मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सोडायला शिका…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “सोडायला शिका…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एकदा मी देवपूजा करत होतो. पूजा करताना मी समईची ज्योत पेटविली.त्या ज्योतीला लावून अगरबत्ती पेटवताना उदबत्ती हातातून निसटली. गडबडीत उदबत्ती पकडण्याचा प्रयत्न करताना माझा हात समईला लागला.समई खाली कलंडताना तेलासकट देव्हाऱ्यातील हळदी कुंकवाच्या पंचपाळावर पडली आणि झालेला राडा सावरायला जवळपास अर्धा तास गेला.

खाली पडणारी अगरबत्ती पकडण्याच्या हव्यासापोटी हे सर्व झाले.अगरबत्ती खाली पडली असती, तर विशेष असा काय फरक पडला असता!अगरबत्ती काही मोडणार नव्हती किंवा वाया जाणार नव्हती. आणि समजा वाया गेलीही असती तरी तिची किंमत ही साफसफाईसाठी वाया गेलेला वेळ,तेल, हळदी,कुंकू, तांदूळ,तेलकट झालेलं मंदिर यापेक्षा तर जास्त नक्कीच नव्हती.

आपण आयुष्यातसुद्धा अशाच उदबत्तीसारख्या अनेक गोष्टी उगीचच धरण्याचा प्रयत्न करत असतो.क्षुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी निसटून जातात. त्यामुळे क्षुल्लक गोष्टी सोडून देणेच हितकारक.

 

मला रामराम केला नाही,

मला निमंत्रणच दिलं नाही,

स्टेजवर माझं नावच घेतलं नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत,

माझा फोन घेतला नाही,

मला बसायला खुर्चीच दिली नाही,

मला उधारी मागितली,

मला कोणी मदतच केली नाही, माझ्या पोस्टला लाईक केले नाही,

साडीच हलकी दिली..इ. इ.

 

किरकोळ बाबी,अहंकार सोडा आणि मग पहा….

निसटून चाललेल्या नात्यांमधे पुन्हा आपलेपणा येईल.

 

अहंकार आपल्याला आपल्या माणसापासून तोडतो.अहंकार लगेच सोडता येणार नाही, पण कठीणही नाही.आजच प्रयत्न सुरू करा.

 

किरकोळ मतभेद मिटवा आणि आनंदी व्हा.

मतभेद पराकोटीचे,गंभीर स्वरुपाचे असतील तर तो विषय मात्र वेगळेपणाने, शांतपणाने मिटवा.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आयुष्यातील दु:खांना कोण जबाबदार आहे?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘आयुष्यातील दु:खांना कोण जबाबदार आहे?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

एक महिला दररोज मंदिरात जायची. एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले, “आता मी मंदिरात येणार नाही.”

यावर पुजाऱ्याने विचारले – “का?”

ती बाई म्हणाली, “मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते! काहींनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे. काही लोक पूजा, होम हवन प्रामाणिकपणे कमी करतात आणि देखावा अधिक!”

यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला, “ते बरोबर आहे! पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, मी जे सांगतो ते तुम्ही करू शकता का?”

बाई म्हणाल्या, “ठीक आहे. तुम्ही मला सांगा, काय करावे?”

पुजारी म्हणाले, “एका ग्लासात काठोकाठ पाणी भरा. ते ग्लास हातात धरा आणि मंदिराच्या आवारात दोनदा प्रदक्षिणा करा. अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एकही थेंब खाली पडता कामा नये.”

बाई म्हणाल्या, “मी हे करू शकते!”

मग थोड्याच वेळात त्या बाईने तसे केले! त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने महिलेला 3 प्रश्न विचारले…

“१) तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसले का?

२) तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना दिसले का?

३) तुम्हाला कोणी देखावा करताना दिसले का?”

बाई म्हणाली, “नाही, मी काही पाहिले नाही!”

मग पुजारी म्हणाले, “जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता, तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते, जेणेकरून त्यातून पाणी पडू नये. म्हणून तुम्हाला काहीही दिसले नाही.

आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमात्म्याकडे केंद्रित करा, मग तुम्हाला इतर काहीही दिसणार नाही. सर्वत्र फक्त देवच दिसेल.”

आपल्या आयुष्याचंही असंच आहे.

आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे? देव आहे? कुंडली आहे? की तुम्ही स्वत:?

खरं तर देव नाही, गृह-नक्षत्र किंवा कुंडली नाही, नशीब नाही, नातेवाईक नाहीत, शेजारी नाहीत, सरकार नाही, तुम्ही स्वतः याला जबाबदार आहात.

१) तुमची डोकेदुखी अनावश्यक विचारांचा परिणाम आहे.

२) तुमची पोटदुखी तुमच्याच चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे.

३) तुमचे कर्ज तुमच्या हावरटपणामुळे होणाऱ्या जास्त खर्चाचा परिणाम आहे.

४) तुमचे कमकुवत शरीर/वाढलेली चरबी आणि आजारी शरीर, तुमच्याच चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे.

५) तुमच्या कोर्ट केसेस, तुमच्या असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे.

६) तुमच्यातील अनावश्यक वाद, तुम्ही नको तिथे जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे.

वरील कारणांखेरीज शेकडो कारणे आहेत, ज्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखी असता. दोष मात्र विनाकारण इतरांना देत राहता.

यामध्ये कोठेही देव दोषी असत नाही.

जर आपण या दुःखांच्या कारणांचा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कुठेतरी आपली चुकीची विचारसरणी याला कारणीभूत आहे.

म्हणून योग्य निर्णय घ्यावा. योग्य गुरुच्या चरणात लीन व्हावे आणि त्यानुसार आपले आयुष्य निरोगी, सुखी समाधानी आणि समृद्ध बनवावे!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अवयवांची गंमत – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆ ☆

? वाचताना वेचलेले ?

अवयवांची गंमत लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

१. जिभेचे वजन खूप हलके असते, पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते.

२. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्‍या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो.

३. पाठ मजबूत ठेवा कारण शाबासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.

४. माणसाने घमेंडीत एवढे उडू नये की एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते हे विसरू नये.

५. सगळ्यात सुंदर नातं हे        डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात, पण एकमेकांना न पाहता.

६. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे पण असावं, कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात.

७. एकदा हाताने पायांना विचारले, “तुझ्यावर सगळे डोके ठेवतात तो अधिकार मला का नाही?”त्यावर पाय हसून म्हणाले, “यासाठी जमिनीवर असाव लागतं, हवेत नाही.”

८. दुःखात बोटं अश्रू पुसतात, तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात. आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची!

९. जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य. पण ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो.

१०. एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली, “तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात?” त्यावर हारातील फुले म्हणाली,  “त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते.”

११. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो, तेच डोळ्यांना बघायला लागतो.

१२. या जगात चप्पल शिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही कारण एक हरवली की दुसऱ्याचं जीवन तिथेच संपतं..

कवी :अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आधी माणूस म्हणून जगा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

आधी माणूस म्हणून जगा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

केनियाचा जगप्रसिद्ध धावपटू अबेल मुताई ऑलम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंडमध्ये धावताना अंतिम रेषेपासून फक्त काही मीटर दूर होता. त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते.सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते.सर्व प्रेक्षक त्याच्या नावाचा जल्लोष करीत होते.एवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून रेषेच्या एक मीटर आधीच थांबला.

त्याच्या मागून येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की चिन्ह न समजल्यामुळे तो थांबला आहे.त्याने ओरडून अबेलला पुढे जाण्यास सांगितले. पण अबेलला स्पॅनिश समजलं नसल्याने तो जागचा हलला नाही. शेवटी इव्हानने त्याला ढकलून अंतिम रेषेपर्यंत पोहचविले.त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला.

पत्रकारांनी इव्हानला विचारले, ” तू असे का केलेस? तुला संधी असताना तू पहिला क्रमांक का घालवलास?”

“इव्हानने सांगितले- माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू,जी एकमेकांना मदत करेल आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही.”

रिपोर्टर पुन्हा म्हणाला, “पण तु केनियन स्पर्धकाला ढकलून पुढे आणलेस?”

यावर इव्हान म्हणाला,”तो पहिला आलेलाच होता. ही रेस त्याचीच होती!”

रिपोर्टर पुन्हा म्हणाला,”तरी पण….”

 “त्या जिंकण्याला काय अर्थ होता?माझ्या मेडलला मान मिळाला नसता!माझी आई काय म्हणाली असती? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे जात असतात.मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते?दुसऱ्याच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईने दिली आहे.”

धन्य ती माऊली आणि धन्य ते लेकरु!

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्री… एक Perfect सिस्टिम.… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ स्री… एक Perfect सिस्टिम… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

बायकांची बुद्धिमत्ता किती असते, असा कोणी कधी अभ्यास केला आहे का?

भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी – भाजी, वरण-भात, कोशिंबीर – चटणी, उसळ वगैरे वगैरे… आणि लाडू – चिवडा, मिठाया – पक्वान्नं वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते, असा कोणी कधी अभ्यास केला आहे का?

फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?

गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी – जास्त करायचा, पदार्थ उलथान्याने किती हलवायचा, उलथनं की डाव, का झारा? कढई का पातेलं?

पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?

एका वेळी चार पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावेत,म्हणून काय आणि कसं करायचं?

ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?

प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा?

दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे किंवा गदागदा हलवून येणे,हा वेळेचा हिशोब कसा करायचा?

मीठ, तिखट, साखर किती घालायचं?

पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची?

उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की, आपल्याला फक्त स्वयंपाक, नाहीतर स्वयंपाक घराचं नियोजन ही शिकायला लागणार आहे.

बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाक घरात लागत असतो, तो महत्त्वाचा गुण म्हणजे involvement.

उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाक घर चालत नसतं.

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुशार म्हणणारी आपण माणसं, प्रसंगी पूर्ण अशिक्षित असूनही स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तमपणे हाताळणाऱ्या बायकाच्या हुशारीला आपण दाद कितीवेळा देतो?

निसर्गाने दिलेली अंगभूत हुशारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते. पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे, असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो.

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत, याची स्वतःला जाणीव करून द्यावी किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाक घरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं. दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं.

खाण्यापूर्वी दिवसातून एकदा तरी निसर्गाने आपल्या घराला सढळ हस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘डॉ. स्नेहलता देशमुख आणि पांढरा ढग’ – लेखक : श्री श्रीकृष्ण म्हसकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘डॉ. स्नेहलता देशमुख आणि पांढरा ढग’ – लेखक : श्री श्रीकृष्ण म्हसकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्याशी निगडित एक अतिशय तरल आठवण आहे. मंडळाच्या एका कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांना पार्ल्याहून ठाण्याला आणायची जबाबदारी माझ्याकडे होती. ठरल्या वेळी मी त्यांच्या घरी पोचलो आणि आम्ही ठाण्यासाठी निघालो.

गाडीत सर्वसाधारण विषयांवर गप्पा चालू होत्या.  कांजूरमार्ग येथे पोचल्यावर त्यांनी खिडकीतून   एक पांढरा ढग  बघितला आणि म्हणाल्या,  “हा किती एकटा आहे!”

मी त्यांना म्हटले, “या अशा ढगाकडे कधीही बघितले की मला ‘डॅफोडिल्स’ कवितेतील पहिली ओळ आठवते. I wandered lonely like a cloud…. या एका ओळीत खूप काही अर्थ आहेत, जे मला अनेकदा आतून काहीतरी संवेदना देत असतात, ज्या अजूनपर्यंत मी कोणाकडे व्यक्त केलेल्या नाहीत.”

देशमुख ताई म्हणाल्या, “जरूर सांगा.”

मी म्हटले, “हा एकांडा ढग स्वतःच्या मर्जीने वाऱ्याबरोबर उंडारतोय. त्याला कोणाची कसलीही अपेक्षा पूर्ण करायचे ओझे नाही, कारण तो रिकामा आहे. व्रतस्थ आहे, कारण त्याच्याकडे आता देण्यासारखे काहीच नाही. त्यातून ना पाणी पडत ना त्याची सावली कोणाला मिळत. तरीही त्याचे अस्तित्व तो जाणवून देत आहे, दखल घ्यायला लावत आहे. हा ढग आणि आपले वार्धक्य एकाच पातळीवर असतात. कारण दोघांकडे द्यायला काही शिल्लक नसते, तर एक कृतार्थ भाव मनात असतो. हे ढग एकटे असतात. कारण झुंड फक्त काळया ढगांची असते. त्यांचा कडकडाट होतो. ते खूप गरजतात. पण त्यांना वाटले तरच पाणी देतात नाहीतर हुलकावणी देतात, जी लोकांच्या जिव्हारी लागू शकते. सूर्य किरणे काळया ढगांना चांदीची झालर लावतात, तर हा एकटा ढग शुभ्र चंदेरी असतो.

या एकट्या ढगाकडे बघितले की जीवनाच्या पक्वतेची अनुभूती येते आणि वयाच्या एका टप्प्यावर आलेले एकटेपण सोसायची उमेद देते. हे ढग आणि एकाकी माणसे कधी विरून जातात हे कळतच नाही.

या एका ढगा कडे बघितले की असेच विचार अनेक वर्षे माझ्या मनात रुंजी घालत आहेत. वर्डस्वर्थच्या कवितेची सुरुवात एका विरक्त भावनेने होताना, तो एकटा आहे हेच त्याला अधोरेखित करायचे असेल कदाचित. कारण पुढची सगळी रचना माणसे आणि त्याची गर्दी वगैरे सांगते.”

माझे बोलणे ताई एकाग्रतेने ऐकत होत्या आणि नंतर म्हणाल्या, “अहो म्हसकर, या विवेचानातून तुम्ही माझ्या मनात अनेक वर्षे अनुत्तरित असलेल्या एका प्रश्नांचे उत्तर देऊन टाकले आहे. तुमची मी खूप आभारी आहे.”

मी विचारले, “कोणता प्रश्न आहे तो?”

तेव्हा त्या म्हणाल्या, “या एकट्या आणि एकाकी ढगाच्या मनात उगाच हिंडताना काय बरे विचार येत असतील?”

पुढचा ठाण्यापर्यंतचा सगळा प्रवास निशब्द होता.

लेखक : श्री श्रीकृष्ण म्हसकर

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘नातीगोती की नातीगोची’ – लेखिका : सौ. दीपा बंग ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘नातीगोती की नातीगोची’ – लेखिका : सौ. दीपा बंग ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

खूप प्रतिष्ठित घरातलं चांगलं स्थळ समृध्दीसाठी चालून आलं होतं. पण पी.एच.डी.झालेली समृध्दी मात्र तयार नव्हती, ह्या विवाहासाठी.

तिला हवं असलेल्या कोणत्याच गोष्टी तिला त्या नात्यात दिसत नव्हत्या.

अमोल कमवता होता. देखणी, पीळदार शरीरयष्टी लाभलेल्या,एकुलत्या एक असलेल्या मुलामध्ये एकच अवगुण होता.

तो अवगुण म्हणजे त्याला आई ,वडील होते. त्याची शी,शू काढणारी, जगाच्या वाईट नजरेतून वाचवण्यासाठी रोज मीठ मोहरी ओवाळून टाकणाऱ्या त्याच्या आजीची तब्येत अजून ठणठणीत होती. थोडक्यात, घरात येणाऱ्या सुनबाईला एक नाही, दोन नाही, चक्क तीन लोकांना सांभाळायचं होतं.

धुणं,भांडी,फरशी , फर्निचर पुसायला, दिवसभर काम करायला होते दोन गडी आणि जरी पोळ्यांना बाई होती. तरी त्या तिघांसोबत राहणे म्हणजे फार मोठा जाच! असंच त्या भोळ्या मनाला वाटत होतं.

समृध्दीच्या आईला तिची व्यथा कळली. ती मनातून हळहळली. ही व्यथा दूर व्हायलाच पाहिजे, असा तिने चंग बांधला. तुर्तास हे स्थळ बाजूला सारले गेले.

एके दिवशी समृध्दी, आपल्या फुलांनी समृद्ध बागेत चहा पित असताना शेजारचा छोटू पेपर घेऊन आला. त्या पेपरमध्ये काही प्रश्न होते. ते सोडवण्यासाठी त्याला समृध्दीची मदत हवी होती.

प्रश्न होता, “अचानक रात्री नवरा आजारी पडल्यावर तुम्ही एकटे असताना काय कराल?”

दुसरा प्रश्न होता, “अचानक दोनच महिन्यांचं तुमचं बाळ रडू लागलं आणि तुम्ही एकटे आहात, तर तुम्ही काय कराल?”

तिसरा प्रश्न होता, “तुम्हाला ताप आला आणि तुमचा नवरा ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकत नसेल तर तुम्ही काय कराल?”

कमनशिबी आहोत आपण. कारण आपल्या देशात पी.एच.डी.झाली तरी जीवनात असल्या प्रश्नांना सामोरे कसे जायचे ? ह्याचे शिक्षण देत नाहीत.

पेपर वाचून तिला अनुमान आला होता की हे पेपर छोटू घेऊन येण्यामागे नक्कीच आईचं सुपीक डोकं होतं. आपल्या आईला लहानपणापासून ह्याच पद्धतीने शिकवण देताना तिने अनेक वेळा पाहिले होते.

हो किंवा नाही अशी तट नव्हती.विचार करायला वेळ मिळाला. आणि समृध्दीला कळत होतं की जीवनात असे अनेक प्रसंग येतात, जेथे आपल्याला कुणीतरी सोबत हवंच असतं.

समृध्दी आज नावासारखी विचारांनी पण समृध्द झाली होती.सरळ उठून आईच्या गळ्यात पडून रडली.लगेच अश्रू पुसत, हसत हसत, लाजत म्हणाली , “आई मी अमोलशी लग्नाला तयार आहे.

“पण आई! ही नातीच सगळी गोची करतात.स्वतंत्रता हिरावून घेतात. म्हणून मनात शंका होती गं. मनासारखं जगता नाही ना येत इथं.”

आई तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, “इथं तुझीच गोची होते.काळ बदलला. मग सासू कडे बघायचा दृष्टिकोन नको का बदलायला? आता विचारसरणी बदलली. मैत्रीचं नातं रुजायला लागलं. वैचारिक मतभेद असले तरी मने जिंकता आली पाहिजेत .

लग्नानंतर  घरात सासू,सासरे असल्यावर जबाबदारी लवकर पडत नाही.

आमच्या काळात दहा बारा वर्षानंतर कुठं जबाबदारी पडायची. तुम्हा मुलींना मात्र एकटं राहून लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून घरात काय हवं नको ते पहावंच लागतं. अनुभव कमी पडतो. मग भांडणतंटे आणि सगळंच अघटित घडू लागतं.

पटतंय का?”

समृध्दी डोळ्यावरचा चष्मा पुसत होती.चष्म्यावरची धूळ साफ होता होता तिच्या मनावरचं नात्याबद्दलचं मळभही दूर झालं होतं.

पण हे मळभ परत कधीच तिच्या जीवनात येऊ नये म्हणून आईने शेवटचे शब्द गरम तेला सारखे तिच्या कानात ओतले,

” बाळ! एकटं राहून जर माणूस सुखी राहु शकला असता तर आज सगळ्यात जास्त  अनाथाश्रमातील मुलेच सुखी असती. “

 नात्यातील गोची संपून आज नातीगोती सांभाळण्यास समृध्दी सज्ज होती.

  

लेखिका : सौ. दीपा बंग

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भाऊ- बहिणी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ भाऊ- बहिणी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

भाऊ आणि बहिणी हे आपल्या आई-वडिलांनी म्हातारपणी आपल्यासाठी ठेवलेल्या सर्वांत मौल्यवान ठेवी आहेत, याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते. फक्त सख्खे नाही तर चुलत, मावस, मामे, आत्ते, सर्व भावंडं.

आम्ही लहान असताना भाऊ-बहिणी आमचे सर्वांत जवळचे सवंगडी होते. दररोज, आम्ही एकत्र खेळत होतो आणि गोंधळ घालत होतो.  आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो.

मोठे झाल्यावर, आम्ही आमच्या स्वतःच्या कुटुंबात रमलो, स्वतःचे वेगळे जीवन सुरू झाले. आम्ही भाऊ- बहिणी सहसा क्वचितच भेटतो.

आमचे पालक हा एकमेव दुवा होता, ज्याने आम्हा सर्वांना जोडले होते.

आपण हळूहळू म्हातारे होईपर्यंत वाट पाहत राहू. आपले आई-वडील आपल्याला सोडून गेले आहेत आणि आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांची संख्या कमी होत चालली आहे, त्याचवेळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळते.

मी नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये १०१ वर्षांचा मोठा भाऊ त्याच्या ९६ वर्षांच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता.  थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते, तेव्हा धाकट्या बहिणीने त्याच्या कारचा पाठलाग केला.   भावाला २०० युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितले.  तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले.

असे काही नेटिझन्स होते, ज्यांनी टिप्पणी केली की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे.

होय, आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळते की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताने बांधलेला असणे किती महत्त्वाचे आहे!

जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आई-वडील दोघेही गेले असतील, तेव्हा तुमचे भाऊ आणि बहिणी या जगातील सर्वात जवळचे लोक असतात.

मित्र दूर जाऊ शकतात. मुलं मोठी होतात, ती ही दूर जातात. तुमचा जोडीदार तुमच्या सोबत असेल नसेल, तरीही फक्त तुमचे भाऊ आणि बहिणी आहेत, जे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उत्तरार्ध पूर्ण करण्यासाठी पुरेशी साथ देऊ शकतात.

आपण म्हातारे झालो तरी बंधुभगिनी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे.

त्यांच्या सहवासात आम्हाला उबदारपणाची कमतरता भासणार नाही.  त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही.  वृद्धापकाळापर्यंत, कृपया आपल्या बंधू आणि बहिणींशी जुळवून घ्या.

भूतकाळात काहीही अप्रिय घडले असले, तरीही भाऊ आणि बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील आणि क्षमाशील असले पाहिजे.

अशी कोणतीही गाठ नाही जी भाऊ-बहिणीमध्ये बांधता येत नाही.  अशी कोणतीही ढाल नाही जी काढली जाऊ शकत नाही.

बंधू-भगिनींनी कधीही जुने हिशेब मांडू नयेत किंवा जुनी नाराजी बाळगू नये.  थोडे अधिक परस्पर अवलंबित्व आणि परस्पर पालनपोषणाने, संबंध अधिक चांगले आणि चांगलेच होतील कारण या जगात आपल्या पालकांनी सोडलेल्या या सर्वांत मौल्यवान भेटवस्तू आहेत.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ शेवटचा निरोप समारंभ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शेवटचा निरोप समारंभ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

 आज आयुष्यात पहिल्यांदाच तिला इतका मानपान मिळाला

असा मानपान मिळण्यासाठी तिने पुनः जन्मा यावे असा विचार क्षणभर डोकावला…

 

आज तिच्या घरी सर्वच आले,

माहेरचे, सासरचे, मानाचे अन पानाचे…

 

 आज तिने नाही कुणाच्या पायाला हात लावला,

 तरी कुणालाच तिचा राग नाही आला… 

खरंच आज तिचा पाहुणचार वेगळाच झाला.

 खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 ती आज पहाटे उठली नाही,

म्हणून कुणीच तिला हटकले नाही… 

उशिरा का असेना पण तिने उठावे अशा विनवण्या सगळ्यांनीच तिला केल्या,

खरंच आयुष्यात असा क्षण पहिल्यांदा आला…

 हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 नेहमीच आटप म्हणून कटकट करणारा नवरा आज स्वतःच तिची तयारी करायला लागला,

 तिने त्याचं आज्ञा पालन नाही केलं,

तरीही साश्रू प्रेमाने तिला भिजवू लागला…

 खरंच आयुष्यात पहिल्यांदाच नवऱ्याच्या मनाचा ठाव लागला…

 हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 तिची नवी साडी नेहमीच हसण्याचा विषय होता,

पण आज मात्र सर्वांनी तिला पैठणीचा आहेर दिला…

खणखणत्या बांगड्यांचा चुडा भरला,

तरी आज कुणाच्या डोळ्यात उपहास नाही दिसला…

 खरंच आयुष्यात पहिल्यांदा तिच्या सौंदर्याचा गौरव झाला…

 खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 आज तिच्या डोळ्यात स्मित हास्य,

 तर दुसऱ्यांच्या डोळ्यात मात्र आसवांचं रहस्य…

 तिचे हात कुणाचे अश्रू नाही पुसायला गेले,

 तरी प्रत्येकजण तिच्यासाठी हळहळला…

 खरंच आयुष्यात पहिल्यांदाच प्रत्येक जण तिच्यासाठी रडला…

 हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 आज तिला कुणाचीच पर्वा नव्हती,

 सगळ्या बंधनातून ती मुक्त होती…

 आक्रोश करून पुनः तिला बंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला,

 आज पहिल्यांदा जगाला तिचा मोह झाला…

 खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 जिवंतपणी नेहमीच तिच्यावर जबाबदारी राहिली,

 थोडीशी चुकली तर तिला धारेवर धरली…

 आज सर्व त्यागून ती निर्धास्त झाली,

 तरी गुलाबाची शेज सजवून सर्वांनी तिची कदर केली…

 आज पहिल्यांदाच  काट्याशिवाय गुलाब तिच्या वाट्याला आला…

खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 आज प्रत्येकाने तिचा सोहळा पाहिला,

बाकी ती मात्र शांत होती.

तिला पाठवणारा प्रत्येकजण रडला… 

घरचाही रडला, दारचाही रडला, 

पाठचाही रडला, पोटचाही रडला…

 लहानही रडला, मोठाही रडला,

 जेव्हा नवऱ्याने हंबरडा फोडला…

 मुलांनी एकच गलका केला,

तेव्हा तिच्या स्त्रीपणाला खरा अर्थ प्राप्त झाला…

खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

कवी :अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गुंडाळी पोळी… – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ गुंडाळी पोळी… – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

शनिवारची शाळा म्हणजे अफाट आनंद. सकाळची शाळा, तीही अर्धा दिवस. दुसऱ्या दिवशी रविवार म्हणजे अमर्याद सुख. शाळेतून परत येताना नुसता धुडगूस. बेस्ट च्या १७१ क्रमांकाच्या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर, एकदम पुढच्या आसनावर,  खिडकीसमोर बसून वारा खात केलेला भन्नाट प्रवास. काहीतरी वेगळंच वाटत राहायचं. शनिवार रविवारची ही महती अगदी आजतागायत तशीच, काळ गोठल्यागत.

शनिवारचा मधल्या सुट्टीचा डबा म्हणजे पण काहीतरी वेगळाच अनुभव. कधी पोळीचा लाडू, कधी sandwich, कधी पोह्याचा चिवडा, कधी सुकी भेळ. तेव्हाचा तो quick bite. हा खाऊ पट्कन गिळून शाळेच्या प्रशस्त मैदानावर खेळण्यासाठी जाण्याची प्रचंड घाई. कधीकधी  पैसे मिळायचे खाऊसाठी, पण मर्यादित. आमच्या शाळेचं कॅन्टीन फार  भारी होतं. हॉट डॉग या प्रकाराशी तिथेच पहिल्यांदा ओळख झाली.

तो प्रकार मात्र आम्ही लांबूनच बघायचो. आमची झेप वडापाव नाहीतर इडली चटणी, इथपर्यंतच मर्यादित. काही सुखवस्तू घरातली, इंग्रजी माध्यमातली मुलं चवीपरीने तो पदार्थ खाताना आम्ही बघायचो आणि कोण हेवा वाटायचा त्या पदार्थाचा आणि तो खाणाऱ्या त्या मुलांचा सुद्धा!

पोरांच्या अलोट  गर्दीत प्रचंड लोटालोट करून हस्तगत केलेला वडा पाव  म्हणजे अगदी दिग्विजय . तो तिखटजाळ वडापाव खाऊन झाल्यावर,  नळाखाली ओंजळ धरून पाणी पिण्यात कोणालाच काही वावगं वाटायचं नाही. आज असं नळाचं पाणी पिणं म्हणजे महापाप. पोरांना बाटलीबंद  किंवा अति शुद्ध केलेल्या पाण्याची सवय. ती किती योग्य, किती अयोग्य यावर भाष्य करणे कठीण, पण आम्ही असं नळाचं पाणी पितच वाढलो, हे मात्र निर्विवाद सत्य.

कधीतरी अवचित, डब्यात गुंडाळी पोळी असायची. गुंडाळी पोळीत बहुतेक वेळा साजूक तुपाचा नाजूक लेप आणि त्यावर पिठी साखरेची पखरण असायची. पोळी गुंडाळून त्याचे दोन तुकडे केले जायचे आणि असे चार पाच तुकडे म्हणजे अगदी भारी काम असायचं. कधी पोळीवर साखरांबा नाहीतर गुळाम्बा पण लेपन होऊन यायचा. तेव्हा बाटलीबंद जॅम चा जमाना सुरू नव्हता झाला आणि हा घरगुती जॅम म्हणजेच परमोच्च बिंदू असायचा चवीचा, आईच्या किंवा आजीच्या मायेचा स्पर्श लाभलेला. जेव्हा wrap संस्कृती अस्तित्वात आलेली नव्हती, तेव्हा आईच्या हातचा हा मायेचा wrap मनाला आणि जिभेला सुख देऊन जायचा.

आजही या  गुंडाळी पोळीचा आस्वाद घेतच असतो मी वेळोवेळी. गरमागरम पोळीवर कधी तूप साखर,  तर कधी लसणीच्या कुटलेल्या तिखटाचा लेप लेऊन किंवा आंब्याच्या लोणच्याचा खार सोबत घेऊन जेव्हा हा साधासुधा पदार्थ समोर येतो तेव्हा चाळवलेल्या भुकेचं शमन तर होतंच पण  विस्मृतीत जाऊ पहात असलेल्या सुखकारक आठवणी पण सुखद समाधान देऊन जातात. तो काळ आणि रम्य भूतकाळ आज समोर येताना अतीव सुखाचं निधानच घेऊन येतो हे मात्र नक्की.

 

लेखक : श्री पराग गोडबोले

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print