नशीब म्हणायचं की, डोळ्यासमोर स्वतःसाठी वृद्धाश्रम दिसायला लागल्या नंतर तरी आपल्याला संस्कृतीची आठवण झाली. आणि युवा पिढीला संस्कार नाहीत संस्कृती पासून दुरावत चालली हे म्हणणे कितपत बरोबर आहे. कारण संस्कार आणि संस्कृती पुस्तके वाचून शिकायची नव्हे तर आचरणातून घडवायची बाब आहे. मुलं जे पाहातं तेच शिकत असतं.
मुलांना नावं ठेवणाऱ्या पालकांना माझा साधा प्रश्न आहे.. किती आईवडील संध्याकाळी आपल्या मुलांना घेऊन शुभंकरोती म्हणतात? बोधकथा सांगतात, मुलांसमोर आई वडील सासू सासरे इतर मोठी माणसं यांचा मान ठेवतात. निःस्वार्थ शेजार धर्म पाळतात, किती गरजू लोकांना मदत करतात हाहीप्रश्नच आहे.
शिवाय मुलांना फास्ट फूड,कोल्ड्रिंक्स, पिझ्झा बर्गरची, सवय कुणी लावली?
किती जणांच्या घरी आज घरी बनवलेले लोणचे, पापड, कुरडई, साखर आंबा, आवळ्याचा मुरंबा, तिळाची, पोळी गुळाची, पोळी, तीळ / शेंगदाण्याचे लाडू असे पदार्थ बनवलेले असतात ? जे आपण लहानपणी भरपेट खाल्ले,….
अनेक माता आज मुलांना डब्यात चक्क मॕगी करून देतात. काहीजण मुरमुरे तेलमीठ लावून तर काहीजणी चक्क दहा रूपये देऊन मुलांना कुरकुरे,चक्के पे चक्का घ्यायला सांगतात. मग त्या पैशात मुलांनी नेमकं काय केलं हे पाहायची सुद्धा तसदी घेत नाहीत. … मी मुलांना डब्यात पोळी भाजीची सक्ती केली तेव्हा घरी बसणाऱ्या एका माऊलीने चक्क एक रूपयाची लोणच्याची पुडी आणि एक पोळी देऊन पाठवलं. रोज पोहे चालणार नाहीत असा निरोप दिल्या नंतर मला तीनचार डबे द्यावे लागतात “मह्यानं व्हतं नाही” असं उत्तर दिलं. आम्ही काही देऊ मॕडमला काय करायचं अशी आपलीच भावना असते, आणि मग यातूनच जो रोज नवनवीन फास्ट फूड आणणार तोच श्रेष्ठ आदर्श बनतो ते पाहून बाकीचे घरी हट्ट करून तेच आणतात. दिलेल्या दहा रूपयातून चौथी पर्यंतचा मुलगा पाच रूपयाची माजाची किंवा थम्सअपची बॉटल विकत घेतो, यात जर आई वडीलांना काही वावगे वाटत नसेल, तर बारावीत त्याने ड्रिंक्स घेतले तर त्यात नवल ते काय !
एखाद्या वेळी सर मॕमनी मारलं, की दंड थोपटून आपणच भांडायला तयार. …..! आम्हाला वेळ नाही आणि शाळेतल्यांना काय करायचं……. यातूनच शिक्षक फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढेच आपले काम समजतात. . ….बाकी अभ्यासाचं गुत्ते ट्युशनचे . ….. आणि मग आम्ही झालो आदर्श पालक! हे झालं श्रीमंती थाटाचे लक्षण.
याशिवाय गरीबांनाही मुलं इंग्रजी शाळेतच हवे असतात. तिथं मुलं काय शिकतात हे यांना कळत नाही, हे मुलांना कळायला फार वेळ लागत नाही. मग मुलं श्रीमंत मुलांची बरोबरी करण्याच्या नादात अनेक भलेबुरे मार्ग अवलंबतात. शिवाय गरीब असो की श्रीमंत आई वडीलां पेक्षा आपणच हुशार आहोत ते बिन डोकं असा समज झाल्यानंतर सुरूवातीला ते आईला तुला काही कळत नाही म्हणतात, त्यात काही वावगं आहे असं कोणालाही वाटत नाही मग हळूहळू वडीलांचा नंबर , मग अशा आई वडीलांच काही ऐकण्याचा प्रश्न येतोच कुठे? अशी मुलांची हळूहळू मानसिकता बनते आणि यातूनच मुलं उद्धट, उद्दाम होतात. पुढे नकळतच मोकाट होतात यात शंकाच नाही.
आजी आजोबा शिवाय घर असण्याची ही तिसरी पिढी आहे खरंतर. ..परंतु आपण एवढे दिवस आई बाबा आणि मुलं या चौकोनी घरात खुश होतो. पण आता आपलाच पत्ता काटला जात आहे याचं टेन्शन आल्या मुळे मुलं संस्कार आणि संस्कृती पासून दूरावत असल्याची जाणीव आपल्याला व्हावी ही खेदाची बाब आहे
आदरनिय बाबा आमटे यांची सलग तिसरी पिढी त्यांचे कार्य अविरत पुढे चालवत असेल. … आणि तेही आपल्या मते आजच्या रसातळाला पोहचू पाहणाऱ्या संस्कृतीत……! तर कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच गरज आहे. यासाठी प्रबोधन हवेच असेल तर अगोदर प्रौढांचे करण्याची गरज आहे, कारण हे संस्काराचे बीज त्यांच्याच आदर्शातून उगवलेले आहे असं माझं स्पष्ट मत आहे.
