मिनिटे बोलून तुम्हाला सल्ला देतील. या सल्ल्याची फी रु. तीन हजार असेल. तुमची केस पाहून तुम्हाला आम्ही तीन महिन्यांसाठी एक डाएट प्लॅन देऊ. तो तुम्हाला फॉलो करावा लागेल.तुम्ही जर हा प्लॅन घेतलात तर
तीन हजारमधील दोन हजार रुपये आम्ही परत करू.”
दोन हजार रुपये परत करणार म्हटल्यावर मला एकदम भारी वाटलं. डाएट प्लॅन घ्यायचाच ,असा पक्का निश्चय करून मी विचारलं, ” मॅडम, म्हणजे हा डाएट प्लॅन एक हजार रुपयात मला पडेल नं?”
” अहो मॅडम नाही नाही.डाएट प्लॅनची किंमत वेगळी पडणार.”
” किती आहे किंमत” मी जरा नाराजीनेच विचारले.
” प्रत्येक पेशंटनुसार प्लॅन वेगळा असतो.त्यामुळे किंमतही वेगळी असते.”
” अहो पण रेंज असेल नं,कमीत कमी किंमत काय असेल ?”
“साठ हजार”. ….
माझ्या हातातून फोन खाली पडला. दोन दिवसांनी माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या चित्राच्या घरी गेले होते.
तिला ही घटना ऐकवली. क्षणार्धात तिचा चेहरा रागाने लाल झाला. ती आत गेली. हातात अनेक बाटल्या,प्लास्टिकचे डबे आणि फाईल घेऊन बाहेर आली….. आठ महिन्यांपूर्वी चित्राला खूप अशक्तपणा वाटू लागला होता.काम होत नव्हते.चिडचिडेपणा आला होता.जगण्यात अर्थ वाटत नव्हता. ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला तपासले.त्यांना काही विशेष आजार वाटला नाही. जीवनसत्त्व ,लोहासारखी खनिजं यांच्या कमतरतेमुळे असं होऊ शकतं. पौष्टिक, संतुलितआहाराने बरं वाटेल, असं त्या जुन्या जाणत्या डॉक्टरांचं मत पडलं.
लक्ष्मी पाणी भरत असलेल्या चित्राच्या घरात अन्नाची काही कमी नव्हती. स्वयंपाकाच्या मावशी दोन्ही वेळेला प्रत्येकाच्या आवडीचं जेवण रांधत होत्या. पण चित्राला दाक्षिणात्य पदार्थ आवडत .ती बरेचदा वैशाली, वाडेश्वरमधून इडल्या,डोसेच मागवून खाई. इतर वेळी वरणभातावरच तिचं पोट भरत असे. आईस्क्रीम मात्रं तिला रोज लागायचेच. आणि चहा हे तिचं अमृत होतं. दिवसातून सात-आठदा तरी तिचा चहा होत असे. चित्राच्या लेकीचे चायनीजशिवाय पान हलत नसे. ती मैत्रिणींबरोबर चायनीज खाऊनच घरी येत असे. शिवाय डॉमिनोज ,पिझा हट, मॅकडी ही तिची तीर्थस्थानं होती. घरची पोळी भाजी तिला बोअर होई. भात खाणं हे तर तिला पाप वाटे. पिझा,बर्गरनी तिच्या व्यक्तीमत्त्वाला चांगलच वजनदार केलं होतं.. मंदार ,चित्राचे यजमान त्यांच्या धंद्याच्या निमित्ताने बरेचदा बाहेरच असत. सामिष जेवण त्यांचा जीव की प्राण…विविध गावांतील कोणत्या हॉटेलात फिश चांगला मिळतो, कुठे बिर्याणी लाजवाब असते, हे सांगताना सरस्वती त्यांच्या जीभेवर नाचत असे. मटन,तांबडा-पांढरा खाण्यासाठी ते मित्रांबरोबर खास कोल्हापुरला जात असत. त्यामुळे चित्राच्या शाकाहारी घरी जेवणासाठी ते क्वचितच असत.
चित्रावर त्यांचं खूप प्रेम होतं. म्हणूनच चित्रा आजारी पडल्यावर त्यांनी तिला लगेच डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी जेंव्हा जीवनसत्त्व, खनिजे, लोह यांची कमतरता सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्या समृद्ध भरल्या घरात असं का व्हावं ते त्यांना समजेना. म्हणूनच शेवटी ते शहरातल्या प्रसिद्ध व महागड्या आहारतज्ञांकडे चित्राला घेऊन गेले.
मी चित्राची फाईल पाहिली. फाईलमध्ये तिच्या रक्ताच्या तपासण्यांचे रिपोर्ट्स होते. त्यात अनेक जीवनसत्त्वे, खनिजे,लोह यांची कमतरता तिच्या रक्तात दिसत होती. त्या फाईलवर मी चौकशी केलेल्या क्लिनिकचेच नाव दिसत होते. निरनिराळ्या व्हिटॅमिन्स, मिनरल्सच्या गोळ्या असलेल्या बाटल्या दिलेल्या होत्या. प्लॅस्टिकच्या डब्यातून नाचणी,बाजरी वगैरेंची कसली कसली पिठे दिसत होती. या सगळ्यांचे तिच्याकडून ऐंशी हजार रुपये घेतले होते.
