मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैफल तालांची… शंतनु किंजवडेकर ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ मैफल तालांची… शंतनु किंजवडेकर  ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

(एक अल्लड बोल-अभिनय गीत)

असे एकदा     स्वप्नी आले

तबला डग्गा    बोलु लागले 

नवथर बोटें     नाचु लागली 

तालांची मग   मैफल सजली 

               ***

त्रिताल बोले     ‘धा धिं धिं धा’

जसा चमकतो   रुपया बंदा

टाळी आणिक   ‘खाली’ मधला 

सम-प्रमाणी      शासक खंदा 

               ***

झप-तालाचे    रूप-आगळे 

दोन-तीनचे      छंद-वेगळे  

जणु-संवादे     वंदी-जनांना

धीना-धीधीना  तीना-धीधीना 

               ***

 रूपक   हसे-गाली

 पावलें   सात-चाली

 मारीतो  गोड-ताना

 तिंतिंना धीना-धीना   

                 ***

दादरा करीतो       भलता नखरा 

सहाच मात्रांत      मारीतो चकरा 

लाडीक स्वभाव   मोहक दागीना

धाधीना-धातीना  धाधीना-धातीना

                  ***

केहेरवा म्हणे       मी रंगीला

नर्तनातुनी           करतो लीला

चला नाचुया      एकदोन दोनतिन्

धागेनतिनकधिन् धागेनतिनकधिन् 

                  ***

एकताल मग   हसुन बोलला

राजा मी तर    मैफिलीतला  

मी तर देतो     भक्कम ठेका

चलन देखणे   माझे ऐका 

                ***

ताल-मंडळी   खुशीत सगळी

तबल्यामधुनी  बोलु लागली

समेवरी मग     अचूक येता

स्वप्न संपले      जाग जागली 

स्वप्न संपले      जाग जागली 

                ***

– शंतनु किंजवडेकर

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 13 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 13 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

[६९]

शांत… नि:शब्द हो

माझ्या मना

हे विशाल वृक्ष म्हणजे

प्रार्थना आहेत.

 

[७०]

सुंदरते,

स्वत:ला शोधताना 

कशाला विसंबतेस

या तोंडापुज्या आरशावर

शोध ना स्वत:ला

प्रीतीमधून

 

[७१]

कुठली अज्ञात बोटे

हलकेच फिरतात

रेंगाळणार्‍या झुळकीसारखी

माझ्या काळजातून

उठवत तरंग गीतांचे

 

[७२]

नदीचं पात्र

भरभरून टाकणारे

हे जलद मेघ

लपवतात स्वत:ला

दूरातल्या डोंगरात

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – मृत्युंजय ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – मृत्युंजय ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

मृत्युंजय– लेखक.शिवाजी सावंत.

कर्ण — ( हस्तिनापुरची राजसभा. द्यूतात सर्वस्व हरलेले पांडव. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा दुर्दैवी प्रकार.)

अंशूकांचा ढीग सभागृहात पडू लागला. माझ्या मनात असंख्य विचारांचा ढीग पडू लागला. काय केलं मी ! बालपणापासून कडक नियमांनी आणि कष्टसाध्य प्रयत्नांनी हस्तगत केलेली चारित्र्याची धवल साधना एका क्षणात सूडाच्या काळ्या कुंडात आज मी बुडवून टाकली! कर्ण ! योध्द्यांनी गौरविलेला कर्ण ! प्रेमाच्या धाग्यांनी सगळ्या नगरजनांच्या हृदयावर अधिराज्य करणारा कर्ण ! एकाच क्षणात भावनांच्या राज्यातील दुर्दैवी कर्ण पराजित ठरला ! शिशुपाल आणि मी, दु:शासन आणि मी, इतकंच काय पण कंस आणि मी यात कसलाच फरक नाही की काय ? या विचारानं कधी नव्हते ते माझ्या डोळ्यात टचकन अश्रुबिंदू उभे राहिले ! राजसभेतील माझ्या जीवनातले पहिलेच अश्रुबिंदू ! त्यात कारुण्य नव्हतं, भीती नव्हती, याचना नव्हती, परिणामाच्या भयानं थरथरणारी पश्चातापदग्धताही नव्हती ! आदर्श म्हणून प्राणपणानं जीवनभर उराशी कवटाळलेल्या नीतितत्वांना उरावर घेऊन अंशुकांच्या ढिगार्‍यात सूर्यशिष्य कर्णाचं कलेवर पाहताना खंबीर मनाचे बांध फोडून आलेली ती वेदनेची आणि यातनेची तीव्र सणक होती. अश्रुबिंदूंच्या स्वरूपात ती सणक उभी राहिली होती – तीही सूतपुत्र कर्णाच्या नेत्रांत ! सूर्यशिष्या साठी सूतपुत्राच्या डोळ्यांत अश्रू ! एक क्षणभरच मला वाटलं, मी सूतपुत्र झालो नसतो तर! कसं झालं असतं माझं जीवन !श्रीकृष्णासारखं ?  का नाही ? झालंही असतं ? संस्काराच्या संघातांनी सामान्याचा असामान्य होतो. उलट कुसंस्कारांच्या कर्दमात कमलपुष्पाच्या पाकळ्यांचंही घृणामय शेवाळ होतं ! कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. मी एका क्षणात या सर्व मर्यादा आज ओलांडल्या होत्या !