कारण सकाळच्या वेळी सुंदर भजन लावून ठेवायला, देव पूजा करायला,एक टिकला गंध लावायला, घरातील मोठ्यांच्या पाया पडायला, घरी आलेल्यांची अस्थेने चौकशी करायला, घरी आणलेली नवीन वस्तू शेजारी किंवा निदान कामवालीला तरी घासभर द्यायला,फारसा वेळ किंवा पैसा लागत नाही. परंतु याची आपल्याला गरजच वाटत नसेल तर मुलांच्या नावाने ओरडण्यात काय अर्थ आहे.
दिवसभर व्यस्त आहात ठीक आहे पण निदान रात्रीचे जेवण सर्वांनी मिळून टीव्ही लावून न करता आपल्या लहानपणी करत असू तसं गप्पा गोष्टीत करायला काय हरकत. तोही वेळ आपण मुलांसाठी देत नसू तर मुलांना सांभाळणारी आया किंवा गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड जवळचे वाटले तर त्यात नवल काय?
थोडं आपलं लहानपण आठवून पाहा अशा कितीतरी गोष्टी असायच्या ज्या पळत येऊन ताई- दादा, आई- बाबा,आजी- आजोबांना सांगायच्या असायच्या आणि त्या बदल्यात ढीगभर प्रेम किंवा तोंडभर खाऊ घेऊन आपण नाचत पळायचो. दंगामस्ती करायला घरचं काय अख्खी गल्ली सुध्दा कमी पडायची.. … चिखल,माती, दगड, वाळू, पाऊस कशाचीही तमा नसायची. ओलसर मातीचे किंवा वाळूचे खोपे बणवण्यात तासन् तास गुंग असायचे आणि मोठेही कौतुकानं पाहायचे तोंडभर कौतुक करायचे…. मूठभर मास चढायचं…..
नुसतं पास झालो कळालं तरी पेढ्यांचा पुडा घेऊन गल्लीभर वाटायचो. ….जसं काही एव्हरेस्ट सर केले एवढा आनंद असायचा. सागळ्यांच्या कौतुकानं छाती फुगून यायची. .. केवढा!! आत्मविश्वास वाढलेला असायचा. आज मुलं घाबरतात. ….स्वच्छ आई बाबांना…! मुलांना शी घाण च्या नावावर माती, पाणी, पाऊस, वाळूपासूनच नव्हे तर स्वच्छंदपणा पासूनच तोडलं आहे आपण, घरात घाण नको,पसारा नको, मोठ्याने आवाज नको, घरी कुणी,सोबती नको बाहेरची मुलं घरात नको. ….
मग. …..पुस्तकात,नजर चुकवून मोबाईल किंवा टीव्हीला डोळे लावून बसतात. …. बऱ्याच माऊली सुद्धा मुलगा शांत बसतो म्हणून मोबाईल हाती देऊन धन्यतेचा अनुभव घेत असतात.
मुलांना 80%,90% मार्क्स मिळाले तरी कुणाला तरी 95% मिळाल्यामुळे कमीपणाची भावना आणि पालकांची भिती वाटत असते. मुलं म्हणजे काय मशीन आहेत का? आणि सगळ्यांनाच 99% टक्के कसे पडतील सगळेच डॉक्टर झाले तर कसं चालेल हो…. अन् क्लासवन अॉफिसर सोडले तर बाकी लोक जगतात ते काय जीवन नसतं. ….! नंबर वनच्या नादात आपण आपलं जीवन हरवून बसतं आहोत हेच मुळी आपल्याला समजेनासे झाले आहे. मुलांशी मुक्त संवाद नाही त्यांच्या आवडी, निवडीचा विचार नाही, अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलं चक्क गुदमरून जाऊन टोकाची पाऊले उचलतात. मग ती आत्महत्या असो की व्यसनाधिनता……!
नातेवाईकांचे येणे जाणे नाही कुणी आलं गेलं तरीसुद्धा हातचं राखून. …..! प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट पैशात मोजून, तुसडेपणाणे आपले वागणे….
मुल जेव्हा मावस चुलत आत्ते भावंडे जमतात तेव्हा हिशोब करतात त्यांच्यापासून वस्तू लपवून ठेवतात त्यांना नीट बोलत नाहीत ते कधी जातील याची वाट पहातात तेव्हा आपल्याला मजा आणि त्यांच्या हुशारीचं कौतुक सुद्धा वाटतं, परंतु हीच मुलं जेव्हा आपल्या बाबतीत हिशोब लावतात तेव्हा आपल्याला संस्कृतीचा ऱ्हास जाणवायला लागतो. परंतु ही संकुचित वृत्ती निर्माण कोणी केली याचा विसर आपल्याला पडलेला आसतो. पेराल तेच उगवते हाच जगाचा नियम आहे हेच सत्य आहे. याचं भान प्रत्येकाला असायलाच हवं.आणि तरीदेखील संस्कार /संस्कृती ऱ्हासाचं खापर आपण त्यांच्याच माथी फोडत असू तर हा चक्क कृतघ्नपणा ठरेल.
अर्थातच हे मत माझें आहे आणि याला अनेक अपवाद सुद्धा असू शकतात. परंतु बहुतांशी हेच चित्र सत्य आहे.
© रंजना मधुकर लसणे