मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ ! नथ एक सौंदर्य आभुषण ! ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ ! नथ एक सौंदर्य आभुषण ! ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

पारंपरिक स्त्री अलंकार आभुषणात नथीचा थाट न्याराच असतो. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत विवाहच्या वेळी सालंकृत कन्यादान करतांना  पायाच्या बोटातील जोडवी पासून डोक्यावरच्या बिंदीपर्यंत सर्व प्रकारच्या विविध नक्षी कलाबुतीने सजलेले अलंकार नि आभुषणाने नटलेली चि.सौ.का. आपण पाहात आलो आहोत. यात नाकातील नथ हा आगळा वेगळा आकाराने छोटेखानी पण तितकाच तो नाजूक नजाकतीने घडवलेला दागिना ,तो त्या स्त्रीच्या सौंदर्यात भरच घालतो. काही वेळा असाही प्रश्न पडतो की नथीमुळे सौंदर्य खुलले आहे कि मुळच्या स्त्री सौंदर्याने नथीची  शोभा वाढली. थोडसं खट्याळ पणे बोलण्याची मुभा घेतली तर असं म्हणता येईल की नाक कसे का असेना… चपटं,नकटं,बसकं,बाकदार, धारदार, अपरं, चाफेकळी, वगैरे वगैरे….चेहऱ्याचा रंग  कुठला का असेना…गौरवर्ण, गहूवर्ण,काळासावळा, ….पण नाकात ती  अडकवलेली नथ मात्र तो चेहरा छान सजवून टाकतो…

नथीचा तो आकडा,एक सोनेरी तार आणि त्यात जडावलेले ते नाजूक लोभस मोती, हिरे,निलमणी,त्यांना एकमेकांना बांधून घेणारे ते छोटे छोटे लाल पिवळे मणी आणि सर्वात मेरु म्हणजे चमचम करणारा तो पाचुचा डाळिंबी  वा हिरा म्हणजे क्या कहना ?…

स्त्रियांचा मुळात नटण्यामुरडण्या चा स्थायीभाव आहे. तशातच नाकातील नथीमुळे भर पडली नाही तरच नवल. मुरकणे म्हणजे काय असते स्त्रियांना सांगावे लागत नाही पण नाकातील नथीचा तो लडिवाळ मारलेला मुरका बघून ….

तसे बघायला गेलं तर नथीसाठी आधी नाक टोचून घेणं आवश्यक ठरतं.. नाजूक नजाकतीच्या  सौंदर्याखाली सुद्धा एक वेदना दडलेली असते पण ती आनंददायी असते.. आता आजकाल चापाच्या सुद्धा नथ बाजारात उपलब्ध आहेत…नथीचं वजन हलकं असलेलं पाहिले जातं म्हणून तर नाकाला झेपेल इतकेच मोती, पाचूची जडणघडण  बघतली जाते नाहीतर नाका पेक्षा मोती जड झाला तर नाक ओघळले म्हणून समजा…आणि ही म्हण रुढ झाली..

…तिकडे उत्तर भारतात नथीनी ,राजस्थान मेवाडात मोठ्या रिंगा असलेले नथीचे प्रकार प्रचलित आहेत…और क्या सौंदर्य खुल जाता है..?

…मला वाटतं आता नथ पुराणास पूर्ण विराम द्यावा .नाहीत तर तुम्ही म्हणाल एव्हढा नथीतुन तीर मारून आम्हाला नवीन ते काय सांगितले?…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कागदी होडी… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कागदी होडी ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

