श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ एक कटिंग चाय… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… सन 1957चं राजकमल स्टुडिओत गुरूदत्तचं प्यासा चित्रपटातलं… ‘सर तेरा जो चकराये, या दिल डूबा जाये… आजा प्यारे पास हमारे.. काहे घबराए, काहे घबराए… गाण्याचं शुटींगची तयारी होत असताना त्या गाण्यासाठी एक डोक्याला टक्कल असलेल्या माणसाची गरज भासली… शुटींगचं सगळं युनीट त्याचा शोध घेण्यास सरसावलं… अख्खा स्टुडिओ पिंजून काढला पण हवा तसा नैसर्गिक टक्कलाचा माणूस मिळेना… त्या वेळेस एक्स्ट्रा सप्लायर्स टूम नसल्याने शुटींगचं बराच वेळ खोळंबून राहिलं… गुरुदत्त नां तो माणूस त्या गाण्यात हवाच होता… तो मिळे पर्यंत त्यांच्या जिवाला चैन नव्हती… जाॅनी वाॅकर आणि गुरूदत्त फ्लोवर बसून एक कटिंग चहाचे प्याले घोट घोटाने घेतं… पहिला दुसरा, तिसरा रिचवत राहिले.. स्पाॅट बाॅय, चायवाला, गाडीचे ड्रायव्हर यांना सुध्दा राजकमल स्टुडिओच्या बाहेर पिटाळणयात आलं… ‘और जो ऐसे शख्स से धुंड के लायेगा उसे बडा इनाम मिलेगा’ असही सांगण्यात आलं… सगळेच झटून कामाला लागले… आणि आणि तासाभरातच आत्माराम गावकर नावाचा टक्कल असलेला माणूस कुणा सोबत तिथे आणला गेला… लगेचच एक चाय का प्याला त्यांच्या आणि ज्यांनी त्यांना आणलं त्यांना स्वता गुरूदत्त नि जाॅनी वाॅकर यांनी दिला… चहा पान झालं.. . कायं करायचं याची कल्पना गावकरांना दिली… एकदा दोनदा रिहर्सल्स झाली… शुटींग सुरू झाले, लाईट , कॅमेरा, साऊंड ऑन आता अक्शन म्हटले… एव्हढ्या त्या प्रचंड गोंधळात आत्माराम घाबरून गेले… काय करायचं कसं करायचं हे त्यांना सुचेना… आपलं हे काम नव्हे आपण आताच येथून बाहेर गेलेलं बरं म्हणून पळ काढावा.. असं त्यांच्यात मनात आलं आणि तिथून ते बाहेर पडले.. पुन्हा शुटींग थांबवलं… गुरूदत्त नि जाॅनी वाॅकर नी त्यांना धीर दिला..एक कटिंग चहा दिला… घाबरून जाऊ नका काहीही होणार नाही… फक्त मी तुम्हांला बसवून मालिश करणार आहे ते तुम्ही करून घायचं ईतकचं… गाणं संपले कि झालं… फिरून गावकरा़ंची मानसिक तयारी झाली…लाईट कॅमेरा.. ॲक्शन पुन्हा तेच घडलं… मग परत परत तसचं घडत गेलं… दरवेळेला कटिंग चहा दिला जायचा.. तरतरी यायची भीती कमी झाली असं वाटायचं … असे बरेच टेक झाले शेवटी निदान एका कडव्या पुरता का होईना पण शाॅट घेण्याचा ठरला आणि तोही त्यांच्या नकळत… थोडे लाईट अंधूक लावले गेले… आता गावकरांनी पण मनाचा हिय्या केला… आता हिथं न थांबता ताबडतोब बाहेर निघून जायचं… जाॅनी वाॅकरनीं गाण्यात त्यांच्या हाताला धरलं होतं तो हात सोडून तिथून धावतच ते निघाले… ते आपल्या घराकडे येईपर्यंत मागेसुद्धा जरा वळून न बघता… घरात येताच त्यांची बायकोने विचारले, “खयं गेला व्हतास? चाय कधीची करून वाट बघत रव्हली मी…”
“आनं तो चाय हडे नि ओत तो माज्या टकलावर.. ” गावकर चिडले… आज त्यांना एक कटिंग चाय आपली पाठ सोडत नाही हेच समजले…
… प्यासा थेटरला लागला गावकरांनी बायको सोबत पाहिला… विषेश ते गाणं बघून दोघांना आनंद वाटला…
सिनेमा संपला नि सौ. गावकर म्हणाल्या “गाणं संपे पर्यंत तरी फुकटची तेल मालिश तरी करुन घ्यायची व्हती… निदान शेवटाक बिदागी तरी मिळाली असती… हया कामाचे तुमका काय मिळाला?”
“एक कटिंग चाय…” गावकर कसनुसं तोंड करत म्हणाले…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470.
ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