“माझं चुकलं..” असं बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो…
कुणाशी वाद घालत बसण्यात आता काही मजाच उरली नाही …
पहिल्यासारखं, भले हरलो तरी चालेल, पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासनतास चर्चा कराविशी वाटतं नाही आता …
आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो…
लोक आपल्याला चुकीचे समजतील याचंही काहीच वाटतं नाही आता …
“चूक की बरोबर” या पलिकडे पण एक जग असतं. तिथे फक्त मौनी शांतता असते…
आधीच दुनिया खूप पुढे चाललीय, लोक फार वेगाने धावतायत्, या सगळ्यात आपण मागे राहू याची भीती वाटायची पूर्वी – टेन्शन यायचं …पण आता सावकाश चालणंच योग्य वाटतं …
कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते…
आता पुढे जाणार्याला वाट करून द्यायची आणि आपण आपले कडेच्या साइड पट्टीवरून निवांत चालत राहायचं …
वाटेत सुखं मिळतील…
तशी दु:खंही मिळतील …
हसायचं, रडायचं …
ते आतल्या आत …
पण चालत राहायचं … !
पण चालत राहायचं … !!
लेखक : अनामिक
संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे
भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
डॉ. आंबेडकर चौक हा आमच्या गावातील एक प्रमुख चौक. याच चौकात असलेलं पुजारी हॉटेल आपल्या अनेक वैशिष्ट्यांनी वेगळेपण जपून होतं. आमच्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंतच्या आमच्या जीवनात या हॉटेलचे अनेक अनुभव स्मृतीपटलावर कोरले गेले आहेत .आज सहजच पुजारी हॉटेलच्या जागेवर बांधल्या गेलेल्या शोरुम कडे पाहिलं आणि पुजारी हॉटेलच्या आठवणी मन:चक्षुसमोरून सरसरत गेल्या.
पुजारी हॉटेल म्हणजे काही भव्यदिव्य वास्तू नव्हती. दहा बाय वीस पंचवीस फूट क्षेत्रफळ असलेल्या टिनाच्या शेडमध्ये हे हॉटेल होते. पण इतके लहान असले तरी आम्हाला ते कधी अडचणीचे वाटले नाही. पश्चिम व दक्षिण दिशेला असलेले दरवाजे आम्ही कधी बंद झालेले पाहिले नाहीत .दोन तीन टेबलं , त्याभोवती खुर्च्या. कोपऱ्यात एक निमुळता टेबल व त्यामागे लाकडी खुर्ची म्हणजे मालकाचे काऊंटर. उत्तरेकडे सदैव पेटत असलेली भट्टी. कोपऱ्यात पाण्याचे टाके, त्यावर पाण्याचा नळ. याच टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जायचे. नोकरही चार ग्लास बोटात धरून टाक्यातील पाण्यात बुडवत आणि तसेच टेबलवर आणून ठेवत. आणि याला त्यावेळी कुणाचाही आक्षेप नसायचा. मिनरल वॉटर तर माहीतच नव्हते, पण कुणी आजारी पडल्याचे कधी ऐकले नाही .नगर परिषदेच्या नळाचे पाणी म्हणजे शुद्ध पाणी असा तेव्हा नियम होता . .या हॉटेलचे वेगळेपण म्हणजे ते जवळपास दिवसरात्र सुरू असायचे. रात्री दोन तीन तास लाईट बंद केले की हॉटेल बंद. हॉटेलचे नोकर तिथेच रहायचे .काही विशिष्ट पदार्थांसाठी प्रसिद्ध म्हणावे तर तसेही नव्हते .भजी, आलुबोंडे ,शेव चिवडा असे नेहमीचेच पदार्थ तिथे मिळायचे. मिठाई म्हणजे जिलेबी व केव्हातरी बनविलेले पेढे बस. पण केव्हाही गरम मिळणारा एक पदार्थ तिथे मिळायचा तो म्हणजे मिसळ, त्याचीही रेसिपी ठरलेली होती. हॉटेलच्या भट्टीवर सदैव एक गंज मांडलेला असायचा- त्यात केव्हातरी बनविलेली दह्याची कढी सदैव गरम होत राहायची. मिसळ म्हणजे दोन चार भजी, त्यावर शेव चिवडा, आणि गरम कढी टाकलेली असायची.
हे पुजारी हॉटेल पदार्थासाठी महत्वाचे नव्हते, तर ते अनेकांचा आधार होते. त्याकाळी चंद्रपुरात सायकल रिक्षे होते.रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर असे रिक्षावाले हॉटेलच्या आश्रयाने उभे असायचे. रात्री साडेबाराला सिनेमाचे शो संपायचे ,अनेक लोक चहा नाश्त्यासाठी याच हॉटेलचा आश्रय घ्यायचे. दुसरे महत्वाचे म्हणजे तेव्हा पॅसेंजर ट्रेन हेच लोकांच्या आवागमनाचे साधन होते. नागपूरकडे जाणारी व नागपूरकडून येणारी- अशा दोन्ही गाड्या मध्यरात्रीच येत असत. या दोन्ही गाड्यांचे प्रवासी रात्रीचा वेळ पुजारी हॉटेलच्या आसपास घालवीत असतं. साधारणतः रात्री दोन तीन पर्यंत सुरू असलेले ते हॉटेल पहाटे पाचला पुन्हा सुरू व्हायचे. रात्रीच्या गाडीने आलेले पाहुणे पहाट होईपर्यंत हॉटेल परिसरात थांबायचे, कारण तिथे रात्रीही वर्दळ असायची.
हॉटेलमध्ये नॅशनल एको कंपनीचा रेडिओ होता, जो सकाळी सहाला सुरू व्हायचा तो रात्री रेडिओ प्रक्षेपण बंद होईपर्यंत सुरू असायचा. हॉटेललगत एक मोठे सिरसाचे झाड होते.. त्यावर एक मोठा स्पीकरबॉक्स लावलेला होता. तो रेडिओला जोडला असल्यामुळे रेडिओचे सर्व कार्यक्रम परिसरात ऐकू जायचे. त्यावेळी “ सिलोन ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन का व्यापारी विभाग “ हे रेडिओ स्टेशन प्रसिद्ध होते.बिनाका गीतमाला, आपहीके गीत, भूले बिसरे गीत, असे अनेक कार्यक्रम ऐकण्यासाठी लोक तिथे थांबायचे .अमीन सयानीचा आवाज ऐकू आला की लोकांची पावले नकळत थांबत. आमच्यासाठी तर ते घड्याळही होते.आमची सकाळची शाळा असायची. साडे सातला शाळा सुरू व्हायची. सात वीस ला प्रार्थना व्हायची . हॉटेलपासून शाळा पाच मिनिटाच्या अंतरावर होती. सव्वासातला रेडीओवर `सत्तेशू समाचार` हा ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारा कार्यक्रम लागायचा व नंतर समाचार लागायचे. आम्ही तिथे पोहोचलो की कोणता कार्यक्रम सुरू आहे ते ऐकायचो.समाचार सुरू नसतील तर बरोबर प्रार्थनेला हजर. नाहीतर उशीर म्हणून छड्या बसत असेत . सिरसाचे ते झाड आणखी एका बाबतीत मनोरंजक होते. या झाडावर गावातील सिनेमा थियेटरमध्ये लागलेल्या सिनेमाचे बोर्ड टांगलेले असायचे. कोणत्या टॉकीजमध्ये कोणता सिनेमा लागलाय ते तिथे समजायचे .शाळा सुटली की तिथे उभे राहून ते बोर्ड पाहणे हा आमचा आवडीचा विषय होता .
