मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गुंडाळी पोळी… – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ गुंडाळी पोळी… – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

शनिवारची शाळा म्हणजे अफाट आनंद. सकाळची शाळा, तीही अर्धा दिवस. दुसऱ्या दिवशी रविवार म्हणजे अमर्याद सुख. शाळेतून परत येताना नुसता धुडगूस. बेस्ट च्या १७१ क्रमांकाच्या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर, एकदम पुढच्या आसनावर,  खिडकीसमोर बसून वारा खात केलेला भन्नाट प्रवास. काहीतरी वेगळंच वाटत राहायचं. शनिवार रविवारची ही महती अगदी आजतागायत तशीच, काळ गोठल्यागत.

शनिवारचा मधल्या सुट्टीचा डबा म्हणजे पण काहीतरी वेगळाच अनुभव. कधी पोळीचा लाडू, कधी sandwich, कधी पोह्याचा चिवडा, कधी सुकी भेळ. तेव्हाचा तो quick bite. हा खाऊ पट्कन गिळून शाळेच्या प्रशस्त मैदानावर खेळण्यासाठी जाण्याची प्रचंड घाई. कधीकधी  पैसे मिळायचे खाऊसाठी, पण मर्यादित. आमच्या शाळेचं कॅन्टीन फार  भारी होतं. हॉट डॉग या प्रकाराशी तिथेच पहिल्यांदा ओळख झाली.

तो प्रकार मात्र आम्ही लांबूनच बघायचो. आमची झेप वडापाव नाहीतर इडली चटणी, इथपर्यंतच मर्यादित. काही सुखवस्तू घरातली, इंग्रजी माध्यमातली मुलं चवीपरीने तो पदार्थ खाताना आम्ही बघायचो आणि कोण हेवा वाटायचा त्या पदार्थाचा आणि तो खाणाऱ्या त्या मुलांचा सुद्धा!

पोरांच्या अलोट  गर्दीत प्रचंड लोटालोट करून हस्तगत केलेला वडा पाव  म्हणजे अगदी दिग्विजय . तो तिखटजाळ वडापाव खाऊन झाल्यावर,  नळाखाली ओंजळ धरून पाणी पिण्यात कोणालाच काही वावगं वाटायचं नाही. आज असं नळाचं पाणी पिणं म्हणजे महापाप. पोरांना बाटलीबंद  किंवा अति शुद्ध केलेल्या पाण्याची सवय. ती किती योग्य, किती अयोग्य यावर भाष्य करणे कठीण, पण आम्ही असं नळाचं पाणी पितच वाढलो, हे मात्र निर्विवाद सत्य.

कधीतरी अवचित, डब्यात गुंडाळी पोळी असायची. गुंडाळी पोळीत बहुतेक वेळा साजूक तुपाचा नाजूक लेप आणि त्यावर पिठी साखरेची पखरण असायची. पोळी गुंडाळून त्याचे दोन तुकडे केले जायचे आणि असे चार पाच तुकडे म्हणजे अगदी भारी काम असायचं. कधी पोळीवर साखरांबा नाहीतर गुळाम्बा पण लेपन होऊन यायचा. तेव्हा बाटलीबंद जॅम चा जमाना सुरू नव्हता झाला आणि हा घरगुती जॅम म्हणजेच परमोच्च बिंदू असायचा चवीचा, आईच्या किंवा आजीच्या मायेचा स्पर्श लाभलेला. जेव्हा wrap संस्कृती अस्तित्वात आलेली नव्हती, तेव्हा आईच्या हातचा हा मायेचा wrap मनाला आणि जिभेला सुख देऊन जायचा.

आजही या  गुंडाळी पोळीचा आस्वाद घेतच असतो मी वेळोवेळी. गरमागरम पोळीवर कधी तूप साखर,  तर कधी लसणीच्या कुटलेल्या तिखटाचा लेप लेऊन किंवा आंब्याच्या लोणच्याचा खार सोबत घेऊन जेव्हा हा साधासुधा पदार्थ समोर येतो तेव्हा चाळवलेल्या भुकेचं शमन तर होतंच पण  विस्मृतीत जाऊ पहात असलेल्या सुखकारक आठवणी पण सुखद समाधान देऊन जातात. तो काळ आणि रम्य भूतकाळ आज समोर येताना अतीव सुखाचं निधानच घेऊन येतो हे मात्र नक्की.

 

लेखक : श्री पराग गोडबोले

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुरलेला हात” – लेखक : श्री शिवप्रसाद मेढे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “मुरलेला हात” – लेखक : श्री शिवप्रसाद मेढे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

‘समोरची बंगाल्याची बायको स्वयंपाकात अजून मुरायची आहे. पदार्थ परतताना कढईचा केवढा आवाज करते!’ हे वाक्य मी लिहिलं आणि माझं मलाच हसू आलं.

करू दे ना तिला हवा तसा स्वयंपाक! ती तिच्या पद्धतीने करतीये. मी का वैतागावं?

पण तसं नाहीये. स्वयंपाक ही एक कला आहे. तसंच स्वयंपाकघरात वावरणं ही पण एक कला आहे.

महिलांचा आणि क्वचित काही पुरुषांचा दिवसभरातला खूपसा वेळ स्वयंपाकघरात जात असतो.

असे म्हणतात, स्वयंपाक घरावरून त्या संपूर्ण घराची ओळख पटते. हे नीटनेटकं, देखणं स्वयंपाकघर चालवायला गरज असते ती मुरलेल्या हातांची.

आपल्या भारतात स्वयंपाक करायच्या खूप पारंपारिक पद्धती आहेत. प्रत्येक प्रांतात, राज्यात, जातीत, धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने चवदार, चमचमीत, चविष्ट जेवण तयार करण्यात येतं. जेवण बनवण्याच्या परंपरा पूर्वापार चालत आल्या आहेत. काही काही पदार्थ तर पिढ्यानुपिढ्या पारंपारिक पद्धतीने जसेच्या तसे अजूनही बनत आहेत. पंचपक्वान्न (श्रीखंड, बासुंदी, रसगुल्ले), काही चमचमीत भाज्या (भरली वांगी, रस्से) उसळी, छोले भटुरे, मांसाहारी पदार्थ, (शाकुती), इडली डोसा असे अनेक पदार्थ. (यादी खूप मोठी आहे, हे केवळ उदाहरणादाखल पदार्थ.)

आपली खाद्य परंपरा ही आपल्या देशाची खासियत आहे. ती परंपरा टिकवून ठेवणे ही अजून एक खासियत! मला असं वाटतं, भारत सोडल्यास, जगातील इतर देशात अगदी चमचमीत असे जेवण – खाद्यपदार्थ क्वचितच बनत असतील.

ही परंपरा टिकवण्यामागे किंवा टिकण्यामागे एक खास कारण म्हणजे मुरलेला हात!

ओला – सुका मसाला बनवण्याची मक्तेदारी या मुरलेल्या हातांची.

वर्षभर टिकणारी लोणची ही ह्या मुरलेल्या हातानेच घालावीत.

