श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “खुश रहे तू सदा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… आज अचानक सुमीची गाठ पडली. काॅलेज रोड वरून चालत निघालेली… सोबत तिचा कुंकवाचा टिळा नामक टिक्कोजी राव होता तिच्या संरक्षणाची ढाल बनून असल्यासारखा… दोन वर्षापूर्वी सुमी नि मी एकाच आर्टस काॅलेजातले, मराठी विषय एम. ए. च्या वर्गातले… हाताच्या बोटावर मोजता येणारी वर्गातली ती एकूणच पटसंख्या असलेला तो वर्ग त्यात आम्ही मुलं जेमतेम दोन तीन आणि मुलींचाच भरणा जास्त… अर्थात आम्हा मुलांना चाॅईस भरपूर होता… आमचे मुलांचे आप आपल्या परीने गनिमी काव्याने किल्ले लढवणे सुरू होतेच.. शेवटचे सत्र संपायच्या आत बात पक्की करने के आरमान काफ़ी बुलंद थे.. पण आमच्या तिघां पैकी एकच लकी बाॅय ठरला आणि आम्ही रडवैय्या भारतभूषण चे वारसदार झालो.. प्रियाराधन मनापासून करूनही सुमीने मला नाक मुरडले… आता दैवजात मिळालेली काटकुळी, गहूवर्णीय शरीरसंपदा नि बावळट चेहरा याने माझ्या भावी सुख स्वप्नांचा चुराडा केला होता… एकटी सुमीच काय पण तिच्या अवतीभवती असणाऱ्या साळकाया माळकाया, स्वतःला सो कॉल्ड रुप सुंदरीचं आभासी नि अहंकारी कवचाचे लेपन केलंल असल्याने त्यांनी देखील मला डावललं.. मलाही त्यांच्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हताच म्हणा… पण सुमी नाहीच म्हणाली तर तिच्या नाकावर टिच्चून तीचीच मैत्रीण गटवली तर बरी हा सर्व सामान्य विचार मनात केला.. पण तिथेही माशी शिंकलीच… या अक्करमाशी माझ्याच नशीबाला होत्या… तर एकूणातच काय गळाला एकही मासोळी त्यावेळी लागली नाही ती नाहीच… पण मला फक्त सुमीचं त्यातल्या त्यात बरी वाटायची, आवडली होती.. एक कदम तुम भी चलो एक कदम हम भी चलो या बोधवचनाच्या आधारे मीच पुढाकार घेण्याचे ठरवले… तो दिवस मी या आयुष्यात कधीच विसरणार नाही… त्या काळ्यादिवशी सगळे निचीचे ग्रह, व्यतिपात, आणि अनिष्ट फल देणारा माझ्या भाग्यात न भुतो न भविष्यती आला असल्याने.. माझ्या पहिल्या प्रेम व्यक्त करण्याच्या प्रयत्नाला सुमीने अणूबाॅम्म लावून उध्वस्त करून टाकला.. मला चक्क ‘ एकदा आरशात स्वताचं थोबाड बघून ये ‘ असं ती म्हणाली.. ‘आणि पुन्हा जर मागे लागलास तर हेच तुझं थोबाड असं रंगवीन कि कायमची सुमीची आठवण राहील तुझ्या आयुष्यात.. ‘ माझा कोणी कडलोट करेल किंवा हत्तीच्या पायी देईल, फासावर लटकवेल, चालत्या वाहनाखाली,.. निदान बाजारात मिळाणारी जहरची बाटलीने वा या सगळ्या प्रयत्नांपैकी कशाची एकाने मदत केली असती तर बरं झालं असतं.. हा सुमीच्या जीवनातील काटा आपोआप दूर करायला हातभार लागला असता.. या विचारचक्रात माझा कालपव्यय मात्र झाला पण अमंलबजावणी झालीच नाही… सुमीला हत्येचं पाप लागलं नाही… सुमी पुण्यवान, नशीबवान असल्यामुळे लवकरच तिचं पाणीग्रहण कोणी गबाळग्रंथी आयुर्वेदाचार्यशी झालेलं मला उडत उडत समजले… अर्थात मला काही तिने लग्नाला येण्याचं निमंत्रणही हेतूपुरस्सर टाळले होतेच… पण अश्या बातम्या कुठे लपून राहतात.. माझ्या मित्रांची चांडाळचौकडीने तर या संधीचा फायदा साधून माझ्या घायाळ हृदयाची दुखरी जखम जास्त चिघळत ठेवायला आपल्या मैत्रीला जागले… दोस्त दोस्त न रहे प्यार, प्यार न रहा… सुमीच्या त्या साळकाया माळकाया मैत्रीणी पण हुळहुळणाऱ्या जखमेवर मीठ चोळायचा आसुरी आनंदच घेत राहिल्या… आणि मी माझ्या दुभंगलेल्या मनाची नि टुटा फुटा दिल की तू नही तो और सही या समजूतीची मलमपट्टी करत राहीलो… आणि ती और सही च्या शोधात फिरत असताना अचानक सुमी नि तिचा नवरा माझ्या समोरच आलेले दिसले… माझी नि सुमीची नजरानजर झाली… तिचे ते पाण्याने तरारले बोलके डोळे… तीच्या मनातली मला अव्हेरून काय पदरात पडले, या पश्चातापाची अबोल भावना प्रकट करून दाखवत असलेले मला दिसले.. तिची ती केविलवाणी चर्या मला खुप काही सांगून गेली. माझ्या मनात आनंदाची लहर उमटून गेली… मला आरश्यात थोबाड पाहायला लावणारीने असा कोणता जगावेगळा झेंडा लावलाय हे त्या तिच्या सोबत असलेल्या ढेरपोट्या, बेढब आणि डोळ्यावर निळा चष्मा लावून सुमी सोबत निघालेला मला दिसत होता.. सुमीशी केलेलं लग्न हि त्याला लागलेली लाॅटरीच होती… मला त्याच्या भाग्याचा हेवा आणि सुमीच्या नशीबाची किव वाटली… काय पाहिलत त्याच्यात तिने कि जे माझ्याकडं नव्हतं… पण अनहोनी कौन टाल सकता है… चिडीया खेत चुग गई थी… मग मीच मोठं मन करून स्वताशीच गुणगुणत राहिलो.. खुश रहे तू सदा.. ये दुवा है मेरी… सुमीचा तो ढेरपोट्या गबाळग्रंथी नवरा सुमीच्या कानात काहीतरी बोलला.. मला ते ऐकू आलं नाही… पण त्याच्या एकूणच चर्चेवरून मी ताडलं कि.. ‘ तो समोरचा लफंगा बघ कसा प्रेमभंग झाल्यासारखा उध्वस्त झालेला दिसतोय आणि रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या बायका मुलींकडे हसत हसत बघतोय… तो तुझ्याकडे ही तसंच बघतोय… जशी काही तू त्याची पहिली प्रेयसीच असावी.. बघ बघ त्याचं ते केविलवाणं हसणं बघ.. ‘
त्याचं तसलं बोलणं ऐकून सुमी चमकली… आणि नरमाईच्या सुरात… ‘ एकदा अपयश आलं म्हणून थांबत का कोणी!… लवकरच लग्न का करू नये. ?’.. असं मला ऐकू जाईल अश्या आवाजात जाता जाता बोलून गेली. समझनेवाले को इशारा काफ़ी है… सुमी पुढे निघून गेली… कुठूनशी यहूदी सिनेमातले गाण्याची लकेर…. ‘. दिलको तेरी हि तमन्ना… दिलको है तुझसेही प्यार…. ‘ माझ्या कानावर आली… आणि मी तसाच तिथे रेंगाळत राहिलो… सुमीच्या ढेरपोट्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेले हासू नि सुमीच्या डोळ्यात लपलेले आसू माझ्या मनाला दंश करत राहीले.
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