दिलेल्या प्लॅननुसार तिने ही औषधे घेण्यास सुरुवात केली. जेवणाऐवजी पिठे शिजवून खाऊ लागली. दोन दिवस बरं वाटलं. तिसऱ्या दिवसापासून जुलाब होऊ लागले. आहारतज्ञाला फोन केला. प्लॅननुसार सगळं सुरू ठेवा,असं उत्तर मिळालं. दोन दिवसांनी जुलाबांबरोबरच उलट्याही सुरू झाल्या. पुन्हा आहारतज्ञाला फोन गेला. मॅडम परदेशी गेल्याचं उत्तर मिळालं.
मैत्रीण उलट्या जुलाबांनी अंथरुणाला खिळली. चित्राच्या यजमानांना काय करावं ते समजेना. त्यांना ज्या आत्यांनी लहानाचं मोठं केलं होतं त्या आत्याला गाडी पाठवून गावाकडून घरी आणलं. आत्यांनी वयाची ऐंशी वर्षं पार केलेली असली तरी पन्नाशीच्या चित्रापेक्षा त्या ठणठणीत दिसत होत्या. ऐंशी पावसाळे पाहिलेल्या आत्याबाईंच्या सारं लक्षात आलं….. त्यांनी आल्या दिवसापासून पदर खोचून स्वयंपाकघराचा ताबा घेतला. त्यांनी तिच्यासाठी लोणकढ्या तुपातले मुगाचे,नाचणीचे, डिंकाचे लाडू बनवले. चित्राचा चहा बंद करून टाकला. उठल्याबरोबर कोमट पाणी, लिंबू नि मध तिला प्यायला देत असत. नाष्ट्याला ताजा बनवलेला लाडू नि गरमागरम भाताचे प्रकार.. गरम गरम भाताबरोबर कधी मेतकूट तूप लोणचं ,कधी कुळथाचं पिठलं, कधी लसणाची फोडणी दिलेलं मुगाचं वरण, कधी टोमॅटोचं तर कधी आमसुलाचं सार ! कधीतरी मुगडाळीची खिचडी ,तूप ,पापड नि मुरलेलं लिंबाचं लोणचं…..
दुपारच्या जेवणात गरम गरम पोळी, तूप, कधी बाजरीची तर कधी नाचणीची भाकरी. तिच्यासोबत घरच्या ताज्या लोण्याचा गोळा. पोळी-भाकरीसोबत लिंबू पिळलेली, भरपूर कोथिंबीर घातलेली रोज वेगळी कोशिंबीर, मोड आलेल्या कडधान्याची उसळ, रोज नवीन फळभाजी नि ओल्या खोबऱ्याची, कच्च्या टोमॅटोची ,कांद्याची, दोडक्याच्या किंवा दुधीच्या सालीची खमंग चटणी…..
दुपारी गरम गरम उपमा ,कधी पोह्याचा एखादा प्रकार ,कधी लाह्यापीठ ,कधी थालीपीठ, कधी मिश्र धान्यांचं गरमागरम धिरडं …..
रात्रीच्या जेवणात मात्रं गरम गरम ज्वारीची भाकरी, पालेभाजी नि जवस, खोबरं, कारळे, लसूण यांपैकी एकाची चटणी. दिवसभरात दोन मोसमी फळे तिला खावीच लागत..
आता आत्याबाई हे एकटीला थोडच खाऊ घालणार ?
साऱ्या घराचाच हा डाएट प्लॅन झाला. आणि आत्यांना नाही म्हणण्याची किंवा विरोध करण्याची कुणाची बिशाद नव्हती.
चित्राला तिच्या न कळत कधी बरं वाटू लागलं, ते कळलंच नाही. तिचा अशक्तपणा, निरुत्साह , निराशा सगळं सगळं पळालंच, पण चित्राच्या यजमानांची रक्तातील वाढलेली साखरही पळाली. लेकीचं वाढलेलं वजन पळालं नि तिच्यामागे कॉलेजात मुले लागू लागली..
….. आजारपणाच्या छायेनं वेढलेलं घर हसतं-खेळतं झालं.
बाहेरून पिझा ,बर्गर, वडापाव, तेलकट चायनीज, तुपकट पंजाबी ,बेचव कॉंटिनेंटल मागवणं बंद झालं नि पैशाची कल्पनेपलिकडे बचत होऊ लागली……. पण यासाठी ऐंशी हजार रुपये अक्कलखाती जमा करावे लागले.
भाच्याच्या घरातील पोटं आणि तब्येती मार्गी लावून आत्याबाई आपल्या गावी निघाल्या.. चित्रा नि तिच्या यजमानांनी आत्याला वाकून नमस्कार केला . आत्याबाईंनी डोक्यावर ठेवलेल्या आशीर्वादाचा हात हातात घेतला, नि त्या अन्नपूर्णेच्या हातात नवीन घडवून आणलेले सोन्याचे बिलवर चित्राने घातले.
” आत्या तू तुझ्या अन्नपूर्णेच्या हातांनी जे पौष्टिक अन्न आम्हाला करून वाढलंस त्यामुळे चित्रालाच काय, आम्हा सर्वांना पुनर्जन्म मिळाला. त्या अन्नाची किंमत होऊच शकत नाही. पण ही फूल ना फुलाची पाकळी. “…..
लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले, सोलापूर
संग्राहिका : वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