मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दक्षिणायन-उत्तरायण ” – कवी :ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “दक्षिणायन-उत्तरायण ” – कवी :ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

सूर्योदय तो पूर्वेला अन्

पश्चिमेस तो अस्त असे

सृष्टीचा हा नियम मानवा

त्रिकालाबाधित सत्य असे ||

 *

रवि जरासा अवखळ भारी

एका जागी स्थिर नसे

एका जागी नित्य उगवणे

हेच तया मंजुर नसे  ।।

 *

वदे रवि तो ब्रह्मापाशी

जरा मोकळीक द्या मजला

उगवुन येण्या एक ठिकाणी

मजला येईल कंटाळा   ।।

 *

आज येथुनी उद्या तेथुनी

उगवलो तर होईल छान

रोज नव्या देशाला देईन

पहिला बघण्याचा हो मान ।।

 *

ब्रह्मदेवही हसले किंचित

हट्ट पाहुनी सूर्याचा

दिवस कुठे अन् कुठे रात्र

हा मेळ कसा साधायाचा ।।

 *

मान राखुनी परी रविचा

ब्रह्मदेव वदले त्याला

उगवताना पूर्व दिशा अन्

पश्चिमेस जा अस्ताला  ।।

 *

परि उगवता पूर्व दिशेला

उत्तरेकडे सरकत जा

सहा मास सरताच मागुता

दक्षिण अंगे उगवत जा ।।

 *

सूर्य तोषला रचना ऐकून

उदय आणिक अस्ताची

दिशा जरी ती एक परंतु

जागा बदले नित्याची  ।।

 *

उत्तर अंगे उगवत जाता

उत्तरायणी सूर्य असे

दक्षिण अंगे तोच उगवता

दक्षिणायनी तोच दिसे ।।

 *

संक्रमणाने फुलते जीवन

गती लाभते जगण्याला

म्हणुनी दिनकर व्यापुनी फिरतो

नभांगणातुनी दिवसाला ।।

 *

जगी चिरंतन टिकून राही

बदल तयाचे नाम असे

असे बदल, परी मार्ग सुनिश्चित

हे देवाचे दान असे ।


कवी :ॲड .समीर आठल्ये

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वजनकाटा ठेवला झाकून… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ वजनकाटा ठेवला झाकून – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

उन्हाळ्याच्या सुरुवातीला खायची ओल्या काजूची उसळ….

चव बदलायला कधी तरी लागते मग मिसळ….

रसरशीत बिटक्या चोखताना तोंड जातंय माखून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

कैरीची डाळ आणि झकास पन्हं थंडगार….

रात्री पण आइस्क्रीमचा मारा चाललाय फार…..

व्यायाम करायचा निश्चय केलाय सोमवार पासून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

करवंद जांभळे कलिंगड

खावी ताव मारून….

फणसाचे गरे आणि सांदण जरा थोडी जपून…

रिचवावा पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

आमरस पुरीचं जेवून करतो थोडा आराम…

वजन कमी करण्यासाठी

कोणते करू मी व्यायाम…

हाताची बोटं पायांच्या बोटाला टेकतात अजून वाकून..

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

कवी: अज्ञात

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ऊन ऊन खिचडी, साजूकसं तूप…  – कवी : मो. दा. देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ऊन ऊन खिचडी, साजूकसं तूप…  – कवी : मो. दा. देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

ऊन ऊन खिचडी साजूकसं तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख.

 

एक नाही दोन नाही माणसं बारा,

घर कसलं मेलं त्यो बाजारच सारा.

सासूबाई – मामंजी, नणंदा नि दीर,

जावेच्या पोराची सदा पिरपिर.

पाहुणेरावळे सण नि वार,

रांधा वाढा जीव बेजार.

दहांमध्ये दिलं ही बाबांची चूक,

वेगळं राहायचं भारीच सुख…

 

सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ,

प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू,

अन् एवढासा जीव झाला तरी विंचू तो विंचू.

चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,

वीतभर लाकडाला हातभर झिलपी.

बाबांची माया काय मामंजींना येते?

पाणी तापवलं म्हणून साय का धरते?

बहीण अन् जाऊ यात अंतरच खूप,

वेगळं राहायचं भारीच सुख….

 

दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,

दोघांत तिसरा म्हणजे डोळ्यांत कचरा.

दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,

गुलुगुलु बोलायचं नि दूर दूर फिरायचं.

आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,

फिटतील साऱ्या आवडी निवडी.

दोघांचा असा स्वयंपाकच काय?

पापड मेतकूट अन् दह्याची साय,

त्यावर लोणकढं साजूक तुप,

वेगळं राहायचं भारीच सुख….

 

रडले पडले नि अबोला धरला,

तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.

पण मेलं यांचं काही कळतच नाही,

महिन्याचा पगार कसा पुरतच नाही.

साखर आहे तर चहा नाही,

तांदुळ आहेत तर गहू नाही.

ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी,

घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी.

बाळ रडलं तर ते खपायचं नाही,

मिनिटभर कसं त्याला घ्यायचंही नाही.

 

स्वयंपाक करायला मीच,

बाळ रडलं तरी घ्यायचं मीच.

भांडी घासायची मीच,

अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.

जिवाच्या पलीकडे काम झालं खुप,

वेगळं राहायचं कळायला लागलं सुख….

 

सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या,

सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या.

मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,

बाजारहाट करायला भावजी जायचे.

कामात जावेची मदत व्हायची,

नणंद बिचारी ऊर नि पुर निस्तरायची.

आत्ता काय कुठल्या हौशी नि आवडी,

बारा महिन्याला एकच साडी.

थंडगार खिचडी, संपलं तूप,

अन् वेगळं व्हायचं कळलं सुख!

 

कवी: प्रा. मो. दा. देशमुख

प्रस्तुती:सौ. वर्षा राजाध्यक्ष

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “राधा… राधा…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “राधा… राधा…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

प्रसन्न एका सकाळी,

कृष्ण समवेत अष्टपत्नी,

रमले होते हास्यविनोदात सकळी…

 

दुग्ध प्राशन करण्या घेतला प्याला,

चटका कृष्णाच्या बोटाला बसला,

कृष्णमुखातून एकच बोल आला, “राधा-राधा”!!..

 

साऱ्या राण्यांनी प्रश्न एकच केला,

“स्वामी, का सदैव आपल्या मुखी, राधा?

काय असे त्या राधेत, जे नाही आमच्यांत?… “

 

काहीच न बोलला तो मेघश्याम,

मुखावर विलासत केवळ आर्त भाव,

जणू गेला गढून राधेच्या आठवणीत…

.

.

.

काळ काही लोटला…

कृष्ण देवेंद्राच्या भेटीस निघाला,

निरोप देण्या प्रिया साऱ्या जमल्या,

कृष्णाने पुसले,

 “काय प्रिय करु तुम्हाला?”

 

सत्यभामेची इच्छा एक,

 दारी असावा तो स्वर्गीय पारिजात,

सातजणींनी मागणे काही मागितले,

कृष्णाने रुक्मिणीस पुसले,

“सांग, तुझे काय मागणे?”

 

चरणस्पर्श करण्या रुक्मिणी झुकली,

कृष्णाची मऊसूत पाऊले पाहून थबकली,

नकळत वदली,

“स्वामी, इतके अवघड जीवन,

तरी पाऊले आपली कशी इतकी कोमल?”

 

कृष्ण केवळ हसला,

अन् “राधा राधा” वदला,

रुक्मिणीने मग हट्टच धरला,

 “प्रत्येक वेळी का राधा राधा?

या प्रश्नाचे उत्तर,

हेच प्रिय माझे आता…

 

सांगाच आम्हास आज,

कृष्णाच्या मुखी का ‘राधा राधा?’

हे कृष्णा,

निद्रेत तुझा श्वासही बोलतो राधा राधा!

का असे इतकी प्रिय ती राधा?”

 

कृष्ण वदला,

“हाच प्रश्न मी राधेलाही होता पुसला,

सोडून वृंदावन जेव्हा निरोप तियेचा घेतला.

पुन्हा न भेटणे या जगती आता,

 हे ठावे होते तिजला.

 

ह्ळूच धरून हनुवटीला,

पुसले राधेला,

‘सांग राधे,

आयुष्याची काय भेट देऊ तुजला?

मी सोडून, काहीही माग तू मजला. ‘

 

‘कान्हा,

ऐक, दिलेस तू वचन मजला,

नाही बदलणे आता शब्द तुजला,

जे मागीन मी, ते द्यायचेच तुजला…

 

कान्हा,

वर एकच असा दे तू मजला…

 

पाऊल प्रत्येक तुझे,

 माझ्या हृदयीच्या पायघड्यांवर पडू दे,

सल इवलासा जरी सलला तुझ्या अंतरी वा शरीरी,

तर क्षत त्याचा उमटू दे रे माझ्या शरीरी… ‘

 

 ‘राधे, राधे, काय मागितलेस हे?