चमचमीत पदार्थ करावेत मुरलेल्या हातानेच.

मुरलेल्या हाताला कधीही तवा, कुकर, कढईचा चटका बसत नाही किंवा चटक्याचे काळे डाग हातावर उमटत नाहीत.

वाफ कधीच तोंडावर येत नाही, की उकळतं पाणी अंगावर सांडत नाही.

मुरलेला हात स्वयंपाक करताना कधीच ढणढण भांड्यांचा आवाज करत नाही. कढईतला पदार्थ कसा हळूच कापसासारखा हलवला जाईल.

रवीने दही घुसळताना एक लयबद्ध आवाज येत राहील.

भात कधी चिकट होणार नाही किंवा ताटात तांदूळ वाजणार नाही.

आमटी फुळुक पाणी होणार नाही किंवा चटण्या, कोशिंबिरी, भाज्या वाहून जाणार नाहीत.

पोळ्यांचा आकार गोलाकार असेल.

लोणचं करताना मुरलेले हात, आधी ज्याचं लोणचं घालायचं तो जिन्नस (कैरी, लिंबू, मिरची, फ्लॉवर, गाजर, वगैरे, वगैरे) व्यवस्थित निवडून घेणार. मग ते देठ काढून, धुऊन, पुसून थोडा वेळ वाळत ठेवणार. त्याच्या जोडीला चिरायची विळी, ज्या काचेच्या बरणीत लोणचं घालायचं ती बरणी, ताटसुद्धा व्यवस्थित धुऊन, पुसून स्वच्छ कोरडे करणार. अजूनही पाणी राहण्याची शक्यता नको, म्हणून हलकेच पेटत्या गॅसवर सुकवून घेणार. मगच चिरून मसाला घालून लोणचे तयार करणार. मसाला पण घरीच बनवणार. तिखट, हळद, मीठ सुद्धा हलकेच तव्यावर गरम करून घेणार. सगळं कसं निर्जल करणार. काय बिशाद, लोणचे खराब होईल!

ती बरणी ठेवायची पण विशिष्ट पद्धत. खाली तळाशी मीठ पसरून, वरती लोणचं घालून, सर्वात वरती मिठाचा पुन्हा हलकासा थर. मग त्या बरणीच्या उघड्या तोंडावर स्वच्छ धुतलेला पांढरा कपडा, त्याचीच कड, एका बाजूला फाडून व्यवस्थित बांधणार आणि मग झाकण लावणारा हा मुरलेला हातच असतो.

मसाला करताना प्रत्येक घटक व्यवस्थित निवडून, साफ करून निरनिराळे  भाजून, एकत्र करून मगच मिक्सरमध्ये बारीक करून ठेवणार. तेव्हाच तो मसाला खमंग होणार.

मुरलेल्या हाताला वयाचं बंधन नसतं. अनुभवाचं शहाणपण, आत्मविश्वास आणि स्वयंपाकाची आवड असेल तर पुरे!

मुरलेल्या हाताचा स्वयंपाक झटपट आणि चविष्ट होणारच.

पाच माणसांचा स्वयंपाक एका तासाच्या आत करावा तर मुरलेल्या हातानेच.

त्या हाताची आपली अशी पद्धत आहे. कुठच्या वेळी काय करायचं हे त्या हाताला पक्क माहीत असतं.

आता बघा. या पद्धतीने पायर्‍या पायर्‍यांनी स्वयंपाक केला तर काय बिशाद स्वयंपाकात जास्त वेळ जाईल.

कणीक भिजवून बाजूला ठेवली. डाळ-तांदूळ धुवून कुकर लावला. कुकरची शिट्टी होईपर्यंत भाजी चिरून घेतली. शिट्ट्या झाल्यावर गॅस बारीक ठेवून दुसर्‍या गॅसवर भाजीला फोडणी टाकून शिजायला ठेवली. तोपर्यंत कुकरची मंद गॅसवर ठेवायची वेळ संपलेली. कूकर उतरवून त्यावर पोळ्यांसाठी तवा ! तवा तापेपर्यंत पोळपाट लाटणे, फुलके असतील तर चिमटा, पीठ, तेल यांची जमवाजमव. पोळ्यांना सुरुवात करण्यापूर्वी, भाजी ढवळून मीठ, खोबरे, इतर वाटण, चिंचेचा कोळ घालून शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवलं की तोपर्यंत तवा तापून तयार! पोळ्यांना सुरुवात केली की सलग दहा पंधरा मिनिटात पोळ्या होतात. एका पोळीला जास्तीत जास्त दोन मिनिटं लागणार. पोळ्या झाल्या की कढईतील भाजी एका छानशा पातेल्यात काढून डायनिंग टेबलवर झाकून ठेवायची . त्याच कढईत आमटी करण्यासाठी तवा उतरवून आमटी टाकता येते. जी काही डाळ, उसळ असेल तिला फोडणी टाकली; मिरच्या, कोथिंबीर मसाला इतर गोष्टी टाकून आमटी तयार! पोळ्या झाल्यावर त्याच गरम तव्यावर आमटीचा मसाला, इतर वाटण परतून घेता येईल.

आमटी उकळेपर्यंत ओटा आवरून पोळ्यांची परात, पोळपाट लाटणे धुवून जागेवर ठेवता येईल. उकळलेल्या आमटीवर झाकण ठेवलं की काम फत्ते. जेवायच्या वेळी फक्त गॅस पेटवला, गरमगरम आमटी खायला तयार! कितीसा वेळ लागला?

आहे न मुरलेल्या हाताची कमाल?

ह्या मुरलेल्या हाताची मोजमापं पण कशी तर, चिमुटभर, मुठभर, ओंजळभर. सगळा कारभार अंदाजपंचे.

ह्या मुरलेल्या हाताचा अंदाज इतका पक्का की पदार्थ कधी खारट, तिखट, आंबट, कडू होणार नाही. समतोल चवीचा रुचकर पदार्थ करावा तर मुरलेल्या हातानेच!

पदार्थ शिजला की नाही हे त्या मुरलेल्या हाताला बघूनच समजणार. वासावरून काय घातलं, राहिलं ते कळणार.

हे मुरलेले हात टीव्ही बघताना कधीच वेळ वाया घालवणार नाहीत. भाजी निवडणे, लोणी काढणे, डाळी,  कडधान्यं निवडून ठेवणं ही काम लगेच टीव्ही बघता बघता करून टाकतात.

उन्हाळ्याची कामं (सांडगे, पापड वगैरे) भल्या पहाटे उठून नाश्त्याच्या वेळेपर्यंत उरकून टाकणारे मुरलेले हातच !

पुन्हा सगळी रोजची कामे वेळच्यावेळी करण्यासाठी.

अशा सर्व मुरलेल्या हातांना माझ्याकडून नमस्कार.

लेखक :श्री शिवप्रसाद मेढे

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जेव्हा-जेव्हा सूर्य पश्चिमेला जातो… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ जेव्हा-जेव्हा सूर्य पश्चिमेला जातो…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

” जेव्हा-जेव्हा सूर्य पश्चिमेला जातो तेव्हा तो मावळतो. हे या जगात त्रिवार सत्य आहे “.

