मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “खडाष्टक…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“खडाष्टक…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आता तुला सांगायची काही काही सोय राहिली नाही… आम्हीपण एकेकाळी सासुरवाशीण होतो पण हि ही असली थेरं काही आम्ही कधीच केली नाहीत… बाळबोध वळण आणि  पारंपारिक संस्काराचे माहेरचं लेणं घेऊन हिथं सासरी आले… सासु सासऱ्यांचे नि वडीलधाऱ्यांचे शब्द कधी खाली पडू नाही दिले… ना कधी मी माझ्या माहेरच्या घराण्याचं नाव बद्दू केलं… सासरच्या लोकांनी डोळ्यात तेल घालून माझी कुसळाएव्हढी चुक कुठे सापडते का जंग जंग शोधून पाहिलं… मी पण काही कच्चा गुरूची चेली नव्हती सगळ्यांनाच पुरून उरली होते… तेव्हा कुठे माझा या घरात टिकाव लागला.. मग घरच्यांनाही लक्षात आल्यावर माझा नाद सोडून दिला… तिथून पुढे या घरात माझा शब्दाला दिला जाऊ लागला मान… मी म्हणेल ते आणि म्हणेन तेच होऊ लागले प्रमाण.. प्रत्येक गोष्ट माझ्या संमती शिवाय इथली घडत नाही… अगदी माझ्या बाळ्याचं तुझ्याबरोबर लग्न करण्याचा शिक्कामोर्तब सुध्दा मी केल्यानंतरच झालंयं बरं… या घरासाठी कितीतरी खस्ता मी खाल्ल्या आहेत… तेव्हा आता कुठे हे चार दिवस सुखाचे दिसताएत… हे डोक्यावरचे केस उगाच पांढरे नाही झाले..लांबसडक केस गळत झडत बारीक झाले ते काही अंबाडा बांधण्यासाठी कापून नाही घेतले… ठसठशीत लाल कुंकुवाचा टिळा कपाळी रेखिला ते सौभाग्य माझे धडाडीचे ठणठणीत आहे म्हणून…चांगले मिनाक्षी सारखे डोळे होते पहिल्यांदा जेव्हा मी घरी इथे आले.. सगळ्यांवर जरब बसवता बसवता त्याच्या खाचा झाल्या आणि सोडावाॅटर काचेच्या चष्मा नाकी बसला…देहाच्या कुडीला शोभेल अशी कानातली कुडी नि नापसंतीचा नाकाचा मुरका मारताना चमकणारी नथीची जोडी.. कधी बाळे वेगळी केलीच नाही… घसघशीत तासाच्या वाटीचे सोन्याचे लखलखीत मंगळसूळत्राने गळा शोभून दिसतो..सौभाग्यवतीचा अलंकार तो इतर डागांना लाजवतो…भुंड्या हाताने कधी घरभरच काय पण बाहेर सुद्धा पडले नाही.. कांकणाची किणकिण वाजवी सुवासिनीचा हिरवा चुडा… अंगभर स्वच्छ, नीटनेटके वस्त्रप्रावरणे लेवेलेलाच पाहिला प्रत्येकाने आमचा उभयतांचा जोडा… अहो ऐकलतं का…. मी काय म्हणत होते अशी दबकत हळु आवाजात बोलणं होत असे आमचं… सुनबाईचं बोलणं म्हणजे सोळा आणे तोळा  असं कौतुक सासु सासऱ्या कडून व्हायचं…घराला लावली चांगली शिस्त त्यामुळे आलय़ उजागिरीला… सासुचा नि सासऱ्यांच्या मनी विश्वास तो दुणावला… सुनबाई आता आमची काळजी मिटली…आमच्या माघारी आता तूच या घराण्याची परंपरा पुढे चालू ठेवशील यात आम्हाला संदेह नाही…नातसून बघणं काही आम्हाला शक्यच होईल असं वाटत नाही… ती आता तुझी जबाबदारी चांगली पार पाडशील हि आहे आम्हला खात्री…

 

पण पण कसचं कायं.. बरं झाले माझे सासु सासरे मागे नाही राहिले… नाहीतर तुला असे पाहून त्यांच्या जिवाला नुसता एकेक घोर असते लागले .. माझं मेलीचं नशिबच फुटकं.. आमच्या बाळ्याचं बाशिंगबळच हलकं… एकतरी कौतुकाचा गुण हवा होता गं तुझ्यात… तुझं असं मोकळं ढाकळं वागणं पाहून कळ जाते माझ्या मस्तकात… काय ती तुझी एकेक थेरं… किती किती सांगून पाहिलं बाईच्या जातीला  हे शोभत नाही बरं… केस मोकळे सोडले हडळी सारखे काय म्हणे  केसांचं पोनिटेल मानेला जड होत नाही.. कान झाकले गेले असल्याने कुड्या, रिंगने कान ओघळत नाही..कानात हेडफोन सदैव अडकलेले… इतरांचे बाहेरील बोलणे म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेणे..कधी कुणाचं ऐकून घ्यायची सवयच नाही पहिल्या पासून… मी माझी राजी स्वतंत्र चालीची लाडावलेली कन्या माहेरा पासून…कपाळावर कुंकूच काय साधी टिकली पण तू लावत नाहीस… अन मला म्हणते जीनवर टिकली कुणी लावत नाही… गळयात काही नाही,हातातली कांकणं तर आता शोकेस मधे बसली हात झाले भुंडे,ना कपाळावर टिकली..साडीचा बोंगाळा आता ओल्ड फॅशन झाला… आणि  ठिक ठिकाणी फाटलेल्या जीन टाॅपने उघडे अंग दाखवण्याचा राजरोस स्टाॅलच उघडला…अरेला कारे नवऱ्याला चोविसतास करते…पुरे झालं आई तुमचं आता जमाना तो गेला.. मी पण नोकरी करुन चार पैसे मिळवते तर माझ्या डोक्याला शाॅट कशाला… तुमच्या आमच्या जमान्यात पडलय जमिन अस्मानाचं अंतर…  तुम्हाला पटलं तर राहते ईथे नाहीतर जवळ करते माहेर माझे निरंतर..रांधावाढा उष्टी काढा, संसाराचं लेंढार वाढवा हि पाॅलिसी जुनाट ठरली.. अब हम दो और हमारा एक ही करियर प्रणाली आली…आता सगळचं सारं बदलयं…त्याच्यशी आम्ही जुळवून घेतलयं.. तुम्हाला ते पटवून घेता येतयं का ते पहा… नाहीतर इथं कधीही या घरं आपलचं आहे असं म्हणायला भाग पाडू नका… 

अगं अगं सुनबाई डोक्यात अशी राख घालून घेऊ नकोस बाई… सुनबाई घर तुझचं आहे.. पण चार दिवस सासूचे आहेत  तिलाही तू हवी आहेस… वेगळं व्हायचं मला… हा विचार सुद्धा मनात आणू नको बरं… संध्या छाया कुणालाच चुकली नाही बरं…जोवर आहे कुडीत राम तोवर  जसं जमेल तसं घरकाम बघते … नाहीतर तूच उद्या सगळीकडे गवगवा करशील नवऱ्याची  आई कुठे काय करते? …

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “चिल्लर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“चिल्लर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… कालपरवापर्यंत ही चलनी नाणी होती बाजारात…

… होतं त्याचं प्रत्येकाचं आपापलं मानाचं मुल्य….

.. दोन पैसै टाकले तर मिळत होती पार्लेची लिमलेटची  गोळी..

… आंबट गोड चवीने तोंड स्स स्स करणारी…

… आणे बाराणे, चवली पावली नि अधेली…

… खुर्दा चिल्लरचा खुळखुळ वाजविणारी…

… नगदी नोटांचा कागदी सुळसुळाट होता कि तेव्हा..

.. फक्त तो धनिकांच्या पेढीवर नि गरिबांकडे लाजाळू…

… तांबा पितळ, शिसे, अल्युमिनियम धातूचीं नाणी

… भाव वधारला धातूंचा नि जमाना लोपला नाण्यांचा…

… शेवटी कागदी नोटाने नाण्यांवर मात केली…

… चिल्लर आता बाजारातून हद्दपार झाली…

… कुठे कधीतरी नजरेस पडते एखादे फुटकळ नाणे…

… सांगत असते आपले भूतकाळाचे गाणे केविलवाणे…

… आता रस्तावरचा भिकारी त्याला झिडकारतो..

… ना बाजारातला व्यापारी गल्ल्यात आसरा देतो…

.. देवाच्या पेटीत गुपचूप दान धर्म केल्याचा टेंभा मिरवतो..

… डोळे बंद असलेला देव भक्ताची दांभिक भक्ती ओळखतो…

… अन माणसाला तू कितीही महान झालास तरीही मजपुढे…

…. आजही चिल्लर आहेस हेच सुचवत असतो.. तसे

… नवी येणारी प्रत्येक पिढी जुन्या पिढीला चिल्लर समजत राहते..

… मुल्य हरवून बसलेली  जुनी पिढी अवमुल्यनाच्या दुखाने अवमानित होऊन जाते…

… होतं त्याचं प्रत्येकाचं आपापलं मानाचं मुल्य…

… चिल्लर असलं म्हणून काय झालं?..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “काहूर मनी दाटले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“काहूर मनी दाटले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

या निर्जन निवांत स्थळी, आणि अश्याच रोजच्या कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. तू हवा हवासा  असतोस जवळी..दिनवासर दिनकर निरोपाचे काळवंडलेले अस्तराचे पालाण घालून आसंमाताला जातो अस्ताला डोंगरराजीच्या पलिकडे दूर दूर. ते पाहून  हूरहूर मनातील उमटते  तरंग लहरी  लहरी ने तडागाच्या जलाशयावर. आता क्षणात येशील तू अवचित जवळी अशी मनास माझ्या समजूत घालते  आभासमय आशेवर. निराशेच्या काळ्या मळभाने गिळून टाकतात डोंगर, तलावाचे काठ, नि पाते पाते तरूलताचे, तृणपातीचे माझ्या मनासहीत..चाहूल पदरवांची येईल का , आतुर झालेले कान नि दाटून गेलेल्या  चोहिकडेच्या अंधकाराने भयकंपिताचे आलेले भान. आजची आशा निराशेत नेहमीप्रमाणे  लुप्त झाली, तसे उठून निघाले पाय ओढीत तनाचे मण मण ओझे घराकडे.चुचकारीले कितीतरी परी हटवादी मनास जोजवेना ते आढेवेढे..

.. अशी रोजच संध्याकाळी कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. काहूर मनी दाटले नेत्रातून पाझरले.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “आप की ऩजरो ने समझा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“आप की ऩजरो ने समझा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… अलिकडे अलिकडे  रिक्त हस्ताने रात्र माझ्या दारी अवतरते… उदासीचा घनघोर काळा अंधार बसतो पहाऱ्याला.. अन रात्रभर दार सताड  उघडेच असते… कुणी येईल याची आतुरतेने वाट पाहात राहते… निराशा पदरी पडते पण कुणाचेही पाय इकडे वळत नाहीत… आलेली रिक्त रात्र मग सकाळ होताच तशीच निघून जाते दारातूनच.. उसासे भरून.. सगळया मोहल्यात तर दररोज संध्याकाळपासून दिव्यांची रोषणाई उजळून टाकत असते रंगीबेरंगी दारं, खिडक्या आणि भिंतीनां… अप्सरांचे मुखवटे दारी, सज्जात घुटमळत असतात मुरकत, भुवया उडवत, कंबर लचकत आपल्या नव्या नव्या सावजाच्या प्रतिक्षेत… साज शृंगाराने नटलेले शरीर, अत्तराचा घमघमाट, मोगऱ्याच्या गजऱ्याचा नाजूक सुकोमल फुलांचा पसरलेला सुगंध सारा माहोल धुंद करून सोडलेला असतो.. सुंगधी केवड्याच्या बनात नागीण लपून बसते तशी इश्काच्या माशुकी सळसळत राहतात आपल्या हवेलीत, हवेलीच्या वाटेवर… रात्र गडद होत जाते तशी हळुहळू इश्काचे माशुक येतात चोर पावलांनी दबकत दबकत… आपल्या मनाच्या

दुखऱ्या जखमेवर प्यारीचा हळवा कोपरा शोधत… व्यवहाराच्या सौद्या नुसार प्रेमाची देवाणघेवाण  इथं रात्रभर चालते… घडी घडीला दार खिडक्यांची उघड मीट होत राहते… डोळयांची उघडझाप व्हावी तशी… भिडू बदलत गेला तरी पण  आतली प्रीतीचा खेळ  मात्र उत्तरोतर रंगत रंगत जातो… लखलखाटात प्रेमाचा मिना बाजार रात्रभर  झळाळून निघत असतो इथं… पोटाच्या वितभर खळगी साठी, परिस्थितीच्या दुर्दैवी वरवंट्याखाली चेपून चिपाडं झालेली शरीरं नि मेलेली मनं घेऊन माशुकीं  हतबलतेने उसने हासू चेहऱ्यावर दाखवत आयुष्यातली आपली एकेक रात्र कमी कमी करत जातात… थकलेलं शरीर, मरगळलेलं मन, चुरगाळलेल्या चादरी, काळवंडून सुकुन कोमजलेल्या मोगऱ्याच्या कळ्यांच्या बाजेवर सैलावून पडतं… त्राणं नसलेलं आंबलेलं  शरीर दिवस तसाच लोळून काढतं… दोरीवर टाकलेले विरलेले, डागळलेले कपडे लोंबत असतात विस्कटलेल्या मनाच्या चिंध्या चिंध्या झाल्यासारख्या… मग पुन्हा संध्याकाळ झाली कि बेगडी प्रेमाची झुल अंगावर पांघरून घेतली जाते… अंगावरील वस्त्राच्या धागे सुटलेल्या कलाबुताचे दिव्याच्या उजेडात क्षीणपणे चमकताना दिसतात..

… मी ही त्यांच्यांतील एक… पोरसवदा वयात फसलेली.. नशिबाच्या फेऱ्यात अडकलेली… घरादाराने, समाजाने कलंकित म्हणून लाथाडलेली या वस्तीत कधी कशी आले काही कळलेच नाही… त्या सगळ्या लपंट देहातील.. वखवखून उसळून आलेली वासनाने शेवटी चांदनी बाजारापर्यंत आणून सोडले…. समज आली पण त्या मागचं गांभिर्य लक्षात येणारं वयं कधी आलचं नाही…. निराधाराला आधार अमिनाबाईची हवेली…. नजरेची जरब असणारी अमिनाबाई… वसुलीची पक्की…. कुठल्याही पुरूषात गुंतून पडायचं नाही हा एकमेव नियम मात्र कटाक्षाने पाळण्यास सांगितला जाई… दावणीला बांधलेल्या माजाला आलेल्या बैलांच्या  नाकात वेसणीचा रज्जू असतो तसा हवेलीची मोहर उजव्या हातावर ठसठशीतपणे गोंदवलेली असल्याने तिथून बाहेर पडण्याचा मार्ग कायमचा बंद केलेला… असं असतानाही.. असचं एका रात्री बऱ्याच उशीराने त्याचं येणं झालं होतं.. ओळखी नंतर  त्याचं येणं मग सुरूच झालं…. अमरप्रेममधील नायका सारखा… घरच्या स्त्री कडून झिडकारला गेलेला… प्रेमाचा भुकेला… आणि मी… नकळत त्याच्यात गुंतून गेलेली… या नरकातून माझी सुटका तोच करेल या आशेवर विसंबलेली… माझ्या मनीचे गुज ओळखले त्यानें आणि   लवकरच येथून बाहेर घेऊन जाईन असा विश्वास दिला… या नरकातून फक्त मरणच सुटका करतं हेच सत्य असतं आणि बाकी सगळचं झुट असतं… हे मानायला नादावलेलं मन कुठे तयार असतं… अचानकपणे हळूहळू त्याचं येणं कमी कमी होतं जातं… खोट्या कारणांची ढाल तो पुढे करत राहतो… त्याचा उधवस्त होणारा संसाराच्या मोहात तो अडकून पडतो.. कमळात अडकलेल्या भुंग्यासारखा.. आणि येणं बंद होतं  काहीही न कळवता सवरता… आशाळभूतपणे रोजची रात्र त्याचीच वाट पाहण्यात जाते… आज तो नक्की येईल.. पण तो त्यानंतर कधीच फिरकला नाही…

नेहमी सारख्या बाकीच्या आपआपल्या कोठीत दार बंद करून राहिल्या….. मला कुणी भेटलचं नाही त्या रात्री… वाटलं आजची रात्र आपल्याला फाके पडणार आणि त्यात  अमिनाबाई चे गाली गलौच ऐकून घ्यावे लागणार ते वेगळे… रात्रभर तारवटलेले दिवे  वाट पाहत राहीले, पहाटेला चला उशिराने का होईना पण आता तरी प्रकाश मिटून पडून राहता येईल. म्हणून… पण तसं काही झालं नाही… आता आता माझे डोळे सुद्धा भरून वाहणे विसरून गेलेत… आणि आणि… अलिकडे अलिकडे  रिक्त हस्ताने रात्र माझ्या दारी अवतरते… उदासीचा घनघोर काळा अंधार बसतो पहाऱ्याला.. अन रात्रभर दार सताड  उघडेच असते… कुणी येईल याची आतुरतेने वाट पाहात राहते… शमा जलती रही परवाने कि आने कि पैगाम पर… निराशा पदरी पडते पण कुणाचेही पाय इकडे वळत नाहीत… आलेली रिक्त रात्र मग सकाळ होताच तशीच निघून जाते दारातूनच  गुणगुणत… जी हमे मंजूर है आपका ये फैस़ला…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “संध्याछाया भिवविती हृदया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“संध्याछाया भिवविती हृदया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… संध्याकाळच्या परतीच्या वाटेवर थव्यातून जात होतो…कळले नव्हते सकाळी तेव्हा घरट्यापासून किती लांबवर आलो होतो… पिल्लांच्यासाठी आणि तिच्या ओढीसाठी घरट्याकडे,  अंतरामागुन अंतर कापत जात होतो…कितीतरी वेळ पंख पसरून हवेत विहरत निघलो पण घरट्याच्या झाडाजवळ काही अजून  पोहचलो नव्हतो… सोबत घेतलेला होता चिमणचारा कच्चा बच्च्या पिलांना आणि आणि तिच्यासाठीही… त्याचं ओझं काहीच वाटत नव्हतं…आतुरतेने वाट  पाहत बसली असतील माझी घरट्याच्या तोंडाशी… चिवचिवाट किलबिलाटाचा करत असतील कलकलाट झाडावरती…रातकिड्यांना रागावून सांगत असतील तुमची किर्र किर्र नंतर करा रे संध्याकाळ उतरून गेल्यावर…येणारेत आमचे बाबा आता एवढ्यात या संधिप्रकाशात… फुलेल आनंदाचा गुलाल मग सारा घरट्यात… मग सांडून जाऊ दे काळोखाचे साम्राज्य.. पण पण त्या आधी आमचा बाबा घरी आलेला असूदे… “

“… का कुणास ठाऊक आता आताशा  मला दम लागुन राहिला…लांब पल्ल्याच्या झपाट्याला श्वास कमी पडू लागला..दिवसभर काही जाणवत नाही पण संध्याकाळी घरट्याकडे परताना थव्याबरोबर विहरणे जमत नाही… हळूहळू मग  मागे मागे पडत जातो… नि थवा मात्र ‘त्याचं कायं येईल तो मागाहून… कशास थांबावे त्याच्यासाठी.. ‘नि मला न घेताच तसाच पुढे निघून जातो… क्षणभराचे कसंनुसे होते मला.. धैर्य एकवटून पुन्हा पंख जोराने फडफडवत त्यांच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न करतो… पण पण तो  आटापिटा आता पूर्ण पणे निष्फळ ठरतो.. सगळे त्राण, अवसान कधीच संपलेले असते.. आता फक्त काही वेळ  विश्रांती घेणे गरजेचे ठरते… आंगातुक मला..वाटेवरील झाडे नि त्यावरील आमचेच जातभाई आसरा देण्यावरून कालवा कालवा करतात.. ‘तू  इथं थांबू नको बाबा तुझ्या ईथे असण्याने आमच्या शांतेत येतेय बाधा… ‘मग तसाच नदीच्या प्रवाहातला काळ्या कातळावर जरा विसावतो… चौफेर नजर फिरवतो… शांत एकसुरीचा जलप्रवाह कातळावर डचमळून जातो…नदीतील कातळाचा हुंकार ऐकू येतो.. ‘तू पूर्ण अंधार पडण्याआधी तूझ्या घरट्याकडे जाशील बरं… रात्र गडद होत जाईल तसं नदीचं पाणी शांत गहिरं होत जाईल.. काही जलचर आवाज न करता मग या कातळावर येतील  नि तुला पाहून त्यांना आयतीच मेजवानी होईल…’असा त्याचा मित्रत्त्वाचा सबुरीचा सल्ला.. भले मदतीला मर्यादा असल्या तरी त्याच्या… अस्ताचा सूर्य सांगत असतो… मंद मंद गतीने मी अस्ताचलाला जाई पर्यंत तू त्त्वरेने उडत उडत जा.. आपल्या घरट्यात पोहचून जाशील…माझ्याकडे  वेळ आहे फारच थोडा…तो संपला कि अंधाराचा उधळीत येईल काळाघोडा… आभाळाने घातले आपल्या डोळी काजळ गडद अंधाराचे.. ते पाहूनी भिउनी मान लवूनी बसले तृणपाती किनाऱ्यावरचे… आ वासूनी धावून येती अंगावर काळे काळे बागुलबुवांची तरूवर नि झाडेझुडे… थकल्या तनाला , बळ कुठले मिळण्याला,… भीतीच्या काट्याने थडथड  लागली मनाला… राहिले घरटे दूर माझे… त्राण नाही उरले या देहात… जरी उडून जावे करून जीवाचा तो निर्धार…  अर्ध्यावरती  हा डावच संपणार…समीप आलेला अंत ना चुकणार..आणि घरचे माझे नि मी घरच्यांना कायमचा मुकणार… वियोगाची आली अवचित अशी घडी… लागले नेत्र ते पैलथडी… मी जाता मागे घरच्यांना कशी मिळावी माझी कुडी…आठवणीचीं  राहावी एकतरी जुडी..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “पैश्याचं झाडं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“पैश्याचं झाडं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

 राम्या! रग्गड झाली बाबा तुझी शाळासुळा… आरं शाळंत जातुयास कि रोज रोज नवा नव्या खर्चानं बापाच्या सदऱ्याचा खिसाचं फाडतूयासं… आज का म्हनं नवीन वही पायजेल, उदयाला नविन कसलसं पुस्ताकं.. कंपास पेटी, पेन्सल, पट्टी , रबरं, ह्याचं रोजचं विकात घेणं असतयाचं.. काव आला बाबा तुझ्या शाळा शिकण्याचा… आरं लेका शाळतं काय  दुसरं शिकवित्यात कि न्हाई.. का नुसतं उगी आज ते आना आनि हे आना एव्हढ्यावरचं शाळा चालली व्हयं… ते बी शाळा सुरू व्हायच्या टायमाला योकदाच काय ते भाराभर घेऊन दिल्यालं असतानं पुन्हा पुन्हा कसली हि पिरपिर चालूच असती.. कवा संपायची रं हि रटरट.. इथं दिवसरात घाम गाळवा तवा कुठं घराचा खुटाना चालतूया… पैश्याचं झाडं अगदी दारात लावलेलं असल्यागत..मागन्याचं भूत कायमचं मानेवरचं बसल्यालं..खाली उतराया मागना व्हयं…काय गरज लागली कि तोड चारपाच पैश्याची पानं भागीव तुझी नडं असं सांगायला येतयं व्हयं… कष्टाबिगर पैका उगवत न्हाई.. आमच्या सारखं ढोर मेहनतीचं काम तुला पुढं करायला लागु नये म्हनुशान दोन चार बुकं शिकलास तर कुठं बी चाकरी करून चार घास सुखानं खाशिला.. म्हनुन ह्यो शाळंचा आटापिटा करायला गेलो तर गळ्यात हि नसस्ती पीडाच पडलीया बघं.. जरा म्हनुन दम खावा इळभर तर  तुझ्या शाळंचा एकेक नव्या खर्चाचा वारू चौखूर उधळलेल्या.. आम्ही बी शाळंत गेलो व्हतो.. एक दगडी काळी पाटी नि पेन्सल यावरच शिकलो शाळा सुटं पर्यंत.. कधी वही लागाया न्हाई तर कधी पुस्तकाचं नावं न्हाई.. सगळं घोकंपट्टीचा आभ्यास हुता… आजबी समधं हाताच्या बोटावर नि तोंडावर सगळं आपसूकच येतयं… नि तुमचं टकुऱ्यात तर शिरतं न्हाई पन डझनावारी वह्याचीं रद्दी वाढत जाती… आन तु एकला असतास तरी बी काय बी न कसंबी चालवून घेतलं असतं पर एकाला सोडून तुम्ही चार पाच असताना माझा कसा टिकावं लागावा रं.. एक मिळविनार आनि पाचसहा तोंड खानार..समध्यास्नी लिवता वाचता आलं म्हंजे माप रग्गड झालं… तू थोरला हाईस तवा  झाली एव्हढी शाळा लै झाली.. आता कामाधंद्याचं बघुया.. अरं बाबा बाकी सगळी सोंग करता येत्यात पन पैश्याचं सोंग न्हाई आनता येत… आनि त्याचं झाडं बी कुठं लागलेलं नसतयं.. हे तुला आता कळायचं न्हाई.. तू बाप झाला म्हंजी तवा समधं कळंल…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “अकेला हूॅं मैं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“अकेला हूॅं मैं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

होय मी तुला या किनाऱ्यावर आणून सोडलंय!… आता येथून पुढे तुझा तुला एकट्यानेच प्रवास करायचा बरं!… काही साधनं , सोबती मिळतीलही जर तुझ्या भाग्यात तसा योगायोग असेल तर.. नाही तर कुणाचीच वाट न पाहता, कुणी येईल याच्या भ्रामक अपेक्षेत न राहता पुढे पुढे चालत राहणे हेच तुला श्रेयस्कर ठरणार आहे… जसा मी बघ ना जोवर तू सागराच्या जलातून ऐलतीरावरून पैलतीरी जाण्यासाठी  आलो तुझ्या सोबतीला मदतीला… आणि या किनाऱ्यावर तुला उतरवून दिले… मलाही मर्यादा असतात त्याच्या पलीकडे मला जाता यायचं नाही.. जाता यायचं नाही म्हणण्यापेक्षा जमिनीवर माझा काहीच उपयोग नसतो… हतबल असतो..मनात असलं अगदी शेवटपर्यंत साथ द्यावी पण पण तसं तर कधीच घडणार नसतं मुळी… आता आपल्या त्या प्रवासात किती प्रचंड वादळं येऊन गेलेली आपण पाहिली की.. खवळलेला समुद्र, त्याच्या महाप्रचंड काळ धावून आल्यासारख्या प्रलयंकारी अजस्त्र लाटांचे मृत्यूतांडवाशी केलेला संघर्ष…तो माझ्या तशाच तुझ्याही जिवनाचा अटळ भाग होता… आणि तसं म्हणशील तर जीवन म्हणजे तरी काय संघर्ष असतो कधी आपला आपल्याशी नाही तर दुसऱ्याशी केलेला… साध्य, यश तेव्हाच मिळते.. विना संघर्ष काही मिळत नसते… मग सोबतीला कुणी असतात तर कुणी नसतातही… एकट्याने लढावा लागतो हा अटळ संघर्ष…अंतिम क्षणापर्यंत… आभाळाएव्हढी स्वप्नं दिसतील तुला या तुझ्या जीवन प्रवासात… जी हाती पूर्ण आली तेव्हा म्हणशील याच साठी केला होता हा अट्टाहास..तेव्हा आपसूकच ओठांवर हास्य येते आपल्या… आणि आणि दूर कुठेतरी संगीताची धुन वाजत असलेली कानी पडते… अकेला हूॅं मैं. इस दुनिया में… कोई साथी है तो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  प्रतिमेच्या पलिकडले  ☆ “आनंदाचे डहाळी आनंदी सदन” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“आनंदाचे डहाळी आनंदी सदन” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

अगं वेडे स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच बरं… झाडांच्या फांदीवर थाटलयं छोटसं घरकुल खरं… नाही लागायचा  उन्हाचा ताव तो, वारा विसरून गेला  आपण कसा बोचकारतो… पावसाच्या सरी सुता सारख्या एका लयीत छपरावर पाडतो…पिल्लांची काळजी आता नको करायला… एकदाच दिवसभर भटकून आणले अन्न तर पुन्हा पुन्हा नको जायला…. घरकुलात आता आनंद आनंदी भरुन भरून राहिला… किलबिलाटाचे संगीत लागेल वातावरणात घुमायला… रात्रीच्या चांदण्यात पानांची रुपेरी चमचमताना आनंद किती होईल  बघायला… असं वाटतयं आला फिरूनी पुन्हा  सळसळता तारुण्याचा जोष… घ्यावा लपेटून तुला मला तो गुलाबी थंडीचा मधुकोष… किती दिवसाची होती ती मनाला वेडी वेडी आस… असावे सुंदर सुंदर घरकुल आपले खास… इतके दिवस काडी काडी जमवून संसार केला फिरत्या रंगमंचावर…किती गावांच्या वेशी ओलांडल्या नि सारख्या झाडांच्या माड्या बदलल्या…सुखाचा संसार पसाभरच पसरला…अर्धा कष्टात नि अर्धा निवारा शोधण्यात गुंतला… ते कुणीसं सांगुन गेलयं नां भगवान के यहाॅं देर है लेकिन अंधेर नही.. अगदी  बघ पटलयं… आयुष्याच्या उताराला का होईना पण स्व:ताचं  हक्काचं घरकुल मिळालयं…पिल्लांना आकाशाने केव्हाचं आव्हान दिलयं… पंखातलं बळ अजमावयाला   एकट्याने उंच उंच विहार करून दाखव म्हणून सांगितलयं… गेली सारी उडून क्षितिजावरून.. आणि आपण दोघचं उरलो आता या मोठ्या घरात… सोबतीला कुणी असावं असं वाटतयं या सरत्या वयात.. तसा तर योग कुठे असतो आपल्या घराचा.प्रत्येकाच्या नशिबात… बोलवूया त्यां निराधारानां  देऊया मायेचा तो आसरा.. लाभेल आपल्याला द्विगुणित आनंद खरा खुरा… जाताना हे सारं आहे  का नेता येणार… माघारी आपली  आठवण कायमची त्यांच्या स्मृतीत  राहणार… अक्षय आनंदाचा झरा असाच वाहता राहणार…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ जेव्हा शेतात नागीण सळसळली… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ जेव्हा शेतात नागीण सळसळली… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

डांबरी रस्त्याची सडक  जेव्हा गावत नवी नवी आली.. वाटलं काळी नागीणच सळसळ करत चालली…जसा बळीराजाच्या गळ्यात बांधलेला काळा गोफाचा गंडा…तसा गावाच्या गळसरीला चकचकीत काळ्या नागिणीचा कंडा..दोन्ही कडेच्या उभ्या पिकांनी थरथर भीतीने आपली अंग आकसून घेतली.. आणि जी पिकं, तृणपाती नागीणीला मधेच आडवी आली त्यांना आपला फणा उभारून क्षणात आडवे करून गेली… उरलेली लव्हाळी जरळी माना मोडून शरणागती पत्करून भुईसपाट झाली…आडमार्गाचा गाव आला हमरस्ताशी हातमिळवणी करायला… कधीतरी दिवसभरातून एकदा येणारी एस. टी.च्या लागल्या ना चकरा वाढायला… फटफट ती पोलीस पाटलाची नि तलाठ्याची मिजाशीत पळायची तेव्हा.. आता  घराघरातली डौलाने दुडदूडू धावत असते हिरोहोंडावरची नवयौवना…बाजारहाट आठवड्याचा तालुका भरायचा तोच आता ऑनलाईन ऑर्डर करा   माल येईल तुमच्या घरा असं सांगू लागला… शाळा कालेज शिक्षणाची वणवण संपली…घराघरात पदव्यांची प्रमाणपत्रांची तसबिरी लटकली…निशाणी डावा अंगठा निळ्या शाईत साक्षर झाला.. गावाचा विकासाचा सूर्य आता अस्ताला जाण्याचा विसरला…जग आले जवळ किती मुठीत सामावले प्रत्येक हाती… विज्ञानाने साधली प्रगती. .. गावा गावाने आता कात टाकली…आधुनिक वैचारिकतेचे उदंड वारे चोहोबाजूंनी वाहू लागले… सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे…एकदा येणारी संधी आता दारातच ठाण मांडून बसली…यशाच्या पहिल्याच पायरीने अपयशाच्या पायरीला पायतळीच गाडली… यशा सारखे यशच त्याला नाही क्षिती कुणाची… माध्यान्हीचा सूर्य तळपता तळपता पश्चिम दिशेला झुकू लागला…

हळूहळू हळूहळू यशाची धुंदी मनामनावर गारूड करत गेली… अधिक प्रगतीचा सूर्य दुसऱ्या देशात दिसू लागला… आणि आपल्या कतृत्वाचा हिथला वावच संपला…  विमानं डोई  भरभरून उडून गेली परदेशात… ओस पडत गेले गाव आणि डोळ्यातले  दु:खाश्रु माईना  घरा घरात.. विकासाची रोपं पिवळी पडत सुकत गेली कोळपून भुईवर पडली…कधीतरी येतो आंब्याचा मोहर घेऊन वसंताचा ऋतु…अन सारा गाव लोटतो त्याला समजून घालण्यास अरं बाबा ईथं  थांबशील तरी तू… विकास झालाय पोरका तुमच्या शिवाय त्याला कोण विचारणारं तरी आहे का…आता सुखाला चटावलेली मन माघारी फिरणारी असतात का… आणि गावातलं जुनं हाडं गावाची नाळ कापून घ्यायला तयार नसते… अखेरची कुडी या मातीत मिसळून जावी हिच एक इच्छा मनात तिची असते… मागचं सारं सारं एकेक आठवतयं.. पाऊलवाटा, माळरान, मारूतीचं देऊळ, शेताचा बांध, पांदणं…नि आपुलकीची घट्ट माती… जोवर हे सगळं अबाधित होतं  तेव्हा तेव्हा   अन आता डांबरी रस्त्याची सडक  जेव्हा गावत नवी नवी आली तर तर… एखादा चुकार अश्रूचा टिपूस ओघळून जातो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ फूल ज़रा आहिस्ता फेको…… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ फूल ज़रा आहिस्ता फेंको… फूल बडे नाजुक होते हैं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

फुलं आणि मुलं उमलताना सुकोमल असतं… दिसताना तसचं दिसत असतं…ममतेने, प्रेमाने त्यांची काळजी घेणारे हात…मुग्धावस्थेत लालन पालन करणाऱ्यांची असते का त्यांना  साथ… पण हे सगळं प्रत्येकाच्या नशिबात कुठे असते.. भाग्याचा अभंग  खडक परिस्थितीच्या चौकात वाट पाहात असतो त्यांची… अशी दुर्भाग्य पूर्ण बालकांची नि फुलांची… अबोल भावना दोघांच्याही.. एक हाताने चौकात कुठे फुलांची माळ विकावी तेव्हा कुठे मिळणाऱ्या दमडीतून पोटाची खळगी भरावी… फुलांना तरी हट्ट करायला कुठे मिळते स्वातंत्र्य…कधी मूर्तीवर,प्रतिमेवर तर कधी पांढऱ्या शुभ्र वसनातील कलेवर…आजचं फुलणं, सुगंधाची पखरण करणं आणि आणि  संध्यासमयी कोमेजून आपलचं निर्माल्य होणं… काय तर म्हणे निसर्ग चक्र.. आजवरी यात कधी तसुभर बदल झालाय काय?  आणि होईल कसा?… बाल्यावस्थेतील मुलाची निसर्गाच्या नियमाने होत जाणारी वाढ थांबवता येते का?.. परिस्थितीतचा नकाशा मात्र व्यापक नि विस्तृत झालेला… चौकातच जिना और चौकातच मरना अपनी अपनी औकात पहचानना… फुलांच्या माळेने नाकाला सुगंध जाणवतो तो जगणं किती सुंदर असतयं याचा क्षणाचा भास दाखवतो…मला विकुन तुझं पोट भरता येईल… विकत घेणाऱ्याला सुगंधाचा आनंदही देईन माझ्या अंतापर्यंत… पण पण मला काय मिळेल.. चौकातला दगडी कटृटा निर्विकारपणे मुलाला नि फुलाला जवळ बसवून घेत असतो… सिग्नलचा लाल पिवळा हिरवा रंगाचा …थांबा पाहा पुढे जाचा खेळ मांडून बसतो…वाहनांमधले, पदपथावरले माणसांना क्षण दोन आपल्या विश्वातून भानावर या संवेदनशीलता जागरूक ठेवून सजगतेने अवतीभवतचं अवलोकन करा… कुणी गरजु असेल तर त्यास न हिचकिचता मदतीचा हात पुढे करा… हिच खरी मानवता… नाहीतर आहेच आपली कोरडी शुष्क घोषणाबाजी बसवर नि भिंतीवर रंगवलेली.. मुलं म्हणजे देवा घरची फुलं.. झाडं लावा झाडं जगावा… बालकांना शाळेत पाठवा… आणि आणि आणि बालमजुरी करायला लावणं हा समाजाचा शासनाचा नैतिक अध: पात आहे…कायदेशीर गुन्हा आहे…हिरवा सिग्नल लागताच वाहनं बसेस पळू लागतात नि त्यावरील घोषणा पोकळच ठरतात… निर्जीव भिंतीना रंग चोपडून घोषणा गोंदवून घेतात पण त्याकडे माणूस नावाचा प्राणी फक्त बघत नसतो… त्याच्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसतं… रूपायाचं चाफ्याचं  फुलं मात्र दहाच पैश्यालाच हवं असतं… महागाईला धरबंध काही उरलाच नाही हे तत्त्वज्ञान मात्र चौकात मांडायचं असतं…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print