बालपणातला पाण्यात  कागदाची होडी करून सोडणे हा खेळ खेळण्यातला आनंद काही औरच असतो नाही…पूर्वापार हा खेळ चालत आलेला आहे… अरे पाण्यात जाऊ नका भिजायला होईल, सर्दी पडसं होईल असा काळजीपोटी घरच्यांच्या रागवण्याला अक्षतांच्या वाटाण्या लावून हा खेळ खेळण्याची मजा लुटणे हा तर बालकांचा नाद खुळा असतो. बालकांचं कशाला तुम्हा आम्हा मोठ्या माणसांना देखील अजूनही त्यात गंमतच वाटत असतेच की… पाण्याच्या प्रवाहात आपली कागदी बोट अलगदपणे सोडताना किती काळजी घेत असतो, कधी ती पटकन वाहत वाहत पुढे पुढे जाते तर कधी सुरुवातीलाच पाण्यात  आडवी होते भिजते मग काही केल्या ती सरळ होतच नाही ती तशीच पुढे पुढे वाहत जाते.. मन जरा खट्टू होतं..पण चेहऱ्यावर उमलणारा तो आनंद मात्र शब्दातीत असतो… कधी एकट्याने तर कधी मित्र मैत्रिणींच्या सोबत हा खेळ खेळायला जास्त मजा येते… माझी पहिली तुझी दुसरी, त्याची मागेच राहिली तर अजून कुणाची वाटेत अडकली.. नकळतपणे स्पर्धेचं स्वरूप येते.. वेळंचं भान हरपून   खेळात मग्न झालेले मन सगळं विसरायला लावतं.. शाळेची वेळ आणि हा खेळ एकमेकांशी घटट नातं असलेला असतो… अभ्यास नको पण खेळ मात्र हवा अशी  मुलं मुली अगदी बिनधास्तपणे हा खेळ खेळण्यासाठी मागेपुढे पाहत नाही… मग कुणी आई ताई दादा बाबा तिथं येऊन पाठीत धपाटे घालून ओढून नेतात. तेव्हा मात्र मान वेळावून सारखं सारखं पुढे पुढे जाणाऱ्या त्या होडी कडे मन आणि लक्ष खिळलेले असतं.. विरस मनाला होडीचा क्षणैक आनंद पुढे बसणारा  मार नुसता झेलत राहतो.. 

.. खरंतर या खेळातच आपल्या जीवनाचं सारं दडलंय असावं असं मला वाटतं.. प्रवाहात आपली जीवननौका अशीच जात असते… आपण काळजी कितीही घेतली तरी वाटेतल्या प्रवाहात अनेक अडथळे, भोवरे यांना पार करून आपल्याला आपल्या इप्सिताचा किनारा गाठायचा असतो ते ही आनंदाने… हेच तर तो खेळ सुचवत असतो… पण अजाण वयात निखळ आनंदा पुढे हे कळणार कसे… आणि मोठे होते तेव्हा हा आनंदाला विसरणे कधीही शक्य होणार नसते… बालपणीचा काळ सुखाचा आठवतो घडी घडी… पाण्यासंगे पुढे चालली माझीच ती होडी होडी… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ हसताय ना! ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ हसताय ना! ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

…. काय मंडळी हसताय ना? हसलेच पाहिजे. तुमच्या टेन्शन वरची मात्रा,  ईनोदाचे चारवार हास्याचा चौकार. चमत्कृतीचा ईनोद नि शाब्दिक कसरतीवर शारीरिक चमत्कारिक अंगविक्षेप अश्या अनेक क्लुप्त्या दाखवून हसायला लावणारे अनेक टि. व्ही. कार्यक्रम सतत चौवीस तास डोळ्याना सुखवत मुखाला हसवत असतात… दुसऱ्याच्या व्यंगावर (वर्मावर टिप्पणी करून) केलेला विनोदाला हसणे हा मनुष्याचा नैसर्गिक स्वभावच असतो नाही का? रस्त्यावरुन चालणारा अचानक पाय घसरुन पडला तर सगळया पहिले हासतो ते आपण… फजिती, विचका झाल्याचा विकृत आनंदच तो असतो आपल्या हास्यातून बाहेर पडतो.. पण ते का खरे निखळ हसणे असते..पू्र्वी सर्कस येत असत त्यात विविध जोकर उलट्या सुलट्या उड्या आणि कसरती द्वारे प्रेक्षकांना हसवत असत… मेरा नाम जोकर सिनेमा पाहिलेला तुम्हाला आठवत असेलच.. जो माणूस आतून खरोखर दुःखात बुडालेला असतो तोच चेहऱ्यावर आपलं दुख लपवून दुसऱ्याला जास्त हसवत असतो हे ही आपल्याला ठाऊक आहेच की… पण खरी गोष्ट अशी आहे की तो आपल्याला हसवत नसून तो आपल्या आतल्या दु:खावरच हसण्याचा उपाय करत असतो.. हसण्यासाठी जन्म आपुला हे वाक्य जो सतत जपत राहतो त्याच्या पुढे सगळी संकटे दु:ख चार हात लांबच राहू पाहतात. साहित्यिक हलके फुलके नर्म विनोद सगळ्या वाचकांना हसवत असतात, व्यंग चित्र, अभिनयातून साधलेले विनोद, ही सारी उदाहरणे निखळ हास्य निर्माण करतात.. ती अक्षर कलाकृती अक्षय आनंदाचं हास्य फुलवित असते. म्हणून आजही भाईंची सगळी पुस्तकं तेच हास्य देत असतात.. धीरगंभीर प्रवृत्तीच्या लोकांना  विनोदाचं वावडे असल्याने ते तर कधीच हासत नाहीत नि दुसऱ्यालाही हसवत नाहीत.. पण काही काही वेळा तीच माणसं हसण्याचा विषय होउन बसतात… मग हिच माणसं टवाळा आवडे विनोद म्हणून हाकाटी पिटत बसतात…दैनंदिन जीवनातील कंटाळवाणे, नीरस धबगडयात मनोरंजनासाठी चार हास्याचे कण मिळावेत म्हणून तर सिनेमा,नाटक, टि. व्ही. वरील कार्यक्रम  पाहिले जातात..तसं पाहिलं तर विनोदाला कुठलाच विषय वर्ज्य नाही..आदी नाही अंतही नाही… पण ताळतंत्र सुटलेला विनोद हास्य निर्माण करत नाही तर त्या विनोदाची कीव करायला लावतो… हसणं हा जन्मजात गुण मानवाला मिळालेला असून तो आबालवृद्धा़ना  तितकाच हवाहवासा असतो..स्त्रियांवर तर विनोदाला कळस गाठला जातो.तसा नवरोजीही यातून सुटलेला नसतो बरं… थोडक्यात काय विनोदाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्व स्पर्शी असल्याने ते ज्याला लुभावते तोच त्यातून हासू निर्माण करतो… स्वता हसतो नि दुसऱ्याला हसवतो..

… आताच्या काळात तो जूना शब्द प्रयोग ‘हसावे कि रडावे’ आता कुचकामी ठरला आहे.. आता फक्त हसतच राहावे असे वाटते…हल्लीचे राजकारण त्यात अग्रेसर आहे.. त्यामुळे सर्कस, सिनेमा, नाटक बंद पडली आहेत… एकापेक्षा एक धुरंधर विदूषक आपली विनामूल्य मनोरंजनातून हसवत असतात.. मेडिया त्याचं विस्ताराने प्रसिद्धी करण करत असतो, पेपर तर पहिल्या पानापासून ते शेवटच्या पाना पर्यंत विनोदाची विविधता पेरूनच असतो..

… एव्हढी सगळी साधने तुम्हा आम्हाला सतत हसत राहा म्हणून कानीकपाळी ओरडून सांगत असताना आपण हसयाचं नाही?…टिआरपी वाढण्यासाठी तरी आपल्याला हसायला हवं ना?… मग

…. काय मंडळी हसताय ना? हसलेच पाहिजे. तुमच्या टेन्शन वरची मात्रा,  ईनोदाचे चारवार हास्याचा चौकार…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ अस्तित्व… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अस्तित्व… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“.. अगं तारामती !चल चल लवकर पाय उचलत राहा… अजून तालूक्याचं गाव आलं नाही!.. पाच सहा मैलाची रपेट करायची आपल्याला… आपल्या कनवाळू  मायबाप सरकारने यंदाच्या दिवाळी साठी दुर्बल कुटुंबांना दिवाळीसामानाचं पॅकेट देणारं आहेत फक्त शंभर रुपयात….त्या स्वस्त शिधावाटप दुकानातून… आपल्याला तिथं जाऊन नंबर लावला पाहिजे तरच ते आपल्याला मिळेल…त्यासाठी आधी बॅंकेत जाऊन हया महिन्याची स्वातंत्र्य सेनानी पेंशन योजनेतील जमा झालेली पेंशन काढायला हवी… तुला एक खादीची साडी आणि मला जमला तर खादीचा सदरा घ्यायला हवा…गेली दोन अडीच वर्षे कोरोना मुळे फाटकेच कपडे तसेच वापरले गेले आणि आता तेही घालण्याच्या उपयोगी नाही ठरले… यावर्षीची दिवाळी आपली खास जोरदार दिवाळी होणार आहे बघ… एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो तेल, एक किलो डाळ, अंगाचा साबण, सुवासिक तेलाची बाटली हे सगळं त्या पॅकेट मधे असणार आहे… ते आपल्याला मिळाले कि दिवाळीचा सणाचा आनंद होणार आहे… अगं चल चल लवकर… तिकडे बॅकेत किती गर्दी असते तुला ठाऊक नाही का? . मग पैसे मिळाले की त्या रेशन दुकानावर किती गर्दी उसळली असेल काही सांगता येत नाही… “

…बॅकेत पोहचल्यावर त्यांना सांगण्यात आलं…स्वातंत्र्य सेनानीं ची पेंशन मध्ये वाढ द्यायची का नाही यावर शासनाचा निर्णय प्रलंबित असल्याने निर्णय झाल्यावरच पेंशन खात्यावर जमा होईल… तेव्हा पेंशन धारकानी बॅकेत वारंवार चौकशी करू नये… खादीची साडी नि सदरा, दिवाळीचं पॅकेट दुकानात वाट बघत राहिलं… अन पेपरला बातमी आली… सरकारी दिवाळी पॅकेज कडे लाभार्थींनी पाठ फिरवली त्यामुळे सगळी पॅकेटची खुल्या बाजारात  विक्री करण्यास अनुमती दिली आहे…

