सुश्री नीलांबरी शिर्के
☆
पंचेंद्रियाचे शरीर आपले
सहावे इंद्रीय जडले गेले
हातामधूनी प्रवेश करूनी
मेंदुवर सत्ता करते झाले
*
हे नवे सहावे इंद्रिय
मन देहावर गारूड करते
नुकसान होते कळे मेंदूला
अवयवास कळते नच वळते
*
मेंदूला प्रवृत्त करण्यासाठी
सतत नवनव्या आणि गोष्टी
खिळवुन ठेऊन आपल्याशी
चांगुलपणाची करतो पुष्टी
*
विचार करूनी वापर करता
उपयुक्तपणा पुष्कळ आहे
अती तिथे माती म्हणीचा
प्रत्यय या इंद्रियाही आहे
*
सहावे इंद्रिय मानलेच तर
दुज्या इंद्रिया हानी नसावी
शरीर मनाच्या आरोग्यास्तव
इंद्रियांची वागणूक असावी
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के