माझ्या डोळ्यातले ते पहिलेच अश्रुबिंदू कुरूंच्या राजसभेत घरंगळून हातांतल्या उत्तरीयावर पडून असेच विरले! ज्यांचा अन्वय सभागृहातल्या कुणालाही लागला नसता. निवळलेल्या डोळ्यांसमोर पांचाली उभी होती. घामानं डवरलेला, थकलेला दु:शासन क्षणभर थांबला. शेकडो योजनांचा प्रवास करून आलेल्या घोड्यासारखा तो धापावत होता. अंशुकांचा ढिगारा त्या दोघांपेक्षाही उंच दिसत होता. सर्व वाद्यांचा आवाज एकाएकी थांबला आणि केवळ मुरलीचेच स्वर भयाण भेदक शीळ घालू लागले. पांचालीच्या अंगावर पीतवर्णी अंशुक झळाळत होतं ! सुवर्णधाग्यांनी गुंफलेल्या वस्त्रासारखं ! मला ते पूर्वीही कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं ! सर्व शक्ती एकवटून त्या पितांबरालाही हात घालण्यासाठी दु:शासनानं हात उचलला ! पुढचे खूर उचलून मध्येच उसळणाऱ्या शुभ्र घोड्यासारखे दोन्ही हात उंचावून पितामह खाडकन उठून गरजले.

“दु:शासन,  एक सूतभरही आता पुढं सरकू नको ! शिशुपालासारखा एका क्षणातच दग्ध होशील. लक्षात ठेव ते पितांबर आहे ! “

अंगी त्राण  नसल्यामुळे हात खाली सोडून दु:शासन रखडत – रखडत कसातरी आपल्या आसनाजवळ आला. क्षणभर आसनाच्या हस्तदंडीवर हात टेकवून कमरेत खाली वाकला.त्याच्या स्वेदानं डवरलेल्या मस्तकावरचे दोन थेंब टपकन त्याच्याच आसनावर ओघळले. त्या स्वेदबिंदूवर तो उभ्यानंच शक्तिपात झाल्यासारखा कोसळला.आसनावर स्वेदबिंदू,  स्वेदबिंदूवर दु:शासन ! शिसारीने मी मान  फिरविली. माझ्या हातातील उत्तरीय केव्हाच गळून पडलं होतं. पितांबराच्या तेजस्वी वर्णापुढं त्या उत्तरीयाचा वर्ण काहीच नव्हता ! खिन्न मनानं मी खाली बसलो. कायमचा !

(अंशुक म्हणजे स्त्रियांचे वस्त्र)

श्रीकृष्ण — ( रणभूमीवर अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन कर्ण पडला ती वेळ. )

त्याची अंतिम इच्छा विचारण्याचं सर्व-सर्व नैतिक उत्तरदायित्व आता केवळ एकट्या माझ्यावर येऊन पडत होतं ! केवळ एकट्या माझ्यावरच !!

झटकन मी पुढे झालो ! त्याच्या पाळं तुटलेल्या कानाजवळ तोंड नेत हळूच पुटपुटलो.”  कौंतेया, तुझी अंतिम इच्छा ? “

त्यानं झापडणारे निमुळते डोळे निर्धारानं पुन्हा उघडले ! दोन अश्रुबिंदू त्याच्या डोळ्यात तरळलेले मला स्पष्ट दिसत होते ! कसले होते ते !

दुःखाचे ? पश्चातापाचे ? ते ; धन्यतेचे !!  कृतार्थतेचे !! मी – स्वतः मी त्याला ‘कौंतेया’ म्हटलेलं ऐकून धन्य झाल्याचे! तोही हळूहळू पुटपुटू लागला, ” द्वारकाधीशा… माझी अंतिम इच्छा! इच्छा की… तू – तूच माझा अंत्यसंस्कार… एका… एका… कुमारी-भूमीवर करावा!!  कुमारी-भूमी!! ” त्याच्या आवाज अत्यंत क्षीण झाला होता.

“कुमारी-भूमी!! म्हणजे ?” त्याला अचूक काय पाहिजे होतं ते मला नीटपणे कळलं नाही म्हणून मी पुटपुटलो.

“होय…कुमारी! ज्या भूमीवर… कधी – कधीच…तृणांकुरसुद्धा… उगवले नसतील… उगवणार नाहीत! माझी दुःखं…ती…ती पुन्हा – पुन्हा या मर्त्य भूमीवर – कोणत्याही रूपात उगवू नयेत!!! म्हणून… ही – ही पंचमहाभूते… कुमारी-भूमीत –  लय – लय…!”

त्याचा आवाज आता अत्यंत क्षीण आणि अस्पष्ट होत चालला होता. त्याची ती धक्का देणारी विलक्षण अंतिम इच्छा ऐकून मीही स्तिमित झालो! तो अर्धवट बोलत होता. त्याला आणखी काही सांगायचं तर नसेल म्हणून मी माझे कान त्याच्या अगदी ओठांजवळ नेले. टवकारून ऐकू लागलो. एकचित्तानं!

तो अस्पष्ट अर्धवट शब्द उच्चारत होता-

” ली… ली… माता… माता… ण … न!”

तो काय म्हणू इच्छित होता ते माझ्याशिवाय कुणालाच स्पष्ट सांगता आलं नसतं! तो वृषाली म्हणत होता की पांचाली! तो कुंतीमाता म्हणत होता की राधामाता!!  शोण म्हणत होता की अर्जुन!!! मी ताडलं – तो दोन्ही म्हणत होता!!!

आता त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्दही बाहेर पडेनासे झाले! सूर्यबिंबावर खिळलेल्या निळ्या बाहुल्या कणभरही चळत नव्हत्या. त्याच्या ओठांच्या हालचालींवरून तो काय म्हणत होता ते मी ओळखू शकत होतो! अर्ध्यदान करणाऱ्या एका एकनिष्ठ सूर्यपुत्राचे ते शेवटचे शब्द होते. ओठांच्या हालचालींवरून नक्कीच सवितृ मंत्राचे, गायत्री छंदातले ते दिव्य बोल होते!!

“ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यंऽऽऽ!”  एकाएकी त्याच्या ओठांची तीही हालचाल क्षणात थांबली!  सर्वांनी श्वास रोखले! त्याचा आकाशदत्त श्वास पूर्ण थांबला! छातीवरचं स्पंदणारं लोहत्राण आता शांत झालं! स्थिर झालं.

 महान तेजस्वी असा, डोळे दिपवणाऱ्या एका प्रखर तेजाचा प्रचंड स्त्रोत क्षणात सर्वांसमक्ष त्याच्या हृत्कमलातून बाहेर पडून आकाशमंडलातील पश्चिम क्षितिजावर अमीन टेकडीच्या माथ्यावर रेंगाळणाऱ्या विशाल अशा लाल-लाल सूर्यबिंबाकडे प्रचंड गतीनं झेपावला! क्षणात त्या रसरशीत तप्त हिरण्यगर्भात लय पावला!! त्या जात्या महान तेजानं सभोवतीच्या सर्वांचे डोळे दिपले! अंधारले!

 त्या मृत्युंजय महावीराचं महानिर्वाण झालं!!!

प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनंत चतुर्दशी -कवी अनामिक ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अनंत चतुर्दशी -कवी अनामिक ⭐ संग्राहक – सौ.शशी.नाडकर्णी-नाईक ⭐

ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

तो क्षणच अनंत – चतुर्दशी !