“पुजारी हॉटेल“ या नावातील `पुजारी` या शब्दाचाही एक इतिहास आहे. पुजारी हे मालकांचे आडनाव नव्हे, तर मालकाचे वडील गुजरात राज्यातून चंद्रपूरच्या लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी म्हणून आले होते. पुढे त्यांचे मूळ आडनाव मागे पडून पुजारी हेच नाव प्रसिद्ध झाले.
हॉटेलचे एक आणखी वैशिष्टय म्हणजे हॉटेलमध्ये लावलेले फोटो. यात अनेक राष्ट्रीय पुरुषांचे फोटो होते.आम्ही शिकतांना दहावीत काँग्रेसच्या स्थापनेचा इतिहास शिकला होता. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी, बद्रुद्दिन तय्यबजी,दादाभाई नौरोजी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, यालन ह्यूम, वेडरबर्न, या सर्वांचे फोटो तिथे लावले होते. हे त्यांचे अनौपचारिक शैक्षणिक कार्यच होते.
आणखी एक वैशिष्टय म्हणजे या हॉटेलच्या दर्शनी भागात बँडवाल्यांची वाद्ये लटकवलेली असायची.कारण हॉटेल मालकांच्या लहान भावाची इंडिया बँड पार्टी होती.त्या परिसरातील बँडवाल्यांनी आपसातील भांडणाला कंटाळून त्यांना आपले प्रमुख नेमले होते. ` बँड पार्टीचे ब्राम्हण प्रमुख ` हे कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. गावातील सर्व लग्नाचे बँड पुजारी होटलातच ठरायचे. महत्वाचे म्हणजे ही बँडपार्टी व त्याचे ` पुजारी ` हे मालक अजूनही आहेत . नुकताच त्यांनी त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.
असे हे वैशिष्टयपूर्ण पुजारी हॉटेल नवीन पिढीने विकले– तिथे दुसरे शोरुम उभे राहिले. पण माझ्या पिढीतील अनेक चंद्रपूरकर या हॉटेलला कधीही विसरू शकत नाहीत —कारण ते फक्त हॉटेल नव्हतेच.
☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 1 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
अनेक दिवसांपासून ठरलेला एखादा प्रवास… आव्हानात्मक, साहसी असेल तर त्यासाठी काही दिवसांपासून रोजचा दिनक्रम सांभाळून सुरु केलेली शारीरिक आणि मानसिक तयारी… प्रवासासाठी लागणार्या साधन सुविधांची जमवाजमव, कपडे-खाऊची बांधाबांध ,प्रवासाचा दिवस जवळ येऊ लागताच आप्त आणि मित्रांच्या शुभेच्छानी वाढू लागलेली उत्सुकता…काही दिवसांसाठी बंद रहणार्या घराची व्यवस्था….अशा सगळ्या धामधुमीत केलेले तुम्हा आम्हा सगळ्यांचेच प्रवास खूप छान आठवणी गाठीला बांधतात. निसर्गरम्यतेमुळे मनाला तजेला आणि चिरंतन आन्तरीक समाधान देऊन जात असतात.म्हणून तर प्रत्येक जण अशा प्रवासाची आतुरतेने वाट पहात असतो आणि तेथून आल्यावर त्या क्षणांना इतरांसोबत वाटून पुन्हा पुन्हा तो आनंद उपभोगत असतो. फोटोरुपाने ते क्षण जपत आणि जगत रहातो ; पण काही प्रवास वेगळ्या अर्थी अविस्मरणीय ठरतात….
अशाच एका अविस्मरणीय प्रवासाची अधुरी कहाणी तुम्हाला सांगावीशी वाटली.
तर झालं असं..
चार सहा महिन्यांपूर्वी ‘एवरेस्ट बेस कैंप’ला जायचा बेत ठरला. आमच्या कुटुंबातील आम्ही सहाही जण (तीन भाऊ आणि त्यांच्या पत्नी) या प्रवासाची आपापल्या परीने तयारी करत होतो.आमचे नवरे यात उत्साहाने सामिल झालेले असल्याने आम्ही तिघी जावा प्रवासाच्या आखणीबाबत अगदी निश्चिंत होतो.निदान मी तरी प्रवासाच्या मार्गक्रमणाबाबत अगदीच गाफिल होते. चाळीस तज्ञ आणि सूज्ञ लोकांबरोबर प्रवास करताना ‘आपण केवळ प्रवासाचा आनंद लुटावा ‘अशी माझी साधी सोपी धारणा!!
कमीत कमी संख्येने कपडे आणि खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याच्या सूचनांचे आम्ही पालन करण्याचे ठरवले.19000 फुटांवरचे जग आणि तिथले जगणे पहिल्यांदा अनुभवण्यासाठी आमची तयारी झाली होती.
29 एप्रिलला मुंबईहून आम्ही दोघे आणि इतर तीन जण विमानाने दिल्लीला पोहोचलो.तिथे इतर दहा बारा पुणेकर आम्हाला भेटले.संध्याकाळी चार पर्यंत काठमांडूला पोहोचल्यावर उरलेल्या पंचवीस तीस भारतीय सहप्रवाशांची भेट झाली.चाळीस लोकांच्या या चमूत भारतीयांबरोबर काही अमेरिकन आणि ब्रिटिश प्रवासीही होते.ग्रुपमधील जवळ जवळ सर्व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि पूर्वाश्रमीचे घट्ट मित्र!त्यांच्या साठी हे एक अनोखे कौटुंबिक reunion होते.आम्हीच यामध्ये थोडे नवखे होतो. सगळ्यांशी ओळखी होण्याकरता काही दिवस नक्कीच लागले असते.या चमूमध्ये बरेच प्रवासी पहिल्यांदाच गिर्यारोहणाचा अनुभव घेणार होते.चोवीस वर्षांच्या तरुणांपासून पासष्टीपर्यंतच्या वयोगटातील सगळे या साहसी यात्रेसाठी उत्सुक होते.प्रवासी कंपनीची सगळी मदतनीस माणसे, गाईड्स यानी मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले आणि उद्यापासून सुरु होणार्या प्रवासाबाबत सूचनाही दिल्या. एकंदरीत वातावरणात उत्साह आणि उत्सुकता भरल्याचे जाणवत होते.येत्या काही दिवसात आंघोळीची गोळी घ्यावी लागणार असल्यामुळे मस्त अंघोळ करुन घेतली आणि साद देणार्या हिमशिखरांची स्वप्ने बघत लवकरच झोपी गेलो….
दुसर्या दिवशी बांधून दिलेली न्याहारी सोबत घेऊन 15 जणांच्या गटाला घेऊन जाणार्या लहानश्या विमानाने ‘ लुक्ला ‘ नावाच्या विमानतळी उतरलो.आसमंतातील गारवा, शुद्ध ताजी प्रदुषणरहित हवा मनाला उत्तेजित करत होती.नवीन ओळखी करत, गप्पा टप्पा मारत, हसत खिदळत, रस्त्यात भेटणार्या देशी परदेशी गिर्यारोहकाना ‘नमस्ते’ या शब्दानी अभिवादन करत चाळीस जणांचा आमचा चमू आणि इतर 10 नेपाळी शेर्पा मदतनीस पुढे निघालो.पाइन वृक्षांच्या
हिरवाइने नटलेल्या डोंगररांगा, नागमोडी वळणाच्या कच्च्या पाऊलवाटा , अखंड सोबत करणारा खळखळता नदीप्रवाह, मधूनच दूरदर्शन देणारी हिमशिखरे, सुखद गारवा आणि मस्त उत्साही गप्पा….प्रवासाची सुरुवातच इतकी छान झाली…रोज साधारण पाच सहा तासांचे चालणे अपेक्षित होते. माझ्या आतापर्यंतच्या इतर जुन्या ट्रेकच्या अनुभवावरुन ‘दुपारच्या जेवणानंतर विश्रांती ‘असे गणित माझ्या मनात बसले होते.परंतु या ट्रेकची गणिते थोडी वेगळी आहेत हे हळू हळू लक्षात येऊ लागले.
त्या दिवसाच्या प्रवासाचा टप्पा ‘फाकडिंग’ या गावापर्यंत होता.तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला 7 तास लागले.प्रत्येकाचा वेग, क्षमता, शारिरीक आणि मानसिक तयारी वेगवेगळी! शिवाय 2500 मीटर उंचीवरची विरळ हवा प्रत्येकासाठीच आव्हानात्मक होती.दिवसाअखेरी ,प्रचंड थकल्यानंतर आयता मिळणारा साधा ‘डाळ भात’ही गोड लागत होता.
बिछान्यावर पडताच झोप लागली.
दुसर्या दिवसाची सुरुवात भरपेट न्याहारीने होणे गरजेचे असले तरी ग्रुपमधील अनेकाना म्हणावी तशी भूक नव्हती.पाठीवरच्या सैक मध्ये काही पौष्टिक खाऊ आणि दोन लिटर पाणी घेऊन आमचा प्रवास सुरु झाला.गिर्यारोहणात शारिरीक तयारी इतकीच मानसिक तयारी गरजेची असते,हे जाणवत होते.थकलेल्या शरीराला सोबतचा निसर्ग जोजवत होता.दिवसाअखेरी जडावलेले पाय आणि डोळे साध्याश्या अंथरुणावरही निवांत होत होते.
दर दिवशी जसजसे आम्ही अधिक उंची गाठू लागलो तसतशी परिस्थिती अधिक आव्हानात्मक होत चालल्याचे जाणवू लागले.काहींचे पोट बिघडले,काहींची डोकी जड झाली, काहींची झोप हरवली तर काहीना प्रचंड थकवा जाणवू लागला.चालताना धाप लागणे तर सहाजिकच होते. पण एखाद दोन दिवसात परिस्थिती आटोक्यात येऊ लागली. आम्ही या नवख्या वातावरणाला सरावत होतो. कोणालाही मेडिकल imergency लागली नाही.
रोज सात आठ तासांचे चालणे होत होते.कधी ग्रुपबरोबर आणि बर्याच वेळा एकल असा हा प्रवास होत होता.स्वत:शी गप्पा मारायची, वाद घालायची, समजावणीची, चुचकारायची खूप संधी मिळाली.नव्या लोकांकडे बघून खूप शिकायला मिळाले.प्रतिकूल परिस्थितीमधील स्वत:च्या गरजा आणि क्षमता नव्याने कळल्या.निसर्गाची अपरिमित ताकद तर पावलगणिक जाणवत होती.पंचमहाभुतांनी व्यापलेल्या वातावरणाचा आपणही एक भाग आहोत याची संवेदना होत होती.निसर्गशक्ती धीरगंभीरतेने आम्हा सर्वांच्या अस्तित्वाला साथ करत होती.
एका प्रवासात तर डोले नावाच्या गावी मुकामी पोहोचायचे होते.त्या दिवशी आम्ही 14 तास चाललो.शरीराने प्रवास पूर्ण करण्यासाठी बंड पुकारले.पण डोंगरदर्यात, जंगलात, रात्र दाटत असताना ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यावाचून गत्यंतरच नव्हते.
क्रमशः…
लेखिका : डॉ. सुप्रिया वाकणकर.
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पालकनीती परिवार या एन् जी ओ वर 1996 पासून विश्वस्त.
स्वतःच्या घरी ‘खेळघर’ या, झोपडपट्टीतील मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्पाची सुरुवात.
1998 पासून शिक्षण आणि पालकत्व या क्षेत्रात तज्ञ मार्गदर्शक सल्लागार म्हणून कार्यरत.
मनमंजुषेतून
☆ शोध आनंदाचा…भाग -1 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆
खूप वर्षे झाली…. कधीपासून बरं? आपल्या मनातल्या विचारांबद्दल कळायला लागलं तेव्हापासून हा शोध मनात पिंगा घालतोय.
आपल्याच जगण्याकडे थोडे बाहेरून बघायला लागल्यावर कधी कधी काही उलगडल्यासारखं वाटतं… त्याबद्दल लिहायचं आहे.
कधी छान वाटतं? कशामुळे? कशामुळे रुसतो आनंद आपल्यावर?
आवर्जून प्रयत्न करून मिळवता येतो का आनंद? शोधुयात बरं … असं ठरवलं आणि लिहायला सुरूवात केली.
बहुसंख्य वेळा मन व्यापलेलं असतं कशाने तरी… काय असतं हे ओझं?
काळजी, ताण, भविष्यात करायच्या गोष्टींची आखणी किंवा मनासारखं झालं नाही म्हणून राग, अचानक काही वाईट घडतं त्याचं दुःख, गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून असहायता… अशा अनेक गोष्टींनी व्यापलेलं असतं मन!
त्यात मुळी जागाच उरत नाही आनंदाला!