आयुष्याचे दुःख माझे,

का पदरात घेतलेस हे?

सारे म्हणती, राधा चतुर शहाणी,

का आज अशी ही वेडी मागणी?’

 

गोड हसून, हृदय राधेचे बोलले,

‘कान्हा, नाहीच कळणार तुला माझी चतुराई.

तुझ्यापासून वेगळे अस्तित्व आता राधेला नाही.

 

कान्हा,

तुझ्या प्रत्येक पावलाची चाहूल,

हृदय माझे मजला देईल.

अन् शरीरी उमटता क्षत प्रत्येक,

क्षेम तुझे मला कळवेल.

 

कृष्ण आणि राधा,

नाही आता वेगळे,

दोन तन जरी,

 तरी एकजोड आत्मे’ “

 

साऱ्याच होत्या स्तब्ध, ऐकत,

अश्रूधारा कृष्णाच्याही डोळ्यात,

तनमनात केवळ,

 नाम राधेचे होते घुमत.

 

“प्रियांनो,

पाऊल प्रत्येक माझे,

हृदय राधेचे तोलते,

घाव सारेच माझे राधा सोसते,

म्हणून चरण माझे राहिले कोमल ते…

 

प्रत्येक पाऊल ठेवता,

हृदय राधेचे दिसते,

सल तनमनात उठता वेदना राधेची जाणवते,

अन् म्हणून प्रत्येक श्वासात राधा वसते…

 

प्रियांनो,

प्रेम तुम्ही केले,

प्रेम मीही केले,

पण

राधेच्या प्रेमाची जातच वेगळी…

ती एकच एकमेव राधा आगळी…

 

जोवरी राहील मानवजात,

तोवरी राधा म्हणजे प्रेमाचे दुसरे नाव…

राधा म्हणजे केवळ प्रेमभाव…

राधा म्हणजे प्रेमाचा एक गाव…

प्रत्येकाच्या अंतरीचा कोवळा भाव…

मला ही वंदनीय माझी राधा…

कृष्णाच्याही आधी बोला ‘राधा राधा’.

 

राधा-राधा….

राधा-राधा….

कवी: अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆‘ज्येष्ठ नागरिकांसाठी एक छान सल्ला!…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी एक छान सल्ला!…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

काटकसर जरूर करावी

चिकटपणा नको

भरभरून आयुष्य जगावं

हातचं राखून नको

 *

विटके दाटके आखूड कपडे

घरी घालून बसायचे

स्वच्छ चांगले कपडे फक्त

बाहेर जाताना वापरायचे

 *

कपाटं भरून ठेवण्यापेक्षा

घरातही टापटीप रहावं

राजा-राणीसारखं रूप

वास्तूलाही दाखवावं

 *

महागाच्या कपबश्या म्हणे

पाहुण्या-रावळ्यांसाठी

जुन्या-पुराण्या फुटक्या

का बरं घरच्यांसाठी?

 *

दररोजचाच सकाळचा चहा

घ्यावा मस्त ऐटीत

नक्षीदार चांगले मग

का बरं ठेवता पेटीत?

 *

ऐपत असल्यावर घरातसुद्धा

चांगल्याच वस्तू वापरा

का म्हणून हलकं स्वस्त?

उजळा कोपरा न कोपरा

 *

अजून किती दिवस तुम्ही

मनाला मुरड घालणार?

दोनशे रुपयांची चप्पल घालून

फटक फटक चालणार?

 *

बॅलन्स असून उपयोग नाही

वृत्ती श्रीमंत पाहिजे

अरे वेड्या जिंदगी कशी

मस्तीत जगली पाहिजे

 *

प्लेन कशाला ट्रेन ने जाऊ

तिकीट नको ACचं?

गडगंज संपत्ती असूनही

जगणं एखाद्या घुशीचं

 *

Quality चांगली हवी असल्यास

जास्त पैसे लागणार

सगळं असून किती दिवस

चिकटपणे जगणार?

 *

ऋण काढून सण करावा

असं आमचं म्हणणं नाही

सगळं असून न भोगणं

असं जगणं योग्य नाही

 *

गरिबी पाहिलीस, उपाशी झोपलास

सगळं मान्य आहे

तुझ्याबद्दल प्रेमच वाटतं

म्हणून हे सांगणं आहे

 *

टिंगल करावी टोमणे मारावे

हा उद्देश नाही

तुला चांगलं मिळालं पाहिजे

बाकी काही नाही

 *

लक्झरीयस रहा, एन्जॉय कर

नको चोरू खेटरात पाय

खूप कमावून ठेवलंस म्हणून

चांगलं कुणीही म्हणणार नाय

 *

ऐश्वर्य भोगलं पाहिजे,

माणसाने मजेत जगलं पाहिजे…!

कवी : अज्ञात

प्रस्तुती : श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नवीन म्हणी…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “नवीन म्हणी…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

बाबा, आजोबा, आता तुमचा जमाना गेला… आता आमच्या नवीन म्हणी ऐका… आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी:

१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !

२) सासू क्लबमध्ये सून पबमध्ये !

३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !

४) मुलं करतात चॅनेल सर्फ, आईबाप करतात होमवर्क !

५) चुकली मुलं सायबरकॅफेत !

६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !

७) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !

८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !

९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !

१०) स्क्रीनपेक्षा एस एम एस मोठा !

११) जागा लहान फर्निचर महान !

१२) उचलला मोबाईल लावला कानाला !

१३) रिकाम्या पेपरला जाहिरातींचा आधार !

१४) काटकसर करुन जमवलं, इन्कम टॅक्समध्ये गमावलं !

१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !

१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी!

१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !

१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !

१९) चोऱ्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला!

२०) आपले पक्षांतर, दुसऱ्याचा फुटीरपणा !

२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !

२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !

२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !

२५) सरकार जेवू घालीना, पदवी भीक मागू देईना!

 २६) वशिल्याच्या नोकरीला शिक्षण कशाला?

२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहिले दाखले !

२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !

२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता !

३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !

३१) स्मगलिंगचे खाणार, त्याला दाऊद देणार !

३३)न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!

३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !

३५) पुढाऱ्याचं मूळ व हॉटेलची चूल पाहू नये !

३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !

३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही!

३८) घरात नाही दाणा आणि म्हणे बर्शन आणा !

३९) घरावर नाही कौल पण  अँटिनाचा डौल !

४०) घाईत घाई त्यात चष्मा सापडत नाही !

४१) रिकामा माळी ढेकळं फोडी !

४२) घरोघरी मॉडर्न पोरी !

४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !

४४) नाकापेक्षा चष्मा जड !

४५) अपुऱ्या कपडयाला फॅशनचा आधार !

४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !

४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !

४८) काम कमी फाईली फार!

४९) लाच घे पण जाच आवर !

५०) मंत्र्याचं पोर गावाला घोर !

५१) मरावे परी मूर्तिरूपे उरावे !

५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !

५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !

५४) रिकामी मुलगी शृंगार करी!

५५) प्रेमात पडला हुंड्यास मुकला !

५६) दुरुन पाहुणे साजरे !

५७) ऑफिसात प्यून शहाणा !

५८) डिग्री लहान वशिला महान!

५९) एक ना धड भाराभर पक्ष !

६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !

६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !

६२) तोंडाला पदर गावाला गजर !

६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !

६४) रात्र थोडी डास फार!

६५) शिर सलामत तो रोज हजामत!

६६) नेता छोटा कटआऊट मोठा !

६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!

६८) दैव देतं आयकर नेतं!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देव… – कवी : कुसुमाग्रज ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ देव… – कवी : कुसुमाग्रज  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

देव मानावा की मानू नये

या भानगडीत मी पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

ज्यांना देव हवा आहे

त्यांच्यासाठी तो श्वास आहे,

ज्यांना देव नको आहे

त्यांच्यासाठी तो भास आहे,

आस्तिक नास्तिक वादात

मी कधीच पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

हार घेऊन रांगेत कधी

मी उभा रहात नाही,

पाव किलो पेढ्याची लाच

मी देवाला कधी देत नाही,

जो देतो भरभरून जगाला

त्याला मी कधी देत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

जे होणारच आहे

ते कधी टळत नाही,

खाटल्यावर बसून

कोणताच हरी पावत नाही,

म्हणून मी कधी

देवास वेठीस धरीत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

देव देवळात कधीच नसतो…

तो शेतात राबत असतो,

तो सीमेवर लढत असतो,

तो कधी आनंदवनात असतो,

कधी हेमलकसात असतो,

देव शाळेत शिकवत असतो,

तो अंगणवाडीत बागडत असतो,

तो इस्पितळात शुश्रूषा करीत असतो,

म्हणून…

ह्यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही.. !