आपल्याकडे आधीच अमृताने भरलेली भांडी असताना…

आपण ते अमृत फेकून चिखलाने का भरतोय…? ह्याचा जरा विचार करा..

☀️ मातृनवमी होती तर मग Mother’s day का आणला?

☀️ कौमुदी महोत्सव आहे तर Valentine day कशासाठी?

☀️ गुरू पूर्णिमा आहे तर Teacher’s day कशाला हवाय ?

☀️ धन्वंतरी जयंती आहे तर Doctor’s day कशासाठी?

☀️ विश्वकर्मा जयंती आहे Technology day कशासाठी?

☀️ सन्तान सप्तमी आहे तर Children’s day कशासाठी?

☀️ नवरात्री आणि कन्या भोजन आहे तर Daughter’s day कशासाठी?

☀️ रक्षाबंधन आहे तर Sister’s day कशासाठी?

☀️ भाऊबीज आहे तर Brother’s day कशासाठी?

☀️  वळे नवमी, तुळशी विवाह साजरा करणारे हिंदूंना Environment day  ची काय आवश्यकता ?

आपल्या हिन्दुंचे सर्व उत्सव किती सुन्दर आहेत बघा: 

मकर संक्रांती, वसंत पंचमी, महाशिवरात्री, होळी, चैत्र नवरात्री, राम नवमी, अक्षय तृतीया, नाग पंचमी, जन्माष्टमी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, चंपाषष्ठी, दत्तजयंती इत्यादी सणवार असतात. हे सर्व सणवार गर्वाने साजरे करा.

आपल्या कडुन पाश्चिमात्यांचे आंधळेपणाने अनुकरण होणार नाही ह्याची काळजी घ्या…  

“जेव्हा-जेव्हा सूर्य पश्चिमेला जातो तेव्हा तो मावळतो.” हे या जगात त्रिवार सत्य आहे.

आपल्या सनातनी, सांस्कृतिक आणि शाश्वत मुळांकडे परत या.

आपले व्रत-वैकल्य, उपवास, विविध सणवार आणि उत्सव साजरे करा. आपली सनातनी हिन्दु संस्कृती आणि सभ्यता जिवंत ठेवा.

卐 ॐ शुभम् भवतु  卐

कवी :अज्ञात

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘पगार– –’ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘पगार – –’ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

‘Miss World’ contest मधे  ‘हरियाणा’ ची डॉ मानुषी छिल्लर हिने विजेते पद पटकाविले होते.

शेवटच्या निर्णायक राऊंड मधे तिला प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वात जास्त पगार कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाला पाहिजे? तेंव्हा तिचे ‘winning’ उत्तर हे होते की “सर्वात जास्त पगार ‘आई’ला मिळाला पाहिजे.” आईच्या कामाचे मोल नाही!

तिच्या या उत्तराने तिने ती स्पर्धा तर जिंकलीच. बरोबर जगात एक नवीन विषय चर्चेला दिला. 

त्यानंतर फोर्ब्स व्दारे  संचालित वेबसाईट ‘Salary.com’ वर research सुरू झाला की एक आई जेवढं काम करते, त्या कामांसाठी जर वेगवेगळी माणसे ठेवली, तर त्यांना किती पगार द्यावा लागेल? तेंव्हा सर्व गोष्टी लक्षात घेता, एका आईचा पगार वर्षाला एक लाख पंधरा हजार डॉलर  (१,१५,००० डॉलर) असायला हवा. हा निष्कर्ष निघाला. म्हणजे तिला महिन्याला अंदाजे  ९,५०० डॉलर मिळायला हवा. म्हणजे भारतीय आईला ९,५०० × ७५ = ₹ ७,१२,५०० अंदाजे एवढा पगार मिळाला पाहिजे दरमहा.

तिच्या उत्तराने जगात ही  गोष्ट प्रकर्षाने उजागर झाली. जगासमोर भारतीय परिवार व त्यात आईची  भूमिका समोर आली.   अनंत काळापासून आई हेच काम करते आहे रोजच, वर्षानुवर्षे. न  थकता, न थांबता  आनंदाने. कुठेही उपकाराची भावना नाही. अहंपणा नाही. कंटाळा नाही. ती सुखी घराची किल्ली आहे.

एकाच वेळी ती  असंख्य  departments सहज सांभाळते. सकाळ ते संध्याकाळ असंख्य कामं सहज करते. अगदी काटेकोरपणे बिनबोभाट. ती घरची   Administrative officer आहे. वेळ पडली तर डॉक्टर,  टीचर, सल्लागार आहे आणि कधी कधी हिटलरही होते. जवळ जवळ सर्वच मंत्रालये  तिच्याकडे असतात. घराची गृह मंत्री, वित्त मंत्री आहे ती. थोडक्यात घराचा भक्कम आधारस्तंभ आहे. 

तज्ञ, कोणत्या तरी एकाच क्षेत्रात perfect असतात. तज्ञ असतात व त्यांच्या या expertise चे भरपूर पैसेही  मिळतात त्यांना. येथे प्रत्येक घरची आई प्रत्त्येक department किती कुशलतेने सांभाळते.

I think she is ‘The Best CEO’ in the world.

जगाची रीतच आहे ही. जुन्या काळापासून चालत आलेली. कुठेही न लिहिलेले नियमच आहेत ते की ही सर्व कामे तिनेच केली पाहिजेत.  ही कामे करण्यात तिला आनंदही  आहे.  समाधान आहे. एखादं काम जरी नीट झालं नाही, तर ती disturb होते‌. म्हणजे अगदी भरलेला डबा शाळेत जाताना मुलगा विसरला, तरी ती अस्वस्थ होते. माझी कुठे चूक झाली? याचा विचार करते व पुन्हा असे होणे नाही याची काळजीही घेते.

या सर्व कामाचा मला मोबदला मिळावा हा विचार तिच्या मनातही येत नाही.

“प्रत्त्येक घरी देव पोहचू शकत नाही म्हणून आई असते. आईच्या पायाशी स्वर्ग आहे. आईला केलेला नमस्कार देवाला पोचतो” वगैरे वगैरे हे मोठे, महान विचार पुस्तकात वाचायला मिळतात. काळ कितीही बदलू दे, आधुनिकता किती ही असू दे, “आई” आईच राहणार आहे.

तशीच कर्तव्यदक्ष. आपल्या घराला घरपण देणारी, जीव ओवाळून टाकणारी, सांभाळणारी….!

प्रत्येकाच्या या आईला साष्टांग नमस्कार !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एपिक्यूरसचा पॅराडॉक्स…” – लेखक – डॉ. विजय रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “एपिक्यूरसचा पॅराडॉक्स…” – लेखक – डॉ. विजय रणदिवे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

एपिक्यूरस

देवाच्या अस्तित्वाबाबत सर्वात स्पष्ट, परखड आणि समर्पक मत मांडणारा माझा सर्वात आवडता फिलॉसॉफर म्हणजे “एपिक्युरस”.

“देव आहे”  म्हटलं तरीही अन “देव नाही” म्हटलं तरीही , दोन्ही परिस्थितीत ईश्वरवाद्यांना तोंडावर पाडणारा एपिक्यूरस चा पॅराडॉक्स जगप्रसिद्ध आहे. ह्या पॅराडॉक्स ला चॅलेंज करण्याचे अनेक केविलवाणे प्रयत्न जगभरातील ईश्वरवादी दार्शनिकांनी केले आहेत , परंतु असं करताना ते जे तर्क देतात ते अत्यंत हास्यास्पद आणि बालबुद्धी असतात.

एपिक्युरीअन पॅराडॉक्स मर्मभेदी आहे. अचूक आहे. अभेद्य आहे.

काय आहे एपिक्युरिअन पॅराडॉक्स?

एपिक्युरस ईश्वरवाद्यांना पहिला प्रश्न विचारतो. ” DOES EVIL EXIST ? ” (ह्या जगात दुष्ट प्रवृत्ती , दुर्दैवी /वाईट गोष्टी अस्तित्वात आहेत का?

ह्या प्रश्नाचं उत्तर “होय” असंच द्यावं लागतं. ते अन्यथा देता येत नाही. तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक तुम्हाला हे मान्य करावंच लागेल कि ह्या जगात दुष्ट प्रवृत्ती आणि दुर्दैवी घटना (खून बलात्कार दरोडा अन्याय अत्याचार इत्यादी) अस्तित्वात आहेच आहे.

आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर “होकारार्थी” दिल्यावर एपिक्युरस दुसरा प्रश्न विचारतो अन इथूनच आता तो आस्तिकांना लपेटायला सुरवात करतो.

दुसरा प्रश्न.. “CAN GOD PREVENT EVIL ?” अर्थात देव ह्या दुष्टतेला रोखण्यास समर्थ आहे का?

आता ह्या प्रश्नाचं उत्तर “नाही” असं दिलं तर देवाच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह लागतं. देव “सर्वशक्तिमान” नाही हे मान्य करावं लागतं .

पण जर का ह्या प्रश्नाचं उत्तर “होय” असं दिलं तर मग एपिक्युरस तिसरा प्रश्न विचारतो..

“DOES GOD KNOW ABOUT THE EVIL ?” अर्थात देवाला ह्या दुष्टतेबद्दल संज्ञान आहे का?

आता जर “नाही” म्हटलं तर देव “सर्वज्ञ” आहे ह्यावर प्रश्नचिन्ह लागेल.

आणि जर का “होय” असं उत्तर दिलं तर मग एपिक्युरस चौथा प्रश्न विचारतो…

“DOES GOD WANT TO PREVENT EVIL ?” अर्थात जगात दुःख नसावं असं देवाला वाटतं का ?

आता “नाही” म्हटलं तर देव दयाळू किंवा प्रेमळ नाही हे मान्य करावं लागेल. आणि जर “हो” म्हटलं तर मग एपिक्युरस पाचवा प्रश्न विचारतो..

“IF GOD WANT TO PREVENT EVIL THEN WHY IS THERE EVIL ?” अर्थात दुष्टता /दुःख दूर करण्याची इच्छा देवाची आहे तर मग त्याच्या इच्छेविरुद्धहि दुःख अस्तित्वात का बरं आहे ?

ह्याचं उत्तर देताना आता ईश्वरवाद्यांना चलाखी करावी लागते. ती अशी..

पहिला तर्क ईश्वरवादी देतात तो असा ,” दुष्टतेला देव नाही तर सैतान कारणीभूत आहे”

पण मग सर्वशक्तिमान ईश्वर सैतानाला नष्ट का करत नाही ? आता परत देवाच्या सर्वशक्तिमान असण्यावर शंका आली.

दुसरी चलाखी केली जाते हा दुसरा तर्क देऊन, “आपली सत्वपरीक्षा घेण्यासाठी देवाने दुष्ट प्रवृत्ती तयार केल्या आहेत”

पण मग जर देव सर्वज्ञ आहे तर त्याला आपली परीक्षा घेण्याची गरज काय? त्याला तर सर्व माहीतच असते न ?

तिसरी चलाखी ,” दुःख आणि नाकारात्मकतेशिवाय जगाचे अस्तित्व टिकून राहणे शक्य नाही”

म्हणजे दुखविरहित जगाची निर्मिती करण्यात देव “असमर्थ” आहे तर !  आणि जर समर्थ आहे तर मग त्यानं दुखविरहित जगाची निर्मिती केली का बरं नाही?

आता इथं ईश्वरवादी कोंडीत सापडतात . कारण आता त्यांना तेच तेच तर्क घुमून फिरून द्यावे लागतील , “देवाची मर्जी” , “सैतान” “लीला” “सत्वपरीक्षा” इत्यादी इत्यादी.

पण ह्यातला कोणताही तर्क दिला तरी एपिक्युरस म्हणतो कि देव एकतर अस्तित्वातच नाही. किंवा असेलही तरी तो सर्वशक्तिमान नाही, सर्वज्ञ नाही किंवा सर्वव्यापी नाही. आणि जर का तो सर्वशक्तिमान सर्वज्ञ आणि सर्वव्यापी असूनही ह्या जगातलं दुःख दूर करत नसेल तर मग तो स्वतः  दुष्ट असावा.

कोणत्याही परिस्थितीत एपिक्युरसला देवाची भक्ती करणे किंवा त्याला मानणे हे शहाणपणाचे कृत्य वाटत नाही. आणि गरजेचे तर नाहीच नाही.

एपिक्युरस शेवटी म्हणतो.. “ जर देव नसेल तर प्रश्नच मिटला, परंतु तो जर असेलही तरी माझ्यासाठी तो “रिलीव्हन्ट” नाही अन पूजनीय नाही. दूर आकाशात बसून मानवी दुःखांकडे पाहून त्यातून आनंद लुटणारा निष्ठुर देव तुम्हाला लखलाभ असो, मला त्याची गरज नाही “  असे तो ठामपणे सांगतो. 

लेखक : डॉ. विजय रणदिवे

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सदाफुली… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ सदाफुली… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

सदाफुली………… उमलावं हिच्या सारखं.   बहरावं हिच्या सारखं…….. ना असते ऋतूंची ओढ ना कधी मावळतीचे वेड……….. नसते कधी ईश्वराच्या चरणी…… ना कधी कोणी केसात माळत…… तरीही बहरत राहते स्वतः साठी…….. अनेक रंगात……. कुठे आहे ती कडे कपारीत , तर कधी छान बगीचात तर कधी एकटीच उंच डोंगरावर………… असतात कधी सोबती तर कधी एकटी……… तरीही बहरायचं एवढंच माहिती असतं……… मिळणार नसतो कधी मानाचा मुकूट…… ना मिळणार असते कधी कौतुकाची थाप………… असेच येतात अनेक प्रसंग तरीही रहायचं सदाफुली सारखं नेहमी प्रसन्न…….. ना उगवतीची आस ना मावळतीची भिती .. लक्षात ठेवायचं आपण  नेहमीच बहरायचं……….. आयुष्य जगावं सदाफुली सारखं ……….. Be happy anytime anywhere in any condition …….. 

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सिंदबादची सफर… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ सिंदबादची सफर… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

टीम सेव्हरीन

पावनखिंड बद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलोय.शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवली.पुर्वी तिचं नाव घोडखिंड होतं..पण बाजीप्रभूच्या बलिदानाने ती पावन झाली.. म्हणून मग पावनखिंड.

काही वर्षांपुर्वी काही शिवप्रेमींनी ठरवलं.शिवाजी महाराज या खिंडीतून ज्या प्रकारे गेले.. तस्साच प्रवास करुन गडावर पोहोचायचे.तश्शाच एका पावसाळी रात्री त्यांनी ती पावनखिंड पार केली.गो.नी.दांडेकर,बाबासाहेब पुरंदरे यांनी पण अनेकदा ती पार केली.इतिहास प्रेमी जे असतात.. किंवा इतिहासाचे अभ्यासक..ते अश्या प्रकारची साहसी करतच असतात.

कालीदासाचं मेघदुत हे एक दीर्घ काव्य.या काव्यातील मेघाचा प्रवास सुरु होतो तो मध्य भारतातुन.. साधारण नागपुरच्या परिस्थितीनं निघालेला मेघ उत्तर भारतात कसा जातो ‌.त्याला भारताच्या या भागातील निसर्ग कसा दिसतो याचे वर्णन म्हणजे मेघदुत.

मध्यंतरी याच मार्गाने एकाने प्रवास केला.. हेलिकॉप्टर मधुन..आणि मेघदुतामधील वर्णन अनुभवलं.

सिंदाबादची सफर पण आपण वाचत आलोय.. मुळ अरबी भाषेतील या सुरस कथा.सिंदाबादच्या सात सफरी वाचुन एकाला वाटलं की आपण सुध्दा अश्या सफरी कराव्यात.सिंदाबादने ओलांडले तसे..त्याच मार्गाने.. तश्याच पध्दतीच्या जहाजातुन.

टीम सेव्हरीन त्यांचं नाव.हा एक आयरीश संशोधक होता.या संपूर्ण मोहिमेचा खर्च उचलला होता ओमानच्या सुलतानाने.ओमान  मधील सोहर हे एक बंदर.सिंदबाद या गावचा होता अशी येथील गावकऱ्यांची समजुत.त्यामुळे या जहाजाचे नाव ठेवलं गेलं..सोहर.

टीम सेव्हरीन ओमान मधील शहरांमधून..बंदरांमधुन भटकला.सिंदबाद ज्या प्रकारच्या जहाजातुन निघाला होता,ते जहाज नेमकं कसं होतं यावर त्यानं संशोधन केलं.त्याला समजलं की हे जहाज बांधण्यासाठी आपल्याला लाकुड आणावं लागणार आहे ते.. भारतातील मलबार किनारपट्टी वरुन.

तो कालिकतला पोहोचला.फार पुर्वी कालीकत बंदरामधुन मसाल्याचा व्यापार चालत असे.येथे येणाऱ्या अरबी जहाजांमुळे येथे बरेच उद्योग बहरले होते.जहाज बांधणारे.. दोरखंड वळणारे..जहाजांसाठी लागणारे लाकूड विकणारे.

येथे आल्यावर सेव्हरीनला समजलं की सागवान लाकडांच्या निर्यातीवर भारत सरकारने बंदी आणली आहे.मग ऐनाचं लाकूड वापरायचं ठरवलं.मंगलोरच्या आसपास जंगलं, टेकड्या धुंडाळल्या.शेवटी कोचीन जवळ हवं तसं लाकूड मिळालं.

जहाजाच्या तळाचा भाग हा सगळ्यात महत्वाचा.त्यासाठी साधारण बावन्न फुट लांबीचा सरळसोट वासा हवा होता.बराच तपास केल्यानंतर तोही मिळाला.बाकी महत्त्वाची खरेदी होती काथ्याची.चारशे मैल इतक्या लांबीचा काथ्या मिळणं आवश्यक होतं.लक्षद्विप बेटावरच्या या विषयातला तज्ञ म्हणजे कुन्हीकोया.त्याच्या सल्ल्यानुसार ही पण खरेदी झाली.

फळ्या जोडण्यासाठी पाव टन डिंक.. चुन्याची पोती..जहाजाला बाहेरुन लावण्यासाठी माशांचं तेल..ते सहा पिंप..हत्यारे..हातोड्या..अशी ही भली मोठ्ठी यादी.

जहाज शिवण्याची कला असलेले मोजकेच माणसं होते.. तेही लक्षद्वीप बेटावर.मग तेथुन दहा माणसं ओमानला आणण्यात आली.

आणि मग एका शुभ दिवशी जहाज बांधणीला सुरुवात झाली.तो दिवस होता ४ फेब्रुवारी १९८०.काही दिवसांतच सोहर नावाचं ते भव्य जहाज उभं राहिलं.

मस्कतमधील बंदरात जहाज उभं राहीलं.. अगदी मध्ययुगीन काळात होतं तसं.मग त्यावर एक एक साहित्य जमा होऊ लागलं.जनरेटर..कंदील..लाईफ जॅकेटस्.. खाद्य वस्तु..हजारो अंडी.. कांदे बटाटे.. आणि ओमानी खजुर.

सोहरवर कमीत कमी वीस कर्मचारी होते.परंपरागत जहाज हाकण्याची कला असलेले खलाशी.. देखभाल करणारे..शिडं हाताळणारे.. त्याशिवाय रेडिओ ऑपरेटर.. कॅमेरामन.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञ.

२३ नोव्हेंबर १९८० या दिवशी सोहर ची वाटचाल सुरु झाली.ज्या मार्गाने आठव्या शतकात सिंदबाद गेला होता..त्यांचं मार्गाने सोहर निघालं.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोहर लक्षद्वीप बेटावर आलं.इथुन पुढे कालीकत.. मग श्रीलंका.पंचावन्न दिवसांच्या प्रवासानंतर सोहर  सुमात्रा बेटावर पोहोचलं.नंतर सिंगापूर आणि शेवटी चीनचा किनारा.

नकाशा पुढे ठेवून बघितलं तर कळतं की सेव्हरीनची ही सफर सुरू झाली मस्कत पासून.अरबी समुद्र.. हिंदी महासागरातुन सहा हजार मैलांचा प्रवास करत साडेसात महिन्यांनी ही सफर पुर्ण झाली.खलाशांचं जीवन तसं धोक्याचचं असतं.सोहर वरील निम्मे खलाशी कधी ना कधी संकटात सापडले होते.अनेक संकटांचा सामना करत टीम सेव्हरीनची ही सफर पार पडली.ती मुळच्या सिंदबादच्या सफरीइतकीच रोमांचक होती.

या प्रवासासाचा सुरस तपशील आपल्याला वाचायला मिळतील मिळतो तो टीम सेव्हरीन ने लिहीलेल्या आपल्या पुस्तकात..१९८२ सारी प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाचे नाव आहे.. ‘दि सिंदबाद व्हॉयेज’

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरेदी…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरेदी…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

“ तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे? ”

“ होय आहे !.” 👌

“कधी घेतलात?”

“झाली की १५-२० वर्षे.”

“व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”

“झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता कि बहुतेक. !”

“आता कुठे असतो.”

“माळ्यावर असेल बहुदा?. हिला माहीत आहे.” 🤣

“मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”

“अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन !.” 🤣

“पण मग घेतला कशाला?”

“अहो, एक वर्ष दिवाळीत हिला पाडव्याची ओवाळणी म्हणून घातला.”

“ म्हणजे तुम्ही आपण होऊन घातली ओवाळणी?”

“नाही. चार महिने आधी हिच्या बहिणीकडे घेतला होता. तिनेच तो सेल्समन आमच्याकडे पाठवला होता. मेव्हणी म्हणाली जाळ्या, जळमटे फार छान निघतात.” 🤦‍♀️‍♀️

“काय सांगता! मग नसतील जाळ्या, जळमटे तुमच्या घरात?”

“नाही हो !. कोणीही तो वापरायला नको म्हणतात. फार उस्तवार करावी लागते त्याची. सुरुवातीला मुलं भांडायची तो वापरायला. …मग उत्साह गेला. आता हीच मला म्हणते कधीतरी अहो, तो व्हॅक्युम क्लिनर लावून जाळ्या काढून द्या ना.” 🤣

“मी म्हणतो तिला तूच कर. तर म्हणते कशी… हे पुरुषांचं काम आहे. 🤦‍♂️”

“म्हणजे तुमच्याच अंगावर पडलं म्हणायचं.”

“मी नाही म्हणतो. त्यापेक्षा कुंचा घेतो आणि स्टूल घेऊन सोयीचं होतं.” 🤣

“मेव्हणी वापरते का?”

“नाही विचारलं कधी…. तिला काही विचारायची सोय नाही. …तिने काहीतरी नवीन घेतलेलं असतं आणि इकडे वाटतं आपल्याकडेही असावी ती वस्तू.”

“बरं… आता ते जाऊन द्यात. ही व्यायामाची सायकल दिसते आहे तुमच्याकडे.??? रोज करता की नाही व्यायाम?”

“नाही हो… टॉवेल वाळत घालतो तिच्यावर.” 

“काढूयात का त्यावरचा टॉवेल?… अरेच्या! टॉवेलच्या ओलीमुळे गंजून गेली आहे हो सायकल…” 🤦‍♀️‍♂️ 😖

“अहो, मुलांसाठी आणली, पण १५ दिवसांनंतर वापरतील तर शपथ.?” 🤦‍♀️‍♂️‍♀️

“बरं आणली तेव्हा मुलगा किती वर्षांचा होता?”

“होता. ५-६ वर्षांचा. अहो, तेव्हा मीच वापरणार होतो. ही पण म्हणाली होती कि मी पण करीन व्यायाम 🏋🏼‍♂️🚴🏼‍♀️ पण राहूनच गेले. 😠

“आता वापरून बघू यात का?”

“अहो, तिची चेनपण तुटलीय. ती बसवलीच नाही.” 🤣

“बरं ते जाऊ द्यात. हे काय आहे?”

“रोनाॅल्डचा फूड प्रोसेसर.” 👌

“त्याचं काय करता?”

“यात कणिक मळली जाते, काकडी गाजराचे काप होतात. अजून काय काय बरंच होतं.” 👌

“अरे व्वा! वहिनींना त्रास कमी झाला असेल नाही.”

“ नाही अहो, आम्ही फक्त दाण्याचा कूट करतो त्यात. ही सुरुवातीला वापरायची. पण पुढे म्हणायला लागली तो धुवायचा कंटाळा येतो. त्यापेक्षा परातीत कणिक भिजवणे सुटसुटीत होते. थोडे हात दुखतात हिचे, पण मिक्सरचे भांडे आणि ब्लेड धुण्यापेक्षा बरे पडते.” 🤦‍♀️‍♀️

“मग घेताना लक्षात आले नाही?”

“अहो, तो सेल्समन हिच्या मैत्रिणीने पाठवला. तिने फार कौतुक केले. मग आम्हीपण घेतला.” 🤣

“ती मैत्रीण वापरते का?”

“काय आहे … हे बघा, ही म्हटली आणा. आपलं काम पैसे देणं आहे. 🤦‍♂️ 🤣 मी विचारत नाही का? कशाला?”

“बरं ते जाऊन द्या. तुमचा लग्नातला सूट आहे?”

“हो. आहे ना.” 👌 🎁 👌

“शेवटचा कधी घातलात?”

“आमच्या लग्नात.” 🤣

“म्हणजे किती वर्षे झाली.”

“दहा.पंधरा”

“मधे कधी घालून बघितलात?” 🤣

“पाच वर्षांपूर्वी मेव्हणीच्या लग्नात. पण बसला नाही.”

“म्हणजे तुमच्या लग्नाच्या दिवशी फक्त घातला.” 🤣

“नाही. नंतर एकदा कंपनीत सेमिनारला घातला. बसं इतकाच.” 🤦‍♀️‍♂️ 🤣

“काय किंमत होती?”

“त्या काळात दहा हजार असेल.”

“मग वहिनींचा लग्नातला शालू 🎁 👌 त्या अजून वापरतात?”

“नाही. तो शालू प्रत्येक वेळी घातला तर लोक काय म्हणतील? म्हणून प्रत्येक लग्नात नवी साडी घेते.”

“म्हणजे शालू एकदाच वापरला. होय ना?” 🤦‍♀️‍♀️

“ हो ! म्हणजे वापरला, पण ज्या लग्नात नवीन माणसे असतात तेव्हाच वापरते. ते काय आहे ना दर वेळी तोच तोच शालू वापरला तर इतर बायका हसतील असे तिला वाटते.” 🤣 

“शालू आणि कोट कुठे आहेत?”

“वॉर्डरोब मध्ये. जागा अडवतायत. 🤦‍♂️ 🤦‍♀️” 🤣

“बरं ते जाऊ द्यात. हा क्रोकरी सेट छान आहे. 💎 👌 कधी घेतला?”

“फार वर्षे झाली.”

“कधी वापरला जातो?”

“एकदाच वापरला. मोलकरणीने त्यातला एक बाउल फोडला. सेटमध्ये ३६ पीस होते, आता ३५ पीस राहिलेत.” 🤦‍♂️ 🤦‍♀️ पैशांचा अपव्यय ! 🤣 ! आईला-सासुला, गरीब पुतण्याला देणार नाहीत 🤦‍♂️

“मग दुसरा बाउल आणायचा ना!”

“अहो, तसाच मिळत नाही ना… मग ही म्हणाली, मोलकरणींच्या राज्यात नकोच वापरायला.” 🤣

“मग कुणाच्या राज्यात वापरणार?”

“हो ना. तो प्रश्नच आहे. ही म्हणते क्रोकरी वापरली की धुवायचे काम हिलाच करावे लागते. मोलकरणीचा भरवसा नाही कधी फोडतील ती. मग ही म्हणते नकोच वापरायला. आठ हजाराचा सेट पडून आहे.” 😠

“शोकेसमध्ये छान दिसतो पण.” 🤣

“हो ना. आलेल्या पाहुण्यांना फार आवडतो. सगळे म्हणतात छान आहे. पण बाउल फुटल्यापासून हिचे मनच उडाले आहे.” 🤣

“बरं, अजून काय काय आहे जे वापरात नाही असे.”

“ बरेच !….खूप आहे कि. राईस कुकर, ओव्हन, पोळ्या लाटायचे मशीन, कॉफी मशीन, स्युईंग मशीन. आणखी काय काय आहे बघावं लागेल. ” 👌 🤣  

“व्वा! चालू द्यात. चला निघतो मी.” 🤦‍♀️‍♂️ 🤣

* * * * * * * * * * * * * * *

उगाच हसू नका. 😊  तुमच्या घरात काही वेगळे नाही 😊 . तुम्हांला विचारले तर तुमची उत्तरेदेखील अशिच, हीच असणार. 😊 🤣 पण तुम्हांला सांगतो तुम्ही फार बरे. काही काही जण तर अक्खी कार घेऊन ठेवतात आणि महिन्यातून एकदा काढतात battery चार्ज करण्यासाठी 🤣. काही लोक सेकंड होमदेखील असेच उगाच नासिक, पुना, मुंबई,तळेगावला घेतात 😖. काही लोक फार्म हाउस घेतात कोकणात आणि पाच वर्षांत एकदाच जातात 🤣 तर रस्ताच विसरलेले असतात.. प्लॉट शोधत बसतात आणि पाच वर्षांपूर्वीच्या खुणा शोधत बसतात. 🤣 

 तुम्ही फार बरे आहात. थोडक्यात आहे अजून

असो !. येतो मी !. 

चहा पुढच्या वेळी घेऊ. ! ! !

विवेक जागृत ठेवा,

आनंदात राहू शकाल,…..

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसनं… लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ उसनं… लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

वैशाली आणि गौरवचं नुकतंच एका महिन्यापूर्वी लग्न झालेलं… दोघेही मूळ अकोल्याचे. नोकरी निमित्त गौरव आधीच मुंबईमध्ये स्थाईक झालेला आणि आता लग्नानंतर वैशालीने देखील मुंबईमध्ये नोकरी बघण्याचे ठरले. वैशाली जरी अकोल्यात वाढलेली तरी एकदम स्मार्ट, प्रचंड हुशार आणि हुशार असल्याने साहजिकच थोडीशी आत्मकेंद्री.. नाही म्हणजे मित्र मैत्रीण होते तिला, पण तरीही तिचा अभ्यास वगैरे सांभाळून मगच त्यांच्या बरोबर मज्जा करायला, फिरायला जाणारी अशी होती ती. आई अनेकदा तिला सांगत, अगं असं घुम्या सारखं राहू नये.. चार लोकात मिसळावं, आपणहून बोलावं, ओळखी करून घ्याव्यात… पण तेव्हा तिला काही ते फार पटत नसे.. आई सतत तिच्या बरोबर असल्यामुळे तिलाही कधी एकटं वगैरे वाटलं नाही…

आता मुंबईमध्ये आल्यावर हळू हळू इथलं वातावरण अंगवळणी पडत होत तिच्या.. वैशालीला मुंबईला घरी येऊन १०/१२ दिवस झाले होते.. कामवाली बाईसुद्धा मिळाल्याने वैशालीचा भार एकदम कमी झाला होता… 

ती अशीच एका दुपारी पुस्तक वाचत बसली होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली.. तिने थोडंसं नाराजीनेच दार उघडलं.. पाहते तो साधारण ७० च्या आसपास वय असलेल्या आज्जी उभ्या होत्या दारात… 

तिने दारातूनच विचारलं, “आपण कोण? काय हवं आहे?”

“मी, लतिका देवस्थळी.. इथे शेजारच्या फ्लॅट मध्ये राहते.” आज्जीबाईंनी माहिती पुरवली.

“बरं…काही काम होतं का??”, आपली नाराजी सुरातून फार जाणवू न देता वैशालीने विचारलं.

” १०/१२ दिवस झाले तुम्हाला येऊन , म्हटलं ओळख करून घेऊ.. म्हणून आले… आत येऊ? ” 

वैशालीने थोडं नाराजीनेच दार उघडलं… तशी आज्जीबाई आनंदाने घरात येऊन सोफ्यावर बसल्या…

“थोडं पाणी देतेस??”, आज्जी नी विचारलं.

“हो…”

वैशाली स्वयंपाक घरातून पाण्याचा ग्लास घेऊन आली…

“छान सजवलयस हो घर… निवड चांगली आहे तुझी… मला थोडी साखर देतेस.. घरातली संपली आहे… ह्यांना चहा करून द्यायचाय.. मेला, तो किराणावाला फोन उचलत नाहीये माझा.. कुठे उलथलाय देव जाणे..” आज्जी एका दमात सगळं बोलून गेल्या.

“हो आणते…”  वैशाली वाटी भरून साखर घेऊन आली….. 

“चला आज साखर दिलीस.. आपलं नातं साखरे सारखं गोड राहील हो पोरी “, असं म्हणून देवस्थळी आज्जी तिच्या गालाला हात लावून निघून गेल्या…

जरा विचित्रच बाई आहे?? असं पहिल्याच भेटीत कोणी काही मागत का.. आणि हे काय, गालाला काय हात लावला तिने.. जरा सांभाळूनच राहावं लागणार असं दिसतंय… वैशालीचं आत्मकथन सुरू होतं.. तेवढ्यात गौरव आला….. 

तिने गौरवच्या कानावर घडलेला प्रकार घातला… तो म्हणाला, ” अग म्हाताऱ्या आहेत ना वाटलं असेल तुझ्याशी बोलावं म्हणून आल्या असतील.. नको काळजी करूस..”

एक दोन दिवस गेले अन् परत दुपारी दारावरची बेल वाजली..

वैशालीने दार उघडलं तर समोर आज्जी… आणि हातात वाटी…. आज ही काहीतरी मागायला आल्यात वाटतं…

“जरा थोडा गूळ देतेस का?? ह्यांना आज गूळ घातलेला चहा प्यायचाय आणि घरातील गूळ संपलाय…” इति आज्जी

“हो.. देते…”

वैशाली वाटीतून गूळ घेऊन आली … 

“वा .. धन्यवाद हो पोरी… चांगली आहेस तू… असं म्हणून तिच्या हाताला हात लावून आज्जी घरी गेल्या..”

तिला परत असं त्यांनी स्पर्श करणं जरा खटकलं ….. 

पुन्हा एक दोन दिवस झाले आणि आज्जी दारात उभ्या आणि हातात वाटी, “जरा दाणे देतेस…”

— हे असं हल्ली दर एक दोन दिवस आड चाले… काहीतरी मागायचं आणि जाताना हाताला, गालाला, पाठीला, डोक्याला हात लावून निघुन जायचं… वैशालीला ते अजिबात आवडत नसे, अस परक्या बाईने आपल्याला हात लावणं..

ती आपली गौरवला नेहमी सांगायची पण तो काही हे सगळं फार सिरीयसली घेत नव्हता…

एके दिवशी न राहवून तिने ठरवलं आता आज आपण त्यांच्या घरी जाऊन काहीतरी मागू या… हे काय आपलं सारखं घेऊन जातात काही ना काही….. 

वैशाली ने आज्जींचं दार वाजवलं.. आजींनी दार उघडलं तशी वैशाली घरात गेली..

आज्जी, ” अरे व्वा, आज चक्क तू माझ्या घरी आलीस.. छान छान.. खूप बरं वाटलं…” 

वैशाली आपलं स्मितहास्य करत घरावरून नजर फिरवत होती आणि एका जागी तिची नजर खिळली… भिंतीवर २५/२६ च्या आसपास असलेल्या एका सुंदर मुलीचा फोटो आणि त्याला हार…

आज्जीच्या लक्षात आलं… 

” ही माझी वैशाली… काय गंमत आहे नाही… सेम नाव… काही वर्षांपूर्वी अपघातात गेली… मला कायमच पोरकं करून… जेव्हा तू इथे रहायला आलीस आणि तुझं नाव ऐकलं ना तेव्हा सगळ्या आठवणी एकदम ताज्या झाल्या… खूप अडवलं ग मी स्वतःला की माझी वैशाली आता नाहीये आणि परत कधीच येणार नाहीये… पण मन फार वेड असतं पोरी… बुद्धीवर मात करतंच….  

…. आणि मग मी सुरू केलं तुझ्याकडे उसनं सामान घ्यायला येणं… पण खरं सांगू, मी सामान नाही ग .. 

स्पर्श उसना घेत होते… !! ” 

लेखिका : सुश्री प्रणिता स्वप्निल केळकर 

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “Mandatory Overs…” – लेखक – अवि बोडस ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “Mandatory Overs…” – लेखक – अवि बोडस ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

एका पाठोपाठ wicket पडाव्या तसा एक एक दात crease सोडून चाललाय! तरीही काही खायला जावं  तर घरातल्या घरात running between the wicket चालू होतं .डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच ! आता mandatory overs! विसरलात वाटतं !

डोळ्यात मोतीबिंदू झाला की काय? सारखं bad light चं  appeal  करतायत ! तरीही डोळे फाडून फाडून मोबाईल मधे cheer girls पाहायला जावं  तर बायको पाठीमागे cought behind साठी तत्पर! डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय, बरोबरच आहे !आता mandetory overs! विसरलात वाटतं !

आजकाल पाय वळतात म्हणून जरा बाहेर मित्र मैत्रिणीकडे जायला पाय वळतात तर ते नेमके ते wide ball पडल्यासारखे उजवी डावीकडे पडतात. रस्ता अडवून बायको दारात उभी आणि मुलगा सून नातू सारे एक सुरात leg before wicket ..  out म्हणतात. खरं  म्हणजे इन म्हणतात. डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच ! आता mandatory overs! विसरलात वाटतं ! काठी ठेवत चला bat सारखी !

आजकाल कान माझं सुद्धा ऐकत नाहीत. त्यामुळे बरेच शब्द ,काही वेळा अख्खं वाक्य missfield होतं  आणि विषय पार boundry line च्या बाहेर ! हैं ना चौका देनेवाली बात ! डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच ! आता mandatory overs! विसरलात वाटतं !

डोक्याच्या peach वर जरा कुठे गवत राहिले असेल तर शप्पथ ! पार पाटा wicket. पोटाचा आकार  

Shape  बदललेल्या चेंडूसारखा होत चाललाय. डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय चालायचंच.आता  mandatory overs ! विसरलात वाटतं….. 

गुळगुळीत दाढी करून पँटवर ball  घास घास घासून तकाकी लकाकी कायम ठेवावी तसं सुरकुतलेल्या चेहऱ्यावर क्रीम चोळून चोळून चेहेऱ्यावरची तकाकी कायम ठेवायचा निष्फळ प्रयत्न करतोय.पण व्यर्थ! डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच, mandatory overs. विसरलात वाटतं !

मनगट तर अशी दुबळी झाली आहेत की हातातली कपबशी कधी spin होउन कपाचा कान bells उडाव्या तसा उडतो ते माझे मलाच समजत नाही.डॉक्टर नावाचा umpire म्हणातोय,चालायचंच !आता mandatory overs! विसरलात वाटतं !

काहीही लक्षण नसताना सर्दी होते रुमालाची covers on होतात आणि  खेळ थांबतो नाक आणि घशाच field inspection होई पर्यंत!डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच !आता mandatory overs! विसरलात वाटतं !

कॉन्फिडन्स तर एवढा शेक झालाय की बारीक सारीक सरळ पडणारा ball सुद्धा bouncer वाटतो आणि विनाकारण bit होतो. hook करायला जावं तर हुकतो!डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच!आता mandatory overs! विसरलात वाटतं !

Umpire ने केव्हाच इशारा केलाय तुमच्या  Power play च्या overs केव्हाच संपल्यात.तेव्हा उगाच मोठे strok न मारता जमतील तेवढे chikki run काढून score board हलता ठेवावा हे मलाही उमगलय.पण यमराज टीम चा Power play मात्र सुरू झालाय.मोठी attacking field लावलीय. डायबेटिस,बीपी,

सांधेदुखी,कंपवात,विस्मरण हे fielder, slip, Gally,covers,point ला catch घ्यायला टपून बसलेत. यमदूत नेटाने inswing,outswing ची भेदक balling करतायत. *umpire म्हणतोय,चालायचंच!आता mandatory overs! विसरलात वाटतं !

.त्या सगळ्यांना चकमा देत गोळ्या इंजेक्शनचे  pad   बांधून इन्सुलिन चे helmet  घालून  gap काढत आपली मात्र batting चालू आहे.तरी एकदा attacking stroke  ने दगा दिलाच. mid on ला  चक्क catch out. तरीही umpire म्हणतोय,चालायचंच !आता mandatory overs! विसरलात वाटतं !

आम्ही जवळ जवळ crease सोडून निघालोच ! — 

— पण तो वरती बसलाय ना third umpire! त्यानें चित्रगुप्ताला action replay दाखवायला सांगितले परत परत !आणि फायनली तो no ball ठरून आम्ही crease वर परत दाखल !आता मात्र century मारायचीच! मगच pavilion ची वाट धरायची. मग भले त्या डॉक्टर नावाच्या umpire ला म्हणू दे ना… mandatory overs ! विसरलात वाटतं !

लेखक :  अवि बोडस

(प्रेरणा : क्रिकेट वर्ल्ड कप २०२४.– वरील घटनांशी माझा काहीही संबंध नाही. फक्त कल्पना विलास यांचा संबंध आहे.) 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print