मनमंजुषेतून
☆ इंदिरा : तीन ऋणे – सुश्री विनिता तेलंग ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆
‘आपल्या अंधाऱ्या प्रवासात प्रकाशाचे झोत फेकणाऱ्या ‘ तीन जणांच्या ज्या ऋणांविषयी इंदिराबाईंनी लिहिलं आहे, ते सारं खरं तर कोणत्याही उमलू पहाणाऱ्या कलाकारासाठी फार मोलाचे आहे..
इंदिराबाई लिहितात —-
कवी माधव जूलियन त्यांना शिकवायला होते. ते एकदा, ‘ तुम्ही कविता लिहिता असं समजलं, तर येतो एकदा पहायला ‘ असं म्हणून एक दिवस खरंच घरी आले. जाताना माझ्या मनाविरुध्द आईने त्यांना कवितांची वही दिली..
आता इथे काय अभिप्राय येतो म्हणून प्राण कंठाशी आलेले !आठ दिवसांनी सरांनी वही आणून दिली आणि सांगितले….. “ शब्दसंग्रह वाढवा.. त्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा. शब्दासाठी कविता अडली असे दारिद्र्य असू नये. शब्द म्हणजे काय ते ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगेल. दुसरे, जेव्हा कविता लिहावी वाटते तेव्हा जे वाटते ते प्रथम गद्यात लिहून काढा. ते झाले की कवितेत लिहा. काही बदल हवा वाटला तर तो पुन्हा गद्यात लिहा.. पुन्हा त्यानुसार कवितेत बदल करा..”
दुसरे दुर्गाबाई भागवतांचे सांगणे…..
बोलता बोलता त्यांनी विचारले, ” सध्या काय वाचताय?”
” तसे विशेष काही नाही..”
यावर त्या उत्तरल्या, ” पण जे वाचता त्याचे टिपण ठेवता ना?…”
“नाही हो..” असे उत्तरताना इंदिराबाई गुदमरल्याच !…. पुढे बाई सांगतात….. .
“आणि मग एक अद्भुत झाले ! त्यांनी मला क्षुद्र, अडाणी ठरवले नाही. त्या मला म्हणाल्या, “ कसे वाचन करावे, मी सांगते…” असे म्हणत त्यांनी कागद पेन घेतले, त्यावर रेघा ओढून खण पाडले आणि त्या सांगू लागल्या. अगदी मनापासून व जिव्हाळ्याने.
त्यांच्या सांगण्याचा तपशील आठवत नाही, पण सारांश असा होता……
“ वाचन नेहमी जाणीवपूर्वक करावे. कोणतेही पुस्तक वाचा, शेजारी एक वही ठेवावी. त्या पुस्तकातील आवडलेले, न आवडलेले मुद्दे नोंदवावेत. त्यावरचे आपले मत नोंदवावे. झाल्यावर एकूण पुस्तकाविषयीचे मत नोंदवावे. ही नोंद स्वतंत्र करावी; व मागील नोंदी व ही नोंद तपासून लेखनाविषयीचे तुमचे निष्कर्ष नोंदवावेत. मग एकूण पुस्तकाचे एक स्वतंत्र टिपण या साऱ्यावरुन करावे. तुम्ही कविता अशा तऱ्हेने वाचा. बघा तरी !” इतके तपशीलवार त्यांनी मला सांगितले ! त्या विदुषी खऱ्याच !”
तिसरे वि.स.खांडेकर…
एकदा ते म्हणाले, ” तुम्हाला मी एक काम सुचवणार आहे. तुम्ही कविता प्रत्यक्ष कागदावर उतरू लागलात की, हे करायचे. एका वहीत तारीख टाकून त्या दिवशी सुचलेल्या ओळी, कविता लिहायची. पुन्हा त्यात काही भर पडली, बदल झाले, तर पुन्हा तारीख टाकून पुढच्या पानावर लिहायचे. मागच्या ओळींसकट. क्रम बदलला, शब्द बदलले तर त्याचीही नोंद करायची. मथळे बदलले वा काहीही काम त्या कवितेवर केले तरी ते नोंदवायचे. अशी ती कविता- रचनेची डायरी ठेवायची.. अगदी प्रामाणिकपणे. तुम्ही हे करु शकाल म्हणून सांगतो. हे काम समीक्षेला पुढे नेणारे आहे….”
“या साऱ्या सूचना मी सहीसही अमलात आणल्या असे नाही. पण ही तीन ऋणे माझ्या मनात बिल्वदलांसारखी टवटवीत आहेत. या सूचनांचा गाभा मी आत्मसात केला आहे. माझ्या लेखनप्रवासाची वाटचाल या प्रकाशकिरणांनी थोडीफार उजळली आहे, हे निश्चित.”
हे वाचल्यावर पुन्हा प्रकर्षानं आपल्या तोकडेपणाची जाणीव झाली !
वाटलं की उत्स्फूर्तता, सहजभाव, लालित्य हे सारं जपूनही शास्त्रशुध्द पध्दतीने लिखाण विकसित करता येऊ शकतं, तसं ते केलं पाहिजे .
एखादा कसलेला नट त्याच्या नैसर्गिक जिवंत अभिनयाचा प्रभाव पाडतो, तेव्हा त्यामागे त्याची शास्त्रशुद्ध मेहनत असते. गायक रियाज करतो, ताना पलटे घोटतो, तसे लेखक, कवी म्हणून आपण काय करतो ?
तर या इंदिराबाईंच्या बिल्वदलानं असं विचारात पाडलं !
लेखिका – सुश्री विनिता तेलंग
संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