☆ पुरुषमाणूस आणि बाईमाणूस… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
ज्या घरात बाई नाही त्या घरातला पुरुष म्हणतो, “घरात कोणी बाईमाणूस नसेल तर घराला घरपण येत नाही!
एखादं अवघड काम नाईलाजाने अंगावर घेतांना, घरातली एकटीच बाई म्हणते, “निपटायचं कसं हो सगळं? घरात कोणी पुरुषमाणूसच नाही ना!
ज्या घरांत नवरा-बायकोचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे त्या घरातलं बाईमाणूस आणि पुरुषमाणूस असं दोघेही म्हणतात की , वर्षातून निदान पंधरा-वीस दिवस तरी कुठे तरी एकटंच जाऊन रहावं!
ज्या घरांत नवरा-बायकोचा संसार तसा गुण्यागोविंदाने चालू नसतो त्या घरातलं पुरुषमाणूस विचार करत असतं की, घरांतलं बाईमाणूस निदान महिन्याभरासाठी माहेरी कां जात नाही?
तर बाईमाणूस विचार करत असतं की, “हल्ली घरातल्या या पुरुषमाणसाला पूर्वीसारखं ऑफिसच्या कामासाठी आठ-दहा दिवससुद्धा बाहेरगांवी कां बरं जायला लागत नाही?
माणूसप्राणी हा असाच आहे. रोजच्या कामांपासून, – अगदी आवडत्या कामांपासून, माणसांपासून सुद्धा – त्याला चार क्षण विरंगुळा हवा असतो. पण अनेकदा तसे क्षण येतच नाहीत. आणि तो चेहेर्यावर न दाखवता मनांतून काहीसा निराशच होतो.
पण आश्चर्याची गोष्ट अशी – घरातला संसार गुण्यागोविंदाने चालू असो किंवा नसो, विरंगुळ्याचे क्षण लाभलेले असोत किंवा नसोत, एक माणूस हरपला की दुसरा माणूस कोसळतो ! बधिर होतो ! भुतासारखा जगतो! खरं तर आता सारे क्षण विरंगुळ्याचे असायला हवेत ! पण तसं होत नाही. आता प्रत्येक क्षण भकास असतो ! माणूस हे खरोखरच न सुटलेलं अवघड कोडं आहे !
अखेर हे माणसांचं जग आहे. प्रत्येक माणूस आपली आपली भूमिका जगत असतो. त्यातून कोणाचीही सुटका नाही!!!
☆ दे डाय रिच…!!— जयंत विद्वांस ☆ श्री विनय माधव गोखले ☆
(नकुशा मालमत्ता )
एकीकडे तरुण पिढी स्थावर मालमत्तांपासून दूर चालली आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ अजूनही स्थावर मालमत्तामध्ये मनाने गुंतून पडलेले आहेत. फक्त स्वत:साठीच राहायला घर नव्हे, तर आपल्या मुलांसाठीसुद्धा घरे ज्येष्ठांनी घेऊन ठेवली आहेत. ज्यांची पुढची पिढी महाराष्ट्राच्याही बाहेर नव्हे तर परराष्ट्रात आहे, अशांसाठीसुद्धा पालकांनी आपल्या आयुष्यातील पै-पै जमवून घरे घेतली आहेत. त्यांच्यापुढील पिढय़ांना या घरांमध्ये काडीचाही रस नाही. या मालमत्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. पुढची पिढी खूप व्यवहारी आहे.
माझे एक अशील वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी वारले. पत्नीचे आधीच निधन झाले होते. एक मुलगा लंडनमध्ये आणि दुसरा न्यूझीलंडमध्ये रहातो. त्यांचे त्या देशाचे राष्ट्रीयत्व आहे. दोघांनाही वडिलांनी घेतलेल्या घरामध्ये स्वारस्य नव्हते. वडिलांनी इच्छापत्रानुसार सर्व मालमत्ता दोन्ही मुलांत समप्रमाणात देण्याचे लिहून ठेवले होते. मी इच्छापत्रानुसार व्यवस्थापक होतो. दोन्ही मुलांना सर्व मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यास, नंतर विकण्यास वेळ नव्हता. दोघांनी माझ्या नावाने कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) बनवून दिले. सर्व मालमत्ता विकून येणारे पैसे विशिष्ट खात्यात जमा करून त्यांच्या देशात पाठवण्यास सांगितले.
ज्येष्ठ नागरिक आपल्या वास्तूंमध्ये भावनात्मकदृष्टय़ा गुंतलेले असतात, तशी तरुण पिढी नसते.
