मराठी साहित्य – मराठी आलेख – *एकांतातला आरसेमहाल* – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

एकांतातला आरसेमहाल

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का आलेख  एकांतातला आरसेमहाल)

एकांत किती हवाहवासा वाटतो . आपलाच आपल्याशी संवाद  साधायला, अंतर्मनात डोकावून बघायला, त्रयस्थासारखं स्वत:कडे निरखून बघायला , प्रत्येक कोनातून स्वत:ला न्याहाळायला !

ह्या एकांताचं आणि स्वमग्न मनाचं अगदी गाढ नातं आहे. एकांताच्या रूपात अवतरलेला आरसेमहाल आणि स्वमग्न मनाच्या प्रतिबिंबीत झालेल्या असंख्य छबी ..मोठं विलोभनीय दृष्य असतं ते. प्रत्येकच छबी स्वत:चं असं खास रुप घेऊन आलेली. कधी ती मैत्रिणींबरोबर भातुकलीत रमलेली असते, तर कधी अंगणातल्या ठिक्करबिल्ल्याच्या खेळात रमलेली, तर कधी शाळेच्या बाकावर बसून कवितेच्या जगात रममाण झालेली , तर कधी टारझनबरोबर आफ्रिकेच्या दाट जंगलात हरवलेली तर कधी श्रावणात झाडाला बांधलेल्या झोक्यावर बसून आकाशाशी स्पर्धा करत ऊंच ऊंच झोके घेणारी !

मध्येच एखादी छबी डोकावते डोळ्यात भरारीचं स्वप्न जागवणारी, तिचं तिचं आकाश शोधणारी, शोधलेल्या आकाशात जोडीदाराला सामावून घेणारी आणि नव्या जोमाने जणू इंद्रधनूच्या शोधात निघालेली ही छबी फारच लोभस भासते. तिच्या डोळ्यातील चमक बरंच काही बोलून जाते. तिच्या चेहऱ्यावरचे तृप्त भाव सुखाचा मूलमंत्रच जणू सांगू बघतात ..

 

आणि …अचानकच तिच्या अवती भवती वेगवेगळे भेसूर चेहरे डोकवायला लागतात …नको असलेले क्षण आणि त्यांनी व्यापलेले ठाण मांडून बसलेले त्या त्या घेरलेल्या क्षणांचे भेसूर चेहरे ..कितीही ठरवलं तरी ढवळून निघालेल्या तळातून सारं बाहेर येणारच ना ..आरसेमहालच तो, येणारी छबी लपून राहणार का …ती तर प्रतिबिंबीत होणारच..आणि एकांताच्या रूपातला तो आरसेमहाल एकदमच अंगावर येऊ बघतो, पण ….हीच वेळ असते स्वमग्न मनाला सावरायची, आधार द्यायची, फक्त आणि फक्त सुंदर तेच बघायला शिकवण्याची ! एकांताशी सुरेल नातं जोडायला शिकवण्याची !

नको असलेल्या कटू आठवणींचं ओझं किती वाहायचं, बोचकं बांधून भिरकावता आलंच पाहिजे आणि हिंमत करून एकदा भिरकावल्यावर, मागे वळून वळून त्या बोचक्याकडे कटाक्ष टाकणं, पुन: त्याला काखोटीला मारणं तर केवळ आत्मघातकीच !

 

एकांत आणि एकांतातलं स्वमग्न मन ह्यांच्यात सुसंवाद साधता यायला हवाच !

एकांतातल्या ह्या आरसेमहालातले स्वमग्न मनाचे चेहरे कायम उजळ हवेत, हंसरे हवेत, प्रसन्न हवेत  ! सगळ्या उजळ चेहऱ्यांनी हा आरसेमहाल कायम लखलखताच दिसायला हवा !!

 

*ज्योति हसबनीस*

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – *हळवा क्षण* – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

हळवा क्षण

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का आलेख  हळवा क्षण)

