मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनाच्या घराचा पाहुणचार ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ मनाच्या घराचा पाहुणचार ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर ☆ 

एक सुंदर अनुभव. “मनातल्या घरात” (Self – Introspection)

आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे कां ???

एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण, इथे तिथे फिरायला जातोच की !!! मग ती  पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या तरी घरी !!! याच्या त्याच्या घरी, या ना त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी ठरवले, कां नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा ???

हो, हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार !!! आपणच आपल्या मनाच्या  घराला भेट द्यावी म्हंटले, बघावे तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाचे घर !!! कोण, कोण रहातात तिथे ???  कसे स्वागत होत ते ???

ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहचलो. अगदी छोटेसे होते, पण छान होते !!! आत काय असेल, या उत्सुकतेने दार वाजवले, तर आतून आवाज आला, “कोण आहे ???? काय पाहिजे ????” असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती पण खरंच आपण कोण आहोत, हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ???

मी ही सांगितले, “मी स्व आहे रे !!! ज्याचे तू कध्धी ऐकत नाही. ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी !!!”

आतून आवाज आला, ” बरं…. बरं…उघडतो दार !!!” दार उघडल्या नंतर आत पाहिले, तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारले, ” कां रे एवढा अंधार ???” तेव्हा तो म्हणाला, ” तुमच्याच कृपेने !!! मी म्हंटले, ” माझ्या कृपेने ??? तर तो म्हणाला, “हो !!! तुझ्याच कृपेने !!! कारण इथे उजेड तेव्हा पडेल, जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील.”

मी ही जरा ऐटीतच म्हणालो, “ठीक आहे… ठीक आहे !!! लावतो दिवे” म्हणत, पुढे सरकलो. थोडं पुढे चाचपडत गेलो तर काय !!! तिथं असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होते. मी त्याला पुन्हा विचारले, “काय रे, त्या खोल्यात काय दडलंय ???”

तो पुन्हा म्हणाला, ” बघ की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते.” मग मी हळूच एका खोलीचे दार उघडले.  आणि…फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावले. तेव्हा तो म्हणाला, ” काय झालं ??? दार कां लावले ???” मी म्हंटले, ” कसले भयानक होते रे ते !!! ” तर तो पुन्हा हसत म्हणाला, ” तुम्हीच गोळा केले आहेत ते !!! तुम्ही ज्यांचा ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे ते कळलं कां ??? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती !!!”

हुश्श…..अरे बापरे !!! पुढचं दार उघडायचे धाडसच होईना, पण म्हंटले आता आलोच आहे तर उघडावे. तिथे ज्या काही घटना पहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिस्कीलपणे म्हणाला, ” काय, काय झालं… ??? मी म्हंटले, “अरे बाबा, हे काय ??? तो पुन्हा म्हणाला, ” तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करीत गेलास, त्याला मी तरी काय करणार ??? आता तर साठवून ठेवायला या खोल्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत.”

तिथं अशा किती तरी खोल्या होत्या, ज्यांना उघडायच धाडस माझं झालं नाही. मग त्याने त्या उघडून दाखवल्या, ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्षा, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली अशा अनेक खोल्या पाहिल्या, सर्वच्या सर्व अंगावर येत होते.

आता मात्र माझं डोकं गरगरायला लागले, अस्वस्थता वाढली होती. किती भयावह होत ते सर्व !!! त्यामुळे पुढं काय आहे, हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारं भयाण बघून अंगाला काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता.

मी त्याला म्हंटले, “मी जातो आता. मला काही बघायचं नाही आता.” तो म्हणाला, ” थोडं…थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा.”

थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो….तिथं संपूर्ण जाळ लागलेला होता…मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय….आहा…..हा हा…स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होत, तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान शांती ने भरलेले, अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व काही होते.

मी म्हंटले, “काय रे हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी कां नाही दाखवलं ???” तर तो मिस्कील पणे हसत म्हणाला, ” अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे.” मग मी म्हणालो, ” जे आधी पाहिलं, ते काय होतं ???” तो पुन्हा हसत म्हणाला, ” त्या…त्या…तुम्ही अतिक्रमण करत वाढविलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, इर्षा, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी याची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारा पुढे पहारेकरी बनून बसले आहेत, जे तुम्हाला इथं पर्यंत येण्यास अडवत आहेत.”

क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख, आनंदाच्या कडे जाणारा रस्ता, या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता पण ठरवलं की, आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख समाधान, शांती कडे जाणारा मार्ग सोपा करायचा.

बरं झालं. आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं.

मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर, दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची.

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ओंजळीतली चांदणफुले – सौ.  पुष्पा जोशी ☆ प्रस्तुति – श्री  प्रमोद वर्तक

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ ओंजळीतली चांदणफुले – सौ.  पुष्पा जोशी ☆ प्रस्तुति – श्री  प्रमोद वर्तक ☆ 

पुस्तकाचे नाव – ओंजळीतली चांदणफुले

लेखिका –  सौ पुष्पा जोशी

प्रकाशक – राजा प्रकाशन, मुंबई.

पाने  – १०४

 किंमत – रु १२५

जीवनसेतू

अनादिकाळापासून मानवाला जीवनाबद्दल प्रेम आहे, ओढ आहे. जीवनाविषयी त्याच्या मनात दडलेले कुतूहल त्याला नव्या नव्या वाटा शोधण्याची उर्मी  देते. साहस करण्याची वृत्ती आणि प्रवास करण्याची प्रवृत्ती यामुळे  मानवाने दळणवळणाच्या अनेक सोयी व साधने निर्माण केली आहेत. त्यातील पूर्वापार साधन म्हणजे ओढे, नद्या, खाड्या, समुद्र ओलांडून जाण्यासाठी बांधलेले अनेक प्रकारचे पूल! रामायण काळातील वानरसेनेने श्रीरामांसाठी बांधलेला समुद्रसेतू म्हणजे दुष्ट शक्तिचा विनाश करण्यासाठी समूह शक्तिने उभारलेला सेतू  होता.

लहान  गावांमध्ये पावसाळी झरे, ओढे किंवा पाण्याचे छोटे प्रवाह ओलांडण्यासाठी झाडांचे मजबूत ओंडके किंवा बांबू त्या प्रवाहावर बसवून साकव घालण्याची पद्धत आहे. हिमालयातील कितीतरी दुर्गम गावांमध्ये पोहचण्यासाठी अनेक खळाळते ,रुंद प्रवाह ओलांडावे लागतात. तिथे प्रवाहच्या दोन्ही तीरांना जोडणारा एक मजबूत लोखंडी दोर बांधलेला असतो. त्यावरील कप्पीच्या सहाय्याने बांबूच्या टोपलीत बसून ते प्रवाह पार केले जातात.

इंग्रजांना मुंबई बेट आंदण मिळाले. त्यांचा पसारा वाढू लागला तेव्हा त्यांनी माहिम- वांद्रे इथल्या खाडीमध्ये भर घालून तेव्हाची बेटे जोडण्यासाठी पूल बांधले. वसई -भाईंदरच्या खाडीवरील रेल्वेचा जुना पूल इंग्रजी आमदानीतला आहे.शंभराहून अधिक वर्षे इमानेइतबारे सेवा करुन तो पूल आता निवृत्त झाला आहे. त्या खाडीवर आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेले दोन नवीन पूल पाहत तो सेवानिवृत्त पूल  स्थितप्रज्ञासारखा उभा आहे. असाच एक  जुना जाणता पूल म्हणजे कोलकत्याचा हावडा ब्रिज. तिथेही आता एकावर एक दोन नवीन पूल बांधण्यात आले आहेत. दुसऱ्या महायुद्धातील एका घटनेवर आधारित ‘ब्रिज आॅन द रिव्हर क्वाॅय’हा एक गाजलेला युद्धपट होता.

ब्रह्मपुत्रा नदी(नद)वर बांधलेला साडेतीन किलोमीटरचा पूल ही आपल्या लष्करी अभियंत्यांची करामत आहे. त्या पुलावरून ब्रह्मपुत्रेचा वेगवान खळाळता प्रवाह ओलांडताना मानवी जिद्द व तंत्रज्ञान यापुढे आपण नतमस्तक होतो. वांद्रे- वरळी सी लिंक ब्रिज हा मुंबईचा मानबिंदू आहे. या सागरी सेतूवरील सहा मिनिटांचा प्रवास म्हणजे भारतीय अभियंते, तंत्रज्ञ, कामगार व त्यांना साथ देणारे देशी-परदेशी हात यांच्या जिद्दीची, श्रमाची यशोगाथा आहे. रात्री प्रकाशाने उजळून निघणाऱ्या  त्यावरील त्रिकोणाकृती केबल्स म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या फडफडणाऱ्या सोनेरी-रुपेरी पताकाच! अशा अनेक पुलांमुळे वाहतुकीच्या सोयी सुविधांमध्ये भर पडते हे निश्चित पण असे पूल बांधत असताना मजुरांपासून ते वरिष्ठ अभियंत्यांपर्यंत  सर्वजण आपला जीव धोक्यात घालून ही कामे उभी करीत असतात. सागरी सेतू बांधताना समुद्राची भरतीओहोटीची वेळ सांभाळणे, निसर्गाच्या लहरीमुळे केलेले काम फुकट जाणे, मेट्रो रेल्वेसाठी पूल बांधताना जमिनीच्या पोटात खूप खोलवर उतरून कामे करणे या प्रकारचे अनेक धोके असतात. अशा कामांवर होणाऱ्या अपघातात जीव गमावलेल्यांची संख्या बरीच मोठी असते. या सोयी सुविधांचा वापर करताना आपण या साऱ्यांची कृतज्ञ आठवण ठेवली पाहिजे.

मेघालयची राजधानी शिलाॅऺ॑गहून थोडे दूर घनदाट जंगलात एक ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ आहे. दगड, गोटे यांनी भरलेल्या मोठ्या खळाळत्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला जंगली रबराची झाडे आहेत.( या झाडांपासून रबर मिळत नाही.) या रबर प्लांटची जाडजूड, लांब , भक्कम मुळं ओढ्यामध्ये  बांबू रोवून त्यावरून एकमेकात गुंफली आहेत.मुळांच्या कित्येक  वर्षांच्या वाढीमुळे, तसेच त्यांना दिलेला आधार व आकार यामुळे त्या मुळांचा मजबूत डबलडेकर ब्रिज तयार झाला आहे.आसपासचे गावकरी ओढा ओलांडण्यासाठी त्या पुलाचा उपयोग करतात. कित्येक ट्रेकर्स त्या पुलावरून चालण्याचा थरार अनुभवतात. परदेशी प्रवाशांना या ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ चे खूप आकर्षण आहे .कारण जगात फारच क्वचित ठिकाणी असे जिवंत पूल आहेत. गणित आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घालणारा कीटक म्हणजे मुंगी. जंगलातील जवळ जवळ असलेल्या दोन उंच झाडांवरून खाली-वर करण्याऐवजी या मुंग्यांनी आपले डोके वापरून झाडांची पाने व तंतू यांचा वापर करून आपल्या कामसू वृत्तीने या दोन्ही झाडांना जोडणारा पूल तयार केला होता आणि त्यावरून त्यांची शिस्तबद्ध वाहतूक सुरू होती.

थेम्स नदीवरील लंडन ब्रिजशिवाय लंडन चे चित्र पूर्ण होत नाही. मावळत्या सूर्यकिरणात अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोचा गोल्डन ब्रिज झळाळत असतो. जपानमधील अकाशी इथला सस्पेन्शन ब्रिज हा गोल्डन ब्रिजहूनही मोठा आहे. स्वीडनमध्ये पंधरा पुलांच्या खालून आमची क्रूझची सफर होती. त्यातला एक ब्रिज संपूर्ण तांब्याच्या पत्र्याने बांधलेला आहे. सूर्यकिरणे त्यावरून परावर्तित होऊन त्याचे लालसर प्रतिबिंब खालच्या पाण्यात पडले होते. कोपनहेगन या डेन्मार्कच्या राजधानीच्या शहरातून एक चिमुकली नदी वाहते. तिच्यावर चारशे वर्षांपूर्वी बांधलेला पूल चक्क संगमरवराचा आहे. त्याचा पादचारी पूल म्हणून अजूनही वापर होतो. तुर्कस्तान मुख्यतः  आशिया खंडात येतं. पण तुर्कस्तानमधील इस्तंबूलचा थोडासा भाग युरोप खंडात येतो.इस्तंबूलच्या एका बाजूला असलेल्या बास्पोरस या खाडीवरील पुलाने युरोप  आणि आशिया हे दोन खंड जोडले जातात. या खाडीवरील क्रूझ सफारीमध्ये युरोप आशियाला जोडणारा हा सेतू छोट्या-छोट्या लाल निळ्या दिव्यांनी चमचमत असताना दिसतो.

जीवन व्यवहार सोयीस्कर होण्यासाठी मानवाने जसे अनेक पूल बांधले तसेच जीवनगाणे अर्थपूर्ण होण्यासाठी मानवाला सहृदयतेचे सेतू उभारणे आवश्यक असते. जीवनामध्ये संकुचितपणाच्या भिंती उभारण्यापेक्षा मैत्रीचे पूल उभारणे हे केव्हाही श्रेयस्कर ठरते. काही विशिष्ट कामाकरता माणसे एकत्र येतात तेव्हा त्यातून तात्पुरत्या सहवासाचे साकव उभारले जातात. तर कधी त्यातूनच प्रदीर्घ मैत्रीचे पूल उभे राहतात. पती-पत्नीमधील भावबंधनाचा पूल, कौटुंबिक नात्यांचा जिव्हाळ्याचा पूल भक्कम असावा लागतो. समाजकार्य उभे करताना क्रियाशील कार्यकर्त्यांचा समविचाराचा पूल असतो. समान छंद, आवडीनिवडी असणारे त्यांच्या त्या छंदामुळे एकत्र येऊन त्यातून मैत्रीचा पूल बांधला जातो. राष्ट्रा- राष्ट्रातील वैज्ञानिक प्रगती, माहिती- तंत्रज्ञान यांच्या वाहतुकीचे पूल हे जग जोडणारे असतात. मानवाच्या प्रगतीला नव्या दिशा दाखविणारे असतात.

माणसा माणसांमधल्या या पुलांना सामंजस्याचे भरभक्कम खांब असावे लागतात. गैरसमज, कटुता, द्वेष, अहंभाव यांच्या भिंती टाळता आल्या तरच हे पूल उभे राहतात. वेळप्रसंगी आपला अट्टाहास बाजूला ठेवण्याचा, आपल्या मतांना मुरड घालण्याचा, सहनशीलतेचा टोल या पुलांसाठी भरावा लागतो. अशा मानवी पुलांवर एखादं हक्काचं, आपुलकीचं विश्रांतीस्थान असेल तर तिथे थोडावेळ थांबून गतप्रवासाचा आढावा घेता येतो आणि पुढील वाटचालीसाठी नवी उमेद, मार्गदर्शन, शक्ती मिळते.

मानवनिर्मित, निसर्गनिर्मित आणि सुरेल मानवी जीवनासाठी आवश्यक अशा या पुलांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व पुलांना स्वतःची अशी एक गती असते.लय असते. ही लय,ही गती म्हणजे जीवन वाहते ठेवण्याचा मूलमंत्र असतो.ही लय ज्याला सापडली त्याचे जीवन गतिमान, प्रवाही ,आनंदी होते आणि ही लय जीवनाला विलयापर्यंत सांभाळून नेते.

प्रस्तुति –  श्री प्रमोद वर्तक

सिंगापूर

मोबाईल-9892561086

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिटायर्ड माणूस – स्व. पु.ल. देशपांडे ☆ प्रस्तुति – सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ रिटायर्ड माणूस – स्व. पु.ल देशपांडे ☆ प्रस्तुति – सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

वाचक..सौ.अंजली दिलिप गोखले

स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे)

जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस…! …. पु.लं.

 

रिटायर्ड माणसांनो,

भावांनो,सहकाऱ्यांनो…

 

जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा

प्राणी म्हणजे “रिटायर माणूस” होय..!

 

पु.लं च्या भाषेत सांगायचं म्हणजे

 

पुण्यांच्या दुकानदारांच्या नजरेतून

सगऴ्यांत दुर्लक्षीत प्राणी म्हणजे

गिऱ्हाईक अगदी त्याचप्रमाणे

समजा…!

 

गरिब बिचारा,भांबावलेला,

बावरलेला,काहिसा आत्मविश्वास हरवलेला असा हा प्राणी असतो..!