एका क्लाएंटने त्यांच्या निवृत्तीपश्चात राहण्यासाठी कोकणात घर बांधले होते. आई-वडिलांच्या पश्चात त्या मालमत्तेच्या सात/बारा उताऱ्यावर नावे लावण्यास मुलांना वेळ नव्हता. खेडय़ात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांबरोबर कागदपत्रांची पूर्तता करणे कटकटीचे वाटत होते. हे सोपस्कार करून मिळणाऱ्या पशांमध्ये रस नव्हता. कारण त्यांचे उत्पन्न भरपूर होते. म्हणून वडिलांनाच त्यांच्या पश्चात, कोठे आड जागी घर बांधले म्हणून दूषणे देत होते.
आपली पारंपरिक दुसरी गुंतवणूक सोने-नाणे आणि चांदीच्या वस्तूंमध्ये असते. आणि ती सांभाळणे जोखमीचे असल्याने ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली जाते. बँकेत ठेवल्याने त्याचा वापर संपतो आणि लॉकरचे भाडे व लॉकरसाठी द्यावी लागणारी ठेव रक्कम यांनी आपण बँकेला श्रीमंत करत असतो.
आमच्या लहानपणी सोन्याचा भाव अमुक होता. आज तो इतका वाढला, असे आपण म्हणतो. आपण मधली वर्षे मोजत नाही. सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये दीर्घ मुदतीत परतावा फक्त सात टक्के असतो. वस्तू घडणावळ आणि वस्तू मोडताना होणारी घट विचारात घेतल्यास तो अजून कमी होतो. तसेच होणाऱ्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो तो वेगळाच.
सोन्या-चांदीतली गुंतवणूक ही खूपदा भावनात्मक जास्त असते. त्याचा व्यावहारिक विचार केला जात नाही.
मग सोने घेताना शुद्ध सोने घेऊन ठेवण्याऐवजी मुली-सुनांसाठी दागिने किंवा नातवंडांसाठी दागिने या स्वरूपात केली जाते. खूपदा जुन्या पद्धतीचे दागिने नवीन पिढीस आवडत नाहीत. मग ते मोडून नवीन डिझाइनचे बनविले जातात. यात पुन्हा घट आणि घडणावळ जाते.
आज बाजारांत फेरफटका मारल्यास सर्वात जास्त दुकाने मोबाइलची. नंतर सोने-चांदी, कपडेलत्ते, ओषधे, खाण्याचे पदार्थ यांची असतात. त्या तुलनेत वाणसामानाची फार कमी असतात. ज्यात नफा प्रचंड ती दुकाने जास्त. स्वाभाविकपणे त्यात ग्राहकाचा फायदा कमीच होणार.
नवीन पिढी जोखीम नको म्हणून खरे दागिने घालण्यापेक्षा खोटे घालणे पसंत करते. शेवटी खोटे जास्तच चकाकते.
सोन्याची मागणी चीन आणि भारत देशात सर्वात जास्त आहे. इतर देशांत सोने दागिन्यांच्या स्वरूपात फार थोडय़ा प्रमाणात खरेदी केले जाते. गुंतवणूक म्हणून इतर देशांत सोने शुद्ध स्वरूपात बाळगले जाते. बाजारातील सोन्याच्या भावातील चढ उतारानुसार त्याची खरेदी-विक्री केली जाते.
गुंतवणुकीच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. जुन्या योजनांचा परतावा पुढील काळात अजून कमी होण्याची शक्यता आहे. तो वेळीच समजून घ्या व पर्यायी गुंतवणूक योजना निवडणे क्रमप्राप्त ठरेल.
तिसरी भावनात्मक गुंतवणूक मुलांचे उच्चशिक्षण.
मुलांच्या उच्चशिक्षणासाठी आपल्या हौस-मौजेवर काट मारून प्रसंगी कर्ज काढतात. मुलं नोकरीला लागली की ते कर्ज फेडतात. मुलं परदेशात असतील तर हे कर्ज खूपदा आई-वडीलच फेडतात. याच्या पुढे जाऊन काही ज्येष्ठ आपल्या नातवंडांसाठी शिक्षणाची सोय म्हणून आयुर्वमिा पॉलिसी किंवा इतर गुंतवणूक करत असतात.
असेच एका ज्येष्ठ क्लाएंटला गुंतवणूक करताना विचारले,
‘‘काका, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. आता नातवासाठी गुंतवणूक का करता?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस खूप वाढतोय. तेवढीच नातवाच्या शिक्षणासाठी माझी थोडीशी मदत.’’
मी त्यांना म्हटले, ‘‘नातवाच्या शिक्षणासाठी गरज किती रकमेची असेल, याचा अंदाज आहे का? आणि तुमच्या मुलाने नातवाच्या शिक्षणासाठी यापूर्वीच ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू केली आहे. ती रक्कम त्याच्या शिक्षणासाठी भरपूर होईल. नातवाच्या नावाने लाखभर रुपये ठेवण्यापेक्षा तुम्ही दोघे चांगल्या पर्यटनाला जाऊन या.’’
त्यावर ते म्हणाले, ‘‘ही रक्कम नातवाच्या वाढदिवसाची भेट म्हणून आता तरी गुंतवा. नंतरच्या वेळचे नंतर पाहू.’’
आपली मानसिकता कशी आहे– आपल्याला मुलांकडून पैसे घ्यायला- त्यातसुद्धा लग्न झालेल्या मुलीकडून पैसे घ्यायला कमीपणा वाटतो. पण नातवंडांची सोय पाहणे जबाबदारीचे वाटते.
आयुष्यभर मुलांचा विचार केला आणि म्हातारपणी नातवंडांचा विचार करता.
– आपले आयुर्मान वाढते आहे. आपले खर्च वाढते आहेत. याचा विचार करा. कायम दुसऱ्यांचा विचार करण्यात स्वत:ची हौस-मौज विसरू नका. आयुष्य स्वत:साठी जगा.
असे म्हणतात की *भारतीय लोक आयुष्यभर गरिबीत (कष्टांत) राहतात आणि पुढल्या पिढीला श्रीमंत करतात..
—“दे डाय रिच!*
— जयंत विद्वांस
(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)
संग्राहक : विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
झोपाळ्यावर कधी लिहीन असे वाटले नव्हते मला. लहानपणापासूनचा तो जिवलग मित्रच होता आमचा.
माझ्या माहेरी, खूप मोठा, शिसवी लाकडाचा गुळगुळीत मोठा झोपाळा माजघरात होता.
मोठा वाडा होता आमचा. शाळेतून आलो की दप्तर टाकले की बसलोच झोपाळ्यावर.
खाणे तिथेच.पुस्तके वाचणे तिथेच. माझ्या शाळेतल्या मैत्रिणी झोपाळ्यावर बसायलाच माझ्या घरी यायच्या.
माझी आजी फार हौशी. तिने छान गादी करून घेतली होती झोपाळ्याच्या मापाची.
मग तर मी रात्री झोपाळ्यावरच झोपू लागले. पायाने झोका घेत, अशी सुंदर झोप लागायची.
आजी आणि आई, दुपारची कामे झाली की टेकायच्या झोपाळ्यावर. मग त्यांचे दुपारचे निवडणे, टिपणे, शिवणे सगळे काही झोपाळ्यावरच.
माझ्या वडिलांना भारी हौस होती सगळ्या गोष्टींची. त्यांनी झोपाळ्याला चकचकीत पितळी कड्या बसवून घेतल्या होत्या. ते झोका फक्त अगदी हळू,फक्त मागे पुढे करत. आमच्या सारखा जोरात, आढ्याला पाय टेकतील असा झोका त्यांना आवडत नसे. आम्ही काय त्यांना दाद देणार.
ते गेले की चढाओढीने जोरात झोके घेत असूच. आमच्या गल्लीतली सगळी मुलं, मुली आमच्या घरी संध्याकाळी येत.
आमची खूप भांडणेही होत, झोपाळ्यावर बसण्यासाठी. तो बिचारा तरी एका वेळी किती मुलांना बसवणार ना.
मग आजी म्हणायची, ”अरे, भांडू नका– थोड्या थोड्या वेळाने सगळे बसा हं.”
ती भांडणे मिटायचीही लगेच. मग आजी सगळ्यांना छान खाऊ द्यायची.अजूनही मैत्रीण भेटली की विचारते,
“अग तुमचा झोपाळा आहे का ग अजून.काय भांडायचो ना आपण.”
मला आठवते, मराठीच्या पुस्तकातल्या कविता, झोपाळ्यावर बसून,जोरजोरात ओरडून म्हटल्यामुळे लगेच पाठ होत.
माझे मामे भाऊ उल्हास उदय पण, केवळ झोपाळा आवडतो म्हणून आमच्याकडे राहायला येत.
असेच दिवस मजेत जात होते. मी मग मेडिकल कॉलेजला गेले. तिथला अतिशय मोठा, आणि न संपणारा
अभ्यासही मी झोपाळ्यावर बसूनच केला. मला आठवते, दुसऱ्या दिवशी आमची viva असली की रात्र रात्र जागून मी झोपाळ्यावरच वाचत असायची.वडील मला चहा करून देत आणि मायेने म्हणत,” अग झोप जरा. होईल परीक्षा छान तुझी.’ माझ्या पोटात त्या व्हायवा चा मोठा गोळा आलेला असे. आई म्हणायची,”अग मस्त देशील बघ तुझी ओरल।झोप जरा.”
बघता बघता मी डॉक्टर झाले. सासरही माझं फार सुंदर होतं. खूप मोठी टेरेस होती त्या घराला–प्रशस्त ,ऐसपैस.
माझ्या वडिलांनी मला हौसेने, त्या गच्चीत, मोठा झोपाळा बसवून दिला. मला तर ब्रम्हानंद झाला.
माझी तान्ही मुलगी रात्री जागायची.तिला घेऊन मी कितीतरी रात्री झोपाळ्यावर काढल्या आहेत.
तीही त्या संथ लयीत लगेच झोपून जायची.
माझे हॉस्पिटल सुरू झाले. एखादी खूप अवघड प्रसूती करून आले की रात्री अपरात्री सुद्धा मी झोपाळ्यावर बसून चहा घेऊन तो शीण घालवत असे.
माझ्या धाकट्या मुलीलाही असेच झोपळ्याचे वेड होते. शाळेतून आली की मला शोधत ती गच्चीवरच येई.
मग तिच्या लहान विश्वातली सगळी गुपिते, रुसवे-फुगवे, झोपाळ्यावर बसून मला सांगितल्याशिवाय तिला चैन नाही पडायचे. मोठ्या लेकीला नाही फारसा आवडायचा झोपाळा. पण तरी तीही,समोर खुर्ची घेऊन बसायची मी मात्र झोपाळ्यावरच. डॉक्टर नवराही घरी आला की समोर बसून कॉफी पीत, आम्ही इतक्या गप्पा मारत असू की बस. तोच एक निवांत वेळ असे आम्हाला आमच्यासाठी असा.
मग माझ्या बहिणीही यायच्या लाडक्या भाचीशी खेळायला. ताई हॉस्पिटलमध्ये असली तरी भाची आनंदाने लाडक्या मावश्याबरोबर खेळत असे. त्याही तिला घेऊन गाणी म्हणत बसत झोपाळ्यावर.
_दिवस भराभर पुढे गेले.आम्ही गावाबाहेर बंगला बांधला. मी टेरेसवर छान झोपाळा बसवून घेतला.
मुलीही लग्न होऊन परदेशात गेल्या. माझ्या बहिणींचीही लग्ने झाली. सुदैवाने त्यांनाही मोठी घरे मिळाली.
हौसेने प्रत्येकीने आपापल्या घरी झोपाळा बांधलाच.
अजूनही आम्ही एकमेकींकडे गेलो की म्हणतो, झोपाळ्यावर बसूया ग बाई. त्याशिवाय गप्पाना रंगत येत नाही.
माझी झोपाळा वेडी मुलगी अमेरिकेला गेली. त्यांनी स्वतः चे छान मोठे घर बांधले. खूप मोठे बॅकयार्ड आहे तिचे.
तिने खूप छान झोपाळा घेतला तिथे. मी तिकडे गेल्यावर बघितला. मला अतिशय आनंद झाला.
तिची लहान मुलगी आणि मी, तासनतास झोपाळ्यावर बसून गोष्टी ऐकत असू. आजी,गोष्ट सांग ना मला मराठी, असे म्हणत ती मला झोपाळ्यावरच घेऊन जायची. वंशपरंपरा झोपाळ्याचे वेड तिच्यातही उतरलेय.
परवाच मी आमच्या पूर्वी राहत होतो त्या लक्ष्मी रोडवर गेले होते. तिथे मैत्रीण भेटली. म्हणाली ,” आहे का ग अजून तो झोपाळा तुमचा ?”