काळ भराभर पुढं जात असतो. आणि स्वत:बरोबर आपल्यालाही नेत असतो. कधी स्वखुषीने तर कधी नाईलाजाने, त्याचं बोट धरून पुढे पुढे आपली पावलं पडत राहतात. मागचं सारं काही धुसर धुसर होत जातं आणि त्याच वेळी समोरच्या दृष्यातले रंग अधिकच गहिरे आणि वेधक वाटायला लागतात. बदलत्या आयुष्याशी जवळीक वाढू लागते, गोडी निर्माण होते. जीवनातली लज्जत आणि रंगत अनुभवता अनुभवता एखादा क्षण असा येतो की परत मन झर्रकन काळाचं बोट सोडून पार भूतकाळात मुसंडी मारतं ..आणि शोधू लागतं काही हरवलेलं, निसटलेलं, काळाच्या ओघात दुरावलेलं..!! पाऊस पडल्यानंतरची तरारलेली जुईची वेल आणि वेड लावणारा तिचा सुगंध फार फार बेचैन करतो जिवाला! कर्दळीच्या पानातल्या जुईच्या कळ्यांची पुडीच माझ्या नजरेसमोर येते आणि पार माझ्या शाळा कालेजच्या दिवसात घेऊन जाते ती मला ! आई-बाबांचं सहजीवनच साकारतं माझ्या डोळ्यासमोर! छोटंसं घर आमचं चाळीतलं, बाग कुठे असणार तिथे ! पण बाबा अतिशय रसिक, आईची फुलांची आवड  ओळखून न विसरता पावर हाउस वरून येतांना जुईच्या कळ्या तोडून कर्दळीच्या पानांत बांधून आणायचे , आणि शाळेतून आलेली थकलेली आई प्रसन्न्  चेहऱ्याने गजरा करायची! गजरा लावतांनाचा तिचा आनंदी चेहरा अजूनही डोळ्यांसमोर तस्साच आहे, आणि आफिसमधून आल्यावर लगबगीने आईच्या हातात ती हिरवी पुडी देतांनाची बाबांची कृतकृत्य भाव असलेली छबी तश्शीच मनावर कोरली गेलीय ..!

काळाबरोबर भरपूर पुढे आलेय ..भरपूर काही मागे राहिलंय पण आई-बाबांच्या सुखी समाधानी सहजीवनाच्या स्मृती तर कालातीत आहेत …नेहमीच पाऊस पडणार …जुई तरारणार ..आणि त्या हिरव्या गार पुडीतल्या जुईच्या कळ्या मला परत लहान करणार ..आई-बाबांकडे घेऊन जाणार ..

येतो असा एखादा क्षण खुप हळवं करून जाणारा …!!

© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – *शिस्तीची चौकट* – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

शिस्तीची चौकट

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का आलेख  शिस्तीची चौकट)

अतिशय निष्ठेने एखाद्या व्रतस्थासारखं आपला दिनक्रम पाळणाऱ्या व्यक्तिंविषयी मला नेहमीच आदर आणि कुतूहल वाटत आलंय. आदर त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीबद्दल आणि कुतूहल नेमकी कुठल्या मातीची ही मंडळी बनलीत त्याबद्दल !

उजाडल्यापासून  तर मावळेपर्यंत एका ठराविक पद्धतीनेच दिवसाची वाटचाल करणं यांना पसंत असतं. त्या आखीव रेखीवपणात एकही रेष जागची हललेली यांना चालत नाही. नियमितपणे अनियमितपणा करण्यावर यांचा काडीमात्र विश्वास तर नसतोच पण अनियमितपणा ह्या शब्दाला त्यांच्या शब्दकोषात स्थानच नसते ! पेपर वाचायचा झाला तरी ठराविक वेळेतच ठराविक बातम्यांना प्राधान्य देतच त्याला गुंडाळणार, मग कितीही वाचनीय संपादकीय असू दे, की मजेदार लेख असू दे ! घड्याळाच्या काट्यांची पोझिशन हवी ती आली की पेपरची गुंडाळी भिरकावलीच ! फिरायला निघाले तरी,डोळ्यांवर झापडं बसवल्यासारखी अगदी नाकासमोर चालणार, पक्ष्यांची मंजुळ साद ऐकून कान टवकारणार नाहीत, की आवाजाच्या रोखाने वेध घेणार नाहीत. चालीमध्ये ठराविक गती राखत, अध्ये मध्ये न रेंगाळता, झपझप योजलेला पल्ला पार करत व्यवस्थित घर गाठणार !दिवसभराचं व्यस्तपण घरी आल्यावर तरी शांत करतं का ..? छे: एक नजर मोबाईलवर अर्ध ऑफिस समर्थपणे पेलण्यात गुंगलेली तर एक नजर घड्याळाच्या काट्यांच्या गरगरण्यात गुंतलेली !आली रे आली हवी तशी पोझिशन काट्यांची की  अन्न हे पूर्णब्रह्म मानून तेही एका रिच्यूअल सारखं आटोपून दिवसाची अखेर TV समोर रंजक करायला हे मोकळे ! हातात रिमोट जरी असला तरी त्यावर ठराविकच चॅनेल्स चे नंबर असावेत की काय याची दाट शंका यावी इतकी आलटून  पालटून इन मिन तीन जरी नाही तरी पाच ते सहा चॅनेल्स बघणार ज्यात कधीही चटकदार सीरियल्स नसणार, मूव्हीज नसणार ..! हो , जगभरातल्या घडामोडींची मात्र रेलचेल असणार !

झोप यांच्या डोळ्यावर कधीच नसते ती तर घड्याळाच्या काट्यांवर असते …? त्यांची ह्यांना जमेल तशी हातमिळवणी झाली की निद्रा त्यांच्यावर प्रसन्न झालीच म्हणून समजा ! एका शिस्तबद्ध कार्यक्रमाची सांगता यशस्वीपणे झाल्याच्या खुषीत ही मंडळी लयबद्ध घोरू देखील लागतात !

कित्येकदा ह्या शिस्तबद्ध चौकटीचे कोन आजूबाजूच्यांना खुपतात, त्रासदायक ठरतात, पण ह्या शिस्तबद्ध चौकटीतलं जग अत्यंत सुरक्षित असतं, अनियमितपणाला घातल्या जाणाऱ्या नियमित वेसणामुळे एक अंगभूत अशी संरक्षक कवच कुंडलं ह्याला प्राप्त झालेली असतात,  ही शिस्तशीर चौकटच त्या जगाची शान असते !

© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – * डिजिटल माळा * – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

डिजिटल माळा

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी का  अप्रतिम आलेख  “डिजिटल माळा ” ।)

गेले कित्येक दिवस घोकत होते एक काम हातावेगळं करण्याचं. निवांतपणाच मिळत नव्हता म्हणा किंवा मुहूर्त लागत नव्हता म्हणा, सततच त्या कामाची  चालढकल होत होती. पण आज अगदी चंगच बांधला त्याचा पुरता फडशा पाडण्याचा. कपाटं आवरणं, जुन्या नको असलेल्या सामानाची  विल्हेवाट लावणं, विल्हेवाट लावलेल्या सामानाला घरी घेऊन जाणाऱ्या घरच्या मदतनीस मंडळींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मनात आलेला अपराधी आवंढा शिताफीने आणि मोठ्या समाधानाने  गिळणं हे तर अंगवळणीच पडलं होतं पण मनात जी साफ सफाई योजली होती ती होती ‘डिजिटल माळ्याची’ ! आणि तिला मात्र प्रचंड वेळ लागणार होता. साफसफाईची ती प्रक्रिया म्हणजे प्रचंड गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असणार होती. असंख्य फोटोजने खचाखच भरलेली गॅलरी रिती करणं म्हणजे महा कठीण काम!

फुलाभोवती भिरभिरणाऱ्या फुलपाखराशी मन रेंगाळणार होतं, असंख्य  पक्ष्यांची आकाशीची नयनरम्य झेप मोहात पाडणार होती, डोळ्यांत न मावणारा फुलांचा बहर पुन: पुन: डोळ्यांत साठवला जाणार होता, ऋतूनुसार कात टाकून अधिकच देखणी झालेली बाग क्षणोक्षणी खिळवून ठेवणार होती, मैत्रिणींबरोबर घालवलेले असंख्य आनंदाचे क्षण, त्यांचे फुलून आलेले लकाकते चेहरे पुन: ते क्षण जिवंत करणार होते, उगवत्या रविबिंबाच्या, त्याच्या रंगोत्सवाच्या विविध छटांनी नटलेली अगणित दृष्य बघत  पुन: एकदा विधात्यापुढे नतमस्तक व्हायला होणार होतं, उजाडणारा प्रत्येक दिवस अधिकाधिक रंजक करणारी आणि रात्र उत्तरोत्तर रंगवत जाणारी अप्रतिम शब्द चित्रं परत एकदा त्यांच्या प्रेमात पाडणार होती, जिवलगाबरोबर काढलेले सेल्फीज, त्याच्याबरोबर सैर केलेल्या असंख्य जागा तिथल्या सौंदर्याची भुरळ पाडत परत तिथेच खेचून नेणार  होत्या, गोजिरवाण्या नातींचे लडिवाळ, खट्याळ भाव ल्यालेले  गोंडस चेहरे तिथेच खिळवून ठेवणार होते, एक ना अनेक असंख्य गोष्टी, सगळ्याच अगदी जिवापेक्षा जास्त ! टाकणार काय, ठेवणार काय, खरंच मी नेमकं काय करणार असा प्रश्न पडला मला!  . Digital माळा कसला …तो तर माझा SAFE DEPOSIT VAULT होता! सारा माझा खजिना जपून ठेवला होता मी तिथे, आणि त्याची कसली साफ सफाई? आपल्या साऱ्या मौल्यवान गोष्टी कशा आपण डोळे भरून बघतो, आणि त्या त्या मधुर क्षणांच्या आठवणीत रमत परत नीटनेटक्या ठेवून देतो, अगदी तस्संच मी केलं. मधुर स्मृतींच्या हिंदोळ्यावर मजेने झुलत झुलत माझी DIGITAL साफसफाई तशी झाली …विस्मृतीचा धुरळा साफ करून …आणि सारा माळा लखलखीत करून …! भूतकाळातल्या साऱ्या सुंदर क्षणांनी पुनश्च आनंदाने माझ्याभोवती फेर धरला आणि एका वेगळ्याच जगात मी हरवून गेले! तो माळा नव्हताच मुळी …माझा TREASURE BOX होता! अक्षरश: कुबेराचा FEEL घेऊन निवांssssत झाले मी अगदी!

© ज्योति हसबनीस

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख – माझा मॉर्निंग वॉक – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

माझा मॉर्निंग वॉक

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति हसबनीस जी  का “मॉर्निंग वॉक “पर आधारित  एक मनोरंजक आलेख।)

उशिर झालाच शेवटी निघायला असं पुटपुटत भराभर बगिचा गाठला आणि गोल गोल चकरा मारायला सुरूवात केली , तीन चार चकरांनंतर पावलांचा वेग आपोआपच थोडा मंदावला , आणि नजरही अगदीच नाकासमोर  चालायचं सोडून चुकार मुलासारखी आजूबाजू भिरभिरायला लागली , एव्हाना अगदी गडीगूप असलेले कानही भवतालचे आवाज टिपण्यात अगदी गुंतून गेले कुहूकुहू चा गोड आवाज कानी साठवून घेतांना आज भारद्वाज दिसावा असं मनात येतंय तेवढ्यात  मी एकदम दचकलेच …..केवढं गडगडाटी हास्य कानावर आदळलं कुठूनतरी ..कुठल्या दिशेने हा गडगडाट होतोय याचा वेध घेतेय तर काय ..दोन्ही हात कंबरेवर ठेवून मागे झुकून आकाशाच्या दिशेने आ वासत एक हाफ चड्डी t shirt मधलं महाकाय धूड एकटंच हास्याची आवर्तनांवर आवर्तनं पार पाडत होतं ..! बापरे …केवढी एकरूपता , तन्मयता , आजूबाजूच्यांचा विसर पाडणारी ! आणि केवढी ही अघोरी तपश्चर्या …आजूबाजूच्यांना हादरवून सोडणारी

गडगडाटी वातावरणाचे जराही तरंग चेहऱ्यावर उमटू न देता न डगमगता एक सुशांत मूर्ती अत्यंत स्थितप्रज्ञपणे समोरच्याच बाकावर सुखासनात बसलेली आणि ओंकाराच्या गहन साधनेत गढून गेलेली आढळली ..खरंच अद्वैताशी एकरूप होण्याचा हा मार्ग किती भंवतालाचा विसर पाडणारा असू शकतो याचं एक जिवंत उदाहरणच डोळ्यासमोर होतं माझ्या …

धाडधाड आवाजाने एकदम भानावर आले आणि जरा बाजू सरकले …अहाहा काय मस्त दुक्कल होती मैत्रिणींची ..मस्त पोनी बांधलेली ..ट्रॅक सूट घातलेला ..आणि पायातल्या शूज चा आवाज करत पळा पळा ..कोण पुढे पळे तो अशी स्पर्धा करत रस्त्यातल्या सगळ्यांना अंगचोरपणा करायला भाग पाडत बिंधास पळापळ चालली होती दोघींची ! सक्काळ सक्काळ चकाट्या पिटणाऱ्या टोळक्याकडे दुर्लक्ष करत थोडं जिम मारू म्हटलं तर काय चक्क एकही instrument रिकामं नाही !भरीला भर म्हणून चक्क घुंघट ओढलेली उताराकडे झुकलेली स्त्री air skier वर

स्वार झालेली पाहीली आणि मग काय बघतच राहीले तिच्याकडे , तिचं सराईतासारखं पाम व्हील फिरवणं , मिनी स्कीवर लीलया स्वार होणं , waist twister चा समोरून मागून वापर करणं , आणि एकूणच सगळ्या instruments शी तिने साधलेली जवळीक तर चाट करणारी होती ..!

वयाचा अडसर , जागेचा अडसर , वेड्या वाकड्या पसरलेल्या देहाचा अडसर कश्शालाही न जुमानता , सारे निर्बंध झुगारून मुक्तपणे चाललेली समस्त मंडळींची ती निरामय आरोग्याची आराधना अगदी भान हरपायला लावणारी होती ….! प्रत्येकाचे ध्येय एकच पण त्या ध्येयाप्रतीची वाटचाल वेगळी , आणि वाटचालीतली रंगत ही आगळी ! मिळून सारी …ह्या खेळात मग मीही सामिल झाले … शाळेची PT आठवली , सरांची कडक नजर आठवली आणि त्यांच्याच चालीत एक,दो , तीन, चार . पाच ,छे , सात, आठ . आठ ,सात ,छे पाच , चार तीन दो एक असे लहानपणी गिरवलेले PT चे धडे मन आणि शरीर मोठ्या प्रेमाने गिरवायला लागले ! (आणि हो , हे धडे गिरवतांना मोठमोठ्याने टाळ्या पिटत जाणारं एक कपल माझ्यासमोरून गेलं तेव्हा त्या टाळकुटीने किती ऊर्जा त्यांना मिळत असणार याची नोंद घेणाऱ्या अगोचर मनाला दमदाटी करायला मी अजिब्बात विसरले नाही हं !)

खरंच सकाळचे मॉर्निंग walk ने गजबजलेले रस्ते , फुललेल्या बागा , अत्यंत वयस्कर मंडळींनी काठी टेकत टेकत शांतपणे घराच्या अंगणात मारलेल्या फेऱ्या बघितल्या आणि आजकाल माणूस किती health conscious झालाय हे जाणवायला लागलं . त्याचं असं हे health conscious होऊन निसर्गाच्या सान्निध्यात राहून , मन प्रसन्न ठेवणं , निकोप ठेवणं ही एक प्रकारे निरामय समाजस्वास्थ्याची नांदीच नव्हे काय !

© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख – निष्पर्ण वृक्ष – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

निष्पर्ण वृक्ष

(प्रस्तुत है पतझड़ के निष्पर्ण वृक्ष से संबन्धित स्मृतियों पर आधारित सुश्री ज्योति हसबनीस जी का भावप्रवण आलेख ‘निष्पर्ण वृक्ष’)

निष्पर्ण वृक्ष …अत्यंत कळाहीन ..असंख्य पर्णहीन फांद्यांच्या रूपात उरलेला ..वठलेला ..शुष्क ..नीरस ..सारा जीवनरसच आटलेला ..अनंताकडे एकटक बघणारा ..चमकणाऱ्या वीजेकडे आशेने बघणारा ..कल्पनेनेच शहारणारा …मनोमन उसासणारा ..हिरव्यागार माळरानावर आपलं एकाकीपण निमूटपणे जगणारा .. ..क्वचित विसाव्याला आलेल्या एखाद्या पक्ष्याच्या अस्तित्वाने मोहरणारा …त्याच्या चाहुलीने, पंखांच्या हालचालीने ..मंजुळ सादेने सुखावणारा ..आणि नकळत गतवैभवात रमणारा !!

गच्च पर्णसंभाराच्या हिरव्या ओल्या आठवणीतले कित्येक ऋतू मनात जागत असतील याच्या. गोड शीळ घालत फुलणारं पक्ष्यांचं प्रेम, कटीखांदी खेळवलेल्या उबदार घरट्यांतला पिल्लांचा चिवचिवाट, चोचीतल्या चिमणचाऱ्यातलं वात्सल्य, आणि सारं आकाश पंखांवर पेलण्याचे पिल्लांनी आईच्या मदतीने गिरवलेले असंख्य जीवनधडे, पिल्लाची  भरारी बघणारी

आईची कौतुकभरली नजर, रिते होणारे घरटे, साऱ्याचा मूक साक्षीदारच ना तो! वाटेवरच्या पांथस्थाला आपल्या शीतल प्रेमाच्या सावलीत कितीदा तरी निवांत केलं असेल त्याने. प्रेमी जनांच्या गोड गुपितांना ह्याचाच तर आधार! कित्येकदा मनोरम  प्रीतीचे मळे फुलले असतील याच्या साक्षीने!

लहरी निसर्गाच्या विक्षिप्तपणाचे कैक घाव सोसून देखील एखाद्या स्थितप्रज्ञासारखा पाय घट्ट रोवून आजवर अविचल उभा आहे हा, आपल्या मातीत पसरलेल्या असंख्य मुळांना जगण्याचं  बळ देत …आपल्या निष्पर्ण फांद्या सांभाळत …आणि त्यांची समजूत काढत ..कारण आता विसाव्याला पक्षी येणार नाहीत, त्यांच्या गुलाबी मनाला निष्पर्ण फांद्यांची भुरळ पडणार नाही, सुरक्षितता आणि ऊब हरवून बसलेल्या ओक्या बोक्या फांद्यांच्या कटीखांदी घरटी झुलणार नाहीत.

पांथस्थांचं शांतवन , प्रीतीची गुपितं यापैकी काहीच साधणार नाही. आयुष्यातलं गमकच हरवलेला हा एकाकी वृक्ष मात्र डोळ्यांत स्वप्न जागवतोय असा भास झाला मला अचानक …स्वप्न ..तुटलेपणाचे ..

भंगलेपणाचे ..पण त्या तुटलेपणातही एक चमक होती भंवतालाशी अतूट नातं जपता आल्याची, कुणाच्या तरी आयुष्याशी आजवर स्वत:ला जोडता आल्याची, सांधता आल्याची ! त्याच्या श्वासाश्वासात कृतकृत्यता जाणवत होती आयुष्य सार्थकी लागल्याची, मातीशी इमान राखल्याची !

© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख – शेवट गोड व्हावा …!  – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

शेवट गोड व्हावा …! 

(प्रस्तुत है सुश्री ज्योति हसबनीस का आलेख ‘शेवट गोड व्हावा’) 

रिमझिमता पाऊस ..हवेतली सुरकी ..आणि वाफाळत्या काॅफीचा एकेक घोट ..बघता बघता काॅफीने तळ गाठला ..आणि शेवटचा घोट ..किंचित गोड लागला …अपार तृप्ती देऊन गेला .

कसं असतं ना माणसाचं …शेवट गोड तर सारं गोड हे अगदी ठसलं असतं त्याच्या मनावर ! मग ते सीरियल असो, कथा कादंबरी असो, नाटक असो , चित्रपट असो की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी असो ! ‘

‘ते दोघं आणि चारचौघं’ ह्यातही आपल्याला ‘त्या दोघांच्या’वियोगाची कल्पना करवतच नाही , त्यांच्या ओढीचा शेवट चिरकाल एकत्र येण्यातच व्हावा असंच आपल्याला वाटतं !

खुप कष्ट करून जिद्दीने वाढवलेल्या मुलांनी आईचा आधार बनून तिला अपार सुख देऊन तिचा शेवट सुखासमाधानात व्हावा असंच आपल्याला वाटतं !

वन्यपशुंच्या जीवनावरील लघुपट बघतांनादेखील जिवाच्या भीतीने सुसाट पळणारं हरिण वाघाच्या तडाख्यातून सुटून सुखरूप आपल्या कळपात जावं , गरूडाची झडप चुकावी आणि गोजिरवाणं सीगल त्याच्या तावडीतून सुटावं , कपारीच्या आश्रयाने त्याने दडावं , आणि अशा  जीवघेण्या पाठलागाचा शेवट त्यांच्या सुखरूप असण्यात व्हावा ..हेच मन म्हणत असतं !

आयुष्य पुरेपूर उपभोगून झालेली वयोवृद्ध मंडळी ..वाढणारी वयं आणि ढासळत चाललेलं आरोग्य सांभाळत कशीबशी आला दिवस साजरा करणारी पिकली पानं ..कमीत कमी यांचा तर शेवट गोड व्हावाच ..आहे त्यापेक्षा अजून कमीअधिक वाट्याला न येता आजवर चाखलेल्या गोडीची चव मनभर असतांनाच  त्यांचा शेवट व्हावा असं तर वाटतंच वाटतं …!

कॉफीचा तो शेवटचा घोट पण किती विचारांचं मोहोळ उठवलं त्याने !

मनात आलं कसं असतं ना माणसाचं , एखादी गोष्ट नाही करायची म्हणली तरी हटकून तीच कराविशी वाटते , आणि ती केल्यानंतर त्याचं नेमकं स्पष्टीकरणही अंतर्मनातल्या ‘मी’ साठी मनात तयारच असतं! बिनसाखरेची काॅफी प्यावी म्हणून काॅफी घेतली तशीच पण मनाच्या समाधानासाठी अपराधी भावाने चिमूटभर साखरही घातलीच कपात ..काॅफी संपता संपता समाधान होतं अजिबात गोड नाही लागत आहे त्याचं आणि शेवटी एका घोटात काॅफीला आलेल्या माफक गोडव्याने जीव सुखावला ..काॅफीचा तो शेवटचा घोट अपार तृप्ती देऊन गेला ! आणि त्या अपार तृप्तीतच विचार आला तो अशा सुखांताचा ..!!!!

*ज्योति हसबनीस*

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख – प्रतिसाद – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

प्रतिसाद 

(यह सत्य है  कि ईश्वर ने  मानव हृदय को साद-प्रतिसाद  के  भँवर में उलझा कर रखा है जबकि प्रकृति अपना कार्य करती रहती है। उसे प्रतिसाद से कोई लेना देना नहीं है। इस तथ्य पर प्रकाश डालती यह रचना सुश्री ज्योति हसबनीस जी के संवेदनशील हृदय को दर्शाती है।) 

सरलेली संध्याकाळ, अलगद होणारं निशेचं आगमन, उगवतीचा चंद्र आणि आकाशातल्या चांदण्यांशी स्पर्धा करणारी चांदणफुलं अंगभर दिमाखाने मिरवणारा , दैवी सुगंधाने सारा भंवताल भारून टाकणारा डौलदार प्राजक्त ..

आषाढाचे मेघ , श्रावणाची सर सारं काही अंगाखांद्यावर झेलून तृप्तीच्या हुंकारात लाल ,पिवळ्या ,गुलाबी ,जांभळ्या रानफुलांनी नटलेली देखणी सह्यपठारे ..उष:कालची तांबूस पिवळी आभा पांघरत कोवळ्या सूर्यकिरणांत लखलखणारी हिमशिखरे ..आपल्या ऋतुचक्रात सातत्य राखणारा निसर्ग असं विविधरंगी दर्शन देत साद घालत असतो , आणि आपण जसं जमेल तसं कधी अनाहूतपणे तर कधी आवर्जून याची दखल घेत प्रतिसाद देत असतो ,सृष्टीची ही रूपं नवलाईने न्याहाळत असतो , त्यातल्या अपूर्वाईच्या गोडीने नादावून जात असतो .

खरं तर साद -प्रतिसाद हा खेळ मानवाचा , निसर्गाला त्याच्याशी काय देणं घेणं ? तुमच्या कौतुकाने तो काही बहर वाढवणार नाही की प्रतिसाद मिळाला नाही म्हणून बहर आवरता घेणार नाही …मी केलं हे सारं , हा त्याचा पुसटसा देखील अभिनिवेशही नाही …पण हाडामासाच्या जित्या जागत्या माणसाचं तसं नाहीय ना ! माणसाला देवाने अतिशय तरल आणि संवेदनशील  ‘मन’ बहाल केलंय आणि साद – प्रतिसादाच्या खेळांत त्याला पुरतं अडकवलंय ! अपेक्षांचं ओझं खांद्यावर वागवत , जमेल तसा त्याचा भार हलका करत असतांना , हक्काच्या गोतावळ्यातला एखादा कौतुकाचा कटाक्ष त्याला कृतकृत्य करतो ! मस्त मेन्यू आखून दिवसभर खपून छान बेत जुळवून आणला आणि ‘काय छान झालंय सगळं’ अशी हवीहवीशी दाद देत पदार्थांचा आस्वाद घेऊन मंडळी तृप्त झाली की मिळालेल्या प्रतिसादाने मन सुखावतंच ! मैफलीतली वाद्यांची रंगलेली जुगलबंदी , रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाविना अपुरीच होय ! ..काळजाचा वेध घेत आत अलवारपणे झिरपणारे सूर कानात साठवत उत्सफूर्तपणे तोंडातून निघणारा ‘ वन्स मोअर ‘आणि तो ऐकल्यावर गोडसं हसून तितक्याच तडफेने पुन: ती गझल ऐकवणारा कलाकाराचा आनंदाने उजळणारा चेहरा ह्या प्रतिसादाचं बोलकं रूपच नव्हे काय ?

स्वान्तसुखाय अनेक गोष्टी आपण करतो . आपले छंद तर स्वान्त सुखायच असतात ! छंद मग तो रांगोळी रेखाटण्याचा असो , लेखनाचा असो , समाजाप्रति  काही देणं लागतो ह्या जाणीवेतून अनेक संस्थांमध्ये कार्यरत राहून त्या संस्थांच्या कार्यशैलीत झोकून देता देता आपलं स्वत:चं एक स्थान तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न देखील त्या छंदाची दुसरी बाजूच नव्हे काय ? आणि हे सारं मिळणाऱ्या प्रतिसादावरच अवलंबून असणार ना! स्वान्तसुखाय जरी माणूस हे सारं करत असला तरी योग्य त्या व्यासपीठाद्वारे  स्वत:तल्या कलागुणांचं प्रगटन करण्याचा त्याचा स्थायीभावच असतो . आणि योग्य त्या प्रतिसादानेच हे कलागुण बहरतात हे वास्तव आहे ! आणि तसे ते बहरायलाच हवेत ! त्यांना प्रतिसाद हा मिळायलाच हवा !

स्त्री स्वत:साठीच साजशृंगार करत असली तरी , तिच्या साडीचं , निवडीचं , केलेलं कौतुक तिला सुखावून जातं , पाठवलेला लेख खुप आवडला असं जेव्हा मोबाईलवरून कळवलं जातं तेव्हा मोरपीस फिरतंच ना गालावर ..! आणि प्रतिसादाच्या अपेक्षेनेच तर मोबाईल नंबरही देत असतो ना आपण पेपरमध्ये !

*प्रतिसाद* ..केलेल्या कामाची पोचपावती ..परिश्रमाचं कौतुक हे सारं सारं माणसाचं जीवन सुखकर बनवण्यात खुप मोठ्ठी भूमिका बजावतं ! जितक्या तत्परतेने हाकेला ओ दिली जाते तितक्याच तत्परतेने साद घातली असता प्रतिसाद ही मिळावा …तृप्तीची साय ही त्याविना धरलीच नाही जाणार माणसाच्या जीवनावर !!

© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख – सुरेल संगत … – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

सुरेल संगत …

(Today we present wonderful article on music, songs and our moods written by  Mrs. Jyoti Hasabnis. She is a renowned Marathi Author/Poetess. Her articles are being published in Sakal Nagpur Edition.) 

एखादं गाणं जेव्हा मनात रूंजी घालू लागतं ना तेव्हा त्या शब्दांनीच जाग येते , त्याचे सूर दिवसभर संगतीला असतात आणि रात्री ते उशाशी घेऊनच त्याच्या तालावर झुलत आपण निद्रेच्या अधीन होतो . खरंच गीताची ही मोहिनी मनावर इतकी जबर्दस्त असते की त्या क्षणी जाणवतं , संगीत हा आयुष्याचा केवढा सुरेल भाग आहे ! रोजच्या नीरस आणि कंटाळवाण्या आयुष्याची लय बिघडू न देण्यात ह्या शब्द सूरांचा केवढा मोठा वाटा आहे !

गाण्याचं सुद्धा असं असतं ना ,  गाण्याचे जसे भाव , शब्द ,  सूर , तसा मूड व्हायला लागतो . एखादं गाणं ऐकताक्षणी मूड अगदी प्रसन्न होतो . प्रसन्न मूड असला की मनात अगदी चांदणं फुललेलं असतं आणि त्या चांदणगावात चंद्र , तारका , आणि आपण एवढेच वस्तीला असतो , सूरावर झुलत असतो , ठेक्यात ताल धरत असतो  ‘ आ जा सनम पासून तर नीले नीले अंबर ‘ पर्यंतचा जोडीदाराबरोबरचा प्रवास असा चांदणप्रकाशात अगदी झोकात पार पडतो !     गीतातल्या शब्दाबरोबरच तृप्त करणारं संगीत आणि कलाकारांनी त्यात ओतलेला जीव सारं कसं एखाद्या सुंदर कलाकृतीसारखं मनात ठसतं . आणि मग काही गाण्यांबरोबर

कायमच ते भाव मनात घर करतात   . ‘तेरा मेरा प्यार अमर ‘ ऐकतांना उगाचच हळवं व्हायला होतं , ‘ तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं ‘ ऐकतांना बेचैन व्हायला होतं , तर ‘ वो शाम कुछ अजीब थी ‘ऐकतांना आत आत असे तरंग उठल्यासारखे वाटतात , ‘ हमने देखी है इन आँखोंकी महकती खुशबू ‘ ऐकताना तर हलका शहारा मनाला व्यापतो , अंतर्मुख करतो ! एखाद्या गाण्याने आळवलेला दु:खी सूर आयुष्याच्या फोलपणाची जाणीव करून देत अगदी रितं रितं करून टाकतो तर ,’ दिखाई दिए यूँ ‘ सारखं गाणं काळीज चीरत जातं . गाणं संपलं तरी सुप्रिया पाठकचा कोवळा चेहरा , आणि गीतातले शब्द त्याच्या सूरासकट संगीतासकट पाठलाग करत राहतात . ‘ ये जीवन है ‘ असो की ‘ जिंदगी के सफरमें गुजर जाते हैं ‘ असो ह्या सारखी जीवनावर नितांत सुंदर भाष्य करणारी गाणी विरळाच  . काल परवा माचिस मधलं ‘ छोड आएँ हम ये गलियाँ ‘ हे गुलजारने लिहीलेलं सुरेश वाडकरांनी गायलेलं गाणं ऐकलं आणि अक्षरश: मनात विचारांचं मोहोळच उठलं ! अशांत पंजाब , आणि भडकलेला वाट चुकलेला , आणि परतीच्या वाटेला मुकलेला अगतिक तरूणवर्ग इतकी भेदक परिस्थिती आणि विदारक वास्तव त्या चित्रपटात चितारलंय , की सगळा चित्रपटच हे गाणं ऐकतांना डोळ्यासमोरून झर्रकन सरकतो . ह्या गाण्यातल्या सुरूवातीच्या शब्दांतून झरणारा गोडवा कधी नैराश्यात कडवटपणात बदलतो ते कळतही नाही आणि मग गाणं संपलं तरी मनात ते सगळ्या भावनिक आंदोलनांसकट सुरूच राहतं . आजची काश्मिरची परिस्थिती , बहकलेला , बिथरलेला तरूण वर्ग असाच नैराश्याच्या गर्तेत गेला तर …परतीच्या वाटा त्यालाही बंद झाल्या तर ..

अशीही काही गाणी , जिवाची घालमेल करणारी  , घायाळ करणारी , जिवाच्या चिंधड्या करणारी ,  !!

सुख -दु:ख , प्रीति -असूया , मीलन-विरह ह्या साऱ्या छटांनी नटलेलं जीवन आणि त्याचंच प्रतिबिंब ही गाणी ! सावलीसारखी त्यांची आपल्याला असलेली सोबत आयुष्याची वाटचाल सुरेल करते हे मात्र नक्की !

© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares
image_print