 

कोणे एके काळी या माणसाचे

पण सुगीचे दिवस असतात.

त्याचा रूबाब! वाखाणण्याजोगा असतो.

सर्व गोष्टी हातात मिळत

असतात.

घरी व कार्यालयात देखील..

 

टेबलावरून फायली फिरत

असतात,मोठ्या मोठ्या

करारांवर सह्या होत असतात.

नुसती बेल वाजवलीना तरी

तीन तीन शिपाई धावत येत

असतात.एक चहा घेऊन.

एक बिस्कीटं घेऊन,तर एक

बडीशोप घेऊन..!

 

अहाहा…त्या शिपायाच्या

चेहऱ्यावर भाव असतो,

तो हा,की साहेब हे फक्त

आपल्याचसाठीच्…

 

आणि आता,टेबलावर

मिरच्यांची देठं काढली जातात,भेंडी पुसली जाते. लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होतात…!

अरेरे… किती हा विरोधाभास?

 

रिटायर्ड माणसाला कुठंही डोकं चालवायला वा मध्ये घालायला बंदी असते,कधी कधी मला,तर

वाटतं, की रिटायर्ड माणूस त्याचं डोकं फक्त उशीवर टेकवायलाच वापरत असावा सध्या…बिच्चारा…!

 

कुणी समदु:खी माणूस त्याला

घरी भेटायला आलाच,तर हिंदी

चित्रपटात यात्रेत हरवलेला भाऊ भेटल्यावर नायकाला जो आनंद होतो,अगदी तसाच किंबहूना त्याहून जास्त आनंद रिटायर्ड माणसाला होतो.पण त्यांचं.बोलणं किचनचा सी.सी. टिपत असतो,हे त्याच्या ध्यानी नसतं…

 

आपल्या सुगीच्या दिवसांत हा

माणूस कट्टयावर मित्रांसमवेत

हास्य विनोद करत असतो.

मधून मधून नेत्र व्यायामही

सुरू असतो,तोच बिचारा

आता मंदिराच्या कट्टयावर वा

वाचनालयाच्या ओट्यावर

विसावलेला असतो…

 

ज्या चौपाटीवर सणसणीत

भेळ,रगडा,बर्फाचा गोळा

खातांना नजर भिरभीरत

ठेवलेली असते,गार वार वारा

अंगावर घेत रिटायर्ड लाईफ नंतरच्या आयुष्याची स्वप्न रंगवलेली असतात,तिथेच चटई टाकून योगा करायची वेळ आलेली असते…

 

दिवसभरांत टोमणे ऐकावे

लागतात,ते शेजारचे बघा,या वयातही किती फीट व धीट

आहेत…नाही तर..तुम्ही बघा,

भित्रे काळवीट..वगैरे वगैरे…!

 

अरे कांय,आहे कांय हे…!?

 

एक नवीन मुद्दा मला कळलांय,तो तुम्हाला सांगतो. या रिटायर्ड माणसांचा उल्लेख पुराणांत म्हणजे महाभारतात सुध्दा आला आहे….

चक्रावलात नां..?

मग ऐका…समोर सागराप्रमाणे पसरलेला विशाल सैन्याचा समुह,त्यातले स्नेही,आप्तेष्ट पाहून अर्जुन जेव्हा युध्द करायला नकार देतो,तेंव्हा कृष्ण भगवान अर्जुनाला

म्हणतात…

 

अर्जुना असा रिटायर्ड

माणसासारखा हताश व

निराश होऊ नकोस.उठ व

लढायला सज्ज हो…!!

 

पुढं कालांतरानं रिटायर हा

शब्द गीतेतून वगळण्यांत

आला.कां,तर “भविष्यांत

रिटायर्ड लोकांच्या भावना

दुखाऊ नयेत”.

 

बघा,लोकहो…!त्या काळांत

पण यांच्या भावनांची कदर

केली जात होती आणि आता

सुकलेल्या पालापाचोळ्या प्रमाणे त्या पायदळी तुडवल्या जातात…अरेरे…!!

 

सरते  शेवटी भगवंतानं रिटायर्ड लोकांना हताश न होण्याचा मार्ग सुचवला..

भगवान म्हणाले…!

 

अरे वत्सा,रिटायर्ड माणसा…!

हताश व निराश होऊ नकोस,

मी तुला फंड व पेन्शन या

दोन गुळाच्या वेेली देतो,जो

पावेतो त्या तुझ्याकडं आहेत,

तोवर तुला मरण नाही…

 

मरण नाही,म्हणजे खरं मरण

नाही,रोजच्या जीवनात तू ज्या

यातना वा अपमान भोगशील,

त्या यातना तुझ्याकडं असलेल्या,या दोन शस्रांनी सुसह्य होतील…

फंड व पेन्शन जो पावेतो

तुझ्याकडे आहेत,तो पर्यंत सारे

तुझे असतील….

 

उठ,वत्सा उठ आणि आयुष्याच्या संग्रामास तयार हो. उठ…!!

 

खाडकन जाग आली…!

 

भानावर आलो.आणि की

माझी ती दोन शस्र जागेवर

आहेत,की नाही हे बघण्यासाठी अंथरूणातून बाहेर आलो…

 

माझ्या सर्व सेवानिवृत्त (रिटायर )झालेल्या व होऊ घातलेल्या मित्रांना समर्पित..?

 

संग्राहक – सौ.अंजली दिलिप गोखले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वर्गाची करन्सी.. – सौ. वर्षा विनायक पांडे ☆ प्रस्तुति – सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ स्वर्गाची करन्सी !!! ☆ प्रस्तुति – सौ.स्मिता पंडित ☆ 

एक Industrialist होता..अतिशय धन्याढ्य…!! भरपूर गाड्या, बंगले, कंपन्या…काही म्हणता कशालाच काही कमी नव्हतं…

एक दिवस, गाडीमधून कंपनीत जाताना, त्याने ड्रायव्हरला रेडीओ लावायला सांगितला…कुठलं तरी अधलं-मधलं चँनेल लागलं. चँनेलवर एकाचं काही अध्यात्मिक बोलणं चालू होतं…तो प्रवचक बोलत होता,” मनुष्य, आयुष्यात भौतिक अर्थाने जे काही कमवतो, ते सर्व काही म्रुत्यूसमयी त्याला इथेच सोडून जावं लागतं…तो त्यातले काही म्हणजे काहीच घेऊन जाऊ शकत नाही…..”

या बिझनेसमँननी हे ऐकल्यावर तो एकदम अंतर्मुख? झाला……एकदम सतर्क? झाला….

त्याला एकाएकी जाणवलं, डोक्यात लख्खकन् प्रकाश ?पडला की आपण जे काही प्रचंड वैभव?????? उभारलं आहे त्यातला एकही रूपया मरताना आपण आपल्या पुढल्या जन्मासाठी घेऊन जाऊ शकत नाही….

सर्वकाही इथेच सोडून जावं लागणार आहे…

त्याला एकदम कसंतरीच झालं. तो कमालीचा अस्वस्थ? झाला….

आँफीसमधे पोहोचल्यावर त्यानी emergency meeting बोलावली. झाडून सगळे सहाय्यक, सचीव, सल्लागार, सेक्रेटरी, कायदेतज्ञ बोलावले आणि जाहीरपणे सांगितलं की,’ मी ही अगणित संपत्ती मिळवली आहे, ती मी मरताना माझ्याबरोबर घेऊन जाऊ इच्छितो..तर मी ते कसे घेऊन जाऊ शकतो, ते मला नीटपणे, विचारपूर्वक सांगा…’

सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले की आज साहेब हे काहीतरी असंबध्द काय बोलतायेत!? मरताना तर कुणालाच काही बरोबर नेता येत नाही..हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि हे तर ढिगभर संपत्ती न्यायची भाषा बोलतायेत…हे जमणार कसं?

साहेबांनी सर्वांना शोधकार्य करायला सांगितलं…… बक्षिसे जाहीर केलं की जो कुणी मला यासाठी 100% प्रभावी पध्दत सांगेल, त्याला मी बेसुमार संपत्ती बहाल करीन…

जो तो पध्दत शोधायचा प्रयत्न करू लागला, माहीती काढू लागला..पण काही जमेना..प्रत्येक जण अथक प्रयत्न करत होता..पण उत्तर काही सापडत नव्हतं… बिझनेसमन दिवसागणिक उदास होत होता, त्याला हरल्याप्रमाणेच वाटू लागलं की मी का हे सर्व बरोबर नेऊ शकत नाही..? म्हणजे मी हे सर्व इथेच सोडून जायचं? का? मला न्यायचंय हे सर्व..जे मी मेहनतीने मिळवलंय….ते मला का नेता येऊ नये?..त्याला काही सुचेना..