अच्छा असं होतंय का?
थोडे आणखी खोलात जायला हवे……
काळजी, ताण, राग, दुःख अशा भाव भावनांची वादळे आपल्या मनाचा अवकाश व्यापून रहातात आणि म्हणून आनंदाला जागा रहात नाही शिल्लक! म्हणजे हे तर अडथळे आहेत आनंदाच्या वाटेवरचे. पण असे कसे, आपण माणूस आहोत, भावना तर असणारच. ते संवेदनाक्षम मनाचे लक्षण आहे.
या भावभावना उत्स्फूर्तपणे आपल्याही नकळत मनात उफाळून येतात आणि दंगा घालतात. मला आठवतंय, छोटीशी घटना घडते आणि खूप काही जुनं जुनं वर येतं आणि मन अस्वस्थ होऊन जातं. असं का होतं? खरंच या भाव भावनांना समजून घ्यायला हवं आहे. भावनांचे वादळ जरा शमले, की ते सारे विसरून पुढे जायची घाई असते आपल्याला!
मनाच्या शांत अवस्थेत स्वतःच्या वर्तनाला, भावनांना निरखून पहायला वेळ काढला तर… ?
☆ … माणसाळलेली चाळ … सुश्री नीलिमा जोशी ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆
नेहाशी, फोन वर बोलत होते. “आई, तुम्ही सांगितलं तश्या कापसाच्या गाद्या बनवून घेतल्या हं.”
“बरं केलंत… इतक्या लहान वयात कसली ती पाठदुखी आणि कंबरदुखी.!!”””मी म्हटलं..
इकडचं तिकडचं बोलून मी फोन ठेवला—-
—-आणि त्या कापसाच्या सुतावरून चक्क आमच्या चाळीत पोहोचले .
मला तो खांद्यावर काठी टाकून धनुष्यासारखी दोरी ताणत “एक विशिष्ट टिंग टिंग “आवाज करीत चाळीत शिरणारा लखन आठवला … कापूस पिंजून गाद्या शिवून देणारा. शिवाजी पार्कच्या १३० बिऱ्हाडं असलेल्या चाळीत तो रोज यायचा . एकही दिवस असा नाही जायचा की त्याला काम नाही मिळालं…
.. माझ्या चाळीतल्या आठवणी “चाळवल्या “गेल्या…
कित्ती लोकं यायची सकाळपासून !!!!
आता सोसायटी किंवा कॉम्प्लेक्समधेही सकाळपासून माणसं येत असतात. पण ती “स्विगी” ची, नाही तर “झोमॅटो”ची. नाहीतर “amazon, myntra, etc. ची. कुठल्याही वेळी आणि बिन चेहऱ्याची , अनोळखी माणसं..
खरं तर इमाने इतबारे, कष्टाने इकडची वस्तू तिकडे “पोचवण्याचं ” काम करीत असतात बापडी.
पण मनात “पोहोचू “शकत नाहीत.
याउलट साठ सत्तरच्या दशकात चाळीत बाहेरून येणारी माणसं कधी आपलीशी होऊन मनापर्यंत पोहोचली कळलंच नाही.
सकाळची शाळा असायची. रेडिओ वर मंगल प्रभात सुरू असायचे . त्याच वेळी हातात झांजा आणि चिपळ्या घेतलेल्या “वासुदेवाची ” Entry व्हायची. तेव्हढ्या ” घाईतही त्याला दोन पैसे द्यायला धावायचो ..
रोज नाही यायचा तो. पण त्याच्या विचित्र पोशाखाचं आणि गाण्याचं वेड होतं आम्हाला…
कधी एक गृहस्थ यायचे . भगवी वस्त्र ल्यायलेले. हातात कमंडलू असायचं. तोंडाने “ॐ, भवती भिक्षां देही “असं म्हणत सगळ्या चाळीतून फिरायचे, कोणाच्याही दारात थांबायचे नाहीत की काही मागायचे ही नाहीत.
मी आईला कुतूहलाने विचारायचे, “ ह्यांचाच फोटो असतो का रामरक्षेवर ? “
आठवड्यातून एकदा घट्ट मुट्ट, चकाकत्या काळ्या रंगाची वडारीण यायची . “जात्याला, पाट्याला टाकीय,…”
अशी आरोळी ठोकत . जातं नाही तरी पाटा घरोघरी असायचाच . त्यामुळे दिवसभर तिला काम मिळायचंच .
तिची ती विशिष्ट पद्धतीने नेसलेली साडी.. अंगावर blouse का घालत नाही याचं आमच्या बालमनाला पडलेलं कोडं असायचं. (हल्लीची ती कोल्ड shoulder आणि off shoulder ची फॅशन यांचं चित्र बघून आली की काय?)
हमखास न चुकता रोज येणाऱ्यांमध्ये मिठाची गाडी असायची . “मिठ्ठाची गाडी आली , बारीक मीठ,
दहा पैसे किलो, दहा पैसे “!!!! ही त्याची हाक ऐकली की आम्ही पोरं उगीच त्याच्या गाडीमागून फिरायचो.
तसाच एक तेलवाला यायचा . कावड असायची त्याच्या खांद्यावर . दोन बाजूला दोन मोठ्ठे डबे . एकात खोबरेल तेल एकात गोडं तेल. घाणीवरचं.. तेलाच्या घाणी एवढाच कळकटलेला आणि तेलकट.. ढोपरापर्यंत घट्ट धोतर ., कधीकाळी पांढरं असावं, वर बंडी आणि काळं जॅकेट ..त्याची मूर्ती इतक्या वर्षानंतरपण माझ्या डोळ्यासमोर येते.
अशा तेलवाल्याकडून, पॅकबंद नसलेलं तेल खाऊन अख्खी चाळ पोसली. हायजीनच्या कल्पनाही घुसल्या नव्हत्या डोक्यात.
सकाळची लगबग, गडबड आवरून घरातल्या दारात गृहिणी जरा निवांत गप्पा मारायला बसल्या की हमखास बोवारीण यायची . मुळात कपड्यांची चैन होती कुठे हो. पण त्यातल्यात्यात जुने कपडे देऊन, घासाघिस करून, हुज्जत घालून घेतलेल्या भांड्यावर चाळीतले अनेक संसार सजले होते.
हे सगळं सामूहिक चालायचं हं . जी बोवारणीला कपडे देत असायची तिच्या घरात गंज आहे का, परात आहे का, “लंगडी “आहे का हे तिच्या शेजारणींना माहित असायचं.
अशाच दुपारी कधी कल्हई वाला यायचा. त्याची ती गाडी ढकलत तो फणसाच्या झाडाखाली बस्तान बसवायचा .
त्याचा तो भाता, नवसागराचा विशिष्ट धूर आणि वास..कळकटलेली भांडी, पातेली, कापसाचा बोळा फिरवून चकचकित झालेली पहिली की आम्हाला काहीतरी जादू केल्यासारखं वाटायचं. मग ते भांडं पाण्यात टाकल्यावर येणारा चूर्र आवाज . तो गेल्यावर ते बॉलबेअरिंग्ससारखे छोटेछोटे मातीत पडलेले गोळे गोळा करायचे…
कशातही रमायचो आम्ही.
संध्याकाळी मुलांच्या खेळण्याच्यावेळी कुरमुऱ्याच्या पोत्याएवढाच जाडा– पांढराशुभ्र लेंगा सदरा घातलेला कुरमुरेवाला यायचा . खारे शेंगदाणे, चणे, कुरमुरे हा त्या वेळचा खाऊ …जो घेईल तो एकटा नाही खायचा – वाटून खायचा . चाळीचा संस्कार होता तो.- “sharing is caring ” हे शिकवायला नाही लागलं आम्हाला..
घंटा वाजवत , रंगीबेरंगी सरबताच्या बाटल्यांनी भरलेली बर्फाचा गोळा विकणारी गाडी चाळीच्या गेटसमोर रस्त्यावर उभी राहायची . महिन्यातून एखादेवेळी खायला आम्हाला परवानगी मिळायची . १३० बिऱ्हाडातली कमीत कमी दिडेकशे पोरं तो बर्फाचा गोळा कधी ना कधी खायची, पण कोणी आजारी पडल्याचं मला तरी आठवत नाहीये..
संध्याकाळी सात वाजेपर्यंत पटांगणात धुमाकूळ घालून , गृहपाठ , परवचा, म्हणून गॅलरीमधे कोण आजोबा आज गोष्ट सांगणार म्हणून वाट बघत असायचो .
उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्र झाली की “कुल्फीय..” ओरडत डोक्यावर ओला पंचा गुंडाळलेला मटका घेऊन कुल्फी विकणारा यायचा ..चाळीत तेव्हा तरी कुल्फी खाणं ही चैन होती. नाही परवडायची सहसा . पहिला दुसरा नंबर आला तर क्वचित मिळायची ..
अशी ही बाहेरून येणारी सगळी माणसं “आमची “झाली होती.
शेजाऱ्यापाजाऱ्यांचे नातेवाईकही “आपले “वाटायचे …
या सगळ्यांमुळे एकही पैसा न मोजता आमचा व्यक्तिमत्व विकास होत राहिला.
माझ्या पिढीतल्या लोकांच्या चाळीच्या आठवणी आजही अधूनमधून अशा “चाळवतात” .
पु. लं च्या बटाट्याच्या चाळीने “चाळ संस्कृती “घराघरात “पोहोचवली.
आमच्या चाळीने मात्र ती आमच्या “मनामनात “रुजवली …
लेखिका – सुश्री नीलिमा जोशी
प्रस्तुती – श्री माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
शब्द गोठले. शब्दच तुटले. शब्दातीत आहे सारे. शब्दाविना, शब्दां पलीकडले..
अथांग समुद्राच्या शांत किनाऱ्यावर मुलायम वाळूत, एका झपुर्झा अवस्थेतच मी बसले होते. आणि पलीकडे क्षितिजावर, मावळतीला सूर्याची घागर हळूहळू कुठेतरी अज्ञातात बुडत होती. अथांग आभाळात संध्या रंग उजळले होते. वार्याच्या झोताने मुठीतले वाळूचे कण घरंगळत होते आणि बगळ्यांची माळ आकाशात मुक्तपणे विहरत होती. खरोखरच हे सारं मनावर झिरपत असतानाची ही अवस्था शब्दातीत होती. अव्यक्त होती. शब्दां पलीकडची ती केवळ एक अनुभूती होती.
मातेला मुलाचे मन न सांगताच कळते. त्याची भूक, त्याचा आनंद, त्याचं भावविश्व, त्याचा राग, त्याची व्यथा, त्याचा ताण, तिला न सांगताच कसे कळते? कारण हे वात्सल्याचं नातं शब्दांपलीकडचं असतं.तिथे संवादाची गरजच नसते.
भक्ताचा ईश्वराशी घडणारा संवाद— हा सुद्धा शब्दाविना असतो.तो निर्गुण असतो.अंतराचा अंतराशी झालेला, शब्दांपलीकडे घडलेला एक भावानुभव असतो.
व्यक्त होत नाही ते अव्यक्त. आणि जे अव्यक्त असतं ते शब्दांशिवायच बोलत असतं.
एखादी नजर, एखादा स्पर्श, एखादीच स्मितरेषा, किंवा अर्धोन्मीलित अधर, भावनेचा कितीतरी मोठा आशय, शब्दाविनाच भिडवतो. या शब्दांच्या पलीकडलं हे मौन असाधारण असतं. ती फक्त एक अनुभूती असते. ती अनेक रंगी ही असते. रागाची, लोभाची, प्रेमाची, क्रोधाची, भयाचीही. शब्दांत वर्णन करता येत नसली तरी तिचं अंत: प्रवाहाशी नातं असतं. उमटलेले नुसते तरंग असले, तरी खूप खोलवर परिणाम करणारे असतात.
पन्नास वर्षानंतर, मला माझा बालमित्र अचानक भेटला. सगळा ताठरपणा संपलेला, संथ, वाकलेला, दाट काळ्याभोर केसांच्या जागी काही चंदेरी कलाबूतच फक्त ऊरलेली. मी ही त्याला तशीच दिसले असेल ना? पण धाडकन् , समोरा समोर आल्यावर, डोळ्यातल्या नजरेनं आणि ओठातल्या हास्याने तो पन्नास वर्षाचा काळ आक्रसून गेला. न बोलताच पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणींचा एक मूकपट सहजपणे क्षणात उलगडून गेला.
“कशी आहेस?”
“बरी आहे.”
या पलीकडे शब्द जणू संपूनच गेले.पण त्या भेटीतला आनंद हा केवळ शब्दांच्या पलीकडचा होता.
आमचं नातं आता शब्दांपलीकडे गेलंय असं म्हणताना, त्यांना त्यातला घट्टपणा, अतूट बंध, विश्वासच जाणवतो. शब्दांपलीकडे याचा अर्थ अबोला नव्हे.मौनही. नव्हे तर एक अबोल, मूक समंजसपणा. जाणीव. खोलवर वसलेल्या प्रेमाची ओळख.
तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्हाला निसर्गातले निश:ब्द संवादही ऐकू येतील. पक्ष्यांचं झाडांशी नातं, चंद्राचं रोहिणीशी नातं, धरणीचं पर्जन्याशी नातं, नदीचं सागराशी नातं, सागराचं किनार्याशी नातं, फुलाचं भ्रमराशी नातं, चकोराचं चांदण्याशी नातं, कमळाचं चिखलाशी नातं. शब्द कुठे आहेत? पण नातं आहे ना? हेच ते शब्दांच्या पलीकडचं नातं!
दूर गावी गेलेल्या आपल्या धन्याला, त्याची निरक्षर कारभारीण, एक पत्र लिहिते. आणि जेव्हां तो, ते पत्र उघडून पाहतो, तेव्हा त्यात फक्त एक कोरा कागद असतो. या कोर्या कागदाला सुकलेल्या बकूळ फुलांचा वास असतो. धन्याच्या पापण्या चटकन ओलावतात आणि तो त्या कोऱ्या कागदाचे चुंबन घेतो.
शब्द खोटे असतात. शब्द बेगडी असतात. शब्द पोकळ असतात. शब्द वरवर चे असतात. पण जे शब्दांच्या पलीकडे असतं, ते नितळ पाण्यासारखं, स्वच्छ स्फटिका समान हिरव्या पाना सारखं, ताजं टवटवीत आणि खरं असतं.
म्हणूनच …. शब्दांवाचूनी कळते सारे शब्दांच्या पलीकडले..
सोसायटी मध्ये गॅस ची pipeline टाकण्याचे काम सुरू झाले. खोदण्या साठी आलेले कामगार, आणि बायकापोरे यांचा नुसता कलकलाट सुरू झाला. सर्व बंगल्यांसमोरच मोठे खड्डे खणत होते. आमच्या गल्लीत पण मोठे खड्डे खणायचे काम सुरू झाले.
मी रोज खिडकीतून हे दृश्य बघायची. त्या बायका गड्यांच्या बरोबरीने पहार घेऊन जमीन खणत होत्या.
माती घमेल्यात भरून टाकायची, आणि मग संध्याकाळी ट्रक येऊन ती घेऊन जायचा. कमीतकमी आठ दहा दिवस तर हे काम चालणार होतंच.
दुपार झाली की सगळे लोक झाडाखाली जमत,आणि आणलेली भाजीभाकरी हसत खेळत खात. रोज मी त्यांच्या साठी कळशी भरून पाणी ठेवत असे. संध्याकाळी जाताना लख्ख घासलेली कळशी पायरीवर ठेवलेली असायची.
आमच्या बंगल्या समोर काम करणारी एक मुलगी छोट्या बाळाला घेऊन यायची. ते पोर असेल एक दीड वर्षाचे.
नुकतेच चालायला लागले होते. एका फुटक्या डबड्याला दोरी बांधली होती. ते मूल ते डबडे ओढत सगळीकडे मजेने हिंडायचे.
त्याच्या आईशी माझी हळूहळू ओळख झाली.
“ काय ग नाव बाळाचे? “
“ नवसाचा आहे तो म्हणून मल्हारी हाये आमचा. “ तिने कौतुकाने सांगितले.
“ आणि तुझे ग? “
म्हणाली, “मी हाये रेसमा. मालकांनी हौसेने माझे नाव रेसमा ठेवलंय. “
मला हसूच आले. रेश्मा म्हणता न का येईना, पण नाव भारी होते की नाही?
तर रेसमा काळी सावळी, पण काय सुंदर फिगर होती तिची–बघत राहावे अशी–
आत्ताच्या मुली झक मारतील अशी घाटदार. छान साडी असायची अंगावर. डोक्यात फूल, भरगच्च केस, नाकात मोरणी. आली की साडी बदलून जुने नेसायची. पोराला झाडाखाली जुन्या धडप्यावर निजवायची. तेही पडून खेळत राहायचे. मला मोठी गम्मत वाटायची या कुटुंबाच.
रेसमा चा कामाचा झपाटा बघण्यासारखा होता. मी रोज तिच्या सुट्टीच्या वेळी गेटशी जाऊन गप्पा मारायची.
परदेशातल्या माझ्या मुलींना मी रोज reportingकरायची. डोक्याला हात लावून त्या म्हणायच्या–“ आई,तुझी पण कमाल आहे. दगडालाही बोलायला लावशील ग बाई तू. “ त्यांच्याकडे लक्ष न देता,माझ्या चौकश्या सुरूच असायच्या.
“ रेश्मा, कुठले ग तुम्ही? असलीच कामे करता का ? गावाकडे कोणकोण असतं ? “
ही मंडळी सोलापूर कडची होती .त्यांचा मुकादम,अशी कामे आली, की या लोकांना गावाकडून घेऊन यायचा.
“ रेश्मा,किती ग रोज मिळतो तुम्हाला? “
“ ताई,गड्याला सातशे रोज आणि बाईला सहाशे पडतात रोज.” अभिमानाने रेश्मा सांगत होती. पण हे कायम नसते ना. मग गावाकडे करतो शेती. पण आता शहरच गोड वाटतं बघा.मी सांगतेय मालकाला, आपण पुण्यातच राहूया.
पोराला चांगले शिकवूया. तो नको आपल्या सारखा बिगारी व्हायला. “
पोरगे मोठे निरोगी,गुटगुटीत होते. एक भाकरीचा तुकडा दिला की बसायचे चघळत.
नुकताच माझा नातू आणि मुलगी परदेशातून येऊन गेले होते. नातू त्याची खेळणी इथेच ठेवून गेला होता.
मी त्यातले एक छान सॉफ्ट टॉय शोधले. अगदी गोड कुत्रे होते ते.
दुसऱ्या दिवशी रेश्मा आणि मल्हारी आलेच. मी मल्हारीला ते कुत्रे दिले. आनंदाने त्याचे डोळे इतके चमकले.
त्याने आपल्या आईकडे बघितले. त्याची आई म्हणाली, “ अजून त्याला नीट बोलता येत नाही तर तो मला विचारतोय घेऊ का असे.”
“ घेरे बाळा,तुलाच दिलेय मी. खेळ त्याच्याशी.” मल्हारीला खूप आनंद झाला. ते कुत्रे तो मांडीवर घेऊन बसला.
त्याच्या बोबड्या भाषेत त्याच्याशी बोलू लागला. ते डबडे कुठे टाकून दिले कोणास ठाऊक.
रेश्मा म्हणाली, “ मावशी, तुम्ही ते खेळणे दिलेत ना, माझे काम अगदी हलके झाले बघा. मल्हारी आता एका जागी बसूनच खेळतो. आधी मला भीति वाटायची हा चुकून खड्ड्यात तर नाही ना पडणार.”
रोज रोज ते कुत्रे आणि मल्हारीची जोडी सकाळी यायची.
एक दिवस म्हटले, “ अग रेश्मा, किती ग मळलेय ते कुत्रे. निदान धू तरी स्वच्छ.”
रेश्माने कपाळाला हात लावला. म्हणाली “ अवो मावशी,त्याने दिले तर धुवू ना. चोवीस तास ते बरोबर असतय बघा–
झोपताना,जेवताना. वस्तीतली पोरे लै द्वाड हायेत. त्याला भ्या वाटतं, कोणी चोरलं तर. म्हणून एक मिनिट त्याला दूर करत नाही .मावशी,मल्हारीला कुत्र्याचे नाव विचारा ना.”
“ मल्हारी,काय रे नाव तुझ्या कुत्र्याचे?”
लाजत लाजत बोबडा मल्हारी म्हणाला- “ लघु.”
आम्ही दोघी हसलो. रेश्मा म्हणाली, “ वस्तीत एक कुत्रा आहे रघु, म्हणून याचा पण रघु.”
आता रस्त्याचे काम संपले होते. पाईपलाईन टाकून खड्डे बुजवले सुद्धा. रेश्मा माझा निरोप घ्यायला आली
“ मावशी,लै माया केलीत आमच्यावर.आठवन ठेवा गरीबाची.”
पायावर डोके ठेवून तिने नमस्कार केला. मलाही गहिवरून आले. शंभरची नोट तिच्या हाती ठेवून म्हटले,
“ खाऊ घे मल्हारीला.”
यालाही होऊन गेले 4 महिने. एक दिवस दुपारी बेल वाजली. कोण आहे बघितले तर रेश्मा.माझ्या हातात एक पुडके दिले. “ अग हे काय? हे कशाला?”
“ काही नाहीये हो जास्त. गावाला गेलो होतो ना, तर तुमच्यासाठी आमची शेंगदाणा चटणी आणि मसाला आणलाय बघा. सांगा बर का,आवडते का गरीबाची भेट.”
चहा पिऊन रेश्मा निघून गेली. पण मला विचारात पाडून गेली. —–
किती ही छोटी,गरीब माणसे. सहजच तिच्या बाळाला मी दिलेले खेळणे ती विसरली नाही. आपल्या परीने तिने कृतज्ञता व्यक्त केली.—-
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(त्यानंतर ती भारतात पसरली…. आणि त्याहीनंतर ती भारताच्या बाहेर सुद्धा पसरली…. ) इथून पुढे —-
रिलायन्स ग्रुपचे अंबानी, सौ नीता आणि श्री भावेश यांना भेटावयास महाबळेश्वरमध्ये गेले आणि त्यांनी त्यांना भक्कम हात दिला…
—-रस्त्यावर …..फुटपाथवर दहा मेणबत्त्या विकून स्वतःचं घर चालवणारा लहान भावेश….. आज हजारो अंध बांधवांना घेऊन मेणबत्त्या तयार करून त्या जगातल्या बारा देशांमध्ये विकत आहे…. येणारा पैसा या हजारो अंध बांधवांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी तो खर्च करत आहे….!
एक होती गांधारी…. जिने नवऱ्याच्या प्रेमापोटी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली…. आणि आईने डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून शंभर “कौरव” जन्मले…. !
–एक आहे सौ. नीता, जिने नवऱ्याच्या प्रेमापोटी डोळे उघडे ठेवले आणि तिने शंभरावर “अंध कुटुंबे” जगवली…. !
महाभारतातली गांधारी मोठी ? की आधुनिक युगातली सौ. नीता भावेश भाटिया …. ? माझी बहिण !
नदीतल्या पाण्यात दगड असतात आणि माती सुद्धा ….. दगड फक्त भिजत असतो…. माती पाण्यात विरघळून जाते…. ! नुसतं भिजणं आणि विरघळणं यात खूप फरक असतो…भिजणं म्हणजे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून दुसऱ्याचे विचार मान्य करणं ….. परंतु विरघळणे म्हणजे स्वतःचं कोणतेही अस्तित्व न ठेवता…. जोडीदाराच्या विचारांशी समरस होऊन स्वतःला समर्पित करणे….
श्री भावेश भाटिया यांची पत्नी सौ नीता भावेश भाटिया असो किंवा माझी पत्नी डॉ मनीषा अभिजित सोनवणे असो….
या दोघी अक्षरशः माती झाल्या…. आणि म्हणून आम्ही आमची मुळं या मातीत रुजवू शकलो….
अशा अनेक अज्ञात नीता आणि मनीषा समाजात आहेत…. मी त्यांना प्रणाम करतो…. !
`भीक मागणाऱ्या लोकांचे पुनर्वसन ` या तत्वावर मी आणि मनीषा आम्ही काम करत आहोत ….
पण भावेश भाई हे तत्व स्वतः जगत आहेत आणि आचरणात सुद्धा आणत आहेत…. !
आणि म्हणून तो मला मोठ्या भावापेक्षाही जास्त आहे…. घरात जरी सगळ्यात थोरला मी असलो, तरी समाजामध्ये मी त्याला मोठ्या भावाचं स्थान दिल आहे…. !
पुण्यातील अंध भिक्षेकऱ्यांसाठी असाच एक प्रकल्प आमच्या माध्यमातून पुण्यात सुरु करण्याचं वचन मला भावेश भाईने दिलं आहे…! हा प्रकल्प सुरु झाला तर, पुण्यातील अंध बांधवांच्या आयुष्यात क्रांती घडेल…!
यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्रातील अंध भिक्षेकरी बांधवापर्यंत पोचवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे माझे पुढचे स्वप्न असेल…. यात आपणा सर्वांचे आशीर्वाद हवेत….!
कार्यक्रम झाल्यानंतर भावेशभाई मला हात जोडून म्हणाला, ‘ दादा आपके साथ सेल्फी ले सकता हूँ क्या….? ‘
मोठी माणसं अशीच असतात…. नेहमी दुसऱ्याला आदर देतात…
उलट मी भावेश भाईला म्हणालो, ‘ आप तो मेरे बडे भाई हो…. मैं तो एक गरीब डॉक्टर हूँ ….आपके साथ खडा होने की मेरी औकात नही है ….आप मुझे चरणोमे रख लो… तो मेरी जिंदगी बन जायेगी….! ‘
यावर बसल्याजागी भावेशभाईने मला मिठी मारली आणि शून्यात पहात म्हणाला…., ‘ दादा मै तो आपको देख नही सकता हूँ .. लेकीन नीताको पूछूंगा फोटो मे मेरा छोटा भाई “अभिजीत” दिखता कैसे है….? तू मुझे बता…. ! ‘
मी म्हणालो, “ नीताभाभी को क्या पूछना है दादा … ? मैं खुद आपको बताता हूँ …., ‘ हम दोनो दिखनेमे सेम टू सेम है… दो हात, दो पांव, एक नाक, दो कान…. सब same to same….बस फर्क सिर्फ इतना है…
आसमान सिर्फ आपसे दो गज दूरी पे है…. और मेरी उंचाई आपके घुटनो तक भी नही है ….!
बस फर्क सिर्फ इतना है…हमने हाथ मे मशाल पकडी है…. आप दिल मे लिए घुमते हो….!
बस फर्क सिर्फ इतना है.. इन्सान बनने की नाकाम कोशिश हमारी…. आप ईश्वर से भी बेहतर इन्सान बन गये हो….!
बस फर्क सिर्फ इतना है… हम आँखे लिए अंधे जी रहे है…. आप अंधेरे मे रहकर, दूसरोंको रोशनी दे रहे हो….! “
—– यानंतर काळ्या चष्म्याच्या आडून भर उन्हातही पाऊस कोसळून गेला….!
(१४ मे २०२२, वैशाख शु १३, धर्मवीर संभाजी महाराज जयंती)
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली माणसं…! – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
सप्रेम नमस्कार !
शक्यतोवर मला मिळालेले पुरस्कार, मान-सन्मान या विषयी काहीही लिहिण्याचे मी टाळतो….
स्वतःचं कौतुक स्वतःच काय करायचं? कोणी दुसऱ्याने कौतुकाने ते इतरांना सांगितलं तर भाग वेगळा !
आज मात्र आवर्जून एका पुरस्काराविषयी लिहिणार आहे… कारण त्या निमित्ताने भेटलेल्या
अनेक व्यक्तींचा परिचय मला करून देता येईल, घडलेल्या अनेक बाबी सांगता येतील…..
या महत्त्वाच्या बाबी सांगण्याअगोदर मला मिळालेल्या पुरस्काराचा उल्लेख करणं अपरिहार्य आहे !
१४ मे, धर्मवीर संभाजीराजे महाराज यांची जयंती… !
आदरणीय गुरुवर्य बंडातात्या कराडकर…. एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व !
“व्यसनमुक्त युवक संघ” या नावाची संस्था स्थापन करून हे गुरुजी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून नव्हे, “झिजून” नव्या पिढीमधून एक उत्तम भारतीय नागरिक तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
गुरुजींनी संपूर्ण जावळी तालुका व्यसनमुक्त केला आहे…
आयुष्यात केवळ पाच माणसांना मी व्यसनमुक्त करु शकलो तरी जीवनाचे सार्थक झाले असे मला वाटेल ….तिथे या ऋषितुल्य माणसाने पूर्ण एक तालुका व्यसनमुक्त केला आहे, यावरून त्यांच्या कार्याची स्पष्ट कल्पना येते…. !
—-अत्यंत करारी स्वभाव…. नजरेत जरब …. संवादाची धार तलवारीहून तीक्ष्ण…. कोणाचीही भीडभाड न ठेवणारा हा “खरा माणूस”…. अन्याय झाला तर कोणालाही पायाखाली चिरडण्याची ताकद… पण समाजात कोणी काही चांगलं केलं तर त्याच्यासमोर कमरेत वाकून मुजरा करण्याएवढी नम्रता या माणसात आहे…. !
अशा या सच्च्या माणसाने स्थापन केलेल्या संस्थेकडून… त्यांच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा यावर्षीचा “धर्मवीर श्री संभाजी महाराज पुरस्कार” मला देण्यात आला.
याच सोबत ” श्रीमती राणी लक्ष्मीबाई पुरस्कार “ सौ निता भावेश भाटिया” यांना देण्यात आला.
श्री विवेक राऊत, श्री नवनाथ मालुसरे यांचे आम्ही ऋणी आहोत.
भावेश भाटिया यांना जगात….हो जगात, त्यांना कोणी ओळखत नाही असा माणूस नसेल….
अजूनही जर कोणाला त्यांची ओळख नसेल, तर माझ्या या जगप्रसिद्ध जिवलग मित्राबद्दल थोडक्यात सांगतो….
—-महाबळेश्वर इथं लहानपणी दृष्टी नसलेला भावेश फुटपाथवर बसून मेणबत्त्या तयार करायचा आणि त्या तो विकायचा…. खूपदा भीक मागावी अशी परिस्थिती त्याच्या आयुष्यात निर्माण झाली, परंतू तो परिस्थितीला शरण गेला नाही. आठ आठ दिवस उपाशी राहिला परंतू या स्वाभिमानी माणसाने भीक मागितली नाही…. !
भारतातील एक अब्जाधीश… उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या फॅमिलीला घेऊन महाबळेश्वरला येऊन एक बंगला भाड्याने घेऊन महिना-महिना तिथे मुक्काम करत असत….
अब्जाधीशाच्या या फॅमिलीमधल्या एका चिमुरडीला या लहान भावेशने केलेल्या मेणबत्त्या आवडल्या…. त्याचा तो एकूण गरीब अवतार पाहून…. त्याची अंध अवस्था पाहून, मेणबत्ती खरेदी केल्यानंतर तिने त्याला टीप दिली…
तो तेव्हा म्हणाला होता… “Honoured madam… मी ऋणी आहे आपला ….परंततू मला माझ्या कामाचे पैसे हवेत… भीक नको…. माझ्या डोळ्यात ज्योत नसेल पण हृदयात नक्की आहे….”
ही चिमुरडी भारावली….
मग दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वरला आल्यावर “ती” भावेशला भेटायची….
अनेक वर्ष त्या दोघांमध्ये संवाद झाला आणि सूर जुळले….
अब्जाधीशाच्या त्या मुलीने रस्त्यावरच्या अंध भावेशशी घरच्यांना न जुमानता लग्न केलं….
—-हो हीच ती निता…. !
अब्जाधीशाच्या मुलीने एका भिकारड्या (?) मेणबत्ती विकणाऱ्या पोराशी लग्न केलं….. याचं घरातल्या लोकांना वाईट वाटलं….
या दोघांनीही त्या घरातून काहीही घेतलं नाही….हे दोघं पाच बाय पाच च्या पत्र्याच्या खोलीत राहू लागले….
“दूरदृष्टी” असलेल्या नीताने भावेशला सांगितले, “ तू एकटा किती मेणबत्त्या करशील आणि किती विकशील ? त्यापेक्षा आपण इतर अंध बांधवांना एकत्र करू, तू त्यांनाही मेणबत्त्या करायला शिकव, आपण हा व्यवसाय वाढवू…. आपल्यासोबत त्यांनासुद्धा पैशाची मदत होईल….! “
—ध्येयवेड्या भावेशने सर्व अंधांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवातीला पाच अंध बांधवांकडून मेणबत्त्या करवून घेतल्या…. !
आता भावेशचं घर चांगलं चालू लागलं आणि त्यासोबत इतर पाच अंध बांधवांचं सुद्धा…
त्याने आणखी अंध बांधव एकत्र केले…. गोतावळा वाढत गेला….
—-एक अंध माणूस इतर अंध बांधवांचे पुनर्वसन करत आहे….
बघता बघता ही गोष्ट महाबळेश्वरमध्ये पसरली ….महाबळेश्वरमधून ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली ….. त्यानंतर ती भारतात पसरली…. आणि त्याहीनंतर ती भारताच्या बाहेर सुद्धा पसरली….