 

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

होतील तीच अनंत – चतुर्दशी !

 

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण

बाप्पासारखा काही दिवसांचा

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा…

 

थोडा वेळ आहोत इथे

तर थोड जगुन घेऊया

बाप्पा सारखे थोडे

लाडु मोदक खाऊन घेऊया…

 

इथे सर्वच आहेत भक्त आणि

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा

थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा…

 

मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद…

 

जातील निघुन सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला…

 

बाप्पा सारखं नाचत यायचे

आणि लळा लावुन जायचे

दहा दिवसांचे पाहूणे आपण

असे समजून जगायचे…

 

किंमत तुमची असेलही

तुमच्या प्रियजनांना लाख

आठवणी ठेवतील जवळ

अन् विसर्जित करतील तुमची राख…

 

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण

दीड दिवस अन् दहा दिवसाचा

हे जगणे म्हणजे एक उत्सव

हा काळ दोन घडींच्या सहवासाचा………….

 

संग्राहक –  सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोणाचं घरटं मोडू नका! ☆ संग्राहिका : सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ कोणाचं घरटं मोडू नका ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

 ( सत्य घटना )

टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्यांच्या जीवनात घडलेला प्रसंग !—

एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते. उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती. वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.

जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं.  त्यांना वाटायला लागलं की आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल. त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.

गाड्या थांबल्या. त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले. तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता. त्याला बोलावलं. तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ती आलीय ,हे त्यानी ओळखलंच. त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं. त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली.  “दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे.”

यावर तो मुलगा म्हणाला , “सरजी, पैशाचा सवालच नाहीए.  कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही.”

“का रे बाबा?”

“त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत. सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल, ते माझ्याच्यानं पाहवणार नाही. कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी.”

हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.

शेषन् म्हणाले, “कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं. माझं पद, माझी पदवी, उच्च शिक्षण सार्‍या सार्‍याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला. जे शिक्षण, संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत, ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.”.

 

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मंत्र मुळी हा सोडू नका☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? वाचताना वेचलेले ?

☆ मंत्र मुळी हा सोडू नका☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

मंत्र मुळी हा सोडू नका

 

कितीक सरले कितीक उरले,

आयुष्याला मोजु नका.

छान जगूया आनंदाने,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय 

श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !! 

 

नाही पटले काही जरीही

उगाच क्रोधित होऊ नका.

व्यक्ती तितक्या विचारधारा, 

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय 

श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !! 

 

योग्य अयोग्य चूक बरोबर,

मोजमाप हे लावू नका.

विवेक बुद्धिने जगण्याचा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय 

श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !! 

 

सुख दुःख हे पुण्य पाप ते,

दैव भोग हे तोलू नका.

कर्म फळाच्या सिद्धांताचा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय 

श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !! 

 

खाण्या बाबत हट्टी आग्रही,

कधी कुठेही राहू नका.

खाऊ मोजके राहू निरोगी,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय 

श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !! 

 

संस्कारांचे मोती उधळा,

पैसा शिल्लक ठेवू नका.

पैसा करतो आपले परके,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय 

श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !! 

 

मत आपले,विचार,सल्ला,

विचारल्या विण देऊ नका.

मान आपला आपण राखा,

मंत्र मुळी हा सोडू नका.

 ॐ श्री गुरुदत्तात्रेय 

 श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !! 

 

नित्यच पाळा वेळा सर्व, 

वेळी अवेळी जागू नका,

पैश्याहुनही अमूल्य वेळा,

मंत्र मुळी हा सोडू नका

ॐ श्री गुरुदत्तात्रेय 

श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !! 

 

नाही बोलले कुणी तरीही,

वाईट वाटुन घेऊ नका.

मौन साधते सर्वार्थाला,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय 

श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !! 

 

जगलो केवळ आपल्यासाठी,

कुठेच आता गुंतू नका.

फक्त जगुया इतरांसाठी,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय 

श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !! 

 

जाणा कारण या जन्माचे,

वेळ व्यर्थ हा घालू नका.

श्वासोश्वासी नामच घ्यावे,

मंत्र मुळी हा सोडू नका.

ॐ श्री गुरुदत्तात्रेय 

श्रीपाद श्रीवल्लभाय नमः !!

 

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पु.ल.देशपांडे लिखित प्रार्थना ☆ संग्राहिका – सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ पु.ल.देशपांडे लिखित प्रार्थना ☆ संग्राहिका – सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

 

पु ल देशपांडे लिखित उत्कृष्ट  प्रार्थना अणि शुभेच्छा !

 

हे परमेश्वरा…

मला माझ्या वाढत्या वयाची 

जाणीव दे. बडबडण्याची माझी 

सवय कमी कर

आणि प्रत्येक प्रसंगी मी 

बोललच पाहिजे ही माझ्यातली 

अनिवार्य इच्छा कमी कर.

 

दुसर्‍यांना सरळ करण्याची 

जबाबदारी फक्त माझीच व 

त्यांच्या खाजगी प्रश्नांची 

दखल घेउन ते मीच 

सोडवले पाहिजेत अशी 

प्रामाणिक समजूत माझी 

होऊ देऊ नकोस.

 

टाळता येणारा फाफटपसारा 

व जरुर नसलेल्या तपशिलाचा

 पाल्हाळ न लावता

शक्य तितक्या लवकर मूळ 

मुद्यावर येण्याची माझ्यात 

सवय कर.

 

इतरांची दुःख व वेदना 

शांतपणे ऐकण्यास मला

 मदत करच पण त्यावेळी 

माझ तोंड शिवल्यासारखे 

बंद राहु दे. अशा प्रसंगी 

माझ्याच निराशा, वैफल्यांचे 

रडगाणे ऐकवण्याची माझी 

सवय कमी कर.

 

केंव्हा तरी माझीही चूक 

होउ शकते, कधीतरी माझाही 

घोटाळा होऊ शकतो,

 गैरसमजुत होऊ शकते 

ह्याची जाणीव माझ्यात ठेव.

 

परमेश्वरा,

अगदी शेवटपर्यंत माझ्यात 

प्रेमाचा ओलावा, गोडवा, 

लाघवीपणा राहू दे.

मी संतमहात्मा नाही 

हे मला माहीत आहेच, 

पण एक बिलंदर बेरकी 

खडूस माणूस म्हणून मी 

मरू नये अशी माझी

 प्रामाणिक इच्छा आहे.

 

विचारवंत होण्यास माझी 

ना नाही पण मला लहरी 

करू नकोस. दुसर्‍याला 

मदत करण्याची इच्छा 

आणि बुद्धी जरूर मला 

दे पण गरजवंतांवर 

हुकूमत गाजवण्याची

 इच्छा मला देऊ नकोस.

 

शहाणपणाचा महान ठेवा 

फक्त माझ्याकडेच आहे 

अशी माझी पक्की खात्री 

असूनसुद्धा, परमेश्वरा, 

ज्यांच्याकडे खरा सल्ला

 मागता येइल असे 

मोजके का होईना

 पण चार मित्र दे.

 

एवढीच माझी प्रार्थना…

 

 – पु.ल.देशपांडे

*55-60 वय पार केल्यावर दर तीन महिन्यांनी परत परत वाचावी ही…. 

 

संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काही सांगायचं आहे ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

? वाचताना वेचलेले ?

⭐ काही सांगायचं आहे ⭐  प्रस्तुती  सौ.अस्मिता इनामदार ⭐

बसले होते निवांत

विचार होते गणपतीचे—

काय करू कसं करू करत होते विचार—

इतक्यात कोणी तरी डोकावलं देवघरातून

म्हटलं कोण आहे ?

तर म्हणे मी गणपती–

काही सांगायचं आहे, ऐकशील ?

सर्व करणार तुझ्याच साठी

मग सांग नं !