म्हटले, ” नाही ग हेमा, वडिलांनी वाडा विकला ना आमचा,झाली की ग वीस वर्षे. पण आम्ही मात्र झोपाळा बांधलाच आहे आमच्या घरात. वडिलांचा झोपाळा धाकट्या बहिणीने फार्म हाऊस वर नेला. खूप मोठे फार्म हाऊस आहे तिचे. तिकडे तो रुबाबात अजूनही झुलतोय. आमच्या आई वडिलांची माया आम्हाला देत.”
हेमाच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाली,” निदान तुमच्या झोपाळ्याला भेटायला तरी स्वातीच्या फार्म हाऊसला आलेच पाहिजे.”
आम्ही तिघी बहिणी स्वातीच्या फार्म हाऊसवर आवर्जून जातो.आणि झोपाळ्यावर बसूनच चहा,जेवणही तिथेच घेतो. आमचे अतिशय गोड सज्जन मेहुणे आम्हाला बसल्या जागी चहा कॉफी पुरवतात.
आम्हा बहिणींचे झोपाळा वेड सर्वानाच माहीत आहे आता.
—-झोका घेताना,असा भास होतो की समोर आमचे आईकाका बसलेत आणि त्यांच्या सुखी असलेल्या लेकींकडे कौतुकाने डोळे भरून बघत आहेत.—–
मिरजेतल्या किल्ल्याच्या कमानीतून म्हैशाळ वेसेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अब्दुला चाचाचं लाकडी फळ्यांचं सुबक असं दुकान होतं.दुकानाच्या मागेच त्याची वखारही होती. तिथून जरा पुढच्या वळणाला असणाऱ्या झोपडपट्टीत आम्ही रहायचो.त्याच्या दुकानातून आम्ही कधी कधी वरक्या तर कधी गोळ्या विकत घ्यायचो.वखारीतनं जळण घेऊन जायचो. उंचपूरा,गोरापान आणि देखणा असणारा अब्दुल्ला अजूनही आठवतो.त्याचा लांबलचक सदराही त्याच्यासारखाच असायचा.
त्याची आठवण ईद दिवशी नेहमीच येत राहते. बकरी ईदच्या दिवशी अब्दुलाच्या घरी बकरं कापलं जायचं. त्याची खबर आमच्या झोपडपट्टीत पोहचायची. आम्ही गल्लीतली पोरं भगुलं घेऊन अब्दुल्लाच्या घरी जायचो.अब्दुल्ला मूठ मूठभर मटण प्रत्येकाच्या भगुल्यात द्यायचा. मटण बघून तिथच तोंडाला पाणी सुटायचं.कावळ्या कुत्र्यांना जपत आम्ही असं जिथं तिथं मिळणारं मूठ मूठ मटण घरी घेऊन यायचो.असं मूठ मूठभर मिळालेल्या डल्ल्यांनी झोपडपट्टीतली ईद हरखून जायची.कधी कधी अब्दुल्लाच्या घरातनं शिरकुरमा पण मिळायचा.तो ही आम्ही तांब्यातनं, कुणी भगुल्यातनं घरी न्यायचो.अब्दुला असं प्रत्येकाला भरल्या अंतकरणानं दानत देऊन पाठवायचा.
आमच्या झोपडपट्टीत अशी प्रत्येक सणाला मज्जा असायची. कधी बिर्याणी आणि घट्ट जिगरीचा सुगंध झोपडपट्टीत दरवळत रहायचा. आमच्या झोपडीच्या पुढच लैलाभाभीची झोपडी होती.तिचीही आम्हा भावंडावर विशेष माया होती. नेहमी स्वच्छ व नीटनेटकी राहणारी गव्हाळ रंगाची,सुबक नाकेली आणि सडपातळ असणारी लैलाभाभी.तिच्या कडूनही या दिवसात काय बाय मिळत रहायचं.चोंगे,रोट आणि गुलगुल्यानं; तर कधी मलिद्यानं असं ज्या त्या सणात मिळणाऱ्या पदार्थांनी आमची पोटं गच्च भरायची. डोल्यांच्या दिवसात तडतडणाऱ्या ताशात दंगून जायचो. आमच्या झोपडीच्या पुढेच कत्तलीच्या रात्रीचा खेळ असायचा.अठरापगड जाती धर्मांच्या सणांनी आमची झोपडपट्टी अशी घट्ट बांधली गेली होती. ‘सलाम अलेकुम ‘, ‘रामराम ‘ आणि ‘जयभिम’ च्या वातावरणात लहानपणी वावरताना एकोपा जपलेली माणसं जिथं तिथं मोठ्यामनानं हसतमुखी आणि समाधानी भावनेनं आमच्या झोपडपट्टीत नांदत होती.
…… लहानपणी ईद दिवशी आमच्या झोपडपट्टीतली पोटं भरणाऱ्या अब्दुल्लाची आठवण आजही कधी त्या भागातून जाताना येते.अब्दुल्लाच्या वखारीतनं ढलप्याचं जळण आणि चहासाठी वरक्या घेऊन जातानाचे दिवस आठवत राहतात. अब्दुल्लानं दिलेल्या मूठ मूठभर मटणाची आणि शिरकुरम्याची आठवण येत राहते. आता अब्दुल्ला काय करतो.. कसा दिसतो माहीत नाही. पण उंचपुऱ्या, गोर्यापान आणि देखण्या अशा अब्दुल्लाचा चेहरा मात्र विसरता म्हणता विसरता येत नाही. अशा या माणसातला माणूस म्हणून भावलेल्या- अब्दुल्लाला मनापासून सलाम अलेकुम म्हणत दुवा द्यावासा वाटतो…….!
माझ्या आई-बाबांनी एकमेकांना त्यांच्या नावाने कधीच हाक मारली नाही… निदान आमच्यासमोर, चार चौघात तरी नाहीच.
त्यावेळी यांना एकमेकांजवळ बसून अगदी प्रेमाचं तर सोडाच, पण कधी साधं कुजबुजतांनाही ऐकल्याचं आठवणीत नाही.
बाबा आईसाठी साडी घेऊन येत असत नवी, तेव्हा तिला जवळ बोलावून, प्रेमाने तिच्या हातात ती साडी देणं, हा प्रकार नसे, तर पिशवी टेबलावर ठेऊन बाहेरुनच ओरडून सांगत असत “अगं हे बघ जरा बरंय का?”
आणि आईला ते बरं नाही, तर कायम अप्रतिमच वाटत असे…! बदला बदलीचा प्रश्न कधीच ऊद्भवला नाही.
बाबा आईवर ओरडायचे… चिडायचे… अगदी आमच्यासमोर तिला बोलायचे.
पण आईने चुकून कधी ‘अरे’ ला ‘कारे’ केल्याचं पुसटसही स्मरणात नाही.
तसं करणं चुकीचं आहे, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण त्याकाळातही बाई नोकरी करत असे…
कदाचित घरच्या परिस्थितीमुळेही, असेल, पण…
“मीही कमावते… मीही खुप दमते… मग मीच एकटीने का म्हणून करायची ही राब राब?” हे वाक्य त्या पिढीतील कुठल्याही बाईने, तिच्या नव-याला ऐकवलं नसेल… कधीच.
राग यायचा बाबांचा… एक wicked thought यायचा खुप लहान असतांना मनात की, सुट्टीच्या दिवशी दुपारचं जेऊन मस्त घोरत पडलेल्या बाबांच्या ऊघड्या राहिलेल्या तोंडात भांडंभर पाणी ओतावं नी पळून जावं…
पण हा विचार मी त्या कधीच न घेतलेल्या भांड्यातील पाण्याच्या घोटाबरोबरच गिळत असे.
एक भक्कम अस्तित्व त्यांचं, आम्हा सगळ्यांना निर्धास्त करत असे, यात काडीमात्र शंका नाही.
या माझ्या बाबांना आईच्या आजारपणांत… दोन-एक मोठ्या आँपरेशन्स दरम्यान मी दिवस रात्र तिच्यासाठी झटतांना पाहिलंय… तिच्या उशाशी जागतांना पाहिलय, एखाद्या क्षणी हतबल… हळवं होऊन डोळ्यांची ओली किनार रुमालात लपवतांना पाहिलंय.
गोवंडीला झालेली आईची बदली जीवाचा आटापीटा करुन, महिन्याभराच्या आत विक्रोळीला आणून ठेवल्याचंही पाहिलंय.
माहेराला गिरगावात आलेल्या आईला नी आम्हाला, दिवसाआड आँफिसमधुन येऊन… भेटुन… फक्त डोळ्यांवाटे तीची चौकशी करुन… आधी डोंबिवली नी मग मुलुंडला अपरात्री परततांना पाहिलय.
आताशा आई बाबांवर ओरडते… आणि बाबांची गोगलगाय होते… पण आईचा राग येत नाही… ऊलट मजा वाटते,फिरलेली चक्र पाहून. कारण, मला माहित असतं, की, ‘हे तिचं ओरडणं म्हणजे स्वतःआधी बाबांसाठी जगणं असतं.’
बाबांची औषधं… पथ्य-पाणी ही तीची priority झालीये अगदी स्वतःची, वितभर वरुन बोटभर झालेली खळगी भरण्याही आधीची.
‘बाबांनी कमरेला पट्टा बांधलाय/ नाही बांधलाय,’ याला ती ‘आपण गळ्यात मंगळसुत्र घातलय/ नाही घातलय’, या गोष्टीईतकच महत्व देते.
रात्री झोपतांनाही मंगळसुत्र गळ्यातुन न काढणारी ती, बाबांनी पट्टा काढलाय की नाही हे आवर्जुन बघते.
आमच्या पिढीच्या उघड… उथळ… दिखाऊ प्रेमापेक्षा, ह्या पिढीचा अव्यक्त… अबोल… खोल जिव्हाळा, हे अनाकलनीय सत्य आहे माझ्यासाठी… अगदी निर्विवादपणे.
आयुष्यभर एकमेकांशी चार घटकाभरही निवांत होऊन न बोललेली ही पिढी, एव्हढी घट्ट एकमेकांशी कशी राहू शकते?
एकमेकांना कधी चोरटा स्पर्श ही न करणारी ती पीढी, फक्त डोळ्यांतून साठलेल्या प्रेमावर एव्हढा लांबचा पल्ला एकत्रीत कसा गाठू शकते?? हे मला सतावणारे गहन प्रश्न होते… आहेत… राहतील.
ह्या त्यांच्या अबोल ‘Attachment’ ला खरंच माझं साष्टांग दंडवत आहे 🙏
पत्रकार विकास शहा
दैनिक लोकमत, शिराळा (सांगली)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आत्महत्या करावी वाटते…संजय आवटे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
“आत्महत्या करावी वाटते”, म्हणून एकजण डॉक्टरांकडं गेला. डॉक्टर माझे मित्र. त्यांनी समुपदेशनासाठी त्याला माझ्याकडं पाठवलं.
“आत्महत्या करायचीच आहे”, यावर गडी ठाम होता. त्याला त्याची कारणं होती. ती कारणं अगदी तकलादू नव्हती. जगावंसं वाटू नये, अशी कारणं होती ती. विष्ण्ण, खिन्न करणारी आणि उपाय आवाक्यातही नसणारी अशी कारणं होतीच ती.
मुळात तो तसा बुद्धिमान. विचारी. कलासक्त. पन्नाशीच्या उंबरठ्यावर. पण, अशा वळणावर उभा होता की आता जगाचा निरोप घेणं अधिक सोईचं. आगामी काळ फारच कठीण. इतके सारे गुंते होते आयुष्यात की त्या प्रत्येकावर काम करत बसण्यापेक्षा अलगद जगाचा निरोप घेणं चांगलं. त्याचं लॉजिक काही अगदीच चुकीचं नव्हतं.
आमच्या गप्पा सुरू झाल्या.
यथेच्छ गप्पा ठोकल्या.
दोनेक तास गप्पा झाल्यावर त्याला म्हटलं, “यार. मजा आली. उद्या भेटू.”
त्यावर तो म्हणाला, “अहो, पण मला आत्महत्या करायची होती. म्हणून मी आलो होतो तुमच्याकडे. समुपदेशनासाठी. तुम्ही त्यावर काही बोललाच नाहीत.”
मी म्हटलं, “अरे हो. विसरलोच. बोलू पुढच्या वेळी. घाई कुठं आहे. एक फक्त करा. आपण बोलल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घ्यायचा नाही.”
त्यानंही तसं आश्वासन दिलं.
*
या गोष्टीला काही महिने उलटले.
आज तो मित्र पुन्हा भेटला.
“यार, काय मूर्खासारखा विचार करत होतो मी? आत्महत्या वगैरे…”
तोच हसायला लागला.
मग मनसोक्त गप्पा झाल्या.
*
दरम्यानच्या काळात नेमकं काय घडलं?
माझ्याकडं येऊन तो म्हणाला होता, “मी आत्महत्या करणार म्हणजे करणार.”
मी म्हणालो होतो, “जगावं की मरावं हा ज्याचा-त्याचा निर्णय. माझी विनंती एकच. मला नव्वद दिवस दे. आपण बोलत राहू. त्यानंतर तुला हवं ते कर. तू जगत राहिलास तरी जगात क्रांती होणार नाही आणि मेलास तरी कोणाला काही फरक पडणार नाही. पण एवढी पन्नास वर्षं म्हणजे १८००० दिवस जगलास ना! आणखी नव्वद दिवस मरू नकोस. बाकी आपण बोलू.”
आम्ही नव्वद दिवसांचा कार्यक्रम आखला.
त्याला सांगितलं, “तुझ्या हातात ९० दिवस आहेत. म्हणजे दोन हजार तास. त्यातले हजारेक तर झोपेत आणि बाकी असेच गेले. उरले हजार तास. नाही तरी, मरायचेच आहे. हे हजार तास वापरू ना मस्त.”
सुरूवात आम्ही केली तीच मुळी माथेरानात.
कारण, त्याच्या माथेरानातल्या आठवणी मोठ्या रम्य होत्या!
रम्य माथेरानात आम्ही दोन दिवस राहिलो.
त्याला आवडणारी वाइन. मासे. असं भरपेट खाल्ल्यावर तो झोपी गेला.
दुस-या दिवशी सकाळी सकाळी त्याला घेऊन बाहेर पडलो. हिवाळा होता तेव्हा. धुक्याच्या दुलईत पहुडलेलं माथेरान आणि शांत तळ्याकाठी निःशब्द बसलेलो आम्ही.
‘तुझी लायकी काय, माझी लायकी काय आणि आपल्या सभोवताली जे विसावले आहे, त्याचे मोल काय! किती मिळतंय आपल्याला… आपली लायकी नसतानाही! जोवर तू जिवंत आहेस, तोवर ही सुखं तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत. तेव्हा, यार धमाल करत राहा.”
एवढंच त्याला सांगितलं आणि आनंदानुभव घेऊन आम्ही परत फिरलो.
दुस-या दिवशी त्याच्या सोसायटीचं गेट टुगेदर होतं. सांस्कृतिक कार्यक्रमात त्याला गायचं होतं. पण, दडपण होतं. ‘जमेल का? नाही चांगले गायलो, तर लोक काय म्हणतील?’
“काही का म्हणेनात? आपल्याला कुठं जगायचंय? गेलं उडत जग. गायचं आणि निघायचं. जगायचं त्यांना आहे. आपल्याला निघायचं आहे. आपल्याला काय फरक पडतो? ते हसतील वा खिदळतील. आपल्याला कुठे आहेत त्यांच्या जगण्याचे नियम? आपल्याला तर मरायचंय.”
तो बिन्धास्त मनापासून गायला.
ग्रेट नाही, पण लोकांना चक्क आवडलं. त्यालाही भारी वाटलं.
पुढच्या दिवशी त्याला घेऊन गेलो, ते अशा घरात.
जिथं कोरोनामुळं घराची पार वाताहात झालेली.
बाप मेला. आई मेली. तीन कच्चीबच्ची उरली.
आणि, एक म्हातारी.
त्यांना जेवण घेऊन गेलो.
ती पोरं याला बिलगली.
यानं मग त्यांना गोष्टी सांगितल्या. शाळेतल्या कविता म्हणाला. एका सामाजिक संस्थेनं या मुलांची जबाबदारी घेतलेली. हा म्हणाला, “माझी सगळी इस्टेट यांच्या नावानं करतो.”
म्हटलं, “इस्टेट सोड. तू त्यांना वेळ दे. प्रेम दे. ही तीन आयुष्यं उभी राहातील.”
दुस-या दिवशी त्याला फोन केला.
तर, काही शेड्यूल ठरण्याच्या आधीच हा त्या गोतावळ्यात जाऊन रमलेला.
आता मला तो शेड्यूल सांगू लागला.
“अरे, हिला पुस्तकं आणायचीत. त्याला कॅडबरी आवडते. मधली जी आहे ना, ती अप्रतिम चित्रं काढते. तिला रंगपेटी आणायचीय. म्हातारीचे पाय दुखताहेत. मी गुगलवर सर्च केलं. ते अमुक तेल चांगलं आहे. तुला काय वाटतं?”
दिवस असेच गेले.
त्याला मी सांगितलं-
“नव्वद दिवस होऊन गेले. आता, हवं तर तू मरू शकतोस.”
तो म्हणाला,
“मूर्ख आहेस का तू? त्या पोरांना आणि म्हातारीला घेऊन मला माथेरानला जायचंय.”
मी म्हटलं, “साला तू काही मरत नाहीस!”
तर म्हणतो कसा –
“मरायला आयुष्य पडलंय. थोडं जगू तर दे. “
– संजय आवटे
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