 

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

कवी: कुसुमाग्रज

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आनंद वाटणाऱ्या ओंजळी…!’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘आनंद वाटणाऱ्या ओंजळी…!’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆3

एखादा माणूस रोज हसतमुखाने दुसऱ्यांना मदत करतो. त्यांच्यासाठी वेळ देतो. प्रेम आणि माया वाटतो. तो खरोखरच श्रीमंत असतो. ह्या श्रीमंतीचा संबंध पैशाशी नसतो, तर अंतःकरणाच्या समृद्धीशी असतो.

कधी कधी वाटते, आपल्याकडे काय आहे दुसऱ्याला देण्यासाठी? पैसा नाही, मोठं घर नाही, भरगच्च वस्त्रालंकार नाहीत. पण या गोष्टींचा खरा अभाव नसतो. अभाव असतो तो आनंद वाटण्याच्या वृत्तीचा. ज्यांच्याकडे ही वृत्ती असते त्यांची ओंजळ कधी रिकामी राहत नाही.

मला आठवतेय, माझ्या गावातली एक आजी कायम उत्साहाने दुसऱ्यांच्या मदतीला धावून जायची. कुणाच्या घरी अडचण आली, की ती कधी डबा पाठवायची, कधी धीर द्यायची, कधी अंगणातली मोगऱ्याची फुलं गजऱ्यात गुंफून एखाद्या सूनबाईंना हसवत राहायची. तिच्या या प्रेमळ स्वभावामुळे सारा गाव तिला आपलीच म्हातारी मानायचा.

मी एकदा आजीला विचारलं, “आजी, तू एवढ्या सगळ्यांना मदत करतेस त्या बदल्यात तुला काय मिळतं?”

ती हसली आणि म्हणाली, “बाळा, आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधी रिकाम्या राहत नाहीत. परमेश्वर त्यांना पुन्हा भरून टाकतो. जशी विहीर पाणी देते, पण कधी कोरडी पडत नाही. अगदी तशीच माझीही ओंजळ आहे. “

मी विचार करत राहिलो. खरंच. आनंद, प्रेम, माया ही अशी संपत नसतात. उलट, जितकी जास्त वाटली, तितकी वाढत जातात.

संपन्नता ही केवळ गोष्टींमध्ये नसते. ती मनात असते. आणि जी माणसं दुसऱ्यांना आनंद देतात, ती आयुष्यभर कधीच रिकामी होत नाहीत!

 लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘एका ‘स्पेससम्राज्ञी‘ ची कैफियत…’ – लेखक : श्री विनय गोखले  ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘एका ‘स्पेससम्राज्ञी‘ ची कैफियत – लेखक : श्री विनय गोखले  ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

कुणी पृथ्वी देता का पृथ्वी ?

कुणी पृथ्वी देता का पृथ्वी ?

एका गुरुत्वविरहिणीस कुणी पृथ्वी देता का ?

एक स्पेस-स्त्री

आकर्षणावाचून,

निसर्गावाचून,

माणसाच्या मायेवाचून,

देवाच्या दयेवाचून

अवकाशात गोलगोल भ्रमतेय.

जिथून पुन्हा पृथ्वीच्या कवेत जाता येईल

अशी एक कक्षा धुंडतेय.

कुणी पृथ्वी देता का पृथ्वी ?

 

ना कुणी सगेसोयरे,

ना मित्रमैत्रिणी,

एक स्पेस-स्त्री

गप्पागोष्टींवाचून,

 हशाटाळ्यांवाचून,

उन्हपावसावाचून,

मुक्त श्वासांवाचून

मतीकुंठित झालीये.

 

पुन्हा एकदा

पृथ्वीतलावरील जीवनाच्या

महाकुंभमेळ्यात मिसळण्यास

आतुरलीये.

 

कुणी पृथ्वी देता का पृथ्वी ?

कुणी पृथ्वी देता का पृथ्वी ?

 

कवी: श्री. विनय गोखले

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Be cool आई ! –  लेखिका: सौ. योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ Be cool आई ! –  लेखिका: सौ. योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

लॅपटॉप आहे तो आई..! एवढ्या जोरात बटनं दाबायची गरज नाहीए त्याला….

ठक काय आई? किती वर्ष झाली माॅलला येतेस! तरी काय त्या एस्कलेटरजवळ घुटमळतेस….?

नेट बॅंकिग करत जा ग. किती सेफ आहे आई…

स्मार्टफोन फक्त फेसबुक आणि व्हॉटस अॅप साठीच बनलाय असं वाटतं का तुला..?

अशी वाक्ये फक्त माझ्याच घरात ऐकू येतात, असं नाही, तर सगळ्यांच्याच घरात ऐकू येतात…कारण हल्लीची मुलं टेक्नोस्मार्ट आहेत आणि आपण टेक्नो ढं.

पण डरने का नहीं. Cool रहनेका.

……आणि यांना तर एवढंच येतं, मला तर काय काय येतं! अख्खं घर चालवते मी !

अशी स्वतःचीच समजूत काढायची……

मुलांची काही काही मतं ऐकली की खूप मज्जा येते…..कधी त्यांचे फोटो काढले की लगेच म्हणणार….cool हां आई..टाकू नको लगेच फेसबूकवर किंवा लावू नको स्टेटसला…का रे…?असा प्रश्न आपण विचारला की उत्तर ठरलेलं असतं..Be cool, आई….आपले फोटो आपल्या साठीच असतात…..दुसर्‍यांसाठी नाही..

परवा एक ओळखीच्यांचं लग्न होतं

भरपूर मंडळी नाचून आनंद घेत होती..म्हणून मुलालाही म्हटलं, नाचला का नाही तू?..नाचायचं थोडं…तर म्हणाला, Be cool आई….लग्न करताना एवढं नाचण्यासारखं काय आहे…त्याचं लग्न होतंय….मी का एवढं नाचू…..?

आपली मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्याला लहानच वाटतात….

मुलगी परीक्षेला निघाली तेव्हा हे घेतलं का, ते घेतलं का…? असं विचारताना मला आलेलं टेन्शन बघून तीच मला म्हणाली….Coooooool आई….सगळं घेतलंय…….

गाडी चालवताना पण तेच होतं..

मी शक्यतो मुलांच्या मागे बसत नाही..त्यामुळे कुठे जाताना मुलगा मागे असेल तर म्हणतो….आजच पोचायचंय ना आपल्याला…..? नाही, सायकलवाले पण ओव्हरटेक करुन चाललेत म्हणून म्हटलं…..

हाॅटेलमध्ये गेलं की अन्न गरमागरम असावं, असं सगळ्यांना वाटतं..त्यासाठी त्या वेटरची जास्त ये-जा व्हायला लागली की मी म्हणते जाऊ दे रे. नको बोलावूस आता…हे ऐकलं की मुलं नक्की म्हणतात chill, आई. आपण थंड खाण्यासाठी एवढे पैसे भरणार का..?

आणि तो तुला दहा पैसेतरी सोडणार आहे का..?

फेसबुकवर फ्रेंडशिपबद्दलच्या खुप सार्‍या पोस्ट फिरत असतात. ते वाचून अशा फ्रेंड रिक्वेस्ट घेऊ नका, असं सांगितलं की मुलं म्हणतात, Cool आई! सगळेच काही आतंकवादी नसतात…

मुलगी तर कुठेही जाणार असेल, तर मी नेहमी सांगते कुणाही अनोळखी व्यक्तीशी बोलू नको..कुणी काही दिलं तर खाऊ नको….या सगळ्या सूचना तिला आता पाठ झाल्यात. त्यामुळे मी सांगायच्या आधीच ती म्हणते…हो..कळलं…Chill, आई! कुण्ण्णाशी नाही बोलणार….काही नाही खाणार..

एकंदर असं आहे..हल्लीची मुलं खुप clear आणि smart आहेत आणि आपली पिढी खूप मायाळू आणि सर्वांना सामावून घेणारी…

आणि या दोन्हीचा समन्वय साधून अजूनतरी दोन्ही पिढ्या मस्त मजेत चालत आहेत….चालत रहातीलच…

आपण फक्त एकच मंत्र जपायचा…

Be Cool, आई….

लेखिका: श्रीमती योगिता कुलकर्णी

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares