सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ चाटण संस्कृति… – लेखिका :श्रीमती योगिनी श्रीनिवास पाळंदे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
आमच्या घरी जेवणं झाली की त्यानंतर आमचे वडील ताट ‘चेक’ करायचे.पान स्वच्छ लागायचं.
खाताना स्वच्छ निपटून आणि चाटून पुसून खाणे हे खाद्यसंस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून घट्ट रुजले आहेत.
माझ्या आयुष्यातला चाटण संस्कृतीतला जॉय, माझ्या लहानपणी, जॉय नामक वर्षाकाठी एकदाच मिळणाऱ्या आईसक्रीमपाशी सुरू झाला होता! त्या कपाचे पातळ कव्हरापासून चाटणप्रवास सुरु झाला.
या प्रवासातला प्रामाणिक साथीदार म्हणजे दुधाचं पातेलं. ते घासायला टाकण्यापूर्वी अंगठ्याने त्याला खरवडून घेऊन चाटतानाचा तो समाधीक्षण अवर्णनीय असतो. दुधाच्या पातेल्याच्या इतकंच आमटीचं पातेलं चाटण म्हणजे ‘सुख दुःख समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ.’दूध आणि आमटी याला समान न्याय देण्याइतकं गीतातत्त्व अंगात मुरणं ही या चाटणसंस्कृतीची देन आहे.
रात्रीचं जेवण झालेलं असतं. शेवग्याच्या शेंगांची ओलंखोबरं आणि चिंचगूळ घालून केलेली अमृततुल्य आमटी संपलेली असते, पण त्या रिकाम्या पातेल्याच्या आतल्या भिंतींना जे अमृतकण चिकटलेले असतात, ते बोटाने निपटून चाटून साफ करताना जो काही निर्मळ आनंद मिळतो, तो ते पातेलं चाटणाऱ्यानेच अनुभवावा.
तुम्ही काजू शेंगदाणे घालून मस्त आटवलेली अळूची भाजी (पुण्यात फदफदं म्हणतात) खाल्लेली असेल, पण पंगतीच्या शेवटी उरलेली भाजी, वाटीत ट्रान्सफर केल्यानंतर पातेल्याच्या आत चिकटलेली अळूची-साय कधी खाल्ली आहे?बेफाट लागते!
माझी नणंद गव्हल्याच्या खिरीचं पातेलं, खीर संपल्यानंतर मागून घेते आणि रिकाम्या पातेल्याला स्वच्छ करते.
सासूबाई तर गोडाचा शिरा संपल्यानंतर गार झालेली कढई घेऊन त्यात इवलं दूध टाकून ठेवायच्या आणि पातेले निपटून घ्यायच्या.
पिठल्याच्या कढईच्या तळाशी जमलेली खमंग खरवड बेसुमार चविष्ट लागते. आणि, ती मन लावून खरवडणारं ध्यान, किती सुंदर दिसतं ते साक्षात तुकोबाच सांगू शकतील.
या चाटण संस्कृतीला समजूतदारपणाचे आणि सिव्हिक सेन्सचे अनेक पदर आहेत.
ताट अथवा पातेलं इतकं स्वच्छ निपटावं की त्यातले अन्नकण पूर्णत्वाने संपावे, ते घासणाऱ्या बाईला त्याची घाण वाटू नये आणि बरबटलेलं ताट घासताना व्यय होणाऱ्या पाण्याचीही केवढीतरी बचत व्हावी.
आमचा हा चाटून पुसून खाण्याचा अलिखित नियम हा फक्त पातेलं आणि कढई पुरता मर्यादित नव्हता तर तो आंब्याच्या फोडी आणि कोयी खातानाही लागू व्हायचा.
‘खाऊन माजावं, टाकून माजू नये’, ‘भूखी तो सुखी’ अशा अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांमध्ये लहानपण घालवलेल्या आम्हा सर्वांनाच, अन्न टाकण्याचा मोठाच तिटकारा. एकतर आम्ही जास्त अन्न शिजवत नाही आणि समजा जास्त शिजून उराउरी झालीच तर ती टाकून कधीच देत नाही.
आमटीची थालिपीठं, फोडणीचा भात, किंवा फोडणीची पोळी असेल किंवा, कोबीच्या उरलेल्या भाजीचे पराठे किंवा कोथिंबीर माठ पालक यांच्या कोवळ्या देठाचं बनवलेलं सुप असेल.
तुपाच्या बेरीमध्ये कणिक भिजवण्यापासून ते त्याचा गूळ घालून केलेल्या वड्यापर्यंतचा कायापालट असेल. अशी टाकाऊतुन टिकाऊची संस्कृती किंवा कचऱ्यातून पुनर्निर्माणाची कला जोपासणाऱ्या मला, या दिवाळीत मोठाच धक्का बसला.
घरी केलेला ताजा चिवडा आणि बेसन लाडू एका ओळखीच्या बाईने लेकाला खायला दिले, त्यानेही “ममी, यम्मी”करत खाल्ले. (मम्मी आणि यम्मी हे शब्द ऐकल्यावर का कुणास ठाऊक एक कानफटात मारावीशी वाटते. तसेच मराठी घरात मोठया बहिणीला ताई न म्हणता दीदी शिकवले जाते त्याचाही राग येतो)
असो खरा कानफटात मारायचा प्रसंग तेव्हा उदभवला, जेव्हा मी त्याची ताटली घासायला टाकली. मी पाहाते तो त्यात चिवड्यातून वेचलेले दाणे आणि लाडवातून उपटलेले बेदाणे त्याने चक्क टाकून दिलेले होते. त्याला विचारल्यावर ”हल्ली मला नाही आवडत तो कचरा,“ इतकं सरळ सोपं उत्तर आलं.
बारकाईने पाहिल्यावर अशा टाकणं-प्रसंगांची न संपणारी मालिकाच माझ्या डोळ्यापुढे तरळली.
माझा एक भाऊ पोहे आणि उपम्यातून मोहोरी निवडून बाजूला ठेवतो आणि मी फारफार तर मोहोरी कढीपत्ता मिरची असा सो कॉल्ड कचरा टाकणाऱ्यांना एकवेळ माफ करू शकते, पण बुफेच्या रांगेत उभे राहून भुकेकंगाल राष्ट्रातुन आल्यासारखं बदाबदा वाढून घेऊन, नंतर अन्न टाकून देणाऱ्यांना कधीही माफ करू शकणार नाही.
काहीजण पुलावातून काजू बाजूला निवडून ठेवतात आणि कितीतरीजण न आवडत्या भाज्या पुलावातून निवडून टाकून देतात आणि “नाही आवडत आम्हाला त्या भाज्या”असं निर्लेप स्पष्टीकरण देतात.
गुळाच्यापोळ्या खाताना, गूळ पसरलेला भाग सोडून उरलेल्या निर्गुळपोळीच्या चंद्रकोरी टाकणाऱ्यांचीही एक जमात असते.
पावाच्या कडा टाकून मधला मऊभाग खाणारे महाभागही असतातच की.
मसालादूध म्हणजे माझा जीव की प्राण!!
पण त्यात जीव ओतून घातलेलं केशर आणि सुकामेव्याचं वैभव, तळाशी जाऊन बसतं ही एक समस्याच आहे. आणि हल्लीच्या पिढीच्या माजखोर पाईकांना ते चाटायला आवडत नाही आणि टाकण्यात काही गैरही वाटत नाही.
मी मसाला दुधाच्या ग्लासच्या तळाशी चिकटलेली सुकामेवापूड बोटाने चाटून न खाणाऱ्याला कधीच क्षमा करू शकत नाही.
माझ्या एका मैत्रिणीकडे भरली वांगी प्रचंड आवडतात. ती करतेच अप्रतिम.पण तिची मुलं वांग्याला चिकटलेला मसाला खाऊन वांगी चक्क टाकून देतात. मी तिला सुचवणार आहे की एक दिवस मसाल्याचा गोळाच दे डब्यात भाजी म्हणून. कशाला ती वांगी फुकट घालवायची!!
अशा टाकण-संस्कृती पाईकांना शनिवारवाड्यावर जाहीर फटके अशा शिक्षा ठोठावल्या पाहिजेत
बरं ही टाकणं मंडळी स्वतः चाटून पुसून घेत नाहीतच पण इतरांनी कुणी चाटायला घेतलं की त्यांना एमबॅरॅसिंग वाटतं (टाकताना बरं नाही वाटत एमबॅरॅसिंग).
खूप जणांना सवय असते,ते पूर्ण चहा पीत नाहीत,तळाशी उरवतात…म्हणजे आम्ही वेडेखुळे म्हणून गाळून देतो की काय याना चहा!!
काहींना चहावर जमलेली साय त्याच कपाच्या कडांवर फाशी दिल्यासारखी टांगून ठेवण्याची सवय असते.जी बघताना घाण वाटते.
पुन्हा तो कप साफ करणाऱ्याचा विचार केला आहे का कधी?
ह्या मुलांनी खाल्लेल्या हापुसच्या फोडी बघितल्या आहेत? विलक्षण वेदनादायी आहे त्या खाल्लेल्या फोडी टाकणं!शरीराचा नक्की कुठला अवयव वापरतात फोडी खाताना देवच जाणे. दात नामक अवयव तोंडात असताना, आंब्याच्या फोडीला इतका गर शिल्लक राहूच कसा शकतो? आमच्यावेळी आम्ही आंब्याच्या कापट्या खाताना, जबड्यातला सर्वात तीक्ष्ण दात वापरून त्याचं अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक करायचो,आणि त्यानंतर बाठ कुणी चाखायची यावरून युद्धं व्हायची ती वेगळीच.
हल्लीच्या फूड फूड वगैरे चॅनेलवर येणारे समस्त कपूर-खन्ना लोक, पदार्थ करुन झाल्यावर ज्या बेपर्वाईने ती पातेली आणि कढया सिंकमध्ये टाकतात, ते पाहून अंगावर काटा येतो.
खरवडून घेणे, निपटून घेणे, चाटून घेणे, पुसून घेणे, विसळून घेणे या स्वैपाकघरातल्या पाच क्रियापदांची ओळख हल्लीच्या पिढीला करून द्यावी वाटते.
आतेसासूबाईंकडे एकदा गेले होते. त्या गुळाच्या पोळ्यांसाठी गूळ,किसत होत्या. किसण्याचे काम झाल्यावर त्यांनी किसणीखाली स्टीलचे ताट ठेवून त्या किसणीवर पाणी ओतले आणि म्हणाल्या दुपारपर्यंत हा किसणीला चिकटलेला गूळ विरघळून त्याचं पाणी होईल, मग मी ते आमटीसाठी वापरीन.
मला त्यांच्या काटकसरीपणाचं आणि कल्पकतेचंही कौतुक वाटलं.आता काही लोकांना या कृतीला ‘किती तो कर्मदरिद्रीपणा’ असं म्हणावंसं वाटेलही, पण उलटपक्षी मीच असं म्हणणाऱ्यांना विचारदरिद्री म्हणेन.
बटाटेवडे अथवा भजी करून झाल्यावर परातीला चिकटलेला पिठाचा, ओवा-मीठ- तिखट – कोथिंबीर-कांदा युक्त चविष्ट ऐवज, सिंकस्वाहा करण्याऐवजी, विसळून आमटीत ढकलावा,त्या आमटीची चव अप्रतिम लागते.
आणि ती आमटी यदाकदाचित उरलीच तर दुसऱ्यादिवशी थालीपीठार्पण करावी.काय जबरदस्त होतं त्या थालीपीठाचं. मुळात भाजणीचं थालीपीठ चविष्टच असतं पण उरलेल्या आमटीला पोटात आश्रय दिल्यावर थालीपीठ जणू कातच टाकतं.
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्मच्याही पलीकडे नेणारी एक ऋणजाण भावना आहे.ती, गुडघा गुडघा चिखलात भात लावणी करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल असेल.उन्हातान्हात राबणाऱ्या मजुराविषयी असेल.
पेरणी,लावणी,छाटणी, कापणी करणाऱ्या घट्टे पडलेल्या हातांबद्दल असेल.त्याहीपुढे, रात्रीबेरात्री वाहने चालवून शेतातील धान्य आपल्यापर्यंत वाहून आणणाऱ्या वाहन चालकांबद्दल असेल.ज्या रस्त्यांवरून ती वाहने धावतात तो तयार करणाऱ्या मजूरांबद्दल असेल.शेतातून सुरू होणारी ही ऋण-जाण-साखळी, वाटेतल्या अनेक कष्टकऱ्यांपासून ती अगदी पोळ्यावाल्या काकूंपर्यंत, नव्हे त्याहीपुढे भांडी घासणाऱ्या सखूपर्यंत येते. मला टाकलेल्या अन्नात हे सगळे चेहेरे दिसतात.
काही वर्षांपूर्वी ज्ञान प्रबोधिनी संस्थेत एका शिबीरात सहभागी झाले होते.त्यांच्या कॅन्टीनमध्ये गेले असता, तिथे मनाला भिडणारा एक श्लोक-संदेश भिंतीवर लावला होता :
वदनी कवळ घेता,नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते,आपुल्या बांधवांचे
कृषिवल कृषी करुनि,अन्न ते निर्मितात
कृषिवल कृषी कर्मी,राबती दिन – रात
स्मरण करून त्यांचे,अन्न सेवा खुशाल
उदर भरण आहे,चित्त होण्या विशाल.
जुनं-नवं, आमची पिढी-तुमची पिढी,यापलीकडे जाऊन,विविध मतभेद टाळून,निदान अन्न-ऋण-स्मरण या विषयावर एकमत व्हायलाच हवे, नाही का?
लेखिका :श्रीमती योगिनी श्रीनिवास पाळंदे
पुणे
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