म्हणाला —

येतो आहे तुझ्याकडे आनंदा साठी

नका करू आता काही देखावा

नको त्या सोन्याच्या दूर्वा

नको ते सोनेरी फूल

नको तो झगमगाट — त्रास होतो मला

माझा साधेपण, सात्विकता पार जाते निघून —

घे तुझ्या बागेतील माती

दे मला आकार

मी गोल मटोल

नाही पडणार तुला त्रास

मग दे मला स्वच्छ पाट बसायला

अनवाणी चाल गवतातून

आण दूर्वा आणि फुलं दोन चार

माझ्यासाठी नको ओरबाडू झाडांचं सौंदर्य वारंवार

माझ्या बरोबर तुझ्या आरोग्याची पण होईल वाटचाल

दररोज साधं गरम जेवणाचा दे मला प्रसाद

म्हणजे माझं आणी तुझं आरोग्य राहील साथ

रोज पहाटे उठव मला तुझ्या ओम् कार ध्वनीनं

संध्याकाळी कर मला मंत्र आणी शंखनाद

मग पवित्र सोज्ज्वळता येईल—

तुझ्या घरात व मनात .

मला विसर्जन पण हवं तुझ्या घरात

विरघळेन मी छोट्या घागरीत पण

मग मला पसरव तुझ्या बगिच्यात

तिथेच मी थांबीन —

म्हणजे लक्ष राहील तुझ्या  घरात

तू अडचणीत सापडलीस, तर —

येता येईल क्षणात

 

प्रस्तुती : सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आजचा दिवस,आपला दिवस ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? वाचताना वेचलेले ?

☆ आजचा दिवस,आपला दिवस ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

काय करावे, एक करायला गेलं तर एक राहूनच जातं.

सकाळी फिरायला गेलं तर दुलईत गुरफटून झोपायचं सुख निसटतं.

शांततेने पेपर वाचू लागलो तर पूजा, प्राणायाम राहून जाते.

दोन्ही साधायचा प्रयत्न केला  तर नाश्ताच राहून जातो,

धावपळ करत सगळं केले तर आनंद हरवतो.

डायट फूड मिळमिळीत लागतं, चमचमीत खाल्ले तर वजन वाढतं.

एक करायला गेलं तर एक राहूनच जातं.

सिरीयल पहायची तर स्वयंपाक राहतो, स्वयंपाक घरात रमलो तर सिरीयल पहायची राहते.

नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही पण कुटुंबासाठी नोकरी हवी दोन्ही सोडायच्या कल्पनेचे भय वाटायला लागतं.

लोकांचा विचार करता करता मन दुखावत, मनासारखा वागायला गेलं तर लोक दुखावतात.

एक करायला गेलो की एक राहूनच जातं.

घाईगडबडीने निघालो तर सामान विसरतो,  सावकाश गेलो तर गाडी सुटायची भीती.

सुखात असलो की दुःख संपत आणि दुःखात असलो की सुख जवळ फिरकत नाही.

एक करायला गेलो की एक राहूनच जातं.

पण या काहीतरी राहून जाण्यातच खरं जीवन आहे. काहीतरी मिळाल्याचे समाधान आहे.

कारण बाळ जन्मल्याबरोबर त्याच्या रडण्यात आनंद आहे. आणि अचानक दुरावलेली व्यक्ती कित्येक वर्षांनी भेटल्यावर आनंदातही रडणे आहे.

कधी रडण्यातही आनंद मिळतो तर कधी आनंदातही रडता येतं.

ज्याला या कुठल्याच गोष्टीचे काही विशेष वाटत नाही तो माणूस नाही तर यंत्रच आहे.

      म्हणून

आनंदाने भरभरून जगून घेऊ या.

आजचा दिवस आहे तो  आपला आहे.

 बघा, पटलं ना..!

 

संग्रहिका –  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 12 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 12 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

१.   भांड्यातल्या पाण्याचा

        स्वच्छ चमकता तळ

        समुद्राचं पात्र किती

        गहन…. गूढ…. अथांग …

        छोट्या स्त्यांना जसे-

        स्पष्ट, सोपे, शब्द

        श्रेष्ठ सत्यांना वेढलेली

        नि:शब्द खोल शांतता

 

२.   स्तुती ओशाळं करते मला

      कारण

      अगदी चोरटेपणानं

     मीच तिची भीक मागतो…

 

३..    वादळाला उत्तर देणारा आवाज 

      असतोच आमच्याजवळ

      पानं म्हणतात आम्हाला…

      सतत सळसळतो आम्ही,

      पण तू रे कोण इतका गप्प?

      मी?

      मी फक्त फूल आहे.

 

४.   त्या कडयाच्या

     पार टोकावर बसवतोस

     आपल्या प्रीतीला?

     फार उंच आहे रे ते….

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares