मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “वन्ही तापला तापला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“वन्ही तापला तापला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

पूरे करं बाबा आता तुझं असं आग ओकत राहणं… नाही रे नाही होतं आम्हाला हा ताप सहन करणं… त्या तुझ्या कडकडीत उन्हाच्या झळीने सावल्या देखिल करपून गेल्या… हिरव्या लता झाडाझुडांच्या फांद्या फांद्या भेगाळल्या.. नदी नाले ओढे बावी तळी विहिरी कोरडी कोरडी ठाक कि रे झाली… पाण्याच्या एका थेंबासाठी आसुसली भुमी नि माणसं राहिली तहानलेली… भेगाळलेल्या शेतामध्ये फुले निवडूंगाचा लाल बोंड… खायला चारा नसे पाणी नसे पिण्याला सुकून गेली सारी सारी तोंड… अविचाराने करत आलो निर्सगाचा र्हास तो आम्ही… त्याचीच फळे भोगतोय कि रे जन्मोजन्मी… हालेना झाडाचे ते पान वारा देखील रागावला.. जणू होळीचा तो वणवा वणवा गावातून नाही अजूनही शमला… निळ्या आभाळाच्या छताला भास्कर तो सदा तळपला… साऱ्या सृष्टीचा जीव तो व्याकुळला…

… जरा थांब तू घेशील सबुरीने.. देतो तुला वचन गळाशपथेने.. करीन सांभाळ वसुंधरेचा लाविन एकेक झाड..निश्चिय करतो हिरवाई आणायचा…विचाराला देईन कृतीची जोड.. तुझे रूप तुला मुळचे आणीन पुन्हा तू चिंता सोड… पण पण तू आता आवरते घे रे तापण्याला…अंगी अवसान गळपटले ते शिक्षा भोगण्याला… तू आमची मायबाप मग चुकले माकले लेकरू तुझे त्याला तू क्षमा नाही करणार तो कोण करणार सांग बरे आम्हाला…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “एल्गार…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“एल्गार…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

सप्त अधरातून सुर ते निनादले…

समुह गायनातून शब्द पेटून निघाले..

जोश गीताचा अर्थ भावनेचा पेटूनी उठलेला…

अन्यायाला वाचा फुटूनी डोळ्यात अंगार फुललेला…

भडकली माथी गात्रं झाली लालीलाल…

कवितेने फुंकले रान पेटले सारे भवताल..

जो तो करी क्रांतीचाच जयजयकार…

उठा उठा जागे व्हा हिच वेळ आहे…

क्रांतीचे शंख फुंकताच संघटीत होण्याची…

उलथवुनिया देण्या जुलमी सत्तापिसाटा़ंचीं

चेतवूया स्फुल्लिंग मना मनात…

उधळला वारू संघर्षाचा फडकवित

जरीपटका एल्गाराचा…

अटकेपार रोवायाला आता नाही सवड त्याला थांबायला..

घुसळले वारे क्रांतीचे  माणसांचे जग ते हादरले…

अशी ही आहे का बंडखोरीची भावना दडलेली आपल्यात..

आज प्रथमच  मनाला  मनातले स्फुल्लिंग जाणवले…

सप्त अधरातून सुर ते निनादले…

समुह गायनातून शब्द पेटून निघाले..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “आत्मनिर्भर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“आत्मनिर्भर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… अजुन किती पैसे पैसै करतेस गं…पाकिट तर केव्हाच रिकामं करून झालं… शर्टाचे नि पॅंटचेही खिसे सगळे झाडून झाडून दाखवले… आता माझ्या जवळ एक दिडकी देखील शिल्लक ठेवली नाही… नोकरी धंद्याचा माणूस मी ,मलाही काही किरकोळ खर्च वगैरे रोज करावे लागतात कि … आणि तू तर मला कफ्फल्लकच करून सोडलसं… तरी बरं तुला महिन्याच्या पगाराचा नि त्यानंतर केलेल्या सततच्या मागणीनुसार दिलेल्या पैशाचा हिशोब कधीच मागितला नाही… आणि इनमिन  दोघचं आपण नवरा बायको घरात राहत असताना  एव्हढे भरमसाठ पैसै लागतातच कशाला.. त्यात माझं दिवसाचं जेवणखाण, चहापाणी तर बाहेरच्या बाहेर निपटत असतं…ती तुझी सतरा महिला मंडळ, अठरा भिशीची वर्तुळं, किटी पार्टीची महिला संमेलनं, साडी ड्रेसेचे सतराशेसाठ exhibitions…गेला बाजार  माॅल मधील शाॅपिंग,अख्खं टाकसाळ जरी तुझ्या हाती दिलं तरी तुला ते कमीच पडेल… आणि आणि एव्हढी ढिगानं ढिग खरेदी करूनही कुठल्याही समारंभासाठी म्हणून नेसण्यासाठी एकही साडी तुझ्याकडे कधीच नसते…याबाबत तु कायम चिंतित राहतेस… मला ते दर वेळेला न चुकता ऐकवून दाखवतेस.. यावर मी काही आहेत त्या साड्यांमध्ये सुचवू पाहतो तेव्हा वसकन अंगावर येत म्हणतेस शी या कार्यक्रमाला असल्या साड्या काही उपयोगाच्या नाहीत.. त्याला ती तसलीच हवी… मागच्या वेळी माझी घ्यायची राहून गेली… आता ती साडी नसेल तर मला काही या कार्यक्रमला जायला लाज वाटेल बाई… म्हणजे थोडक्यात काय आली नवी खरेदी… मी आता असं करतो साड्यांच्या दुकानातच नोकरी करतो.. म्हणजे निदान तुला साड्यांचीं चिंता कधीच भेडसावणार नाही…

… तुम्ही सारखं सारखं माझ्या साडीवर काय घसरताय… तुम्हा पुरुषांना त्यातलं काय कळणार म्हणा… आणि तुम्ही दिवसभर ऑफिस मध्ये असता मग मी काय घरी बसून माश्या  मारू… विरंगुळा म्हणून महिला मंडळ, भीशी क्लब, किटी पार्टी, यातून चार शहाण्या , हूशार बायकांच्या सहवासात काढते… कितीतरी नवी नवीन गोष्टी कळतात…आजं जगं कुठं चाललयं आणि आजची महिला कुठे आहे… याचं वास्तवातलं भान येतं… तो आपल्या केंद्र सरकारने केलेला महिला आत्मनिर्भर चा कायदा आता मला चांगलाच समजलाय बरं… सारखं सारखं उठसुठ तुमच्या कडून किती दिवस पैश्यासाठी याचना ती करावी म्हणतेय मी… मलाही वाटतं आता आपण आत्मनिर्भर व्हायला हवं… आणि आणि तुम्ही मला ते तसं होऊ देण्यास तयार असायलाचं हवं… नाही का?.. मग देताय ना दर महिन्याला माझे म्हणून खास   आत्मनिर्भरतेचे पैसे…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “आवाज दे कहा है…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“आवाज दे कहाॅं है…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

..”अगं अल्के! तू मला काही विचारू नयेस आणि मी तुला सांगू नये अशी गत झाली आहे बाई अलिकडे माझी… आताच पाहते आहेस ना.. तुझ्या डोळ्यासमोरच त्यांचं काय चाललं आहे ते… अस्सं सारखं दिवसरात्र याचं पिणं चालूचं असतं घरात… जळ्ळा मेला काय तो करोना आला आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याचं मातेरा करून गेला बघ… त्यावेळेपासून याचं वर्क फ्राॅम होम जे सुरू झालयं ना तेव्हा चोवीस तास त्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसतात.. सारखा सारखा दहा दहा मिनिटाला चहाची ऑर्डर सोडत असतात… घर नाही तर कॅन्टीनच करून ठेवलयं त्यांनी.. आणि मला सारखी दावणीला जुंपून ठेवलीय त्यांनी… हक्काची बायको आहे मी त्यांची पण पगारदार मोलकरणीसारखी नाचवत असतात हरकामाला…पूर्वी ऑफिसला जात होते तेव्हा बरं होतं बाई.. आठवड्यातून एकदा सुट्टीच्या वेळेला काय तो  पिटृटा पडायचा.. पण आता हा माणूस चौविसतास घरात असतो त्यानं मला अगदी विट आलाय बघ… बाईच्या जातीला थोडा आराम, मनासारखं काही करु म्हटलं तर कसली सोय उरली नाही… हौसमौज तर केव्हाच केराच्या टोपलीत गेली… मगं अती  झालं नि हळूहळू आमच्यात तू तू मै मै सुरू झालं…घरं दोघाचं आहे.. जबाबदारी दोघांनी सारखी घेतली पाहिजे असं सगळ्याची समसमान वाटणी करुन घेऊया म्हटलं तर मला म्हणाले , मी इथं असलो तरी ऑफिसात असल्यासारखेच आहे असं समज.. जसा ऑफिसला जात होतो.. उशीराने घरी येत होतो कधी कधी पार्टी करून येत होतो अगदी तसचं वागलं तर मला ऑफिसात काम केल्याचा फिल येईल… त्यावेळी लाॅकडाऊन असल्याने बाहेर जाऊन असले काही थेरं करता येत नव्हती पण जसं लाॅकडाऊन बंद झालं पण ऑफिसने मात्र काॅस्टकटिंगच्या नावाखाली ऑफिसची जागाच विकून टाकली आणि सगळयांनाच  वर्क फ्राॅम होम सुरू करायला काय सांगितले… तेव्हा पासून रोजची यांची संध्याकाळ एका पेगने सुरू झाली… आणि हळूहळू हळूहळू आता  खंबा पर्यंत   पोहचली बघं.. मग कसली शुद्ध राहतेय… रात्रभर पेगवर पेग ढोसणं तोंडी लावायला चणेफुटाणे कधी काही.. आणि मग तर्र झालं कि तसचं लुढकणं.. सकाळी उशिरापर्यंत झोपणं.. हॅंगहोवर झाला कि तोंडाचा पट्टा सुरू करणं कि परत उतारा म्हणून पेग घेणं.. चढत्या क्रमानं वाढतं जातं… तरी बरं घरात आम्ही दोघचं असतो.. मुलबाळं, मोठं कुणी असतं तर शोभायात्राच निघाली असती… अलिकडे या बेसुमार नि बेताल पिण्या पुढे बायको देखील त्यांना ओळखेनाशी होते बऱ्याच वेळेला..कधी कधी अति पिणं झाल्यावर मलाच डोळा मारून सांगतात जानू चल माझ्याघरी… आय लव्ह यू व्हेरी व्हेरी मच… ती घरवाली नुसती कामवाली झालीयं.. तिच्यात तुझ्यासारखा काही चार्म राहिला नाही… असं बरळत असतात… आणि पुढे कुठेतरी सोफ्यावर पडून जातात… असं हे रोजचचं चाललंय बघं… माझा आयुष्याचा तमाशाच झालायं… सुदैव इतकं कि त्यांची नोकरी अजून शाबूत आहे… म्हणून घरं तरी चालतयं.. पण किराणाच्या बिलापेक्षा बाटलीचं बिलं कैकपटीने जास्त येतेयं… बाटल्यांचा हा खच पडतो आठवड्याला… चुकून मागच्या आठवड्यात दोनचार बाटल्या कमी झाल्या असतील नसतील.. तर त्या दिवशी कचरेवाल्यानं विघारलं देखील बाईजी इस हप्ते बाटली बहुत कम दिखती है…साब ने पिना छोड दिया लगता है… अरे ऐसा हमरा नुकसान मत करो भाभी… ‘आता सांग काय म्हणू मी या दुर्देवाला…सगळं ऑनलाईन मिळतं असल्याने बाहेर कुणाला कसलीच शंका येत नाही बघ.. आणि सोसायटीत आता याचंच तेव्हढेच वर्क फ्राॅम होम असल्याने बाकी सगळे ऑफिसला बाहेर जातात…तसं घरीही कुणाचं येणं जाणही नसतचं मुळी..म्हणजे घरी याचचं राज्य..अख्खी सोसायटी यांच्या या सुखी माणसाबद्दल असुयेने बघतात… . आणि त्या शेजारच्या पाजारच्या साळकाया माळकाया तर मला बघून सारखं नाकं मुरडत असतात… काय नशिबं एकेकीचं.. सगळं काही सुपात नि सुखात देतो देव त्यांना नाहीतर आपलं बघा.. मेला हा जन्म नकोसा करून टाकलाय या संसाराने… अगं अल्के  तुला सांगते… दिसतं तसं नसतंच मुळीच.. जावं त्याच्या वंशा म्हणजे कळतील त्या यातना… अगं अल्के मला तर बाई घरी कुणाला बोलवायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो.. हा माणूस कधी कसा बरळेल काहीही सांगता येत नाही… तरी बरं जास्त पिणं झालं कि यांची जीभ जड होते समोरच्याला त्यांचं बोलणं स्पष्ट कळतं नाही तेच बरं… मला आता त्याची सवय झाली आहे.. त्यामुळे मला सगळं बोलणं कळतं… आता हेच बघ.. इतकं पिणं चाललयं तर मला डोळा मारून सांगतात कि त्या स्विटहार्ट चा मोबाईल नंबर  मला देशील काय? म्हणजे तुझा नंबर त्यांना हवा आहे… आता सांग मी हसावं कि रडावं यांच्या पुढे नि माझ्या नशिबापुढे… मला वाटतं तू फार वेळ थांबू नये.. तू आता निघालेलं बरं… माझं कायं रोज मरे त्याला कोण रडे… पण बरं वाटलं बऱ्याच दिवसांनी कोणीतरी माझी आपुलकीने चौकशी केली!…मोहर गळून गेलेल्या वसंत ऋतूतल्या आम्रवृक्षासारखं जिवन झालयं माझं!… कोकिळाच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत विराणी गात बसलेल्या कोकिळेसारखं!. “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “फसले गं बाई मी फसले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“फसले गं बाई मी फसले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

फसले गं बाई मी फसले… कायमची फसले…प्रेमविवाह का म्हणूनी केला… त्याच्या दिलेल्या शपथा, आणा भाका प्रीतीच्या अनुनायाच्या होत्या त्या सगळ्याच भुलथापा… कशी कळेना कुठल्या धुंदीत मी त्याला हो म्हणूनी बसले.. अन आता लग्नानंतर डोळे ते उघडले… होता तो आभास सारा  माझ्या मनी सत्यचं  भासला… पण वेळ गेल्यावर लक्षात आले… फसले गं बाई मी फसले… कायमची फसले… जानू तुला काय हवं ते मी दयायला तयार आहे… गाडी,बंगला, सोनं नाणं, नोकर चाकर, बॅंकेत बिग बॅलन्स.. सारं सारं काही तयार आहे…या खेरीज अजुन तुला काही हवं असेल तर हा चाकर आणायला एका पायावर उभा आहे.. अगदी आकाशीचा चंद्र, तारे हवे असल्यास ते सुद्धा मी तुझ्या ओंजळीत आणून टाकतो… पण पण.. आपण आता लग्न मात्र लवकरच करूया… माझ्या घरचे सारखे मला टोचत असतात  वश्या तुझ्या प्रितीचा मोहर तर कधीचा बहरलाय आता त्याला फळं कधी दिसणारं… आम्ही बाबा आता थकलोय बघ.. घरात आम्हाला निदान पाणी पिण्यास देणारी सुन लवकरच आण… या घराची घेउन टाकू दे सगळीच जबाबदारी एकदा म्हणजे आमच्या जिवाला स्वस्थता लाभेल आमच्या… असं त्याचं  त्यावेळी च्या भेटीत सारखं सारखं टुमणं असायचं… मग मीही मनांत म्हटलं.. नाहीतरी असं चोरुन चोरुन किती दिवस बाहेर भेटायचं.. कधीतरी त्याच्या अंतरंगात आणि आपल्या हक्काच्या घरात नि माणसात राजरोसपणे कधी राहयाचं.. विचार केला पक्का आणि माझ्या घरच्यांनीही त्यावर मारला होकाराचा शिक्का..एका क्षणात मी मिस ची मिसेस झाले आणी आणि..हवा भरलेले फुगे फुटत जावेत तसे नशिबाचे फुगे फुटू लागले… मी बरचं काही मिस केलेली मिसेस झालीयं असं लक्षात आलं… आणि याचा राग कधीतरी काढायचा असं मनाशी ठरवलं… होयं हो माझंही त्याच्यावर खरंखुरं प्रेम असल्यानं मलाही आता हे सारं निभावून नेणं भाग होतचं.. खऱ्या प्रेमाची किंमत मोजणं सुरू झालं होतं.. त्यालाही कळावी  प्रेमात लबाडी केलेली किंमत  काय असते ती… शाॅंपिग माॅलच्या भरमसाठ खरेदीसाठी त्याचा खिसा पाकिटाचा, एटीएम चा खुर्दा सुफडा साफच करून टाकण्यासाठी.. खरेदीची बाडं ची बाडं दिली त्याच्याकडे सांगितलं  हे तुला निट सांभाळून घरी न्यायचं बरे…तु त्यावेळी मला दिलेल्या भुलथापांची शिक्षेचा हा ट्रेलरचं दाखवला आहे बरं… आता इथून पुढे मेन पिक्चर सुरु होईल आपल्या संसारात आणि तो खरा खराच असेल… आपल्या प्रिती मधे आता खोट्याला कधीच थारा नसेल… पाहिलासं का तो आकाशीचा चंद्र कसा हसतोय गालफुगवून लबाड पाहतोय आपल्या कडे कसं बनवलं तुला म्हणून चिडवतोय मला… मला तो चंद्र देखील हवायं तू मारे त्यावेळी म्हणाला होतास तुझ्यासाठी हवा तर आणून देतो मग आता का मागे सरकतोस… अरे बोलना काहीतरी मगापासून मीच बोलतेय आणि तु ढिम्मच आहेस कि.. जानु माझ्यावर रागावलास..

.. नाही जानु तुझ्यावर आता रागावणार नाहीच मुळी… रागावलोय फक्त मी माझ्यावर.. त्यावेळी काहीही करून तुला लग्न करून घरी आणायची हाच उद्देश होता माझ्यापुढे.. म्हणून तुला बोलून दाखवत होते आभासाचे पाढे… त्यावेळी मी बोलत होतो नि तू ऐकत होतीस.. सारं काही मनात साठवतं होतीस.. भावी जीवनाचं चित्रं पाहात होतीस… अगदी मनासारखं घडेल हेच तुला वाटतं असे… नशिबाने लग्न लवकरच झाले नि आणि चित्र सारे फिरले…भ्रभाचा भोपळा तो फुटला… आणि मला दिले बारा मुलूख तोफेच्या तोडांला… काय करतो बिचारा केलेल्या चुकांची किंमतच आहे एव्हढी जबरी चुकवता चुकवता आयुष्य येई जेरी…बोलून सांगू कुणाला… कळा या लागल्या जीवा… आता तू बोलतेस… बोलत राहतेस आणि मी फक्त ऐकण्याचचं काम करतो…भारवाही हमालं बनलोय..दाबून मुक्याचा मार सोसतोय… त्यावेळी दिलेल्या खोट्या नाट्या शपथा, आणा भाकांची किंमत आता आयुष्यभर मोजत बसणार… त्याला माझी ना कधीच असणार नाही… पण पण जानू आता तो आकाशीचा चंद्र काही माझ्या कडे मागू नकोस.. झाल्या या खरेदीलाच माझा सुफडा साफ झाला… खिशात आता दिडकीही शिल्लक उरली नाही गं… थोडसं ठेवं शिल्लक पुढच्या खेपेला… आधीच खांदा नि हात भाराने गेलेत अवघडू दुखायला… नि डोकं लागलयं गरगरायला… माझं काही म्हणणं नाही  हा बंदा गुलाम आहेच सदैव तुझ्या सेवेला… आणि आणि तो  तसाच हवा असेल तर… घरी गेल्यावर   तुझ्या नाजूक हाताने बाम चोळून देशील माझ्या   डोक्याला… जमलं तरं पहाशील.. तसं माझं आता तुझ्याकडे काहीचं मागणं… म्हणणं नाही.. तसचं काही नाही…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “संध्याछाया भिवविती हृदया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“संध्याछाया भिवविती हृदया…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… संध्याकाळच्या परतीच्या वाटेवर थव्यातून जात होतो…कळले नव्हते सकाळी तेव्हा घरट्यापासून किती लांबवर आलो होतो… पिल्लांच्यासाठी आणि तिच्या ओढीसाठी घरट्याकडे,  अंतरामागुन अंतर कापत जात होतो…कितीतरी वेळ पंख पसरून हवेत विहरत निघलो पण घरट्याच्या झाडाजवळ काही अजून  पोहचलो नव्हतो… सोबत घेतलेला होता चिमणचारा कच्चा बच्च्या पिलांना आणि आणि तिच्यासाठीही… त्याचं ओझं काहीच वाटत नव्हतं…आतुरतेने वाट  पाहत बसली असतील माझी घरट्याच्या तोंडाशी… चिवचिवाट किलबिलाटाचा करत असतील कलकलाट झाडावरती…रातकिड्यांना रागावून सांगत असतील तुमची किर्र किर्र नंतर करा रे संध्याकाळ उतरून गेल्यावर…येणारेत आमचे बाबा आता एवढ्यात या संधिप्रकाशात… फुलेल आनंदाचा गुलाल मग सारा घरट्यात… मग सांडून जाऊ दे काळोखाचे साम्राज्य.. पण पण त्या आधी आमचा बाबा घरी आलेला असूदे… “

“… का कुणास ठाऊक आता आताशा  मला दम लागुन राहिला…लांब पल्ल्याच्या झपाट्याला श्वास कमी पडू लागला..दिवसभर काही जाणवत नाही पण संध्याकाळी घरट्याकडे परताना थव्याबरोबर विहरणे जमत नाही… हळूहळू मग  मागे मागे पडत जातो… नि थवा मात्र ‘त्याचं कायं येईल तो मागाहून… कशास थांबावे त्याच्यासाठी.. ‘नि मला न घेताच तसाच पुढे निघून जातो… क्षणभराचे कसंनुसे होते मला.. धैर्य एकवटून पुन्हा पंख जोराने फडफडवत त्यांच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न करतो… पण पण तो  आटापिटा आता पूर्ण पणे निष्फळ ठरतो.. सगळे त्राण, अवसान कधीच संपलेले असते.. आता फक्त काही वेळ  विश्रांती घेणे गरजेचे ठरते… आंगातुक मला..वाटेवरील झाडे नि त्यावरील आमचेच जातभाई आसरा देण्यावरून कालवा कालवा करतात.. ‘तू  इथं थांबू नको बाबा तुझ्या ईथे असण्याने आमच्या शांतेत येतेय बाधा… ‘मग तसाच नदीच्या प्रवाहातला काळ्या कातळावर जरा विसावतो… चौफेर नजर फिरवतो… शांत एकसुरीचा जलप्रवाह कातळावर डचमळून जातो…नदीतील कातळाचा हुंकार ऐकू येतो.. ‘तू पूर्ण अंधार पडण्याआधी तूझ्या घरट्याकडे जाशील बरं… रात्र गडद होत जाईल तसं नदीचं पाणी शांत गहिरं होत जाईल.. काही जलचर आवाज न करता मग या कातळावर येतील  नि तुला पाहून त्यांना आयतीच मेजवानी होईल…’असा त्याचा मित्रत्त्वाचा सबुरीचा सल्ला.. भले मदतीला मर्यादा असल्या तरी त्याच्या… अस्ताचा सूर्य सांगत असतो… मंद मंद गतीने मी अस्ताचलाला जाई पर्यंत तू त्त्वरेने उडत उडत जा.. आपल्या घरट्यात पोहचून जाशील…माझ्याकडे  वेळ आहे फारच थोडा…तो संपला कि अंधाराचा उधळीत येईल काळाघोडा… आभाळाने घातले आपल्या डोळी काजळ गडद अंधाराचे.. ते पाहूनी भिउनी मान लवूनी बसले तृणपाती किनाऱ्यावरचे… आ वासूनी धावून येती अंगावर काळे काळे बागुलबुवांची तरूवर नि झाडेझुडे… थकल्या तनाला , बळ कुठले मिळण्याला,… भीतीच्या काट्याने थडथड  लागली मनाला… राहिले घरटे दूर माझे… त्राण नाही उरले या देहात… जरी उडून जावे करून जीवाचा तो निर्धार…  अर्ध्यावरती  हा डावच संपणार…समीप आलेला अंत ना चुकणार..आणि घरचे माझे नि मी घरच्यांना कायमचा मुकणार… वियोगाची आली अवचित अशी घडी… लागले नेत्र ते पैलथडी… मी जाता मागे घरच्यांना कशी मिळावी माझी कुडी…आठवणीचीं  राहावी एकतरी जुडी..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ घर… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ घर… ☆ सौ. प्रांजली लाळे

रस्त्यावरुन जाताना एखादे बंद घर दिसलं की बऱ्याचदा माझ्या मनात रेंगाळणारा भावनिक प्रश्न..हे घर कोणाचे असेल..कोण रहात असेल ह्या घरात या आधी.. आता ते बंद का आहे..काय कारण असेल बंद राहण्याचे?बरेचदा उत्तर मिळतच नाही खरं तर..पुर्वी गल्लीतील एखादे जरी घर रिकामे राहिले तर भुताखेतांच्या गोष्टी रंगायच्या.. कोणी फिरकायचे नाही.. आता दिवसागणिक बंगलेच्या बंगले रिकामे पडलेत..आजुबाजुला गवतं,झाडेझुडपे वाढलेले..असे बंगले,घरं दिसली की मन सुन्न होते..घराचे सौंदर्य काय असते हो..ज्या घरात माणसं असतात तीच घराची शोभा.. नाही तर नुसत्या भिंती काय कामाच्या !!अर्थात त्या भिंतीही बोलक्या असतील जेव्हा त्या घरातील माणसं तिथे रहात असतील..माणूस घर बांधताना स्वप्न पुर्तीचे किती मनोरे चढत असेल नाही.. शुन्यातून निर्माण केलेले क्षण घट्ट मुठीत ठेवत असेल बांधून..परंतु येणारा प्रत्येक क्षण त्याचाच असतो असे नाही ना..

कोरोनाने बरीच कुटुंब बरबाद केलीत..क्षणात घरं रिकामी झाली.. होत्याचे नव्हते झाले.. काहींची मुलं बाहेर परदेशात.. त्यामुळे आईबापही तिकडे नाही तर इहलोकी !!  ह्या घरांची गरज नसते त्या मुलांना.. पैसा वारेमाप.. एखाद्या बिल्डरला ती भावनिक गुंतवणूक न ठेवता विकायची न् मोकळं व्हायचं..जो घर बांधतो.. तो ते सर्व इथंच सोडून जातो.. चार भिंतींबरोबर आपली आठवण कायमची तिथं ठेवून जातो..

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “खडाष्टक…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“खडाष्टक…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आता तुला सांगायची काही काही सोय राहिली नाही… आम्हीपण एकेकाळी सासुरवाशीण होतो पण हि ही असली थेरं काही आम्ही कधीच केली नाहीत… बाळबोध वळण आणि  पारंपारिक संस्काराचे माहेरचं लेणं घेऊन हिथं सासरी आले… सासु सासऱ्यांचे नि वडीलधाऱ्यांचे शब्द कधी खाली पडू नाही दिले… ना कधी मी माझ्या माहेरच्या घराण्याचं नाव बद्दू केलं… सासरच्या लोकांनी डोळ्यात तेल घालून माझी कुसळाएव्हढी चुक कुठे सापडते का जंग जंग शोधून पाहिलं… मी पण काही कच्चा गुरूची चेली नव्हती सगळ्यांनाच पुरून उरली होते… तेव्हा कुठे माझा या घरात टिकाव लागला.. मग घरच्यांनाही लक्षात आल्यावर माझा नाद सोडून दिला… तिथून पुढे या घरात माझा शब्दाला दिला जाऊ लागला मान… मी म्हणेल ते आणि म्हणेन तेच होऊ लागले प्रमाण.. प्रत्येक गोष्ट माझ्या संमती शिवाय इथली घडत नाही… अगदी माझ्या बाळ्याचं तुझ्याबरोबर लग्न करण्याचा शिक्कामोर्तब सुध्दा मी केल्यानंतरच झालंयं बरं… या घरासाठी कितीतरी खस्ता मी खाल्ल्या आहेत… तेव्हा आता कुठे हे चार दिवस सुखाचे दिसताएत… हे डोक्यावरचे केस उगाच पांढरे नाही झाले..लांबसडक केस गळत झडत बारीक झाले ते काही अंबाडा बांधण्यासाठी कापून नाही घेतले… ठसठशीत लाल कुंकुवाचा टिळा कपाळी रेखिला ते सौभाग्य माझे धडाडीचे ठणठणीत आहे म्हणून…चांगले मिनाक्षी सारखे डोळे होते पहिल्यांदा जेव्हा मी घरी इथे आले.. सगळ्यांवर जरब बसवता बसवता त्याच्या खाचा झाल्या आणि सोडावाॅटर काचेच्या चष्मा नाकी बसला…देहाच्या कुडीला शोभेल अशी कानातली कुडी नि नापसंतीचा नाकाचा मुरका मारताना चमकणारी नथीची जोडी.. कधी बाळे वेगळी केलीच नाही… घसघशीत तासाच्या वाटीचे सोन्याचे लखलखीत मंगळसूळत्राने गळा शोभून दिसतो..सौभाग्यवतीचा अलंकार तो इतर डागांना लाजवतो…भुंड्या हाताने कधी घरभरच काय पण बाहेर सुद्धा पडले नाही.. कांकणाची किणकिण वाजवी सुवासिनीचा हिरवा चुडा… अंगभर स्वच्छ, नीटनेटके वस्त्रप्रावरणे लेवेलेलाच पाहिला प्रत्येकाने आमचा उभयतांचा जोडा… अहो ऐकलतं का…. मी काय म्हणत होते अशी दबकत हळु आवाजात बोलणं होत असे आमचं… सुनबाईचं बोलणं म्हणजे सोळा आणे तोळा  असं कौतुक सासु सासऱ्या कडून व्हायचं…घराला लावली चांगली शिस्त त्यामुळे आलय़ उजागिरीला… सासुचा नि सासऱ्यांच्या मनी विश्वास तो दुणावला… सुनबाई आता आमची काळजी मिटली…आमच्या माघारी आता तूच या घराण्याची परंपरा पुढे चालू ठेवशील यात आम्हाला संदेह नाही…नातसून बघणं काही आम्हाला शक्यच होईल असं वाटत नाही… ती आता तुझी जबाबदारी चांगली पार पाडशील हि आहे आम्हला खात्री…

 

पण पण कसचं कायं.. बरं झाले माझे सासु सासरे मागे नाही राहिले… नाहीतर तुला असे पाहून त्यांच्या जिवाला नुसता एकेक घोर असते लागले .. माझं मेलीचं नशिबच फुटकं.. आमच्या बाळ्याचं बाशिंगबळच हलकं… एकतरी कौतुकाचा गुण हवा होता गं तुझ्यात… तुझं असं मोकळं ढाकळं वागणं पाहून कळ जाते माझ्या मस्तकात… काय ती तुझी एकेक थेरं… किती किती सांगून पाहिलं बाईच्या जातीला  हे शोभत नाही बरं… केस मोकळे सोडले हडळी सारखे काय म्हणे  केसांचं पोनिटेल मानेला जड होत नाही.. कान झाकले गेले असल्याने कुड्या, रिंगने कान ओघळत नाही..कानात हेडफोन सदैव अडकलेले… इतरांचे बाहेरील बोलणे म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेणे..कधी कुणाचं ऐकून घ्यायची सवयच नाही पहिल्या पासून… मी माझी राजी स्वतंत्र चालीची लाडावलेली कन्या माहेरा पासून…कपाळावर कुंकूच काय साधी टिकली पण तू लावत नाहीस… अन मला म्हणते जीनवर टिकली कुणी लावत नाही… गळयात काही नाही,हातातली कांकणं तर आता शोकेस मधे बसली हात झाले भुंडे,ना कपाळावर टिकली..साडीचा बोंगाळा आता ओल्ड फॅशन झाला… आणि  ठिक ठिकाणी फाटलेल्या जीन टाॅपने उघडे अंग दाखवण्याचा राजरोस स्टाॅलच उघडला…अरेला कारे नवऱ्याला चोविसतास करते…पुरे झालं आई तुमचं आता जमाना तो गेला.. मी पण नोकरी करुन चार पैसे मिळवते तर माझ्या डोक्याला शाॅट कशाला… तुमच्या आमच्या जमान्यात पडलय जमिन अस्मानाचं अंतर…  तुम्हाला पटलं तर राहते ईथे नाहीतर जवळ करते माहेर माझे निरंतर..रांधावाढा उष्टी काढा, संसाराचं लेंढार वाढवा हि पाॅलिसी जुनाट ठरली.. अब हम दो और हमारा एक ही करियर प्रणाली आली…आता सगळचं सारं बदलयं…त्याच्यशी आम्ही जुळवून घेतलयं.. तुम्हाला ते पटवून घेता येतयं का ते पहा… नाहीतर इथं कधीही या घरं आपलचं आहे असं म्हणायला भाग पाडू नका… 

अगं अगं सुनबाई डोक्यात अशी राख घालून घेऊ नकोस बाई… सुनबाई घर तुझचं आहे.. पण चार दिवस सासूचे आहेत  तिलाही तू हवी आहेस… वेगळं व्हायचं मला… हा विचार सुद्धा मनात आणू नको बरं… संध्या छाया कुणालाच चुकली नाही बरं…जोवर आहे कुडीत राम तोवर  जसं जमेल तसं घरकाम बघते … नाहीतर तूच उद्या सगळीकडे गवगवा करशील नवऱ्याची  आई कुठे काय करते? …

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “चिल्लर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“चिल्लर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… कालपरवापर्यंत ही चलनी नाणी होती बाजारात…

… होतं त्याचं प्रत्येकाचं आपापलं मानाचं मुल्य….

.. दोन पैसै टाकले तर मिळत होती पार्लेची लिमलेटची  गोळी..

… आंबट गोड चवीने तोंड स्स स्स करणारी…

… आणे बाराणे, चवली पावली नि अधेली…

… खुर्दा चिल्लरचा खुळखुळ वाजविणारी…

… नगदी नोटांचा कागदी सुळसुळाट होता कि तेव्हा..

.. फक्त तो धनिकांच्या पेढीवर नि गरिबांकडे लाजाळू…

… तांबा पितळ, शिसे, अल्युमिनियम धातूचीं नाणी

… भाव वधारला धातूंचा नि जमाना लोपला नाण्यांचा…

… शेवटी कागदी नोटाने नाण्यांवर मात केली…

… चिल्लर आता बाजारातून हद्दपार झाली…

… कुठे कधीतरी नजरेस पडते एखादे फुटकळ नाणे…

… सांगत असते आपले भूतकाळाचे गाणे केविलवाणे…

… आता रस्तावरचा भिकारी त्याला झिडकारतो..

… ना बाजारातला व्यापारी गल्ल्यात आसरा देतो…

.. देवाच्या पेटीत गुपचूप दान धर्म केल्याचा टेंभा मिरवतो..

… डोळे बंद असलेला देव भक्ताची दांभिक भक्ती ओळखतो…

… अन माणसाला तू कितीही महान झालास तरीही मजपुढे…

…. आजही चिल्लर आहेस हेच सुचवत असतो.. तसे

… नवी येणारी प्रत्येक पिढी जुन्या पिढीला चिल्लर समजत राहते..

… मुल्य हरवून बसलेली  जुनी पिढी अवमुल्यनाच्या दुखाने अवमानित होऊन जाते…

… होतं त्याचं प्रत्येकाचं आपापलं मानाचं मुल्य…

… चिल्लर असलं म्हणून काय झालं?..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “काहूर मनी दाटले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“काहूर मनी दाटले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

या निर्जन निवांत स्थळी, आणि अश्याच रोजच्या कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. तू हवा हवासा  असतोस जवळी..दिनवासर दिनकर निरोपाचे काळवंडलेले अस्तराचे पालाण घालून आसंमाताला जातो अस्ताला डोंगरराजीच्या पलिकडे दूर दूर. ते पाहून  हूरहूर मनातील उमटते  तरंग लहरी  लहरी ने तडागाच्या जलाशयावर. आता क्षणात येशील तू अवचित जवळी अशी मनास माझ्या समजूत घालते  आभासमय आशेवर. निराशेच्या काळ्या मळभाने गिळून टाकतात डोंगर, तलावाचे काठ, नि पाते पाते तरूलताचे, तृणपातीचे माझ्या मनासहीत..चाहूल पदरवांची येईल का , आतुर झालेले कान नि दाटून गेलेल्या  चोहिकडेच्या अंधकाराने भयकंपिताचे आलेले भान. आजची आशा निराशेत नेहमीप्रमाणे  लुप्त झाली, तसे उठून निघाले पाय ओढीत तनाचे मण मण ओझे घराकडे.चुचकारीले कितीतरी परी हटवादी मनास जोजवेना ते आढेवेढे..

.. अशी रोजच संध्याकाळी कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. काहूर मनी दाटले नेत्रातून पाझरले.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares