सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
मनमंजुषेतून
☆ सखी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
‘पुन्हा कधी भेटशील गं? नक्की ये, खूप कंटाळा येतोय गं हॉस्पिटलमध्ये !’ हेच तिचं माझ्याशी शेवटचं बोलणं ठरलं! माझी जिवाभावाची मैत्रीण, कॉलेजमध्ये एकत्र एका डिपार्टमेंटला शिकलो. अतिशय हळुवार, कवी मनाची होती ती!
माझं एम ए पूर्ण झाल्यावर लगेचच माझे लग्न झाले आणि मी संसारात गुरफटले ! एम ए पूर्ण करून ती तिच्या गावी एका कॉलेजला प्राध्यापिका म्हणून नोकरीला लागली . ती कॉलेजमध्ये आणि मी माझ्या संसारात रमून गेले. दिवस पळत होते. प्रत्येक जण आपापल्या विश्वात बिझी होतो. प्रथम काही काळ पत्रव्यवहार होई. हळूहळू त्याचाही वेग मंदावला.तेव्हा फोन फारसे कुठे नव्हते आणि मोबाईल तर नव्हताच! तिचे लेख, कविता वाचायला मिळतं. त्यातून तिचे निराश, दु:खी मन प्रकट होई. तिच्या मनात काहीतरी खोलवर दुःख होतं ते जाणवत राही! पण त्यावर फारसे कधी बोलणे झालेच नाही !
अशीच वर्षे जात होती. अधून मधून भेटी होत असत. ती साहित्य संमेलनं, वाड्मय चर्चा मंडळ, कॉलेजचे इतर कार्यक्रम यात गुंतलेली होती, तर मी संसारात मिस्टरांच्या बदली निमित्ताने वेगवेगळ्या गावी फिरत होते. परत पाच सहा वर्षानंतर आम्ही आमच्या मूळ गावी परत आलो. यांची नोकरीही तिथेच स्थिरावली. घर बांधलं. मुलगी मोठी झाली आणि अचानकपणे मुलीच्या गायन स्पर्धा निमित्ताने सखीच्या गावी जाणे झाले. त्यादिवशी गायन स्पर्धेपेक्षा मला जिची ओढ होती ती सखी नेमकी परगावी गेली होती.
त्यानंतरच्या बातम्या ज्या कळल्या त्या फारशा चांगल्या नव्हत्या. तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आणि एका ब्रेस्टचे ऑपरेशनही झाले. या सगळ्यावर मात करून तिचे आयुष्य पुढे चालले होते. युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर वर्गाशी तिचा चांगला संपर्क होता. लेखनामुळे चांगली प्रसिद्धी मिळाली होती. अशाच एका कार्यक्रमासाठी ती आमच्या गावात आली असता माझी तिची भेट झाली. तिलाही खूप आनंद झाला. मी तिला घरी बोलावले, त्याप्रमाणे ती घरी आली. खूप आनंद झाला मला ! ‘काय देऊ भेट तुला मी?’ प्रथमच भेटतेस इतक्या वर्षांनी ! डोळ्यात टचकन पाणी आले तिच्या ! ‘ माझं काय गं, किती आयुष्य आहे देव जाणे! आपण भेटलो हीच मोठी भेट !’असं म्हणून रडली. तेव्हा मी तिला ड्रेसवर घालायचे जॅकीट दिले. ती खुश झाली.
एक दिवस अचानक तिचा कोणाबरोबर तरी दिलेला निरोप मला मिळाला. निरोप होता की, ‘ मी हॉस्पिटल मध्ये आहे, मला भेटून जा.’ मी तेव्हा मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होते, तरीपण एक दिवस दुपारच्या वेळात आम्ही दवाखान्यात गेलो. आजारपणामुळे ती खूप थकली होती. कॅन्सरने पुन्हा आपले अस्तित्व दाखवले होते. अगदी बघवत नव्हते तिच्याकडे! त्यातूनही हसून तिने मला जवळ बोलावले. तिच्या कवितांचे पुस्तक माझ्यासाठी तिने आणून ठेवले होते. त्या हळव्या कविता वाचून मन आणखीच दुःखी झालं ! तिथून पाय निघत नव्हता. ‘ पुन्हा वेळ काढून नक्की
येते ‘ असं तिला म्हंटलं खरं, पण मला पुन्हा लग्नाच्या गडबडीत जायला झाले नाही. साधारण महिन्याभरातच ती गेल्याचे कळले. खूप खूप हळहळ वाटली. आपण तिला परत नाही भेटू शकलो, ही रुखरुख कायम मनाशी राहिली. तेव्हापासून मनाशी ठरवलं की, अशा भेटी पुढे ढकलायच्या नाहीत. त्या आवर्जून वेळेत करायच्या ! तिच्या ‘सारंगा तेरी याद में….’ गाण्याचे स्वर ते गाणं लागलं की अजूनही कानात घुमत राहतात ! सखीची बाॅबकट केलेली, काळीसावळी, हसतमुख मूर्ती डोळ्यासमोर येते. काळाने हे सुकुमार पुष्प आपल्यातून फार लवकर खुडून नेले, नाहीतर तिच्याकडून आणखी खूप काही चांगले लेखन आपल्याला मिळाले असते. तिच्या दु:खासह ती अकाली गेली. पण अजूनही जून महिन्याच्या दरम्यान ती गेली ही आठवण मनात रहाते .वीस वर्ष झाली. आठवणींच्या माळेतील हा सुंदर मणी आज गुंफला गेला !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