मग त्यांनी यासाठी जाहीरात दिली….भलंमोठं बक्षिस ठेवलं…पण उत्तर सापडेना…

एक दिवस, अचानक एक माणूस या बिझनेसमनच्या आँफिसमधे आला..’साहेबांना भेटायचंय’.. म्हणाला..

बिझनेसमननी त्याला केबिनमधे बोलावलं…तो म्हणाला,’ माझं नाव श्याम……..  मला तुम्हांला काही विचारायचंय..मगच मी यावर काही उत्तर सांगू शकेन…’

बिझनेसमन म्हणाला,’ विचार……’

याने विचारलं की,’ साहेब, तुम्ही अमेरीकेला गेलाय..!?’

‘हो…’ इति बिझनेसमन…

‘खरेदी केलीये तिथे!?…श्यामने विचारले..

‘हो…’ – बिझनेसमन

‘पैसे कसे दिलेत…!? – इति श्याम

‘कसे म्हणजे..!? आपले पैसे देऊन अमेरीकन dollars विकत घेतले व दिले…इति बिझनेसमन…

बाकी आणखी कुठल्या कुठल्या देशात गेलात, खरेदी केलीत आणि काय काय currency वापरलीत?

आँस्टेलियाला आँस्ट्रेलिअन dollar

सिंगापूरला सिंगापूर dollars

मलेशियाला रिंगिट

जपानला येन

बांगलादेशला टका

सौदी अरेबियाला रियाल

दुबईला दिरहम्स

थायलंड बाथ

युरोपला युरो

म्हणजेच  ज्या ज्या ठिकाणी जी जी म्हणून currency चालते, तीच घ्यावी लागते व वापरावी लागते…….बिझनेसमन म्हणाला..

‘म्हणजे तुमच्याकडे असलेले पैसे हे सर्व ठिकाणी जसेच्या तसे चालत नाहीत..तर ते तुम्हांला देशानुरूप, जागेनुरूप  बदलून घ्यावे लागतात. जिथे जिथे, जी जी currency आहे ती ती, तुमच्याकडचे रूपये देऊन बदलून घ्यावी लागते…

‘बरोबर…’ – बिझनेसमन

मग त्याच न्यायाने तुम्हांला तुमचे पैसे देऊन त्याबदली स्वर्गाची करन्सी देखिल विकत घ्यावी लागेल…..तिथे तुमचे रूपये कसे चालतील!? – श्याम म्हणाला..

‘मग…!?’ बिझनेसमनने कुतूहलाने विचारले….

तिथे ही करन्सी चालणार नाही कारण स्वर्गाची करन्सी आहे    “‘पुण्य..!” आणि तिथे तीच तुम्हांला घ्यावी लागेल आणि मगच तुम्हांला वापरता येईल..!

तेव्हा तुमच्याकडचे पैसे हे तुम्हांला ‘पुण्य’ नावाच्या करन्सीमधे convert करून घ्यावे लागतील…मगच ती बरोबर नेता येईल..आणि तिथे वापरता येईल…

बिझनेसमनच्या डोक्यात आता जास्त लख्ख? प्रकाश पडला की शेवटी बरोबर न्यायला ‘पुण्यच’ कमवायला हवं!

इथली करन्सी अशीच convert करावी लागेल की जी पुण्यांमधे convert होऊन मिळेल…….

आणि असा काही विचार- वर्तन, आचरण करावं लागेल की जे जाताना पुण्याच्या रूपात बरोबर नेता येईल!!

बिझनेसमनच्या प्रश्नाला यथार्थ उत्तर मिळालं होतं…तो श्यामच्या पायाच पडला….त्याला  यथोचित बक्षिस दिले आणि सत्कार केला…!!

आणि मनोमन ठरवलं की या भूतलावर जगण्यासाठी जे काही मिळवतो आहे…मिळवलं आहे..ते आता ‘पुण्य’ नावाच्या currency मधे रूपांतरीत करून घ्याचचं…आणि ते शेवटपर्यंत करतच राहायचं…

वरती जाताना घेऊन जायला!!!!

संग्राहक – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ यमपत्नी… – सौ. वर्षा विनायक पांडे ☆ प्रस्तुति – सुश्री संध्या पुरकर

? वाचताना वेचलेले ?

☆ यमपत्नी… – सौ. वर्षा विनायक पांडे ☆ प्रस्तुति – सुश्री संध्या पुरकर ☆ 

आपण आजवर सर्व देवांच्या “सौं.” चे म्हणजे देवींच्या  बद्दल ऐकले आहेच पण यमाची यमी नेहमीच दुर्लक्षित राहिली. एक वर्षापासून जिचा नवरा अहोरात्र कामावर आहे अश्या या “यमपत्नी” चे मनोगत ऐकायला नको का..?

लेखिका : सौ. वर्षा विनायक पांडे, लक्ष्मीनगर, नागपूर

यमिणबाई म्हणाल्या यमाला आता कंटाळले बाई,

किती तुमचे टार्गेट्स, घरी येण्याची नाही तुम्हाला घाई..

 

तुम्हाला ऑर्डर देणारा तो भगवंत,

घरात स्वतः आहे निवांत..

 

बालाजी तिरुपतीत उभा,

मारुतीचा आतल्या आत नुसताच त्रागा..

 

विठ्ठल आहे रुक्मिणी संग,

होत नाही शंकराची समाधी भंग..

 

सरस्वतीच्या वीणेच्या शांत आहेत तारा,

लक्ष्मी शांततेने घालते विष्णूला वारा..

 

सगळे करतायत “वर्क फ्रोम होम”,

तुम्ही मात्र सतत “नॉट ऍट होम”..

 

सगळे कसे जोडी जोडीने बंद मंदिराच्या दारात,

तुम्ही आपले सतत पुढच्या “पिक-अप” च्या विचारात..

 

अश्या कश्या सगळ्या यंत्रणा माणुसकीला झाल्या फितूर,

तुम्ही दवाखान्याबाहेर एकेकाला उचलण्यास आतुर..

 

तुमच्या वागण्याचं बाई आजकाल मला काही कळत नाही,

तुमच्या कामाला नियम, पद्धत काही राहिलीय की नाही..

 

ऍम्बुलंस, विमान, गाड्या-घोड्या आणि अगदी ऑटोमधुनही घालताय तुम्ही राडा,

जाऊ द्या ना यमदेवा, बरा आहे ना आपला संयमी आणि संथ रेडा..

 

उचलाउचलीचे हे सत्र आता तुमचे पुरे झाले,

आपल्या सात पिढ्यांचेही टार्गेट आता पूर्ण झाले..

 

पुरे झाले काम आता आवरा तुम्ही स्वतःला,

पांढऱ्या चादरीच्या सोबत राहून काळा रंग ही मलूल झाला..

 

काय होता तुम्ही, केवढी होती तुमची शान,

पण अशा अतिरेकी वागण्याने घालवला तुम्ही तुमचा मान..

 

घरातले कर्ते हात उचलण्यात कोणता आहे पुरुषार्थ,

कोरोनाला उचलून दाखवा आणि सिद्ध करा तुमचे सामर्थ्य..

 

सिद्ध करा तुमचे सामर्थ्य …………….. ??

 

संग्राहक –  सुश्री संध्या पुरकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – २ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – २ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[1]

जळतय

तळमळतय

हे विशाल वाळवंट

की

थोडा तरी

जीव लाव रे

हिरव्या प्राणांच्या

लाडक्या तृणपात्या

पण

हिरव्याच तोर्‍यात

मान उडवत ते

नाक मुरडून हिरवंगार

दुष्ट हसतं

आणि भिरभिरत जातं

दूर…दूर…

 

[2]

पृथ्वीचे आसूच

फुलवत ठेवतात

तिचं हसू

 

[3]

मुळं कशी?

जमिनीमधल्या

फांद्या जशी

फांद्या कशा?

हवेमधली

मुळं जशी

 

[4]

ही प्रचंड पृथ्वी

उग्र आणि कठोर

पण

किती मीलनसार झाली

तृणपात्यांच्या संगतीनं ……

 

≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print