… रेशन दुकानाच्या पायरीवर ते दोघे थकून भागून बसले.. पिशवीतून आणलेल्या पाण्याच्या बाटलीतले चार घोट पाणी पिऊन तरतरीत झाले…आजही स्वतःच्या अस्तित्व टिकविण्याच्या धावपळीत  त्यांना पंचाहत्तर वर्षापूर्वीचा स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या धावपळीचा भूतकाळ आठवला… तन,मन,धन वेचून देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी योगदान दिले होते… देश स्वतंत्र झाला पण…पण  स्वतंत्र देशाच्या अनुशासनाचे आजही  ते गुलामच राहिले आहेत…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ एक कटिंग चाय… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ एक कटिंग चाय… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… सन 1957चं राजकमल स्टुडिओत गुरूदत्तचं प्यासा चित्रपटातलं… ‘सर तेरा जो चकराये, या दिल डूबा जाये… आजा प्यारे पास हमारे.. काहे घबराए, काहे घबराए… गाण्याचं शुटींगची तयारी होत असताना त्या गाण्यासाठी एक डोक्याला टक्कल असलेल्या  माणसाची गरज भासली… शुटींगचं सगळं  युनीट त्याचा शोध घेण्यास सरसावलं… अख्खा स्टुडिओ पिंजून काढला पण हवा तसा नैसर्गिक टक्कलाचा माणूस मिळेना… त्या वेळेस एक्स्ट्रा सप्लायर्स टूम नसल्याने शुटींगचं बराच वेळ खोळंबून राहिलं… गुरुदत्त नां तो माणूस त्या गाण्यात हवाच होता… तो मिळे पर्यंत त्यांच्या जिवाला चैन नव्हती… जाॅनी वाॅकर आणि गुरूदत्त  फ्लोवर बसून एक कटिंग चहाचे प्याले  घोट घोटाने घेतं…  पहिला दुसरा, तिसरा रिचवत राहिले.. स्पाॅट बाॅय, चायवाला, गाडीचे ड्रायव्हर यांना सुध्दा  राजकमल स्टुडिओच्या बाहेर पिटाळणयात आलं… ‘और जो ऐसे शख्स से धुंड के लायेगा उसे बडा इनाम मिलेगा’ असही सांगण्यात आलं… सगळेच झटून कामाला लागले… आणि आणि तासाभरातच आत्माराम गावकर नावाचा टक्कल असलेला माणूस कुणा सोबत तिथे आणला गेला… लगेचच एक चाय का प्याला त्यांच्या आणि ज्यांनी त्यांना आणलं त्यांना स्वता गुरूदत्त नि जाॅनी वाॅकर यांनी दिला… चहा पान झालं.. . कायं करायचं याची कल्पना गावकरांना दिली… एकदा दोनदा रिहर्सल्स झाली… शुटींग सुरू झाले, लाईट , कॅमेरा, साऊंड ऑन आता अक्शन म्हटले… एव्हढ्या त्या प्रचंड गोंधळात आत्माराम घाबरून गेले… काय करायचं कसं करायचं हे त्यांना सुचेना… आपलं हे काम नव्हे आपण आताच येथून बाहेर गेलेलं बरं म्हणून पळ काढावा.. असं त्यांच्यात मनात आलं आणि तिथून ते बाहेर पडले.. पुन्हा शुटींग थांबवलं… गुरूदत्त नि जाॅनी वाॅकर नी त्यांना धीर दिला..एक कटिंग चहा दिला… घाबरून जाऊ नका काहीही होणार नाही… फक्त मी तुम्हांला बसवून मालिश करणार आहे ते तुम्ही करून घायचं ईतकचं… गाणं संपले कि झालं… फिरून गावकरा़ंची मानसिक तयारी झाली…लाईट कॅमेरा.. ॲक्शन पुन्हा तेच घडलं… मग परत परत तसचं घडत गेलं… दरवेळेला कटिंग चहा दिला जायचा.. तरतरी यायची भीती कमी झाली असं वाटायचं … असे बरेच टेक झाले शेवटी निदान एका कडव्या पुरता का होईना  पण शाॅट घेण्याचा ठरला आणि तोही त्यांच्या नकळत… थोडे लाईट अंधूक लावले गेले… आता गावकरांनी पण मनाचा हिय्या केला… आता हिथं न थांबता ताबडतोब बाहेर निघून जायचं… जाॅनी वाॅकरनीं गाण्यात त्यांच्या हाताला धरलं होतं तो हात सोडून तिथून धावतच ते निघाले… ते आपल्या घराकडे येईपर्यंत मागेसुद्धा जरा वळून न बघता… घरात येताच त्यांची बायकोने विचारले, “खयं गेला व्हतास? चाय कधीची करून वाट बघत रव्हली मी…”

“आनं तो चाय हडे नि ओत तो माज्या टकलावर.. ” गावकर चिडले… आज त्यांना एक कटिंग चाय आपली पाठ सोडत नाही हेच समजले…

… प्यासा थेटरला लागला गावकरांनी बायको सोबत पाहिला… विषेश ते गाणं बघून दोघांना आनंद वाटला…

सिनेमा संपला नि सौ. गावकर  म्हणाल्या “गाणं संपे पर्यंत तरी फुकटची  तेल मालिश तरी करुन घ्यायची व्हती… निदान शेवटाक बिदागी तरी मिळाली असती… हया कामाचे तुमका काय मिळाला?”

“एक कटिंग चाय…” गावकर  कसनुसं तोंड करत म्हणाले…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ फुटबॉल विश्वचषक 2022… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

फुटबॉल विश्वचषक 2022… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

किलियन एम्बापे यास,

मानाचा मुजरा.तो अंतिम सामना विश्वचषक जेते पदासाठी तु आणि तुझ्या संघाकडून खेळला गेला त्याला तोड नाही.. प्रतिपक्षाच्या संघाकडून दोन गोल करून जे नैतिक दडपण आणले गेले , आणि हे ही तितकेच खरे आहे कि जो संघ असे गोल करतो तोच या सामन्याचा जेता दावेदार ठरतो हा इतिहास आहे, आणि हे ही तितकेच खरे आहे कि आजवरचे झालेले अंतीम सामने हे उभय पक्षात एकांगी झाले होते.. खरी लढत, त्या खेळातला तो शेवटच्या क्षणापर्यंतचा थरार फार क्वचितच अनुभवायला मिळाला होता. त्यावेळी बडे बडे दिग्गज नामांकित खेळाडूंचा कस लागणारी खेळीचं उत्कंठेचे समाधानही म्हणावं तसं लाभलं नाही.. अटीतटीच्या लढती झाल्या असतील पण आजच्या या लढतीचा अविस्मरणीय थरारची नोंद इतिहासात प्रथमच होईल.. दडपण आणि स्पर्धेतला खेळ यांचाच मिलाप कायम मैदानावर असतो त्यात अंतीम सामना आणि तोही विश्वचषकाचा असेल तर खेळाडू, तिथे जमलेले खेळाचे चाहते, जगभरातले चाहते इ्. इ. चें काळजाचे ठोके क्षणा क्षणाला वाढवत नेणारा तो माहोल असतो. असं सारं काही या अनुभवाची शिदोरी तुमच्या जवळ होती ती कालच्या खेळात अटीतटीच्या लढतीत दाखवून दिलीत.. कुठल्याही प्रकारची त्या खेळाची गोलाची आकडेवारीत, जी सर्वांना विदीत आहे, त्या तपशिलात न जाता, त्याचा थरार आणि थरारक खेळाचं कौतुक तुझं आणि तुझ्या संघाचं करावं तितकचं थोडं आहे.. जिंकणं हाच ध्यास तिथं दोन्ही बाजूला दिसत होता…मानवी प्रयत्नाला दैव देखिल साथ देते याची प्रचिती सुद्धा पदोपदी जाणवत होती.. नव्हे नव्हे ते दैव सुद्धा काही काळ स्वताला हरवून त्या खेळाचा थरार बघण्यात मश्गुल झाले असावे असेच वाटत होते.. इतका सुंदर तोडीसतोड खेळ, त्यातील पदलालित्य, गती, आवेग, शह, काटशाह, ऐनवेळेस बदल केलेली चाल, प्रतिचाल, गोलाचं लक्ष्य, ॲटक डिफेन्स, अश्या अगणित गोष्टींवर त्या वेगवान हालचालीत भानं ठेवून शांत डोक्यानं खेळायचं हे येरागबाळयाचं काम नाही..म्हणून तर अख्ख जगं या खेळानं खुळावले आहे..महासागराला देखिल मागे टाकले जाईल त्याहून कितीतरी प्रचंड चाहत्यांची संख्या हि जगभरात आहे आणि तिला ओहोटी हा शब्दच ठाऊक नाही.. इतकंच नाही तर राष्ट्रप्रमुख सुद्धा या खेळाचे चाहते, प्रेमी असावेत, आपल्या देशातील खेळाडूंचा खेळ पाहण्यास आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्ष हजर असतात, हरलो तरी पाठीवर हात फिरवतात,उमेद देतात,हे पाहून देशभिभानाने उर भरून येतो.. मी देशाचा आहे आणि मी देशा करता खेळतो तेव्हा केवळ नि केवळ खेळावरच ध्यानकेंदीत झालेलं असतं.. अर्थात खेळ आहे तिथं हार जीत हि असायचीच, वेळेची मर्यादेची चौकट आणि जेता ठरवण्याचा निकषाचे पालन करुन विजेता हा ठरविला जातो..म्हणून काही जो जीता वही सिकंदर असा पूर्वापार प्रघात असला तरी हारणारा हा काही लेचापेचा नसतो.. हेच तुझ्या खेळातून तू दाखवून दिलेस.. भले त्या क्षणी तुझ्या मनात सामना हरल्याचं शल्य मनात टोचत असेल पण म्हणून तू दिलेली अखेर पर्यंतची लढत कमी मोलाची ठरत नाही.. सरतेशेवटी हा खेळ आहे.. एखादी खेळातील चुकचं सगळा खेळाचं पारडंचं बदलून टाकण्यास कारणीभूत होते. तो क्षण आपला नसतो..आपल्या हातात काहीही उरलेलं नसतं आणि शल्य मनात टोचत राहतं.. समजूती चे कोरडे सोपस्काराने मन शांत होत नाही, निवळत नाही.. अगदी खेळ संपल्यावर चाहत्यांकडून नि राष्ट्राध्यक्षांकडून सुद्धा मैदानावर येऊन पाठीवरून हात फिरवून सांगितले तरीही.. तुझा शांत आणि निराश चेहरा हेच दाखवत होता..

किलियन, मला या खेळातलं ओ कि ठो काही कळत नाही पण का कुणास ठाऊक तो गोल झालेला जेव्हा दिसतो तेव्हा मी पण आनंदाने टाळया वाजवतो.. फक्त विश्वचषकाचे सामने कधी कधी पाहतो.. आणि या खरा खेळयातील थराराचा अनुभव घेतो.. जे त्याच्या खेळाचं कौतुक होतचं होतं पण तितक्याच तोलामोलाच्या प्रतिस्पर्धीचं कौतुक मला करावसं वाटतं.. मला प्रत्यक्षात तुझ्या पाठीवर थाप दयायला आनंद वाटला असता पण ते अशक्य असल्याने या पत्राद्वारे ती थाप तुला पोहचवतं आहे…

.. सातत्यपूर्ण सराव, खेळा प्रती देशाभिमान, उंचावलेला आत्मविश्वास, नि सांघिक डेडीकशन या सर्व गुणात्मक गोष्टीनी परिपूर्ण असलेला खेळाडूच अशी देदीप्यमान कामगिरी करू शकतो हेच दोन्ही बाजूच्या संघानी जगाला दाखवून दिले आहे… एका रात्रीत चमकते सितारे जन्माला येणाऱ्या माझ्या देशाला तूम्ही आदर्श घालून दिला आहे.. आम्हाला पचनी कधी पडेल तो सुदिन कधी उगवतोय याची वाट पाहत आहे..कारण मी जिथं राहतो तिथं क्रिकेट आणि राजकारण हाच देशाचा प्रमुख सर्वव्यापी खेळ आहे.. आणि बाकी सारे त्यापुढे तुच्छ आहे.. हाच तुझ्यात आणि माझ्यातला मोठा फरक आहे.. असो.

यदाकदाचित मी फ्रान्सला आलो तर मी निश्चित तुझी भेट घेईन पण ते जरा अवघडच आहे.. पुढचा फुटबॉल विश्व चषकावर तुझंच नाव कोरलेलं बघायला मिळेल हि सदिच्छा करुन हे पत्र पूर्ण करतो..

तुझा एक चाहता

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ सात सुरांची साथ नव्यांची… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ सात सुरांची साथ नव्यांची… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… तू जो मेरे सुर मे सुर मिलाके, संग गाले, तो  जिंदगी हो जाए सफल… सा रे ग म प ध..नी सा… ये म्हणा कि गं तुम्ही पण माझ्या बरोबर.सात सुरांची साथ नव्याची ऑडिशनला आपल्याला उदया जायचयं! आहेना लक्षात? आपल्या सातही जणींची  फायनला निवड पक्की होणारच.केशरबाई तू काळी दोन मधे सुरु करशील.पिवळाक्का तुम्ही काळी चार घ्या बरं. उदयाचा विठूचा गजर टिपेला न्या. तुम्ही दोघी करडू दिदी  यमनचा षड्ज द्रुतलयीत लावाल. मी आणि ग्रे ताई मालकंस नि भैरवी ने मंद्र सप्तकात सांगता करू.

…परिक्षक कोणी असले तरी आपण घाबरायचं नाही. घाबरायचं त्यांनी आपल्याला. एक सुरात म्याँव म्याँव करून त्यांना सळो कि पळो करु.पायात घुटमळत राहू.तोंड पुसत पुसत त्यांना आपली निवड करायला भाग पाडू.नाहीतर अंगावर फिस्कारुन येउ म्हणावं हि धमकी देऊ.आमच्या शिवाय स्पर्धा होणे नाही!आम्ही नसलो तर स्पर्धा उधळून लावू. इतकंच नाही तर विजेते आमच्यातलेच असतील.बाहेरचा कुणी दिसलाच तर स्पर्धेत फिक्सिंग झाले असण्याचा संशयाचा धुरळा मेडियात उडवू देउ अशी तंबीच त्यांना देउ या; आणि आपले सगळेच नंबर आले तर स्पर्धा खेळी मेळीत निकोप वातावरणात झाली,उदयाच्या नव्या गायकांना प्रोत्साहन प्रेरणा अश्या स्पर्धेतून मिळते,म्हणून अश्या स्पर्धा सतत होणं गरजेचे आहे असं मेडियाला मुलाखत देताना तोंड फुगवून सांगूया.यातूनच जे आयोजक, ठेकेदार यांचे उखळ कायम पांढरे होत जाईल. टीआरपी वाढला कि स्पर्धेचे एपिसोड वाढतील.चॅनेल वाल्यांची चांदी आणि नव्या गायकांची एक्सपोजरची नांदी होईल.तेव्हा उदया

“… सारे के सारे गा मा के लेकर गाते चले….”  कोरस हम साथ साथ मे म्हणू या… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पिकलेपण… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

अल्प परिचय 

शिक्षण – B.A. (Hons.) Mum. Uni.  अर्थशास्त्रातील पदविका

जन्म – 02/06/1958 – निपाणी

दी सांगली बँकेत1979 पासून- कारकून पदाने सुरू झालेली कारकीर्द. 2011 रोजी सीनियर मॅनेजर पदावरून आय.सी.आय.सी.आय बँकेतून (विलींनकरणा नंतर) निवृत्त. सध्याचे वास्तव्य विश्रामबाग सांगली.

निवृत्ती नंतर लेखन सुरु केले. कथा, ललित लेखन,पहिला चहा (स्फुट लेखन), चित्र कथा सारखे लेखन.विविध लेखन स्पर्धेत सहभाग आणि यशस्वी मानाकांने प्राप्त. दिवाळी अंकातून कथांना प्रसिध्दी. ‘कथारंग’ पहिले पुस्तक प्रसिध्द.

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ पिकलेपण… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

(एक नवीन सदर  – ‘प्रतिमेच्या पलिकडले’, चित्रकाव्य प्रमाणेच परंतू गद्य लेखन)

… जे जे पेरतो  ते तेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे ,हे तर तुम्हा आम्हा सर्वांना विदीत आहेच…प्रत्येक भागातली अशी सुफलाम भूमी हि सोन्याची खाण असणारी भूमी वाटतं असते…निसर्गाचे वरदान लाभलेली , नदी, नाले, ओढे ,तळी, बावी ,विहिरी जलाने तुडुंब भर भरून वाहू लागल्या की कृषीवलाच्या चेहऱ्यावर आनंद पसरवते. जे पिकतं ते सोनच असतं…उन्हाळातल्या मशागतीपासून रोहिणीची वाट पाहात मृगाची सरीने भूमी भिजली कि पहिला उगवणारा आशेच्या हिरव्या हिरव्या कोवळ्या कोंबाकडे पाहून कृषिवल त्याची निगराणी करत जातो..श्रावणातल्या हिरवाईने  वसुंधरा शालूने सलज्ज नवथर नवयौवना दिसते…आश्विनला ती परिपक्व होते.. हिरवे पणा च्या जागी पिवळेपणाची परिपक्वता येते… जीवन परिपूर्ण झाले या कृतार्थतेने समाधान तिथे विलसत असते.पश्चिमेचा वारा वाहू लागतो आणि त्यावेळी उभ्या असलेल्या शेतातील पिकाचे तुरे डोलू लागतात. जणू काही सृष्टीचे गुणगान गात असताना मग्न झालेले दिसतात… आता लवकरच आपलं या भुमीशी असलेलं नातं संपणार आहे.. ही मोहमाया  सोडून जायचे दिवस आले आहेत.. आसक्ती पासून मुक्ती मिळवायची हीच वेळ आलेली असते…

… अन् आपली सर्वांची जिवनानुभवता याहून काही वेगळी असते का? पिकलेपण म्हणजे अगणित कडू गोड अनुभवांची संपन्नता नसते काय? हा अनमोल सोनेरी विचारांचा ठेवा पुढील पिढीला  द्यायचा हेच सुचवत नसते काय? पिकलेपणात सोनेपण दडलेलं नसते काय?

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print